Friday, January 12, 2024

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्यात आणि गदारोळात काही प्रमुख आक्षेप किंवा प्रश्न 'सर्वांना' सामायिकरित्या (कॉमन) पडलेले आढळतात. इथे 'राममंदिराचे समर्थक आणि विरोधक या दोघांनाही' अशा अर्थी 'सर्वांना' हा शब्द वापरला आहे. आणि खरंच दोन्ही बाजूच्या लोकांना छळणारे हे प्रश्न किंवा आक्षेप त्यांना अगदी मनापासून, अगदी प्रामाणिकपणे पडलेले आहेत असं जाणवतं. ते सगळे प्रश्न/आक्षेप एकत्रितरित्या मांडण्याचा प्रयत्न केल्यावर अशी काहीशी यादी तयार झाली. हे प्रश्न/आक्षेप कुठल्याही विशिष्ट क्रमाने नसून दिसले, आठवले, सुचले त्याप्रमाणे लिहिले आहेत याची नोंद घेणे.

 

आक्षेपांची/प्रश्नांची यादी

१. राममंदिराचं उदघाटन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीलाच का ठेवला आहे?

२. हा कार्यक्रम रामनवमीला ठेवणं अधिक योग्य ठरलं नसतं का?

३. रामनवमीच्या दरम्यान निवडणूक येत असल्याने आचारसंहितेच्या भीतीने राजकीय फायदा मिळवता येणार नसल्यानेच उद्घाटन लवकर ठेवलं आहे.

४. हिंदू धर्मानुसार पौष महिना हा धर्मकार्याचा मुहूर्त म्हणून वर्ज्य महिना आहे.

५. निव्वळ लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा स्वार्थ साधण्यासाठी हा मुहूर्त काढला गेला आहे का?

६. हा असा मुहूर्त कोणी काढून दिला?

७. राममंदिर पूर्णपणे बांधून व्हायच्या आधीच उद्घाटन / प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा अट्टहास का?

८. राममंदिराच्या नावावर निव्वळ राजकारण चालू आहे.

९. राममंदिराच्या नावावर मतं गोळा करण्याचा प्रकार आहे हा.

१०. हे राममंदिर ज्या प्रकारे उभं राहतंय त्याला माझा विरोध आहे.

११. सगळं वातावरण मोदीमय करून, रामाच्या नावावर भावनिक आवाहन करून निवडणूक जिंकण्याचा अश्लाघ्य प्रयत्न.

१२. राममंदिराच्या आडून हिंदूंच्या शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न आहे हा.

१३. राममंदिराच्या आडून भाजपच्या शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न आहे हा.

१४. राममंदिराच्या आडून मोदींच्या शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न आहे हा.

१५. खुद्द शंकराचार्यांचा या सोहळ्याला आणि दिवसाला विरोध आहे.

१६. हिंदू धर्माचे प्रमुख असलेल्या चार पीठांच्या शंकराचार्यांपैकी एकालाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण का नाही?

१७. मोदींना हिंदूचे नवे शंकराचार्य होण्याची इच्छा आहे का?

१८. चारही पीठांचे शंकराचार्य पद हे केवळ शोभेचं पद आहे का?

१९. शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रमुख असताना मोदींच्या हस्ते उदघाटन का?

२०. मोदी हे हिंदू धर्माचे प्रमुख आहेत का?

२१. शंकराचार्यांच्या मतांना काहीच किंमत नाही का?

२२. थापाड्याच्या हातून राममंदिराचं उद्घाटन का?

२३. ज्याने स्वतःच्या बायकोला सोडून दिलं आहे अशा माणसाच्या हस्ते राममंदिराचं उद्घाटन का?

२४. अशिक्षित माणसाच्या हस्ते राममंदिराचं उद्घाटन का?

२५. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि अन्य महत्वाच्या भाजप नेत्यांना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

२६. राष्ट्रपतींना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

२७. उद्धव ठाकरेंना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

२८. संजय राऊतांना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

२९. राज ठाकरेंना सोहळ्याचं आमंत्रण का नाही?

३०. रणबीर कपूर आणि आलीया भट आणि बॉलिवूडमधल्या अन्य नटव्यांना आणि नाटक्यांना आमंत्रण कशाबद्दल?

