Friday, December 25, 2009

बरहाताईचा गुगल-दादा (इमे)

गेल्या आठवड्यात एका मित्राने बरहाताईच्या या गुगल-दादाबद्दल सांगितलं. इमे त्याचं नाव. मी कधीपासून डाउनलोड करून ट्राय करणार होतो पण राहून जात होतं. शेवटी आज वेळ मिळाला आणि हे गुगल इनपुट मेथड एडिटर (IME - इमे) डाउनलोड केलं. एकदम झक्कास आहे. बरंचसं बरहा सारखंच आहे. म्हणजे तळाशी लँग्वेज बार उघडतो. तिकडे मराठी निवडायचं. (आणि ही मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु भाषा वगैरे आपण डाउनलोड करायच्या वेळी निवडायची.) आणि नेहमीप्रमाणे दाणादण टंकायचं. बरहावाल्यांना कदाचित विशेष आवडणार नाही. पण माझ्यासारखे गुगल भक्त असतील त्यांना नक्की आवडेल. आणि खूप सोयीस्कर पण वाटेल. क्वीलपॅड, बरहा वगैरे मध्ये कॉमनसेन्सचा अभाव आहे असं मला वाटतं. म्हणजे गुगल मराठीतले नेहमीचे वापरातले शब्द आपोआप टिपतं. पण क्वीलपॅड, बरहा ते नाही करत. सोप्प उदाहरण म्हणजे "येतं, जातं, करतं" सारख्या शब्दांमधला शेवटचा अनुस्वार किंवा विंग्रजीत लिवलेले office किंवा camera सारखे शब्द गुगल बरोब्बर टिपतं. अर्थात क्वील/बरहा मध्ये पण असेल अशी काहीतरी सोप्पी सोय किंवा शोर्टकट. पण मला नाही सापडले. अजून एक म्हणजे IME मध्ये आपण शब्द टाईप करायला लागलो कि तिथे तो आपोआप आपल्याला शब्द सुचवतो. म्हणजे समानार्थी वगैरे नाही हो (करेल. ते पण करेल गुगल १-२ वर्षात :P) . म्हणजे word-suggestion. आपल्या मोबाईल मधल्या डिक्शनरी सारखं.
गुगलदादा काय एकेक प्रोडक्टस काढतो यार. (आणि पुन्हा चकटफू) जी-मेल, युट्युब, ओर्कट,पिकासा, अर्थ, जी-टॉक, क्रोम, गुगल maps. गुगल वॉईस. सगळे एकापेक्षा एक. गुगलने जी-टॉक जी-मेलच्या पेज मधेच इंटीग्रेट केल्यावर याहूला पण तसं करावंच लागलं. किंवा पीसी-टू-पीसी वॉईस चॅट पण सुरु केलं ते गुगलने. त्यांनी क्रोम लॉंच केल्या केल्या त्या दिवसापासून मी ते वापरायला सुरु केलं. काय मस्त लाईट-वेट आहे. खरंच अगदी हलकं-फुलकं वाटतं. लॅपटॉपलाही आणि आपल्यालाही.. आता वाट पहायची ती क्रोम ओ.एस. ची.
असो गुगलचा उदो उदो थोडा अति होतोय आणि तो उद्देश नव्हता या पोस्टचा. इमे बद्दल चटकन-पटकन सांगायचं होतं. म्हणून हे क्विक पोस्ट.

Wednesday, December 23, 2009

डकवा-डकवी

अपर्णाने मला डकवलं. बघूया कसं जमतंय KBC चं ब्लॉग व्हर्जन. पटकन त्या डकवलं शब्दाची गम्मत सांगतो. पाचवी किंवा सहावीत असताना मी वर्गात सामान्य विज्ञानाचा धडा मोठ्याने वाचत असताना हा डकवणे शब्द आला आणि मी प्रिंटींग मिस्टेक समजून तो चक्क अडकवणे असा वाचला. बाईंनी पुन्हा वाचायला सांगितल्यावर सुद्धा मी सुरुवातीच्या "अ" चा आधार सोडला नाही. आणि तेव्हा मला सगळ्यांसमोर त्या शब्दाचा अर्थ समजावला गेल्याने पक्का बसला डोक्यात. आणि तेव्हा मला कळलं डकवणे हा एक वेगळा शब्द आहे तर. चिकटवणे या अर्थी. तोपर्यंत माझ्या मेंदूच्या शब्दकोशात तो नव्हताच. असो. घडाभर तेल संपल तरी याच नमन काही संपत नाही असं कोणी म्हणायच्या आत (किंवा सगळ्यांच म्हणून झाल्यावर) आपण ब्लॉग KBC ला सुरुवात करू.

1.Where is your cell phone?
आत्ता उशीखाली आहे. (पण एकंदरीत मुलाच्या तोंडात, माझ्या खिशात किंवा चार्जिंगला नसला की हरवला समजायचा.)

2.Your hair?
काळे, दाट (होते पूर्वी. आता बाळराजांच्या ओढण्यातून किती शिल्लक राहतील हे Fructis च जाणे)

3.Your mother?
माझा आदर्श

4.Your father?
सुपर अक्टिव

5.Your favorite food?
पाव भाजी, बटाटा वडा, अळूच्या वड्या, पिझ्झा (बेसिकली हाताने न घ्यावं लागणारं काहीही)

6.Your dream last night?
मी ८ तास झोपलो आहे.

7.Your favorite drink?
कॉफी, बोर्नविटा (सोमरसाबद्दल म्हणत असाल तर अब्राम्हण्यम !! ;) )

8.Your dream/goal?
म्म्मम्म्म (Instant गोल तर ही प्रश्नावली पूर्ण करणे.)

9.What room are you in?
(माझ्या स्वतःच्या घरातली) बेडरूम

10.Your hobby?
वाचन (व पु, पु ल, मतकरी, रणजीत देसाई आणि जॉन ग्रिशम यांची सगळी पुस्तकं) , ट्रेकिंग (आणि झोपणे, लोळणे, उशिरा उठणे).. आणि हो. भरपूर मुव्हीज बघणे.

11.Your fear?
"भूत" मधली मनजित

12.Where do you want to be in 6 years?
म्म्म्मम... २०१५.. आय गेस

13.Where were you last night?
अर्थात घरीच

14.Something that you aren’t?
हेरंब ओक सोडून काहीही

15.Muffins?
डबल चोकलेटचिप मफीन. केव्हाही, कितीही

16.Wish list item?
आपल्या मुकेशच्या शेजारी त्याच्या पेक्षा १ मजला जास्त असलेलं घर बांधायचं (आणि त्यात राहायचं) .. वचने किं दरिद्रता??

17.Where did you grow up?
आमची डोंबिवली

18.Last thing you did?
आत्ता "पाकिस्तानात" जाऊन आलो.

19.What are you wearing?
टी-शर्ट आणि track pant

20.Your TV?
सोनी.
TV शो म्हणत असाल तर F.R.I.E.N.D.S (दुसरं काय असतं म्हणा बघण्याच्या लायकीच)

21.Your pets?
आय हेट पेट्स

22.Friends
बरेच. पण अगदी जीवाभावाचे फारच कमी. सगळे डोंबिवली, मुंबईत आहेत सुखात

23.Your life?
निवांत.

24.Your mood?
झोपेश.

25.Missing someone?
आई

26.Vehicle?
सध्या तरी पाथ आणि सबवे

27.Something you’re not wearing?
शूज

28.Your favorite store?
स्टोर मध्ये कसलं फेवरेट? काहीही चालतं ..

Your favorite color?
पांढरा. (गाडी मात्र जांभळी आवडते)

29.When was the last time you laughed?
मगाशी चिंटू खांद्यावर डोकं ठेवून झोपण्याचं नाटक करत होता आणि नंतर एकदम जोरात हसत हसत ओरडायला लागला तेव्हा :)

30.Last time you cried?
गेल्या वर्षी दोनदा रडलो. १७ ओगस्ट आणि ९ नोवें

31.Your best friend?
#२२ चं उत्तर बघा साहेब.

32.One place that you go to over and over?
Actually those are two places. ऑफिस आणि घर.

33.One person who emails me regularly?
फार कमी. पण मी कायम पाठवत असतो सगळ्यांना. कर्मण्ये वादिकारस्ते म फलेषु कदाचन ||

34.Favorite place to eat?
चांगला पिझ्झा देणारं कुठलही हॉटेल.

मी आनंद, उन्मेष दादा आणि सचिनला डकवतोय.

तळमळला !!

