वादळी भाषण, वादळी खेळी, वादळी चर्चा, वादळी सभा असं जिथे तिथे 'वादळी' हे विशेषण जोडून तो शब्द, त्याचा अर्थ, त्याचा डौल, दिमाख कसा अगदी वादळवून टाकलाय आपण. (हो वादळणे असा शब्द आहे. त्याचा अर्थ एखादा पदार्थ खराब होणे, किंवा पापड, चिवडा मऊ होणे या अर्थी. ) .. पण मी आज हा शब्द अगदी ख-याखु-या अर्थाने वापरणार आहे कारण तेवढ्याच जवळून अनुभवलं मी एक वादळी वादळ. हिम वादळ. स्नोस्टॉर्म.. म्हणजे ते पुस्तकात किंवा डिस्कव्हरीवर दाखवतात तसं जीवावर बिवावर बेतलेलं नव्हे. पण अगदी जवळून पाहिलेलं आणि मस्त मजा केलेलं हे वादळी वादळ.
weather.com च्या म्हणण्यानुसार मंगळवार (९ फेब) रात्री १० पासून स्नो सुरु होणार होता तो डायरेक्ट गुरुवार सकाळ ८ पर्यंत. या weather.com ची लोकांना घाबरवण्याची आणि अमेरिकनांनी त्याला घाबरण्याची जुनी पद्धत, सवय पाहता मला त्याचं विशेष वाटलं नव्हतं. त्यांनी साधारण ३६ तास म्हटलंय म्हणजे एक १०-१२ तास तरी नक्की पडेल आणि अडीच ते तीन फूट म्हटलंय म्हणजे (जर्सीत) नक्की एक दीड फूट तरी पडेल असा अंदाज आम्ही बांधला होता.
मंगळवार सकाळपासूनच बुधवारच्या स्नोस्टॉर्मबद्दल ऑफिसमध्ये चर्चा चालू होत्या. वादळी नाही नुसत्याच. स्नोमुळे ऑफिस मधली सगळी महत्वाची कामं ४८ तास पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे विशेष काम नव्हतं. (आणि त्यामुळेच की काय) जो तो एकमेकांना, किंवा थोडक्यात भेटेल त्याला विचारत होता की "काय राव, येणार का उद्या हापिसात?". मला कळेना की हे लोक एवढा का इश्यू करतायत याचा. त्यामुळे मी आपला प्रत्येकाला सांगत होतो की "होय बा, आपुन तर यनारच". आणि असं उत्तर मी दिलं रे दिलं की ते माझ्याकडे एखाद्या gladiator कडे किंवा ३०० मधल्या त्या निर्भय योद्ध्याकडे - किंवा .. जाउदे सालं.. तर अशा नजरेने बघत.
पण संध्याकाळ होता होता हे जरा जास्तच सिरीयस प्रकरण आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं होतं. कारण नवीन-यार्कातल्या आणि नवीन-जर्सीतल्या ब-याच शाळा, दुकानं दुस-या दिवशी बंद राहणार होती. अनेक कंपन्यांमध्ये, ऑफिसेसमध्ये घरून-काम करायला सांगितलं होतं. मात्र आमच्या ऑफिस मध्ये हे घरून-काम वाले लाड पोसले जात नसल्याने आम्हाला ऑफिसला जायला लागणार हे (हिमवर्षावाआड लपलेल्या) सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं. किंवा मग दांडी मारून घरी बसा. पण मी (इतरांच्या दृष्टीने) वर्कहोलिक (म्हणजे दारू पिऊन काम करणारा असं नव्हे) या सदरात मोडत असल्याने मी ऑफिसला जायचंच अशा विचारात होतो. रात्री १० ला सुरु होणार सांगितलेला स्नो चक्क चक्क ९ लाच सुरु झाल्याने प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे अशा निष्कर्षापर्यंत आम्ही येऊन ठेपत असतानाच १० लाच स्नो बंद झाल्याने weather.com आपलं काम अजूनही तेवढ्याच कार्य-तत्परतेनं करत आहे हा आमचा विश्वास अजून वृद्धिंगत झाला. (इंग्रजीत म्हणतात तसं four-fold म्हणजे चौपदरी झाला असं म्हणणार होतो मी खरं तर, पण उगाच तो विश्वास आहे की रस्ता असल्या प्रश्नांना उत्तरं द्यायला लागू नयेत म्हणून तो दुसरा शब्द वापरला आहे.)
