Friday, November 17, 2017

स्मायली

"आई, आज हिंदीचा पेपर मिळाला."

"फक्त हिंदीचा? आणि बाकीचे? बाकीचे कधी मिळणार?" लेक रिसर्च पेपर प्रेझेंट करून आल्याच्या उत्साहागत आईने पृच्छा केली.

"ते माहीत नाही." तोडीस तोड निरुत्साहात उत्तर आलं.

"बरं ठीके. बघू हिंदीचा. किती मिळाले?" 'रिसर्च पेपर' मोड ऑनच होता.

"एटीन करेक्ट, वन रॉंग आणि एक स्मायली. !!!!"

"एक काय?" आता बाबाचंही कुतूहल चाळवलं होतं

"ए टी न क रे क्ट, व न रॉं ग आ णि ए क स्मा य ली. !!!!" पुनर्मतमोजणीचा निकाल तोंडावर मारण्यात आला.

"स्मायली??? म्हणजे? कुठे दिला? पेपरात? आणि का ते??"

"ते मला काय माहीत. तूच बघ आणि सांग मला" एवढा निरुत्साह कुठून येत असावा??

मातोश्रींनी घाईघाईने पेपर हातात घेऊन उलट सुलट मागे पुढे करत चाळायला सुरुवात केली आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. एका प्रश्नाला काहीच मार्क दिले नव्हते परंतु मुलांच्या तोंडून देवाने वदावे तद्वत 'स्मायली' मात्र खरोखरीच विराजमान जाहला होता.

दोनेक मिनिटं सगळं वाचून झाल्यावर मातोश्रींना हसणं आवरेनासं झालं. मातोश्रींचा अवतार पाहता एव्हाना तीर्थरूपांनीही रिंगणात उडी घेतली होती.

"अग काय झालं तरी काय? काय पराक्रम केलेत?"

"थांब जरा" असं म्हणत मातोश्री वाचून दाखवायला लागल्या.

"एक जंगल मी एक खरगोश और एक कछुआ रहते थे. दोनो बहोत अच्छे दोस्त थे." साध्या ससा कासवाच्या बोधकथेवरच्या प्रश्नोत्तरांमध्ये शाळेच्या म्याडमला स्मायली द्यावासा का वाटला असावा हे एक कोडंच होतं.

एव्हाना मातोश्री कथा संपवून प्रश्नोत्तरांवर आल्या होत्या.

"इस कथासे आपको क्या बोध मिलता है? " ... स्मायली वालं काय तात्पर्य असावं बरं??

"इस कथासे मुझे ये बोध मिलता है के प्रतियोगिता में सोना नही चाहिये"


आई-बापाच्या धो धो हसण्याच्या शर्यतीत "आई सांग ना. का दिला स्मायली?" हा प्रश्न साफ विरघळून गेला. !

Tuesday, November 14, 2017

ठसका !

शी आई. किती उचकी लागली आहे बघ ना.

शी काय त्यात? पाणी पी थोडं. लगेच थांबेल मग उचकी.

आई, ते उचकीचं तू काय सांगितलं होतंस? मला कोणाची तरी आठवण येत असली की उचकी येते ना?

हाहाहाहा. नाही रे राजा. कोणीतरी तुझी आठवण काढत असेल तर मग तुला उचकी लागते.

अग आई, पण कळणार कसं कोण आठवण काढतंय, कोणामुळे उचकी लागली आहे ते?

तसं कळत नाही राजा. पण आपण एक गंमत करूया. आपण तुझे मित्र, भावंडं असं एकेक करत सगळ्यांची नावं घेत जाऊया. ज्याचं नाव घेतल्यावर तुझी उचकी थांबेल ती व्यक्ती तुझी आठवण काढत होती असं समजायचं. चालेल?

बापरे. एवढी नावं घेत बसू मी?

मग काय? त्यात काय झालं? नावं घेता घेता उचकी थांबेल की तुझी.

नाही हा. मुळीच नाही. मी नाही एवढ्या सगळ्यांची नावं घेत बसणार. मी फक्त एकाच फ्रेंडचं नाव घेणार आणि पुढे फक्त 'एट सेट्रा' म्हणणार !!!!

मातोश्रींना लागलेला ठसका अजूनही थांबलेला नाहीये !!!!

#आदि_व_इत्यादी

Saturday, November 11, 2017

शिका !

