Friday, April 30, 2010

उत्तर : भाग-४ (अंतिम)


--------
अ  पेक्षा 


--------

चिठ्ठी पूर्ण कोरी होती फक्त पानाच्या मध्यभागी 'अ  पेक्षा' असं लिहिलं होतं. मला काहीच कळलं नाही. मी तडक दादांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना ही आनंदाची बातमी द्यायची होती. तेव्हाच त्या मजकुराचा  अर्थही विचारू असं ठरवलं. 

**

"दादादादा"

"अरे कोण देवेशये ये.. बस. कसा आहेस ?"

"दादा माझं प्रोजेक्ट त्या कंपनीला खूप आवडलं. त्यांनी त्यांच्या योजनेसाठी माझ्या प्रोजेक्टची निवड केली आहे. मला पुढची बोलणी करण्यासाठी पुढच्या आठवड्यात बंगलोरला जायचं आहे. खूप खुश आहे मी दादा खूप खुश आहे."

"अरे वा. उत्तम. अभिनंदन."

"दादाअजून एक. मी तुम्ही दिलेली चिठ्ठी उघडली. पण मला काही नीट कळलं नाही. समजावून सांगाल प्लीज?"

"पुन्हा वाच काय लिहिलंय ते" दादा मंदस्मित करत म्हणाले.

"अपेक्षा" मी पुन्हा गोंधळून जाऊन म्हंटलं.

"आठवतंय मी तुला काय सांगितलं होतंतू जेव्हा यशस्वी आहेस असं तुला पटेल तेव्हाच तू चिठ्ठी उघडायचीस. तू आत्ता चिठ्ठी उघडली आहेस म्हणजे तू यशस्वी आहेसआनंदी आहेस हे मान्य आहे तुला?"

"हो आहे."

"पण तुला माहित आहे का की हा आनंदहे यश चिरकाल टिकत नाही. आपण ते टिकूच देत नाही. कारण आपला स्वभाव. आता तुझं हे प्रोजेक्ट यशस्वी झालं आहे. तू आनंदात आहेस. पण कालांतराने आपल्या अपेक्षा वाढू लागतातआपल्याला वाटू लागतं की त्या अमक्यातमक्याकडे माझ्यापेक्षा चांगली गाडीचांगलं घरचांगली नोकरी/धंदा आहे. त्याच्या मानाने मी तर काहीच नाही. आणि असा विचार करून आपण आपलाच आनंदसमाधान आपल्या हातांनीच गमावून बसतो. आणि जे दुसर्‍याकडे आहे पण आपल्याकडे नाही असं आपल्याला वाटतं ते मिळवण्याच्या मागे धावू लागतो. ही धावाधाव अविरत असते. कधीच न संपणारी. कारण आपल्या अपेक्षा कधीच संपत नाहीत. इतक्या की होता होता त्या अपेक्षा बदलून लोभाचं, हावेचं रूप घेतात. आपल्याला लोभी बनवून जातात. ही हावहा लोभ कधीही न संपणारा असतो. पण आपल्याला ते कळतच नाही....
एक सांगू? ? तू माझ्याकडे आला होतास तेव्हाही तू सुखीयशस्वी होतासच. फक्त तुला त्याची जाणीव नव्हती किंवा तू ते विसरला होतास इतकंच. तू जेव्हा सीए झालास, जेव्हा तुला पहिली नोकरी मिळालीजेव्हा तू नोकरी सोडून व्यवसायात उतरायचं ठरवलंस, जेव्हा व्यवसाय प्रत्यक्ष सुरु केलास त्या त्या प्रत्येक क्षणी, हरेकक्षणी तू यशस्वी आणि आनंदी होतास. आणि तेही पूर्वीपेक्षा जास्तच. त्या प्रत्येक क्षणी मी तुला जर ती चिठ्ठी दिली असतीस तर तू "होय मी आत्ता सगळ्यात यशस्वी आहे" असं म्हणून ती उघडली असतीस. मला खात्री आहे. बघ नीट विचार करून. त्या प्रत्येक क्षणी तू यशस्वी होतासच... नव्हतास तो फक्त समाधानी. 
अर्थात सुखीसमाधानी रहायचं म्हणून "आहे त्यात सुख मानून नवीन ध्येये शोधू नयेतकुपमंडूक वृत्तीने जगत रहावं, 'ठेविले अनंते' किंवा 'असेल माझा हरी' अशा अविर्भावात जगावं" असं मी अजिबात म्हणत नाहीयेकदापिही म्हणणार नाही. नवीन यशासाठी नवीन प्रयत्न हे केलेच पाहिजेत. पण डोळे उघडे ठेवून. सुखयश किंबहुना प्रत्येक गोष्ट सापेक्ष असते. फार कशाला...  अरे अगदी दु:खही सापेक्ष असतं. तुमच्यापेक्षा अधिक दु:खी असणारा माणूस दिसला की तुम्ही आपोआपच त्याच्यापेक्षा सुखी ठरता. नाही का? त्या बिरबलाच्या रेघेसारखं.. !! म्हणून तुलना करायची असेल तर आपल्यापेक्षा दु:खी लोकांशी कर. त्यांना सुखी कसं करता येईल ते बघ. अर्थात यशाची तुलना आपल्यापेक्षा जास्त यशस्वी लोकांशी करणं उत्तमच पण ते प्रेरणा घेण्यासाठी. त्यातून वैफल्य येता कामा नये. न्यूनगंड निर्माण होता कामा नये. परंतु दुर्दैवाने लोक आपल्यापेक्षा अधिकाधिक यशस्वी माणसं बघून त्यांच्या यशाने गांगरून जाऊन आपल्या अपेक्षाइच्छाआकांक्षा वाढवून ठेवतात आणि मग छोट्या छोट्या अपयशाने उध्वस्त होऊन जातात आणि नशिबाला किंवा असाच उगाच कोणाला तरी बोल लावत रहातात. तू मला जेव्हा पहिल्या वेळी भेटायला आला होतास तेव्हा आठवतंय तू किती निराश होतास, किती खचलेला होतास ? कारण अजून अजून यशाच्या अपेक्षेत तू तोवर कमावलेलं यश विसरला होतास. दुर्दैवाने पुढच्या वेळी जर असा प्रसंग आलाच तर तेव्हा तू तुझं आजचं यश विसरू नको. तू सुखी होतास, आनंदी होतास हे विसरू नकोस. आणि एक लक्षात ठेव हे असे प्रसंग वारंवार येणारच पण त्याला तू अपयश मानतोस की आव्हान समजतोस यावर निकाल अवलंबून आहे.

तात्पर्य, त्या चिठ्ठीत सांगितल्याप्रमाणे 'अपेक्षामधला 'काढून टाक आणि उरलेला 'पेक्षाहा मी कोणा 'पेक्षा' किती अयशस्वीदु:खी आहे हे बघण्यापेक्षा कोणा 'पेक्षा' किती 'सुखीआनंदीयशस्वीसमाधानीआहे हे बघण्यासाठी वापर. जे तुझ्यापेक्षा दु:खी आहेत त्यांना तुझ्यापेक्षा सुखी करण्याच्या प्रयत्नाला लाग. यशसमाधान अजून वेगळं काय हवं मग?" 

मी भारावून जाऊन ऐकत होतो. खरंच हा एवढा विचार मी कधी केलाच नव्हता. उगाच स्वतःची दु:ख कुरवाळत बसण्याची सवय लागली होती मला....... !!! तेवढ्यात मला काहीतरी आठवलं.

"दादाअजून एक. त्या दिवशीही आणि आजही जे जे लोक तुम्हाला भेटून बाहेर येतात त्यांच्या हातात मी तुम्ही मला दिलीत तशी चिठ्ठी बघितली. काय असतं त्या प्रत्येक चिठ्ठीत?."

 "तुला काय वाटतं?" दादा पुन्हा मंदस्मित करत उत्तरले. त्यांच्या प्रश्नातच त्यांचं (आणि माझंही) उत्तर दडलेलं होतं !!! 

--  समाप्त.

Thursday, April 29, 2010

उत्तर : भाग-३

भाग-१ इथे वाचा.
भाग-२ इथे वाचा.भर दुपारी २ वाजता दार वाजून झोपमोड झाली की की जो एक संताप होतो त्या संतापात मी दार उघडलं. आणि त्यात पुन्हा हा लंगडा पाय. म्हणजे तसा अगदी बरा होतो आता. थोडं लंगडणं सोडलं तर... माझ्या ऑफिससंबंधीच्या कामाचं एन्व्हलप आलं होतं. ऑफिसच्या कामाचं एन्व्हलप? आणि तेही घरच्या पत्त्यावर? कसं शक्य आहे? मला जरा आश्चर्यच वाटलं. मी बंगलोरहून परत आल्यानंतर मानसिकदृष्ट्या एवढा खचून गेलो होतो की मी जवळपास तीन आठवडे माझ्या त्या 'वन मॅन आर्मी' वाल्या ऑफिसच्या दिशेने फिरकलोही नव्हतो. मूडच लागत नव्हता. "त्यामुळे कदाचित घरी आलं असेल पत्र" असा विचार करून सही करून मी ते एन्व्हलप हातात घेतलं आणि उघडलं. बघतो तर आतून दोन पत्रं  बाहेर पडली. हा काय प्रकार आहे? जरासं गोंधळूनच मी त्यातलं एक पत्र उचललं आणि उघडून वाचायला लागलो. 

-------------------------------

श्री. देवेश रमानाथ राजे,

आपण पाठवलेल्या प्रोजेक्टचे तपशील आणि प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला मिळाले. आमच्या 'सर्वांसाठी संगणक' या नवीन योजनेसाठी आम्ही आपल्या प्रोजेक्टची निवड करत आहोत. सविस्तर चर्चेसाठी आणि इतर प्रक्रियांसाठी येत्या महिन्याच्या एक तारखेला आमच्या बंगलोर ऑफिस मध्ये येऊन भेटणे.

आपले कृपाभिलाषी,
संचालक,
'सर्वांसाठी संगणक' योजना

-------------------------------

माझा क्षणभर स्वतःवर विश्वासच बसेना. हे काय चाललंय, काय घडतंय काहीच कळत नव्हतं. मी आनंदाने वेडापिसा झालो होतो. जोरजोरात नाचावंसं, ओरडावंसं वाटत होतं. एका बोटभर चिठ्ठीने माझं आयुष्यच बदलून टाकलं होतं. थोड्या वेळाने भानावर आल्यावर "त्यांना माझा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा मिळाला? कुठून मिळाला?" असे प्रश्न पडले. काहीच कळत नव्हतं.. आणि ही दुसरी चिठ्ठी कशासाठी? त्यात काय आहे?.... या पहिल्या चिठ्ठीतला मजकूर तुमच्यासाठी नाही. ती चिठ्ठी तुम्हाला नजरचुकीने पाठवण्यात आली आहे" अशा तर्‍हेचा काही मजकूर असेल का त्यात असे वेड्यासारखे विचारही क्षणभर मनात येऊन गेले.

घाबरतच दुसरी चिठ्ठी उघडली.

दुसरी चिठ्ठी शुद्ध मराठीत होती.

-------------------------------

प्रिय देवेश,

मी देवदत्त रमाकांत राजे. 'सर्वांसाठी संगणक' योजनेचा संचालक. आपल्यात असलेल्या वयाच्या अंतरामुळे मी तुला अरे-तुरे संबोधण्याचं स्वातंत्र्य घेतो आहे. मला तुझा प्रोजेक्ट रिपोर्ट, तुझी कल्पना, मांडणी हे सगळं खूप आवडलं. त्यामुळे मी तुझ्या प्रोजेक्टची निवड आमच्या कंपनीच्या 'सर्वांसाठी संगणक' योजनेसाठी केली आहे. तसं मी तुला पहिल्या पत्रात कंपनीच्या ऑफिशियल लेटरहेडवर लिहिलेलंच आहे. ते ऑफिशियल लेटर मी आधी तुझ्या कंपनीच्या पत्त्यावर पाठवलं होतं. तेही दोन वेळा. पण दोन्ही वेळा ते घ्यायला तिथे कोणीच नसल्याने ते माझ्याकडे परत आलं. तुझ्या ऑफिसच्या नंबरवर फोन केला असता तोही कोणी उचलत नव्हतं. 

म्हणून मग तुझ्या लॅपटॉप बॅगमध्ये थोडी शोधाशोध केली. त्याबद्दल क्षमस्व. त्यात मला तुझा घरचा पत्ता सापडला. म्हणून पत्र तुला घरच्या पत्त्यावर पाठवत आहे. तुझी 'लॅपटॉप बॅग माझ्याकडे कशी आली?' वगैरे एकेका प्रश्नाचं उत्तर देण्यापेक्षा सगळं काय नि कसं झालं आणि झालं असावं ते पहिल्यापासून सांगतो.

तू मुंबईहून बंगलोरला ज्या विमानातून आलास त्याच विमानात मीही होतो. मुंबई ऑफिसमधल्या माझ्या विकेंडच्या अर्जंट मीटिंग्स संपवून मी बंगलोरला येत होतो. सुदैवाने त्यादिवशीच्या अपघातात मला विशेष काही अपाय झाला नाही. फक्त खांद्याला थोडासा मुका मार लागला होता. त्यामुळे मला हॉस्पिटलमधून एका दिवसात डीसचार्ज मिळाला. घरी आल्यावर एक दिवस आराम करून मी दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्ये रुजू झालो. दोन दिवसांनी एअरलाईन्सच्या लोकांनी मला माझं सामान ऑफिसच्या पत्त्यावर पाठवून दिलं. खरं तर माझी एकच केबिन बॅग होती परंतु त्यांनी मला दोन बॅग्ज पाठवल्या होत्या. कदाचित नजरचुकीने झालं असेल म्हणून मी दुसर्‍या बॅगवरचं नाव बघायला म्हणून गेलो तर त्या बॅगवरचं तुझ्या नावाचं लेबल फाटून गेलं होतं आणि तिथे नुसता दोरा लटकत होता. पण लॅपटॉप बॅगच्या उजव्या तळाच्या कोपर्‍यात मला मार्करने ठळक अक्षरांत लिहिलेलं "Mr. D. R. Raje" असं दिसलं. एअरलाईन्स कंपनीला तुझ्या बॅगवर पत्ता न दिसल्याने अद्याक्षरांच्या साधर्म्याने त्यांनी चुकून तीही माझीच बॅग समजून माझ्या पत्त्यावर पाठवून दिली असावी. त्यामुळे ती बॅग ज्याची असेल त्याला पोचती करावी यासाठी पत्ता शोधण्याच्या उद्देशाने मी ती उघडली. बघतो तर आतल्या फाईलवर मला "प्रोजेक्ट रिपोर्ट : सर्वांसाठी संगणक" असं दिसलं. न राहवून मी ती फाईल उघडली आणि रिपोर्ट वाचून काढला. पुढचं सगळं तर तुला माहित आहेच. हे सगळं ऑफिशियल पत्रात लिहिणं अर्थातच शक्य नसल्याने आणि तू आमच्याबरोबर काम करावंस असं मनापासून वाटत असल्याने तुला हे वेगळं पत्र लिहिलं. लवकरच भेटू.