सोमवारी (दर सोमवार प्रमाणेच) उठायला उशीर झाला. वीकेंडचा हॅंगओवर आणि आळशीपणा वगैरे वगैरे.. नाही हो.. सोमरस वाला हॅंग ओवर नव्हे.. आम्ही त्या क्षेत्रात "काला अक्षर भैस बराबर" आहोत. आमचा आपला नॉर्मल वीकेंड वाला हॅंग ओवर. आळशीपणातून आलेला.. असो. उगाच भरकाटतोय. मुद्दा हा की उशिरा उठल्यामुळे डबा नेता आला नाही ऑफीसला आणि दुपारी जेवायला बाहेर गेलो. आमच्या ऑफीसच्या जवळच एक छोटं सॅंडविच शॉप आहे तिकडे जाऊन बसलो. हॉटेल मधे ४-५ जणच होते. तसं सगळं शांत शांत होतं...
मी पण सॅंडविच वर ताव मारण्यात मग्न असताना माझ्या मागेच अगदी जवळ, अचानक धप्प असा आवाज आला. मी पटकन मागे वळून बघितलं. तर एक माणूस आडवा पडलेला दिसला. आधी काही नीट कळलंच नाही. मग पटकन लक्षात आलं की तो बहुतेक तोल जाउन पडला आहे. मी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा एक पाय टेबालाखली थोडा अडकल्या सारखा वाटला की ज्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती. आणि तो काही बोलत पण नव्हता. डोळे अर्धवट उघडे होते.. आणि अचानक माझ्या लक्षात आल की हे साधं तोल जाऊन पडण्यातलं प्रकरण नाहीये.. त्याला काहीतरी चक्कर वगैरे आली असावी आणि त्यामुळे तो पडला असावा. तो काही प्रतिसाद देत नाही हे पाहून मी पटकन आजूबाजूला नजर फिरवली. पण तो धप्प आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोचल्याचं निदान त्यांच्या चेहर्यावरून तरी दिसत नव्हात. (आणि तो माणूस एका कोपर्‍यात पडला असल्याने तो त्यांना दिसलाही नसावा असा मी आपला संशयाचा फायदा दिला त्यांना). कानाचा पडदा आणि सभोवतालचं जग या मधे आय-पॉड चे हेड फोन्स आल्याने तो धप्प आवाज हेडफोन्सच्या बाहेरच्या आवरणावर एकदा टकटक करून मावळला असणार. शेवटी मी पटकन ऑर्डर द्यायच्या काउंटरवर जाऊन त्या कोपर्याकडे बोट दाखवून काउंटर वरच्या मुलीला झाला प्रकार सांगितला. ती पटकन धावत आली माझ्याबरोबर. तिनेही आधार देऊन त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण तिलाही ते शक्य झालं नाही.. एकीकडे मोबाइलची बटणं दाबून तिने पटकन इमर्जन्सी अँब्युलंस सर्विसला फोन लावून अँब्युलंस मागवली. आता माझं हळू हळू त्या माणसाकडे लक्ष गेलं. जरा म्हातारेच गृहस्थ होते. म्हणजे आपल्या आजोबांच्या वयाचे असतील. थोडे शुद्धीत आले होते आता. तोवर आम्ही त्यांना हात धरून भिंतीला टेकून बसवलं. त्यांनी डोक्यावरून टोपी काढून ठेवली. चेहर्यावर, कपाळावर चांगलाच घाम तरारला होता. अँब्युलंस काकुंनी त्यांना काहीही-अगदी पाणीही- न देण्याविषयी बजावलं होतं. माझं निरीक्षण चालूच होतं.. आजोबा चांगले उंच होते. सहा फूट तर आरामात असतील. चेहर्यावर छोटी दाढी, हसरे डोळे आणि एकदम धिप्पाड देह असा सगळा डौल होता. तेवढ्यात एक तरुण, उंच पोलिस हॉटेलमधे शिरला. अँब्युलंस काकुंनी त्या एरियातल्या पोलिसांना फोन करून इकडे यायला फर्मावलं होतं वाटतं. त्याने आजोबांजवळ बसून कसं वाटतंय वगैरे विचारून जुजबी चौकशीला सुरूवात केली. Chanton का असं काहीतरी नाव होतं त्यांचं. जवळच्याच चर्च मधे पादरीबाबा होते ते. गेली ३० वर्ष. त्यांचं आय-डी कार्ड दाखवलं पोलिसाला. त्याने वय विचारल्यावर त्यांनी ७८ असं सांगितलं. अरे म्हणजे साधारण माझ्या आजीच्याच वयाचे की. माझे आजोबा मी खूप लहान असतानाच गेल्याने आजी म्हणजे आमचं सर्वस्व होतं. आजी जायच्या आधीचा एक महिना सोडला तर कायम अगदी ठणठणीत होती. बाहेर पडली नाही तरी घरात अगदी व्यवस्थित फिरायची, स्वतःची कामं स्वतः करायची. म्हणजे ८०-८२ वर्षांची झाली तरी शेवटचा एक महिना सोडला तर म्हातारी वगैरे कधीच वाटली नाही.. अरे हो.. आता अजुन १५-२० वर्षातच आई-बाबा पण साधारण त्याच वयाचे होतील की म्हणजे म्हातारे होतील. कोणी सांगावं त्यांच म्हातारपण ८० मधे न येता थोडं आधी सत्तरीतच येईल. नको त्या दिशेला विचार वळतायत हे कळत असून ही मी त्यांना थांबवु शकत नव्हतो. आजी बरोबर तिच्या जवळपास निदान तिची मुलं म्हणजे माझे काका, आई-बाबा, तरी होते. पण आमच्या आई-बाबां बरोबर कोण आहे? त्यांना पण आमच्या बरोबर राहावसं वाटत असणारच ना . नातवला किती दिवस वेबकॅम वरुन बघणार ते? आणि त्यांचं म्हातारपण मला वाटतंय तसं सत्तरी ऐवजी साठीतच आलं तर? म्हणजे आत्ताच.. अरे बाप रे.. विचारांच्या नादात कधी हॉटेल मधून बाहेर पडलो कळलंच नाही. त्याच विचारांनी रस्त्यावरून चालत होतो. २ मिनिटे डोकं जरा दाबून धरलं, चेहर्यावरून हात फिरवला आणि पुन्हा चालायला लागलो.. जागा बदलली, रस्ता बदलला तरी विचार काही बदलत नव्हते.

*****
श्या.. बस झाल.. परत जायला हवं आता.. एक्सपोजर, करियर, लाइफ स्टाइल, एक्सपिरियन्स, मुलांच्या भवितव्यासाठीची तयारी अशी कितीही गोंडस वेष्टणं गुंडाळण्याचा प्रयत्न आपण केला ना तरी आपल्याला पण माहीत असतं की आतली गोळी शेवटी वेगळीच आहे, एकच आहे आणि ती म्हणजे पैसे, अजुन थोडे पैसे, अजुन थोडे जास्त पैसे.
हट्ट.. बस झाल.. कितव्यांदा हा असा विचार करतोय मी गेल्या २ वर्षात? परतीचा मार्ग एवढ्या जवळ नाही हे माहीत असूनही?? तसं म्हटलं तो तेवढा लांबही नाहीये.

ते मागे "सागरा प्राण तळमळला" कोणी लावलंय रे?? बंद करा बघू ते आधी.. की माझ्या मेंदूतच वाजतंय ते?

*****

पार्टनर म्हणाला "अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही"
"असं कसं ?"
"माणूस नुसता काव्यावर जगात नाही. मागची बाजू व्यवहाराचीच"
"....."
"तू जी वेष्टनं म्हणतोयस ती खरोखर नुसतीच वेष्टण आहेत का? असं असेल तर ताबडतोब परत जा. पण तसं नसेल तर ? ती गोळीला पूरक असतील तर? किंबहुना गोळीचाच एक भाग असतील तर? गोळीलाही बिलाच्या कागदासारखीच मागची बाजू आहे हे विसरू नकोस. इतरांसाठी नाही पण निदान स्वतःसाठी तरी !!

(व पुं च्या सदाबहार पार्टनर मध्ये माझी सरमिसळ केल्याबद्दल कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे.)

Monday, December 14, 2009

हलके-मिस्ट झालासे कळस !!!

खरं तर राजू परुळेकरच्या (माझ्या याआधीच्या लेखात मी त्यांचा उल्लेख आदरार्थी करत होतो. पण आता ते त्या योग्यतेचे वाटेनासे झालेत ) दुसर्‍या हलके-मिस्ट्रीला उत्तर देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. सगळ्यांनी त्याच्या लेखावर (आणि त्याच्यावर) एवढी टीका केली होती की त्याचं त्यावर उत्तर येणार हे तर नक्की होतच. आणि ते त्याप्रमाणे आलंच. मीही सवयीप्रमाणे ते वाचलं. सचिनवरील टीकेने बरबटलेली ती हलके-मिस्ट्री  वाचून मनातल्या मनात त्यांची (संस्कार आड आल्याने एकेरीवरून पुन्हा आदरार्थी बहुवाचानाकडे वळतोय.. अरे(रे) संस्कार संस्कार)  कीव यायला लागली. आणि शेवटी तर टीका करता करता साहेबांची भीड एवढी चेपली कि ते स्वतःची तुलना चक्क तुकाराम महाराजांशी करायला लागले. हे जरा फारच "परुळेकरी" होत होतं.. आता तुकाराम महाराजांचा भक्त असण्यासाठी वारकरी असाव लागत नाही किंवा सचिनवर प्रेम करण्यासाठी क्रिकेटर (परुळेकरी भाषेत खेळ्या) असाव लागत नाही. पण यापैकी कोणाचाही अपमान होत असेल तर तुकोबारायांनीच सांगितल्याप्रमाणे "तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैंजारा" हा मार्ग स्वीकारावा लागतो .. आणि त्यासाठीच हा पुनःश्च पत्रप्रपंच..


मी दोन्ही हलके-मिसट्रया पुन्हा पुन्हा वाचून बघितल्या पण सगळ्या unsung aani unhonoured हिरोंना स्मरून सांगतो की सचिनबद्दलचा तीव्र आकस आणि सचिनसारख्या निरुपद्रवी आणि इझी टार्गेट (ऑस्ट्रेलिया  मध्ये भारतीयांवर हल्ले का होतात? कारण तेही तिकडे इझी टार्गेट असतात. ते फिरून प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करत नाहीत) असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून जास्तीत जास्त फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग हे दोन्ही केमिसट्रया मधले सामाईक मुद्दे सोडले तर दुसरी केमिस्ट्रीला मला फारच विस्कळीत आणि संदर्भहीन वाटली.. का ते सांगतो. निदान मला तरी दिसलेले त्यांचे प्रमुख मुद्दे असे.


१. तो  "खेळ्या" उर्फ "ग्लॅडिएटर" आहे .. त्याचं  अधिकाधिक  क्रिकेट  खेळणं आणि  अधिकाधिक  सेन्चुर्‍या  मारणं हे  राज्यसंस्था आणि समाज  यांना शोकांत शेवटाकडे नेणारं आहे.


२. त्याने फेरारीचा कर भरला असता आणि मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे असं सांगितलं असतं तर परुळेकरी भाषेत त्याला चांगला भारतीय ग्लॅडिएटर म्हणता आलं असतं. (म्हणजे एवढ करून पुन्हा 'ग्लॅडिएटर'च बरं का )


३. त्याने (पुलेला गोपीचंद प्रमाणे) पेप्सीच्या जाहिराती  नाकारल्या  असत्या  आणि (मुंबईतील मुले दत्तक ना घेता) स्टीव वॉ प्रमाणे कोलकात्यातील मुले दत्तक घेतली असती तर तो परुळेकरी डिक्शनरी प्रमाणे स्वार्थी व्यक्तिमत्व न  राहता सेल्फलेस सोल म्हणून मान्यता पावला असता.


