Monday, February 28, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-३

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

एवढ्यात अचानक जोरात चित्कारल्याचा आवाज आला. तो आमच्यातल्याच एकाचा आवाज होता आणि तो आनंदातिशयाने ओरडत होता. तो बाकी ग्रुपच्या थोडा पुढे होता आणि खाणाखुणा करून आम्हाला बोलवत होता. त्याचा तो आनंदाने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून सगळेजण अक्षरशः धावतच त्याच्याकडे गेलो. तो जिकडे उभा होता तिथून पायथा, रस्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सकाळी ओलांडलेला पोल्ट्री फार्म दिसत होता. बघता बघता आमचे चेहरे उजळले. काय करावं काही सुचेना. वेड्यासारखे ओरडत एकदा त्या पोल्ट्री फार्मकडे आणि एकदा एकमेकांच्या चेहर्‍यांकडे बघत होतो. प्रचंड आनंद झाला होता. लवकरच या दिवसभराच्या कटकटीतून आम्ही सुटणार होतो. पण... !!!

आमच्या फुग्याला क्षणभरातच टाचणी लागली. खालचा रस्ता, पोल्ट्री फार्म वगैरे सगळं दिसत होतं पण दिसत नव्हती ती एकच गोष्ट. आम्ही उभे होतो त्या टेकडीवरून खाली त्या पोल्ट्री फार्मपर्यंत जाण्याची वाट...... !!!!

पक्की वाट नाही की साधी छोटीशी पायवाट नाही. उलट सगळीकडे एक तर वाळलेलं गवत होतं किंवा मग निसरडे खडक.आता मात्र चांगलंच टेन्शन यायला लागलं होतं. दिवसभर पुरवून पुरवून वापरलेला पेशन्स आता मात्र संपला होता. सकाळपासून एकही गोष्ट धड झाली नव्हती. अर्थात सारखं सारखं तेच तेच रडगाणं गाऊनही उपयोग नव्हता. साडेपाच होत आले होते. बघता बघता आकाशातला सोनेरी रंग कमीकमी होत जात होता. लवकरच अंधार पडणार होता त्यामुळे तातडीने काहीतरी करायला लागणार होतं. आम्ही निर्णय घेतला. इथून उतरत खाली जाणं तर शक्य नव्हतं, आमच्या हातात वेळही नव्हता. आम्हाला एकच मार्ग सुचत होता, एकच पर्याय दिसत होता. आता विचार केला तर त्या पर्यायाला तितकासा अर्थ नव्हता हे लगेच लक्षात येतं. पण त्यावेळी तरी आमची सारासार विचार करण्याची बुद्धी खुंटली असावी.

आम्ही खाली पोचू शकत नसल्याने खालच्यांचं (जे तिथे होते की नव्हते हेही आम्हाला दिसत नव्हतं) लक्ष आमच्याकडे वेधून घेणं हा एकमेव पर्याय आम्हाला दिसत होता. अर्थात खाली असलेल्या लोकांचं लक्ष आमच्याकडे गेलं तरी "आम्ही चुकलो आहोत, खाली यायचा रस्ता कुठून आहे?" वगैरे गोष्टी आम्ही त्यांना कशा विचारणार होतो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आत्ताही नाही आणि तेव्हाही आमच्याकडे नव्हतं. पण मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही कोणी एवढा विचारही केला नव्हता.....

आमच्याकडे जुनी वर्तमानपत्रं होती. आमच्याकडे काडेपेटी होती. लक्ष वेधून घेण्याचा एकमेव मार्ग आम्हाला दिसत होता. बघता बघता वर्तमानपत्रांच्या गुंडाळ्या केल्या गेल्या आणि त्यांच्या टोकाशी पेटती काडी धरण्यात आली. सगळे कागद एकदम संपू नयेत म्हणून एका वेळी एकच वर्तमानपत्र पेटवण्याची हुशारी (!!) आम्ही दाखवत होतो. खरंच खाली कोणी होतं की नाही याचाही काही अंदाज येत नव्हता. पेटवलेलं वर्तमानपत्र जोरजोरात हलवून आमच्याकडे लक्ष वेधून घेण्याचा आमचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते. एकेक करत कागद संपत चाललेले बघून आमचा दिवसभर ताणून धरलेला उरला सुरला पेशन्सही संपला. कदाचित एकच पेटवलेला पेपर त्यांना दिसत नसेल म्हणून आम्ही उरलेले सगळे पेपर एका वेळी पेटवण्याचं ठरवलं आणि बघता बघता ते पेटवलेही. शेवटचा पेपर जाळून संपत चालला होता. पण ढिम्म........ शून्य.......... खाली (न)असलेल्या कोणालाही वर काय चाललंय इकडे लक्ष देण्याची काहीएक फिकीर पडली नव्हती. शेवटचा कागद अगदी बोटाला चटका बसेल इतक्या अखेरच्या क्षणापर्यंत हातात धरला गेला होता. हाताला जेव्हा चांगलाच चटका बसला त्यावेळी तो कागद हातातून खाली पडला. आणि खल्लास.........

एवढा वेळ शहाण्यासारखं आमच्याकडे पाहणार्‍या आणि आमच्या सभोवती जिकडे नजर जाईल तिथवर पसरलेल्या त्या वाळलेल्या गवताने बघता बघता पेट घेतला. अचानक सगळीकडे ज्वाळा दिसायला लागल्या. ती आग विझवण्याचे आकाशाला ठिगळ लावण्याचे आमचे निष्फळ प्रयत्न करून झाले. पण आग काही दाद देईना.... !!!

