Wednesday, November 9, 2022

अरुण शौरी : विचारमंथन


अरुण शौरी हे अत्यंत बुद्धिमान अर्थतज्ज्ञ
मुरब्बी राजकारणी आणि तितकेच अभ्यासू विचारवंत म्हणून भारतीय जनतेला सुपरिचित आहेत. त्यांनी अनेक मासिके/वृत्तपत्रांमधून महत्वाच्या विषयांवर वेळोवेळी लिहिलेल्या लेखांवरून त्यांच्या व्यासंगी व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला झालेलीच असते. या अशा अत्यंत प्रतिभावंत आणि कर्तबगार व्यक्तीने लिहिलेली तब्ब्ल चार पुस्तकं गेल्या दोन महिन्यांत वाचण्याचा योग आला. यापूर्वी त्यांचे वृत्तपत्रांमधून छापून आलेले लेख वगळता मी त्यांचं कुठलंच पुस्तक वाचलेलं नव्हतं. या चारही पुस्तकांचे विषय एकमेकांपेक्षा सर्वस्वी भिन्न असूनही प्रत्येक पुस्तकात संबंधित विषय इतक्या प्रभावीपणे मांडणे आणि त्यासाठी शेकडो पुस्तकेपत्रव्यवहारखंडग्रंथ यांचे संदर्भ म्हणून वापर करूनते योग्य ठिकाणी मांडून वाचकाला त्या विषयाची इत्यंभूत माहिती अतिशय सोप्या शब्दांत करून देण्याची त्यांची हातोटी बघून थक्क व्हायला होतं. या चार पुस्तकांचे विषय भारत-चीन संबंधभारतीय राजकारणातली नोकरशाहीतथाकथित सुप्रसिद्ध असे भारतीय इतिहासतज्ज्ञ आणि मुस्लिम समाजातील फतवे आणि त्यांचा इतिहास असे एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न असे आहेत. प्रत्येक विषयाची अनेक पुस्तके-पत्रव्यव्हार-खंड वाचून, पानापानांवर त्यांचे संदर्भ देऊन केलेलं हे लिखाण वाचणं हा वाचक म्हणून अत्यंत समृद्ध करणारा अनुभव आहे.

आपण एकेका पुस्तकाची थोडक्यात ओळख करून घेऊ.

पुस्तक क्रमांक १


मूळ पुस्तक : Self-Deception

अनुवादित पुस्तक : आत्मवंचना

अनुवाद : अशोक पाथरकर

सर्वप्रथम हे आवर्जून नमूद करायला हवं की हे संपूर्ण पुस्तक अन्य इतर संदर्भांबरोबरच प्रामुख्याने SWJN अर्थात Selected Works of Jawaharlal Nehru या ग्रंथाच्या जवळपास ८० हून अधिक खंडांमधले असे निवडक खंड ज्यांत नेहरूंचा भारत-चीन संदर्भात केलेला पत्रव्यवहारनोंदी आणि त्या संदर्भात केलेली भाषणं इत्यादी आहेत अशा खंडांवर आधारलेलं आहे.

तत्कालीन भारत-चीन संबंधांच्या बाबतीत पंतप्रधान म्हणून नेहरूंचं धोरण कसं होतंदृष्टिकोन कसा होतात्यांचे काय परिणाम झाले हे वाचायला मिळतं. त्याचप्रमाणे तत्कालीन राजदूतांनी भारत-चीन संदर्भातील वेळोवेळी व्यक्त केलेली मतं आणि माध्यमं व त्यांच्या प्रतिक्रिया इत्यादी मुद्द्यांची साद्यन्त माहिती वाचकाला मिळते.

नेहरूंच्या अक्साई चीनच्या बाबतीतल्या "हा प्रदेश केवळ वाळवंट असून या भागात गवताचं पातंही उगवत नाही" या अत्यंत वादग्रस्त विधानापासून ते भारताने अरुणाचल प्रदेश आणि एकूणच ईशान्य भारतातल्या राज्यांकडे केलेलं दुर्लक्ष यांच्या नोंदी वाचायला मिळतात. "अरुणाचल हा चीनचाच प्रदेश आहे.", "अरुणाचल हा भारताने बळजबरीने ताब्यात ठेवलेला चीनी प्रदेश आहे." अशी विधानं चीनच्या नेतृत्वाकडून अधिकृतपणे आणि वारंवार केली जात असतानाही त्याकडे भारतीय नेतृत्व साफ दुर्लक्ष करत राहिलं. चीनच्या अधिकृत नकाशात संपूर्ण अरुणाचलबरोबरच आसामचा बराचसा भाग चीनचा म्हणून दाखवला जात होता. तिबेट जेव्हा भारताकडे लष्करी मदतीसाठी विनवण्या करत होतं तेव्हा तिबेटला मदत तर पुरवली गेली नाहीच पण उलट "चीनचा शस्त्रबळाने पराभव करता येईल हा विचार भ्रामक आहे" अशी मखलाशीही करण्यात आली.

