Wednesday, December 22, 2021

रक्तरंजित पुस्तकमाला : Cody Mcfadyen (Smoky Barrett Series)

Cody Mcfadyen या अमेरिकन लेखकाच्या Smoky Barrett सिरीज मध्ये पुस्तकं आहेत.

  1. Shadow Man

  2. The Face of Death

  3. The Darker Side

  4. Abandoned

  5. The Truth Factory


स्मोकी
बॅरट ही एफबीआय ची स्पेशल एजंट आहे. एका विकृत सिरीयल किलरने तिच्या कुटुंबीयांचं दुर्दैवी हत्याकांड घडवून आणून तिच्यावरही प्राणघातक हल्ला केलेला असतो. सुदैवाने त्या जीवघेण्या हल्ल्यातून जेमतेम वाचलेली स्मोकी ही विद्रुप चेहरा, असंख्य जखमा आणि कमालीचं नैराश्य या सगळ्यांच्या साथीने आयुष्य ढकलते आहे.

आणि अचानक अजून एका अशाच विकृत सिरीयल किलरचं आव्हान तिच्या पुढ्यात उभं ठाकतं आणि स्मोकी पुन्हा जुन्या उमेदीने त्याला सामोरी जाते. शाडो मॅन या पहिल्या पुस्तकाचा हा साधारण गोषवारा.

पुढच्या पुस्तकांमध्येही असेच पण वेगळ्या तऱ्हेचे, विक्षिप्त, खुनशी, विकृत सिरीयल किलर्स वाचकांच्या भेटीला येतात. प्रचंड रक्तस्राव, खुनी हल्ले, हत्याकांडं यांनी भरलेली ही पुस्तकं आहेत.

*अर्थातच सर्व वाचकांना झेपणारी.*

ज्यांना या प्रकारचं जान्र आवडतं त्यांना नक्की आवडू शकतील. अर्थात शाडो मॅन मध्ये जाणवणारी लेखकाची, पात्रं आणि प्रसंग यांवरची पकड पुढच्या पुस्तकांमध्ये हळूहळू निसटत चालल्याचं जाणवतं. तिसरं पुस्तक (डार्कर साईड) मध्ये तर उगाचच काहीही चाललंय असं वाटतं काही वेळा. त्यामुळे मी चौथं पुस्तक सुरू केलं पण संपवलं नाही. हळूहळू संपेल. बघू.

ज्यांना रक्तरंजित, बीभत्स, विकृत, विक्षिप्त सिरीयल किलर्स आणि हत्याकांडं,  त्यातली वर्णनं, गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या अचाट विचित्र पद्धती आणि त्यावर स्पेशल एजन्टसची दमदार प्रत्युत्तरं अशा प्रकारचे विषय आवडतात त्यांना नक्की आवडेल अशी ही बुकसिरीज.

#CodyMcFadyen
#SmokyBarrett









Saturday, April 3, 2021

हिंसक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं प्रत्ययकारी चित्रण : 'राजकीय हत्या'

आपल्या (तथाकथित!) सुसंस्कृत समाजात नियमितपणे घडणाऱ्या मोर्चेधरणी, आंदोलनं यांसारख्या घटना किंवा अगदी सार्वजनिक उत्सव, समारंभ, मिरवणुका यांदरम्यान होणाऱ्या अथवा घडवल्या जाणाऱ्या दंगली, हाणामाऱ्या अशा स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडींच्या मागे सामान्य माणसाच्या दृष्टीसही पडू न शकणारं किंवा कल्पनेतही न येऊ शकणारं असं गुप्त आणि तितकंच गलिच्छ राजकारण शिजत असतं. या तुलनेत आंतरराष्ट्रीय राजकारणात घडणाऱ्या घडामोडी, सत्तापालट, शीतयुद्ध यांदरम्यान घडणाऱ्या घटना किती गूढ, खोल आणि सामान्य माणसाच्या कल्पितापलीकडे असतील याची कल्पनाच केलेली बरी. आणि या अशा प्रकारच्या घटनांची परिणती अनेकदा त्या देशातील/प्रांतातील एखाद्या महत्वाच्या सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील नेत्याची हत्या होण्यात होत असते. अशा प्रकारच्या राजकीय हत्यांमध्ये कोणकोणत्या व्यक्ती, संस्था, गुप्तचर संघटना, अतिरेकी संघटना, दहशतवादी संस्था  यांचे हात असतील हे थेटपणे कधीच बाहेर येत नाही किंबहुना येऊ दिलं जात नाही. अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अति महत्वाच्या व्यक्तींच्या हत्यांच्या घटनांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न लेखक पंकज कालुवाला यांनी आपल्या 'राजकीय हत्या' या पुस्तकात केला आहे. कालुवाला यांचं हे दहावं पुस्तक. यापूर्वी देशोदेशींच्या गुप्तचर संघटनांवर श्री कालुवाला यांनी 'इस्रायलची मोसाद', 'अमेरिकेची सीआयए', 'रशियाची केजीबी' अशी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. 