त्यानंतर जे झालं ते कसं झालं हे मला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही आठवत नाहीये. अंधुक अंधुकसं एवढं मात्र नक्की आठवतंय की बघावं तिकडे मोठमोठ्या ज्वाळांचं तांडव चालू होतं. ती धग असह्य झाल्यावर, पायाखालचं गवत जळायला लागल्यावर आमच्यातल्या प्रत्येकाने काहीही विचार न करता जिथून दिसेल तिथून, जिथून सुचेल तिथून खालच्या दिशेने उड्या घेतल्या. खरचटत, धडपडत, घसरत, पडत खाली आलो. काही मिनिटांपूर्वी इथून कसं उतरायचं वगैरेचे भंपक विचार करणारे आम्ही पाचव्या मिनिटाला (धडपडत का होईना पण) खाली आलो होतो. जवळपास प्रत्येकाचे गुढगे फुटले होते. कोपर, दंड, पाठ, मनगट अशा कुठल्या ना कुठल्या अवयवावर रक्तदान केल्याच्या खुणा उमटल्या होत्या. केस पिंजारले होते. चेहरे धुळीने माखले होते. पण कोणालाही त्याचं कसलंही दुःख नव्हतं. वाईट रीतीने अडकलेलो असताना अचानक सुटका झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर अगदी स्पष्ट दिसत होता. त्यासमोर या जखमा वगैरे फारच क्षुल्लक होत्या.

अजूनही तो पोल्ट्री फार्म अगदी जवळ असा नव्हता पण तिथपर्यंत जाण्याची वाट मात्र चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसत होती. पोल्ट्री फार्म क्रॉस केला की आम्ही सुटणार होतो. जसजसा तो पोल्ट्री फार्म जवळ यायला लागला तसतसा आमचा उत्साह वाढत चालला होता.

आम्ही एव्हाना त्या फार्मच्या एवढे जवळ येऊन पोचलो होतो की दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पहिली म्हणजे सकाळी जाताना लागलेला पोल्ट्री फार्म आणि आम्हाला आत्ता समोर दिसत असलेला फार्म वेगवेगळे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूला साधारण १५-२० घरांचा एक पाडा (छोटं गाव) होता. अचानक इतका वेळ विसरलेल्या किंवा दाबून ठेवलेल्या तहान-भूक वगैरे वगैरेची आम्हाला तीव्रतेने जाणीव झाली. पण तो पाडा इतका छोटा दिसत होता की तिथे खायला वगैरे काही मिळणं ही गोष्ट अगदीच दुरापास्त होती. पण निदान पाणी तरी नक्की मिळेल या आशेने आम्ही तिथल्या पहिल्या घरासमोर जाऊन उभे राहिलो आणि पाणी द्यायची विनंती केली. त्यांनी जणु आमच्या स्वागतासाठी पाणी तयारच ठेवलेलं असल्यागत भराभर पाण्याने भरलेले तांब्ये आमच्या हातात दिले.

खरंच सांगतो, आयुष्यात एका वेळी एकदम प्यायलं नसेल एवढं पाणी त्यादिवशी पहिल्यांदा प्यायलो. तहान भागल्यावरही निव्वळ प्यायचं म्हणून प्यायलो, चेहर्‍यावर ओतलं, मानेवर ओतलं, हात धुतले. पुन्हा भरपूर पाणी प्यायलो. पुन्हा पुन्हा प्यायलो. पाणी पिऊन मस्त ताजेतवाने होऊन आम्ही निघणार एवढ्यात..........

एवढ्यात तिथल्या एका माणसाने आमची वाट अडवली........ !!!!!!!!!!

क्रमशः

- भाग ४ इथे  वाचा.

Sunday, February 27, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-२

* भाग-१ इथे  वाचा.

वाट तुडवत उतरत असताना आम्ही पुन्हा एकदा आम्हाला एका सुकलेल्या ओहोळाच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या वाटेत फाईंड केलं. गड चढत असताना ही वाट आम्हाला लागली होती का (आमची वाट लागली होती याबद्दल तर वाटच... आपलं सॉरी वादच नव्हता) या प्रश्नाचं उत्तर आत्ताच काय पण तेव्हाही आम्ही ठामपणे 'हो' असं देऊ शकत नव्हतो. आम्ही खालच्या दिशेने चाललोय ही आमच्या दृष्टीने त्यावेळची एकमेव समाधानाची बाब होती. अजून एक चैनीची बाब म्हणजे आम्ही दोन्ही बाजूला घनदाट झाडी असलेल्या वाटेने उतरत होतो. त्यामुळे उन्हाचा तर पत्ता नव्हताच वर थंडगार हवेचा बोनस होता. तर तो बोनस घेत घेत त्या सुकलेल्या ओहोळातून उतरत असताना एका ठिकाणी आम्हाला बऱ्यापैकी सपाट जागा दिसली जिथे बसून आम्ही डबे खाऊ शकणार होतो. काही विचार न करता आम्ही ताबडतोब थांबून तिथे पोटपूजा करून घेण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेणं आणि तो अंमलात आणणं यातली धुसर सीमारेषा प्रसंगी किती रुंद होऊ शकते याचा प्रत्यय आम्हाला यायचा होता.