४. त्याच्याकडे मर्यादेपलीकडे पैसा आहे आणि तो त्याने (टाटा, पु ल, रॉकफेलर, गेट्स दाम्पत्य यांच्या प्रमाणे) सचिन तेंडूलकर फाउंडेशन काढून त्या फाउंडेशन कडे सुपूर्द करायला हवा होता. आणि त्याने तसं केलं असतं तर रा रा परुळेकरांनी त्याच्या सामाजिक बांधिलकीला जाहीर अप्रुव्हल दिलं असतं


(मी खेळ्या, ग्लॅडिएटर, पत्रकार, विचारवंत यापैकी काहीही नसणारा, पेप्सी पिणारा, मुलांना दत्तक न घेतलेला, हेमलकसात काम न करणारा, कुठल्याही फाउंडेशनचा नसणारा असा एक तुच्छ पामर असल्याने माझी मते ही नक्कीच चुकीची असणार याची परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री मला आहे आणि माझी ही तमाम चुकीची मते बदलण्यात ते नक्कीच यशस्वी होतील याचीही मला परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री ........ वगैरे वगैरे.....)


आता पुन्हा एकदा परुळेकर साहेबांच्या मुद्द्यांना मी माझ्या नसलेल्या बुद्धीबाहुल्ल्ल्याने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

१. सचिनच्या क्रिकेट खेळण्यामुळे समाज रसातळाला जात असल्याने तो आपली बॅट म्यान करून घरी बसला असता तरी गांगुली, द्रविड, धोनी, युवराज, सेहवाग, गंभीर, हरभजन, झहीर, इशांत, हे सगळे खेळत राहिलेच असते ना? का सगळ्यांनीच घरी बसायचं आणि भारतीय टीम आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरू द्यायची नाही आणि समाज रसातळाला जाण्यापासून रोखायचं?? मी खरंच प्रचंड बुचकळ्यात पडलो असल्याने रा रा परुळेकर "सचिनच्या बॅटिंग करण्याने समाज कसा काय आणि का रसातळाला जातो" हे अगदी सोप्प्या भाषेत (तिसर्‍या केमिस्ट्रीत) सांगतील का?"


२. हरभजन, धोनी, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी हे आणि परुळेकरांच्या परिचयातल्या असंख्य राजकारण्यांनी इतर अनेक महागड्या गाड्या कर चुकवून आणल्या आहेत. त्यावर परुळेकरांनी किती शाई खर्ची घातली आत्तापर्यंत? आणि परुळेकर साहेबांनी सचिनचं ते वाक्य पुन्हा एकदा तपासून बघाव. अर्थात यावर मी माझ्या पहिल्या पत्रात उत्तर दिलेलं आहेच.


३. सचिनने पेप्सीच्या जाहिराती नाकारल्या असत्या तरी पहिल्या मुद्द्यातील सगळ्या खेळाडूंनी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अमिताभ पासून अक्षय कुमार पर्यंत सगळे जण त्या जाहिराती करत राहिले असतेच त्याचं काय? आणि ज्या अर्थी परुळेकर साहेब सचिनच्या थातुरमातुर (म्हणजे काय रे भाऊ?) सामाजिक कार्यांबद्दलचा उल्लेखही  न करण्याचा सज्जड दम भरतात त्या अर्थी तो सामाजिक कार्य करतो हे त्यांनाही माहित आहे फक्त त्याचा उल्लेख त्यांच्या लेखाला आणि हेतूला बाधक आणि अडचणीचा ठरत असल्याने तो करू नये असे त्यांचे म्हणणे आहे काय?


४. लेखात उल्लेखलेली सगळी फाउंडेशन्स हि त्या त्या व्यक्तींनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस काढली आहेत. राजे, सचिन अजून चाळीशीचाही नाहीये. आणि प पु परुळेकर साहेबांना माहित नसल्यास सांगतो सत्यमची पण "सत्यम फाउंडेशन " आणि "बायराजू फाउंडेशन" अशा दोन संस्था होत्या. त्याचं काय झालं पुढे हे जग जाणतंच.


हुश्श .. संपला बाबा एकदाचा प्रश्नोत्तराचा तास (त्रास!!)


आता थोडे प्रश्न मी विचारतो परुळेकर काकांना.... परुळेकरांनी राजकारण्यांवर लिहिलेल्या केमिसट्रयांमध्ये बहुतांशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते का आहेत हा प्रश्न माझ्या बालमनाला पडला आहे. विधानसभा/लोकसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे पडद्यामागे गुलुगुलू चालू असणे आणि परुळेकर (शिवसेनेचे समर्थक असल्याने... आता माहित नाही) यांनी राष्ट्रवादी नेत्यांचे गोडवे गाणे याला निव्वळ योगायोग समजायचं का?

मिडिया नेहमीच सचिन, त्याच्या क्रिकेटची २० वर्षे याला अवास्तव महत्व देते असे परुळेकरांना वाटत असेल तर त्यांनी सचिनला नावे ना ठेवता डायरेक्ट मिडियावरच हल्लाबोल का नाही केला? मिडिया सचिनला अवास्तव महत्व देते तर त्यात सचिनचा काय दोष ? दोष माध्यमांचाच ना??? मग परुळेकरांची लेखणी मिडीयावर का नाही सरसावली?? अरे हो पण परुळेकर पण मिडियावालेच पडले ना. मग जळात राहून माशाशी वैर कस पत्करणार बुवा. उगाच खरं बोलून आणि मिडीयाचे दोष दाखवून आपलं (२० वर्ष पूर करू घातलेलं ) करिअर का बिघडवा? राजे, तेथे पाहिजे जातीचे... म्हणूनच आचार्य अत्रे, नीलकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे एकदाच निर्माण होतात. बाकीचे सगळे असतात ते परुळेकर, राउत आणि (बाळ नाही) "बाल" ठाकरे.

आणि सचिनला टार्गेट केल्याचे २ फायदे.. तो बिचारा उलटून बोलत पण नाही आणि टीका करणार्‍याला (तुमचीच) मिडिया भरपूर प्रसिद्धी पण देते. एक उदाहरण देतो राज ठाकरेंचं. (मला राज ठाकरे यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे हे विसरू नये). राज ठाकरे सगळ्यात जास्त राष्ट्रीय मिडीयाच्या चर्चेत आले ते कधी पासून माहित्ये? सांगतो. मनसेने टॅक्सीवाल्यांना मारलं, रेल्वे परीक्षांना आलेल्या भैयांना मारलं, तलवारी वाटण्याची भाषणं केली त्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन वर शाब्दिक हल्ला केला. रातोरात त्यांचं नाव सगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्सवर (आधी पेक्षाही जास्त ठळकपणे ) झळकू लागलं. ही त्यांची स्ट्रॅटजी होती. पुन्हा सांगतो मला राज ठाकरेंबद्दल पूर्ण आदर आहे पण लोकप्रियता आणि जनाधार मिळवण्यासाठी त्यांना अमिताभ बच्चनवर शाब्दिक हल्ला करावा लागला हे सत्य मी तरी नाकारू शकत नाही .. एक्झॅक्टली तीच स्ट्रॅटजी वापरून परुळेकर सचिनला लक्ष्य करताहेत..

त्यांचं कुठलही पुस्तक मी वाचलेलं नाही (पण ई टीव्ही वरील संवाद चे जवळपास ७०% एपिसोड्स आणि त्यांचे राज, उद्धव, विजय तेंडूलकर यांच्यावरील आणि इतरही अनेक लेख वाचलेले आहेत ) पण त्या पुस्तकाचं मार्केटिंग करण्याचा किंवा मी कसा इतका हजारो माणसांना भेटलोय आणि मी कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना असा एक उगाच संशय येऊन गेला.

परुळेकर जसे अजिबात क्रिकेट ना बघता, किंवा सचिनची बॅटिंग  न बघता त्याच्यावर घणाघाती हल्ला करू शकतात  तर  म्या पामराने त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याचा म्हणजे त्यांची पुस्तके न वाचता त्यांच्या विषयी बोलण्याचा (मी निदान त्यांनी लिहिलेले लेख आणि "संवाद" तरी पहिले आहेत म्हणा) अल्पस्वल्प प्रयत्न केला तर ते वाईट वाटून घेणार नाहीत याची नक्की खात्री आहे.

अजून एक म्हणजे अरुंधती जोशींच्या मताला/लेखाला उत्तर देण्या ऐवजी "अमेरिकेतल्या मराठी माणसांना काय कळतंय, त्यांनी गप्प बसावं.. उगीच "आमच्या" भारतातल्या गोष्टींत लुडबुड करू नये" हा जो सूर आहे ना तो तर अतिशय उबग आणणारा आहे. (मी पण अमेरिकेतूनच लिहित असल्याने त्यांनी माझं उत्तरही तो गंड मनात ठेवून वाचलं तर मग विषयच संपला)

परुळेकरांचे (वर उल्लेखिलेले आणि इतरही अनेक) अप्रतिम लेख वाचून, लेखांच्या मांडणीवर आणि त्यातल्या मुद्द्यांवर बेहद्द खुश होऊन मी अनेकदा तोंडात बोटे घातली होती.. पण सचिनवरच्या या २  हलके-मिसट्रया  वाचून तीच बोटे तोंडातून काढून खिशात लपवून ठेवावीत कि त्यांच्याच दिशेने उगारावीत या संभ्रमात असताना पर्याय २ चा प्रभाव अधिक ठरल्याने पत्रोत्तर दिले. केवळ सचिनचा, त्याच्या खेळाचा,त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या गुणांचा अतिशय तीव्र चाहता म्हणूनच नव्हे तर एक मराठी माणूस म्हणून पण मी त्यांचा आणि त्यांच्या लेखाचा अनेकवार निषेध करतो. मूर्तीभंजन केल्याचा आव आणत आणत फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करता करता जनक्षोभाच्या रेट्याने त्यांचे लेखणीभंजन न होवो हीच सदिच्छा


जाता जाता : (पेप्सीच्या जाहिराती करत असल्याने आणि फेरारीचा कर माफ करण्या विषयी विनंती केल्याने) परुळेकर यांना सचिन जर एक महान माणूस वाटत नसेल तरी त्याच्या महान खेळ्या (परुळेकरी डिक्शनरीतला "खेळ्या" नव्हे, "खेळी"चे अनेक वचन या अर्थी), आकडेवारी, संदर्भ हे सर्व नजरेखालून घातल्यावर परुळेकरांना सचिन हा एक सार्वकालिक महान खेळाडू आहे हे तरी नक्की जाणवेल. तेव्हा पुढच्या कुठल्याही लेखात त्यांनी आमच्या सचिन तेंडूलकरचा उल्लेख खेळ्या, ग्लॅडिएटर असा करू नये हि त्यांना कळकळीची विनंती.. !!