३१. त्यांचं राममंदिर उभारणीत काय कर्तृत्व आहे?

३२. काँग्रेस आणि सोनिया गांधींवर आमंत्रण नाकारण्याची वेळ का आली?

३३. राममंदिराच्या गर्भगृहात होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी संघाच्या सरसंघचालकांना कोणत्या धार्मिक/अध्यात्मिक निकषानुसार निवडण्यात आलं?

३४. अयोध्येतला राम माझा राम आहे. पण आमच्या रामाचा तुमच्या राजकारणासाठी आणि मतं वाढवण्यासाठी गैरवापर आम्हाला मान्य नाही.

३५. धर्माचा वापर करून राजकारण करण्यास माझा विरोध आहे.

३६. धर्माचा वापर करून निवडणूक जिंकणं मला अमान्य आहे.

३७. धर्माचा वापर करून निवडून येणं आणि नंतर भ्रष्टाचार करणं मला हे अमान्य आहे.

३८. धर्माचा वापर करून निवडून येणं आणि नंतर भ्रष्ट लोकांना आणि गुंडांना पोसणं हे मला अमान्य आहे.

३९. हे अक्षता वाटपाचं काय प्रकरण आहे नक्की?

४०. त्या अक्षतांचं काय करायचं आहे नक्की?

४१. त्यापेक्षा ते तांदूळ एखाद्या भुकेल्या माणसाला देणं योग्य नाही का?

४२. मंदिरात असलेला राम बालरुपातच का आहे?

४३. मोदी रामाला हाताला धरून नेतायत हे चित्र चुकीचं आहे.

४४. हा सर्वधर्मसमभाव मानणारा अर्थात सेक्युलर देश आहे. धार्मिक प्रकरणांत सरकारचा सक्रिय सहभाग असणं चुकीचं आहे.

४५. एवढा जो निधी जमलं आहे त्याचा हिशेब कुठे आहे?

४६. या एवढ्या उधळपट्टीची काय आवश्यकता आहे?

४७. श्रीरामाच्या जयघोषात सीतेचा उल्लेखही का नाही?

४८. श्रीराम लिहिणंच योग्य आहे. श्री राम लिहिणं चुकीचं आहे.

४९. श्रीरामाच्या गळ्यात जानवं का नाही?

५० श्रीरामाच्या हातात आयुधं दाखवण्यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय?

५१. एक सर्वसामान्य हिंदू म्हणून मला इतरही अनेक प्रश्न पडलेले आहेत.


"देशातल्या इतर सर्व समस्या संपल्या का?", "त्या ठिकाणी शाळा किंवा हॉस्पिटल का बांधत नाहीत", "तारीख का सांगत नाहीत" या प्रश्नांची उत्तरं मिळाली असल्याने किंवा ते तितकेसे समयोचित (relevant) राहिलेले नसल्याने किंवा न्यायालयाने तो गुंता सोडवलेला असल्याने हे आणि असे अन्य काही प्रश्न अलीकडे विचारले जात नाहीत नसल्याने ते वरच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाहीत.

राज्याभिषेकाच्या वेळी खुद्द श्री छत्रपती शिवाजी महाराजांनाही अशाच अनेकानेक प्रश्नांना आणि आक्षेपांना तोंड द्यावं लागलं होतं हे आपण जाणतोच. या वाक्यात श्रीराम किंवा शिवाजी महाराज किंवा मोदी यापैकी कुठल्याही व्यक्तीची अन्य दोन व्यक्तींशी तुलना करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही हे मराठीचं किमान ज्ञान असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीच्या लक्षात येईल हे गृहीत धरून त्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही याची नोंद घेणे.

तर राज्याभिषेकाच्या वेळी खुद्द श्री छत्रपती शिवाजी महाराजांनाही अशाच अनेकानेक प्रश्नांना आणि आक्षेपांना तोंड द्यावं लागलं होतं हे आपण जाणतोच. सर्वसामान्य जनतेच्या मनावर असणाऱ्या शेकडो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीचं जोखड उखडून फेकून देऊन, कैक वर्षांत न झालेली एक अतिशय महत्वपूर्ण अशी ऐतिहासिक कृती किंवा हिंदू व्यक्ती सत्ताधारी होऊ शकते, तिचा राज्याभिषेक होऊ शकतो या गोष्टींची कल्पनाही करू न शकणाऱ्या किंवा त्यांचा साफ विसर पडलेल्या हिंदू हृदयांमध्ये नवचेतना फुंकण्यासाठी त्याच तोडीची काहीतरी प्रतीकात्मक कृती करणं आवश्यक आहे हे ओळखून शिवाजी महाराजांनी फार विचारपूर्वक राज्याभिषेकाचा निर्णय घेतला.


