Sunday, June 27, 2010

मित्रेभ्या नमः : भाग २

** भाग १ इथे  वाचा

आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी....


रॉस गेलर (डेव्हिड श्विमर) : मोनिकाचा मोठा भाऊ, अतिशय हुशार त्यामुळे लहानपणापासूनच आईवडिलांचा लाडका आणि एक्झॅक्टली त्याच कारणामुळे मोनिकाचा नावडता असलेला, पीएच.डी., पेलिऑन्टॉलॉजिस्ट (म्हणजे बहुतेक भूगर्भशास्त्रज्ञ चुभूद्याघ्या), विज्ञानाची प्रचंड आवड, रेचलवर नववीमध्ये असल्यापासून अतिशय प्रेम करणारा पण ते प्रेम कधीच व्यक्त करू न शकणारा, घाबरट तर इतका की लोएस्ट-स्पीड लिमिटपेक्षाही हळू गाडी चालवल्याने लायसन्स जप्त करून घेणारा, तीनदा लग्न झालेला (पहिल्या बायकोशी ती लेसबियन असल्याने तर दुसरीशी लग्नाच्या दिवशीच झालेल्या गैरसमजांमुळे घटस्फोट), विज्ञान (डायनोसॉर्स, पेलिऑन्टॉलॉजी) आणि रेचलवर जीवापाड म्हणजे अगदी प्रचंड प्रेम करणारा आणि त्यासाठी आपल्या जवळच्या मित्रांशीही वेळोवेळी भांडणारा, चँडलरचा क्लासमेट आणि अतिशय जिवलग मित्र. असा हा अनेकानेक गुणविशेष असलेला आणि अनेक रूपडी असलेला 'रॉस' डेव्हिड श्विमरने आपल्या अप्रतिम अभिनयाने खासच रंगवलाय.

चँडलर बिंग (मॅथ्यु पेरी) : याचं सगळ्यांत मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सतत पीजे मारत राहणं, सदैव हलके फुलके विनोद टाकत राहणं. अगदी अगदी नॉनस्टॉप.. नवीन नवीन विचित्र शब्द वापरणं, चित्रविचित्र चेहेरे करत राहणं. पूर्ण ग्रुपमध्ये चांगली नोकरी, चांगला पगार असणारे चँडलर आणि रॉस हे दोघेच.
चँडलर हा जोईचा रूममेट आणि बेस्टबडी. सहाव्या सिझनमध्ये चँडलरचं मोनिकाशी अफेअर सुरु होऊन नंतर त्यांचं लग्न होण्याआधीपर्यंतचा चँडलर डेडली आहे. एकदम भन्नाट. लाईव्हली. त्याच्या बिनडोक जोक्स वर हसता हसता गडबडा लोळायची पाळी येते. याने आणि जोईने पहिले ५-६ सिझन्स नुसता धुमाकूळ घातला आहे. लग्नानंतर मात्र जरासा हळवा, शांत, किंचित दबून राहणारा असा वेगळाच चँडलर आपल्या दृष्टीस पडतो. मोनिका किंचित जास्त डॉमिनेटिंग दाखवली असल्याने 'चँडलर बिंग'चं धुंवाधार पात्र शेवटच्या ३-४ सिझन्समध्ये थोडसं मागे पडल्यासारखं वाटतं. चँडलरचे आधीचे विनोद, बाष्कळ बडबड, चमत्कारिक शब्दप्रयोग आणि विचित्र हावभाव हे सगळे लग्नानंतर एकदम कमी होऊन जातात. मला तरी वाटलं असं. पण त्याआधीचा चँडलर बघणं म्हणजे एक मेजवानी आहे.

जोई ट्रिबियानी (मॅट ले-ब्लांक) : मुद्दाम मी जोई उर्फ जोसेफ ट्रिबियानीला शेवटी ठेवलं कारण याच्यावर लिहिता लिहिता माझा माझ्यावरच कंट्रोल राहणार नाही. फ्रेंड्समधलं हे माझं सगळ्यांत आवडतं पात्र. हो फिबीपेक्षाही किंचित वरच. कारण फिबी आणि याच्या बिनडोकपणामध्ये थोडा फरक आहे असं मला वाटतं. फिबी जेन्युइन बिनडोक वाटत नाही. कधी कधी ती निरागस, हलकीफुलकी, मुद्दाम येडेपणाचा आव आणणारी वाटते. पण जोई. अहं.. !!! १००% ओरिजनल, जेन्युइन, होममेड बिनडोकपणा बघायचा असेल तर या माणसाकडे बघावं. कम्प्लीट ट्यूबलाईट.. ९५% पीजे किंवा नॉर्मल जोक्स या माणसाला जवळपास १० मिनिटांनी कळतात आणि उरलेले ५%......... अहं.. नाही.. मुळीच नाही. उरलेले ५% जोक्स याला कळतच नाहीत..  इटालियन अमेरिकन. सहा बहिणी असलेल्या भल्या मोठ्या कुटुंबातला एकटा मुलगा. पेशाने कलाकार. फालतू जाहिरातींपासून ते भिकार नाटकांपर्यंत कशातही कामं करणारा. टीव्ही शोमध्ये प्रमुख भूमिका मिळवायचं स्वप्न बघत असणारा. (ते स्वप्न काही काळ पूर्णही होतं आणि मग त्याच्या स्वतःच्याच बिनडोकपणामुळे धुळीला मिळतं.). पण हा माणूस आवडण्याचं खरं कारण म्हणजे याचा प्रचंड बिनडोकपणा, बावळटपणा, वेंधळेपणा त्यातून निर्माण होणारे एकापेक्षा एक भयंकर विनोद, अफलातून संवाद आणि त्याचं 'अचूक' हा शब्दही थिटा पडावा इतकं भन्नाट टायमिंग. रुममेट असल्याने चँडलर याचा भयानक लाडका आणि बिनडोकपणाची लेव्हल सेम असल्याने फिबीही खूप आवडती. साधारण सहाव्या/सातव्या सिझनपासून म्हणजेच जिथपासून चँडलरचा प्रभाव कमी व्हायला लागतो तिथपासून जोईचं अधिराज्य सुरु होतं. शेवटचे ४-५ सिझन हा मनुष्य नुसता चेकाळल्यासारखा सुटलाय. याचे अनंत किस्से आहेत ते असे इथे ३-४ ओळीत सांगता येणार नाहीत. त्यासाठी त्याला पडद्यावर वावरतानाच बघायला हवं. आणि त्याने फ्लर्टिंगच्या दुनियेत अजरामर केलेल्या 'हाऊ यु डुइन' या डायलॉगला आणि ते म्हणण्याच्या त्याच्या युनिक शैलीला कोण विसरेल !!!!

खरं म्हंटलं तर ओळखच प्रमुख कार्यक्रमापेक्षा जास्त लांबली. पण ओळख आणि प्रमुख कार्यक्रम हे एकमेकांत इतके गुंतलेले, गुंफलेले आहेत की काही इलाज नव्हता. सगळ्यांचे स्वभाव विशेष सांगितले तरी सगळ्यांचं एक कॉमन स्वभाववैशिष्ट्य म्हणजे हे सगळे एकदम अनप्रेडिक्टेबल आणि एकदम इम्पल्सिव्ह आहेत. कधी काय होईल, काय करतील, कसे वागतील काहीच सांगता येणार नाही. म्हणजे एखादा प्रोग्राम बघून मोनिका शेअर ट्रेडिंग काय करायला लागते किंवा कॅरेबियन बेटांवर जाऊन तिकडच्या बायकांसारखे केसांचे विचित्र प्रकार काय करून घेते, फिबीला एकाच वेळी दोन-दोन बॉयफ्रेंडस काय आवडायला लागतात किंवा अचानक गाण्याचा अल्बम काढावासा किंवा केटरिंगचा बिझनेस करावासं कसं वाटायला लागतं, अचानक पैसे आहात आल्यावर जोई चित्रविचित्र वस्तूंनी आणि फर्निचरने घर कसं भरून टाकतो किंवा खिशात दमडीही नसताना निव्वळ भावनेच्या भरात लिलावात एक मोठं जहाज विकत घेण्यासाठी सर्वोच्च बोली कशी लावतो (अर्थात त्याचं खरं कारण म्हणजे लिलावात बोली लावून जिंकलेल्या गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतात हे या सदगृहस्थाला माहीतच नसतं :) ), चँडलरला आपलं नावच कसं अचानक आवडेनासं होतं आणि ते बदलण्याची त्याची धडपड कशी चालू होते किंवा अचानक त्याचा त्याच्या अतिशय चांगल्या नोकरीतला इंटरेस्ट कसा संपून जातो आणि तो ती सोडून देऊन दुसरी नोकरी कशी शोधायला लागतो, घरात एकट्याला कंटाळा येत असल्याने रॉस एक माकडच कसं पाळतो किंवा दोन वेगवेगळया लांबलांबच्या कॉलेजेसमध्ये शिकवताना न्यूयॉर्कच्या रस्त्यांतून स्केटिंग करत कसा जातो, आपल्या तिसाव्या वाढदिवसाला रेचल जोरजोरात रडायला कशी लागते किंवा हजार डॉलर्सची अशक्त, फिकट दिसणारी एक घाणेरडी मांजर विकत घेऊन ठेवते हे असे प्रकार चालू असतात. हे सगळे आत्ता संदर्भ सोडून सांगितल्याने विचित्र वाटणारे (आणि खरेही तेवढेच विचित्र असणारे) प्रकार प्रत्यक्षात बघणं म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे. सगळी टेन्शन्स, कटकटी, वैताग तात्पुरते का होईना पिटाळून लावण्याचा एक बेष्ट उपाय.

माझं अजून एक निरीक्षण म्हणजे सगळे सिझन्स एकापेक्षा एक जबरदस्त आहेत यात वादच नाही पण सहाव्या सिझनमध्ये हे गणित काहीतरी कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. तुलनेने रटाळ एपिसोड्स किंवा पात्रांना जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा येतात असं दाखवून जुन्याचा एपिसोड्समधल्या गोष्टी, किस्से पुन्हा पुन्हा दाखवले आहेत. तेव्हा त्यांच्याकडे नवीन कथा/कल्पना नसाव्यात किंवा टीममध्येच काहीतरी गडबड झाली असावी असा संशय उगाच येऊन जातो. पण हा एक सिझन सोडला तर बाकी सगळे सिझन्स म्हणजे नुसता धुमाकूळ आहे.

जाता जाता माझ्या प्रचंड आवडत्या काही निवडक एपिसोड्सची एक यादी देतो. जे नियमित फ्रेंड्स बघतात किंवा दहाही सिझन्स अनेकदा बघितले असणारे माझ्यासारखेच फ्रेंड्स-वेडे नक्कीच या यादीशी सहमत होतील. चुकूनमाकून काही भारी एपिसोड्स टाकायला विसरलो तर आठवणीने कमेंट्समध्ये टाका. हे कुठल्याही क्रमाने नाहीत. कुठलाही एपिसोड कधीही आणि कितीही वेळा बघितला तरी कधीच कंटाळा येणार नाही याची १०१% खात्री.

१. पोकर : यात मुलं विरुद्ध मुली असा पोकरचा सामना रंगतो. मुलींना आधी पोकर अजिबात खेळता येत नसतो आणि मग त्या एका पोकरतज्ज्ञ बाईकडून पोकर शिकतात आणि मुलांची वाट लावतात असा काहीसा हा एपिसोड. पण भन्नाट विनोदांनी आणि आचरट प्रकारांनी भरलेला.

२. फुटबॉल : यात रॉस गेलर आणि कंपनी वि. मोनिका गेलर आणि कंपनी असा अमेरिकन फुटबॉलचा (आपला सॉकरवाला फुटबॉल नव्हे) 'गेलर कप' साठीचा सामना रंगतो. ते खेळतानाची धमाल, गोल्स, मध्येच एका डच मुलीचं अवतरणं, तिच्यावरून जोई आणि चँडलरमध्ये रंगलेले वाद, रॉस आणि रेचलचं वेगळ्याच कारणावरून झालेलं भांडण अशा भारी यात गोष्टी आहेत.

३. क्विझ : एका साध्या गोष्टीवरून पैजा लागून शेवटी मोनिकाचं अपार्टमेंट (फ्लॅट) डावावर लावलं जाईपर्यंत प्रकरण चढत जातं. स्पर्धा असते कोण कोणाला किती जास्त ओळखतं, कोणाला एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी जास्त माहित आहेत याबाबत. मोनिका आणि रेचल वि. जोई आणि चँडलर अशा टीम्स असतात. प्रश्न काढणारा आणि जजगिरी करणारा असतो रॉस (फिबीचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं या एपिसोडमध्ये त्यामुळे ती क्विझमध्ये नाहीये.). तर या प्रकारात एकेक भन्नाट प्रश्न, त्यांची तितकीच भन्नाट उत्तरं, शेवटी लायटनिंग राउंड आणि त्याचा धक्कादायक निकाल सगळंच तुफ्फान मजेशीर.