बाळराजांच्या कृपेने रात्री दीडला झोपताना पुन्हा एकदा पडदा थोडासा सरकवून बघितला तरी स्नोचा मागमूसही न दिसल्याने उद्या सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला जावं लागणार या विचारात झोपून गेलो. आणि.. बरोब्बर सहा तासांनी जेव्हा पुन्हा एकदा तो पडदा सरकवला तेव्हा मतकरींच्या 'धुकं धुकं धुकं' कथेची आठवण व्हावी अशी अवस्था झाली होती बाहेर. स्नो/हिम, बर्फ, धुकं अशा सगळ्या पांढ-या, हलक्या (वजनाने), पण थंडगार वस्तूंच्या घाऊक (आपला होलसेल हो) बाजारात शिरल्याचा भास होत होता. सगळं पांढरं पांढरं दिसत होतं. नजर टाकू तिकडे फक्त बर्फ दिसत होता. खूप दिवसात साफ न केलेल्या फ्रीझरमध्ये बसलेल्या आईसक्रीमच्या कपाने डोळे उघडून आजुबाजुला बघितल्यावर त्याला ज्याप्रमाणे नजर टाकू तिथपर्यंत (म्हणजे तेच ते जे १-२ फूट काय असेल ते) बर्फ दिसत असेल आणि तेव्हा त्याला जसं वाटतं असेल अगदी तसं वाटत होतं आम्हाला घरात बसून बाहेरचा तो पांढरा थर बघताना. (हे "खूप दिवसात साफ न केलेल्या" हे बर्फाचा थर सांगण्यासाठी आहे. घर आणि फ्रीझर दोन्ही स्वच्छ असतं हो आमचं..) त्या स्नो/हिम-बर्फ-धुकं रूपी महाभूतांना पटकन टाटा करून मी पडदा लावून टाकला आणि त्यांच्या नुसत्या दर्शनानेही गार पडलेल्या घशाला कॉफीची किती नितांत आवश्यकता आहे हे ओळखून स्वयंपाकघरात पळालो.गरमागरम कॉफीचे घुटके घेत टीव्हीवरच्या सगळ्या बातम्यांच्या वाहिन्यांचं २-२ मिनिट दर्शन घेत असताना काही बाबी लक्षात आल्या.
१. weather.com आपलं काम करतंय. म्हणजे खरोखर या अर्थी.
२. आत्ता बाहेर जवळपास १०-१२ इंच स्नो आहे आणि उद्या सकाळपर्यंत एकूण १८-२० इंच स्नो पडण्याची शक्यता आहे.
३. दुपारी १२-३ मध्ये बाहेर पडल्यास आपल्या सगळ्या अंतिम इच्छा पु-या करून बाहेर पडा. कारण त्या ३ तासांत जबरदस्त हिमवर्षाव होणार होता. भयंकर वादळ, वारा, स्नो यांचं तांडव बघायला मिळणार होतं.
४. ३ नंतर वादळ कमी झालं तरी भरपूर स्नो पडत राहणारच होता.
५. हा स्नो कमी होत जात जात हळू हळू दुस-या दिवशी पहाटे ४ ला संपूर्ण विश्रांती घेणार होता.
