Friday, February 5, 2010

एक(चि)दंत !!


आपल्याला संक्रांतीच्या दिवसात संक्रांतीच्या शुभेच्छांचे, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांचे, दिवाळीत दिवाळीच्या शुभेच्छांचे, दस-याला दस-याच्या शुभेच्छांचे पोस्ट्स बघायला मिळतात प्रत्येक ब्लॉगवर. शी काय फालतू लिहितोय मी. थोडक्यात म्हणजे त्या त्या सणाच्या, उत्सवाच्या काळात ते ते पोस्ट्स बघायला मिळतात. हा हे किती सोप्पं. पण सध्या काय सिझन चालू आहे मला माहित नाही किंवा तो कसा ओळखायचा हेही मला माहित नाही पण मराठीब्लॉग्स.नेट वर गेल्या पंधरा-वीस दिवसांतले पोस्ट्स बघितले तर आपली ब्लॉगर लोकं (एकत्र नव्हे वेगवेगळी) स्वत:साठी किंवा आपल्या पोराबाळांसाठी दंतवैद्यांचे उंबरठे झिजवताहेत असं लक्षात आलं. कोणी दात काढतंय म्हणजे काढून घेतंय, कोणी रूट कनाल करतंय म्हणजे करून घेतंय (हे दर वेळी लिहायला नको आता) , कोणी सिमेंट भरतंय तर कोणी चांदी भरतंय. असं काय काय चालू होतं. हे सगळे पोस्ट्स वाचतोय तोवर माझ्यावरही दातासंबंधीचं पोस्ट टाकायची वेळ आलीये हे माझ्या लक्षातही आलं नाही !! आज टाकू उद्या टाकू करता करता राहून जात होतं आणि त्यात मधेच त्या कु. नुरिया बीअरेकर, रारा (राजपुत्र राहुल) आणि बाळ्या फिरवेकर यांची पण शाळा घ्यायला लागली. त्यामुळे अजून थोडा उशीर झाला. असो.
पण हे दातांवरचं पोस्ट माझ्या इतर ब्लॉगु-ब्लगिनींच्या (बंधू-भगिनीच्या तालावर) अनुभवापेक्षा आणि पोस्ट्सपेक्षा थोडसं वेगळं आहे. कसं ते कळेलच.

झालं काय की परवा रात्री लेकाची पेज पिऊन झाल्यावर बायकोने त्याला सिंकच्या इथे नेलं तोंड धुवायला. मी (नेहमीप्रमाणेच) हॉलमध्ये बसलो होतो. आणि अचानक बायको किंचाळली. म्हणजे आनंदातिशयाने. "अरे हेरंब पटकन आत ये".. मी काय झालं काय असं ओरडत घाबरून स्वयंपाकघरात धावलो. (कारण तोवर ती मला आनंदातिशयाने ओरडते आहे हे कळलं नव्हतं.). आत गेल्यावर बायकोने मला लेकाच्या खालच्या हिरडीवरून बोट फिरवून बघायला सांगितलं. मी बोट फिरवत होतो आणि अचानक काहीतरी टोचलं. छोट्याशा दाताचं छोटसं टोक वर आलं होतं. अर्थात तिने तसं करायला सांगितलं तेव्हा ती असं का सांगतेय वगैरे असले प्रश्न पडले नव्हते. अर्थातच दात येत असणार हे कळलंच. पण अॅक्च्युअली त्या छोटूश्या दातावरून हात फिरवताना, तो फील पहिल्यांदा घेताना जी मजा आली ना ती अवर्णनीय.

