किस्सा क्र. १.
तुमच्या तोंडावर कधी चिखलाचा फुगा येऊन फुटलाय? आणि तेही रंग खेळायला सुरुवात केल्या केल्या?? आता अशा प्रकारचे प्रश्न हे जेव्हा आपण त्या प्रसंगात हिरो (या चिखलाच्या प्रसंगात जोकर) असतो अशा वेळी विचारायची पद्धत आहे. उदा तुम्ही कधी सचिनबरोबर डिनर केलं आहेत? किंवा हरिश्चंद्रगड मध्यरात्री चढला आहात? किंवा असं काहीतरी. तर या प्रस्तावानेनंतर चाणाक्ष वाचकांच्या हे लक्षात आलंच असेल की सदर प्रसंगात हा चिखलाचा फुगा माझ्या चेह-यावर फुटलेला नाही. आणि अर्थात त्यामुळेच माझ्या दृष्टीने तो सगळ्यांना रंगवून सांगण्याचा एक किस्सा आहे.
मी साधारण सहावी/सातवीत असतानाचा प्रसंग आहे. आम्ही नवीन सोसायटीत शिफ्ट झालो होतो. बिल्डिंग नवीन, लोक नवीन आणि पहिलीच होळी त्यामुळे जरा जास्तच उत्साह होता सगळ्यांचा. तर खेळायला सुरुवात करताना सगळेजण गोल करून उभे राहून, पिचका-या वरच्या दिशेला धरून सगळ्यांनी एकदम पाणी उडवायचं आणि सुरुवात करायची अशा टिपिकल फिल्मी स्टायलीच्या होळीची कल्पना एकाच्या सुपिक मेंदूतून निघाली. कोणाला विशेष आवडली नसली तरी नवीन मित्र, पहिली होळी म्हणून कोणी विरोध केला नाही. तर आम्ही सगळेजण गोल करून, पिचका-या वर धरून ('होळी रे होळी' हे तेव्हा जाम डाऊनमार्केट वाटत असल्याने) 'होली है' असं चित्कारायला आणि वरून एक चिखलाने भरलेला मोठ्ठा फुगा त्या सुपिक मेंदूच्या मालकाच्या डोक्यावर येऊन आदळायला एकच गाठ पडली. त्याला आणि आम्हाला कोणालाच क्षणभर काहीच कळलं नाही. आणि कळलं तेव्हा येत हसलेलं हसू दाबून त्याचा (बघवत नसलेला) चेहरा बघून जो तो एकमेकाच्या चेह-यावर पिचकारी उडवून त्याआडून त्या दाबून ठेवलेल्या हसण्याला वाट मोकळी करून देत होता. त्याचं झालं असं की आमच्या बिल्डिंगच्या शेजारी एक छोटी झोपडपट्टी होती. त्यातल्या काही पोरांनी बहुतेक हे आमचे फिल्मी स्टाईल होळीचे उद्योग बघितले असावेत आणि त्या फिल्मी होळीतल्या व्हिलनची उणीव भरून काढण्याची त्यांना हुक्की आली असावी. जे काय असेल ते पण तो किस्सा सॉलिड लक्षात राहिला.
किस्सा क्र. २.
एका धुळवडीच्या दिवशी आईने सांगितलं की त्यांच्या लहानपणी जेव्हा ते रंगपंचमी खेळायचे तेव्हा आत्तासारखे रंगांनी खेळत नसत. तर फक्त होळीच्या राखेने आणि पाण्यानेच खेळण्याची पद्धत होती. ती होळीच्या राखेने खेळायची कल्पना इतकी सही वाटली आम्हाला की आम्ही पण ठरवलं की यावर्षी आपण खेळण्याची निदान सुरुवात तरी होळीच्या राखेने करायची. नंतर आहेतच आपले नेहमीचे रंग. तर आम्ही सगळेजण गेलो होळीच्या इथे आणि यावेळी मी आपल्या सुपिक मेंदूचा वापर (न) करत एका लाकडाखालची राख घेण्यासाठी ते लाकूड बाजूला करण्यासाठी हातात उचललं. and that's it. done deal. खल्लास. 'वरून कडक मात्र आत गोड पाणी' वाल्या नारळाच्या किंवा 'बाहेरून काटे आणि आत गरे' वाल्या फणसाच्या अगदी उलट म्हणजे बाहेरून दिसायला गार पण आतून मात्र 'इंतकामच्या' आगीने धगधगणा-या लाकडाने मला असा काही चटका दिला की त्यानंतर होळीच्या लाकडाची राख हा पर्याय कितीही डॅशिंग वाटला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी बाजारात मिळणा-या (अनैसर्गिक आणि केमिकलमिश्रित) रंगांशी सदैव एकनिष्ठ राहिलो.