 जॅकस मार्टिन या ब्रिटिश विशेषज्ज्ञाच्या एका प्रबंधात एक थक्क करणारं उदाहरण वाचायला मिळतं. तो म्हणतो, "पूर्वीचा चीन, हा आज चीन म्हणून जो आहे असा दावा केला जातो त्याच्या *फक्त* एक तृतीयांश होता"

यावरून गेल्या काही दशकांमध्ये उत्तरोत्तर वाढत गेलेल्या, चीनच्या सत्तापिपासू अपप्रवृत्तीवर झगझगीत प्रकाश पडतो.

 नेहरूंच्या काळापासून चालू असलेला भारतीय सत्ताधाऱ्यांचा चीनच्या बाबतीतला बोटचेपेपणा हा थेट डॉ मनमोहन सिंगांच्या काळापर्यंत कसा चालू होता हे दाखवणाऱ्या एका घटनेचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. हा प्रसंग २००८ सालच्या बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान दिल्लीत घडला होता.

२००८ च्या बीजिंग ऑलिम्पिक गेम्सच्या आधीच्या काही महिन्यांमध्ये चीन सरकारने तिबेटी जनतेचे निषेध आंदोलन नेहमीप्रमाणेच अतिशय क्रूरपणे दडपून टाकले. आणि ते ही खुद्द आपल्या देशाच्या राजधानीत. प्रत्यक्ष नवी दिल्लीत. जगातील कुठल्याही सरकारने जे केले नव्हते ते मनमोहन सिंग सरकारने दिल्लीला केले. कोणत्याही सरकारने दिला नसता इतका भ्याड आणि भित्रा प्रतिसाद आपल्या सरकारने दिला. ऑलिम्पिक मशालीसाठीची दौड जेमतेम दोन किलोमीटर अंतर कापणार होती. या दोन किमीसाठी सरकारने वीस हजारांपेक्षा जास्त जवान‚ पॅरामिलिटरी जवान‚ पोलीस आणि साध्या वेषातील पोलीस त्या मार्गाभोवती व जवळपासच्या भागांत तैनात केले होते. तिबेटी निर्वासितांना मारहाण करून दूर ठेवण्यात आले. सरकारी कार्यालये बंद होती. रस्ते अडवण्यात आले होते. मेट्रो बंद करण्यात आली. अगदी संसद सदस्यांनासुद्धा संसदेला लागून असलेल्या विजय चौकातून आपल्या घरी जाण्यापासून थांबवण्यात आले. हे सर्व ऑलिम्पिकच्या प्रेमामुळे करण्यात आले असे तुम्हाला वाटतेते चीनच्या भीतीमुळे करण्यात आले.

चीनची विस्तारवादी प्रवृत्तीवाढती भूक आणि त्याला भारतीय नेतृत्वाच्या बोटचेप्या धोरणांमुळे मिळत गेलेलं प्रोत्साहन आणि या सर्वांमध्ये भारतभूमीचं झालेलं नुकसान या सगळ्याचं तपशीलवार वर्णन वाचायचं असल्यास हे पुस्तक अवश्य वाचायला हवं. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक तसेच भारत-चीन संबंध या विषयात रुची असणाऱ्यांनीही आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे.