४. चँडलर आणि जोई वेगळे होतात आणि परत एकत्र येतात ते तीन एपिसोड्स : छोट्याशा कारणावरून गैरसमज होऊन जोई चँडलरच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडतो. पण दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नाही. तेवढ्यात चँडलरला एक दुसरा रूममेट मिळतो. पण तो जाम विक्षिप्त आणि चक्रम असतो. काही दिवसांनी चँडलर आणि जोई पुन्हा एकत्र येतात. हे तीन एपिसोड्स जबरदस्त आहेत. जाम धमाल येते बघायला. नुसतेच हसवतात असं नाही तर कधीकधी नकळतपणे डोळ्यात थोडंसं का होईना पाणीही आणतात.

५. रेचलची बहिण (क्रिस्टीना अ‍ॅपलगेट) थँक्सगिव्हिंगला येते तो एपिसोड : या एपिसोडमध्ये क्रिस्टीना अ‍ॅपलगेटने रेचलच्या बावळट बहिणीचं काम अप्रतिम केलं आहे. छोट्याछोट्या गोष्टींवरून तिची आणि रेचलची होणारी भांडणं, तिचं मंदासारखं वागणं, विचित्र प्रश्न विचारणं आणि साध्या प्रश्नांना महाबिनडोक उत्तरं देणं हे सगळे प्रकार बघून हसून हसून तोंड फाटायची पाळी येते.

६. जोई चँडलरला पेटीत कोंडून ठेवतो तो एपिसोड : चँडलरने केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे चँडलर आणि जोईमध्ये कडाक्याचं भांडण होतं. चँडलर जोईची हजार वेळा माफी मागतो आणि तो म्हणेल ते करायला तयार असतो. तेव्हा जोई त्याच्या चमत्कारिक स्वभावाप्रमाणेच चँडलरला एका पेटीत कोंडून घेण्याची चमत्कारिक शिक्षा करतो. (अर्थात तो असं का करतो त्यालाही एक पार्श्वभूमी आहेच.) आणि त्यादरम्यान अनेक भयंकर विनोदी आणि काही अतिशय हळवे प्रसंग घडून जातात. पहायलाच हवा असा हा एपिसोड..

७. लॉटरी : सगळेजण मिळून काही लॉटरीची तिकिटं घेतात. पण फिबीच्या मुर्खपणामुळे ती रस्त्यावर पडतात. ती कुठल्यातरी माणसाला सापडून तो माणूस रातोरात करोडपती होतो. त्यामुळे सगळे फिबीवर जाम वैतागतात. त्यावेळी फिबीची माफी मागण्याची अनोखी पद्धत आणि त्या अनोख्या पद्धतीतली गंमत न कळल्याने वेड्यासारखा वागणारा जोई. हे सगळं बघताना हसून हसून वाट लागते.

८. रॉस आणि रेचलचं ब्रेकऑफ होतं तो एपिसोड : काही विनोदी संवाद सोडले तर हा एपिसोड बघायला खूप कठीण जातो. एकदम हळवं व्हायला होतं. खूप छान रंगवलेला प्रसंग !!

असे अजूनही चिक्कार एपिसोड्स आहेत किंवा काही काही एपिसोड्स मधले निवडक प्रसंग आहेत जे या यादीत टाकता येतील. पण कुठलाही प्रसंग असो की कुठलाही संवाद, त्यांची प्रेक्षकांना क्षणभरात आपलंसं करून घेण्याची, सगळी टेन्शन्स विसरायला लावून त्यांच्या चेहर्‍यावर एक छोटीशी का होईना स्मितरेषा आणण्याची आणि बघता बघता त्या छोट्या स्मितरेषेचं नाना पाटेकरच्या मंदूने (मंदिरा बेदीने) केळं आडवं खाल्ल्यावर तिचं हसणं जसं दिसतं तितक्याच आडवेपणाने आपल्याला हसायला लावण्याची हातोटी वादातीत आहे.

अर्थात फ्रेंड्सवर अशीही टीका झाली की यातले विनोद

१. खूप उथळ आहेत.
२. खूप प्रेडिक्टेबल आहेत
३. खूप बालिश आहेत.
४. तोचतोचपणा आहे.
५. दर्जाहीन आहेत.

वैयक्तिकरित्या मला यातला एकही आरोप मान्य नाही. कारण सगळ्या (हो जवळपास ९९%) विनोदांचा दर्जा, निवड खूप उच्च आहे, सगळे विनोद, त्यांची शैली फार वेगळी आहे त्यात अजिबात काहीही प्रेडिक्टेबल नाही, बालीशपणा किंवा तोचतोचपणा तर अजिबात नाही. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती !!

पण मला मात्र हे मित्र अतिशय प्राणप्रिय आहेत, अतिशय जिवलग आहेत आणि याचं कारण फ्रेंड्सच्याच भाषेत सांगायचं झालं तर

No one could ever know me
No one could ever see me 
Since you're the only one who knows what it's like to be me 
Someone to face the day with 
Make it through all the best with 
Someone who always laughs at 
Even when I'm at my worst, I'm best with you
Yeah!
I'll be there for you
I'll be there for you...... !!!!

या रेम्ब्रंड्सच्या गाण्याचे पूर्ण शब्द पुढीलप्रमाणे. ते इथेही मिळतील.


So no one told you life was gonna be this way
Your job's a joke, you're broke, your love life's D.O.A.
It's like you're always stuck in second gear
When it hasn't been your day, your week, your month, or even
your year, but

{Chorus}

I'll be there for you
When the rain starts to pour
I'll be there for you
Like I've been there before
I'll be there for you
'Cause you're there for me too

You're still in bed at ten and work began at eight
You've burned your breakfast so far, things are going great
Your mama warned you there'd be days like these
But she didn't tell you when the world has brought you down to your knees, and

{Chorus}

No one could ever know me
No one could ever see me
Since you're the only one who knows what it's like to be me
Someone to face the day with
Make it through all the best with
Someone who always laughs at
Even when I'm at my worst, I'm best with you
Yeah!

{Chorus}

I'll be there for you
I'll be there for you
I'll be there for you
'Cause you're there for me too
 


* सर्व 'मित्रचित्रां'साठी अर्थातच गुगल नावाच्या फ्रेंडचे आभार !!

Friday, June 25, 2010

मित्रेभ्या नमः : भाग १

So no one told you life was gonna be this way
Your job's a joke, you're broke, your love life's DOA
It's like you're always stuck in second gear,
When it hasn't been your day, your week, your month,
or even your year, but...

I'll be there for you...
When the rain starts to pour
I'll be there for you...
Like I've been there before

I'll be there for you...
'Cause you're there for me too.

डिसेंबरची एक संध्याकाळ. सगळीकडे ख्रिसमसची सजावट. कॅलिफोर्निया असल्याने स्नोचा प्रश्न नव्हता. पण चांगलीच थंडी होती. आमच्याकडे गाड्या-घोडे नसल्याने बाहेर फिरायला जाणं म्हणजे चैनीचा मामला होता. अर्थातच तो आम्हाला परवडणारा नसल्याने डोळे टीव्हीला चिकटवून बसण्याचं काम इमानइतबारे पार पाडत होतो. पहिलाच अमेरिका दौरा. त्यामुळे सगळ्याच गोष्टींचं अप्रूप. अगदी टीव्हीवरल्या मालिकांचंही. मालिका या प्रकाराशी माझं आयुष्यात जमलेलं नाही. त्यामुळे सच्च्या चित्रपटभक्ताप्रमाणे पिक्चर बघणं चालू होतं. ब्रेकात इतर चॅनल्सना खोखो देण्याचे प्रकार चालू होते. त्यावेळी वरचं गाणं ऐकू आलं. जरा बरं वाटत होतं ऐकायला. त्यानंतर अचानक एक माणूस (अर्थात स्क्रीनवर) येऊन "How you doin'?" सदृश्य काहीतरी म्हणाला. चेहरा जरा ओळखीचा वाटत होता त्याचा. अचानक मागून जोरजोरात हसण्याचे आवाज आले. मालिका विनोदी आहे हे भासवण्यासाठी भाडोत्री प्रेक्षकांचे कृत्रिम हसण्याचे आवाज ऐकणं याचा मला "चला एकवार जोरदार टाळ्या होऊन जाउदेत !!!" एवढाच किंबहुना किंचित अधिकच तिटकारा होता. तत्परतेने चॅनल बदललं गेलं.


F.R.I.E.N.D.S या जगप्रसिद्ध, अनेकानेक विक्रम प्रस्थापित केलेल्या सिटकॉमशी (सिच्युएशनल कॉमेडी) आलेला हा माझा पहिला संबंध. काही सेकंदच टिकलेला. तशी भारतात 'स्टार वर्ल्ड' वर याची ओळख झाली होती मागे पण मालिका या प्रकाराशी फटकून वागण्याच्या माझ्या स्वभावामुळे या 'मित्रां'बद्दल कधी आपुलकी वाटली नव्हती. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा अमेरिकेत जायचा योग आला. यावेळी तर एकटा होतो हॉटेलात आणि तेही तीन महिने. रूममेट्स नाहीत की कोणी नाही. त्याच त्याच चॅनल्सवरचे तेच तेच चित्रपट बघून कंटाळा यायला लागला होता. अशात एका लॉंग विकांताला एका मित्राशी भेट झाली. गप्पा मारता मारता त्याने नेटफ्लिक्सवरून मागवलेल्या फ्रेंड्सच्या चौथ्या सिझनच्या डीव्हीडी बद्दल मला सांगितलं आणि फ्रेंड्स बघायचं का म्हणून विचारलं. आमच्या मित्रवर्याला त्या डीव्हीडीतले सगळे एपिसोड्स तोंडपाठ होते. सुरुवातीचं संगीत संपून पहिला डायलॉग सुरु झाला की तो लगेच म्हणायचा "अरे हो. हा तो पोकरचा एपिसोड" किंवा "हा एपिसोड बोरिंग आहे ". काहीही न बोलता त्याचं ते ज्ञानामृत रिचवता रिचवता मला एकच प्रश्न छळत होता की "जर याला हे सगळे एपिसोड्स तोंडपाठ आहेत तर मग तरीही याने डीव्हीडी का मागवली आहे?". आणि हाच छळवादी प्रश्न जेव्हा मी त्याला उघडपणे विचारला तेव्हा "वत्सा, तू किती किरकोळ आहेस याची तुजला जाणीव आहे काय?" अशा अर्थाचा एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकत तो "तू या वीकांतात ही डिव्हीडी बघ आणि मग आपण बोलू." असे वदता झाला... झालं !!! जे टीव्हीवर दिवसरात्र दिसत असतात आणि ज्यांना मी शिताफीने टाळतो असे फ्रेंड्स माझ्या या फ्रेंडच्या रुपाने माझ्या मनोरंजन विश्वात चंचुप्रवेश करते झाले. त्या वीकांतात चौथ्या सिझनची डीव्हीडी मी बघून काढली ('वाचून काढली' सारखं)... अ‍ॅंड बिंगो. लव्ह अ‍ॅट 'सेकंड' साईट !!! अक्षरशः प्रेमात पडलो त्यांच्या. उरलेल्या दौर्‍यात अजून दोन सिझन्स संपवले. भारतात परत आल्यावर जवळच्या व्हिडीओ लायब्ररीत जाऊन दर विकांताला एक अशा रीतीने एक ते दहा सिझन्स (एक सिझन = २४-२५ एपिसोड्स) संपवून टाकले तेव्हा कुठे आत्मा तृप्त झाला ... छ्या नाहीच. उलट सतत आणि अजून अजून फ्रेंड्सचेच एपिसोड्स बघावेसे वाटू लागले. आणि "जे वाटतं ते करावंच" या (माझ्या) नियमाप्रमाणे ईसवी सन २००५ पासून ते आजतागायत काही किरकोळ अपवाद वगळता मी दररोज फ्रेंड्सचा एक तरी एपिसोड बघतोच. दिवसा किंवा रात्री, अमेरिकेत असो वा भारतात, कितीही बिझी असो वा दमलेला असो, या फ्रेंड्सना दिवसातून एकदातरी भेटल्याशिवाय चैन पडत नाही. दहाही सिझन्स हार्डडिस्कमध्ये कॉपी करून ठेवले आहेत. एवढी काय जादू आहे यांच्यात? असो ते नंतर बघू. तूर्तास त्यांचे काही ठळक विक्रम बघू.


१. १९९४ ते २००४ अशी सलग दहा वर्षं अमेरिकन टेलिव्हिजनवर चाललेली मालिका

२. असंख्य पारितोषिकं आणि नामांकनं

३. सलग दहा वर्षांत यातलं एकही पात्र बदललेलं नाही. अगदी छोट्यात छोट्या भूमिकेतले कलाकारही तेच आहेत. (अपवाद फक्त एक पात्र आणि तेही पहिल्याच सिझनमध्ये).. आपल्याकडे प्लास्टिक सर्जर्‍या करून करून एक दिवसाआड पात्र बदलण्याच्या सिरियल्सवाल्यांच्या सवयीच्या पार्श्वभूमीवर या गोष्टीचं महत्व लक्षात यावं.