त्यात राजकारण होतं का? हो होतं....

त्यात समाजकारण होतं? नक्कीच होतं...

धार्मिक प्राबल्याचं दर्शन होतं का? अर्थात होतं..

शक्तिप्रदर्शन होतं का? होतंच होतं...

आपली दुचाकी स्वच्छ करण्यासाठी दुचाकीला बांधलेलं फडकं चोरीला गेल्यावर किंवा आपल्या पार्किंगच्या जागेत एखाद्या तिऱ्हाईताने गाडी लावल्यावर किंवा अगदी जाहिरातीत दाखवल्याप्रमाणे ५ टक्के सूट मिळण्याऐवजी केवळ ३ टक्के सूट मिळाल्यानेही आपण संतापाने लालेलाल होतो. अर्थात त्यात काही चूकही नाही. कायदेशीररित्या आपल्या मालकीची असलेली आपली एखादी वस्तू, वास्तू, गोष्ट आपल्याकडून जेव्हा अन्याय्य पद्धतीने हिरावून घेतली जाते त्यावेळी असा संताप येणं आणि ती परत मिळवण्यासाठी बळाची, धनाची, काळाची पर्वा न करता ती वस्तू परत मिळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहणं यात काहीही चूक नाही. मग ते एकेकाळी आपल्या पूर्वजांचं असलेलं राज्य असो की आपल्या हृदयाच्या अगदी समीप असणाऱ्या एखाद्या उपास्य देवतेचं मंदिर असो. आणि एकदा का न्याय्य पद्धतीने विजय प्राप्त झाला की तो विजय साजरा करणं हेही सर्वार्थाने योग्यच. कारण ती वस्तू आपण बळाने जिंकलेली नसते तर आपलीच असणारी (Rightfully ours) वस्तू न्याय्य पद्धतीने लढा देऊन आपण परत मिळवलेली असते. यात इंग्रजांच्या जड जिभांना उच्चारता येत नसल्याने त्यांनी बॉम्बे केलेलं मूळ मुंबई हे नाव परत देणं, पाशवी क्रौर्याचं प्रदर्शन मांडत धर्मांध टोळ्यांनी दिलेलं अलाहाबाद नाव अडगळीत टाकून मूळच्या प्रयाग या नावाचं पुनरुज्जीवन करणं अशा सगळ्या उदाहरणांचा समावेश होतो.

'मोपल्यांचे बंड' मध्ये सावरकर तिथल्या हिंदूंच्या मानसिकतेला आणि धार्मिक अज्ञानाला उद्देशून म्हणतात की शत्रू वेशीवर येऊन उभा ठाकलेला असतानाही आपले लोक मात्र पळी-पंचपात्र आणि सव्य-अपसव्य यातच अडकून पडले होते. (तंतोतंत हेच शब्द नाहीत. पण मथितार्थ हाच). अंतिम लक्ष्य अर्थात पोपटाचा डोळा हा राममंदिराची उभारणी हा आहे. दिवस  कोणता? वार कोणता? नक्षत्र कोणतं? मुहूर्त कोणता? प्रसाद कशाला? आमंत्रण कशाला? अक्षता कशाला? याच्याच हस्ते का? त्याच्या हस्ते का नाही? यांच्या मताला किंमत नाही का? यांना आमंत्रण का? त्यांना का नाही? यात राजकारण का? धर्मकारण कशाला? शक्तिप्रदर्शन कशाला? हे आणि असे लक्षावधी प्रश्न अक्षरशः गौण आहेत या क्षणी. पिढ्यान् पिढ्यांच्या प्रतीक्षेनंतर हा एवढा महान सोहळा वास्तवात उतरतोय. तो याचि देही याचि डोळा पाहायला मिळण्याचं भाग्य आपल्या पिढीला लाभतंय!!


