Showing posts with label पडदा. Show all posts
Showing posts with label पडदा. Show all posts

Thursday, November 17, 2011

शब्द : ए ते यु

तम्मत्तद्दो ओ ओ ओ
(कै)त्ता चम्माना आदा नतते दिकादे
तम्मत्तद्दो ओ ओ ओ

अलम हिंदी संगीताच्या दुनियेत हे एकमेव गाणं शिल्लक उरलं असावं किंवा मग सरकारने यच्चयावत सगळ्या गाण्यांवर बंदीची मोहोर उमटवली असून फक्त, फक्त आणि फक्त (ट्रुथ, द होल ट्रुथ अँड नथिंग बट द ट्रुथ किंवा आपल्या हिंदी चित्रपटांच्या कोर्टातल्या सीनमधल्या "सिर्फ सच कहुँगा और सच के सिवा कुछ नही कहुँगा" च्या स्टायलीत) हे एकच गाणं ऐकण्याची (वाचा पुन्हा पुन्हा ऐकण्याची) सक्ती केली असावी अशा थाटात हे गाणं आमच्याकडे वाजतं, वाजत असतं.. म्हणजे इत्त....क्या वेळा वाजत असतं.. अर्थात वर दिल्याप्रमाणे नाही तर नॉर्मल अ-बोबड्या शब्दांत.. त्याचं बोबडेकरण हे अगदी शुध्द होममेड आहे. अर्थात अ‍ॅकॉनने गायलेलं मूळ गाणंही खरं तर बोबड्या शब्दांतच आहे. (आणि कदाचित त्यामुळेच लेकाला ते जवळचं वाटलं असावं... बडबडगीतासारखं).. त्यामुळे ते अजून बोबड्या शब्दांत गायलं तर त्यात काहीच चूक नाही. हवं तर त्याला 'होममेड रिमिक्स व्हर्शन' म्हणू शकतो. अर्थात ते अ‍ॅक्क्याने (कृ. अक्षयकुमारप्रेमींनी गैरसमज करून घेऊ नये.) गायलेलं असल्याने त्याला सगळं माफ आहे. परंतु समजा हेच जर मी (इथे 'मी' हे फक्त उदाहरणादाखल वापरण्यात आलेले सर्वनाम आहे याची समस्त जिज्ञासूंनी कृपया नोंद घ्यावी.) शाळेत हिंदीच्या पेपरात हे असं 'अखियाँ' च्या ऐवजी 'अक्किया' (कृ. अक्षयकुमारप्रेमींनी पुन्हा एकवार गैरसमज करून घेऊ नये.) किंवा मग 'कैसा'च्या ऐवजी 'केस्सा', 'नखरे दिखा' च्या ऐवजी 'नक्रे दिका' आणि 'छम्मकछल्लो' च्या ऐवजी 'चम्मकचल्लो' असं लिहिलं असतं तर फकस्त हिंदीच्याच नाही तर समस्त शिक्षकगणाने मला "धिन मे तारे दिका"वले असते. अर्थात कुठल्या शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात 'छम्मकछल्लो' हा शब्द ऑफिशियली वापरला जातो हा मुद्दा तूर्तास गौण आहे.

तर हे असं 'चम्मकचल्लो' वारंवार ऐकून मला माझ्या उमेदीची वर्षं आठवली. 'चित्रपट प्रेक्षक' या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं.. गोंधळ झाला असल्यास दोन्ही वाक्यं पुन्हा एकदा वाचा.. झालेला गोंधळ शमला असल्यास पुढचं वाक्य वाचा. शमला नसेलच याची खात्री असल्याने तेच वाक्य पुन्हा एकवार व्यवस्थित लिहितो.

"तर हे असं 'चम्मकचल्लो' वारंवार ऐकून मला माझ्या 'चित्रपट प्रेक्षक' या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं आठवली." हुश्श..

तर तो काळ म्हणजे असा की ज्यावेळी रा. रा. रणजीत (रा. रा. रणजीत हे क... क... किरण प्रमाणे वाचू नये. अन्यथा रा१ बा१ वेळा बघण्याची शिक्षा ठोठावण्यात येईल.), शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद, किरण कुमार वगैरे लोक श्रीदेवी, जयाप्रदा (लांब केस असल्याने लहानपणीची माझी आवडती हिरवीण) झालंच तर पूनम धिल्लो, रीना रॉय वगैरे बायांची त्या 'गाव के नदी पे' पाणी भरायला किंवा मग कपडे धुवायला जात असताना वाट अडवायचे आणि तेव्हा त्या छेडछाड प्रकरणाचा श्रीगणेशा व्हायचा तो याच वाक्याने. "हाय रे म्मेरी छम्मकछल्लो." त्यानंतर मग माफक चर्चेनंतर आणि त्या बाईच्या त्या चित्रपटातल्या स्थानानुसार (म्हणजे हिरोची बहिण/प्रेयसी/बायको) 'हिरव्या' ची एन्ट्री किंवा छम्मकछल्लोचा तो क्लासिक डायलॉग उच्चारणार्‍या कुत्त्या/कमिन्याच्या गालावर एक चपराक आणि त्यानंतर बाईचं अपहरण वगैरे गोष्टी घडायच्या. पण असो. तो आपला आजचा मुद्दा नव्हे.

तर 'छम्मकछल्लो' या शब्दाची ओळख मला झाली ती अशी रणजीत, शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद, किरण कुमार यांच्या तोंडूनच. अमिताभ, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदा, मिथुनदा, संजू बाबा प्रभृतींनी कधीही आपल्या साता जन्माच्या प्रेयसीला छम्मकछल्लो सोडा साधं डार्लिंग/डिअर म्हटल्याचंही स्मरत नाही. गेला बाजार जानू, जान, सनम, दिलबर, जानेमन वगैरेच आणि तेही कटाक्षाने फक्त गाण्यांमध्येच.

तत्कारणात् शाहरुख खानाला त्याच्या बायडीला त्या अलिखित नियमानुसार उपरोल्लेखित साच्यातली हाक न मारता एखाद्या खलनायकाने रस्त्यावरच्या बाईला छेडताना बोलवावं तशा पद्धतीने बोलावताना आणि त्या हाकेला ओ देत त्या बयेने नाचत नाचत पुढे येताना पाहून माझ्यातल्या ऑर्थोडॉक्स प्रेक्षकाला अंमळ कसंसंच झालं आणि सुमारे १२-१५ वर्षांपूर्वीची करीना करिष्मा आठवली. लग्नानंतर करिष्माचं वेगाने गायब होणं आणि त्याच्या जवळपास दुप्पट वेगाने करीनाने पडदा काबीज करणं यामुळे झालंय काय की "त म्हटल्यावर ताकभात" प्रमाणे "क म्हटल्यावर/लिहिल्यावर" आधी करीनाच आठवते (इथे सैफभक्तांच्या किंवा एकताभक्तिणींच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्हास त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. एखाद्याला सैफ किंवा/आणि एकता आवडतो/ते हाच खरं तर पुरेसा गुन्हा आहे !!). करिष्मा डोक्यातही येत नाही. असो..

तर या 'चम्मकचल्लो' (शब्दा) च्या सढळ वापरामुळे मला पंधरा एक वर्षांपूर्वी 'खुद्दार' नावाच्या गोंद्याच्या तद्दन टाकाऊ चित्रपटात करिश्माच्या तोंडी असलेलं "सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले, हाय सेक्सी हॅलो सेक्सी क्यों बोले" वालं गाणं आठवलं. ते गाणं पहिल्यांदा टीव्हीवरच्या 'सुपरहिट मुकाबला' (चित्रहार/छायागीतचं नव्वदीच्या दशकातलं अपग्रेडेड व्हर्शन) नामक कार्यक्रमात ऐकलं आणि धरणीमाय पोटात घेईल तर बरं असे काहीसे भाव अस्मादिकांच्या आणि आमच्या 'चित्रपट-नावडणाऱ्या' पालकांच्या चेहर्‍यावर जवळपास एकाच वेळी दाटले. लगबगीने उठून च्यानेल बदलले गेले हेसांनल. त्यावेळी आमच्या घरात निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण जवळपास मुंबईभर किंवा कदाचित देशभरही ("वचने किं दारिद्रता" च्यायला) पसरलं असावं. कारण दोनच दिवसांनी चित्रहाराच्या कार्यक्रमात ते गाणं चक्क असं वाजलं होतं.

"__ __ __ मुझे लोग बोले
हाय __ हॅलो __ क्यों बोले"

त्यानंतर काही दिवसांतच 'सेक्सी'चं सोवळेकरण करून गाळलेल्या जागा भरत तिथे चतुराईने 'बेबी' शब्दप्रयोगाचा चपखल वापर करून मोठ्या खुबीने तेच गाणं पुन्हा "बेबी बेबी बेबी मुझे लोग बोले" करत राजरोसपणे वाजायला लागलं आणि तमाम 'सेक्सी' प्रकरणावर पडदा पडला. त्याच्यानंतर काही दिवसांनी/महिन्यांनी घडलेली गोष्ट असेल. 'दुलारा' नामक असल्याच लक्षातही ठेवण्याची लायकी नसलेल्या चित्रपटात "मेरी पेँट भी सेक्सी, मेरा शर्ट भी सेक्सी" असं करत करत शेवटी रुमालावर घसरत म्हणजे "रुमालभी सेक्सी है" असं जाहीर करत अचानक गोंद्या उड्या मारताना दिसला. त्याच्या त्या तथाकथित सेक्सी कपड्यांचं ('गोविंदाचे कपडे' आणि 'सेक्सी' हे दोन शब्द एकाच वाक्यात येणे यासारखं विरोधाभासाचं दुसरं उदाहरण नसेल !!) उड्या मारत केलेलं मार्केटिंग त्यानंतर काही दिवस चालू होतं. परंतु तेव्हा त्या गाण्यावर कोणी विशेष आक्षेप घेतल्याचं स्मरत नाही. कदाचित मुलीने स्वतःला सेक्सी म्हण(व)णं आणि मुलाने आपले कपडे सेक्सी आहेत हे तारस्वरात जाहीर करणं यातला दुसरा पर्याय सरकार/सेन्सॉरला कमी निर्लज्ज वाटला असावा.

अर्थात "काय सेक्सी झालीये पावभाजी" किंवा "कसली सेक्सी बाईक आहे यार तुझी" च्या काळात वर सांगितलेलं हे सगळं सेक्सीपुराण म्हणजे निव्वळ चर्वितचर्वण वाटण्याचाच संभव अधिक आहे.. आणि तसंही हे चर्वितचर्वणच आहे. कुठे काही मुद्दा तरी आहे का? उगाच या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणं तर चाललंय. असो.

'छम्मकछल्लो' च्या पॉझिटीव्ह (चित्रपटात स्वतःच्याच बायकोला उद्देशून असल्याने पॉझिटीव्ह) वापरामुळे आणि वय वर्षं अडीच ते वय वर्षं कितीही या सर्वांनी अगदी आवडीने डोक्यावर घेतल्याने असाच अडगळीत पडलेला किंवा निगेटीव्ह (वरच्या कंसाच्या विरुद्ध) अर्थाने वापरल्या जाणार्‍या 'आयटम' या शब्दास सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आम्ही आत्ताच वर्तवून ठेवत आहोत. आणि करीनाने 'छम्मकछल्लो' केल्याने कतरीना 'आयटम' शब्द असलेलं आयटम सॉंग करणार हे जवळपास नक्की आहे !! कदाचित 'दुःशासन : The Dusha's-Son' किंवा मग "कंस : The Con's Story" असल्या एखाद्या नावाच्या चित्रपटात विवेक मुश्रान किंवा शरद कपूर किंवा मग गेला बाजार चंद्रचूड सिंग असल्या एखाद्या दुसरं कुठलंही काम नसणार्‍या महामख्ख चेहऱ्याच्या निरुपद्रवी इसमाला 'Dusha's-Son' किंवा 'The Con' म्हणून आपल्यासमोर उभं करून सल्लू किंवा हृतिक किंवा आमीर 'किसन : The Key-Son' म्हणून आपल्यापुढे उभे ठाकतील. थोडक्यात 'छम्मकछल्लो' च्या अचानक वाट्याला आलेल्या अमाप लोकप्रियतेमुळे त्याच्या धाकट्या भावंडाला (की भगिनीला?) उर्फ 'आयटम' ला मरण नाही हे निश्चित आणि कदाचित आयटमच्या मागोमाग 'माल' आणि तत्सम शब्दही या भल्यामोठ्या यादीत असतील !!!

अनेक वर्षांपूर्वी निळूभौंच्या मराठी सिनेमात एका स्त्रीवर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल बोलताना फक्त 'भानगड' असा काहीतरी शब्द वापरून त्या प्रसंगाचं वर्णन केलं गेलं होतं. त्यानंतरही कित्येक वर्षं जबरदस्ती, बळजबरी असे तुलनेने अहिंसक (वर्णनाच्या दृष्टीने अहिंसक) शब्द वापरण्याचा अलिखित नियम होता. एखादा निवडक 'ए' प्रमाणपत्र असलेला हिंदी चित्रपट आला तर त्यात चुकून 'बलात्कार' हा शब्द ओझरता निघून जायचा. जेमतेम वीस वर्षात चित्रपटांच्या भाषेची, दिग्दर्शकांच्या अकलेची आणि प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेची एवढी 'प्रगती' झाली की एके काळी दबून हलक्या आवाजात उच्चारला जाणारा शब्द 'चमत्कार' ला प्रतिशब्द म्हणून वापरला गेला आणि तो तशा पद्धतीने वापरला गेल्याने जणु त्याची तीव्रता कमी होत असावी अशा प्रकारे त्या शब्दावर विनोद करून पोट धरून हसण्यापर्यंत या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या !!!

खरं तर हेलन, बिंदु, अरुणा इराणी वगैरे बायका म्हणजे आद्य आयटम गर्ल्स. एखाद्या क्लबात कॅबरे वगैरे करणं हे त्यांचं चित्रपटातलं प्रमुख काम. कारण आशा पारेख, शर्मिला टागोर, हेमामालिनी, साधना, बबिता, नूतन वगैरे बायांनी असलं काही करणं हे कमीपणाचं किंवा अशोभनीय समजलं जायचं. पण आता करीना, प्रियांका, कतरिना वगैरेंसारख्या मेन हिरविणीच हे काम आनंदाने आणि प्रसंगी मुद्दाम मागून घेऊन करायला लागल्याने राखी सावंत, इत्यादींसारख्या फुलटाईम आयटम-गर्ल्सवर भुकेकंगाल होण्याची वेळ आली आणि त्यांना एकतर बाष्कळ बडबड करून, बेगडी स्वयंवरं रचून आणि टुक्कार न्यायालयांचे तमाशे मांडावे लागले किंवा मग भुक्कड टीव्ही मालिकांमध्ये भडक काजळं लावून भोळ्याभाबड्या, सहनशील नायिकेच्या नवऱ्यांना पटवण्याची कामं इमानेतबारे करावी लागली.

असो.. खरंतर हाही विषय नव्हताच आजचा. तसं म्हटलं तर कुठलाच नव्हता किंवा कोणाबद्दल कसली काही तक्रारही नाही. कारण सिनेमा हे जात्याच एवढं बदलतं माध्यम असल्याने हे कधीनाकधी तरी होणार होतंच.. पण तरीही 'चम्मकचल्लो' मुळे चित्रपटांमधल्या बदलत्या भाषेचा प्रवास सहज जाणवून गेला आणि तो थोडाफार इथे मांडला. अर्थात ही पोस्ट म्हणजे काही तो प्रवास मांडण्याचा वगैरेही काही प्रयत्न नव्हता कारण तो समग्र प्रवास मांडण्यासाठी खूपच विस्तृतपणे लिहावं लागेल. हा लेख म्हणजे फार तर फार काही निवडक किंवा एके काळी वाळीत असलेल्या किंवा सभ्य नायकाने चारचौघात वापरण्यावर बंदी असलेल्या शब्दांचा 'ए' पासून 'यु' पर्यंतचा प्रवास असं म्हणू शकतो जास्तीत जास्त आणि मुख्य म्हणजे 'दिल्लीच्या गुरगुरणाऱ्या पोटा' कडे पाहता/ऐकता ही म्हणजे त्या प्रवासाची फक्त, फक्त आणि फक्त सुरुवात आहे असंच केवळ आपण म्हणू शकतो !!

Wednesday, November 9, 2011

सिनेमाच्या ऑटोमॅटिकली प्रेमात पाडणारं 'सिनेमॅटिक'

- अतिशय प्रसिद्ध आणि सगळ्यात गाजलेल्या ' द एक्झॉर्सिस्ट' या भयपटाचा निर्माता आणि त्याच नावाच्या कादंबरीचा लेखक विल्यम पीटर ब्लॅटी हा त्यापूर्वी विनोदी पटकथाकार म्हणून प्रसिद्ध होता आणि 'द एक्झॉर्सिस्ट' लिहिण्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थितीत असलेल्या ब्लॅटीने त्या काळात विनोदी लेखन/चित्रपटांची लाट ओसरल्याने निव्वळ प्रयत्न म्हणून आणि उपजीविकेचं साधन म्हणून एका १४ वर्षांच्या मुलाच्या अंगातलं भूत उतरवण्याच्या अमेरिकेत प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारित ' द एक्झॉर्सिस्ट' नावाची कादंबरी लिहिली.

- मेट्रिक्स चित्रत्रयी बनवताना वाचोस्कींनी त्यांच्यारोबरच 'अ‍ॅनिमेट्रिक्स' ही नऊ अ‍ॅनिमेटेड लघुपटांची मालिका आणि 'एन्टर द मेट्रिक्स' हा संगणकीय खेळ तयार केला. मेट्रिक्स चित्रत्रयीबरोबरच ही लघुपटांची मालिका आणि संगणकीय खेळ बघितल्या/खेळल्याशिवाय मेट्रिक्सचा आनंद पूर्णपणे उपभोगता येत नाही.