४. हॉलीवूडच्या मोठ्या पडद्यावरच्या अनेकानेक मान्यवर कलाकारांनी यात हजेरी लावली आहे. उदा. ब्रॅड पिट, ब्रूस विलीस, जॉर्ज क्लूनी, रॉबिन विल्यम्स, जीन-क्लॉड वॅन डॅम, टॉम सेलेक, चार्ली शीन, ज्युलिया रॉबर्टस, हेलन हंट, इझाबेला रोसेलिनी, क्रिस्टीना अ‍ॅपलगेट, रिज विदरस्पून, ब्रुक शिल्ड्स, रिचर्ड ब्रॅन्सन (व्हर्जिन अटलांटिक), राल्फ लॉरेन (पोलो)

५. यातले अनेक संवाद, स्टाईल्स अमेरिकन तरुणाईने जसेच्या तसे उचलले. जसं जोईचा "How you doin'?" वाला द-ग्रेट-फ्लर्टिंग संवाद किंवा रेचलचा फेमस 'रेचल कट. किंवा अजून एक म्हणजे "ओ माय गॉड" हा साधासा भासणारा संवाद आवाजाच्या चढउताराच्या सहाय्याने, निरनिराळ्या ढंगात इतक्या अनंत पद्धतींनी म्हणता येतो हा नवीन शोध लागला.

जे आत्तापर्यंत कधीच या मित्रांना भेटलेले नाहीत किंवा फार क्वचित भेटले आहेत किंवा नुसतीच तोंडओळख झाली आहे अशा लोकांसाठी या मित्रांच्या ओळखीचा अनौपचारिक कार्यक्रम करून टाकू. याची कथा प्रामुख्याने सहा प्रमुख पात्रांभोवती फिरते. खरं तर कथा नाहीच. (अमेरिकन) तरुणाईच्या रोजच्या जीवनातले प्रसंग. नेहमी घडणारे. तेचतेच. परंतु जबरदस्त संवाद, उत्तम संवादफेक, नवनवीन शब्दांची निवड, आणि ते वापरण्याच्या निरनिराळ्या पात्रांच्या निरनिराळ्या लकबी, विलक्षण मांडणी, विनोदाची उत्कृष्ट जाण असलेले कलाकार आणि संवादांचं/विनोदाचं अप्रतिम टायमिंग या प्रमुख अस्त्रांच्या आधाराने सामान्य प्रसंगही हसून हसून मुरकुंडी वळायला लावणारे ठरतात. पण कितीही रोजच्या जीवनातले प्रसंग म्हंटले तरीही आधी म्हंटल्याप्रमाणे ते अमेरिकन जीवनातले किंबहुना न्यूयॉर्कर तरुणाईच्या जीवनातले प्रसंग आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे (हो खूप फरक आहे. आपल्याकडे जसं मुंबईकर वि. पुणेकर, मुंबईकर आणि पुणेकर वि. इतर्स असे प्रकार असतात तसंच इथेही न्यूयॉर्क वि. इतर किंवा ईस्ट कोस्ट वि. वेस्ट कोस्ट असे सामने रंगत असतात. जसं सर्वसामान्य अमेरीकनाला आपण बाकीच्या जगापेक्षा कोणीतरी ग्रेट, वेगळे आहोत असं वाटत असतं तसंच इथल्या सर्वसामान्य न्यूयॉर्करालाही आपण अन्य अमेरिकनांपेक्षा जरा जास्तच वरचढ आहोत असं (उगाचंच) वाटत असतं. आता यातले मुंबईकर कोण, पुणेकर कोण आणि अन्य कोण याची अनुमानं वाचकांच्या आपापल्या 'स्थलपरत्वे' बदलू शकतात हेसांनल.) अन्यथा यातली मुक्त भाषा, सेक्सचे उल्लेख, त्या अनुषंगाने येणारे प्रसंग, गे/लेसबियन्स बद्दलचे मुक्त संवाद आणि प्रसंग, गे-मॅरॅजेस, प्रत्येक पात्राची अनेकांबरोबर असणारी प्रकरणं (आपल्या भाषेत लफडी), अमेरिकन (मुख्यतः न्यूयॉर्क) संस्कृती, मुलांच्या दृष्टीने पालकांचं असलेलं घरातलं स्थान (आणि व्हाईसवर्सा), कुटुंबव्यवस्था, लग्न टिकवण्याची धडपड आणि तरीही कित्येकदा ते फसणं, सावत्र आई-वडील, पहिली-दुसरी-तिसरी-चौथी बायको/नवरा हे प्रकार म्हणजे अतिरेक वाटू शकतात. पण एकदा का ही मालिका अमेरिकन नजरेतून बघता यायला लागली की मग कधी आपण त्यात एकरूप होऊन हास्याच्या नायगारात सामील होऊन कोसळायला लागतो ते कळतही नाही. असो. तर ही सहा प्रमुख पात्र म्हणजे रेचल ग्रीन, फिबी बुफे, मोनिका गेलर, रॉस गेलर (रॉस आणि मोनिका बहिण भाऊ), चँडलर बिंग, जोई (जोसेफ) ट्रिबियानी.


तसं म्हंटलं तर यांमध्ये अजून एक महत्वाचं पात्रही आहे आणि ते म्हणजे हे सहा जण दर संध्याकाळी भेटतात ते 'सेंट्रल पर्क' नावाचं छोटंसं कॉफीशॉप. इथे यांच्या अनेक मीटिंग्स होतात, खेचाखेची, बडबड, गप्पा, नवीन प्लान्स, नवीन बॉयफ्रेंड्स/गर्लफ्रेंड्सच्या ओळखी, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या नवीन नवीन बातम्या या सगळ्या इथेच शेअर केल्या जातात. थोडक्यात जसा आपल्या इथे नाका किंवा अड्डा (तो चोरांचा नव्हे, आपल्यासारख्या सभ्य तरुणतरुणींचा) असतो तसं यांचं हे 'सेंट्रल पर्क'... !!


 रेचल ग्रीन (जेनिफर अ‍ॅनिस्टन) : आपल्याला या लग्नात इंटरेस्ट नाही याचा अचानक लग्नाच्या दिवशी साक्षात्कार होऊन लग्नाच्या हॉलमधून पळून जाऊन मोनिकाकडे येऊन धडकणारी, फॅशनच्या दुनियेत करिअर करायची इच्छा असलेली तरुणी. वडील डॉक्टर, होणारा नवरा डॉक्टर. पण सगळं सोडून ती पळून येते. या पात्राच्या अनेक लकबी आहेत, अनेक छटा आहेत. कधी रॉसवर जीवापाड प्रेम करणारी मुलगी तर कधी त्याचा प्रचंड द्वेष करणारी किंवा स्वार्थीपणे त्याच्याकडून हवं ते वदवून घ्यायचा प्रयत्न करणारी. मला स्वतःला जेनिफर अ‍ॅनिस्टन कितीही आवडत असली तरीही रेचल ग्रीन या पात्राचा नेहमीच राग येतो. अनेकदा स्वार्थी, मतलबी, प्रसंगी कावेबाज असं वाटणारं आणि वागणारं हे पात्र. तिच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या रॉसला कित्येकदा फसवून, गंडवून त्याचा वापर करून घेते. पण अनेकदा तिचं वागणं, स्टाईल, संवाद, दिसणं हे प्रचंड आवडून जातं. तिचं रॉसबद्दलचं प्रेम, एकटं राहण्याची धडपड, मोनिकाबरोबरची मैत्री आणि कधीकधी उडणारे खटके, फॅशन जगताची आवड, जोईशी जवळीक आणि अखेरीस पुन्हा रॉसकडे जाणं हे सगळं विलक्षण आवडून जातं.

फिबी बुफे (लिझा कुद्रो) : ही बया म्हणजे एक अजब रसायन आहे. बालपणीच आईने केलेली आत्महत्या, वडिलांचा पत्ता नाही, विक्षिप्त जुळी बहिण या सगळ्यामुळे बालपण अतिशय हालात गेलेलं. त्यामुळे पोटापाण्याचा उद्योग म्हणून ही मसाज पार्लरमध्ये (किंवा अनेकदा फ्रीलान्सर म्हणून) 'मसुस (masseuse)' चं काम करते आणि 'सेंट्रल पर्क' मध्ये गिटारही वाजवते. हे वाचताना जेवढं भयानक किंवा दयनीय वाटतं त्याच्या कैकपटीने प्रत्यक्षात हलकंफुलकं आहे. तिचं विचित्र वागणं, कधीकधी (इतर पात्रांच्या) डोक्यात जाणारी पण निरागस निरर्थक बडबड, तिच्या नजरेतलं नीतिमुल्यांचं महत्व, तिचा शाकाहाराचा अट्टाहास, महागड्या कृत्रिम वस्तूंविषयी तिच्या मनात असणारा राग, मित्रांसाठी केव्हाही काहीही करण्याची तयारी यामुळे नियमित फ्रेंड्स बघणार्‍या अनेकांची ती सगळ्यांत आवडती फ्रेंड आहे. मी हे म्हणतोय त्याअर्थी माझंही हे 'फ्रेंड्स' मधलं सगळ्यांत आवडतं पात्र आहे हे वेगळं सांगायला नकोच. पण मला फिबी सगळ्यांत आवडते ते तिच्या पांचट, निरर्थक बडबडीमुळे आणि त्यातून होणार्‍या विनोदांमुळे. एक उदाहरण सांगतो. एकदा फिबी रेचलला रेचलच्या होणार्‍या मुलाविषयी काहीतरी विचारते.

रेचल : फिबी, मला याविषयावर बोलायची निदान आत्तातरी इच्छा नाहीये.

फिबी : बरं ठीके.

दोन सेकंद पॉझ

फिबी : बरं आता?

फिबीचे विनोद, तिची बडबड काय लायकीची असेल आणि त्यामुळे आपली कसली भन्नाट करमणूक होत असेल हे सांगायला हा एवढा प्रसंग पुरेसा आहे मला वाटतं.


मोनिका गेलर (कर्टनी कॉक्स) : निव्वळ मॅनहॅटनसारख्या महागड्या परिसरात आजीचा जुना फ्लॅट असल्यानेच मॅनहॅटनमध्ये राहू शकणारी ही मुलगी. ही आणि रेचल रूममेट्स आहेत. (आणि त्यांच्या समोरच्याच फ्लॅटमध्ये चँडलर आणि जोई राहतात.) उत्कृष्ट शेफगिरी आणि स्वच्छतेची अतिरेकी आवड हे तिचे दोन प्रमुख गुण. आणि स्वच्छतेची अतिरेकी आवड ही अतिशयोक्ती नाही. मोठ्या व्हॅक्युम क्लिनर स्वच्छ करण्यासाठी छोटा व्हॅक्युम क्लिनर वापरणारी किंवा रॉसचं एका मुलीबरोबर ब्रेकऑफ झाल्यानंतर त्या मुलीचं घर प्रचंड अस्वच्छ आहे हे रॉसकडून कळल्यावर रात्री धडपडत त्या मुलीच्या घरी जाऊन तिला "तुझं घर मी साफ करून देऊ का?" असं विचारणारी ही बाई. :D. आता कळलं ना स्वच्छतेची किती अतिरेकी आवड आहे हिला ते. स्वतःच्या मालकीचं एक रेस्टॉरंट असावं असं स्वप्न कायम बघणारी, सख्खा भाऊ रॉसशी सतत तुलना झाल्याने रॉसवर, आई-बाबांवर वैतागणारी. अपघातानेच चँडलरच्या प्रेमात पडून पुढे त्याच्याशी लग्न करणारी, लहान मुलांची प्रचंड आवड असणारी पण दुर्दैवाने ते सुख नशिबात नसणारी अशी ही मुलगी. हे सगळे प्रकार तिला पडद्यावर करताना बघताना मजा येते जाम.

बापरे.. एका दिवसासाठी खूप झालं लिहून. उरलेल्या फ्रेंड्सना उद्या भेटू !!

फ्रेंड्सच्या गाण्याचे व्हिडिओज खालील ठिकाणी पाहता येतील.


Opening Sequence


पूर्ण गाणं

* सर्व 'मित्रचित्रे' आणि व्हिडीओज आंतरजालावरून साभार.

- भाग २ इथे  वाचा.

Thursday, June 24, 2010

तूच !!

खरं तर कविता लिहिणं हा माझा प्रांत नाही पण पावसावर काहीतरी लिहायचंय म्हंटलं आणि खरडायला बसलो तर गद्याऐवजी आपोआप कविताच उतरली. पूर्वी यमक जुळवण्याचे आटोकाट प्रयत्न करत र ला ट जोडत सामाजिक आणि कैच्याकै कविता लिहिल्या होत्या. पण मुक्तछंदातला हा पहिलाच प्रयत्न. !!

