Thursday, November 24, 2011

जा..ळ.. !!!


काही काही शब्द बघता बघता एकमेकांचे असे काही प्राणसखे बनतात किंवा बेजावदार माध्यमं आणि अक्कलशून्य नेतेमंडळी त्यांना इतक्या कुशलतेने एकमेकांत गुंफतात की आपल्याला पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दावाचून विचारही करवत नाही. वरच्या वाक्यातला 'बेजावदार माध्यमं/मिडिया' किंवा 'अक्कलशून्य नेतेमंडळी' हे शब्द ही त्यांचीच उदाहरणं होऊ शकतात म्हणा. पण अर्थात योग्य उदाहरणं. असो.... तर चितळ्यांची बाकरवडी, अमूल बटर किंवा मग नेस्लेची कॅडबरी, कॅननची झेरॉक्स वगैरे वगैरे वगैरे ही काही उदाहरणं. तर या दोन जमातींच्या मते अक्कलशून्य नेतेमंडळींना (यापुढे हे दोन शब्द एकत्रित येतील हे अध्याहृत आहे. अनलेस स्पेसिफाईड अदरवाईज !) जनतेद्वारे दिली जाणारी ट्रीटमेंट, त्यांच्याबद्दल दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया या त्यांच्याविरुद्ध जनतेच्या मनात खदखदत असलेला क्षोभ, असंतोष, कमालीचा संताप, तीव्रतम द्वेष याचा एकत्रित परिपाक असूच शकत नाही. असतो तो फक्त 'भ्याड हल्ला'

भ्याड??????? हल्ला???????

जनहितार्थ (वाचा मिडिया आणि नेतेमंडळी हितार्थ) काही शब्दार्थ-

भ्याड : पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा/री

हल्ला : आक्रमण, जोरदार धडक किंवा शुद्ध बोलीभाषेत हमला/अटॅक किंवा मग धक्काबुक्की करून जोरदार मारझोड

मला शाळेत शिकवलेल्या मराठीनुसार आणि माझ्या वकुबानुसार मी अर्थ दिले आहेत आणि ते बहुधा चुकीचे नसावेत असा माझा कयास आहे !



आता हे शब्द आपण हरविंदर सिंगने शरदरावांच्या श्रीमुखात भडकावून दिल्याच्या घटनेशी जोडून पाहू. तर हरविंदर सिंग पळपुटा, घाबरट, डरपोक, भित्रा, तोंड लपवून फिरणारा आहे का? निश्चितच नाही. तो भित्रा इसम असता तर सुरक्षारक्षकांच्या गराड्यात फिरणाऱ्या शरच्चन्द्रांच्या चंद्र्मुखात (आणि दुखरामाच्याही.. नॉट टू फरगेट) एक सणसणीत चपराक भडकावण्यासारखं कृत्य त्याने केलंच नसतं. शिव्या देणारी पत्रं पाठवली असती, अनामिक इ-मेल आयडीवरून इमेल केले असते, पवारांच्या घरावर रात्रीच्या अंधारात गुपचूप दगडफेक करून पळ काढला असता. त्याने असं काही केलं का? कृती करून तो तोंड लपवून बसला का किंवा अंधारात दडला का? मुळीच नाही. उलट त्याने त्याच्या कृत्याची कारणमिमांसाही दिली. "चोर है सब साले चोर है. सब मालूम है इन्हे (शरदरावांच्या "मुझे कुछ मालूम नही"" या उत्तरला उद्देशून)" असंही सांगितलं. असो. ही व्यक्ती भ्याड नाही हे मान्य करायला एवढे पुरावे पुरेसे असावेत माझ्या मते.

आता हल्ला... हल्ला????? अरे हल्ला एक देश दुसऱ्या देशावर करतो, एक टोळी दुसऱ्या टोळीवर करते, एक समूह दुसऱ्या समूहावर करतो, किंवा मग एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जोरदार धक्काबुक्की करून तीव्र जखमी करण्याच्या उद्देशाने करते तो हल्ला असतो.

