Thursday, May 13, 2010

दृष्टीचे कोन !!

काल संध्याकाळी घरी येण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो. नेहमीप्रमाणे ग्रिशम वाचायला घेतलं. तेवढ्यात मागून दोन माणसांचा मोठा आवाज ऐकू आला. ओरडल्यासारखा. आरडाओरडा नव्हता किंवा भांडणही नव्हतं. पण जरा भाषण दिल्यासारखं. न बघताच माझ्या लक्षात आलं की हे कोण असणार ते. इथे ट्रेन्स मध्ये,

प्लॅटफॉर्मवर, स्टेशनच्या बाहेर बरेचदा आफ्रिकन-अमेरिकन लोक उभे असतात. अगदी ढगळ आणि एकावर एक घातलेले भरपूर कपडे, गळ्यात जाड माळा, बोटांत भरपूर अंगठ्या, एका खांद्याला मोठ्ठी बॅग, हातात बायबल आणि तोंडाने "झिजस लव्हज यु" चा जयघोष. तसंच मधे मधे बायबलमधले उतारे वाचून दाखवतात. पण हे सगळं प्रचंड मोठ्ठ्या आवाजात, घशाच्या शिरा ताणून चालू असतं. तर हे दोघे त्यापैकीच एक असणार हे लक्षात आलं. पुस्तक वाचत असताना शेजारचे लोक मोठ्याने बोलत असतील तरी माझी चिडचिड होते आणि त्यात हे असे जयघोष करणारे लोक आपल्याच डब्यात आले की ती चिडचिड शिगेला पोचते. पुढच्या स्टेशनला डबा बदलणे किंवा शांतपणे सहन करणे हे दोनच पर्याय असतात. पण माझा जाम इंटरेस्टिंग चाप्टर चालू होता आणि तो वाचल्याशिवाय चैन पडलं नसतं म्हणून पुढच्या स्टेशनला डबा बदलू असं ठरवून मी तसंच वाचायला लागलो.

त्या दोघांची बडबड चालूच होती. अचानक ते क्षणभर थांबले आणि एकदम मृदुंगाची थाप ऐकू आली आणि त्याच्या मागोमाग झांजेचा मंजुळ आवाज. काहीतरी वेगळं आहे हे जाणवतंय तोवर पुन्हा ग्रिशमने ताबा घेतला. आणि अचानक अमेरिकन अक्सेंटमध्ये "हरे राम्मा हरे राम्मा हरे क्रिश्ना हरे क्रिश्ना" सुरु झालं. सलग दोन वेळा ते म्हणून झालं की पुढच्या ओळींना चाल बदलत होती. असं सतत चालू होतं. आता मात्र मला राहवेना. मी मान वळवून बघितलं. साधा पांढरा झब्बा आणि (चक्क) धोतर अशा वेशात दोन आफ्रिकन-अमेरिकन माणसं बसली होती. दोघेही साधारण पंचेचाळीस-पन्नाशीचे वाटत होते. एकाच्या हातात मृदुंग होता आणि एकाच्या हातात झांजा. दोघेही इस्कॉन वाले असणार नक्की. तोंडाने सतत "हरे राम्मा हरे क्रिश्ना" चालूच होतं. वेगळं वाटत होतं ऐकायला. पण मी 'आर्ट ऑफ लिव्हिंग' च्या मंडळींची भजनं ऐकली आहेत अनेकदा. त्यामुळे 'राम्मा, क्रिश्ना' च्या उच्चारांचं काही वाटलं नाही. ते वेगवेगळया चालीत, मृदुंग आणि झांजेच्या साथीने ऐकायला छान वाटत होतं.................  अचानक चमकलो !!!!!!!! 