(हाच लेख मी माझी प्रतिक्रिया म्हणून राजू परुळेकर यांच्या इ-मेल आयडी आणि लोकप्रभाच्या इ-मेल आयडी वर ही पाठवली आहे.)

Friday, December 11, 2009

माझे (बदलते) संगीतप्रेम :D

मी शाळेत असताना "आशिकी"च्या गाण्यांनी आमच्या पिढीला वेड लावले होते. नदीम-श्रवण म्हणजे सर्वोत्कृष्ठ संगीतकार असा आमचा ठाम समज होता. आणि ज्याला हे मान्य नसेल त्याच्या कडे विचित्र नजरेने पाहायचो आम्ही. नंतर "मैने प्यार किया" ने "आशिकी" ची जागा घेतली. एक काळ असा होता की मी झोपलो नसेन आणि अभ्यास करत नसेन तर मी फक्त MPK ची गाणी ऐकत असायचो. त्यानंतर अचानक ए आर रेहमानने दणक्यात एन्ट्री करत रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से अशा जबरदस्त अल्बम्सची रांग लावली आणि मी आपोआपच त्याचा फॅन झालो... इतरांप्रमाणेच. नंतर मध्ये एकदा हेवी मेटलचं वेड लागलं आणि Sepultura माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये add झाले. Sepultura च्या ५०० रु ची एक अशा ३ सीडीज विकत घेतल्या, त्यांची चिक्कार गाणी ऑनलाइन ऐकली, पहिली. गेल्या वर्षी आलेल्या रॉक-ऑनने पण अशीच झिंग आणली होती. गेले ६ महिने सतत तीच गाणी ऐकली, मोबाईल रिंग टोन, अलार्म टोन, SMS टोन सगळ रॉक-ऑन मय होत. अर्थात जुनी गाणी ऐकायला तर मी केव्हाही तयार असायचो, असतो. आणि त्यातल्या त्यात किशोर/आर डी/ देव आनंद असलेलं किंवा आपल्या हृदयनाथ मंगेशकरांचं कुठलंही गाणं म्हणजे तर स्वर्गसुखच. ट्रीप/ट्रेक मध्ये, कोणाच्या वाढदिवसाला, मित्रांबरोबर/cousins बरोबर रात्री जागवताना किंवा अगदी सहज गुणगुणताना सुद्धा या गाण्यांपैकीचं कुठलं तरी गाण म्हंटल जायचं. अगदी काल परवा पर्यंत. पण अचानक काहीतरी बदललंय असं माझ्या लक्षात आलं. परवा ऑफिस मधून घरी येत असताना सहज एक गाणं गुणगुणत होतो आणि मला एकदम माझंच आश्चर्य वाटून गेल कारण ते माझ्या नेहमीच्या फेवरेट लिस्ट मधलं नव्हतं.... आणि अचानक मला क्लिक झालं कि सध्या मी हे किंवा असंच एखादं गाणं गुणगुणत असतो. . त्यांचे विडीयो खाली टाकतोय. अर्थात कुठल्याच विडीयो मधलं आनिमेशन उच्च कोटीचं नाही (बायको ३-डी आनीमेटर असल्याने मला पण थोड थोड कळायला लागलाय आनिमेशन मधलं. म्हणूनच जीभ उचलून टाळयाला लावायचं धाडस करतोय. ) किंवा गाणीही काही ग्रेट अशी नाहीत. पण बाळकोबांना आवडतात.

सांगू काय सांगू काय



एका माकडाने काढलंय दुकान



एक मुलगा गेला तळ्याच्या काठी



ससा तो ससा कि कापूस जसा



सांग सांग भोलानाथ



Old MacDonald had a farm


त्याच काय आहे कि रात्री आमचा डॉन लवकर झोपतच नाही. मग त्याला कडेवर घेऊन फिरवावं लागत. तरीही नाही झोपला तर मग हि गाणी त्याला लावून द्यावी लागतात. मग स्वारी एकदम खुश होते. आणि हळू हळू छातीला बिलगून झोपायला लागते. मध्ये अनुजाने कुठेतरी वाचलं की रात्री मुलं लवकर झोपत नसतील, किरकिर करत असतील तर त्यांना काही क्लासिकल, instrumental ऐकवावं. म्हणून काल हे पण ट्राय करून झालं.

पं. हरिप्रसाद चौरसिया आणि झाकीर हुसेन जुगलबंदी


पण हळू हळू आमच्या हे लक्षात यायला लागलय की साहेब सगळ ऐकतात, बघतात पण त्यांना हव तेव्हाच (म्हणजे २ च्या आसपासच) झोपतात.

थोडक्यात सध्या रेहमान, रॉक ऑन, RD, किशोर या सगळ्यांची आमच्या बाळासाहेबांनी विकेट काढलीये आणि आमचं संगीतप्रेम आपोआपच बदलत चाललय. (पुढची पोस्ट मी बोबड्या भाषेत नाही टाकली म्हणजे मिळवलं :) )

झिप झॅप ........ झो S S S प !!!

परवा अस्मादिकांचा दिवस नेहमी प्रमाणेच उगवला. अर्थात आधीचा दिवस पण नेहमी प्रमाणेच मावळला होता. म्हणजे अंथरुणाला पाठ टेकायला १:३० वाजून गेला.. रात्रीचा.. (उगाच am/pm चा गोंधळ नको व्हायला... तुमचा... आणि माझाही थोडा..) आमच्या छोट्या डॉन च्या कृपेने झोपायला जवळपास २ वाजले. (आणि हे अस बरेच दिवस चालू होत. शेवटी त्याची सगळी कसर आज भरून निघाली.) कसाबसा ८ ला उठलो सकाळी आणि धडपडत, अर्धवट झोपेतच १० च्या सुमारास पोचलो ऑफिसला. (ही अतिशयोक्ती नाही).. अर्थात ऑफिसमध्ये जाऊन कामाला लागलं कि काही विशेष वाटत नाही झोपेचं किंवा दमल्याचं. साधारण १ च्या सुमारास काम ब-यार्पैकी संपवून जरा निवांत वेळ मिळतो ना मिळतो तोच एका कलीगने पिंग केलं की आत्ता कॉन-कॉल आहे लगेच. जॉईन होशील का? आणि वेब-प्रेझेन्टेशन ची लिंक पण दिली. अस्मादिक झाले जॉईन. प्रेझेन्टेशन छान होत अगदी. नवीन backup प्रोडक्टची छान माहिती होती त्यात. सुरुवातीला मी लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होतो आणि यशस्वीही होत होतो. पण जेमतेम १५ मिनिटेच. त्यानंतर इतका वेळ राखलेला संयम सुटला. झोपेला अडवून धरण्याचे सगळे प्रयत्न धुळीला मिळाले. प्रचंड झोप यायला लागली. अर्थात ऑफिस मध्ये झोप येणे हे काही मला नवीन नाही ;).. पण यावेळी काहीतरी भयंकरचं प्रकार होता. मी अक्षरशः पेंगत होतो. जागा राहण्यासाठी अक्षरशः धडपडत होतो. समोरच्या स्क्रीन वर काय चाललय हे कळून घेण्यासाठी आणि एकीकडे मान वाकडी करून कान आणि मानेच्या मध्ये धरलेला रिसिव्हर खाली पडू नये म्हणून मी अगदी जंग जंग पछाडत होतो. काय काय केलं नाही त्यासाठी. २ चुइंगगम्स टाकली तोंडात, डोळे चोळले, स्क्रीन थोडा वर केला जेणेकरून मान वर करून बघायला लागेल, खुर्चीची उंची कमी केली जेणेकरून मान वर ......... पण नाहीच. Benadryl घेतल्यासारख किंवा चरस गांजा प्यायल्यासारखी झोप येत होती. (अर्थात स्वानुभव शून्य, निव्वळ ऐकीव वर्णन. benadryl चं नव्हे हो , गांजाचं. एकदा benadryl घेऊन मी जवळपास १४-१५ तास गाढ झोपलो आहे. असो. विषयांतर होतंय. (विषय काय होता आपला? कुठे होतो मी? पुन्हा झोप येतेय कि काय? ;) ). झोप यायला लागली तेव्हाच खरतर पटकन बाहेर जाऊन एक राउंड मारून किंवा तोंडावर गार पाणी मारून झोप घालवता आली असती. पण या सेशन रुपी राक्षसाने आणि त्याच्या रिसिव्हर आणि स्क्रीन रुपी २ यमदुतांनी मला खुर्चीवर बांधून टाकल होत. नशिबाने ते इंटर अक्टिव सेशन नव्हत. मी म्हंटल जरा वेळ बडबडून (म्हणजे बडबड ऐकून) सेशन संपेल. पण कसलं काय. माझ्या आयुष्यातले चांगले २ तास कुरतडल्या नंतर त्यांनी announce केलं कि आता QnA सेशन आहे. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकतात. (QnA सेशन कधी संपणार असा प्रश्न विचारावा अस हळूच माझ्या मनात डोकावून गेल.). त्यानंतर आमच्या टीम मधल्या अतिउत्साही कलीग्सनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. (ज्याने मला लॉगीन व्हायला सांगितलं होत त्याच्यावर दगडांचा भडीमार करावा की विटांचा या प्रश्नात मी स्वतःला गुंतवून ठेवून झोप पिटाळण्याचा व्यर्थ प्रयत्न मी करून पहिला. पण डुलकी लागून जाग आली तेव्हा कळलं की तो प्रयत्नही फसला होता.)
शेवटी एकदाची ती मीटिंग संपली. आमच्या manager ने सगळ्या टीमच्या वतीने त्या प्रेझेंटरचे आभार बिभार मानले. आणि शेवटी हे पण म्हणाला कि "we had a little quiet gentleman today, who didn't ask much(???) questions". म्हणजे अस्मादिकच एवढ न कळण्याएवढा काही मी झोपेच्या आधीन झालो नव्हतो. मी पटकन आजूबाजूला कुठे हिडन कॅमेरा वगैरे नाहीयेना ते बघितलं. संपली मीटिंग एकदाची. कसाबसा दिवस ढकलला आणि आज रात्री लवकर झोपायचंच असा ठरवून घरी गेलो. पण कसलं काय आज पण डॉनच जिंकला आणि आमच्या झोपेचे दीड वाजले. आता वीकेंडला जास्तीत जास्त झोप पूर्ण करून घ्यायची या (गुलाबी!!) विचारांनी आत्ताच मला गुदगुल्या व्हायला लागल्यात.. बघूया कस जमतंय ते :)

(ब्लॉग लिहावा कि झोप काढावी अशा द्विधा मनःस्थितीत सापडल्यावर नेहमीच ऑप्शन # २ जिंकल्याने ब्लॉग टाकायला उशीर झाला.)