किस्सा क्र. ३.
आमचा मित्रमैत्रिणींचा ग्रुप डोंबिवलीभर पसरलेला असल्याने साधारणत: एका एरियातले सगळेजण एकत्र भेटत आणि असे छोटे छोटे ग्रुप पुढे जात जात एकमेकांना भेटत. तर एकदा असेच आमच्या एरियातले आम्ही ५-६ जण एकमेकांना भेटलो आणि पुढच्या ग्रुपला भेटायला म्हणून एका मैत्रिणीच्या घराच्या दिशेने चालायला लागलो. तिच्या घराच्या आसपास पोचल्यावर लांबूनच आम्हाला तिच्या बिल्डिंगखाली एक खूप मोठ्ठा, चित्रविचित्र रंगलेला, आरडाओरडा करत खिदळणारा ग्रुप दिसला. ते प्रकरण काहीतरी विचित्र वाटत असल्याने आम्ही तिच्या बिल्डिंगच्या जास्त जवळ न जाता लांबच उभे राहून तो मोठ्ठा ग्रुप गेला की मग तिकडे जाऊ असं ठरवलं. पण बराच वेळ झाला तरी तो ग्रुप काही निघेना आणि शेवटी कंटाळून आणि जरा वेळाने नीट निरखून बघितल्यावर आम्हाला एक चेहरा ओळखीचा वाटला. बघितलं तर ती आमच्याच ग्रुपमधली एकजण होती. असं करत करत एकेक चेहरा ओळखीचा दिसायला लागला आणि नंतर आम्हाला कळलं की हा (लोकांच्या दृष्टीने धांगडधिंगा, आरडाओरडा करणारा) मवाली (वाटणारा) ग्रुप म्हणजे आमचाच ग्रुप होता. तेव्हापासून धुळवडीच्या दिवशी माखलेले चेहरे घेऊन रस्त्याने हिंडणा-या कुठल्याही ग्रुपला आम्ही कधीही नावं ठेवली नाहीत.
किस्सा क्र. ४.
मी काही झालं तरी धुळवडीच्या दिवशी कधीही ऑफिसला जात नसे. कसंही करून शिफ्ट अॅडजस्ट करून किंवा एक्स्ट्रॉ शिफ्ट करून किंवा दुसरं काहीतरी सेटिंग करून मी घरी असायचोच त्या दिवशी. पण एकदा काय झालं की एक नवीन बॉस आला होता आणि नवीन आणि फक्त त्यामुळेच कडक असल्याने तो यातलं काहीही करायला देणार नाही याची मला पूर्ण कल्पना होती. आणि फक्त धुळवडीसाठी ऑफिसला दांडी मारतोय असं सांगणं म्हणजे तेच रंग वार्षिक अप्प्रायझल मध्ये अधिक तेजस्वीपणे चमकावणं असं होतं याची मला पूर्ण कल्पना असल्याने मी सरळ त्यादिवशी सकाळी फोन करून मी आजारी आहे आणि खूप ताप आला आहे असं ठोकून दिलं. झालं... नेहमीप्रमाणे ६-७ तास खेळून झाल्यावर घरी आलो आणि आंघोळ करून बाहेर आलो आणि बघतो तर काय चेह-यावरचा, कानामागचा, नखांमधला रंग जसाच्या तसा. पुन्हा आंघोळ केली तरी तेच. इतका प्रयत्न करूनही रंग निघत नाही हे बघून ऑफिसमध्ये दुस-या दिवशी होऊ घातलेला तमाशा आणि अप्प्रायझलवरची रंगरंगोटी माझ्या डोळ्यासमोर माझ्याच नावाने होळीच्या बोंबा मारत फेर धरून नाचायला लागली. आणि ते सगळं टाळण्यासाठी उरलेला सगळा दिवस हात आणि चेहरा हे साबण, रॉकेल, पेट्रोल, डीटर्जंट आणि अशा कुठल्या कुठल्या अगम्य आणि भयंकर पदार्थांनी धुण्यात घालवला. होता होता बराचसा रंग गेला आणि नखांत उरलेला थोडासा रंग म्हणजे मित्रांनी जबरदस्तीने लावलेला रंग आहे अशी थाप क्र. २ मी दुस-या दिवशी बॉसच्या गळ्यात अडकवण्यात यशस्वी झालो.
