Thursday, June 30, 2016

गर्व

गर्वच नाही तर माज आहे मराठी असल्याचा !!!
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
.

असले स्टेटस टाकणारी टाळकीच मुंबईला 'बॉम्बे' आणि भारताला 'इंडिया' म्हणण्यात आघाडीवर असतात.

कामसू

आई : अरे आत्ताच आलायस शाळेतून. लगेच मस्ती कसली करतोस.. आधी शूज काढ, हातपाय धू, तोंड धू, कपडे बदल...

युवराज (अत्यंत त्रासिक आवाजात) : काय ग आई... आल्या आल्याच तू मला किती कामं सांगतेस????

फ्रेंच कनेक्शन

परवा रस्त्याने जात असताना फ्रेंच क्लासेसचा एक बोर्ड दिसला. मी गंमतीत म्हणून बाळराजांना विचारलं "काय रे, फ्रेंच क्लासला जायचं का?" (पूर्वी त्याला थोडी थोडी स्पॅनिश यायची आणि आवडायचीही.. या पार्श्वभूमीवर)

बाळराजे : फ्रेंच? म्हणजे?

मी : अरे फ्रेंच ही एक लँग्वेज आहे. मराठी, इंग्रजी, स्पॅनिश सारखी

बा.रा. : बाबा, फ्रेंच कोण बोलतं?

मी : अरे, फ्रान्समधले लोक फ्रेंच बोलतात. फ्रान्स हा एक देश आहे. अ कंट्री. भारत किंवा अमेरिकेसारखा.

बा.रा. : बाबा, तिथल्या लोकांना मराठी किंवा इंग्लिश येतं का?

मी : नाही रे. त्यांना फ्रेंच येतं फक्त..

बा.रा. : बा...... बा...... (प्रचंड टेन्शनमध्ये येऊन अतिशय पॅनिक स्वरात). अरे मग ते मला कसं शिकवणार? माझ्याशी ते कसे बोलणार? आता मी काय करू??

फुंतरू

दुकानात सर्वात जास्त दुर्लक्ष करण्याची गोष्ट म्हणजे गिऱ्हाईक.....

आणि चित्रपटात सर्वात जास्त दुर्लक्ष करण्याची गोष्ट म्हणजे पटकथा....
आणि संवाद
आणि कथा
आणि संकलन
आणि संकल्पना
आणि (अनाठायी) संगीत
आणि (अस्थानी) गाणी
आणि दिग्दर्शन......
.
.
.
.
.
.
.
.
आणि प्रेक्षक

#फुंतरू

क्षण

क्रिकेटप्रेमी बापाला कृतकृत्य वाटायला लावणारा क्षण कुठला??

काही महिन्यांपूर्वीपर्यंत क्रिकेटमधलं काहीही कळत नसणाऱ्या आणि त्यात अजिबात इंटरेस्टही नसणाऱ्या ७ वर्षाच्या लेकाने भारत खेळत नसलेली वर्ल्डकप फायनल बघून झाल्यावर विचारलेला प्रश्न.

 "ए बाबा, आपण स्टेडियमवर जाऊन मॅच कधी बघायची रे?"

तोच तो क्षण !!!!

गुडघ्याला बाशिंग

सीझन : बाळराजांच्या मुंजीच्या तयारीचा
प्रसंग : मुंडावळ्या खरेदीचा

बाळराजांच्या कपाळी मुंडावळ बांधली जाते. आईसाहेब आणि आजीसाहेबांच्या तोंडून अर्थातच समाधानमिश्रित कौतुकाचे उद्गार निघतात. परंतु बाळराजे विशेष इम्प्रेस झाल्यासारखे वाटत नाहीत किंबहुना थोडे नाराजच वाटतात. अखेरीस काळजीयुक्त सवाल केला जातोच.

माँसाहेब : काय रे आवडल्या नाही का मुंडावळ्या?

बाळराजे : आवडल्या.

माँसा : मग?

बारा : अग पण.

माँसा : पण काय?

बारा : अग मला असं वाटतंय की या मुंडावळ्या मला लग्नात लहान होतील.

आईसाहेब आणि आजीसाहेबांना हसणं अनावर होऊन जातं.

बाप ओळख न दाखवता दुकानातून पळून जातो.

उघडं

सहकुटुंब चाललो होतो आणि अचानक प्रचंड पाऊस कोसळायला लागला. छत्रीचा साधा शो-पीस म्हणूनही उपयोग होईना म्हणून मग रस्त्याच्या कडेला एका दुकानाच्या शेडखाली जाऊन उभे राहिलो. चिरंजीवांनी पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याचा सेहवागी निश्चय केला असल्याप्रमाणे आसूड ओढला.

चिरंजीव : बाबा, घरी कसे जाणार आपण? उघडं आहे.

मी : काय????

चि : बाबा, पाऊस पडतोय. उघडं आहे.

मी पटकन छत्रीला भोक बिक पडलंय की काय ते बघितलं. शो-पीस सुस्थितीत होता.

मी : अरे काय उघडं आहे?

चि.  : बाबा, आपलं उघडं आहे.

मी क्षणभर चपापुन जाऊन पटकन शर्टचं एखादं बटन (आणि हो जीन्सची झीपही. का खोटं बोला उगाच?) चुकून उघडी राहिलीये का ते चाचपून बघितलं. (हो. देवाघरच्या फुलाच्या तोंडून देव कदाचित वॉर्निंग देत असावा. उगाच रिस्क का घ्या?). सुदैवाने सगळं बंद होतं.

माँसाहेब : अरे काय बडबडतोयस बेटा?

मी : काय झालंय काय नक्की?

अत्यंत दयार्द्र नजरेने पहात शक्य तितक्या संयमी आवाजात चिरंजीव उत्तरले.... "बाबा, एवढा पाऊस पडतोय, आपण पूर्ण भिजलोय, कपडे भिजलेत. आता घरी कसे जाणार आपण??? आपलं उघडं आहे."

तेवढ्यात अचानक खाडकन वीज चमकली आणि मी धबधब्यासारखं कोसळू पाहणारं हसू महत्प्रयासाने आवरून धरत चँडलर बिंगचे शब्द उसने घेत उत्तरलो "द वर्ड यु आर लुकिंग फॉर, डिअर, इज 'अ-व-घ-ड'

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...