Sunday, February 28, 2010

किस्से होळीचे !!!

आता 'किस्से होळीचे' नाव दिलं असलं तरी किस्से आहेत ते धुळवडीचेच. पण 'किस्से धुळवडीचे' किंवा 'किस्से धुलीवंदनाचे' (आणि रंगपंचमी तर आठवडाभराने येते तेव्हा रंग, पाणी, उत्साह आणि त्यामुळे किस्से असं सगळंच संपलेलं असतं) हे 'किस्से होळीचे' इतकं ग्लॅमरस वाटत नाही हे तुम्हालाही पटेल. आणि तसंही आमच्या होळीचे 'बोंबा, गरम खोबरं, पुरणपोळ्या' याच्या पलीकडे काही विशेष किस्से नाहीयेत. त्यामुळे कितीही 'किस्से होळीचे' असं म्हंटलं तरी हे किस्से खरे धुळवडीचेच...

किस्सा क्र. १. 

तुमच्या तोंडावर कधी चिखलाचा फुगा येऊन फुटलाय? आणि तेही रंग खेळायला सुरुवात केल्या केल्या?? आता अशा प्रकारचे प्रश्न हे जेव्हा आपण त्या प्रसंगात हिरो (या चिखलाच्या प्रसंगात जोकर) असतो अशा वेळी विचारायची पद्धत आहे. उदा तुम्ही कधी सचिनबरोबर डिनर केलं आहेत? किंवा हरिश्चंद्रगड मध्यरात्री चढला आहात? किंवा असं काहीतरी. तर या प्रस्तावानेनंतर चाणाक्ष वाचकांच्या हे लक्षात आलंच असेल की सदर प्रसंगात हा चिखलाचा फुगा माझ्या चेह-यावर फुटलेला नाही. आणि अर्थात त्यामुळेच माझ्या दृष्टीने तो सगळ्यांना रंगवून सांगण्याचा एक किस्सा आहे. 
मी साधारण सहावी/सातवीत असतानाचा प्रसंग आहे. आम्ही नवीन सोसायटीत शिफ्ट झालो होतो. बिल्डिंग नवीन, लोक नवीन आणि पहिलीच होळी त्यामुळे जरा जास्तच उत्साह होता सगळ्यांचा. तर खेळायला सुरुवात करताना सगळेजण गोल करून उभे राहून, पिचका-या वरच्या दिशेला धरून सगळ्यांनी एकदम पाणी उडवायचं आणि सुरुवात करायची अशा टिपिकल फिल्मी स्टायलीच्या होळीची कल्पना एकाच्या सुपिक मेंदूतून निघाली. कोणाला विशेष आवडली नसली तरी नवीन मित्र, पहिली होळी म्हणून कोणी विरोध केला नाही. तर आम्ही सगळेजण गोल करून, पिचका-या वर धरून ('होळी रे होळी' हे तेव्हा जाम डाऊनमार्केट वाटत असल्याने) 'होली है' असं चित्कारायला आणि वरून एक चिखलाने भरलेला मोठ्ठा फुगा त्या सुपिक मेंदूच्या मालकाच्या डोक्यावर येऊन आदळायला एकच गाठ पडली. त्याला आणि आम्हाला कोणालाच क्षणभर काहीच कळलं नाही. आणि कळलं तेव्हा येत हसलेलं हसू दाबून त्याचा (बघवत नसलेला) चेहरा बघून जो तो एकमेकाच्या चेह-यावर पिचकारी उडवून त्याआडून त्या दाबून ठेवलेल्या हसण्याला वाट मोकळी करून देत होता. त्याचं झालं असं की आमच्या बिल्डिंगच्या शेजारी एक छोटी झोपडपट्टी होती. त्यातल्या काही पोरांनी बहुतेक हे आमचे फिल्मी स्टाईल होळीचे उद्योग बघितले असावेत आणि त्या फिल्मी होळीतल्या व्हिलनची उणीव भरून काढण्याची त्यांना हुक्की आली असावी. जे काय असेल ते पण तो किस्सा सॉलिड लक्षात राहिला.

किस्सा क्र. २.

एका धुळवडीच्या दिवशी आईने सांगितलं की त्यांच्या लहानपणी जेव्हा ते रंगपंचमी खेळायचे तेव्हा आत्तासारखे रंगांनी खेळत नसत. तर फक्त होळीच्या राखेने आणि पाण्यानेच खेळण्याची पद्धत होती. ती होळीच्या राखेने खेळायची कल्पना इतकी सही वाटली आम्हाला की आम्ही पण ठरवलं की यावर्षी आपण खेळण्याची निदान सुरुवात तरी होळीच्या राखेने करायची. नंतर आहेतच आपले नेहमीचे रंग. तर आम्ही सगळेजण गेलो होळीच्या इथे आणि यावेळी मी आपल्या सुपिक मेंदूचा वापर (न) करत एका लाकडाखालची राख घेण्यासाठी ते लाकूड बाजूला करण्यासाठी हातात उचललं. and that's it. done deal. खल्लास. 'वरून कडक मात्र आत गोड पाणी' वाल्या नारळाच्या किंवा 'बाहेरून काटे आणि आत गरे' वाल्या फणसाच्या अगदी उलट म्हणजे बाहेरून दिसायला गार पण आतून मात्र 'इंतकामच्या' आगीने धगधगणा-या लाकडाने मला असा काही चटका दिला की त्यानंतर होळीच्या लाकडाची राख हा पर्याय कितीही डॅशिंग वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी बाजारात मिळणा-या (अनैसर्गिक आणि केमिकलमिश्रित) रंगांशी सदैव एकनिष्ठ राहिलो. 

किस्सा क्र. ३.

आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप डोंबिवलीभर पसरलेला असल्याने साधारणत: एका एरियातले सगळेजण एकत्र भेटत आणि असे छोटे छोटे ग्रुप पुढे जात जात एकमेकांना भेटत. तर एकदा असेच आमच्या एरियातले आम्ही ५-६ जण एकमेकांना भेटलो आणि पुढच्या ग्रुपला भेटायला म्हणून एका मैत्रिणीच्या घराच्या दिशेने चालायला लागलो. तिच्या घराच्या आसपास पोचल्यावर लांबूनच आम्हाला तिच्या बिल्डिंगखाली एक खूप मोठ्ठा, चित्रविचित्र रंगलेला, आरडाओरडा करत खिदळणारा ग्रुप दिसला. ते प्रकरण काहीतरी विचित्र वाटत असल्याने आम्ही तिच्या बिल्डिंगच्या जास्त जवळ न जाता लांबच उभे राहून तो मोठ्ठा ग्रुप गेला की मग तिकडे जाऊ असं ठरवलं. पण बराच वेळ झाला तरी तो ग्रुप काही निघेना आणि शेवटी कंटाळून आणि जरा वेळाने नीट निरखून बघितल्यावर आम्हाला एक चेहरा ओळखीचा वाटला. बघितलं तर ती आमच्याच ग्रुपमधली एकजण होती. असं करत करत एकेक चेहरा ओळखीचा  दिसायला लागला आणि नंतर आम्हाला कळलं की हा (लोकांच्या दृष्टीने धांगडधिंगा, आरडाओरडा करणारा) मवाली (वाटणारा) ग्रुप म्हणजे आमचाच ग्रुप होता. तेव्हापासून धुळवडीच्या दिवशी माखलेले चेहरे घेऊन रस्त्याने हिंडणा-या कुठल्याही ग्रुपला आम्ही कधीही नावं ठेवली नाहीत.

किस्सा क्र. ४.

मी काही झालं तरी धुळवडीच्या दिवशी कधीही ऑफिसला जात नसे. कसंही करून शिफ्ट अॅडजस्ट करून किंवा एक्स्ट्रॉ शिफ्ट करून किंवा दुसरं काहीतरी सेटिंग करून मी घरी असायचोच त्या दिवशी. पण एकदा काय झालं की एक नवीन बॉस आला होता आणि नवीन आणि फक्त त्यामुळेच कडक असल्याने तो यातलं काहीही करायला देणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. आणि फक्त धुळवडीसाठी ऑफिसला दांडी मारतोय असं सांगणं म्हणजे तेच रंग वार्षिक अप्प्रायझल मध्ये अधिक तेजस्वीपणे चमकावणं असं होतं याची मला पूर्ण कल्पना असल्याने मी सरळ त्यादिवशी सकाळी फोन करून मी आजारी आहे आणि खूप ताप आला आहे असं ठोकून दिलं. झालं... नेहमीप्रमाणे ६-७ तास खेळून झाल्यावर घरी आलो आणि आंघोळ करून बाहेर आलो आणि बघतो तर काय चेह-यावरचा, कानामागचा, नखांमधला रंग जसाच्या तसा. पुन्हा आंघोळ केली तरी तेच. इतका प्रयत्न करूनही रंग निघत नाही हे बघून ऑफिसमध्ये दुस-या दिवशी होऊ घातलेला तमाशा आणि अप्प्रायझलवरची रंगरंगोटी माझ्या डोळ्यासमोर माझ्याच नावाने होळीच्या बोंबा मारत फेर धरून नाचायला लागली. आणि ते सगळं टाळण्यासाठी उरलेला सगळा दिवस हात आणि चेहरा हे साबण, रॉकेल, पेट्रोल, डीटर्जंट आणि अशा कुठल्या कुठल्या अगम्य आणि भयंकर पदार्थांनी धुण्यात घालवला. होता होता बराचसा रंग गेला आणि नखांत उरलेला थोडासा रंग म्हणजे मित्रांनी जबरदस्तीने लावलेला रंग  आहे अशी थाप क्र. २ मी दुस-या दिवशी बॉसच्या गळ्यात अडकवण्यात यशस्वी झालो.

किस्सा क्र. ५.

फिरंगी देश, अडीच दिवस सतत पडलेला स्नो, रस्त्याने चालताना दुतर्फा बर्फाचे डोंगर, या सगळ्यात जुनी लाडकी होलिकामाय कधी लोप पावली कळलंही नाही. घरात पुरणपोळीचा बेत तर आहेच पण रंगरंगोटी राहून गेली.

किस्सा क्र. ६. 

"बाबा बायेल ये.... पतकिनी.... आं आं ऊ.... लागलंय बग माज्या पायाला कायतली" .. मी धावत बाहेर येतो, खाली वाकतो आणि त्याच क्षणी त्याच्या पिचकारीतलं पाणी थेट माझ्या नाकपुड्यांत आणि तोंडात. तो हसतो, टाळ्या पिटतो आणि त्याच्या आजूबाजूचेही टाळ्या पिटतात. तेच ते सगळे चित्रविचित्र रंगांनी माखलेले, आरडाओरडा करत खिदळणारे !!!

Wednesday, February 24, 2010

३३ कोटी + १आज मला देव (इथे प्रोजेक्ट मॅनेजर, क्लायंट असलं काही दिसत असेल तर दोष तुमच्या नजरेचा आहे आणि सचिन दिसत असेल तर तुम्हीही आमच्यातलेच आहात. वेलकम टू द क्लब !!) प्रसन्न झाला आणि माझ्यापुढे प्रकट होऊन म्हणाला की "माग वत्सा, काय हवं ते माग" तर मी म्हणेन "देवा, खरंच आज काही नको. आजचा दिवस दाखवलास, भरून पावलो... सचिनच्या (तुझ्या) काळात, त्याच्या देशात, त्याच्या राज्यात, गावात, तो बोलणा-या भाषेत जन्माला घातलंस, त्याची संपूर्ण कारकीर्द, सगळ्या वादळी खेळ्या जवळून बघता आल्या आणि इतकंच नव्हे तर सचिनवर प्रेम करायची बुद्धी दिलीस (नाहीतर इथे त्याला स्वार्थी, क्षुद्र, सामान्य, gladiator ठरवणा-या कपाळकरंट्यांची संख्या काय कमी आहे?) अजून काय हवं? आणि आज तर सर्वोच्च बिंदू गाठलास !! भरून पावलो.."

या वयात, एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक वैयक्तिक धावा, पाहिलं द्विशतक आणि तेही नाबाद करणा-या आणि साक्षात सुनील गावस्कर  "मी याचे पाय धरीन" असं ज्याला म्हणतो त्या व्यक्तीला (निदान क्रिकेटमधला तरी) देव  मानणं यात कोणाला अंधश्रद्धा वाटत असेल तर ती आमची अंधश्रद्धा नसून तुमचं (क्रिकेटात नव्हे तर एकूणच) अज्ञान आहे असं मी म्हणीन. उगाच नको तिथे नास्तिकपणा मिरवू नये माणसाने. जाउदेत उगाच भलता विषय नको आत्ता.

असो.. मी सचिनचं कौतुक वगैरे करण्यासाठी ही पोस्ट लिहीत नाहीये, (कोणाला आवडो वा नावडो) ते तर टीव्ही, पेपर वाले करतीलच भरपूर  पण आत्ता जे भरून आल्यासारखं झालंय, 'आनंदाचे डोही आनंद तरंग' असं जे वाटतंय ते पटकन उतरवावं म्हणून ही ट्वीटी पोस्ट!!

Monday, February 22, 2010

आझाद-ए-हिंदी

"मराठी माणूस भुताला भित नाही तेवढा हिंदीला भितो" असं पुल म्हणतात ते फक्त ८०-९० च्या दशकापर्यंत लागू होत असावं (असं मला आपलं वाटतं) कारण त्यानंतर आलेल्या 'खाना'वळ, सिप्पी, चोपडा, बच्चन, जोहर, कपूर, मेहता, सिन्हा, खन्ना यांच्या कृपेने आपल्या पिढीचं ऐकीव आणि बोलीव (??) हिंदीचं ज्ञान निदान एवढं तरी सुधारलं की अगदी अटलजींच्यासारख्या हिंदी कविता किंवा भाषणं ठोकता आली नाहीत तरी 'उपरसे धाडकन पड्या, बुचकळ्या, बुड्या' वाल्या हिंदीतून आपण नक्कीच बाहेर पडलो आणि कामकाजापुरतं हिंदी बोलणं, हिंदी चित्रपट यंज्वाय  करणं हे मात्र आपण नक्की करू लागलो.

तर इतकी वर्षं इतके चांगले (वाईट जास्त) हिंदी चित्रपट बघूनही काही काही अगम्य हिंदी/उर्दू शब्दांचे अर्थ मला अगदी अलिकडे उमगले आणि ब-याचशा शब्दांनी माझं बालपण पोखरून ठेवलं होतं (अर्थात चित्रपट पहातानाच्या तीन तासांच्या आयुष्याविषयी बोलतोय मी). आणि एवढे अतर्क्य शब्द लेदर जॅकेट घालून बाईक वरून उंडारणारा हिरो असो वा फाटक्या चिंध्या घालून बसलेला रस्त्याच्या कडेचा भिकारी असो दोघेही इतक्या सारख्या सहजतेने वापरायचे की ते बघून तर मला त्यांचे वंशज अफगाणिस्थान, इराण, इराक, कतार असल्या कुठल्यातरी कट्टर उर्दू/अरेबिक भाषा बोलणा-या देशांतले असावेत असं वाटायचं. थोडाफार विनोदाचा भाग सोडला तरी खाली दिलेल्या उदाहरणातलं एकही उदाहरण हे उगाच विनोदनिर्मितीसाठी तयार केलेलं नाही. यातले प्रत्येक शब्द, वाक्य, विधानं मला लहानपणी, शाळेत/कॉलेजात असताना, आणि काही काही अगदी गेल्या ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत अगदी जेन्यूईनली गोंधळवून टाकायचे. तो चलो डोकावते है बॉलीवूड हिंदी मे..

शुक्रिया : हिरो नेहमी हिरोईनला शुक्रिया म्हणायचा. मला वाटायचं हिचं नावच शुक्रिया असावं. आपली सुप्रिया तशी यांची शुक्रिया. 'पार्टनर' मध्ये वपुंना "असं गवतासारखं सगळीकडे उगवलेलं जोशी आडनाव हे किरणचं आडनाव असायला नको" असं वाटायचं तसंच मलाही प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळ्या असणा-या नायिकांचं नाव एकच का असा प्रश्न पडे. पण तो नायकही तिला एकदा शुक्रिया म्हणायचा आणि नंतर पुढच्या सीन मध्ये हेमा, रीना, सीमा असं काहीतरी म्हणायचा तेव्हा मला वाटायचं की शुक्रिया हे पाळण्यातलं नाव असावं आणि तिला ते आवडत नसल्याने तो तिला तिच्या आवडत्या अशा दुस-या एखाद्या नावाने हाक मारत असावा. (यावरून आठवलं, वेंकट हे नाव तेलुगु भाषिकांमध्ये एवढं कॉमन आहे की माझा मित्र म्हणायचा की हैद्राबादमध्ये रस्त्यावरून चालताना १० खडे मारले तर त्यातले ८ वेंकट नावाच्या व्यक्तीला लागतील.)

बादल : असंच अजून एक इंटरेस्टिंग प्रकरण म्हणजे बादल. तर बादल हे यांच्या प्रत्येक ड्युएटमध्ये असायचंच. अगदी प्रामाणिकपणे सांगतो बादल म्हणजे मला वादळ वाटायचं त्यामुळे मला हे कळेना की च्यायला यांना हा वादळ प्रकार एवढा रोमँटिक का वाटावा. अर्थात मला वादळ/बादल प्रकार नीट कळत नसला तरी रोमँटिक म्हणजे काय हे माहित होतं. एतद्देशीय भाषांपेक्षा आंग्लभाषेचं विशेष प्रेम आणि आकलन म्हणा किंवा (जरा जास्तच) लवकर आलेली समज म्हणा. जे काय असेल ते. आपल्याला कारणांत शिरायचं कारण नाही

कुमार : आता कुमार हा हिंदी शब्द नाही हे माहित्ये मला पण पूर्वी हिंदी चित्रपटात चमकणारे हे असंख्य कुमार पाहून मला कुमार हे सुद्धा कपूर, खन्ना, सिन्हा सारखं एक आडनावच वाटायचं. लहानपणी एकदा एका मित्राच्या मित्राने त्याची ओळख 'मी कुमार'अशी करून दिली तेव्हा त्याला "तू पिक्चर मध्ये काम करतोस का?" आणि "तुझं (नक्की) नाव काय? कुमार हे तर आडनाव झालं" असले (आता मुर्खासारखे वाटणारे) प्रश्न विचारण्याची अनिवार इच्छा मला झाली होती.