- ९/११ ची ऐतिहासिक दुर्घटना घडल्यानंतर पुढची कमीतकमी ४ ते ५ वर्षं अमेरिकन चित्रसृष्टीने त्या विषयाकडे (काही मोजकेच अपवाद वगळता) जाणूनबुजून संपूर्णतः दुर्लक्ष केलं होतं. प्रेक्षक त्या घटनेला पडद्यावर कसे स्वीकारतील हे त्यामागचं प्रमुख कारण होतं.

एक्झॉर्सिस्ट, मेट्रिक्स किंवा ९/११ शी संबंधित चित्रपट माहिती नसलेले/न बघितलेले (इंग्रजी चित्रपटांचे) रसिक हे नक्कीच अगदी फार फार विरळ असतील परंतु वर दिलेले हे मुद्दे किंवा या प्रकारची माहिती ठाऊक नाही असे लोक मात्र नक्कीच तितकेसे विरळ नसावेत. किंबहुना विपुल असतील.

किंवा मग पायरसीच्या विरोधात बोलण्याची (काही प्रमाणात रास्त) पद्धत असतानाही "निव्वळ पायरसीमुळे का होईना दुर्मिळ किंवा आपल्या इथे प्रदर्शित न होणारे चित्रपट सहजगत्या लोकांपर्यंत पोचवणार्‍या पायरेटेड डीव्हीडी मार्केटच्या प्रेक्षक घडवण्याच्या प्रक्रियेतल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल पायरसीचे आभार" अशा प्रकारचा खळबळजनक आणि तितकाच क्रांतिकारक विचार एका सिनेपरीक्षकाकडून मांडला जाऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसेल का?

विशेष आवड म्हणून, लक्षपूर्वक चित्रपट बघणारे , चित्रपट या प्रकारावर प्रेम करणारे असा एक गट आणि जड विषय न आवडणारे आणि मेंदूला उगाच ताण न देता हलकेफुलके, डोकं बाजूला ठेवून बघायचे चित्रपट आवडणारे असा दुसरा गट असे प्रेक्षकांचे दोन ढोबळ प्रकार पाडता येऊ शकतात. पण तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रेक्षक असलात तरीही चित्रपट बघण्यापूर्वी तो चित्रपट कुठल्या घटनेवर बेतला आहे (असल्यास) , तत्कालीन सामाजिक, जागतिक परिस्थिती, लेखक/दिग्दर्शकाची पार्श्वभूमी, विचारधारा, वैशिष्ठ्य इत्यादी तुरळक गोष्टी माहित असतील तर मग कुठलाही चित्रपट अगदी तद्दन विनोदी किंवा गल्लाभरू हाणामारीचा चित्रपट बघतानाही जरा वेगळीच मजा येते किंवा तो चित्रपट आपल्यापर्यंत पोचल्याची एक हलकीशी का होईना जाणीव निर्माण होऊ शकते. अशी चित्रपटांची अंतर्बाह्य ओळख करून देऊन, चित्रपट कसा बघायचा, त्यात नक्की काय बघायचं याची माहिती करून देऊन चित्रपट बघायला शिकवणारे आणि चित्रपटांच्या प्रेमात पडायला लावणारे अशा प्रकारच्या सिनेसमीक्षकांमध्ये गणेश मतकरी यांचं नाव निर्विवादपणे बरंच वर आहे. सुरुवातीला दिलेले तीन मुद्दे आणि ते क्रांतिकारक विधान (आणि इतरही असंख्य महत्वपूर्ण गोष्टी) त्यांच्या नुकत्याच शिकागो येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात प्रकाशित झालेल्या 'सिनेमॅटिक' या पुस्तकाद्वारे आपल्या भेटीस येतात.

'सिनेमॅटिक' म्हणजे मतकरींनी दिवाळी अंक किंवा तत्सम सिनेविषयक विशेषांकांमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या माहितीपूर्ण लेखांचा संग्रह. त्यात रहस्यपट, भयपट, युद्धपट, सुपरहिरोपट, लघुपट, मराठी चित्रपट, साय-फाय यावर प्रत्येकी एक आणि समांतर सिनेमा व ९/११ यावर प्रत्येकी दोन लेख अशा विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या एकापेक्षा एक माहितीपूर्ण लेखांची भरगच्च मेजवानी आहे. या पुस्तकाला अरुण खोपकरांसारख्या दिग्गज जागतिक चित्रपट-अभ्यासकाची प्रस्तावना लाभली आहे.

मागे एकदा रॉजर एबर्ट या जगप्रसिद्ध चित्रपट-समीक्षकाविषयी लिहिताना मतकरींनी समीक्षकांचे ढोबळ मानाने तीन प्रकार सांगितले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर

१. दैनिका, साप्ताहिकांत निव्वळ जागा भरून काढण्यासाठी लिहिणारे.. चित्रपटांचं परीक्षण करण्यापेक्षा गोष्ट तपशीलात सांगून जागा भरण्याकडे या मंडळींचा कल असतो. त्यांना प्रेक्षकांच्या चित्रपट विषयक ज्ञानात भर टाकण्याची गरज वाटत नाही, किंबहूना ते मुळात असावं असाही त्यांचा आग्रह नसतो.

२. चित्रपटांचे अभ्यासक असणारे आणि चालू चित्रपटांना बऱ्या वाईटाची लेबलं लावण्यापेक्षा एकूण चित्रपटांच्या इतिहासात अधिक रस असणारे. हे लोक बऱ्यापैकी दुर्मिळ असतात.

३. आणि तिसरे म्हणजे या दोन्ही प्रकारांचा सुवर्णमध्य साधणारे. या मंडळींचा स्वतःचा असा अभ्यास आहे. त्यांच्याकडून होणारा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे चित्रपट रसिकांना होऊ शकणा-या अचूक मार्गदर्शनाचा. यांचं लिखाण क्लिष्ट नाही, पण काही विशिष्ट अभ्यासातून आलेलं आहे. ते शक्य तितक्या सोप्या भाषेत आपल्या वाचकांपर्यंत नेण्य़ाची त्यांची हातोटी आहे.

मला वाटतं मतकरींनी रॉजर एबर्टसाठी लिहिलेलं हे वर्णन त्यांच्या स्वतःसाठीही अगदी चपखलपणे लागू होतं. सिनेमॅटिकमधला प्रत्येक लेख हा याचा पुरावा आहे. प्रत्येक लेखात त्या त्या प्रकारच्या चित्रपटांच्या निर्मितीपासून तत्कालीन सामाजिक, राजकीय, जागतिक परिस्थितीवर प्रकाश टाकून कुठलाही चित्रपट हा तसाच का बनवला गेला, त्यामागची प्रेरणा काय होती, दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचं होतं या साऱ्या साऱ्या विषयीची विपुल माहिती अजिबात रटाळ किंवा किंचितही क्लिष्ट न होता ओघवत्या स्वरूपात आपल्यापुढे येते. या पुस्तकात उल्लेखलेले काही चित्रपट आपण कधी ऐकलेलेही नसतील पण तरीही त्याची निर्मिती प्रक्रिया, कार्यकारणभाव, उद्देश, त्यासाठी घेतली गेलेली मेहनत आणि त्या चित्रपटाचा समाजावर, लोकमनावर आणि अन्य चित्रपटांवर झालेला परिणाम इ. इ. तर आपण अक्षरशः जगतोच. पण खरी मजा तर पुढेच आहे. कित्येक माहित असलेल्या, लाडक्या असलेल्या आणि अनेकदा पाहिलेल्या चित्रपटांविषयी तो कसा बघायचा, त्या चित्रपटात नक्की काय बघायचं, प्रसंगी त्यात काही काही उणीव कशा आहेत हे दाखवून देऊन आपण इतक्या वेळा बघितलं तरी हा मुद्दा किंवा हा दृष्टीकोन किंवा अगदी हा कॅमेरा अँगल आपल्या अजिबातच कसा लक्षात आला नाही याप्रकारची माहिती वाचून आपण अचंबित होऊन जातो. ठाऊक असलेला चित्रपटही अधिक चांगल्या प्रकारे कसा बघायचा याचं रसाळ मार्गदर्शकच जणु..

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातली ओळ न् ओळ वाचताना हे सगळं प्रचंड अभ्यासातून आणि निरीक्षणातून आलेलं आहे हे सतत जाणवत राहतं. प्रत्येक लेख, प्रत्येक नवीन परिच्छेद आपल्या चित्रपटविषयक ज्ञानात भर घालत असतो. आणि पुस्तकाच्या अखेरीस दिलेली संदर्भग्रंथांची सूची पाहता त्याची सत्यताही पटते. जागतिक चित्रपटाच्या विविध अंगांवरच्या अनेक पुस्तकांच्या वाचनातून आणि अभ्यासातून प्रत्येक लेख जन्माला आला आहे हे सतत जाणवत राहतं.

प्रत्येक लेख हा निर्विवाद अप्रतिम आहेच तरीही माझे या पुस्तकातले विशेष आवडते लेख म्हणजे 'रम्य नसलेल्या युद्धकथा', 'गरीबांचा सिनेमा', 'समांतर - एका चित्रप्रकाराचा प्रवास', 'हॉलिवूड पोस्ट ९/११' आणि 'हॉलिवूडचा पडदा आणि ९/११' हे लेख. बाकीचे लेखही अत्यंत माहितीपूर्ण आणि अप्रतिम आहेतच परंतु हे लेख अधिक आवडण्याची विशेष कारणं आहेत. युद्धपटांवरच्या लेखात युद्धपटांच्या संक्रमणाचा जो प्रवास मांडला आहे त्याला खरंच तोड नाही. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातल्या किंबहुना अगदी युद्धाच्या आणि त्यानंतरच्या काही वर्षांतल्या चित्रपटांत सैनिक, सैन्य, युद्ध इत्यादींना जे एक स्वप्नील रूप देऊन, हिरो बनवून, युद्धांना रम्यकथा म्हणून दाखवण्यापासून ते काही वर्षांतच युद्धांचे भीषण दुष्परिणाम जाणवायला लागल्यानंतर समाजाच्या आणि त्यामुळे चित्रकर्त्यांच्याही युद्धपटनिर्मितीच्या बदललेल्या जाणिवांवर आणि प्रतिमांवर हा लेख अगदी अचूक बोट ठेवतो. युद्धपटांचं संक्रमण अक्षरशः आपल्यासमोर घडताना दिसतं. तर समांतर सिनेमे खूप जास्त प्रमाणात बघितले नसल्यामुळे समांतर चित्रपटांचा इतिहास, प्रवास वेगवेगळया दिग्गजांनी केलेली हाताळणी, त्याची कारणमीमांसा इ सगळं वाचायला खूप आवडलं. 'गरीबांचा सिनेमा' मध्ये एका पूर्णपणे वेगळ्या ज्यॉनरमधल्या चित्रपटांविषयी लिहिताना 'बायसिकल थिव्ज', 'पथेरपांचाली', 'दो बिघा जमीन' पासून ते थेट 'पीहोटे', 'सलाम बॉम्बे' आणि अगदी आजच्या 'स्लमडॉग मिलिअनेअर पर्यंतच्या चित्रपटांचा तपशीलवार घेतला गेलेला मागोवा फारच रोचक वाटला. अर्थात ९/११ वरचे दोन लेख विशेष आवडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ९/११ बद्दल मला व्यक्तिशः असलेलं प्रचंड आकर्षण किंवा आवड. अर्थात आकर्षण किंवा आवड हे शब्द योग्य आहेत की नाहीत याची कल्पना नाही पण थोडक्यात हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्या विषयावरचा आणि तो विषय हॉलिवूडसारख्या सतत नवनवीन प्रकार लीलया हाताळणाऱ्या चित्रसृष्टीने कसा मांडला हे समजून घेण्याच्या दृष्टीने ९/११ वरचे लेख खूपच आवडले.

पुस्तकाचं मुखपृष्ठही खरंच अतिशय सुंदर आहे. दहा विषयांवरच्या दहा लेखांना दहा स्तंभांमध्ये मांडून दाखवल्याने पुस्तकातल्या विषयांची व्याप्ती मुखपृष्ठापासूनच ध्यानात येते. पण मुखपृष्ठापेक्षाही त्याच्या पुढचं पान हे माझं जास्त आवडतं आहे. त्याला कारणही तसंच आहे !!!




नुकताच गणेश मतकरींच्या भेटीचा योग आला आणि त्यावेळी चित्रपटांवरच्या भरपूर गप्पांच्या मेजवानीबरोबरच प्रत्यक्ष मतकरींकडूनच त्यांनी स्वाक्षरी केलेलं पुस्तक मिळवण्याची सुवर्णसंधी लाभली.

एवढं सगळं लिहिल्यावरही पुस्तक नक्की वाचा असं वेगळं सांगण्याची गरज नाहीच पण तरीही सांगतो प्रत्येक चित्रप्रेमीने अगदी आवर्जून वाचण्यासारखं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करताना मतकरी म्हणतात की "मला वाटतं चित्रपट कसा पाहावा या प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर म्हणून 'सिनेमॅटिक' कडे पाहता येईल." यातलं "माझ्यापुरतं" काढून टाकून "चित्रपट कसा पाहावा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'सिनेमॅटिक' आहे" असं मी म्हणेन. !!

प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन
ऑनलाईन वितरक : बुकगंगा

-मीमराठी.नेटच्या २०११ च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

Monday, May 9, 2011

बँक नावाची शिवी : भाग ५ (अंतिम)

* भाग १ इथे  वाचा.
* भाग २ इथे  वाचा.
* भाग ३ इथे वाचा.
* भाग ४ इथे  वाचा. 


भाग ५ : सध्याची परिस्थिती नक्की कशी आहे? (व्हेअर आर वुई नाऊ?)

एकूणच या प्रकारामुळे अमेरिकन (आणि त्यामुळे आपोआपच जागतिक) आर्थिक विषमता कमालीची वाढली. करप्रणाली श्रीमंतांना पूरक बनवली गेली. ग्लेन हबर्डने बुश सरकारच्या काळात काम करताना अनेक करकपाती सुचवल्या आणि अंमलातही आणल्या. बुश सरकारने आर्थिक गुंतवणूक, त्यावरील नफा आणि डीव्हीडंड यावरचे अनेक महत्वाचे कर रद्द केले. हे कर रद्द केल्याने सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा होईल असं भासवलं गेलं. परंतु प्रत्यक्षात हे असे महत्वाचे कर रद्द केल्याने एकूण लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या अतिधनिक नागरिकांना खूप मोठा फायदा झाला. १९८० आणि २००७ या दरम्यान मध्यमवर्गाचं अधिकाधिक आर्थिक खच्चीकरण झालं. घर, गाडी, वैद्यकीय सुविधा, शिक्षण या सगळ्यांच्या किंमती वाढल्या आणि या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकन नागरिक भरभरून कर्जं घ्यायला लागला. तालाच्या ९०% लोकांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालं आणि तेवढाच फायदा झाला तो या शृंखलेत वर असलेल्या १०% नागरिकांचा. !!!!

२००८ मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वीच्या भाषणांमधून बराक ओबामा यांनी वॉल स्ट्रीट आणि वॉशिंग्टनमधली वाढती आर्थिक हाव आणि आर्थिक शिथिलीकरण या दोन प्रमुख बाबींमुळे महामंदी आली आणि या दोन गोष्टी ताबडतोब बदलण्याचं प्रतिपादन केलं. अध्यक्ष झाल्यानंतर २००९ च्या सुमारास त्यांनी ताबडतोब आर्थिक पुनर्रचनेच्या आवश्यकतेचं सुतोवाच केलं. परंतु २०१० मध्ये जेव्हा प्रत्यक्ष आर्थिक पुनर्रचना केली गेली त्यावेळी कुठलेही विशेष बदल केले गेले नाहीत . गुणांकन एजन्सीज, लॉबीइंग आणि अन्य आर्थिक नियम यामधल्या बदलासंबंधी साधं भाष्यही केलं गेलं नाही. वॉल स्ट्रीटची आर्थिक पुनर्बांधणीशी निगडीत असलेल्या महत्वाच्या आर्थिक बाबींवरील मजबूत पकड अजूनही स्पष्ट दिसून येते.

ओबामा यांनी टिमोथी गाईटनर याची ट्रेजरी सेक्रेटरी पदावर निवड केली. हा तोच टिमोथी गाईटनर जो अतिशय नाजूक प्रसंगी न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर होता आणि ज्याने गोल्डमन सॅक्सला भरभरून आर्थिक मदत देववली.

विल्यम सी डडली
विल्यम सी डडली हा न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा नवीन अध्यक्ष आहे. हा तोच इसम ज्याने ग्लेन हबर्डसह लिहिलेल्या अहवालात डेरीव्हेटीव्हजची प्रचंड स्तुती केली होती.

मार्क पॅटरसन हा गाईटनरचा कर्मचारी-प्रमुख आहे. मार्क पॅटरसन गोल्डमनचा माजी लॉबीईस्ट होता.

लुईस सॅक्स हा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे. हा मनुष्य ट्रायकेडिया या कंपनीचा प्रमुख होता. ट्रायकेडियाचा चुकीच्या आर्थिक गुंतावणूकीविरुद्ध बेटिंग करण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता.

कमॉडिटी फ्युचर्स कमिशनच्या प्रमुखपदी आहे तो गॅरी गेन्सलर. या गेन्सलरची गोल्डमन सॅक्सचा प्रमुख असताना डेरीव्हेटीव्हजना कायद्याच्या बंधनात आणण्याच्या विरोधात महत्वाची भूमिका होती.

ओबामाचा चीफ ऑफ स्टाफ असलेला रॅम इमॅन्युअल याने आता बुडीतखात्यात गेलेल्या फ्रेडी मॅकच्या संचालक मंडळात असताना सव्वा तीन लाख डॉलर्सची कमाई केली होती.

लॉरा टायसन
मार्टीन फेल्टसीन आणि लॉरा टायसन हे दोघेही ओबामाच्या आर्थिक पुनर्रचना सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

आणि ओबामाचा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे तो म्हणजे लॅरी समर्स.

२००९ मध्ये ओबामाने बेन बर्नान्कीची फेडरल रिझर्व्हचा सेक्रेटरी म्हणून पुन्हा नेमणूक केली !!!

