Friday, December 25, 2009

बरहाताईचा गुगल-दादा (इमे)

गेल्या आठवड्यात एका मित्राने बरहाताईच्या या गुगल-दादाबद्दल सांगितलं. इमे त्याचं नाव. मी कधीपासून डाउनलोड करून ट्राय करणार होतो पण राहून जात होतं. शेवटी आज वेळ मिळाला आणि हे गुगल इनपुट मेथड एडिटर (IME - इमे) डाउनलोड केलं. एकदम झक्कास आहे. बरंचसं बरहा सारखंच आहे. म्हणजे तळाशी लँग्वेज बार उघडतो. तिकडे मराठी निवडायचं. (आणि ही मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु भाषा वगैरे आपण डाउनलोड करायच्या वेळी निवडायची.) आणि नेहमीप्रमाणे दाणादण टंकायचं. बरहावाल्यांना कदाचित विशेष आवडणार नाही. पण माझ्यासारखे गुगल भक्त असतील त्यांना नक्की आवडेल. आणि खूप सोयीस्कर पण वाटेल. क्वीलपॅड, बरहा वगैरे मध्ये कॉमनसेन्सचा अभाव आहे असं मला वाटतं. म्हणजे गुगल मराठीतले नेहमीचे वापरातले शब्द आपोआप टिपतं. पण क्वीलपॅड, बरहा ते नाही करत. सोप्प उदाहरण म्हणजे "येतं, जातं, करतं" सारख्या शब्दांमधला शेवटचा अनुस्वार किंवा विंग्रजीत लिवलेले office किंवा camera सारखे शब्द गुगल बरोब्बर टिपतं. अर्थात क्वील/बरहा मध्ये पण असेल अशी काहीतरी सोप्पी सोय किंवा शोर्टकट. पण मला नाही सापडले. अजून एक म्हणजे IME मध्ये आपण शब्द टाईप करायला लागलो कि तिथे तो आपोआप आपल्याला शब्द सुचवतो. म्हणजे समानार्थी वगैरे नाही हो (करेल. ते पण करेल गुगल १-२ वर्षात :P) . म्हणजे word-suggestion. आपल्या मोबाईल मधल्या डिक्शनरी सारखं.
गुगलदादा काय एकेक प्रोडक्टस काढतो यार. (आणि पुन्हा चकटफू) जी-मेल, युट्युब, ओर्कट,पिकासा, अर्थ, जी-टॉक, क्रोम, गुगल maps. गुगल वॉईस. सगळे एकापेक्षा एक. गुगलने जी-टॉक जी-मेलच्या पेज मधेच इंटीग्रेट केल्यावर याहूला पण तसं करावंच लागलं. किंवा पीसी-टू-पीसी वॉईस चॅट पण सुरु केलं ते गुगलने. त्यांनी क्रोम लॉंच केल्या केल्या त्या दिवसापासून मी ते वापरायला सुरु केलं. काय मस्त लाईट-वेट आहे. खरंच अगदी हलकं-फुलकं वाटतं. लॅपटॉपलाही आणि आपल्यालाही.. आता वाट पहायची ती क्रोम ओ.एस. ची.
असो गुगलचा उदो उदो थोडा अति होतोय आणि तो उद्देश नव्हता या पोस्टचा. इमे बद्दल चटकन-पटकन सांगायचं होतं. म्हणून हे क्विक पोस्ट.

Wednesday, December 23, 2009

डकवा-डकवी

अपर्णाने मला डकवलं. बघूया कसं जमतंय KBC चं ब्लॉग व्हर्जन. पटकन त्या डकवलं शब्दाची गम्मत सांगतो. पाचवी किंवा सहावीत असताना मी वर्गात सामान्य विज्ञानाचा धडा मोठ्याने वाचत असताना हा डकवणे शब्द आला आणि मी प्रिंटींग मिस्टेक समजून तो चक्क अडकवणे असा वाचला. बाईंनी पुन्हा वाचायला सांगितल्यावर सुद्धा मी सुरुवातीच्या "अ" चा आधार सोडला नाही. आणि तेव्हा मला सगळ्यांसमोर त्या शब्दाचा अर्थ समजावला गेल्याने पक्का बसला डोक्यात. आणि तेव्हा मला कळलं डकवणे हा एक वेगळा शब्द आहे तर. चिकटवणे या अर्थी. तोपर्यंत माझ्या मेंदूच्या शब्दकोशात तो नव्हताच. असो. घडाभर तेल संपल तरी याच नमन काही संपत नाही असं कोणी म्हणायच्या आत (किंवा सगळ्यांच म्हणून झाल्यावर) आपण ब्लॉग KBC ला सुरुवात करू.

1.Where is your cell phone?
आत्ता उशीखाली आहे. (पण एकंदरीत मुलाच्या तोंडात, माझ्या खिशात किंवा चार्जिंगला नसला की हरवला समजायचा.)

2.Your hair?
काळे, दाट (होते पूर्वी. आता बाळराजांच्या ओढण्यातून किती शिल्लक राहतील हे Fructis च जाणे)

3.Your mother?
माझा आदर्श

4.Your father?
सुपर अक्टिव

5.Your favorite food?
पाव भाजी, बटाटा वडा, अळूच्या वड्या, पिझ्झा (बेसिकली हाताने न घ्यावं लागणारं काहीही)

6.Your dream last night?
मी ८ तास झोपलो आहे.