 

पुस्तक क्रमांक २


मूळ पुस्तक : Governance

अनुवादित पुस्तक : गव्हर्नन्स

अनुवाद : भारती पांडे

भारतातील नोकरशाहीअनेक खातीअनेक शासकीय विभाग आणि उपविभाग आणि त्यांचे आपापसातले तंटेबखेडे आणि त्या संदर्भात या सर्वांचा एकमेकांशी वर्षानुवर्षं गोगलगायीच्या गतीने चालत असलेला निर्बुद्ध पत्रव्यवहार हा या पुस्तकाचा प्रमुख विषय आहे. अनेक खाती आणि विभागांनी एकमकांवर दाखल केलेलं खटलेत्यांचे निकालवरच्या न्यायालयांमध्ये केली गेलेली अपील्सया अनुषंगाने केला जाणारा कधीही न संपणारा अर्थहीन पत्रव्यवहार आणि त्यात उधळले जाणारे सरकारचे आणि पर्यायाने जनतेचे कोट्यवधी रूपये या सर्वांवर हे पुस्तक परखड भाष्य करतं. त्यातले काही तऱ्हेवाईक आणि तितकेच बालिश प्रसंग बघितले की वाचकांच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही.

१. दिल्लीत सरकारी मालकीची असलेली कित्येक हॉटेल्स बेकायदा आहेत.

२. अनेकांचे मालक ठाऊक नाहीत.

३. अनेकांवर खटले चालू आहेत.

४. कित्येक खटल्यांमध्ये सरकारच्या बाजूने निकाल लागलेले असूनही मूळ मालक अद्यापही त्या वास्तूची मालकी सोडायला तयार नाही आणि तरीही सरकार त्याबाबतीत काहीही पावलं उचलत नाही.

या असल्या विस्मयकारक गोष्टी वाचून वाचकाला धक्काच बसतो.

दुसरं एक प्रकरण असंच धक्कादायक आहे. दोन खात्यांदरम्यान झालेल्या आर्थिक व्यवहारात नजरचुकीने काही हजार कोटींनी वाढवला गेलेला आकडात्यामुळे जमाखर्चात उदभवलेली भानगड त्यावरून कित्यके महिने चालू असणारा पत्रव्यवहार आणि शेवटी कोणीतरी एका पक्षाने समजूतदारपणा दाखवून पडती बाजू घेणे अशा प्रसंगांची मालिका वाचली की या लोकांचा मेंदूकॉमन सेन्स वगैरे शब्दांशी दुरान्वये तरी संबंध आलेला असतो की नाही असा प्रश्न पडतो.

 एक प्रसंग तर इतका दुर्दैवी आहे की हे सगळं खोटंच आहे असं वाटायला लागतं.

काही खात्यांच्या एका सामूहिक बैठकीत एका खात्याने दुसऱ्या खात्याला काही लेखी सूचना केल्या होत्या. त्या सूचना करताना त्यांनी त्या हिरव्या शाईचा वापर केला होता. दरम्यान त्या सूचनांकडे साऱ्यांनीच दुर्लक्ष करून त्याऐवजी "कुठल्याही खात्याला सूचना करताना सर्वमान्य अशा काळ्या किंवा निळ्या शाईचा वापर न करता हिरव्या शाईचा वापर करण्याचा अधिकार आहे का?" आणि "हिरवी शाई वापरून केल्या गेलेल्या सूचना ग्राह्य धाराव्यात का?" या मुद्द्यांवर कित्येक महिने खंडीने पत्रव्यवहार केला गेला आणि अखेरीस हिरवी शाई चालेल असा निर्णय घेतला गेला!

भारतीय नोकरशाहीच्या अशा थक्क करून सोडणाऱ्या असंख्य निर्बुद्ध घटनांचे उल्लेख या पुस्तकात पानोपानी भेटीस येतात आणि वाचकाला नैराश्यग्रस्त करून सोडतात.


पुस्तक क्रमांक ३


मूळ पुस्तक : The Eminent Historians

अनुवादित पुस्तक : ख्यातनाम इतिहासकार

अनुवाद : सुधा नरवणे

 डॉ भैरप्पा यांचं आवरण हे पुस्तक ज्यांनी वाचलं असेल त्यांना भारताच्या कला आणि शिक्षण क्षेत्रावर डाव्या विचारांच्या मंडळींची कशी मजबूत विखारी पकड आहे याचा चांगलाच अंदाज असेल. हे पुस्तक वाचताना आवरण या कादंबरीत वाचलेल्या काल्पनिक प्रसंगांशी नातं सांगणाऱ्या परंतु प्रत्यक्षात घडलेल्या घटना आपल्या भेटीस येतात आणि हतबुद्ध व्हायला होतं. 