आर्थिक महामंदी ओसरल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी आणि पुन्हा असा आर्थिक उद्रेक घडू नये यासाठी जगभरातल्या मोठमोठ्या देशांनी अनेक महत्वाचे कडक नियम तयार केले आणि त्यांची कसोशीने अंमलबजावणीही केली........... परंतु ज्या देशातल्या अवाढव्य धनपिपासू वृत्तीमुळे जगावर महामंदी लादली गेली त्या अमेरिकेने आणि ओबामा सरकारने भविष्यात हे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने अजूनही कोणतीही हालचाल केलेली नाही !!!!!!!!!! त्यांच्या मते अजूनही हा एक छोटासा धक्का अस्जून स्थिती पूर्ववत होईल आणि असं पुन्हा कधीच होणार नाही.

२०१० च्या मध्यापर्यंत अजूनही कुठल्याही वित्तसंस्थेच्या प्रमुखावर कुठल्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा लावला गेलेला नाही की खटला चालवला गेलेला नाही. कोणालाही अटक झालेली नाही की कुठल्याही विशेष समितीची स्थापना झालेली नाही !!

आर्थिक फुगवट्याच्या काळात विविध वित्तसंस्थांच्या प्रमुखांना दिल्या गेलेल्या महाप्रचंड रकमेची वसुली करण्याच्या दृष्टीने ओबामा सरकारने कारवाई सोडा साधे प्रयत्नही केलेले नाहीत.

हा विरोधाभास पहा... २००९ मध्ये बेकारीचा दर १७ वर्षातल्या सर्वोच्च पातळीवर पोचला आणि त्याच वेळी

- मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना १४ बिलियन डॉलर्स अक्षरशः वाटले. !!!!!!!!!!

- गोल्डमन सॅक्सने १६ बिलियन वाटले

अमेरिकेची अर्थप्रणाली ही अनेक दशकांपर्यंत अतिशय स्थिर आणि सुरक्षित होती. पण गेल्या काही वर्षात काही महत्वाचे बदल झाले. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे या प्रणालीने समाजाकडे चक्क पाठ फिरवली. राजकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला महाप्रचंड आर्थिक संकटाच्या खाईत ढकलून दिलं ! ज्या लोकांनी महत्वाच्या पदांवर बसवून ही आर्थिक महामंदी अमेरिकेवर आणि त्यामुळे आपोआपच संपूर्ण जगावर लादली ते लोभी गुन्हेगार अजूनही त्याच सत्तास्थानांवर आहेत. महत्वाचे निर्णय घेताहेत.

--------------------------

इतके एकामागोमाग एक धक्के बसल्याने माहितीपट संपताना डोकं चक्रावून गेलेलं असतं. हे सगळं वाचून तुमचं डोकं गरगरत नसेल तर तो दोष सर्वस्वी माझ्या लिखाणाचा आहे. प्रत्यक्ष माहितीपट प्रचंड प्रभावी आहे. अनेक उदाहरणं, असंख्य छोटेछोटे पुरावे, कित्येक मुलाखती, अनेक वस्तुस्थितीदर्शक पुरावे यांचा आपल्यावर एकामागोमाग एक एवढा मारा होतो की त्यामुळे अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्याचा भास होतो.  च्यायला हे $#%$^ लोक कित्येक वर्षं आपल्याला हातोहात फसवतायत चक्क आणि आपण फसतोय हे आपल्याला कळतही नाहीये.. आणि पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण एवढे निराधार आहोत की सगळं कळत, दिसत असूनही आपण कोणाचंही काहीही वाकडं करू शकत नाही. हे सारं असंच चालू आहे कित्येक वर्षं आणि पुढची अनेक वर्षं असंच चालू राहणार. सतत चालू राहणार. ज्यांच्या अमाप हावेपायी आणि कृष्णकृत्यांपायी सर्वसामान्य निर्दोष माणसाला आपला श्रमाचा पैसा हातातून निसटताना पाहावा लागतोय ते गुन्हेगार अजूनही तिथेच आहेत. सरकारात आहेत.. मानाची, महत्वाची आणि जवाबदारीची पदं अजूनही उपभोगत आहेत आणि कदाचित भविष्यातल्या महामंदीची तयारी करतायत. अर्थात ते काहीच गमावणार नाहीयेत.. सर्वस्व गमावणार आहोत ते आपण !! थोडक्यात भविष्यात येऊ घातलेल्या अशा अनेकानेक महामंद्यांना तोंड देण्याची तयारी करा हे नक्की.. !!

- समाप्त

बँक नावाची शिवी : भाग ४

* भाग १ इथे  वाचा.
* भाग २ इथे  वाचा.
* भाग ३ इथे  वाचा.

भाग ४ : जवाबदारी !!

ज्या व्यक्तींच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांच्या स्वतःच्याच अतिविशाल बँका, कंपन्या बुडाल्या ते लोक (सीईओज) मात्र त्यांनी साठवलेली गडगंज माया व्यवस्थितपणे घेऊन बाहेर पडले. लिमन ब्रदर्सच्या पाच उच्चाधिकाऱ्यांनी २०० आणि २००७ या सात वर्षात १ बिलियन डॉलर्सची माया कमावली आणि लिमन बुडल्यावरही त्यांचे पैसे त्यांच्याकडे सुरक्षित होते. त्यातल्या एका पैश्यालाही धक्का लागला नाही !!!!


अँजेलो मोझिलो

कंट्रीवाईडचा प्रमुख कार्यकारी अधिकारी अँजेलो मोझिलो याने २००३ आणि २००८ या पाच वर्षांत ४७० मिलियन डॉलर्स कमावले. कंट्रीवाईड बुडण्याआधीच्या एका वर्षात त्याच्याकडे असलेले कंट्रीवाईडचे शेअर्स विकून त्याने १४० मिलियन डॉलर्स कमावले ते वेगळेच.


मेरील लिंचचा प्रमुख कार्यकारी अधिकारी स्टॅन ओ'निल याची फक्त २००६ आणि २००७ मधली कमाई ९० मिलियन डॉलर्स होती. मेरीलला बुडवल्यानंतर त्याने राजीनामा दिला (खरं तर त्याला संचालक मंडळाने काढून टाकायला हवं होतं) आणि त्याला भत्त्याच्या स्वरुपात १६० मिलियन डॉलर्स मिळाले.

ओ'निल नंतर आलेल्या जॉन थेनने २००७ मध्ये ८७ मिलियन डॉलर्स कमावले. आणि मेरीलला सरकारने पैसे देऊन वाचवल्यानंतर फक्त दोनच महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर २००८ मध्ये थेन आणि संचालक मंडळातल्या सदस्यांनी करोडो डॉलर्स बोनस म्हणून आपापसात वाटून घेतले !!


स्टॅन ओ'निल
२००८ च्या मार्च मध्ये एआयजीच्या फायनान्शिअल प्रोडक्ट डिव्हिजनला ११ बिलियन डॉलर्सचा तोटा झाला. त्याबद्दल त्या डिव्हिजनचा प्रमुख असणारा जोसेफ कॅसेनो याची हकालपट्टी करण्याऐवजी कंपनीने दरमहा १ मिलियन डॉलर्सच्या पगारावर त्याची नेमणूक सल्लागार (कन्सल्टंट) म्हणून केली !!!!


अमेरिकन बँक्स आता पूर्वीपेक्षाही अधिक बलाढ्य, अवाढव्य आणि अधिक शक्तिशाली झाल्या आहेत. अनेक छोट्या बँकांना मोठ्या बँकांनी विकत घेतलंय किंवा त्यांचं विलीनीकरण झालंय. अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वीसारखी होण्यासाठी (म्हणजे सगळ्या आर्थिक नाड्या पुन्हा आपल्या हातात येण्यासाठी) अमेरिकन वित्तक्षेत्र पाण्यासारखा पैसा ओततंय. अनेक राजकारण्यांना खिशात घालण्याचे प्रयत्न केले जातायत, अनेकजण त्यांचे बाहुले बनलेत देखील. पण अजून एक महत्वाचं क्षेत्र आहे ज्यात हे लोक प्रचंड गुंतवणूक करतायत. हे असं क्षेत्र आहे की जे ज्यात गुंतवणूक होते आहे हेच कोणाला माहित नाहीये आणि ते म्हणजे फायनान्शिअल स्टडीज. 

जॉन थेन
इकॉनॉमिक्स शिकवणारं हे क्षेत्र, विद्यापीठं यांच्याकडे त्यांनी मोर्चा वळवला आहे. वित्तक्षेत्रावरची बंधनं शिथिल करण्यासाठी अनेक अर्थतज्ज्ञ, अभ्यासक, प्राध्यापक यांनी हिरीरीने मोहिमा चालवल्या आहेत. १९८० पासून या प्रकाराला विशेष जोर चढला आहे आणि हेच लोक अमेरिकेच्या सरकारी आणि महत्वाच्या राजनैतिक नियमांची आखणी करत आहेत. हे असे प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ अनेक कंपन्यांच्या सल्लागार मंडळात काम बघताहेत आणि आपसूकच त्या कंपन्यांना फायदे होतील अशा प्रकारचे नियम तयार करण्यासाठी सरकारवर दबाव आणतायत किंवा शक्य असेल तिथे स्वतःच असे नियम बनवतायत. 






अमेरिकन अर्थव्यवस्थेला आपल्या मनाप्रमाणे वाकवणारी आणि तरीही सरकारात दिमाखाने मिरवणारी अशी अनेक नावं उदाहरण म्हणून बघता येतील

मार्टीन फेल्डस्टीन
- मार्टीन फेल्डस्टीन हा हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेला विद्वान अर्थतज्ज्ञ. रेगन सरकारचा प्रमुख  आर्थिक सल्लागार आणि शिथिलीकरणाचा (फायनान्शिअल डीरेग्युलेशन) कट्टर समर्थक ज्याने शिथिलीकरणासाठी विशेष मदत केली. १९८८ ते २००९ पर्यंत तो एआयजी आणि एआयजी फायनान्शिअल प्रोडक्टसच्या संचालक मंडळावर होता. यादरम्यान त्याने करोडो डॉलर्स कमावले.

ग्लेन हबर्ड हा कोलंबिया बिझनेस स्कूलचा डीन आणि बुश सरकारमधला एक प्रमुख आर्थिक सल्लागार होता.

ग्लेन हबर्ड, मार्टीन फेल्डस्टीन आणि यांच्यासारख्या असंख्य वित्तीय अभ्यासक/अर्थतज्ज्ञांनी अर्थव्यवस्थेला हवं तसं वळवून, सरकारला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडून करोडो डॉलर्सची माया गुपचूप गोळा केली आणि अजूनही करत आहेत.

ग्लेन हबर्ड
बेअर स्टर्नचे दोन हेज फंड अधिकारी राल्फ सिऑफि आणि मॅथ्यू टॅनीन या दोघांना आर्थिक घोटाळ्याबद्दल अटक झाली. ग्लेन हबर्डने १ लाख डॉलर्स घेऊन ते दोघे निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र दिलं. अशा रीतीने हबर्डने मेटलाईफच्या संचालक मंडळात राहून अडीच लाख डॉलर्स कमावले.

- लॉरा टायसन (जिने या माहितीपटासाठी मुलाखत द्यायला नकार दिला.), कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची प्राध्यापिका... ही क्लिंटन सरकारमध्ये राष्ट्रीय आर्थिक समितीच्या अध्यक्षपदी होती. सरकारमधून बाहेर पडल्यावर वार्षिक साडेतीन लाख डॉलर्सच्या भरभक्कम पगारावर ती मॉर्गन स्टॅनलीच्या संचालक मंडळात रुजू झाली.

- रुथ सिमन्स ही ब्राउन विद्यापीठाची अध्यक्षा वार्षिक तीन लाख डॉलर्सचं पॅकेज घेऊन गोल्डमन सॅक्सच्या संचालक मंडळात रुजू झाली.

लॅरी समर्स ज्याचा आर्थिक शिथिलीकरणाच्या निर्णयात अतिशय प्रमुख सहभाग होता. तो २००१ साली हार्वर्ड विद्यापीठाचा अध्यक्ष बनला. त्यावेळी त्याने अनेक हेज फंड्सचा सल्लागार म्हणून अक्षरशः लाखो डॉलर्स जोडले.

फ्रेडरिक मिश्किन
फ्रेडरिक मिश्किन : जो अमेरिकन अर्थव्यवस्था बुडायला आली असताना फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर होता आणि योग्य ते उपाय योजण्याऐवजी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पळून आला. या फ्रेडरिक मिश्किनने २००६ साली आईसलँड बद्दल, तिथल्या अर्थव्यवस्था आणि इतर महत्वाच्या बाबींबद्दलच्या एका महत्वाच्या अहवालाचं लिखाण केलं. त्यात त्याने आईसलँडच्या अर्थव्यवस्थेचं तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं. परंतु त्याच्या अहवालातल्या माहितीला, मतांना कुठल्याही आर्थिक अभ्यासाची, शोधाची, पार्श्वभूमी नव्हती. तो अहवाल अतिशय चुकीचा, खोटा आणि म्हणूनच धक्कादायक होता. आईसलँडच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या चांगल्या (पण नितांत खोट्या) माहितीने भरलेला अहवाल पुरवण्यासाठी आईसलँड चेंबर ऑफ कॉमर्सने मिश्किनला सव्वालाख डॉलर्सची घसघशीत रक्कम पुरवली. या माणसाचं वार्षिक उत्पन्न अंदाजे ६ ते १७ मिलियन डॉलर्स आहे !!!

रिचर्ड पोर्टस
रिचर्ड पोर्टस, ब्रिटनमधला अत्यंत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि लंडन बिझनेस स्कुलचा प्राध्यापक यानेही २००७  मध्ये आईसलँड चेंबर ऑफ कॉमर्सच्या विनंतीवरून आईसलँडबद्दल एक अहवाल लिहिला. हा अहवाल देखील आईसलँडच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या अमाप परंतु खोट्या स्तुतीने भरलेला होता.

आर्थिक फुगवटा अत्युच्च शिखरावर असताना २००४ मध्ये ग्लेन हबर्ड आणि विलियम सी डडली (गोल्डमन सॅक्सचा प्रमुख अर्थतज्ज्ञ) या दोघांनी मिळून अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल एक महत्वाचा अहवाल लिहिला. या अहवालात हबर्डने डेरीव्हेटीव्हज आणि सिक्युरिटायझेशन चेनचं प्रचंड कौतुक केलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेतले धोके कमी झाले आणि आर्थिक सक्षमीकरण वाढलं. यामुळे अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि सुरक्षित होऊन महामंदीसदृश संकट येण्याची शक्यता जवळपास निकालात निघाली.

* भाग ५ (अंतिम भाग) इथे  वाचा

बँक नावाची शिवी : भाग ३

* भाग १ इथे  वाचा.
* भाग २ इथे  वाचा.



भाग ३ : महासंकट !! (द क्रायसिस)

बेन बर्नान्की २००६ मध्ये फेडरल रिझर्व्ह बोर्डाचा चेअरमन बनला. त्याच वर्षी सबप्राईम कर्जांचं वितरण सर्वाधिक झालं. हा योगायोग खचितच नव्हता !! अनेक अर्थतज्ज्ञ, अभ्यासक इत्यादींकडून धोक्याच्या अनेकानेक सूचना मिळूनही बर्नान्कीने ते रोखण्यासाठी कुठलीही पावलं उचलली नाहीत. उलट त्याच्यामते "हे अतिशय प्रगतीचं लक्षण असून घाबरण्याचं काही कारण नाही कारण अमेरिकेच्या इतिहासात घरांच्या किंमती आत्तापर्यंत कधीही घसरलेल्या नाहीत !!" बर्नान्कीने या माहितीपटासाठी मुलाखत देण्यास अर्थातच नकार दिला !

तब्बल २००४ पासून एफबीआयने वाढत जाणाऱ्या घरांच्या किंमती आणि सहजगत्या उपलब्ध होणारी कर्जं याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कर्जांसाठी दिलेल्या कागदपत्रात गडबड असल्याची भीतीही व्यक्त केली होती. पण त्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं गेलं. २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी, २००६ मध्ये नुरील रुबिनी या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाने, २००७ मध्ये अ‍ॅलन स्लोन या फॉर्च्युन मासिकाच्या ख्यातनाम पत्रकाराने, २००७ मध्ये हेज फंड मॅनेजर बिल अ‍ॅकमन याने आणि २००८ मध्ये चार्ल्स मॉरिस या अभ्यासकाने वेळोवेळी या धोकादायक कर्जांच्या बाबतीत अनेक पेपर्स सदर केले, लेख लिहिले, पुस्तकं लिहीली, किंबहुना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही अमेरिकन सरकारला वेळोवेळी धोक्याच्या सूचना दिल्या. परंतु कसलाही परिणाम झाला नाही.

२००८ च्या दरम्यान कर्जवसुलीसाठी होणाऱ्या घरांच्या लिलावांनी विक्रमी संख्या गाठली !!!! गृहकर्जं आता बँकांना विकली जाईनाशी झाली. सीडीओजच्या व्यवहारांचं मार्केट साफ कोसळलं ज्यामुळे वित्तसंस्थांकडे अब्जावधी डॉलर्सची कर्जं, अन्य सीडीओ आणि प्रत्यक्ष घरं पडून राहिली आणि ती विकत घेण्यासाठी कोणीही ग्राहक मिळेनासा झाला. कारण लोकांकडे पैसेच नव्हते. हा कर्जांचा फुगवटा फुटला तेव्हा सरकार आणि फेडरल रिझर्व्ह त्याला तोंड देण्यासाठी सज्ज नव्हते. कारण या संकटाच्या व्याप्तीची त्यांना तोवर काही कल्पनाच आलेली नव्हती !

२००८ च्या फेब्रुवारी महिन्यातल्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतही अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरी हेन्री पॉलसन याचे उद्गार होते "आर्थिक क्षेत्र मजबूत आहे. भरघोस वृद्धी होते आहे. आणि ज्याअर्थी भरघोस वृद्धी होते आहे त्याअर्थी महामंदी कशी येईल बरं? " आणि विशेष म्हणजे पॉलसनने हे उद्गार काढायच्या आधी चार महिने महामंदी ऑलरेडी सुरु झाली होती !!!!!!