7.Your favorite drink?
कॉफी, बोर्नविटा (सोमरसाबद्दल म्हणत असाल तर अब्राम्हण्यम !! ;) )

8.Your dream/goal?
म्म्मम्म्म (Instant गोल तर ही प्रश्नावली पूर्ण करणे.)

9.What room are you in?
(माझ्या स्वतःच्या घरातली) बेडरूम

10.Your hobby?
वाचन (व पु, पु ल, मतकरी, रणजीत देसाई आणि जॉन ग्रिशम यांची सगळी पुस्तकं) , ट्रेकिंग (आणि झोपणे, लोळणे, उशिरा उठणे).. आणि हो. भरपूर मुव्हीज बघणे.

11.Your fear?
"भूत" मधली मनजित

12.Where do you want to be in 6 years?
म्म्म्मम... २०१५.. आय गेस

13.Where were you last night?
अर्थात घरीच

14.Something that you aren’t?
हेरंब ओक सोडून काहीही

15.Muffins?
डबल चोकलेटचिप मफीन. केव्हाही, कितीही

16.Wish list item?
आपल्या मुकेशच्या शेजारी त्याच्या पेक्षा १ मजला जास्त असलेलं घर बांधायचं (आणि त्यात राहायचं) .. वचने किं दरिद्रता??

17.Where did you grow up?
आमची डोंबिवली

18.Last thing you did?
आत्ता "पाकिस्तानात" जाऊन आलो.

19.What are you wearing?
टी-शर्ट आणि track pant

20.Your TV?
सोनी.
TV शो म्हणत असाल तर F.R.I.E.N.D.S (दुसरं काय असतं म्हणा बघण्याच्या लायकीच)

21.Your pets?
आय हेट पेट्स

22.Friends
बरेच. पण अगदी जीवाभावाचे फारच कमी. सगळे डोंबिवली, मुंबईत आहेत सुखात

23.Your life?
निवांत.

24.Your mood?
झोपेश.

25.Missing someone?
आई

26.Vehicle?
सध्या तरी पाथ आणि सबवे

27.Something you’re not wearing?
शूज

28.Your favorite store?
स्टोर मध्ये कसलं फेवरेट? काहीही चालतं ..

Your favorite color?
पांढरा. (गाडी मात्र जांभळी आवडते)

29.When was the last time you laughed?
मगाशी चिंटू खांद्यावर डोकं ठेवून झोपण्याचं नाटक करत होता आणि नंतर एकदम जोरात हसत हसत ओरडायला लागला तेव्हा :)

30.Last time you cried?
गेल्या वर्षी दोनदा रडलो. १७ ओगस्ट आणि ९ नोवें

31.Your best friend?
#२२ चं उत्तर बघा साहेब.

32.One place that you go to over and over?
Actually those are two places. ऑफिस आणि घर.

33.One person who emails me regularly?
फार कमी. पण मी कायम पाठवत असतो सगळ्यांना. कर्मण्ये वादिकारस्ते म फलेषु कदाचन ||

34.Favorite place to eat?
चांगला पिझ्झा देणारं कुठलही हॉटेल.

मी आनंद, उन्मेष दादा आणि सचिनला डकवतोय.

तळमळला !!

