Tuesday, August 23, 2011

सैतान (?? !!!!)

- अण्णा हजारेंचं आंदोलन म्हणजे सगळा चुकीचा प्रकार आहे.

- सगळा सावळा गोंधळ आहे नुसता. कोणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.

- जे चाललंय ते सगळं चुकीचं चाललंय.

- अण्णांना पाठींबा देण्यासाठी गर्दी करणाऱ्यांपैकी किती जणांना लोकपाल म्हणजे काय हे माहिती आहे?

- आणि समजा लोकपाल विधेयक आलं तर काय दुसऱ्या दिवसापासून भ्रष्टाचार बंद होणार आहे का?

- आंदोलनं अशी एसएमएस पाठवून आणि "मी अण्णा आहे" च्या टोप्या घालून मिरवून यशस्वी झाली असती तर काय हवं होतं !!

- अण्णांना मिडियाने हिरो केलंय बाकी काही नाही.

- या आंदोलनाला काही दिशा नाही की कसलं प्लानिंग नाही.

- क्रांती अशी पंधरा दिवसांत होत नाही !!

- अण्णा स्वतःचा वैयक्तिक अजेंडा राबवताहेत.

- बेदी आणि केजरीवाल स्वतःचे वैयक्तिक अजेंडे राबवताहेत

- अण्णांच्या आंदोलनामागे कोणाचे आणि काय छुपे उद्देश आहेत हे तिथे येऊन त्यांना पाठींबा देणाऱ्या एकाला तरी माहिती आहे का?

- अण्णांच्या जुन्या आंदोलनांमधले कुठलेही सहकारी त्यांच्या या आत्ताच्या आंदोलनामध्ये अण्णांबरोबर का नाहीयेत?

- अण्णा हे स्वतःचंच म्हणणं खरं करणारे आणि हट्टी आहेत.

- आंदोलनाला पाठींबा देणाऱ्या किती जणांनी आत्तापर्यंत कधीच लाच दिलेली नाहीये?

- या आंदोलनात गरीबांचा सहभाग अजिबात नाहीये.

- हे आंदोलन म्हणजे जनतेच्या डोळ्यात पद्धतशीरपणे धूळफेक करण्याचा प्रयत्न आहे.

- हे आंदोलन केजरीवाल आणि बेदींनी हायजॅक केलंय आणि ते म्हणतील तसेच निर्णय घेतले जातायत.

- अण्णांचे उद्देश कदाचित योग्य असतीलही पण मार्ग मात्र साफ चुकलाय.

- अण्णा उपोषणाच्या धमक्या देऊन सरकारला वेठीला धरू पहातायत जे साफ चूक आहे.

- सरकार थोडं झुकायला तयार आहे मग अण्णांनीही थोडं नरमाईने घ्यायला हवं.

- अण्णांनी पूर्वीची उपोषणं इलेक्ट्रॉलची पावडर घेऊन केली आहेत म्हणे. (अशा पावडरी घेऊन तर मीही उपोषण करू शकेन आणि तेही वर्षभर)

- अण्णा वाटाघाटीत लगेच नमतात हा पूर्वेतिहास आहे.

इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी.. इत्यादी..


-----------------------------------------------------

जुलुमी इंग्रजी सत्तेचा बिमोड करून भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मला प्रसंगी सैतानाची मदत घ्यावी लागली तरी ती मी घेईन आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देईन.

