Monday, May 9, 2011

बँक नावाची शिवी : भाग ३

* भाग १ इथे  वाचा.
* भाग २ इथे  वाचा.



भाग ३ : महासंकट !! (द क्रायसिस)

बेन बर्नान्की २००६ मध्ये फेडरल रिझर्व्ह बोर्डाचा चेअरमन बनला. त्याच वर्षी सबप्राईम कर्जांचं वितरण सर्वाधिक झालं. हा योगायोग खचितच नव्हता !! अनेक अर्थतज्ज्ञ, अभ्यासक इत्यादींकडून धोक्याच्या अनेकानेक सूचना मिळूनही बर्नान्कीने ते रोखण्यासाठी कुठलीही पावलं उचलली नाहीत. उलट त्याच्यामते "हे अतिशय प्रगतीचं लक्षण असून घाबरण्याचं काही कारण नाही कारण अमेरिकेच्या इतिहासात घरांच्या किंमती आत्तापर्यंत कधीही घसरलेल्या नाहीत !!" बर्नान्कीने या माहितीपटासाठी मुलाखत देण्यास अर्थातच नकार दिला !

तब्बल २००४ पासून एफबीआयने वाढत जाणाऱ्या घरांच्या किंमती आणि सहजगत्या उपलब्ध होणारी कर्जं याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कर्जांसाठी दिलेल्या कागदपत्रात गडबड असल्याची भीतीही व्यक्त केली होती. पण त्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं गेलं. २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी, २००६ मध्ये नुरील रुबिनी या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाने, २००७ मध्ये अ‍ॅलन स्लोन या फॉर्च्युन मासिकाच्या ख्यातनाम पत्रकाराने, २००७ मध्ये हेज फंड मॅनेजर बिल अ‍ॅकमन याने आणि २००८ मध्ये चार्ल्स मॉरिस या अभ्यासकाने वेळोवेळी या धोकादायक कर्जांच्या बाबतीत अनेक पेपर्स सदर केले, लेख लिहिले, पुस्तकं लिहीली, किंबहुना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही अमेरिकन सरकारला वेळोवेळी धोक्याच्या सूचना दिल्या. परंतु कसलाही परिणाम झाला नाही.

२००८ च्या दरम्यान कर्जवसुलीसाठी होणाऱ्या घरांच्या लिलावांनी विक्रमी संख्या गाठली !!!! गृहकर्जं आता बँकांना विकली जाईनाशी झाली. सीडीओजच्या व्यवहारांचं मार्केट साफ कोसळलं ज्यामुळे वित्तसंस्थांकडे अब्जावधी डॉलर्सची कर्जं, अन्य सीडीओ आणि प्रत्यक्ष घरं पडून राहिली आणि ती विकत घेण्यासाठी कोणीही ग्राहक मिळेनासा झाला. कारण लोकांकडे पैसेच नव्हते. हा कर्जांचा फुगवटा फुटला तेव्हा सरकार आणि फेडरल रिझर्व्ह त्याला तोंड देण्यासाठी सज्ज नव्हते. कारण या संकटाच्या व्याप्तीची त्यांना तोवर काही कल्पनाच आलेली नव्हती !

२००८ च्या फेब्रुवारी महिन्यातल्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतही अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरी हेन्री पॉलसन याचे उद्गार होते "आर्थिक क्षेत्र मजबूत आहे. भरघोस वृद्धी होते आहे. आणि ज्याअर्थी भरघोस वृद्धी होते आहे त्याअर्थी महामंदी कशी येईल बरं? " आणि विशेष म्हणजे पॉलसनने हे उद्गार काढायच्या आधी चार महिने महामंदी ऑलरेडी सुरु झाली होती !!!!!!