अरे हो... एवढा वेळ चुकचुकाट करण्याच्या नादात डब्याचा एक किस्सा सुरुवातीलाच सांगायचा होता तो राहूनच गेला. हरकत नाही. आता सांगतो. मला खात्री आहे की पुढचं वाक्य वाचून तुम्ही एक तर "च्यायला, काय फेकतोय यार हा" असं तरी म्हणाल किंवा मग "सत्य हे कल्पिताहून अदभूत (इथे फसवं) असतं" यावर तुम्हाला विश्वास तरी ठेवावा लागेल. तर झालं काय की यावेळी डब्यासाठी आम्ही एक वेगळी आयडिया केली होती. नेहमी प्रत्येक जण आपला डबा म्हणजे पोहे, उपमा, पराठे वगैरे काय काय आणत असतं त्याऐवजी यावेळी आम्ही असं ठरवलं होतं की दहा वेगवेगळे डबे आणण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्र सँडविचेस खाऊ आणि त्यासाठी लागणारं सामान एकेक करत प्रत्येकाने आणू. थोडक्यात ब्रेड एकाने आणायचे, दुसर्‍याने बटर, तिसर्‍याने कांदा.. असं करत करत प्रत्येकाने काही काही सामान आणलं की प्रत्येकाला आणायला लागायचं वजनही कमी असेल आणि सगळ्यांनी एकत्र सँडविच खायला मजा येईल !

ओके. आता बॅक टू ओहोळ. तर आम्ही तिथे असं छानपैकी गोल करून बसलो आणि प्रत्येकाने आपापले डबे काढायला सुरुवात केली आणि........ आणि आधीचा धक्का बरा होता असं म्हणायची पाळी यावी असे एकेक नवीननवीन धक्के आम्हाला बसायला लागले.

- प्रचंड उकाड्याने बटर विरघळून जाऊन डबा एकदम चिकट, तेलकट झाला होता.

- बटाट्यांना प्रचंड वास यायला लागला होता.

- त्या छोट्या टेकडीवरून चढ-उतार करताना नेमकी ब्रेडवाल्याची सॅक जमिनीवर आदळली असावी. कारण ब्रेड स्लाईसचा आकार अक्षरशः होत्याचा नव्हता झाला होता. ब्रेड तुटले होते, आक्रसले होते, मऊ झाले होते. एकूण इतका विचित्र प्रकार झाला होता की भलेही ब्रेड चांगला असला तरी त्याच्या त्या रुपाकडे बघून तो तोंडातही घालावासा वाटत नव्हता.

अखेरीस आमच्याकडे फक्त काकडीचे आणि कांद्याचे काप एवढंच काय ते शिल्लक राहिलं होतं. नाईलाजाने, कंटाळून, भूकेपोटी का होईना सगळ्यांनी त्याचा अक्षरशः दोन मिनिटात फन्ना उडवून टाकला..... आणि त्यानंतर आम्हाला अचानक एका भयंकर वास्तवाची जाणीव झाली. आमच्याकडचं जेवण, कोरडी खादाडी, पाणी असं सगळं सगळं पूर्णतः संपलं होतं.... गड पोहोचू शकायच्या पलीकडे होता.... पायथा दृष्टीक्षेपातही नव्हता. आमचा अक्षरशः त्रिशंकू झाला होता. तरीही न डगमगता, डोक्यावरच्या उन्हाची आणि शुष्क घशांची पर्वा न करता आम्ही पुन्हा उतरायला सुरुवात केली. त्या ओहोळ-वाटेतले दगड चांगलेच निसरडे आहेत आणि फार जपून पाऊल टाकणं आवश्यक आहे अन्यथा कपाळमोक्ष ठरलेलाच वगैरेची जाणीव मला पहिल्याच दगडावरून पाय निसटून, नाक, तोंड आणि पोट जोरदार जमिनीवर आपटल्यावर झाली. उरलेल्या काही लोकांना तीच जाणीव व्हायला दुर्दैवाने अधिक खडतर परीक्षा द्यावी लागली......

ओहोळ उतरताना आमच्यात दोन ग्रुप्स पडले होते. ग्रुप्स म्हणजे अगदी काही लांब वगैरे नाही.. दोन्ही ग्रुप्स एकमेकांच्या दृष्टीक्षेपातच पण अंतर जरा जास्त. वरच्या ग्रुपमधल्या एका मुलीच्या पायाखालून एक मोठा धोंडा निसटून तो धडधडत खाली येत खालच्या ग्रुपमधल्या सावधपणे बसून गड उतरत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला, मानेच्या किंचित वर जोरात लागला आणि काय होतंय ते कळायच्या आत तो धापकन जमिनीवर पालथा पडला. तो गडगडत येणारा दगड आणि त्याच्या आघाताने आमच्या मित्राने फोडलेली किंकाळी हे सगळं एवढ्या कमी वेळात झालं होतं की कोणाला काहीच कळलं नव्हतं. तो आवाज ऐकून सगळेजण अक्षरशः थरकापले. जेव्हा त्याच्या केसातून एक लालसर रंगाची धार खाली येऊन त्याच्या मानेवरून, कानावरून वाहून त्याचा खांदा भिजवायला लागली तेव्हा तर सगळ्यांचे पाय क्षणभर गोठल्यासारखे झाले. या अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरत लगेच त्याला उचलून कुठे लागलंय, किती लागलंय वगैरे बघायला आम्ही पुढे धावलो. सुदैवाने एवढ्या मोठ्या दगडाची धडक डोक्याला लागूनही आणि रक्तस्त्राव होऊनही तो शुद्धीवर होता. त्याची जखम धुवायलाही साधं पाणी नसल्याचं लक्षात आल्यावर आम्ही आततायीपणे पाणी संपवून टाकल्याबद्दल स्वतःलाच डझनावारी शिव्या घातल्या. शेवटी तसंच त्याच्या त्या जखमा रुमालांना, त्याच्या शर्टला वगैरे पुसून आम्ही त्याला त्यातल्यात्यात चालू शकण्याइतपत अवस्थेत आणलं.