- नेताजी सुभाषचंद्र बोस

-----------------------------------------------------

अण्णा कदाचित हट्टी आणि दुराग्रही असतीलही, कदाचित त्यांचा मार्ग चुकला असेल, कदाचित त्यांचं आंदोलन मिडिया आणि विरोधी पक्षांनी मॅनेज केलं असेल किंवा हे एवढेच नाही तर वर लिहिलेले सगळे मुद्दे आणि अण्णांवर केले गेलेले सगळे आरोप खरे असतीलही पण तरीही... हो हो तरीही माझा अण्णांना संपूर्ण पाठींबा आहे. कारण त्यानिमित्ताने का होईना सामान्य माणूस रस्त्यावर उतरला, कुठल्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय एकत्र आला, आपण कितीही आणि कितीही करोडोंचे घोटाळे करू शकतो आणि फसव्या कमिट्या नेमून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू शकतो या कॉंग्रेस सरकारच्या अपसमजाला जनतेने अजाणतेपणे आणि न ठरवता का होईना धक्का दिला, सरकारला अक्षरशः उघडं पाडलं, त्यांना पळताभुई थोडी केली, (सोनिया नावाचा) रिमोट कंट्रोल नसेल तर जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राचं सरकार चालवणाऱ्या मुठभर तथाकथित बुद्धिवादी राजकारण्यांची कशी तारांबळ उडते याचं भयानक आणि वास्तव चित्र अण्णांना पाठींबा न देणाऱ्या 'इंटरनेट इंटलेक्च्युअल्स' समोर मांडलं !!!!

आणि हे सगळं बघताना मला वैयक्तिक आनंद होतोय.... अगदी आसुरी आनंद.. कितीही घोटाळे केले तरी घोटाळेबाज मंत्र्यांच्या केसांनाही धक्का न लावणाऱ्या सरकारची अशी गलितगात्र अवस्था बघून मला खरंच भयानक राक्षसी आनंद होतोय.. एक सूड घेतल्याचा आनंद मिळतोय. म्हणून म्हटलं भलेही लोकपाल विधेयक आल्याने किंवा हे अशा प्रकारचं आंदोलन केल्याने भ्रष्टाचार नाहीसा झाला नाही तरी चालेल पण सरकारची पाचर मारता येऊ शकते, भ्रष्टाचाराने पिचलेली जनता सरकारच्या अवघड जागचं दुखणं ठरू शकते ही कल्पनाच कसली सुखावह आहे !!! राहुल, मनमोहन, चिद्या, अहमद, अँटोनी यांच्या साल्या रातीच्या निंदा (झोपा हो) हराम झाल्यात, सगळे एकजात पायात शेपूट घालून अण्णांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या तंबूचे उंबरठे झिजवताहेत ही वस्तुस्थिती अपार सुख देणारी आहे. हर्शोन्मादात चिंब भिजवणारी आहे.

साला पुढचा भ्रष्टाचार करताना, घोटाळे करताना, ते निर्लज्जपणे दाबून टाकताना, कोणाच्या बापाची भीती नसल्यागत बेलगामपणे हिंडणाऱ्या पांढऱ्या कपड्यातल्या डुकरांना क्षणभर जरी अण्णांची, या आंदोलनाची, विशाल जनसमुदायाची आठवण झाली आणि त्या दहशतीने पुढच्या घोटाळ्यांची साईज पाच टक्क्यांनी जरी कमी झाली तरी माझ्या दृष्टीने ते प्रचंड मोठं यश आहे. आणि त्यासाठी सुभाषबाबू म्हणतात त्याप्रमाणे सैतानाची, राक्षसाची मदत घ्यावी लागली तरी माझी हरकत नाही. माझा त्यांना पाठींबाच असेल !!!

Monday, August 8, 2011

तिसरा

काल ना आम्ही त्या चित्रांच्या दुकानात गेलो होतो. बाबाला उशीर झाला यायला. तो ना असलाच आहे. नेहमीच उशीर करतो कुठेही यायला. आणि मग नेहमीच मला त्याचा राग येतो. पण काल नाही आला. कारण त्या दुकानातली ती मस्त मस्त चित्रं बघण्यात वेळ कसा गेला कळलंच नाही. मी खूप चित्रं बघितली पण मला सगळ्यात आवडलं ते एका छान छोटुल्या चिंटुकलीचं चित्र. काय बरं म्हणाली आई?? पो स ट र.. हां.. असंच काहीतरी.. तर ना त्या चिंटुकलीचे ना डोळे मोठ्ठे होते एकदम आणि टकलूही होती ती.. आणि गुलाबी गाल होते आणि तेही एवढे मोठे नि गुबगुबीत की आता खालीच पडतात की काय असं वाटत होतं. आई म्हणाली की मीही अशीच टकलू होते म्हणून. मग आम्ही दोघी खूप हसलो.