१६ मार्च २००८ ला अवाढव्य वित्तसंस्था 'बेअर स्टर्न' च्या तिजोरीत खडखडाट झाला आणि 'जे पी मॉर्गन चेस' ने केवळ २ डॉलर प्रतिशेअर देऊन तिला विकत घेतलं. अर्थात यासाठी केंद्र सरकारने ३० बिलियन डॉलर्सची मदत दिली होती. त्यावेळीही सरकारने ताबडतोब पुढे होऊन या सगळ्या घोटाळ्यात हस्तक्षेप करून सगळी सुतराम आपल्या हातात घ्यायला हवी होती. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही !!

७ सप्टेंबर २००८ ला सरकारने 'फ्रेडी मॅक' आणि 'फॅनी मे' या दोन एके काळच्या प्रचंड मोठ्या पण आता बुडीत खात्यात चाललेल्या गृहकर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांना ताब्यात घेतलं. तरीही पॉलसनच्या मते त्यात घाबरण्यासारखं काहीही नव्हतं.

दोनच दिवसांनी लीमन ब्रदर्सने ३.२ मिलियन डॉलर्सचा विक्रमी तोटा नोंदवला आणि त्यांचा शेअर गडगडला.

या कंपन्या बुडण्याच्या काही दिवस/महिने आधी यांची गुणांकनं (रेटिंग्ज) काय होती ते पाहू. फार धक्कादायक निकाल आहेत हे.

- बुडण्याच्या फक्त एक महिना आधीच बेअर स्टर्नचं गुणांकन ए२ (एए)होतं थोडक्यात अतिशय उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक असं हे रेटिंग होतं.

- लिमन ब्रदर्स : बुडण्याच्या फक्त काही दिवस आधी ए२.

- एआयजी : बुडण्याच्या फक्त काही दिवस आधी एए

- 'फ्रेडी मॅक' आणि 'फॅनी मे : एएए !!!!!!!!

- सिटीग्रुप, मेरील : एए

आपण या रेटिंग्जचे अर्थ पहिल्या भागात बघितलेच आहेत तरीही पुन्हा एकदा इथे बघू.

एएए : सर्वोत्कृष्ट
एए : उत्तम
ए : चांगलं
बीबीबी : बरं
बीबी : वाईट
बी : धोकादायक

१२ सप्टेंबर २००८ ला लिमन ब्रदर्सच्या तिजोरीत खडखडाट झाला आणि संपूर्ण वित्तक्षेत्र धोक्यात आलं. शेवटच्या क्षणी हेन्री पॉलसन आणि टिमोथी गाईटनर या न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर्सनी लिमन ब्रदर्सला वाचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी सगळ्या प्रमुख बँकांच्या प्रमुखांची बैठक बोलावली.

परंतु त्याच सुमारास मेरील लिंच ही अजून एक महाबलाढ्य वित्तसंस्था/बँक धोक्यात आली होती. १४ सप्टेंबरला बँक ऑफ अमेरिकाने मेरीलला विकत घेतलं. लिमन ब्रदर्सला वाचवण्यासाठी/विकत घेण्यासाठी बारक्लेज बँक ही एकमेव ब्रिटीश बँक तयार होती. परंतु त्या बदल्यात त्यांना अमेरिकन सरकारकडून फायनान्शियल गॅरंटी हवी होती. पॉलसनने त्याला नकार दिला !!!!!!!!!!!!!! थोडक्यात लिमन काय किंवा अमेरिकन सरकार काय यापैकी कोणीही बँकरप्सीपासून वाचण्याची कसलीही काहीही तयारी केलेली नव्हती.

लिमन ब्रदर्सची बँकरप्सी केस सांभाळणारे वकील हार्वे मिलर म्हणतात "फेडरल रिझर्व्हला लिमन ब्रदर्सच्या बँकरप्सीची अंमलबजावणी १४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी करून टाकायची होती. आम्ही त्यांना त्यांच्या निश्चयाचा पुनर्विचार करण्यासंबंधी बऱ्याच वेळा सुचवलं. पण त्यांच्या मते ते काय करताहेत आणि त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या मते आर्थिक स्थिती पूर्ववत आणण्यासाठी, शेअर बाजारात स्थैर्य आणण्यासाठी हे करणं अत्यावश्यकच आहे !!!!"

