Friday, December 11, 2009

माझे (बदलते) संगीतप्रेम :D

मी शाळेत असताना "आशिकी"च्या गाण्यांनी आमच्या पिढीला वेड लावले होते. नदीम-श्रवण म्हणजे सर्वोत्कृष्ठ संगीतकार असा आमचा ठाम समज होता. आणि ज्याला हे मान्य नसेल त्याच्या कडे विचित्र नजरेने पाहायचो आम्ही. नंतर "मैने प्यार किया" ने "आशिकी" ची जागा घेतली. एक काळ असा होता की मी झोपलो नसेन आणि अभ्यास करत नसेन तर मी फक्त MPK ची गाणी ऐकत असायचो. त्यानंतर अचानक ए आर रेहमानने दणक्यात एन्ट्री करत रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से अशा जबरदस्त अल्बम्सची रांग लावली आणि मी आपोआपच त्याचा फॅन झालो... इतरांप्रमाणेच. नंतर मध्ये एकदा हेवी मेटलचं वेड लागलं आणि Sepultura माझ्या फेवरेट लिस्ट मध्ये add झाले. Sepultura च्या ५०० रु ची एक अशा ३ सीडीज विकत घेतल्या, त्यांची चिक्कार गाणी ऑनलाइन ऐकली, पहिली. गेल्या वर्षी आलेल्या रॉक-ऑनने पण अशीच झिंग आणली होती. गेले ६ महिने सतत तीच गाणी ऐकली, मोबाईल रिंग टोन, अलार्म टोन, SMS टोन सगळ रॉक-ऑन मय होत. अर्थात जुनी गाणी ऐकायला तर मी केव्हाही तयार असायचो, असतो. आणि त्यातल्या त्यात किशोर/आर डी/ देव आनंद असलेलं किंवा आपल्या हृदयनाथ मंगेशकरांचं कुठलंही गाणं म्हणजे तर स्वर्गसुखच. ट्रीप/ट्रेक मध्ये, कोणाच्या वाढदिवसाला, मित्रांबरोबर/cousins बरोबर रात्री जागवताना किंवा अगदी सहज गुणगुणताना सुद्धा या गाण्यांपैकीचं कुठलं तरी गाण म्हंटल जायचं. अगदी काल परवा पर्यंत. पण अचानक काहीतरी बदललंय असं माझ्या लक्षात आलं. परवा ऑफिस मधून घरी येत असताना सहज एक गाणं गुणगुणत होतो आणि मला एकदम माझंच आश्चर्य वाटून गेल कारण ते माझ्या नेहमीच्या फेवरेट लिस्ट मधलं नव्हतं.... आणि अचानक मला क्लिक झालं कि सध्या मी हे किंवा असंच एखादं गाणं गुणगुणत असतो. . त्यांचे विडीयो खाली टाकतोय. अर्थात कुठल्याच विडीयो मधलं आनिमेशन उच्च कोटीचं नाही (बायको ३-डी आनीमेटर असल्याने मला पण थोड थोड कळायला लागलाय आनिमेशन मधलं. म्हणूनच जीभ उचलून टाळयाला लावायचं धाडस करतोय. ) किंवा गाणीही काही ग्रेट अशी नाहीत. पण बाळकोबांना आवडतात.

सांगू काय सांगू काय



एका माकडाने काढलंय दुकान



एक मुलगा गेला तळ्याच्या काठी



ससा तो ससा कि कापूस जसा



सांग सांग भोलानाथ



Old MacDonald had a farm


त्याच काय आहे कि रात्री आमचा डॉन लवकर झोपतच नाही. मग त्याला कडेवर घेऊन फिरवावं लागत. तरीही नाही झोपला तर मग हि गाणी त्याला लावून द्यावी लागतात. मग स्वारी एकदम खुश होते. आणि हळू हळू छातीला बिलगून झोपायला लागते. मध्ये अनुजाने कुठेतरी वाचलं की रात्री मुलं लवकर झोपत नसतील, किरकिर करत असतील तर त्यांना काही क्लासिकल, instrumental ऐकवावं. म्हणून काल हे पण ट्राय करून झालं.