मी आईला म्हटलं की आपण हेच चित्र घ्यायचं विकत. आई काही बोललीच नाही. मला वाटलं तिला ऐकू आलं नसणार म्हणून मी पुन्हा सांगणार होते पण मग तेवढ्यात मला चिप्रा म्हणते ते आठवलं. चिप्रा म्हणते मोठ्या लोकांना आपल्या म्हणण्याकडे दुर्लच्च करायचं असलं की ते असं न ऐकल्यासारखं दाखवतात. तेवढ्यात बाबा आला. मग मी बाबालाही म्हंटलं की आपण या छोटुल्या चिंटुकलीचंच चित्र विकत घेऊ. तर बाबा एकदम चिडलाच. आई म्हणते तसं तो ऑफिसमधल्या कामामुळे चिडचिड करतोय असं मला वाटल्याने मी गप्प बसले. मग जरा वेळाने पुन्हा एकदा त्याला तेच चित्र घेण्याचा हट्ट केला तर एकदम मला म्हणाला कसले ग अभद्र हट्ट करतेस. मला अभद्रचा अर्थ कळलाच नाही. उद्या चिप्रालाच विचारावा लागणार. पण बाबा ओरडून म्हणाला त्याअर्थी काही चांगला अर्थ नसणार हे नक्की.

शेवटी आम्ही एका निळी टोपी घातलेल्या गुबगुबीत बाळाचं चित्र घेऊन घरी आलो.

***

चिप्रा माझी खूप चांगली मैत्रीण आहे पण मला कधीकधी मात्र तिचा खुपच राग येतो. आज शाळेत तिला अभद्रचा अर्थ विचारला तर फिस्सकन हसली त्या घाटपांडे आजींच्या मांजरीसारखी. पण नंतर लगेच अर्थ सांगितलाही. म्हंटलं ना मी ती चांगली मुलगी आहे आणि माझी चांगली मैत्रीणही आहे पण कधी कधी मात्र रागच येतो. अतीच आगाऊपणा करते कधीकधी.. शेता म्हणते की चिप्राला तो लहान भाऊ आहे ना म्हणून जास्त आगाऊपणा करते. पण त्याचा अर्थ मला तरी कळला नाही. तसं तर त्या भावीलाही आहे की लहान बहिण पण ती कुठे असा शहाणपणा करते.. शेताचं आपलं काहीतरीच.

***

"काय बघत्येस? शाळेत नाही का जायचं? उशीर होतोय. आत्ता दहा मिनिटांत येईल स्कूल बस.. आवर ग पटपट.."

खरं तर मला ती गुलाबी चिंटुकली खूप आवडली होती पण आता हे निळी टोपीवालं गुबगुबीत बाळही हळूहळू आवडायला लागलंय. नुसतं त्याच्याकडे बघत रहावसं वाटतं. चिंटुकलीएवढे नसले तरी त्याचेही गाल मस्त गुबगुबीत आहेत. आवडले मला.

"अग जेमतेम सहा वर्षांची तू आणि आरसे कसले बघतेस? आवर ग बाळा फटफट. बस येईल आता"

ही आई पण ना मॅडकॅपच आहे. मी त्या गुबगुबीत चिंटूच्या चित्राकडे बघतेय तर हिला वाटतंय आरश्यात बघतेय. पण मी काही बोललेच नाही. कारण मग ती पुन्हा मलाच ओरडली असती आणि मग पुन्हा तिची ती डोकेदुखी, उलट्या वगैरे सुरु झालं असतं... शी.. त्यापेक्षा नकोच ते... म्हणून मग मी पुन्हा एकदा हळूच त्या चिंटूला टाटा केला आणि लगेच बुट घालायला घेतले.