फसाना-अफसाना : मला आधी हे दोन वेगळे शब्दच वाटायचे. अर्थाच्या नावाने अर्थातच बोंब होती. पण नंतर कळलं की यमक आणि गाण्याची चाल जुळवण्यासाठी हा शब्द शिताफीने कुठेही कसाही वापरू शकतो. आणि तरीही अर्थ तोच राहतो. वा वा.

समा-आसमा : इथे एक गडबड झाली. मी तो वरचा 'फसाना-अफसाना'वाला नियम इथेही लावून बसलो. म्हंटलं नसेल जुळत यमक कधीकधी म्हणून बदलत असतील हाही शब्द. पण बदललेल्या शब्दाने (माझ्या दृष्टीच्या) अर्थाची मात्र नुसती वाट लागायची. तर इथे हे सांगणं क्रमप्राप्त आहे की मला दोन्ही शब्दांचा अर्थ आकाश (आसमा) असा वाटायचा. त्यामुळे 'समा है सुहाना सुहाना'मध्ये 'आकाश इतकं छान छान का असावं' असा मला प्रश्न पडायचा. अर्थात सुहाना म्हणजे छान हा पण इतर असंख्य अर्थांप्रमाणे मी ढोबळ मानने काढलेलाच अर्थ होता.

शमा-परवाना : आता हे शमा आणि परवाने. गाणी ऐकून साधारण वाटायचं की ही शमा म्हणजे कोणीतरी महान सुंदरी असावी आणि तिच्यामागे लागणा-या सगळ्यांना परवाना म्हणत असावेत. पण कोण होती ही एवढी महान बया ते काही कळत नसे. जळणं बिळणं माहित नव्हतं त्यामुळे कोण ही शमा जिच्यामागे एवढे परवाने पागल होतात असं सारखं वाटायचं. पण नंतर शमा म्हणजे ज्योत आणि परवाने म्हणजे त्या ज्योतीवर झेपावणारे पतंग (किडे. मांजावाले पतंग नव्हेत) हे कळल्यावर तर माझा अपार हिरमोड झाला होता हे अजूनही त्या शमेच्या प्रकाशाएवढं लख्ख आठवतंय.

हसीन किंवा हसीना : हे प्रकरण म्हंजे आपण हसतमुख म्हणतो त्या टायपातलं हसणारा/री (न म्हणजे रा, ना म्हणजे री) असावं असं नेहमी वाटायचं मला. आणि 'हसीन कातिल' म्हटलं की चाकूचे सपासप वार करून झाल्यावर किंवा धडाधड गोळ्या उडवल्यानंतर त्या प्रेताकडे बघून खदाखदा हसणारा पिसाट खलनायक वाटायचा मला. 

मांग : मुख्य म्हणजे "हमारी मांगे पुरी करो" मुळे सगळा गोंधळ झाला या शब्दाबद्दल. त्या 'खून भरी मांग' च्या पोस्टरवर दिसणारी डॅशिंग रेखा आणि त्याच सुमारास वाचलेलं 'कमलाकर नाडकर्णी' यांचं त्या चित्रपटावरचं 'मगर मगर' वालं जबरी परीक्षण वाचून तर मला रेखाने का बरं असल्या भयंकर मगरींच्या रक्ताबद्दलची मागणी केली असावी असं (चित्रपट बघण्यापूर्वी) वाटायचं. (चित्रपट बघितल्यानंतर नाडकर्णींबद्दलचा आधीच असलेला आदर अजूनच वाढला.)

दिवार-दिवाल : दिवारला दिवाल हा एक प्रतिशब्द आहे असं सांगणा-या आमच्या एका मित्राला आम्ही "तो चुकीचा शब्द आहे. अशुद्ध असेल" असं सांगितलं होतं. एखाद्याचं अशुद्ध हिंदी मी (त्या काळी) शोधून त्याला दाखवून द्यावं हे म्हणजे फार होतं. त्याने काय किंमत केली असेल माझी देव जाणे .

मौसम : हे एक भारी प्रकरण होतं. 'आया प्यार का मौसम' किंवा 'मस्तीभरा मौसम' असं सारखं सारखं ऐकून मी माझ्याहून वयाने मोठ्या असलेल्या एका मित्राला (आणि त्यामुळे साहजिकच त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल या अपेक्षेने) "मौसम म्हणजे काय रे (भाऊ) ?" असं विचारलं होतं. आणि तो कदाचित नुकताच टीव्हीवरच्या 'मौसम की खबरे' बघून आला असावा त्यामुळे त्याने चटकन उत्तर दिलं "मौसम म्हणजे हवामान". झालं. मला कित्येक दिवस कळेना प्रेमाचं हवामान, मस्ती मजा करण्याचं हवामान म्हणजे नक्की काय बुवा? मग 'मस्तीभरा मौसम' म्हणजे हिवाळा असावा बाबा अशी मी आपली माझी समजूत करून घेतली. कारण हिवाळा हा अतिशय उत्साहवर्धक ऋतू आहे हे तेव्हाच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात होतं आम्हाला.

बरसात-बारिश : आता एकाच पावसाला दोन दोन नावं का बरं देतील असं विचार करून मी, उगाच, माझ्याच मनाने, कोणालाही न विचारता बरसात हे जरा भारदस्त वाटत असल्याने बरसात म्हणजे आपला मुसळधार टाईप पाऊस आणि बारिश म्हणजे रिमझिम पाऊस असे अर्थ काढले होते.

**-ए-** : दर्द-ए-दिल, दीदार-ए-यार , दिल-ए-नादान, ऐलान-ए-जंग, शेर-ए-हिंदुस्तान, रुस्तुम-ए-हिंद या अशा 'ए' वाल्या ('ए' ग्रेड वाल्या नाही हो) शब्दांचा अर्थ अजिबात कळत नसे. आणि त्यामुळे दुखण्याचं हृदय, बघणारा मित्र, हृदयाचं वेडेपण, सिंहाचा हिंदुस्तान हे असले अर्थ निघत. कालांतराने मला कळलं की 'ए' या छोट्या अक्षरात एवढी ताकद आहे की तो संपूर्ण शब्द उलट वाचायला भाग पाडतो. त्यानंतर त्या शब्दांचे खरे अर्थ कळायला लागले. मग मला लक्षात आलं की लोकांना शेरो-शायरी, गजला-बिजला एवढ्या का आवडायच्या आणि मला त्या का आवडायच्या (वाचा कळायच्या) नाहीत.

चमन, गुफ्तगू : चमन म्हटलं की चमन-गोटा आणि  गुफ्तगू म्हणजे काहीतरी अदृश्य बिदृश्य होणं असावं हे असे अर्थ डोक्यात एवढे भिनले होते की या शब्दांचे एवढे नाजूक, कोमल अर्थ असतील हे मूळ अर्थ कळल्यावर पटेचना. (डंब-शराझ खेळताना तर गुफ्तगू पिक्चर आला की आम्ही त्याचा अक्षराच्या अर्थाप्रमाणे अभिनय करून दाखवायचो. म्हणजे दोन बोटं उभी करून दाखवायचो आणि मग पाहिलं आणि शेवटचं अक्षर सेम आहे असं सांगायचो. :P)

धडकन, चष्मेबद्दूर : या दोन शब्दांचे अर्थ माहित असले तरी त्या शब्दांच्या उच्चारांमुळे विचित्र किंवा विनोदी असेच जास्त वाटायचे. धडकन म्हणजे धाडकन वाटायचं आणि चष्मेबद्दूर म्हणजे ढापण्या किंवा चष्मिस वाटायचा.

ढल : 'ढलना' म्हणजे मावळणे हे कळेपर्यंत मी ते "ढल गया दिन, हो गई शाम" वालं गाणं चक्क "जल गया दिन, हो गई शाम" असं म्हणायचो. मला 'ढल' चा अर्थ माहित नसल्याने ते 'ढल' बरोबर ऐकूनही मला वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं ऐकत असू आणि म्हणून मी तो 'ढ' चा 'ज' करून टाकायचो.

रैना, रूत : रैना म्हणजे रात्र आणि रूत म्हणजे ऋतू हे कित्येक रात्री आणि ऋतू सरले तरी माहित नव्हतं..

प्रियकर/प्रेयसी : (याला हिंदी शब्द काय बरं?? असो. बाय द वे, ईसवी सन १९९० नंतर जन्माला आलेल्या समस्त जनांनी समजण्यास सोपे जाण्यासाठी येथे बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असे वाचावे.) : आता त्या प्रियकर/प्रेयसीला किती ते शब्द . जानु, जाने  जहां, जाने जनाना, हमसफर, हमदर्द, शहेखुमा, जानम, सनम, जाने जिगर, यारा (यार माहित होतं) , दिलदार, जानेमन.. बापरे बाप.

बरखा, घटा, बहार, वादिया : या शब्दांचे नक्की आणि अगदी अचूक अर्थ खरं तर मला अजूनही माहित नाहीयेत. माहिती आहेत ते फक्त अंदाजे अर्थ.. आणि तसेही हे सगळे शब्द गाण्यांतच येतात म्हणा. त्यामुळे नाही कळले नीट तरी विशेष बिघडत नाही. पण तरीही "बहारो फुल बरसाओ" म्हटलं की फुलं कोण टाकणार किंवा "ये हसी वादिया" म्हटलं की नक्की छान काय आहे? (हसी म्हणजे हसणारा नव्हे.. विसरलात?), "काली  घटा" म्हणजे नक्की काळं काय किंवा "बरखा बहार " (बोंबला दोन्ही शब्दांची बोंब आहे) म्हणजे काय बरं हे असे प्रश्न मला अजूनही पडतात. ज्यांना या शब्दांचे अचूक अर्थ माहित असतील त्यांनी कमेंटात टाका, जे माझ्यासारखे समदु:खी असतील आणि अजूनही (म्हणजे इतकी वर्षं झाल्यावरही या अर्थी नव्हे तर अनेक/खूप याअर्थी ) कित्येक शब्दांचे अर्थ माहित नसतील त्यांनीही कमेंटा, कोणीतरी उत्तर देईलच :)...

 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' किंवा हिंदीतच सांगायचं झालं तर 'मुझे लेके साथ चल तू, युंही दिनरात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथोंमे हाथ चल तू, ओ साथी चल SSSSSS '

ताजा कलम (हा मूळ शब्द हिंदीत असला तरीही त्याचा योग्य अर्थ सगळ्यांनाच माहित असल्याने गोंधळ उडणार नाही) : मी जे वर दिलेल्या अनेक शब्दांचे मला बरोबर वाटलेले अर्थ दिलेले आहेत त्यातले अगदी सगळेच्या सगळे नाहीत तरी काही, बरेचसे अर्थ चुकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हसून झाल्यावर त्याचे योग्य अर्थ टाकलेत तरी चालेल.

Saturday, February 20, 2010

एक 'चावदार' संक्रमण


आता १० महिन्याच्या मुलाचे पहिले २-३-४ दात येणं या विषयावर पोस्ट होऊ शकतं का? आणि समजा कोणी लिहिलंच तर कोणी वाचेल तरी का ते? हे असे आणि अस्सेच काहीसे विचार होते माझ्या मनात पाहिलं पोस्ट लिहिताना. पण एक(चि)दंतच्या अभूतपूर्व यशानंतर (हे असं म्हंटलं की हे पोस्ट किंवा एकुणातच हा ब्लॉग पहिल्यांदा वाचणा-याला वाटतं की या महामानवाने लहान मुलांचे दात येणे, दातदुखी, दंतोपचार अशा विषयांवर पूर्वी एखादा (किंवा अनेक) महान लेख लिहिला असावा आणि हा नवीन लेख वाचणा-या जुन्या वाचकांना जुन्या लेखाच्या उल्लेखामुळे त्याची आठवण होऊन आपोआपच नवीन लेख आवडायला लागतो. तर असे आपले माझे एका दातात दोन लेख किंवा एका लेखात दोन दात वगैरे.. लेख संपेपर्यंत माझेच दात घशात गेले नाहीत किंवा दाती तृण धरण्याची वेळ आली नाही म्हणजे मिळवलं) चिरंजीवांनी त्यांच्या साडे तीनच दातांनी आमच्या दोन --म्हणजे माझ्या आणि बायकोच्या प्रत्येकी एक-- नाकी आणलेल्या नवाचं वर्णन करणं हे क्रमप्राप्तच आहे.

सुरवंटाचं फुलपाखरू होणं किंवा 'कु. अमुकतमुक'चं-- व्हाया चि. सौ. कां. -- 'सौ. फलाणा फलाणा' होणं या हळुवार संक्रमणांइतकंच बाळराजांचं दात येण्यापूर्वीच्या डोनाल्ड डकसदृश्य अवताराचं साडेतीन-चार दातांचं हत्यार हाती आल्यावर मिकी माउस मध्ये होणारं संक्रमण हे एकाच वेळी हळुवार, टोकदार, बोचदार, चावदार असं होतं. आता 'चावदार' या सर्वस्वी नवीन शब्दाची मराठी साहित्यात, भाषेत भर घालण्याचं कृत्य अनवधानाने का होईना माझ्या हातून झालं असलं तरी त्याच्या उत्पत्तीचं समग्र श्रेय हे आमच्या मिकी माउसलाच जातं हे माझं म्हणणं तुम्ही,  "आपल्या धारदार आणि टोकदार दातांनी दार चावणा-याला काय म्हणायचं?" असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर शोधताना तुमची जी दमछाक होईल ती लक्षात घेऊन आधीच, मान्य कराल आणि हे श्रेय ज्याचं त्याला (म्हणजे बाळराजांना) क्षणभराचाही विलंब न करता देऊन टाकाल याची मी, मिकी आणि डोनाल्ड यांना खात्री आहे.

तर जगातलं सर्वात धारदार नैसर्गिक शस्त्र म्हणजे 'दहा महिन्यांच्या बाळाचे नुकतेच येणारे दात' हे मला कोणी महिनाभरापूर्वी सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यातच काढलं असतं. पण अनुभव हीच खात्री हे स्वानुभवाने सिद्ध झाल्याने असं वेड्यात काढणं म्हणजे वेड्यात निघाण्यासारखं आहे हे मला आता पुरेपूर  पटलं आहे. तर आमचे हात, मनगट, दंड, गाल, खांदे, बोटं, पोट, मान असे सगळे अवयव यथेच्छ चावून झाल्यावर साहजिकच तोचतोचपणाचा कंटाळा आल्याने (Life can be so monotonous at times) बाळराजांनी आपलं लक्ष अनेक चमचमणा-या रंगीबेरंगी गाड्या, सॉफ्ट टॉईज, लहान-मोठे रबरी/कापडी चेंडू, पुस्तकं, वृत्तपत्रं, टिश्यूज, वाईप्स असे कागदांचे विविध प्रकार, लाळेरी, शाली, दुपटी, मोजे असे कपड्यांचे विविध प्रकार आणि मोबाईल, रिमोट, किल्ल्या, घड्याळ असे इलेक्ट्रॉनिक्सचे विविध प्रकार किंवा सोफा, गादी, उशा, दारं, ड्रॉवर अशा अनेक निरुपद्रवी, निरुपयोगी आणि आमच्या मान ते पोट यामधल्या अवयवांपेक्षा रंगीबेरंगी आणि चविष्ट भासणा-या गोष्टींकडे वळवलं. परंतु निळकंठ महादेवाने आपला तिसरा नेत्र उघडल्यानंतर ज्याप्रमाणे मृत्यूलोकातले, स्वर्गातले सर्व देव, मानव भयातिशयाने जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागत त्याप्रमाणे वरील सर्व वस्तूंची या (साडे) त्रिदंतापासून शक्य तेवढे दूर पळून जाण्याची अपार इच्छा असूनही अंगभूत जडत्वामुळे ते शक्य न झाल्याने मिकीपुढे संपूर्ण शरणागती स्विकारण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्यासाठी उरला नाही. 