१६ मार्च २००८ ला अवाढव्य वित्तसंस्था 'बेअर स्टर्न' च्या तिजोरीत खडखडाट झाला आणि 'जे पी मॉर्गन चेस' ने केवळ २ डॉलर प्रतिशेअर देऊन तिला विकत घेतलं. अर्थात यासाठी केंद्र सरकारने ३० बिलियन डॉलर्सची मदत दिली होती. त्यावेळीही सरकारने ताबडतोब पुढे होऊन या सगळ्या घोटाळ्यात हस्तक्षेप करून सगळी सुतराम आपल्या हातात घ्यायला हवी होती. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही !!

७ सप्टेंबर २००८ ला सरकारने 'फ्रेडी मॅक' आणि 'फॅनी मे' या दोन एके काळच्या प्रचंड मोठ्या पण आता बुडीत खात्यात चाललेल्या गृहकर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांना ताब्यात घेतलं. तरीही पॉलसनच्या मते त्यात घाबरण्यासारखं काहीही नव्हतं.

दोनच दिवसांनी लीमन ब्रदर्सने ३.२ मिलियन डॉलर्सचा विक्रमी तोटा नोंदवला आणि त्यांचा शेअर गडगडला.

या कंपन्या बुडण्याच्या काही दिवस/महिने आधी यांची गुणांकनं (रेटिंग्ज) काय होती ते पाहू. फार धक्कादायक निकाल आहेत हे.

- बुडण्याच्या फक्त एक महिना आधीच बेअर स्टर्नचं गुणांकन ए२ (एए)होतं थोडक्यात अतिशय उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक असं हे रेटिंग होतं.

- लिमन ब्रदर्स : बुडण्याच्या फक्त काही दिवस आधी ए२.

- एआयजी : बुडण्याच्या फक्त काही दिवस आधी एए

- 'फ्रेडी मॅक' आणि 'फॅनी मे : एएए !!!!!!!!

- सिटीग्रुप, मेरील : एए

आपण या रेटिंग्जचे अर्थ पहिल्या भागात बघितलेच आहेत तरीही पुन्हा एकदा इथे बघू.

एएए : सर्वोत्कृष्ट
एए : उत्तम
ए : चांगलं
बीबीबी : बरं
बीबी : वाईट
बी : धोकादायक

१२ सप्टेंबर २००८ ला लिमन ब्रदर्सच्या तिजोरीत खडखडाट झाला आणि संपूर्ण वित्तक्षेत्र धोक्यात आलं. शेवटच्या क्षणी हेन्री पॉलसन आणि टिमोथी गाईटनर या न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर्सनी लिमन ब्रदर्सला वाचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी सगळ्या प्रमुख बँकांच्या प्रमुखांची बैठक बोलावली.

परंतु त्याच सुमारास मेरील लिंच ही अजून एक महाबलाढ्य वित्तसंस्था/बँक धोक्यात आली होती. १४ सप्टेंबरला बँक ऑफ अमेरिकाने मेरीलला विकत घेतलं. लिमन ब्रदर्सला वाचवण्यासाठी/विकत घेण्यासाठी बारक्लेज बँक ही एकमेव ब्रिटीश बँक तयार होती. परंतु त्या बदल्यात त्यांना अमेरिकन सरकारकडून फायनान्शियल गॅरंटी हवी होती. पॉलसनने त्याला नकार दिला !!!!!!!!!!!!!! थोडक्यात लिमन काय किंवा अमेरिकन सरकार काय यापैकी कोणीही बँकरप्सीपासून वाचण्याची कसलीही काहीही तयारी केलेली नव्हती.

लिमन ब्रदर्सची बँकरप्सी केस सांभाळणारे वकील हार्वे मिलर म्हणतात "फेडरल रिझर्व्हला लिमन ब्रदर्सच्या बँकरप्सीची अंमलबजावणी १४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी करून टाकायची होती. आम्ही त्यांना त्यांच्या निश्चयाचा पुनर्विचार करण्यासंबंधी बऱ्याच वेळा सुचवलं. पण त्यांच्या मते ते काय करताहेत आणि त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या मते आर्थिक स्थिती पूर्ववत आणण्यासाठी, शेअर बाजारात स्थैर्य आणण्यासाठी हे करणं अत्यावश्यकच आहे !!!!"

पॉलसन आणि बर्नान्कीने अन्य देशातल्या बँकरप्सी कायद्यांचा, नियमांचा आणि परिणामांचा अजिबात अभ्यास केलेला नव्हता हे तर उघड आहे. बँकरप्सीच्या ब्रिटीश कायद्यान्वये (लिमन ब्रदर्स ही ब्रिटीश कंपनी असल्याने) लिमन ब्रदर्सचं लंडनमधलं ऑफिस ताबडतोब बंद करावं लागलं. जगभरातले लिमनशी संबंधित सगळे व्यवहार क्षणार्धात ठप्प झाले. त्याच आठवड्यात एआयजी आपोआपच क्रेडीट डिफॉल्ट स्वापवाल्या ग्राहकांना १३ बिलियन डॉलर्स देणं लागले. परंतु त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता. १७ सप्टेंबरला एआयजीला सरकारने विकत घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी पॉलसन आणि बर्नान्कीने केंद्र सरकारकडे बँकांना वाचवण्यासाठी ७०० बिलियन डॉलर्स देण्यासाठी हात पसरले.

क्रेडीट डिफॉल्ट स्वापवरची बंधनं शिथिल करण्यासाठी आणि वित्तसंस्थांचं लिव्हरेज लिमिट (बँकेचा स्वतःचा पैसा आणि कर्जाऊ पैसा यांचं गुणोत्तर) वाढवण्यासाठी आग्रही असणारा थोडक्यात ज्या दोन प्रमुख गोष्टींमुळे एवढं मोठं महाभारत घडलं त्यासाठीचा जवाबदार माणूस पॉलसनच होता. अर्थातच हेन्री पॉलसनने या माहितीपटासाठी मुलाखत देण्यास नकार दिला.


पॉलसन, बर्नान्की आणि गाईटनर

एआयजी बुडाल्यावर (म्हणजे प्रचंड पैसे ओतून सरकारने वाचवल्यावर) त्यांच्या क्रेडीट डिफॉल्ट स्वापचे प्रमुख ग्राहक असलेल्या गोल्डमन सॅक्सला दुसऱ्याच दिवशी ६१ बिलियन डॉलर्स दिले गेले. स्वतः वाचण्यासाठी सरकारकडून ७०० बिलियन घेणाऱ्या बँकेने दुसऱ्याने बुडू नये म्हणून आपल्याला भीक म्हणून मिळालेल्या ७०० बिलियन मधले ६१ बिलियन काढून दुसर्याला देणं हा शुद्ध मुर्खपणा होता. पॉलसन, बर्नान्की आणि गायटनरच्या या धक्कादायक निर्णयामुळे अमेरिकन करदात्यांच्या १५० बिलियन डॉलर्स एवढ्या प्रचंड कराच्या पैशाचं नुकसान झालं.

यानंतर जगभरात एक भीतीचं वातावरण पसरलं, महामंदी येणार, आली याविषयी लोकांची खात्री झाली. अमेरिका आणि युरोपमधली बेकारी १०% झाली. महामंदीने बघता बघता संपूर्ण जगाला विळखा घातला. डिसेंबर २००८ च्या दरम्यान प्रचंड विशाल अशा जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीभोवती आणि त्याच बरोबर क्रायसलर या कंपनीभोवती बँकरप्सीचं वादळ घोंघावू लागलं. अमेरिकन लोकांची क्रयशक्ती, खर्च करण्याची क्षमता कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम चीनी बाजारावर झाला. चीनमधल्या जवळपास एक कोटी नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.

सिंगापूरची एक कंपनी वार्षिक वीस टक्क्यांच्या भरधाव वेगाने मोठी होत होती आणि अचानक त्यांच्या वाढीचा वेग वजा नऊ टक्क्यांवर आला. निर्यात तीस टक्क्यांनी कमी झाली.

अशा प्रकारच्या कुठल्याही वाईट घटनेत सगळ्यात जास्त भरडला जातो तो सर्वात गरीब माणूस हा नियम आहे. इथेही तेच झालं. रोजंदारीवर काम करणारे, हातावर पोट असणारे लोक अक्षरशः रस्त्यावर आले. घरदार सोडून जाऊन रस्त्यावर अक्षरशः तंबू ठोकून राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.

भाग ४ इथे  वाचा.

बँक नावाची शिवी : भाग २

* भाग १ इथे  वाचा.

भाग २ : कर्जाचा फुगवटा (द बबल)

अचानक अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाचा (लक्षात घ्या, प्रत्यक्ष डॉलर्सचा नव्हे !!! ) नुसता ओघ वाहू लागला. कोणालाही कितीही डॉलर्सचा कर्ज मिळणं सहज शक्य होतं. त्यामुळे बघता बघता घराच्या किंमती अक्षरशः आकाशाला भिडल्या आणि इतिहासातल्या सर्वात मोठ्या फायनान्शियल बबलला जन्म दिला गेला. याधीचा गृहकर्जाचा/घराच्या किमतीचा फुगा/बुडबुडा ८० च्या दशकाच्या दरम्यान आला होता. पण त्यावेळी जेमतेम १०० टक्क्यांनी चढलेल्या घरांच्या किंमती या आताच्या वेळच्या तुलनेत जवळपास नगण्य होत्या.

१९९६ पासून ते २००६ पर्यंत घरांच्या किंमती २००% हून अधिक वाढल्या. सबप्राईम कर्जांची रक्कम फक्त दहा वर्षांत प्रतिवर्षी ३० बिलियन डॉलर्स वरून थेट ६०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोचली. मेरील लिंच, बेअर स्टर्न, गोल्डमन सॅक्स हे सगळे सगळे यात सामील होते आणि काय चाललंय हे या सगळ्यांना चांगलंच ठाउक होतं.

कंट्रीवाईड ही वित्तसंस्था सबप्राईम कर्जं देण्यात सगळ्यांत आघाडीवर होती. कंट्रीवाईडने एकट्याने किमान ९७ बिलियन डॉलर्सची कर्जं वाटली आणि त्यातून त्यांना ११ बिलीयन डॉलर्सचा थेट नफा झाला. वॉल स्ट्रीटवरच्या अधिकाऱ्यांना मिळणारे बोनसचे आकडे गगनाला भिडले.

लीमन ब्रदर्स हे या सबप्राईम कर्जांमध्ये असलेलं अजून एक प्रमुख नाव. लीमन ब्रदर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड फुल्ड याने ४८५ मिलियन डॉलर्सचा बोनस कमावला.

रिचर्ड फुल्ड
अशा अनेकांनी अनेक मिलियन्सचे बोनस कमावले. वित्त कंपन्यांनी करोडो डॉलर्सचा नफा कमावला. पण तो खरा नफा नव्हता. प्रत्यक्षातली कमाई नव्हती. ते आभासी धन होतं जे यंत्रणेचा गैरवापर करून निर्माण केलं गेलं होतं आणि मग प्रॉफीट बुकिंग केलं गेलं होतं. जेमतेम तीन वर्षांत त्यातला खोटेपणा सिद्ध झाला आणि आभासी पैसे अक्षरशः गायब झाले ज्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात हाहाःकार मजला. जगभरात राबवली गेलेली ती एक पोन्झी स्कीम होती.

सगळ्यांचेच हात बांधले गेलेले असल्याने दुर्दैवाने सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड आणि तत्सम नियंत्रक संस्थांनी बँक्स आणि अन्य वित्तीय संस्थांवर कुठलाही बडगा उभारला नाही की त्यांची साधी चौकशीही केली नाही.

या फुगवट्याच्या दरम्यान वित्तसंस्था अधिक अधिक कर्ज घेत होत्या आणि अधिक अधिक सिडीओज तयार करत होत्या. बँकेचे स्वतःचे पैसे आणि कर्जाऊ घेतलेली रक्कम यांच्यातल्या गुणोत्तराला लीव्हरेज असं म्हणतात. बँका जेवढ्या अधिक कर्जं घेतील तितकं जास्त त्यांचं लिव्हरेज असतं.

हेन्री पॉल्सन
२००४ मध्ये गोल्डमनचा प्रमुख कार्यकारी अधिकारी हेन्री पॉल्सन याने सिक्युरिटीज अंड एक्सचेंज कमिशन वर दबाव आणून या लिव्हरेजवरची बंधनं शिथिल करायला भाग पाडलं. अधिक लिव्हरेज मिळाल्याने बँकांना सहजतेने अधिक कर्जं घेणं सोपं जायला लागलं. हे कर्जं घेण्याचं प्रमाण बघता बघता इतकं वाढत गेलं की काही बॅंकांचं लिव्हरेज गुणोत्तर ३३:१ झालं. थोडक्यात बँकेकडे स्वतःचा फक्त १ रुपया असताना त्यांना ३३ रुपयांचं कर्ज मिळालं.


पण हे इतक्यावरच थांबलं नव्हतं. अजून एक टाईमबॉम्ब स्फोट होण्याची वाट बघत होता. एआयजी ही जगातली सर्वात मोठी विमा कंपनी 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' नावाचा डेरीव्हेटीव्हचा अजून एक प्रकार खुप मोठ्या प्रमाणात विकत होती. ज्यांच्याकडे सिडीओज आहेत अशा ग्राहकांसाठी (वित्तसंस्था, बँक्स वगैरे) 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' हे एखाद्या विम्याप्रमाणे काम करतं. जर सिडीओजमध्ये पुढे मागे काही तोटा झाला तर तो तोटा एआयजी च्या 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' या योजनेच्या माध्यमातून ग्राहकाला भरून मिळेल  अशी योजना होती. थोडक्यात तोटा झाला तरी त्यासाठी ग्राहकाला काही चिंता नव्हती. एआयजी सगळ्याची काळजी घेणार होती आणि त्या बदल्यात एआयजी कडून क्रेडीट डिफॉल्ट स्वाप योजना विकत घेतलेल्या ग्राहकाला एआयजीला त्रैमासिक हफ्ता भरावा लागत असे.

परंतु क्रेडीट डिफॉल्ट स्वाप मध्ये अजून एक खोच होती. ती म्हणजे तुमच्याकडे नसलेल्या सिडीओजचाही विमा तुम्ही उतरवू शकत होतात. (हे अत्यंत चुकीचं आणि धोकादायक असूनही एआयजी याचा अवलंब करत होतं कारण त्यातून त्यांना प्रचंडउत्पन्न मिळत होतं.)

एक सोपं उदाहरणं बघू. आपल्या नेहमीच्या विमा पद्धतीनुसार आपण फक्त आपल्या मालकीच्या घरचाच विमा उतरवू शकतो. परंतु क्रेडीट डिफॉल्ट स्वापमुळे फक्त आपणच नाही तर त्या घराची मालकी नसलेले इतर कोणीही त्या घराचा विमा उतरवू शकत होते. थोडक्यात भविष्यात जर घराला आग लागली तर विमा कंपनीला तितक्या पटीने लोकांना पैसे द्यावे लागणार होते. (आणि अर्थात ती आग लागलीच. !!!) आणि क्रेडीट डिफॉल्ट स्वापवर कुठल्याही कायद्याचं बंधन नसल्याने त्या घराच्या विम्याच्या भविष्यातल्या परताव्यासाठी एआयजीला कुठल्याही प्रकारची रक्कम बाजूला काढून ठेवावी लागत नव्हती !!! किंबहुना एआयजीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी नवीन नवीन क्रेडीट डिफॉल्ट स्वापची कंत्राटं मिळवल्या मिळवल्या गडगंज बोनस मिळत होते !! एआयजीच्या लंडन शाखेने फुगवट्याच्या काळात ५०० बिलियन डॉलर्स किंमतीच्या क्रेडीट डिफॉल्ट स्वापची विक्री केली.

जोसेफ कसॅनो
जोसेफ कसॅनो या एआयजी च्या प्रमुखाने ३१५ मिलियन डॉलर्सच्या घसघशीत बोनसची कमाई केली. या क्रेडीट डिफॉल्ट स्वापच्या चुकीच्या पद्धतीच्या निषेधार्थ एआयजीच्या ऑडीटर्सनी कसॅनोला वारंवार सावधानतेचे इशारे दिले. परंतु तरीही कंपनीच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही हे पाहून त्याच्या निषेधार्थ जोसेफ डेनिस या एका ऑडीटरने राजीनामाही दिला. पण तरीही सारं तसंच चालू राहिलं !!! करोडोंचे बोनस, महागड्या गाड्या, आलीशान महालांसारखी चार चार घरं !! ही हाव न संपणारी होती.


'MIT Laboratory for Financial Engineering' चे संचालक असलेल्या अँड्रयु लो यांनी एक विलक्षण निरीक्षण नोंदवलं आहे. ते म्हणतात की शास्त्रज्ञांनी एक अनोख्या प्रयोगादरम्यान काही लोकांना एकत्र करून त्यांना एमआरआय मशीनमध्ये ठेवलं आणि एक खेळ खेळायला सांगितला. जो जिंकेल त्याला काही डॉलर्स बक्षीस म्हणून मिळणार असंही त्यांना सांगितलं होतं. प्रयोगाअंतीचं त्यांचं निरीक्षण धक्कादायक होतं. पैसा जिंकणं/कमावणं हा विषय निघाल्यावर मेंदूच्या काही विशिष्ट पेशी कार्यरत होतात. त्या पेशी आणि कोकेनच्या सेवनानंतर कार्यरत होणाऱ्या पेशी या सारख्याच असतात !!!!!!!!!!! थोडक्यात अधिकाधिक पैसा कमावणं हे एखाद्या व्यसनाप्रमाणेच आहे ज्यात आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक धन मिळाल्याशिवाय चैन पडत नाही !