***

माझा हात पुरत नव्हता म्हणून मग आजीने मला उचलून घेतलं आणि घंटा वाजवायला दिली. चिप्राची आजी खूप छान आहे. नेहमी छान हसत असते बोलताना. आज आईला बरं नव्हतं आणि बाबाला उशीर होणार होता. मला तर घरात बसून अस्सा कंटाळा यायला लागला होता ना. तेवढ्यात चिप्रा आली विचारायला की देवळात येतेस का म्हणून. मी तर काय लगेच तयार झाले. चिप्राची आजी बरोबर येणार होती म्हणून मग आईनेही मला पाठवायला जास्त कटकट केली नाही.

नंतर आजीने चिप्रालाही उचलून घेतलं आणि घंटा वाजवायला दिली. मग आम्ही गणपती बाप्पाला नमस्कार केला आणि प्रदच्चिणा घातली.

मग मी आई म्हणते तशी मला चांगली बुद्धी दे असं बाप्पाला सांगितलं. आणि मग हळूच आईला आणि बाबालाही चांगली बुद्धी दे असंही सांगितलं. ते नेहमी मलाच मागायला सांगतात स्वतःसाठी मागतच नाहीत. म्हणून मी ते नसतात तेव्हा हळूच त्यांच्यासाठीही चांगली बुद्धी मागून घेते. बाप्पा ऐकतो की नाही माहित नाही. नसावा ऐकत.

मग मी हळूच ती गुलाबी गालांची चिंटुकली आमच्या घरात येउदे असंही मागितलं. आणि नंतर चिप्रासारखाच मलाही लहान भाऊ दे असंही मागितलं. बरंय चिप्राचा आगाऊपणा तरी जरा कमी होईल.

***

आज आमच्या शाळेत कसलीतरी मोठ्या लोकांची मिन्टीग होती. त्यामुळे शाळा चक्क मधल्या सुट्टीतच सोडून दिली आणि प्रत्येकाला अगदी घरापर्यंत स्कूलबसने सोडलं. नेहमीसारखं त्या जवळच्या चौकात नाही. त्यामुळे मजा आली. दार वाजवलं तर चक्क चक्क बाबाने दार उघडलं. बाSSS बाSSS ?? आज लवकर घरी? मला खूप मस्त वाटलं एकदम. आज त्याचे डोळे लालही नव्हते. संध्याकाळी बाग आणि मग भेळपुरी असं काय काय ठरवायला लागले मी मनातल्या मनात. तेवढ्यात माझं समोर लक्ष गेलं. एक आजोबा बसले होते समोर. म्हणजे खूप म्हातारे नव्हते. पण टक्कल होतं. पांढरा झब्बा आणि लेंगा घातला होता आणि कपाळाला मोठा अंगारा... उमम्म.. अंगारा नाही गंध गंध.. आजीने सांगितलाय मला गंध आणि अंगार्‍यातला फरक.

"बेटा, हे आहेत अण्णा महाराज.. यांना नमस्कार कर बरं" बाबा म्हणाला.

मी नमस्कार केल्यावर त्यांनी मला जवळ घेतलं आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला. आणि माझ्या कपाळाला त्यांनी लावलेलं तसंच गंधही लावलं. आई, बाबा आणि आजी तिघांच्याही कपाळाला असंच गंध होतं. आत्ता लक्ष गेलं माझं. मग आई मला किचनमधे घेऊन गेली आणि चिवडा आणि बिस्किटं खायला दिली आणि मी लवकर कशी आले हे ही विचारलं. मग मी ते मिन्टीगचं तिला सांगितलं.. ती फक्त हम्म म्हणाली. चिवडा खाऊन झाल्यावर मी बाहेर आले तर बाबा म्हणाला की तू चिप्राकडे जा खेळायला. मला मुळीच जायचं नव्हतं तिच्याकडे. मी फक्त आईकडे बघितलं. मग आई म्हणाली की राहुदे. तिला खेळूदे बेडरूममधे.. बाबा खरं तर तयारच नव्हता मग त्या महाराजांनी हसून फक्त हातानेच "चालेल" अशी खुण केली. मग मी बेडरूममधे जाऊन एकटीच भातुकली खेळत बसले. आधी आवडले नव्हते ते महाराज पण त्यांच्यामुळे मला चिप्राकडे जायला लागलं नाही त्यामुळे बरं वाटलं.

