Friday, May 13, 2011

कंपोस्ट-३ : गुग्ल्या आणि कं

- तुम्ही ब्लॉग लिहीत असाल,

- ब्लॉगवर मोठमोठाल्या पोस्ट्स टाकत असाल,

- आणि त्या मोठमोठाल्या पोस्ट्स पब्लिश करायच्या आधी ब्लॉगरवर सेव्ह न करता 'घमेल्या'तल्या ड्राफ्टमधे सेव्ह करत असाल...

वर सांगितलेल्या तिन्ही अटींमध्ये तुम्ही-म्हणजे तुमचा ब्लॉग-बसत असेल तर ही छोटीशी पोस्ट उर्फ कंपोस्ट तुमच्यासाठीच आहे. (नाही. ब्लॉगर कित्येक तास बंद पडलं होतं त्याच्याशी या कंपोस्टचा काहीही संबंध नाही.)

पण यावेळी थोडं वेगळं आहे. ही कंपोस्ट  माझ्या कं विषयी नसून राजाधिराज, सिंहासनाधिश्वर, महासम्राट (गो-ब्राह्मणप्रतिपालक मुद्दाम लिहिलं नाहीये. उगाच वाद होतात त्या शब्दाने ;) ) गुगल महाराजांच्या कं विषयी आहे. आणि कंपोस्ट असल्याने अर्थातच छोटीशी आहे.

पेबची गोष्ट  लिहिताना आठवून, वेळ काढून, तुकड्यातुकड्यात लिहायला मला जवळपास ४-५ दिवस लागले होते. चांगली सवय की वाईट सवय किंवा चूक की बरोबर ते माहित नाही पण पोस्ट लिहिताना मी ती घमेल्याच्या मसुद्यांमध्ये (जीमेल ड्राफ्ट) मधे लिहितो. थोडा भाग लिहून झाल्यावर लिखाण बंद करायचं असेल तर ते तिकडेच सेव्ह करून ठेवतो. तर त्या सवयीप्रमाणे ४-५ रात्री जागून लिहून शुक्रवारी रात्री (अ‍ॅक्च्युअली शनिवारी पहाटे) पेब बर्‍यापैकी पूर्ण केलं आणि शनिवारी सकाळी पुन्हा एकदा नीट वाचून चेक करून पहिला भाग टाकायचा असं ठरवलं.

पण शनिवारी सकाळी उठून बघतो तर काय !! शेवटचे दोन भाग गायब !! पुन्हा पुन्हा शोधलं पण जैसे थे. आणि नेमका मी पहिला भाग जस्ट टाकला होता. त्यामुळे रात्री बसून शेवटचे दोन भाग संपवायचे असं ठरवलं आणि त्याप्रमाणे शनिवारी रात्री बसून ते संपवलेही. एकच चूक केली की सगळे भाग वेगवेगळया ड्राफ्टसमधे सेव्ह करण्याऐवजी एकत्र सेव्ह केले आणि रविवारी सकाळी व्हायचं तेच झालं. पुन्हा दोन भाग गायब होते !!!!

आधीच्या वेळी कदाचित अति झोप आल्याने मी सेव्ह करायला विसरलो असेन (खरंतर ड्राफ्टस ऑटोसेव्ह होतात.. पण तरीही) असा संशयाचा फायदा मी घमेल्याला दिला होता पण यावेळी मात्र मला पक्कं आठवत होतं की मी ड्राफ्ट नक्की सेव्ह केला होता. आणि त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा मी गुग्ल्यावर अविश्वास व्यक्त केला. प्रचंड राग आला होता त्याचा. तोवर दुसरा भाग टाकून झाला होता. त्यामुळे त्या रात्री (म्हणजे रविवारी रात्री, सोमवारी सकाळी ऑफिसला जायचं असूनही) रात्रभर जागून पुन्हा एकदा शेवटचे दोन भाग नीट लिहून काढले आणि सगळे भाग वेगवेगळ्या ड्राफ्टसमधे सेव्ह केले. मग उरलेल्या दोन दिवसात शेवटच्या भागांवर फायनल हात फिरवून ते पोस्ट केले.

नंतर 'इनसाईड जॉब' बघून झाल्यावर पुन्हा एकदा लंब्याचवड्या पोस्टस  लिहायची खुमखुमी आली :P .. पण यावेळी आठवणीने वेगवेगळे ड्राफ्टस बनवले होते. पण तरीही प्रत्येक भागाला वेगळा ड्राफ्ट बनवला नव्हता.. एका ड्राफ्टमधे दोन-तीन भाग एकत्र असं सेव्ह केलं आणि व्हायचं तेच झालं. शेवटचे दोन भाग पुन्हा यावेळीही उडाले. !!!! :(

त्यानंतर आधीप्रमाणेच जागरणं करून, पुन्हा पुन्हा माहितीपट बघून सगळे भाग पुन्हा लिहिले. या सगळ्याला जवळपास १५-२० दिवस लागले आणि थोडक्यात पोस्ट किमान वीस दिवसांनी तरी लांबली. यावेळी मात्र एका भागाला एक ड्राफ्ट असं करून पोस्ट्स सेव्ह केल्या असल्याने वाचलो.

दोन्ही पोस्ट्स पूर्ण लिहून झाल्यावर सहज कुतूहल म्हणून नेटवर ड्राफ्टच्या साईझ लिमिटबद्दल काही माहिती मिळते का म्हणून शोधाशोध केली (म्हणजे पुन्हा गुगलवरच.. आईशप्पत $%^$). अर्थातच कुठेच काहीच सापडलं नाही. मग पुन्हा एकदा माझ्या पोस्ट्स बघितल्या आणि एक गोष्ट लक्षात आली. 'पेब' चे पाहिले पाच भाग मिळून अंदाजे ३२७५ शब्द होतात आणि 'इनसाईड जॉब'चे पहिले तीन भाग मिळून अंदाजे ३७१७ शब्द होतात. थोडक्यात घमेल्याच्या ड्राफ्टसमधे या आकड्यांच्या आसपास कुठेतरी काहीतरी गफलत नक्की आहे. यापेक्षा जास्त शब्दसंख्या झाली की घमेलं टांग देतं. अजिबात रिस्क घ्यायची नसेल तर ३००० शब्द अँड दॅट्स ऑल असं म्हणू. !!

वरची सगळी बडबड ऐकून तुमच्या डोक्यात दोन विचार नक्की आले असतील. एक म्हणजे ही खरंच कंपोस्ट असेल तर हा एवढी बडबड का करतोय.. ही खरंच कंपोस्ट आहे का? तर हो आहे. कारण आता लवकरच ही संपणार आहे

आणि दुसरी गोष्ट म्हणजे "च्यायला, ब्लॉगसाठी हा किती मेहनत करतो, दोन-चार रात्री जागतो, १५-२० दिवस लिहीतो अँड व्हॉट नॉट !!" हे दाखवण्यासाठी हे लिहिलंय असं वाटतंय. किंबहुना आता वाचताना मलाही ते तसंच वाटतंय ;) ... पण तरीही तुम्हाला बरं वाटावं म्हणून क्षणभर ते खरं आहे असंही समजू पण तरीही एवढी बडबड वाचल्यावर तुम्हाला ३००० शब्दांच्या लिमिटविषयी तरी कळलं ना? आणि तेही न जागता ;) थोडक्यात आपल्या दोघांसाठीही विन-विनचं आहे हे.. नाही का?

तर तात्पर्य एकच.... ३००० शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे लेख गुगल ड्राफ्टमधे सेव्ह करू नका आणि केलेत तर विसरून जा कारण कितीही कामसू आणि आज्ञाधारक असला तरीही गुग्ल्यालाही कधीकधी कं येतोच !! ;)


* तळटीप : ही पोस्ट मात्र (कंपोस्ट असल्याने) एका बैठकीतच संपवलेली आहे ;)

Monday, May 9, 2011

बँक नावाची शिवी : भाग ५ (अंतिम)

* भाग १ इथे  वाचा.
* भाग २ इथे  वाचा.
* भाग ३ इथे वाचा.
* भाग ४ इथे  वाचा. 


भाग ५ : सध्याची परिस्थिती नक्की कशी आहे? (व्हेअर आर वुई नाऊ?)

एकूणच या प्रकारामुळे अमेरिकन (आणि त्यामुळे आपोआपच जागतिक) आर्थिक विषमता कमालीची वाढली. करप्रणाली श्रीमंतांना पूरक बनवली गेली. ग्लेन हबर्डने बुश सरकारच्या काळात काम करताना अनेक करकपाती सुचवल्या आणि अंमलातही आणल्या. बुश सरकारने आर्थिक गुंतवणूक, त्यावरील नफा आणि डीव्हीडंड यावरचे अनेक महत्वाचे कर रद्द केले. हे कर रद्द केल्याने सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा होईल असं भासवलं गेलं. परंतु प्रत्यक्षात हे असे महत्वाचे कर रद्द केल्याने एकूण लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या अतिधनिक नागरिकांना खूप मोठा फायदा झाला. १९८० आणि २००७ या दरम्यान मध्यमवर्गाचं अधिकाधिक आर्थिक खच्चीकरण झालं. घर, गाडी, वैद्यकीय सुविधा, शिक्षण या सगळ्यांच्या किंमती वाढल्या आणि या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकन नागरिक भरभरून कर्जं घ्यायला लागला. तालाच्या ९०% लोकांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालं आणि तेवढाच फायदा झाला तो या शृंखलेत वर असलेल्या १०% नागरिकांचा. !!!!

२००८ मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वीच्या भाषणांमधून बराक ओबामा यांनी वॉल स्ट्रीट आणि वॉशिंग्टनमधली वाढती आर्थिक हाव आणि आर्थिक शिथिलीकरण या दोन प्रमुख बाबींमुळे महामंदी आली आणि या दोन गोष्टी ताबडतोब बदलण्याचं प्रतिपादन केलं. अध्यक्ष झाल्यानंतर २००९ च्या सुमारास त्यांनी ताबडतोब आर्थिक पुनर्रचनेच्या आवश्यकतेचं सुतोवाच केलं. परंतु २०१० मध्ये जेव्हा प्रत्यक्ष आर्थिक पुनर्रचना केली गेली त्यावेळी कुठलेही विशेष बदल केले गेले नाहीत . गुणांकन एजन्सीज, लॉबीइंग आणि अन्य आर्थिक नियम यामधल्या बदलासंबंधी साधं भाष्यही केलं गेलं नाही. वॉल स्ट्रीटची आर्थिक पुनर्बांधणीशी निगडीत असलेल्या महत्वाच्या आर्थिक बाबींवरील मजबूत पकड अजूनही स्पष्ट दिसून येते.

ओबामा यांनी टिमोथी गाईटनर याची ट्रेजरी सेक्रेटरी पदावर निवड केली. हा तोच टिमोथी गाईटनर जो अतिशय नाजूक प्रसंगी न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर होता आणि ज्याने गोल्डमन सॅक्सला भरभरून आर्थिक मदत देववली.

विल्यम सी डडली
विल्यम सी डडली हा न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा नवीन अध्यक्ष आहे. हा तोच इसम ज्याने ग्लेन हबर्डसह लिहिलेल्या अहवालात डेरीव्हेटीव्हजची प्रचंड स्तुती केली होती.

मार्क पॅटरसन हा गाईटनरचा कर्मचारी-प्रमुख आहे. मार्क पॅटरसन गोल्डमनचा माजी लॉबीईस्ट होता.

लुईस सॅक्स हा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे. हा मनुष्य ट्रायकेडिया या कंपनीचा प्रमुख होता. ट्रायकेडियाचा चुकीच्या आर्थिक गुंतावणूकीविरुद्ध बेटिंग करण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता.

कमॉडिटी फ्युचर्स कमिशनच्या प्रमुखपदी आहे तो गॅरी गेन्सलर. या गेन्सलरची गोल्डमन सॅक्सचा प्रमुख असताना डेरीव्हेटीव्हजना कायद्याच्या बंधनात आणण्याच्या विरोधात महत्वाची भूमिका होती.

ओबामाचा चीफ ऑफ स्टाफ असलेला रॅम इमॅन्युअल याने आता बुडीतखात्यात गेलेल्या फ्रेडी मॅकच्या संचालक मंडळात असताना सव्वा तीन लाख डॉलर्सची कमाई केली होती.

लॉरा टायसन
मार्टीन फेल्टसीन आणि लॉरा टायसन हे दोघेही ओबामाच्या आर्थिक पुनर्रचना सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

आणि ओबामाचा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे तो म्हणजे लॅरी समर्स.

२००९ मध्ये ओबामाने बेन बर्नान्कीची फेडरल रिझर्व्हचा सेक्रेटरी म्हणून पुन्हा नेमणूक केली !!!

आर्थिक महामंदी ओसरल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी आणि पुन्हा असा आर्थिक उद्रेक घडू नये यासाठी जगभरातल्या मोठमोठ्या देशांनी अनेक महत्वाचे कडक नियम तयार केले आणि त्यांची कसोशीने अंमलबजावणीही केली........... परंतु ज्या देशातल्या अवाढव्य धनपिपासू वृत्तीमुळे जगावर महामंदी लादली गेली त्या अमेरिकेने आणि ओबामा सरकारने भविष्यात हे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने अजूनही कोणतीही हालचाल केलेली नाही !!!!!!!!!! त्यांच्या मते अजूनही हा एक छोटासा धक्का अस्जून स्थिती पूर्ववत होईल आणि असं पुन्हा कधीच होणार नाही.

२०१० च्या मध्यापर्यंत अजूनही कुठल्याही वित्तसंस्थेच्या प्रमुखावर कुठल्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा लावला गेलेला नाही की खटला चालवला गेलेला नाही. कोणालाही अटक झालेली नाही की कुठल्याही विशेष समितीची स्थापना झालेली नाही !!

आर्थिक फुगवट्याच्या काळात विविध वित्तसंस्थांच्या प्रमुखांना दिल्या गेलेल्या महाप्रचंड रकमेची वसुली करण्याच्या दृष्टीने ओबामा सरकारने कारवाई सोडा साधे प्रयत्नही केलेले नाहीत.