Friday, November 20, 2009

अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !!

आत्ताच राजू परुळेकरांची सचिनवरची अल्केमिस्ट्री वाचली. सचिनला नावे ठेवून मोठे, प्रसिद्ध होण्याचा किंवा मोठ्या माणसांना आपल्या अज्ञानामुळे दुर्बोध ठरवून प्रसिद्धीचा झोत आपल्यावर वळवण्याचा दुष्फळ प्रयत्न करणाऱ्या अनेक कपाळ करंट्यान्च्या टीम मध्ये राजू परुळेकर याचंही नाव झळकल तर. सचिनचं कौतुक केल म्हणजे Dr हिम्मतराव बावस्कर किंवा मंदा/प्रकाश आमटे यांचा अनादर केला अस कुठे होत? शेतकरी आत्महत्या करतात यासारखी दुसरी गोष्ट नसेल सरकारला आणि कृषी मंत्र्यांना मान खाली घालायला लावणारी. पण सरकार ते seriously घेत नाही, आत्महत्या, load shading वर उपाय शोधात नाही यात सचिनचा काय दोष? परुळेकर साहेब, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरहि आपण स्वतः आपल्या घरात दोन्ही वेळेला भरपेट जेवताय ना? आपण का नाही करत काही? आपल दोन्ही वेळ च जेवण आणि शेतकयांच्या आत्महत्या यांचा संबंध जोडणं हे जेवढ चुकीच आहे तेवढच सचिन आणि शेतकरी यांचा संबंध जोडण मूर्खपणाच आहे. सचिन जेवढ्या रन्स काढतो, सेन्चुर्या मारतो तेवढे शेतकरी जास्त आत्महत्या करतात असा काहीसा गैरसमज आपला झालेला नाहीये ना ? उगाच रोमन राज्यकर्ते, त्यांचे gladiators यांचे दाखले देऊन काहीतरी भारदस्त लेख लिहिल्याचा आव आपण आणत असलात तरी ते केविलवाणच जास्त वाटतंय हे कदाचित आपल्या लक्षात येत नसेल. आता सचिन हेमलकसात जाऊन क्रिकेट खेळला नाही,सेन्चुर्या ठोकल्या नाहीत म्हणजे त्या कमीपणाच्या झाल्या का? म्हणजे हेमलकसाच्या आवाराबाहेर कितीही आणि काहीही महान गोष्टी, व्यक्ती घडल्या तरी त्या हेमलकसा मध्ये किंवा इतर प्रयोगशाळांच्या बंद भिंतींआड घडल्या नाहीत (परुळेकरांचेच शब्द) त्यामुळे त्याच महत्व कमी होतं का? हेमलकसा ही यश मोजण्याची एकमेव फुटपट्टी असू शकते का? हेमलकसा आणि आमटे दाम्पत्याबद्दल मला अतीव आदर आहे आणि त्यांचा कुठेही यत्किंचितहि अपमान करण्याचा हेतू नाही. प्रत्येक मनुष्याच्या जगण्याच ध्येय हे ठरलेलं असत किंबहुना तो ज्या गोष्टीत सर्वोत्तम असतो ती गोष्ट पुन्हा पुन्हा, अजून, अधिक तीव्रतेने आणि योग्य पद्धतीने (improvisation) करणं आणि ते आपल्या जीवनाचं ध्येय मानणं यात चूक ते काय? परुळेकर साहेब, आपण पत्रकार आहात. आपल्या पत्रकारितेने किती शेतकऱ्यांचे जीव वाचतात ? किंवा आपण का नाही जाऊन सचिन सारखी batting करत किंवा मग ISRO मध्ये जाऊन संशोधन करत? नाही. कारण आपण त्यात सर्वोत्तम नाही आहात. आपल्याला पत्रकारिता चांगली जमते (??) ती आपण करता सचिनला क्रिकेट चांगल जमत तो क्रिकेट खेळतो. अमुक तमुक पत्रकाराने पत्रकारिता करण्यापेक्षा ISRO मध्ये जाऊन rockets का नाही उडवली किंवा हेमलकसा मध्ये जाऊन आदिवासी लोकांविषयी कार्य का नाही केल अशी बाष्कळ बडबड सचिनने केल्याच मी तरी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. सचिन, Dr बावस्कर, आमटे दाम्पत्य हे सगळे अशा गोष्टींच्या पार पुढे गेलेले आहेत. फार महान लोक आहेत ते. पण तुमच्या सारख्या पत्रकारांना ते जमण किती कठीण आहे ते दिसतच आहे.
राहता राहिला विषय सचिनने मुंबई संबंधी केलेल्या विधानाचा. यात त्याची चूक नाही तर त्याला प्रश्न विचारणार्याची चूक आहे. किंबहुना तुम्हीच तुमच्या प्रश्नाच उत्तर स्वतः च दिलेलं आहे. सचिनला appendix च operation करायला सांगितलं तर तो चुकणारच. कारण ते त्याच क्षेत्रच नाही. त्याप्रमाणेच मुंबई कोणाची हे ठरवण हे त्याच काम नाही तर राजकारण्याचं आहे आणि ते ते योग्य प्रकारे करत नसतील त्यात सचिन चा काय दोष? पत्रकारांना हि सवयच असते. चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचे आणि ती व्यक्ती काही बोलली कि त्यातील चुकीचेच शब्द निवडून ते छापून आणून मग त्या महान माणसाविषयी बोंबा मारायच्या. पण तुम्ही तरी काय करणार? ते शेवटी तुमच्या पोटापाण्याचं साधन आहे ना. आणि दुसर म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सचिन हा आंतरराष्ट्रीय आहेच त्याने कितीही तसा राहण्याचा किंवा न राहण्याचा प्रयत्न केला तरीही. राज ज्याप्रमाणे म्हणतो कि महाराष्ट्र हे माझ कार्यक्षेत्र आहे आणि मी त्यासंबधीच विचार करणार आणि बोलणार आणि आपणही ते मान्य करतो तसच सचिन हा ग्लोबल आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल. (आणि तुम्ही मान्य नाही केलत तरीही तो ग्लोबल आहे आणि राहणार हे सत्य आहेच आणि साऱ्या जगाने ते मान्य केलेलं आहे .)
आणि सचिनच्या खेळाला नाव ठेवण्यापेक्षा मी तर म्हणेन कि हे तुम्ही स्वतःचं महद्भाग्य समजा कि सचिन ज्या काळात क्रिकेट खेळला त्या काळात तुम्ही या पृथ्वीतलावर अस्तित्वात होतात जेणे करून तुम्हाला त्याच्या खेळाचा आनंद उपभोगता आला. तुम्हाला चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती.
राहता राहिला सचिनच्या खेळाचा विषय. तो गेली २० वर्षे खेळतोय, फलंदाजीतले नवनवे इतरांना नंतरची अनेक वर्ष असाध्य ठरतील असे विक्रम रचतोय त्याला खेळू देत. आणि हो .. सचिन, तू आज च आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३०,००० धावांचा टप्पा गाठलास. त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. तू (इतरांकडे लक्ष न देता) असाच खेळत राहा .. !!!

Thursday, November 12, 2009

तेव्हा कुठे गेला होता स.पा.सुता तुझा धर्म अर्थात.... आपला तो बाब्या... !!

अबु च्या "धोपट" विधी (म. टा.चा शब्द :-) ) नंतर अपेक्षेनुसारच बरीच चर्वितचर्वण, चर्चा, लेख, मुलाखती, छोटे दंगे, जाळपोळ सगळंच झालं. मनसैनिकांनी अबु आझमीला फटकावलं ते चुक की बरोबर, का फटकावलं, सभागृहात न फटकावता रस्त्यावर फटकावायला हवं होतं की हे काहीच न करता सत्याग्रही मार्गाने धरणं देत बसून राहायला हवं होतं या सगळ्या वादविवादात आत्ता मी शिरत नाही कारण तो आजच्या लेखाचा मुद्दा नाही.

अबु आणि सपाचा (मी चुकुन सापाचा टाइप करत होतो. कीबोर्ड पण मनकवडा रे बाबा ;-) ) मराठीतून शपथ घेण्याला विरोध होता तो या दोन मुद्द्यांवर की

1. त्याला मराठी येत नाही आणि
2. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि त्यामुळे हिंदीत शपथ घेण्याचा त्याला अधिकार आहे.

दोन्ही प्रश्नांची उत्तरे तशी सोप्पी आहेत. प्रथम म्हणजे मराठी येत नसली तरी तो ती शिकु शकला असता किंवा अगदीच सुवर्णमध्य काढायचा झाल्यास शपथेची पहिली ओळ मराठीत आणि उरलेली शपथ हिंदीत घेऊ शकला असता. (सत्यनारायाणाच्या पुजेत आपले भटजी अध्याय वाचताना पहिली ओळ संस्कृत मधे वाचतात आणि त्यापुढचा अध्याय मराठीत सांगतात नाही का.. अगदी तसंच) अर्थात असे करण्याला घटनात्मक आधार आहे का ते मला माहीत नाही पण हे न चालण्यमागचं लॉजिक माझ्या सामान्य मेंदूला तरी काही दिसत नाही. असो.

दुसरा प्रश्न हा मुळातच चुकीचा आहे. बर्‍याच जणांना माहीत असेल (नसेल) की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही. ती (वन ऑफ द) अधिकृत भाषा आहे. किंबहुना कुठल्याही भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा नाही. आहेत त्या सगळ्या अधिकृत भाषा. भाषावार प्रांतरचनेनुसार प्रत्येक राज्याची राज्यभाषा हीच त्या राज्याची अधिकृत भाषा आहे. आणि कुठलीही एकच अशी राष्ट्रभाषा नसल्याने राज्याचा व्यवहार करताना (मंत्रीमंडळाचे कामकाज, शपथविधी इ. इ.) ते राज्यभाषेतच व्हायला हवेत. खरं ना? पण आझमीने राज्यभाषेचं अस्तित्व, महत्व नाकारून हिंदीतून शपथ घेण्याचा हट्ट धरला आणि उपस्थित गांधारी, धृतराष्ट्रांच्या साक्षीने तो फळालाही नेला.. आणि त्याउप्पर जाउन मुलायमने अबु कसा बरोबर आहे, "मनसेने भारतीय संविधान का अपमान किया है" तर अमरसिंगाने एक पायरी/पातळी खाली उतरून "हिंदी हमारी माँ है और आज हमारी माँ नंगी हो गई" असल्या बिनडोक उद्गाराननी हिंदी चॅनेल्सच्या रिपोर्टर्सना बाइट्स दिले. तर आता या मुल्लू, अमुच्या टीमला आपण एक प्रश्न विचारूया..