तर या ठिकाणी असं झालं का? माझ्या मते नाही. उसळत्या आणि सतत चढत्या महागाईने व्याकुळ आणि संत्रस्त झालेल्या जनतेच्या असंतोषाला हरविंदररूपी एका सामान्य माणसाने करून दिलेली वाट, सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरुद्ध व्यक्त केलेली प्रतिक्रिया.. कडकडीत प्रतिक्रिया म्हणू हवं तर. हल्ला नक्कीच नाही. एक विसरू नका की हरविंदरकडे एक छोटा चाकूही होता आणि त्याच चाकूने त्याने स्वतःच्या मनगटावर वारही करून घेतले. हल्लाच करायचा असता तर त्या चाकूएवढं दुसरं कुठलंही योग्य हत्यार त्याच्याकडे त्यावेळी नसावं. हल्लाच करायचा असता तर चाकूने केला असता, जखमी केलं असतं. पण त्याने तसं केलं नाही. कारण हल्ला करणे हा हेतू नव्हताच तर फक्त आणि फक्त असंतोषाला वाट करून देणं एवढाच हेतू होता; रोजच्यारोज हातातोंडाची मिळवणी करताना जनतेवर कोसळणाऱ्या महागाईरूपी संकटाचा आणि बसणाऱ्या झळांचा आणि त्याला कारणीभूत असलेल्या सरकारचा एक प्रतिकात्मक निषेध !!

थोडक्यात हरविंदरने जे केलं तो भ्याड हल्ला नव्हता. भ्याड हल्ला हा असा नसतो. कधीच नसतो.. नसतोच. हा होता तो जा..ळ.. कडकडीत, सणसणीत जाळ!!

मुंबईवर २६/११ ला कसाब आणि त्याच्या भावडांनी केला तो भ्याड हल्ला होता किंवा मग कारगीलवर पाकिस्तानेने केला तो. हरविंदरने जे केलं तो भ्याड हल्ला नक्कीच नाही. तत्कारणात निदान यापुढे तरी प्रसारमाध्यमं आणि नेतेलोक्स यांनी 'भ्याड' आणि 'हल्ला' हे दोन हल्ले एकत्रितपणे वापरण्याची खाज, अर्ज (इंग्रजीतला) रोखून ठेवावी !!

आणि हो.. जाता जाता अजून एक.. हरविंदरची कृती चूक की बरोबर किंवा मिडियाच्या भाषेत "हल्ला झाला" हे चूक की बरोबर असल्या थोतांड विषयात मला पडायचंच नाही. कारण झालं ते अगदी योग्यच झालं. आणि अशा हल्ल्याला पाठींबा देणं हे विकृत, पिसाट आणि भ्याडपणाचं लक्षण असेल तर मी कमालीचा विकृत आणि पिसाट आहे आणि हे असे तथाकथित भ्याड हल्ले वारंवार होवोत आणि या हल्ल्याचं आणि भविष्यात कुठल्याही राजकीय व्यक्तीवर होणाऱ्या प्रत्येक हल्ल्याचं मी जाणीवपूर्वक आणि साभिमान समर्थन करतो !!

ता. क. : नेते लोकांना होणारी मारहाण, चपला/बुट फेकणे या संबंधी बोलताना हे असलं करण्यापेक्षा "निवडणुकांच्या वेळी  मतदान करा आणि योग्य व्यक्तीला निवडून द्या" असं सांगणं हे माझ्यामते फारच हास्यास्पद आहे. अशा गोष्टींवर निवडणूका आणि मतदान हे अत्यंत फसवे पर्याय आहेत, अतिशय ढोंगी उपाय आहेत. कारण आपण निवडून दिलेली व्यक्ती सत्तेत आल्याआल्याच भ्रष्टाचार किंवा जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू लागली तरीही ती व्यक्ती पुढची पाच वर्षं आपल्या गळ्यात लोढणं म्हणून अडकून राहतेच आणि करायचा तो भ्रष्टाचार करतेच किंवा जनतेच्या  प्रश्नांकडे दुर्लक्ष करतेच. माकडउड्या मारता मारता लोकसभेत जाऊन पोचलेल्या गोंद्याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. त्यामुळे यावर उपाय म्हणून तेवढी ती मतदानाची उदाहरणं वगैरे प्लीज देऊ नका.