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या नेमणुकांत केल्या गेलेल्या पक्षपतांच्या त्रोटक उल्लेखांसोबतच ICHR अर्थात Indian Council of Historical Research (भारतीय इतिहास अनुसंधान परिषद) या महत्त्वपूर्ण संस्थेतएकाच विचारसरणीच्या (तथाकथित) इतिहासतज्ज्ञांच्या (!) नेमणूका वारंवार आणि वर्षानुवर्षे कशा केल्या जातात यावर लेखक प्रश्नचिन्ह उमटवतात. ICHR मध्ये २५ वर्षांत रोमिला थापर आणि सतीशचंद्र यांची चार वेळा तर इरफान हबीब आणि एस गोपाल यांची अनुक्रमे पाच आणि तीन वेळा नेमणूक केली गेली. इतकंच नव्हे तर ICHR च्या अध्यक्षपदासाठीही अशाच प्रकारचे खेळ खेळण्यात आले होते. यातल्या अनेक इतिहासतज्ज्ञांनी एखाद्या प्रकल्पासाठी सरकारकडून लाखो रूपये घेऊन तो प्रकल्प पूर्ण न करता ते पैसे हडपले, वारंवार मुदतवाढ मागून घेतली आणि वरून त्यासाठी अतिरिक्त मानधनही घेत राहिले आणि अंतिमतः प्रकल्प पूर्ण केलाच नाही अशा स्वरूपाची असंख्य उदाहरणं शौरी यांनी दिली आहेत.

श्री श्रीमाळी नावाच्या एका डाव्या विचारांच्या इतिहासकाराने टीव्हीवरील एका चर्चेच्या कार्यक्रमात असं विधान केलं की "प्राचीन भारतात गोमांस खाल्ले जात होते असे सुस्पष्ट उल्लेख वेदात आहेत". त्यावेळी आपले सनातन ग्रंथवेदपुराणे इत्यादींचे तज्ज्ञ असलेल्या श्री रघुवंशी नामक व्यक्तीने त्यावर आक्षेप नोंदवला आणि प्रतिप्रश्न केला की अशा अर्थाचा उल्लेख श्री श्रीमाळी यांनी कुठल्या ग्रंथात वाचला आहे त्याचा संदर्भ सांगावा. श्रीमाळी यांनी असे संदर्भ अनेक ठिकाणी सापडतात असं ठोकून दिलं. तरीही श्री रघुवंशी यांनी त्यांना निदान एखादा वेदऋचाश्लोक यांचा संदर्भ देण्याची विनंती केली ज्याचं उत्तर श्रीमाळी यांना अर्थातच देता आलं नाही. त्यानंतर त्यांनी "मी वेद नाहीतर वैदिक वाङ्मय असे म्हंटले होते" अशी मखलाशी केली. त्यानंतर कुठल्या वैदिक वाङ्मयात हा उल्लेख आहे हे विचारल्यावर त्यांच्याकडे अर्थातच उत्तर नव्हतं. अखेरीस श्रोत्यांमधून एक विद्वान गृहस्थ पुढे आले आणि म्हणाले की त्यांनी त्यांच्याबरोबर चारही वेद आणले आहेत. श्रीमाळी यांनी कृपा करून त्यात तो संदर्भ शोधून दाखवावा. श्रीमाळी यांनी त्या वेदांना हात तर लावला नाहीच आणि तरीही स्वतःच्याच असत्यकथनाला ते ठामपणे चिकटून राहिले. त्यानंतर श्री रघुवंशी यांनी वेदांमधील एकामागोमाग एक असे अनेक श्लोक वाचून दाखवले की ज्यांत गोमांस खाऊ नये असे स्पष्ट उल्लेख करण्यात आले होते. एवढं होऊनही श्री श्रीमाळी हेच म्हणत राहिले की "मला एखादी ऋचा म्हणू दाखवता आली नाही याचा अर्थ असा नाही की मी तज्ज्ञ नाही. त्याचप्रमाणे गोमांस भक्षणाच्या विरुद्ध अनेक ऋचा काढून दाखवल्या तरी त्याचा अर्थ असा होत नाही की त्याकाळी गोमांस खाल्ले जात नव्हते."

काही दिवसांनी श्रीमाळी यांनी 'द हिंदूया वृत्तपत्रातील आपल्या लेखात सदर प्रसंगाचा उल्लेख करून असे सांगितले की मी एखाद्या श्लोकाचा संदर्भ देऊ शकलो याचा अर्थ असा नाही की प्राचीन भारतात गोमांस भक्षण अमान्य होते."