आपल्या राजकीय हत्या या पुस्तकात लेखकाने अकरा अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या हत्यांविषयी तपशीलवार माहिती दिली आहे. यातल्या २-३ प्रकरणांचे अपवाद वगळता बाकीची सगळी प्रकरणं ही आशिया खंडातील महत्वाच्या राजकीय/लष्करी व्यक्तींच्या हत्यांविषयी चर्चा करतात. यात सर्वच प्रकरणं अतिशय तपशीलवारपणे सर्व मुद्द्यांची मांडणी करत असली तरी बहुतांशी वाचकांना माहीत असलेली आणि त्यामुळे जवळची वाटणारी काही प्रकरणं म्हणजे राजीव गांधी, इंदिरा गांधी, झिया उल हक, बेनझीर भुत्तो आणि सद्दाम हुसेन यांच्या हत्यांची प्रकरणं. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्याविषयीच्या प्रकरणांची माहिती तर अतिशय विस्तारपूर्वक स्वरूपात, छोट्यातले छोटे तपशील पुरवून वाचकांना त्या हत्यांचं अधिकाअधिक स्पष्ट रीतीने आकलन होईल हा हेतू मनात ठेवून लिहिल्याचं आणि हा हेतू जवळपास १००% यशस्वी झाल्याचं प्रकरण संपेपर्यंत आपल्याकडे जमा झालेल्या माहितीवरून लक्षात येतं. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि दहशतवाद या विषयाची आवड असणाऱ्या वाचकांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

पात्रपरिचयादरम्यान, हत्या झालेल्या अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या पालकांच्या आयुष्यापासून सुरुवात करत लेखक त्या व्यक्तीच्या बालपणापासून ते उच्च पदापर्यंत पोचण्याच्या प्रवासावर बऱ्यापैकी प्रकाश टाकतो. त्यादरम्यान येणारी संकटं, अडीअडचणी आणि त्यावर नायकाने/नायिकेने केलेली मात या गोष्टी तर आपसूकपणे येतातच परंतु त्यादरम्यान नायक/नायिकेचं भावविश्व, संस्कार, राजकीय प्रभाव, स्वभाव, व्यक्तिगत आयुष्य या सर्वांचाही उहापोह केला जातो.

कुठल्याही भारतीयाला जवळच्या वाटणाऱ्या दोन महत्वाच्या हत्या म्हणजे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्या. आणि त्या हत्यांना पूरक असलेल्या किंवा त्या हत्यांचा परिणाम म्हणून घडलेल्या दोन घटना म्हणजे राजकीय आशीर्वादाने अतिशय पद्धतशीरपणे घडवण्यात आलेलं शिखांचं शिरकाण आणि दुसरी म्हणजे जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या. ही दोन्ही प्रकरणं देखील अगदी अंगावर काटा आणणारी. जवळपास प्रत्येक प्रकरणात लेखकाने कटाक्षाने पाळलेला नियम म्हणजे तपशीलवार पात्रपरिचय आणि घडलेल्या घटनेची सखोल राजकीय/सामाजिक ससंदर्भ कारणमीमांसा. प्रत्येक प्रकरणात आपल्याला त्या घटनेत समाविष्ट असलेल्या प्रत्येक पात्राची तपशीलवार ओळख होते. अमुक एक व्यक्ती त्या वेळी अमुक अमुक प्रकारे का वागली अशा स्वाभाविकपणे पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर ही सर्व प्रकारची माहिती वाचकाला मिळाल्याने आपसूकपणेच मिळतं.