क्षणभरापूर्वी त्या सुरुवातीच्या कोलाहालाला वैतागलेलो मी काही क्षणातच त्याचा आनंद घ्यायला लागलो होतो. कशामुळे हे? त्यांचं गाणं, भजन एवढं सुश्राव्य होतं का? नक्कीच नाही. मी धार्मिक, हिंदुत्ववादी आहे का? हो.. नक्कीच.. थोडाफार.. पण जोवर त्याच्याआगेमागे कट्टर, हाडाचा, जहाल वगैरे लागत नाही तोवरच. या "हरे राम्मा हरे क्रिश्ना" ऐवजी "झिजस लव्हज यु" असतं तरी मला ते तेवढंच आवडलं असतं का? सांगता येत नाही.. कारण ते मी ते हळुवार, मंजुळ आवाजात, आरडाओरड्याशिवाय कधीच ऐकलेलं नाही. निदान ट्रेन मध्ये तरी. आणि खरंच हळुवार, सुश्राव्य आवाजात असतं तरी आवडलं असतं का?? सांगता येत नाही. तेव्हा मला नक्कीच ग्रिशमच आपलासा वाटला असता... अचानक आपल्या मुंबईच्या ट्रेनमधली टाळ-मृदुंगाच्या संगतीने "जय जय राम कृष्ण हरी" करणारी भजनी मंडळी आठवली. सुरुवातीला काही दिवस त्यांची गाणी जरा तरी बरी वाटायची, पण हळूहळू त्या अशक्य कोलाहलाला कंटाळून जाऊन मी त्यांच्या डब्यापासून कसा लांब जाऊन बसायला (उभा राहायला) लागलो तेही आठवलं. तेही एक प्रकारचं (खरं तर मूळचं आणि आपल्याला जवळचं असणारं) "हरे राम्मा हरे क्रिश्ना"च. पण त्याच्यापासूनही मी पळून जाणंच पसंत केलं होतं. इथेही "झिजस लव्हज यु"वाल्या आरडाओरड्याचाही तिटकाराच वाटला कायम. पण हे "हरे राम्मा हरे क्रिश्ना" मात्र अगदी आवडलं वगैरे नसलं तरी छान वाटलं. कशामुळे? कल्पना नाही.. कोडंच आहे.

क्षणभराच्या त्या "हरे राम्मा हरे क्रिश्ना" ने हिंदुत्ववादी, धार्मिक, "झिजस लव्हज यु" व्हाया "जय जय राम कृष्ण हरी" असा प्रवास करत करत वेगवेगळया दृष्टीकोनातून विचार करायला भाग पाडलं.... कोडं मात्र उलगडलं नाही.. !!

30 comments:

  1. सोप्प उत्तर आहे...मायदेशाशी अजून(ही)जोडलेली नाळ. ...सुंदर झाली आहे पोस्त...एखादा फोटो काढायचा न...."मी धार्मिक, हिंदुत्ववादी आहे का? हो.. नक्कीच.. थोडाफार.." हे वाचून बर वाटल.....

    ReplyDelete
  2. आभार सागर.

    अरे मायदेशाशी नाळ अजूनही जोडलेली आहेच. पण मला आधीही ट्रेन मधल्या त्या कर्कश्श भजनांचा वीटच यायचा..

    >> धार्मिक, हिंदुत्ववादी आहे का? हो.. नक्कीच.. थोडाफार.." हे वाचून बर वाटल.....

    पण जोवर त्याच्या आगेमागे कट्टर, जहाल, हाडाचा वगैरे येत नाही तोवरच.. हे ही वाचलंस ना ? :)

    ReplyDelete
  3. पर्फेक्ट शिर्षक. खरेच कधीकधी आपल्याही नकळत आपला दृष्टिकोन बदलतो. मायदेशाशी संबंधीत काहीही नजरेस पडले नं की लगेच त्याकडे माझे मन ओढ घेऊ लागते.... Total biased opinion... :) ये कंट्रोलच नही होता....[ नेहमीच सगळं काही नावाजण्यासारखं नसतं हे कळत असूनही वळतच नाही....( अरेच्या! हे काय... लागण हो गयी रे...:)कंसबाबा की जय!)] कट्टर, जहाल, हाडाचा वगैरे येत नाही तोवरच..... एकदम १००% सहमत.