बरोबर १३ वर्षांपूर्वी उ. प्र. च्या विधानसभेतही शपथ घेण्याच्या भाषेवरून असाच वाद झाला होता. तेव्हा स. पा. च्या पिलावळीतले दोन नेते मियाँ आलम बादी आणि मियाँ वासिम अहमद यांनी आझमी सारखाच वाद घातला होता. त्यांना हिंदीतून शपथ घ्यायची नव्हती तर उर्दूतून घ्यायची होती. उ. प्र. मधे उर्दू बोलणार्यांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यामुळे उर्दूला तिथे द्वितीय क्रमांकाच्या अधिकृत भाषेचा दर्जा आहे. परंतु त्यांना तेव्हा "देवनागरी लिपी असलेल्या भाषेतच शपथ घेऊ शकता" या कारणावरून अडवण्यात आले आणि उर्दुत शपथ घ्यायला मज्जाव केला गेला. मग त्यांनी विधानसभेबाहेर धरणी वगैरे धरली पण तरीही तत्कालीन अध्यक्ष श्री. केशरीनाथ त्रिपाठी यांनी त्यांना उर्दूतून शपथ घेण्यास परवानगी दिली नाही आणि वर हे ही सुनावले की कुठलं योग्य कारण न देता जर ते सभागृहात अनुपस्थित राहीले तर त्यांना निलंबित केले जाईल. आणि शेवटी सगळ्या सव्यापसव्यानंतर आणि मुलायम सिंगांच्या मध्यस्थी नंतर त्या दोघांनी हिंदीत शपथ घेतली. त्यासंबंधीची बातमी इथे वाचा. म्हणजे त्यांनी एवढा गाजावाजा, सत्याग्रह, धरणी करूनही तेव्हाचे सरकार त्यांच्या पुढे नमले नाही उलट सरकारचा, मंत्रीमंडळाचा, राज्याचा निर्णय मान्य करण्यास त्यांना भाग पाडण्यात आले. प्रसंगी निलंबनाच्या कारवाईची भीतीही घालण्यात आली. पण वाईट वाटतं ते एवढच की ही एवढी धमक ना महाराष्ट्रातल्या धर्मनिरपेक्ष सरकारमधे आहे, ना मराठी-हिन्दू चा सी-साँ खेळणार्या विरोधी पक्षांमधे आहे, ना दिल्लीच्या दावणीला बांधलेल्या मीडियामधे आहे की असा दबाव आपल्या राज्यभाषेचा अपमान कराणार्यँच्यावर टाकला जाईल. दुःख आहे ते म्हातारी मेल्याचंही आणि काळ सोकावल्याचंही. म्हणजे तेव्हा हिंदीच्या विरुद्ध आणि उर्दूच्या बाजूने लढणारेच आता हिंदीच्या बाजूने आणि मराठीच्या विरुद्ध लढतायंत, हिंदीच्या बाजूने लढत असल्याचा, हिंदी भाषिकांचा कैवारी असल्याचा किमान देखावा तरी निर्माण करण्यात यशस्वी होतायंत. तेव्हा कुठे गेला होता स. पा. सुता तुझा धर्म एवढंच म्हणू शकतो आपण.. !!!

Wednesday, November 4, 2009

वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम् !!

ही बातमी वाचून समजा चुकुन तळपायाची आग मस्तकात गेली नाही तरी त्यातली शेवटची ओळ वाचून मात्र ती नक्कीच जाईल. थोडक्यात बातमी पुढील प्रमाणे.

==============================
"वंदे मातरम् हे गीत इस्लामविरोधी असल्याचे कारण देत, मुस्लिमांनी हे गीत गाऊ नये, असा फतवा जमात-ए-उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेने काढला आहे. देवबंदच्या राष्ट्रीय परिषदेत याबाबतचा ठराव संमत करण्यात आला होता.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही या फतव्याचे समर्थन केले आहे. अल्लाह व्यतिरिक्त मुस्लिम समाज अन्य कुणाकडेही प्रार्थना करत नाही, असे मत बोर्डाने व्यक्त केले. तर आमचे देशावर प्रेम आहे, परंतु देशाची पूजा करू शकत नाही, असे बोर्डाचे ज्येष्ठ नेते कमाल फारूकी म्हणाले.

दरम्यान, देवबंद येथील जमात-ए-उलेमा हिंदच्या आजच्या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही मार्गदर्शन केले.
==================================

अरे हे काय चाललय काय? मुस्लिम समाजाकडे पूर्वग्रहदुषित नजरेने बघून मी हा लेख लिहितोय असं कोणाच्या मनात येत असेल तर ते ताबडतोब काढून टाका. पण हे मुस्लिम पर्सनल बोर्ड आणि उलेमा वगैरेच मुस्लिम जनतेचं प्रतिनिधित्व करतात ना? म्हणजे मग त्यांनी मांडलेले मत, फतवे हे मुस्लिम समाजाचे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहेत असं कोणी मानलं तर त्यात वावगं काय? अन्यथा मुस्लिम समाजातील इतर संस्थांनी पुढे येऊन सांगावं की हे उलेमा जे काही बडबडत आहेत त्याला आमचा पाठिंबा नाही. हा मुद्दा मांडण्याच कारण एवढंच की या विषयाच्या संदर्भात हे आणि अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच उपस्थित केले जातात. म्हणून सुरुवातीलाच त्यांची उत्तरे दिलेली बरी.

मी मुद्दामच वंदे मातरम्, त्याचा तेजस्वी इतिहास, त्या गीताने हजारो क्रांतिकारकांना दिलेली प्रेरणा या विषयी बोलणार नाहीए कारण आपण सर्वजण ते जाणतोच. मुख्य आक्षेप आहे तो बातमीच्या शेवटच्या ओळीत मांडण्यात आलेल्या मुद्द्याबद्दल.

ज्या जमात-ए-उलेमा हिंद संघटनेने वंदे मातरम् विरुद्ध फतवा काढला आहे त्याच संघटनेच्या परिषदेत आपले केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम उपस्थित रहातात आणि मार्गदर्शन करतात याचा अर्थ काय?? सर्वसामान्य माणसांनी, जे वंदे मातरम् या गीताला पुज्यस्थानी मानतात, जे केंद्रीय गृहमंत्र्यांचा शब्द म्हणजे देशाच्या अतिशय प्रभावी आणि महत्वाच्या अशा गृहखात्याचे अधिकृत विधान मानतात त्यांनी काय समजायचे? की गृह खाते, गृहमंत्री, पंतप्रधान इत्यादींचा या विक्षिप्त निर्णयाला पाठिंबा आहे? वन्दे मातरम् म्हन्टल्याने त्यांच्याही भावना दुखावल्या जातात?

खरं तर शिवराज पाटील या ठोकळ्याची गृहमंत्री पदावरून हकालपट्टी झाल्यावर पी चिदंबरम जेव्हा त्यांच्या जागी आले तेव्हा गृहमंत्रालयचा कारभार थोडासा सुधारेल अशी पूसटशी का होईना आशा होती. परंतु त्यांची वन्दे मातरम् बाबतची भूमिका, अफझाल गुरूच्या फाशी संदर्भात त्यांनी केलेली हास्यास्पद विधाने पाहता गृहमंत्रीपदाला लागलेलं ग्रहण इतक्यात काही सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

स्पर्धा ... वैचारिक गुलामगिरीची !!

नुकतीच ही राष्ट्रकुल (commonwealth) स्पर्धाँची बातमी वाचली. राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजे काय तर इंग्रजांच्या वसाहतींच्या देशांचं मिनी ओलिंपिक. किंवा भारतीयांच्या मानसिक गुलामगिरीचा अजुन एक उत्तम नमुना. अर्थातच जे देश एकेकाळी इंग्रजांचे गुलाम होते तेच देश या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही एकेकाळी आमचे गुलाम होतात (आणि अजूनही मानसिक गुलाम आहातच) हे इतर जगाला सांगण्याची सुपीक डोक्याच्या इंग्रजांची पद्धत. आणि आपणही ते मारे एवढे मिरवतो, त्याला एवढ महत्व देतो की आपल्या राष्ट्रपती इंग्लंडला जाऊन इंग्लंडच्या राणीबरोबर त्या स्पर्धांच्या ज्योतीच उद्घाटन करतात. एक मुद्दा लक्षात घ्या. विरोध हा त्या स्पर्धेला, त्यातील खेळांना किंवा किंबहुना सहभागी होणार्‍या देशांना नाही. विरोध आहे तो स्पर्धेच्या नावाला, किंवा सहभागी देशांच्या निवडीच्या निकषाबद्दल. इंग्रजांच्या वसाहतीच जर अस्तित्वात नाहीत तर त्या वसाहतीच्या सामूहिक खेळ / स्पर्धा घेण्याच प्रयोजन काय? हे मानसिक गुलामगिरीच लक्षण नाही काय? (भाषिक गुलामगिरी तर वर्षानुवर्षे आहेच.)
या मताच्या विरोधात काही मुद्दे / प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात त्यांचा थोडक्यात परामर्श घेऊ.

1. नावात काय आहे.

2. क्रिकेट हा पण इंग्रजांचाच खेळ आहे. तो कसा चालतो तुम्हाला???