आपला,
श्री. देवदत्त रमाकांत राजे

---------------------------

आनंदातिशयाने माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हता. खरंच वेड लागायची पाळी आली होती. मी खूप खुश झालो होतो. क्षितीज हातात आल्यासारखं वाटत होतं. किती वर्षांनी मी यशाची चव चाखत होतो. आणि अचानक मला दादांच्या चिठ्ठीची आठवण झाली. ती अजूनही त्या पुस्तकात तशीच पडून होती. मी धावतच जाऊन ती चिठ्ठी उघडली. "तुला ज्याक्षणी वाटेल की  'मी यशस्वी आहेतेव्हाच उघडायची ही चिठ्ठी. तोवर नाही." दादांचे शब्द कानात घुमत होते. हो. मी यशस्वी होतोच आता. त्यामुळे आता चिठ्ठी उघडायला काहीच हरकत नव्हती. नुकत्याच उघडलेल्या दोन चिठ्ठ्यांतून मला इतक्या अप्रतिम बातम्या मिळाल्या होत्या. या तिसर्‍या चिठ्ठीत काय असेल बरं असा विचार करतच मी ती चिठ्ठी उघडली.-- पुढचा भाग येतोय लवकरच !!


- भाग ४ अर्थात अंतिम भाग इथे  वाचा.

Wednesday, April 28, 2010

उत्तर : भाग-२


"पण?"

"पण मला कळत नाहीये की मी उद्या जाऊ की नको. म्हणजे गेल्यावर मला माझं प्रोजेक्ट त्यांना नीट समजावून सांगता येईल की नाही? इतर प्रोजेक्ट्स, त्यांच्या कल्पना, त्यांचे रिपोर्ट्स, त्यांची निरीक्षणं माझ्यापेक्षा चांगली असली तर? माझं हे असंच होतं नेहमी. अपयशाची भीती वाटत राहते. भरपूर अपयश बघितलंय मी. व्यक्तिगत आयुष्यातलं अपयश, नोकरीतलं अपयश, आता धंदा करायला घेतला तर त्यातही अपयश. नाहीतर इतर लोक कसे दणादण यशाच्या पायर्‍या चढत जात असतात. माझ्यापेक्षा तुलनेने कमी कुवतीचे, कमी हुशारी कमी ज्ञान असलेले, बेफिकीरीने जगणारे अनेक लोक मला माहित आहेत. पण त्यांनी हा हा म्हणता मला मागे टाकलं. बघता बघता माझ्यापेक्षा यशस्वी झाले, माझ्यापेक्षा श्रीमंत झाले. एक साधासा व्यवसाय यशस्वी होण्याचं स्वप्न पाहणं, तशी अपेक्षा ठेवणं हे खरंच एवढं मोठं आहे का? चूक आहे का? अव्यवहारी आहे का?"

बराच वेळ मी अशीच काहीशी निराशेने भरलेली बडबड करत होतो. आत साठलेलं मोकळं करत होतो. मनातली सगळी मळमळ व्यक्त करून मी थांबलो. एवढं सगळं ऐकूनही दादा शांतच होते.

"दादा, मला एकच सांगा.... मिळेल का मला हे प्रोजेक्ट?" मी शेवटी एकदाचं विचारलं.

दादांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. पण क्षणभरच. त्यानंतर पुन्हा पूर्वीचा तो मृदू भाव त्यांच्या चेहर्‍यावर परत आला.

"हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. मी काही कोणी ज्योतिषी, ज्ञानी, भूत-भविष्य जाणणारा बाबा वगैरे नाही. फार तर तुला बरं वाटावं म्हणून तुझ्या प्रश्नाला 'हो' असं खोटंच उत्तर देईन हवं तर. पण ते काही खरं नाही, योग्यही नाही आणि मला ते पटतही नाही. सध्या तरी तुझ्यासाठी मी हे एवढंच करू शकतो."

असं म्हणत त्यांनी ती पानाची पेटी उघडली. आणि त्यातून एक चिठ्ठी काढली आणि माझ्या हातात दिली.

**

मी पुस्तक उघडलं आणि तेवढ्यात त्यातून खुण म्हणून ठेवलेली चिठ्ठी बाहेर पडली. 'ती' चिठ्ठी आत्ता इथे समोर बघून माझे डोळे भरून आले. न राहवून मी चिठ्ठी उघडायला गेलो. पण तेवढ्यात दादांनी सांगितलेलं आठवलं.

"या चिठ्ठीत एक निरोप आहे तुझ्यासाठी. तुला पुढच्या आयुष्यात कसं वागावं हे समजावून सांगण्यासाठी. पुन्हा अपयश, पराभव पदरी आले तर त्यातून मार्ग काढण्यासाठी. पण अट एकच. ही चिठ्ठी तू आत्ता उघडायची नाहीस. तुला ज्याक्षणी वाटेल की  'मी यशस्वी आहे' तेव्हाच उघडायची ही चिठ्ठी. तोवर नाही."

हातातोंडाशी आलेलं मोठ्ठं प्रोजेक्ट आणि त्याबरोबरच आत्मविश्वासही गमावलेला, हातपाय प्लास्टरमध्ये घातलेल्या अवस्थेत या हॉस्पिटलमधून सुटण्याची वाट बघत असलेला माणूस कधी सुखी असेल का? मी सुखी शब्दापासून अनंत योजनं दूर होतो. अर्थातच मी चिठ्ठी उघडली नाही.

**

"गुड मॉर्निंग" संजू म्हणाला.

बातमी कळल्या कळल्या मिळेल त्या विमानाने संजू बंगलोरमध्ये आला होता. पहिल्या दिवशी मी दिवसभर गुंगीतच होतो तेव्हा तो येऊन मला बघून गेला होता. मला आयसीयूमधून बाहेर काढलं की मग भेटायला या असं डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं. आयसीयूमधून दोन दिवसांनी बाहेर आणण्यात येईल असंही सांगितलं होतं.

"कळलं काही सामानाचं ???"

"नाही रे. मी एअरपोर्टवर आणि त्या एअरलाईन्सच्या ऑफिसमध्ये दोन दिवस खेपा घालतोय. त्यांना तुझं काहीही सामान मिळालेलं नाही."

"कसं शक्य आहे? सगळ्यांचं सामान मिळतं माझंच मिळत नाही असं कसं होईल? अरे त्यात माझा लॅपटॉप, प्रोजेक्ट रिपोर्ट असं सगळं होतं रे. तो प्रोजेक्ट रिपोर्ट मिळाला नाही तर माझी इतक्या महिन्यांची अविश्रांत मेहनत वाया जाईल. आणि पुन्हा पुढे काय करायचं हा प्रश्न आ वासून उभा आहेच. श्या. नॉनसेन्स... !!!!! मी त्या पुस्तकाबरोबरच माझा प्रोजेक्ट रिपोर्टही माझ्या ब्लेझरच्या खिशात ठेवायला हवा होता."

"अरे तुला माहित होतं का की असं काही होणार आहे म्हणून? उगाच त्रास करून घेऊ नकोस. आपण बघू काय करायचं ते."

काहीही करता येणार नाहीये हे आम्हाला दोघांनाही माहित होतं त्यामुळे कोणीच काही बोललं नाही. कारण आता आधी सामान शोधा, त्यात प्रोजेक्ट रिपोर्ट शोधा, तो नाही मिळाला तर घरच्या पीसी वरच्या अपुर्ण आणि रफ कॉपीवरून पुन्हा नवीन रिपोर्ट तयार करा, आणि हे एवढं सगळं झाल्यावर पुन्हा क्लायंटची नवीन अपॉइंटमेंट घ्या, ते ही त्यांनी पुन्हा भेटायची तयारी दर्शवली तर. आणि तेही हे सगळं होईपर्यंत त्यांनी बाकीच्या प्रोजेक्ट्स मधून एखादं प्रोजेक्ट शॉर्टलिस्ट केलं नसेल तर. नाहीतर मग संपलंच सगळं. 'संपलंच' नाही खरोखर सगळं 'संपलंच' होतं !!

-- पुढचा भाग लवकरच..

- भाग ३ इथे  वाचा.

Tuesday, April 27, 2010

उत्तर : भाग-१

मुंबई विमानतळावरून सकाळी सातचं विमान, साडेआठला बंगलोरला उतरणार, कॅब पकडून 'आय टी  व्हिला' ला पोचायला जास्तीत जास्त अर्धा तास--वाईट ट्रॅफिक धरून एक तास--तरी दहाच्या मीटिंगसाठी मी साडेनऊपर्यंत मीटिंगच्या जागी पोचणार होतो. सगळा नेटका, चोख हिशोब होता. अजून पाचच मिनिटात विमान बंगलोर विमानतळावर उतरत असल्याची घोषणा झाली. मी हातातलं पुस्तक बंद करून ते ब्लेझरच्या खिशात ठेवून दिलं. आत ठेवताना त्यातल्या चिठ्ठीकडे लक्ष जाऊन मी थोडासा हसलो. माझं घड्याळ सव्वाआठची वेळ दाखवत होतं. अचानक काय झालं काय माहित. प्रचंड मोठ्ठा आवाज झाला. अख्खं विमान हलत होतं. सगळं सामान वरच्या कप्प्यातून धडाधड खाली पडायला लागलं, काही काही सीट्स उखडल्या गेल्या. सगळीकडून आरडाओरडा, किंकाळ्या ऐकू येत होत्या. मीही प्रचंड घाबरलो. काय करावं कळेना. तेवढ्यात माझ्या डोक्यावर प्रचंड जोरात येऊन काहीतरी आदळलं..

**

"हे औषध घ्या" सिस्टर माझ्या दंडाला हलकेच हलवून मला उठवत होती. मी अर्धवट डोळे उघडले आणि पुन्हा मिटले. जणु डोळे उघडण्याचे श्रमही मला जास्त झाले होते.

आणि अचानक आठवड्यापुर्वीचं ते विमान, धक्के, आरडाओरडा, प्रचंड आवाज माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेलं आणि नंतर डॉक्टरांनी सांगितलेलं सारं आठवलं. बंगलोर विमानतळावर विमान उतरताना काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि विमानाचं सेफ लँडिंग झालं नाही. अनेकजण जखमी झाले आणि तेही याच हॉस्पिटलमध्ये होते. पण जवळपास सगळ्यांनाच १-२ दिवसातच डीसचार्ज मिळाला होता. मोडका पाय आणि गळ्यात हात घालून घेऊन बसलेला मी एकटाच होतो.

"आणि हे पुस्तक. डॉक्टरांनी पुस्तक वाचायला परवानगी दिली आहे आता. म्हणून तेही आणलं. पण रोज जास्तीतजास्त एक तासच वाचायचं त्यापेक्षा जास्त नाही."

"सिस्टर, आठवणीने पुस्तक आणल्याबद्दल आभार. दुपारच्या वेळी खुपच कंटाळा येतो." माझ्या चेहर्‍यावरचं हलकं स्मित बघून सिस्टरही हसल्या.

मला जास्त वाचन न करण्याविषयी बजावून पुन्हा त्या निघून गेल्या.

मी पुस्तक उघडलं आणि तेवढ्यात त्यातून खुण म्हणून ठेवलेली 'ती' चिठ्ठी बाहेर पडली.

**

"दादा, नमस्कार. हा माझा मित्र देवेश. देवेश रमानाथ राजे."
"नमस्कार संजू... नमस्कार देवेश..."
"दादा, याला जरा प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही तो नक्की सोडवू शकाल म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो."
"अच्छा. बरं बरं. संजू, मी बोलतो देवेशशी. तू बाहेर बसलास तरी चालेल."
"बरं" म्हणून संजू उठला आणि बाहेर गेला.
"बोल देवेश. काय झालं? "
"दादा, खूप आशेने आलोय तुमच्याकडे. प्लीज मला मदत करा."
"पण काय झालंय आणि कशासाठी मदत हवीये हे कळल्याशिवाय मदत कशी करणार? काय ते सगळं सविस्तर सांग."
"ठीके दादा. सगळं तपशीलवार सांगतो. मी शिक्षणाने सीए आहे. चांगली नोकरी चालू होती. चांगला पगार होता. पण त्या नोकरीत आणि एकूणच त्या अकाउंटिंग प्रकारात मला विशेष रस वाटत नव्हता. मला बिझनेस करायचा होता. संगणकाशी संबंधित. कारण त्या व्यवसायात खूप पैसा आहे आणि मला स्वतःला संगणकाची खूप आवडही आहे. संगणकाच्या सुट्ट्या भागांचा व्यवसाय सुरु करायचा किडा एका मित्राने डोक्यात घुसवला. तो फार उत्तम, लाभदायक, कमी भांडवलाचा, कमी वेळ द्यावा लागणारा आणि या सगळ्याच्या तुलनेत इतर व्यवसायांच्या मानाने जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे असेही त्याने त्याच्या अनुभवावरून सांगितलं. त्याने माझ्या डोक्यात कल्पना घुसवली काय आणि ते मला शब्द न् शब्द पटलं काय आणि बघता बघता मी हातातली नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला काय. सगळंच स्वप्नवत. सुरुवात तर छान झाली. पण बघता बघता तेच स्वप्न एक दु:स्वप्न ठरायला लागलं होतं. मी कामात आळशीपणा किंवा टाळाटाळ करत होतो अशातला भाग मुळीच नव्हता. उलट मी नोकरीपेक्षा जास्त उत्साहाने काम करत होतो. जास्त वेळ देत होतो. जास्त मेहनत करत होतो. पण कुठेतरी काहीतरी मार खात होतं. आणि त्यात पुन्हा आलेली ही जागतिक मंदी, मोठमोठ्या कंपन्यांनी केलेली खर्चातली कपात या सगळ्याचा एकूण परिणाम आपोआपच संगणक क्षेत्रावर झाला. परिणामी माझ्यासारख्या नुकत्याच व्यवसाय सुरु केलेल्या छोट्या व्यावसायिकाची पार वाट लागली. बघता बघता तोटा वाढतच गेला. पण तरीही मी हार सोडली नाही. एवढा तोटा झाल्यावरही व्यवसाय चालू ठेवण्याचा निगरगट्टपणा फार कमी व्यावसायिकांकडे असेल. आणि त्या कमी व्यावसायिकांच्या ग्रुपचा मी आजीवन सभासद ठरेन कदाचित."

