Monday, February 22, 2010

आझाद-ए-हिंदी

"मराठी माणूस भुताला भित नाही तेवढा हिंदीला भितो" असं पुल म्हणतात ते फक्त ८०-९० च्या दशकापर्यंत लागू होत असावं (असं मला आपलं वाटतं) कारण त्यानंतर आलेल्या 'खाना'वळ, सिप्पी, चोपडा, बच्चन, जोहर, कपूर, मेहता, सिन्हा, खन्ना यांच्या कृपेने आपल्या पिढीचं ऐकीव आणि बोलीव (??) हिंदीचं ज्ञान निदान एवढं तरी सुधारलं की अगदी अटलजींच्यासारख्या हिंदी कविता किंवा भाषणं ठोकता आली नाहीत तरी 'उपरसे धाडकन पड्या, बुचकळ्या, बुड्या' वाल्या हिंदीतून आपण नक्कीच बाहेर पडलो आणि कामकाजापुरतं हिंदी बोलणं, हिंदी चित्रपट यंज्वाय  करणं हे मात्र आपण नक्की करू लागलो.

तर इतकी वर्षं इतके चांगले (वाईट जास्त) हिंदी चित्रपट बघूनही काही काही अगम्य हिंदी/उर्दू शब्दांचे अर्थ मला अगदी अलिकडे उमगले आणि ब-याचशा शब्दांनी माझं बालपण पोखरून ठेवलं होतं (अर्थात चित्रपट पहातानाच्या तीन तासांच्या आयुष्याविषयी बोलतोय मी). आणि एवढे अतर्क्य शब्द लेदर जॅकेट घालून बाईक वरून उंडारणारा हिरो असो वा फाटक्या चिंध्या घालून बसलेला रस्त्याच्या कडेचा भिकारी असो दोघेही इतक्या सारख्या सहजतेने वापरायचे की ते बघून तर मला त्यांचे वंशज अफगाणिस्थान, इराण, इराक, कतार असल्या कुठल्यातरी कट्टर उर्दू/अरेबिक भाषा बोलणा-या देशांतले असावेत असं वाटायचं. थोडाफार विनोदाचा भाग सोडला तरी खाली दिलेल्या उदाहरणातलं एकही उदाहरण हे उगाच विनोदनिर्मितीसाठी तयार केलेलं नाही. यातले प्रत्येक शब्द, वाक्य, विधानं मला लहानपणी, शाळेत/कॉलेजात असताना, आणि काही काही अगदी गेल्या ३-४ वर्षांपूर्वीपर्यंत अगदी जेन्यूईनली गोंधळवून टाकायचे. तो चलो डोकावते है बॉलीवूड हिंदी मे..

शुक्रिया : हिरो नेहमी हिरोईनला शुक्रिया म्हणायचा. मला वाटायचं हिचं नावच शुक्रिया असावं. आपली सुप्रिया तशी यांची शुक्रिया. 'पार्टनर' मध्ये वपुंना "असं गवतासारखं सगळीकडे उगवलेलं जोशी आडनाव हे किरणचं आडनाव असायला नको" असं वाटायचं तसंच मलाही प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळ्या असणा-या नायिकांचं नाव एकच का असा प्रश्न पडे. पण तो नायकही तिला एकदा शुक्रिया म्हणायचा आणि नंतर पुढच्या सीन मध्ये हेमा, रीना, सीमा असं काहीतरी म्हणायचा तेव्हा मला वाटायचं की शुक्रिया हे पाळण्यातलं नाव असावं आणि तिला ते आवडत नसल्याने तो तिला तिच्या आवडत्या अशा दुस-या एखाद्या नावाने हाक मारत असावा. (यावरून आठवलं, वेंकट हे नाव तेलुगु भाषिकांमध्ये एवढं कॉमन आहे की माझा मित्र म्हणायचा की हैद्राबादमध्ये रस्त्यावरून चालताना १० खडे मारले तर त्यातले ८ वेंकट नावाच्या व्यक्तीला लागतील.)