    ReplyDelete
  4. असाच अनुभव माझापण अंधेरी स्टेशनच्या ब्रिजवर अमेरिकन अकसेंटमध्ये भगवतगीतेचे श्लोक वाचत होते आणि ते विकत होते...खूप प्रस्थ आहे आंपल्या इथे यांच..असो पोस्ट बेस झालीय :)

    ReplyDelete
  5. आभार श्रीताई... मायदेशाशी संबंधीत होतं हे एक कारण होतंच आणि कदाचित अजून एक म्हणजे मी "झिजस लव्ज यु" ऐकायच्या मानसिक तयारीने बसलो असताना अचानक "हरे राम्मा हरे क्रिश्ना" ऐकू आलं म्हणूनही वाटलं असेल तसं.. :) !!

    >> नेहमीच सगळं काही नावाजण्यासारखं नसतं हे कळत असूनही वळतच नाही...

    हे तर अगदी अगदी खरं !!

    आणि हो.. बरं झालं कंसाची लागण लागली...!! कंसपंथात स्वागत ;-)

    ReplyDelete
  6. आभार सुहास. अरे हो त्या इस्कॉनचं भारी प्रस्थ आहे सगळीकडे.. इथे पण आणि भारतातही.
    आणि मुंबईत तर आहेच त्यांचं प्रस्थ पण मी हैद्राबादमध्ये असताना तिथेही बघितले होते हे अमेरिकन अक्सेंटवाले कृष्णभक्त :)

    ReplyDelete
  7. हे मात्रं एकदम खरं आहे.....परदेशात अस्लो की आपल्या देशातील काहीही किंवा देशाशी संस्कृतीशी जवळीक दाखवणारे काहीही(म्हणजे आपल्याच देशात आपल्याला न आवडलेली गोष्ट सुध्दा) दिसले की खूप भरून येतं आणि मायदेशाची आठवण येतेच. हेच काही वेळा महाराष्ट्राच्या बाहेरही अनुभवास येते. :-)

    ReplyDelete
  8. माझ्याबरोबरही हे अस होत कधी कधी माझ्या नकळत...नंतर विचार केल्यावर मला ते जाणवते..दॄष्टीचे कोन भारीच...

    ReplyDelete
  9. जीसस असो कि हरे क्रिष्ना, नवीन उत्पादनांसारखा प्रचार करणे वाईटच. लोकांना बोलावून बोलावून चर्च किंवा मंदिरात नेण्यात काय अर्थ आहे? बाकी पोस्ट मस्त आहे.

    ReplyDelete
  10. अपर्णा, अगदी खरं आहे. बाहेर गेल्यावर आपलं सगळंच आवडायला लागतं.. पण या प्रसंगात मला ते या कारणासाठी आवडलं का ते नक्की माहित नाही. म्हणून तसंच लेबल लावलंय आणि कोडं उलगडलं नाही असं म्हटलंय :)

    ReplyDelete
  11. देव, खरंय. असे प्रसंग घडतच असतात. पण आपल्या दृष्टीचे कोन किती आणि कसं टिपतात आणि किती किती अंशात फिरतात त्यावर अवलंबून आहे सगळं :)

    ReplyDelete
  12. आभार अभिलाष. (कुठल्याही) देवाचं एखाद्या विकाऊ वस्तुप्रमाणे मार्केटिंग करणं हे केव्हाही चूकच.. !!

    ReplyDelete
  13. मी सावरकरवादी आहे, त्यामुळे हिंदुत्वाची वेगळी व्याख्या आहे. म्हणून देवधर्म मी वेगळ्या नजरेने पाहतो. पण असाच फिरायला इथल्या इस्कॉनला गेलो होतो आणि तिथलं ते वातावरण एकदम भावलं.
    कदाचित आपली आपल्या देशाशी, आपल्या संस्कारांशी जोडली गेलेली नाळ आणि कदाचित हे परदेशी लोक आपल्या संस्कृतीला देत असलेल्या आदरामुळे कुठेतरी जागृत होत असलेला अभिमान ही सगळी कारणं असावीत.