सोमवारी (दर सोमवार प्रमाणेच) उठायला उशीर झाला. वीकेंडचा हॅंगओवर आणि आळशीपणा वगैरे वगैरे.. नाही हो.. सोमरस वाला हॅंग ओवर नव्हे.. आम्ही त्या क्षेत्रात "काला अक्षर भैस बराबर" आहोत. आमचा आपला नॉर्मल वीकेंड वाला हॅंग ओवर. आळशीपणातून आलेला.. असो. उगाच भरकाटतोय. मुद्दा हा की उशिरा उठल्यामुळे डबा नेता आला नाही ऑफीसला आणि दुपारी जेवायला बाहेर गेलो. आमच्या ऑफीसच्या जवळच एक छोटं सॅंडविच शॉप आहे तिकडे जाऊन बसलो. हॉटेल मधे ४-५ जणच होते. तसं सगळं शांत शांत होतं...
मी पण सॅंडविच वर ताव मारण्यात मग्न असताना माझ्या मागेच अगदी जवळ, अचानक धप्प असा आवाज आला. मी पटकन मागे वळून बघितलं. तर एक माणूस आडवा पडलेला दिसला. आधी काही नीट कळलंच नाही. मग पटकन लक्षात आलं की तो बहुतेक तोल जाउन पडला आहे. मी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा एक पाय टेबालाखली थोडा अडकल्या सारखा वाटला की ज्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती. आणि तो काही बोलत पण नव्हता. डोळे अर्धवट उघडे होते.. आणि अचानक माझ्या लक्षात आल की हे साधं तोल जाऊन पडण्यातलं प्रकरण नाहीये.. त्याला काहीतरी चक्कर वगैरे आली असावी आणि त्यामुळे तो पडला असावा. तो काही प्रतिसाद देत नाही हे पाहून मी पटकन आजूबाजूला नजर फिरवली. पण तो धप्प आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोचल्याचं निदान त्यांच्या चेहर्यावरून तरी दिसत नव्हात. (आणि तो माणूस एका कोपर्‍यात पडला असल्याने तो त्यांना दिसलाही नसावा असा मी आपला संशयाचा फायदा दिला त्यांना). कानाचा पडदा आणि सभोवतालचं जग या मधे आय-पॉड चे हेड फोन्स आल्याने तो धप्प आवाज हेडफोन्सच्या बाहेरच्या आवरणावर एकदा टकटक करून मावळला असणार. शेवटी मी पटकन ऑर्डर द्यायच्या काउंटरवर जाऊन त्या कोपर्याकडे बोट दाखवून काउंटर वरच्या मुलीला झाला प्रकार सांगितला. ती पटकन धावत आली माझ्याबरोबर. तिनेही आधार देऊन त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण तिलाही ते शक्य झालं नाही.. एकीकडे मोबाइलची बटणं दाबून तिने पटकन इमर्जन्सी अँब्युलंस सर्विसला फोन लावून अँब्युलंस मागवली. आता माझं हळू हळू त्या माणसाकडे लक्ष गेलं. जरा म्हातारेच गृहस्थ होते. म्हणजे आपल्या आजोबांच्या वयाचे असतील. थोडे शुद्धीत आले होते आता. तोवर आम्ही त्यांना हात धरून भिंतीला टेकून बसवलं. त्यांनी डोक्यावरून टोपी काढून ठेवली. चेहर्यावर, कपाळावर चांगलाच घाम तरारला होता. अँब्युलंस काकुंनी त्यांना काहीही-अगदी पाणीही- न देण्याविषयी बजावलं होतं. माझं निरीक्षण चालूच होतं.. आजोबा चांगले उंच होते. सहा फूट तर आरामात असतील. चेहर्यावर छोटी दाढी, हसरे डोळे आणि एकदम धिप्पाड देह असा सगळा डौल होता. तेवढ्यात एक तरुण, उंच पोलिस हॉटेलमधे शिरला. अँब्युलंस काकुंनी त्या एरियातल्या पोलिसांना फोन करून इकडे यायला फर्मावलं होतं वाटतं. त्याने आजोबांजवळ बसून कसं वाटतंय वगैरे विचारून जुजबी चौकशीला सुरूवात केली. Chanton का असं काहीतरी नाव होतं त्यांचं. जवळच्याच चर्च मधे पादरीबाबा होते ते. गेली ३० वर्ष. त्यांचं आय-डी कार्ड दाखवलं पोलिसाला. त्याने वय विचारल्यावर त्यांनी ७८ असं सांगितलं. अरे म्हणजे साधारण माझ्या आजीच्याच वयाचे की. माझे आजोबा मी खूप लहान असतानाच गेल्याने आजी म्हणजे आमचं सर्वस्व होतं. आजी जायच्या आधीचा एक महिना सोडला तर कायम अगदी ठणठणीत होती. बाहेर पडली नाही तरी घरात अगदी व्यवस्थित फिरायची, स्वतःची कामं स्वतः करायची. म्हणजे ८०-८२ वर्षांची झाली तरी शेवटचा एक महिना सोडला तर म्हातारी वगैरे कधीच वाटली नाही.. अरे हो.. आता अजुन १५-२० वर्षातच आई-बाबा पण साधारण त्याच वयाचे होतील की म्हणजे म्हातारे होतील. कोणी सांगावं त्यांच म्हातारपण ८० मधे न येता थोडं आधी सत्तरीतच येईल. नको त्या दिशेला विचार वळतायत हे कळत असून ही मी त्यांना थांबवु शकत नव्हतो. आजी बरोबर तिच्या जवळपास निदान तिची मुलं म्हणजे माझे काका, आई-बाबा, तरी होते. पण आमच्या आई-बाबां बरोबर कोण आहे? त्यांना पण आमच्या बरोबर राहावसं वाटत असणारच ना . नातवला किती दिवस वेबकॅम वरुन बघणार ते? आणि त्यांचं म्हातारपण मला वाटतंय तसं सत्तरी ऐवजी साठीतच आलं तर? म्हणजे आत्ताच.. अरे बाप रे.. विचारांच्या नादात कधी हॉटेल मधून बाहेर पडलो कळलंच नाही. त्याच विचारांनी रस्त्यावरून चालत होतो. २ मिनिटे डोकं जरा दाबून धरलं, चेहर्यावरून हात फिरवला आणि पुन्हा चालायला लागलो.. जागा बदलली, रस्ता बदलला तरी विचार काही बदलत नव्हते.

*****
श्या.. बस झाल.. परत जायला हवं आता.. एक्सपोजर, करियर, लाइफ स्टाइल, एक्सपिरियन्स, मुलांच्या भवितव्यासाठीची तयारी अशी कितीही गोंडस वेष्टणं गुंडाळण्याचा प्रयत्न आपण केला ना तरी आपल्याला पण माहीत असतं की आतली गोळी शेवटी वेगळीच आहे, एकच आहे आणि ती म्हणजे पैसे, अजुन थोडे पैसे, अजुन थोडे जास्त पैसे.
हट्ट.. बस झाल.. कितव्यांदा हा असा विचार करतोय मी गेल्या २ वर्षात? परतीचा मार्ग एवढ्या जवळ नाही हे माहीत असूनही?? तसं म्हटलं तो तेवढा लांबही नाहीये.

ते मागे "सागरा प्राण तळमळला" कोणी लावलंय रे?? बंद करा बघू ते आधी.. की माझ्या मेंदूतच वाजतंय ते?