बादल : असंच अजून एक इंटरेस्टिंग प्रकरण म्हणजे बादल. तर बादल हे यांच्या प्रत्येक ड्युएटमध्ये असायचंच. अगदी प्रामाणिकपणे सांगतो बादल म्हणजे मला वादळ वाटायचं त्यामुळे मला हे कळेना की च्यायला यांना हा वादळ प्रकार एवढा रोमँटिक का वाटावा. अर्थात मला वादळ/बादल प्रकार नीट कळत नसला तरी रोमँटिक म्हणजे काय हे माहित होतं. एतद्देशीय भाषांपेक्षा आंग्लभाषेचं विशेष प्रेम आणि आकलन म्हणा किंवा (जरा जास्तच) लवकर आलेली समज म्हणा. जे काय असेल ते. आपल्याला कारणांत शिरायचं कारण नाही

कुमार : आता कुमार हा हिंदी शब्द नाही हे माहित्ये मला पण पूर्वी हिंदी चित्रपटात चमकणारे हे असंख्य कुमार पाहून मला कुमार हे सुद्धा कपूर, खन्ना, सिन्हा सारखं एक आडनावच वाटायचं. लहानपणी एकदा एका मित्राच्या मित्राने त्याची ओळख 'मी कुमार'अशी करून दिली तेव्हा त्याला "तू पिक्चर मध्ये काम करतोस का?" आणि "तुझं (नक्की) नाव काय? कुमार हे तर आडनाव झालं" असले (आता मुर्खासारखे वाटणारे) प्रश्न विचारण्याची अनिवार इच्छा मला झाली होती.

फसाना-अफसाना : मला आधी हे दोन वेगळे शब्दच वाटायचे. अर्थाच्या नावाने अर्थातच बोंब होती. पण नंतर कळलं की यमक आणि गाण्याची चाल जुळवण्यासाठी हा शब्द शिताफीने कुठेही कसाही वापरू शकतो. आणि तरीही अर्थ तोच राहतो. वा वा.

समा-आसमा : इथे एक गडबड झाली. मी तो वरचा 'फसाना-अफसाना'वाला नियम इथेही लावून बसलो. म्हंटलं नसेल जुळत यमक कधीकधी म्हणून बदलत असतील हाही शब्द. पण बदललेल्या शब्दाने (माझ्या दृष्टीच्या) अर्थाची मात्र नुसती वाट लागायची. तर इथे हे सांगणं क्रमप्राप्त आहे की मला दोन्ही शब्दांचा अर्थ आकाश (आसमा) असा वाटायचा. त्यामुळे 'समा है सुहाना सुहाना'मध्ये 'आकाश इतकं छान छान का असावं' असा मला प्रश्न पडायचा. अर्थात सुहाना म्हणजे छान हा पण इतर असंख्य अर्थांप्रमाणे मी ढोबळ मानने काढलेलाच अर्थ होता.

शमा-परवाना : आता हे शमा आणि परवाने. गाणी ऐकून साधारण वाटायचं की ही शमा म्हणजे कोणीतरी महान सुंदरी असावी आणि तिच्यामागे लागणा-या सगळ्यांना परवाना म्हणत असावेत. पण कोण होती ही एवढी महान बया ते काही कळत नसे. जळणं बिळणं माहित नव्हतं त्यामुळे कोण ही शमा जिच्यामागे एवढे परवाने पागल होतात असं सारखं वाटायचं. पण नंतर शमा म्हणजे ज्योत आणि परवाने म्हणजे त्या ज्योतीवर झेपावणारे पतंग (किडे. मांजावाले पतंग नव्हेत) हे कळल्यावर तर माझा अपार हिरमोड झाला होता हे अजूनही त्या शमेच्या प्रकाशाएवढं लख्ख आठवतंय.

हसीन किंवा हसीना : हे प्रकरण म्हंजे आपण हसतमुख म्हणतो त्या टायपातलं हसणारा/री (न म्हणजे रा, ना म्हणजे री) असावं असं नेहमी वाटायचं मला. आणि 'हसीन कातिल' म्हटलं की चाकूचे सपासप वार करून झाल्यावर किंवा धडाधड गोळ्या उडवल्यानंतर त्या प्रेताकडे बघून खदाखदा हसणारा पिसाट खलनायक वाटायचा मला. 