दादा त्यांच्या समोर ठेवलेल्या पानाच्या पेटीवर हात ठेवून बोटातल्या अंगठीशी चाळा करत एकटक मी बोलतोय ते ऐकत होते.

"अशात पेपरातली एक जाहिरात माझ्या नजरेस पडली. अमेरिकेत मुख्य ऑफिस असलेल्या एका मोठ्या कॉम्प्युटर बनवणार्‍या कंपनीची जाहिरात होती. ते जगातला सगळ्यात, म्हणजे अगदी अगदी स्वस्त कॉम्प्युटर बनवण्याचा प्रोजेक्ट हातात घेत होते. आणि त्या अनुषंगाने जर कोणाकडे कल्पना असतील, त्या कल्पनांना मूर्त रूप देऊन जर कोणी अगदी स्वस्त कॉम्प्युटर बनवू शकत असेल तर त्या संपूर्ण प्रोजेक्टचा खर्च ती कंपनी करणार होती. आणि त्या व्यक्तीला त्या प्रोजेक्टच्या नफ्यातला ५०% वाटाही देणार होती. तीन महिन्यांत प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करायचा होता. गेले कित्येक महिने संगणकाच्या सुट्ट्या भागांशी मी अक्षरशः खेळलो असल्याने अशा अनेक स्वस्त भागांपासून मी असा एखादा कॉम्प्युटर बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकेन असं मला वाटत होतं. आणि बघता बघता मी त्या दृष्टीने तयारीला लागलो. गेले तीन महिने मी बाकीचं कामधाम सांभाळून, प्रसंगी कामाकडे थोडं दुर्लक्षही करून हात धुवून या प्रोजेक्टच्या मागे लागलो होतो."

दादा डोळे मिटून शांतपणे ऐकत होते. मध्येमध्ये बोटातल्या अंगठीशी चाळा चालूच होता.

"आणि शेवटी एकदाचं त्या प्रोजेक्टचं डिझाईन तयार झालं आणि मी ते अगदी थोडक्यात त्यांच्या वेबसाईटवर टाकलं. आश्चर्य म्हणजे त्यांनाही ते आवडलं. तिथे सबमिट झालेल्या प्रोजेक्ट्स मध्ये निवडक १० प्रोजेक्ट्स त्यांनी निवडली आहेत. त्यातलं एक माझं प्रोजेक्ट आहे. त्यांनी मला उद्या सविस्तर चर्चेसाठी माझा फायनल प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन बंगलोरला बोलावलं आहे. तिथे त्या कंपनीच्या त्या प्रोजेक्टवरच्या एका मोठ्या अधिकार्‍याबरोबर उद्या माझी मीटिंग आहे. पण  ....."

-- क्रमशः

- भाग २ इथे  वाचा.

Friday, April 23, 2010

बोलू वाकुडे... कवतुके...


साल : २०११/१२ वगैरे
स्थळ : घर (अर्थात स्वतःचंच. उगाच दुसर्‍यांच्या घरात डोकावण्याची मला सवय नाही. आणि डोकावलो तरी त्यांच्या घरातले किस्से मी (ब्लॉगवर) सांगत नाही.)
वेळ : सो. ते शु. मधली कुठलीही संध्याकाळ.

दरम्यान : अशा प्रकारची सुरुवात यापूर्वीही (म्हणजे ते विचित्र साल वगळता) वाचल्यासारखी वाटत असेल तर आधीच सांगतो ती माझ्याच काही दिवसांपूर्वीच्या पोस्ट मधून साभार घेण्यात आलेली आहे. चिकित्सकांनी पृ.क्र. अमुक तमुक बघावे. (त्या जगभरातल्या गाण्यांच्या रोज नवनव्या चोर्‍या करणार्‍या प्रीतमची गाणी "वा वा" करत आवडीने ऐकता आणि मी माझीच जुनी सुरुवात उचलली तर चोरी म्हणता? न्याय राहिला नाही जगात !!)
दरम्यान संपलं.

तर मी उपरोल्लेखित सालात, उपरोल्लेखित स्थळी आणि अर्थातच उपरोल्लेखित वेळी प्रवेश करता झालो. कपडे बदलून, फ्रेश होऊन आलो तर राजपुत्र (ठकसेन) गाल फुगवून कोपर्‍यात उभा. काय झालं कळेना. मी जवळ गेलो आणि म्हटलं
"एय शोनुल्या, काय झ्यालं बालाला?"
स्वारी ढिम्म 
"ए मनुली, बोलत का नाईश ग तू"
तरी पुन्हा तेच
सारखं सारखं विचारून झाली, आमिषं दाखवून झाली. मग जरा वेळाने लेकाला कंठ फुटला.

"एय बाबा.. मी काय मुग्गी आये का ल्ये?"
"नाई ले. कोन म्हनतं अशं"
"कोन काय. तुच्य मनालाश की आत्ता. नेयमीच्य मनतोश.. ती आई पन नेयमी मनते"
"काय मनते" काहीतरी बिनसलंय हे ओळखून मी "काय म्हणतो" हे शिताफीने गाळून फक्त "काय म्हणते" असंच विचारलं.
"ह्येच. शगली मुग्गीची नावं. शोनुली, मनुली, शकुली आनि ये अशच काय काय त्ये."


ठक.. क्लिक.. त्या कॉमिक्समध्ये दाखवतात तसा दिवा माझ्या डोक्यावर पेटला. (वातावरण निर्मितीसाठी तो दिवा इथे चिकटवला आहे. ठांकु गुग्ल्या !! ) अच्छा असं आहे होय रागाचं कारण.

"अले ती मुग्गीची नावं नशतात काई. आम्ही ते तुला लाडाने, प्रेमाने म्हणतो. अशच."
"पन लालाने मनायला मुग्गीची नावं कचाला पायज्येल? चोनुल्या, मनुल्या अच्यं मना की."
"अरे ते असंच. आता त्या शेजारच्या छकुलीला नाही का तिचे बाबा "ए माझ्या राजा" असं म्हणत? तसंच हे" मी उगाच खिंड लढवण्याचा अखेरचा प्रयत्न केला.
"पन छकुलीला पन त्ये आवलत नाई." 
'तुझं वय काय, बोलतोस किती?' टाईपचा लूक त्याला क्षणभरच देऊन मी सावरून घेत म्हणालो. 
"बरं आता नाही म्हणणार मुग्गीची नावं. सगळी मुग्ग्यांची नावंच म्हणू. खुश?" स्वारीने तोंड 'बहिर्वक्रचं अंतर्वक्र करून' लगेच खुश झाल्याची वर्दी दिली.

फुस्स फुस्स.. धूर धूर.. धुकं धुकं.. स्क्रीनवरची चित्रं गोलगोल फिरत स्थिरावली. माझ्यावर कॅमेरा. मी ढगाकडे तोंड करून काहीतरी विचारात गढलेलो... थोडक्यात बॅक टू फ्युचर आपलं प्रेझेंट. झालं काय की परवा लेकाशी हेच ते "शोनुली, छकुली" करत खेळत असताना हा फ्युचरवाला सीन डोळ्यासमोर चमकून गेला आणि माझं हे असं ज्यामुळे झालं ते कारण शोधताना काही वर्षांपूर्वी ब्येष्ट-हाफ बरोबर झालेला संवाद आठवला.

आमची ब्येष्ट-हाफ, आमच्या जीजुंची ब्येष्ट-हाफ, आणि बाबांची ब्येष्ट-हाफ एकत्र बसून भावी 'मिस युनिव्हर्स'च्या ब्येष्ट-हाफाला खेळवत होत्या. थोडा जास्तच यॉर्कर पडला असेल तर सरपटी टाकतो आता. तर माझी बायको, बहिण आणि आई एकत्र बसून माझ्या भाच्याला खेळवत होत्या. तेव्हा त्यांचं ते गोड गोड, लाडं लाडं, बोबडं बोलणं, ती बडबडगाणी, कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या कविता आणि दर कवितेआड पुन्हा ते गो , ला , बो बोलणं मी ऐकत होतो. त्यांच्या प्रत्येक गाण्याला, बोलण्याला, दर वेळी ते छोटुलं खिदळत होतं. शेवटी मी न राहवून विचारलं "तुम्हाला कसं जमतं हे उगाच खोटं खोटं बोबडं, लाडं लाडं बोलायला? मला तर या जन्मात जमणार नाही."

बहिण म्हणाली "अरे आपोआप जमतं. मला पण अगदी असंच वाटायचं पूर्वी. आता याच्याशी खेळताना आपोआप जमून जातं."

आईने आणि बायकोने पण तिला दुजोरा दिला. तरी मला पटेना. मी तिला म्हटलं "छे मला नाही पटत. मला हे जमणारच नाही असं लाडात बोलणं. आणि तसंही मला माझ्या मुलाशी बोबडं बोलायचंच नाहीये. मी अगदी व्यवस्थित मोठ्या माणसांसारखं शुद्ध बोलणार. उगाच हवंय कशाला ते "बोबडकांदा पळीचा दांडा.".. उगाच आपलं बोबडं बोलणं ऐकून मोठा झाल्यावर मुलाचं कंफुजन (हो आमच्याकडे घरगुती संवादात कन्फ्युजनला कंफुजनच म्हणतात. मी तरी म्हणतो) होणार की चूक काय आणि बरोबर काय, योग्य काय नि अयोग्य काय, बोबडं काय नि अ-बोबडं काय, लाडंलाडं काय नि अ-लाडंलाडं". 
माझ्या फालतू बडबडीला कंटाळून तिघींनी त्या 'मिस युनिव्हर्स'च्या नवर्‍यासकट तिथून काढता पाय घेतला. (काय हे.. निदान एकेकीने तरी जायचं !!!)

त्यानंतर कालांतराने दोन हजार नवात (अरे काय ते काय टाईम मशीन लावल्यासारखं पुढे मागे करतोयस) दुसर्‍या एका (हे महत्वाचं) 'मिस युनिव्हर्स'चा ब्येष्ट-हाफ आमच्या घरात प्रवेश करता झाला. सुरुवातीचे काही महिने बोबो-लाला (बोबडंबोबडं-लाडंलाडं) बोलता येत नसल्याने मी त्या वरच्या भाषणातले बरेचसे उतारे 'मी बाळाशी बोबडं का बोलत नाही' हे सगळ्यांना पटवून देण्यात घालवले. (किंवा हे सगळ्यांना पटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न करत राहिलो हे वाक्य जास्त चपखल बसतं तिकडे. पण असो.).. शेवटी आपण सोडून जो येतो तो बाळाशी छान गाल फुगवून (यशस्वीपणे) बोबडं बोलतो आणि छोटूकलं   हसून, खिदाळून त्याला चांगला प्रतिसाद हे लक्षात यायला लागलं. हळू हळू कुठेतरी त्या तीन ब्येष्ट-हाफांचं बोलणं पटायला लागलं होतं. आणि "काय हे, आपलं बाळ, आणि आपण त्याच्याशी संवाद साधू शकत नाही, बोलत नाही" असे काहीतरी विचार डोक्यात यायला लागले. आणि झालं.. 

श.. र.. णा.. ग.. ती... !! काही दिवसांतच मी आधी मनातल्या मनात आणि कालांतराने जाहीर शरणागती पत्करली. आई, बायको वगैरे बाळाशी कशा बोलतात, काय बोलतात, कुठला शब्द किती बोबडा बोलायचा, किती वाकडा उच्चारायचा, किती अर्धवट म्हणायचा या सगळ्याचं निरीक्षण करायला लागलो. आपला 'र' म्हणजे त्यांचा 'ल', आपला 'ल' म्हणजे त्यांचा 'य', आपला 'ग' म्हणजे त्याचा 'द', आपला 'श' म्हणजे त्याचा 'च' हा बेसिक क्रॅश कोर्स आणि "अलेच्च्या, काय झ्यालं ग या माऊला ", "माज्या चकाअली (सखाहरी) तो", "लल्लाच्य नाई ग अचं", "का कत्त्ये द माजी मनीमाऊ", "बोक्या, कोन ले उगाच्य तोतं तोतं ललताय? " (आणि असे अजून अनंत वाक्प्रचार) असा अ‍ॅडव्हान्स कोर्स असे दोन्ही कोर्स मी शिताफीने, झटपट आणि खळखळ न करता पूर्ण केले. म्हणजे करावेच लागले. न करून सांगतोय कोणाला? आणि बघता बघता "जान्हवं, शेंडीवाल्या भटजींनी मटणावर आडवा हात मारायला शिकावं, तुफ्फान कडक्या पोराने गल्लीच्या दादाला बुचकळून काढावं, एका चाश्मिष्ट, गरगट्ट पोरीने चिकण्या पोरीच्या नाकावर टिच्चून रोझ-क्वीन बनावं" तसं वर्ष दोन वर्षांपूर्वी मुलांशी बोबडं बोलण्यावर हसणार्‍या माणसाने (पक्षि स्वयमेव) त्यात प्राविण्य मिळवलं. आनि त्ये पन येकदम गोल्ड मेडल च्या मारी...