इंदिरा गांधींची हत्या :

इंदिरा गांधींच्या हत्याप्रकरणात फक्त अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर केलेल्या ऑपरेशन ब्लुस्टार पुरतंच मर्यादित न राहता, लष्कर आणि सरकारने ऑपरेशन ब्लुस्टारशी साधर्म्य साधणाऱ्या अन्य कारवाया, त्यांच्या यशापयशाची समीकरणं आणि अखेरीस ब्लुस्टार वरील शिक्कामोर्तब असा सर्व भाग तर अतिशय तपशिलाने येतोच परंतु ज्याचा बिमोड करणं सर्वतोपरी आवश्यक होतं आणि ज्याच्यामुळे सरकारला मनावर दगड ठेवून हे ऑपरेशन ब्लुस्टार करणं भाग पडलं तो जर्नलसिंग भिंद्रनवाले, त्याचा राजकीय प्रवास, त्याच्या पाशवी महत्वाकांक्षा, सत्तेची लालसा, कोणाच्याही मताला आणि जीवाला किंमत न देण्याची बेदरकार प्रवृत्ती यावरही प्रकाश टाकला जातो. आणि हे सर्व घडत असताना ऑपरेशन ब्लुस्टार कसं झालं, कसं घडलं, कुठल्या क्रमाने घडलं ते स्पष्ट करून सांगणाऱ्या आणि पानोपानी भेटीस येणाऱ्या आकृत्या आणि नकाशे यामुळेही ऑपरेशन ब्लुस्टारचा थरार आपल्याला बसल्या जागी अनुभवायला मिळतो. कुठल्याही यशस्वी अथवा फसलेल्या लष्करी कारवाईत ती कारवाई झाल्यावर काय चुका झाल्या, काय करायला नको होतं, त्याऐवजी काय करायला हवं होतं हे सांगणं किती सोपं असतं मात्र त्या कठीण समयी अक्षरशः क्षणार्धात निर्णय घ्यायची वेळ आल्यावर अचूक निर्णय घेणं किती अवघड जाऊ शकतं याचीही चुणूक सामान्य वाचकाला मिळते.

हत्येचं नियोजन आणि त्यानंतरच्या दंगली :

इंदिरा गांधींच्या हत्येचं नियोजन कित्येक आठवड्यांपासून चालू असूनही कोणाच्याही ते कसं लक्षात आलं नाही हे वाचून तर थक्कच व्हायला होतं. त्यांच्या हत्येनंतर त्यांना रुग्णालयात न्यायला गाडी नसणे, चुकीच्या रुग्णालयात नेले जाणे, अर्ध्या मार्गातून गाडी फिरवून तिसऱ्याच रुग्णालयात नेले जाणे इत्यादी गोष्टी वाचून त्यांचा जीव वाचवण्यात संबंधितांनी केलेली अक्षम्य हेळसांड पाहून अक्षरशः हळहळ वाटल्याशिवाय राहत नाही. आणि त्यानंतर मात्र सुरु होतो तो सरकार प्रायोजित शिखांच्या शिरकाणाच्या रक्तरंजित प्रवासाच्या भयप्रद आणि भेदक वर्णनांचा अंगावर काटा आणणाऱ्या तपशिलांसह येणारा ताळेबंद. मतदार याद्यांच्या साहाय्याने शिखांच्या वस्त्यांवर वेचून वेचून करण्यात आलेले हल्ले, पोलिसांची निष्क्रियता, सरकारी नेत्यांनीच भाडोत्री गुंडांना हाताशी धरून घडवून आणलेल्या अमानुष कत्तली, जिवंत जाळणे, जाळण्यासाठी फॉस्फरस/टायर्स चा वापर हे सर्व वाचून प्रचंड असहायतेचा अनुभव येतो. आणि या सर्व अतिरेक्यांना काबूत आणण्याचे प्रयत्न करण्याऐवजी सर्वोच्च सरकारी नेत्याचे या सगळ्याची भलामण करणारे "जेव्हा एखादा वृक्ष उन्मळून पडतो तेव्हा जमीन थोडीफार हादरणारच" हे उद्गार तर अतिशय विषण्ण करून सोडतात. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर १९८४ या पाच दिवसांत सरकारी आकड्याप्रमाणे सुमारे २८०० शिखांना जीव गमवावा लागला. मात्र प्रत्यक्षात हा आकडा सुमारे ८ ते १० हजार असल्याचं सांगितलं जातं.