हा विरोधाभास पहा... २००९ मध्ये बेकारीचा दर १७ वर्षातल्या सर्वोच्च पातळीवर पोचला आणि त्याच वेळी

- मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना १४ बिलियन डॉलर्स अक्षरशः वाटले. !!!!!!!!!!

- गोल्डमन सॅक्सने १६ बिलियन वाटले

अमेरिकेची अर्थप्रणाली ही अनेक दशकांपर्यंत अतिशय स्थिर आणि सुरक्षित होती. पण गेल्या काही वर्षात काही महत्वाचे बदल झाले. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे या प्रणालीने समाजाकडे चक्क पाठ फिरवली. राजकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला महाप्रचंड आर्थिक संकटाच्या खाईत ढकलून दिलं ! ज्या लोकांनी महत्वाच्या पदांवर बसवून ही आर्थिक महामंदी अमेरिकेवर आणि त्यामुळे आपोआपच संपूर्ण जगावर लादली ते लोभी गुन्हेगार अजूनही त्याच सत्तास्थानांवर आहेत. महत्वाचे निर्णय घेताहेत.

--------------------------

इतके एकामागोमाग एक धक्के बसल्याने माहितीपट संपताना डोकं चक्रावून गेलेलं असतं. हे सगळं वाचून तुमचं डोकं गरगरत नसेल तर तो दोष सर्वस्वी माझ्या लिखाणाचा आहे. प्रत्यक्ष माहितीपट प्रचंड प्रभावी आहे. अनेक उदाहरणं, असंख्य छोटेछोटे पुरावे, कित्येक मुलाखती, अनेक वस्तुस्थितीदर्शक पुरावे यांचा आपल्यावर एकामागोमाग एक एवढा मारा होतो की त्यामुळे अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्याचा भास होतो.  च्यायला हे $#%$^ लोक कित्येक वर्षं आपल्याला हातोहात फसवतायत चक्क आणि आपण फसतोय हे आपल्याला कळतही नाहीये.. आणि पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण एवढे निराधार आहोत की सगळं कळत, दिसत असूनही आपण कोणाचंही काहीही वाकडं करू शकत नाही. हे सारं असंच चालू आहे कित्येक वर्षं आणि पुढची अनेक वर्षं असंच चालू राहणार. सतत चालू राहणार. ज्यांच्या अमाप हावेपायी आणि कृष्णकृत्यांपायी सर्वसामान्य निर्दोष माणसाला आपला श्रमाचा पैसा हातातून निसटताना पाहावा लागतोय ते गुन्हेगार अजूनही तिथेच आहेत. सरकारात आहेत.. मानाची, महत्वाची आणि जवाबदारीची पदं अजूनही उपभोगत आहेत आणि कदाचित भविष्यातल्या महामंदीची तयारी करतायत. अर्थात ते काहीच गमावणार नाहीयेत.. सर्वस्व गमावणार आहोत ते आपण !! थोडक्यात भविष्यात येऊ घातलेल्या अशा अनेकानेक महामंद्यांना तोंड देण्याची तयारी करा हे नक्की.. !!

- समाप्त

बँक नावाची शिवी : भाग ४

* भाग १ इथे  वाचा.
* भाग २ इथे  वाचा.
* भाग ३ इथे  वाचा.

भाग ४ : जवाबदारी !!

ज्या व्यक्तींच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांच्या स्वतःच्याच अतिविशाल बँका, कंपन्या बुडाल्या ते लोक (सीईओज) मात्र त्यांनी साठवलेली गडगंज माया व्यवस्थितपणे घेऊन बाहेर पडले. लिमन ब्रदर्सच्या पाच उच्चाधिकाऱ्यांनी २०० आणि २००७ या सात वर्षात १ बिलियन डॉलर्सची माया कमावली आणि लिमन बुडल्यावरही त्यांचे पैसे त्यांच्याकडे सुरक्षित होते. त्यातल्या एका पैश्यालाही धक्का लागला नाही !!!!


अँजेलो मोझिलो

कंट्रीवाईडचा प्रमुख कार्यकारी अधिकारी अँजेलो मोझिलो याने २००३ आणि २००८ या पाच वर्षांत ४७० मिलियन डॉलर्स कमावले. कंट्रीवाईड बुडण्याआधीच्या एका वर्षात त्याच्याकडे असलेले कंट्रीवाईडचे शेअर्स विकून त्याने १४० मिलियन डॉलर्स कमावले ते वेगळेच.


मेरील लिंचचा प्रमुख कार्यकारी अधिकारी स्टॅन ओ'निल याची फक्त २००६ आणि २००७ मधली कमाई ९० मिलियन डॉलर्स होती. मेरीलला बुडवल्यानंतर त्याने राजीनामा दिला (खरं तर त्याला संचालक मंडळाने काढून टाकायला हवं होतं) आणि त्याला भत्त्याच्या स्वरुपात १६० मिलियन डॉलर्स मिळाले.

ओ'निल नंतर आलेल्या जॉन थेनने २००७ मध्ये ८७ मिलियन डॉलर्स कमावले. आणि मेरीलला सरकारने पैसे देऊन वाचवल्यानंतर फक्त दोनच महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर २००८ मध्ये थेन आणि संचालक मंडळातल्या सदस्यांनी करोडो डॉलर्स बोनस म्हणून आपापसात वाटून घेतले !!


स्टॅन ओ'निल
२००८ च्या मार्च मध्ये एआयजीच्या फायनान्शिअल प्रोडक्ट डिव्हिजनला ११ बिलियन डॉलर्सचा तोटा झाला. त्याबद्दल त्या डिव्हिजनचा प्रमुख असणारा जोसेफ कॅसेनो याची हकालपट्टी करण्याऐवजी कंपनीने दरमहा १ मिलियन डॉलर्सच्या पगारावर त्याची नेमणूक सल्लागार (कन्सल्टंट) म्हणून केली !!!!


अमेरिकन बँक्स आता पूर्वीपेक्षाही अधिक बलाढ्य, अवाढव्य आणि अधिक शक्तिशाली झाल्या आहेत. अनेक छोट्या बँकांना मोठ्या बँकांनी विकत घेतलंय किंवा त्यांचं विलीनीकरण झालंय. अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वीसारखी होण्यासाठी (म्हणजे सगळ्या आर्थिक नाड्या पुन्हा आपल्या हातात येण्यासाठी) अमेरिकन वित्तक्षेत्र पाण्यासारखा पैसा ओततंय. अनेक राजकारण्यांना खिशात घालण्याचे प्रयत्न केले जातायत, अनेकजण त्यांचे बाहुले बनलेत देखील. पण अजून एक महत्वाचं क्षेत्र आहे ज्यात हे लोक प्रचंड गुंतवणूक करतायत. हे असं क्षेत्र आहे की जे ज्यात गुंतवणूक होते आहे हेच कोणाला माहित नाहीये आणि ते म्हणजे फायनान्शिअल स्टडीज. 

जॉन थेन
इकॉनॉमिक्स शिकवणारं हे क्षेत्र, विद्यापीठं यांच्याकडे त्यांनी मोर्चा वळवला आहे. वित्तक्षेत्रावरची बंधनं शिथिल करण्यासाठी अनेक अर्थतज्ज्ञ, अभ्यासक, प्राध्यापक यांनी हिरीरीने मोहिमा चालवल्या आहेत. १९८० पासून या प्रकाराला विशेष जोर चढला आहे आणि हेच लोक अमेरिकेच्या सरकारी आणि महत्वाच्या राजनैतिक नियमांची आखणी करत आहेत. हे असे प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ अनेक कंपन्यांच्या सल्लागार मंडळात काम बघताहेत आणि आपसूकच त्या कंपन्यांना फायदे होतील अशा प्रकारचे नियम तयार करण्यासाठी सरकारवर दबाव आणतायत किंवा शक्य असेल तिथे स्वतःच असे नियम बनवतायत. 






अमेरिकन अर्थव्यवस्थेला आपल्या मनाप्रमाणे वाकवणारी आणि तरीही सरकारात दिमाखाने मिरवणारी अशी अनेक नावं उदाहरण म्हणून बघता येतील

मार्टीन फेल्डस्टीन
- मार्टीन फेल्डस्टीन हा हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेला विद्वान अर्थतज्ज्ञ. रेगन सरकारचा प्रमुख  आर्थिक सल्लागार आणि शिथिलीकरणाचा (फायनान्शिअल डीरेग्युलेशन) कट्टर समर्थक ज्याने शिथिलीकरणासाठी विशेष मदत केली. १९८८ ते २००९ पर्यंत तो एआयजी आणि एआयजी फायनान्शिअल प्रोडक्टसच्या संचालक मंडळावर होता. यादरम्यान त्याने करोडो डॉलर्स कमावले.

ग्लेन हबर्ड हा कोलंबिया बिझनेस स्कूलचा डीन आणि बुश सरकारमधला एक प्रमुख आर्थिक सल्लागार होता.

ग्लेन हबर्ड, मार्टीन फेल्डस्टीन आणि यांच्यासारख्या असंख्य वित्तीय अभ्यासक/अर्थतज्ज्ञांनी अर्थव्यवस्थेला हवं तसं वळवून, सरकारला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडून करोडो डॉलर्सची माया गुपचूप गोळा केली आणि अजूनही करत आहेत.

ग्लेन हबर्ड
बेअर स्टर्नचे दोन हेज फंड अधिकारी राल्फ सिऑफि आणि मॅथ्यू टॅनीन या दोघांना आर्थिक घोटाळ्याबद्दल अटक झाली. ग्लेन हबर्डने १ लाख डॉलर्स घेऊन ते दोघे निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र दिलं. अशा रीतीने हबर्डने मेटलाईफच्या संचालक मंडळात राहून अडीच लाख डॉलर्स कमावले.

- लॉरा टायसन (जिने या माहितीपटासाठी मुलाखत द्यायला नकार दिला.), कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची प्राध्यापिका... ही क्लिंटन सरकारमध्ये राष्ट्रीय आर्थिक समितीच्या अध्यक्षपदी होती. सरकारमधून बाहेर पडल्यावर वार्षिक साडेतीन लाख डॉलर्सच्या भरभक्कम पगारावर ती मॉर्गन स्टॅनलीच्या संचालक मंडळात रुजू झाली.

- रुथ सिमन्स ही ब्राउन विद्यापीठाची अध्यक्षा वार्षिक तीन लाख डॉलर्सचं पॅकेज घेऊन गोल्डमन सॅक्सच्या संचालक मंडळात रुजू झाली.

लॅरी समर्स ज्याचा आर्थिक शिथिलीकरणाच्या निर्णयात अतिशय प्रमुख सहभाग होता. तो २००१ साली हार्वर्ड विद्यापीठाचा अध्यक्ष बनला. त्यावेळी त्याने अनेक हेज फंड्सचा सल्लागार म्हणून अक्षरशः लाखो डॉलर्स जोडले.

फ्रेडरिक मिश्किन
फ्रेडरिक मिश्किन : जो अमेरिकन अर्थव्यवस्था बुडायला आली असताना फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर होता आणि योग्य ते उपाय योजण्याऐवजी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पळून आला. या फ्रेडरिक मिश्किनने २००६ साली आईसलँड बद्दल, तिथल्या अर्थव्यवस्था आणि इतर महत्वाच्या बाबींबद्दलच्या एका महत्वाच्या अहवालाचं लिखाण केलं. त्यात त्याने आईसलँडच्या अर्थव्यवस्थेचं तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं. परंतु त्याच्या अहवालातल्या माहितीला, मतांना कुठल्याही आर्थिक अभ्यासाची, शोधाची, पार्श्वभूमी नव्हती. तो अहवाल अतिशय चुकीचा, खोटा आणि म्हणूनच धक्कादायक होता. आईसलँडच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या चांगल्या (पण नितांत खोट्या) माहितीने भरलेला अहवाल पुरवण्यासाठी आईसलँड चेंबर ऑफ कॉमर्सने मिश्किनला सव्वालाख डॉलर्सची घसघशीत रक्कम पुरवली. या माणसाचं वार्षिक उत्पन्न अंदाजे ६ ते १७ मिलियन डॉलर्स आहे !!!

रिचर्ड पोर्टस
रिचर्ड पोर्टस, ब्रिटनमधला अत्यंत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि लंडन बिझनेस स्कुलचा प्राध्यापक यानेही २००७  मध्ये आईसलँड चेंबर ऑफ कॉमर्सच्या विनंतीवरून आईसलँडबद्दल एक अहवाल लिहिला. हा अहवाल देखील आईसलँडच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या अमाप परंतु खोट्या स्तुतीने भरलेला होता.

आर्थिक फुगवटा अत्युच्च शिखरावर असताना २००४ मध्ये ग्लेन हबर्ड आणि विलियम सी डडली (गोल्डमन सॅक्सचा प्रमुख अर्थतज्ज्ञ) या दोघांनी मिळून अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल एक महत्वाचा अहवाल लिहिला. या अहवालात हबर्डने डेरीव्हेटीव्हज आणि सिक्युरिटायझेशन चेनचं प्रचंड कौतुक केलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेतले धोके कमी झाले आणि आर्थिक सक्षमीकरण वाढलं. यामुळे अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि सुरक्षित होऊन महामंदीसदृश संकट येण्याची शक्यता जवळपास निकालात निघाली.

* भाग ५ इथे  वाचा

बँक नावाची शिवी : भाग ३

* भाग १ इथे  वाचा.
* भाग २ इथे  वाचा.



भाग ३ : महासंकट !! (द क्रायसिस)

बेन बर्नान्की २००६ मध्ये फेडरल रिझर्व्ह बोर्डाचा चेअरमन बनला. त्याच वर्षी सबप्राईम कर्जांचं वितरण सर्वाधिक झालं. हा योगायोग खचितच नव्हता !! अनेक अर्थतज्ज्ञ, अभ्यासक इत्यादींकडून धोक्याच्या अनेकानेक सूचना मिळूनही बर्नान्कीने ते रोखण्यासाठी कुठलीही पावलं उचलली नाहीत. उलट त्याच्यामते "हे अतिशय प्रगतीचं लक्षण असून घाबरण्याचं काही कारण नाही कारण अमेरिकेच्या इतिहासात घरांच्या किंमती आत्तापर्यंत कधीही घसरलेल्या नाहीत !!" बर्नान्कीने या माहितीपटासाठी मुलाखत देण्यास अर्थातच नकार दिला !