पॉलसन आणि बर्नान्कीने अन्य देशातल्या बँकरप्सी कायद्यांचा, नियमांचा आणि परिणामांचा अजिबात अभ्यास केलेला नव्हता हे तर उघड आहे. बँकरप्सीच्या ब्रिटीश कायद्यान्वये (लिमन ब्रदर्स ही ब्रिटीश कंपनी असल्याने) लिमन ब्रदर्सचं लंडनमधलं ऑफिस ताबडतोब बंद करावं लागलं. जगभरातले लिमनशी संबंधित सगळे व्यवहार क्षणार्धात ठप्प झाले. त्याच आठवड्यात एआयजी आपोआपच क्रेडीट डिफॉल्ट स्वापवाल्या ग्राहकांना १३ बिलियन डॉलर्स देणं लागले. परंतु त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता. १७ सप्टेंबरला एआयजीला सरकारने विकत घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी पॉलसन आणि बर्नान्कीने केंद्र सरकारकडे बँकांना वाचवण्यासाठी ७०० बिलियन डॉलर्स देण्यासाठी हात पसरले.

क्रेडीट डिफॉल्ट स्वापवरची बंधनं शिथिल करण्यासाठी आणि वित्तसंस्थांचं लिव्हरेज लिमिट (बँकेचा स्वतःचा पैसा आणि कर्जाऊ पैसा यांचं गुणोत्तर) वाढवण्यासाठी आग्रही असणारा थोडक्यात ज्या दोन प्रमुख गोष्टींमुळे एवढं मोठं महाभारत घडलं त्यासाठीचा जवाबदार माणूस पॉलसनच होता. अर्थातच हेन्री पॉलसनने या माहितीपटासाठी मुलाखत देण्यास नकार दिला.


पॉलसन, बर्नान्की आणि गाईटनर

एआयजी बुडाल्यावर (म्हणजे प्रचंड पैसे ओतून सरकारने वाचवल्यावर) त्यांच्या क्रेडीट डिफॉल्ट स्वापचे प्रमुख ग्राहक असलेल्या गोल्डमन सॅक्सला दुसऱ्याच दिवशी ६१ बिलियन डॉलर्स दिले गेले. स्वतः वाचण्यासाठी सरकारकडून ७०० बिलियन घेणाऱ्या बँकेने दुसऱ्याने बुडू नये म्हणून आपल्याला भीक म्हणून मिळालेल्या ७०० बिलियन मधले ६१ बिलियन काढून दुसर्याला देणं हा शुद्ध मुर्खपणा होता. पॉलसन, बर्नान्की आणि गायटनरच्या या धक्कादायक निर्णयामुळे अमेरिकन करदात्यांच्या १५० बिलियन डॉलर्स एवढ्या प्रचंड कराच्या पैशाचं नुकसान झालं.

यानंतर जगभरात एक भीतीचं वातावरण पसरलं, महामंदी येणार, आली याविषयी लोकांची खात्री झाली. अमेरिका आणि युरोपमधली बेकारी १०% झाली. महामंदीने बघता बघता संपूर्ण जगाला विळखा घातला. डिसेंबर २००८ च्या दरम्यान प्रचंड विशाल अशा जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीभोवती आणि त्याच बरोबर क्रायसलर या कंपनीभोवती बँकरप्सीचं वादळ घोंघावू लागलं. अमेरिकन लोकांची क्रयशक्ती, खर्च करण्याची क्षमता कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम चीनी बाजारावर झाला. चीनमधल्या जवळपास एक कोटी नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.

सिंगापूरची एक कंपनी वार्षिक वीस टक्क्यांच्या भरधाव वेगाने मोठी होत होती आणि अचानक त्यांच्या वाढीचा वेग वजा नऊ टक्क्यांवर आला. निर्यात तीस टक्क्यांनी कमी झाली.