नव्या युगाची नांदी ठरेल असा सुवर्णक्षण काही पावलांवर आलेला असताना फुटकळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यात आनंदाने सहभागी होण्याचं समाधान मिळवायचं? की छिद्रान्वेषीपणा करत, निरर्थक मुद्दे मांडत, अर्थहीन आक्षेप घेत, आपले अहंकार कुरवाळत या सोहळ्याला गालबोट लावण्याचं समाधान पदरी पाडून घ्यायचं? दोन्हींमध्ये समाधान आहेच. योग्य पर्याय निवडण्याचा प्रगल्भ संतुलितपणा प्रत्येकाच्या ठायी येवो हीच त्या रामरायाचरणी प्रार्थना.

 जय श्रीराम !!!!

 --हेरंब ओक

Sunday, December 31, 2023

२०२३ चा वाचनप्रवास

२०२३ चा वाचनप्रवास

 

असत्यमेव जयते : अभिजीत जोग

ओरिजिन : डॅन ब्राऊन (अनुवाद : मोहन गोखले)

व्योमकेश बक्षी (भाग १) : शरदिंदू बंदोपाध्याय (अनुवाद : अशोक जैन

अरुणाची गोष्ट : पिंकी विराणी (अनुवाद : मीना कर्णिक)

डिटेक्शन ऑफ क्राईम : विलास तुपे

खेलंदाजी : द्वारकानाथ संझगिरी

कॉलिंग सेहमत : हरिंदर सिक्का (अनुवाद : मीना शेटे संभू)

जेव्हा मी जात चोरली होती : बाबुराव बागूल

फाळणीचे दिवस : गोविंद कुळकर्णी

१०

चंद्रविलास : नारायण धारप

११

आनंदमठ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय (अनुवाद : कांचन जोशी)

१२

शौझिया : डेबोरा एलिस (अनुवाद : अपर्णा वेलणकर)

१३

यस, आय अ‍ॅम गिल्टी : मुनव्वर शाह

१४

संवाद : अच्युत गोडबोले

१५

डोनाल्ड ट्रम्प : अतुल कहाते

१६

मयादा इराकची कन्या : जीन सॅसन (अनुवाद : भारती पांडे)

१७

डायल डी फॉर डॉन : नीरज कुमार (अनुवाद: भारती पांडे)

१८

द लायन्स गेम : नेल्सन डेमिल (अनुवाद : अशोक पाध्ये)

१९

ओ हेन्रीच्या लघुकथा : अनुवाद : अनघा देशपांडे

२०

हाच माझा मार्ग : सचिन पिळगांवकर

२१

ड्रॅक्युला :  ब्रॅम स्टोकर  (अनुवाद : स्नेहल जोशी)

२२

द सिम्पल ट्रूथ : David Baldacci (अनुवाद : सुधाकर लवाटे)

२३

सोहळा : जयवंत दळवी

२४

इन द नेम ऑफ ऑनर : मुख्तार माई (अनुवाद : उल्का राऊत)

२५

अनिताला जामीन मिळतो : अरुण शौरी (अनुवाद : उदय भिडे)

२६

फुल ब्लॅक : ब्रॅड थॉर (अनुवाद : बाळ भागवत)

२७

सिमी : विजय वाघमारे

२८

पाकिस्तानचे जन्मरहस्य : व्ही. व्ही. नगरकर (अनुवाद: माधव लिमये)

२९

ओपेनहायमर : माणिक कोतवाल

३०

साम्राज्य बुरख्यामागचे : कारमेन बिन लादेन (अनुवाद : अविनाश दर्प)

३१

इनसाइड द गॅस चेंबर्स : श्लोमो व्हेनेत्सिया (अनुवाद : सुनीति काणे)

३२

गबाळ : दादासाहेब मोरे

३३

गांधी आणि आंबेडकर : गंगाधर बाळकृष्ण सरदार

३४

लैंगिक नीती आणि समाज : श्रीकृष्ण केशव क्षीरसागर

३५

ओ : शरणकुमार लिंबाळे

 

 

सेतुमाधवराव पगडी

३६

एका माळेचे मणी

३७

भारतीय मुसलमान शोध आणि बोध 

३८

१८५७ चे आणखी काही पैलू

३९

काश्मीर : एक ज्वालामुखी

 

शेषराव मोरे

४०

अखंड भारत का नाकारला?

