आता १० महिन्याच्या मुलाचे पहिले २-३-४ दात येणं या विषयावर पोस्ट होऊ शकतं का? आणि समजा कोणी लिहिलंच तर कोणी वाचेल तरी का ते? हे असे आणि अस्सेच काहीसे विचार होते माझ्या मनात पाहिलं पोस्ट लिहिताना. पण एक(चि)दंतच्या अभूतपूर्व यशानंतर (हे असं म्हंटलं की हे पोस्ट किंवा एकुणातच हा ब्लॉग पहिल्यांदा वाचणा-याला वाटतं की या महामानवाने लहान मुलांचे दात येणे, दातदुखी, दंतोपचार अशा विषयांवर पूर्वी एखादा (किंवा अनेक) महान लेख लिहिला असावा आणि हा नवीन लेख वाचणा-या जुन्या वाचकांना जुन्या लेखाच्या उल्लेखामुळे त्याची आठवण होऊन आपोआपच नवीन लेख आवडायला लागतो. तर असे आपले माझे एका दातात दोन लेख किंवा एका लेखात दोन दात वगैरे.. लेख संपेपर्यंत माझेच दात घशात गेले नाहीत किंवा दाती तृण धरण्याची वेळ आली नाही म्हणजे मिळवलं) चिरंजीवांनी त्यांच्या साडे तीनच दातांनी आमच्या दोन --म्हणजे माझ्या आणि बायकोच्या प्रत्येकी एक-- नाकी आणलेल्या नवाचं वर्णन करणं हे क्रमप्राप्तच आहे.
सुरवंटाचं फुलपाखरू होणं किंवा 'कु. अमुकतमुक'चं-- व्हाया चि. सौ. कां. -- 'सौ. फलाणा फलाणा' होणं या हळुवार संक्रमणांइतकंच बाळराजांचं दात येण्यापूर्वीच्या डोनाल्ड डकसदृश्य अवताराचं साडेतीन-चार दातांचं हत्यार हाती आल्यावर मिकी माउस मध्ये होणारं संक्रमण हे एकाच वेळी हळुवार, टोकदार, बोचदार, चावदार असं होतं. आता 'चावदार' या सर्वस्वी नवीन शब्दाची मराठी साहित्यात, भाषेत भर घालण्याचं कृत्य अनवधानाने का होईना माझ्या हातून झालं असलं तरी त्याच्या उत्पत्तीचं समग्र श्रेय हे आमच्या मिकी माउसलाच जातं हे माझं म्हणणं तुम्ही, "आपल्या धारदार आणि टोकदार दातांनी दार चावणा-याला काय म्हणायचं?" असा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर शोधताना तुमची जी दमछाक होईल ती लक्षात घेऊन आधीच, मान्य कराल आणि हे श्रेय ज्याचं त्याला (म्हणजे बाळराजांना) क्षणभराचाही विलंब न करता देऊन टाकाल याची मी, मिकी आणि डोनाल्ड यांना खात्री आहे.
तर जगातलं सर्वात धारदार नैसर्गिक शस्त्र म्हणजे 'दहा महिन्यांच्या बाळाचे नुकतेच येणारे दात' हे मला कोणी महिनाभरापूर्वी सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यातच काढलं असतं. पण अनुभव हीच खात्री हे स्वानुभवाने सिद्ध झाल्याने असं वेड्यात काढणं म्हणजे वेड्यात निघाण्यासारखं आहे हे मला आता पुरेपूर पटलं आहे. तर आमचे हात, मनगट, दंड, गाल, खांदे, बोटं, पोट, मान असे सगळे अवयव यथेच्छ चावून झाल्यावर साहजिकच तोचतोचपणाचा कंटाळा आल्याने (Life can be so monotonous at times) बाळराजांनी आपलं लक्ष अनेक चमचमणा-या रंगीबेरंगी गाड्या, सॉफ्ट टॉईज, लहान-मोठे रबरी/कापडी चेंडू, पुस्तकं, वृत्तपत्रं, टिश्यूज, वाईप्स असे कागदांचे विविध प्रकार, लाळेरी, शाली, दुपटी, मोजे असे कपड्यांचे विविध प्रकार आणि मोबाईल, रिमोट, किल्ल्या, घड्याळ असे इलेक्ट्रॉनिक्सचे विविध प्रकार किंवा सोफा, गादी, उशा, दारं, ड्रॉवर अशा अनेक निरुपद्रवी, निरुपयोगी आणि आमच्या मान ते पोट यामधल्या अवयवांपेक्षा रंगीबेरंगी आणि चविष्ट भासणा-या गोष्टींकडे वळवलं. परंतु निळकंठ महादेवाने आपला तिसरा नेत्र उघडल्यानंतर ज्याप्रमाणे मृत्यूलोकातले, स्वर्गातले सर्व देव, मानव भयातिशयाने जीवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागत त्याप्रमाणे वरील सर्व वस्तूंची या (साडे) त्रिदंतापासून शक्य तेवढे दूर पळून जाण्याची अपार इच्छा असूनही अंगभूत जडत्वामुळे ते शक्य न झाल्याने मिकीपुढे संपूर्ण शरणागती स्विकारण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्यासाठी उरला नाही.
