Monday, October 24, 2011

आशु आणि चित्र-पट(पट) सत्यवान !!'

अआ आणि आशु लोकांसाठी ब्लॉगिंगचे तीन विशेष नियम आहेत.

१. अशा लोकांनी ब्लॉग सुरु करू नये

२. सुरु केलाच तर तो जेमतेम एक वर्षच चालेल अशी पूर्वसूचना ब्लॉगवर ठळकपणे द्यावी. (आणि ब्लॉगवर दिली नाही तरी स्वतःच्या मनाशी तरी पक्की खुणगाठ बांधावी.)

३. वरचे दोन्ही नियम मोडले तर परिणामांना तयार राहावं !!!

ओह सॉरी... सगळ्यात पाहिलं वाक्य "अत्यंत आळशी आणि आरंभशूर लोकांसाठी.... " असं वाचा. नेहमीप्रमाणे जरा आळशीपणा केल्याने ते बाराखडीसदृश लिहिलं गेलं. असो. तर माझ्यासारख्या अति अआ आणि अति आशु माणसाने पहिले दोन्ही नियम मोडले आणि त्यामुळे आपोआपच परिणामांसाठी तयार राहायची पाळी आली. (न राहून सांगतोय कोणाला ! ).. व्हायचं तेच झालं. पहिल्या वर्षी  तब्बल ११० पोस्ट्स पाडणाऱ्या ब्लॉगवर दुसऱ्या वर्षी जेमतेम ४२ पोस्ट्स आल्या. (अर्थात पाठीराखेही १३८ वरुन २१६ वर गेले म्हणा.) ... खरं तर ब्लॉग (रडतखडत का होईना) दोन वर्षं चालू ठेवला म्हणजे आपण (म्हणजे मी) कदाचित वाटतो तेवढे काही आरंभशूर नाही असं जाणवलं.

त्यानंतर हे मधेच आठवलं.

===============================================

आरंभशूर नाही म्हणजे काय आहोत? आरंभशूरचा विरुद्धार्थी शब्द काय बरं ??

आरंभ X अखेर
शूर X भित्रा

अभि.... !!! अखेरभित्रा....... अखेरभित्रा.......!! अखेरभित्रा?? म्हणजे अखेरीस भित्रा असणारा?? म्हणजे आरंभी शूर असणारा?? च्यायला थोडक्यात आशु आणि अभि एकमेकांचे विरुद्धार्थी नाही तर समानार्थी शब्द झाले..

ओके.. इनफ विषयांतर आणि पांचटपणा.. ब्याक टू कन्फेशन !!

===============================================

अर्थात दुसऱ्या वर्षात वेग मंदावण्याची अन्यही काही कारणं होतीच म्हणा. आपल्या सिनेमास्कोपमुळे पूर्वी जेमतेम तोंडओळख असणाऱ्या हॉलीवूड आणि जागतिक सिनेमाशी अधिक चांगली ओळख झाली. नवीननवीन चित्रपटांची माहिती कळली. चित्रपट कसे बघायचे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजलं. त्यामुळे पूर्वी ब्लॉग लिहिण्यासाठी वापरला जाणारा फावला वेळ पूर्णतः हे सिनेमे गिळंकृत करायला लागले. (ऑफ कोर्स नो कम्प्लेंट्स). त्यामुळे आपोआप ब्लॉगपोस्ट्सशी संख्या रोडावली. अनेक वेगवेगळया प्रकारचे, निरनिराळ्या भाषांतले, अनेक देशांतले चित्रपट बघितले. प्रत्येक चांगल्या चित्रपटाबद्दल ब्लॉगवर लिहावंसं वाटायचं. परंतु तोवर वेटिंग लिस्टमधला पुढचा चित्रपट/सिरीज खुणावत असायचा. हे एक कारण आणि दुसरं एक कारण म्हणजे सतत चित्रपटांवर लिहायला आपला ब्लॉग काही चित्रपटविषयक लिखाणाला वाहिलेला ब्लॉग नाही असंही वाटायचं.

आणि मग तेवढ्यात ट्यूब पेटली. जर ब्लॉग चित्रपटविषयक नाही हे एकमेव कारण चित्रपटांविषयीच्या नवीन पोस्ट्स टाकायच्या आड येत असेल तर ते कारणच दूर करून टाकू. एक नवीन ब्लॉग फक्त चित्रपट/टीव्हीसाठीच सुरु करून टाकू. "प्रत्येक अडथळ्याचं रुपांतर संधीत करू" किंवा "टर्न एव्हरी ऑब्स्टॅकल इन्टू अपॉर्च्यूनिटी.. मला मान्य आहे की हे जरा अतिच होतंय. पण हे आत्ता जस्ट सुचलं.. म्हणजे ब्लॉग काढायचं नव्हे.. हे वाक्य.. सुचलं म्हणजे वाक्य सुचलं नाही. ते कोणालातरी आधीच सुचलेलं होतं. ते वाक्य इथे टाकायचं सुचला, असो. तर पहिल्या ब्लॉगच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या आणि दिवाळीच्या निमित्ताने वटवट सत्यवान सादर करतोय चित्रपटांचा नवीन ब्लॉग..... चित्र-पट(पट) सत्यवान !!

अर्थात वटवट सत्यवान उर्फ harkatnay.com वर पूर्वीप्रमाणे भेटूच. पण 'चित्र-पट(पट) सत्यवान !!' उर्फ http://harkatkay.blogspot.com/ वरही नियमित पोस्ट्स टाकायचा मानस आहे. अर्थात हा अति अवि आहे याची मला कल्पना आहे पण वटवटीचा ब्लॉग दोन वर्षं चालल्याने मी आता आशु राहिलो नसल्याने शक्यतो या अवि ला आणि वाचकांच्या सत्यवानावरच्या वि ला तडा जाणार नाही असा प्रयत्न राहील. प्रयत्न कसा वाटला ते नक्की कळवा...

सर्वांना दिवाळीच्या चित्रपटीय आणि ब्लॉगवाचीय शुभेच्छा !!

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...