Thursday, November 17, 2011

शब्द : ए ते यु

तम्मत्तद्दो ओ ओ ओ
(कै)त्ता चम्माना आदा नतते दिकादे
तम्मत्तद्दो ओ ओ ओ

अलम हिंदी संगीताच्या दुनियेत हे एकमेव गाणं शिल्लक उरलं असावं किंवा मग सरकारने यच्चयावत सगळ्या गाण्यांवर बंदीची मोहोर उमटवली असून फक्त, फक्त आणि फक्त (ट्रुथ, द होल ट्रुथ अँड नथिंग बट द ट्रुथ किंवा आपल्या हिंदी चित्रपटांच्या कोर्टातल्या सीनमधल्या "सिर्फ सच कहुँगा और सच के सिवा कुछ नही कहुँगा" च्या स्टायलीत) हे एकच गाणं ऐकण्याची (वाचा पुन्हा पुन्हा ऐकण्याची) सक्ती केली असावी अशा थाटात हे गाणं आमच्याकडे वाजतं, वाजत असतं.. म्हणजे इत्त....क्या वेळा वाजत असतं.. अर्थात वर दिल्याप्रमाणे नाही तर नॉर्मल अ-बोबड्या शब्दांत.. त्याचं बोबडेकरण हे अगदी शुध्द होममेड आहे. अर्थात अ‍ॅकॉनने गायलेलं मूळ गाणंही खरं तर बोबड्या शब्दांतच आहे. (आणि कदाचित त्यामुळेच लेकाला ते जवळचं वाटलं असावं... बडबडगीतासारखं).. त्यामुळे ते अजून बोबड्या शब्दांत गायलं तर त्यात काहीच चूक नाही. हवं तर त्याला 'होममेड रिमिक्स व्हर्शन' म्हणू शकतो. अर्थात ते अ‍ॅक्क्याने (कृ. अक्षयकुमारप्रेमींनी गैरसमज करून घेऊ नये.) गायलेलं असल्याने त्याला सगळं माफ आहे. परंतु समजा हेच जर मी (इथे 'मी' हे फक्त उदाहरणादाखल वापरण्यात आलेले सर्वनाम आहे याची समस्त जिज्ञासूंनी कृपया नोंद घ्यावी.) शाळेत हिंदीच्या पेपरात हे असं 'अखियाँ' च्या ऐवजी 'अक्किया' (कृ. अक्षयकुमारप्रेमींनी पुन्हा एकवार गैरसमज करून घेऊ नये.) किंवा मग 'कैसा'च्या ऐवजी 'केस्सा', 'नखरे दिखा' च्या ऐवजी 'नक्रे दिका' आणि 'छम्मकछल्लो' च्या ऐवजी 'चम्मकचल्लो' असं लिहिलं असतं तर फकस्त हिंदीच्याच नाही तर समस्त शिक्षकगणाने मला "धिन मे तारे दिका"वले असते. अर्थात कुठल्या शाळेच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात 'छम्मकछल्लो' हा शब्द ऑफिशियली वापरला जातो हा मुद्दा तूर्तास गौण आहे.

तर हे असं 'चम्मकचल्लो' वारंवार ऐकून मला माझ्या उमेदीची वर्षं आठवली. 'चित्रपट प्रेक्षक' या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं.. गोंधळ झाला असल्यास दोन्ही वाक्यं पुन्हा एकदा वाचा.. झालेला गोंधळ शमला असल्यास पुढचं वाक्य वाचा. शमला नसेलच याची खात्री असल्याने तेच वाक्य पुन्हा एकवार व्यवस्थित लिहितो.

"तर हे असं 'चम्मकचल्लो' वारंवार ऐकून मला माझ्या 'चित्रपट प्रेक्षक' या नात्याने काढलेली उमेदीची वर्षं आठवली." हुश्श..