3. क्रिकेटेतर खेळांचा विकास कसा होणार. त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धा हे एक उत्तम व्यासपीठ आहे

असे इतर ही अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. पण त्यातल्या त्यात धारदार, टोकदार प्रश्नांचा विचार आपण करू :)

1. नावात काय आहे या सारख मूर्ख विधान खरच दुसर नसेल. (सॉरी शेक्स्पियर आजोबा).. कारण आपण सर्वच जाणतो आणि वेळोवेळी त्याचा प्रत्ययही घेतो की नावातच सगळं आहे. नावावरूनच या स्पर्धा कुठल्या स्वरूपाच्या आहेत, सहभागी देशांचा निकष काय आहे इत्यादी महत्वाच्या बाबी ठरवल्या जातात. नाही का? त्यांना आपण सरळ एशियाड / ओलिंपिक अस काही म्हणू शकत नाही.. हो ना? एशियाड हा एशिया खंडातील देशांमधे खेळला जाणार खेळ आहे तर ओलिंपिक म्हणजे जगातल्या सगळ्या देशांमधे. पण त्यात कुठेही तुमचा वर्ण, वंश, किंवा मुख्य म्हाणजे तुमच्यावर 70 वर्षांपूर्वी कोणी राज्य केल होत असल्या मूर्ख गोष्टी निवडीचा निकष म्हणून वापरल्या जात नाहीत.

2. क्रिकेट हा इंग्रजांनीच चालू केलेला खेळ असला तरी त्यात कोणीही खेळू शकतो. फक्त इंग्रजच किंवा फक्त ज्यांच्यावर इंग्रजांनी राज्य केलय अशाच देशांनी तो खेळावा असले फालतू नियम त्या खेळाबाबत नाहीत.

3. क्रिकेटेतर खेळांचा विकास जरूर व्हायला हवा. नाही हवाच. पण त्यासाठी राष्ट्रकुल स्पर्धा कशाला? आपण मिनी-एशियाड, मिनी ओलिंपिक, तिरंगी, चौरंगी, पंचरंगी (देश) अशा अनेक प्रकारच्या लढती, स्पर्धांच आयोजन करू शकतो. त्यासाठी इंग्लंडच्या राणीने ज्यांच्या डोक्यावर वरदहस्त(!!!??) ठेवला होता / आहे असेच देश हवे अशी काही अट असणार नाही.

खेळांचा प्रसार, क्रिकेटेतर खेळ हा मुद्दा नाहीच आहे. मूळ मुद्दा हा आहे की ही लपून छपुन केली जाणारी शाब्दिक, वैचारिक गुलामगिरीच आहे हे आपल्याला कळतय का? पटतय का? निदान त्याची जाणीव तरी आहे का? कारण अशी काही जाणीव असेल तरच त्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा प्रयत्न आपण करणार ना? अन्यथा इंग्रज मायबाप सरकार देवाच सरकार होत असे मानणारे, म्हणणारे महाभाग तेव्हाही आणि आत्ताही काय कमी होते/ आहेत ?

Thursday, October 29, 2009

तेरी जात का !!

आज मजा आली. आमच्या एका याहू ग्रूप वर एका सदस्याने तामीळनाडूच्या एका देवळात दलितांना प्रवेश मिळाल्यासंबंधीच्या एका बातमीची लिंक पाठवली होती. आणि झालं मग. एकच चर्चा सुरू झाली.जातपात किंवा जनरल कॅस्ट सिस्टम, धर्मांतर अशा वळणावरुन जाता जाता ती हळूहळू आणि थोडीशी जातीव्यवस्था का हवी, जातीव्यवस्था विसर्जीत (!!!) करण्याआधीतिला योग्य पर्याय शोधायला हवा अशा वळणांवर जायला लागली. मग आम्हीही थोडी आमची लेखणी (आपला कीबोर्ड हो) चालवली. तोच reply जसाच्या तसा खाली देतोय.

--------------------------------

जातीव्यवस्थेला कधीही कुठलाही पर्याय असु शकत नाही. जातीव्यवस्था नष्ट (विसर्जीत हा शब्द जातीव्यवस्थेला खूपच मान देणारा आहे त्यामुळे) करणे हा एकमेव पर्याय आहे. जातीव्यवस्थेतून निर्माण होणार्‍या विषामतेची झळ आपल्याला कधीच बसत नाही, बसली नाही (कारण आपण असे प्रसंग फक्त पुस्तक/वर्तमानपत्रातूनच वाचतो) आणि ज्यांना ती बसते त्यांच्यापासून आपण सुरक्षित अंतरावर असतो त्यामुळे त्याची तीव्रता आपल्याला कळत नाही. ज्या जातीव्यवस्थेने शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर यासारख्या महापुरुषांना सोडलं नाही तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा? जातीव्यवस्थेमुळे झालेले असंख्य दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत. फक्त ते डोळसपणे मान्य करायला लागतील इतकंच. (शिवाजीमहाराजंसारख्या महापुरुषाला राज्याभिषेक नाकारण्यात आला होता तो ते ब्राह्माण की क्षत्रिय की राजपूत या वादामुळेच.)

-- ब्राह्मणात पुन्हा तुम्ही कोकणस्था की देशस्थ की कर्‍हाडे की देवरुखे?.. त्यात पुन्हा यजुर्वेदी की ऋग्वेदी, आणि अजुन घोळ घालायचे असतील तर हे पुढचा ऐका.. तुम्ही शुक्ल यजुर्वेदी की कृष्ण यजुर्वेदी.. ???

-- मराठ्यांमधे पुन्हा कुणबी की ९६ कुळी मराठा की अजुन काही. (मराठा आरक्षणाचा वाद कशा मुळे निर्माण झाला काही अंदाज?)

-- अरे हे तर लेवा पाटील. आम्ही ९६ कुळी.. तुमची आणि आमची सोयारीक जुळु शकत नाही..

-- आम्ही सारस्वत. म्हणजे सरस्वतीचे भक्त. म्हणजे मांस खाणारे ब्राह्मणच.

-- आम्ही सोनार.. म्हणजे दैवद्न्य ब्राह्मण..

असे तट अजूनही पडताना दिसतात. मला नाही वाटत या गटातटातुन कोणालाही काही फायदा होतोय.. !!

या जातीव्यवस्थेमुळेच दादोजी कोंडदेवांना शिवरायांचे गुरू मानायचे की नाही असे वाद घालण्यात येतात. समर्थ रामदसांची रामदास ठोसर अशी संभावना करण्यात येते. बाबासाहेब पुरंदर्‍यांचं शिवाजी महाराजांच्या अभ्यासावरील श्रेष्ठत्व नाकारलं जातं ते या जातीपतीतील भेदांमुळेच. संभाजी ब्रिगेड ची साइट/ब्लॉग एकदा वाचून बघा म्हणजे जाती व्यवस्थेने खोलवर केलेले दुष्परिणाम कळून येतील.

खेडेगावांमधे (ज्यांच्यापसून आपण फक्त काही मैलांवर आहोत किंवा थोडक्यात सुरक्षित अंतरावर आहोत) अजुन ही दलितांसाठी वेगळा पाणवठा असतो. त्यांना गावाच्या विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही. त्यांना देवळात जायला मज्जाव असतो.. २००६ चं महाराष्ट्रातलं भैय्यालाल भोतमांगे प्रकरण एवढ्यात विसरलो आपण?


अनिल आवचटानच कुठलाही पुस्तक काढून वाचा म्हणजे जातीव्यवस्थेचे चटके किती तीव्र असतात ते कळेल.

आता conversions विषयी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतर का होतं? सगळे धर्मांतर करणारे अशिक्षित नसतात. सगळीच धर्मांतरे धनाच्या लालसेने किंवा जबरदस्तीने होत नसतात. त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे ही भ्रष्ट जाती व्यवस्था. जर माझ्या धर्मात राहून (निव्वळ माझ्या जातिमुळे जो माझ्या उदात्त (!!) धर्माचाच एक भाग आहे) मला कायम हीन वागणूक मिळत असेल, मला माझ्या सामान्य अधिकारांपासून वंचित ठेवले जाणार असेल तर खड्ड्यात गेला तुमचा धर्म. मी धर्मच बदलतो. सगळ्याच कटकटी मिटल्या. ही आणि फक्त हीच मानसिकता असते. हे फक्त हिंदू धर्मविषयीच आहे असं नाही. अनेक आफ्रो-अमेरिकन्स/ब्लॅक्स हे इस्लाम स्वीकारतात कारण त्यांच्या धर्मात त्यांना सतत हीन वागणूक दिली जाते. मुसलमानांमधे होणारे सुन्नी आणि शिया वाद/दंगली तर सर्वश्रुतच आहेत.

सॉरी.. बरच मोठं आणि विस्कळित झालं ईमेल. पण जे जसं सुचलं/साचलं होतं तसं लिहिलं. कारण जेव्हा एक तरुणांचा ग्रूप २१ व्या शतकात जातीव्यवस्थेच्या फायद्यांविषयी, ती विसर्जित न करण्या विषयी बोलू लागतो तेव्हा एक भयंकर विचित्र फीलिंग येत त्याचाच हा परिपाक !!

Friday, October 23, 2009

कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???

कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???

कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !!
भावनांची व्याकुळता आठवणींचा जंजाळ
झाकोळल्या क्षितिजाला गडद अंधारलेली किनार
अडकलेला कण न कण, कोंडलेला श्वास अन श्वास
राहून राहून होणारे सारे सारे तुझेच भास

ओहटल्या सागराला आर्त हाकांचं वलय
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||१||

अनोळखी माणसांचं वैराण वाळवंट
निर्जीव चेहर्यांच अरण्य घनदाट
निःशब्द रस्त्यांवर हुंकार अस्पष्ट
साथीला बोचणारी बेचैनी मात्र स्पष्ट

एकटेपणाची अशी कधी होते का सवय?
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||२||

तेज लोपलेला सूर्य आणि डागाळलेला चन्द्र
कोमेजल्या फुलांचे आटलेले गंध
कुंद हवेतले निराश उःश्वास
बेचव उन्हं आणि कुबट पाउस

सारं सारं जणू विचित्र विचित्र झालंय
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||३||

ओळखीच्या वाटा पण अनोळखी पावलं
काळोख्या उजेडाच्या निस्तेज सावल्या
हव्याशा आठवणींचे लख्ख कवडसे
सोबतीला दाबलेले हुंकार आणि उसासे

नको नको असलं तरी सारं खरयं
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! सांग ना मला उत्तर हवयं !! ||४||

हेरंब ओक
२८ एप्रिल '०९

शिल्लक !!

२६ नोव्हेंबर च्या मुंबई हल्ल्यानंतर तुकड्यातुकड्यात सुचलेली कविता !!

शिल्लक !!