किस्सा क्र. ५.
फिरंगी देश, अडीच दिवस सतत पडलेला स्नो, रस्त्याने चालताना दुतर्फा बर्फाचे डोंगर, या सगळ्यात जुनी लाडकी होलिकामाय कधी लोप पावली कळलंही नाही. घरात पुरणपोळीचा बेत तर आहेच पण रंगरंगोटी राहून गेली.
किस्सा क्र. ६.
"बाबा बायेल ये.... पतकिनी.... आं आं ऊ.... लागलंय बग माज्या पायाला कायतली" .. मी धावत बाहेर येतो, खाली वाकतो आणि त्याच क्षणी त्याच्या पिचकारीतलं पाणी थेट माझ्या नाकपुड्यांत आणि तोंडात. तो हसतो, टाळ्या पिटतो आणि त्याच्या आजूबाजूचेही टाळ्या पिटतात. तेच ते सगळे चित्रविचित्र रंगांनी माखलेले, आरडाओरडा करत खिदळणारे !!!
हे...हे...हे...
ReplyDeleteभारीच आहेत किस्से, क्रमांक २ मात्र खुप आवडला.....
होळी आणि धुळवडीच्या अनेक शुभेच्छा!
मस्तच आहेत किस्से... किस्सा क्र.३ तर एकदम भारी....
ReplyDeleteमाझा लहानपणचा किस्सा म्हणजे मोठ्या जोशात दुसर्यला कलर लावायला जायचो अन तोच कलर स्वतःला फासून फासून रडत घरी यायचे.....
अन मोठे आता खेळतो ती कपडे फाड होळी...
मित्राच्या अंगावर फक्त प्यांट ठेवून बाकी फाडायचे....
मग गावभर तसच हिंडायचं...
कारण तसही कोण कोणाला ओळखताय म्हणा.....
अन हो एक राहील...अस्सल गावरानी शिव्या....
आहाह काय शिव्या यायच्या त्या दिवशी....
या होळीला नाही शिव्या देता येणार ....
कारण मोठ्या कॉलेजात आलो न..हाय फाय पोर आहेत इथे सर्व....:)
होळीच्या हार्दिक शुभेच्या..तुम्हा सर्वाना....
"बाबा बायेल ये.... पतकिनी.... आं आं ऊ.... लागलंय बग माज्या पायाला कायतली"
ReplyDeletehaha mast lihalay re
aavdal ;)
होळी रे होळी , पुरणाची पोळी :)
ReplyDeleteहोलिकोत्सवाच्या शुभेच्छा
mast ahe post..
ReplyDeleteHappy Holi..
अरे भांग वगैरे पिणे , आणि अपेय पानाच्या आठवणी? राहुन गेल्या की मुद्द्दाम लिहिल्या नाहीत?
ReplyDelete@आनंद, काय चटका बसलेला माहित्ये.. वाट लागलेली.. :-)
ReplyDeleteहोलिकोत्सवाच्या शुभेच्छा !!