तर या अशा तुच्छ, मर्त्य गोष्टींपैकी ज्या काही निवडक आणि अनपेक्षित गोष्टींच्या अस्तित्वावरच आमच्या मिकीने प्रश्नचिन्ह लावलं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक क्षुद्रसा थर्माकोल कप. परवा हॉटेल मध्ये गेलो असताना इडली/वड्याबरोबर मिळणा-या सांबारासाठी आम्ही प्रत्येकी एक आणि मिकीला खेळायला एक असे तीन कप घेतले. पण आमच्या इडली/वड्याचा पहिला घास संपायच्या आधीच आपल्या तोंडातील छुप्या वाघनखांनी आपलं दातांनी त्याने त्या कपावर सपासप असे एवढे वार केले की तो कप होत्याचा नव्हता झाला आणि प्रमोद नवलकरांच्या 'भटक्याची भ्रमंती' मध्ये किंवा 'पोलीस टाईम्स', 'दक्षता' सारख्या मासिकांमधल्या लेखांमधल्या फोटोंच्या खाली आढळणारी 'हाच तो ट्रक ज्याच्यावर पोलिसांनी धाड टाकली ' किंवा 'हेच ते घर ज्या घरात अतिरेकी राहत होते' अशा तालावर वाचण्याचं हे पुढचं वाक्य जन्माला आलं. तर "हाच तो कप ज्याला कप प्रजातीतून हद्दपार व्हावं लागलं"
अशा दुस-या विस्थापिताचं नाव होतं चॉकलेट. तो टेबलावर ठेवलेला चॉकलेट बार कसा त्याच्या हातात लागला देव जाणे. तर हा बराच वेळ शांत का बसलाय, काही आवाज वगैरे का येत नाहीये असा विचार करून मी (लॅपटॉप मधून डोकं बाहेर काढून) त्याच्याकडे बघितलं आणि बघतो तो काय. मिकीने तोंडात चॉकलेटच्या पाकिटाचं एक टोक धरलं होतं, ते फटाफटा चावत होता आणि दुस-या हाताने पाकिटाचं दुसरं टोक पिरगाळत होता. थोडक्यात काथ्याचे दोर वळणे याचं सॉफीस्टीकेटेड रूप आणि कचाकचा चावणे याचं हार्श रूप याचा अनोखा संगम माझ्यापासून तीन फुटावर घडत होता. आणि चॉकलेट कोको परिवारातून 'सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही' वाल्या सुंभ उर्फ सुतळ/दोर परिवारात जाऊन स्थिरावलं.तिसरी शिकार होती कानाला लावायच्या मलमाची ट्यूब. आणि तीही मेटल किंवा पत्र्याची. म्हणजे आपल्या टूथपेस्ट किंवा इतर मलमांच्या प्लास्टिक/रबरी ट्यूब सारखीही नाही. तिच्यावर तर दातांच्या एवढ्या खुणा आहेत की ते Manufacture's Design वाटावं आणि एका ठिकाणी तर त्या चाव्यांमुळे (आता यात किल्ली कुठे आली विचाराल म्हणून सांगतो, चावाचं अनेकवचन) ट्यूबला चीर जाऊन मलम बाहेर आलं. अर्थात ताबडतोब त्याच्या हातातून ती ट्यूब हिसकावून घेण्यात आम्ही यशस्वीही झालो. पण 'कसं फसवलं' असे जे भाव त्याच्या चेह-यावर आणि (नको तितक्या) बोलक्या डोळ्यांत होते त्यावर एक मोठ्ठा सुस्कारा सोडण्याखेरीज आमच्या हाती काहीच नव्हतं.. :-)अर्थात यातल्या एकाही शिकारीचे 'केस उगवण्याच्या औषधांच्या' किंवा 'बारीक होण्याच्या गोळ्यांच्या' जाहिरातीच्या स्टाईलचे 'द बिफोर' आणि 'द आफ्टर' असे फोटोज नाहीत. कारण कुठल्या कुठल्या वस्तूचे पूर्वाश्रमीचे फोटोज काढून ठेवणार? संपूर्ण घरच शूट (पक्षी कॅमकॉर्डरने.. 'ओक म्हनत्यात मला' आन म्या त्येररिश्त न्हाय.) करून ठेवावं लागेल.  कारण हल्ला कधीही आणि कुठल्याही वस्तूवर होऊ शकतो त्यामुळेच .....  अरे अरे थांब.... आँ आँ आ SSSSS 

Tuesday, February 16, 2010

तो आणि ती

तो अलिकडे तसा अस्वस्थच होता. मधून मधून चिडायचाही थोडा. पण संस्कार आणि भीती या अजब समीकरणामुळे बरेचदा गप्प बसायचा. तसा तो कोणाचाच नव्हता. त्याला वाघ (किंवा धनुष्यबाण) आवडत नसे. हाताबद्दल विशेष आत्मीयता नव्हती की घड्याळाबद्दल विशेष प्रेम नव्हतं. कमळाचा गुच्छ थोडा प्रिय होता पूर्वी पण तोही एक कमळ वेळेआधीच खुडलं गेल्याने आणि दुसरं मोठ्ठ कमळ अगदी कोमेजून गेल्याने विशेष आवडेनासा झाला. सुरु झाल्या झाल्या इंजिन आवडलं थोडं. पण लगेच  एवढं हुरळून जायला नको असंही वाटायचं. कारण आताशी पहिलाच थांबा तर घेतला होता इंजिनाने. आणि बाकी हत्ती बित्ती तर त्याच्या आवडी-नावडीच्या यादीतही नव्हते. ती बरेचदा त्याला काही बाही (समजावून) सांगायचा  प्रयत्न करायची पण हा काही तिला विशेष बधत नसे. पण तो मनातल्या मनात आणि त्याच्या स्वत:च्याच नकळतपणे आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवून असतो हे तिला चांगलं माहित होतं. आणि त्याच्या या भाबडेपणावर (ती त्याला मुर्खपणा म्हणायची) भरपूर हसायची. या बिचा-याला त्याचं कारणही कळत नसे.

त्यात एकदा त्या शांत गावातली बेकरी फुटली आणि हा बेचैन झाला खूप चिडला, हताश झाला.  आणि त्याचदिवशी तिने त्याला एका प्रधानाने १०० दिवस पूर्ण केल्याची बातमी निर्ल्लज्जपणे येऊन सांगितली. याची अस्वस्थता अजूनच वाढली. खूप वाढली. त्याच बेचैनीत त्याने खूप विचार केला, जुनं वाचन आठवलं, तिने सांगितलेल्या सगळ्या जुन्या घटना आठवल्या. ती विश्वासघात करेल असं त्याला स्वप्नातही वाटत नव्हतं. पण त्याच्या दृष्टीने जे स्वप्नातही घडणं अशक्य होतं ते रोजच्या जीवनात घडवणं हा तिच्या डाव्या हातचा मळ होता. त्याचं विचार करणं चालूच होतं. फार लांब कशाला जा म्हणून  फक्त गेल्या महिनाभारताल्या तिच्याशी झालेल्या गप्पा आठवून पाहिल्या. आणि तो जागच्या जागी उडालाच. कारण तिच्या खांद्यावर मान टाकून ती सांगेल त्या सगळ्या गोष्टी तो ऐकत असे आणि ती सांगेल ते तात्पर्य प्रमाण मनात असे. या सगळ्यात तिने आपल्याला हातोहात फसवलं आहे हे त्याला कळलंही नव्हतं अगदी आत्तापर्यंत. 

त्याला सगळ्यात आधी आठवलं ते १५-२० दिवसांपूर्वीचं राजपुत्राचं वाक्य. अर्थात ते तिनेच येऊन त्याला सांगितलं होतं. पण कुठली गोष्ट कशी आणि किती जोरात ओरडून/हळू बोलून सांगायची याची तिला चांगली समज होती. त्याप्रमाणे यावेळी ती नुसतं पुटपुटली. त्यामुळे त्यानेही काही विशेष लक्ष दिलं नाही. पण वाघाने मात्र राजपुत्राची गोष्ट ऐकली होती,प्रचंड मनावरही घेतली होती आणि चिडून जाऊन प्रचंड डरकाळीही फोडली होती आणि त्याच्या सगळ्या सवंगडी वाघांना तो म्हणाला होता की राजपुत्राला शांत मार्गाने (म्हणजे काळे पंजे दाखवून) सळो की पळो करून सोडा. झालं. तिने हे मात्र अगदी छान फुगवून फुगवून सांगितलं त्याला. त्यालाही आला होता राजपुत्राचा थोडासा राग. पण तिच्या हळुवार समजावण्याने आणि मेंदू-धुण्याने त्याला वाघ कसा चुकीचा आहे आणि त्याची डरकाळी कशी अनाठायी आहे हे अगदी ठाम पटलं. ठरल्याप्रमाणे राजपुत्र आला तेव्हा प्रधानाच्या सांगण्यावरून एक तर हजारो वाघ पिंज-यात होते आणि उरलेल्या वाघांसाठी त्यांच्या दुप्पट शिकारी हजर होते. राजपुत्र आला, फिरला, बोलला, हसला आणि परत गेलाही. आणि वाघाचा झाला पोपट. पण पोपट कसा? आणि वाघाचाच का आणि कसा? वाघ चूक होता का? यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला ठाऊक नव्हतं. का बरं? आणि अचानक त्याला आठवलं की तिने त्याच्या मेंदूला असले प्रश्न पडण्याची संधीच दिली नव्हती. ती सकाळी सकाळी आली तीच ओरडत की वाघाचा पोपट, वाघ थंडावला असं काहीसं. आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याने ते एकलंही. म्हणजे ऐकावंचं लागलं. ती खोटं थोडंच बोलणार होती? सगळे प्रश्न आतल्या आत विरून गेले. कळलंही नाही त्याला. पण आता तो ते पुन्हा आठवत होता. विचार करत होता.
आत्मपरीक्षण करताना पुन्हा पुन्हा स्वतःला बजावत होता की वाघाचा आणि त्याचा काहीही संबंध नाही, वाघाबद्दल त्याला काहीही आत्मीयता नाही. पण तरीही त्याला वाघाचं म्हणणं योग्य वाटू लागलं. हे असं का होतंय म्हणून त्याची चिडचिड होत होती म्हणून त्याने तिच्या एका प्रगत मैत्रिणीची मदत घेतली. ही मैत्रीण खोटं बोलणार नव्हती. अगदी मनात आलं तरी खोटं बोलू शकणार नव्हती. तर या नवीन मैत्रिणीने त्याला राजपुत्र काय म्हणाला ते वाक्य न् वाक्य सांगितलं.
हिची अजून एक छान गोष्ट म्हणजे ती तात्पर्य बित्पर्य काही सांगणार नव्हती. ती फक्त गोष्ट सांगणार तात्पर्य त्याचं त्याने काढायचं. हा प्रकार त्याला जाम आवडला होता. थोडा मोकळा श्वास घेतल्याचा आनंद मिळत होता. आणि तिने हे आधी सांगत असताना हे काहीच आपल्या लक्षात कसं आलं नाही म्हणून तो स्वत:वरच मनोमन हिरमुसला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की नवीन मैत्रिणीच्या मदतीने हे असं वाक्य न् वाक्य ऐकायला मिळणे वगैरे असे प्रकार जुन्या 'ती'च्या बाबतीत कधीच होत नसत. ती म्हणेल ते प्रमाणवाक्य असे. आणि बरेचदा ते बोलणारा 'मी असं बोललोच नव्हतो' असं म्हणून सुटका करून घेत असे. पण नवीन मैत्रिणीच्या बाबतीत ही शक्यताच नव्हती.  त्यामुळे ते वाक्य न् वाक्य पुन्हा पुन्हा ऐकल्यावर त्याला वाघाची डरकाळी नक्कीच चुकीची नव्हती हे कधी नव्हे ते पहिल्यांदा जाणवलं. आणि डरकाळीचं कारण जर चुकीचं नव्हतं तर मग वाघाचे बाकीचे साथीदार, मित्र, राजधानीतले सवंगडी वाघाबरोबर का आले नाहीत हा प्रश्न त्याला राहून राहून टोचत राहिला. आणि सवंगडीच जर आले नाहीत तर आपल्यासारख्या वाघाशी दुरान्वयेही संबंध नसणा-याला वाघाबद्दल काहीच वाटू नये आणि तिने सांगितलं की वाघाचा पोपट झाला की आपला तिच्यावर विश्वास बसावा यात त्याला वावगं वाटलं नाही. पण तो चुकला होता हे नक्की. वाघ बरोबर होता हे त्याला पहिल्यांदाच जाणवलं. आता त्याचं मन वाघाच्या नजरेने विचार करू लागलं. तिने पुढे हे सुद्धा विचारलं होतं की नेहमी डरकाळ्या फोडणारा वाघ शांततेने काळे पंजे वगैरे दाखवून हळू हळू का गुरगुरतोय. वाघ संपला आहे असं तात्पर्य काढून आणि त्याला तसं वाटायला आणि म्हणायला लावून मगच ती शांत बसली. आता आत्मपरीक्षणाच्या नादात त्याला आठवलं की पूर्वी हिनेच डरकाळ्या फोडणा-या वाघाला जंगली, रानटी, क्रूर ठरवून त्याच्या डरकाळी या प्रमुख अस्त्रालाच खलनायक ठरवलं होतं. तेव्हा तिच्यामुळे त्याला हे सगळे वाघ म्हणजे जंगली, रानटी, रक्तपिपासू वाटले होते. मात्र आता राजपुत्राच्या वेळी किंवा मागेही इतर १-२ छोट्या प्रसंगात वाघाने डरकाळ्यांऐवजी काळ्या पंजांनी लढायचं ठरवल्यावर हिनेच वाघाला भित्री भागुबाई ठरवून 'वाघ संपला' अशी आरोळी ठोकून दिली.
त्याचे विचार चालूच होते.  मनावरचं दडपण कमी झाल्याने विचारांना चालना मिळत होती, विचारांचा वेग वाढत होता. अचानक त्याचं मन सोंगाड्याच्या विधानांवर स्थिरावलं. याहीवेळी त्याने नवीन मैत्रिणीचा आधार घेत शहानिशा करायचं ठरवलं. जुन्या 'ती' च्या बोलण्यावर तो आता आंधळेपणाने विश्वास ठेवणार नव्हता हे नक्की. सोंगाड्याचं विधान बारकाईने ऐकल्यावर तर त्याच्या आश्चर्याला पारावरच उरला नाही. जुन्या 'ती' ने त्याला काहीच नीट कळू दिलं नव्हतं आणि ती नेहमी असंच करत असे याबद्दल त्याची पुन्हा एकदा खात्री पटली. सोंगाड्याने तर पैसे कमावण्याच्या, स्वत:ची प्रतिमा जपण्याच्या नादात 'त्या' च्या सारखे अनेक जण ज्या शेजा-याला शत्रू मानतात, ज्या शेजा-याने असंख्य वेळा कुरापती काढून 'त्या'ला, त्याच्या राजाला, प्रधानाला, सेनापतीला सळो की पळो करून सोडलं होतं त्या.. हो त्याच.. शेजा-याला सोंगाड्या आदर्श शेजा-याची उपमा देत होता. शेजारी कसा बरोबर आहे हे सांगत असतानाच सोंगाड्या स्वत: कसा बरोबर आहे हेही तो पटवून देत होता. त्याचं मनच विटलं हे पाहून. 'ती'च्या बद्दलचा संताप अजून उसळून आला कारण याहीवेळी त्याला उमगलं होतं की वाघ चुकला नव्हता. याहीवेळी राजा तीच खेळी खेळला होता. हजारो वाघ पिंज-यात आणि उरलेल्यांना ठोकण्यासाठी हजारो शिकारी. हजारो शिका-यांच्या पहा-यात राजा, प्रधान, घर-प्रधान, उप-प्रधान सगळे सगळे जण सोंगाड्याचा खेळ बघून गेले. त्याला आठवलं याही वेळी ती म्हणाली होती वाघ संपला. एका छोट्या मुद्द्यावरून एवढा तमाशा करायची काय गरज होती वाघाला आणि त्याने यावेळीही नंदीबैलासारखी मान डोलावली होती. त्याला तिचा आणि त्यापेक्षाही जास्त स्वत:चा राग येत होता.
तेव्हाच वाघाने अजून एक डरकाळी फोडली होती की त्या दूरदेशात 'त्या'च्या सारख्यांना जिवानिशी मारलं जातंय, हल्ले होतायत आणि तेही जवळपास दररोज, सतत. वाघाचं म्हणणं होतं कि त्या दूरदेशातल्या खेळीयांना येउच द्यायचं नाही इथे. झालं. लगेच तिने येऊन त्याच्यासमोर आक्रोश केला, थयथयाट केला की खेळीया/सोंगाड्या आणि राजा हे एकमेकांपासून वेगवेगळे असले पाहिजेत. पुन्हा एकदा नंदिबैलाने बुगुबुगु केलं होतं. पण वाघाचा मुद्दा सरळ होता. दूरदेशात मरणा-या 'त्या'च्या सारख्या लोकांसाठी ना तिकडचा राजा काही करतोय ना आपला राजा आणि त्यामुळे ते खेळीयांना इथे येण्यापासून रोखणे किंवा निदान तशी गर्जना तरी करणे या गोष्टीने दोन्ही राजे त्या मुद्द्याकडे डोळे उघडून पाहतील असं वाघाचा हिशोब होता. कारण सोप्पं होतं. आपले खेळीये आणि त्यांचे खेळीये एकत्र येऊन खेळणं हे त्याच्या गल्लीतल्या पोराटोरांनी एकत्र येऊन विटीदांडू खेळण्यापैकी नव्हतं. इथे करोडो मोहरा लागत होत्या लिलावावर. त्या खेळीया गुलामांवर. आणि दुरदेशातले हल्ले रोखण्यासंदर्भात त्या राजाचे डोळे उघडण्यासाठी या करोडो मोहरांच्या  गोणीचे तोंडच आवळून ठेवणं हा एकमेव उपाय आहे हे वाघाला नक्की माहित होतं. हा उपाय चांगला लागूही पडत होता इतका की अगदी आपल्या खेळीयांचा आणि शेतक-यांचा राजा येऊन पाया पडला वाघाच्या. त्या पाया पाडण्यामागे शेतक-यांच्या राजाचे इतरही अनेक हेतू असले तरी त्यामुळे वाघाची सरशी होणं काही कमी होत नव्हतं. हळू हळू त्यालाही हे पटू लागलं होतं की गोणीचं तोंड आवळणं हा एकमेव आणि सर्वोत्कृष्ठ पर्याय होता.  हाच विचार करताना त्याला मागे झालेलं आपल्या शेजा-यांबद्दलचं तिचं बोलणं, त्याच्या पांढ-या सद-याच्या गळ्याच्या आणि  बुद्धी हाच जीव मानणा-या इतर मित्रांचं बोलणं आठवलं. अगदी बर्फाच्छादित डोंगरावरून दगाबाजी  होईपर्यंत या सगळ्या आंधळ्या, मुक्या, बहि-यांचं (सोंग आणलेल्यांचं) हेच मत होतं की शेजा-याला व्यापार उदीम, दळणवळण इ इ मदत करून त्याची गरिबी दूर केली की आपण सुरक्षित होऊ. आणि या सगळ्या मतप्रदर्शनात, मुद्दे समजावण्यात  ती अर्थातच सगळ्यांच्या पुढे होती. संताप संताप होत होता त्याचा की इतके दिवस ती कशी शिताफीने हातोहात फसवत राहिली आपल्याला आणि आपल्याला कधी कळलंही नाही. आणि मग या अशा आत्मपरीक्षणाच्या नादात त्याच्या विचारांची साखळी पुढे पुढे सरकत राहिली. इंजिनाच्या मालकाविषयी असो, खाकी अर्ध-विजारी, काळी टोपीवाल्यांविषयी असो, रेल्वेचे डबे पेटवून माणसं जिंवत जाळणा-यांविषयी असो किंवा मोठ्ठ्या बाईंच्या त्यागाविषयी असो वेळोवेळी आणि पद्धतशीरपणे  ती आपल्याला कशी फसवत राहिली हे त्याला आठवत गेलं आणि अधिकाधिक बेचैन करत गेलं.
पण त्याने आता ठरवलंय तिच्या एकाही गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही, तिने सांगितलेल्या (ओरडून असो की पुटपुटत) प्रत्येक गोष्टीची शहानिशा करायची, जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा थोडक्यात जास्तीत जास्त वेळी नवीन मैत्रिणीची मदत घ्यायची किंवा नवीन मैत्रिणीच्या इतर मित्र मैत्रिणींची मदत घ्यायची. पण त्यामुळे त्याला आता आधार मिळाल्यासारखं वाटतंय, हलकंहलकं वाटतंय, तिचे हरत-हेने दिशाभूल करायचे प्रयत्न अजूनही सतत चालू असतातच. चुकून कधी कधी तो भूलातोही. पण तात्पुरताच. वेळीच डोळे उघडतो, चोळतो आणि क्षितिजाकडे अजून आत्मविश्वासाने चालू लागतो.
----------
यातला 'तो' म्हणजे सामान्य माणूस (किंवा अगदी मी स्वत:) आणि 'ती' म्हणजे फक्त मटा नाही तर सगळी प्रसार माध्यमं उर्फ मिडीया हे असलं काहीतरी तात्पर्यात सांगणं म्हणजे अगदीच किरकोळपण झाला हे माहित्ये मला. पण तरीही..... पुण्याचा बॉम्बस्फोट इतका ताजा असताना ही मागची मढी उकरून काढून त्याचा कीस पाडणं खरं तर अप्रस्तुत आहे. पण झालं काय की पुणे बॉम्बस्फोटानंतर लगेच (अक्षरश: काही तासांत) नेटवर आलेल्या बातमीत महाराष्ट्र सरकारने १०० दिवस 'यशस्वीरित्या' पूर्ण केल्याबद्दलची बातमी सौरभ यांच्या ब्लॉगवर वाचल्यावर माझा क्षणभर विश्वासच बसेना त्या बातमीवर. अरे वेळ काय आणि तुम्ही बातमी काय देता आणि तेही मटासारख्या दैनिकात? मी गेली कित्येक वर्षं मटाचा नियमित वाचक आणि भारतकुमार राउत यांच्या अग्रलेखांचा पंखा आहे. त्या मटाने ही असली बातमी इतक्या चुकीच्या वेळी (हा मुख्य मुद्दा आहे) देणं मला सहनच होत नव्हतं. तसंही प्रसार माध्यमांचा बेजवाबदारपणा आपण पावलोपावली अनुभवत असतो. पण यावेळी अजून एक म्हणजे 'शिवसेनेचा पोपट', 'वाघ थंडावला' , 'राहुलने दिली हातावर तुरी' या असल्या पांचट हेडलाईन्स वाचून मला खूप वाईट वाटलं. आणि त्यापेक्षाही वाईट वाटलं ते हे जाणवून की मिडीया आपल्याला तिच्या दृष्टीकोनातून विचार करायला कशी भाग पडते आहे, आपल्या विचारांना, बुद्धीला, गृहीतकांना (त्यांना) हव्या त्या दिशेने कसं वळवते आहे हे बघून. मी शिवसैनिक नाही, शिवसेनेचा खंदा, कट्टर अशा कुठल्याही कॅटेगरीला चाहता/समर्थक/कार्यकर्ता नाही. पूर्वी थोडा भाजपकडे ओढा आणि हल्ली राजच्या शैली, भाषणांमुळे मनसेबद्दल आपुलकी असं फार तर म्हणु शकतो. पण इतर वेळी सगळ्या मराठी माणसांनी पक्षभेद विसरून एकत्र या असं आवाहन करणारा राज शिवसेनेच्या त्याच मुद्यांना निव्वळ वेगळा पक्ष म्हणून साथ देत नाही हे बघून वाईट वाटलं. यावेळी बाळासाहेब जे करत होते ते योग्यच होतं असं मला मनोमन वाटतं. आणि मुदाम त्यासाठीच राहुल आणि शाहरुखचे मूळ विडीयोज इथे चिकटवले आहेत. त्यांनी जी मुक्ताफळं उधळली आहेत ती जर इतर कुणी उधळली असती तर राष्ट्रीय मिडीयाने त्यांचा ऑलमोस्ट जीव घेतला असता. पण ते राहुल आणि शाहरुख असल्याने त्यांच्या देशद्रोही विधानांनाही डोक्यावर घेऊन नाचणारी ही मिडीया. शिवसेनेने राडा केला तर 'गुंडांचा पक्ष' म्हणून हिणवणारी आणि विधायक मार्गाने काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला तर 'कुठे गेली शिवसेनेची आक्रमकता? शिवसेना संपली' अशी हाळी देणारी ही दुतोंडी मिडीया. आणि याला कुठल्याही प्रकारची मिडीया अपवाद नाही. प्रिंट, टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स सगळ्या प्रकारची प्रसार माध्यमं पण डोळ्यावरल्या झापडांची लांबी, रुंदी, उंची अगदी सारखी. विचारातला कोतेपणा, उथळपणा अगदी एकाला झाकावं आणि दुस-याला काढावं एवढा हुबेहूब. आणि नेहमीप्रमाणेच आर के लक्ष्मणांच्या कॉमनमॅनची (आपलीच हो) फसवणूक. तर अशी वारंवार फसवणूक करणारी 'ती' आणि या फसवणुकीतून, गुदमरण्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणारा तो. अशी 'तो' आणि 'ती' ची ही (प्रेम) कहाणी कधीच पाचा उत्तरी संपूर्ण होणार नाही !!

-- सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.

Saturday, February 13, 2010

भक आणि अम..... एकदम अच्चूक !!!


कोणालाही खरं वाटणार नाही पण सामान्य माणूस आता एवढा तय्यार झालाय की भविष्य (त्याचंच नाही तर सगळ्यांचं) जाणून घ्यायला त्याला ना ज्योतिषी लागतो, ना प्रसार माध्यमं, ना वृत्तपत्रं. अशाच एका अतिसामान्य (आणि त्यामुळेच अतिदुर्लक्षित) माणसाचा पुढच्या ९६ तासांत घडणा-या घटना ओळखून, सगळे अंदाज मांडून ते आपल्यापुढे ठेवण्याचा हा (अचूक भविष्यकथनाचा) प्रयत्न. अर्थात एवढ्यावरच न थांबता यच्चयावत अतिरेकी संघटनांच्या गुप्त प्रतिनिधीचे अतिगुप्त मनोगतही तो आता सहज ओळखू शकतो. उगाच नाही म्हटलं तय्यार झालाय !!  तसंच कुठल्याही प्रकारच्या घातपाताच्या, बॉम्बस्फोटाच्या वगैरे घटना घडल्यानंतर त्या घटनांमागची कारणमिमांसा किंवा पुढच्या ४-६ दिवसांत घडणा-या गोष्टींबद्दलचे सामान्य माणसाच्या डोक्यात येणारे विचार आणि अतिरेकी संघटनांची (गुप्त) मनोगतं किती समांतर पातळीवर आहेत तसंच ज्या साध्या साध्या गोष्टी सामान्य माणसांना देखील कळतात पण त्याबद्दलचा साधा पुसटसाही विचार राजकारणी, पुढारी, नेते, विरोधी पक्ष या सगळ्यांच्या मनातही कसा येत नाही (किंवा ते कसं शिताफीने असं दाखवतात) हे बघून आपण चक्रावून जाल.

तर अशा या सगळ्या राजकारणी, नेते, गृह आणि संरक्षणखाते, पोलीस यांच्यासाठी हा सामान्य माणूस भविष्यकथनाचे क्लासेसदेखील काढायला तयार आहे. आणि तेही फुकट.. कुठलाही हप्ता आपलं सॉरी फी न घेता.

भविष्यकथन क्र.१ :  पुण्यात पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात येईल : (आणि त्याचबरोबर मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, गुजरात आणि हैद्राबाद येथेही)
अतिरेक्यांचे मनोगत क्र.१ : तुम्हाला काय अतिरेकी म्हणजे मुर्ख, बेअक्कल, वेंधळे, अक्कलशून्य, बेभरवशाचे, निरुपयोगी, आळशी, खादाड (किंवा थोडक्यात तुमच्यासारखे) वाटले की काय? अरे एकदा बॉम्बस्फोट झाला की तिथेच जाऊन पुन्हा पुन्हा बॉम्ब फोडायला आम्ही काय तुमच्याएवढे मंद आहोत का? अरे ही सगळी मेट्रो-शहरं म्हणजेच देश नाही. आम्ही कुठेही जाऊन कितीही हल्ले करू शकतो. पण बरंय नंतर बंदोबस्त वाढवता ते. आधी वाढवलात तर उगाच तेवढ्याच आम्हाला कटकटी जास्त. 

भक क्र.२ : पंतप्रधान त्यांच्या पीए ला ताबडतोब (म्हणजे साधारण आठेक दिवसात) पुण्याला जाण्यासाठीच्या विमानाची तयारी करायला सांगतील. आणि गेल्या वेळच्या त्या स्पिरीटवाल्या भाषणांमधून (तेच ते जे अक्षरधाम, घाटकोपर, संसद, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद असा बदल/प्रवास करत करत मुंबईला येऊन थांबलं) मुंबईला आणि मुंबईकरांना सलाम ऐवजी तिकडे फक्त पुणे घालून भाषणाची थोडी डागडुजी करायला सांगतील. म्हणजे हेच थोडीफार मृतांची संख्या, तारीख असले फुटकळ बदल. बाकी सारं तेच. 
अम क्र.२ : हा हा हा.. स्पिरीट (रॉकेल, पेट्रोल, डिझेल वगैरे वगैरे) आणि सॅल्युट (सलाम, कौतुक, दाद वगैरे वगैरे)

भक क्र.३ : मुख्यमंत्र्यांचा सगळ्या हिंदी चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांना निरोप जातील की पुढचे निदान दोन आठवडे तरी कोणीही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करू नयेत. आमची पोरंबाळं त्यांच्या त्यांच्या पायावर उभी असल्याने 'साईट-सीइंग' चे कुठल्याही प्रकारचे दौरे केले जाणार नाहीत.
अम क्र.३ : ओय तौबा.. मागच्या वेळचा बगळा त्यामुळे खपला होता होय? आम्हाला वाटलं आमच्यामुळेच. साला पुढचं प्लॅनींग जरा डेंजरच करतो बघा.

भक क्र.४ : मॅडम कुठल्याकुठल्या राज्यात राज्यपालपदं नजिकच्या काळात रिकामी होऊ शकतील याचा आढावा घेऊ लागतील. कशाला म्हणजे? अहो याहीवेळी गृहमंत्र्यांचं आणि अजून कुठल्याकुठल्या मंत्र्याचं पुनर्वसन करायला लागलं तर गेल्यावेळेस सारखी धांदल नको उडायला शेवटच्या क्षणी.
अम क्र.४ : मनोगत क्र.३ वरून "कापा आणि चिकटवा"

भक क्र.४ : मॅडमकडून मुख्यमंत्रीपदासाठीच्या इच्छुकांना गुप्त खलिते धाडले जातील. अर्थात यावेळी फक्त दहाच (!!) ठार आणि चाळीसच (!!!!!) जखमी असल्याने लगेच काही मुमंना उडवायला लागणार नाही म्हणा. पण कुणी सांगावं. तयार असलेलं बरं. उगाच गेल्यावेळेस सारखा एक आठवडा लागायचा आणि इतकं सतत पोसुनही हे मिडीयावाले शेवटच्या क्षणी आमच्यावरच दात काढायचे.
अम क्र.४ : ये तो सोचाही न था.

भक क्र.५ : राज्य आणि केंद्र सरकारं दोन्हीही एकाच मातेची आपलं सॉरी मातीची लेकरं असल्याने विशेष हमरीतुमरीवर आली नाहीत तरी पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा नेहमीप्रमाणे एकमेकांवर चिखलफेक करतीलच.
अम क्र.५ : माशाअल्ला..!! चला काहीतरी होतंय मनासारखं.

भक क्र.६ : मिडीयावाले मेणबत्यावाल्यांना आणि सगळ्या स्वाभिमानी, दुराभिमानी पक्षांना, सगळ्या प्रकारच्या सेनांना, सगळ्या प्रकारच्या बहुजन, मध्यमजन, अल्पजन आणि (स) माजवादी पक्षांना, सगळ्या राष्ट्रीय, गवताच्या,तृणाच्या, मुळाच्या दलांना, कोंग्रेसांना, आणि सगळ्या माक-या आणि भाक-यावादी  कमीनष्टांना यावर्षीचं 'सेलिब्रेशन' एक वर्षाने न घेता एका आठवड्यात किंवा फार तर एका महिन्यात घ्यायला सांगतील. ढोलताशे बडवायला एक वर्ष थांबायचं म्हणजे फार होतं बघा.
अम क्र.६ : करा काय ते. या असल्या सगळ्या थिल्लरबाजीने आम्हाला काय फरक पडतोय.

भक क्र.७ : अशा वेळी विरोधी पक्ष आपल्या जवाबदा-या आणि तारतम्य विसरून,
१. उपोषणं, आंदोलनं, मोर्चे, धरणी असे तमाशे करत वेळ घालवून पोलिसांची कामं वाढवून ठेवतील. 
२. इतर विरोधी पक्षांशी वाद घालत आरोप, प्रत्यारोपांची चिखलफेक करतील.
अम क्र.७ : विरोधी पक्ष? ये क्या है मियाँ? अच्छा अच्छा एक मिनट.. हे म्हणजे सत्तेत नसूनही सत्ताधा-यांप्रमाणेच मिजाशीत वागणारे पांढ-या कपड्यातले बगळे होय? अरे ये तो हमारे पाकिस्तान जैसाही है एकदम. 

भक क्र.८ : सत्ताधारी पक्षांतली असंतुष्ट, मंत्रीपदाची इच्छुक मंडळी या हल्ल्यांमध्ये सरकारातल्या मंत्र्यांचाच, अगदी मुख्यमंत्र्यांचाही कसा हात आहे आणि आपण ते पुराव्यानिशी कसं सिद्ध करू शकतो ते तावातावाने ओरडून सांगतील आणि नंतर ३-४ दिवसांतच (दिल्लीच्या हस्तक्षेपानंतर) आपला कसा गैरसमज झाला होता आणि सरकार कसं निर्दोष आहे अशा दिलगि-या (आणि दिलजमायाही) व्यक्त करतील. 
अम क्र.८ : बरं झालं झाली दिलजमाई. उगाच भांडं फुटलं असतं आणि पुढच्या प्लान्स साठी नवीन बगळे शोधावे लागले असते.

काय बसला ना तुमचाही विश्वास आता की सामान्य माणूस कसा तरबेज झालाय भक करण्यात आणि अम ओळखण्यात आणि तेही एकदम अच्चूक !!! 

"पुण्याच्या बॉम्बहल्ल्यातील सर्व मृतात्म्यांना शांती लाभो आणि अशीच श्रद्धांजली या सगळ्या भ्रष्ट सत्ताधीश नेते, विरोधीपक्षनेते, भ्रष्ट पोलीस, राजकारणी, यांच्यासाठीही वाहण्याची संधी सामान्य माणसाला लवकरात लवकर मिळो ही सदिच्छा !!!"

Friday, February 12, 2010

वादळी

वादळी भाषण, वादळी खेळी, वादळी चर्चा, वादळी सभा असं जिथे तिथे 'वादळी' हे विशेषण जोडून तो शब्द, त्याचा अर्थ, त्याचा डौल, दिमाख कसा अगदी वादळवून टाकलाय आपण. (हो वादळणे असा शब्द आहे. त्याचा अर्थ एखादा पदार्थ खराब होणे, किंवा पापड, चिवडा मऊ होणे या अर्थी. ) .. पण मी आज हा शब्द अगदी ख-याखु-या अर्थाने वापरणार आहे कारण तेवढ्याच जवळून अनुभवलं मी एक वादळी वादळ. हिम वादळ. स्नोस्टॉर्म.. म्हणजे ते पुस्तकात किंवा  डिस्कव्हरीवर दाखवतात तसं जीवावर बिवावर बेतलेलं नव्हे. पण अगदी जवळून पाहिलेलं आणि मस्त मजा केलेलं हे वादळी वादळ.

weather.com च्या म्हणण्यानुसार मंगळवार (९ फेब) रात्री १० पासून स्नो सुरु होणार होता तो डायरेक्ट गुरुवार सकाळ ८ पर्यंत. या weather.com ची लोकांना घाबरवण्याची आणि अमेरिकनांनी त्याला घाबरण्याची जुनी पद्धत, सवय पाहता मला त्याचं विशेष वाटलं नव्हतं. त्यांनी साधारण ३६ तास म्हटलंय म्हणजे एक १०-१२ तास तरी नक्की पडेल आणि अडीच ते तीन फूट म्हटलंय म्हणजे (जर्सीत) नक्की एक दीड फूट तरी पडेल असा अंदाज आम्ही बांधला होता.

मंगळवार सकाळपासूनच बुधवारच्या स्नोस्टॉर्मबद्दल ऑफिसमध्ये चर्चा चालू होत्या. वादळी नाही नुसत्याच. स्नोमुळे ऑफिस मधली सगळी महत्वाची कामं ४८ तास पुढे  ढकलण्यात आली होती. त्यामुळे विशेष काम नव्हतं. (आणि त्यामुळेच की काय) जो तो एकमेकांना, किंवा थोडक्यात भेटेल त्याला विचारत होता की "काय राव, येणार का उद्या हापिसात?". मला कळेना की हे लोक एवढा का इश्यू करतायत याचा. त्यामुळे मी आपला प्रत्येकाला सांगत होतो की "होय बा, आपुन तर यनारच". आणि असं उत्तर मी दिलं रे दिलं की ते माझ्याकडे एखाद्या gladiator कडे किंवा ३०० मधल्या त्या निर्भय योद्ध्याकडे - किंवा .. जाउदे सालं.. तर अशा नजरेने बघत.