*****

पार्टनर म्हणाला "अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही"
"असं कसं ?"
"माणूस नुसता काव्यावर जगात नाही. मागची बाजू व्यवहाराचीच"
"....."
"तू जी वेष्टनं म्हणतोयस ती खरोखर नुसतीच वेष्टण आहेत का? असं असेल तर ताबडतोब परत जा. पण तसं नसेल तर ? ती गोळीला पूरक असतील तर? किंबहुना गोळीचाच एक भाग असतील तर? गोळीलाही बिलाच्या कागदासारखीच मागची बाजू आहे हे विसरू नकोस. इतरांसाठी नाही पण निदान स्वतःसाठी तरी !!

(व पुं च्या सदाबहार पार्टनर मध्ये माझी सरमिसळ केल्याबद्दल कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे.)

Monday, December 14, 2009

हलके-मिस्ट झालासे कळस !!!

खरं तर राजू परुळेकरच्या (माझ्या याआधीच्या लेखात मी त्यांचा उल्लेख आदरार्थी करत होतो. पण आता ते त्या योग्यतेचे वाटेनासे झालेत ) दुसर्‍या हलके-मिस्ट्रीला उत्तर देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. सगळ्यांनी त्याच्या लेखावर (आणि त्याच्यावर) एवढी टीका केली होती की त्याचं त्यावर उत्तर येणार हे तर नक्की होतच. आणि ते त्याप्रमाणे आलंच. मीही सवयीप्रमाणे ते वाचलं. सचिनवरील टीकेने बरबटलेली ती हलके-मिस्ट्री  वाचून मनातल्या मनात त्यांची (संस्कार आड आल्याने एकेरीवरून पुन्हा आदरार्थी बहुवाचानाकडे वळतोय.. अरे(रे) संस्कार संस्कार)  कीव यायला लागली. आणि शेवटी तर टीका करता करता साहेबांची भीड एवढी चेपली कि ते स्वतःची तुलना चक्क तुकाराम महाराजांशी करायला लागले. हे जरा फारच "परुळेकरी" होत होतं.. आता तुकाराम महाराजांचा भक्त असण्यासाठी वारकरी असाव लागत नाही किंवा सचिनवर प्रेम करण्यासाठी क्रिकेटर (परुळेकरी भाषेत खेळ्या) असाव लागत नाही. पण यापैकी कोणाचाही अपमान होत असेल तर तुकोबारायांनीच सांगितल्याप्रमाणे "तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैंजारा" हा मार्ग स्वीकारावा लागतो .. आणि त्यासाठीच हा पुनःश्च पत्रप्रपंच..


मी दोन्ही हलके-मिसट्रया पुन्हा पुन्हा वाचून बघितल्या पण सगळ्या unsung aani unhonoured हिरोंना स्मरून सांगतो की सचिनबद्दलचा तीव्र आकस आणि सचिनसारख्या निरुपद्रवी आणि इझी टार्गेट (ऑस्ट्रेलिया  मध्ये भारतीयांवर हल्ले का होतात? कारण तेही तिकडे इझी टार्गेट असतात. ते फिरून प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करत नाहीत) असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून जास्तीत जास्त फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग हे दोन्ही केमिसट्रया मधले सामाईक मुद्दे सोडले तर दुसरी केमिस्ट्रीला मला फारच विस्कळीत आणि संदर्भहीन वाटली.. का ते सांगतो. निदान मला तरी दिसलेले त्यांचे प्रमुख मुद्दे असे.


१. तो  "खेळ्या" उर्फ "ग्लॅडिएटर" आहे .. त्याचं  अधिकाधिक  क्रिकेट  खेळणं आणि  अधिकाधिक  सेन्चुर्‍या  मारणं हे  राज्यसंस्था आणि समाज  यांना शोकांत शेवटाकडे नेणारं आहे.


२. त्याने फेरारीचा कर भरला असता आणि मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे असं सांगितलं असतं तर परुळेकरी भाषेत त्याला चांगला भारतीय ग्लॅडिएटर म्हणता आलं असतं. (म्हणजे एवढ करून पुन्हा 'ग्लॅडिएटर'च बरं का )


३. त्याने (पुलेला गोपीचंद प्रमाणे) पेप्सीच्या जाहिराती  नाकारल्या  असत्या  आणि (मुंबईतील मुले दत्तक ना घेता) स्टीव वॉ प्रमाणे कोलकात्यातील मुले दत्तक घेतली असती तर तो परुळेकरी डिक्शनरी प्रमाणे स्वार्थी व्यक्तिमत्व न  राहता सेल्फलेस सोल म्हणून मान्यता पावला असता.


४. त्याच्याकडे मर्यादेपलीकडे पैसा आहे आणि तो त्याने (टाटा, पु ल, रॉकफेलर, गेट्स दाम्पत्य यांच्या प्रमाणे) सचिन तेंडूलकर फाउंडेशन काढून त्या फाउंडेशन कडे सुपूर्द करायला हवा होता. आणि त्याने तसं केलं असतं तर रा रा परुळेकरांनी त्याच्या सामाजिक बांधिलकीला जाहीर अप्रुव्हल दिलं असतं


(मी खेळ्या, ग्लॅडिएटर, पत्रकार, विचारवंत यापैकी काहीही नसणारा, पेप्सी पिणारा, मुलांना दत्तक न घेतलेला, हेमलकसात काम न करणारा, कुठल्याही फाउंडेशनचा नसणारा असा एक तुच्छ पामर असल्याने माझी मते ही नक्कीच चुकीची असणार याची परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री मला आहे आणि माझी ही तमाम चुकीची मते बदलण्यात ते नक्कीच यशस्वी होतील याचीही मला परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री ........ वगैरे वगैरे.....)