तब्बल २००४ पासून एफबीआयने वाढत जाणाऱ्या घरांच्या किंमती आणि सहजगत्या उपलब्ध होणारी कर्जं याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कर्जांसाठी दिलेल्या कागदपत्रात गडबड असल्याची भीतीही व्यक्त केली होती. पण त्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं गेलं. २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी, २००६ मध्ये नुरील रुबिनी या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाने, २००७ मध्ये अ‍ॅलन स्लोन या फॉर्च्युन मासिकाच्या ख्यातनाम पत्रकाराने, २००७ मध्ये हेज फंड मॅनेजर बिल अ‍ॅकमन याने आणि २००८ मध्ये चार्ल्स मॉरिस या अभ्यासकाने वेळोवेळी या धोकादायक कर्जांच्या बाबतीत अनेक पेपर्स सदर केले, लेख लिहिले, पुस्तकं लिहीली, किंबहुना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही अमेरिकन सरकारला वेळोवेळी धोक्याच्या सूचना दिल्या. परंतु कसलाही परिणाम झाला नाही.

२००८ च्या दरम्यान कर्जवसुलीसाठी होणाऱ्या घरांच्या लिलावांनी विक्रमी संख्या गाठली !!!! गृहकर्जं आता बँकांना विकली जाईनाशी झाली. सीडीओजच्या व्यवहारांचं मार्केट साफ कोसळलं ज्यामुळे वित्तसंस्थांकडे अब्जावधी डॉलर्सची कर्जं, अन्य सीडीओ आणि प्रत्यक्ष घरं पडून राहिली आणि ती विकत घेण्यासाठी कोणीही ग्राहक मिळेनासा झाला. कारण लोकांकडे पैसेच नव्हते. हा कर्जांचा फुगवटा फुटला तेव्हा सरकार आणि फेडरल रिझर्व्ह त्याला तोंड देण्यासाठी सज्ज नव्हते. कारण या संकटाच्या व्याप्तीची त्यांना तोवर काही कल्पनाच आलेली नव्हती !

२००८ च्या फेब्रुवारी महिन्यातल्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतही अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरी हेन्री पॉलसन याचे उद्गार होते "आर्थिक क्षेत्र मजबूत आहे. भरघोस वृद्धी होते आहे. आणि ज्याअर्थी भरघोस वृद्धी होते आहे त्याअर्थी महामंदी कशी येईल बरं? " आणि विशेष म्हणजे पॉलसनने हे उद्गार काढायच्या आधी चार महिने महामंदी ऑलरेडी सुरु झाली होती !!!!!!

१६ मार्च २००८ ला अवाढव्य वित्तसंस्था 'बेअर स्टर्न' च्या तिजोरीत खडखडाट झाला आणि 'जे पी मॉर्गन चेस' ने केवळ २ डॉलर प्रतिशेअर देऊन तिला विकत घेतलं. अर्थात यासाठी केंद्र सरकारने ३० बिलियन डॉलर्सची मदत दिली होती. त्यावेळीही सरकारने ताबडतोब पुढे होऊन या सगळ्या घोटाळ्यात हस्तक्षेप करून सगळी सुतराम आपल्या हातात घ्यायला हवी होती. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही !!

७ सप्टेंबर २००८ ला सरकारने 'फ्रेडी मॅक' आणि 'फॅनी मे' या दोन एके काळच्या प्रचंड मोठ्या पण आता बुडीत खात्यात चाललेल्या गृहकर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांना ताब्यात घेतलं. तरीही पॉलसनच्या मते त्यात घाबरण्यासारखं काहीही नव्हतं.

दोनच दिवसांनी लीमन ब्रदर्सने ३.२ मिलियन डॉलर्सचा विक्रमी तोटा नोंदवला आणि त्यांचा शेअर गडगडला.

या कंपन्या बुडण्याच्या काही दिवस/महिने आधी यांची गुणांकनं (रेटिंग्ज) काय होती ते पाहू. फार धक्कादायक निकाल आहेत हे.

- बुडण्याच्या फक्त एक महिना आधीच बेअर स्टर्नचं गुणांकन ए२ (एए)होतं थोडक्यात अतिशय उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक असं हे रेटिंग होतं.

- लिमन ब्रदर्स : बुडण्याच्या फक्त काही दिवस आधी ए२.

- एआयजी : बुडण्याच्या फक्त काही दिवस आधी एए

- 'फ्रेडी मॅक' आणि 'फॅनी मे : एएए !!!!!!!!

- सिटीग्रुप, मेरील : एए

आपण या रेटिंग्जचे अर्थ पहिल्या भागात बघितलेच आहेत तरीही पुन्हा एकदा इथे बघू.

एएए : सर्वोत्कृष्ट
एए : उत्तम
ए : चांगलं
बीबीबी : बरं
बीबी : वाईट
बी : धोकादायक

१२ सप्टेंबर २००८ ला लिमन ब्रदर्सच्या तिजोरीत खडखडाट झाला आणि संपूर्ण वित्तक्षेत्र धोक्यात आलं. शेवटच्या क्षणी हेन्री पॉलसन आणि टिमोथी गाईटनर या न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर्सनी लिमन ब्रदर्सला वाचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी सगळ्या प्रमुख बँकांच्या प्रमुखांची बैठक बोलावली.

परंतु त्याच सुमारास मेरील लिंच ही अजून एक महाबलाढ्य वित्तसंस्था/बँक धोक्यात आली होती. १४ सप्टेंबरला बँक ऑफ अमेरिकाने मेरीलला विकत घेतलं. लिमन ब्रदर्सला वाचवण्यासाठी/विकत घेण्यासाठी बारक्लेज बँक ही एकमेव ब्रिटीश बँक तयार होती. परंतु त्या बदल्यात त्यांना अमेरिकन सरकारकडून फायनान्शियल गॅरंटी हवी होती. पॉलसनने त्याला नकार दिला !!!!!!!!!!!!!! थोडक्यात लिमन काय किंवा अमेरिकन सरकार काय यापैकी कोणीही बँकरप्सीपासून वाचण्याची कसलीही काहीही तयारी केलेली नव्हती.

लिमन ब्रदर्सची बँकरप्सी केस सांभाळणारे वकील हार्वे मिलर म्हणतात "फेडरल रिझर्व्हला लिमन ब्रदर्सच्या बँकरप्सीची अंमलबजावणी १४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी करून टाकायची होती. आम्ही त्यांना त्यांच्या निश्चयाचा पुनर्विचार करण्यासंबंधी बऱ्याच वेळा सुचवलं. पण त्यांच्या मते ते काय करताहेत आणि त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या मते आर्थिक स्थिती पूर्ववत आणण्यासाठी, शेअर बाजारात स्थैर्य आणण्यासाठी हे करणं अत्यावश्यकच आहे !!!!"

पॉलसन आणि बर्नान्कीने अन्य देशातल्या बँकरप्सी कायद्यांचा, नियमांचा आणि परिणामांचा अजिबात अभ्यास केलेला नव्हता हे तर उघड आहे. बँकरप्सीच्या ब्रिटीश कायद्यान्वये (लिमन ब्रदर्स ही ब्रिटीश कंपनी असल्याने) लिमन ब्रदर्सचं लंडनमधलं ऑफिस ताबडतोब बंद करावं लागलं. जगभरातले लिमनशी संबंधित सगळे व्यवहार क्षणार्धात ठप्प झाले. त्याच आठवड्यात एआयजी आपोआपच क्रेडीट डिफॉल्ट स्वापवाल्या ग्राहकांना १३ बिलियन डॉलर्स देणं लागले. परंतु त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता. १७ सप्टेंबरला एआयजीला सरकारने विकत घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी पॉलसन आणि बर्नान्कीने केंद्र सरकारकडे बँकांना वाचवण्यासाठी ७०० बिलियन डॉलर्स देण्यासाठी हात पसरले.

क्रेडीट डिफॉल्ट स्वापवरची बंधनं शिथिल करण्यासाठी आणि वित्तसंस्थांचं लिव्हरेज लिमिट (बँकेचा स्वतःचा पैसा आणि कर्जाऊ पैसा यांचं गुणोत्तर) वाढवण्यासाठी आग्रही असणारा थोडक्यात ज्या दोन प्रमुख गोष्टींमुळे एवढं मोठं महाभारत घडलं त्यासाठीचा जवाबदार माणूस पॉलसनच होता. अर्थातच हेन्री पॉलसनने या माहितीपटासाठी मुलाखत देण्यास नकार दिला.


पॉलसन, बर्नान्की आणि गाईटनर

एआयजी बुडाल्यावर (म्हणजे प्रचंड पैसे ओतून सरकारने वाचवल्यावर) त्यांच्या क्रेडीट डिफॉल्ट स्वापचे प्रमुख ग्राहक असलेल्या गोल्डमन सॅक्सला दुसऱ्याच दिवशी ६१ बिलियन डॉलर्स दिले गेले. स्वतः वाचण्यासाठी सरकारकडून ७०० बिलियन घेणाऱ्या बँकेने दुसऱ्याने बुडू नये म्हणून आपल्याला भीक म्हणून मिळालेल्या ७०० बिलियन मधले ६१ बिलियन काढून दुसर्याला देणं हा शुद्ध मुर्खपणा होता. पॉलसन, बर्नान्की आणि गायटनरच्या या धक्कादायक निर्णयामुळे अमेरिकन करदात्यांच्या १५० बिलियन डॉलर्स एवढ्या प्रचंड कराच्या पैशाचं नुकसान झालं.

यानंतर जगभरात एक भीतीचं वातावरण पसरलं, महामंदी येणार, आली याविषयी लोकांची खात्री झाली. अमेरिका आणि युरोपमधली बेकारी १०% झाली. महामंदीने बघता बघता संपूर्ण जगाला विळखा घातला. डिसेंबर २००८ च्या दरम्यान प्रचंड विशाल अशा जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीभोवती आणि त्याच बरोबर क्रायसलर या कंपनीभोवती बँकरप्सीचं वादळ घोंघावू लागलं. अमेरिकन लोकांची क्रयशक्ती, खर्च करण्याची क्षमता कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम चीनी बाजारावर झाला. चीनमधल्या जवळपास एक कोटी नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.

सिंगापूरची एक कंपनी वार्षिक वीस टक्क्यांच्या भरधाव वेगाने मोठी होत होती आणि अचानक त्यांच्या वाढीचा वेग वजा नऊ टक्क्यांवर आला. निर्यात तीस टक्क्यांनी कमी झाली.

अशा प्रकारच्या कुठल्याही वाईट घटनेत सगळ्यात जास्त भरडला जातो तो सर्वात गरीब माणूस हा नियम आहे. इथेही तेच झालं. रोजंदारीवर काम करणारे, हातावर पोट असणारे लोक अक्षरशः रस्त्यावर आले. घरदार सोडून जाऊन रस्त्यावर अक्षरशः तंबू ठोकून राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.

भाग ४ इथे  वाचा.

बँक नावाची शिवी : भाग २

* भाग १ इथे  वाचा.

भाग २ : कर्जाचा फुगवटा (द बबल)

अचानक अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाचा (लक्षात घ्या, प्रत्यक्ष डॉलर्सचा नव्हे !!! ) नुसता ओघ वाहू लागला. कोणालाही कितीही डॉलर्सचा कर्ज मिळणं सहज शक्य होतं. त्यामुळे बघता बघता घराच्या किंमती अक्षरशः आकाशाला भिडल्या आणि इतिहासातल्या सर्वात मोठ्या फायनान्शियल बबलला जन्म दिला गेला. याधीचा गृहकर्जाचा/घराच्या किमतीचा फुगा/बुडबुडा ८० च्या दशकाच्या दरम्यान आला होता. पण त्यावेळी जेमतेम १०० टक्क्यांनी चढलेल्या घरांच्या किंमती या आताच्या वेळच्या तुलनेत जवळपास नगण्य होत्या.

१९९६ पासून ते २००६ पर्यंत घरांच्या किंमती २००% हून अधिक वाढल्या. सबप्राईम कर्जांची रक्कम फक्त दहा वर्षांत प्रतिवर्षी ३० बिलियन डॉलर्स वरून थेट ६०० बिलियन डॉलर्स पर्यंत पोचली. मेरील लिंच, बेअर स्टर्न, गोल्डमन सॅक्स हे सगळे सगळे यात सामील होते आणि काय चाललंय हे या सगळ्यांना चांगलंच ठाउक होतं.

कंट्रीवाईड ही वित्तसंस्था सबप्राईम कर्जं देण्यात सगळ्यांत आघाडीवर होती. कंट्रीवाईडने एकट्याने किमान ९७ बिलियन डॉलर्सची कर्जं वाटली आणि त्यातून त्यांना ११ बिलीयन डॉलर्सचा थेट नफा झाला. वॉल स्ट्रीटवरच्या अधिकाऱ्यांना मिळणारे बोनसचे आकडे गगनाला भिडले.

लीमन ब्रदर्स हे या सबप्राईम कर्जांमध्ये असलेलं अजून एक प्रमुख नाव. लीमन ब्रदर्सचा मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड फुल्ड याने ४८५ मिलियन डॉलर्सचा बोनस कमावला.

रिचर्ड फुल्ड
अशा अनेकांनी अनेक मिलियन्सचे बोनस कमावले. वित्त कंपन्यांनी करोडो डॉलर्सचा नफा कमावला. पण तो खरा नफा नव्हता. प्रत्यक्षातली कमाई नव्हती. ते आभासी धन होतं जे यंत्रणेचा गैरवापर करून निर्माण केलं गेलं होतं आणि मग प्रॉफीट बुकिंग केलं गेलं होतं. जेमतेम तीन वर्षांत त्यातला खोटेपणा सिद्ध झाला आणि आभासी पैसे अक्षरशः गायब झाले ज्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात हाहाःकार मजला. जगभरात राबवली गेलेली ती एक पोन्झी स्कीम होती.