पण संध्याकाळ होता होता हे जरा जास्तच सिरीयस प्रकरण आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं. कारण नवीन-यार्कातल्या आणि नवीन-जर्सीतल्या ब-याच शाळा, दुकानं दुस-या दिवशी बंद राहणार होती. अनेक कंपन्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये  घरून-काम करायला सांगितलं होतं. मात्र आमच्या ऑफिस मध्ये हे घरून-काम वाले लाड पोसले जात नसल्याने आम्हाला ऑफिसला जायला लागणार हे (हिमवर्षावाआड लपलेल्या) सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं. किंवा मग दांडी मारून घरी बसा. पण मी (इतरांच्या दृष्टीने) वर्कहोलिक (म्हणजे दारू पिऊन काम करणारा असं नव्हे) या सदरात मोडत असल्याने मी ऑफिसला जायचंच अशा विचारात होतो. रात्री १० ला सुरु होणार सांगितलेला स्नो चक्क चक्क ९ लाच सुरु झाल्याने प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे अशा निष्कर्षापर्यंत आम्ही येऊन ठेपत असतानाच १० लाच स्नो बंद झाल्याने weather.com आपलं काम अजूनही तेवढ्याच कार्य-तत्परतेनं करत आहे हा आमचा विश्वास अजून वृद्धिंगत झाला. (इंग्रजीत म्हणतात तसं four-fold म्हणजे चौपदरी झाला असं म्हणणार होतो मी खरं तर, पण उगाच तो विश्वास आहे की रस्ता असल्या प्रश्नांना उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून तो दुसरा शब्द वापरला आहे.)

बाळराजांच्या कृपेने रात्री दीडला झोपताना पुन्हा एकदा पडदा थोडासा सरकवून बघितला तरी स्नोचा मागमूसही न दिसल्याने उद्या सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जावं लागणार या विचारात झोपून गेलो. आणि.. बरोब्बर सहा तासांनी जेव्हा पुन्हा एकदा तो पडदा सरकवला तेव्हा मतकरींच्या 'धुकं धुकं धुकं' कथेची आठवण व्हावी अशी अवस्था झाली होती बाहेर. स्नो/हिम, बर्फ, धुकं अशा सगळ्या पांढ-या, हलक्या (वजनाने), पण थंडगार वस्तूंच्या घाऊक (आपला होलसेल हो) बाजारात शिरल्याचा भास होत होता. सगळं पांढरं पांढरं दिसत होतं. नजर टाकू तिकडे फक्त बर्फ दिसत होता. खूप दिवसात साफ न केलेल्या  फ्रीझरमध्ये बसलेल्या आईसक्रीमच्या कपाने डोळे उघडून आजुबाजुला बघितल्यावर त्याला ज्याप्रमाणे नजर टाकू तिथपर्यंत (म्हणजे तेच ते जे १-२ फूट काय असेल ते) बर्फ दिसत असेल आणि तेव्हा त्याला जसं वाटतं असेल अगदी तसं वाटत होतं आम्हाला घरात बसून बाहेरचा तो पांढरा थर बघताना. (हे "खूप दिवसात साफ न केलेल्या" हे बर्फाचा थर सांगण्यासाठी आहे. घर आणि फ्रीझर दोन्ही स्वच्छ असतं हो आमचं..) त्या स्नो/हिम-बर्फ-धुकं रूपी महाभूतांना पटकन टाटा करून मी पडदा लावून टाकला आणि त्यांच्या नुसत्या दर्शनानेही गार पडलेल्या घशाला कॉफीची किती नितांत आवश्यकता आहे हे ओळखून स्वयंपाकघरात पळालो.गरमागरम कॉफीचे घुटके घेत टीव्हीवरच्या सगळ्या बातम्यांच्या वाहिन्यांचं २-२ मिनिट दर्शन घेत असताना काही बाबी लक्षात आल्या.

१. weather.com आपलं काम करतंय. म्हणजे खरोखर या अर्थी.
२. आत्ता बाहेर जवळपास १०-१२ इंच स्नो आहे आणि उद्या सकाळपर्यंत एकूण १८-२० इंच स्नो पडण्याची शक्यता आहे.
३. दुपारी १२-३ मध्ये बाहेर पडल्यास आपल्या सगळ्या अंतिम इच्छा पु-या करून बाहेर पडा. कारण त्या ३ तासांत जबरदस्त हिमवर्षाव होणार होता. भयंकर वादळ, वारा, स्नो यांचं तांडव बघायला मिळणार होतं.
४. ३ नंतर वादळ कमी झालं तरी भरपूर स्नो पडत राहणारच होता.
५. हा स्नो कमी होत जात जात हळू हळू दुस-या दिवशी पहाटे ४ ला संपूर्ण विश्रांती घेणार होता.

अशा सगळ्या गार गार गोष्टींचे उल्लेख सारखे सारखे ऐकून कपातलीच काय तर तोंडातली, पोटातली आणि मायक्रोवेव्हमधलीही कॉफी घाबरून गार पडली. ऑफिसला जाण्याचा 'to be or not to be' चा  माझ्यासारखाच खेळ खेळणा-या २-३ मित्रांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपला ट्रेनप्रवास (जमिनीखालून असल्याने) सुरक्षित आहे. ट्रेन्स वेळेवर आहेत. ट्रेनच्या अॅलर्टस साईट वर जाऊन तिथेही पुन्हा एकदा खात्री करून घेतली. आणि मग थोडा उशिराच निघालो ऑफिसला जायला. आधीच एक तर अमेरिकेतल्या गाड्या पादचा-यांना दबकून जात असतात त्यात पुन्हा हे सोन्याहून पिवळं किंवा पांढरं झाल्याने त्या अजूनच हळू जात आहेत हे बघून मी खरोखरच ३०० मधल्या सैनिकांसारखी  दाणदाण पावलं टाकत रस्ते क्रॉस करायला लागलो. अर्थात शूजना एकसारखा चिकटणारा स्नो त्या दाणादाणीत झटकून, उडवून टाकणे हा गुप्त उद्देशही होताच. अर्थात गाड्या अगदी वेळेवर होत्या आणि माझ्यासारखे शूरवीर फारच कमी असल्याने गाडीत कुठेही बसायची सोय होती आज. थोडक्यात नेहमीपेक्षा आजचा प्रवास जास्त सुरळीत, सुरक्षित आणि सुरळीत झाल्याने मी जास्तच सुशीत आपलं खुशीत ऑफिसला आलो. मेलबॉक्स (ऑफिसचा, ग्रेटमेलचा नव्हे) चेक करताना पाहिलंच मेल बघून माझा जबडा वासला की कायसं म्हणतात ते झालं. कारण आमचा मॅनेजर आठलाच ऑफिस मध्ये हजर झाला होता आणि "I'll cover the support today" अशा डरकाळ्या इतर टीम्सन उद्देशून फोडून झाल्या होत्या. मीही 'Reply All' करत "खडे है हम भी राह मे" म्हणत माझ्या अस्तित्वाची आणि (त्याच्या मानाने माझ्या सेमी) शूरपणाची जाणीव सगळ्यांना करून दिली.

बरोब्बर बारा वाजता अचानक ती सकाळची चौ-महाभूतं एकत्र आली आणि बहुतेक (त्यांना) चुकल्याचुकल्यासारखं वाटत असल्याने जोरदार वा-याचं पाचवं भूतही त्यांना सामील झालं. आणि चॉकलेटसाठी अँ ऊं करणा-या मुलाने बघता बघता भोकाड पसरून, हातपाय आपटत वस्तू भिरकावून द्यायला लागावं अगदी त्याप्रमाणे हळूहळू, भुरूभुरू पडणा-या स्नोने पाचव्या भुताच्या मदतीने अक्षरश: बघता बघता उच्छाद मांडला. स्नोचा पाउसच तो. पावसाचे थेंब, पावसाची धार, पावसाची सर, पावसाचा धुमाकूळ, पावसाचा धिंगाणा या सगळ्याला CTRL-H मारून replace पावसा with स्नो असं करून जे वाक्य बनेल ते वाक्य माझ्यापासून १० फूट अंतरावर जिवंत होत होतं. तुफान, जबरदस्त, शॉल्लीट असली सगळी विशेषणं लुळी-पांगळी होऊन पडावीत इतका प्रचंड जोर होता वादळाचा. अक्षरश: तांडव चाललं होतं. होता होता त्या तांडवाचा कौतुक समारंभ पुढल्या १५-२० मिनिटात संपला. आता ऑफिसमध्ये आलोच आहोत तर जरा काम करावं अशा उदात्त हेतूने मी शेवटी नाईलाजाने मॉनिटरमध्ये तोंड घातलं.

टंगळमंगळ  करत, काहीतरी फालतू कामं करत बसलो असताना अचानक २-३ तासांतच शूर मॅनेजर साहेब निघून गेले आहेत असं त्यांच्या मेल वरून कळलं. "अच्छा म्हणून सकाळी लवकर येण्याची नाटकं काय रे चोरा" असा विचार जेवढ्या तत्परतेने माझ्या मनात, मेंदूत, जिभेवर आला त्याच्या चौपट (शी इथे तर चौपदरी जामच फालतू वाटेल) वेगाने मी तो परत आत ढकलून दिला कारण त्याच्या मेलचं शेवटचं वाक्य होतं की

"Heramb, If you think you are going to face problems with your commute back home, you have my authorization to leave now"

आनंदी आनंद गडे, आज आनंदी आनंद झाला, आनंदवनभुवनी, आनंद सिनेमातली इतर गाणी अशी अनेक आनंदविषयक गाणी (मनातल्या मनात) गाऊन मी माझा आनंद साजरा केला. अर्थात मोठ्याने गाऊन साजरा केला असता तरी काही विशेष फरक पडला नसता एवढी तुरळक उपस्थिती होती हापिसात.

ते मेल माझ्या इनबॉक्स मध्ये डोकावल्यापासून साडेतीन मिनिटाच्या आत मी ऑफिसच्या बाहेर होतो. घरी परत जाताना पुन्हा सकाळसारखंच दाणदाण पावलं टाकत चालायला लागलो. सकाळपेक्षा आता परिस्थिती जरा जास्तच बिकट होती. पण जरा सवयही झाली होती. तर आता पुन्हा घरी कसा गेलो वगैरे सांगून जास्त पकवत नाही. घरी जाताना अर्थातच भ्रमणध्वनीतील प्रतिमाग्राहकाला कामाला लावलं. अहो सेलफोन वरून फोटोज आणि विडीओज काढले. आणि घरी येऊन पाहतो तर काय बायकोने माझ्या दुप्पट फोटोज आणि विडीओज काढले होते.

संध्याकाळ होऊन गेली होती. वादळही एव्हाना माणसाळलं होतं. आणि हळूहळू एकेक भूत काढता पाय घ्यायला लागलं होतं. त्यामुळे स्नोचा हट्टीपणाही कमी कमी होत होत शेवटी दहाच्या आसपास तोही पूर्ण गुप्त झाला. आणि एक वादळ संपलं.

तर एवढं सगळं (रटाळ) वर्णन करून (आणि फोटोज काढले असं नुसतं सांगून) तुम्हाला अर्ध्यावर सोडून देण्याचा देशद्रोहीपणा (आता यात काहीही देशद्रोहीपणा नाहीये हे मलाही माहित्ये पण नुसतं द्रोही विचित्र वाटतंय आणि  द्रोही म्हटलं की देशद्रोहीच लिहायची आणि वाचायची एवढी सवय झालीये ना की.... ) मी करणार नाहीये. बेचव जेवणानंतर आलेलं सुंदर डेझर्ट जसं मस्त चव आणतं ना तोंडाला तसंच ही पकवापकवी संपल्यानंतर दिसणारे हे फोटोज, विडीओज नक्की मूड खुलवतील ही माफक अपेक्षा !!

घरातून काढलेले फोटो

हापिसातून काढलेले फोटोWednesday, February 10, 2010

बारा-मति


आपल्याला जगण्यासाठी काय काय लागतं? बापरे हा माणूस आता जीवन, आयुष्य असं काय काय बडबडत चावणार असं तुम्हाला वाटणं साहजिक आहे. पण नाही मी पकवणार नाहीये. म्हणजे अर्थात प्रयत्न तरी तसाच आहे. बघू. तर काय काय लागतं? ते अन्न, वस्त्र, निवाराच्या चालीवर नका सांगू. मी जिवंत राहायला काय काय लागतं ते विचारत नाहीये. जगायला (हो. फरक आहे दोन्हींत) काय काय लागतं असं विचारतोय. तर एखादी कला, नाट्य, नृत्य, खेळ असं कोणी सांगेल. पण कुठलीही कला किंवा खेळ येत नसलेल्या माझ्यासारख्या जमातीतल्या एखाद्याला विचारलं तर? तर मी सांगेन की अशाच कुठल्या कला किंवा खेळ यांचा आस्वाद घेणं. तर माझ्यासारख्याला जगायला आवश्यक म्हणजे पुस्तकं, संगीत, चित्रपट, क्रिकेट किंवा तत्सम काहीतरी. अर्थात लॅपटॉप, इंटरनेट, ब्लॉग हेही आहेत त्या यादीत. पण त्याच्यावर नंतर (म्हणजे नंतर कधीतरी) बोलू. त्यातही पुन्हा काही पुस्तकं, गाणी, चित्रपट आपण (मी) पुन:पुन्हा, वारंवार बघतो/ऐकतो एवढी त्यांची सवय झालेली असते आपल्याला. मला तर पार्टनर, व्यक्ती आणि वल्ली, फुलोंके रंग से, (आशाताईंचं) जीवलगा, शोले, आनंद, अब तक ५६, मैने प्यार किया या सगळ्या गोष्टी दर २-४ महिन्यांनी पुन्हा पुन्हा वाचायला, ऐकायला, बघायला लागतातच. नाहीतर चुकल्याचुकल्या सारखं वाटतं. (अर्थात 'मैने प्यार किया' आणि 'अब तक ५६' वर प्रचंड मतभेद होतील. इतके की मी अल्पमतातही जाईन कदाचित.. नाही मला खात्रीच आहे तशी. पर नाविलाज्य को क्या विलाज्य). 

तर माझ्या या सवयींमधला असाच एक चित्रपट म्हणजे "12 Angry Men". १९५७ चा ऑस्कर नॉमिनेटेड. ऑस्कर विजेत्या (या चित्रपटासाठी नाही) हेन्री फोंडाच्या संयत अभिनयाने नटलेला. पण हा चित्रपट बघितला कि आपल्याला वाटतं याला याच चित्रपटासाठी का नाही मिळाला ऑस्कर. 
१९५७ चा म्हटला म्हणजे अर्थातच कृष्ण-धवल. पूर्वी मला कृष्ण-धवल चित्रपट विशेष आवडत नसत. पण नंतर आवडायला लागले. (मॅच्युरिटी का कायसं म्हणतात ते हेच असावं) कारण आत्ताचे साय-फाय, हायटेक, कॉम्प्युराईज्ड, अॅनिमेटेड, कृत्रिम टेक्नो-थ्रिलर्स (सरसकट सगळे नव्हे) बघितले की ५०-६० च्या दशकात यातलं काहीही नसतानाही निव्वळ मनाला भिडणारी कथा, संवाद, पार्श्व-संगीत, दिग्दर्शन या सगळ्यांतून निर्माण झालेल्या कलाकृती मनाला जास्तच भिडतात. कारण त्या सच्च्या असतात. आणि कधीही आपल्या आजूबाजूला घडू शकतील असं वाटायला लावणा-या असतात. त्यामुळे एकाच वेळी हव्याशा आणि नकोशा वाटणा-या असू शकतात. माझं "दो बिघा जमीन" बघताना असं झालं होतं.

आणि हो अजून एक. हा लेख म्हणजे त्या चित्रपटाचं समीक्षण नाही. चित्रपटाचं परीक्षण किंवा समीक्षा करायला त्या क्षेत्राचं सखोल ज्ञान लागतं जे पूर्वीचे कमलाकर नाडकर्णी किंवा आताचे मुकेश माचकर, श्रीकांत बोजेवार, जयंत पवार, गणेश मतकरी अशा लोकांकडेच आहे. मी तर एक सर्वसामान्य नेत्रसेन (कानसेनच्या तालावर). सामान्य प्रेक्षक. त्यामुळे हा चित्रपट मी फक्त माझ्या नजरेतून मांडतोय.
तर नावात आल्याप्रमाणे हा चित्रपट १२ भिन्न प्रकृतीच्या, स्वभावधर्माच्या लोकांचा एक ठाम, सक्षम, सुयोग्य निर्णय घेण्याच्या दृष्टीने (न ठरवता केलेला) प्रवास. कथा आणि चित्रपटाची रूपरेषा बघण्याआधी एक गोष्ट पटकन सांगतो. ही कथा अमेरिकन न्याय-व्यवस्था, कोर्टखटला आणि ज्युरींचा अंतिम निर्णय यावर आहे. अमेरिकन न्यायव्यवस्थेत प्रत्येक खटला हा ज्युरींसमोर चालतो. वकील मुद्दे मांडतात, न्यायाधीश खटल्याच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतात. पण सगळे मुद्दे, साक्षी, पुरावे ऐकून, तपासून आरोपी दोषी आहे कि नाही याचा अंतिम निर्णय देतात ते ज्यूरीच. हे ज्युरी म्हणजे विशेष कोणी नाही तर तुमच्या आमच्यासारखेच सामान्य (अमेरिकन) नागरिक असतात. प्रत्येक खटल्यासाठी न्यायालय अशा ज्युरींची रँडमली निवड करतं. त्यांचा त्या खटल्याशी, निकालाशी, साक्षीदारांशी काही संबंध नाही हे बघून घेऊनच अर्थात. आणि कोणालाही असं कोर्टाचं 'ज्युरी ड्युटी' साठी उपस्थित राहण्यासाठीचं पत्र आलं की ते बंधनकारक असतं. आणि एखादी व्यक्ती ज्युरी ड्युटीसाठी अनुपस्थित राहिली तर तो गुन्हा मानला जातो.