पाऊस पडायचाय अजून... पण
भरकटणार्‍या वार्‍याने फरपटणारी पानं
क्षण दोन क्षणापुरतं आकाश चंदेरी करणार्‍या वीजा
झाडांची सळसळ आणि ढगांचा कल्लोळ
पाऊस येणार हे मनोमन पटत असतं...

पण अचानक बघता बघता
सगळं गायब होऊन जातं.
वारा थंडावतो, वीजा मालवतात..
पावसाच्या वाकोल्या लांबूनच दिसतात..

आणि मग अचानक कधीतरी ध्यानीमनीही नसताना
रोरावत, रौद्रावत, घोंघावत, येतोस अचानक...
बेसावध क्षणी गाठावं तसा..
कपड्यांची शुद्ध नसते की रूपाचं भान..
अवचित मागून येऊन विळखा घालावास तसा.

कधी कधी मात्र कशाचाच मागमूस नसतो.
ना कसली चाहूल ना कसल्या पाउलखुणा
हलकेच येतोस अंदाज घेतोस
अचानक समोर उभा राहून हनुवटीखाली बोट ठेवून
माझा झुकला चेहरा वर करावास तसा.

पण आताशा आताशा...
मागमूसच नसतो तुझा...
दिसत नाहीस की भेटत नाहीस
चाहुली नाही की खाणाखुणा नाहीत
धिंगाणा नाही की हळुवारपणाही नाही.
पुन्हा पुन्हा त्या लांबून दिसणार्‍या वाकोल्या फक्त.

हल्ली वेड्यासारखा वागतोस.
पाऊसही आणि तूही...
लवकर ये.. येशील??
सांग ना.... !!

ही कविता ऋतू हिरवा  या पावसाळी विशेषांकातही प्रसिद्ध झाली आहे.

Monday, June 21, 2010

त्याच्या पाईकांचे मेंदू

हा धर्म

१. हा धर्म माझ्यावर कुठल्याही विशिष्ट दिवशी देवळात गेलंच पाहिजे अशी जबरदस्ती करत नाही. मी देवाच्या दर्शनाला कधीही जाऊ शकतो. किंबहुना देवळात गेलंच पाहिजे असाही अट्टाहास नाही.

२. मी देवाला मानत नाही या कारणावरून मला धर्मभ्रष्ट ठरवून माझी समाजातून/धर्मातून हकालपट्टी केली जात नाही किंवा तशा प्रकारचे काही फतवे बितवे निघत नाहीत.

३. हा धर्म माझ्यावर दिवसातून ३-४-५-६-७-८ वेळा प्रार्थना करायची सक्ती करत नाही. किंबहुना प्रार्थना कराच अशीही सक्ती करत नाही.

४. केवळ धर्म सांगतो म्हणून मला याच भाज्या खा आणि त्या भाज्या खाऊ नका असे प्रकार करावे लागत नाहीत. माझ्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडीत हा धर्म लुडबुड करत नाही.

५. माझा पोशाख, राहणी आणि सवयी ठरवण्याचा अधिकार या धर्माला नाही आणि समजा असला तरी त्याची सक्ती केली जात नाही. धर्म सांगतो म्हणून मला दाढी वाढवावी लागत नाही की टोपी घालावी लागत नाही. शस्त्रं बाळगावी लागत नाहीत की सक्तीच्या एककल्ली अहिंसेचा मार्ग पत्करावा लागत नाही.

६. हा धर्म आपल्या प्रार्थनास्थळात कुठल्याही अन्य धर्मियाला प्रवेश नाकारत नाही की मला अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळात जाण्यापासून रोखत नाही.

७. हा धर्म "भाकरीच्या किंवा धनाच्या बदल्यात धर्म बदला" असं सांगून कोणाच्याही फसव्या 'लुबाड-मदती' करत नाही की दिशाभूली करून छुप्या सौदेबाज्या करत नाही.

८. मी सगळं खाणंपिणं सोडून देऊन (प्रसंगी तब्येती बिघडवून घेऊन) अघोरी उपास करावेत अशी बळजबरी हा धर्म माझ्यावर करत नाही.

९. धर्मयुद्धाच्या नावावर या धर्माच्या सोडून अन्य सर्वधर्मियांच्या कत्तली करून तोच स्वर्गात जाण्याचा, मुक्तीचा, अंतिम सुखाचा एकमेव मार्ग असल्याच्या भ्रामक, धूर्त, फसव्या, अतिरेकी कल्पना हा धर्म माझ्या मनात भरवत नाही.


पण हाच धर्म

१. पण हाच धर्म लोकाग्रहामुळे अग्निपरीक्षा द्यायला लावून त्यातून सुखरूप बाहेर पडलेल्या आपल्या पत्नीला एका सामान्य धोब्याच्या फुटकळ टोमण्यांवरून ऐन गरोदरपणात वनवासाला पाठवणार्‍या राजाला देवत्व बहाल करतो.

२. "गुरंढोरं, शूद्र आणि नारी म्हणजे ताडनाचे अधिकारी (यांचा जन्म मार खाण्यासाठीच झालेला आहे)" असं अधिकारवाणीने सांगणार्‍याचे ग्रंथ डोक्यावर घेतो.

३. बालविवाह, सतीप्रथेचं परकीयांनी इथे येऊन नियम-कायदे करून सुसूत्रतेने उच्चाटन करेपर्यंत धर्मात सांगितलं आहे म्हणून त्या प्रथा पाळायला लावतो.

४. नवरा मेल्यानंतर स्त्रीचं केशवपन करून तिला कुरूप करून तिच्या दु:खावर अजूनच डागण्या देत ती अधिकाधिक एकलकोंडी कशी होईल हे बघतो. तिला पुनर्विवाह करणं नाकारून, लग्न, आणि अन्य तत्सम धार्मिक आणि सामाजिक सणसमारंभापासून तिला वेगळी काढतो.

५. चातुर्वर्ण्याचे नियम कसे योग्य आहेत हे अहमहमिकेने पटवून देऊन आजच्या युगातही जातीपातीच्या भिंती तोडण्याऐवजी त्या अधिकाधिक उंच आणि बळकट कशा होत राहतील याची खबरदारी घेतो.

६. जबरदस्तीने धर्मांतर झालेल्यांना स्वधर्मात परत घेणं हे कसं अशक्य आहे अशा भाकडकथा सांगतो.

७. एखाद्याच्या जातीवरून त्याला वेदविद्याग्रहणाचे अधिकार आहेत की नाहीत हे ठरवतो.

८. देवाला नैवेद्य म्हणून हजारो मुक्या प्राण्यांच्या कत्तली करण्यास प्रवृत्त करतो.

अरेच्च्या पण हा एवढा पॉवरफुल धर्म आहे तरी कोण? कुठला? कसा दिसतो, कसा वागतो, कुठे राहतो, काय करतो? अंगुलीनिर्देश करायचा झाल्यास कोणाकडे करायचा? त्याला त्याच्या नावाने हाक मारली तर ओS देऊन कोण पुढे येईल? असे सगळे विचार करेकरेतो लक्षात आलं की असं कोणी नसतंच.. असं काही नसतंच. एखाद्याकडे बोट दाखवून "हाच तो धर्म" असं बेछूटपणे नाही म्हणता येणार. फार तर काय, हा माणूस त्या धर्माचा, त्या पंथाचा आहे असं म्हणता येईल.. पण तो माणूस, ती बाई, ती व्यक्ती म्हणजेच तो धर्म, तो पंथ असं होऊ शकत नाही. ती व्यक्ती त्या धर्माची आहे पण तीच म्हणजे तो धर्म नव्हे. तर अशा अनेक व्यक्ती मिळून बनलाय तो हा धर्म. ती माणसं आहेत म्हणून तो धर्म आहे. आणि त्या माणसांची मतं, त्या सार्‍या समूहाची मतं ही त्या धर्माची अंतिम सत्य असल्याच्या थाटात मांडली जातात, आदळली जातात, भिरकावली जातात. पण खरं काय तर धरम बिरम सब झुठ... त्याच्या पाईकांचे मेंदू शाबूत आहेत की सडके हेच महत्वाचं !! तेच अंतिम सत्य... !! ओम शांति: शांति: शांति: .... आमेन.. !!

Sunday, June 20, 2010

चौ-किडे !!

संताप झाला होता नुसता. त्या तिरीमिरीतच घरी गेलो. कपाटातला खण उघडून ती छोटीशी डबी बाहेर काढली आणि टेबलावर ठेवली. त्यातून ते चार किडे बाहेर काढले आणि टेबलावर ठेवले. रागारागाने चौघांकडे बघत होतो. डोळे आग ओकत होते.

"पुन्हा एकदा जिंकलात तुम्ही"
ते शांतच होते. चेहर्‍यावर एक छद्मी विजयी हास्य होतं.

जमेल तेवढी आग डोळ्यातून ओकत पहिल्या किड्यावर खेकसलो.

"१५००० लोकांचा खून, २६ वर्षांचा लढा आणि त्याची शिक्षा १ लाख रुपडे दंड आणि २ वर्षं कैद? अरे शिक्षा होती की बक्षीशी ? हे असे हजारो माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्ह्याचे खटले २६-२६ वर्षं चालवता कसे तुम्ही लोक? आणि १ लाख रुपड्यांचा दंड? अरे त्या लोकांनी साधा खिसा झटकला तर तेवढे पैसे खाली पडतील. आणि तेवढा तुम्ही त्यांना दंड म्हणून लावता? आणि वर जामीनही? अशा गुन्ह्याला जामीन? अरे हा न्याय आहे की पैसे कमाईचं दुकान?"

त्या 'अन्यायालय' नावाच्या किड्याला माझं हे रूप अपेक्षित होतंच कारण त्याच्यासाठी ते नेहमीचं होतं. त्याने चेहर्‍यावर नेहमीचे निर्लज्ज भाव आणून बेशरम आवाजात बोलायला सुरुवात केली.

"हे बघ. उगाच आरडओरडा करू नकोस. एवढ्या मोठ्या खटल्याला २६ वर्षं लागणारच. त्यात काय एवढं? आणि त्यांच्यावर पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले होते त्या गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त शिक्षा ही २ वर्षंच आहे आणि दंडही तेवढाच आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या गुन्ह्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त शिक्षा मिळाली आहे. आणि तो गुन्हा जामीनपात्र आहेच. त्यामुळे त्यासाठी एवढा त्रागा करायची आवश्यकता नाही. बाकी हे कायदे, नियम असे का आणि या अशा कलमांचे गुन्हे आरोपींवर का लावले ते मला माहित नाही. ते तू याला विचारू शकतोस"... माझ्या सगळ्या मुद्यांचं, शंकांचं, प्रश्नांचं यथास्थित समाधान केल्याचा आव आणत त्याने उरलेले सगळे प्रश्न बाजूला उभ्या असलेल्या किड्याकडे वळते केले. मी पुन्हा त्याच प्रश्नांचा भडीमार करू नये म्हणून मला बोलायची संधीच न देता तो 'सरकाट' नावाचा किडा थेट बोलायला लागला.

"तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही पण तरीही मला ठाऊक आहे की जे मी केलं आहे तो योग्य आणि न्यायाला धरून होतं आणि आहे. खटला सुरु झाल्यावर त्या अँडरसनला मीच तर अमेरिकेतून इथे आणलं, त्याच्यावर खटला चालवला. अरे त्याला मोकळं सोडलं असतं तर अनर्थ झाला असता, लोकांनी कायदा हातात घेतला असता. त्याला ठार केलं असतं. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असती. त्यामुळे मी केलं ते योग्यच होतं. आणि तुला काय वाटतं त्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी होती? अरे ते शक्य नाही. आणि आता तर मुळीच शक्य नाही."

"आणि त्याचं कारण मी सांगतो." दुसर्‍या किड्याचं बोलणं संपतं ना संपतं तोच 'मानवाधिक्कार संघटना' नावाचा तिसरा किडा मध्ये लुडबुडला. "अँडरसनचं आता वय झालं आहे. त्यामुळे त्याचं वय, तब्येत वगैरे गोष्टी लक्षात घेता त्याच्यावर खटला चालवणं शक्य नाही. त्याला फाशीच काय कुठलीच शिक्षा करणं शक्य नाही. मानवाधिकाराच्या विरुद्ध आहे ते. आणि तसंही फाशीच्या शिक्षेला अनेक प्रगत देशात मान्यता नाही. एखाद्या व्यक्तीचा कायद्याने खून करायचा आपल्याला काय अधिकार तो आपल्याला कोणी दिला? त्याला मारल्याने ते मेलेले लोक परत येणार आहेत का?"

एव्हाना माझं डोकं गरगरायला लागलं होतं. तो सारा प्रकार असह्य होऊन मी दाणकन टेबलवर माझी मुठ आपटली.

"अरे तुम्ही किडेच. शेवटी किड्यांसारखाच विचार करणार. त्यात तुमची चूक नाही पण तरीही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय माझ्या जीवाची तगमग कमी होणार नाही. मला उत्तरं मिळालीच पाहिजेत.