    ReplyDelete
  14. तुझ्या नेहमीच्या लिखाणापेक्षा वेगळं पण तरीही अतिशय उत्तम पोस्ट...
    आता माझे मत, (वरचे ही माझेच मत आहे :D) केवळ विदेशात ऐकलेस म्हणुन तुला त्याचे नवल वाटले कदाचित.. नाहीतरी इथे लोकलमध्ये गाणार्‍यांना आपण कितीसं महत्व देतो. रोज ऐकशील तर कंटाळुन देखील जाशील बहुतेक.

    असो दृष्टीचा कोन आवडला.

    ReplyDelete
  15. Post kharech khoop chaan aahe...
    क्षणभराच्या त्या "हरे राम्मा हरे क्रिश्ना" ने हिंदुत्ववादी, धार्मिक, "झिजस लव्हज यु" व्हाया "जय जय राम कृष्ण हरी" असा प्रवास करत करत वेगवेगळया दृष्टीकोनातून विचार करायला भाग पाडलं.... कोडं मात्र उलगडलं नाही.. !! pratyek kode ulagadanyachi garaj astech ase naahi... ( thts wt I think...) Vegavegalya drushtikonatun vichar karun ashi kodi nirmaan karanyatch maja aahe...ti ulagadali naahit tari pharase kahi bighadat naahi...( Funda jastch zala na... ekdam aaji baai type....)

    ReplyDelete
  16. हेरंब..मस्त लिहिलंय! पण अचानक तुझ्या अपेक्षेला तडा जावून सुखद (?) धक्का बसल्याने नेमकं तुझ्या मनात...बुद्धीत किंवा हृदयात नव्हे, काय खळबळ झाली असेल ती प्रत्यक्षात कागदावर उतरवणं कठीण आहे खरं...

    त्यामुळे तुला पडलेले प्रश्न स्वाभाविक आहेत. ह्या तुझ्या विचारांच्या युद्धात तुलाच तुझ्याच्सोबत लढून उत्तरं मिळवावी लागतील (असे वाटते...) शेवटी काय... आपण सगळे तेच शोधतोय.

    मिळणार... फक्तं थांबायचं!!!

    ReplyDelete
  17. विद्याधर, मी कट्टर सावरकरवादी नाही. कट्टर नाही हे एवढ्याचसाठी कारण मला त्यांची काही काही मतं पटली नाहीत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान वादातीत आहे. ते नि:संशयपणे क्रांतिकारकांचे मेरुमणी आहेत. पण एखाद्याचा केवळ त्याच्या धर्मामुळे तिरस्कार करणं हे मला पटत नाही. अर्थात मो क गांधींप्रमाणे आपल्या धर्मातल्या लोकांना मुद्दाम दुजाभाव दर्शवून इतर धर्मियांना (निव्वळ ते इतर धर्माचे आहेत म्हणूनच) कुरवाळणं हे ही मला तितकंच अमान्य आहे... असो..

    संस्कारांशी जोडली गेलेली नाळ आणि कदाचित हे परदेशी लोक आपल्या संस्कृतीला देत असलेला आदर ही कारणं असतील कदाचित पण तरीही हीच भजनं मुंबईत ट्रेनमध्ये (भसाड्या आवाजात) गायली जातात तेव्हा आवडत नाहीत. सगळ्या कमेंट्स वाचून आणि त्यांन उत्तर देऊन मला आता हळूहळू असं जाणवतंय की कदाचित तो सुखद अपेक्षाभंग (जीझस च्या ऐवजी क्रिश्ना) हेच त्याचं कारण असावं.