तर चित्रपटाची सुरुवात होते एका १८ वर्षांच्या मुलावरचा खटला संपतानाच्या प्रसंगातून.  आपल्या वडिलांचा खून केल्याचा आरोप असतो त्या मुलावर. सगळे साक्षी, पुरावे त्याच्या विरुद्ध असतात. घटना प्रत्यक्ष पाहिलेले साक्षीदार असतात, गुन्ह्यातलं हत्यार सापडलेलं असतं. तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवर न्यायाधीश ज्युरींना आरोपी दोषी आहे किंवा काय यावर चर्चा करायला सांगतात आणि निर्णय देताना तो एकमताने असावा असं सांगतात. म्हणजे दहा जणांना वाटतंय दोषी आहे आणि दोघांना नाही असं व्हायला नको अशी विनंतीही करतात. एक तर खटला ऐकून ऐकून कंटाळलेले, घरी जायची घाई असलेले, वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि निरनिराळ्या पार्श्वभूमीचे लोक आणि त्यातही सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ पुरावे पाहून अर्थातच आरोपी दोषी आहे असं घोषित करून चर्चा संपवण्याच्या मार्गावर असतात. पण हेन्री फोंडाला हे मान्य नसतं. तो म्हणतो कुठलाही पुरावा निर्भेळ नाही. प्रत्येकात संशयाला थोडीफार जागा आहेच. आणि अशी संशयाला जागा असताना एखाद्या व्यक्तीला मी असं सरळ सरळ चर्चा न  करता दोषी ठरवू शकत नाही. काहीच निष्पन्न होत नाहीये हे बघितल्यावर प्रमुख ज्युरी म्हणतो कि आपण मतदान घेऊ. अर्थात फोंडा सोडून सगळे ताबडतोब आरोपीला दोषी ठरवण्याबद्दल मतदान करतात. मग फोंडाला विचारलं जातं कि तू एवढा विरोध करतो आहेस शिक्षेला तर तुझं काय म्हणणं आहे किंवा तुला तो का निर्दोष वाटतोय हे तरी सांग. आणि त्याचं पुन्हा पुन्हा हेच उत्तर असतं कि "I Don't know. माझ्याकडे काहीही पुरावा नाहीये तो दोषी नसल्याचा. पण मी फक्त एवढंच म्हणतोय की तो दोषी असेलच असं मला ठामपणे वाटत नाहीये आणि त्यासंदर्भात आपण चर्चा करू.". तर अशा रीतीने चर्चा करत करत, वादविवाद होत, प्रसंगी ऑलमोस्ट हाणामारी करत करत एकेकाचं मत बदलत जातं. या सगळ्या चर्चांमधून समाजाची प्रवृत्ती, स्वभाव, निष्क्रियता, निष्काळजीपण, 'मला काय त्याचे' हा भाव अशा विविध छटा दिग्दर्शकाने अप्रतिमरित्या टिपल्या आहेत.

मला वारंवार हेन्री फोंडा, फोंडा असं म्हणावं लागतंय कारण चित्रपटात कुठल्याही पात्राच्या (अपवाद शेवटच्या प्रसंगातली दोन पात्र) नावाचा उल्लेख नाही कारण ज्युरींनी आपली ओळख गुप्त राखायची असते असा नियम आहे. त्यामुळे पूर्ण चित्रपटात "हे यु जंटलमन" किंवा "ज्युरी नंबर ५" अशाच नावाने सगळेजण एकमेकांना उल्लेखतात. अर्थात त्या 'यु जंटलमन' वरून प्रसंगी 'यु बास्टर्ड' पर्यंतची वाटचाल श्वास रोखून धरायला लावणारी आहे. तर फोंडा एका प्रसंगात त्या साक्षीदाराप्रमाणे चालतो तो प्रसंग, किंवा भाषा, उच्चार, व्याकरण, बोलण्याची पद्धत यावरून माणसाची योग्यता ठरवणा-या एका ज्युरीला दुस-याने त्याच प्रकारे तोंडघाशी पाडण्याचा प्रसंग, फोंडाचे तळमळीने मुद्दा मांडण्याचे, आपला विषय पटवून देण्याचे अनेक लहान-मोठे प्रसंग हे वर्णनातीत आहेत. त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा.

चित्रपटाची अजून एक जमेची बाजू म्हणजे सशक्त संवाद. कथेचा जीव छोटा असताना पटकथा आणि त्यापेक्षाही संवाद हे कुठल्याही चित्रपटाला कसे सर्वोच्च पातळीला पोचवू शकतात याचं उत्तम उदाहरण आहे हा चित्रपट म्हणजे. नाहीतर अनेक चित्रपट वर सांगितलेलं सगळं सशक्त असूनही निव्वळ दुर्लक्षिलेल्या संवादांमुळे कोसळू शकतात किंवा अपेक्षित उंची गाठत नाहीत. (माझ्या मते) उत्तम उदाहरण म्हणजे '१९४२, लव्ह स्टोरी'. कलाकार, संगीत, कथा, दिग्दर्शन सगळं उच्च दर्जाचं असूनही निव्वळ सक्षम संवाद नसल्याने हा चित्रपट मनात घर करत नाही. नाहीतर गेल्या वर्षी आलेला नानाचा एक सारखा बकवास चित्रपट.. (हो. 'एक' हेच चित्रपटाचं नाव आहे).. तो खरं तर २ दिवसही चालला नसता पण नानाच्या जबरदस्त संवादामुळे तो थोडीफार तरी तग धरू शकला. यात मी १९४२ हा एक पेक्षा चांगला होता वगैरे असलं काही म्हणत नाहीये.

यात हातघाईच्या एका प्रसंगात आपले रोजच्या जीवनातले बोल हे कधीकधी कसे अगदी निरर्थक आणि निव्वळ नेहमीच्या बोलण्याच्या सवयीतून आलेले असतात यावर एक उत्तम प्रसंग आहे. त्या प्रसंगातले संवाद, त्यांचं टायमिंग हे एवढं अफलातून आहे कि तो प्रसंग, त्यातली पात्र अक्षरश: त्याक्षणी लगेच आपल्या मनात घर करतात.

मी त्यातल्या त्यात कथा न उलगडू देण्याचा प्रयत्न केला आहे (आणि त्यात मी सपशेल फसलो आहे हे पण मला माहित आहे.) पण तरीही काही चित्रपट असे असतात कि त्यांची कथा कळली तरी चित्रपटाची मांडणी, सादरीकरण, विषय, संवाद यांच्या वेगळेपणामुळे कथा थोडी माहित असली तरीही चित्रपट बघायला खूप मजा येते. तर सांगायचा मुद्दा हा की अशाच वर्गातला चित्रपट आहे हा. 

मागे एकदा "100 movies you should watch before you die" असं एक इ-मेल फॉरवर्ड आलं होतं मला बऱ्याच वर्षांपूर्वी आणि त्यात या चित्रपटाचा उल्लेख होता. आणि तो किती किती किती योग्य होता हे मला तो बघितल्यावरच कळलं.

तर बघताय काय बघाच लगेच.. भेटूच !!

एक राहिलंच : आपल्याकडे पण मागे याच कथेवर बेतलेला पंकज कपूरचा 'एक रुका हुआ फैसला' नावाचा चित्रपट आला होता. पण (बहुतेक) त्याच्या आर्टफिल्म किंवा समांतर सिनेमा (आत्ताच्या भाषेत मल्टीप्लेक्स सिनेमा ) सदृश्यतेमुळे तो विशेष चालला नाही.

* सर्व चित्रे अर्थातच गुगल इमेजच्या मदतीने.

Friday, February 5, 2010

एक(चि)दंत !!


आपल्याला संक्रांतीच्या दिवसात संक्रांतीच्या शुभेच्छांचे, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांचे, दिवाळीत दिवाळीच्या शुभेच्छांचे, दस-याला दस-याच्या शुभेच्छांचे पोस्ट्स बघायला मिळतात प्रत्येक ब्लॉगवर. शी काय फालतू लिहितोय मी. थोडक्यात म्हणजे त्या त्या सणाच्या, उत्सवाच्या काळात ते ते पोस्ट्स बघायला मिळतात. हा हे किती सोप्पं. पण सध्या काय सिझन चालू आहे मला माहित नाही किंवा तो कसा ओळखायचा हेही मला माहित नाही पण मराठीब्लॉग्स.नेट वर गेल्या पंधरा-वीस दिवसांतले पोस्ट्स बघितले तर आपली ब्लॉगर लोकं (एकत्र नव्हे वेगवेगळी) स्वत:साठी किंवा आपल्या पोराबाळांसाठी दंतवैद्यांचे उंबरठे झिजवताहेत असं लक्षात आलं. कोणी दात काढतंय म्हणजे काढून घेतंय, कोणी रूट कनाल करतंय म्हणजे करून घेतंय (हे दर वेळी लिहायला नको आता) , कोणी सिमेंट भरतंय तर कोणी चांदी भरतंय. असं काय काय चालू होतं. हे सगळे पोस्ट्स वाचतोय तोवर माझ्यावरही दातासंबंधीचं पोस्ट टाकायची वेळ आलीये हे माझ्या लक्षातही आलं नाही !! आज टाकू उद्या टाकू करता करता राहून जात होतं आणि त्यात मधेच त्या कु. नुरिया बीअरेकर, रारा (राजपुत्र राहुल) आणि बाळ्या फिरवेकर यांची पण शाळा घ्यायला लागली. त्यामुळे अजून थोडा उशीर झाला. असो.
पण हे दातांवरचं पोस्ट माझ्या इतर ब्लॉगु-ब्लगिनींच्या (बंधू-भगिनीच्या तालावर) अनुभवापेक्षा आणि पोस्ट्सपेक्षा थोडसं वेगळं आहे. कसं ते कळेलच.

झालं काय की परवा रात्री लेकाची पेज पिऊन झाल्यावर बायकोने त्याला सिंकच्या इथे नेलं तोंड धुवायला. मी (नेहमीप्रमाणेच) हॉलमध्ये बसलो होतो. आणि अचानक बायको किंचाळली. म्हणजे आनंदातिशयाने. "अरे हेरंब पटकन आत ये".. मी काय झालं काय असं ओरडत घाबरून स्वयंपाकघरात धावलो. (कारण तोवर ती मला आनंदातिशयाने ओरडते आहे हे कळलं नव्हतं.). आत गेल्यावर बायकोने मला लेकाच्या खालच्या हिरडीवरून बोट फिरवून बघायला सांगितलं. मी बोट फिरवत होतो आणि अचानक काहीतरी टोचलं. छोट्याशा दाताचं छोटसं टोक वर आलं होतं. अर्थात तिने तसं करायला सांगितलं तेव्हा ती असं का सांगतेय वगैरे असले प्रश्न पडले नव्हते. अर्थातच दात येत असणार हे कळलंच. पण अॅक्च्युअली त्या छोटूश्या दातावरून हात फिरवताना, तो फील पहिल्यांदा घेताना जी मजा आली ना ती अवर्णनीय.

आमचा लेक, आदितेय, म्हणजे घरातला चालता- (रांगता म्हणू हवं तर) फिरता व्हॅक्युम  क्लीनर. जी दिसेल ती गोष्ट तोंडात घालण्याची सवय त्याला पहिल्यापासूनच. त्यामुळे आम्हाला वाटायचं की याला दात लवकर येणार बहुतेक. म्हणून आम्ही कधीपासून वाट बघत होतो. पण कसलं काय. माझ्या एका मित्राच्या त्याच्याच वयाच्या (म्हणजे आदितेयच्या वयाच्या) मुलाला ७ महिन्यात चार दात आले सुद्धा. त्यामुळे याला का अजून दात येत नाहीत असं आम्हाला सारखं वाटत होतं. आणि हा सारखी बोटं किंवा जे दिसेल ते तोंडात घालतो म्हटल्यावर लवकर दात येणार असं गृहीत धरून आम्ही कधीपासून दातांची वाट बघत होतो. अखेरीस ते वाट बघण्याचं प्रकरण संपलं एकदाचं. आता  आमच्या लेकाला पहिला दात फुटला म्हणून काय आम्ही (मी) युधिष्ठिरासारखा जमिनीपासून दोन बोटं वर चालायला लागलो अशातला भाग नाही. युधिष्ठिर स्वत: नव्हे तर त्याचा रथ जमिनीपासून दोन बोटं वर चालत होता आणि तेही त्याच्या लेकाला पहिला दात फुटायच्याआधीपासूनच हे तपशील माहित्येत मला. पण वाक्य जरा चांगलं जुळत होतं म्हणून टाकलं. तर असं तरंगत चालत नसलो तरी जाम आनंद झालाच. एकदम मस्त वाटत होतो. आणि बघता बघता दोन दिवसात वरच्या आरड्याओरड्याचा सीन पुन्हा एकदा झाला आमच्या घरात. मात्र यावेळी मी ओरडत होतो आणि बायको रिसिव्हिंग एंडला होती. (स्कोर SS) . आणि मी तर चक्क २ नवीन दातांचा शोध लावला होतं यावेळी आणि तेही वरच्या जबड्यातल्या. ते तर  इतके कोवळे होते की हाताला टुच्च वगैरे पण काही होत नव्हतं. पण चांगले दोन मोठ्ठे पांढरे ठिपके दिसत होते. म्हणजे पिल्लू आता तीन दातांचा मालक झाला होता तर. वा वा.(अर्थात पहिल्या दाताच्या वेळीच पोस्ट लिहायला सुरुवात केल्याने पोस्टचं नाव तेच ठेवलंय. आणि अर्थात ते आवडलं पण आहे मला.)

पण पूर्वीच एका कोळीयाने (आपल्या टोबी मॅग्वायरने हो..) म्हणून ठेवल्याप्रमाणे ग्रेट पॉवर बरोबर ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी आल्याचा प्रत्यय आम्हाला आला. अर्थात पॉवर बाळराजांना आली होती पण जवाबदा-या आमच्या वाढल्या होत्या. आठ दिवसांनी पुन्हा एकदा त्या आरडाओरड्याचा तिसरा एपिसोड झाला. बायकोला चवथा दात गवसला असण्याच्या शक्यतेने मी पुन्हा एकदा पोराच्या हिरडीवरून हात फिरवण्याच्या तयारीने स्वयंपाकघरात गेलो. थोडा आरामातच आत गेलो यावेळेला. पण बघतो तर काय. यावेळी मातोश्री आनंदातिशयाने नाही तर वेदनातिशयाने ओरडत होत्या. बाळराजांनी त्यांच्या बोटाचा चांगला कडकडून चावा घेतला होता आणि आणि मी आत आलेलो बघून बाळराजे हसायला लागले. नवीन भक्ष्य हाती (दाती) आल्याच्या आनंदाने असेल बहुतेक !!!  ;-) 

("दंत"चित्रे आंतरजालावरून साभार)

Wednesday, February 3, 2010

शब्द बापुडे केवळ वारा !!सुरुवातीला : हे पोस्ट वाचत असताना आवडलं नाही, कंटाळा आला, वैताग आला, बोर झालं, राग आला किंवा रागावून, चिडून अशा कुठल्याही कारणाने जर पोस्ट पूर्ण न वाचताच खिडकी बंद केलीत तरी हरकत नाही पण तसं करण्यापूर्वी तळटीप मात्र नक्की वाचा ही विनंती.

===========

रंभेने नुकत्याच ओतलेल्या अमृताचा चषक एका हातात आणि पृथ्वीवरून नुकतीच आलेली मराठी वृत्तपत्रं दुसऱ्या हातात अशा दोन्हींचा आस्वाद घेत सकाळची छान उन्हं अंगावर घेत साहेब खाटेवर लवंडले होते. त्यांच्या आजूबाजूला --वृत्तपत्रांशी काही संबंध नसल्याने-- फक्त चषकातल्या अमृताचा स्वाद घेणारे त्यांचे कार्यकर्ते बसले होते. वृत्तपत्रांमधल्या बातम्यांवरून नजर फिरत असताना साहेबांच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलू लागले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते अचूक टिपलेही. पण हातात वृत्तपत्र नसल्याने नक्की काय बातमी आहे ते त्यांना कळत नव्हतं. पण काहीतरी आनंदी, विलक्षण चांगली, शुभशकुनी वगैरे वगैरे अशी काहीतरी बातमी आहे हे नक्की कळत होतं. साहेब ५-१० मिनिटं पुन्हा पुन्हा त्या बातम्या वाचत राहिले. आणि अखेर पुटपुटले "धन्य तो बिरबल. नाव काढलं पोरानं"..

अरेच्चा हे काय विक्षिप्तासारखं बोलताहेत साहेब असा चेहरा करून पुलंनी जशी गटण्याच्या डोळ्यात कुठे वेडाबीडाची झाक दिसतेय का ते पाहण्याचा प्रयत्न केला होता तसा प्रयत्न कार्यकर्त्यांनी साहेबांच्या डोळ्यात डोकावून पाहून केला. "काय झालंय काय यांना"  "असं का बडबडताहेत हे" "कोण पोरगा" "बिरबलाचा काय संबंध" असे अनेक प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनात दाटले होते. पण प्रत्यक्षात मात्र यातलं काहीही न बोलता "काय झालं साहेब, साहेब काय झालं" असं काहीसं बोलून हस-या चेह-याने कार्यकर्त्यांनी बातमीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला.

साहेब खूप खुश होते. त्यांनी अजून एक चषक रिता केला आणि पुन्हा म्हणाले "बिरबला तू महान हायेस. माझ्या पोरा तू ग्रेट हायेस". यावेळी मात्र काक काहीही न बोलता स्वस्थ बसून राहिले आणि त्यांनी साहेबांना पुढे बोलू दिले. साहेबांचं मात्र कुठंच लक्ष नव्हतं. ते आपल्याच तंद्रीत बोलू लागले.