आता पुन्हा एकदा परुळेकर साहेबांच्या मुद्द्यांना मी माझ्या नसलेल्या बुद्धीबाहुल्ल्ल्याने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

१. सचिनच्या क्रिकेट खेळण्यामुळे समाज रसातळाला जात असल्याने तो आपली बॅट म्यान करून घरी बसला असता तरी गांगुली, द्रविड, धोनी, युवराज, सेहवाग, गंभीर, हरभजन, झहीर, इशांत, हे सगळे खेळत राहिलेच असते ना? का सगळ्यांनीच घरी बसायचं आणि भारतीय टीम आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरू द्यायची नाही आणि समाज रसातळाला जाण्यापासून रोखायचं?? मी खरंच प्रचंड बुचकळ्यात पडलो असल्याने रा रा परुळेकर "सचिनच्या बॅटिंग करण्याने समाज कसा काय आणि का रसातळाला जातो" हे अगदी सोप्प्या भाषेत (तिसर्‍या केमिस्ट्रीत) सांगतील का?"


२. हरभजन, धोनी, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी हे आणि परुळेकरांच्या परिचयातल्या असंख्य राजकारण्यांनी इतर अनेक महागड्या गाड्या कर चुकवून आणल्या आहेत. त्यावर परुळेकरांनी किती शाई खर्ची घातली आत्तापर्यंत? आणि परुळेकर साहेबांनी सचिनचं ते वाक्य पुन्हा एकदा तपासून बघाव. अर्थात यावर मी माझ्या पहिल्या पत्रात उत्तर दिलेलं आहेच.


३. सचिनने पेप्सीच्या जाहिराती नाकारल्या असत्या तरी पहिल्या मुद्द्यातील सगळ्या खेळाडूंनी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अमिताभ पासून अक्षय कुमार पर्यंत सगळे जण त्या जाहिराती करत राहिले असतेच त्याचं काय? आणि ज्या अर्थी परुळेकर साहेब सचिनच्या थातुरमातुर (म्हणजे काय रे भाऊ?) सामाजिक कार्यांबद्दलचा उल्लेखही  न करण्याचा सज्जड दम भरतात त्या अर्थी तो सामाजिक कार्य करतो हे त्यांनाही माहित आहे फक्त त्याचा उल्लेख त्यांच्या लेखाला आणि हेतूला बाधक आणि अडचणीचा ठरत असल्याने तो करू नये असे त्यांचे म्हणणे आहे काय?


४. लेखात उल्लेखलेली सगळी फाउंडेशन्स हि त्या त्या व्यक्तींनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस काढली आहेत. राजे, सचिन अजून चाळीशीचाही नाहीये. आणि प पु परुळेकर साहेबांना माहित नसल्यास सांगतो सत्यमची पण "सत्यम फाउंडेशन " आणि "बायराजू फाउंडेशन" अशा दोन संस्था होत्या. त्याचं काय झालं पुढे हे जग जाणतंच.


हुश्श .. संपला बाबा एकदाचा प्रश्नोत्तराचा तास (त्रास!!)


आता थोडे प्रश्न मी विचारतो परुळेकर काकांना.... परुळेकरांनी राजकारण्यांवर लिहिलेल्या केमिसट्रयांमध्ये बहुतांशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते का आहेत हा प्रश्न माझ्या बालमनाला पडला आहे. विधानसभा/लोकसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे पडद्यामागे गुलुगुलू चालू असणे आणि परुळेकर (शिवसेनेचे समर्थक असल्याने... आता माहित नाही) यांनी राष्ट्रवादी नेत्यांचे गोडवे गाणे याला निव्वळ योगायोग समजायचं का?

मिडिया नेहमीच सचिन, त्याच्या क्रिकेटची २० वर्षे याला अवास्तव महत्व देते असे परुळेकरांना वाटत असेल तर त्यांनी सचिनला नावे ना ठेवता डायरेक्ट मिडियावरच हल्लाबोल का नाही केला? मिडिया सचिनला अवास्तव महत्व देते तर त्यात सचिनचा काय दोष ? दोष माध्यमांचाच ना??? मग परुळेकरांची लेखणी मिडीयावर का नाही सरसावली?? अरे हो पण परुळेकर पण मिडियावालेच पडले ना. मग जळात राहून माशाशी वैर कस पत्करणार बुवा. उगाच खरं बोलून आणि मिडीयाचे दोष दाखवून आपलं (२० वर्ष पूर करू घातलेलं ) करिअर का बिघडवा? राजे, तेथे पाहिजे जातीचे... म्हणूनच आचार्य अत्रे, नीलकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे एकदाच निर्माण होतात. बाकीचे सगळे असतात ते परुळेकर, राउत आणि (बाळ नाही) "बाल" ठाकरे.