सगळ्यांचेच हात बांधले गेलेले असल्याने दुर्दैवाने सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड आणि तत्सम नियंत्रक संस्थांनी बँक्स आणि अन्य वित्तीय संस्थांवर कुठलाही बडगा उभारला नाही की त्यांची साधी चौकशीही केली नाही.

या फुगवट्याच्या दरम्यान वित्तसंस्था अधिक अधिक कर्ज घेत होत्या आणि अधिक अधिक सिडीओज तयार करत होत्या. बँकेचे स्वतःचे पैसे आणि कर्जाऊ घेतलेली रक्कम यांच्यातल्या गुणोत्तराला लीव्हरेज असं म्हणतात. बँका जेवढ्या अधिक कर्जं घेतील तितकं जास्त त्यांचं लिव्हरेज असतं.

हेन्री पॉल्सन
२००४ मध्ये गोल्डमनचा प्रमुख कार्यकारी अधिकारी हेन्री पॉल्सन याने सिक्युरिटीज अंड एक्सचेंज कमिशन वर दबाव आणून या लिव्हरेजवरची बंधनं शिथिल करायला भाग पाडलं. अधिक लिव्हरेज मिळाल्याने बँकांना सहजतेने अधिक कर्जं घेणं सोपं जायला लागलं. हे कर्जं घेण्याचं प्रमाण बघता बघता इतकं वाढत गेलं की काही बॅंकांचं लिव्हरेज गुणोत्तर ३३:१ झालं. थोडक्यात बँकेकडे स्वतःचा फक्त १ रुपया असताना त्यांना ३३ रुपयांचं कर्ज मिळालं.


पण हे इतक्यावरच थांबलं नव्हतं. अजून एक टाईमबॉम्ब स्फोट होण्याची वाट बघत होता. एआयजी ही जगातली सर्वात मोठी विमा कंपनी 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' नावाचा डेरीव्हेटीव्हचा अजून एक प्रकार खुप मोठ्या प्रमाणात विकत होती. ज्यांच्याकडे सिडीओज आहेत अशा ग्राहकांसाठी (वित्तसंस्था, बँक्स वगैरे) 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' हे एखाद्या विम्याप्रमाणे काम करतं. जर सिडीओजमध्ये पुढे मागे काही तोटा झाला तर तो तोटा एआयजी च्या 'क्रेडीट डिफॉल्ट स्वाप' या योजनेच्या माध्यमातून ग्राहकाला भरून मिळेल  अशी योजना होती. थोडक्यात तोटा झाला तरी त्यासाठी ग्राहकाला काही चिंता नव्हती. एआयजी सगळ्याची काळजी घेणार होती आणि त्या बदल्यात एआयजी कडून क्रेडीट डिफॉल्ट स्वाप योजना विकत घेतलेल्या ग्राहकाला एआयजीला त्रैमासिक हफ्ता भरावा लागत असे.

परंतु क्रेडीट डिफॉल्ट स्वाप मध्ये अजून एक खोच होती. ती म्हणजे तुमच्याकडे नसलेल्या सिडीओजचाही विमा तुम्ही उतरवू शकत होतात. (हे अत्यंत चुकीचं आणि धोकादायक असूनही एआयजी याचा अवलंब करत होतं कारण त्यातून त्यांना प्रचंडउत्पन्न मिळत होतं.)

एक सोपं उदाहरणं बघू. आपल्या नेहमीच्या विमा पद्धतीनुसार आपण फक्त आपल्या मालकीच्या घरचाच विमा उतरवू शकतो. परंतु क्रेडीट डिफॉल्ट स्वापमुळे फक्त आपणच नाही तर त्या घराची मालकी नसलेले इतर कोणीही त्या घराचा विमा उतरवू शकत होते. थोडक्यात भविष्यात जर घराला आग लागली तर विमा कंपनीला तितक्या पटीने लोकांना पैसे द्यावे लागणार होते. (आणि अर्थात ती आग लागलीच. !!!) आणि क्रेडीट डिफॉल्ट स्वापवर कुठल्याही कायद्याचं बंधन नसल्याने त्या घराच्या विम्याच्या भविष्यातल्या परताव्यासाठी एआयजीला कुठल्याही प्रकारची रक्कम बाजूला काढून ठेवावी लागत नव्हती !!! किंबहुना एआयजीच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी नवीन नवीन क्रेडीट डिफॉल्ट स्वापची कंत्राटं मिळवल्या मिळवल्या गडगंज बोनस मिळत होते !! एआयजीच्या लंडन शाखेने फुगवट्याच्या काळात ५०० बिलियन डॉलर्स किंमतीच्या क्रेडीट डिफॉल्ट स्वापची विक्री केली.

जोसेफ कसॅनो
जोसेफ कसॅनो या एआयजी च्या प्रमुखाने ३१५ मिलियन डॉलर्सच्या घसघशीत बोनसची कमाई केली. या क्रेडीट डिफॉल्ट स्वापच्या चुकीच्या पद्धतीच्या निषेधार्थ एआयजीच्या ऑडीटर्सनी कसॅनोला वारंवार सावधानतेचे इशारे दिले. परंतु तरीही कंपनीच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही हे पाहून त्याच्या निषेधार्थ जोसेफ डेनिस या एका ऑडीटरने राजीनामाही दिला. पण तरीही सारं तसंच चालू राहिलं !!! करोडोंचे बोनस, महागड्या गाड्या, आलीशान महालांसारखी चार चार घरं !! ही हाव न संपणारी होती.


'MIT Laboratory for Financial Engineering' चे संचालक असलेल्या अँड्रयु लो यांनी एक विलक्षण निरीक्षण नोंदवलं आहे. ते म्हणतात की शास्त्रज्ञांनी एक अनोख्या प्रयोगादरम्यान काही लोकांना एकत्र करून त्यांना एमआरआय मशीनमध्ये ठेवलं आणि एक खेळ खेळायला सांगितला. जो जिंकेल त्याला काही डॉलर्स बक्षीस म्हणून मिळणार असंही त्यांना सांगितलं होतं. प्रयोगाअंतीचं त्यांचं निरीक्षण धक्कादायक होतं. पैसा जिंकणं/कमावणं हा विषय निघाल्यावर मेंदूच्या काही विशिष्ट पेशी कार्यरत होतात. त्या पेशी आणि कोकेनच्या सेवनानंतर कार्यरत होणाऱ्या पेशी या सारख्याच असतात !!!!!!!!!!! थोडक्यात अधिकाधिक पैसा कमावणं हे एखाद्या व्यसनाप्रमाणेच आहे ज्यात आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक धन मिळाल्याशिवाय चैन पडत नाही !

कमावलेले पैसे घरं, बंगले, गाड्या इत्यादींवर उधळण्यातच मर्यादित नव्हते. त्यातला अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे अक्षरशः करोडो डॉलर्स वेश्यांवर उडवले गेले!!! स्ट्रीप क्लब्जवर (ज्यांना प्रत्यक्षात जंटलमन्स क्लब म्हणतात) अक्षरशः लाखो-करोडो डॉलर्सची उधळण झाली !!

क्रिस्टीन डेव्हीस
क्रिस्टीन डेव्हीस नावाची उच्चभ्रू वर्तुळात वावरणारी स्त्री तिच्या अतिशय उंची आणि महागड्या घरातून वेश्याव्यासाय चालवत असे...... !! तिचं घर न्यूयॉर्क शेअरबाजारापासून काही पावलांवरच होतं !!!!!!!!!!!!!!

या स्त्रीच्या मुलाखतीचाही समावेश या माहितीपटात आहे. तिच्या म्हणण्यानुसार जवळपास प्रत्येक वित्तसंस्थांमधले उच्चाधिकारी यात गुंतलेले होते. मार्केट रिसर्च, कॉम्प्युटर रिपेअर अशा कुठल्याही कारणांनी ही भलीमोठी बिलं दाखवली जात आणि ती सहजपणे पासही केली जात.


गृह्कर्जं घेणाऱ्या लोकांनी घराच्या किंमतीच्या जवळपास ९९.३% किंमतीची कर्जं घेतली होती. थोडक्यात त्यांच्याकडे ७० पैसे असताना १०० रुपयांचं घर त्यांनी विकत घेतलं होतं. आणि अशा प्रकारच्या कर्जांनाही रेटिंग एजन्सीज एएए अर्थात सर्वाधिक सुरक्षित किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर 'सरकारी बॉण्ड्स एवढी सुरक्षित गुंतवणूक' असं गुणांकन देत होत्या.

गोल्डमन सॅक्सने २००६ च्या पहिल्या सहामाहीत या असल्या कचऱ्याचीही लायकी नसलेल्या सिडीओजची ३.१ बिलियन डॉलर्सची विक्री केली. गोल्डमन सॅक्सचा प्रमुख कार्यकारी अधिकारी हेन्री पॉल्सन हा तेव्हाचा वॉल स्ट्रीटवरचा सर्वाधिक पगार घेणारा सीईओ होता. २००६ च्या मे महिन्यात जॉर्ज बुश यांनी या पॉल्सनची ट्रेजरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक केली !! करोडो डॉलर्सचा पगार सोडून सरकारी नेमणुकीत कोणीही स्वखुशीने का जाईल हा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पण त्यामागचं कारण ऐकल्यावर आपण चक्रावून जातो.

ट्रेजरी सेक्रेटरी होण्यापूर्वी पॉल्सनने त्याच्याकडे असलेले ४८५ मिलियन डॉलर्स किंमतीचे शेअर विकून टाकले. पहिल्या बुशने संमत केलेल्या एका कायद्यान्वये पॉल्सनला या एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीवर एका पैशाचाही कर भरावा लागला नाही. थोडक्यात कराचे ५० मिलियन डॉलर्सही त्याने बुडवले.

या असल्या काहीही किंमत आणि अर्थ नसलेल्या बॉण्ड्समध्ये दरमहा ८०,००० निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृतीवेतनाची काळजी घेणाऱ्या मिसिसिपी राज्याच्या निवृत्तीवेतन विभागाने पैसे गुंतवले आणि व्हायचं तेच झालं.. त्यांना कित्येक मिलियन डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आणि त्यांनी गोल्डमन सॅक्सवर केसही केली आहे.

आपण संबंधितांच्या उत्पन्नांच्या आकड्यांची एक ढोबळ तुलना बघू.

मिसिसिपीच्या निवृत्त कर्मचाऱ्याचं सरासरी वार्षिक उत्पन्न : १८,७५० डॉलर्स

गोल्डमनच्या कर्मचाऱ्याचं सरासरी वार्षिक उत्पन्न : ६,००,००० डॉलर्स

पॉल्सनचं २००५ वर्षातलं उत्पन्न : ३,१०,००,००० डॉलर्स !!!!!!!!!!!

गोल्डमन सॅक्स एवढ्यावरच थांबले नाहीत. २००६ च्या अखेरीस त्यांनी अजून एक धोकादायक पाऊल पुढे टाकलं. जे कःपदार्थ सिडीओज ते विकत होते त्यांच्या विरुद्ध (म्हणजे ते सिडीओज बुडतील या अर्थाने... थोडक्यात ते सिडीओज बुडणार आहेत याची गोल्डमनला खात्री होती.) त्यांनी बेटिंग करायला सुरुवात केली आणि त्याचवेळी ग्राहकांना मात्र ते अतिशय सुरक्षित सिडीओज असल्याचं सांगून त्याची अजून अजून विक्री चालू ठेवली. स्वतःच विकत असलेले सिडीओज बुडतील यावर गोल्डमन ज्याअर्थी बेटिंग करत होते त्याअर्थी ते सिडीओज नक्की बुडणार आहेत याची गोल्डमनला पूर्णतः खात्री होती.

एआयजी कडून क्रेडीट डिफॉल्ट स्वाप विकत घेऊन स्वतःच्या मालकीच्या नसलेल्या सिडीओज च्या विरुद्धही गोल्डमनने बेटिंग केलं आणि जेव्हा ते सिडीओज बुडाले तेव्हा त्याबद्दलही एआयजीकडून पैसे कमावले. गोल्डमनने एआयजीकडून किमान २२ बिलियन डॉलर्स किंमतीचे सिडीओज विकत घेतले. कालांतराने गोल्डमनला स्वतःलाच लक्षात आलं की इतक्या अति किंमतीचे सिडीओज घेणं अतिशय धोकादायक आहे. धोकादायक म्हणजे उलट अर्थी. कारण यामुळे स्वतः एआयजीच बुडण्याची शक्यता अधिक आहे. आणि हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःच एआयजीच्या संभाव्य घसरणीपासून स्वतःला वाचवण्यसाठी १५० मिलियन डॉलर्सचा विमा उतरवला !!!!!!!!!!!!!

२००७ मध्ये एआयजीने अजून एक पाऊल पुढे टाकून प्रत्येक कंपनीसाठी विशिष्ट पद्धतीने बनवलेले (कस्टमाईझ्ड) सिडीओज विकायला सुरुवात केली जेणेकरून जेवढा अधिक तोटा ग्राहकांना झाला तेवढाच अधिक फायदा गोल्डमनला मिळाला !!! गोल्डमनचा प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि अन्य उच्चाधिकारी यांनी या माहितीपटासाठी मुलाखती देण्यास नकार दिला आहे.