मांग : मुख्य म्हणजे "हमारी मांगे पुरी करो" मुळे सगळा गोंधळ झाला या शब्दाबद्दल. त्या 'खून भरी मांग' च्या पोस्टरवर दिसणारी डॅशिंग रेखा आणि त्याच सुमारास वाचलेलं 'कमलाकर नाडकर्णी' यांचं त्या चित्रपटावरचं 'मगर मगर' वालं जबरी परीक्षण वाचून तर मला रेखाने का बरं असल्या भयंकर मगरींच्या रक्ताबद्दलची मागणी केली असावी असं (चित्रपट बघण्यापूर्वी) वाटायचं. (चित्रपट बघितल्यानंतर नाडकर्णींबद्दलचा आधीच असलेला आदर अजूनच वाढला.)

दिवार-दिवाल : दिवारला दिवाल हा एक प्रतिशब्द आहे असं सांगणा-या आमच्या एका मित्राला आम्ही "तो चुकीचा शब्द आहे. अशुद्ध असेल" असं सांगितलं होतं. एखाद्याचं अशुद्ध हिंदी मी (त्या काळी) शोधून त्याला दाखवून द्यावं हे म्हणजे फार होतं. त्याने काय किंमत केली असेल माझी देव जाणे .

मौसम : हे एक भारी प्रकरण होतं. 'आया प्यार का मौसम' किंवा 'मस्तीभरा मौसम' असं सारखं सारखं ऐकून मी माझ्याहून वयाने मोठ्या असलेल्या एका मित्राला (आणि त्यामुळे साहजिकच त्याला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल या अपेक्षेने) "मौसम म्हणजे काय रे (भाऊ) ?" असं विचारलं होतं. आणि तो कदाचित नुकताच टीव्हीवरच्या 'मौसम की खबरे' बघून आला असावा त्यामुळे त्याने चटकन उत्तर दिलं "मौसम म्हणजे हवामान". झालं. मला कित्येक दिवस कळेना प्रेमाचं हवामान, मस्ती मजा करण्याचं हवामान म्हणजे नक्की काय बुवा? मग 'मस्तीभरा मौसम' म्हणजे हिवाळा असावा बाबा अशी मी आपली माझी समजूत करून घेतली. कारण हिवाळा हा अतिशय उत्साहवर्धक ऋतू आहे हे तेव्हाच्या सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात होतं आम्हाला.

बरसात-बारिश : आता एकाच पावसाला दोन दोन नावं का बरं देतील असं विचार करून मी, उगाच, माझ्याच मनाने, कोणालाही न विचारता बरसात हे जरा भारदस्त वाटत असल्याने बरसात म्हणजे आपला मुसळधार टाईप पाऊस आणि बारिश म्हणजे रिमझिम पाऊस असे अर्थ काढले होते.

**-ए-** : दर्द-ए-दिल, दीदार-ए-यार , दिल-ए-नादान, ऐलान-ए-जंग, शेर-ए-हिंदुस्तान, रुस्तुम-ए-हिंद या अशा 'ए' वाल्या ('ए' ग्रेड वाल्या नाही हो) शब्दांचा अर्थ अजिबात कळत नसे. आणि त्यामुळे दुखण्याचं हृदय, बघणारा मित्र, हृदयाचं वेडेपण, सिंहाचा हिंदुस्तान हे असले अर्थ निघत. कालांतराने मला कळलं की 'ए' या छोट्या अक्षरात एवढी ताकद आहे की तो संपूर्ण शब्द उलट वाचायला भाग पाडतो. त्यानंतर त्या शब्दांचे खरे अर्थ कळायला लागले. मग मला लक्षात आलं की लोकांना शेरो-शायरी, गजला-बिजला एवढ्या का आवडायच्या आणि मला त्या का आवडायच्या (वाचा कळायच्या) नाहीत.