अचानक एकाच्या डोक्यात काहीतरी आलं. त्याने ताबडतोब त्याची सॅक उघडून ग्लुकॉन-सी/डी चा एक मोठा खोका बाहेर काढला आणि आमच्या सगळ्यांच्या हातावर चिमूट चिमूट टाकलं. त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सगळ्यांनी ताबडतोब ते तोंडात टाकलं. ते तोंडात टाकताक्षणी तोंडात पाण्याचा एक जो भास निर्माण झाला त्याची तुलना फक्त मृगजळाशीच होऊ शकेल. आम्ही अक्षरशः मृगजळ पीत होतो मृगजळ. काही का असेना पण त्या चिमूटचिमूट ग्लुकॉन-सी ने तात्पुरती का होईना पण तरतरी वाटली. पुन्हा एकदा नव्या उमेदीने आम्ही झपझप उतरायला लागलो. जवळपास अर्धा तास सगळेजण शांतपणे उतरत होते. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. किंवा बोलायचे त्राणही नव्हते हे जास्त समर्पक. त्यामुळे आहे ती उर्जा साठवून ठेवून तिचा वापर बोलण्यापेक्षा चालण्यासाठी करुया असं साधं एनर्जी कन्झरवेशनचं सूत्र आम्ही (नकळत) वापरत होतो.

अर्धा तास न बोलता चालल्यावर आता मात्र बोलणं भागच आहे हे लक्षात आल्यावर एकाने तोंड उघडलं आणि त्याचं पुढचं वाक्य आमचा ठोका चुकवून गेलं. जवळपास १००% विश्वासाने आम्ही चुकलो असल्याचं त्याने जाहीर केलं. एवढा वेळ चालताना इतका वेळ घडणार्‍या अतर्क्य घटनांचा विचार करत असल्याने ही साधी-सोपी उघड वस्तुस्थिती कोणाच्या लक्षातच आली नव्हती. सगळेजण चरकलो. कारण तो म्हणाला ते पूर्णपणे सत्य होतं. त्या ओहोळातून उतरत उतरत आम्ही भलतीकडेच जात होतो. त्याक्षणी अचानक भानावर आल्यागत सगळ्यांनी इकडे तिकडे बघत आजूबाजूच्या वाटांचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. क्षणभर आम्ही कुठे आलो आहोत आणि नक्की कुठे जायचं आहे हे काही कळेचना. मग हळूहळू नीट विचार करून सगळ्यांनी धावपळ करण्यापेक्षा दोन-तीन जणांनी पुढे जाऊन वाट शोधून परत यावं आणि तोवर बाकीच्यांनी तिथेच बसून राहावं असं ठरलं. वीसेक मिनिटांत ते परत आले ते खांदे आणि चेहरे पाडूनच. कारण आजूबाजूला ओळखीचं काहीच दिसत नव्हतं. पण आम्ही चालतोय तो रस्ता तर नक्की चुकीचा होताच. त्यामुळे सर्वानुमते या ओहोळाच्या रस्त्यातून बाहेर पडणं हे अत्यावश्यक होतं. ओहोळाच्या रस्त्याच्या डावीकडून एका छोट्या वाटवजा रस्त्याने आम्ही त्या सुकलेल्या ओहोळाला अलविदा करून बाहेर पडलो. समोर दिसणार्‍या वाटेने हळूहळू अंदाज घेत चालणं चालू होतं. सगळ्यांच्या नजरा अक्षरशः चारी दिशांना घिरट्या घालत होत्या. एखादी ओळखीची वाट, ओळखीचं झाड, ओळखीचा कातळ असं काही काही शोधण्याचा प्रयत्न चालू होता. पण कुठेच काही हाती लागत नव्हतं. या सगळ्या गडबडीत आम्ही उपाशी आहोत, तहानलेले आहोत, एकाचं डोकं फुटून त्यातून रक्त वाहतंय वगैरे वगैरेची कसलीही शुद्ध आम्हाला नव्हती. आम्हाला काही करून रस्ता शोधायचा होता फक्त आणि तोही लवकरात लवकर. कारण मगाशी तीन वाजलेले बघितल्यानंतरचे दोन तास कधी कुठे आणि कसे गेले याचा काहीच हिशोब लागला नव्हता की आमच्या परिस्थितीतही विशेष काहीच फरक पडला नव्हता. उलट ती बिघडलीच जास्त होती. आता अजून फार तर तासाभरात अंधार पडायला सुरुवात होणार होती आणि अंधार्‍या रात्रीत जंगलात/डोंगरावर वाट शोधत फिरणं म्हणजे........... !!! आम्हाला कल्पनाही करवत नव्हती. झपाझप पावलं पडायला लागली. पण जाणार कुठे, कसं काहीच कळत नव्हतं. एवढ्यात..................................

क्रमशः

* आता अजून थोडेच भाग !!

- भाग ३ इथे  वाचा

Saturday, February 26, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-१

हापूसच्या गोडव्याचं वर्णन करणं हे निराळं आणि तो गोडवा प्रत्यक्ष अनुभवणं हे निराळं.... हा अनुभव म्हणजे असंच आम्ही प्रत्यक्ष हापूसचा गोडवा कसा चाखला होता त्याची गोष्ट. फरक एवढाच की त्यात गोडवाही नाहीये की हापूसही नाहीये. असले तर फणसाचे काटेच असतील आणि तेही कारल्याच्या कडूपणाबरोबर...... !!!

****  

गेल्या काही वर्षांत एकूण ट्रेकिंगच कमी-नगण्य-बंद अशा पायर्‍या उतरत गेल्याने हल्ली लक्षात येत नाही पण पूर्वी मात्र ट्रेकिंग म्हटलं की हमखास पेब डोळ्यासमोर यायचा आणि पेब म्हटलं की ८ फेब्रुवारी १९९८ डोळ्यासमोर चमकायचा. त्या पेब ट्रेकच्या आठवणी, झालेली प्रचंड दमछाक, तो गोंधळ, ती चुकामुक, तो उशीर... सगळं कसं पद्धतशीरपणे चुकलेलं.... !! थोडक्यात, या आठवणी 'रम्य त्या आठवणी' कॅटेगरीतल्या खचितच नाहीत (आणि वाटत असतील तर तो माझ्या लेखनशैलीचा दोष समजावा) कारण ट्रेकच्या रम्य आठवणींमध्ये गाणी, भेंड्या, धडपडणे, थट्टा, मस्करी, चढाई, रॉकपॅच, गप्पा, धुमाकूळ, आरडाओरडा असे प्रकार असतात. पण आमच्या पेब चढाईत यापैकी काहीच नव्हतं. असलंच तर जेमतेम १०% किंवा सकाळचे काही तासच !