या सगळ्या गैरकारभारात वित्तसंस्थांएवढाच मुडीज, स्टँडर्ड अँड पुअर आणि फिच या सर्वात मोठ्या रेटिंग एजन्सीजचाही बरोबरीचा सहभाग होता. अत्यंत धोकादायक गुंतवणुकीला एएए सारखं सर्वोच्च गुणांकन देऊन त्यांनी त्याच्या बदल्यात करोडो डॉलर्स कमावले ! मुडीज या सर्वात मोठ्या रेटिंग एजन्सीचा २००७ मधला नफा त्यांच्या २००० सालच्या नफ्याच्या चौपट झाला.. ४०० % !!!!!!!!!!!!!! रेटिंग एजन्सीजना हे थांबवणं, अनावश्यक एएए रेटिंग न देणं आणि थोडक्यात हा सगळा गैरकारभार थांबवणं सहज शक्य होतं. किंबहुना तेच तर त्यांचं काम होतं ! वर्षागणिक करोडो करोडो करोडो डॉलर्सची अतिशय धोकादायक असलेली गुंतवणूक प्रत्यक्षात मात्र  'गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित' गुणांकन मिळवत गेली. कालांतराने सगळा डोलारा कोसळल्यावर चौकशी समितीसमोर आपली बाजू मांडताना या रेटिंग एजन्सीजच्या जवळपास प्रत्येक उच्चाधिकाऱ्याने ही रेटिंग/गुणांकनं म्हणजे सल्ला नसून निव्वळ मत असल्याचं ठासून सांगितलं. दुर्दैवाने यातल्या कुठल्याही अधिकाऱ्याने या माहितीपटाच्या निर्मात्यांकडे आपलं 'मत' मांडण्याचं धारिष्ट्य दाखवलं नाही. एकजात सर्वांनी या माहितीपटातल्या मुलाखतीसाठी नकार दिले.

भाग ३ इथे  वाचा.

बँक नावाची शिवी : भाग १

या वर्षीच्या ऑस्कर विजेत्यांच्या यादीतले सगळे चित्रपट बघायचं ठरवलं होतं पण दुर्दैवाने फक्त 'इन्सेप्शन' आणि 'सोशल नेटवर्क'च बघून झाले. दरम्यान या वर्षीचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळवणारा 'इनसाईड जॉब ' बघण्याचा सुवर्णयोग आला आणि बाकीचे चित्रपट बघण्याची हुरहूरच शमून गेली. एकदम विषण्णता आली.

मला खात्री आहे की हा माहितीपट बघितल्यानंतर (कदाचित हा लेख वाचल्यावरही... कारण माहितीपटात दाखवलेलं तंतोतंत मी या लेखात लिहिलं आहे. माझ्या बुद्धीचं, मनाचं, पदरचं काहीही नाही.) तुम्ही आपल्या बँकेत ठेवलेल्या पैश्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कमालीचे साशंक व्हाल. कदाचित बँकेतले पैसे काढून आणून पूर्वीच्या काळासारखे आपल्या घराच्या तिजोरीत ठेवण्याचाही मोह तुम्हाला होईल. किंबहुना बँक हा शब्द शिवीसारखा वापरायची इच्छाही होईल. अर्थात कालंतराने आणि दुर्दैवाने तुमच्या लक्षात येईल की कितीही इच्छा नसली तरीही आपण या यंत्रणेचा या सिस्टमचा एक अविभाज्य आणि तितकाच दुर्दैवी घटक आहोत आणि आपण कोणाचंही काहीही वाकडं करू शकत नाही.

अजून एक गोष्ट म्हणजे २००८ साली आलेली महामंदी ही त्या साली झालेल्या गैरकृत्यांमुळे आली असा आपला अपसमज असतो. पण ही महामंदी आली ती वाढत्या हव्यासापोटी घडलेल्या गुन्ह्यांमुळे, वाकवलेल्या नियम आणि कायद्यांमुळे, शोधलेल्या पळवाटांमुळे आणि ज्यांनी गैरव्यवहार रोखायचे त्यांनीच गैरव्यवहार करणार्‍यांशी वेळोवेळी केलेल्या हातमिळवणीमुळे. तर हे सगळे प्रकार फार पूर्वीपासून म्हणजे जवळपास ८० च्या साशाकापासून चालू आहेत. काहीवेळा ती अतिरिक्त हाव, पैशाच्या हव्यासाचा अतिरेक सामौर्ण समाजाला रसातळाला नेऊ शकतो. नेतोही.. २००१ आणि तत्सम मंदीच्या वेळी आपण ते पाहिलंही आहे. हा चित्रपट २००८ साली आलेल्या महामंदीची पूर्वतयारी किती आधीपासून अनावधानाने का होईना चालू होती हे सांगतो. अनावधानाने या साठी म्हणतोय की हे एवढ्या भयंकर प्रमाणात उसळेल हे काही ठराविक उच्चपदस्थ सोडता कोणालाच माहित नव्हतं.  अर्थात अनावधानाने असं काही नव्हतंच.. लुबाडणूकीचा परमप्रिय अजेंडाच त्याला कारणीभूत होता आणि आहे.

चार्लस फर्ग्युसन
हा संपूर्ण माहितीपट बघताना प्रचंड कौतुक वाटत राहतं ते या माहितीपटाचा लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक असलेल्या चार्लस् फर्ग्युसन या माणसाचं. या माणसाने विविध बँका, वित्तसंस्था, सरकारी अधिकारी, वित्तीय अभ्यासक यांच्याशी बेधडकपणे केलेल्या चर्चा, कोड्यात टाकणारे प्रश्न विचारून त्यांना निरुत्तर केल्याचे प्रसंग आणि प्रसंगी अपशब्द झेलून का होईना उघडकीस आणलेलं मोठं सत्य या सार्‍या सार्‍याबद्दल त्याची पाठ थोपटावी तेवढी कमीच आहे !!

हा चित्रपट पाच उपविभागात विभागलेला आहे आणि म्हणूनच मीही तो पाच पोस्ट्समधे विभागून (एकाच वेळी) पोस्ट करतो आहे. पुन्हा एकदा सांगतो यात माझ्या पदरचं काहीही नाही. माहितीपटात दाखवलेली भयानक वस्तुस्थिती अधिकाधिक लोकांसमोर यावी असं वाटल्याने ते मी इथे जसंच्या तसं लिहितोय. अर्थात सगळ्या गोष्टी कव्हर करणं अशक्यच आहे पण तरीही मी त्यातल्या त्यात महत्वाचे मुद्दे इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

अजून एक सूचना म्हणजे लेखात अनेक इंग्रजी शब्द आले आहेत. पण बर्‍याचशा तांत्रिक शब्दांसाठी चपखल मराठी शब्द माहित नसल्याने किंवा आयत्या वेळी न सुचल्याने आणि उगाच काहीतरी चुकीचं मराठी भाषांतर होऊन मूळ भावार्थ बदलले जाऊ नयेत यासाठी मी मूळ इंग्रजी शब्द जसेच्या तसे ठेवले आहेत.

माहितीपट सुरु होतो तो आईसलँडच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याच्या चित्रीकरणाच्या आणि जोडीला मेट डेमनच्या गंभीर आवाजातल्या विवेचनाच्या पार्श्वभूमीवर.

सगळ्यांना माहित असेलच पण तरीही आईसलँडविषयी थोडंसं. २००८ च्या महामंदीत ज्याप्रमाणे अनेक कंपन्या बुडीतखात्यात गेल्या, उध्वस्त झाल्या, बँकरप्ट झाल्या त्याप्रमाणे आईसलँड हा संपूर्ण देश बँकरप्ट झाला !!!!!!

अतिशय सक्षम, अत्याधुनिक आणि बेकारी जवळपास नगण्य असणार्‍या या देशाच्या आर्थिक अधःपतनाची सुरुवात २००० सालापासून राबवण्यात आलेल्या अत्यंत चुकीच्या सरकारी धोरणांमुळे झाली. सरकारने आईसलँडच्या तीन मोठ्या बँकाचं खाजगीकरण केलं आणि पाचच वर्षात या तीन छोट्या बँका ज्यांनी आयुष्यात कधीही आईसलँडच्या बाहेरच्या जगाशी व्यवहार केलेले नाहीत त्यांनी १.२० बिलियन डॉलर्सचं कर्ज घेतलं जे आईसलँडच्या अर्थव्यवस्थेच्या किमान दहापट होतं !!!

जिल्फी झोएगा (Gylfi Zoega) हा  आइसलँड विद्यापीठाचा प्रोफेसर म्हणतो "त्या काळी वर्तमानपत्रात नेहमी बातम्या यायच्या की आईसलँडमधल्या या कोट्याधीशाने फ्रान्स/इंग्लंड/फिनलंड मधली अमुक अमुक कंपनी विकत घेतली. परंतु त्या वरवर दिसणार्‍या आकर्षक बातमीतली खरी गोम कोणालाच कळायची नाही.खरं तर त्या कोट्याधीशाने 'अब्जावधी रुपयांचं कर्ज घेऊन' ही कंपनी विकत घेतलेली असायची. पण हे प्रमुख सत्य दुर्लक्षिलं जायचं".. यापुढे जाऊन तो अनधिकृत असलेल्या परंतु सरकार आणि बँकांच्या हातमिळवणीमुळेच घडू शकलेल्या अनेक छोट्या छोट्या घटना आपल्या दृष्टीक्षेपास आणतो सांगतो आणि नंतर एक अप्रतिम प्रश्न विचारतो. "हे असंच तर जगभरात झालं ना??.. न्यूयॉर्कमध्ये काय वेगळं झालं??!!!"

आणि इथे सुरु होतो आपल्या माहितीपटाचा पहिला भाग.


भाग १ : हे सारं कसं घडलं?

चार्लस कीटिंग
अनेक कायदे बदलले गेले, वित्तक्षेत्राला अनेक नियमातून सुट मिळू लागली. याची सुरुवात सर्वप्रथम रोनाल्ड रेगन यांच्या कारकीर्दीत १९८१ साली झाली. त्यांनी 'डोनाल्ड रेगन' या मेरील लिंचच्या प्रमुख कार्यकारी अधिकार्‍याला (सी ई ओ) अर्थमंत्री म्हणून नेमलं. रेगन यांचं सरकार बँक्स आणि वित्तक्षेत्रातल्या लॉबीईस्टसच्या पाठिंब्याने आलं होतं. आणि तेव्हापासून वित्तक्षेत्रातल्या ३० वर्षांच्या अधःपतनास सुरुवात झाली. १९८२ मध्ये रेगन सरकारने बंकांवारचे आणेल निर्बंध हटवले गेले ज्यामुळे बँकांना लोकांच्या पैशांची धोकादायक स्कीम्समध्ये गुंतवणूक करण्याची मुभा मिळाली. दशकभराच्या अवधीतच शेकडो बँका बुडाल्या. १२४ बिलियन डॉलर्सचा चुराडा झाला.  अनेक बँक उच्चाधिकारी कैदेत गेले. सर्वात गाजलं ते प्रकरण म्हणजे चार्ल्स कीटिंग.


अ‍ॅलन ग्रीनस्पॅन
१९८५ मध्ये केंद्र सरकारने त्याची चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा त्याने अ‍ॅलन ग्रीनस्पॅन नावाच्या एका अर्थतज्ज्ञाची नेमणूक केली. ग्रीनस्पॅनने चौकशी समिती आणि सरकारला लिहिलेल्या  पत्रात कीटिंगच्या गुंतवणूकधोरणांचं वारेमाप कौतुक केलं. त्याच्या मते कीटिंगने त्याच्या गुंतवणूकदारांचे पैसे अन्य (धोकादायक) योजनांमध्ये गुंतवण्या काहीच वावगं नव्हतं !! नंतर कीटिंगने ग्रीनस्पॅनला ४०,००० डॉलर्स दिल्याचं उघडकीस आलं !!! त्यानंतर चार्ल्स कीटिंग तुरुंगात रवानगी झाली. आणि ग्रीनस्पॅन............. !!! ग्रीनस्पॅनची रेगन यांनी अमेरिकेच्या सेंट्रल बँकच्या चेअरमनपदी नियुक्ती केली !!  आणि धक्कादायक म्हणजे बिल क्लिंटन आणि जॉर्ज डब्ल्यु बुश यांच्या कारकीर्दीत ग्रीनस्पॅनची पुनर्नियुक्ती झाली !!! क्लिंटनच्या कारकीर्दीतही ग्रीनस्पॅनद्वारा आर्थिक क्षेत्रावरचे निर्बंध हटवणं चालूच राहिलं. त्याच्या सोबतीला रॉबर्ट रुबीन आणि लॅरी समर्स (हारवर्ड इकोनॉमिक स्कूलचा प्राध्यापक) हे ट्रेजरी सेक्रेटरी म्हणून होते. रॉबर्ट रुबीन हा माजी गोल्डमन सॅक्सचा माजी मुख्य कार्यकारी (सी ई ओ) अधिकारी होता ही इथे विशेष लक्ष देण्याची गोष्ट आहे !!

लॅरी समर्स
१९९० च्या सुमारास आर्थिक क्षेत्र मोठ मोठ्या निवडक कंपन्यांमध्ये विभागलं गेलं. या कंपन्या एवढ्या मोठ्या होत्या की त्यांचं बुडणं किंवा त्यांचं काही विपरीत होणं हे संपूर्ण यंत्रणेला धोका पोचवू शकणारं होतं ! आणि क्लिंटनच्या कारकीर्दीतल्या धोरणांनी त्या विशाल असलेल्या कंपन्यांना अधिकच अवाढव्य होण्यास हातभार लावला. १९९८ मध्ये सिटीकॉर्प आणि ट्रॅव्हलर्स ग्रुप या दोन विशाल कंपन्यांचं एकत्रीकरण होऊन त्याने सिटीग्रुपला जन्म दिला. सिटीग्रुप ही आर्थिक सेवा क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी ठरली. या एकत्रीकरणामुळे 'ग्लास-स्टिगल कायद्या 'चा भंग झाला होता. हा कायदा जागतिक महामंदीनंतर तयार करण्यात आला होता. या कायद्यान्वये बँकांना गुंतवणूकदारांचे पैसे धोकादायक योजनांमध्ये गुंतवण्यास बंदी होती. खरंतर सिटीने ट्रॅव्हलर्स ग्रुपला ताब्यात घेणं बेकायदेशीर होतं. पण ग्रीनस्पॅनने त्यावेळी शक्य असूनही आणि अधिकार असूनही त्यात काहीही हस्तक्षेप केला नाही. केंद्र सरकारने सिटीग्रुपला एक वर्षाचा कालावधी सुट म्हणून दिला आणि त्या कालावधीत त्यांच्यावरची बंधनं हटवली आणि एक नवीन कायदा संमत केला. त्या एका वर्षात (१९९९ मध्ये) समर्स आणि रुबीन यांच्या दबावामुळे कॉंग्रेसने 'ग्रॅम-लिच-बिली' विधेयक  संमत केलं (ज्याला सिटीग्रुप रिलीफ अ‍ॅक्ट असंही म्हणतात.). 'ग्रॅम-लिच-बिली' च्या विधेयकामुळे 'ग्लास-स्टिगल' कायद्याद्वारे आलेली बंधनं दूर झाली आणि भविष्यकाळातल्या असंख्य मर्जर्सचा मार्ग मोकळा झाला !!  कालांतराने रॉबर्ट रुबीनने सिटीग्रुपचा व्हाईस चेअरमन या नात्याने  १२६ मिलियन डॉलर्स कमावले !! त्याने या डॉक्युमेंटरीसाठी मुलाखत द्यायला स्पष्ट नकार दिला !