आणि सचिनला टार्गेट केल्याचे २ फायदे.. तो बिचारा उलटून बोलत पण नाही आणि टीका करणार्‍याला (तुमचीच) मिडिया भरपूर प्रसिद्धी पण देते. एक उदाहरण देतो राज ठाकरेंचं. (मला राज ठाकरे यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे हे विसरू नये). राज ठाकरे सगळ्यात जास्त राष्ट्रीय मिडीयाच्या चर्चेत आले ते कधी पासून माहित्ये? सांगतो. मनसेने टॅक्सीवाल्यांना मारलं, रेल्वे परीक्षांना आलेल्या भैयांना मारलं, तलवारी वाटण्याची भाषणं केली त्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन वर शाब्दिक हल्ला केला. रातोरात त्यांचं नाव सगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्सवर (आधी पेक्षाही जास्त ठळकपणे ) झळकू लागलं. ही त्यांची स्ट्रॅटजी होती. पुन्हा सांगतो मला राज ठाकरेंबद्दल पूर्ण आदर आहे पण लोकप्रियता आणि जनाधार मिळवण्यासाठी त्यांना अमिताभ बच्चनवर शाब्दिक हल्ला करावा लागला हे सत्य मी तरी नाकारू शकत नाही .. एक्झॅक्टली तीच स्ट्रॅटजी वापरून परुळेकर सचिनला लक्ष्य करताहेत..

त्यांचं कुठलही पुस्तक मी वाचलेलं नाही (पण ई टीव्ही वरील संवाद चे जवळपास ७०% एपिसोड्स आणि त्यांचे राज, उद्धव, विजय तेंडूलकर यांच्यावरील आणि इतरही अनेक लेख वाचलेले आहेत ) पण त्या पुस्तकाचं मार्केटिंग करण्याचा किंवा मी कसा इतका हजारो माणसांना भेटलोय आणि मी कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना असा एक उगाच संशय येऊन गेला.

परुळेकर जसे अजिबात क्रिकेट ना बघता, किंवा सचिनची बॅटिंग  न बघता त्याच्यावर घणाघाती हल्ला करू शकतात  तर  म्या पामराने त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याचा म्हणजे त्यांची पुस्तके न वाचता त्यांच्या विषयी बोलण्याचा (मी निदान त्यांनी लिहिलेले लेख आणि "संवाद" तरी पहिले आहेत म्हणा) अल्पस्वल्प प्रयत्न केला तर ते वाईट वाटून घेणार नाहीत याची नक्की खात्री आहे.

अजून एक म्हणजे अरुंधती जोशींच्या मताला/लेखाला उत्तर देण्या ऐवजी "अमेरिकेतल्या मराठी माणसांना काय कळतंय, त्यांनी गप्प बसावं.. उगीच "आमच्या" भारतातल्या गोष्टींत लुडबुड करू नये" हा जो सूर आहे ना तो तर अतिशय उबग आणणारा आहे. (मी पण अमेरिकेतूनच लिहित असल्याने त्यांनी माझं उत्तरही तो गंड मनात ठेवून वाचलं तर मग विषयच संपला)

परुळेकरांचे (वर उल्लेखिलेले आणि इतरही अनेक) अप्रतिम लेख वाचून, लेखांच्या मांडणीवर आणि त्यातल्या मुद्द्यांवर बेहद्द खुश होऊन मी अनेकदा तोंडात बोटे घातली होती.. पण सचिनवरच्या या २  हलके-मिसट्रया  वाचून तीच बोटे तोंडातून काढून खिशात लपवून ठेवावीत कि त्यांच्याच दिशेने उगारावीत या संभ्रमात असताना पर्याय २ चा प्रभाव अधिक ठरल्याने पत्रोत्तर दिले. केवळ सचिनचा, त्याच्या खेळाचा,त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या गुणांचा अतिशय तीव्र चाहता म्हणूनच नव्हे तर एक मराठी माणूस म्हणून पण मी त्यांचा आणि त्यांच्या लेखाचा अनेकवार निषेध करतो. मूर्तीभंजन केल्याचा आव आणत आणत फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करता करता जनक्षोभाच्या रेट्याने त्यांचे लेखणीभंजन न होवो हीच सदिच्छा


जाता जाता : (पेप्सीच्या जाहिराती करत असल्याने आणि फेरारीचा कर माफ करण्या विषयी विनंती केल्याने) परुळेकर यांना सचिन जर एक महान माणूस वाटत नसेल तरी त्याच्या महान खेळ्या (परुळेकरी डिक्शनरीतला "खेळ्या" नव्हे, "खेळी"चे अनेक वचन या अर्थी), आकडेवारी, संदर्भ हे सर्व नजरेखालून घातल्यावर परुळेकरांना सचिन हा एक सार्वकालिक महान खेळाडू आहे हे तरी नक्की जाणवेल. तेव्हा पुढच्या कुठल्याही लेखात त्यांनी आमच्या सचिन तेंडूलकरचा उल्लेख खेळ्या, ग्लॅडिएटर असा करू नये हि त्यांना कळकळीची विनंती.. !!


(हाच लेख मी माझी प्रतिक्रिया म्हणून राजू परुळेकर यांच्या इ-मेल आयडी आणि लोकप्रभाच्या इ-मेल आयडी वर ही पाठवली आहे.)