आमचा लेक, आदितेय, म्हणजे घरातला चालता- (रांगता म्हणू हवं तर) फिरता व्हॅक्युम  क्लीनर. जी दिसेल ती गोष्ट तोंडात घालण्याची सवय त्याला पहिल्यापासूनच. त्यामुळे आम्हाला वाटायचं की याला दात लवकर येणार बहुतेक. म्हणून आम्ही कधीपासून वाट बघत होतो. पण कसलं काय. माझ्या एका मित्राच्या त्याच्याच वयाच्या (म्हणजे आदितेयच्या वयाच्या) मुलाला ७ महिन्यात चार दात आले सुद्धा. त्यामुळे याला का अजून दात येत नाहीत असं आम्हाला सारखं वाटत होतं. आणि हा सारखी बोटं किंवा जे दिसेल ते तोंडात घालतो म्हटल्यावर लवकर दात येणार असं गृहीत धरून आम्ही कधीपासून दातांची वाट बघत होतो. अखेरीस ते वाट बघण्याचं प्रकरण संपलं एकदाचं. आता  आमच्या लेकाला पहिला दात फुटला म्हणून काय आम्ही (मी) युधिष्ठिरासारखा जमिनीपासून दोन बोटं वर चालायला लागलो अशातला भाग नाही. युधिष्ठिर स्वत: नव्हे तर त्याचा रथ जमिनीपासून दोन बोटं वर चालत होता आणि तेही त्याच्या लेकाला पहिला दात फुटायच्याआधीपासूनच हे तपशील माहित्येत मला. पण वाक्य जरा चांगलं जुळत होतं म्हणून टाकलं. तर असं तरंगत चालत नसलो तरी जाम आनंद झालाच. एकदम मस्त वाटत होतो. आणि बघता बघता दोन दिवसात वरच्या आरड्याओरड्याचा सीन पुन्हा एकदा झाला आमच्या घरात. मात्र यावेळी मी ओरडत होतो आणि बायको रिसिव्हिंग एंडला होती. (स्कोर SS) . आणि मी तर चक्क २ नवीन दातांचा शोध लावला होतं यावेळी आणि तेही वरच्या जबड्यातल्या. ते तर  इतके कोवळे होते की हाताला टुच्च वगैरे पण काही होत नव्हतं. पण चांगले दोन मोठ्ठे पांढरे ठिपके दिसत होते. म्हणजे पिल्लू आता तीन दातांचा मालक झाला होता तर. वा वा.(अर्थात पहिल्या दाताच्या वेळीच पोस्ट लिहायला सुरुवात केल्याने पोस्टचं नाव तेच ठेवलंय. आणि अर्थात ते आवडलं पण आहे मला.)

पण पूर्वीच एका कोळीयाने (आपल्या टोबी मॅग्वायरने हो..) म्हणून ठेवल्याप्रमाणे ग्रेट पॉवर बरोबर ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी आल्याचा प्रत्यय आम्हाला आला. अर्थात पॉवर बाळराजांना आली होती पण जवाबदा-या आमच्या वाढल्या होत्या. आठ दिवसांनी पुन्हा एकदा त्या आरडाओरड्याचा तिसरा एपिसोड झाला. बायकोला चवथा दात गवसला असण्याच्या शक्यतेने मी पुन्हा एकदा पोराच्या हिरडीवरून हात फिरवण्याच्या तयारीने स्वयंपाकघरात गेलो. थोडा आरामातच आत गेलो यावेळेला. पण बघतो तर काय. यावेळी मातोश्री आनंदातिशयाने नाही तर वेदनातिशयाने ओरडत होत्या. बाळराजांनी त्यांच्या बोटाचा चांगला कडकडून चावा घेतला होता आणि आणि मी आत आलेलो बघून बाळराजे हसायला लागले. नवीन भक्ष्य हाती (दाती) आल्याच्या आनंदाने असेल बहुतेक !!!  ;-) 

("दंत"चित्रे आंतरजालावरून साभार)

40 comments:

  1. सही... पहिल्या दाताची गम्मत काही औरच असते. मग दररोज नविन एखादा दात आलाय का हे बघणं .... जुने दिवस आठवले. :)
    लिहिलं पण खुप छान आहे.

    ReplyDelete
  2. धन्यवाद काका.. तेच ना.. पहिला दात आल्यावर हे पोस्ट टाकेपर्यंत ४ दात आले पण. मजा वाटत्ये जाम आता. त्यालाही आणि आम्हालाही :-)

    ReplyDelete
  3. अभिनंदन, लेकाचं आणि तुझंही :-)

    ReplyDelete
  4. सही ............हळवं आहे पोस्ट एकदम खेकडा ष्टाईल....
    लेक मोठा झाला की दाखव त्याला...’दात’ दाखवून हसेल तो बघ मनापासून.....