राजीव गांधींची हत्या :

राजीव गांधींच्या हत्येच्या प्रकरणात त्या हत्येत अतिशय महत्वाची भूमिका निभावणारी श्रीलंका, तिथल्या विविध तामिळ संघटना, वांशिक संघर्ष या अशा सर्वाचा अतिशय तपशीलवारपणे उहापोह केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून श्रीलंकेचा इतिहास हा सिंहली आणि तामिळ अशा दोन वंशांच्या लोकांच्या वांशिक संघर्षामुळे रक्तरंजित झाला आहे हे आपण जाणतोच. परंतु हा संघर्ष काही दर्शकांपासूनचा नसून काही शतकं जुना आहे किंवा अगदी स्पष्टपणे सांगायचं तर इ. स. पूर्व ५०० च्या ही आधीपासूनचा आहे हे वाचल्यावर तर धक्काच बसतो.

श्रीलंकेतील वर्णसंघर्षाचा अतिप्राचीन इतिहास :

सर्वप्रथम इ. स. पूर्व ३५०० मध्ये दक्षिण भारतातून तामिळ लोकांनी श्रीलंकेच्या दिशेने प्रवास केला, आणि श्रीलंकेच्या उत्तर भागात आपल्या वसाहती वसवल्या आणि कालांतराने इ. स. पूर्व सुमारे ९०० च्या आसपास ते अनुराधापुर राज्य म्हणून नावारूपाला आलं. इ. स. पूर्व ५०० च्या सुमारास त्यावेळच्या वंगदेशात म्हणजेच आताच्या पश्चिम बंगालात सिंहपूर नावाचं राज्य होतं जे आता सिंगूर या नावाने ओळखलं जातं. सिंहपूरच्या राज्याचे राजा सिंहबाहू आणि राणी सिंहशिवाली यांनी राज्याचा ज्येष्ठ राजपुत्र विजया याला त्याच्या अपराधाची शिक्षा म्हणून राज्यातून हद्दपार होण्याची सजा सुनावली. राजपुत्र विजया आपल्या ७०० अनुयायांसमवेत राज्याबाहेर पडला आणि त्याने भूमार्गाचा वापर करण्याऐवजी जलमार्गाचा वापर करून आपल्या जहाजांवरून तांबपर्णी द्वीपाच्या महातिथ (म्हणजे आत्ताचे मन्नार किंवा मंथोला) या स्थळी तो येऊन पोहोचला. त्याकाळी श्रीलंकेला तांबूस रंगाची जमीन असलेला देश अर्थात तांबपर्णी या नावाने ओळखलं जात असे. तेथे येऊन पोचल्यावर विजया त्याच्या अनुयायांना स्वतःच्या आईच्या नावावरून सिंहली म्हणवून घ्यायला लागला. हे सर्वजण बौद्ध धर्म मानणारे होते. कालांतराने राजपुत्र विजया तेथील स्थानिक राणी कुवेनी हिच्याशी विवाहबद्ध झाला. हळूहळू सिंहली बौद्ध आणि तामिळ हिंदू यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली. गेल्या अनेक वर्षांत अनेकदा सिंहली बौद्ध लोकांकडून तामिळ हिंदूंचं निर्वंशिकरण करण्याचे (ethnic cleansing) असंख्य प्रयत्न करून झाले. काहीवेळा त्यांना छुपेपणाने तर अनेकदा उघडपणे सरकारचा पाठींबा आणि सहकार्यही मिळालं.

एवढ्या प्राचीन वैराचा रक्तरंजित इतिहास असलेल्या संघर्षात तत्कालीन पंतप्रधानांनी शांतीसेना पाठवण्याचा घेतलेल्या चुकीच्या निर्णयापायी दुहेरी नुकसान झालं. या निर्णयामुळे श्रीलंकेतील तामिळींना काही मदत झाली नाही ती नाहीच पण उलट युद्धाचा अनुभव नसलेल्या शांतिसेनेला युद्धभूमीवर जावं लागल्याने आणि बळजबरीने लढायला लागल्याने त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं आणि त्याबरोबर ते त्या सैनिकांच्या जीवावरही बेतलं आणि पुढे जाऊन राजीव गांधींच्या हत्येलाही कारणीभूत ठरलं. 