तर या अशा तुच्छ, मर्त्य गोष्टींपैकी ज्या काही निवडक आणि अनपेक्षित गोष्टींच्या अस्तित्वावरच आमच्या मिकीने प्रश्नचिन्ह लावलं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एक क्षुद्रसा थर्माकोल कप. परवा हॉटेल मध्ये गेलो असताना इडली/वड्याबरोबर मिळणा-या सांबारासाठी आम्ही प्रत्येकी एक आणि मिकीला खेळायला एक असे तीन कप घेतले. पण आमच्या इडली/वड्याचा पहिला घास संपायच्या आधीच आपल्या तोंडातील छुप्या वाघनखांनी आपलं दातांनी त्याने त्या कपावर सपासप असे एवढे वार केले की तो कप होत्याचा नव्हता झाला आणि प्रमोद नवलकरांच्या 'भटक्याची भ्रमंती' मध्ये किंवा 'पोलीस टाईम्स', 'दक्षता' सारख्या मासिकांमधल्या लेखांमधल्या फोटोंच्या खाली आढळणारी 'हाच तो ट्रक ज्याच्यावर पोलिसांनी धाड टाकली ' किंवा 'हेच ते घर ज्या घरात अतिरेकी राहत होते' अशा तालावर वाचण्याचं हे पुढचं वाक्य जन्माला आलं. तर "हाच तो कप ज्याला कप प्रजातीतून हद्दपार व्हावं लागलं"
अशा दुस-या विस्थापिताचं नाव होतं चॉकलेट. तो टेबलावर ठेवलेला चॉकलेट बार कसा त्याच्या हातात लागला देव जाणे. तर हा बराच वेळ शांत का बसलाय, काही आवाज वगैरे का येत नाहीये असा विचार करून मी (लॅपटॉप मधून डोकं बाहेर काढून) त्याच्याकडे बघितलं आणि बघतो तो काय. मिकीने तोंडात चॉकलेटच्या पाकिटाचं एक टोक धरलं होतं, ते फटाफटा चावत होता आणि दुस-या हाताने पाकिटाचं दुसरं टोक पिरगाळत होता. थोडक्यात काथ्याचे दोर वळणे याचं सॉफीस्टीकेटेड रूप आणि कचाकचा चावणे याचं हार्श रूप याचा अनोखा संगम माझ्यापासून तीन फुटावर घडत होता. आणि चॉकलेट कोको परिवारातून 'सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही' वाल्या सुंभ उर्फ सुतळ/दोर परिवारात जाऊन स्थिरावलं.