अशा सगळ्या गार गार गोष्टींचे उल्लेख सारखे सारखे ऐकून कपातलीच काय तर तोंडातली, पोटातली आणि मायक्रोवेव्हमधलीही कॉफी घाबरून गार पडली. ऑफिसला जाण्याचा 'to be or not to be' चा माझ्यासारखाच खेळ खेळणा-या २-३ मित्रांना फोन करून परिस्थितीचा आढावा घेतला. सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपला ट्रेनप्रवास (जमिनीखालून असल्याने) सुरक्षित आहे. ट्रेन्स वेळेवर आहेत. ट्रेनच्या अॅलर्टस साईट वर जाऊन तिथेही पुन्हा एकदा खात्री करून घेतली. आणि मग थोडा उशिराच निघालो ऑफिसला जायला. आधीच एक तर अमेरिकेतल्या गाड्या पादचा-यांना दबकून जात असतात त्यात पुन्हा हे सोन्याहून पिवळं किंवा पांढरं झाल्याने त्या अजूनच हळू जात आहेत हे बघून मी खरोखरच ३०० मधल्या सैनिकांसारखी दाणदाण पावलं टाकत रस्ते क्रॉस करायला लागलो. अर्थात शूजना एकसारखा चिकटणारा स्नो त्या दाणादाणीत झटकून, उडवून टाकणे हा गुप्त उद्देशही होताच. अर्थात गाड्या अगदी वेळेवर होत्या आणि माझ्यासारखे शूरवीर फारच कमी असल्याने गाडीत कुठेही बसायची सोय होती आज. थोडक्यात नेहमीपेक्षा आजचा प्रवास जास्त सुरळीत, सुरक्षित आणि सुरळीत झाल्याने मी जास्तच सुशीत आपलं खुशीत ऑफिसला आलो. मेलबॉक्स (ऑफिसचा, ग्रेटमेलचा नव्हे) चेक करताना पाहिलंच मेल बघून माझा जबडा वासला की कायसं म्हणतात ते झालं. कारण आमचा मॅनेजर आठलाच ऑफिस मध्ये हजर झाला होता आणि "I'll cover the support today" अशा डरकाळ्या इतर टीम्सन उद्देशून फोडून झाल्या होत्या. मीही 'Reply All' करत "खडे है हम भी राह मे" म्हणत माझ्या अस्तित्वाची आणि (त्याच्या मानाने माझ्या सेमी) शूरपणाची जाणीव सगळ्यांना करून दिली.
बरोब्बर बारा वाजता अचानक ती सकाळची चौ-महाभूतं एकत्र आली आणि बहुतेक (त्यांना) चुकल्याचुकल्यासारखं वाटत असल्याने जोरदार वा-याचं पाचवं भूतही त्यांना सामील झालं. आणि चॉकलेटसाठी अँ ऊं करणा-या मुलाने बघता बघता भोकाड पसरून, हातपाय आपटत वस्तू भिरकावून द्यायला लागावं अगदी त्याप्रमाणे हळूहळू, भुरूभुरू पडणा-या स्नोने पाचव्या भुताच्या मदतीने अक्षरश: बघता बघता उच्छाद मांडला. स्नोचा पाउसच तो. पावसाचे थेंब, पावसाची धार, पावसाची सर, पावसाचा धुमाकूळ, पावसाचा धिंगाणा या सगळ्याला CTRL-H मारून replace पावसा with स्नो असं करून जे वाक्य बनेल ते वाक्य माझ्यापासून १० फूट अंतरावर जिवंत होत होतं. तुफान, जबरदस्त, शॉल्लीट असली सगळी विशेषणं लुळी-पांगळी होऊन पडावीत इतका प्रचंड जोर होता वादळाचा. अक्षरश: तांडव चाललं होतं. होता होता त्या तांडवाचा कौतुक समारंभ पुढल्या १५-२० मिनिटात संपला. आता ऑफिसमध्ये आलोच आहोत तर जरा काम करावं अशा उदात्त हेतूने मी शेवटी नाईलाजाने मॉनिटरमध्ये तोंड घातलं.