सकाळी साधारण सात-साडेसातच्या सुमारास आम्ही नेरळ स्टेशनला उतरलो. प्रत्येक ट्रेकला होतो तसा चहा, वडापाव वगैरेचा कार्यक्रम पार पाडला. प्रत्येक ट्रेकला असतं तसं निरभ्र आकाश, मस्त फ्रेश हवा होती आणि प्रत्येक ट्रेकला असतो तसा एक मस्त, भन्नाट, बिनधास्त मूड आमचाही होता. आम्ही दहा-बारा जण होतो साधारण. चार-पाच मुली आणि बाकीची मुलं. काही महत्वाच्या फॅक्टस म्हणजे 

- निम्म्यापेक्षा जास्त लोकांचा पहिलाच ट्रेक होता, 
- सगळ्या मुलींचा पहिलाच ट्रेक होता आणि 
- आमच्यातल्या प्रत्येकाचाच हा पहिलाच पेब दौरा होता. 

थोडक्यात आधीच अनुभवी लोक कमी आणि त्यातही पेबचा अनुभव शून्य असलेले लोक अशी आमची एक अल्टिमेट गँग होती. हे दोन कारणांसाठी सांगतोय. पुढे येणार्‍या घटना वाचून तुम्ही आमचं नाव समर्थांच्या मुर्खविषयक लक्षणांमध्ये नोंदवण्यासाठी धावू नये म्हणून आणि दुसरं म्हणजे जे काही घडलं त्याचं खापर आम्हाला सर्वस्वी परिस्थितीवर फोडता येऊ नये म्हणूनही ! 

नेरळला स्टेशनात उतरून डावीकडे गेलं की माथेरानकडे जायचा रस्ता लागतो आणि उजवीकडून गेलं की पेबचा रस्ता हे आम्ही सगळ्यांनी एकमुखाने पाठ करून ठेवलं असल्याने स्टेशनातून बाहेर पडल्या पडल्या उजव्या दिशेने आमचा जथ्था निघाला. वाटेत ओहोळ, काही भलेमोठे विजेचे टॉवर्स, पोल्ट्री फार्म वगैरे वगैरे (चूभूद्याघ्या. बर्‍याच वर्षांपूर्वीचं वर्णन आहे.) खुणा लागेपर्यंत चालायचं अशीही माहिती आम्ही काढली होती. या सगळ्या गोष्टी ओलांडल्यावर लगेच (बहुतेक) डावीकडे एका वळणावर वळलं की आपण पेबच्या पायथ्याच्या दिशेने जायला लागतो या माहितीचाही त्यात समावेश होता. साधारण पाऊण-एक तास चालूनही आम्हाला यातला पोल्ट्री फार्म सोडून काहीही दिसलं नाही ....... म्हणजे आम्ही बहुधा सुरुवातीपासूनच रस्ता चुकलो असू असा निष्कर्ष आता काढणं सोपं असलं तरी तेव्हा आमच्या कोणाच्याही ते साधं डोक्यातही आलं नाही. त्यामुळे त्यावेळी पोल्ट्री फार्म लागल्यानंतर त्यानंतरच्या एका (कुठल्यातरी) डाव्या वळणाला वळून आम्ही बिनधास्त समोर दिसेल तो पेबचा पायथा असावा असं समजून तिथून चढायला लागलो. यातले बरेच तपशील चुकीचेही असतील. कदाचित एवढा मुर्खपणा, निष्काळजीपणा आम्ही केलेलाही नसेल. पण अर्थात त्याने नंतर घडणार्‍या घटनांवर काहीही परिणाम होणार नव्हता एवढं मात्र नक्की. तर त्या अगम्य सो कॉल्ड पायथ्यापासून चढाईला सुरुवात झाली. हसत खिदळत निवांत रस्ता कापणं चालू होतं. साधारण तासभराचं चढण झालं की एक छोटं पठार लागतं. ते पठार म्हणजे पेबचा साधारण अंदाजे हाफवे मार्क. त्या पठारावरून गडाच्या दिशेने जाण्यासाठी योग्य वाट पकडणं आवश्यक असतं. कारण तिथे बर्‍याच वाटा आहेत आणि त्या किल्ला सोडून इतर कुठेही जातात. त्यामुळे योग्य वाटेने जाणं अत्यावश्यक. या पठाराचं अजून एक महत्व म्हणजे समोरच्या डोंगरावरून कोसळणार्‍या धबधब्याचं मनमोहक दर्शन. साधारण इथे हिरवळीवर पहिला ब्रेक घेऊन, थोडी खादाडी करून, धबधब्याचं सौंदर्य अनुभवून गडाच्या दिशेने कुच करण्याचा रिवाज, शिरस्ता वगैरे वगैरे आहे. पण अर्थातच आम्ही तो रिवाज पाळला नाही. म्हणजे पाळावाच लागला नाही. ती वेळच आमच्यावर आली नाही.. कारण ते मुदलातलं पठार आणि तो धबधबाच आम्हाला न लागल्याने त्यावर चढलेलं चुकीच्या वाटांचं व्याज आमच्या नशिबी आलं नाही. अर्थात पण त्याने काही फरक पडला नाही. कारण आम्ही आमच्या चुकण्याचा वाटा स्वतः ठरवत होतो आणि पावलागणिक त्यात वाढ होत होती. असो. ते सगळं नंतर येईलच..