तर आता पुन्हा असा भविष्यातला प्रसंग डोळ्यासमोर आला किंवा खरोखर भविष्यात घडलाच आणि लेकाला उत्तर द्यायला लागलं तर आधी (बोबडं बोलत नाही म्हणून) मला हसणार्‍या आणि नंतर मला ते तसलं बोलायला (इनडायरेक्टली) भाग पाडणार्‍या आणि माज्या तोंडून लेकाला "चोनुली, चकुली, मनीमाऊ" असं काय काय म्हणवून घेणार्‍या त्या तीन ब्येष्ट-हाफांवर सगळं बिल फाडायचं ठरवलं ........ आनि मया इत्तं इत्तं इत्तं बलं वातलं मनून शांगु. येकदम चांत-चांत, अयकं-अयकं, च्यान च्यान.... !!

Tuesday, April 20, 2010

भी(शि)क्षा

१. एकेक करत हातापायाची सगळी बोटं तोडून टाकणे आणि हळूहळू एकेक अवयव तोडत जाणे.

२. डोळ्यांच्या पापण्या कापून गरम चरचरीत सळई किंवा धारदार चाकू डोळ्यांच्या आत फिरवणे.

३. जाड बांबूने मारत जात जात एकेक अवयव निकामी करून तडफडून मारणे.

४. अंगावरची चामडी सोलून काढून चौकात टांगून ठेवणे.

५. नागडं करून बांधून ठेवून भुकेल्या कुत्र्यांना अंगावर सोडणे.

६. 'पुरुष' नाटकात दाखवलेली शिक्षा जशीच्या तशी भर चौकात देणे

मनोरुग्ण, सायकोपाथ, सेडिस्ट असा काय काय वाटतोय ना मी? पण रोजच्यारोज सकाळी पेपर उघडल्यावर बलात्कारांच्या घटनांनी बरबटलेली पानं (की मनं) वाचताना डोक्याचा पार भुगा होतो.

निम्म्यापेक्षा (कितीतरी) जास्त गुन्हे दाखल होत नाहीत, दाखल झालेल्या गुन्ह्याताल्या अनेक आरोपींवरचे आरोप सिद्ध होत नाहीत, सिद्ध झाले तरी वरच्या कोर्टात अपील केलं जातं, आणि त्या कोर्टातून आरोपीला सोडवण्यासाठी कायद्याच्या बिळात लपून बसलेले वकील कायद्यातले बग्स बरोब्बर हेरून आरोपीला शाही लवाजम्यानिशी घरी पोचवण्याची व्यवस्था करतात.............................

आणि पुढच्या बलात्काराची बातमी येते........ वर्तुळ पूर्ण. अशी कित्येक वर्तुळं तासागणिक पूर्ण होत असतील.

भलेही व्यक्ती तीच नसेल, पण प्रवृत्ती तीच असते, हेतू तोच असतो, नशा तीच असते, वखवख तीच असते.

कधी अपमानाचा बदला म्हणून तर कधी दिलेल्या नकाराचा राग मनात धरून, कधी नवर्‍याने केलेल्या एखाद्या गुन्ह्याची (?) शिक्षा (?) म्हणून तर कधी दहशत बसावी म्हणून, कधी दलित म्हणून तर कधी नुसतीच मादी म्हणून.

कारणं काहीही असोत पण परिणाम एकच, शिक्षा एकच, निकष एकच, निकालही एकच. बाईला नासवली की झाला सूड पूर्ण, झालं पौरुषत्व सिद्ध.

आणि हे प्रकार वाढते, अनेक पटींनी वाढत जाणारे. manifold.. परवापेक्षा कालची संख्या जास्त. कालच्या पेक्षा आजच्या बातम्या जास्त. आजच्या पेक्षा उद्याचा हैदोस अजून जास्त.. आणि उद्यापेक्षा परवाचा अजूनच !!!! हे संपतच नाही कुठे. संपेल अशी चिन्हही दिसत नाहीत.

हे का संपत नाही किंवा काय केलं की अशा सडक्या जनावरांना जन्मभराची अद्दल घडेल, कायमची दहशत बसेल असा विचार करत होतो तेव्हा वरच्या सगळ्या शिक्षा सुचल्या. अ‍ॅक्च्युअली अजूनही भयंकर सुचल्या होत्या. पण त्या इथे देणं प्रशस्त नाही. यातली निदान एखादी तरी शिक्षा निदान एकदा तरी प्रत्यक्षात अंमलात आणली गेली ना तरी पुढच्या वेळी त्या नुसत्या कल्पनेनेच ती जनावरं कापू लागतील. कारण शेवटी मानापेक्षा, बदल्याच्या आगीपेक्षा, वखवखीपेक्षा जीव प्यारा असतो.

...................... पण अचानक जागा झालो. मी पांढरपेशा, मध्यमवर्गीय, सीधासाधा, दबलेला, नश्वर (आणि निर्लज्ज कोडगा) मनुक्ष आहे याचं भान आलं आणि ............
"साधी चौकशी आणि सुटका, ३ महिने साधी कैद आणि २००० रुपये दंड, १०,००० रुपयाच्या जामिनावर सुटका, चौकशीत गुन्हा सिध्द झाला नाही, घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार (eye-witness) नसल्याने  आणि ठोस परिस्थितीदर्शक पुरावे नसल्याने निर्दोष मुक्तता, परस्पर संमतीने संबंध ठेवले गेले असल्याने बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला नाही, फिर्यादीच्या पूर्वायुष्यातल्या घटना पाहता तिने केलेल्या तक्रारीत संशयाला नक्कीच वाव आहे" वगैरे वगैरे वाल्या बातम्या पुन्हा निमूटपणे वाचायला लागलो.

Sunday, April 18, 2010

पुन्हा चोरशील ??

आजपासून एक नवीन ब्लॉग सुरु करतोय. पण ब्लॉगची जाहिरात करण्यासाठी वगैरे म्हणून ही पोस्ट लिहीत नाहीये. हा ब्लॉग आपल्या सगळ्यांशी निगडीत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षेने आणि खात्रीनेच हे पाउल उचलतो आहे. ब्लॉगचे तपशील पुढीलप्रमाणे 

ब्लॉगचं नाव : पुन्हा चोरशील
पहिली पोस्ट : पहिली चोरी

तीच पोस्ट इथे खाली चिकटवतो आहे.
---------------------------------------------------------------------------------------
गेल्या ५-६ महिन्यांत मराठी ब्लॉग्सच्या जगात मुक्त मुशाफिरी करताना एक लक्षात आलं की इथे एकापेक्षा एक सशक्त लेखन करणारी मंडळी आहेत. नुसतं वाचक म्हणून इथे वावरलो तरीही आपल्या साहित्यविषयक किंवा एकूणच जीवनविषयक ज्ञानात, अनुभवात खूप भर पडेल, पडते आहे. पण दुर्दैवाने लवकरच हेही लक्षात आलं की इथे असे एकसेएक भन्नाट लिहिणारे जेवढे आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक ते लेखन सरळ, जसंच्या तसं, मूळ लेखाचा आणि मूळ लेखकाचा साधा उल्लेखही न करता, त्यांना योग्य ते श्रेय न देता बिनदिक्कतपणे आपल्या ब्लॉगवर टाकणारे, कॉपी+पेस्ट करून इमेल मध्ये चिकटवून फॉरवर्ड करणारे आहेत. अनेक महिने वेगवेगळया अनेक ब्लॉग्सचं वाचन केल्याने (जवळपास) प्रत्येक ब्लॉगरची भिन्न, युनिक शैली, विषय, मांडणी, रचना आणि एकूणच लेखन यामुळे ते लेखन त्या त्या ब्लॉगवर न वाचता (दुर्दैवाने आणि चुकूनमाकून) इतर कुठे वाचायची वेळ आली तरी मूळ लेखक सहज ओळखता येऊ लागला. सुरुवातीला काय करावं ते न कळल्याने 'हे असं चालायचंच' असं वाटून त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्ष केलं गेलं. पण बघता बघता या गोष्टी वारंवार होतायत असं लक्षात यायला लागलं किंवा अशा बाबतीत नजर थोडी जास्तच शोधक बनल्याने अशा चोर्‍या (यापेक्षा सौम्य शब्द मला तरी माहित नाही) जास्तच चटकन दृष्टीस पडू लागल्या. आणि एक दिवस चक्क माझ्याही कवितेची दुसर्‍या एका अशी चोरी झाल्याचं लक्षात आलं. तेव्हा मग त्या ब्लॉगच्या त्या पोस्ट वर जाऊन मी आणि आपल्या ब्लॉगु-ब्लगिनींनी अनेक प्रतिक्रिया देऊन मूळ कवितेची लिंक दिली. कालांतराने त्या ब्लॉगमालकाने माफीही मागितली. पण एक लक्षात आलं की हा प्रकार आपल्या नजरेस पडला म्हणून आपण तिथे जाऊन प्रतिक्रिया देऊन आणि आपल्या मित्रांना प्रतिक्रिया द्यायला सांगून त्या ब्लॉगमालकाला त्याची चूक मान्य करायला भाग पडू शकलो. पण असे असंख्य गुणी लेखक/लेखिका असतील की ज्यांच्या लेखनाच्या रोज चोर्‍या होत असतील आणि त्या बिचार्‍यांना आपलं लिखाण दुसरा कोणीतरी परस्पर आपल्या नावावर खपवून उगाच आपलं श्रेय लाटतोय याची कल्पनाही नसेल. तेव्हापासून मी जेव्हा जेव्हा अशा चोर्‍या नजरेस पडल्या तेव्हा तेव्हा त्या लेखाखाली जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायला लागलो. तर बयाच वेळा अशा प्रतिक्रिया दिल्यावर ते ब्लॉगमालक ती पोस्ट अपडेट करून लगेच मूळ लेखकाचं नाव आणि मूळ लेखाची लिंक द्यायला लागले. पण सगळ्यांचं कारण जवळपास एकच असे की "मला हा लेख/कविता इमेल मधून आली होती आणि तिथे मूळ लेखकाचं नाव नव्हतं." खरंतर मूळ लेख शोधणं आजच्या गुगल जमान्यात अजिबात अवघड नाही हे वेगळं सांगायला नको. असो. पण सगळेच जण असे लगेच माफी मागणारे नव्हते. याच्या उलट अनुभवही आले. चोराच्या ब्लॉगवर जाऊन तिथे त्याला मूळ लेखनाबद्दल माहिती करून देणारी प्रतिक्रिया दिली की ती प्रतिक्रिया कधी प्रकाशितच केली जायची नाही. उलट इमेल मधून धमक्या यायच्या की "या ब्लॉगवरील लेखन माझे आहे असं मी कुठेच म्हटलेलं नाही. हा ब्लॉग म्हणजे माझ्या आवडत्या लेखांचा, कवितांचा संग्रह आहे. प्रतिक्रिया देण्यापूर्वी विचार करत जा."  असा उद्धटपणाआड लपलेला साळसूदपणाचा आव आणला जायचा. किंवा कधी कधी तर त्या लेखावर "वा वा ", "सुंदर..", "फारच छान.. खूप आवडलं." अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया प्रकाशित केल्या जायच्या पण मूळ लेखनाचा दुवा दिलेली प्रतिक्रिया मात्र हटकून प्रसिद्ध केली जायची नाही. हे असं झालं की संताप व्हायचा. तेव्हा मग मी अजून एक प्रकार करणं सुरु केलं. मूळ लेखकाच्या ब्लॉगच्या त्या लेखावर जाऊन त्याच्या खाली "आपला हा लेख अमुक अमुक ब्लॉगवर चोरीला गेला आहे"' असं लिहून चोरट्या ब्लॉगची लिंक द्यायचो. ही मात्रा मात्र बरेचदा काम करायची. मूळ लेखकाने चोरट्याला मेल/प्रतिक्रिया देऊन खडसावाल्यावर बरेच (सगळे नव्हे. तरीही शिरजोरी करणारेही अनेक बघितले) चोर सरळ व्हायचे आणि मग त्यांच्या ब्लॉगवरून तो लेख काढून टाकायचे. यातला एकही प्रसंग उगाच सनसनाटी निर्माण करण्यासाठी दिलेला नाही. प्रत्येक चोरीचे/मेलचे/प्रतिक्रियांचे पुरावे माझ्याकडे आहेत. पण मुद्दामच मी आत्ता इथे एकाही ब्लॉगचं, लिंकचं, लेखकाचं नाव देत नाहीये. कारण जवळपास बरीच प्रकरणं मिटलेली आहेत. तर हे असं पुन्हा पुन्हा झालेलं बघितल्यावर मात्र काहीतरी करायला हवं हा विचार डोक्यात घुमायला लागला. "आपण साधे मराठी ब्लॉगर. आपण काय करणार?" असा विचार मनात येतो ना येतो तोच त्याचं उत्तर मिळालं. आपण ब्लॉगर .. आपण काय करणार?? सोप्प आहे. आपण नवीन ब्लॉग सुरु करणार. हो हो.. नवीन पोस्ट नाही.. नवीन कोरा करकरीत ब्लॉग. कशासाठी?? तर या अशा चोर्‍या सगळ्यांसमोर याव्यात यासाठी. अशा चोर्‍या सगळ्यांसमोर आल्या की आपोआपच त्या कमी होतील. अर्थात पूर्ण नाहीशा होतील असं नाहीच. प्रमाण तरी कमी होईल. तेवढाच आपला खारीचा वाटा.
थोडक्यात काय तर जेव्हा जेव्हा आपल्याला अशी चोरी दिसेल तेव्हा आधी नेहमीप्रमाणे मूळ लेखावर जाऊन चोरीच्या लेखाची आणि चोरीच्या लेखावर जाऊन मूळ लेखाची लिंक द्यायची. १-२ दिवस वाट बघूनही चोरीच्या ब्लॉगमालकाचं काही उत्तर आलं नाही तर ती चोरी सरळ या आपल्या नवीन ब्लॉगवर टाकायची. म्हणजे जास्तीतजास्त लोक ते वाचतील. चोरी जगजाहीर होईल आणि आपोआपच चोराला नमतं घ्यावं लागेल. यात फायदा आपल्या सगळ्यांचाच आहे. आपले अनेक लेख/कविता चोरीला जात/गेले असतील पण आता अशा चोर्‍यांवर लक्ष ठेवणारे आपण एकटेच नसू. सगळेजण मिळून हे काम करतील आणि चोरी पकडून देतील. आणि आपल्या या  संघटीत कामामुळे असे चोर आपोआपच दबकून राहतील आणि त्यामुळे कदाचित आपल्या लेखांच्या भविष्यात होऊ शकणार्‍या चोर्‍या रोखल्या जातील. अर्थात या प्रश्नाचा आवाका खूप मोठा आहे. त्याच्यावर ठोस उपाय सध्यातरी कोणालाच माहित नाही (कोपीराईट वगैरे सगळं ठीक आहे. पण त्याच्याने हे प्रकार रोखले जातायत का या प्रश्नाचं उत्तर हो असतं तर हा ब्लॉग सुरु करायची वेळच आलिओ नसती.). पण त्यामुळे स्वस्थ बसण्यापेखा आपण स्वतः काहीतरी केल्याचं आणि हे प्रकार थोडे तरी कमी केल्याचं समाधान. आणि त्यासाठीच हा नवीन ब्लॉग सुरु करतोय. पण आधी म्हटल्याप्रमाणे हा ब्लॉग माझा एकट्याचा नाही. आपल्या सगळ्यांचा आहे. 
आणि हो.. या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागल्या नाही, तशी वेळ आली नाही तर आनंदच आहे.. नाही का? :-)

तर आजच्या चोरीचे तपशील पुढीलप्रमाणे..