(१ मिलियन = दहा लाख, १ बिलियन = १०० कोटी. मला कल्पना आहे हे सगळ्यांना माहिती आहे पण लेखात या एककांचा उल्लेख वारंवार येणार आहे म्हणून सहज हाताशी अर्थ असावा म्हणून सांगितलं.)

पुढचा घोटाळा नव्वदीच्या अखेरीस झाला. इन्व्हेस्टमेंट बँक्सनी इंटरनेट स्टॉक्सच्या मोठेपणाविषयी चुकीचे समज पसरवण्यास सुरुवात केली. त्यामुळे २००१ मध्ये शेअरबाजारात ५ ट्रिलियन डॉलर्सची जबरदस्त मोठी पडझड झाली. महामंदीनंतर स्थापन करण्यात आलेल्या आणि आर्थिक क्षेत्रातल्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यास बांधील असलेल्या 'सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन' या सरकारी संस्थेने या गैरप्रकाराला आळा घालण्याच्या दृष्टीने कुठलीही पावलं उचलली नाहीत की त्यात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. न्यूयॉर्क अ‍ॅटर्नी जनरल एलियट स्पिट्झर्स यांच्या चौकशी समितीने हे उघडकीस आणलं की  इन्व्हेस्टमेंट बँकांनी इंटरनेट कंपन्यांविषयी चुकीचे कॉल्स देऊन, चुकीचे रिकामेंडेशन्स देऊन त्यांच्या किंमती चढवून ठेवल्या होत्या. स्टॉक अ‍ॅनालीस्टसना फक्त नवीन नवीन ग्राहक आणण्यासाठी पैसे दिले जात होते. परंतु त्यांची एखाद्या कंपनीच्या स्टॉकबद्दलची सार्वजनिक मतं आणि खाजगी मतं यांत जमीनआस्मानाचा फरक होता.

२००१ च्या पडझडीच्या विरोधातली केस सेटल करण्यासाठी दहा मोठ्या वित्तसंस्थांनी २००२ च्या डिसेंबरमध्ये १.४ बिलियन डॉलर्स मोजले आणि त्यांच्या सदोष कार्यपद्धतीत बदल करण्याचं आश्वासन सरकारला दिलं. या यादीत लीमन ब्रदर्स, डॉईश्च बँक, जे पी मॉर्गन, मेरील लिंच, मॉर्गन स्टेनली, गोल्डमन सॅक्स, सिटीग्रुप अशा अनेक मान्यवर वित्तसंस्थांचा सहभाग होता !

आर्थिक नियमांचं शिथिलीकरण केल्यानंतर असंख्य घटना, उदाहरणं घडली ज्यात वित्तसंस्थांमधले बडे बडे अधिकारी अनेक आर्थिक गैरकृत्यांत सामील असून त्यांनी गुंतवणूकदरांचे अब्जावधी डॉलर्स बुडवले, अफरातफर केली. सरकारी अधिकार्‍यांना मोठमोठ्या रकमेची लाच दिली.

- क्रेडीट सुईस (स्वीस) या वित्तसंस्थेने तर इराणच्या राष्ट्रीय आण्विक कार्यक्रमाला मदत म्हणून प्रचंड मोठी आर्थिक मदत केली. कालांतराने त्यांना ५३६ मिलियन डॉलर्सचा दंड करण्यात आला.

- सिटीबँकेने मेक्सिकोमधून १०० मिलियन डॉलर्सचे ड्रग्सचे पैसे वळते करून् दिले.

- १९९८ आणि २००३ च्या दरम्यान फ्रेडी मॅक आणि फेनी मे या दोन वित्तसंस्थांनी करोडो डॉलर्सचा घोटाळा केला. त्यांना अनुक्रमे १२५ मिलियन आणि चारशे मिलियनचा दंड झाला. फेनी मेने आपली आर्थिक उलाढाल मुळच्यापेक्षा किमान १० बिलियन डॉलर्सने वाढवून दाखवली. फेनी मे चा प्रमुख कार्यकारी अधिकारी फ्रँकलीन रेन्स हा बिल क्लिंटनच्या कारकीर्दीत बजेट डायरेक्टर होता. त्याने फेनी मेचा सी ई ओ म्हणून ५२ मिलियन बोनसरूपात कमावले.

- सिटीबँक, मेरील लिंच आणि जे पी मॉर्गन  या वित्तसंस्थांनी एन्रॉनचा महाघोटाळा दडवून ठेवण्यास मदत केली. त्यांना कालांतराने ३८५ मिलियन डॉलर्सचा दंड झाला.

१९९० च्या सुरुवातीला नियमांमध्ये आणली गेलेली शिथिलता आणि तंत्रज्ञानातील झेप यांच्या अपूर्व संगमाने 'डेरीव्हेटीव्हज' नावाच्या एका अतिशय क्लिष्ट अशा नवीन उत्पादनाला जन्म दिला. या उत्पादनामुळे शेअरबाजार अधिक सुरक्षित झाल्याचे दावे अर्थतज्ज्ञांनी आणि बँक्सनी केले. याउलट डेरीव्हेटीव्ह्जमुळे मार्केट अधिकच अस्थिर झालं. शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अनेक तंत्रज्ञ, गणितज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या मेंदूला खाद्य असलेल्या 'शीतयुद्ध तंत्रज्ञान' नावाच्या पर्वाचा अस्त झाला होता. तेच कुशाग्र मेंदू हे डेरीव्हेटीव्ह्ज बनवण्याच्या कामी वापरले गेले.

रॉबर्ट रुबीन
डेरीव्हेटीव्ह्ज मुळे बँकर्सना अक्षरशः कुठल्याही मुद्यावर जुगार खेळण्याची मुभा मिळाली. तेलाच्या किमंतीमधला चढउतार, एखादी कंपनी बंद पडणे यासारखा कुठलाही मुद्दा डेरीव्हेटीव्ह्जमधे पणाला लावला गेला. १९९० च्या अखेरीस डेरीव्हेटीव्हज हा १५ ट्रिलियन डॉलर्सचा परंतु कुठल्याही प्रकारच्या नियमांचं बंधनं नसलेला भलामोठा बाजार बनला होता. १९९८ च्या दरम्यान प्रथमच त्यांना काही नियमात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला. बिल क्लिंटन यांनी स्टॅनफर्ड लॉ स्कूलची पदवीधर असलेल्या ब्रूक्सली बोर्न नावाच्या अर्थतज्ज्ञाची नेमणूक 'कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन' च्या अध्यक्षपदी केली. बोर्न यांनी डेरीव्हेटीव्ह्ज मार्केटवर काही नियंत्रण आणण्याचा आणि त्यासाठी आवश्यक ते कायदे संमत करण्याची तयारी केली. त्या सुमारास समर्स, ग्रीनस्पॅन, रुबीन आणि 'सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशन' चा अध्यक्ष आर्थर लेव्हीट या सर्वांनी एकत्रितपणे बोर्न यांच्यावर दबाव आणून त्यांना तसं न करण्याविषयी सुचवलं/सुनावलं. आश्चर्य म्हणजे बिल क्लिंटन यांचाही त्या लोकांना पाठींबाच होता.

२००० साली सिनेटर फिल ग्राम यांनी एक विधेयक संमत करण्यात महत्वाची भूमिका बजावली. या विधेयकानुसार डेरीव्हेटीव्ह्ज हे  कुठल्याही माध्यमातून नियंत्रित केले जाऊ शकणार नव्हते. आणि यामुळेच

- कालांतराने सिनेटर फिल ग्रॅम ('ग्रॅम-लिच-बिली' विधेयकातला एक प्रमुख) यु बी एस (स्वित्झर्लंड बँक) बँकेचा  व्हाईसचेअरमन बनला.

- १९९३ मध्ये त्यांची पत्नी वेंडी ही एन्रॉनच्या संचालकमंडळात होती.

- समर्सने कालांतराने डेरीव्हेटीव्हज वर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणार्‍या एका हेजफंडचा कन्सल्टंट या नात्याने २० मिलियन डॉलर कमावले.


२००१ मध्ये ज्यावेळी जॉर्ज डब्ल्यु बुश अध्यक्ष झाले त्यावेळी अमेरिकन वित्तक्षेत्र हे पूर्वीच्या तुलनेत प्रचंड बलाढ्य, अवाढव्य आणि नफेखोर झालं होतं. खालील कंपनी/बँक्स/वित्त संस्था/विमा कंपन्यांची/गुणांकन कंपन्यांची (रेटिंग एजन्सीज) या क्षेत्रावर मजबूत पकड होती.

गोल्डमन सॅक्स
मॉर्गन स्टेनली
लीमन ब्रदर्स
मेरील लिंच
बेअर स्टर्नस
सिटीग्रुप
जेपी मॉर्गन
ए आय जी (विमा कंपनी)
एम बी आय ए
ए एम बी ए सी

रेटिंग एजन्सीज

मुडीज
स्टँडर्ड अँड पुअर्स
फिच

आणि या सगळ्या महत्वाच्या घटकांना एकत्र आणून तयार झाली ती 'सिक्युरिटायझेशन फूड चेन'.  या 'सिक्युरिटायझेशन फूड चेन'च्या यंत्रणेमुळे कर्ज, गहाणखत मिळून कित्येक ट्रिलियन डॉलर्सची उलाढाल झाली.


पूर्वीच्या काळी जेव्हा गृहकर्जं घेतली जायची तेव्हा कर्ज घेणारी व्यक्ती ते कर्ज फेडण्यासाठी बांधील होती. दरमहा हफ्ते (इंस्टॉलमेन्टस) भरून अनेक वर्षांनी कर्ज फेडलं जाई. अशा या दीर्घकालीन कर्जांमध्ये कर्ज देणारी स्थानिक वित्तसंस्था ही दरमहाचे हफ्ते आणि एकूणच फेडलं जाणारं कर्ज याबाबतीत अतिशय जागरूक असे. परंतु या 'सिक्युरिटायझेशन फूड चेन'च्या नवीन संकल्पनेमध्ये या मूळ तत्वालाच दूर सारण्यात आलं होतं.  कर्ज देणार्‍या संस्थांनी ती कर्ज मोठमोठ्या वित्तसंस्थांना विकून टाकली. या बलाढ्य वित्तसंस्थांनी अशा हजारो गृहकर्जांबरोबरच कारलोन्स, स्टुडंट लोन्स, क्रेडीट कार्डवरची कर्जं इत्यादी सगळी कर्जं एकत्र करून को-लॅटरलाईझ्ड डेट ऑब्लिगेशन (Collateralized Debt Obligation) उर्फ सीडीओ (CDO) नावाचं एक अतिशय क्लिष्ट असं डेरीव्हेटीव्ह तयार केलं. त्यानंतर वित्तसंस्थांनी हे सीडीओज मोठमोठ्या गुंतवणूकदारांना विकले. त्यामुळे कर्ज फेडणार्‍या सामान्य माणसांनी भरलेल्या हफ्त्यांचे पैसे जगभरातल्या अशा असंख्य मोठ्या गुंतवणूकदारांकडे जायला लागले. मोठ्या वित्तसंस्थांनी 'क्रेडीट रेटिंग एजन्सी 'जना पैसे चारून 'सिडीओज'बद्दल चांगली गुणांकनं (रेटिंग्ज) देण्यास भाग पाडलं. ज्यामुळे अनेक सिडीओजना एएए रेटिंग मिळालं ज्याचा अर्थ ते सीडीओ/कर्ज अतिशय सुरक्षित (म्हणजे फेडलं जाईल असं) आहे असा होतो. त्यामुळे सिडीओज हे रिटायरमेंट फंडांमध्ये देखील अतिशय लोकप्रिय झाले. रिटायरमेंट फंडांमध्ये लोक आपल्या आयुष्यभराची गुंतवणूक उतारवयातलं आयुष्य सुरळीतपणे व्यतीत करण्यासाठी गुंतवत असतात. थोडक्यात रिटायरमेंट फंडांनी अतिशय सुरक्षित क्षेत्रात गुंतवणूक करणं अपेक्षित असतं. या सिडीओजना मिळालेल्या एएए रेटिंग्जमुळे अधिकाधिक रिटायरमेंट फंड त्या सिडीओजमध्ये गुंतवणूक करायला लागले........................ !!!!