चमन, गुफ्तगू : चमन म्हटलं की चमन-गोटा आणि  गुफ्तगू म्हणजे काहीतरी अदृश्य बिदृश्य होणं असावं हे असे अर्थ डोक्यात एवढे भिनले होते की या शब्दांचे एवढे नाजूक, कोमल अर्थ असतील हे मूळ अर्थ कळल्यावर पटेचना. (डंब-शराझ खेळताना तर गुफ्तगू पिक्चर आला की आम्ही त्याचा अक्षराच्या अर्थाप्रमाणे अभिनय करून दाखवायचो. म्हणजे दोन बोटं उभी करून दाखवायचो आणि मग पाहिलं आणि शेवटचं अक्षर सेम आहे असं सांगायचो. :P)

धडकन, चष्मेबद्दूर : या दोन शब्दांचे अर्थ माहित असले तरी त्या शब्दांच्या उच्चारांमुळे विचित्र किंवा विनोदी असेच जास्त वाटायचे. धडकन म्हणजे धाडकन वाटायचं आणि चष्मेबद्दूर म्हणजे ढापण्या किंवा चष्मिस वाटायचा.

ढल : 'ढलना' म्हणजे मावळणे हे कळेपर्यंत मी ते "ढल गया दिन, हो गई शाम" वालं गाणं चक्क "जल गया दिन, हो गई शाम" असं म्हणायचो. मला 'ढल' चा अर्थ माहित नसल्याने ते 'ढल' बरोबर ऐकूनही मला वाटायचं की आपण काहीतरी चुकीचं ऐकत असू आणि म्हणून मी तो 'ढ' चा 'ज' करून टाकायचो.

रैना, रूत : रैना म्हणजे रात्र आणि रूत म्हणजे ऋतू हे कित्येक रात्री आणि ऋतू सरले तरी माहित नव्हतं..

प्रियकर/प्रेयसी : (याला हिंदी शब्द काय बरं?? असो. बाय द वे, ईसवी सन १९९० नंतर जन्माला आलेल्या समस्त जनांनी समजण्यास सोपे जाण्यासाठी येथे बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड असे वाचावे.) : आता त्या प्रियकर/प्रेयसीला किती ते शब्द . जानु, जाने  जहां, जाने जनाना, हमसफर, हमदर्द, शहेखुमा, जानम, सनम, जाने जिगर, यारा (यार माहित होतं) , दिलदार, जानेमन.. बापरे बाप.

बरखा, घटा, बहार, वादिया : या शब्दांचे नक्की आणि अगदी अचूक अर्थ खरं तर मला अजूनही माहित नाहीयेत. माहिती आहेत ते फक्त अंदाजे अर्थ.. आणि तसेही हे सगळे शब्द गाण्यांतच येतात म्हणा. त्यामुळे नाही कळले नीट तरी विशेष बिघडत नाही. पण तरीही "बहारो फुल बरसाओ" म्हटलं की फुलं कोण टाकणार किंवा "ये हसी वादिया" म्हटलं की नक्की छान काय आहे? (हसी म्हणजे हसणारा नव्हे.. विसरलात?), "काली  घटा" म्हणजे नक्की काळं काय किंवा "बरखा बहार " (बोंबला दोन्ही शब्दांची बोंब आहे) म्हणजे काय बरं हे असे प्रश्न मला अजूनही पडतात. ज्यांना या शब्दांचे अचूक अर्थ माहित असतील त्यांनी कमेंटात टाका, जे माझ्यासारखे समदु:खी असतील आणि अजूनही (म्हणजे इतकी वर्षं झाल्यावरही या अर्थी नव्हे तर अनेक/खूप याअर्थी ) कित्येक शब्दांचे अर्थ माहित नसतील त्यांनीही कमेंटा, कोणीतरी उत्तर देईलच :)...

 'एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ' किंवा हिंदीतच सांगायचं झालं तर 'मुझे लेके साथ चल तू, युंही दिनरात चल तू, संभल मेरे साथ चल तू, ले हाथोंमे हाथ चल तू, ओ साथी चल SSSSSS '

ताजा कलम (हा मूळ शब्द हिंदीत असला तरीही त्याचा योग्य अर्थ सगळ्यांनाच माहित असल्याने गोंधळ उडणार नाही) : मी जे वर दिलेल्या अनेक शब्दांचे मला बरोबर वाटलेले अर्थ दिलेले आहेत त्यातले अगदी सगळेच्या सगळे नाहीत तरी काही, बरेचसे अर्थ चुकले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे हसून झाल्यावर त्याचे योग्य अर्थ टाकलेत तरी चालेल.

45 comments:

  1. ultimate post...liked it very much. Most of the words here are Urdu words having Persian roots which seeped into Hindi over a period of time. And it is really a language of love and royal one. One more kind of words I never used to understand - Ijahar, Ikarar, Inkar, Intajar...all sound same.

    ReplyDelete
  2. आभार निखिल आणि ब्लॉगवर स्वागत. हो.. बरेचसे शब्द उर्दू, अरेबिक, पर्शियन अशा भाषेतले म्हणजेच आपल्या दृष्टीने आताच्या हिंदीतले आहेत :D..

    आणि हो. 'इजहार' आणि 'इकरार' च्या बाबतीत १००% सहमत :)

    ReplyDelete
  3. एकदम फ़ंडु लिहिलंस....
    BTW वेंकट या नावाने तू इथे अमेरिकेत जरी खडे मारलेस तरी प्रत्येक मित्र-मैत्रीणीचा किमान एक आणि त्यांचे काही असे मिळून पार्टीला किती गर्दी होईल कल्पना आली नं.....:)
    आणि हो तो फ़ेमस "रब" राहिलाच की....रब ही भानगड फ़क्त हिंदी गाण्यातच का असते मला कळत नाही...जाऊदे रब मुझे माफ़ करे.....

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर. ते १० खडे इथे पण ८ वेंकटांनाच लागतील. मला माहिती होतं की बरेच शब्द राहणार आहेत म्हणून. पण रब कसा राहिला.. अरेरे. रब मुझेभी (माफ नाही) मुआफ करे ;-)

    ReplyDelete
  5. हेरंब,मस्त पोस्ट.तुझे अवलोकन आणि मांडणी सहीच. मुख्य म्हणजे ही कल्पनाच मला आवडली. ”मांग’.... हाहा. चष्मेबद्दूर या शब्दाने एकेकाळी जाम पिडले होते. तुझे ढल चे जल सहीच आहे. बहुतेक दिल जलने लगा... किंवा दिलजले वरून असेल... मराठीतही दिन ढळला असे म्हटले जाते पण तसे बोली भाषेत कोणी म्हणत नाही. धृवाचे अढळपद ढळले.:)

    महसीमियों ने जब मायुस किया है
    गुलहा-ऐ-मुराद बन गए हौसलें मेरे...

    महसीमियों ने म्हणजे - साथीने-सहचारी असेच म्हणायचेय की.....? गुलहा-ऐ-मुराद... ? अर्धवट कळते पण.... गुल चा अर्थ गुलशन शी जोडून लावला तर... पण मग हौसलें तर बुलंद असतात ना नेहमी... :)
    बाकी हिंदी चित्रपटसृष्टीने अनेक उर्दू शब्दांची ओळख करून दिली आहेच.

    ReplyDelete
  6. चष्मेबद्दूर..बहोत खूब...मशहअल्लाह...
    बस मस्त झालीय पोस्ट नेहमीप्रमाणे एवढाच म्हणायाच आहे lol

    ReplyDelete
  7. आभार भाग्यश्री ताई.. :-) .. त्या मांग, बादल, शुक्रिया आणि शमा-परवान्याने जाम छळलं होतं. अरे हो. धृवाच्या अढळपदावरून आला लक्षात आपला 'ढळला' ह शब्द.. :)

    वाह वाह.. माशा आल्लाह..!!

    ReplyDelete
  8. हा हा सुहास.. (सुप्रिया नव्हे) शुक्रिया .. ;-)

    ReplyDelete
  9. लोग हर मंझील को मुश्कील समझते है...
    हम हर मुश्कील को मंझील समझते है.
    बडा फर्क है लोग और हमारे नझरीए में,
    लोग दिल को दर्द और हम दर्द को दिल समाझते है...