तर "त्या पठारावरून पुढे जाताना सांभाळून जा आणि योग्य वाट निवडा" असे महत्वाचे सल्ले देणार्‍यांच्या तपशीलात एक गडबड होती. "त्या पठारापर्यंत येतायेताच चुकलो तर काय" याविषयी कोणीच काहीच सांगितलं नव्हतं. त्या प्रश्नाचं नवनीत मार्गदर्शक, २१-अपेक्षित वगैरे वगैरे आमच्याकडे नव्हतं. कारण पठारापर्यंत येतानाच आम्ही चुकू हे कोणाच्या खिजगणतीतही नव्हतं. बहुतेक आत्तापर्यंत कधीच कोणीच असली क्षुल्लक, फुटकळ वगैरे चूक केलेली नसावी. पण "प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी पहिल्यांदाच घडते" या नियमाला सर्वार्थाने सिद्ध करण्याची जवाबदारी आमच्या अननुभवी खांद्यांवर होती आणि त्याच्या सिद्धतेसाठी आम्ही अनावधानाने का होईना जंग जंग पछाडत होतो. तर थोडक्यात आम्हाला ते पठार न लागल्याने आम्ही समोर दिसेल तसा डोंगर चढत होतो, दिसेल ती वाट तुडवत होतो. तरीही म्हणावं तसं टेन्शन कोणाच्याच चेहर्‍यावर दिसत नव्हती कारण ज्याप्रमाणे "अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आधी अन्याय होतोय हेच कळणं आवश्यक असतं" त्याप्रमाणे चुकलो आहोत याचं टेन्शन येण्यासाठी आधी आम्ही चुकलो आहोत हेच आमच्यापैकी कोणाच्या गावीही नव्हतं. म्हणजे थोडंसं चुकलो आहोत याची कल्पना होती पण एवढं मोठं 'बलंडर' होतंय हे कोणालाही कळलं नव्हतं.

तर वाट तुडवता तुडवता ते विंग्रजी कादंबर्‍यांत वर्णन असतं की "ही फाउंड हिमसेल्फ इन फ्रंट ऑफ चर्च" अक्षरशः अगदी तसंच आम्ही आम्हाला अचानकच एका सत्तर अंशाच्या चढासमोर फाईंड केलं. म्हणजे अक्षरशः खरंच अचानक तो एवढा मोठा चढ/डोंगर/टेकडी समोर कुठून आली हे आम्हाला कळलंही नाही. आधी माफक आणि होता होता भयानक प्रयत्न करूनही आम्ही तो चढ चढू शकू याची कुठलीही चिन्हं दिसेनात. बरेच प्रयत्न केले तरी कोणीही माघार घेईना. कोणीही म्हणजे आम्हीही नाही की ती टेकडीही नाही याअर्थी.. एव्हाना सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. भयंकर उकडायला लागलं होतं. अक्षरशः आग आग होत होती. त्यादिवशी रोजच्यापेक्षा थोडं जास्तच ऊन पडलं होतं. अतीच गरम होत होतं. किंवा कदाचित नसेलही होत पण दर अर्ध्या तासाने पाणी पिऊन पिऊन आमच्याकडचं पाणी आम्ही संपवून टाकल्याने निदान आम्हाला तरी तसं वाटलं तेव्हा. पाणी संपलंय म्हटलं की अजून तहान लागते त्याप्रमाणे एकाच्या घशाला कोरड पडतेय ना पडतेय तोवर दुसर्‍यालाही ती जाणीव झाली आणि होता होता त्या गोष्टीचं जाणीव-अफवा-बातमी असं प्रमोशन होत होत सगळ्यांच्याच घशाला अचानक सामाईक कोरड पडली. झालं.. आता मात्र प्रसंग बाका होता. डोक्यावर रणरणता सूर्य, सुकलेले घसे, पोटात भूक आणि समोर न चढता येऊ शकणारी अशी उंच टेकडी... डबे होते पण ते या एवढ्या तळपत्या उन्हात आणि धड उभंही राहायला जागा नसलेल्या ठिकाणी खाणं शक्य नव्हतं. सुकी खादाडी चालताचालताच करून संपून गेली होती. काय करावं सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या चढावरून थेट वर न जाता त्याला वळसा घालून जाऊन बघू अशी एक कल्पना कोणालातरी सुचली. अर्थात ज्याप्रमाणे प्रत्येक कल्पना सुचवणार्‍याला आपली कल्पना अभिनव वाटत असते त्याप्रमाणे यालाही ती वाटली परंतु आजूबाजूच्या सुकलेल्या घशांनी त्या एकमेव चाललेल्या मेंदूवर मात केली. सगळे त्या टेकडीच्या पायथ्याशी बसून राहिले होते. काही मिनिटांपूर्वी हसत खिदळत चालणार्‍या ग्रुपमध्ये अचानकपणे अंगात उठण्याचंही बळ नसल्यागत झालं. 