राजीव हत्येचा कट :

त्यानंतर लिट्टे (Liberation Tigers of Tamil Eelam) ची उभारणी, प्रभाकरनची जडणघडण, त्याच्या भारतीय सरकारशी झालेल्या चर्चा, दरम्यान बिघडलेले संबंध, भारत सरकार वरील राग, नजीकच्या भविष्यात भारतात होऊ घातलेल्या निवडणूका, जनतेचा गांधींकडे झुकणारा कौल आणि त्यामुळे भविष्यात लिट्टेचं होऊ शकणारं नुकसान आणि या सगळ्याचा अभ्यास करून प्रभाकरनने घेतलेला धाडसी निर्णय या सगळ्याचं तपशीलवार विवेचन आपल्याला वाचायला मिळतं. त्यानंतर कशा प्रकारे कट शिजला, त्यात कोणी कोणी भाग घेतला, कोणाच्या भूमिका काय होत्या, आपण नक्की कुठल्या कामगिरीवर आहोत याबद्दल सर्वच सभासदांमध्ये असलेली अनभिज्ञता आणि निवडक ज्येष्ठ सदस्य वगळता एकूणच सर्वच बाबतीत पाळली गेलेली गुप्तता आणि मौन याचा उहापोह केला जातो. त्या सभेदरम्यान राजीव गांधींपर्यंत पोचणं विश्वास बसणार नाही इतकं सोपं होतं हे वाचून धक्काच बसतो.

पाकिस्तानातील राजकीय हत्या :

झिया उल-हक यांच्यासारख्या सामान्य वकुबाचा माणूस निव्वळ नशीब आणि धर्मातिरेकाच्या आधारावर देशाच्या राजकारणात सर्वोच्च स्थानावर कसा जाऊन बसतो आणि विरोधकांचे काटे काढत असताना हळूहळू स्वतःलाच शत्रू निर्माण करून घेऊन अखेरीस त्याची परिणती आत्मघातात होण्याच्या संपूर्ण प्रवासाचं वर्णन हे हक यांच्या हत्येसंदर्भातील प्रकरणात वाचायला मिळतं. बेनझीर भुत्तोंच्या हत्येच्या प्रकरणात त्यांचा राजकीय प्रवास, शिक्षा, देश सोडणं, परतून येणं या सगळ्याचं वर्णन तर येतंच पण अखेरीस डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या भुत्तोंच्या हत्येच्या अहवालात मात्र त्यांच्या हत्येचं कारण अपघाती असं दाखवून त्यांचा मृत्यू गाडीच्या सनरुफच्या लिव्हरला डोकं आपटल्यामुळे झाल्याचं वाचून हसावं की रडावं हे कळत नाही. हत्ये/अपघातानंतर काही तासांतच घटनास्थळी कुठलेही पुरावे गोळा केले न जाता ते स्थान आणि अपघाती गाडी पाण्याने धुवून पुसून काढली जाते हे तर अधिक हास्यास्पद की संशयास्पद असा संभ्रम निर्माण झाल्यावाचून राहत नाही! 

ओड्वायर, उधमसिंग आणि किपलिंग :