तिसरी शिकार होती कानाला लावायच्या मलमाची ट्यूब. आणि तीही मेटल किंवा पत्र्याची. म्हणजे आपल्या टूथपेस्ट किंवा इतर मलमांच्या प्लास्टिक/रबरी ट्यूब सारखीही नाही. तिच्यावर तर दातांच्या एवढ्या खुणा आहेत की ते Manufacture's Design वाटावं आणि एका ठिकाणी तर त्या चाव्यांमुळे (आता यात किल्ली कुठे आली विचाराल म्हणून सांगतो, चावाचं अनेकवचन) ट्यूबला चीर जाऊन मलम बाहेर आलं. अर्थात ताबडतोब त्याच्या हातातून ती ट्यूब हिसकावून घेण्यात आम्ही यशस्वीही झालो. पण 'कसं फसवलं' असे जे भाव त्याच्या चेह-यावर आणि (नको तितक्या) बोलक्या डोळ्यांत होते त्यावर एक मोठ्ठा सुस्कारा सोडण्याखेरीज आमच्या हाती काहीच नव्हतं.. :-)
अर्थात यातल्या एकाही शिकारीचे 'केस उगवण्याच्या औषधांच्या' किंवा 'बारीक होण्याच्या गोळ्यांच्या' जाहिरातीच्या स्टाईलचे 'द बिफोर' आणि 'द आफ्टर' असे फोटोज नाहीत. कारण कुठल्या कुठल्या वस्तूचे पूर्वाश्रमीचे फोटोज काढून ठेवणार? संपूर्ण घरच शूट (पक्षी कॅमकॉर्डरने.. 'ओक म्हनत्यात मला' आन म्या त्येररिश्त न्हाय.) करून ठेवावं लागेल. कारण हल्ला कधीही आणि कुठल्याही वस्तूवर होऊ शकतो त्यामुळेच ..... अरे अरे थांब.... आँ आँ आ SSSSS
हेरंब
ReplyDeleteस्ट्रॉ चा चाउन चाउन चोथा करुन टाकणे पण खुप आवडतं फाउंटन पेप्सी वगैरे प्यायला दिली तर एकही सिप न घेता फक्त स्ट्रॉ चावणे हा एक आवडीचा खेळ असतो.
जुने दिवस आठवले. :)
स्ट्रॉ हाताला लागली नाहीये त्याच्या अजून. :) पण त्याला कागद भयंकर आवडतात. गुपचूप खातो आणि मग उलट्या. आणि कचाकचा चावायला तर काहीही चालतं.
ReplyDeleteमिकी...हे..हे..हे...
ReplyDelete"'ओक म्हनत्यात मला' आन म्या त्येररिश्त न्हाय" ... भन्नाटच...
बाळराजाचे पराक्रम तर दिवसेंदिवस वाढतच आहेत....
मस्त रे.....आमचं मोठं नव्हतं असं चावरं पण धाकट्याने केलेत हे उद्योग...... उलट्यांच तर विचारूच नकोस रे बाबा, बाहेरून आलेल्या चपला हे विशेष खाद्य असत्ं अश्यावेळी!!!! माझा अनुभवी(?) सल्ला ऐक ज्येष्ठमधाची काडी दे तोंडात, टीदर नावाच्या अतिमहागड्या प्रकाराला माझ्या लेकीचे पहिल्याच ’चाव्यात’ बाद केल्यावर मी हेच हत्यार वापरले होते.....
ReplyDeletehaha
ReplyDeletechotya sahebancha hi ak pic takaycha na rav
एकदम ’चवदार’ झाल आहे हे ’चावदार’ पोस्ट.
ReplyDeleteत्या कपच्या आणी इतर हुतात्म्याच्या आत्म्यास शांती लाभो.
आणी हो आता घरातल्या सगळ्याच वस्तुंचे फ़ोटो काढुन ठेवा....
हो रे आनंद. कुठून तो 'खान' बघितला आज आणि असलं डोकं उठलं ना... आणि बाळराजाचे पराक्रम तर 'दिन दुगना रात चौगुना' अशा वेगाने वाढतायत.. !!
ReplyDeleteतन्वी, अगदी परफेक्ट... चपला तर भन्नाट आवडतात. ते कसं लिहायचं विसरलो मी. कमाल झाली माझी.. आणि हो हा तर टीदर कडे ढुंकूनही बघत नाही. अनुभवी सल्ला मातोश्रींपर्यंत तत्परतेने पोचवला आहे.. आभार.. :)
ReplyDeleteविक्रम, पुढच्या पोस्ट मध्ये अगदी नक्की टाकतो :-)
ReplyDeleteदेवेंद्र, हुतात्म्यांची यादी भली मोठी आहे रे बाबा... आणि हो आता खरंच फोटो काढून ठेवावे लागणार आहेत सगळ्याचे :P
ReplyDeleteAs Vikram said Mickey cha ek tari photo taka naa plzz.....
ReplyDeleteKhoop ustukataa aahe mala tyala pahayachi...
:-) .. नक्की मैथिली.. लवकरच !!
ReplyDeleteThike mi vaat baghen.......
ReplyDelete:)
ReplyDeleteएखादा ’नको तितक्या बोलक्या डोळ्यांचा’ फोटोही टाकला असतास तर...
(आदितेय नाव छान आहे. त्याचाही अर्थ ’सूर्य’ असाच आहे का? माझ्या मुलाचं नाव आदित्य :) )
हा..हा...मी वाचलो (खान नाही बघीतला)...