बाबा चक्क कोणाचंतरी ऐकतोय हे पाहून तर मला एकदम मज्जा वाटली.

***

आधी तर मला हसायलाच आलं होतं. ही चिप्रा ना कधीकधी ज्याम मॅडकॅपसारखी बोलते. आधी म्हणाली अपत्य म्हणजे संकट. मला तरी काही ते पटलं नाही. मी तिला म्हंटलंही की अग अपत्य म्हणजे संकट कसं असेल? तिला पटेना म्हणून मग ते महाराज आजोबा म्हणाले ते तिला पुन्हा सांगितलं. तिसरं अपत्य मुलगा... आता अपत्य म्हणजे संकट असेल तर "तिसरं संकट मुलगा" असं होतं ना.. आणि ते महाराज आजोबा असं काहीतरी कशाला बरं बोलतील? अर्थ काय त्या वाक्याचा? तर ती म्हणाली की तू आतमधे होतीस तुला नीट ऐकू आलं नसेल. मी तिला पुन्हा एकदा सांगितलं की मी मला सगळं नीट ऐकू नाही आलं कबुल.. पण तिसरं अपत्य मुलगा हे तीन शब्द मात्र मी नक्की ऐकले. पण तरीही तिचं पादुपल चालूच.. मग जरा वेळ थांबली आणि मग मात्र एकदम जीभ चावून पटकन म्हणाली की अग नाही.. आत्ता आठवलं. संकट म्हणजे अपत्य नाही संकट म्हणजे आपत्ती.. तिच्या पपांनी एकदा बातम्या बघताना सांगितलं होतं म्हणाली. पण अपत्य म्हणजे नक्की काय हे तिलाही माहीत नव्हतं. तिलाही माहित नसणार हे मला माहित होतंच. माहित नाहीये तर सरळ कबुल करायचं ना पण आगाऊपणा करण्याची सवय..

नंतर स्वतःच विचारायला लागली की म्हणे नक्की काय बोलत होते ग ते महाराज आजोबा? काय अर्थ असेल त्याचा? तू अजून काही ऐकलंस का?..... आता हिला खरं तर काय गरज आहे मध्ये मध्ये नाक खुपसायची... त्यामुळे मी ऐकलं होतं तरी मी सरळ नाही म्हणाले. तरीही ती मागे लागली तेव्हा मग मीही जास्त नाटकं न करता जे मी अजून ऐकलं होतं तेही तिला सांगितलं. अगदी नक्की ना? खरं ना? असं कायतरी बाबा आणि आजी विचारत होते ते तिला सांगितलं. आजोबा महाराजांचं अस्पष्ट ऐकू आलेलं बोलणंही सांगितलं.. माझ्यावर विश्वास नाही का?.... आणि सहा आठवडे म्हणजे तर काहीच पॉबेम नाही. घाबरू नका... पुढचा तीन नंबरचा....

मला माहिती होतं तसंच झालं. तिलाही यातल्या एकाही शब्दाचा अर्थ माहित नव्हता. हां तसं म्हणजे आमच्या वर्गात एक नेहा विश्वास परब नावाची मुलगी आहे त्यामुळे विश्वास हे नाव आहे एवढं आम्हाला माहित होतं. कदाचित महाराज आजोबांचं खरं नाव विश्वास असेल. पण ते पॉबेम म्हणजे काय हे तर आम्हाला दोघींनाही काहीच कळलं नाही. तो शब्द तसा ऐकला होता मी. पण बाबा वैतागला असला की तो शब्द वापरतो पण त्यावेळी त्याला त्याचा अर्थ विचारायचा म्हणजे संपलंच...