जालियनवाला बागेत पद्धतशीरपणे केल्या गेलेल्या मनुष्यसंहाराचा सूड म्हणून सरदार उधमसिंगांनी २१ वर्षं अविश्रांत मेहनत घेऊन, तयारी करून, संयम बाळगून, भारत ते जर्मनी ते इंग्लंड असा पाठलाग करत अखेरीस १९४० साली लंडनमधील कॅक्स्टन हॉलमधल्या सभेत मायकल ओड्वायरची गोळ्या घालून कशी हत्या केली याचं तपशीलवार वर्णन ओड्वायरच्या प्रकरणात वाचायला मिळतं. या प्रकरणातला एक धक्कादायक उल्लेख म्हणजे सगळ्या जगातल्या बाळगोपाळांच्या लाडक्या 'जंगलबुक' या पुस्तकाचा लेखक असलेल्या रुडयार्ड किपलिंग या लेखकाचा मुखवटा फाटून समोर आलेला त्याचा काळा चेहरा! जालियनवाला हत्याकांडात सहभागी असलेल्या जनरल डायरला लोकक्षोभामुळे का होईना पण सेवामुक्त करून इंग्लंडला परत पाठवलं गेलं. परंतु इंग्लंडमध्ये मात्र त्याला गुन्हेगार म्हणून न मानता त्याच्याकडे 'ब्रिटिश सत्तेचा तारणहार' म्हणून बघितलं गेलं. त्याला आर्थिक मदत करण्यासाठी मदतनिधी काढले गेले. या मदतनिधीसाठी जास्तीत जास्त देणग्या गोळा करण्यासाठी किपलिंग आघाडीवर होता. आणि या मदतनिधीतून सुमारे २६१३७ पौंड्स गोळा केले गेले. ही रक्कम सुमारे १०० वर्षांपूर्वीची आहे हे विसरता कामा नये.

 

राजकीय हत्यांची सामायिक कारणं :

अन्य प्रकरणांमध्ये इस्रायलचे पंतप्रधान राबीन, श्रीलंकेचे पंतप्रधान भंडारनायके, अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अमीन यांच्या हत्यांबद्दलचा तपशीलवार लेखाजोखा वाचायला मिळतो. प्रत्येक प्रकरणात तत्कालीन राजकारण, समाज, आंतरराष्ट्रीय घडामोडी, देशांतर्गत विरोध, इत्यादी प्रत्येक बाबीचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास करून प्रत्येक घटना स्पष्ट करून सांगण्यासाठी लेखकाने घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसते. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे लेखक उगाचंच 'पोलिटिकली करेक्ट' राहण्याचा प्रयत्न न करता त्या त्या घटनेत तत्कालीन राजकारणातील कुठल्या नेत्याची/व्यक्तीची चूक होती, कोण दोषी होतं हे अगदी स्पष्टपणे आणि ससंदर्भ मांडतो. जवळपास प्रत्येक राजकीय हत्येच्या घटनेविषयी जाणून घेतल्यावर पुस्तकाच्या अखेरीस एक बाब मात्र नक्की होते आणि ती म्हणजे ही की प्रत्येक राजकीय हत्येत गुप्तहेर खातं, त्या व्यक्तीचं अंगरक्षक दल, लष्कर, सरकार यांच्या चुकांव्यतिरिक्त काही सामायिक आढळणाऱ्या बाबी म्हणजे त्या नेत्याने न पाळलेले सुरक्षा नियम, जवळच्या व्यक्तींवर टाकलेला अनावश्यक विश्वास, गुप्तहेर संघटनांनी वेळोवेळी दिलेल्या सुरक्षाविषयक सूचनांकडे केलेलं दुर्लक्ष आणि विविध संस्थांमधला आपापसातल्या समन्वयाचा अभाव! पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी पोलीस, लष्कर, कमांडोज आणि तत्सम खाती सामायिकपणे जबाबदार असतात आणि त्यामुळे संपूर्ण जबाबदारी कुठल्याही एका घटकावर टाकता येत नाही.

अशा अनेक छोट्याछोट्या निरीक्षणांच्या नोंदी वाचक आपल्या मनात करत जातो आणि अखेरीस शेवटच्या प्रकरणाच्या शेवटी येऊन थबकतो. कारण पुस्तकाच्या अखेरीस येणाऱ्या संदर्भसूचीत सुमारे शंभरेक पुस्तकं आणि दोनशेच्यावर लेखांच्या नोंदी आढळतात आणि एकेका विषयाचा बारकाईने अभ्यास करण्याच्या पंकज कालुवाला यांच्या अभ्यासू वृत्तीला आपण मनोमन दंडवत घालतो आणि त्यांची इतर पुस्तकं वाचण्याचा दृढनिश्चय करतो.