    ReplyDelete
  18. धन्यवाद आनंद. कोडं हळूहळू उलगडतंय :) .. एक म्हणजे सुखद अपेक्षाभंग आणि दुसरं कारण म्हणजे ते गाणं तुलनेने हळुवार आवाजात चालू होतं. म्हणजे ट्रेन मधेही हळुवार आवाजात गाता येतं हे तोवर माहीतच नव्हतं कारण कधी ऐकलंच नव्हतं :)

    ReplyDelete
  19. आभार मैथिली. अग काहीतरी सांगायचं होतं पण काय सांगायचं होतं ते आठवलं नाही किंवा एखादी चाल गुणगुणतोय पण गाण्याचे बोल काही केल्या आठवले नाहीत तर झोप न लागणारा माणूस मी. एवढं कोडं पडलं आणि ते न उलगडता झोप लागणं अवघडच होतं. पण जरा विचार करून, कमेंट्स वाचून आणि त्यांना उत्तरं देताना उत्तरं मिळालं (असं वाटतंय. बरोबर की चूक माहीत नाही.) .. आनंदच्या प्रतिक्रियेला उत्तरं देताना लिहिलंय बघ.

    ReplyDelete
  20. आभार नेहा. खरं तर छोटे छोटे प्रश्न आणि उगाचंच डोक्याला एवढे ताप देऊन जातात असं वाटतं. पण तेच शोधत रहायला पण मजा येते. तसंच काहीसं झालं असावं. असो :-)

    ReplyDelete
  21. Aplya saglyanchyach manat ase kahitari prashn astatach. kadhi ughadpane te bolata yetat kadhi nahi. anekda asha kodyanchi apsukch ukal hotehi kinva dusryanchi mat aplyala vichar karayla bhag padtat ani tya vicharatunch yogya vat sapdtehi. vicharancha pravah asach akhandpane chalu rahto he matra satya ahe.

    ReplyDelete
  22. रूप, अगदी बरोबर. त्या दहा मिनिटांत मी किती वेगवेगळे विचार केले, फटाफट किती ट्रॅक्स बदलले हे आठवून माझं मलाच हसू आलं नंतर. तेव्हा उत्तरं मिळालं नाही पण आता थोडंसं लक्षात आल्यासारखं वाटतंय. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा नेहमी.

    ReplyDelete
  23. हेरंबा,
    जरा विषयापासून तेही थोडा उशीरा भरकटतोय. पण,
    >>पण एखाद्याचा केवळ त्याच्या धर्मामुळे तिरस्कार करणं हे मला पटत नाही.
    हे वाक्य वाचून माझ्या काळजाला घरं पडलीत.
    सावरकर हे कॉन्ग्रेसच्या निगेटीव्ह मार्केटींगचे किती मोठे बळी आहेत हे माझ्या आज पुन्हा लक्षात आलं. त्यांच्या आपल्याच माणसांनी त्यांचं माहात्म्य ओळखू नये, ह्यापरतं दुर्दैवी काहीच नाही.
    तू जे म्हटलंस ते सावरकरांनी कधीच केलं नाही, उलट ते कायम हिंदूसोबतच मुसलमान धर्माचे आणि सर्वच धर्मांचे क्रिटिक होते.त्यांचा धर्म ह्या प्रकाराबद्दल फार वेगळा, मानवतावादी आणि वैज्ञानिक असा दृष्टीकोन होता. हे सर्व मी त्यांचा फॅन आहे म्हणून सांगत नाही. मी त्यांचं काही साहित्य वाचलंय आणि सध्या वाचतोय.
    त्यांना हिंदू ही पॉलिटिकल आयडेंटिटी म्हणून अभिप्रेत होती. सिंधूच्या काठी ज्यांचे पूर्वज ते हिंदू असं त्यांचं मत होतं. त्यांनी स्वतःच्या मुलांच्यादेखील मुंजी केल्या नव्हत्या.
    त्यांचं एकच मत होतं. कोणी कट्टरता करत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत धडा शिकवावा. आणि हे मला पूर्ण मान्य आहे.
    जर सावरकर धर्मामुळे कुणाचा तिरस्कार करत असते तर तुर्कस्तानच्या केमालपाशावर स्तुतीपर निबंध त्यांनी कधीच लिहिला नसता. केमालपाशा हे माझं अजून एक श्रद्धास्थान आहे. तो अतिशय धार्मिक मुस्लीम होता, पण त्याने तुर्कस्तानातून कट्टरता हद्दपार करून ९०% मुस्लिम देशाला धर्मनिरपेक्ष लोकशाही बनवलं.
    "आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय"..ह्या मुसलमानांना दिलेल्या संदेशातून काय प्रतीत होतं?
    सावरकर आणि कट्टरतावाद ह्यांचं काहीच नातं नाही. पण मजा बघ..मी कट्टर सावरकरवादी आहे.
    असो, प्रतिक्रिया उगाच लांबली. पण मी त्यांचा अजून थोडा अभ्यास करून, लवकरच एक नीट पोस्ट करीन.
    एव्हढ्या मोठ्या प्रतिक्रियेबद्दल सॉरी. ;)