***

आज बरोब्बर चौथा दिवस. घरात कोणीच कोणाशी बोलत नाहीये. निदान आई तरी कोणाशीच नाही बोलते.. सारखी बेडरूममधे बसून आहे. काल तर चक्क डोळे पुसत होती. मी बघितलं एकदा. जाऊन विचारलंही की काय होतंय? तर म्हणाली की काही नाही. असंच थोडं पोटात दुखतंय. पण बरोबरे.. मलाही एकदा पोटात दुखत होतं ना तर तेव्हा मी खूप रडले होते. रात्री आई आणि आजीने रव्याने की ओव्याने कशाने तरी पोट शेकल्यावर थोडं बरं वाटलं होतं. म्हणून मग मी आईला विचारलं सुद्धा की आपण रव्याने तुझं पोट शेकुया का? तर किंचित हसली आणि नाही म्हणाली. काय झालंय आईला कळत नाही. खरं तर गेले चार दिवस तिची तब्येत बरी आहे. उलट्या नाही, डोकं दुखत नाहीये. पण तरीही झोपून आहे. कशामुळे पोट दुखतंय काय माहित. बाबा तर अजूनच उशिरा आला आज. नेहमीपेक्षाही खूप. आजीशी काहीतरी हळू आवाजात बोलला. आई झोपलेलीच होती. आणि आईच्या बाजूला मी. तो बाहेर टीव्ही लावून बसला.

पहिल्या दिवशी शाळा बुडवताना मज्जा आली एकदम. पण आता चार दिवस घरात बसून मला कंटाळा आलाय. परवा आईला डॉक्टरकाकांकडे जायचं होतं. कुठेतरी लांब आहे त्यांचा दवाखाना. खूप वेळ लागणार होता तपासायला. म्हणून मग माझी तयारी करायला, मला डबा द्यायला कोणालाच वेळ नव्हता. म्हणून मग मला दांडी मारायला मिळाली. आई आली ती थेट संध्याकाळी.. आणि चक्क बाबाही होता तिच्याबरोबर. सकाळी जाताना तर एकटीच गेली होती. तर तेव्हा आली आणि जी बेडरूममधे जाऊन झोपली ती झोपलीच. अशीच वागतेय. आणि मला मात्र कधी एखाद्या दिवशी जरा लोळायचं असलं किंवा उशिरा उठायचं असलं की मला मात्र लगेच आळशी म्हणून मोकळे हे लोक. आता कोण आळशीपणा करतंय बघा..

आठ दिवसांनी शाळेत गेले तरी मला कोणी काही म्हणालं नाही की कुठल्या बाई काही ओरडल्या नाहीत. बाबा आला होता सोडायला. तो मुख्यबाईंशीही बोलला काहीतरी.

***

हळूहळू आईला बरं वाटलं. बेडरूममधून बाहेरही पडली एकदाची. आईला किचनमधे बघून बरं वाटलं. आजी तर म्हणतेच की.. की बाईची जागा सैपाकघरात. आजी म्हणते ते अगदी खरं आहे. मलाही पटलं ते. कारण त्या बेडरूममधून बाहेर पडल्यापासून आई पुन्हा नेहमीप्रमाणे माझी तयारी करायला लागली, मला आंघोळ घालायला लागली, माझी पोनी घालायला लागली, मला डबा द्यायला लागली. तिमाही परीक्षेच्यानंतरचे ते चार दिवस सोडले तर आत्तापर्यंत म्हणजे वार्षिक परीक्षेपर्यंत मी एकही दांडी मारली नाहीये. चिप्राने तीनदा मारली आणि भावीने तर चारदा. आता मी महिनाभर मीनामावशीकडे जाणार आहे राहायला. औरंगाबादला. मीनामावशी, श्रीकाका दोघेही एकदम मस्त आहेत. आणि भक्की तर माझी एकदम चांगली बहिण आहे. नाही बहिण नाही.. मैत्रीण मैत्रीण.. बहिण नाही आवडत मला. मैत्रीणच. मी आणि भक्की आता खूप खेळणार.. त्यांच्याकडे जम्पी आहे. मस्त घरभर धावत असतो, उड्या मारत असतो. हातातलं बिस्कीट ओढून घेतो आणि मटकन खाऊन टाकतो आणि मग हळूच हात चाटतो. भक्की, जम्पी आणि मी.. एकदम मज्जा..