१. एवढ्या महत्वाच्या खटल्याचा, ज्यात हजारो जीव अक्षरशः तडफडत तडफडत गेले, नवीन येणारे कित्येक जीव जन्मतःच अपंगत्व घेऊन आले, ज्या दुर्घटनेमुळे एक पिढीच्या पिढी करपली, पुसली गेली अशा खटल्याचा निकाल लागायला २६ वर्षं लागतात? का???????? फास्टट्रॅक कोर्ट किंवा असंच काही करून लवकर निकाल का लावला गेला नाही? की फास्टट्रॅक कोर्ट हे सुद्धा फक्त रंगीबेरंगी नाव असलेलं एक अन्यायालयच आहे?

२. एवढ्या भयानक गुन्ह्यांसाठी एवढी कमी शिक्षा असलेली पर्यायाने अयोग्य कलमं आरोपींवर कोणी लावली? त्यात कोणाचे हितसंबंध गुंतले होते?

३. त्या अँडरसनला जामीन मिळवून देऊन सरकारी गाडीतून चोख बंदोबस्तात सोडणार्‍या नेत्यांच्या घरचे किती जण भोपाळ वायूदुर्घटनेचे बळी आहेत? किती जणांनी तो त्रास, छळ, यातना, अपंगत्व या सगळ्याला तोंड दिलं आहे?

४. भोपाळच्या पाण्यातून, हवेतून, जमिनीतून, वार्‍यातून त्या विषाचा अंश पूर्णतः काढून टाकण्याची जवाबदारी तुम्ही कधी पार पाडणार आहात? तेवढंच तुमच्या महापापाचं थोडंसं प्रायश्चित.. उरलेल्या जगल्या वाचलेल्यांचा दुवा तरी घ्या निदान.

५. प्रगत देशांच्या सोयीस्कर गोष्टींचं अंधानुकरण करणार्‍या आणि त्याची टिमकी वारंवार वाजवणार्‍या किती लोकांना हे ठाऊक आहे की अशा घटना परदेशात घडतात तेव्हा आरोपींना ३०-४०-५० वर्षांच्या शिक्षा होतात, फाशी किंवा तत्सम शिक्षा नाकारणार्‍या, त्यांचा निषेध करणार्‍या किती लोकांनी आपले आप्तजन भोपाळ दुर्घटनेत किंवा एकूणच दुर्दैवी अशा बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले यांसारख्या घटनांमध्ये गमावले आहेत?

६. तुमचं कणभरही वैयक्तिक नुकसान झालेलं नसताना लोकांच्या भावनांची खिल्ली उडवून त्यांना कायदा आणि मानवाधिकाराचे डोस पाजण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?

७. जे हजारो निरपराध लोक स्वतःचा काहीही दोष नसताना त्या भीषण वायुगळतीमुळे (किंवा भयानक बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले यांमुळे) मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांच्या मानवाधिकाराचं, त्यांच्या जगण्याच्या हक्काचं काय?

८. .......

----
--
----
---
---
--

१२ .......

-----

---
--
-
-
---
-
-

२५. ......

---
--
-
-
-

५७. .......

----
-
-
-
---
-

१०३. .......

----
---
-
--
-

२२१. .....
----
--
-
---
--

त्यानंतर असं बरंच बरंच बरंच काहीसं मी बोलत राहिलो, सांगत राहिलो, बडबडत राहिलो, माझी कैफियत मांडत राहिलो, मुद्दें सांगत राहिलो.... बर्‍याच वेळ !!! कारण यादी खूप मोठी होती.. मुद्दे, आरोप, प्रश्न अनेक होते. आणि सारेच अनुत्तरीत.. नेहमीसारखेच.. खूप वेळ अशी काहीशी बडबड करून झाल्यावर मी क्षणभर थांबलो. बघितलं तर ते चौघे शांतपणे उभे होते आणि गालातल्या गालात हसत होते. त्यांना काही फरक पडत नव्हता मी काय बोलतोय, काय सांगतोय, काय मागतोय, काय मांडतोय याच्याशी.. ते मुक्त होते. तृप्त होते. रक्त पिऊन पिऊन त्यांचे खिसे आणि पोटं भरलेली होती. 'जनता' नावाच्या एका क्षुद्र, तुच्छ, हलक्या जनावराच्या पोटतिडीकीने बोलण्याला त्यांच्या दृष्टीने एक निरर्थक, फालतू बडबड, अनाठायी केलेला त्रागा याउपर किंमत नव्हती. त्या बेशरम हास्यातून लोंबणारा क्षुद्र कोडगेपणा मला असह्य झाला. माझी उरली सुरली आशा संपुष्टात आली.

आणि संतापाने लाल होऊन, न राहवून त्या तिन्ही किड्यांना मी एका मागोमाग नखाने चिरडून  चिरडून टाकलं... आणि हो.... त्या अँडरसन नावाच्या चौथ्या किड्यालाही............

मागे अफझल गुरु, कसाब वगैरे वगैरे किड्यांना चिरडून टाकलं होतं ना तसंच. अगदी तसंच. नेहमीप्रमाणेच... !!!

अजून करू तरी काय शकणार होतो मी !!!!!!

** हा लेख या अशा भाषेत टाकू की नको याचा बराच विचार करत होतो. पण जर माझ्या भावना (कितीही कठोर असल्या तरीही) मला माझ्या ब्लॉगवर व्यक्त करता येणार नसतील तर ते ब्लॉगच्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करणारं ठरेल असं वाटलं. त्यामुळे त्या जशाच्या तशा मांडण्याचा प्रयत्न केला.

Thursday, June 17, 2010

पाव(चाळा)साळा आणि गम (भरे) बूट

मला पावसाळा आवडत नाही. कारण मला पाऊसच आवडत नाही. मला कल्पना आहे की मला शाहरुख आवडत नाही कारण त्याची स्टाईलच आवडत नाही किंवा मला द्रविड आवडत नाही कारण त्याची बॅटिंगच आवडत नाही किंवा मग अगदी काजोल आवडत नाही कारण तिची अ‍ॅक्टिंग आवडत नाही असं काहीतरी म्हणण्यासारखं हे आहे. जर कोणाला खरोखरच शाहरुख, द्रविड आणि काजोल (अरे हो.. आणि पाऊसही) आवडत नसतील तर तो योगायोग समजू नये. त्यांचं या एकखांबी तंबूत स्वागत आहे. कितीही वेड्यात काढलंत तरी ईलाज नाही. कारण हे शाश्वत आणि अंतिम नसलं तरीही माझ्यासाठी माझ्यापुरतं मात्र सत्य आहे.

पाऊस म्हटलं की लोकं एकदम नोस्टॅल्जिक होऊन मागे जात जात जात एकदम "आमच्या घरासमोर असलेल्या डबक्यात आम्ही कशा नावा करून सोडायचो.. कशा एकमेकांच्या होड्या सॉरी सॉरी नावा (नावा हे जास्त नोस्टॅल्जिक वाटतं खरं) पाण्यात बुडवायचो" किंवा मग "त्या बंड्याने कसं त्या चिंगीला धक्का देऊन पाण्यात पाडलं" किंवा "कसं ते डबक्यातलं पाणी तिच्या अंगावर उडवलं" पर्यंत मागे जाऊन येतात.. येतात कसले तिथेच थांबतात (राहतात या अर्थी. खरं तर थांबत नाहीत चालूच राहतात) म्हणणं जास्त योग्य. कोणावरही अविश्वास वगैरे दाखवणं असं काही नाही (आणि समजा मी दाखवलाच अविश्वास तर कोसळायला तुम्ही काय सरकार आहात का. उगाच कायच्याकाय) किंवा कदाचित माझ्या जात्याच कमी असलेल्या स्मरणशक्तीमुळेही (शंखपुष्पी की कायसं घेतल्यावर वाढायची म्हणे. च्यायला तेही आठवत नाही आता.. !!) असेल पण मला एकदाही "मी त्या प्रज्ञाची वेणी कशी ओढली होती" किंवा "त्या वैभवला कसा बदाबदा बुकलला होता" ते आठवत नाहीये. हो माझ्या बालपणात चिंग्या आणि बंडे (एक तितली अनेक तितलीया, एक बंड्या अनेक बंडे) वगैरे नव्हते. होत्या त्या प्रज्ञा, विद्या, वर्षा, वैभव, नवीन, राजेश वगैरेच... अरे हो पावसाच्या आठवणींबद्दल बोलायचं होतं नाही का. आणि ही वेणीवाली प्रज्ञा आणि बुकललेला वैभव आपल्या वरच्या यादीत नव्हताच की. उगाच केव्हाही काहीही आठवतं आणि म्हणे नाशतालज्यिक (हे 'नाशतालज्यिक' हे 'सलाम नमस्ते'वाल्या 'एकझ्याकली' च्या तालात वाचावे.)

तर पुष्पीच्या (नाही ही वर्षा, विद्या, प्रज्ञाच्या यादीतली माझी मैत्रीण नाही हे औषधाचं नाव आहे. मगाशी सांगितलं नाही का. ज्यांना आठवत नाहीये त्यांनी पुष्पी घ्यावी) कृपेने किंवा जी कोणी असेल तिच्या कृपेने मी मागे जात जात जात जिथे जाऊन धाडकन आपटतो (आणि डोक्याला टेंगुळ येतं वगैरे वगैरे) ती आठवण म्हणजे नावांची, होड्यांची (दोन्ही एकच हो पण एक नाशतालज्यिक आणि दुसरं ना-नाशतालज्यिक.. आठवत नसेल तर आता मात्र नक्की पुष्पी घ्याच), डबक्यांची किंवा टेंगुळांचीही नव्हे तर वेगळीच आहे. डोंबिवलीच्या रस्त्यांवरून चालताना गिरगावात घेतलेले आणि त्यामुळे गिरगावातले रस्ते आणि पावसाला अनुसरून बनवलेले सँडल्स वापरताना जो एक त्रास (म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला नसला तरी आमचंही बालपण हलाखीतच गेलंय. कळलं ना आता.. !!) होतो ना अगदी तसाच त्रास व्हायचा चालताना. ती चिखलाची चिकचिक, सगळीकडे साठलेलं पाणी सगळा नुसता किचकिचाट. (कुठे गेले रे सगळे पाऊस आवडतो म्हणणारे.). जाम वैताग यायचा ते पाण्याने, चिखलाने बरबटलेले सँडल्स घालून चालताना. पण माझ्या आई-बाबांच्या दृष्टीने मी अजून (म्हणजे तेव्हा) मोठा झालेलो नसल्याने मला गमबूट मिळणार नव्हते. (खरं तर याचा उच्चार 'गं बूट' असा असल्याने लिहितानाही 'गंबूट' असं लिहिलं पाहिजे. परंतु 'गंबूट' म्हणजे ते तंबूत बिंबूत असं काहीतरी विचित्र वाटतंय. त्यामुळे गमबूट असंच लिहितोय. परंतु लिखाण अधिक परिणामकारक वाटण्यासाठी तुम्ही 'गंबूट' असंच वाचा.) त्यामुळे मला वाटतं डोंबिवलीतले पहिले दोन पावसाळे मी त्या बरबट सँडल्सच्या साथीने काढले. त्यानंतर दोन वर्षांनी मी मोठा झाल्यावर म्हणजे गमबूट घेण्याइतका मोठा झाल्यावर त्या वर्षी मी पावसाची जेवढी वाट बघितली असेल तेवढी (अजून अजून मोठा झाल्यावर) दोघांनी एका छत्रीत चालायला मिळावं म्हणून पडाव्याश्या वाटणार्‍या पावसाचीही बघितली नसेल. बरं अतिशयोक्ती सोडून द्या. दुसरी उपमा सुचली नाही, आठवली नाही (पुष्पीनी, येना येना येना) म्हणून ही वापरली. थोडक्यात जाम लय भारी वाट बघितली होती त्यावर्षी. आणि ज्याप्रमाणे आकाशात चार काळे ढग जमा झाले की हार्बरच्या गाड्या बंद पडतात त्याप्रमाणे त्यावर्षीचे काळे ढग जमा झाल्यावर पहिला पाऊस पडण्याआधीच मी माझे सँडल्स बंद पडले असल्याचं आपलं खराब झाले असल्याचं आणि मला गमबूट(च) हवे असल्याचं घरात जाहीर केलं. काही झालं तरी त्या जुन्या, उष्ट्या सँडल्सनी मी यावर्षी पहिल्या पावसाला सामोरा जाणार नव्हतो. माझ्या गमबूटच्या मागणीला घरात मान्यताही मिळाली. झालं.. अचानक मला पावसाळा आवडायला लागला होता. निदान गमबूट मिळेपर्यंत तरी. जसा शुगरबॉक्सनंतर (आणि लग्नाच्या आधीपर्यंत) नवरा आवडायला लागतो ना मुलींना अगदी तसंच. (मुलींनो, हलकं घ्या. मुलांनो, अज्याबात कायपण हलकं नाय यात). तर बघता बघता तो सुवर्णदिन, प्लॅटिनम-क्षण माझ्या आयुष्यात उगवला. अगदी पहिला पाऊस पडायच्या आधी. त्यादिवशी संध्याकाळी दुकानात जाऊन आम्ही ते काळेभोर, मऊशार, देखणे, उत्तम, टिकाऊ गमबूट घेतले आणि दुसर्‍या क्षणीच मी ते पायात चढवले सुद्धा. आणि काय सांगू तो अनुभव अहाहा. दुकानातून घरी येताना सगळेजण माझ्याकडे आणि माझ्या गमबुटांकडेच बघताहेत असं वाटत होतं मला. अगदी पाडगांवकर बोलगाणीमध्ये म्हणतात ना तसंच.