"लेकाला लहानपणी गोष्टी लई आवडायच्या. सारखा मागे लागायचा गोष्टी सांगा गोष्टी सांगा म्हणून. आणि रोज नवीन गोष्ट लागायची त्याला.  त्यामुळे मी ससा कासव, इसापनीती, हितोपदेश, सुरस अरबी कथा अशा सगळ्या सगळ्या गोष्टी त्याला सांगत असे. अशीच एकदा मी त्याला अकबर बिरबलाची एक गोष्ट सांगितली आणि ती त्याला इतकी आवडली म्हणून सांगू कि तो मला रोज तीच गोष्ट सांगा म्हणून मागे लागायला लागला."
साहजिकच कुठली एवढी छान गोष्ट असा प्रश्न काकंच्या मनात उभा राहिला. पण साहेब/मॅडम बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नाही ही पक्षशिस्त सगळ्यांच्या अंगात चांगली भिनली असल्याने कोणीही "कुठली गोष्ट" असं विचारायचा उद्धटपणा केला नाही.

साहेब स्वत:हूनच गोष्ट सांगू लागले.

"एकदा बिरबल आणि बादशहा घोड्यावरून रपेट मारत असताना घोडा मधेच धडपडला. बादशहाने चमकून जाऊन विचारले "बिरबला, घोडा का अडला?" बिरबल काही बोलला नाही. त्याने फक्त स्मित केलं. पुढे जात असताना एका झाडाच्या खाली काही पानं पडली होती. चांगलीच सडलेली दिसत होती. नेहमीप्रमाणेच "पानं का सडली" असा बावळटासारखा प्रश्न बादशहाने बिरबलाला विचारला आणि याही वेळेला बिरबलाने काही उत्तर दिले नाही फक्त हसला. पुढे एका गरीब वस्तीतून जात असताना एक बाई झोपडीबाहेर बसून चुलीवर भाक-या करत बसली होती. पुन्हा बादशहाने विचारलं, बिरबला, भाकरी का करपली?
यावेळी मात्र नुसते हसून न दाखवता बिरबलाने उत्तर दिलं " जहापनाह, तुमच्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर आहे माझ्याकडे. घोडा का अडला, पानं का सडली, भाकरी का करपली या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकच. "फिरवली नाही" म्हणून. घोड्याला सराव असता त्याला सतत फिरता ठेवला असता तर तो अडला नसता, पानं हलवली असती, फिरवली असती तर ती सडली नसती, भाकरीही तव्यावर एकाच जागी न ठेवता फिरवली असती तर ती करपली नसती. उत्तर एकच "फिरवली नाही म्हणून".. तात्पर्य एकच "प्रत्येक गोष्ट फिरवा"

साहेब बोलतच होते. 

"ही गोष्ट लई आवडायची आमच्या बाळ्याला. नेहमी असंचं कायसं फिरवाफिरवीचं बोलत असायचा. अलिकडे तर काय काय ती गानी बी म्हनायला लागला व्हता.
अचानक साहेबांच्या डोळ्यासमोर बंद गळ्याच्या कोटातला, केस नीट विंचरलेला दोन्ही हात पसरून गाणं म्हणणा-या बाळ्याचा चेहरा आला. ती गाती मूर्ती त्यांच्यासमोर तरळली.

घोडा फिरवा, भाकरी फिरवा, फिरवा रे सारे
पाने फिरवा, शब्दही फिरवा, फिरवू जग सारे ||१||

फिरत्या शब्दांची ती सुंदर फिरती रे दुनिया
फिरत्या दुनियेसमोर हे जग भासे मोह अन् माया ||२||

फिरत्या शब्दांच्या दुनियेमध्ये फिरती खुर्ची ती
त्या खुर्चीला उबच भारी पण ती तर तात्पुरती ||३||

तात्पुरत्या त्या उबेमध्ये मन शोधे रे गारवा
अजून हवीये उब तर मग अजून शब्द फिरवा ||४||

"अरे मी त्याला घोडा, भाकरी, पानं फिरवण्याबद्दल सांगितलं होतं आणि तेही फक्त बिरबलाच्या गोष्टीत. पण पठ्ठ्या कसला बहाद्दर. भल्या भल्या टोपीवाल्यांना आणि कोटवाल्यांना जमणार नाही असे शब्द फिरवण्याचे चमत्कार करायला लागला हा मुख्यमंत्री झाल्या दिवसापासून.
आता हेच बघा ना आधी जाहीर केलं की मुंबईतील टॅक्सीचालकांना परवाने देण्यासाठी मराठी लिहिता, बोलता आणि वाचता येणं सक्तीचं आहे. पण त्यावर दिल्लीमॅडम कडून जोरदार कानपिचक्या मिळाल्यावर याने त्याच्या त्या लाडक्या फिरवाफिरविच्या  गाण्याप्रमाणे त्याचे शब्द फिरवले, आणि मराठीच नाही तर  हिंदी, गुजराती अशी कुठलीही स्थानिक भाषा आली तरी चालेल अशी सारवासारवी किंवा त्याच्या भाषेत फिरवाफिरवी केली."

साहेब काय महान आहेत आणि पृथ्वीवरची कशी खडान् खडा माहिती आहे त्यांना असं कौतुक काकंच्या नजरेत तरळत होतं. 

"आता ही पुढची बातमी बघा...
NSG मधल्या बिहारी कमांडोजनी २६/११ च्या हल्ल्यात मुंबई वाचवली आणि मुंबईतील परप्रांतियांचे रक्षण करण्यास महाराष्ट्रातील सरकार कटिबद्ध आहे असे युवराजांनी बिहारमध्ये सांगताच याने युवराजांची आज्ञा शिरसावंद्य मनत मुंबईत लगेच पत्रकं काढली आणि मुंबईतील परप्रांतियांचे संरक्षण करण्यास सरकार सक्षम आहे असं सांगितलं. उडाला थोडा गोंधळ. पण त्यावर आपल्या नेहमीच्या सवयीने मार्ग शोधला पठ्ठ्याने. शिताफीने शब्दांची फिरवाफिरवी करत नवीन पत्रक काढून परप्रांतियांसह सर्व जनतेचे संरक्षण करण्यास सरकार कटिबद्ध आहे असं सांगितलं सुद्धा. आहात कुठे.."

काकंच्या चेह-यावरही आता आनंद स्पष्ट दिसत होता.

"लई मोठं झालं माजं लेकरू. अर्थात या मराठी लोकांना आनि नेत्यांना कायबी कळत न्हाई. शेक्युलर बिक्यूलर असं काय काय बोललं की गप बसतात त्ये बी."
साहेब अपार आनंदात असले आणि कौतुकाच्या भरात बोलत असले की त्यांचा टोन, उच्चार असा बदलतो हे
काकंना माहित होतं. साहेब पुढे बोलतच होते.

"खरं सांगायचं तर मला आज मॅडम, युवराज, युवराज्ञी, त्यांचे पीये, अशिश्टंट, पट्टेवाला, शेक्युरीटी, स्वयंपाकी, नोकर, ड्रायवर, गाडी पुसणारा, माळी अशा सर्वांचेच लय आभार मानावेसे वाटतायत. या सगळ्यांमुळेच बाळ्याची एवढी पर्गती झाली.
लेकरा, असाच मोठा हो, देशाची नाही केलीस तरी चालेल पण मॅडमची सेवा नक्की कर आनि नेहमी करत रहा. आनि मग पहात रहा कुठच्या कुठं जाशील ते. "

साहेबांच्या डोळ्यात चक्क अश्रू आले. काकंनी त्यांना कधीच रडताना बघितले नव्हते. सगळे एकदम विस्फारल्या नजरेने साहेबांकडे बघत होते. अचानक एक काक म्हणाला "साहेब, तुम्ही रडताय?"
"हो रे बाळा रडतोय मी. आनंदाश्रू आहेत हे"  साहेब
"साहेब रडू नका. रडू नका साहेब" सगळे काक.
तेवढ्यात साहेबांनी एकदम खवळून शब्द फिरवले "अरे मी कुठे रडतोय. मी कधीच रडत नसतो. रडताय तर तुम्हीच, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं म्हणून पाणी आलं "

==========================

तळटीप : इथे कोणाही मृत व्यक्तीचा अगदी यत्किंचितही अपमान करण्याचा हेतू नाही आणि तरीही जर काही वाक्यांतून, शब्दांतून, वर्णनातून जर कोणाचा अपमान होत असेल, कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर क्षमा मागतो. मात्र अजून एक. या प्रसंगात आढळणा-या प्रत्येक पात्राचं ज्या जिवंत व्यक्तीशी साधर्म्य आहे त्या प्रत्येक जिवंत व्यक्तीचा जास्तीत जास्त अपमान करून पूर्ण चिरफाड करण्याचा हेतू मात्र नक्कीच आहे.

Tuesday, February 2, 2010

राहु (ल)

राहुल म्हटलं ना की
१. कोण राहुल?
किंवा
२.  राहुल कोण?
आणि मग त्याच्यानंतर

३. कोण????? राहुल????

अशा ३ प्रश्नांचं त्रांगडं नाचतं माझ्या मनात नेहमी. काये माहित्ये का अहो चिक्कार मित्र आहेत माझे राहुल नावाचे आणि  माझे मित्र म्हटल्यावर अवली असणार हे ओघाने आलंच. तर दर वेळी कोणीतरी काहीतरी विचित्र प्रकार, मस्ती, गोंधळ, फजिती, पोपट करतं आणि ते प्रकार करणा-याचं नाव शोधताना म्हणजे ती व्यक्ती शोधताना हे असे प्रश्न विचारावे लागतात.

अर्थात राहुल द्रविड, राहुल बोस, राहुल बजाज, राहुल खन्ना अशा सेलिब्रिटीजचाही पंखा आहेच मी (आणि तो साबणाच्या जाहिरातीतला "राहुल, पानी चला जाएगा" वाला राहुल पण आवडायचा मला). पण त्यांच्या बाबतीत असले प्रश्न विचारून नाही शोधावा लागत तो माणूस. कारण २ दिवसात २५० ठोकले की द्रविडांचा, जास्त आरपीएमची नवीन दुचाकी अजून कमी किमतीत बाजारात आली की तो बजाजांचा, मल्टीप्लेक्स दर्जाचा नवीन सिनेमा कायच्याकाय जोरात आपटला की तो बोसांचा किंवा खन्नांचा राहुल,  ही काळ्या दगडावरची रेघ असते.  (तो बायकोला मारझोड करणारा, नशाबाज, गर्दुल्ल्या (आणि तरीही), स्वयंवराला उभा राहणारा राहुल खिजगणतीतही नाही माझ्या हे किती बरं आहे ना?)
अर्थात अजून एक राहुल सुद्धा आहे. पण तो ना धड मित्र ना धड सेलिब्रिटी. अर्थात तो स्वत:ला सेलिब्रिटी समजतो ही गोष्ट वेगळी. पण एखादा स्वत:ला जे काय समजतो ते तो प्रत्यक्षात आहे असं व्हायला लागलं तर मी एक दिवस सचिन तेंडूलकर, दुसऱ्या दिवशी टायगर वूड्स, तिसऱ्या दिवशी बिल गेट्स, चौथ्या दिवशी अमिताभ बच्चन, पाचव्या.....  सहाव्या.....  सातव्या......  असा काय काय होईन.
तर आपल्या या राहुलला अशा काळ्या दगडावरच्या रेघेसारखी ओळख नाही (अर्थात दगडाचा सामाईकपणा सोडला तर) आणि वरच्या साध्या सोप्प्या तीन प्रश्नांच्या उत्तरातूनही त्याला ओळखता येत नाही. त्याला ओळखण्यासाठीच्या प्रश्नांचा सेट वेगळा आहे. थोडा मोठ्ठा आहे. पण सगळेच्या सगळे प्रश्न लागू होतात त्याला ओळखायला.

१. मुर्खासारखं बडबडून लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतो?
२. कुठेतरी उगाच विदर्भातल्या गावातल्या एका गरीब घरात रात्री मुक्काम करून त्यांच्याबरोबर जेवणाची नाटकं करत चमकोगिरी करतो?
३. त्याचं सभेला जाणं किती आवश्यक आहे हे दाखवण्यासाठी कुठेतरी अंधारात हेलीकॉप्टर उतरवून आपण कसे डॅशिंग आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतो?
४. आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना त्याला पंतप्रधान करा असं म्हणायला भाग पडून स्वत: मात्र "मला अजून खूप शिकायचंय, मी सध्या तरी साधा कार्यकर्ताच राहणे पसंत करीन" असे विनम्र(!!) उद्गार काढतो?
५. कुठलाही कसलाही वाद नसताना उगाच "कोणीही मुसलमान पंतप्रधान होऊ शकतो" अशी नसती सर्वधर्मसमभावाची (वाचा मुस्लीमधर्मसमभावाची)  मुक्ताफळं अकारण, काहीही गरज नसताना उधळतो?
६.
६-अ. सैनिकांची जात, भाषा, प्रदेश यावरून ओळख करून देत भारतीयांना आत्तापर्यंत अनोळखी असलेल्या क्षेत्रातलं अमूल्य ज्ञान पुरवतो?
६-आ . मी सैनिकाची भाषा काढली तरी चालेल पण मुंबईतल्या नेत्यांनी टॅक्सीवाल्यांचीही भाषा काढायची नाही अशी गर्भित धमकी असलेलली भाषणं ठोकतो?
६-इ. त्याचा पक्ष सतत हरत असणा-या प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून तिथल्या मतदारांना खुश करण्यासाठी राष्ट्रीय अस्मिता असलेल्या सैन्याला भाषा, प्रदेश अशा सीमांमध्ये बांधायला मागे पुढे पाहत नाही?

तर अशी खूप म्हणजे खूप मोठ्ठी यादी आहे प्रश्नांची आमच्या या राहुलला ओळखण्यासाठी. पण आपण सगळे सुज्ञ आहात त्यामुळे पहिल्या २-३ प्रश्नांतच ओळखलं असाल.

तर असा आमचा हा बिचारा राहुल. काही काही साध्या गोष्टी ना त्याच्या लक्षातच येत नाहीत.

-त्याच्या हे लक्षात येत नाही की त्याला मिळणारा मान हा राहुलला मिळणारा मान नाहीये तर एका माजी पंतप्रधानाच्या मुलाला, नातवाला आणि पणत्याला [हे कसं लिहायचं? (कंसात कंस : हे राहुल नाही मी विचारतोय) ] मिळणारा मान आहे.
-त्याला हे कळत नाही की नुसते पांढरे कपडे घातले की नेता होता येत नाही. माझा एक (राहुल नाव नसलेला) कार्यकर्ता मित्र नेहमी म्हणतो की "नेता बनना है तो ताने खाना सिखो".
-त्याला-म्हणजे राहुल नाव नसलेल्या मित्राला नव्हे तर वरच्या ६ कलमी कार्यक्रमातल्या राहुलला-हेही कळत नाही की त्याचा पक्ष सर्वधर्म समभावाचे एवढे गोडवे गातो पण जास्त "भाव" एकाच धर्माला देतो.
-त्याला हे कळत नाही की धर्मातल्या भेदभावाला न मानणारा त्याचा पक्ष निवडणुकांची सारी गणितं मात्र जातीपातींच्या हातच्यांच्या मदतीनेच सोडवतो.

असो. पण त्याचाही काही दोष नाही म्हणा. १२५ वर्षांच्या पक्षाची ध्येयधोरणं ४० वर्षांचा तरुण (?) कसा बदलणार? पण राहुलबाबा, तुला एक गुपित सांगतो रे. जरा सांभाळून बोलत जा रे बाबा. कारण तू काय बोलतोयस (ते कितीही बालिश आणि मूर्खपणाचं असलं तरी) त्याचे वेगळेचं अर्थ काढून रान माजवून देण्यासाठी हे विरोधी पक्षवाले आणि मिडीयावाले टपूनच बसलेले असतात रे. आता म्हणालास तू मुस्लीम व्यक्तीला करू पंतप्रधान म्हणून (आपल्या बापाचं काय जातंय, वचने किम् दरिद्रता?),  किंवा म्हणालास की २६/११ ला NSG च्या बिहारी कमांडोजनी वाचवलं मुंबईला तर असुदेतकी. यांच्या का एवढं पोटात दुखतं कळत नाही. तू राहुल आहेस, तू काहीही करू बोलू शकतोस हे पचतच नाही या अल्पसंतुष्ट मराठी लोकांना. अर्थात कोलंबियन (एक्स)गर्लफ्रेंड असणा-या महान नेत्याची दूरदृष्टी या कुपमंडूक महाराष्ट्रीयांकडे कुठून येणार. 
माझंचं चुकलं. उगाच तुला जपून बोलायला सांगितलं. शेवटी मराठी पडलो ना. तर तू आपला विरोधी पक्ष, मिडिया, कोण्णा कोण्णाकडेही लक्ष देऊ नको. अगदी माझ्याकडेही नको. (नाहीतरी फडतूसच ब्लॉग आहे माझा). आणि पुल म्हणतात तशा शिव्या देत, पान खात लोकांचे लक्ष नसेल तरी बडबड बडबड करत राहणाऱ्या मास्तरांसारखा  बोलत रहा बोलत रहा. नक्की होशील पंतप्रधान एक दिवस.

बोलो राहुल बाबा कि जय !!!

Monday, February 1, 2010

ब्याद साली !!


चला.. गाडीने माणसं उडवणाऱ्या त्या हरामखोर संजीव नंदा, सलमान खान (तो तर माणसं, हरणं असं सगळंच मारतो) आणि अशा कित्येक  माजोरड्या श्रीमंतांच्या माळेतला मेरुमणी म्हणून नुरिया हवेलीवालाचं नाव ओवलं गेलं तर. दोघांना उडवलं बेशरम बेवडीने.. त्यातला एक पोलीस शिपाई आणि दुसरा सामान्य नागरिक. बयेने पार्टीतून निघताना दारू ढोसली होती, गाडी चालवताना बीअरचा एक कॅन ढोसून झाला. गाडीत मागच्या सीटवर ४ कॅन्स सापडले म्हणे. तिने गुन्हा कबुल केलाय पण त्यात पण तिची दोन व्हर्जन्स वाचनात आली. एकात म्हणे पोलीस चेकिंग चालू असलेलं बघून ती घाबरली (ढोसली असल्याने) आणि ब्रेकच्या ऐवजी एक्सलरेटर दाबला गेला तर दुसऱ्यात म्हणते की गाडी चालवत असताना बीअर पिण्यासाठी मान वर केली आणि तेवढ्यात गाडीवरचा ताबा सुटला. कुठलाही ग्राह्य धरलं तरी ती दोषी आहे हे नक्की. पण तिचा हलकट बाप म्हणतोय की तिने दारू प्यायालीच नव्हती. गाडीचा टायर फुटून अपघात झालाय. 