Friday, December 11, 2009

माझे (बदलते) संगीतप्रेम :D

मी शाळेत असताना "आशिकी"च्या गाण्यांनी आमच्या पिढीला वेड लावले होते. नदीम-श्रवण म्हणजे सर्वोत्कृष्ठ संगीतकार असा आमचा ठाम समज होता. आणि ज्याला हे मान्य नसेल त्याच्या कडे विचित्र नजरेने पाहायचो आम्ही. नंतर "मैने प्यार किया" ने "आशिकी" ची जागा घेतली. एक काळ असा होता की मी झोपलो नसेन आणि अभ्यास करत नसेन तर मी फक्त MPK ची गाणी ऐकत असायचो. त्यानंतर अचानक ए आर रेहमानने दणक्यात एन्ट्री करत रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से अशा जबरदस्त अल्बम्सची रांग लावली आणि मी आपोआपच त्याचा फॅन झालो... इतरांप्रमाणेच. नंतर मध्ये एकदा हेवी मेटलचं वेड लागलं आणि Sepultura माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये add झाले. Sepultura च्या ५०० रु ची एक अशा ३ सीडीज विकत घेतल्या, त्यांची चिक्कार गाणी ऑनलाइन ऐकली, पहिली. गेल्या वर्षी आलेल्या रॉक-ऑनने पण अशीच झिंग आणली होती. गेले ६ महिने सतत तीच गाणी ऐकली, मोबाईल रिंग टोन, अलार्म टोन, SMS टोन सगळ रॉक-ऑन मय होत. अर्थात जुनी गाणी ऐकायला तर मी केव्हाही तयार असायचो, असतो. आणि त्यातल्या त्यात किशोर/आर डी/ देव आनंद असलेलं किंवा आपल्या हृदयनाथ मंगेशकरांचं कुठलंही गाणं म्हणजे तर स्वर्गसुखच. ट्रीप/ट्रेक मध्ये, कोणाच्या वाढदिवसाला, मित्रांबरोबर/cousins बरोबर रात्री जागवताना किंवा अगदी सहज गुणगुणताना सुद्धा या गाण्यांपैकीचं कुठलं तरी गाण म्हंटल जायचं. अगदी काल परवा पर्यंत. पण अचानक काहीतरी बदललंय असं माझ्या लक्षात आलं. परवा ऑफिस मधून घरी येत असताना सहज एक गाणं गुणगुणत होतो आणि मला एकदम माझंच आश्चर्य वाटून गेल कारण ते माझ्या नेहमीच्या फेवरेट लिस्ट मधलं नव्हतं.... आणि अचानक मला क्लिक झालं कि सध्या मी हे किंवा असंच एखादं गाणं गुणगुणत असतो. . त्यांचे विडीयो खाली टाकतोय. अर्थात कुठल्याच विडीयो मधलं आनिमेशन उच्च कोटीचं नाही (बायको ३-डी आनीमेटर असल्याने मला पण थोड थोड कळायला लागलाय आनिमेशन मधलं. म्हणूनच जीभ उचलून टाळयाला लावायचं धाडस करतोय. ) किंवा गाणीही काही ग्रेट अशी नाहीत. पण बाळकोबांना आवडतात.

सांगू काय सांगू काय



एका माकडाने काढलंय दुकान



एक मुलगा गेला तळ्याच्या काठी



ससा तो ससा कि कापूस जसा



सांग सांग भोलानाथ



Old MacDonald had a farm


त्याच काय आहे कि रात्री आमचा डॉन लवकर झोपतच नाही. मग त्याला कडेवर घेऊन फिरवावं लागत. तरीही नाही झोपला तर मग हि गाणी त्याला लावून द्यावी लागतात. मग स्वारी एकदम खुश होते. आणि हळू हळू छातीला बिलगून झोपायला लागते. मध्ये अनुजाने कुठेतरी वाचलं की रात्री मुलं लवकर झोपत नसतील, किरकिर करत असतील तर त्यांना काही क्लासिकल, instrumental ऐकवावं. म्हणून काल हे पण ट्राय करून झालं.

पं. हरिप्रसाद चौरसिया आणि झाकीर हुसेन जुगलबंदी


पण हळू हळू आमच्या हे लक्षात यायला लागलय की साहेब सगळ ऐकतात, बघतात पण त्यांना हव तेव्हाच (म्हणजे २ च्या आसपासच) झोपतात.

थोडक्यात सध्या रेहमान, रॉक ऑन, RD, किशोर या सगळ्यांची आमच्या बाळासाहेबांनी विकेट काढलीये आणि आमचं संगीतप्रेम आपोआपच बदलत चाललय. (पुढची पोस्ट मी बोबड्या भाषेत नाही टाकली म्हणजे मिळवलं :) )

झिप झॅप ........ झो S S S प !!!