ही गुणांकनं (रेटिंग्ज) थोडक्यात बघू

एएए : सर्वोत्कृष्ट
एए : उत्तम
ए : चांगलं
बीबीबी : बरं
बीबी : वाईट
बी : धोकादायक

थोडक्यात हा एक टाईम बॉम्बच होता..... झालं !! यामुळे यापुढे कर्ज घेणारी व्यक्ती कर्ज फेडण्यास सक्षम आहे की नाही याबद्दल कर्ज देणार्‍याला काहीच वाटेनासं झालं. त्यांनी अधिकाधिक धोकादायक कर्जं अक्षरशः वाटायला सुरुवात केली. बँकांनाही त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. जास्तीतजास्त सिडीओ विकले की त्यांना अधिक अधिक नफा मिळत होता. आणि अर्थातच रेटिंग एजन्सीजनी दिलेली रेटिंग्ज जरी चुकीची आली तरी त्यांनाही काही फरक पडत नव्हता कारण त्यांना तशी रेटिंग्ज (गुणांकनं) देण्यासाठी वित्तसंस्थांकडून/बँक्सकडूनच पैसे मिळालेले होते. थोडक्यात अधिक जास्त, अजून जास्त अशी कर्जं अक्षरशः वाटली गेली. २०० आणि २००३ च्या दरम्यान दिली गेलेली कर्जं वर्षागणिक चौपटीने वाढत गेली होती. या 'सिक्युरिटायझेशन फूड चेन' मधल्या कुठल्याही घटकाने कर्जाच्या सुरक्षिततेचा, कर्जफेडीच्या ग्वाहीचा विचारच केला नव्हता. कर्जांची संख्या अधिक अधिक वाढवून त्यातून मिळणार्‍या कमिशनरूपी फीवरच फक्त त्यांचा डोळा होता. २००० सालच्या सुरुवातीला या अशा असुरक्षित कर्जांची संख्या प्रचंड वाढली. या असुरक्षित कर्जांना सबप्राईम म्हणतात. परंतु अशा रीतीने जेव्हा हजारो सबप्राईम्स किंवा असुरक्षित कर्जांचे मिळून सिडीओज बनले तेव्हा त्या सिडीओजना तरीही एएए गुणांकन मिळालं !!!! थोडक्यात हे सगळं घडू न देणं, आवरता येणं, संयम ठेवणं शक्य होतं परंतु ना वित्तसंस्थांनी काही केलं ना सरकारने. आपण काहीतरी चुकीचं वागतो आहोत हे माहित असूनही, कल्पना असूनही त्यांनी अशा सबप्राईमला जास्तीतजास्त प्रोत्साहन दिलं कारण त्यावरच्या अतिशय वाढीव व्याजदरामुळे त्यांना त्यातून मिळणारं व्याज/नफा हा खूप जास्त होता. या सगळ्यामुळे कर्जप्रक्रियेची वाट लागली. कर्ज घेणारे सर्वसामान्य लोक उगाचंच महागड्य सबप्राईम कर्जाच्या चक्रात अडकले. या घातक पद्धतीमुळे कर्ज फेडणं निव्वळ अशक्य असलेल्याही कित्येकांना कर्जं अक्षरशः वाटली गेली. ग्राहक जितका जास्त सबप्राईम लोन्सच्या जाळ्यात अडकला तितका जास्त पैसा बँकांना मिळत होता आणि हे चक्र असंच चालू राहिलं !!!!!

*भाग २ इथे  वाचा.

Sunday, May 1, 2011

माझे खादाडीचे प्रयोग : भाग ५

माझ्या खादाडीच्या प्रयोगांचे पहिले चार भाग वाचल्यानंतर मला अनेक लोकांच्या तक्रार वजा प्रतिक्रियांना (ज्यात प्रतिक्रिया वजा आणि तक्रारीच अधिक होत्या) तोंड द्यावं लागलं. उदा. पहिला  भाग वाचल्यावर काही जण म्हणाले की "कसली रे ती गांडूळांची डिश.. काय तर म्हणे मॅगी.. शी.. असल्या पोस्ट्स लिहवतात आणि असल्या डिशेस (म्हणजे पदार्थ, ताटल्या नव्हे) करवतात तरी कशा रे?" किंवा दुसर्‍या  भागानंतर काही प्रतिक्रिया होत्या की "पोराला घास भरवण्याचे हे प्रयोग आमच्या दृष्टीने सध्या तरी निरुपयोगी आहेत. जरा काहीतरी धड लिहीत जा किंवा नावं तरी धड देत जा पोस्टला (माझ्या पोस्टला लेख म्हणण्याचं मी अलिकडे आणि वाचकांनी फार पूर्वीपासूनच सोडून दिलंय.)" किंवा तिसर्‍या  भागानंतर काहींनी तक्रार मांडली की "कोण खातं रे हे असले पास्ते बिस्ते? जरा काहीतरी चांगली रेसिपी द्यायची सोडून ही कसली थेरं?" आणि चौथ्या  भागानंतरच्या काही कमेंट्स अशा आल्या की "आमच्याकडे आम्ही बोर्नव्हिटा अजिबात आणत नाही. कंप्लान/हॉर्लीक्स आणतो आणि कंप्लान/हॉर्लीक्स बरोबर ही डिश एकदम फ्लॉप आहे (हो ती आहेच. उगाच सत्य का नाकारा?)..."

या एवढ्या तक्रारी वाचून मला खरं तर खूप आनंद झाला. म्हणजे कसं की शिव्या घालण्यासाठी का होईना पण अजूनही लोक ब्लॉग वाचतायत तर. पण ज्याप्रमाणे त्या कुठल्याशा एका महान सुविचारातली मोठी लोकं त्यांना मारलेल्या दगडांचं रुपांतर माईलस्टोन्समध्ये करतात तसं मीही त्या शिव्यांचं रुपांतर (जरा तरी) बर्‍या पोस्टांमधे करायचं ठरवलं. ज्याप्रमाणे सचिन ऑफला आलेल्या भन्नाट चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा इम्प्रोव्हाईज्ड शॉट मारतो (अर्थात तेंडूलकरच.. पिळगावकरला कधी बॅट तरी हातात धरलेली बघितली आहेत का? उग्गाच कायतरी..) तसंच मीही ही नवीन रेसिपी इम्प्रोव्हाईज्ड करायची ठरवली जिच्यात वेगवेगळे प्रसंग, वेगवेगळया व्यक्ती आणि वेगवेगळी सामाजिक स्थानं (म्हणजे बगीचा, मॉल वगैरे नव्हे त्या व्यक्तींचीच सामाजिक स्थानं) यांना अनुसरून पाककृती द्यायचं ठरवलं.

अजून एक महत्वाची सूचना म्हणजे ही डिश फक्त विकांत स्पेश्य्य्यल ब्रेकफास्ट डिश आहे. उरलेल्या पाच दिवसांत ती कंप्लीट निकामी आहे याची आधीच नोंद घ्या. तर आपली आजची डिश आहे..............

जाऊदे नंतर सांगतो. आधी पूर्वतयारी करुया. आता इथे सामाजिक/घरगुती स्थानावरून इम्प्रोव्हायजेशन आहे बरं... नीट लक्ष द्या.

पहिली पायरी

१. रूममेट व्हर्शन

आपण : अबे, कुछ बनाते है यार.

रूमी : क्या बनाएगा बे तू?

आपण : बोल क्या बनाऊ?

रूमी : तू कुछ मत बना. पिछले बार ऑम्लेट जलाया था. याद है ना? मै ही बनाता हूँ.. बोल क्या खाएगा?

या स्टेपला सहा महिन्यांपूर्वीचं एखादं जळकं ऑम्लेट लक्षात ठेवणारा 'जंगली हाथीकी तरह याददाश' असलेला रूममेट दिल्याबद्दल देवाचे आणि ऑम्लेट जाळण्याच्या कौशल्याबद्दल आपले स्वतःचे (मनोमन) आभार मानावेत. असा रूममेट नसेल तर मग रूममेट बदलावा. डिश बदलली जाणार नाही !!!

आपण : कुछ खास नही यार.. चल सँडविचही बनाते है.

रूमी : ठीक है.

आपण : ओक्के. तू तयारी शुरू कर. मै ब्रेड लेके आता हूँ..

रूमी : अबे रुक. मै ही लाता हूँ..

आपण मागे एकदा शिळा (ळा ळा... ला नाही ळा) आणि नंतर एकदा व्हीटच्या ऐवजी व्हाईटब्रेड आणल्याचंही रूमीने लक्षात ठेवल्याबद्दल पुन्हा एकदा आभारप्रदर्शनाचे कार्यक्रम (हो.. अर्थात मनोमनच) पार पाडावेत.

आपण : ओके. ठीक है.. तब तक मै बाकी की तय्यारी करता हूँ.

आपल्या या वाक्यानंतर "आता यात तयारी करायला राहिलंय काय??" अशा अर्थाच्या रूमीच्या चेहर्‍यावरील प्रश्नचिन्हांकडे साफ दुर्लक्ष करावं.

रूमी गेल्यावर सोफ्यावर देह टाकून, लोळत पडून मस्तपैकी चॅनल्स सर्फत रहावं. ('मस्तपैकी' हे लोळत साठी वापरलेलं विशेषण आहे चॅनल्ससाठी नव्हे.) घराजवळचा अण्णा/भैय्या/वाणी किती दूर आहे यावर तुमचं लोळणसुख अवलंबून आहे.

--------

२. गर्लफ्रेंड व्हर्शन (अर्थात लिव्ह-इन वालीच... (विकांतातल्या) भल्या पहाटे ब्रेकफास्टला बरोबर असणारी गर्लफ्रेंड ही लिव्ह-इनच असणार.. नाही का?)

हे व्हर्शन बघून हळहळ, निषेध आणि संताप व्यक्त करणार्‍या खादाड वाचकांसाठी मौलिक सल्ला : इम्प्रोव्हायजेशनच्या वचनात बांधलो गेलो असल्याने हे व्हर्शन देणं क्रमप्राप्त आहे. तेव्हा

हळहळ व्यक्त करण्याऐवजी एल-आय जीएफ शोधा..
निषेध व्यक्त करण्याऐवजी एल-आय जीएफ शोधा ..
संताप व्यक्त करण्याऐवजी एल-आय जीएफ शोधा ..

यातलं काहीही न व्यक्त करणार्‍यांनी पुढे वाचा.

शनिवारी भल्या पहाटे १० च्या सुमारास आळोखेपिळोखे देत..

आपण : जानू, भूख लगी है... कुछ बनाऊ?

इथे हिंदी संवादांना पुरणाच्या पोळीत पुरण आणि पोळीला जेवढं महत्व असतं तेवढं महत्व आहे. कारण कुठल्याही गर्लफ्रेंडांना (खास करून लिव्ह-इन वाल्या) त्यांच्याशी दिल्लीभाषेत किंवा आंग्लभाषेत संवाद साधत त्या चित्रपटांतल्यासारखे (म्हणजे हिंदी किंवा इंग्रजी हो.. 'त्या' म्हटल्यावर कुठल्या काय विचारताय? सभ्य माणसांचा ब्लॉग आहे हा !!!) संवाद टाकल्याशिवाय आपला (म्हणजे त्यांचा) बॉयफ्रेंड रोम्यांटिक वगैरे वाटत नाही. तेव्हा हिंदी इज लय मस्ट... !

जानू उर्फ ती : ना जानू.. मैही बनाती हूँ.. बोलो क्या बनाऊँ?

सदरहु ठिकाणी "नही मै", "नही मै" करत आदमासे दहा मिनिटे लाडिक भांडणं करावीत. त्याने रोमान्सला रंग चढतो की नाही याची ग्यारंटी, कल्पना वगैरे नाही पण आपल्या डिशला मात्र चढतो. या ठिकाणी फोकस हा रोमान्सवर नसून डिशवर आहे याचा विसर पडू देऊ नये.

"नही मै", "नही मै" वाली लाडिक (आय क्नो, फार सबजेक्टीव्ह आहे हे) किणकिण संपली की मग हार पत्करल्याचा अभिनय करावा आणि म्हणावं "ठीके जान, तुम ही बनाओ"

जानू उर्फ ती : हां. पर क्या बनाऊ?

आपण : कुछ खास नही. बस सँडविचही बनाओ.

जानू उर्फ ती : बस? इतनाही?

जानू खरोखर विचारते आहे की तोंडदेखलं हे शोधण्याच्या भानगडीत न पडता फक्त "हां" असं म्हणावं.

"तो ठीक है. मै ब्रेड लेके आता हुँ" असं म्हणावं. असं म्हणून झाल्यावर खरोखरच तयारीला लागावं. कारण रूमीच्या वेळी वापरलेली युक्ती इथे चालत नाही. आपल्याला स्वतःला खरंच जाउन ब्रेड आणावा लागतो.

जाताना खिशात किमान ४५ रुपये आहेत याची खात्री करावी. नाही.. ब्रेडला २० रुपयेच लागतात हो पण उरलेल्या २५ रुपये आपल्या पदार्थाच्या यशस्वितेसाठीची गुंतवणूक आहे. उरलेल्या २५ रुपयांचा गुलाब घ्यावा. गुलाब मिळाला नाही तर कुठलंही एखादं विंग्रजी नावाचं म्हणजे डेलिया, झेनिया, ट्युलिप, क्याक्टस वगैरे वगैरे नावाचं... सॉरी सॉरी.. क्याक्टस नाही.. क्याक्टस सोडून कुठलंही चालेल... तर असं कुठलंही विंग्रजी नावाचं फुल घ्यावं.. यापैकीही कुठलं मिळालं नाही तर मग कुठलंही एखादं चांगलं टपोरं किंवा कुठलंही वासाचं (म्हणजे सुवासिक याअर्थी) फुल घ्यावं. फुलपुडी चालणार नाही !!

-------

बायको व्हर्शन : उपव्हर्शन १ (नवीन लग्न झालेले)

इथे 'उप' हे उपवर/उपवधू याअर्थी नसून उप-सुचना याअर्थी वापरण्यात आलेलं आहे याची नोंद घ्यावी !! आपला 'उपवधू' काळ संपला आहे हे विसरू नये.

शनिवारी सकाळी अंदाजे साडेनवाच्या सुमारास पहिली मोठी जांभई द्यावी. त्या जांभईने बायको उठतेच.

ती (धडपडत उठत): बापरे.. किती वाजले? बराच उशीर झाला का?

आपण : अग मग काय झालं? शनिवार तर आहे आज. आणि काल जागरणही झालं ना.