कमावलेले पैसे घरं, बंगले, गाड्या इत्यादींवर उधळण्यातच मर्यादित नव्हते. त्यातला अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे अक्षरशः करोडो डॉलर्स वेश्यांवर उडवले गेले!!! स्ट्रीप क्लब्जवर (ज्यांना प्रत्यक्षात जंटलमन्स क्लब म्हणतात) अक्षरशः लाखो-करोडो डॉलर्सची उधळण झाली !!

क्रिस्टीन डेव्हीस
क्रिस्टीन डेव्हीस नावाची उच्चभ्रू वर्तुळात वावरणारी स्त्री तिच्या अतिशय उंची आणि महागड्या घरातून वेश्याव्यासाय चालवत असे...... !! तिचं घर न्यूयॉर्क शेअरबाजारापासून काही पावलांवरच होतं !!!!!!!!!!!!!!

या स्त्रीच्या मुलाखतीचाही समावेश या माहितीपटात आहे. तिच्या म्हणण्यानुसार जवळपास प्रत्येक वित्तसंस्थांमधले उच्चाधिकारी यात गुंतलेले होते. मार्केट रिसर्च, कॉम्प्युटर रिपेअर अशा कुठल्याही कारणांनी ही भलीमोठी बिलं दाखवली जात आणि ती सहजपणे पासही केली जात.


गृह्कर्जं घेणाऱ्या लोकांनी घराच्या किंमतीच्या जवळपास ९९.३% किंमतीची कर्जं घेतली होती. थोडक्यात त्यांच्याकडे ७० पैसे असताना १०० रुपयांचं घर त्यांनी विकत घेतलं होतं. आणि अशा प्रकारच्या कर्जांनाही रेटिंग एजन्सीज एएए अर्थात सर्वाधिक सुरक्षित किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर 'सरकारी बॉण्ड्स एवढी सुरक्षित गुंतवणूक' असं गुणांकन देत होत्या.

गोल्डमन सॅक्सने २००६ च्या पहिल्या सहामाहीत या असल्या कचऱ्याचीही लायकी नसलेल्या सिडीओजची ३.१ बिलियन डॉलर्सची विक्री केली. गोल्डमन सॅक्सचा प्रमुख कार्यकारी अधिकारी हेन्री पॉल्सन हा तेव्हाचा वॉल स्ट्रीटवरचा सर्वाधिक पगार घेणारा सीईओ होता. २००६ च्या मे महिन्यात जॉर्ज बुश यांनी या पॉल्सनची ट्रेजरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली !! करोडो डॉलर्सचा पगार सोडून सरकारी नेमणुकीत कोणीही स्वखुशीने का जाईल हा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण त्यामागचं कारण ऐकल्यावर आपण चक्रावून जातो.

ट्रेजरी सेक्रेटरी होण्यापूर्वी पॉल्सनने त्याच्याकडे असलेले ४८५ मिलियन डॉलर्स किंमतीचे शेअर विकून टाकले. पहिल्या बुशने संमत केलेल्या एका कायद्यान्वये पॉल्सनला या एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीवर एका पैशाचाही कर भरावा लागला नाही. थोडक्यात कराचे ५० मिलियन डॉलर्सही त्याने बुडवले.

या असल्या काहीही किंमत आणि अर्थ नसलेल्या बॉण्ड्समध्ये दरमहा ८०,००० निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृतीवेतनाची काळजी घेणाऱ्या मिसिसिपी राज्याच्या निवृत्तीवेतन विभागाने पैसे गुंतवले आणि व्हायचं तेच झालं.. त्यांना कित्येक मिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आणि त्यांनी गोल्डमन सॅक्सवर केसही केली आहे.

आपण संबंधितांच्या उत्पन्नांच्या आकड्यांची एक ढोबळ तुलना बघू.

मिसिसिपीच्या निवृत्त कर्मचाऱ्याचं सरासरी वार्षिक उत्पन्न : १८,७५० डॉलर्स

गोल्डमनच्या कर्मचाऱ्याचं सरासरी वार्षिक उत्पन्न : ६,००,००० डॉलर्स

पॉल्सनचं २००५ वर्षातलं उत्पन्न : ३,१०,००,००० डॉलर्स !!!!!!!!!!!

गोल्डमन सॅक्स एवढ्यावरच थांबले नाहीत. २००६ च्या अखेरीस त्यांनी अजून एक धोकादायक पाऊल पुढे टाकलं. जे कःपदार्थ सिडीओज ते विकत होते त्यांच्या विरुद्ध (म्हणजे ते सिडीओज बुडतील या अर्थाने... थोडक्यात ते सिडीओज बुडणार आहेत याची गोल्डमनला खात्री होती.) त्यांनी बेटिंग करायला सुरुवात केली आणि त्याचवेळी ग्राहकांना मात्र ते अतिशय सुरक्षित सिडीओज असल्याचं सांगून त्याची अजून अजून विक्री चालू ठेवली. स्वतःच विकत असलेले सिडीओज बुडतील यावर गोल्डमन ज्याअर्थी बेटिंग करत होते त्याअर्थी ते सिडीओज नक्की बुडणार आहेत याची गोल्डमनला पूर्णतः खात्री होती.

एआयजी कडून क्रेडीट डिफॉल्ट स्वाप विकत घेऊन स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या सिडीओज च्या विरुद्धही गोल्डमनने बेटिंग केलं आणि जेव्हा ते सिडीओज बुडाले तेव्हा त्याबद्दलही एआयजीकडून पैसे कमावले. गोल्डमनने एआयजीकडून किमान २२ बिलियन डॉलर्स किंमतीचे सिडीओज विकत घेतले. कालांतराने गोल्डमनला स्वतःलाच लक्षात आलं की इतक्या अति किंमतीचे सिडीओज घेणं अतिशय धोकादायक आहे. धोकादायक म्हणजे उलट अर्थी. कारण यामुळे स्वतः एआयजीच बुडण्याची शक्यता अधिक आहे. आणि हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःच एआयजीच्या संभाव्य घसरणीपासून स्वतःला वाचवण्यसाठी १५० मिलियन डॉलर्सचा विमा उतरवला !!!!!!!!!!!!!

२००७ मध्ये एआयजीने अजून एक पाऊल पुढे टाकून प्रत्येक कंपनीसाठी विशिष्ट पद्धतीने बनवलेले (कस्टमाईझ्ड) सिडीओज विकायला सुरुवात केली जेणेकरून जेवढा अधिक तोटा ग्राहकांना झाला तेवढाच अधिक फायदा गोल्डमनला मिळाला !!! गोल्डमनचा प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि अन्य उच्चाधिकारी यांनी या माहितीपटासाठी मुलाखती देण्यास नकार दिला आहे.

या सगळ्या गैरकारभारात वित्तसंस्थांएवढाच मुडीज, स्टँडर्ड अँड पुअर आणि फिच या सर्वात मोठ्या रेटिंग एजन्सीजचाही बरोबरीचा सहभाग होता. अत्यंत धोकादायक गुंतवणुकीला एएए सारखं सर्वोच्च गुणांकन देऊन त्यांनी त्याच्या बदल्यात करोडो डॉलर्स कमावले ! मुडीज या सर्वात मोठ्या रेटिंग एजन्सीचा २००७ मधला नफा त्यांच्या २००० सालच्या नफ्याच्या चौपट झाला.. ४०० % !!!!!!!!!!!!!! रेटिंग एजन्सीजना हे थांबवणं, अनावश्यक एएए रेटिंग न देणं आणि थोडक्यात हा सगळा गैरकारभार थांबवणं सहज शक्य होतं. किंबहुना तेच तर त्यांचं काम होतं ! वर्षागणिक करोडो करोडो करोडो डॉलर्सची अतिशय धोकादायक असलेली गुंतवणूक प्रत्यक्षात मात्र  'गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित' गुणांकन मिळवत गेली. कालांतराने सगळा डोलारा कोसळल्यावर चौकशी समितीसमोर आपली बाजू मांडताना या रेटिंग एजन्सीजच्या जवळपास प्रत्येक उच्चाधिकाऱ्याने ही रेटिंग/गुणांकनं म्हणजे सल्ला नसून निव्वळ मत असल्याचं ठासून सांगितलं. दुर्दैवाने यातल्या कुठल्याही अधिकाऱ्याने या माहितीपटाच्या निर्मात्यांकडे आपलं 'मत' मांडण्याचं धारिष्ट्य दाखवलं नाही. एकजात सर्वांनी या माहितीपटातल्या मुलाखतीसाठी नकार दिले.

भाग ३ इथे  वाचा.

बँक नावाची शिवी : भाग १

या वर्षीच्या ऑस्कर विजेत्यांच्या यादीतले सगळे चित्रपट बघायचं ठरवलं होतं पण दुर्दैवाने फक्त 'इन्सेप्शन' आणि 'सोशल नेटवर्क'च बघून झाले. दरम्यान या वर्षीचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवणारा 'इनसाईड जॉब ' बघण्याचा सुवर्णयोग आला आणि बाकीचे चित्रपट बघण्याची हुरहूरच शमून गेली. एकदम विषण्णता आली.

मला खात्री आहे की हा माहितीपट बघितल्यानंतर (कदाचित हा लेख वाचल्यावरही... कारण माहितीपटात दाखवलेलं तंतोतंत मी या लेखात लिहिलं आहे. माझ्या बुद्धीचं, मनाचं, पदरचं काहीही नाही.) तुम्ही आपल्या बँकेत ठेवलेल्या पैश्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कमालीचे साशंक व्हाल. कदाचित बँकेतले पैसे काढून आणून पूर्वीच्या काळासारखे आपल्या घराच्या तिजोरीत ठेवण्याचाही मोह तुम्हाला होईल. किंबहुना बँक हा शब्द शिवीसारखा वापरायची इच्छाही होईल. अर्थात कालंतराने आणि दुर्दैवाने तुमच्या लक्षात येईल की कितीही इच्छा नसली तरीही आपण या यंत्रणेचा या सिस्टमचा एक अविभाज्य आणि तितकाच दुर्दैवी घटक आहोत आणि आपण कोणाचंही काहीही वाकडं करू शकत नाही.

अजून एक गोष्ट म्हणजे २००८ साली आलेली महामंदी ही त्या साली झालेल्या गैरकृत्यांमुळे आली असा आपला अपसमज असतो. पण ही महामंदी आली ती वाढत्या हव्यासापोटी घडलेल्या गुन्ह्यांमुळे, वाकवलेल्या नियम आणि कायद्यांमुळे, शोधलेल्या पळवाटांमुळे आणि ज्यांनी गैरव्यवहार रोखायचे त्यांनीच गैरव्यवहार करणार्‍यांशी वेळोवेळी केलेल्या हातमिळवणीमुळे. तर हे सगळे प्रकार फार पूर्वीपासून म्हणजे जवळपास ८० च्या साशाकापासून चालू आहेत. काहीवेळा ती अतिरिक्त हाव, पैशाच्या हव्यासाचा अतिरेक सामौर्ण समाजाला रसातळाला नेऊ शकतो. नेतोही.. २००१ आणि तत्सम मंदीच्या वेळी आपण ते पाहिलंही आहे. हा चित्रपट २००८ साली आलेल्या महामंदीची पूर्वतयारी किती आधीपासून अनावधानाने का होईना चालू होती हे सांगतो. अनावधानाने या साठी म्हणतोय की हे एवढ्या भयंकर प्रमाणात उसळेल हे काही ठराविक उच्चपदस्थ सोडता कोणालाच माहित नव्हतं.  अर्थात अनावधानाने असं काही नव्हतंच.. लुबाडणूकीचा परमप्रिय अजेंडाच त्याला कारणीभूत होता आणि आहे.

चार्लस फर्ग्युसन
हा संपूर्ण माहितीपट बघताना प्रचंड कौतुक वाटत राहतं ते या माहितीपटाचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या चार्लस् फर्ग्युसन या माणसाचं. या माणसाने विविध बँका, वित्तसंस्था, सरकारी अधिकारी, वित्तीय अभ्यासक यांच्याशी बेधडकपणे केलेल्या चर्चा, कोड्यात टाकणारे प्रश्न विचारून त्यांना निरुत्तर केल्याचे प्रसंग आणि प्रसंगी अपशब्द झेलून का होईना उघडकीस आणलेलं मोठं सत्य या सार्‍या सार्‍याबद्दल त्याची पाठ थोपटावी तेवढी कमीच आहे !!

हा चित्रपट पाच उपविभागात विभागलेला आहे आणि म्हणूनच मीही तो पाच पोस्ट्समधे विभागून (एकाच वेळी) पोस्ट करतो आहे. पुन्हा एकदा सांगतो यात माझ्या पदरचं काहीही नाही. माहितीपटात दाखवलेली भयानक वस्तुस्थिती अधिकाधिक लोकांसमोर यावी असं वाटल्याने ते मी इथे जसंच्या तसं लिहितोय. अर्थात सगळ्या गोष्टी कव्हर करणं अशक्यच आहे पण तरीही मी त्यातल्या त्यात महत्वाचे मुद्दे इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अजून एक सूचना म्हणजे लेखात अनेक इंग्रजी शब्द आले आहेत. पण बर्‍याचशा तांत्रिक शब्दांसाठी चपखल मराठी शब्द माहित नसल्याने किंवा आयत्या वेळी न सुचल्याने आणि उगाच काहीतरी चुकीचं मराठी भाषांतर होऊन मूळ भावार्थ बदलले जाऊ नयेत यासाठी मी मूळ इंग्रजी शब्द जसेच्या तसे ठेवले आहेत.

माहितीपट सुरु होतो तो आईसलँडच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याच्या चित्रीकरणाच्या आणि जोडीला मेट डेमनच्या गंभीर आवाजातल्या विवेचनाच्या पार्श्वभूमीवर.

सगळ्यांना माहित असेलच पण तरीही आईसलँडविषयी थोडंसं. २००८ च्या महामंदीत ज्याप्रमाणे अनेक कंपन्या बुडीतखात्यात गेल्या, उध्वस्त झाल्या, बँकरप्ट झाल्या त्याप्रमाणे आईसलँड हा संपूर्ण देश बँकरप्ट झाला !!!!!!

अतिशय सक्षम, अत्याधुनिक आणि बेकारी जवळपास नगण्य असणार्‍या या देशाच्या आर्थिक अधःपतनाची सुरुवात २००० सालापासून राबवण्यात आलेल्या अत्यंत चुकीच्या सरकारी धोरणांमुळे झाली. सरकारने आईसलँडच्या तीन मोठ्या बँकाचं खाजगीकरण केलं आणि पाचच वर्षात या तीन छोट्या बँका ज्यांनी आयुष्यात कधीही आईसलँडच्या बाहेरच्या जगाशी व्यवहार केलेले नाहीत त्यांनी १.२० बिलियन डॉलर्सचं कर्ज घेतलं जे आईसलँडच्या अर्थव्यवस्थेच्या किमान दहापट होतं !!!

जिल्फी झोएगा (Gylfi Zoega) हा  आइसलँड विद्यापीठाचा प्रोफेसर म्हणतो "त्या काळी वर्तमानपत्रात नेहमी बातम्या यायच्या की आईसलँडमधल्या या कोट्याधीशाने फ्रान्स/इंग्लंड/फिनलंड मधली अमुक अमुक कंपनी विकत घेतली. परंतु त्या वरवर दिसणार्‍या आकर्षक बातमीतली खरी गोम कोणालाच कळायची नाही.खरं तर त्या कोट्याधीशाने 'अब्जावधी रुपयांचं कर्ज घेऊन' ही कंपनी विकत घेतलेली असायची. पण हे प्रमुख सत्य दुर्लक्षिलं जायचं".. यापुढे जाऊन तो अनधिकृत असलेल्या परंतु सरकार आणि बँकांच्या हातमिळवणीमुळेच घडू शकलेल्या अनेक छोट्या छोट्या घटना आपल्या दृष्टीक्षेपास आणतो सांगतो आणि नंतर एक अप्रतिम प्रश्न विचारतो. "हे असंच तर जगभरात झालं ना??.. न्यूयॉर्कमध्ये काय वेगळं झालं??!!!"

आणि इथे सुरु होतो आपल्या माहितीपटाचा पहिला भाग.


भाग १ : हे सारं कसं घडलं?

चार्लस कीटिंग
अनेक कायदे बदलले गेले, वित्तक्षेत्राला अनेक नियमातून सुट मिळू लागली. याची सुरुवात सर्वप्रथम रोनाल्ड रेगन यांच्या कारकीर्दीत १९८१ साली झाली. त्यांनी 'डोनाल्ड रेगन' या मेरील लिंचच्या प्रमुख कार्यकारी अधिकार्‍याला (सी ई ओ) अर्थमंत्री म्हणून नेमलं. रेगन यांचं सरकार बँक्स आणि वित्तक्षेत्रातल्या लॉबीईस्टसच्या पाठिंब्याने आलं होतं. आणि तेव्हापासून वित्तक्षेत्रातल्या ३० वर्षांच्या अधःपतनास सुरुवात झाली. १९८२ मध्ये रेगन सरकारने बंकांवारचे आणेल निर्बंध हटवले गेले ज्यामुळे बँकांना लोकांच्या पैशांची धोकादायक स्कीम्समध्ये गुंतवणूक करण्याची मुभा मिळाली. दशकभराच्या अवधीतच शेकडो बँका बुडाल्या. १२४ बिलियन डॉलर्सचा चुराडा झाला.  अनेक बँक उच्चाधिकारी कैदेत गेले. सर्वात गाजलं ते प्रकरण म्हणजे चार्ल्स कीटिंग.