    ReplyDelete
  5. आवडलं? मस्त. चल मग आभाराचा भार नाही देत तुला ;-) .. तुला सांगितलं का? लेक पण आपल्याच जमातीतला आहे :-)

    ReplyDelete
  6. वा, अभिनंदन! लेकाचं आणि तुमचंही. बाबा बनल्याचा आनंद पोस्टमधे मनापासून उतरला आहे.

    ReplyDelete
  7. आभार कांचन.. आनंद तर झालाच आहे आणि तो प्रत्येक दाताबरोबर "वाढता वाढता वाढे" असा आहे :-) ..

    BTW, मला अरे-तुरे चालेल.

    ReplyDelete
  8. हेरंब.. सही म्हणजे सहीच पोस्ट झालय.. एकदम मस्त!

    ReplyDelete
  9. खूप धन्स, गजानन :-) .. तुला आवडलं म्हणजे "दुनिया" च "दारी" आल्यासारखं आहे आमच्यासाठी ;-)

    ReplyDelete
  10. Abhinandan sanga tyaala. Sahich....
    Mast zaliye post ekdam...!!!

    ReplyDelete
  11. आभार मैथिली. सांगितलं त्याला.
    BTW, तो म्हणतोय की तू माझ्या बाबाला दादा म्हणतेस तर मग अहो-जाहो का करतेस.. :-)

    ReplyDelete
  12. Dada Dat alyawar tu itake changle lihilas tar to chalayal palayala laglyavar tu kay aani kiti lihishil

    ReplyDelete
  13. मस्त लिहिलंय :)) दंतचित्रेही छान!

    ReplyDelete
  14. Kharetar tyachya mulech. Mhanaje eka mulachya baba la are ture kase karayache ha prashn padalaa mala... :)

    ReplyDelete
  15. आत्ता स्कोर level करायला जालं तर काय होईल ह्याची कल्पना आली आहे ना?

    ReplyDelete
  16. अग दात येईपर्यंतच लिहिणं शक्य आहे. एकदा तो चालायला पळायला लागला की लिखाण कसलं. त्याच्यामागे पळण्यातच सगळा वेळ आणि दम निघून जाईल. :-)

    ReplyDelete
  17. धन्यवाद प्रीति.. तुझं सॉल्लीड "दंतमनोरंजन" आहे लक्षात :-)

    ReplyDelete
  18. अग पण एका मुलाचा बाबा दादा असू शकत नाही कि काय ? :-)

    ReplyDelete
  19. अरे हो रे... हाताबोटावर चावण्याचा स्कोर लेव्हल झाला तर काय वाट लागेल माझी याच टेन्शनमध्ये आहे सध्या :-)

    ReplyDelete
  20. अभिनंदन..आपल आणि आपल्या बाळ राजांच सुद्धा :)

    ReplyDelete
  21. Aho tase nai kaai.....pan..... Are ture kase karayache ekdam???? Mhanaje aai baba categary madhalya lokana direct are - ture karayala kasetarich vaatate.
    BTW.. thodkyaat kaay tar mi TUMACHA ekeri ullekh karava ashi tumachi ichha aahe...Barr..thike...
    Aiken mi TUZE Heramb DADA..... :)

    ReplyDelete
  22. अय शाब्बास. आता कसं.. !!

    ReplyDelete
  23. मी सुप्रीत ,

    हे मित्रा हेरम्ब ,

    actually मित्रा मी ज्या ब्लोग्वर कविता टाकल्या होत्या त्या खरच माज्या नवत्या , मी आणि माज्या मित्रानी ORKUT वरील स्क्रैप येथे पोस्ट केले होते , तसेच गेला एक महिना मी माज्या ब्लोग्च्या संपर्कात नव्हतो म्हणून मला तुज्या कमेन्ट कळल्या नाहीत . आणि मला हेही माहीत नव्हते की या कविता तुज्या ब्लोग्वर आहे . तुज्या कमेन्ट नंतर मी copyscap वर चेक केले असता माज्या बर्याच कविता तेथे सापडल्या , तेव्हा मी सर्व कविता Delete करत आहे .