मूळ लेख

आणि भाग तिसरा येतोय. म्हणजे मूळ लेखकाने बिचार्‍याने एका पोस्ट मध्ये लिहिलेल्या लेखाची ही अनेक भागांमध्ये चोरी. छान चाललंय !!!!
मी भाग-१ वर मूळ लेखाची लिंक दिली होती. पण आज बघतो तर भाग-२ सुद्धा आला. म्हणून मी भाग-१ वर जाऊन माझ्या प्रतिक्रियेला काय उत्तर दिलं आहे  हे बघायला गेलो तर तिथे माझी प्रतिक्रिया सोडून इतर सगळ्या "वा वा छान छान" वाल्या प्रतिक्रिया प्रकाशित झालेल्या आहेत. मग लक्षात आलं की "अरे चोरा, मूळ लेखक अज्ञात नसून तो तुला मुद्दाम अज्ञात ठेवायचा आहे.". पण त्याच्या दुर्दैवाने अति झालेल्या या चोरी प्रकरणांमुळे या ब्लॉगची कल्पना सुचली आणि पाहिलं अपीलही झालं. आता विकेट कधी पडते ते बघुया. मग? बघता काय? चोरीच्या लेखांवर जाऊन पाडा प्रतिक्रियांचा पाउस.

आणि आधी म्हटल्याप्रमाणे या ब्लॉगवर रोजच्या रोज, नियमित पोस्ट्स टाकाव्या लागू नयेत हीच सर्व चोरांना आणि देवाला प्रार्थना !! :-)

Thursday, April 15, 2010

पांढरा (फटक) वाघ आणि काळा (कुट्ट) देश !!!

मी 'स्लमडॉग मिलिनियर' प्रदर्शित झाल्या झाल्या लगेच पहिला होता. कारण खूप ऐकलं होतं त्याबद्दल. आणि मांजरेकरचा आक्रस्ताळेपणा आणि शेवटी 'जितेंद्र-जयाप्रदा'च्या जुन्या चित्रपटांसारखं हातपाय विचित्र हलवत केलेलं प्लॅटफॉर्म वरचं 'जय हो' गाणं (तेच ते ऑस्करवालं ) सोडलं तर मला चित्रपट प्रचंड आवडला होता. 'ओ साय्या' सोडलं तर संगीतात विशेष दम नव्हता. यापेक्षा कैक सुंदर सुंदर गाणी रहमानने यापूर्वीच देऊन ठेवली आहेत. पण कथा, पटकथा, संवाद, पार्श्वसंगीत, अभिनय आणि एकूणच दिग्दर्शन यात मला हा चित्रपट खुपच उजवा वाटला. सर्वात मुख्य म्हणजे नायकाच्या बालपणात, तरुणपणात घडलेले विविध प्रसंग आणि त्याला त्या शो मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांशी त्यांचे जुळलेले संदर्भ, ती वीण, तो एकूणच प्रकार मला फार भावला. अर्थात तो ऑस्कर मिळवण्याच्या लायकीचा होता का हा निराळा मुद्दा झाला. माझं वैयक्तिक मत म्हणजे तो ऑस्करच्या योग्यतेचा नव्हता. पण असो. त्याविषयी नंतर बोलू. चित्रपट गाजला तो मुख्यत: त्यात दाखवलेली भारतातल्या दारिद्र्याची, विषमतेची, झोपडपट्ट्यांची, गरिबीची, अस्वच्छतेची, बाल-गुन्हेगारीची दृष्य किंवा ते एकूणच चित्रण यामुळे. अनेकांना ते सगळं आक्षेपार्ह वाटलं. भारताची आणि भारतीयांची गरिबी मुद्दाम जगापुढे मांडण्याचा एका ब्रिटीश दिग्दर्शकाचा धूर्त अट्टाहास आणि त्यायोगे ऑस्कर पदरात पडून घेण्याचा एक डाव असंही नाव त्याला दिलं गेलं. असो.

अचानक 'स्लमडॉग मिलिनियर' बद्दल एवढी बडबड करून त्यावर आत्ता पोस्ट लिहिण्याचं कारण काय असं कोणाच्या मनात येत असेल तर आधीच सांगतो आजची पोस्ट 'स्लमडॉग मिलिनियर' बद्दल नाही. 'स्लमडॉग मिलिनियर' वरून एवढं घडाभर तेल वाहून झाल्यावर पोस्ट त्याबद्दल नाही हे ऐकल्यावर अनेक भुवया उंचावल्या गेल्या असतील. पण आज मी लिहिणार आहे ते 'स्लमडॉग मिलिनियर'सारख्याच एका पुस्तकाच्या संदर्भात. नाही. नाही. विक्रम स्वरूप यांच्या मूळ 'Q and A' या पुस्तकाबद्दलही नाही. मी म्हणत असलेल्या पुस्तकात आणि 'स्लमडॉग मिलिनियर' मध्ये दोन मुद्दे समान आहेत. एक म्हणजे दोन्हीत भारतातली सामाजिक विषमता, गरिबी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, दाखवलं आहे आणि दोन्ही त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित आहेत. आणि अर्थातच त्यामुळे त्या दोघांवरही 'भारताचं दारिद्र्य ग्लोरिफाय करून' पुरस्कार हडपल्याचे आरोप झाले. ते आरोप कितपत खरे आहेत ते पुढे बघूच. तर हे पुस्तक आहे अरविंद अडिगा यांचं २००८ सालचं बुकर पारितोषिक विजेतं 'द व्हाईट टायगर'.मी जेव्हा सुरुवातीला या पुस्तकाविषयी वाचलं होतं तेव्हा 'बंगलोरमधला एक छोटा उद्योजक भारताच्या राजकीय दौर्‍यावर येणार्‍या चीनच्या पंतप्रधांनांना उद्देशून पत्र लिहून त्यात भारतात येताना कसं वागायचं, कसं बोलायचं, काय खबरदारी घ्यायची असल्या काहीतरी सूचना करतो' असल्या काहीतरी मुद्द्यांवर लिहिलेलं पुस्तक आहे असं वाचल्याचं आठवत होतं. ते वाचून तेव्हाच मी मनात म्हटलं होतं की 'छे. हा कसला विषय? काहीतरी विचित्र आणि निरस असणार हे पुस्तक.'. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावरही सुरुवातीची काही (१०-१५ च) पानं मी अशा कंटाळवाण्या मूड मधेच वाचत होतो. किंबहुना सुरुवातीलाच मला 'अनेकांना स्लमडॉग मिलिनियर पाहिल्यावर दिग्दर्शक डॅनी बॉयलचा जसा राग आला होता' तसाच अरविंद अडिगा या पोरगेल्या लेखकाच्या भारताविषयक उद्दाम आणि अपमानास्पद (भासणार्‍या) लेखनाचा चांगलाच राग आला होता. किंबहुना लेखकाचा भारताला, आपल्या रुढी-परंपरांना, सामाजिक व्यवस्थेला, मागासलेपणाला, आर्थिक/सामाजिक/वैचारिक विषमतेला तिरकस नजरेने पाहून त्यांना करड्या छटेत रंगवण्याचा (पुरेपूर यशस्वी) प्रयत्न मला अजिबात रुचला नव्हता. पण हळूहळू जसं पुढे वाचत गेलो तसतसा अडिगा यांना सलाम ठोकावासा वाटायला लागला. लेखक सुरुवातीलाच म्हणतो की 'आमच्याइथे दोन भारत आहेत. एक 'अंधारलेला' भारत आणि दुसरा 'चमकणारा' भारत'. हे वाक्यही मला सुरुवातीला तसंच नकारार्थी वाटलं होतं. म्हणजे ते नकारार्थी आहेच पण पुढे सरकता सरकता लेखकाचा भारतातील सामाजिक विषमता आणि जातीभेद इ. वर प्रहार करण्यासाठी त्या वाक्याचा चपखल वापर करताना बघून आपल्याला ते वाक्य मनोमन पटतं आणि थक्क व्हायला होतं. आणि लक्षात यायाल लागतं की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. हळू हळू अडिगांबद्दलचा मनात असलेला आकस, राग निवळून जायला लागतो आणि त्याची जागा त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणाबद्दलचं कौतुक घेतं. कारण लेखक सांगत असतो त्यात यत्किंचितही अतिशयोक्ती नसते. हे असं खरोखर घडतंय आपल्या इथे. पण कोणी हे आत्तापर्यंत अशा गडद शैलीत दणादण शालजोडीतले हाणत अशा प्रकारे कधी सांगितलंच नव्हतं. पुस्तकातला गरीब अशिक्षित नायक जेव्हा स्वतःचा उल्लेख करताना पशु, किडा किंवा टेबलाखाली रांगत जाणार कोळी अशा उपमा अगदी सहजपणे जेव्हा वापरतो तेव्हा त्यातली गडद भीषणता जाणवते. म्हणजे अन्याय होतोय हे तुम्हाला कळण्याइतपत तरी तुमची पंचेंद्रिय जागृत असतील तर तुम्ही त्या घटनांना स्वतःवरील अन्यायाचं लेबल लावू शकणार ना. पण इथे मुळातच हे जातीभेद, वर्णव्यवस्था, गरिबी, शोषण, माणुसकीला ठायी ठायी पायदळी तुडवणं हे अनंत काळापासून असंच चालत आलेले आणि त्यामुळेच आपोआपच तेच योग्य आहे असा सगळ्यांचा समज करून दिलं जाणारे अनेक अन्यायाचे प्रसंग वाचले की मनावर अपार नैराश्याची एक काळी छटा पसरते.

मला वाटतं पुस्तकाचं मोठ्ठं यश म्हणजे लेखकाची सर्वोत्कृष्ठ तिरकस शैली. मला वाटतं सध्याच्या काळात तरी फार कमी लेखकांना इतक्या हलक्या हाताने, सहज रीतीने पण धारदार तिरकस वाग्बाण मारून मंत्री, पुढारी, पोलिस, निवडणुका, न्यायव्यवस्था, गरिबी, उपासमार, धर्मांधता, राजकारण, आर्थिक आणि सामाजिक विषमता, जातीभेद, भ्रष्टाचार या सर्वांचा वेध एका पुस्तकात एवढ्या सहजतेने घेता आला असेल. अशी उदाहरणं फार विरळा. उगाच आगखाऊ भाषणं ठोकून, जडजंबाळ अग्रलेख लिहून, मोठमोठे लेख लिहून कुठल्याही संपादक, विरोधी पक्षनेता नेत्याला जे करता आलेलं नाही ते अडिगा यांनी एका जेमतेम तीनशे पानांच्या या छोटेखानी पुस्तकात अगदी सहजतेने करून दाखवलं आहे. आणि या तिरकस शैलीचा सर्वोच्च बिंदू म्हणजे पान ८९ वरचा 'सर, सर' वाल्या वाक्याचा पूर्ण परिच्छेद. तो काय आहे हे मी इथे सांगणार नाही. तो परिच्छेद किंबहुना हे पुस्तकच प्रत्यकाने मुद्दाम आवर्जून वाचलंच पाहिजे असं आहे. तो वाचल्यावर लेखकाच्या भयंकर चिमटे काढण्याच्या शैलीला दाद दिल्यावाचून राहवत नाही.

या तिरकस शैलीत लिहीत लिहीत लेखक जेव्हा जाता येता आपल्या प्रवृत्तीवर, समाजव्यवस्थेवर (एवढंच कशाला, अगदी पोलीस,न्यायालय  आणि निवडणुकाही सुटत नाहीत त्याच्या तावडीतून) असंख्य प्रहार करून चिमटे काढत, लाथा घालत घालत पुढे पुढे सरकतो तेव्हा तर आता पुढे काय होईल याची उत्कंठा वाढत जाते. किंबहुना काय होणार आहे, शेवट काय आहे ते लेखक पहिल्या पन्नास-साठ पानांतच सांगून टाकतो. पण उलट त्यामुळे ते कसं होईल याची प्रचंड उत्सुकता लागत जाऊन आपण अधिकाधिक हावरटासारखं तुटून पडतो पुस्तकावर. एक मात्र मान्य केलं पाहिजे की शेवटच्या काही पानांत लेखकाची पुस्तकावरची पकड ढिली झाल्याचा भास होतो (मला तरी झाला) आणि उगाच ते ताणलंय आणि उगाच थोडंसं भरकटलंय असंही वाटून जातं. पण आधीच्या दोन-अडीचशे पानांत जो उत्कृष्ठ अनुभव मिळालेला असतो त्यापुढे शेवटची थोडी गडबड नजरेआड करायला हरकत नाही.