अ‍ॅलन ग्रीनस्पॅन
१९८५ मध्ये केंद्र सरकारने त्याची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्याने अ‍ॅलन ग्रीनस्पॅन नावाच्या एका अर्थतज्ज्ञाची नेमणूक केली. ग्रीनस्पॅनने चौकशी समिती आणि सरकारला लिहिलेल्या  पत्रात कीटिंगच्या गुंतवणूकधोरणांचं वारेमाप कौतुक केलं. त्याच्या मते कीटिंगने त्याच्या गुंतवणूकदारांचे पैसे अन्य (धोकादायक) योजनांमध्ये गुंतवण्या काहीच वावगं नव्हतं !! नंतर कीटिंगने ग्रीनस्पॅनला ४०,००० डॉलर्स दिल्याचं उघडकीस आलं !!! त्यानंतर चार्ल्स कीटिंग तुरुंगात रवानगी झाली. आणि ग्रीनस्पॅन............. !!! ग्रीनस्पॅनची रेगन यांनी अमेरिकेच्या सेंट्रल बँकच्या चेअरमनपदी नियुक्ती केली !!  आणि धक्कादायक म्हणजे बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यु बुश यांच्या कारकीर्दीत ग्रीनस्पॅनची पुनर्नियुक्ती झाली !!! क्लिंटनच्या कारकीर्दीतही ग्रीनस्पॅनद्वारा आर्थिक क्षेत्रावरचे निर्बंध हटवणं चालूच राहिलं. त्याच्या सोबतीला रॉबर्ट रुबीन आणि लॅरी समर्स (हारवर्ड इकोनॉमिक स्कूलचा प्राध्यापक) हे ट्रेजरी सेक्रेटरी म्हणून होते. रॉबर्ट रुबीन हा माजी गोल्डमन सॅक्सचा माजी मुख्य कार्यकारी (सी ई ओ) अधिकारी होता ही इथे विशेष लक्ष देण्याची गोष्ट आहे !!

लॅरी समर्स
१९९० च्या सुमारास आर्थिक क्षेत्र मोठ मोठ्या निवडक कंपन्यांमध्ये विभागलं गेलं. या कंपन्या एवढ्या मोठ्या होत्या की त्यांचं बुडणं किंवा त्यांचं काही विपरीत होणं हे संपूर्ण यंत्रणेला धोका पोचवू शकणारं होतं ! आणि क्लिंटनच्या कारकीर्दीतल्या धोरणांनी त्या विशाल असलेल्या कंपन्यांना अधिकच अवाढव्य होण्यास हातभार लावला. १९९८ मध्ये सिटीकॉर्प आणि ट्रॅव्हलर्स ग्रुप या दोन विशाल कंपन्यांचं एकत्रीकरण होऊन त्याने सिटीग्रुपला जन्म दिला. सिटीग्रुप ही आर्थिक सेवा क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी ठरली. या एकत्रीकरणामुळे 'ग्लास-स्टिगल कायद्या 'चा भंग झाला होता. हा कायदा जागतिक महामंदीनंतर तयार करण्यात आला होता. या कायद्यान्वये बँकांना गुंतवणूकदारांचे पैसे धोकादायक योजनांमध्ये गुंतवण्यास बंदी होती. खरंतर सिटीने ट्रॅव्हलर्स ग्रुपला ताब्यात घेणं बेकायदेशीर होतं. पण ग्रीनस्पॅनने त्यावेळी शक्य असूनही आणि अधिकार असूनही त्यात काहीही हस्तक्षेप केला नाही. केंद्र सरकारने सिटीग्रुपला एक वर्षाचा कालावधी सुट म्हणून दिला आणि त्या कालावधीत त्यांच्यावरची बंधनं हटवली आणि एक नवीन कायदा संमत केला. त्या एका वर्षात (१९९९ मध्ये) समर्स आणि रुबीन यांच्या दबावामुळे कॉंग्रेसने 'ग्रॅम-लिच-बिली' विधेयक  संमत केलं (ज्याला सिटीग्रुप रिलीफ अ‍ॅक्ट असंही म्हणतात.). 'ग्रॅम-लिच-बिली' च्या विधेयकामुळे 'ग्लास-स्टिगल' कायद्याद्वारे आलेली बंधनं दूर झाली आणि भविष्यकाळातल्या असंख्य मर्जर्सचा मार्ग मोकळा झाला !!  कालांतराने रॉबर्ट रुबीनने सिटीग्रुपचा व्हाईस चेअरमन या नात्याने  १२६ मिलियन डॉलर्स कमावले !! त्याने या डॉक्युमेंटरीसाठी मुलाखत द्यायला स्पष्ट नकार दिला !

(१ मिलियन = दहा लाख, १ बिलियन = १०० कोटी. मला कल्पना आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण लेखात या एककांचा उल्लेख वारंवार येणार आहे म्हणून सहज हाताशी अर्थ असावा म्हणून सांगितलं.)

पुढचा घोटाळा नव्वदीच्या अखेरीस झाला. इन्व्हेस्टमेंट बँक्सनी इंटरनेट स्टॉक्सच्या मोठेपणाविषयी चुकीचे समज पसरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे २००१ मध्ये शेअरबाजारात ५ ट्रिलियन डॉलर्सची जबरदस्त मोठी पडझड झाली. महामंदीनंतर स्थापन करण्यात आलेल्या आणि आर्थिक क्षेत्रातल्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यास बांधील असलेल्या 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन' या सरकारी संस्थेने या गैरप्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीने कुठलीही पावलं उचलली नाहीत की त्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. न्यूयॉर्क अ‍ॅटर्नी जनरल एलियट स्पिट्झर्स यांच्या चौकशी समितीने हे उघडकीस आणलं की  इन्व्हेस्टमेंट बँकांनी इंटरनेट कंपन्यांविषयी चुकीचे कॉल्स देऊन, चुकीचे रिकामेंडेशन्स देऊन त्यांच्या किंमती चढवून ठेवल्या होत्या. स्टॉक अ‍ॅनालीस्टसना फक्त नवीन नवीन ग्राहक आणण्यासाठी पैसे दिले जात होते. परंतु त्यांची एखाद्या कंपनीच्या स्टॉकबद्दलची सार्वजनिक मतं आणि खाजगी मतं यांत जमीनआस्मानाचा फरक होता.

२००१ च्या पडझडीच्या विरोधातली केस सेटल करण्यासाठी दहा मोठ्या वित्तसंस्थांनी २००२ च्या डिसेंबरमध्ये १.४ बिलियन डॉलर्स मोजले आणि त्यांच्या सदोष कार्यपद्धतीत बदल करण्याचं आश्वासन सरकारला दिलं. या यादीत लीमन ब्रदर्स, डॉईश्च बँक, जे पी मॉर्गन, मेरील लिंच, मॉर्गन स्टेनली, गोल्डमन सॅक्स, सिटीग्रुप अशा अनेक मान्यवर वित्तसंस्थांचा सहभाग होता !

आर्थिक नियमांचं शिथिलीकरण केल्यानंतर असंख्य घटना, उदाहरणं घडली ज्यात वित्तसंस्थांमधले बडे बडे अधिकारी अनेक आर्थिक गैरकृत्यांत सामील असून त्यांनी गुंतवणूकदरांचे अब्जावधी डॉलर्स बुडवले, अफरातफर केली. सरकारी अधिकार्‍यांना मोठमोठ्या रकमेची लाच दिली.

- क्रेडीट सुईस (स्वीस) या वित्तसंस्थेने तर इराणच्या राष्ट्रीय आण्विक कार्यक्रमाला मदत म्हणून प्रचंड मोठी आर्थिक मदत केली. कालांतराने त्यांना ५३६ मिलियन डॉलर्सचा दंड करण्यात आला.

- सिटीबँकेने मेक्सिकोमधून १०० मिलियन डॉलर्सचे ड्रग्सचे पैसे वळते करून् दिले.

- १९९८ आणि २००३ च्या दरम्यान फ्रेडी मॅक आणि फेनी मे या दोन वित्तसंस्थांनी करोडो डॉलर्सचा घोटाळा केला. त्यांना अनुक्रमे १२५ मिलियन आणि चारशे मिलियनचा दंड झाला. फेनी मेने आपली आर्थिक उलाढाल मुळच्यापेक्षा किमान १० बिलियन डॉलर्सने वाढवून दाखवली. फेनी मे चा प्रमुख कार्यकारी अधिकारी फ्रँकलीन रेन्स हा बिल क्लिंटनच्या कारकीर्दीत बजेट डायरेक्टर होता. त्याने फेनी मेचा सी ई ओ म्हणून ५२ मिलियन बोनसरूपात कमावले.

- सिटीबँक, मेरील लिंच आणि जे पी मॉर्गन  या वित्तसंस्थांनी एन्रॉनचा महाघोटाळा दडवून ठेवण्यास मदत केली. त्यांना कालांतराने ३८५ मिलियन डॉलर्सचा दंड झाला.

१९९० च्या सुरुवातीला नियमांमध्ये आणली गेलेली शिथिलता आणि तंत्रज्ञानातील झेप यांच्या अपूर्व संगमाने 'डेरीव्हेटीव्हज' नावाच्या एका अतिशय क्लिष्ट अशा नवीन उत्पादनाला जन्म दिला. या उत्पादनामुळे शेअरबाजार अधिक सुरक्षित झाल्याचे दावे अर्थतज्ज्ञांनी आणि बँक्सनी केले. याउलट डेरीव्हेटीव्ह्जमुळे मार्केट अधिकच अस्थिर झालं. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अनेक तंत्रज्ञ, गणितज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या मेंदूला खाद्य असलेल्या 'शीतयुद्ध तंत्रज्ञान' नावाच्या पर्वाचा अस्त झाला होता. तेच कुशाग्र मेंदू हे डेरीव्हेटीव्ह्ज बनवण्याच्या कामी वापरले गेले.

रॉबर्ट रुबीन
डेरीव्हेटीव्ह्ज मुळे बँकर्सना अक्षरशः कुठल्याही मुद्यावर जुगार खेळण्याची मुभा मिळाली. तेलाच्या किमंतीमधला चढउतार, एखादी कंपनी बंद पडणे यासारखा कुठलाही मुद्दा डेरीव्हेटीव्ह्जमधे पणाला लावला गेला. १९९० च्या अखेरीस डेरीव्हेटीव्हज हा १५ ट्रिलियन डॉलर्सचा परंतु कुठल्याही प्रकारच्या नियमांचं बंधनं नसलेला भलामोठा बाजार बनला होता. १९९८ च्या दरम्यान प्रथमच त्यांना काही नियमात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. बिल क्लिंटन यांनी स्टॅनफर्ड लॉ स्कूलची पदवीधर असलेल्या ब्रूक्सली बोर्न नावाच्या अर्थतज्ज्ञाची नेमणूक 'कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन' च्या अध्यक्षपदी केली. बोर्न यांनी डेरीव्हेटीव्ह्ज मार्केटवर काही नियंत्रण आणण्याचा आणि त्यासाठी आवश्यक ते कायदे संमत करण्याची तयारी केली. त्या सुमारास समर्स, ग्रीनस्पॅन, रुबीन आणि 'सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन' चा अध्यक्ष आर्थर लेव्हीट या सर्वांनी एकत्रितपणे बोर्न यांच्यावर दबाव आणून त्यांना तसं न करण्याविषयी सुचवलं/सुनावलं. आश्चर्य म्हणजे बिल क्लिंटन यांचाही त्या लोकांना पाठींबाच होता.

२००० साली सिनेटर फिल ग्राम यांनी एक विधेयक संमत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. या विधेयकानुसार डेरीव्हेटीव्ह्ज हे  कुठल्याही माध्यमातून नियंत्रित केले जाऊ शकणार नव्हते. आणि यामुळेच

- कालांतराने सिनेटर फिल ग्रॅम ('ग्रॅम-लिच-बिली' विधेयकातला एक प्रमुख) यु बी एस (स्वित्झर्लंड बँक) बँकेचा  व्हाईसचेअरमन बनला.

- १९९३ मध्ये त्यांची पत्नी वेंडी ही एन्रॉनच्या संचालकमंडळात होती.

- समर्सने कालांतराने डेरीव्हेटीव्हज वर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार्‍या एका हेजफंडचा कन्सल्टंट या नात्याने २० मिलियन डॉलर कमावले.


२००१ मध्ये ज्यावेळी जॉर्ज डब्ल्यु बुश अध्यक्ष झाले त्यावेळी अमेरिकन वित्तक्षेत्र हे पूर्वीच्या तुलनेत प्रचंड बलाढ्य, अवाढव्य आणि नफेखोर झालं होतं. खालील कंपनी/बँक्स/वित्त संस्था/विमा कंपन्यांची/गुणांकन कंपन्यांची (रेटिंग एजन्सीज) या क्षेत्रावर मजबूत पकड होती.

गोल्डमन सॅक्स
मॉर्गन स्टेनली
लीमन ब्रदर्स
मेरील लिंच
बेअर स्टर्नस
सिटीग्रुप
जेपी मॉर्गन
ए आय जी (विमा कंपनी)
एम बी आय ए
ए एम बी ए सी

रेटिंग एजन्सीज

मुडीज
स्टँडर्ड अँड पुअर्स
फिच

आणि या सगळ्या महत्वाच्या घटकांना एकत्र आणून तयार झाली ती 'सिक्युरिटायझेशन फूड चेन'.  या 'सिक्युरिटायझेशन फूड चेन'च्या यंत्रणेमुळे कर्ज, गहाणखत मिळून कित्येक ट्रिलियन डॉलर्सची उलाढाल झाली.


पूर्वीच्या काळी जेव्हा गृहकर्जं घेतली जायची तेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती ते कर्ज फेडण्यासाठी बांधील होती. दरमहा हफ्ते (इंस्टॉलमेन्टस) भरून अनेक वर्षांनी कर्ज फेडलं जाई. अशा या दीर्घकालीन कर्जांमध्ये कर्ज देणारी स्थानिक वित्तसंस्था ही दरमहाचे हफ्ते आणि एकूणच फेडलं जाणारं कर्ज याबाबतीत अतिशय जागरूक असे. परंतु या 'सिक्युरिटायझेशन फूड चेन'च्या नवीन संकल्पनेमध्ये या मूळ तत्वालाच दूर सारण्यात आलं होतं.  कर्ज देणार्‍या संस्थांनी ती कर्ज मोठमोठ्या वित्तसंस्थांना विकून टाकली. या बलाढ्य वित्तसंस्थांनी अशा हजारो गृहकर्जांबरोबरच कारलोन्स, स्टुडंट लोन्स, क्रेडीट कार्डवरची कर्जं इत्यादी सगळी कर्जं एकत्र करून को-लॅटरलाईझ्ड डेट ऑब्लिगेशन (Collateralized Debt Obligation) उर्फ सीडीओ (CDO) नावाचं एक अतिशय क्लिष्ट असं डेरीव्हेटीव्ह तयार केलं. त्यानंतर वित्तसंस्थांनी हे सीडीओज मोठमोठ्या गुंतवणूकदारांना विकले. त्यामुळे कर्ज फेडणार्‍या सामान्य माणसांनी भरलेल्या हफ्त्यांचे पैसे जगभरातल्या अशा असंख्य मोठ्या गुंतवणूकदारांकडे जायला लागले. मोठ्या वित्तसंस्थांनी 'क्रेडीट रेटिंग एजन्सी 'जना पैसे चारून 'सिडीओज'बद्दल चांगली गुणांकनं (रेटिंग्ज) देण्यास भाग पाडलं. ज्यामुळे अनेक सिडीओजना एएए रेटिंग मिळालं ज्याचा अर्थ ते सीडीओ/कर्ज अतिशय सुरक्षित (म्हणजे फेडलं जाईल असं) आहे असा होतो. त्यामुळे सिडीओज हे रिटायरमेंट फंडांमध्ये देखील अतिशय लोकप्रिय झाले. रिटायरमेंट फंडांमध्ये लोक आपल्या आयुष्यभराची गुंतवणूक उतारवयातलं आयुष्य सुरळीतपणे व्यतीत करण्यासाठी गुंतवत असतात. थोडक्यात रिटायरमेंट फंडांनी अतिशय सुरक्षित क्षेत्रात गुंतवणूक करणं अपेक्षित असतं. या सिडीओजना मिळालेल्या एएए रेटिंग्जमुळे अधिकाधिक रिटायरमेंट फंड त्या सिडीओजमध्ये गुंतवणूक करायला लागले........................ !!!!

ही गुणांकनं (रेटिंग्ज) थोडक्यात बघू

एएए : सर्वोत्कृष्ट
एए : उत्तम
ए : चांगलं
बीबीबी : बरं
बीबी : वाईट
बी : धोकादायक

थोडक्यात हा एक टाईम बॉम्बच होता..... झालं !! यामुळे यापुढे कर्ज घेणारी व्यक्ती कर्ज फेडण्यास सक्षम आहे की नाही याबद्दल कर्ज देणार्‍याला काहीच वाटेनासं झालं. त्यांनी अधिकाधिक धोकादायक कर्जं अक्षरशः वाटायला सुरुवात केली. बँकांनाही त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. जास्तीतजास्त सिडीओ विकले की त्यांना अधिक अधिक नफा मिळत होता. आणि अर्थातच रेटिंग एजन्सीजनी दिलेली रेटिंग्ज जरी चुकीची आली तरी त्यांनाही काही फरक पडत नव्हता कारण त्यांना तशी रेटिंग्ज (गुणांकनं) देण्यासाठी वित्तसंस्थांकडून/बँक्सकडूनच पैसे मिळालेले होते. थोडक्यात अधिक जास्त, अजून जास्त अशी कर्जं अक्षरशः वाटली गेली. २०० आणि २००३ च्या दरम्यान दिली गेलेली कर्जं वर्षागणिक चौपटीने वाढत गेली होती. या 'सिक्युरिटायझेशन फूड चेन' मधल्या कुठल्याही घटकाने कर्जाच्या सुरक्षिततेचा, कर्जफेडीच्या ग्वाहीचा विचारच केला नव्हता. कर्जांची संख्या अधिक अधिक वाढवून त्यातून मिळणार्‍या कमिशनरूपी फीवरच फक्त त्यांचा डोळा होता. २००० सालच्या सुरुवातीला या अशा असुरक्षित कर्जांची संख्या प्रचंड वाढली. या असुरक्षित कर्जांना सबप्राईम म्हणतात. परंतु अशा रीतीने जेव्हा हजारो सबप्राईम्स किंवा असुरक्षित कर्जांचे मिळून सिडीओज बनले तेव्हा त्या सिडीओजना तरीही एएए गुणांकन मिळालं !!!! थोडक्यात हे सगळं घडू न देणं, आवरता येणं, संयम ठेवणं शक्य होतं परंतु ना वित्तसंस्थांनी काही केलं ना सरकारने. आपण काहीतरी चुकीचं वागतो आहोत हे माहित असूनही, कल्पना असूनही त्यांनी अशा सबप्राईमला जास्तीतजास्त प्रोत्साहन दिलं कारण त्यावरच्या अतिशय वाढीव व्याजदरामुळे त्यांना त्यातून मिळणारं व्याज/नफा हा खूप जास्त होता. या सगळ्यामुळे कर्जप्रक्रियेची वाट लागली. कर्ज घेणारे सर्वसामान्य लोक उगाचंच महागड्य सबप्राईम कर्जाच्या चक्रात अडकले. या घातक पद्धतीमुळे कर्ज फेडणं निव्वळ अशक्य असलेल्याही कित्येकांना कर्जं अक्षरशः वाटली गेली. ग्राहक जितका जास्त सबप्राईम लोन्सच्या जाळ्यात अडकला तितका जास्त पैसा बँकांना मिळत होता आणि हे चक्र असंच चालू राहिलं !!!!!