पं. हरिप्रसाद चौरसिया आणि झाकीर हुसेन जुगलबंदी


पण हळू हळू आमच्या हे लक्षात यायला लागलय की साहेब सगळ ऐकतात, बघतात पण त्यांना हव तेव्हाच (म्हणजे २ च्या आसपासच) झोपतात.

थोडक्यात सध्या रेहमान, रॉक ऑन, RD, किशोर या सगळ्यांची आमच्या बाळासाहेबांनी विकेट काढलीये आणि आमचं संगीतप्रेम आपोआपच बदलत चाललय. (पुढची पोस्ट मी बोबड्या भाषेत नाही टाकली म्हणजे मिळवलं :) )

13 comments:

  1. सेम पिंच......सध्या आमच्या गाडीतही बडबडगीते असतात बरेचदा.....बाकी मुलं सगळ्यांचं बारसं अटॆंड केल्यासारखे निर्विकारपणे सगळे गायक संगीतकार वगैरे पचवतात आणि झोपायचे तेव्हाच झोपतात हे मात्र खरे!!!!!

    ReplyDelete
  2. हा हा हा..त्याला चीची ची गोष्ट सांगितली का??? नाहीतर आणखी एक उपाय म्हणजे "आरत्या" एकाच लयीत म्हणणे..संस्कार तर संस्कार आणि .....:)

    ReplyDelete
  3. तन्वी, हो ना खरंच... ११ ते २ पर्यंत आमच्या पापण्या वेटलिफ्टिंग करत असतात आणि बाळराजांच्या डोळ्यावर झोपेचा मागमूसही नसतो. पण गाणी अगदी आवडीने ऐकतो. :)

    ReplyDelete
  4. अपर्णा, नाही अजून नाही सांगितली. आजच कळली idea तुमचा ब्लॉग वाचल्यावर. आज पासून सुरु करतो :) .. आरत्या नाही पण कडेवर घेऊन फिरताना सगळे श्लोक होतात आमचे म्हणून :)

    ReplyDelete
  5. काल सकाळपासुन इथे एक ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करतोय. हे पोस्ट आत्ताच वाचलं. व्हिडीओज, मस्त आहेत ( आता मला काय समजतं म्हणा त्या ऍनिमेशन मधलं? )

    एक कन्फेशन !
    पहिली मुलगी झाली ( १८ वर्षापुर्वी) तेंव्हा तिला कडेवर घेउन फिरायचो-- रात्रीचा दिवस करुन..रात्र रात्र कडेवर घेउन रामरक्षा , भिमरुपी म्हणत रहायचॊ. रामरक्षेचा अंगारा लावायची सौ. अतिशय सुंदर अर्थ आहे रामरक्षेचा. माझ्या फोरशेअरड मधे आहे एम पी ३ फाइल्स.. रामरक्षा आणि अथर्व शिर्शाच्या.. डाउन लोड करता येतिल हव्या असतिल तर. पण रामरक्षेचा अर्थ जरुर वाचा एकदा, इतका सुंदर अर्थ असलेले श्लोक आहेत ते, पण आपण नुसतं पाठ करुन पोपटासारखं म्हणतो...

    असो.. पण दुसऱीच्या वेळेस.. बायकोला सांगुन सरळ हॉल मधे झोपायला जायचो.. अर्थात ही काही अभिमानाने सांगायची गोष्ट नाही, पण रात्रभर जागल्यावर दुसऱ्या दिवशी ऑफिसमधे दिवसा झोप यायची, काम करणं होतं नव्हतं.. . अर्थात, माझे आई वडिल पण होते सोबत, त्यामुळे सांभाळायला बरेच लोकं होते घरात..