    तुम्हाला ज़ालेल्या सर्व त्रासाबद्दल मला मला मनापासून क्षमा करा , येथून पुढे मी ORKUT SCRAP पोस्ट करण्याआधी त्या कवीचा अपमान होणार नाही याची कालजी घेइल ,


    एक मराठी म्हणून मला एवढ्या वेळी क्षमा करा , अशी चुक पुन्हा होणार नाही

    ReplyDelete
  24. सुप्रीत, मला यावर काहीही बोलायचं नाहीये. तू तुझ्या ब्लॉगवरच्या सगळ्या चोरलेल्या कविता डिलीट करून टाकल्यास हे वाचून आनंद वाटला. यापुढे स्वत:चं नसलेलं कुठलंही साहित्य शक्यतो ब्लॉगवर टाकू नकोस आणि त्यातून टाकलंसच तर त्यापूर्वी मूळ लेखकाची परवानगी नक्की घे. !!

    ReplyDelete
  25. आमचा लेक, आदितेय, म्हणजे घरातला चालता- (रांगता म्हणू हवं तर) फिरता व्हॅक्युम क्लीनर.

    हे...हे...हे...
    अभिनंदन! जाम मजा आली असेल त्याच्या दातांना पहिल्यांदा स्पर्श करताना...

    ReplyDelete
  26. :-) अरे खरंच व्हॅक्युम क्लिनरच आहे तो. जे दिसेल ते तोंडात.
    हो.. खूप मस्त वाटलं.. !!

    ReplyDelete
  27. hi Heramb... "Dant Katha" mast jamaliye.. Solid maja aali wachatana.. Mazya mulache lahanpan aathawale, mhanaje ajun lahanach aahe, pan daat yenyach way nighun gelay...
    (even I've one blog on my son's 1st day of school, wach wel milel tewa - Thursday, August 13, 2009
    :A new beginning:

    ReplyDelete
  28. हाय श्वेता.. आभार. हा हा "दंतकथा". हे पण नाव मस्त आहे... तुझं "A new beginning" चं पोस्ट वाचलं. छान झालंय. कमेंटलोय तिकडे..

    ReplyDelete
  29. Hamara Banja 3 mahineke hogaya...Usake Dat ki Vat baghatoy.....Post chan zaliy....

    ReplyDelete
  30. धन्यवाद सागर. ओह ३ महिन्यांचा झाला ना मग वेळ आहे अजून खूप. पण मजा येते वाट बघायला पण :-)

    ReplyDelete
  31. अरे ही दंतकथा मी उशीराच वाचली ... सहीच लिहिलं आहेस!!!

    ReplyDelete
  32. mi commentala hota pan kuthe disat nahiye...aali nahi ka? aaso maja aali wachayala ani aata punha magacha sagala aathwat nahi pan tumchya vacuum cleaner la aamchya kade pan company aahe....

    Aparna

    ReplyDelete
  33. नाही आली कमेंट. ही पहिलीच. मला वाटलं नेटोपासामुळे टाकली नाहीस की काय :-)
    अरे वा. आमच्या व्हॅक्युम क्लिनरची इतरत्रही शाखा आहे हे ऐकून बरं वाटलं ..

    ReplyDelete
  34. व्हॅक्युम क्लिनर. हेहेहे... पण येणारया दाताला जीभ लावायला मस्त मजा येते... तू केले आहेस का हे कधी?

    ReplyDelete
  35. :) .. अरे खरंच व्हॅक्युम क्लिनर आहे तो. अरे येणा-या दातांना लहानपणी जीभ लावून लावून माझे दात असे भयंकर आले आहेत की काही विचारू नकोस. असो. झाकली मूठ सव्वा लाखाची ;-) !!

    ReplyDelete

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...