तर भारतावर, आपल्या एकूणच व्यवस्थेवर एवढे प्रचंड आसूड ओढून जगाच्या मनात भारताबद्दलचं चुकीचं चित्र भरवलं गेलं असल्याचे आरोप या पुस्तकावर झाले. अनेक ब्लॉग्स, चर्चा यांमध्येही 'भारताबद्दल काहीतरी वाईटसाईट लिहा आणि पुरस्कार कमवा' अशा प्रकारचे हल्ले झाल्याचं मी वाचलं. मला त्यांचा मुद्दा, त्यांचं म्हणणं, त्यांची मतं काही खोडून बिडून काढायची नाहीयेत. ती प्रत्येकाची स्वतंत्र वैयक्तिक मतं आहेत आणि प्रत्येकाने त्याचा आदर केला पाहिजे. म्हणून मी फक्त मला दिसलेला व्हाईट टायगर माझ्या नजरेने सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. लेखकाने आपल्या वृत्तीवर, भ्रष्टाचारावर, गरीबीवर, व्यवस्थेवर असंख्य हल्ले केले आहेत हे नाकारणं शक्यच नाही पण ते असत्य आहे का? कपोलकल्पित आहे का? असा प्रश्न आपण स्वतःला विचारल्यास त्याचं उत्तर खचितच नाही असं द्यावं लागतं. त्यामुळे या अशा भीषण व्यवस्थेवर, खोटेपणावर हल्ला करणार्‍यावर आपण हल्ला करायचा की त्या मूळ समस्येवर हल्ला करायचा हे आपलं आपण ठरवायचं. तसंही बेगडी देशप्रेमाचा बाजार मांडणार्‍या चोपडा, जोहरांची आपल्या देशात काही कमतरता नाही !!!

मागे याच विषयावर माझ्या इंग्रजी ब्लॉगवर थोडक्यात लिहिलं होतं ते इथे पाहता येईल.

Wednesday, April 14, 2010

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ३

"आज आपण बघणार आहोत पास्तुला कसा करायचा" झगावाल्या बाई हात जोडून सुहास्य वदनाने वदत्या झाल्या.

पोस्टची सुरुवातच ढळढळीत खोट्या वाक्याने करू शकत नसल्याने आधीच कन्फेशन देऊन टाकतो की असं काहीसं त्या झगावाल्या बाई न कळणार्‍या विंग्रजीत (की स्पॅनिशात ?) म्हणाल्या असाव्यात असा तर्क मांडून मी या वरच्या वाक्याने सुरुवात करून पुढची प्रक्रिया बायकोला सांगायला सज्ज झालो. काही नीट कळत नाहीये ना मी काय बडबडतोय ते? माझं पण अगदी अस्संच झालं होतं ती रेसिपी बघताना आणि त्याचं धावतं समालोचन बायकोला देताना.

पुन्हा सुरुवात करू.. म्हणजे रेसिपीची नव्हे, प्रसंगाची.. झालं काय की परवा सुदैवाने (की दुर्दैवाने?) आमचा रिमोट हरवला न.. व्ह.. ता... आणि आम्ही चक्क चॅनेल सर्फिंगची लक्जरी उपभोगत होतो आणि अचानक (माझ्या) दुर्दैवाने मी एका इटालियन रेसिपीच्या चॅनेलवर स्थिरावलो. 'अडकलो' हा शब्द जास्त समर्पक आणि वस्तूस्थिती-निदर्शक आहे खरा पण असुदे.. उगाच कशाला खाडाखोड.. तर त्या अडक्या चॅनेलवर कसले कसले भन्नाट (येथे भन्नाट हा विचित्र या अर्थी वापरला आहे याची कृपया समस्त रसिकांनी आणि खादाडांनी नोंद घ्यावी. आमचे सगळे वाचक हे एकतर रसिक तरी असतात किंवा खादाड तरी त्यामुळे आम्ही 'वाचक' हा गुळमुळीत वृत्तपत्रीय शब्द वापरत नाही याचीही इथे नोंद घ्यावी. भरली आजची नोंदवही.. आता पुढे.) पदार्थ घालून कायतरी वाफवून, तापवून, ढवळून 'पास्तुला' (आता हाही शब्द माझाच याचीही नोंद तमाम ........ घ्यावी वगैरे वगैरे) नावाचा पदार्थ करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जात होतं. ते पाहून बायकोने मला तिथेच थांबण्याची (टीव्हीच्या चॅनेलवर याअर्थी) खुण केली. आणि अर्थातच मी त्या चॅनेलवरच थांबलो. आता हे काय वेगळं सांगण्याची गरज होती का? उगाच 'पुन्हा' पुनरुक्ती.. 'पुन्हा' पुनरुक्ती, 'पाठीमागची' बॅकग्राउंड , 'खरी' फॅक्ट वगैरे वगैरे वगैरे.. असो.

तर ते 'पास्तुला' नामक भयंकर खाद्यान्न आणि त्याहूनही भयंकर त्याची कृती बघावी लागणार अशा विचारात असताना युवराजांनी तोंड वेडंवाकडं करून निसर्गराजाने त्यांच्या डायपरमध्ये अनंतहस्तांनी दान दिल्याची वर्दी दिली. बायको डायपर बदलायला धावली आणि मी चॅनेल बदलायला. पण माझा आनंद नशिबाला (आणि बायकोला) बघवला नाही. बायकोने हुकुम सोडला की "चॅनेल बदलू नकोस. ती रेसिपी नीट बघ आणि एकीकडे मला सांग ते काय आणि कसं करतायत ते.."...  "अरे कर्मा.. आली का पंचाईत.. आता डायपर बदलताना तू ती रेसिपी ऐकून काय करणार आहेस?" वगैरे प्रश्न मी (नेहमीप्रमाणे) गिळून टाकून 'हो' म्हटलं.

तर यानंतर त्या सुरुवातीला सांगितलेल्या काल्पनिक वाक्याचा जन्म झाला. तेच ते हो 'हात जोडून', 'पास्तुला' वगैरे.. ही पोस्ट म्हणजे रामूच्या किंवा एखाद्या विंग्रजी पिक्चरासारखी होतेय नाही? जसं ते  म्हणतात (समजतात) की कुठलाही प्रसंग मी कुठेही, कशाही क्रमाने दाखवणार आणि प्रेक्षकांनी (आपल्या इथे रसिकांनी, खादाडांनी) आपलं डोकं वापरून क्रम जुळवायचा. असो. आचरटपणात तेवढाच काहीतरी वेगळेपणा..

तर त्या काल्पनिक वाक्याकडे अर्थातच दुर्लक्ष करून बायकोने महत्वाच्या कामाकडे लक्ष वळवलं आणि मी त्या झगावाल्या बयेकडे.. म्हणजे रेसिपीकडे.. कायतरी उगाच.. ती बया पास्तुला करण्यासाठी आवश्यक पदार्थ (इन्ग्रिडियंट्स व्हो) सांगताना असले काही भन्नाट पदार्थ आणि शब्द वापरत होती की असे काही पदार्थ अस्तित्वात आहेत आणि ते पदार्थ (या आपल्याच मनुष्यलोकात) खाण्यासाठी वापरतात हे मला पहिल्यांदाच कळलं. आणि तेही सबटायटल्स ऑन असल्याने ते शब्द निदान कळले तरी, कारण उच्चारांच्या नावाने बोंबच होती.

तर सुरुवातीचे (काल्पनिक) नमस्कार-चमत्कार झाल्यावर, इन्ग्रिडियंट्स सांगून झाल्यावर झब (झगावाली बया) कृतीकडे वळली.

१. एका पातेल्यात भरपूर (किती ते तिने आमचा त्या चॅनेलवर प्रवेश होण्याआधी सांगितलं होतं. त्यामुळे मी भरपूर असा सर्वसमावेशक शब्द वापरतो आहे) पाणी घेऊन ते रटारटा उकळत ठेवा. (पातेलं, रटारटा आणि उकळत हे अर्थातच झबच्या शब्दांचं मराठीकरण आहे)

२. आता सगळा (आम्या.. म्हणजे 'भरपूर'वाला) पास्ता घेऊन तो फेका... फेका? फेका?? वा वा .. फेका .. "पास्ता फेका" हे असं मी मोठ्याने ओरडून बायकोला सांगितलं तेवढ्यात झब पुढे म्हणाली "into container" .. म्हणजे "Throw the pasta into the container".. च्यायला त्या विंग्रजी भाषेच्या.

३. एकेक करत समोर दिसतील तेवढे (झबकडे सुदैवाने (फक्त?) चारच होते.) सगळे टिन्स, कॅन्स  धडाधड उघडा आणि मिसळा. एकमेकांत नव्हे हो. पास्तुल्याच्या पातेल्यातल्या पाण्यात. (प प प... आता पुढची सगळी वाक्यं 'प' ने सुरु होणारी लिहू का? पको.. पाऊदे पुढच्या पेळी पधीतरी. पाहीतर पात्ता पेवटी "पास्तुला खा" प्या पैवजी "पास्तुला प्या" पसं पिहावं पागेल.. परं पाटतंय.. आपलं सॉरी.. बरं वाटतंय. पुढच्या वेळी नक्की ट्राय करतो. ).. आणि हो ते टिन्स, कॅन्स कसले होते याची नक्की कल्पना नाही कारण आम्या. पण वाण्याच्या दुकानात गेल्यावर 'पास्ता सॉस' लिहिलेले कुठलेही (त्यातल्या त्यात जरा 'दिसायला आणि रंगाने' बरे असलेले.  'वधू-वर पाहिजे' ची अ‍ॅड वाटतेय.) टिन्स/कॅन्स उचललेत तरी चवीत काडीमात्रही फरक पडणार नाही ही आमची (म्हणजे माझी, झब ची नव्हे) 'गॅरंटेड' खात्री. ('पुन्हा' पुनरुक्ती, 'पाठीमागची' बॅकग्राउंड , 'खरी' फॅक्ट, गॅरंटेड खात्री वगैरे वगैरे वगैरे.. )

४. ते सगळं मिश्रण ढवळा. कारण ढवळलं नाहीत तर आजचा पदार्थ 'पास्तुला'च्या ऐवजी 'सॉसचा डोंगर' हा आहे असं वाटेल.

५. त्यात ते खरवडलेलं खोबरं, वितळलेलं चीज आणि किसलेले बदाम घाला आणि ढवळत रहा.

झालं.. त्या झब ने एवढं म्हणताक्षणी स्क्रीनवर कुठलीतरी झाडं दिसायला लागली. मी--आधी मनात आणि मग मोठ्याने ओरडून--म्हटलं "संपली रेसिपी."
"संपेल कशी?"
"मग ही झाडं कुठून आली मधेच? पुढचा प्रोग्राम सुरु झाला."
"ती त्या बदामाची झाडं आहेत. त्या बदामांची पैदास कशी होते, ती झाडं कुठे, कशी असतात, त्यावर कशी प्रक्रिया करतात आणि मग ते बदाम आपल्यापर्यंत कसे येतात, त्यांचा दर्जा कसा उच्च प्रतीचा आहे हे सगळं ते सांगतायत"

डायपर बदलण्याचं काम मगाशीच संपलं असल्याने बायकोही माझ्याबरोबर त्या झब चं प्रवचन ऐकते आहे हे माझ्या लक्षातच न आल्याने मी उगाचच धावतं समालोचन देत बसलो होतो एवढा वेळ. आता एवढा वेळ बघितलंच आहे तर पुढेही बघू आणि हा पास्तुला नक्की दिसतो कसा तेही बघू अशा विचाराने मी वेगवेगळ्या ३९४ (अंअं) कोनातून दाखवली जाणारी ती बदामाची झाडं बघत बसलो. अचानक (अं) सव्वाचार मिनिटांनी स्क्रीनवरची झाडं धुरकट पुसट होत जात जात गोल गोल फिरत खोल खोल जायला लागली आणि तोवर उलट्या दिशेने पांढर्‍या रंगाचं काहीतरी गोल गोल फिरत बाहेर येताना दिसलं. ती 'गरगर' थांबून सगळी चित्रं स्थिर झाल्यावर तो पांढरा रंग म्हणजे पांढरं वाडगं (झबच्या भाषेत बौल) आणि त्या पांढर्‍या रंगाच्या वाडग्यातला पांढरा पास्तुला आहे हे कळलं."हा चीजसॉस मध्ये केला असल्याने पांढरा दिसतोय. आपण टोमॅटो सॉस मध्येही करू शकतो आणि टोमॅटो सॉस घालून केल्यावर पास्ता छान लाल आणि जरा तिखट होतो" अशी (तिच्या मते) अत्यंत उपयुक्त माहिती बायकोने पुरवली. डोळे फाडफाडून बघितलं तरीही त्या चार टिन्समधले ते विविध रंगांचे पदार्थ आणि ते बदामाचं झाड मला त्या पास्तुल्यात कुठेही दिसलं नाही.