    पण पहिल्या वेळेसचा अनुभव अविस्मरणीय असतो.. काय करु अन काय नको.. असं होतं! मी स्वतः कित्येक रात्री जागुन काढल्या आहेत. मी एकटाच नाही, तर घरातले सगळेच जण जागे असायचे रात्री. एकदा तर तिला सॉक्स घटट झाले होते, ते लक्षात आलं नाही, म्हणुन रडत होती, आणि ही गोष्ट लक्षात येत नव्हती. शेवटी, जेंव्हा लालसर वळ दिसला त्या सॉक्स च्या लोकरीचा, तेंव्हा तो सॉक्स काढला, आणि बाईसाहेब एकदम शांत.. असो. थांबतो इथेच , नाहीतर कॉमेंटचीच पोस्ट व्हायची .. :)

    ReplyDelete
  6. http://www.4shared.com/file/65989042/25b855fe/GanapatiAtharvaShirsha.html

    http://www.4shared.com/file/65962680/bbf3e0c/RamaRakshaStotra.html

    या व्यतिरिक्त भिमरुपी पण आहे .. मारुती स्तोत्रं..

    ReplyDelete
  7. वा काका (तुमची मुलगी १८ वर्षांची आणि आमचे चिरंजीव जेमतेम ८ महिन्यांचे. म्हणजे मी तुम्हाला काका नक्की म्हणू शकतो.. आणि तुम्ही मला अहो जाहो नाही केलत तरी चालेल :) ) .. तुमचा पहिलाच कॉमेंट माझ्या ब्लॉगवर आणि तोही एवढा मोठा .. एकदम छान वाटल. धन्यवाद !! हो. आमच्या कडेवर फिरण्याच्या सेशन मध्ये शुभं करोति, गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, अथर्वर्शीर्ष आणि रामरक्षा हे सगळ असतच.(पण तुम्ही म्हणता तस पोपटपंची टाईप. :( तुम्ही दिलेल्या mp3 केल्यात डाउनलोड.. नीट ऐकतो त्या आता. thanks for that ) तसच इंग्रजी आणि मराठी महिने, वार, राशी, दिशा, अ आ इ ई, क ख ग घ, ABCD, 1 2 3 4 असं बरच काय काय असत :) .. आता अपर्णाची चीची ची गोष्ट पण add करायचीये :)
    comment आणि mp3 बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद ..!!

    ReplyDelete
  8. हेरंब
    काही हरकत नाही... :) मी तर त्यांची एक सिडी बनवुन ठेवलेली आहे. अजुनही काही एमपी३ आहेत पण अपल्पोड केलेल्या नाहीत.

    ReplyDelete
  9. हो.. मी पण आता एक सीडीच बनवतो. :) thanks.

    ReplyDelete
  10. उत्तम हो एकदम... मी सुद्धा एकदम भुतकाळात गेलो. लहान पणीची गाणी ऐकत-बघत... :) एका माकडाने काढलंय दुकान - हे माझे फेव. गाणे आहे... :D

    ReplyDelete
  11. माझा भूतकाळ वर्तमानकाळात डोकावालाय :) .. लेकाच्या या फेव गाण्यांच्या रुपाने. मला "ससा तो ससा" आणि "कोणास ठाऊक कसा" ही दोन गाणी जाम आवडायची आणि अजूनही आवडतात :)

    ReplyDelete
  12. हेरंब, अरे कसली मस्तच गाणी तू बनवली आहेस.ऐकतेय मी. शोमू लहान असताना रोज " ओये ओये.... तिरछी टोपी वाले... " या त्रिदेवच्या गाण्यावर झोपायचा... :)) आधी मी बरीच बडबडगीत-मग स्तोत्रे म्हणून दामटायची पण हा पठ्ठ्या दाद देतच नसे. जोवर हे ओये ओये लागत नाही तोवर आमचे रडे चालूच.

    ReplyDelete
  13. :-) .. हो ही आणि अजून थोडी गाणी आहेत लेकाच्या फेव्हरिट लिस्ट मध्ये. या गाण्यांची पारायणं चालू असतात दिवसभर आणि रात्री १० नंतर तर MUST.. कधी कधी एवढा कंटाळा येतो ना :-)

    त्यापेक्षा शोमुचा चॉईस सुपर्ब होता. हा हा..

    (बनवली म्हणजे निवडली या अर्थानेच म्हणताय ना तुम्ही?)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...