 

पुढचा प्रसंग मात्र खासच धक्कादायक आणि निराशाजनक आहे. पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाने १९८९ मध्ये काढलेल्या एका आदेशात असं स्पष्टपणे म्हंटलं की नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात "मुस्लिम राज्यकर्त्यांवर कुठलीही टीका नसावी. त्याचप्रमाणे मुस्लिम राज्यकर्ते आणि आक्रमकांनी मंदिरे उध्वस्त केल्याचे उल्लेख नसावेत. तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर मुस्लिम राजकर्त्यांच्या कारकिर्दीविषयीच्या उल्लेखांमध्ये खाली सूचना सुचवण्यात आल्या आहेत. त्यांची अंमलबजावणी केली जावी". थोडक्यात हा एक प्रकारचा फतवाच होता. कोणते उल्लेख वगळावेत आणि सुधारित उल्लेख काय असावेत यांची एक भलीमोठी यादीच परिपत्रकात जोडण्यात आली होती.

त्यातले काही महत्वाचे उल्लेख आणि बदल आपण बघू.

१.      मूळ : अरबांनी गोहत्येवर बंदी घातली होती.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

२.      मूळ : महमूद कट्टर मुस्लिम होता. 'इस्लाम किंवा मृत्यूअसा इस्लाम धर्माचा गाभा होता.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

३.      मूळ : हिंदू स्त्रियामुस्लिमांच्या नजरेस पडू नयेत म्हणून त्यांना घरातच राहायला सांगत.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

४.      मूळ : लावण्यवती राणी पद्मिनी हिची प्राप्ती करून घेण्यासाठी अल्लाउद्दीनने चितोडवर हल्ला केला.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

५.      मूळ : हिंदुस्थानातील लोकांवर आपला धर्म लादण्यासाठी मुस्लिमांनी अमानुष अत्याचार केले.

सुधारित : हा उल्लेख वगळावा.

६.      मूळ : सुलतान महमूदाने मोठ्या प्रमाणावर हत्यालुटालूटविध्वंस आणि धर्मांतरे केली.

सुधारित : हत्या आणि धर्मांतरे हे उल्लेख वगळले जावेत.

७.      मूळ : सुलतान महमूदाने सोमनाथ मंदिरातील जडजवाहिरांची लूट केली आणि गझनीतील मशिदीकडे जाणाऱ्या मार्गावर शिवलिंगाची पायरी बनवली.

सुधारित : "शिवलिंगाची पायरी बनवली" हा उल्लेख वगळला जावा.

 

'औरंगजेबाचे धार्मिक धोरणया प्रकरणातील मजकूर गाळण्याचे प्रमाण सर्वाधिक होते. हिंदूंशी तो कसा अमानुषपणे वागलाहिंदू मंदिरांचे त्याने काय केलेइस्लामचा प्रचार इत्यादींबद्दलचे सर्व उल्लेख वगळून टाकण्याचे या परिपत्रकवजा फतव्यात म्हंटले होते.

 आणि परिपत्रकात म्हंटल्याप्रमाणे हे सर्व बदल हे (तथाकथित) इतिहासतज्ञांच्या मदतीने आणि मान्यतेने होत होते हे विशेष दुर्दैवी! अशा प्रकारचा दुषित इतिहास भारताच्या उगवत्या पिढ्यांच्या माथ्यावर वर्षानुवर्षे लादून या तथाकथित ख्यातनाम इतिहासकारांनी भारताच्या इतिहासाचे आणि भावी पिढ्यांचे कधीही भरून येऊ न शकणारे असे नुकसान केले आहे.


पुस्तक क्रमांक ४. 