थोडीशी लाज विकत घ्यायची होती
या सत्ताधार्‍यांना वाटण्यासाठी
या राजकारण्यांच्या तोंडावर फेकण्यासाठी
या सत्तापिपासुंना भीक म्हणुन देण्यासाठी
या झोपेच सोंग घेतलेल्या कुंभकर्णांना उठवण्यासाठी ||१||

थोडीशी माणुसकी विकत घ्यायची होती
मेलेल्या मढयावरचं लोणी खाणार्‍या
असंख्य बलिदानांवरही खुर्चीची पोळी भाजणार्‍या
निष्पापांच्या जिवांशी खेळणार्‍या
जवानांच्या मृत्युला "कुत्र्याचीही" किंमत न देणार्‍या
या मानवी चेहर्‍यात वावरणारया श्वापदांसाठी ||२||

थोडं रौद्र थोडं धैर्य थोडं वीर्य विकत घ्यायच होत
या मनगटातल्या ताकदी संपलेल्या
चर्चेची गुर्हाळं चालवून कागदी घोडे नाचावणार्‍या
पोकळ धमक्यांनी शत्रूला घाबरवल्यासारखं करणार्‍या
शब्दांचे बुडबुडे उडवणार्या या भेकड युद्धतज्ज्ञांसाठी ||३||

असं बरंच काही मागण्यासाठी देवाकडे गेलो होतो
तर तो म्हणाला यातलं काही शिल्लक नाहीये आता
कारण ते सगळं मी इस्रायलला दिलंय !!!!!!!

हेरंब ओक
१९ जानेवारी '०९

गर्विष्ठ की अभिमानी ??

हा लेख मी दुसर्या एका ब्लॉगवरून उचलला आहे. घाबरू नका. गंमत करत होतो. दुसरा ब्लॉग पण माझाच आहे. तेव्हा कॉपीराइटचा काही प्रॉब्लेम येणार नाही :-). नवीन मराठी ब्लॉगवर हा लेख जास्त योग्य वाटेल म्हणून इथे पुन्हा पोस्ट करतोय. बाकी काही नाही.


=============================================
आपण सर्वांनीच नितांतसुंदर असा "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" बघितला असेलच. तो किती अप्रतिम आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही किंवा त्याची उत्कृष्टता जोखण्याएवढी माझी कुवतही नाही. फ़क्त त्यातला एक खटकलेला मुद्दा मांडावासा वाटला जो (माझ्या मते) अतिशय महत्वाचा आहे आणि तो विषयाच्या हेतुच्या आड़ येणारा ठरू शकतो किंवा मराठीत चुकीच्या शब्दांचा पायंडा पाडणारा ठरू शकतो म्हणुनच हा ब्लॉग प्रपंच.
या चित्रपटाची tagline आहे "गर्व आहे मला महाराष्ट्रीय असल्याचा". माझ्या मते दिग्दर्शकाला "गर्व" च्या जागी "अभिमान" हा शब्द अभिप्रेत असावा किंबहुना "अभिमान" हा शब्दच तेथे जास्त समर्पक आहे परंतु हिंदी भाषेच्या अतिरेकामुळे
(किंवा पगडा म्हणा हवं तर) हा चुकीचा शब्दा प्रयोग कोणाच्याच लक्षात आलेला नाही. कारण हिंदीत "मुझे गर्व है की मैं आपका बेटा हूं" किंवा "मुझे अपने भारतवासी होनेपे गर्व है" असे शब्दप्रयोग वापरले जातात कारण त्या भाषेतील त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे ते योग्यही आहे. असं म्हणतात की कुठलीही भाषा जितकी जास्तीत जास्त वापरली जाते तितके तिच्यातील शब्दालन्कार, तिचे आयुष्या व्रुधिन्गत होत जाते. गुरुमुखी (किंवा पंजाबी) भाषा ही काही वर्षांपूर्वी मृतवत होऊ घातली होती परंतु त्यभाषिकांनी प्रयत्नपूर्वक अंगिकारलेल्या प्रयत्नांमुळे आज ती भाषा भारतातील अनेल हिंदी भाषिक राज्यांमधे संवाद साधण्याची एक प्रभावी भाषा बनली आहे। (आणि याउप्पर तिला बॉलीवुड च्या चित्रपटांमधे जवळपास राष्ट्रीय भाषेचा दर्जा ही मिळाला आहेच हे सांगणे न लगे). इथे मला मराठी भाषेच्या वापराच्या नावाने गळे काढायची इच्छा नाही. परंतु त्यामुळे वस्तुस्थितीत बदल होत नाही हे मात्र नक्की.
आपल्याला लहानपणा पासून शिकवण्यात आलेल्या "गर्वाचे घर खाली" किंवा "ग ची बाधा" अशा म्हणी किंवा शब्दप्रयोगांवरून गर्व हा शब्द गुणांच्या कक्षेत न येता त्याकडे अवगुण म्हणूनच पहिले जाते हे नक्की. (परंतु हिंदीत गर्व हे अभिमान या अर्थी आणि अभिमान हे गर्व या अर्थी वापरले जाते म्हणून आपणही मराठीतले अर्थ सोडून हिंदी अर्थ उसनवार घेण्याची गरज नाही.. आठवा अमिताभ आणि जया चा "अभिमान".... असो). प्राथमिक शिक्षण झालेल्या कुठल्याही व्यक्तीच्या हे खरतर चटकन ध्यानात यायला हवं होतं. क्षणभरासाठी आपण हे विसरू की सामान्य माणसाच्या हे लक्षात आले नाही परंतु इतके साहित्यिक, लेखक, मराठी कथा/पटकथा लेखक इत्यादी कोणाच्याच हे लक्षात आल नाही हे खर तर मोठ्ठं आश्चर्य म्हन्टल पाहिजे. किंबहुना चित्रपटाचा निर्माता, पटकथाकार हा महेश मांजरेकर सारखा प्रथितयश मराठी कलाकार असून ही त्याच्याही ही गोष्ट लक्षात आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. कालांतराने पुढल्या पिढीने "गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा" आणि "गर्वाचे घर खाली" याच्या संधितून "त्यामुळेच महाराष्ट्रीय माणूस खाली असतो" असा निराळाच अर्थ काढला तर आश्चर्य वाटायला नको...

=============================================

प्रथमा

अनेक दिवसांपासून मनात असलेल्या मराठी ब्लॉग चा श्री गणेशा अखेरीस झाला तर. बरेच मुद्दे, विषय मराठी, महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी गोष्टींशीच संबंधित असतात आणि ते मराठी ब्लॉग मधे जास्त चांगल्या पद्धतीने मांडता येतील म्हणून हा ब्लॉग सुरू करतोय. खर तर इंग्लीश ब्लॉग नंतर हा ब्लॉग लगेच यायला हवा होता.. पण सुचल नाही, जमल नाही काहीही म्हणा.. दोन्ही ब्लॉग मधे सातत्य राखण्याची इच्छा आहेचं... बघुया कितपत जमतय ते.

अरे हो.. ब्लॉगच नाव (URL) थोडं विचित्र वाटेल खरं. पण त्याची एक गंमत आहे. गेल्या वर्षी (बर्‍याच वर्षांनी) एक कविता लिहिली आमच्या डोंबिवलीच्या माजी विद्यार्थी संघाच्या संकल्प या त्रैमसिकासाठी. त्या कवितेचं नाव होत "हरकत नाय". कविता '08 च्या पहिल्या 5-6 महिन्यातल्या विविध स्थानिक हिंसा/दंगलींवरआधारित होती. साधारण त्याच सुमारास इंग्लीश ब्लॉग ची पण सुरूवात झाली. (. . लिहिणं हे त्याच्या बरंच नंतर सुरू झालं हा भाग अलाहिदा :) )... कवितेच्या हॅंगओवर मधे असल्याने ब्लॉगला पण तेच नाव द्यायचं ठरवलं आणि "मनातल्या गोष्टी",किंवा माय थॉट्स, किंवा स्वतःचं नाव अशा टिपिकल नावांपेक्षा हे जरा वेगळं पण वाटलं. . मग तेच नाव (किंवा हॅंग ओवर म्हणा हवं तर) पुढे चालू ठेवावं म्हणून नाय च्या स्पेलिंग मधे थोडा बदल करून मराठी ब्लॉगला तेच नाव दिलं :)

पुढे ती कविता महाराष्ट्र टाइम्सच्या ऑनलाइन अंकात पण छापुन आली. बघा आवडते का...

=============================================

हरकत नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय !!

मारा झोडा ठेचुन काढा
गोळ्या झाडा बाँब फोड़ा
त्यांच डोक आमचा हातोड़ा
ताज्या रक्ताचा पडुदे सडा

एका घावात मागाल पाणी, असे आहोत आम्ही सनातनी
आमच्या देवांची मस्करी करायची नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||१||

खसकन उपसा नंग्या तलवारी
दिसूदे आपली ताकद खरी
भेदरल्या पाहिजेत दिशा चारी
थरथर कापेल दुनिया सारी

आमच्या समोर नको अजीजी, उगाच नही आम्हाला म्हणत "पाजी"
आमच्या गुरु च्या वाटेला जायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||२||

शिवबा आमचा आम्ही त्याचे मावळे
उलट बोलाल तर तोंड करू काळे
आदर व्यक्त करायचे आमचे मार्गच आगळे
फासून डाम्बर घर रंगवू सगळे

मुखी शिवबा हाती ग्रेनेड, अशी आमची राष्ट्रवादी ब्रिगेड
शिवबाचे स्मारक उभारू देत नाही म्हणजे काय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||३||

दिसला भैय्या तर सोडू नका
टँकसया फोड़ा सामान फेका
एकच असा देऊ जोरदार धक्का
की "आपला" खुंटा होइल पकका

नवमहाराष्ट्राची आम्हालाच जाण, आम्ही करू नवनिर्माण
मराठी सोडून दुसर काही बोलायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||४||

पण थाम्बा हे काय !!
हे सगळ अचानक थांबतय काय?
होय ! कारण मी आहे आजचा तरुण, कुठल्याही झापडांशिवाय
मीच गोविन्दसिंह, मीच कृष्ण आणि मीच शिवराय
आमच्या तरुणाईला फसवयाच नाय
याद राखा गाठ आमच्याशी हाय
ज़ातिधर्माच्या नावाने फूट पाड़ाल तर
होय !! आमची हरकत हाय, हरकत हाय, हरकत हाय !!!

हेरंब ओक
१५ जुलै '०८

=============================================

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...