@सागर, कसला पोपट झालेला रे. लांबून चेहरे ओळखले नसते तर त्या ग्रुपला अजून काय काय नावं ठेवली असती :-)
ReplyDeleteअरे हाय फाय पोरांमध्ये शिव्या दे उलट कचकावून. कॉलेजचा भाई होशील लगेच ;-)
होलिकोत्सवाच्या शुभेच्छा
विक्रम :-) .. माझाही तो काल्पनिक किस्साच सगळ्यात फेव्ह आहे. अर्थात मी तशी थोडी सोज्वळच कल्पना केली आहे. प्रत्यक्षात अजूनही भयंकर होईल काहीतरी. I've to be prepared. :-)
ReplyDeleteहोलिकोत्सवाच्या शुभेच्छा..
सुहास, तुलाही होलिकोत्सवाच्या शुभेच्छा...!!
ReplyDeleteआभार योग. तुलाही होळीच्या शुभेच्छा !!
ReplyDeletemasta;holichhya shubhechhya
ReplyDeleteकाका, भांगेच्या नशेमुळे ते किस्से लिहायचे राहूनच गेले बहुतेक ;-) .. हाहाहा..
ReplyDeleteअर्थात अगदी vast experience नसला तरीही १-२ किस्से टाकता आले असते... अरेरे.. :-)
होलिकोत्सवाच्या शुभेच्छा..
आभार.. तुम्हालाही होळीच्या शुभेच्छा.. !!!
ReplyDeleteएकदम जबरदस्त आहेत तुमचे अनुभव.. धुराड्याला (हा तेच ते, धुलिवंदनाला) आम्हीही भरपूर मजा करतो अजुनही.. सात दिवसांच्या आत कलर निघाले तर १००० रूपये, कारण वार्निश-बिर्निश, आणि इतर काही एकदम खतरनाक रंगांची पहिले भिती वाटायची, तेच रंग आज आम्ही खेळतो..
ReplyDeleteबाकी गँगवाला क्रमांक ३ चा किस्सा एकदम भन्नाट.. मलाही तसलाच प्रसंग आठवला, आमच्या गँगसोबत घडलेला, मी ९वी त असतांनाच.. असो.
होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
होळी रे होळी, पुरणाची पोळी, हेरंबजींच्या xxxxxxxxx बोंबा...!
;)
- विशल्या!
अरे विशल्या.. त्या वार्निश प्रकरणाची प्रचंड भीती आहे मला. त्यामुळे आमची धाव गुलालापर्यंतच असायची.. हो त्या गँगच्या किश्श्याची आठवण अजूनही निघते :-)
ReplyDeleteविशल्याच्या बैलाला ........................... !!!!! :-)
होलिकोत्सवाच्या शुभेच्छा.. !!
हा हा हा....सगळेच किस्से एकदम फ़ुल टु धमाल आहेत...आता मला रंगपंचमी न खेळण्याची पुन्हा एकदा चुटपुट लागलीय...
ReplyDeleteतुझ्या बॉसला थाप क्र. २ पचली म्हणजे भलताच कडक दिसतोय...:)
आणि हा लेख वाचताना खास पु.ल. शैली भावली....किस्सा क्र. ६ कोणाचा आहे (मला वाटतंय बहुतेक तू आणि तुझे बाबा..पण आदितेयच्या आधी काही असेल तर अर्थात मला माहित नाही म्हणा...:))
अग पुलंचा प्रभावच एवढा आहे की थोडं ईनोदी लिहिलं की ते आपोआपच पुल इश्टाईलमध्येच येतं. :)
ReplyDeleteमाझी पण रंगपंचमी मिस होतेय गेली काही वर्ष त्यामुळे वाईट वाटतंय.. जाम धम्माल केलीये ग.. :(
आणि तो बॉस मंद (महेंद्र काकांच्या भाषेत अकल'मंद') होता ग. नुसता नावाला कडक... आणि तेही मला त्या होळी प्रसंगा नंतरच कळलं
अग किस्सा ६ भावी आहे माजी नव्हे.. :-) उगाच कायच्याकाय :P
हा..हा...हा...अरे एक नंबर किस्से आहेत!!! होळी च्या हार्दिक शुभेच्छा!!!!