तर तो काळ म्हणजे असा की ज्यावेळी रा. रा. रणजीत (रा. रा. रणजीत हे क... क... किरण प्रमाणे वाचू नये. अन्यथा रा१ बा१ वेळा बघण्याची शिक्षा ठोठावण्यात येईल.), शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद, किरण कुमार वगैरे लोक श्रीदेवी, जयाप्रदा (लांब केस असल्याने लहानपणीची माझी आवडती हिरवीण) झालंच तर पूनम धिल्लो, रीना रॉय वगैरे बायांची त्या 'गाव के नदी पे' पाणी भरायला किंवा मग कपडे धुवायला जात असताना वाट अडवायचे आणि तेव्हा त्या छेडछाड प्रकरणाचा श्रीगणेशा व्हायचा तो याच वाक्याने. "हाय रे म्मेरी छम्मकछल्लो." त्यानंतर मग माफक चर्चेनंतर आणि त्या बाईच्या त्या चित्रपटातल्या स्थानानुसार (म्हणजे हिरोची बहिण/प्रेयसी/बायको) 'हिरव्या' ची एन्ट्री किंवा छम्मकछल्लोचा तो क्लासिक डायलॉग उच्चारणार्‍या कुत्त्या/कमिन्याच्या गालावर एक चपराक आणि त्यानंतर बाईचं अपहरण वगैरे गोष्टी घडायच्या. पण असो. तो आपला आजचा मुद्दा नव्हे.

तर 'छम्मकछल्लो' या शब्दाची ओळख मला झाली ती अशी रणजीत, शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद, किरण कुमार यांच्या तोंडूनच. अमिताभ, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदा, मिथुनदा, संजू बाबा प्रभृतींनी कधीही आपल्या साता जन्माच्या प्रेयसीला छम्मकछल्लो सोडा साधं डार्लिंग/डिअर म्हटल्याचंही स्मरत नाही. गेला बाजार जानू, जान, सनम, दिलबर, जानेमन वगैरेच आणि तेही कटाक्षाने फक्त गाण्यांमध्येच.

तत्कारणात् शाहरुख खानाला त्याच्या बायडीला त्या अलिखित नियमानुसार उपरोल्लेखित साच्यातली हाक न मारता एखाद्या खलनायकाने रस्त्यावरच्या बाईला छेडताना बोलवावं तशा पद्धतीने बोलावताना आणि त्या हाकेला ओ देत त्या बयेने नाचत नाचत पुढे येताना पाहून माझ्यातल्या ऑर्थोडॉक्स प्रेक्षकाला अंमळ कसंसंच झालं आणि सुमारे १२-१५ वर्षांपूर्वीची करीना करिष्मा आठवली. लग्नानंतर करिष्माचं वेगाने गायब होणं आणि त्याच्या जवळपास दुप्पट वेगाने करीनाने पडदा काबीज करणं यामुळे झालंय काय की "त म्हटल्यावर ताकभात" प्रमाणे "क म्हटल्यावर/लिहिल्यावर" आधी करीनाच आठवते (इथे सैफभक्तांच्या किंवा एकताभक्तिणींच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास आम्हास त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. एखाद्याला सैफ किंवा/आणि एकता आवडतो/ते हाच खरं तर पुरेसा गुन्हा आहे !!). करिष्मा डोक्यातही येत नाही. असो..

तर या 'चम्मकचल्लो' (शब्दा) च्या सढळ वापरामुळे मला पंधरा एक वर्षांपूर्वी 'खुद्दार' नावाच्या गोंद्याच्या तद्दन टाकाऊ चित्रपटात करिश्माच्या तोंडी असलेलं "सेक्सी सेक्सी सेक्सी मुझे लोग बोले, हाय सेक्सी हॅलो सेक्सी क्यों बोले" वालं गाणं आठवलं. ते गाणं पहिल्यांदा टीव्हीवरच्या 'सुपरहिट मुकाबला' (चित्रहार/छायागीतचं नव्वदीच्या दशकातलं अपग्रेडेड व्हर्शन) नामक कार्यक्रमात ऐकलं आणि धरणीमाय पोटात घेईल तर बरं असे काहीसे भाव अस्मादिकांच्या आणि आमच्या 'चित्रपट-नावडणाऱ्या' पालकांच्या चेहर्‍यावर जवळपास एकाच वेळी दाटले. लगबगीने उठून च्यानेल बदलले गेले हेसांनल. त्यावेळी आमच्या घरात निर्माण झालेलं गोंधळाचं वातावरण जवळपास मुंबईभर किंवा कदाचित देशभरही ("वचने किं दारिद्रता" च्यायला) पसरलं असावं. कारण दोनच दिवसांनी चित्रहाराच्या कार्यक्रमात ते गाणं चक्क असं वाजलं होतं.