परवा अस्मादिकांचा दिवस नेहमी प्रमाणेच उगवला. अर्थात आधीचा दिवस पण नेहमी प्रमाणेच मावळला होता. म्हणजे अंथरुणाला पाठ टेकायला १:३० वाजून गेला.. रात्रीचा.. (उगाच am/pm चा गोंधळ नको व्हायला... तुमचा... आणि माझाही थोडा..) आमच्या छोट्या डॉन च्या कृपेने झोपायला जवळपास २ वाजले. (आणि हे अस बरेच दिवस चालू होत. शेवटी त्याची सगळी कसर आज भरून निघाली.) कसाबसा ८ ला उठलो सकाळी आणि धडपडत, अर्धवट झोपेतच १० च्या सुमारास पोचलो ऑफिसला. (ही अतिशयोक्ती नाही).. अर्थात ऑफिसमध्ये जाऊन कामाला लागलं कि काही विशेष वाटत नाही झोपेचं किंवा दमल्याचं. साधारण १ च्या सुमारास काम ब-यार्पैकी संपवून जरा निवांत वेळ मिळतो ना मिळतो तोच एका कलीगने पिंग केलं की आत्ता कॉन-कॉल आहे लगेच. जॉईन होशील का? आणि वेब-प्रेझेन्टेशन ची लिंक पण दिली. अस्मादिक झाले जॉईन. प्रेझेन्टेशन छान होत अगदी. नवीन backup प्रोडक्टची छान माहिती होती त्यात. सुरुवातीला मी लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करत होतो आणि यशस्वीही होत होतो. पण जेमतेम १५ मिनिटेच. त्यानंतर इतका वेळ राखलेला संयम सुटला. झोपेला अडवून धरण्याचे सगळे प्रयत्न धुळीला मिळाले. प्रचंड झोप यायला लागली. अर्थात ऑफिस मध्ये झोप येणे हे काही मला नवीन नाही ;).. पण यावेळी काहीतरी भयंकरचं प्रकार होता. मी अक्षरशः पेंगत होतो. जागा राहण्यासाठी अक्षरशः धडपडत होतो. समोरच्या स्क्रीन वर काय चाललय हे कळून घेण्यासाठी आणि एकीकडे मान वाकडी करून कान आणि मानेच्या मध्ये धरलेला रिसिव्हर खाली पडू नये म्हणून मी अगदी जंग जंग पछाडत होतो. काय काय केलं नाही त्यासाठी. २ चुइंगगम्स टाकली तोंडात, डोळे चोळले, स्क्रीन थोडा वर केला जेणेकरून मान वर करून बघायला लागेल, खुर्चीची उंची कमी केली जेणेकरून मान वर ......... पण नाहीच. Benadryl घेतल्यासारख किंवा चरस गांजा प्यायल्यासारखी झोप येत होती. (अर्थात स्वानुभव शून्य, निव्वळ ऐकीव वर्णन. benadryl चं नव्हे हो , गांजाचं. एकदा benadryl घेऊन मी जवळपास १४-१५ तास गाढ झोपलो आहे. असो. विषयांतर होतंय. (विषय काय होता आपला? कुठे होतो मी? पुन्हा झोप येतेय कि काय? ;) ). झोप यायला लागली तेव्हाच खरतर पटकन बाहेर जाऊन एक राउंड मारून किंवा तोंडावर गार पाणी मारून झोप घालवता आली असती. पण या सेशन रुपी राक्षसाने आणि त्याच्या रिसिव्हर आणि स्क्रीन रुपी २ यमदुतांनी मला खुर्चीवर बांधून टाकल होत. नशिबाने ते इंटर अक्टिव सेशन नव्हत. मी म्हंटल जरा वेळ बडबडून (म्हणजे बडबड ऐकून) सेशन संपेल. पण कसलं काय. माझ्या आयुष्यातले चांगले २ तास कुरतडल्या नंतर त्यांनी announce केलं कि आता QnA सेशन आहे. ज्यांना प्रश्न विचारायचे असतील ते विचारू शकतात. (QnA सेशन कधी संपणार असा प्रश्न विचारावा अस हळूच माझ्या मनात डोकावून गेल.). त्यानंतर आमच्या टीम मधल्या अतिउत्साही कलीग्सनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला. (ज्याने मला लॉगीन व्हायला सांगितलं होत त्याच्यावर दगडांचा भडीमार करावा की विटांचा या प्रश्नात मी स्वतःला गुंतवून ठेवून झोप पिटाळण्याचा व्यर्थ प्रयत्न मी करून पहिला. पण डुलकी लागून जाग आली तेव्हा कळलं की तो प्रयत्नही फसला होता.)
शेवटी एकदाची ती मीटिंग संपली. आमच्या manager ने सगळ्या टीमच्या वतीने त्या प्रेझेंटरचे आभार बिभार मानले. आणि शेवटी हे पण म्हणाला कि "we had a little quiet gentleman today, who didn't ask much(???) questions". म्हणजे अस्मादिकच एवढ न कळण्याएवढा काही मी झोपेच्या आधीन झालो नव्हतो. मी पटकन आजूबाजूला कुठे हिडन कॅमेरा वगैरे नाहीयेना ते बघितलं. संपली मीटिंग एकदाची. कसाबसा दिवस ढकलला आणि आज रात्री लवकर झोपायचंच असा ठरवून घरी गेलो. पण कसलं काय आज पण डॉनच जिंकला आणि आमच्या झोपेचे दीड वाजले. आता वीकेंडला जास्तीत जास्त झोप पूर्ण करून घ्यायची या (गुलाबी!!) विचारांनी आत्ताच मला गुदगुल्या व्हायला लागल्यात.. बघूया कस जमतंय ते :)

(ब्लॉग लिहावा कि झोप काढावी अशा द्विधा मनःस्थितीत सापडल्यावर नेहमीच ऑप्शन # २ जिंकल्याने ब्लॉग टाकायला उशीर झाला.)

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...