त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत

हवं तर सिंहासारखं नको छाव्यासारखं म्हणू. म्हणजे लहान सिंह ना म्हणून छावा बाकी काही नाही. (तुम्हाला वाटतंय त्या अर्थी 'छावा' मी नंतर झालो. पण ते आत्ता नको. त्याच्याविषयी नंतर कधीतरी)

पण लोकांनी माझ्याकडे आदराने (मला तेव्हा आदराने वाटलं होतं पण खरं तर त्यांचं बघणं विचित्र या अर्थी होतं) बघण्याचं कारण वेगळंच होतं. आणि आमच्या मातोश्रींनी ते चटकन ओळखलं होतं. घरी आल्यावर, वीज कडाडावी तशा त्या कडाडल्या (आजची म्हण : पावसाळी लेखात विजेची उपमा) "असा लंगडत का चालत होतास ??". "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी" या म्हणीचा (सॉरी. या म्हणीशी तादात्म्य सांगणारी पावसाळी म्हण तयार करता आली नाही. त्यामुळे वरिजिनलच वापरतो आहे. शेवटी जुनं ते सोनं) अनुभव मला क्षणार्धात आला. "असा लंगडत का चालत होतास? चावले की काय नवीन बूट?" वीज पुन्हा कडाडली. ते गमबूट घालून दुकानातून पहिलं पाऊल बाहेर टाकल्यापासून ते थेट आत्तापर्यंत जो मी कळवळत चालत होतो ना तो सगळा त्रास, तो राग, बूट खसकन पायातून ओढून बाहेर काढून टाकला. बूट आणि राग दोन्हीही. बघतो तर दोन्ही पायांवर टाच आणि पोटरीच्या मध्ये जो एक असा बाहेर आलेला भाग असतो ना (काय म्हणतात त्याला मराठीत किंवा कुठल्याही भाषेत देव जाणे. तूर्तास आपण 'गमबूट चावण्याची जागा' असं म्हणू) तो अस्सा लाललाल झाला होता. 'गमबूट चावण्याची जागा' वर्णनातून कळली नसेल(च) तर त्यासाठी गुग्ल्याकडून हे चित्र उधार घेतलंय. त्यात ते खाली सर्वात शेवटच्या बाणाने जी जागा दाखवली आहे ना तिला (आमच्यात) 'गमबूट चावण्याची जागा' असे म्हणतात.

तर दोन्ही पायांवरच्या त्या 'गमबूट चावण्याच्या जागा' (एकूण चार. पाय नव्हे जागा.) एकदम लाल झाल्या होत्या. रबर घासून घासून, हुळहुळल्याने थोडी जखम झाल्यासारखीही झाली होती. मग त्यांना त्या बँडेड नामक चिकटपट्ट्या लावण्याचे कार्यक्रम झाले. पायात मोजे घालून त्यावर गमबूट घालण्याच्या सूचना मिळाल्या. अर्थात चावणं, दुखणं मात्र काही कमी झालं नाही. गमबूटवरचं प्रेम मात्र क्षणात ओसरलं. आणि पाऊस तर अजूनच नकोसा झाला तेव्हापासून. त्यानंतर ते पाऊस पडल्यावर मोजे ओले झाल्याने पाय चिकट होणे वगैरे प्रकार सुरु झाले. कालांतराने ते बूट चावणं प्रकरण कमी झालं नसलं तरी कदाचित त्या चावण्याची सवय झाल्याने काही विशेष वाटेनासं झालं असावं. (इतर कित्येक चावर्‍या गोष्टीं नाही का सहन करत आपण. त्यातलीच ही एक).

हे दुखरे पण सवयीचे झालेले बूट घालून असाच एकदा शाळेत मधल्या सुट्टीत खेळत होतो. शाळेत काहीतरी बांधकाम चालू होतं त्यामुळे मैदानात रेतीचा मोठ्ठा ढीग रचून ठेवलेला होता. सगळ्या कार्ट्यांच्या (मी सोडून) काय मनात आलं देव जाणे पण अचानक सगळेजण त्या ढिगाच्या दिशेने धावायला लागले आणि एकदम त्या ढिगावर उड्या मारायला लागले. अर्थात मीही त्यातलंच एक कार्ट असल्याने (च्यायला कबुल करावंच लागलं शेवटी.. अरेरे.) मीही धावत सुटलो आणि एकदम इश्टायलीत त्या ढिगावर एकदम लॉंग जंप, हाय जंप मारली. सगळी रेती शर्टवर, चेहर्‍यावर उडाली. अर्थात त्याचं मुळीच दु:ख नव्हतं. पण उठून उभा राहिलो, पाहिलं पाऊल टाकलं आणि एकदम सार्‍या जगाचं दु:ख, वेदना, यातना, त्रास, छळ, संकटं जणु माझ्याच शिरी ठेवल्यासारखा माझा चेहरा झाला. आधीच त्या 'गमबूट चावण्याच्या जागा' छळत होत्या ते दु:ख कमी होतं की काय म्हणून चढत्या भाजणीने अजून दु:ख उर्फ रेती बुटात भरली गेली आणि अक्षरशः एकही पाऊल टाकवेना. पाय उचलून खाली टेकवला की त्या एक-दीड सेकंदात असंख्य टोकदार, धारदार बाणांनी, तलवारींनी, भल्यांनी वार करावेत तसे त्या ओल्या, टणक, खरखरीत वाळूचे हल्ले पावलावर होत होते. कळवळत कळवळत हळूहळू दोन्ही बूट पायातून काढले तर पायाची अवस्था बघवत नव्हती. बूट नळाखाली धरून आत चिकटलेली रेती काढून टाकण्याचा सुपर-व्यर्थ प्रयत्न करून झाला. शेवटी घरी येताना अक्षरशः अनवाणी पायाने (हो त्याच त्या डबक्यांनी आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून) चालत घरी यायची पाळी आली. त्यादिवसापासून आयुष्यात कधीही गमबुटांचं नावही काढलं नाही......

तर आपटून टेंगुळ येण्याएवढं मागे गेल्यावर मला आठवतात ते पावसाचे अनुभव असेच भयंकर गंबुटी आहेत त्यामुळे टेंगळाच्या थोडं अलिकडे थांबायचं ठरवलं. पण तरी तिकडेही पावसाचा असाच एक निसरडा प्रसंग आठवतो. फुटबॉलच्या वर्ल्डकपवाला कुठलातरी एक पावसाळा होता. जास्त तपशीलात जात नाही कारण कुठला ते एक तर मला मला आठवत नाहीये आणि दुसरं म्हणजे ते आपल्या या प्रसंगाशी विशेष संबंधितही नाहीये. तर "फुटबॉल वर्ल्डकप चालू असताना फुटबॉल न खेळता क्रिकेट किंवा इतर काहीही खेळणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे" या आम्हीच तयार केलेल्या नियमाच्या आधारे दररोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर आमचं जोरदार फुटबॉल खेळणं चालू होतं. पण हळूहळू पाऊस खूप वाढायला लागला इतका की आमच्या फुटबॉल ग्राउंडची फुलटू वाट लागली होती (हो. माझ्या लहानपणी भरपूर पाऊस पडायचा हे मला नक्की आठवतंय. थांकु पुष्पिनी). पण काहीही होवो आणि कोणीही असो नियम तो नियम त्यामुळे आम्ही तो नियम इमानेइतबारे आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर पाळायला सुरुवात केली. आणि पाऊस पडत असेल तर न थांबता उलट "पावसात फुटबॉल खेळताना उलट अजूनच मजा येते "असं म्हणून आणि एकमेकांना समजावत, सांभाळत (पक्षि दुसर्‍या पार्टीतल्या पोरांना ढकलत) आम्ही अजून उत्साहाने खेळायला लागलो. पण क्ले कोर्टची सर सिमेंट कोर्ट किंवा तुटक्या-चिपा कोर्टला कशी येणार म्हणा. त्यात डोक्यावर पाऊस. त्यामुळे दणादण धडपडणं, घसरणं, आपटणं हे प्रकार नियमित होऊ लागले. पण तरीही त्याचंही काही वाटायचं नाही. पण त्या दिवशीपर्यंतच. त्या दिवशी आमच्यातलाच एक दादा मुलगा (म्हणजे 'भाई' वाला नाही 'वयाने मोठा' वाला) जोरदार आपटला आणि तेही डोक्यावर. क्षणभर आम्ही सगळे एकदम सुन्न. २ मिनिटांनी तो उठून बसला आणि मनमोहन देसाई किंवा यश चोपडाच्या चित्रपटातले कॅरॅक्टर अ‍ॅक्टर्स ज्या थंडपणे म्हणतात अगदी त्याच थंडपणे "मै कहां हुं" चं मराठी व्हर्जन वदता झाला "काय झालंय मला?". आमची तर बोबडीच वळली. थोड्या वेळाने इतर दादा लोकांनी त्याला जरा सावकाश उठवून बसवलं. पाणीबिणी पाजलं आणि हळूहळू त्याला माणसांत आणलं.

तर टेंगळाच्या असं विरुद्ध दिशेने चालत चालत येताना असे बरेच बोचरे, टोचरे, निसरडे, धडपडे, भिजवे, चिखले, चिकटे, कपडे-खराब-करे, पाणी-उडवे, छत्री-उलटे, छत्री-विसरे, विंचीटर-हरवे, ट्रेक-कोरडे, कॉलेजात/हापिसात-पोचल्यावर-ट्रेन-बंद-पडे, बिन-लाईटे, घरभर-पाणी-भरे असे अनेकानेक अनुभव आहेत. पण सगळे देत बसलो तर कंटाळून तुम्ही त्या वरच्या 'X' च्या खुणेवर टिचकी माराल. म्हणून फक्त ओझरतं सांगितलं. आता सांगा मला का बरं आवडावा पाऊस एखाद्याला? सांगा.. !! एक तरी कारण द्या. पण नाही. त्या पावसाच्या भीतीने कोणी काही बोलत नाही. जसं "शेर कळत नाहीत" किंवा "गझला आवडत नाहीत" म्हंटल्यावर जसा एक तुच्छ कटाक्ष नशिबी येतो त्याप्रमाणे "मला पाऊस आवडत नाही" म्हंटल्यावर त्या तु.क. ची सर धावून येते. त्यामुळे शेवटी ते तु.क. चुकवण्यासाठी (आम्हालाही माणूस म्हणून जगू द्या !!! ;) ) शेवटी 'पाऊस आवडण्याची' मी एक माझ्यापुरतीच नियमावली काढली. मागे मैथिलीच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना ती नियमावली लिहिली होतीच. अर्थात त्यात सगळे नियम कव्हर झाले नव्हते कदाचित. तीच नियमावली अजून थोडे नियम वाढवून इकडे देतो.

१. रात्री ११ ते सकाळी ६ मधेच पडावा. : उगाच दिवसा लुडबुड नको. गाड्या लेट होतात, रस्त्यावर पाणी साठतं, चिखल होतो, छत्र्या उडतात/हरवतात.
२. सगळ्या शेतांवर आणि धरणांवर जोरदार बरसावा. कधीही आणि कुठल्याही वेळी चालेल. आमची काही ना नाही. परंतु उगाच रस्त्यांवर पडून चिखल व्हायला नको. : "अरे पाऊस पाडला नाही तर आपण खाणार काय? शेती होणार नाही, धरणांत पाणी साठणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही" असा उपदेश माँसाहेबांकडून लहानपणी मिळाल्यावर या नियमाची निर्मिती केली गेली.
३. ट्रेकला गेलो असलो की दिवसभर नॉनस्टॉप पडावा. : स्पष्टीकरणाची गरज नाही.
४. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकेकदा इतका पडावा की गाड्या बंद पडतील. : तेवढीच मस्त सुट्टी. कारण आयत्या वेळी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी मिळालेल्या/घेतलेल्या सुट्टीची मजा 'प्लान्ड लिव्ह' मध्ये नाही.
५. वरच्या अटीतला पाऊस सोमवारीच पडावा. किंवा फार तर शुक्रवारी. : लॉंग वीकांत !! तुका म्हणे त्यातल्या त्यात..

तळटीप : लेखात दिलेली सर्व मतं ही लेखकाची लेख लिहीत असतानाच्या मानसिक अवस्थेतील मते आहेत आणि त्या सर्व मतांशी लेखक आत्ता म्हणजे लेख लिहून झाल्यावर सहमत असेलच असे नाही याची कृपया नोंद घ्यावी. परंतु काहीही झाले तरीही लेखकाला पाऊस आवडत नाही (उन्हाळ्यात सोडून) हे मात्र नक्की. !!!