टंगळमंगळ करत, काहीतरी फालतू कामं करत बसलो असताना अचानक २-३ तासांतच शूर मॅनेजर साहेब निघून गेले आहेत असं त्यांच्या मेल वरून कळलं. "अच्छा म्हणून सकाळी लवकर येण्याची नाटकं काय रे चोरा" असा विचार जेवढ्या तत्परतेने माझ्या मनात, मेंदूत, जिभेवर आला त्याच्या चौपट (शी इथे तर चौपदरी जामच फालतू वाटेल) वेगाने मी तो परत आत ढकलून दिला कारण त्याच्या मेलचं शेवटचं वाक्य होतं की
"Heramb, If you think you are going to face problems with your commute back home, you have my authorization to leave now"
आनंदी आनंद गडे, आज आनंदी आनंद झाला, आनंदवनभुवनी, आनंद सिनेमातली इतर गाणी अशी अनेक आनंदविषयक गाणी (मनातल्या मनात) गाऊन मी माझा आनंद साजरा केला. अर्थात मोठ्याने गाऊन साजरा केला असता तरी काही विशेष फरक पडला नसता एवढी तुरळक उपस्थिती होती हापिसात.
ते मेल माझ्या इनबॉक्स मध्ये डोकावल्यापासून साडेतीन मिनिटाच्या आत मी ऑफिसच्या बाहेर होतो. घरी परत जाताना पुन्हा सकाळसारखंच दाणदाण पावलं टाकत चालायला लागलो. सकाळपेक्षा आता परिस्थिती जरा जास्तच बिकट होती. पण जरा सवयही झाली होती. तर आता पुन्हा घरी कसा गेलो वगैरे सांगून जास्त पकवत नाही. घरी जाताना अर्थातच भ्रमणध्वनीतील प्रतिमाग्राहकाला कामाला लावलं. अहो सेलफोन वरून फोटोज आणि विडीओज काढले. आणि घरी येऊन पाहतो तर काय बायकोने माझ्या दुप्पट फोटोज आणि विडीओज काढले होते.
संध्याकाळ होऊन गेली होती. वादळही एव्हाना माणसाळलं होतं. आणि हळूहळू एकेक भूत काढता पाय घ्यायला लागलं होतं. त्यामुळे स्नोचा हट्टीपणाही कमी कमी होत होत शेवटी दहाच्या आसपास तोही पूर्ण गुप्त झाला. आणि एक वादळ संपलं.
तर एवढं सगळं (रटाळ) वर्णन करून (आणि फोटोज काढले असं नुसतं सांगून) तुम्हाला अर्ध्यावर सोडून देण्याचा देशद्रोहीपणा (आता यात काहीही देशद्रोहीपणा नाहीये हे मलाही माहित्ये पण नुसतं द्रोही विचित्र वाटतंय आणि द्रोही म्हटलं की देशद्रोहीच लिहायची आणि वाचायची एवढी सवय झालीये ना की.... ) मी करणार नाहीये. बेचव जेवणानंतर आलेलं सुंदर डेझर्ट जसं मस्त चव आणतं ना तोंडाला तसंच ही पकवापकवी संपल्यानंतर दिसणारे हे फोटोज, विडीओज नक्की मूड खुलवतील ही माफक अपेक्षा !!
घरातून काढलेले फोटो
हापिसातून काढलेले फोटो
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन
श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
-
** भाग १ इथे वाचा आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी.... रॉस गेलर (डेव्हिड श...
maja watali vachun... photos pan chhan ahet... sonia from Kolkata
ReplyDeleteहेरंब, सहीच. आम्हीही मस्त झोडपले गेलोय. शाळा-कॊलेजेस बंद. पॆटीओवर चांगला फूटभर स्नो पहुडला. आता वादळ शमले असले तरी आफ्टर इफेक्ट जोरदार आहे.... स्नो मस्त टणटणीत झालाय.जरासा पाय हलका पडला की खाली डोके वर पाय....