    शायर जाग उठा :)

    पण आता सुहास झोपतोय..हे हे हे
    गुड नाइट

    ReplyDelete
  10. वाह वाह ..!! सुभान अल्लाह.. थोडा हमारा भी.. इर्शाद

    कुछ पल ढल जाते है|
    कुछ लोग गुम हो जाते है|
    हम तो वाकीफ न थे इस बात से |
    के हम भी शेर लिख पाते है ||

    ReplyDelete
  11. बरखा = वर्षा (बरखा दत्त= वर्षा दत्त :-) )
    बहार =वसंत,बसंत. बहार म्हणजे बहरण्याचा मोसम अर्थात वसंत.

    ReplyDelete
  12. शुक्रिया संकेत मियाँ !! :-)

    ReplyDelete
  13. शुक्रिया.. ;-) .. आपली 'स्टार डॉट स्टार' ची सवय थोडीच जाणार आहे :-)

    ReplyDelete
  14. मस्त लेख आहे रे ! हैसियत, तहकिकात हे शब्द पण याच वर्गातले आहेत.

    ReplyDelete
  15. शुक्रिया अभिजीत.. हो बरोबर.. मला वाटतं या सगळ्या उरलेल्या शब्दांवर अजून एक पोस्ट टाकायला लागणार :-)

    ReplyDelete
  16. अकलमंद म्हणजे मला मंद बुध्दी वाटायचा कित्येक दिवस..

    ReplyDelete
  17. हा हा हा हा हा हा हा हा .... जबरदस्त हसतोय अजूनही !! आपने तो वाकई कमाल कर दिया, चाचाजान !!

    ReplyDelete
  18. त्या *-ए-* ने मला पण फार काळ पीडलं होतं ... शेवटी ‘ए’ म्हणजे `of' असं लक्षात ठेवलं :)

    ReplyDelete
  19. बरेच दिवसांनी आलीस गौरी.. .. यस्स.. ऑफ हे तर एकदम परफेक्ट आहे.. :-)

    ReplyDelete
  20. सहीये एकदम पोस्ट............. तुला पु.लं.चे ते आठवतेय का ’चश्मेबद्दुर’ म्हणजे चष्मा लावलेले रावबहाद्दूर...........हेहे..
    हाच अनुभव थोड्या प्रमाणात इथे मस्कतला येतोय आम्हाला..आणि इथले अनेक उर्दू /अरेबिक शब्द ऐकले की ते हिंदीतच काय पण मराठीतही आपण तसेच वापरतो हे ज्ञान मिळालेय आता....अगदी ’बाबा’, ’बटाटा’ वगैरे शब्दही अरेबिक मधे जसेच्या तसे आहेत.....
    बाकि ते शायरी/गजला मला अजुनही बरेचदा समजतच नाहीत किंवा निदान १०-१५ वेळा ऐकायला लागतात....

    ReplyDelete
  21. इन्शा अल्लाह क्या फ़र्माया है आपने ...
    बहोत खुब जनाब...
    हमेभी बचपनसे ये और ऐसे बहुत सारे हिंदी-उर्दु शब्दोने घायल किया हुआ है विशेषत: गानोमे...अभी अभी सलमान मिया ने भी ’ तक्कलुफ़ छोडिये अजी तारुफ़ किजिये’ कहके हमे परेशान कर दिया था.अब तो बहोत सारे उर्दु शब्द तो मराठीमे भी घुल-मिल गये है ...

    ReplyDelete
  22. शुक्रिया तन्वीजी :).. हो आहे लक्षात पुलंची चष्मेबद्दूरची व्याख्या :-) .. अरे वा. बाबा, बटाटा जसंच्या तसं?... मस्तच..
    शायरी-गजला तशा समजतात पण तकल्लुफ-ए-इजहार वगैरे आलं की मी क्लीन बोल्ड..

    ReplyDelete
  23. क्या बात है देवेंद्र मियाँ. बहोत खूब फरमाया आपने. तक्कलुफ़-ए-तारुफ़ ने हमे पल दो पल मे नेस्तनाबूद कर दिया !!!