ReplyDeleteआभार मनमौजी.. आता वाटतंय सगळे किस्से द्यायला हवे होते. (हे आपलं उगाच ;-) )
ReplyDeleteतुलाही होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा !!
हेरंब,हा हा.... मला बाबा शेवटचा किस्सा खूप आवडला. आणि हो शेवटून दोन नंबर म्हणजे सेम पिंच....:( हे मात्र खरेच, काही रंग इतके जबरी असतात की चेहरा मोहराच बदलून टाकतात...आणि मग तुझ्या नंबर ३ च्या किश्श्याचीच गत होते. :)
ReplyDeleteहोली हैं...
भाग्यश्री ताई, आमचं ध्यान एवढं बिलंदर आहे की शेवटचा किस्सा प्रत्यक्षात घडेल तेव्हा अजून डेडली असेल बहुतेक :-) ..
ReplyDeleteबाकी शेवटून दुस-या किश्श्याच्या बाबतीत तर आपण समदु:खीच..
तिसरा किस्सा माझा पण एकदम फेव्ह आहे. :-)
सही रे सही...एकसे एक आहेत किस्से...पण मलाही ते शेवटचे ’भावी’ प्रकरण जास्त आवडले :)...... आणि बंधो ते असेच काहिसे घडेल असे मला वाटतेय रे कारण लेक तुझ्याच राशीचा आहे ना!!!!
ReplyDeleteमस्त आहेत किस्से. होळीच्या रंगीत शुभेच्छा.
ReplyDeleteतन्वी :) .. माझा 'माजी' मधला #३ फेव्ह आहे. पण अदरवाईज 'भावी' इस द बेष्ट.. आणि तोही मी थोडा सौम्यच लिहिलाय असं वाटतंय मला. कारण एक तर ही Gen-Y आणि पुन्हा एक रास. त्यामुळे पुरती काशी होणार आहे बहुतेक :P
ReplyDeleteआभार सिद्धार्थ.. तुलाही होळीच्या बोंबाबोंब आणि धुळवडीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा !!
ReplyDeleteछान किस्से आहेत होळीचे..शेवटचा किस्सा मस्त रंगवला आहे..तिसरा किस्सा इतरही काही बाबतीत लागु पडतो.
ReplyDeleteआभार देवेंद्र. हो बरोबर आहे. आलं लक्षात तुला काय म्हणायचंय ते. (आधी आलं नव्हतं म्हणून असं लिहितोय :) )
ReplyDeleteहा हा हा....छान आहेत एकेक किस्से! सर्वात शेवटचा किस्सा एकदम आवडला.... :-)
ReplyDeleteअरुंधती --
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
:D :D .. आभार अरुंधती आणि ब्लॉगवर स्वागत. शेवटचा किस्सा top position ला आहे :)
ReplyDeleteकाय एक एक किस्से घडतात रे!!! माझ्यासाठी होळीचे किस्से म्हणजे अति प्यालेली भांग, पोलिस जीपवर मारलेले फुगे आणि होळीसाठी चोरलेली लाकडे, जळणाऱ्या लाकडातून नारळ काढणे असे बरेच काही. लिहायला हवे आता... :)
ReplyDeleteसही. तुझे किस्से तर माझ्या डबल इंटरेस्टिंग दिसतायत.. टाक ना एक पोस्ट त्याच्यावर.
ReplyDeleteहा हा हा जबरी सगळे किस्से एक नंबर.
ReplyDelete"बाबा बायेल ये.... पतकिनी.... आं आं ऊ.... लागलंय बग माज्या पायाला कायतली"
शेवटचा किस्सा लय भारी रे.
तुम्हा सर्वाना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
हेहे धन्स सचिन... तुलाही होळीच्या अनेक शुभेच्छा !
ReplyDelete