अशा प्रकारच्या कुठल्याही वाईट घटनेत सगळ्यात जास्त भरडला जातो तो सर्वात गरीब माणूस हा नियम आहे. इथेही तेच झालं. रोजंदारीवर काम करणारे, हातावर पोट असणारे लोक अक्षरशः रस्त्यावर आले. घरदार सोडून जाऊन रस्त्यावर अक्षरशः तंबू ठोकून राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.

भाग ४ इथे  वाचा.

7 comments:

  1. हे जेंव्हा घडले (कसे घडले ते सविस्तर आत्ता समजतंय) तेंव्हा माझ्या मोठ्या भावाने लिमन ब्रो. मध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. नशीब तो त्यात नव्हता नाहीतर परिस्थिती वाईट आली असती. दुसरा एक मित्र होता तो पटनी सोडून नुकताच लिमन मध्ये लागला होता. दुर्दैवाने त्याची नोकरी गेली आणि तो पुन्हा पटनीच्या दारी गेला ह्यावेळी त्याला पटनीने ४०% कमी पगार दिला.... :(

    ह्या लोकांनी झोल करून करोडो $ कमावले पण रोजंदारीवर काम करणारे, हातावर पोट असणारे लोक खरच रस्त्यावर आले...

    ReplyDelete
  2. रोहणा, खरंच वाट लागली रे अनेकांची. माझा एक मित्र लीमन बंद पडायच्या थोडं आधी लीमन सोडून आमच्या कंपनीत जॉईन झाला. त्याच्याकडून त्याच्या मित्रांच्या आणि एक्स-कलीग्सच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या !!! खूप वाईट वाटलं सगळं ऐकून :(

    ReplyDelete
  3. माझ्या नणंदेचा मुलगा (भाचा) आणि होणारी सून दोघेही लीमन मध्ये होते. सूनेचे डिपार्ट्मेंट नमूरा ने टेकओव्हर केले. पण भाच्याला मात्र नोकरी गमवावी लागली. आता तो आणि ती दोघेही डॉईश बॅंकेत लंडनमध्ये आहेत.

    ReplyDelete
  4. रोहणा, आधी दिलेलं उत्तर ब्लॉगरने खाऊन टाकलं :( पुन्हा देतो.

    माझा एक मित्र लीमन बुडण्यापूर्वी काही महिने लीमन सोडून आमच्या कंपनीत जॉईन झाला. नंतर त्याच्याकडून त्याच्या एक्स-कलीग्ज, इतर मित्र यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टी ऐकायला मिळाल्या.. फार वाईट वाटलं ते सारं ऐकून :(((

    ReplyDelete
  5. श्रेयाताई, हो ग.. बरेच जणांचे हाल झाले.. आणि मुख्य म्हणजे त्यांचा काहीही दोष नसताना :(

    ReplyDelete
  6. काय काय चालत वरच्या लेवल वर! मला एक कळत नाही प्रत्यक्ष संपत्ती आणि पैसा याचं गुणोत्तर असत ... उगाच कोणीही कितीही पैसा नाही छापू शकत .. मग अमेरिकेत इतका वर्च्युअल पैसा तयार कसा काय झाला? ७०० बिलिअन$ एवढा पैसा अमेरिकन सरकारने कुठून दिला? आणि लीमन ला (त्या तुलनेत)फक्त ३.२ मिलिअन$ चा तोटा कसा काय झाला... साहजिकच माहितीपट पहिला पाहिजे! :) पण तरीही

    ते रेटिंग च गणित इथे पुन्हा चुकल्यासारख वाटतय... कृपया एक अवलोकन होऊ द्या

    ReplyDelete
  7. सगळा प्रचंड गोंधळ आहे रे अभिषेक. ज्यांच्या हाती सत्ता आणि मनात लोभ आहे ते काहीही करू शकतात..

    रेटिंगचं गणित सुधारलं आहे आता. धन्यवाद.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...