ReplyDeleteपोस्ट एकदम मस्त.
आभार सोनिया.. अजून थोडे फोटोज आणि विडीयोज अपलोड करतोय.
ReplyDeleteधन्यवाद भाग्यश्री ताई. हो तिकडे तर जास्तच झालं असेल. आणि अर्थात डीसी, फिली च्या मानाने जर्सीच स्नो म्हणजे अगदी किस पेड की..
ReplyDeleteहो. त्या टणटणीत स्नोवरूनच आज सकाळी घसरणार होतो. जान बची..
मस्तच लिहिलंय हेरंब...अरे फ़िलीपेक्षा खरं जर्सीत बर्फ़ जास्त पडतो असा मागच्या मी तिथे असण्यापर्यंतचा तरी अनुभव..पण यावेळी मी पळाले नं त्यामुळे बघ....हे हे ...जोक्स अपार्ट मला ओरेगनमधली स्प्रिंगीश थंडी आवडते पण जेव्हा जेव्हा northeast ची snow storm alerts पाहाते तेव्हा नकळत मी माझ्या तिथल्या घरात जाऊन पोहोचते आणि आमच्या जुन्या सनरूममधला त्याहुन जुन्या काळचा स्टोव्ह उर्फ़ फ़ायरप्लेस लावुन बाहेर पडणारा बर्फ़ पाहाते असंच वाटतं....मागची काही वर्ष अशावेळी WFH चं सोंग आणून बर्फ़ पाहाताना गेलीत त्याची आठवण झाली...अरे पण तुझ्या ऑफ़िसमध्ये WFH नाही म्हणजे एकंदरितच कठिण आहे बुवा...(त्यांचं...हे हे...)
ReplyDeleteहो का? असेल कदाचित.. पण मी ३ वर्षांत बघितलेला हा highest स्नो जर्सीमधला.. ओरेगावचा तर काय म्हणा स्नोशी दुरान्वयेही संबंध नसेल ना? हो ते तुझं जुन्या घरावरचं पोस्ट (प्रेम) आहे लक्षात.. हो ग WFH नाहीये. फालतूपणा नुसता. ठीके झाली सवय आता..
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteझकास, वर्णन वाचून आणि व्हिडिओ पाहून आम्हाला इकडे हुडहुडी भरली. आपल्या इकडे असा अनुभव कधीच येत नाही. तुला एक वेगळा आणि कापरं भरविणारा अनुभव या निमित्ताने मिळाला. काही महिन्यांपूर्वी मुंबईत फयान हे चक्रीवादळ धडकणार होते, तेव्हा अशीच परिस्शिती इकडे होती. शासकीय, खासगी आणि निमशासकीय कार्यालये दुपारी सोडून देण्यात आली होती. लोक घराकडे परतत होते. सर्व ट्रेन्, बेस्ट बस, ऑफीसेस येथे फयानचीच चर्चा होती. पण सुदैवाने ते मुंबईला धडकले नाही.
असो. लेख छान जमलाय.
धन्यवाद शेखरजी.. खरंच एकदम मस्त अनुभव होता तो. आणि आता साफ केलेल्या रस्त्यांच्या कडेला बर्फाचे हे उंच डोंगर रचले आहेत. गुरुवारनंतर २ दिवस चांगलं उन पडलं पण तरीही ते डोंगर आहेत तसेच आहेत अजून. :-)
ReplyDeleteजबरदस्त वर्णन... वाचुन खुप छान वाटले.. इकडे आत्ताच उन्हाळ्याची चाहुल लागली आहे...पुढील ४ महिने कसे जाणार हे देवालाच ठावुक...तुम्ही मजा करा.... :)
ReplyDeleteआभार आनंद. अरे मजा कसली. बाहेर निघायचेही वांधे झालेत. त्यामुळे आम्ही त्या उन्हाळ्याची डोळ्यात प्राण आणून वाट बघतोय..
ReplyDelete