ReplyDeleteप्रसुतीपुर्व त्या सिनेमाची कल्पना असल्याने :)
Kharac khup aavadli post...Photo yevu de dada aata lavakar...
ReplyDeleteहे हे हे मस्त हेरंब...सगळा कस मस्त जमलय :)
ReplyDeleteसगळी हत्यार म्यान ह्या एक 'चावदार' संक्रमाणसमोर..
अजुन फोटोस येऊ देत :)
मजेदार पोस्ट. 'मुलाचे दात चावल्यावर दिसतात' असे म्हणायला हरकत नाही.
ReplyDeletekiti sahajata aahe lekhanat......
ReplyDelete@प्रीति, येणार येणार... लवकरच... !! धन्यवाद.. हो आदितेयचा अर्थही सूर्यचं आहे.
ReplyDeleteआनंद, खरंच वाचलास रे..
ReplyDeleteheramb... lai bhaari!
ReplyDelete@सागर, टाकतो फोटोज पण.. लवकरच...
ReplyDeleteखरंच सुहास. कुठल्याही अस्त्राची आणि शस्त्राची काही मिजास चालणार नाही या 'चावदार' पुढे :-)
ReplyDeleteहा हा हा योगेश... अगदी बरोब्बर बोललास. मस्तच !!
ReplyDeleteधन्यवाद सुषमेय :-)
ReplyDeleteआभार पीजे.. :-)
ReplyDeleteSahi cha zala ahe "Chavadar Rajkumar".....
ReplyDeleteRaja Rani s nivedan : Tumachy garib janate la vachava!!! (hihihihi)
I'm proud of you Mitra..."Tu Balaraja na tyanchya lahan panchya parakramachy anek ghoshti sangu sakashil...ani puravyane shabil karashil...
निवेदन मिळालं. ठोस कृती करण्यात येईल हे जाहीर आश्वासन :P ..
ReplyDeleteहो.. मी आणि हरितात्या सगळंच पुराव्याने शाबित करतो नेहमी.. :D .. पुल झिंदाबाद.
सही खरचं "चाव"दार आहे पोस्ट. बाळराजे फुल्ल "हल्ला बोल" मूडमध्ये आहेत तर.
ReplyDeleteअर्रे एकदम.. काही विचारू नकोस :-)
ReplyDeleteहेरंब मस्तच झालीय पोस्ट...हा चावण्याचा महिमा फ़ारा काळ चालतो बरं..आणि नंतर दुसरी अस्त्र पण बाहेर येतात जसं चिमटे इ...माझे हात चिमटे आणि चावे यांनी काळेनिळे होतात कधीकधी आणि म्हणून मग माझ्या पोस्ट कमी होतात..(कसं वाटतंय ब्लेमिंग सेशन??)
ReplyDeleteहो ना. तीही निघतीलच हळूहळू.. बाकी सीनियर्सच्या आधाराने आम्हीही हळूहळू या ब्लेमिंग सेशन्स मध्ये पारंगत होऊ ;-)
ReplyDeleteसहीच. जबरीच आहे हे चावदार संक्रमण. त्याचे दात फारच शिवशिवले तर तुझ्या तळहाताचा साईडचा भाग दे त्याला. म्हणजे तुला थोडेसे दुखेल पण त्याला समाधान नक्कीच मिळेल... :) चप्पलही फारच आवडती गोष्ट. भिंत खरवडतोय का? त्याचा एखादा तल्लीन झालेला फोटोही टाकायचास ना.
ReplyDelete:) .. हो तळहात चावणं चालू असतं त्याचं. आणि चप्पल तर काय विचारू नका. तन्वीला तेच म्हंटलं. चप्पल तर प्रचंड आवडती आहे त्याची. मी चपलेवर लिहायला कसा काय विसरलो काय माहित.. हो..फोटो लवकरच टाकणार आहे :-)
ReplyDeleteआयला .. भारी आहे. काय काय सापडले हातात अजून त्याच्या???
ReplyDeleteअरे काही विचारू नकोस बाबा. काहीही चालतं. कागद, कार्डबोर्ड वगैरे प्रचंड प्रिय. आणि हल्ली तर दात प्रचंड शिवशिवत असावेत. त्यामुळे आमचं लक्ष नसताना दोरी किंवा रबर असं काहीतरी घेतो, ते दातात अडकवतो आणि जोरात बाहेर खेचतो. दातांची stress-test चालू आहे बहुतेक. :)
ReplyDelete