    ReplyDelete
  24. या विषयावर इथे बोलता येणार नाही आणि प्रतिक्रिया उगाच मोठ्या होत जातील. तुला मेल करतोय :)

    ReplyDelete
  25. अगदी सहाजिक आहे, लहानपणापासून ऐकलेली भजनं अनपेक्षित पणे ऐकायला मिळाली की नक्कीच छान वाटत असेल.
    इथे पण कोणाला विदर्भातली बोली बोलतांना ऐकलं की खूप बरं वाटतं, आणि काही संबंध नसला तरीही गप्पा माराव्याशा वाटतात.

    ReplyDelete
  26. हो काका. तो अनपेक्षित सुखद धक्का हेच कारण असणार.. इथेही ट्रेन मध्ये, रस्त्यावर कोणी मराठी बोलताना ऐकू आलं की साहजिकच नजर वळते..

    ReplyDelete
  27. मस्त झाली आहे पोस्ट..
    तुझ्या जागी मी असतो तर ...
    मलाही नसते सुटले हे कोडे ..
    धर्म वगैरे राहूदे मला इथे आवड महत्वाची वाटते ...
    येशूचा जप जर मधुर गाण्यातून असता तर आवडला असता नाही का ??

    ReplyDelete
  28. Tu busy aahes ka sadhya..? majhya blog warachi khadadi warachi post vachali nahis ka tu..?
    [ tujha comment shivay post lihilyache sarthak zale ase vatat nai mala ;) mhanun mag ase tuzya blog war yeun lihave laagate. tula vatat asel kay hi mulgi mazya blog war satat svatachya blog chi jahiraat karat aste mhanun mi itke diwas vaat pahili tuzya comment chi pan tu aalach nahis.. :( ]

    ReplyDelete
  29. आभार बायनरी बंड्या... !!

    हो ना कधी कधी सोप्प्या गोष्टी उगाच अवघड कोडी घालून जातात. मला वाटलं 'अनपेक्षित सुखद धक्का' हेच कोड्याचं उत्तर असावं. :)

    ReplyDelete
  30. अग बिझी होतोच थोडा. माझा ब्लॉग पण झोपला आहे गेले ५ दिवस आणि दुसरं कारण म्हणजे मला तुझी पोस्ट दिसलीच नाही मब्लॉ वर.. त्यामुळे राहून गेली वाचायची. never mind, आता फॉलो केलाय तुझा ब्लॉग. आता लगेच अपडेट्स मिळायला लागतील. :)

    >> tujha comment shivay post lihilyache sarthak zale ase vatat nai mala ;)

    माझ्या वारंवार हरभर्‍याच्या झाडावरून पडण्याला सगळ्यांत जास्त तू जवाबदार आहेस ;-)

    बादवे, कमेंटलोय तुझ्या पोस्टवर :)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...