"ठीके.. तुम्ही सगळ्यांनी इथेच बसा. मी थोडं आजूबाजूला बघून येतो" त्या कल्पनेच्या मालकाने प्रस्ताव मांडला आणि लोकांचं मौन हीच त्यांची मूकसंमती गृहीत धरून तो चालायलाही लागला. सगळेजण वैतागून, काही न बोलता तिथेच तसेच बसले होते. काहीजण त्या जळत्या उन्हाचा बिमोड करण्यासाठी म्हणून रुमाल हलवून अक्षरशः 'सुर्व्याने' काजव्यासमोर चमकण्याचा प्रयत्न करत होते. असाच काही वेळ शब्दशः जळफळाट (डोक्यावर आणि पोटातही) सहन करेपर्यंत तो मालक पुन्हा हजर झाला. ओरडतच... !!! आमच्यातल्या दोघा तिघांना त्याने त्याच्याबरोबर यायला सांगितलं. दहा पंधरा मिनिटांनी तो कल्पनेचा मालक आणि त्याच्याबरोबर कल्पना बघायला गेलेले ते ३-४ प्रेक्षक असा सगळा ग्रुप परत आला. सगळ्यांच्या चेहर्‍यावर टेकडीच्या मागच्या बाजूला तानसा-वैतरणा तलाव आणि त्याच्या शेजारी आंबरस-पुरीचं पोटभर जेवण पुरवणारं हॉटेल असावं इतका आनंद ओसंडून वाहत होता. त्याचं कारणही तसंच होतं. एक म्हणजे थोडं मागच्या बाजूने गेल्यावर तो चढ तितकासा भयंकर नव्हता. त्याच्या कोनात भरघोस घट होती आणि दुसरं म्हणजे तिथून काही अंतरावर गड, सुळका वगैरे वगैरे असं काय काय दृष्टीक्षेपात येत होतं. हे असं काही ऐकल्यावर सुकलेले घसे, थंडावलेले मेंदू, थकलेली गात्रं एकदम उठून उभी राहिली. अक्षरशः दहा मिनिटांत आम्ही पुन्हा एकदा आम्हाला त्या कमी कोनाच्या चढाच्या पायथ्याशी फाईंड केलं.

होता होता अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर, हात धरून, साखळ्या बिखळ्या करून आम्ही कसेबसे तो चढ पार करण्यात यशस्वी झालो. पण........... वर पोचल्यावर आमच्या लक्षात आलं की इथे आलो तरीही परिस्थितीत विशेष असा काहीच फरक पडलेला नाही. पण एक छोटंसं झाड, कमी चढ, निदान कसंबसं का होईना बसता येण्यापुरती थोडीशी जागा अशा काही काही जमेच्या बाबी होत्या. पण तरीही डबे काढून, गप्पा मारत जेवणावर ताव मारता येणं हे अजूनही स्वप्नवतच होतं. कारण तेवढी जागा तिथेही नव्हतीच.... मला वाटतं तो आमचा 'ब्रेकिंग पॉईंट' ठरला. हिंदी चित्रपटातल्या 'दर दर की ठोकरे' खाल्ल्यावरही कुठेही नोकरी न मिळाल्याने गुन्हेगारी मार्गाकडे वाळलेल्या सुशिक्षित बेकार तरुणाप्रमाणे किंवा गरिबीला कंटाळून, आजारी मुलासाठी औषधं घ्यावीत म्हणून शेवटी नाईलाजाने चोरी करणार्‍या बापाप्रमाणे आमची अवस्था झाली होती. च्यायला, एवढं तडफडत, साखळ्या करत, उन तुडवत टेकडी चढून वर आलो ते काय पुन्हा वर येऊन उपाशीपोटी उभं राहण्यासाठी?? अरे हट !! हळूहळू तो पॉईंट कॉमन ब्रेकिंग पॉईंट ठरला. आपण रस्ता चुकलो आहोत हे मान्य करायलाच हवं, अजून शोधाशोध करून उगाच धडपडत, तडफडत, रस्ते शोधत वर जाण्याचा अट्टाहास सोडून द्यायला हवा हे जवळपास प्रत्येकाला पटलं. तरी एक-दोन मतं अशी होतीच की एवढे आलोय तर अजून थोडं वर जायला काय हरकत आहे. गड दिसतोय, साधारण अजून एक-दीड तासात गडावर पोहोचूही. गडावर भरपूर थंडगार निर्मळ पाणी आहे. क्षणभरासाठी का होईना गडाच्या टाक्यांमधलं थंड, निर्मळ, भरपूर पाणी हा वर चढाई करायला उद्युक्त करण्यासाठीचा एक आकर्षक मुद्दा भासत होता. पण तो भासमानच होता. कारण एक-दीड तासात पोचलो नाही तर काय? पुन्हा चुकलो तर काय? गडावर पाणी नसलं तर काय (हा पर्याय अशक्य होता.. तरीही)? असलं तरी पिण्यायोग्य नसलं तर काय? आणि एवढं सगळं करूनही वर पोचलो, वर पाणी असलं तरी वर पोचल्या पोचल्या जेमतेम दहा मिनिटं थांबून ताबडतोब परत फिरायला लागणार होतं. कारण या सगळ्या गडबडघोटाळ्यात, चुकामुकीत घडाळ्यात दुपारचे तीन वाजले आहेत याची कोणाला जाणीवच झाली नव्हती. मात्र ज्याक्षणी ती झाली (म्हणजे तीन वाजता ;) ) त्याक्षणी वरती साक्षात अमृत असलं तरी वर न जाता सरळ गड उतरायला लागायचा हा आमचा निर्णय पक्का झाला. कारण वर पोचायला लागणार्‍या तासा-दीड तासाच्या वेळेतच आम्ही खाली पोचू शकणार होतो, पोटभर खाऊ शकणार होतो. थंडगार पाणी पिऊ शकणार होतो. "खा मटार उसळी, खा शिकरण" वाल्या पुणेरी चैनीप्रमाणे सावलीत बसून पोटभर खाणं आणि थंडगार पाणी पिणं ही आमच्या दृष्टीने चैन होती त्या क्षणी. तर त्या चैनीच्या दिशेने मार्गक्रमणा करायला आम्ही सुरुवात केली. चढताना दमत थकत चढलेली ती टेकडी उतरताना मात्र आम्ही आश्चर्यकारक वेगाने उतरलो. गडावर पोचू न शकल्याचं दुःख, ट्रेक अर्धवट सोडावा लागल्याचं शल्य, तथाकथित अपमान, त्यातून येऊ शकणारं नैराश्य वगैरे वगैरे भावनांना (निदान तेव्हा तरी) पट्टीचे ट्रेकर नसल्याने निदान त्याक्षणी तरी आमच्या मनात थारा नव्हता आणि असलाच तरी त्या व्यक्त न करण्याएवढा सुज्ञपणा सुदैवाने जवळपास प्रत्येकाने दाखवला.. 