    ReplyDelete
  24. Laeech Bharii lihileyas... Ashich Posts Padat rahaa [Boondi Padtaat Tashi] Ekdum Zakkass

    ReplyDelete
  25. बापरे तुला भारीच उर्दू येता की... तक्कलुफ़-ए-तारुफ़ ने हमे पल दो पल मे नेस्तनाबूद कर दिया !!! वाह वाह :)

    ReplyDelete
  26. असाच एक भारी शब्द म्हणजे ’फिजा’, हे सुद्धा एका मुलीचं नाव वाटायचे...
    मग एका शायर मित्राला याचा अर्थ विचारला होता... :-)
    लेख नेहमीप्रमाणेच शॉल्लीड!!

    अकल’मंद’ तर सहीच!

    ReplyDelete
  27. apratim mastach
    aamhihi lahanpani anek ganyatil shabda kasehi mhanat asu....agadi chupke chupke gulam aalinchya ganyat khichlena o tera....he mi barech varsha...achilena...asach kahitari gat hoto....aani mitrani vicharala tar bedhadak to urdu shabd aahe tula kalanar nahi asach sangaycho....alikade matra thapa lavata yet nahit

    ReplyDelete
  28. शुक्रिया निशिकांत मियाँ. लोकं (आणि मी स्वत:) कंटाळत नाहीत तोवर बुंदीखाना असाच चालु ठेवायचा विचार आहे :P

    ReplyDelete
  29. अरे तसं काही नाही रे सुहास. थोडी जोडाक्षरं आणि क, ख, फ हे epiglottis (माय नेम वाला) मधून म्हटले की झाले अवघड उर्दू शब्द तयार. त्यासाठी उर्दू यायलाच पाहिजे आणि त्या शब्दांचे अर्थ कळायलाच पाहिजेत असं काही नाही .

    ReplyDelete
  30. हो यार. त्या फिझाचं पण असलंच काहीतरी आहे. या सगळ्या राहून गेलेल्या शब्दांवर मला खरोखरच एक नवीन पोस्ट टाकायला लागणार आहे बहुतेक.

    ReplyDelete
  31. अगदी अगदी, सुषमेय.. माझ्याबाबतीत पण हे अगदी असंच घडायचं. फरक एवढाच की मी 'रिसिव्हिंग एंड' ला असायचो. म्हणजे मी असं काहीतरी विचारायचो (वर 'मौसम' मध्ये सांगितलंय तसं) आणि मला मग असेच माझ्या उर्दूच्या ज्ञानाचे धिंडवडे काढलेले पाहायला लागत :-)

    ReplyDelete
  32. Sahiye post........ Altimate.......
    Dhamaal ekdam
    udya paper aahe maza pahila....jaam pakale hote
    Post vaachun jara bare vatayalaa lagale ( kitti kaal lotalaa aapan hasalyala ase vatayala laagale hote mala) So.... Thanks.... :)

    ReplyDelete
  33. शुक्रिया, मैथिली.. तुझी प्रतिक्रिया बघितल्या बघितल्या वाचायच्या आधीच मी विचार करत होतो अरे हिची परीक्षा आहे ना.. पण जाउदे तू अभ्यास करून already पकली आहेस, अजून पकवत नाही. :)
    पोस्ट वाचून तुझा मूड बदलला हे वाचून बरं वाटलं.
    'इम्तेहान के लिये किस्मत तुम्हारा साथ दे येही रब से दुआ'.... काही नाही ग, All the Best देतोय. :P

    ReplyDelete
  34. Waa mitra, mast jamlaya urdu shabdancha jangad-butta..
    Asach ek bahutek mithun cakravarti var chitrit zaalel ek gaan aahe, aaj paryant mala tyachya pahilya oLicha arth kaLlela nahi
    ''RIHALE MASTI MUKAN BIRANJISH, BAHAR-E-HIJARA(??) HAMARA DIL HAIN''
    Hi complt ool agdich agamy. Yatle shabd hi parichyache nahi.
    Tasa he gaan mala swathala kalat nasla, tari khup awdta. Aata lihinaryane 'hamara dil' baddal lihilay, tewha ya shiwya nakkich nasavya.. Pan mag kaay aahe kunala mahitiye ka?