*भाग २ इथे  वाचा.

Friday, April 29, 2011

रीसदु जूबा


पूर्वसूचना : लेख वाजवीपेक्षा थोडा जास्तच मोठा झाला असल्याने पुरेसा वेळ आणि सहनशक्ती असेल तेव्हाच (किंवा तरच) वाचावा. 

रुबीन कार्टर... न्यू जर्सीत राहणारा एक कृष्णवर्णीय अमेरिकन मुलगा. लहानपणापासूनच विविध लहानसहान गुन्ह्यांमुळे बालसुधारगृह/तुरुंगाच्या वार्‍या केलेला. कालांतराने अमेरिकन सैन्यात सामील होतो. तीन वर्षांनी सैन्यातून बाहेर पडतो आणि व्यावसायिक बॉक्सिंगला सुरुवात करतो. त्याच्या पंच करण्याच्या असामान्य शक्ती आणि प्रतिभेमुळे अनेक स्पर्धा जिंकतो. रुबीन कार्टरचा 'द हरीकेन', रुबीन 'द हरीकेन' कार्टर होतो.

डेन्झेलने रंगवलेला 'द हरीकेन'
१७ जून १९६६. मध्यरात्रीचा अडीच-तीनचा सुमार. खाऊन,पिऊन, नाच-गाणं, थोडी दंगामस्ती वगैरे करून कार्टर न्यू जर्सीतल्या पॅटरसन शहरातल्या एका बारमधून बाहेर पडतो. त्याच्याबरोबर जॉन आर्टिस नावाचा तरुण असतो. आपल्याला कार्टरबरोबर जायला मिळतंय, त्याची गाडी चालवायला मिळते आहे यामुळे आर्टिस प्रचंड खुश असतो. काही काळ गाडी चालल्यावर अचानक एका चौकात त्यांची गाडी पोलिसांच्या गाडीने थांबवली जाते. चारी दिशांनी पोलीस कार्स येऊन कार्टरच्या गाडीला घेरतात आणि त्याची गाडी एका बारमधे (कार्टर आधी होता त्या बार मधे नाही तर दुसर्‍याच एका बार मधे) आणतात. पोलिसांना मिळालेल्या वायरलेस संदेशानुसार त्या बारमध्ये काही वेळापूर्वी दोन कृष्णवर्णीय माणसांनी अंदाधुंद गोळीबार केलेला असतो. कार्टर आणि आर्टिस पोलिसांबरोबर जेव्हा बारमध्ये शिरतात तेव्हा तिथलं वातावरण भयंकर असतं. सामान अस्ताव्यस्त पसरलेलं असतं, काचांचा खच पडलेला असतो आणि जमिनीवर तीन प्रेतं पडलेली असतात. त्या गोळीबाराच्या घटनेचे साक्षीदार असलेल्या दोन माणसांसमोर कार्टर आणि आर्टिस यांना आणलं जातं आणि ओळखपरेड केली जाते. दोन्ही साक्षीदार हे दोघे 'ते' नसल्याचं ठामपणे सांगतात. कार्टर आणि आर्टिसला तात्पुरतं सोडून दिलं जातं. 

हे दोन साक्षीदार म्हणजे भुरटे चोर असतात आणि त्यांच्याविरोधात पोलिसांकडे अनेक जुन्या केसेस चालू असतात. त्या केसेसची धमकी देऊन साक्ष बदलण्यासाठी या दोघांवर पोलिसांकडून दबाव आणला जातो. घाबरून जाऊन साक्ष बदलली जाते. बदललेल्या साक्षीच्या आधारावर कार्टर आणि आर्टिस यांच्यावर खटला उभा राहतो. खटल्यादरम्यान कार्टर आणि आर्टिस यांच्या वकिलाकडून अनेक अ‍ॅलबी साक्षीदारांची (अ‍ॅलबी : गुन्हा घडला तेव्हा आरोपी सदर घटनास्थळी नसून अन्य ठिकाणी होता याचा पुरावा देणारी व्यक्ती) साक्ष दिली जाऊन ते त्यावेळी अन्य ठिकाणी उपस्थित होते हे सिद्ध केलं जातं. परंतु ते पुरावे (कदाचित) पुरेसे न ठरल्याने कार्टरला आणि आर्टिसला तीन खुनांबद्दल तीन जन्मठेपांची शिक्षा सुनावली जाते.

वास्तवातला रुबिन 'द हरीकेन' कार्टर
तुरुंगात असताना कार्टर द सिक्स्टीन्थ राउंड (संदर्भ : बॉक्सिंग मॅचमधे १५ फेर्‍या असतात.) नावाचं त्याचं आत्मचरित्र लिहितो. त्या
 आत्मचरित्रात त्याचा तोवरचा प्रवास, बॉक्सिंग, न केलेल्या गुन्ह्याबद्दलची शिक्षा वगैरेची तपशीलवार माहिती असते. दरम्यान ते आत्मचरित्र कॅनडात राहणार्‍या लेस्रा मार्टीन नावाच्या एका अमेरिकन कृष्णवर्णीय मुलाच्या हाती लागतं. लेस्राच्या शिक्षणाची आणि पालनपोषणाची जवाबदारी दोन कॅनेडियन तरुण आणि एका तरुणीने मिळून घेतलेली असते. कार्टरच्या आत्मचरित्राचा लेस्रावर प्रचंड प्रभाव पडतो.  तो भारावून जातो, चिडतो, प्रसंगी वैफल्यग्रस्तही होतो. कारण कार्टरच्या सुरुवातीच्या आयुष्यातल्या घटना आणि लेस्राच्या आयुष्यातल्या घटना यात बरंच साम्य असतं. दोघांनीही सारखाच त्रास भोगलेला असतो. यानंतर सुरु होतो तो कार्टर आणि  लेस्रामधला पत्रव्यवहार आणि कालांतराने त्यांची झालेली पहिली भेट. सुरुवातीच्या पत्रव्यवहारानंतर आणि पहिल्या भेटीनंतर लेस्राचा सांभाळ करत असलेला कॅनेडियन तरुणांचा ग्रुप आणि लेस्रा मिळून कार्टरला सोडवण्याचा निर्धार करतात. ते सगळ्या केसची कागदपत्र पहिल्यापासून तपासतात, तपशीलातल्या चुकांच्या नोंदी करतात. चुकीच्या आणि खोट्या साक्षी, अर्धवट पुरावे यामुळेच कार्टरला शिक्षा भोगावी लागली यावर त्यांचं एकमत होतं. अनेक महिने प्रयत्न करून, पुरावे गोळा करून त्यांना अखेरीस असा एक महत्वाचा पुरावा पोलिसांच्या वायरलेस यंत्रणेवरच मिळतो की ज्याच्यामुळे हे सिद्ध होतं की गोळीबाराच्या घटनेविषयीची माहिती देणारा कॉल ज्यावेळी वायरलेसवर आला त्यावेळी कार्टर त्या बारमधे नाही तर अन्य बार मधे होता. पोलिसांच्या स्वतःच्या रेकॉर्डमधल्या नोंदीला कोर्टाला ग्राह्य मानावंच लागतं आणि अखेरीस कार्टर आणि आर्टिस यांची निरपराध म्हणून सुटका होते. पण ............... पण त्यासाठी त्यांना त्यांच्या आयुष्यातला २० वर्षांचा अमुल्य काळ गमवावा लागलेला असतो. कार्टरला अटक होते तेव्हा तो त्याच्या बॉक्सिंग कारकीर्दीच्या शिखरावर असतो. पोलिसांच्या सामान्य चुकांमुळे, पूर्ववैमनस्यामुळे दोन तरुणांच्या आयुष्याची नासाडी होते... !!!

----------

रॉन विल्यमसन.. ओक्लाहोमा राज्यातल्या एडा शहरात राहणारा.. लहानपणापासूनच बेसबॉलच्या वेडाने झपाटलेला. बेसबॉल हेच आयुष्य मानणारा. शाळेच्या बेसबॉल टीममधे आपल्या जबरदस्त खेळाने चमत्कार करणारा आणि एक दिवस बेसबॉलच्या मेजर लीगमधे खेळायचं स्वप्न पहात असणारा मुलगा. घरची परिस्थिती बेताची असूनही आई-वडील आणि दोन मोठ्या बहिणींनी त्याचा छंद पुरवण्यासाठी त्याला होता होईतो मदत केलेली असते. कालांतराने त्याची बेसबॉलच्या मायनर लीगमधे निवड होते. संमिश्र यश मिळतं. तो अजून अजून सराव करायला लागतो. पण जोडीला सिगारेट, दारू, बारहॉपिंग, क्लब्ज हे प्रकारही सुरु होतात आणि होता होता जोर धरायला लागतात. 

दरम्यान त्याचं त्याच्या एका जिवलग मैत्रिणीशी लग्न होतं. पण... लग्नानंतरही त्याची व्यसनं कमी होत नाहीत. खेळ सुधारत नसतोच. उलट अजूनच बिघडत जातो. अशात एक दिवस त्याचा उजवा हात प्रचंड दुखायला लागतो आणि त्याला काही महिन्यांसाठी खेळातून विश्रांती घ्यावी लागते. काही महिन्यांनंतर तो पुनरागमन करतो परंतु कामगिरीत अजिबात सुधारणा होत नाही. त्याला मायनर लीगच्या टीममधून वगळलं जातं. घरातली भांडणं, व्यसनं वाढत जातात. तीन-चार वर्षात घटस्फोट होतो. 
दरम्यान त्याच्या वडिलांचा मृत्यू होतो. त्यानंतर रॉन खुपच एकलकोंडा होतो. विचित्र वागायला लागतो. कधी तासनतास गिटार वाजवत बसतो तर कधी वीस-वीस तास झोपून काढायला लागतो. मध्येच आरडाओरडा करायला लागतो किंवा कधी दिवसभर एडाभर भटकत राहतो. त्याच्या विचित्र वागणुकीकडे बघून त्याला मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीची नितांत आवश्यकता आहे हे त्याच्या आईच्या आणि बहिणींच्या लक्षात येतं. त्या त्याला अनेक वेगवेगळ्या डॉक्टर्स, हॉस्पिटल्स मधे नेतात परंतु रॉन कुठेही टिकत नाही किंवा उपचारांसाठी सहकार्य करत नाही. त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार कधीच होत नाहीत.

याच काळात गिटार आणि क्लब या सामायिक आवडींमुळे त्याची ओळख डेनिस फ्रिट्झशी होते. डेनिस शाळाशिक्षक असतो आणि आपल्या आईविना मुलीचा सांभाळ करत असतो. डेनिस आणि रॉन चांगले मित्र बनतात. बार्स, क्लब्जमधे एकत्र जायला लागतात. बर्‍याच ठिकाणी भटकायला लागतात. 

८ डिसेंबर १९८२ ची सकाळ. डेब्रा स्यू कार्टर या २२ वर्षांच्या तरुणीचा मृतदेह तिच्या घरात सापडतो. डेब्रा एका स्थानिक बारमधे वेट्रेस म्हणून काम करत असते. मारण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झालेला असतो आणि अत्यंत हालहाल करून तिला मारण्यात आलेलं असतं. तिच्या घरातल्या दिवाणखान्यातल्या आणि स्वयंपाकघरातल्या भिंतींवर  "आमचा पाठलाग करू नका" अशा अर्थाची विधानं लिहिलेली आढळतात. ती विधानं आणि हल्ल्याचा एकूण प्रकार पाहता हा खून एकापेक्षा अधिक लोकांनी केलाय याची पोलिसांना खात्री पटते. पोलीस अनेक लोकांना ताब्यात घेतात, अनेकांची चौकशी करतात परंतु बरेच दिवस शोधूनही गुन्हेगार काही त्यांच्या हाती लागत नाही. दरम्यान ग्लेन गोर नावाचा एक तरुण पोलिसांकडे येतो आणि डेब्रा ज्या बारमधे काम करत असते तिथे आदल्या रात्री त्याने तिला रॉनबरोबर बघितलं असल्याचं सांगतो. आधीच्या एकाही साक्षीदाराने रॉनच्या तिथे असण्याचा कुठलाही उल्लेख केलेला नसतो. पण तरीही पोलीस मिळालेल्या माहितीच्या आधारे रॉनला पोलीस स्टेशनमधे बोलावतात. त्याची चौकशी करतात. त्याच्या केसाचे, रक्ताचे नमुने जमा करतात. त्याची पॉलिग्राफ टेस्ट करतात. आणि तो टेस्ट फेल झाला आहे असं सांगतात. थोडक्यात तो खोटं बोलतोय असं सांगून त्याने गुन्ह्याची कबुली द्यावी यासाठी त्याच्यावर दबाव आणला जातो. पण रॉन काही त्या दबावाला बधत नाही. अनेक तासाच्या चौकशीअंती त्याला सोडून देतात. दरम्यान अजून एक माणूस पोलिसांकडे येऊन साक्ष देतो की डेब्राचा खून झाला त्या रात्री त्याच्या घराजवळ रॉन आणि अजून एक माणूस आरडाओरडा करत होते. सार्वजनिक नळावर हात पाय धूत होते. निव्वळ रॉनचा चांगला मित्र आहे या आधारावर पोलीस डेनिसलाही पोलीसस्टेशनमधे बोलावतात. त्याचीही पॉलिग्राफ टेस्ट केली जाते, कसून चौकशी केली जाते. पण तोही दबावाला न बधाल्याने त्यालाही सोडून दिलं जातं.

दरम्यान एडामधल्याच एका छोट्या दुकानातून डेनिस हॅरवे या तरुणीचं अपहरण होतं. पण झटापटीच्या कुठल्याही खुणा आढळत नाहीत. अनेक आठवडे प्रचंड शोधाशोध करूनही पोलिसांना गुन्हेगारांचा पत्ता लागत नाही. लागोपाठ घडलेल्या अशा प्रकारच्या दोन घटनांमुळे एडाचे रहिवासी त्रस्त होतात आणि पोलिसांवर प्रचंड दबाव येतो. या दबावापायी पोलीस  टॉमी वॉर्ड आणि कार्ल फॉन्टनॉट या दोन सामान्य तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतात आणि काही वेळाने सोडून देतात.

रॉन विल्यमसन
रॉन, डेनिस, टॉमी, कार्ल या सगळ्यांची चौकशी करणारे पोलीस सारखेच असतात आणि अर्थातच चौकशीची पद्धतही अगदी सारखी असते. ती म्हणजे धाकदपटशाने न् केलेला गुन्ह्याची कबुली नोंदवून घेणे. यासाठी त्यांचा प्रचंड मानसिक छळ केला जातो, धमक्या दिल्या जातात.. आरडाओरडा, मारहाणीची धमकी असे काय काय प्रकार केले जातात. आणि कहर म्हणजे त्यांनी स्वप्नात डेनिस हॅरवेचा खून केला होता हे त्यांच्या डोक्यात ठसवलं जातं आणि त्या स्वप्नात केलेल्या खुनाचा कबुलीजवाब त्यांना प्रत्यक्षात देण्यास भाग पाडलं जातं. या कबुलीजवाबाचं रेकॉर्डिंग केलं जातं आणि त्यात कुठेही हा स्वप्नात घडलेला गुन्हा आहे असा उल्लेख येणार नाही याची काळजी घेतली जाते. असा कबुलीजवाब मिळवण्यासाठी त्यांचे कुठल्या प्रकारचे हाल केले जातात ते अर्थातच व्हिडीओवर येत नाही. 

(या स्वप्नातल्या गुन्ह्यांच्या कबुलीजवाबांच्या हास्यास्पद आणि धक्कादायक पुराव्यांची गोष्ट एक दिवस रॉबर्ट मेयर या न्यूयॉर्क टाईम्सच्या एका पत्रकाराच्या कानी पडते. तो सगळ्या गोष्टींचा, तपशीलांचा, पुराव्यांचा अभ्यास करतो आणि त्याला धक्काच बसतो. तो 'ड्रीम्स ऑफ एडा ' नावाचं एक पुस्तक काढतो आणि त्यात टॉमी आणि कार्लवर झालेल्या अन्यायाचं विस्तृत विवेचन करतो. पण काहीही फरक पडत नाही. दोघेही या क्षणीही तुरुंगात आहेत. टॉमी वॉर्ड कदाचित पुढेमागे जामिनावर सुटूही शकेल परंतु क्लिष्ट यंत्रणेमुळे आणि काही विक्षिप्त नियमांमुळे कार्ल फॉन्टनॉट कधीच सुटू शकणार नाही. !!!!!!)