Thursday, June 10, 2010

प्रतिक्रिया न देण्याच्या लायकीची पोस्ट उर्फ 'लाउड थिंकिंग'

कधी कधी होतं काय माहित्ये ? ब्लॉग एकदम मंदावून जातो. मंदावून कसला. किंबहुना निपचित पडतो, उसासे टाकतो, कण्हायला लागतो. काही म्हणजे काही हालचाल होत नाही तिथे. इतका म्हणजे इतका आळसटलेला, ढिम्म, मंद, हतबल झालेला असतो ना की घरपानावरून (होमपेज) उंदीर फिरवला तरी शेवटच्या पोस्टची धूळ चिकटते उंदराच्या पायांना. इतSSSSका मंद. वर्षानुवर्षं साफ न केलेल्या किंवा गृहिणीचा हात न फिरलेल्या एखाद्या ओसाड घरासारखा. (इथे 'वर्षानुवर्षं'चा अर्थ आठवडानुआठवडं आणि 'गृहिणी'चा अर्थ ब्लॉगर पक्षि मी स्वतः असा घ्यावा हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. (परंतु ज्यांनी ओळखले नाहीये त्यांच्यासाठी मुद्दाम कंसांची योजना केली आहे.) )

बरं निपचित पडलाय तर त्याची कारणं काय? तर नेहमीचीच.. विशेष वेगळी नाहीत. ठराविकच म्हणा हवं तर किंवा घासून गुळगुळीत झालेली म्हणा. काय म्हणताय त्याने फरक पडत नाही. परिणाम एकच. ब्लॉगच्या तोंडावरची माशी हलत नाही. तर या माशीची म्हणजे माशी न हलण्याची ठराविक, घागु झालेली काही कारणं.

१. काही न सुचणे. अगदी काहीच काहीच न सुचणे. टोट्टाल ब्लँक. ब्लॉगर म्हणून नव्हे तर एक नागरिक, समाजप्रिय माणूस, सजग व्यक्ती या नात्याने हे कारण म्हणजे धोक्याची घंटाच. आपल्या आजूबाजूला एवढ्या चांगल्या, उत्तम, बर्‍या, टाकाऊ, वाईट, दु:खद घटना घडताहेत आणि त्याबद्दल आपल्याला आपलं मत नाही? हे फारच भयंकर. ब्लॉग लिहीत नसलात तर काही हरकत नाही. कारण तुमचे व्यक्त होण्याचे मार्ग वेगळे आहेत असं आपण समजू शकतो. पण ब्लॉग/डायरी/कविता असं काहीकाही लिहिताय तरी ब्लॉगवर पोस्ट टाकायला किंवा नवीन कविता करायला विषय मिळत नसेल तर भयानक अवस्था. आपण आपल्या आवरणात, कोषात नको तेवढे गुंतलो आहोत, आजूबाजूला, सभोवताली काय घडतंय ते बघायची, जाणून घेण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही मारून गेलंय आपलं. उठा.. बेसिनसमोर उभं राहून गार गार पाण्याचे ८-१० हबके मारा. जागे व्हा, उठा, जागृत व्हा, जागरूक व्हा.. डोळ्यासमोर (आणि डोक्यातही) आलेला मरगळीचा पदर हरवला, नाहीसा झाला, आसपासचं दिसू लागलं तर मग तुमचा हा आजार भयानक स्वरूपाचा नव्हता हे निश्चित. आता बघा आपोआप सगळ्या बातम्या दिसायला लागतील. युनियन कार्बाईडचा अमानुषपण, न्यायालयाने स्वतःच उडवलेली कायदा आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली, क्रीडामंत्र्यांनी आपलं सॉरी कृषिमंत्र्यांनी ताशी एक या गतीने उलटसुलट फिरवलेली विधानं, अतिरेकी, नक्षलवादी, माओवादी आणि असेच अजून कुठल्या कुठल्या 'वादां'चे बुरखे पांघरलेली अमानुष/भीषण/क्रूर या शब्दांना निरर्थक आणि निस्तेज करून टाकणारी श्वापदं. अर्थात हेच दिसावं/दिसेल/लिहावं असा अट्टाहास नाही. इतरही काही गोष्टी दिसतील ज्या आपल्या थेट जीवनमरणाशी निगडीत नसतील. तुलनेने कमी त्रासाच्या असतील. जाऊदे. भरकटायला नको जास्त. मुद्दा हा की बरंच काही चांगलं/वाईट घडतंय आजूबाजूला. डोळे, मन आणि लॅपटॉप उघडा असला की झालं.

सुदैवाने क्रमांक १ चं कारण लागू होत नाहीये मला. का ते क्रमांक २ मध्ये सांगतो.

२. दुसरं कारण असतं की हे सगळं आपल्याला दिसत असतं. आपण विदीर्ण होत असतो/आनंदी होत असतो. नवीन मुद्दे सुचत असतात. त्यांच्या आपण नोंदी करतो मनातल्या मनात. टिपणं काढून ठेवतो मेंदूत कुठेतरी. त्या सगळ्या नोंदी/टिपणं मग ब्लॉगवर येतात ड्राफ्ट मोड मध्ये. पण झालं.. इथेच कुठेतरी माशी शिंकते, घोडं पेंड खातं. एवढे विषय, मुद्दे, गप्पा, कथा, कविता अर्धवट तयार असतात.
पण आयत्या वेळी 'पावसात भिजायला गेलेल्या चिमुरड्याने पाऊस वाढला तरी घरात न येत हटवादीपणे बाहेरच रहावं' तसा हटवादीपणा करत ते मुद्दे, त्या अर्धवट पोस्ट्स पूर्णत्वाला येताना मात्र हटवादीपणा करतात. म्हणजे अर्धवट अर्धवट अवस्थेत ८-१०-१२ लेख तयार असतात. पण प्रत्यक्षात हातात काय तर शून्य. आधीची पोस्ट लिहून कित्येक दिवस सरलेले असतात आणि सरतही असतात. पण पोस्ट्सची संख्या मात्र आहे तेवढीच. हा प्रत्यक्षात उतरवणं, व्यक्त होणं हा प्रकार जमला पाहिजे खरंतर. आणि तोही जास्त वेळ न घेता.

तर हे दुसरं कारण लागू होतंय मला. अनेक अर्धवट पोस्ट्स पडल्या आहेत अपूर्णावस्थेत. पण मेंदू शिंचा साथ देत नाही.

अजूनही एक कारण आहे. सगळ्यांत लोकप्रिय. उपरोध नाही. खरंच.. आयची आन.. सगळ्यांत लोकप्रिय, सगळ्यांचं लाडकं-आवडतं, सगळ्यांत सुयोग्य, सगळ्याचंच असणारं, नेहमीचंच आणि अगदी खरं...

३. तर हे सगळ्यांचं लाडकं असलेलं कारण म्हणजे "वेळ नसणे". वेळ, वक्त, टाईम, समय.. कसा वेळ जातो तेच कळत नाही. अनेक गोष्टी, मुद्दे ब्लॉगवर टाकायचे असतात. पण वेळच मिळत नाही. आणि कधीतरी जागून किंवा वीकांताला लिहावं म्हटलं तर तोवर तो विषय एवढा जुना होऊन जातो की बर्‍याच ब्लॉग आणि वर्तमानपत्रं यातही तो येऊन गेलेला असतो. त्यामुळे लिहिला जात नाही. आणि पुन्हा सोमवारपासून तेच ते "वेळ नाही" वालं चक्र चालू होतं आणि चालूच रहातं.

वर म्हटलं तसं माझं कारण मधलं आहे. चला ब्लॉग न लिहिण्याच्या कारणांमध्येही मध्यमवर्गीय आहे हे बघून बरं वाटलं ;)

मी काय लिहितोय, काय बडबडतोय, काय टंकतोय मलाच माझं काही कळत नाहीये. मागे कोणीतरी म्हणालं होतं त्याप्रमाणे फुकट जागा मिळाली आहे म्हणून टाका काहीतरी असं वाटत असेल हे. हो. यावेळी तरी हे असंच आहे. काही सुचत नाही, सुचलेलं उतरत नाही आणि ते का उतरत नाही याचं जरा लाउड थिंकिंग करत होतो आणि तेच मग पोस्टमध्ये उतरवलं. ही पोस्ट प्रतिक्रिया मिळण्याच्या लायकीची नाही. त्यामुळे प्रत्येक प्रतिक्रिया म्हणजे बोनस आहे. तरीही प्रतिक्रिया आल्याच तर ते माझं नशीब आणि तुमचा विनय झाला... !!!

Wednesday, June 2, 2010

माझे देव-दिलीप-राज

अतिशय मुख्य सूचना : हा संपूर्ण लेख आणि त्यातली मतं ही माझ्या दृष्टीने लिहिलेली आहेत. अनेक विधानं अनेकांना पटणार नाहीत. जे जे विधान पटत नाहीये त्याच्या सुरुवातीला "माझ्या दृष्टीने" किंवा "माझ्या मते" असे लिहून वाचावे. बाकी,

१. गजनी, रंग दे बसंती, लगान, जोधा अकबर, कमीने, भूत अप्रतिम/टाकाऊ आहे.
२. लता, हिमेश, आशा, अलका, सोनू, श्रेया यांना पर्याय नाही/यांच्याएवढ्या एकांगी गाणारं कोणी नाही.
३. करण जोहर, राजकुमार संतोषी, राजकुमार हिरानी, रामू, विक्रम भट्ट यांच्यासारखा दिग्दर्शक होणे नाही/यांचे मेंदू गुडघ्यात आहेत

ही आणि अशी इतर अनेक वाक्यं आपण वेळोवेळी ऐकतोच. त्या प्रत्येकाला "माझ्या दृष्टीने" किंवा "माझ्या मते" चा प्रिफिक्स लावला की सगळी कोडी सुटतात आणि सगळ्या शंका मिटतात  :)

**

मला कळायला लागल्यापासून जेव्हा जेव्हा मी वाचन (अर्थात अवांतर) करतोय तेव्हापासून मला एक लक्षात यायला लागलं होतं की चित्रपट, संगीत, दिग्दर्शन, अभिनय यातलं काहीही कणभरही करता आलं नाही तरीही या सगळ्या गोष्टींसंबंधी जे जे मिळेल ते ते सगळं वाचून काढण्याची आपल्याला जबरदस्त आवड आहे हे मात्र नक्की. आणि त्यासाठी हिंदी/मराठी चित्रपटच हवेत अशी काही सक्ती नव्हती. हॉलिवूड किंवा जगभरातल्या विविध भाषांमध्ये निर्माण होणारे कुठल्याही चांगल्याचुंगल्या चित्रपटांबद्दल काहीही वाचायला मला आवडायचं. माझ्या लहानपणी चित्रपट विषयावर निघणार्‍या जरातरी दर्जेदार मासिक/पाक्षिकांमध्ये जी, चंदेरी (बाकीची आता आठवत नाहीत) ही काही आघाडीची नावं. त्यांच्या दिवाळी अंकांवर तर मी तुटून पडायचो. बाबा कधी एकदा दिवाळी अंक आणतायत आणि कधी एकदा मी त्यावर तुटून पडून, त्यांचं पान न् पान वाचून काढून त्यांचा फडशा पाडतो असं व्हायचं मला. तर असेच अनेक लेख वाचताना वारंवार ज्यांच्या नावांचा उल्लेख व्हायचा ते त्रिदेव  म्हणजे देव-राज-दिलीप, राज-दिलीप-देव, दिलीप-देव-राज.. क्रम वेगवेगळा पण नावं तीच. लेख लिहिणार्‍या व्यक्तीच्या आवडीनिवडीप्रमाणे क्रम बदलत असतील कदाचित पण नावं तीच. तर अशा रीतीने या तिघांचे विशेष चित्रपट न बघताही (कारण आमच्या घरात "चित्रपट-बघणे" यासाठीचं पोषक वातावरण नव्हतं :) ) मी त्यांचा पंखा झालो. माझ्या वयाच्या इतर अनेकांसाठी असणारा देव आनंद माझ्यासाठी देव होता, राज कपूर राज होता आणि दिलीप कुमार हाही असाच दिलीप. कालांतराने त्यांचे चित्रपट बघितल्यावर दिलीप सदैव (म्हणजे अगदी त्याच्या तरुणपणीही) म्हातारा दिसत असल्याने ('अतिशय मुख्य सूचना' वाचणे) पुन्हा दिलीप कुमार झाला आणि राज सदैव बावळट/मंद दिसत असल्याने ('अतिशय मुख्य सूचना' विसरू नका) पुन्हा राज कपूर झाला. पण अभिनयाची वेगळी शैली, एका श्वासात सगळाच्या सगळा संवाद, मग तो कितीका मोठा असेना, म्हणण्याची लकब, सतत हात हलवत हलवत बोलण्याची स्टाईल, आणि डोळ्यातले मिश्कील भाव यामुळे बालपणी मासिकांतून भेटलेला देव मोठेपणी त्याचे अनेक चित्रपट बघितल्यावरही 'देव'च राहिला त्याचा 'देव आनंद' झाला नाही.