कधी नव्हे ते आपल्या हुशार पोलिसांनी गाडीची तपासणी केली. तसंच होंडा कंपनीकडून पण तिची तपासणी करवून घेतली. त्या अहवालानुसार टायर आणि इतर सगळे पार्टस ठीक आहेत. म्हणजे अपघात झाला तो गाडीतल्या दोषाने नव्हे तर गाडी चालवणाऱ्याच्या चुकीमुळे. आता पुढे काय? सलमानच्या वेळी पोलिसांनी ९३६ (किंवा फार तर १५-२० रुपडे इकडे तिकडे असेल) रुपये घेऊन सोडून दिलं त्याला. हिला कितीत सोडतायत देव जाणे. सलमानच्या बॉलीवूड इमेजला दबून म्हणे त्याला स्वस्तात सोडून दिलं होतं. पण हवेलीवाला चांगली मालदार पार्टी दिसत्ये आणि इथे काय तसं बॉलीवूड इमेज किंवा तत्सम लोकप्रियता वगैरे भानगड नाहीये. त्यामुळे थोडं जास्त कमिशन घेऊन सोडतील. म्हणजे १५-२० हजार. पण सोडणार एवढं नक्की.

त्या संजीव नंदाला कशी काय शिक्षा झाली देव जाणे. मला वाटतं देशभरातल्या तमाम षंढ न्यायालयं आणि नपुंसक न्यायाधीशांमधला तो एकमेव अपवाद असावा. खोटं नाही सांगत. कुठलाही खटला बघा ना.. कोणीही कितीही माणसं कितीही क्रूरपणे मारोत किंवा कितीही करोड रुपयांचा गफला करोत, शिक्षा काय असते ३ वर्षं कारावास, १५०० रुपये दंड आणि दंड न भरू शकल्यास अजून ६ महिने कारावास. एकापेक्षा जास्त गुन्ह्यात पकडला गेला तर दोन गुन्ह्यांच्या अनुक्रमे ३ वर्षं आणि अडीच वर्षं अशा वेगवेगळया शिक्षा होतात पण त्या दोन्ही एकत्र भोगायच्या असतात. ५ कोटी लुटो नाहीतर ५०० कोटी लुटो शिक्षा ३ हजार, ५ हजार किंवा फार फार तर ७०००. १०००० वगैरे म्हणजे तर डोक्यावरून पाणी. अरे ५ कोटी लुटलेल्या माणसाला ५ हजाराची शिक्षा म्हणजे शिक्षा आहे की न्यायाची भिक्षा? अरे काय मुर्खपणा आहे. कुठल्या जगात वावरतात हे न्यायाधीश लोक? मला कळायला लागल्यापासून कितीही भयानक गुन्हेगार असोत (काही अपवाद वगळता) त्यांना कधीही फाशीची शिक्षा दिलेलं बघितलेलं नाही. खालच्या कोर्टाने जर ठोठावलीच फाशीची शिक्षा तर उच्च न्यायालायातला एखादा भित्रा न्यायाधीश ती कमी करतो... चुकून माकून तो असेल जर थोडा कडक आणि त्याने शिक्षा कायम ठेवली तर काहीही झालं तरी सर्वोच्च न्यायालायाचा महान माणूस ती कमी करतोच. एक अफझल गुरुचा अपवाद वगळला (अर्थात तिथे केंद्र सरकारचा नाकर्तेपणा आणि बेशरमपण आड आला) आणि कोलकात्याचा धनंजय चटर्जी वगळला तर सांगा ना कोणाला झालीये फाशीची शिक्षा. (शिक्षा का देतात? ते गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कायद्याची जरब बसावी आणि त्यांनी आणि इतर कोणीही पुन्हा तसे गुन्हे करण्यापुर्वी १००० वेळा विचार करावा म्हणून ना? पण असल्या दीड-दोन हजार आणि २ वर्षांच्या शिक्षांनी कोणाला कसली जरब बसणार आहे?). २००६ साली त्या देवस्थळी मायलेकींना डॉ दीपक महाजनांच्या निर्घृण खुनाबद्दल झालेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने स्त्रिया म्हणून कमी केली. अरे पण खून करताना पण त्या स्त्रियाच होत्या. आणि तरीही त्यांनी खून केला मग तोच स्त्रीपण फाशीची शिक्षा देण्याच्या आड कसा येऊ शकतो? २००६ च्या भैय्यालाल भोतमांगे प्रकरणात जनावरांप्रमाणे वागून स्त्रियांवर अत्याचार करून त्यांचे खून करणाऱ्या आरोपींना प्रबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडलं जातं. अरे न्याय आहे कि मस्करी? न्यायाधीश आहे की ठोकळा? 

मला माहित्ये लेख जरा जास्तच शिवराळ, उद्धट होतोय. नायायालय, न्यायप्रणालीचा अपमान होतोय. पण त्याबद्दल मी माफी बिफी काही मागणार नाहीये. खड्ड्यात जा. च्यायला आरोपींना योग्य शिक्षा देणे, आणि त्यामुळे कायद्याची जरब गुन्हेगारांच्या मनात निर्माण करून त्यांना गुन्हे करण्यापासून प्रवृत्त करणे हे तुमचं काम. ते तुम्ही धड करत नाही आणि कोणी काही बोललं की लगेच न्यायालयाचा अपमान होतो. अरे असा एवढ्या तेवढ्यावरून हगल्या-मुतल्या तुमचा अपमान होतो तर लोकांना तुमचा अपमान करण्यासारखी विधानं करायला भाग पडावं अशी वेळ आणता कशाला? आणि त्यातून माफी मागेनही पण सिद्ध करून दाखवा की मी खोटं बोलतोय. म्हणून मी बोलणार आज. मला हवं ते आणि हवं तसं. सुशिक्षित आणि पांढरपेशा असल्याने दडपून जाऊन, भाषेचा लहेजा सांभाळून, कोणाला काही लागणार नाही, कोणाचा काही अपमान होणार नाही असं हळू, मृदू, सौम्य भाषेत बोलून निष्क्रीय, नाकर्ते, बेशरम अशा टिपिकल व्हाईटकॉलर शिव्या नाही देणार मी आज. षंढला षंढच म्हणणार, नपुंसकला नपुंसकच म्हणणार. होऊदे कोणाचा अपमान होतोय तो. त्या सगळ्या अतिरेक्यांच्या केसेस लढवणाऱ्या वकिलांच्या, त्यांच्या शिक्षा कमी करायला भाग पाडणा-या सो कॉल्ड मानवाधिकार संघटना आणि त्यांचे सगळे फालतू कार्यकर्ते, सगळे बेशरम, कुत्तरडे राज्यकर्ते, पोलीस, न्यायाशीश यांच्या सगळ्यांच्या आयचा घो च्यायला. आणि आयचा घो म्हणजे महेश मांजरेकरचा दिलगिरीवाला नव्हे. खरोखरचा. सणसणीत, दणदणीत शिवीवाला घो. देतो मी तुम्हाला सगळ्यांना शिवी. थुंकतो मी तुमच्यावर. कुठच्या ब्रिगेडस आणि महासंघ आहेत त्यांनी ऐका रे. तुम्हा सगळ्यांच्या आयचा घो.

अरे उघडा रे डोळे. इथे जळतंय. तळमळतोय रे आम्ही इथे. भरडले जातोय. तो नुरिया हवेलीवालाने खून केलेला (हो खूनच. तिच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला चालवला गेला पाहिजे खरं म्हणजे) सामान्य माणूस म्हटला ना मगाशी. अफझल माकनीजा त्याचं नाव. ३५ वर्षांचा तरुण रे बिचारा.. पोलीस चेकिंगसाठी बाईक थांबवली चेक पोस्ट वर आणि काही क्षणात त्याचं रुपांतर निर्जीव प्रेतात केलं त्या क्रूर बाईने. ऑन द स्पॉट गेला तो. घरी बायको आणि ४ वर्षांची मुलगी आहे. काय करणार त्या? म्हणून म्हणतो जळतंय. कधीचं जळतंय आत मध्ये. ९३ पासूनच. तेव्हाचे बॉम्बस्फोट, नंतर ट्रेन, संसद, अक्षरधाम, बोंब स्फोटांच्या मालिका आणि ताजं २६/११. दर वेळी तीच कथा. मुंबई,दिल्ली,हैदराबाद,बंगलोर,अहमदाबाद इ इ ठिकाणच्या नागरिकांच्या स्पिरीटचं कौतुक करणारे आणि त्या त्या घटनांपासून काहीही बोध न घेता आपला खादाडीचा उद्योग बिनदिक्कतपणे चालू ठेवणारे नाकर्ते राज्यकर्ते. रोज सकाळी ऑफिसला जाताना ग्राउंड झीरोकडे बघताना एकच विचार येतो मनात. कितीही मुर्ख आणि हट्टी असूदे तो बुश पण त्याने अशी काही जरब बसवली अतिरेक्यांच्या मनात, संरक्षण व्यवस्था अशी काही मजबूत केली की २००१ नंतर कित्येक प्रयत्नांनंतरही कोणालाही अमेरिकेचं काहीही वाकडं करता आलेलं नाही. जाउदे. टेररिझम हा विषयच नव्हता. थोडा भरकटलो. अर्थात तो स्वतंत्र लेखाचा किंबहुना प्रबंधाचा विषय आहे.

पुन्हा वळू आपल्या लोकल टेररिझम कडे. हे नंदा, साला खान, ती बेवडी हवेलीवाला हे सगळे लोकल टेररीस्टच. त्यांना धर्माचा माज आणि यांना म्हणजे या लोकलवाल्यांना पैशाचा माज. आणि तोही का तर त्याला खतपाणी घातलं जातं म्हणून. सिग्नल तोडला ५० रुपये द्या चायपानी. दारू पिऊन चालवताय गाडी द्या ५०० रुपये. दारू पिऊन गाडी चालवून माणसं पण मारलीत? बरं ठीके. दोन हजारात मिटवू सगळं  हे असं सगळं चाललंय आणि चालतंय म्हणून यांची पिलावळ फोफावतेय. 

- जर पहिल्या वेळीच त्या नंदाला किंवा नंदाच्या आधी ज्या ज्या कोणी अशी माणसं उडवली आहेत त्यांना १ कोटी रुपये दंड, ७५ वर्षं सक्तमजुरी आणि मेलेल्या प्रत्येक माणसाच्या कुटुंबाला ५-५ कोटी रुपये द्यायचे अशी गंभीर शिक्षा दिली असती तर त्या हवेलीने दारू पिण्यापूर्वी १ कोटी वेळा विचार नसता केला? 

- जर पहिल्या बलात्का-यालाच "पुरुष" नाटकात दाखवली तशी भयंकर शिक्षा दिली असती तर आपल्या मुलीच्या वयाच्या रुचिकाकडे वखवखलेल्या नजरेने पाहण्यापूर्वी एस पी राठोडने असंख्य वेळा विचार केला नसता ? 

- जर पहिली अफरातफर करणाऱ्या उद्योगपती, राजकीय नेत्याला जर अब्जावधी रुपयांचा दंड आणि १०० वर्षं कोठडी अशी शिक्षा दिली असती तर एका तरी नेत्याची छाती झाली असती का आर्थिक भानगडी करून स्वीस बँकेत पैसे लपवण्याची?

- जर पहिला खून करणाऱ्यालाच ताबडतोब फाशीची शिक्षा झाली असती तर कोणी विचार केला असता खुनाचा?

- जर पहिला हात पाय तोडणा-याला त्याचाही हात-पाय तोडण्याची शिक्षां झाली असती तर कोणी मारहाणीच्या सुपाऱ्या घेतल्या असत्या?

मला माहित्ये हे इतकं सोप्पं नाहीये. किंवा मी capital punishment (मला योग्य मराठी शब्द माहित नाहीये) चा पुरस्कर्ता नाहीये. कारण capital punishment वरून जगभर मतमतांतरं आहेत. आपण तालिबानी मार्गाने जावं असंही मी सुचवत नाहीये. पण थोड्या जरब बसवणाऱ्या शिक्षा म्हणजे तालिबानीकरण नव्हे. आणि तालिबानी हे खऱ्या गुन्हेगारांना नव्हे तर त्यांच्या शरियतच्या दृष्टीने गुन्हेगार ठरणाऱ्या प्रत्येकाला शिक्षा देतात त्याही अति भयानक. पण इथे मी म्हणतोय ते आपल्या राज्य घटनेतील "गुन्हा" या व्याख्येनुसार गुन्हेगार ठरणा-यांविषयी. उगाच कोणविषयीही नव्हे किंवा अर्थातच दुष्काळ, पूर, गरीबी अशा परिस्थितीने झालेल्या गुन्हेगारांविषयीही नव्हे. खान, नंदा, संजय दत्त, हवेली हे परिस्थितीने झालेले गुन्हेगार नव्हेत हे पटतंय ना? ते पैशाच्या माजाने झालेले गुन्हेगार आहेत. आणि त्यांना ठेचायलाच हवं. ती श्रीमंतीच्या माजाची नांगी चेचायलाच हवी. 

सगळे वकील, न्यायाधीश आणि त्यांची सगळी चिल्लीपिल्ली आता रडतील की हे होणार कसं. या अशा भयंकर शिक्षा देणार कशा? त्यासाठी न्यायप्रणालीत तरतूदच नाही. अगदी भयंकरातल्या भयंकर किंवा दुर्मिळातल्या दुर्मिळ गुन्ह्यालाच फाशी होऊ शकते असे न्यायव्यवस्था सांगते. पण मूर्खांनो वर दिलेल्या घटनांमधली कुठली घटना भयंकरातली भयंकर नाही? न्यायासनावर बसून कुठलीही खून, चोरी, बलात्कार, हल्ले, दंगली, मारझोड ही सामान्यच वाटते कारण त्यात तुम्ही स्वत: किंवा तुमचे कुटुंबिय, नातेवाईक, सखेसोबती हे त्या गुन्ह्यांचे पिडीत नसता (receiving end ला नसता). पण एकदा त्यांच्या जागी स्वत:ला कल्पून बघा. मग बघा कसे सगळे गुन्हे भयंकर वाटायला लागतात ते. आणि आधी कधी अशा भयानक शिक्षा दिल्या गेल्या नाहीत म्हणजे काही त्या कधीच द्यायच्या नाही का? प्रत्येक गोष्ट कधीतरी पहिल्यांदाच घडते. पण म्हणून बदलायचंच नाही? अर्थात प्रत्येक गुन्ह्याला फाशीची शिक्षा असं म्हणायला हवेली किंवा संजय दत्त एवढं काळीज मेलेलं नाही माझं. इतर ठिकाणी शिक्षा आर्थिक स्वरुपात भयंकर केली जाऊ शकते. किंवा तुरुंगवासात वाढ केली जाऊ शकते. बदलायची इच्छा असेल तर हजारो मार्ग आहेत. 

माझ्या मते इतिहासातली २ सर्वात मुर्ख विधानं कुठली तर ती म्हणजे 

"An eye for an eye makes the whole world blind"

"शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला सजा होता कामा नये"

पुन्हा दोन राष्ट्रपुरुषांचा अपमान केला मी. पण आज इलाज नाही. सांगितलं ना ओकायचा दिवस आहे आज. आज येणार सगळं भडाभडा बाहेर. असो तर या दोन वाक्यांत अडकलोय आपण. नेहमी इथेच येऊन अडकतो कुठलाही कठोर निर्णय घ्यायची वेळ आली की. 

यातल्या पहिल्या वाक्याला खूप छान उत्तर दिलंय माझ्या एका मित्राने. I'd rather prefer going blind than going dead. बोला आहे काही उत्तर? लाजवाब ना? अहो जिथे जगण्याचे वांधे आहेत तिथे आंधळं होऊन जगायला मिळतंय हे काय थोडं आहे कि सगळ्यांनीच कुत्र्याच्या मौतीने मरायचं?? थोडक्यात माझा डोळा फोडायला येणा-याला मी नेभाळटासारखं सोडणार नाही. जीव नाही घेतला तरी बोटं तरी कापेनच.

आणि दुसऱ्या वाक्याचा आधार घेऊन जर सगळ्या गुन्हेगारांना संशयाचे फायदे देऊन आपण सोडून द्यायला लागलो ना तर मग समाजात निरपराधी औषधालाच काय पण या वरच्या वाक्यात वापरायलाही शिल्लक राहणार नाहीत. दरवेळी निर्दोष सुटणा-या त्या शंभर अपराध्यांच्या अवलादी एकूण एक निरपराध्यांच्या नरड्यांचे घोट घेतील. त्यापेक्षा मी म्हणतो कि एक निरपराध मरून जर शंभर खरोखरचे अपराधी मरणार असतील तर अनेक निरपराधी (माझ्या सकट) आनंदाने तयार होतील हौतात्म्य पत्करायला.

जाउदे सालं. हे असलं काही होणार नाहीये. उद्याच्या पेपरात बातमी असेल की टायर फुटून गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाला त्यामुळे हवेलीला ५०० रुपयांचा दंड झाला आणि ती सुटली. परवा पुन्हा कोणाला तरी उडवेल ती. आणि पुन्हा सुटेलही. हे असंच होणार आणि असंच होत राहणार. सतत, नेहमी, वारंवार. 

आणि ज्यांच्या आतमध्ये वगैरे जळतंय ना त्यांनी इनो घ्या आणि चांगलं गार पाणी प्या ग्लासभर. फुक्कट नाटकं नको. ब्याद साली !!

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...