आज ण-कर्त्याचा वार असूनही आम्हाला भल्या पहाटे ८:३० ला उठायला लागलं होतं. पहिल्या टर्मचे पेपर्स, ओपन हाऊस वगैरे वगैरे असा भरगच्च कार्यक्रम होता चिरंजीवांच्या शाळेत. थाउजंड अवर्स उर्फ १०:०० ला पोचायचं होतं. शाळेच्या आणि एकंदरीतच भारतवर्षाच्या शैक्षणिक भवितव्याच्या नावाने कडाकडा बोटं मोडत आम्ही उठून तयार झालो. चिरंजीवही अमाप निरुत्साहात दिसत होते. पण त्याचं खरं कारण लवकर उठणं आणि शनिवार असूनही शाळेत जावं लागणं हे नसून काहीतरी वेगळंच होतं.

"बाबा, मी तुला आत्ताच सांगतोय. मी प्रणवशी अज्जिब्बात बोलणार नाहीये !!"

"प्रणवशी? अरे तो तर तुझा बेस्ट फ्रेन्डे ना? तुझ्या शेजारी बसायचं असतं म्हणून भांडतो तोच ना?"

"हो तोच. काल आम्ही शेजारी शेजारीच बसलो होतो"

थोडक्यात काल काहीतरी वाजलं असावं.

"मग तरी त्याच्याशी बोलणार नाहीस? भांडलात की काय?"

"नाही. काल त्याने माझं इरेजर घेतलं.......... आणि मग मी ते परत घेतलं "

"मग झालं की काम. भांडलात कशाला?"

"नाही अरे. मी माझंच इरेजर त्याच्याकडून परत घेतलं म्हणून तो आता माझ्याशी बोलत नाहीये. कट्टी घेतलीये. म्हणून मग मी पण त्याच्याशी कट्टी घेतली. आणि आता अर्जुन पण त्याच्याशी बोलत नाहीये."

"का? प्रणवने  अर्जुनचं पण धनुष्यबाण बीण घेतलं का? " विनोदाचा क्षीण प्रयत्न.

"काSSय? नाही अरे. मी बोलत नाही म्हणून मग अर्जुन पण बोलत नाहीये प्रणवशी" क्षणभर मी आमच्या कार्ट्याची लोकप्रियता विसरूनच गेलो होतो.

अरे असं करायचं नाही, भांडता काय लहान मुलांसारखे, सगळ्यांशी छान बोलायचं, खेळायचं अशा टायपातलं टिपिकल "पालकी" प्रवचन त्याला देण्याचा मी केलेला प्रयत्न त्याने तेवढ्याच निरुत्साहीपणे हाणून पाडला.

शार्प थाउजंड थर्टी अवर्सला आम्ही शाळेत पोचलो. वर्गात एन्ट्री करत असतानाच चिरंजीव हळूच एका मित्राला हाय करताना दिसले. थोडं पुढे पुढे गेल्यावर मी त्याला विचारलं,

"कोण होता रे?"

चिरंजीवांनी माझ्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केलं. मी पुन्हा एकदा विचारलं.

शेवटी अगदीच नाईलाज झाल्याने सगळी रहस्य ओकून टाकायला लागली असावीत असे भाव चेहऱ्यावर आणत चिरंजीव उत्तरले.

"प्रणव"

"अरे पण बोलत नव्हतात ना तुम्ही?" मी मुद्दाम जरा डिवचत विचारलं.

"अरे हो रे बाबा." अनावश्यक स्पष्टीकरण द्यावं लागतानाचा त्रासिकपणा स्वरात ओतप्रोत भरलेला होता.

"पण तो आता कट्टी विसरलाय.......... आणि म्हणून मी ही विसरलोय. आता बोलतोय आम्ही. बट्टी झालोय."

दाटून आलेलं आश्चर्य अतीव प्रयत्नपूर्वक लपवत मी मनातल्या मनात फेबुवर मारलेले ब्लॉक्स मोजायला लागलो.

शिका फेस'ब्युकी'यांनो शिका !!!

रक्तरंजित पुस्तकमाला : Cody Mcfadyen (Smoky Barrett Series)

Cody Mcfadyen या अमेरिकन लेखकाच्या Smoky Barrett सिरीज मध्ये ५ पुस्तकं आहेत .   1. Shadow Man   2. The Face of Death   3. The D...