क्रमशः 

* जास्त मोठ्या पोस्ट्स असल्या की वाचणारा कंटाळतो या आजवरच्या अनुभवाने आणि स्वानुभवानेही मुद्दाम ही पोस्ट काही भागांमध्ये लिहितोय. कदाचित नेहमीपेक्षा अधिक भाग टाकावे लागतील. थोडक्यात, क्रमशः लिहून त्रास देण्याचा कुठलाही उद्देश नाही याची कृ नों घे :) 

- भाग २ इथे  वाचा.

Friday, February 11, 2011

सुखी माणसाची गोष्ट..

उशिरा उठलो..

आंघोळ उरकली..

नाश्त्याला कल्टी दिली..

धावत स्टेशन गाठलं..

पायर्‍या उतरताना धडपडलो..

पास संपल्याने गेटवर अडकलो..

पास काढेपर्यंत ट्रेन गेली..

प्रत्यक्ष प्लॅटफॉर्मवर जाईपर्यंत पुढची ट्रेनही डोळ्यासमोरुन गेली..

पुस्तक काढावं म्हणून बॅगेत हात घातला तर पुस्तक घरीच विसरल्याचं लक्षात आलं..

ऑफिसच्या लॉबीतच बॉसने जंगी 'स्वागत' केलं..

चार भल्यामोठ्या प्रॉब्लेम्सनी हापिसात नाश्ता करण्याच्या बेतावर आणि प्रयत्नावर पाणी फेरलं..

एक कलिग सुट्टीवर, दुसरा ट्रेनिंगला. अजून चीडचीड..

चक्कर यायच्या बेतात आल्यावर हातातलं काम टाकून जेवण्यासाठी पळालो.

सँडवीचमध्ये मीठ जास्त.. त्याच्याशी भांडलो.

जागेवर परत आल्यावर पुन्हा एका कलिगशी भांडलो.


... साला काय एकेक दिवस असतो यार !!! (तरीही अर्धाच संपलाय आत्ताशी :( )


* ही पोस्ट उगाच कैच्याकै आहे. सोडून द्या..

द्वि..... ज

डॉक्टरांची परवानगी मिळताच त्या लगबगीने आत गेल्या. छान उगवतीची सूर्यकिरणं खोलीभर पसरलेली ... कसं छान प्रसन्न वाटत होतं.. तिच्याशी नजरानजर होताच त्या तोंडभर हसल्या. तीही हसली. क्षीणपणे. फार थकलेली दिसत होती. साहजिकच आहे. पहिल्या वेळी त्रास होतोच थोडा. त्यांनी मायेने तिच्या कपाळावरून हात फिरवला. नंतर हळूच बाजूला ठेवलेल्या सश्याच्या पिल्लाच्या गालावरून. पिल्लू गाढ झोपेत होतं. दोघीही हसल्या.

"अवी?" क्षीण आवाजात तिने विचारलं.

"अवी निघालाय. पहाटेच्या फ्लाईटने. येईलच. तू पड शांतपणे"

ती फक्त हसली.

"खूप त्रास होतोय का?"

"हुं" ऐकू जाईल न जाईल अशा अस्पष्ट आवाजात ती हुंकारली.

पहिल्यांदा बातमी कळली तो दिवस, दुसर्‍या-तिसर्‍या महिन्यापासून सुरु झालेल्या त्या उलट्या, डोकेदुखी, मळमळ, कधी भूक गायब तर कधी झोप, अशक्तपणा, दमणूक, वासांची अ‍ॅलर्जी, पाय/हात/डोकं दुखणे अशा असंख्य असंख्य गोष्टींच्या चक्रातून निघालेले गेले नऊ महिने आणि शेवटी एकदाचं त्या त्या कापसाच्या पुंजक्याचा चेहरा बघायला मिळण्याची वेळ. सगळं झरकन डोळ्यासमोरून सरकून गेलं त्यांच्या...

"त्रास होतोच ग पोरी.. होईल सगळं नीट. कितीही झालं तरी शेवटी बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म !!"


*****

भटजींनी मुलाला त्याच्या मांडीवर बसायला सांगितलं. मंत्र म्हटले. नंतर त्याला मुलाच्या कानात नाव सांगायला सांगितलं. मंत्र चालूच होते. तो मुलाच्या कानात हळूच नाव पुटपुटला. मंत्र संपल्यावर गुरुजी म्हणाले "हा तुझा दुसरा जन्म बेटा. मुंज झाली की दुसरा जन्म सुरु होतो मुलाचा. सुखी भव"


*****

एक जन्म चार अक्षतांच्या दाण्यांनी मिळणारा तर दुसरा नऊ महिन्यांच्या खडतर तपश्चर्येनंतर... !

एक जान्हव्याच्या ब्रह्मगाठीला बांधलेला तर दुसरा नाळेत गुंडाळलेला.. !

कुठल्याही जातीला/प्रथेला नावं ठेवण्याचा उद्देश नाही. फक्त एक विसंगती जाणवली. थोडी मोठी वाटली. म्हणून लाउड थिंकिंग केलं.. झालं...!

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...