"कोण खाणार हा पास्तुला?" असं मी म्हटल्यावर बायकोने "ए ते 'पास्तुला पास्तुला' म्हणणं बंद कर बघू आधी. त्याला सरळ सुटसुटीत भाषेत 'पास्ता' म्हणतात सगळेजण. तुही तसंच म्हणालास तर जरा बरं वाटेल. तुझं तुलाच." असे शालजोडीतले हाणेपर्यंत झब ने स्क्रीनच्या उजव्या कोपर्‍यात दिसणार्‍या नंबरवर फोन करण्याविषयी सुचवलं.
"ते वेगवेगळे सॉसेस, चीज, बदाम आणि पास्ता असं सगळ्याचं एकत्र पॅकेज मिळतं फक्त $१९.९९ ला. ते ज्यांना हवं असेल त्यांनी त्या नंबरवर फोन करायचा " असं बायकोने झब च्या भाषेत सांगितलं.
माझ्या आधीच्या प्रश्नातला 'खाणार' काढून तिथे 'घेणार ' टाकून आधीचा प्रश्न मी 'पुन्हा' रिपीट केला. ('पुन्हा' पुनरुक्ती... ते ... 'पुन्हा' रिपीट.. चालू द्या..)
आणि माझ्या त्या प्रश्नाचं उत्तर बायकोऐवजी झब नेच दिलं. ती सुहास्य वदनाने वदती झाली की २४ कॉलर्स वेटिंगमध्ये आहेत आणि अजून फक्त ९ मिनिटंच ही ऑफर आहे.

मी वैतागून जाऊन आणि यावेळी बायकोला न जुमानता चॅनेल बदलायला धावलो. आयुष्यात पुन्हा कधीही हे चॅनेल लावायचं नाही हे लक्षात ठेवून , त्याला अ‍ॅडल्ट-लॉक लावायचं हे ठरवून ते चॅनेल कुठलं आहे ते बघायला गेलो तर चॅनेल होतं Thirteen .... थर्टीन.... तेरा... १३....
आणि सायबाच्या शुभ-अशुभाच्या कल्पनांना मी मनोमन दंडवत घातलं !!!!!


तळटीप : हा ब्लॉग पहिल्यांदा वाचणार्‍या रसिकां/खादाडांसाठी हे काही सुटसुटीत कं-फॉर्म
आम्या : आधीचा म्याटर
अंअं : अंदाजे अंक
अं : अंदाजे

Friday, April 9, 2010

चिदुभाऊ आणि नन्ना !!

"वाहिनी, चिप्या आहे का घरात?" त्याने आत शिरता शिरताच विचारलं.
"भाऊजी तुम्ही? अहो याना आत. इश्श आणि हे कधी नसतात घरात? बसा तुम्ही. मी बोलावते त्यांना. ते झोपले आहेत आतमध्ये"
"तो झोपला असेल तर नंतर येऊ का मी?"
"अहो छे हो त्यात काय."

जरा वेळाने चिप्या बाहेर आला. मित्राचा चेहरा बघताक्षणीच त्याने ओळखलं की काहीतरी गडबड आहे म्हणून.

"काय झालं?"
"अरे नेहमीचंच रे. खडूस बॉस, विचित्र ऑफिस अवर्स, अशक्य डेडलाईन्स आणि या सगळ्याचं आउटपुट म्हणजे सतत वैतागलेली बायको. ती चिडून माहेरी गेलीये. मी वेळेवर घरी यायला लागल्याशिवाय परत येणार नाही म्हणते. सारखं तुझं उदाहरण देऊन म्हणते की चिप्या भाउजी कसे वेळेवर येतात. वहिनी तिला भेटतात तेव्हा नेहमी सांगतात की तू कसा लवकर घरी येतोस, बायकोमुलांना वेळ देतोस, त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये, पिक्चरला जातोस. ते सगळं ऐकून तर ती माझ्यावर अजूनच चिडलीये. चिप्या, प्लीज मला मदत कर."
"ते चिप्या म्हणणं बंद कर बघू आधी. तू मला सरळ सरळ नावाने हाक मार किंवा स्पष्टपणे 'चिदुचा पीए' असं म्हण. हे चिप्या नको उगीच."
"बरं पण प्लीज सांग ना तुला हे सगळं कसं जमतं? ऑफिसचं काम, टेन्शन्स सगळं सांभाळून तुला कसा वेळ मिळतो?"
"अरे सोप्पं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला ऑफिसात काम नाही, टेन्शन नाही. माझा बॉस झक्कास आहे एकदम. त्याला कुठलंही काम करायचं नसतं. सगळ्याला नकारघंटा वाजवतो. मला काय त्याच्या नकारघंटेचा थोडा अभ्यास करून, थोड्या कारणांचा मीठ-मसाला टाकून फक्त भाषण टायपून द्यायचं असतं."
"म्हणजे"
"अरे कुठलंही काम, जवाबदारी आली की नन्नाचा पाढा वाचायचा. झालं काम.
"म्हणजे?"
"एक मिनिट थांब" असं म्हणून चिप्याने शेजारच्या टेबलावरची 'अहवाल' असं लिहिलेली फाईल उचलली. ती मित्रासमोर उघडून धरत त्याला ती वाचायला सांगितली. तो वाचू लागला.


=========================================
** (नन्ना) अहवाल क्र. १

विषय : परराष्ट्र आणि हल्ले
कालावधी : १ डिसे ०८ ते २८ फेब ०९

तपशील : ही सगळी शेजारील राष्ट्राची कारस्थानं आहेत हे आम्हाला ठाऊक नाही असं कोणीही समजू नये. त्यांच्या दहा जणांनी आमच्या शेकडो जणांचा जीव घेतला असला तरीही आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार नाही. आमचं राष्ट्र हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, आमचं सरकार, आमचे नागरिक शांतताप्रिय आहेत हे कोणीही विसरू नये. आम्ही प्रसंगी त्यांच्या (म्हणजे आमच्याच नागरिकांच्या) जीवाचं बलिदान देऊ पण भ्याडपणे युद्ध पुकारणार नाही. त्या दहामधला एकजण अशाच एकाच्या बलिदानामुळे आमच्या हाती गवसला आहे आणि त्याची योग्य पद्धतीने चौकशी करून, योग्य ते न्यायालयीन रितीरिवाज पार पाडून, त्याला उचित न्याय  देणं हे आमचं कर्तव्य असून त्यात आम्ही कसूर करणार नाही. आम्ही त्यांना सगळे पुरावे दिले आहेत व तेच पुरावे घेऊन मी त्या मोठ्या गोर्‍या साहेबाकडे जाऊन दाद मागितल्याशिवाय राहणार नाही. अशा या पुस्तकी आदर्श पद्धतीने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आम्ही सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेऊन त्यांच्या मनात (आमच्या) शेजार्‍यांबद्दल योग्य ती जागृतता निर्माण करणं ही वाटते तेवढी कठीण गोष्ट नाही. न्याय हा झालाच पाहिजे आणि तोही योग्य पद्धतीनेच आणि त्यासाठी वर्षानुवर्षे थांबावं लागलं तरी आम्ही डगमगणार नाही. आमचं शांत राहणं म्हणजे आमची दुर्बलता आहे असं कोणीही समजू नये !!
प्रसिद्धी : इथे आणि इतर अनेक ठिकाणी.

** (नन्ना) अहवाल क्र. २

विषय : 'गुरु'चा निकाल आणि अर्ज
कालावधी : १ मार्च ०९ ते ३१ मे ०९

तपशील : 'गुरु'चं काय करणार असं सारखं सारखं विचारून त्रास देऊ नका. त्याने 'दयेचा अर्ज' दाखल केला आहे आणि 'दयेच्या अर्जांच्या' यादीत एकूण २८ जण आहेत आणि गुरुचा क्रमांक २२ आहे हे कदापि विसरू नका. त्या क्रमाने त्याचा नंबर जेव्हा येईल तेव्हा त्याच्या अर्जावर विचार करण्यात येईल हे तुम्हाला आधी सांगितलं नाहीये का? तर हे २२ आणि २८ हे दोन अंक तुम्ही कधीही विसरू नका !!! त्या यादीप्रमाणे त्याचा नंबर येईपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही.
प्रसिद्धी : इथे आणि इतर अनेक ठिकाणी

** (नन्ना) अहवाल क्र. ३

कालावधी : १ जाने १० ते ३१ मार्च १० (आणि इतरही अनेक प्रसंगी)
विषय : नक्षलवादी आणि भ्याडपणा

तपशील : नक्षलवाद्यांनी या देशातल्या कितीही लोकांना, पोलिसांना, निरपराध आदिवासींना हालहाल करून ठार मारलं आणि ते स्वतःला या देशाचे नागरीक समजत नसले तरीही आमच्यासाठी ते या देशाचे नागरीकच आहेत. नक्षलवाद्यांना बाहेरच्या देशातून, तेथील अतिरेकी संघटनांकडून कितीही मदत मिळत असली तरीही ते अतिरेकी नाहीत. अजूनही असे कितीही भीषण आणि भ्याड हल्ले झाले तरीही आम्ही त्यांच्याविरुद्ध लष्कराला पाचारण करणार नाही, हवाईहल्ले करणार नाही, कडक कारवाई करणार नाही. त्यांच्याशी लढण्यास पोलीस सक्षम आहेत. त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर म्हणजे चर्चा आणि फक्त चर्चा. 'चर्चा करून प्रश्न सोडवणे' (कितीही सुटला नाही तरी निदान तसं चित्र निर्माण करणे) यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
प्रसिद्धी : इथे आणि इतर अनेक ठिकाणी

=========================================

हे आणि असे इतर अनेक छोटे छोटे तपशील, प्रसंग चिप्याच्या मित्राला अहवालांच्या फाईलमध्ये मिळाले आणि ते पाहून त्याने चिप्यासमोर अक्षरशः हात जोडले आणि म्हणाला "चिप्या, तुझा चिदुभाऊ खरंच महान आहे रे. कित्ती चुटकीसरशी सगळे प्रश्न सोडवतो. बाकीच्यांना झाला तरी त्याला आणि त्याच्या हाताखालच्यांना काहीच त्रास नाही. झक्कास नोकरी आहे बघ ही. बघ ना जरा चिदुभाउंना 'असिस्टंट चिप्या' हवाय का ते. मिळेल त्या पगारात नोकरी करायला तयार आहे मी." !!

----------

वरील सगळ्या प्रसंगांना चिदुभाऊ एकटेच जवाबदार आहेत असं आमचं मुळीच म्हणणं नाही. पण अनेक महत्वाच्या प्रसंगांत आणि निर्णयात देशाचे गृहमंत्री या नात्याने त्यांनी केलेली बेफिकीर, पळपुटी आणि बोटचेपी विधानं दुर्दैवाने सरकारची निष्क्रियता, ठोस आणि कडक निर्णय घेण्यातलं दौर्बल्य वेळोवेळी अधोरेखित करतात.

१. जसं २६/११ च्या तपासानंतर झालेल्या गोष्टी. आम्हाला सतत संयम राखण्याचं आवाहन करणारा गृहमंत्री (आणि संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान वगैरे वगैरे) नकोय. काहीतरी ठोस कृती करण्याचं नुसतंच आश्वासन न देता तशी कृती करणारा आणि ती कृती जनतेच्या नजरेस आणून जनतेचा आत्मविश्वास आणि सरकारवरचा विश्वास वाढवणारा नेता हवाय. पुरावे आणि सुरक्षा अहवालांच्या कागदांची बाडं भारतातून अमेरिकेत नेऊन तिथल्या साहेबासमोर ती मांडून तीच आपल्या नोकरीची आणि जीवनाची इतिकर्तव्यता मानणार्‍या कुरियरबॉय आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यात काहीतरी ठळक फरक दिसायला नको का?

२. किंवा "अफझल गुरुच्या दयेच्या अर्जाचा क्रमांक २२ आणि आणि आधीच्या २१ अर्जांचा निकाल लागल्यावर त्याचा नंबर येईल" असली शाळकरी गणितं शिकवणारा गृहमंत्रीही नकोय. कारण २२ नंबरच्या व्यक्तीने जो भीषण गुन्हा केलाय तसा गुन्हा आधीच्या २१ व्यक्तींनी केलाय का हे तपासून बघून त्या अनुषंगाने उगाच लालफितीत न अडकता बाविसाव्या नंबरला विशेष घटना म्हणून बघून ताबडतोब त्या दृष्टीने काही हालचाल करणारा आणि संबंधितानांना हालचाल करायला भाग पडणारा आणि त्या दृष्टीने सारासार विचार करणारा नेता हवाय.

३. 'वंदे मातरम' इस्लामविरोधी असल्याचे कारण देत, मुस्लिमांनी हे गीत गाऊ नये, असा फतवा जमात-ए-उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेने चिदुभाऊंच्या उपस्थितीत काढला अशी बातमी जेव्हा आली तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्या संघटनेचा निषेध करून हे अयोग्य असल्याची जाणीव त्या संस्थेला कडक शब्दात करून देणं आवश्यक होतं. असं केल्याने जनतेसमोर त्यांची प्रतिमा उजळली असती. असला बेअक्कल आणि देशद्रोही फतवा काढणं हे जेवढं धक्कादायक होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक हे धक्कादायक होतं की हा फतवा केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर काढला जातो (निदान बातमी तरी अशीच होती.). परंतु अशा वेळी त्या संस्थेचा जाहीर निषेध करण्याऐवजी चीदुभाऊ पूर्ण वेळ रमले होते ते हे दाखवण्यात की असा असा फतवा जेव्हा निघाला तेव्हा मी तिथे कसा नव्हतो, माझ्या उपस्थितीत हे असलं काहीही झालेलं नाही हे दाखवण्यातच. अरे पण त्या फतव्याबद्दल तुमचं (आणि सरकारचं) अधिकृत मत काय हे सांगण्याची तसदी त्यांनी घेतल्याचं (निदान मला तरी) कधीच स्मरत नाही.