"जिया ओ SSS जिया ओ जिया कुछ बोल दो","फुलोंके रंग से दिल की कलम से", "मै जिंदगी का साथ निभाता चला गया", "दिल का भंवर करे पुकार " म्हणत नूतन बरोबर कुतुब मिनार उतरणारा देव हे सगळं दिग्दर्शक सांगतोय म्हणून नाही तर स्वतः, खरोखर, मनापासून, आतून, नॅच्युरली, सहजतेने करतोय असं वाटायचं आणि पटायचंही. अर्थात कालांतराने उतरत उतरत देव किती खाली गेला त्याचा हिशोब मांडायचा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही. तर माझ्या आधीच्या पिढीला स्वप्नांच्या मनोहारी राज्यात भुलवून, भुरळ पाडून आपल्या असामान्य अभिनयाने त्यांच्या मनावर काही दशकं राज्य करणार्‍या त्रिदेवांचे आजच्या काळातले किंवा अगदी आत्ताच्या काळातले नाही तरी गेल्या वीस वर्षांतले उत्तराधिकारी कोण असं मला कोणी विचारलं तर मी क्षणाचाही विलंब न करता सांगू शकेन की आजच्या काळातले ते तिघेजण म्हणजे अनिल, अजय आणि नाना. ते कपूर, देवगण, पाटेकर विसरून कैक वर्षं झाली. मित्राला कधी पूर्ण नावाने हाक मारतं का कोणी? सचिनला सचिनच म्हणायचं उगाच सचिन तेंडूलकर कशाला..? तसंच हे.

तर या तिघांची आपापली शैली आहे. अभिनय, संवादफेक, चालणं, बोलणं, सरसर बदलणारे हावभाव, देहबोली, भावनांचं प्रकटीकरण या सगळ्या सगळ्याची प्रत्येकाची एक विशिष्ट शैली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जब्बरदस्त ताकदीचा अभिनय. कमालीचा सशक्त. कालपरवाचे जॉन अब्राहम, सैफ, अक्षय (कुठलाही घ्या काय फरक पडतोय.. किंवा चला दोन्ही घ्या), विवेक, सुनील, शहीद, संजूबाबा, अनेक वेळेला शाहरुख, क्वचित काही वेळेला आमीर (वाचा वाचा 'अतिशय मुख्य सूचना'), दर वेळेला सलमान, या सगळ्यांत आणि अनिल-अजय-नाना या तिघांत आढळणारा हा महत्वाचा फरक. आता यांचे किती चित्रपट फ्लॉप झालेत, त्या चित्रपटातला तो प्रसंग, शेवट, सुरुवात, मध्य, गाणी, वगैरे कसे फालतू आहेत वगैरे सांगण्यात काही अर्थ नाही. निदान इथेतरी.. कारण ते गैरलागूच नाही तर चूक आहे. चित्रपटाचा सर्वेसर्वा हा दिग्दर्शक असतो त्यामुळे एखादा प्रसंग, त्यांची लांबी, सत्यासत्यता, आणि चित्रपटाचं एकूणच यश या सगळ्याची संपूर्ण जवाबदारी दिग्दर्शकाची असते. (टी-२० मध्ये ओव्हररेट कमी झाला की कप्तानाच्या मानधनातून पैसे कापून घेतात ना तसंच हे.). आणि या तिघांचे कुठलेही चित्रपट कितीही अयशस्वी झाले असले तरी त्या अपयशाचा कर्ता करविता, त्या मुर्ख प्रसंगांचा आणि कथारहित चित्रपटांचा धनी कोणीतरी वेगळा होता.. निदान या तिघांचा अभिनय हे कारण तर कधीच नव्हतं. उलट टुक्कारातल्या टुक्कार चित्रपटातही या तिघांचेही अभिनय नेहमीप्रमाणेच सर्वोच्च दर्जाचे आहेत. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी आलेला नानाचा 'एक' हा चित्रपट. अतिशय भिकार चित्रपट पण त्याच्या वाट्याला आलेल्या जेमतेम ४-५ प्रसंगांतून त्याने तो चित्रपट चित्रपटगृहात किमान एक आठवडा तरी चालेल याची दक्षता घेतली. अन्यथा बॉबी देओलने तो चित्रपट पहिल्या खेळालाच खड्ड्यात घालण्याची पुरेपूर तयारी केली होती. अनिलचा 'मुसाफिर' किंवा अजयचा 'कयामत'ही त्याच पठडीतले. या लोकांच्या बळावरच या चित्रपटांचा मान टाकण्याचा कालावधी निदान काही आठवड्यांनी तरी पुढे ढकलला गेला.

खरं तर हा लेख लिहायला सुरुवात करताना मी या तिघांवर वेगवेगळं लिहिण्याचं ठरवलं होतं परंतु अभिनयक्षमता, स्टाईल, भूमिकांमधील विविधता, संवादफेक, प्रसंग रंगवण्याची हातोटी हे सगळे गुण या तिघांत एवढे सामाईक आहेत की प्रत्येकाविषयी लिहिताना पुनरुक्तीचा दोष माथी आला असता. त्यामुळे तो टाळून सगळ्यांवर एकत्रच लिहिण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करतो.


अप्रतिम अभिनयक्षमता आणि अतिशय उस्फुर्त व बोलके हावभाव या महत्वाच्या गुणांबरोबरच या तिघांनाउत्तमरित्या साधलेलं कसब म्हणजे भूमिकेत झोकून देणं. 'गंगाजल'मध्ये कायदा हातात घेणार्‍यांना शासन करणारा, बाणेदारपणे, ऐटीत चालत जाणारा एसपी अमित कुमार असो की 'जख्म'मध्ये जातीय दंगलींमध्ये असहायपणे लढणारा गायक अजय असो (या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे), स्वार्थापायी आणि पैशासाठी खून पाडत प्रसंगी आपल्या प्रेयसीलाही शत्रूच्या गोळीला बळी पडू देणारा 'खाकी' मधला यशवंत आंग्रे असो की आपल्या पत्नीची तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी भेट घडवून आणण्यासाठी धडपड करणारा 'हम दिल दे चुके' मधला विवश नवरा वनराज... 'पुकार' मध्ये देशासाठी जीवाची बाजी लावायला तयार असणारा मेजर जयदेव असो की 'बेटा' मधला आपल्या आईसाठी जीव द्यायला तयार असणारा भोळसट राजू, आपल्या मुलाला शोधण्यासाठी जीवाचं रान करणारा 'कॅलकटा मेल' मधला अविनाश असो की बलात्कारीत तरुणीला आपल्या घरात आश्रय देणारा 'हमारा दिल आपके पास है' मधला अविनाश ... "किसीको तो ये कचरा साफ करना पडेगाहीच ना" असं म्हणत दणादण एन्काऊन्टर्स करणारा 'अब तक ५६' वाला इन्स्पेक्टर साधू आगाशे असो की आग दिसली की आपल्या अपराधीपणाची भावना जागृत होऊन फटाफटा डोक्यावर हात मारून घेणारा 'परिंदा' मधला अन्ना असो, बायकोचा पाठलाग करत तिला मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारा 'अग्निसाक्षी' मधला विश्वनाथ असो की अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा 'अंकुश' मधला रवी असो.. हे सर्वजण त्या त्या वेळेला एसपी अमित कुमार, वनराज, राजू, मेजर जयदेव, अन्ना, इन्स्पेक्टर साधू आगाशेच वाटतात. त्यांच्यातून कधीही अजय, अनिल किंवा नाना डोकावत नाहीत की त्यांचा सूक्ष्मसा मागमूसही दिसत नाही हे त्यांचं प्रमुख यश. इतके की सस्पेंड झालेल्या एसपी अमित कुमारला न्याय मिळाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, वनराजची तगमग आपल्याला पाहवत नाही आणि कितीही लाडकी असली (आठवा 'अतिशय मुख्य सूचना') तरी  ऐश्वर्याचा राग आल्याशिवाय रहात नाही, हा राजू एवढा मंद कसा असा प्रश्न पडतो आणि मेजर जयदेव क्लॉक टॉवरच्या दोलकावरून माधुरीला हात देऊन उतरवेपर्यंत आपल्या जीवात जीव येत नाही, शेवटी जॅकीने अन्नाला जाळून मारल्यावरच आपल्या जीवाची तगमग शांत होते आणि साधू आगाशेने जमीरच्या गोटात घुसून त्याला ठार मारल्यावर आपण मनोमन साधूला सलाम ठोकतो.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत किंवा अनेकदा वेगळ्या भूमिका, वेगळे चित्रपट करूनही वेगळं करूनही यांनी कधी त्याचे डिंडिम पिटले नाहीत. उगाच कशाची (अनावश्यक) प्रसिद्धी नाही की कसला गाजावाजा नाही. कधी उगाचच दिग्दर्शनात ढवळाढवळ केल्याचं ऐकिवात नाही की स्वतःला बुद्धिवादी आणि परफेक्शनिस्ट म्हणवून घेण्याचा किंवा स्वतःला ब्रांड म्हणून सादर करण्याचा वृथा अट्टाहास बाळगला नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे (सुरुवातीचा काळ वगळता) निवडक चित्रपटच स्वीकारले. उगाच चलती आहे म्हणून भारंभार चित्रपट साईन केले नाहीत की उगाचच वर्षातून फक्त एक म्हणजे एकच चित्रपट करायचा असे दंडक वगैरे घालून घेतले नाहीत. दर वेळी अगदी वेगळ्याच भूमिका केल्यात असंही नाही पण चाकोरीबद्धपणा, तोचतोचपणा शक्यतो टाळायचा प्रयत्न केला. अर्थात त्यांचे सगळेच्या सगळे चित्रपट दरवेळी दणदणीत यशस्वी झालेच असं मुळीच नाही. चिक्कार चित्रपटांनी दणदणीत मारही खाल्ला. पण आधी म्हंटल्याप्रमाणे त्याचं कारण यांचा अभिनय होता असं कधीच झालं नाही.

तसंच स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याचा अट्टाहास नाही किंवा पत्रकार/पुरस्कार सोहळे मॅनेज करण्याची कला आणि इच्छा नाही त्यामुळे ढीगाने अ‍ॅवार्डस नाहीत. पण अर्थात त्यामुळे अ‍ॅवार्डस फंक्शन्सवर कधी बहिष्कार घातल्याचं स्मरत नाही किंवा उगाच सगळ्याच फंक्शन्स आणि पार्ट्यांना हजेर्‍या लावत सुटलेत असंही कधी झालं नाही. उगाच डझनावारी मासिकांच्या मुखपृष्ठांवर चमकणं नाही की पहिल्या स्थानासाठी कधी चुरस नाही. पीत प्रसिद्धीचा आधार घेत आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला हातभार लावण्याचे प्रकार नाहीत की उगाच अनाठायी वाद ओढवून घेऊन प्रसिद्धीचे झोत आपल्याकडे वळवून घेण्याची व्यर्थ खटपट नाही. अभिनय करणं आपलं काम आहे हे ओळखून, स्वतःच्या मर्यादा/व्याप्ती लक्षात घेऊन आपल्या परिघात राहून सतत उत्तमोत्तम भूमिका (दरवेळीच चित्रपट नव्हे) देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र केला आणि अजूनही करताहेत.

पण हल्ली उगाचच प्रयोगशीलतेच्या/वेगळेपणाच्या नावावर प्रेक्षकांना निर्बुद्ध समजून त्यांच्यावर मल्टिप्लेक्सी चित्रपटांचा मारा करण्याचं जे सत्र चालू आहे ते पाहून या त्रिदेवांचे जातीचे अभिनय बघायला मिळण्याचं प्रमाण फार कमी होतंय. अभिनय कशाशी खातात हे ठाऊक नसलेल्यांच्या या भाऊगर्दीत जातिवंत अभिनयाचा गळा घोटला जाण्याचीच शक्यता अधिक. तसंही अजयचा अपवाद वगळता बाकीच्या दोघांचं वय आता उतरणीला लागलं असल्याने (नाना : ५९, अनिल : ५१, अजय : ४१) हे केंद्रस्थानी असलेल्या भूमिका बघायला मिळणं कठीण आहेच आणि उत्तरोत्तर ते अजूनच अवघड होत जाणार. त्यामुळे यांचे उतरणीला लागलेले देव आनंद, दिलीप कुमार होण्यापेक्षा सदैव आपल्या नजरेतले 'देव-दिलीप-राज'च राहोत ही सदिच्छा !!!

जाता जाता : असाच विचार करत असताना हॉलीवुडातले माझे देव-दिलीप-राज कोण याचं उत्तर शोधत होतो. पण नंतर लक्षात आलं की हॉलीवुडात (माझ्यासाठी) दिलीप-राज नाहीतच. आहे तो फक्त देवच आणि त्याचं नाव टॉम हॅन्क्स !!!

-- सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...