४१

सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद

४२

गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी

 

डॉ एस एल भैरप्पा - (अनुवाद : उमा कुलकर्णी)

४३

काठ

४४

मंद्र

 

रा चिं ढेरे

४५

लज्जागौरी

४६

श्री आनंदनायकी

 

डॉ श्रीरंग गोडबोले

४७

भागानगर (हैदराबाद) निःशस्त्र प्रतिकार

४८

बौद्ध-मुस्लिम संबंध

४९

इस्लामचे अंतरंग

 

ध्रुव भट्ट

५०

सागरतीरी

५१

तिमिरपंथी

 

अनुज धर

५२

नेताजींचा मृत्यू - भारताचे सर्वात मोठे रहस्य : अनुवाद - डॉ मीना शेटे-संभू

५३

युवर प्राइम मिनिस्टर इज डेड : अनुवाद - सीमा भानू

 

ना ह पालकर

५४

डॉ हेडगेवार (चरित्र) 

५५

इस्रायल - छळाकडून बळाकडे

 

रमेश पतंगे

५६

मी, मनु आणि संघ

५७

पाकिस्तान : सेक्युलर राज्य ते धर्मांध राज्य

 

वि. ग. कानिटकर

५८

इस्रायल - युद्ध, युद्ध आणि युद्धच

५९

धर्म - महात्मा गांधींचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा

 

दिनेश कानजी

६०

त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा - माणिक सरकार

६१

उसबा

 

विजय तेंडुलकर

६२

कन्यादान

६३

कमला

६४

बेबी

 

निरंजन घाटे

६५

शोधवेडे शास्त्रज्ञ

६६

आपल्या पूर्वजांचे विज्ञान

 

सुधा मूर्ती

६७

महाश्वेता : अनुवाद - उमा कुलकर्णी

६८

पितृऋण : अनुवाद - मंदाकिनी कट्टी

 

वसंत वसंत लिमये

६९

टार्गेट असद शहा

७०

कॅम्प फायर

 

फ्रेडरिक फॉर्सिथ

७१

द ओडेसा फाईल : अनुवाद : अशोक पाथरकर

७२

किल लिस्ट : अनुवाद - बाळ भागवत

 

सिडने शेल्डन

७३

ब्लडलाईन - अनुवाद : विजय देवधर

७४

द नेकेड फेस - अनुवाद : विजय देवधर

७५

टेल मी युअर ड्रीम्स - अनुवाद : अनिल काळे

७६

नथींग लास्ट्स फॉरेवर - अनुवाद : डॉ अजित कात्रे

७७

द बेस्ट लेड प्लॅन्स - अनुवाद : अनिल काळे

७८

मॉर्निंगनून अँड नाईट - अनुवाद : माधव कर्वे

 

सुहास शिरवळकर

७९

सहज

८०

मंत्रजागर

८१

चूक-भूल देणे घेणे

८२

प्राक्तन

८३

जाई

 

वपु

८४

कर्मचारी

८५

पार्टनर

 

डॉ. बाळ फोंडके

८६

ओसामाची अखेर

८७

भिंतींना जिभाही असतात

८८

गोलमाल

 

पूनम छत्रे (अनुवाद)

८९

प्राईज अ‍ॅक्शन ट्रेडिंग : इंद्रजित शांतराज

९०

लोकशाहीचे वास्तव : जोजी जोसेफ

९१

स्कॅम : देबाशिष बसू, सुचेता दलाल (अनुवाद : अतुल कहाते, पूनम छत्रे)

 

English

९२

Who painted my money white : Sree Iyer

९३

A river in darkness : Masaji Ishikawa

९४

Propaganda : Edward L. Bernays

९५

The Firm : John Grisham

९६

Friends, Lovers, and the Big Terrible Thing : Matthew Perry

Lee Child

९७

The Secret

९८

Bad luck and trouble

 

Andy Weir

९९

The Martian

१००

Project Hail Mary

 

Ian Fleming

१०१

Dr No

१०२

Goldfinger

१०३

Octopussy

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...