४. ही सर्व मूळं आत्ता उकरून काढण्याचं एकमेव कारण म्हणजे पुन्हा एकदा तीच निष्क्रियता आणि आम्ही कसे शांततेचे उपासक आहोत हे दाखवण्याची अहमहमिका आणि त्यापायी असंख्य निरपराध नागरिकांचा आणि पोलिसांचा नक्षलवादी जीव घेताहेत हे पाहताना, वाचताना होणारी सामान्य माणसाची तडफड. चिदुभाऊ आणि त्यांचे सहकारी आणि पगडीवाले साहेब लोक गेले कित्येक महिने कंठशोष करत आहेतच की "आम्ही नक्षलवाद्यांविरोधात हवाईहल्ला करणार नाही, लष्कराची मदत घेणार नाही, हे करणार नाही आणि ते करणार नाही.". काय करणार नाहीस ते कळलं. पण भल्या माणसा, काय करणार आहेस ते सांग की. काय करणार आहेस जेणेकरून अंगाची चाळणी होईपर्यंत गोळ्या घालून ठार मारणार्‍या, मुंडके कापून धड पाठवून देणार्‍या, अत्यंत कमी संख्येत असणार्‍या पोलिसांना चहुबाजूंनी घेरून त्यांना अतिशय क्रूर प्रकारे ठार मारणार्‍या, निरपराध आदिवासी लोकांना वेळोवेळी भीती घालून, धमक्या देऊन अनेकदा त्यांच्याही जीवाशी खेळणार्‍या नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट करू शकशील?? आदल्या दिवशी नक्षलवाद्यांना 'भ्याड' संबोधल्यावर दुसर्‍या दिवशी बदला म्हणून हजाराच्या वर नक्षलवाद्यांनी ७६ पोलिसांना घेरून त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार मारल्यावरही दुसर्‍या दिवशी पुन्हा बोलताना "आम्ही हवाईहल्ला करणार नाही, लष्कराची मदत घेणार नाही, त्यासाठी पोलीस सक्षम आहेत" अशी निर्लज्ज विधानं करताना तुमची जीभ उचलली तरी कशी जाते??? बोला चिदुभाऊ, द्या उत्तर... !!

माझे खादाडीचे प्रयोग !! : भाग २

दिवस : काही वर्षांपुर्वीचा शनिवार
वेळ : दुपारच्या जेवणाची वेळ होऊन बरेच तास उलटून गेलेली आणि रात्रीच्या जेवणाला अजून बराच अवकाश असलेली अशी अधली मधली.
स्थळ : तेव्हाचा डोंबिवलीतला एकमेव एसी हॉल
प्रसंग : जाम भूक लागली होती. (तरीही) मी ताटातला पहिला घास घेतला. घेतला म्हणजे हातात घेतला.. आणि बायकोला भरवला. तो पहिला घास भरवताना इतकं छान रोमँटिक वाटत होतं ना की घास भरवणं हे आयुष्यातलं सर्वात सुंदर काम आहे आणि आयुष्यभर असंच घास भरवत रहावं असं वाटून गेलं.

दिवस : काही आठवड्यांपुर्वीचा शनिवार
वेळ : दुपारच्या जेवणाची
स्थळ : घरातला हॉल, बेडरूम, किचन (आणि प्रसंगी बाथरूमही)
प्रसंग : जाम भूक लागली होती. (तरीही) मी ताटलीतला पहिला घास घेतला. घेतला म्हणजे हातात घेतला.. आणि ..... ................ आणि ओरडलो "कुठे पळतोयस? हा एवढा भात खाल्ल्याशिवाय इथून हलायचं नाही." त्याने (पुन्हा) भोकाड पसरला.

ओरडणं आणि भोकाड सोडलं तर वर्तुळ पूर्ण झालं होतं. काही वर्षांपूर्वी रोमँटिक वाटणारं घास भरवण्याचं काम आता मात्र भयानक कंटाळवाणं आणि कटकटीचं वाटायला लागलं. थांबा थांबा.. "काय हा मुर्खपणा..", "निष्ठुर बाप", "लहान मुलावर ओरडतात का असं कधी" असे वाग्बाण सोडण्याआधी या वर्तुळाचे टप्पे (म्हणजे क्रम याअर्थी बॉलचे टप्पे नव्हेत.) बघुया का जरा आपण? पण अर्थातच ही पोस्ट (लेकाला) घास भरवण्याविषयी (आणि लेकाने भरवून घेण्याविषयी) असल्याने मी तुम्हाला आत्ता, साधारण चौथ्या (की पाचव्या?) महिन्यात उष्टावण झाल्यावर त्याला आम्ही भाताची पेज देणं कसं सुरु केलं, तो पेज पिताना कशी नाटकं करतो आणि करायचा, पेज पाजायला आई आणि समोर नकला करायला, गाणी म्हणायला, हातवारे करायला बाबा तैनात असल्याशिवाय तो तोंडही कसं उघडायचा नाही, चार चमचे खाऊन झाल्यावर उलटी आल्यासारखा आवाज खोटा खोटाच कसा काढायचा, मग ते खोटं खोटं आहे हे कळेपर्यंत आम्ही सुरुवातीला त्याला त्याने उलटीचा आवाज काढून ऑँ ऑँ असं केल्यावर लगेच त्याला कसं उठवून बसवायचो, पेज पाजायला आणल्यावर त्याला अचानक आई आणि बाप नकोसे कसे व्हायचे, अचानक किचन आणि बेडरूमीतल्या सगळ्या वस्तूंबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण होऊन तो त्या दिशेने कसा पळायचा (पक्षि रांगायचा) हे सांगून किंवा पेज पाजायला मांडीवर आडवं घातलं की त्या क्षणापासून तो 'भुताचा भाऊ' मधल्या अशोक सराफ काकांसारखा (त्याचा काकाच ना अशोक? आयला... त्याचा काय माझाही) भुर्रर्रभ्र्रूम भुर्रर्रभ्र्रूम (हे दर वेळी वेगळं असतं थोडंफार.. अशोकचं नव्हे म्हणजे अशोक काकांचं नव्हे... आदितेयचं) असे भुरके कसे मारायचा, ते भुरके मारल्यावर त्याच्या तोंडातली सगळी पेज उडून त्याचे आणि आमचे हात, पाय, चेहरे कसे रंगून जायचे, ते भरलेले चेहरे बघितल्यावर आम्ही (मी) त्याला उचलून रागाने सिंककडे जायला लागलो की तो खुश होऊन कसा टाळ्या पिटायचा (अजूनही पिटतोच.. पाण्यात खेळणं प्रचंड प्रिय... पण ते नंतर बघू... हे वाक्य संपत नाहीये च्यायला...), त्याचं हे खोट्या उलटीचं नाटक आमच्या लक्षात यायला लागल्यावर त्याने खोटं खोटं झोप येण्याचं नवीन शस्त्र कसं उगारलं, आणि तेही खोटं आहे हे आम्हाला कसं उशिरा समजलं, पेज पाजायला मांडीवर घेतल्यावर त्याचं लक्ष वळवण्यासाठी तात्पुरतं त्याच्या हातात दिलेलं खेळणं त्याची जिवाभावाची इस्टेट कशी बनून जायची आणि पेजेपेक्षा त्या खेळण्यावरचं त्याचं अमाप प्रेम कसं ओथंबून वाहायला लागायचं हे सगळं (अजून) सविस्तरपणे सांगून तुम्हाला पकवणार नाही.........
हुश्श.. दमलो... पाणी पिऊन येतो... मिलते हैय ब्रेक के बाद....


आलात? वाटलं नव्हतं (एवढं सगळं झाल्यावर) परत याल. तर "'नेसले सिरेलॅक घासाचा तास (त्रास)' च्या पुढच्या भागात आपलं मन:पूर्वक स्वागत" असं काहीसं मागून ऐकू येत असेल तर तो दोष आमचा वा आदितेयचा नाही. ते रियालिटी शोज बघणं थोडं कमी करून बघा ;-)  असो..
"वयात आलेल्या मुलांची (म्हणजे मुलं आणि मुली दोघेही या अर्थी) सगळ्यांत नावडती भाजी कुठली?? अर्थात पालक" हा आम्ही वयात येत असताना सुपरहिट असणारा सुविचार (!) आमच्या लेकाला एवढ्यातच कसा काय कळला आणि एवढा आवडलाही हे कळणं अवघड आहे पण ते शब्दश: खरं आहे. नाहीतर इतर वेळी प्राणप्रिय असणारे आईबाप बरोब्बर जेवणाच्या वेळी नकोसे झाल्यासारखा वागला नसता तो.

भात अजिबात न आवडण्यात तो अगदी बापावर गेला आहे असं त्याच्या मातोश्री म्हणतात. पण तसं तर आरडाओरडा करण्यात, गाढ न झोपण्यात, चीडचीड करण्यातही तो बापावर गेला आहे असंही त्या म्हणतात. आपण किती गोष्टींवर विश्वास ठेवायचा हे आपण आपलं ठरवायचं. मी ठेवत नाही (म्हणून) तुम्हीही ठेवू नका. अरे ब्लॉगर-वाचक म्हणतात ते रिलेशन बिलेशन काय हाय का नाय आपलं???

तर नुकतंच काही महिन्यांपूर्वी त्याची पेज कमी करून त्याला भात, भाज्या, फळं खायला घालायला सुरुवात करायचं ठरल्यावर आता त्या खोट्या उलट्या, ते भुर्रर्रभ्र्रूम भुर्रर्रभ्र्रूमचे खोटे आवाज, ती चेहर्‍यांची रंगरंगोटी या सगळ्यातून सुटका होणार अशा विचाराने उल्हसित झालेल्या माझ्या मनात आनंदाचं कारंजं थुईथुई नाचायला लागलं. पण अरेरे, ओह नो, अर्रर्र चकचक..... पल्याडचं गवत ह्ये न्येहमीच अल्याडच्या गवतापेक्षा हिरवंगार वाटतं याचा अनुभव नोकरीच्यावेळी येतो तसाच आत्ताही पुन्हा आला आणि यावेळीही नेहमीप्रमाणेच पलीकडे गेल्यावर तो आला हे तर ओघानेच आलं.

जाउदे जाम लांबण लागलीये. ते स्थळ, काळ, प्रसंग टायपात मस्त फटाफट संपेल... तसंच लिहितो आता.

दिवस : प्रसंग बायकोने (अर्थात पुन्हा लेकालाच) घास भरवण्याविषयी असेल तर कुठलाही.. मी (आ म्या) घास भरवण्याविषयी असेल तर विकेंड.
वेळ : पहिला पर्याय असेल तर दुपार, (दुसरा पर्याय क्वचितच असतो म्हणा)
स्थळ : हॉल, बेडरूम, किचन
प्रसंग १ : आई किंवा बाप (थोडक्यात भरवणारा. बरेचदा आईच) जेवणाची डिश घेऊन आली आणि लेकासमोर बसली की ती ज्या दिशेला बसली असेल त्याच्या १८० अंशात तोंड फिरवून पळून जाणे आणि आपलं (म्हणजे त्याचं) त्यांच्याकडे (म्हणजे आपल्याकडे) लक्षच नाही असं दाखवून स्वतःच्याच तंद्रीत राहून एखाद्या (प्रसंगी नावडत्या) खेळण्याशी खेळत बसणे

दि. वे. स्थ. सगळं तेच
प्रसंग २ : पहिल्या प्रसंगावर मात करून त्याच्या तोंडात घास भरवला (उर्फ कोंबला) की तो न चावता तसाच तोंडात ठेवून देणे. (अजून तरी घास थुंकून बिंकून टाकण्याची समज (!!) आलेली नाही)

प्रसंग ३ :  प्रसंग २ मधला प्रकार करून करून तोंड दुखायला लागलं तर मग तोंड न मिटता तसंच उघडं ठेवणे जेणेकरून पुढचा घास भरवताच येणार नाही. एकदा त्याने असंच जवळपास १० मिनिट तोंड पूर्ण उघडं ठेवलं आणि मग दुखायला लागलं म्हणून रडारड करायला लागला. पण तोवर आमचा दुसरा घास तयारच होता. :-)

प्रसंग ४ : प्रसंग ३ प्रमाणे व्यूहरचना केल्यास साफ गंडायला होतं हे पुर्वानुभवातून लवकरच लक्षात आल्याने (भलताच शार्प आहे तो. पोरगं कोणाचं आहे शेवटी.. !!) तो चटपट शहाणा झाला. म्हणून पुढच्या वेळेस त्याने घास घेतल्यावर तोंड उघडं ठेवायच्या ऐवजी मारुतीसारखं हुप्प करून मिटून घेतलं. तेही ५-१० मिनिटं नाही.. चक्क २० मिनिटं.. आरडाओरडा नाही, किंचाळणं नाही, गडबड नाही, धावपळ नाही, रडारड नाही. सगळं एकदम शांत,. एकदम संघ दक्ष.. तर असा २० मिनिटं खेळत अगदी शांतपणे (हुप्प करूनच) खेळत राहिला तो.. मला वाटतं गेल्या ८-१० महिन्यातला तो आमचा सगळ्यात शांत अर्धा तास होता.

प्रसंग ५ : एकदा तर त्याला खूप झोप येत होती आणि जाम भूकही लागली होती. (मलाही होतं हो असं बर्‍याचदा). पटकन खाऊन झोपेल म्हणून त्याला एक घास भरवला पण त्याला झोप एवढी असह्य होत होती की तो घास त्याला चाववेना आणि झोप काही आवरेना. गिळून टाकता येईना आणि थुंकून टाकायची अक्कल नाही अजून (सांगितलं नाही का मगाशी.. ! ).. त्यामुळे जाम रडारड करत, आरडाओरडा करत, एकीकडे थोडं पाणी पीत त्याने तो घास संपवला आणि दुसर्‍या क्षणी झोपून गेला.

काय बोललो... दि. वे. स्थ. प्र स्टाईलने एकदम फटफट होईल म्हणून. उगाच पाल्हाळ आवडत नाही आपल्याला. कारण वेळ नाही हो मिळत हल्ली. (त्याच्या) दोन घासांच्या मध्ये मिळतो तेवढाच काय तो वेळ. बाकी मग आहेतच प्रसंग १,२,३,४,५ आणि त्या सगळ्यावर दर वेळी मात करताना उडालेली धांदल ;-) ... पळतो आता.. अरेच्च्या हे तोंड काय असं केलंय याने आणि नाचतोय का असा गोलगोल? घास संपला का तोंडातला?? बोंबला... प्रसंग ६ येऊ घातलाय वाटतं. देवा...... आता पुन्हा नवीन हल्ले-प्रतिहल्ले आणि नवीन व्यूहरचना.. पळतोच कसा... !!!

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...