या वाक्याला ती लाजते. ती लाजल्यानंतर पाळण्याचे जे काही संकेत/नियम  वगैरे वगैरे तुमच्यात असतील ते पाळून झाल्यावर तिला म्हणावं

आपण : चल. मस्त फ्रेश होऊ या आणि बाहेर जाऊन छानपैकी ब्रेकफास्ट करुया.

ती : छे. ब्रेकफास्टसाठी बाहेर कशाला? मी करते की पटकन काहीतरी. काय करू सांग.

आपण : अग नको. कशाला उगीच? चल ना बाहेरच जाऊ मस्त.

ती : नाही रे. बाहेर नको. मी घरीच करते पटकन काहीतरी.

या वाक्यानंतर आग्रह लगेच थांबवा. वरच्या "नही मै" वाल्या लाडिक किणकिणीप्रमाणे चार-सहा वेळा ताणलंत तर खिशाला मोठी चाट पडण्याचा संभव आहे. प्रत्येक स्टेप, संवादांची पुनरावृत्ती वगैरे बाबी अतिशय विचारपूर्वक योजलेल्या आहेत त्यामुळे वारंवार "का?" असं विचारू नये किंवा स्टेप्समधे आपल्या मनाप्रमाणे बदलही करू नयेत. संभाव्य परिणामांना आणि बिघडलेल्या डिशला आम्ही जवाबदार नाही.

आपण : बरं चल. घरीच कर काहीतरी साधंसोपं.

ती : काय करू?

आपण : म्म्म्म्म्म्म.. (साधारण चौदा सेकंदांच्या पॉज नंतर) चल सँडविच करुया पटकन. (इथे नेहमीच्या सवयीमुळे "करूया" च्या ऐवजी तोंडातून "कर" असं निघून गेल्याने डिश फसल्याची उदाहरणं आहेत. तेव्हा सांभाळून.. )

ती : ओक्के.. चालेल.. मी पटकन ब्रेड घेऊन येते खालून.

आपण : तू कशाला जातेस? तू थांब मीच घेऊन येतो.

ती : नको नको. मी आणते रे.

आपण : चल नाहीतर दोघेही जाऊ ब्रेड आणायला.

ती : वेडा आहेस का? एवढा काही जड नाहीये ब्रेड. मी आणते पटकन. तू थांब इथेच. आराम कर मस्त.

या स्टेपलाही आग्रह सोडून देऊन थांबणं आणि भावनेच्या भरात वाहवत जाणार नाही याची दक्षता घेणं अत्यावश्यक आहे.

आपण : (छान हसत) बरं जा तू.. तोवर मी केर काढून ठेवतो आणि सिंकमधल्या भांड्यांवर हात फिरवून ठेवतो.

घाबरून जाऊ नका. हे करायला लागत नाही. कारण नंतर केर आणि भांड्याला रखमाबाई येणार असतात त्यामुळे आपल्याला इकडची काडी तिकडेही करावी लागत नाही आणि बायकोही खुश होते.

------------

बायको व्हर्शन : उपव्हर्शन २ (लग्नाला तीन-चार वर्षं झालेले.)

१. डोळे उघडल्या उघडल्या नेहमीप्रमाणे "अग ए, चहा झाला की नाही अजून?" च्या ऐवजी "गुड मॉर्निंग सोना" असं म्हणावं (ही सूचना फक्त बायकोचं नाव सोनल/सोनम/सोनिया वगैरे असणार्‍या नवर्‍यांसाठी आहे असं वाटल्याने "अरे पण माझ्या बायकोचं नाव रिचा आहे. मी सोना कसं म्हणू?" असले फालतू प्रश्न विचारू नयेत. सोना हे कॉमन लाड-नाव आहे.)

२. या गुड मॉर्निंगपायी सोन्याला फेफरं आलं असल्याची शक्यता असल्याने संभाव्य उत्तरासाठी (नाही.. उत्तरा हे कोणाचंही लाड-नाव नाही.. आन्सर या अर्थी म्हणतोय मी.) तिला सुमारे सव्वा तीन मिनिटांचा वेळ द्यावा. तरी उत्तर न आल्यास "गुड मॉर्निंग सोना" ची पुनरावृत्ती करावी.. त्यानंतरही सव्वातीन मिनिटे होऊन गेल्यावरही उत्तर न आल्यास पुनरावृत्तीच्या भानगडीत न पडता थंड पाणी तिच्या चेहर्‍यावर ओतण्याची.... स्वारी.. शिंपडण्याची तयारी करावी.

३. फार कमी शक्यता असली तरी बर्‍याचदा सोनाचं प्रत्युत्तर "मॉर्निंग सोना" असं येतं. गांगरून न जाता शरद पवारच्या मुस्काटात मारेल असं स्मित चेहर्‍यावर (तोंड वाकडं न करता) ठेवावं

४. "आज मी घरातले सगळे पंखे पुसणार आहे, माळ्यावरचं सगळं सामान साफ करणार आहे." तीन सेकंद पॉज "....... ब्रेकफास्ट झाल्यावर" असं म्हणून ताडकन बेडवरून खाली उडी मारावी. सोनाचा जमिनीवर पडलेला जबडा उचलून चिकटवावा (शक्यतो हातानेच.)

५. पुढे असं म्हणावं "किंवा मी कामालाच लागतो. माझं आवरून झालं की मग बघुया ब्रेकफास्टचं"

एव्हाना सोनानेही जमिनीवर ताडकन उडी मारलेली असते.

सोना : नाही रे. आधी पटकन ब्रेकफास्ट करते मी काहीतरी. काय करू सांग?

(यावर काय उत्तर द्यायचं हे चाणाक्ष वाचकांनी एव्हाना ओळखलंच असेल तरीही)

आपण : उगाच जास्त काही करू नकोस. साधं सँडविचही चालेल.

सोना : बरं चालेल.

यापुढे काहीच बोलावं लागत नाही कारण त्या ३-४ सेकंदांच्या अवधीत सोना ब्रेड आणायला पळालेली असते. तरीही ती साधारण दरवाज्यापाशी असताना (हे टायमिंग साधणं फार फार महत्वाचं आहे !!) जरा लाउड थिंकिंग केल्यागत, (आपण) म्हंटलं तर स्वगत (तिने) म्हंटलं तर प्रकट अशा पट्टीत, तिने ऐकलं न ऐकलं अशा नरो वा कुंजरो वा थाटात पुढचं वाक्य बेमालूमपणे टाकावं.

आपण : उजवा खांदा जरा दुखतोय किंचित.. जरा गरम पाण्याने शेकून घेतो.

सोना ब्रेड घेऊन येईपर्यंत आपली आंघोळ झालेली असते आणि आंघोळीनंतर माळा आणि पंखे साफ करावे लागत नाहीत त्यामुळे ..... !!

-----------

बायको व्हर्शन : उपव्हर्शन ३ (पोरंबाळं व्हर्शन)

१. वरच्या (उपव्हर्शन २) प्रमाणेच बायकोला (एव्हाना सोनाची बायको झालेली असते) गोड आवाजात हाक मारावी. पण त्यात एक किंचित व्हेरिएशन आहे. बायकोच्या नावाच्या पहिल्या अक्षराने तिला हाक मारावी.. म्हणजे स्वाती असेल तर "ए स्वा" किंवा प्रीती असेल तर "गुड मॉर्निंग प्री" किंवा सारिका असेल तर "हे (हे म्हणजे विंग्रजी hey वालं) सा" अशी हाक मारावी.

महत्वाची सूचना : बायकोचं नाव सुनिता/शुभांगी/शीतल वगैरे असणार्‍या नवर्‍यांनी फक्त पहिल्या अक्षराऐवजी पहिली दोन अक्षरं वापरणं अधिक श्रेयस्कर !!!

२. सकाळच्या अशा छान सुरुवातीनंतर बायको शक्यतो हसतेच. आपणही हसावं

३. आपण : चल आज मी मुलांचा अभ्यास घेणार आहे" तीन सेकंद पॉज "..........ब्रेकफास्टनंतर"

४. त्यानंतर बायको "अभ्यास?? पोरं कितवीत आहेत हे तरी माहिती आहे का?" सारख्या वरकरणी विनोदी पण प्रत्यक्षात गोंधळात टाकणार्‍या प्रश्नांचा 'दुसरा' (गुगली जुना झाला आता) टाकते. त्यावर डगमगून, रागावून, चिडून न जाता फक्त निर्लज्जपणे ख्या ख्या ख्या करावं.

५. आपण : चल आता आम्ही बसतोच अभ्यासाला. मी आणि पोरं अभ्यास झाल्यावर नाश्ता करू. तू तुझ्यासाठी काहीतरी करून खाऊन घे.

६. बायको : चल काहीतरीच काय. पोरं काय उपाशीपोटी करणार आहेत अभ्यास? तुझं आपलं काहीतरीच. मी पटकन काहीतरी करते मग तुम्ही बसा अभ्यासाला. सांग पटकन काय करू ते.

(तुम्हाला उत्तर माहित आहेच तरीही)

७. आपण : उगाच जास्त काही करू नकोस. साधं सँडविचही चालेल.

बायको दोन मिनिटांत तयार होऊन ब्रेड आणायला पळते. आपण सोफ्यावर लोळत निवांतपणे चॅनल सर्फिंग करावं किंवा लॅपटॉप उघडून ब्लॉग्ज वाचत बसावं. काहीच करायचं नसेल तर पुन्हा पांघरूण डोक्यावर घेऊन शांतपणे घोरायला लागावं.

पोरं आपल्याकडे अभ्यास करत नाहीत. त्यांना आईच लागते. हे आपल्याला, पोरांना आणि बायकोलाही माहित असतं. फक्त बायको एखादा चान्स घेत असते. थोडक्यात (मुलांच्या कृपेने) आपण सुटलेले असतो.

---------------

ही आत्ताशी पहिलीच पायरी संपलेली आहे आणि सँडविच सारखा मामुली आणि क्लिष्ट पदार्थ आपल्या "माझे खादाडीचे प्रयोग" च्या सिरीज मध्ये येणार नाही हा चाणाक्ष आणि खादाड वाचकांनी बांधलेला तर्क १०१% खरा आहे. आपली आजची डिश सँडविच नाहीच्चे मुळी. त्यामुळे (कितीही कंटाळा आलेला असला तरीही) डिश समजून घेण्यासाठी पुढे वाचत रहा.

दुसरी पायरी

- तुम्ही वरीलपैकी ज्या कुठल्या गटात मोडत असाल त्याप्रमाणे तुम्हाला ब्रेड आणून मिळाल्यानंतर किंवा तुम्ही ब्रेड आणल्यानंतर, गुलाब, डेलिया, झेनिया, ट्युलिप वगैरे देऊन झाल्यानंतर, चॅनल सर्फिंग करत यथेच्छ लोळून झाल्यानंतर किंवा दुखावलेला खांदा शेकून जरा बरा झाल्यानंतर किचनमध्ये प्रस्थान करावं.

- रूमी, एल-आय जीएफ, बायकोकडे बघून छानसं स्मित द्यावं (हो हो तिन्ही व्हर्जन्समध्ये)..

- त्यानंतर अत्यंत प्रेमाने सुरी आणि कटिंग बोर्ड डायनिंग टेबलवर ठेवावेत.

- एवढं झाल्यावर "एक मिनिट हं. माझा सेल वाजतोय बहुतेक.." असं म्हणत शिताफीने किचनमधून बाहेर पडावं.

- साधारण अडीच मिनिटांनंतर स्वयंपाकघरात पुनःप्रवेश करावा.

- एव्हाना दुसर्‍या पात्राने (कॅरॅक्टर याअर्थी हो.. उगाच पुन्हा ते रूमी, एल-आय जीएफ, बायको वगैरे लिहायला लागायला नको म्हणून पात्र लिहिलं होतं पण तुमच्या शंकेखोर स्वभावाने पुनरुक्ती करावी लागलीच... छ्या !! ) ब्रेडच्या पाकिटातून वरचा ब्रेड बाहेर काढून टाकलेला असतो आणि उरलेल्या ब्रेड्सच्या कडा सुरीने कापून टाकायला सुरुवात केलेली असते...

बिंगो !!!! यु गॉट इट... हीच आहे आपली आजची डिश.

सांगतो सांगतो.. एक मिनिट.. पाकिटातला वरचा आणि खालचा ब्रेड आणि सगळ्या ब्रेड्सच्या कडा या अमानुषपणे, निर्दयीपणे आणि अरसिकपणे काढून टाकल्याचं चित्रच आपण आत्तापर्यंत बघत आलोय. पण ते साफ चूक आहे. किंबहुन मी तर म्हणेन की ब्रेडच्या पाकिटात या तीन वस्तू सोडल्या तर चविष्ट असं काही नसतंच. खोटं वाटत असेल तर आज ट्राय करून बघाच. एक मिनिट.. डिश अजून पूर्ण झालेली नाही.

- तर या कडा आणि ते बिचारे, बापुडवाणे ब्रेड्स हातात घ्या.

- चांगलं भरपूर फॅटवाल्या बटर/लोणी/चीजस्प्रेड वगैरेचा डबा घ्या (चालतं हो एक दिवस. मी सांगतोय ना !!)

- डब्याचं झाकण उघडा.

- ब्रेडची कड सरळ त्या डब्यात बुडवा आणि छानपैकी चमच्याप्रमाणे फिरवा आणि मस्तपैकी गट्टम करा.

- अधून मधून त्या कडा त्या गरीब बिचार्‍या ब्रेड्सवर फिरवा.

- कडा संपल्यावर ते ब्रेडही तोंडात टाकून द्या.

- मस्तपैकी तृप्तीची (हे बायकोचं किंवा कोणाचंही लाड-नाव नाही) ढेकर द्या.

- "ऑSSS.. मी जरा अर्धा तास पडतो ग." असं म्हणून बेडरूमच्या दिशेने पळून जा. गर्लफ्रेंड व्हर्जनात हे हिंदीत म्हणा हे सांगायला नकोच म्हणा.. पण तरीही.

डिश आवडली की नाही ते नक्की कळवा म्हणजे त्याप्रमाणे पुढच्या भागात अजून इम्प्रोवाईज करायला बरं !! नाही का?? ;)

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...