डेनिस फ्रिट्झ
काही महिन्यांनी रॉन आणि डेनिसला पुन्हा चौकशीला बोलावून त्यांच्याकडूनही असाच स्वप्नात केलेल्या गुन्ह्याचा कबुलीजवाब त्यांना दबावाखाली आणून घेतला जातो. थोडक्यात खरा गुन्हेगार शोधणं पोलिसांना शक्य नसतं, त्यांची तेवढी लायकी नसते, इच्छा नसते आणि अर्थातच डोक्यावर परिणाम झालेल्या, दारुड्या, प्रसंगी ड्रग्सचं सेवन करणार्‍या, दिवसभर इथेतिथे भटकणार्‍या वेडसर रॉनला टार्गेट करणं त्यांच्या दृष्टीने अतिशय सोपं असतं. जेणेकरून गुन्हेगार पकडल्याबद्दल कौतुकही केलं जातं आणि कुठल्याही प्रकारच्या जनक्षोभाला बळीही पडावं लागत नाही. डेनिसला अटक करण्यामागचं कारण तर अतिशयच हास्यास्पद असतं. कारण त्याच्याविरुद्ध तर काहीच पुरावा नसतो (रॉनबद्दल खोटं का होईना पण ग्लेन गोरने काहीतरी सांगितलेलं तरी असतं) निव्वळ रॉनचा मित्र असतो म्हणून आणि एका माणसाने डेब्राच्या घराबाहेर दोन माणसांना त्या रात्री बघितलेलं असतं म्हणून डेनिसला अटक होते.

मिळालेल्या भक्कम (!!!) पुराव्याच्या आधारे रॉन आणि डेनिसविरुद्ध खटला उभा राहतो. डेब्रा कार्टरच्या घराची आणि मृतदेहाची भयानक छायाचित्रं दाखवून ज्युरींचं मन वळवलं जातं आणि त्या रॉनला देहदंडाची आणि डेनिसला जन्मठेपेची शिक्षा होते. पोलीसदल सुखावतं, आपली टिमकी वाजवून घेतं.

यानंतर सुरु होतो तो तुरुंगाताला जीवघेणा प्रवास. प्रचंड त्रास, छळ. विक्षिप्त कैदी, विचित्र जेलर. जेलमध्येही रॉनचा प्रचंड मानसिक छळ होतो. त्यामुळे आणि पुरेशा आणि योग्य औषधोपचार आणि डॉक्टरी मदतीच्या अभावी त्याची मानसिक स्थिती अजूनच ढासळायला लागते. दरम्यान त्याच्या आणि रॉनच्या अपिलाची सुनावणी होते. त्यात जेलमधले अधिकारी आणि पोलीस संगनमताने जेलमधल्या काही कैद्यांच्या रुपाने खोटे साक्षीदार उभे करतात जे सांगतात की रॉनने त्यांच्याकडे डेब्राचा खून केल्याचा कबुलीजवाब दिलाय आणि त्याचा त्याला आता प्रचंड पश्चात्ताप होतोय. त्याच्याबरोबर डेनिसही गुन्ह्यात सामील होता. डेनिस आणि रॉन अर्थातच ते निर्दोष असल्याचं नेहमीप्रमाणेच ठासून सांगतात. 

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रॉनची केस मांडायला जो वकील सरकार पुरवतं तो अत्यंत हुशार वगैरे असतो पण दुर्दैवाने तो अंध असतो आणि त्याला पुरावे/फोटो/कागदपत्र इत्यादींची तपासणी करण्यासाठी मदतनीसही दिला जात नाही. अर्थातच रॉनची केस लंगडी पडते. त्यांचं अपील फेटाळलं जातं. अशी तीन वेगवेगळया कोर्टात, तीन वेगवेगळया स्तरांवर त्यांची अपिल्स फेटाळली जातात. इतक्या असंख्य वकील, जेलर, पोलीस, न्यायाधीश यापैकी कोणालाही रॉनच्या ढासळलेल्या मानसिक संतुलनाविषयी एक शब्दही काढावासा वाटत नाही. खरं तर रॉनची मानसिक अवस्था एवढी वाईट असते की शिक्षा तर सोडाच त्याच्यावर साधा खटला उभा राहणं हेही बेकायदेशीर आणि अमानुष असतं. पण ही एवढी साधी बाब या एवढ्या मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींपैकी कोणाच्याही साधी नजरेसही येत नाही. 

दरम्यान रॉनची आई जाते. परंतु जाण्यापूर्वी रॉनला शिक्षेपासून वाचवण्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचं काम करते. ज्या रात्री डेब्राचा खून झाला त्या रात्री रॉन डेब्राच्या क्लबमधे किंवा घरी नाही तर स्वतःच्या घरी असल्याचा पुरावा शोधते. त्या रात्री रॉनने चित्रपटांची कॅसेट भाड्याने आणलेली असते आणि त्या रात्री तो त्याच्या आईबरोबर चित्रपट बघत असतो. रॉनची आई त्या दुकानाची त्या दिवशीची पावती शोधते आणि रॉनच्या निर्दोषत्वाचा पुरावा म्हणून ती पोलिसांना नेऊन देते. तो पुरावा अर्थातच पोलीस दाबून टाकतात.

ज्याच्या चुकीच्या
तपासामुळे या निर्दोष
जीवांना मरणप्राय
यातना भोगाव्या
 लागल्या तो
डिस्ट्रीक्ट अ‍ॅटर्नी
 बिल पिटरसन
आणि एक दिवस रॉनची देहदंडाची शिक्षा अंमलात आणण्याचा दिवसही मुक्रर केला जातो. ही बातमी ऐकून रॉन आणि त्याच्या बहिणी मुळापासून हादरून जातात. शिक्षेच्या निर्णयाचं पत्र एक औपचारिकता म्हणून धड शुद्धीवरही नसलेल्या रॉनला वाचून दाखवलं जातं. तेव्हाही तो सतत फक्त आपण निर्दोष असल्याचंच वारंवार बजावून सांगतो. त्याकडे अर्थातच दुर्लक्ष केलं जातं. परंतु सुदैवाने त्याचवेळी एका शेवटच्या अपिलाला यश येतं. (अमेरिकेन व्यवस्थेप्रमाणे देहदंड झालेल्या गुन्हेगाराला विविध लेव्हलच्या न्यायालयांमध्ये अपिलाची संधी दिली जाते जेणेकरून चुकुनही एखाद्या निर्दोष माणसाचा बळी जाणार नाही.) आणि त्याची शिक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली जाते आणि त्याचा कैदेतला शारीरिक/मानसिक छळ पुन्हा चालू होतो. पुरेसं जेवण मिळत नाही, मिळतं ते अतिशय निःकृष्ट असतं. थंडीतही पुरेसे कपडे दिले जात नाहीत. 

मानसिक छळ तर याहीपेक्षा भयानक असतो. जेलमधील कर्मचारी/पोलीस त्याला अनेक प्रकारे त्रास देतात. कधीकधी घोषणा करण्याच्या सार्वजनिक माईकवरून "रॉन, मी डेब्रा कार्टर बोलते आहे. तू मला का मारलंस?" किंवा "रॉन, मी डेब्राचे वडील बोलतोय. तू माझ्या मुलीचा खून का केलास???" अशा प्रकारचे विचित्र प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नासरशी रॉन अधिकाधिक बिथरतो आणि अधिकाधिक आक्रमक होतो. आपण निर्दोष असल्याचा त्याचा घोशा चालूच राहतो. रात्रभर तारस्वरात ओरडत राहतो. 

फ्रिट्झचीही अवस्था काही विशेष वेगळी नसते. त्या छळाला कंटाळून आणि मुख्य म्हणजे न केलेल्या गुन्ह्याचं बालंट माथ्यावरून पुसून टाकण्यासाठी तो जंग जंग पछाडायचं ठरवतो. त्याला काही करून तिथून बाहेर पडायचं असतं. तुरुंगातच तो कायद्याचा अभ्यास करायला लागतो. तुरुंगातल्या वाचनालयात जाऊन आपलं कायदेविषयक ज्ञान वाढवायला लागतो. कायदेविषयक अनेक पुस्तकं पालथी घालतो. स्वतःच्या आणि रॉनच्या केसचा, आरोपांचा बारकाईने अभ्यास करतो. अनेक टिपणं काढतो.

फक्त देहदंड झालेल्या व्यक्तींनाच त्यांची केस लढण्यासाठी सरकारकडून वकील दिला जातो असा नियम आहे. डेनिसला जन्मठेपेची शिक्षा झाली असल्याने त्याचा खटला लढण्यासाठी त्याला स्वतःला वकील शोधावा लागणार असतो. दरम्यान इनोसन्स प्रोजेक्ट  या संस्थेचं नाव त्याच्या कानावर पडतो. इनोसन्स प्रोजेक्ट ही चुकीच्या रीतीने देहदंड/जन्मठेप किंवा तत्सम शिक्षा झालेल्या निर्दोष व्यक्तींना कायदेशीर मदत मिळवून देणारी सामाजिक/कायदेविषयक संस्था आहे. तो त्यांच्याशी संपर्क साधतो. आपली केस त्यांना समजावून सांगतो. आपली टिपणं त्यांना दाखवतो. ही केस किती चुकीची आहे हे इनोसन्स प्रोजेक्टच्या वकिलांच्याही लक्षात येतं. 


रॉन आणि डेनिस
यांची निर्दोष
 म्हणून मुक्तता
 केली गेल्याचा क्षण
इनोसन्स प्रोजेक्ट आणि रॉनच्या केसवर काम करणारे अन्य वकील या केसमधल्या छोट्या छोट्या चुका शोधतात. कसा अन्याय घडलाय त्याचं पूर्ण विवेचन कोर्टाला सादर करतात. दरम्यान जवळपास अकरा वर्षांचा काळ निघून गेलेला असतो. न केलेल्या चुकीसाठी त्यांनी अकरा वर्षं कैद्याचं भीषण आयुष्य जगलेलं असतं. त्याच दरम्यान डीएनए चं तंत्र विकसित होतं आणि बलात्कार किंवा तत्सम गुन्हे शोधण्यासाठी डीएनएच्या तंत्राचा वापर करायला न्यायालय मान्यता देतं. या डीएनएच्या तंत्राच्या आधारे डेब्राच्या प्रेतावर मिळालेल्या रक्त आणि वीर्याच्या नमुन्यांचा अभ्यास केला जातो आणि अखेर........ अखेर बारा वर्षांच्या अमानुष छळाचा, पोलिसी विक्षिप्तपणाचा अंत होतो. डेनिस आणि इनोसन्स प्रोजेक्टच्या अव्याहत परिश्रमाला यश येतं आणि रॉन आणि डेनिस निर्दोष असल्याचं सिद्ध होतं आणि त्यांची निर्दोष सुटका होते !!! पण तोवर त्यांच्या आयुष्यातली ऐन उमेदीच्या काळातली सोन्यासारखी १२ वर्षं मातीमोल झालेली असतात. !!

---------

काही वर्षांपूर्वी '१२ अँग्री मॅन ' बघितला होता तेव्हा अनेक प्रश्नांची वावटळ मनात उमटवून गेला होता. त्यापूर्वी चोरी, खून, बलात्कार अशा एकापेक्षा एक गुन्ह्यांना फाशीची, जन्मठेपेची शिक्षा झालेली बघून आनंद, समाधान वाटायचं. बस्स.. छान अद्दल घडली असं वाटायचं. '१२ अँग्री मॅन ' ने सारी परिमाणंच बदलून गेली. गुन्हेगार, गुन्ह्याची व्याप्ती, शक्यता, शिक्षा, निकालाची अचूकता या सार्‍यासार्‍यांवर भलीमोठी प्रश्नचिन्हं उमटवून गेला. काही वर्षांनी ब्लॉग लिहायला लागल्यावर त्यावर पोस्ट लिहायची म्हणून पुन्हा एकदा बघितला, अजून नीट बघितला. कालांतराने मॅच्युरिटी नामक पुटं चढली असल्याने की काय तो जास्तच भावला, अधिकच ओरखडे उमटवून गेला. 

सुदैवाने '१२ अँग्री मॅन' मधल्या निर्दोष असलेल्या कोवळ्या आरोपी मुलाच्या मागे हेन्री फोंडासारखा चाणाक्ष, निष्पक्षपाती आणि सजग ज्युरी सदस्य होता आणि त्याने हट्टाने उरलेल्या अकरा जणांशी भांडून, त्या गुन्ह्यातल्या अन्य शक्यता वर्तवून तो मुलगा दोषी आहे हे १००% कसं सिद्ध होत नाही हे सर्वांना दाखवून दिलं आणि त्या मुलाचा जीव वाचवला... पण पण... पण दुर्दैवाने तो चित्रपट होता, काल्पनिक होता. वास्तवात असं काही घडलं नव्हतं. प्रत्यक्षात असं कधीच घडत नाही. प्रत्यक्षातल्या हरीकेन कार्टर, रॉन विल्यमसन, डेनिस फ्रिट्झ, टॉमी वॉर्ड, कार्ल फॉन्टनॉट आणि इतर असंख्य अशा अनाम निर्दोष व्यक्तींच्या माथी गुन्हेगारी कलंक लागतो तो जन्मभरासाठी. कित्येकांना अनेक वर्षांनी न्याय मिळतो पण आयुष्यातला सुवर्णकाळ जातो तो जातोच. तो परत थोडीच मिळतो?? कित्येकांच्या नशिबी तर तेही नसतं. त्यांची आयुष्यं अशीच तुरुंगातल्या चार निर्जीव भिंतीत संपून जातात.  

'द इनोसंट मॅन' प्रकाशित होण्याच्या काही काळ आधी जॉन ग्रिशम ला एका मुलाखतीत (अमेरिकन) न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न आणि त्याने दिलेलं उत्तर खाली देतोय.

Q : Is the criminal-justice system broken?
A : It is a mess. More than 100 people have been sent to death row who were later exonerated because they weren’t guilty or fairly tried. Most criminal defendants do not get adequate representation because there are not enough public defenders to represent them. There is a lot that is wrong. 

'द इनोसंट मॅन'चा लेखक जॉन ग्रिशम
मोर दॅन १००? शंभरपेक्षा अधिक ?? (अर्थात त्याने १०० माणसं किती काळात बळी गेली हे सांगितलं नसलं 
 तरीही १०० हा आकडा कितीही कालावधीसाठी खूप मोठा आहे!!) एवढी निर्दोष माणसं अनाठायी मारली गेली आहेत? आणि का तर फक्त सरकारकडे त्या लोकांचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या माणसांची कमतरता आहे म्हणून? म्हणून सरळ त्यांना मरू द्यायचं? फारच भीषण आहे हे सारं. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात जिथे गुन्हे शोधून काढण्यासाठी, रोखण्यासाठी अतिप्रगत तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्या देशात जर का हा एवढा अन्याय होत असेल तर भारतासारख्या विकसनशील देशात हा आकडा शंभर ऐवजी किती असेल बरं? आज कैदेत असलेले किती लोक खरोखर दोषी असतील? अर्थात 'द इनोसंट मॅन'च्या नावातच असलेल्या 'murder and injustice in small town' गृहीत धरता हे अमेरिकेतल्या छोट्या शहरांमध्ये जिथे तंत्रज्ञान प्रमुख शहरांएवढं पोचलेलं नाही किंवा जिकडची पोलीसखाती गुन्हा शोधण्याच्या नवीन नवीन तंत्रांच्या बाबतीत अद्ययावत नाहीत, प्रशिक्षित नाहीत तिथेच हे घडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही गोष्ट किमान ३० वर्षांपूर्वीची आहे हे जरी गृहीत धरलं तरी अन्याय तो अन्यायच. 

थोडक्यात पोलीस एखाद्याला आरोपी म्हणून उभं करतात तेव्हा प्रत्येकच वेळी ती व्यक्ती खरंच आरोपी असेल असं मानायचं कारण नाही. त्यात कदाचित पोलिसांचे काही लागेबांधे असतील, पूर्ववैमनस्य असेल, जुने हिशोब पुरे करायचे असतील किंवा तपास करताना खरंच पुरेसे पुरावे मिळाले नसतील किंवा जे  मिळाले असतील ते दिशाभूल करणारे मिळाले असतील !!! आणि पोलीसच का निकाल देणारा खुद्द न्यायाधीश (त्याने कितीही निष्पक्षपाती राहून निर्णय देणं अपेक्षित असलं तरीही) संपूर्ण निष्पक्षपातीपणे निर्णय देत असेल असं मानण्याची गरज नाही. अमेरिकेत अजूनही आरोपी काळा आहे की गोरा यावर निर्णय देणार्‍या ज्युरींचा निर्णय ठरल्याची उदाहरणं आहेत. त्याप्रमाणे आपल्या इथेही न्यायालयाने (म्हणजे न्यायाधीशांनी) दिलेले कित्येक निर्णय आरोपीची जात/धर्म यावरून तीव्र किंवा सौम्य झाल्याची उदाहरणं आहेत. 

या एवढ्या भल्यामोठ्या लेखाचं (!!) तात्पर्य काय काढायचं, हे एवढं सगळं मी का लिहिलंय मला माहित नाही. हरीकेन आणि इनोसंट मॅन जवळपास लागोपाठ वाचले/बघितले गेले आणि त्यात दाखवलेल्या यंत्रणेच्या जागरूकतेअभावी अनाठायी बळी जाणार्‍या अशा असंख्य निष्पाप, निर्दोष जीवांची कणव आल्यावाचून राहिली नाही. आणि हे सगळं सगळ्यांना सांगावंसं वाटलं म्हणून लिहिलंय म्हणा हवं तर..

किंवा अगदी तात्पर्य काढायचंच झालं तर ते एवढंच काढू की प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते हे लक्षात ठेवणं अतिशय अतिशय आवश्यक आहे. जे घडतंय त्याची एकच बाजू आपल्याला दिसत असते. पण त्याची न दिसणारी बाजूही असतेच. कदाचित ती दिसते त्या बाजूपेक्षा अधिक उजळ, अधिक प्रभावी, अधिक सच्ची असेल. पण समोर दिसणार्‍या एकाच बाजुमुळे त्या व्यक्तीसंबंधी, त्या घटनेसंबंधी लगेच अनुकूल/प्रतिकूल मत बनवण्याची गरज नाही. कुणी सांगावं, समोरच्या घटनेची, व्यक्तीची, प्रसंगाची दुसरी बाजू बघता बघता कदाचित आपल्याला आपल्यापासून अनभिज्ञ असलेल्या आपल्याच दुसर्‍या बाजूची नव्याने ओळख होईल !!!

रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन

काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...