***

मला वाटतं माझ्या आईइतकं कोणपण आजारी पडत नसेल. सारखं डॉक्टर डॉक्टर.. आज पुन्हा जायचं आहे डॉक्टरांकडे.. मला भीती वाटतेय की पुन्हा गेल्या वर्षीसारखी सलग आठ दिवस हे लोक माझी शाळा बुडवतात की काय.

पण आज गंमतच झाली. आज मी शाळेतून घरी आले तेव्हा आई-बाबा अजून डॉक्टरांकडून यायचे होते. मला वाटलं आल्यावर आई आता पुन्हा बेडरूममधे झोपून राहणार. पण उलटंच झालं. आई-बाबा आले ते हसतहसतच. बाबाच्या हातात पेढ्यांचा पुडा होता. तोंड गोड करायला आणलेत असं म्हणत होता तो. आजीसुद्धा एकदम खुश होती. आईही हसत होती थोडी पण नीट कळत नव्हतं तिचं वागणं. मला ना आई आणि चिप्रा शेम वाटतात कधीकधी. कधी नीट वागतात तर कधी एकदम वेगळ्या. चिप्रा हुशार पण आहे आणि येड्चाप पण.. आईही कधी कधी येड्चाप सारखीच वागते म्हणा. आत्ताच बघा ना. मध्येच हसतेय. मध्येच एकदम शांत होतेय. आजीने मला पेढा भरवला आणि मग आई-बाबांच्या खोलीत जाऊन त्या निळी टोपीवाल्या बाळाच्या चित्राचे खूप पापे घ्यायला लागली.

बाबाने पटकन फोन केला आणि कोणाशीतरी काहीतरी बोलला. फोन ठेवल्यावर म्हणाला उद्या येतायत.

***

दुसऱ्या दिवशी मी सकाळी लवकर उठले तर बाबा म्हणाला की आज शाळेत जायचं नाहीये. मी काही बोललेच नाही कारण का विचारलं तरी कोणी काही सांगतच नाही आमच्या घरात. बाबाही आज ऑफिसला जाणार नव्हता बहुतेक. सगळे आंघोळी करून, नवीन कपडे घालून बसले. कोणाची तरी वाट बघत होते बहुतेक. आजीची दुपारची सिरीयल सुरु होणार तेवढ्यात बेल वाजली. बाबाने धावत जाऊन दार उघडलं आणि एकदम आडवाच पडला. मला तर काय कळलंच नाही काय झालं. बघते तर दारात ते महाराज आजोबा आणि ते आत येतायत न् येतायत तोवर बाबाने त्यांना साशांग नमस्कार घातलेला. आजीनेही तसंच केलं. बाबाने आईला खुण केली. आईनेही नमस्कार केला आणि मलाही करायला लावला. महाराज आजोबा सोफ्यावर बसले आणि आम्ही सगळे खाली. गेल्यावेळसारखं आज मला या लोकांनी बेडरूममधेही पाठवलं नाही. पण मला तिकडे बसायचा जाम कंटाळा आला होता म्हणून मग मी मांडीवर बार्बी घेऊन तिला झोपवायला लागले.

बाबा सारखा चमत्कार झाला असं काहीतरी म्हणत होता. सारखा आजोबांच्या पाया पडत होता. आणि आजीच्या तर डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. हे मोठे लोक नक्की कशासाठी रडतात तेच मला कळत नाही.

बाबा पुन्हा म्हणाला.. महाराज तुम्ही नसतात तर आमचं काही खरं नव्हतं. या एवढ्या मआगाईच्या ज्यमान्यात तीन मुलं सांभाळणं आम्हाला या जनमी तरी शक्य झालं नसतं. तुमच्या अचूक भविच्य आणि माग्रदरशनाची साथ मिळाली नसती तर काही हा पेढा आमच्या नशिबात नव्हता....


==========================
सत्यघटनेवर आधारित.. (दुर्दैवाने) !!!!!

रक्तरंजित पुस्तकमाला : Cody Mcfadyen (Smoky Barrett Series)

Cody Mcfadyen या अमेरिकन लेखकाच्या Smoky Barrett सिरीज मध्ये ५ पुस्तकं आहेत .   1. Shadow Man   2. The Face of Death   3. The D...