    ReplyDelete
  35. शुक्रिया अमितमियाँ, जवाब देनेमे जरा देर हो गई इसलिये मुआफी.. कारण त्या ओळी वाचून मी फेफरं येऊन पडलो होतो. घेरी आली नुसतं वाचूनसुद्धा. (घेरी आणि फेफरं यांना उर्दू प्रतिशब्द मला माहित असणं हे सर्वस्वी अशक्य आहे म्हणून वरच्या ओळी आणि कंटाळा आल्याने पुढच्याही ओळी मराठीत लिहितो आहे.)
    ज्याला उर्दू, अरेबिक, पर्शियन असलं काहीतरी जबरदस्त येत असेल त्यानेच लिहिलं असणार हे. पण त्याला 'मिथुन दि ग्रेट' च्या audience बद्दल काहीच कल्पना दिसत नाही. :-)

    ReplyDelete
  36. हेरंब,
    जबरदस्त झालंय. ह्यातील काही शब्दांबाबत माझीही तुमच्यासारखीच समजूत होती लहानपणी :)

    ReplyDelete
  37. हो ना निरंजन. हे बॉलीवूड वाले सगळ्यांना सगळे शब्द समजत असतील असं समजून एवढे अवघड अवघड उर्दू शब्द घुसडून ठेवतात ना आणि ते इतके रेग्युलरली वापरले जातात हे बघून कोणी विचारत नाहीये म्हणून आपण तरी का विचारा या अशा विचारातून माझ्या (आपल्या)सारखे लोक काहीच विचारत नाहीत. म्हणूनच या अन्यायाला वाचा फोडायचं ठरवलं मी आज :P ..

    जाउदे अति होतंय. प्रतिक्रियेबद्दल आभार !!

    ReplyDelete
  38. danger post ahe, majaa ali vachatanaa , evadha vichar kasa kai kon karu shakata hach prashan mala padalay, manala tula bhau

    ReplyDelete
  39. :D .. आभार अजय.. अरे करतो मधून मधून थोडा थोडा विचार. For a change :P

    ReplyDelete
  40. एकदम भारी...जबरदस्त...
    पण खर तर उर्दू ने केलेल्या घुसखोरीमुळे उगाच आपण हिंदीला घाबरून आहोत.
    हिंदी त्या मानाने बरीच सोपी भाषा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतले बरेच जुने कलाकार उर्दू ची उजळणी करत बसले आणि आपण न कळता माना डोलावत राहिलो.
    पोस्ट एकदम मस्त. पार्ट २ लिहायला हरकत नाही.

    ReplyDelete
  41. शुक्रिया सागर !!

    तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. उर्दूमिश्रित हिंदीत उर्दू आणि हिंदीचं जरा imbalance झालं की आपण बोंबललो. जेवढे उर्दू शब्द जास्त तेवढं ते हिंदी उच्च कोटीचं असे काहीतरी समज असावेत पूर्वी असं मला तरी वाटतं. पण त्यामुळे वाट आपली लागते :) ..
    बघू. कदाचित पार्ट-२ येईलही. कारण अजूनही बरेच शब्द शिल्लक राहिले आहेत :-)

    ReplyDelete
  42. कसं सुचते रे तूला ??? विषय आणि आशय मस्त आहे ... :) आता लगेच भाग २ वाचतो. :)

    ReplyDelete
  43. हा हा. अरे सुचायचं काय? या सगळ्या शब्दांनी मला लहानपणी गंडवलेलं आहे. तेच धडधड टंकून काढलं :) ...

    म्म्म्म दुसरा भाग आवडणार नाही कदाचित. बर्‍याच जणांना नाही आवडला/पटला.

    ReplyDelete
  44. @ Amit, the translation of the song is here - http://in.answers.yahoo.com/question/index?qid=20101122231117AAgOWtj

    ReplyDelete

पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन

श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...