Tuesday, February 16, 2021

वाटेवरची प्रार्थना

काल एक जरा वेगळाच किस्सा घडला. गुहागरहून थोडं उशिरा निघून आम्ही रात्री साधारण ८-८:१५ च्या आसपास कशेडी घाटाच्या तोंडाशी होतो. घाट जस्ट सुरू होणार होता. पण समोर बघतो तर वाहनांची खूप मोठी रांग लागली होती. प्रचंड ट्रॅफिक जॅम झाला होता. गाड्यांचे हेड-टेल लाईट्स वगळता किर्र काळोख होता. आमची गाडीही थोड्या वेळ थांबली. एव्हाना बाकीच्या गाड्यांमधले ड्रायव्हर्स बाहेर उतरले होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज येत होता. खूप वेळ झाला, काहीच हालचाल नाही, सगळं बंद आहे, पोलीस सोडत नाहीयेत वगैरे वगैरे बोलणं ऐकू येत होतं. हळूहळू आम्हाला टेन्शन यायला लागलं. कारण गुगल मॅप्स तिथून पुढे ५ तास दाखवत होतं घरी पोचायला. आणि समजा हा ट्रॅफिक जॅम लवकर सुटलाच नाही किंवा अजून ३-४ तास राहिला तर घरी कसे आणि कधी पोचणार असं वाटायला लागलं. लेकाने ऑलरेडी प्रश्न विचारून हैराण करायला सुरुवात केली होती. समोर लांबच्यालांब नागमोडी वळणं घेतलेली वाहनांची रांग दिसत असल्याने त्याच्या एकाही प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे नव्हतं. आता फक्त प्राप्त परिस्थितीला शरण जाऊन जे होईल ते स्वीकारायचं एवढा एकच मार्ग होता. आणि अचानक प्रकाशचा (आमचा ड्रायव्हर) फोन वाजला. त्याची रिंगटोन म्हणजे 'जाऊंद्या ना बाळासाहेब' या (अतिशय %@*) चित्रपटाचं टायटल सॉंग होतं. आणि ते गाणं म्हणजे

"वाट दिसू द्ये गा द्येवा वाट दिसू द्ये
वाट दिसू द्ये गा द्येवा गाठ सुटू द्ये"

हे गाणं म्हणजे अजय-अतुलच्या काही खास गाण्यांपैकी एक अतिशय गोड असं गाणं आहे. (ज्यांनी ऐकलं नसेल त्यांनी या युट्यूब लिंकवर जाऊन आवर्जून ऐका.
https://youtu.be/FeR81vxTdBs )

ते गाणं अचानक माझ्या डोक्यात वाजायला लागलं. आणि एकदा चुकून शेवटच्या "गाठ सुटू दे" ऐवजी "घाट सुटू दे" असंही म्हंटलं गेलं जे प्राप्त परिस्थितीत अतिशय चपखल बसणारं होतं. ते गाणं ऐकून काही क्षण तरी एकदम धीर आला.

लगान बघत असताना सर्वस्व हरलेला भुवनचा संघ ज्याप्रमाणे देवाला शरण जातो आणि अचानक कुठून तरी लांबवरून लताचे "ओ पालनहारे, निर्गुन और न्यारे" चे सूर येतात आणि भुवनबरोबर आपणही क्षणभर सगळं विसरून जाऊन त्या विधात्याला शरण जातो त्या प्रसंगाचीच एकदम आठवण आली. 

आणि काय आश्चर्य!!!! पुढच्या दोनेक मिनिटांत पुढच्या गाड्या हलायला लागल्या आणि सगळा ट्रॅफिक जॅम पाच मिनिटांत मोकळा झाला. थोडं अंतर गेल्यावर कळलं की सुमारे २०-२५ फूट लांबीच्या सळया वाहून नेत असलेला एक लांबच्या लांब फ्लॅट ट्रक एका मोठ्या जेसीबीवर आदळला होता. ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला होता. जवळपास ३-४ तास तरी पूर्ण ट्रॅफिक जॅम झाला असावा. आम्ही थोडे उशिरा निघाल्याने म्हणा किंवा व्याडेश्वराच्या कृपेने म्हणा त्यातून सुखरूपपणे सुटलो होतो आणि जणू आम्हीच प्रार्थना करावी तद्वत "वाट दिसू दे" हे गाणं वाजलं होतं आणि आमची प्रार्थना ताबडतोब ऐकली जाऊन अक्षरशः पाच मिनिटांत ट्रॅफिक जॅमही सुटला होता! सगळंच विलक्षण चमत्कारिक आणि अद्भुत!!

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...