मूळ पुस्तक : The World of Fatwas

अनुवादित पुस्तक : : फतव्यांचे जग

अनुवाद : भारती पांडे

हे पुस्तक मला सर्वांत आवडलेलं आणि तितकंच डोकं भंडावून सोडणारं आहे. "फतवा म्हणजे काय?" या प्राथमिक प्रश्नापासून पुस्तकाची सुरुवात होते. फतवा म्हणजे निर्णय किंवा हुकूम. रोजच्या जीवनात कसे वागावे किंवा नित्य दिनक्रमातील प्रसंगांमध्ये काय भूमिका घ्यावी अशा स्वरूपाच्या शंकाएखाद्या सर्वसामान्य व्यक्तीनेइस्लामी तज्ज्ञांसमोर मांडल्यावरतज्ज्ञांनी कुराण आणि हदीसमधील घटना आणि श्लोक यांच्या माध्यमातून दिलेली उत्तरं म्हणजे फतवा. यात आरोग्यवैवाहिक संबंधपरंपरावारसाहक्क अशा दैनंदिन मुद्द्यांपासून ते थेट सूर्य पृथ्वीभोवती फिरतो की पृथ्वी सूर्याभोवतीभूकंप का होतातशुक्रवारीच पवित्र दिवस काअशा सर्व प्रकारच्या प्रश्नोत्तरांचा समावेश असतो. सदर पुस्तकासाठी संदर्भ म्हणून लेखकाने १९८२ ते १९८७ या काळात प्रसिद्ध झालेल्या किफायती उल मुफ्ती यांच्या फतव्यांच्या ९ खंडांचा आणि त्याचप्रमाणे अहलउलेयारहिमिया अशा अन्य पाच संग्रहांचा आधार घेतला आहे. 

"भूकंप का होतो?" या प्रश्नाला "पृथ्वीवरील ज्या ठिकाणचं पाप वाढतं तेथील नस खेचली जाते आणि भूकंप होतो" असं उत्तर मिळतं. साप किंवा विंचवाच्या विषयावरील उपाय म्हणून देवाचा धावा करावा असं उत्तर येतं. अन्नपदार्थात माशी पडली तर ती कशी काढावी याचे नियम आहेत. हात पाय कसे धुवावेतलघवीला/शौचाला कसे जावे इत्यादींचेही नियम सांगितले आहेत.

काफर कोणाला मानावे?” या प्रश्नाच्या उत्तरादाखल अनेकांनेक मुद्द्यांचं मंथन केलेलं आढळतं. प्रत्येक जीव जन्माला येताना इस्लामीच असतो परंतु त्याचे पालक त्याला अज्ञानाने ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात अशी मखलाशी केली जाते. वेदगीता आणि कुराण हे सर्व सारख्याच योग्यतेचे धर्मग्रंथ आहेत असे मानणारा तसेच इस्लाम आणि अन्य धर्म समान आहेत असे मानणारा इसम काफर समजावा. यापैकी काहीही गंमतीने किंवा वैतागाने उच्चारलं गेलं असलं तरीही त्याला काफर समजण्यात यावं अशा स्वरूपाचे स्पष्ट निर्देश दिलेले आढळतात.

शिक्षणाविषयी किंवा खरं तर शिक्षणाच्या निरुपयोगीतेविषयी आणि अनावश्यकतेविषयी बरंच भाष्य केलेलं आहे. ज्या शिक्षणामुळे मोमीन अर्थात मुस्लिम लोक, इस्लामी रूढी आणि श्रद्धा यांचा तिटकारा करू लागतात असं आधुनिक शिक्षण घेण्यापेक्षा निरक्षर राहणं केव्हाही उत्तम असं सांगितलं गेलं आहे. झाडूवाल्याची नोकरी सोडून इंग्रजी शिक्षण घेणे हे तर अजूनच वाईट असा एक स्पष्ट निकाल आहे. (स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी काश्मिरी मुसलमानांच्या शिक्षणाची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आल्यावर आलेली ही प्रतिक्रिया आहे.)

 

स्त्रिया आणि स्त्रीशिक्षण या विषयावर असंख्य फतवे आहेत. स्त्रिया चटकन बिघडू शकत असल्याने त्यांना शिक्षणसंस्थांना मध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. स्त्री गुलामाशी संभोग पूर्णतः मान्य आहे. पत्नीशी शारीरिक संबंध कसे ठेवावेतमेहर म्हणजे कायउजूर म्हणजे काय इत्यादी स्त्रियासंभोगविवाह आणि संसार इत्यादी सर्व विषयांवर मार्गदर्शन करणारे फतवे आहेत.

स्त्रियांविषयीची अनेक मतं धक्कादायक आहेत.

१.      पुरुषांसाठी सर्वात दुःखद बाब म्हणजे स्त्री आहे.

२.       नरकातही स्त्रियाच बहुसंख्येने आहेत.

३.       स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत अर्धी बुद्धी असते.

आणि या प्रत्येक मुद्द्याची कारणंही संबंधित फतव्यांमधून देण्यात आलेली आहेत.

तिहेरी तलाक आणि अटीयुक्त (conditional) तलाक म्हणजे काय आणि त्यातला फरक समजावून सांगणारे फतवे आहेत. तिहेरी तलाक च्या संबंधात पाकिस्तानी टेलिव्हिजनवरच्या एका जोडप्याच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग डोळे उघडणारा आहे.

पाकिस्तानी टीव्हीवरील एका मालिकेत नवराबायकोचं काम करणारं आणि प्रत्यक्ष आयुष्यातही नवरा-बायको असलेल्या दाम्पत्याचा धक्कादायक प्रसंग पुढीलप्रमाणे. मालिकेतला नवरा त्याच्या मालिकेतल्या बायकोला मालिकेत तलाक देतो. तो भाग संपल्यावर अर्थातच ते प्रसंग पूर्वीप्रमाणे म्हणजे अर्थातच विवाहित दाम्पत्याप्रमाणे राहू लागतं. ही बातमी कर्णोपकर्णी मौलवींपर्यंत पोचते आणि प्रकरण चिघळतं. मौलवींच्या मतानुसार एकदा तलाक झाल्यावर ते जोडपं, त्या स्त्रीचा इस्लामी नियमांप्रमाणे हलाला होईपर्यंत पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. हलाला म्हणजे अर्थातच त्या स्त्रीला अन्य एखाद्या पुरुषासोबत निकाह करून
, लैंगिक संबंध प्रस्थापित करावे लागतात आणि त्यानंतर त्या पुरुषाने तलाक दिल्यानंतरच ती परत आपल्या जुन्या पतीशी विवाह करू शकते. मौलवींनी त्या स्त्रीला हलाला करून, 'शुद्धहोऊन मगच तिच्या मूळ नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न करता येईल असा निवाडा दिला आणि तिला त्याप्रमाणे वागायला लावलं.

हे मूळ पुस्तक प्रचंड मोठं आहे. भारती पांडे यांनी मूळ पुस्तकाचा संपूर्ण अनुवाद केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अनेक संदर्भांची पुनरावृत्ती झाली आहे. एकच संदर्भ अनेकदा निरनिराळ्या उदाहरणांमध्ये पुनःपुन्हा दिले गेला आहे आणि त्यामुळे पुस्तकाची पृष्ठसंख्या खूप वाढली आहे. त्यामुळे असे पुनरावृत्ती झालेले संदर्भ वगळून त्यांनी पुस्तकाचा पुन्हा एकदा संक्षिप्त स्वरूपात अनुवाद केला आणि त्यानंतर हे पुस्तक आकाराला आलं.

आपण कल्पनाही करून शकणार नाही इतक्या विविध प्रकारचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं या पुस्तकात वाचकांच्या भेटीस येतात. एका ठिकाणी तर तब्बल दोन पानं भरून छोटे छोटे असे फक्त प्रश्न दिलेले आहेत आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं पुरवणाऱ्या फतव्यांची माहिती पुढे देण्यात आलेली आहे.

इस्लामी प्रेरणा, जीवन, धर्म, जीवनशैली, चालीरीती, कट्टरता आणि या सगळ्यावर मौलाना, मुल्ला, मौलवी इत्यादींची असलेली पोलादी पकड या सर्वांची इत्यंभूत माहिती मिळवायची असल्यास हे पुस्तक वाचणं अनिवार्य आहे.

 

सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे एखाद्या विशिष्ट विषयसंबंधीचे शेकडो संदर्भअगदी सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोचवून त्यांचं अनुभवविश्व समृद्ध करून सोडण्याची आणि त्याच वेळी त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची एक विलक्षण हातोटी डॉ अरुण शौरी यांच्या लेखनात आहे. प्रत्येकाने हे अंजन आवर्जून घ्यावंच. अर्थात त्यानंतरही डोळे उघडणं/न उघडणं हे मात्र सर्वस्वी वाचकांच्याच हातात आहे.

-हेरंब ओक

इस्लाम ते सनातन, घरवापसीचा एक अविश्वसनीय प्रवास!

 "इथे आत्ता माझ्यासमोर अनेक पालक बसलेले आहेत ज्यांची मुलं सज्ञान वयाची असतील" तोडक्या मोडक्या हिंदीत व्यासपीठावरून एक प्रश्न येत ह...