"__ __ __ मुझे लोग बोले
हाय __ हॅलो __ क्यों बोले"

त्यानंतर काही दिवसांतच 'सेक्सी'चं सोवळेकरण करून गाळलेल्या जागा भरत तिथे चतुराईने 'बेबी' शब्दप्रयोगाचा चपखल वापर करून मोठ्या खुबीने तेच गाणं पुन्हा "बेबी बेबी बेबी मुझे लोग बोले" करत राजरोसपणे वाजायला लागलं आणि तमाम 'सेक्सी' प्रकरणावर पडदा पडला. त्याच्यानंतर काही दिवसांनी/महिन्यांनी घडलेली गोष्ट असेल. 'दुलारा' नामक असल्याच लक्षातही ठेवण्याची लायकी नसलेल्या चित्रपटात "मेरी पेँट भी सेक्सी, मेरा शर्ट भी सेक्सी" असं करत करत शेवटी रुमालावर घसरत म्हणजे "रुमालभी सेक्सी है" असं जाहीर करत अचानक गोंद्या उड्या मारताना दिसला. त्याच्या त्या तथाकथित सेक्सी कपड्यांचं ('गोविंदाचे कपडे' आणि 'सेक्सी' हे दोन शब्द एकाच वाक्यात येणे यासारखं विरोधाभासाचं दुसरं उदाहरण नसेल !!) उड्या मारत केलेलं मार्केटिंग त्यानंतर काही दिवस चालू होतं. परंतु तेव्हा त्या गाण्यावर कोणी विशेष आक्षेप घेतल्याचं स्मरत नाही. कदाचित मुलीने स्वतःला सेक्सी म्हण(व)णं आणि मुलाने आपले कपडे सेक्सी आहेत हे तारस्वरात जाहीर करणं यातला दुसरा पर्याय सरकार/सेन्सॉरला कमी निर्लज्ज वाटला असावा.

अर्थात "काय सेक्सी झालीये पावभाजी" किंवा "कसली सेक्सी बाईक आहे यार तुझी" च्या काळात वर सांगितलेलं हे सगळं सेक्सीपुराण म्हणजे निव्वळ चर्वितचर्वण वाटण्याचाच संभव अधिक आहे.. आणि तसंही हे चर्वितचर्वणच आहे. कुठे काही मुद्दा तरी आहे का? उगाच या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारणं तर चाललंय. असो.

'छम्मकछल्लो' च्या पॉझिटीव्ह (चित्रपटात स्वतःच्याच बायकोला उद्देशून असल्याने पॉझिटीव्ह) वापरामुळे आणि वय वर्षं अडीच ते वय वर्षं कितीही या सर्वांनी अगदी आवडीने डोक्यावर घेतल्याने असाच अडगळीत पडलेला किंवा निगेटीव्ह (वरच्या कंसाच्या विरुद्ध) अर्थाने वापरल्या जाणार्‍या 'आयटम' या शब्दास सोन्याचे दिवस येण्याची शक्यता आम्ही आत्ताच वर्तवून ठेवत आहोत. आणि करीनाने 'छम्मकछल्लो' केल्याने कतरीना 'आयटम' शब्द असलेलं आयटम सॉंग करणार हे जवळपास नक्की आहे !! कदाचित 'दुःशासन : The Dusha's-Son' किंवा मग "कंस : The Con's Story" असल्या एखाद्या नावाच्या चित्रपटात विवेक मुश्रान किंवा शरद कपूर किंवा मग गेला बाजार चंद्रचूड सिंग असल्या एखाद्या दुसरं कुठलंही काम नसणार्‍या महामख्ख चेहऱ्याच्या निरुपद्रवी इसमाला 'Dusha's-Son' किंवा 'The Con' म्हणून आपल्यासमोर उभं करून सल्लू किंवा हृतिक किंवा आमीर 'किसन : The Key-Son' म्हणून आपल्यापुढे उभे ठाकतील. थोडक्यात 'छम्मकछल्लो' च्या अचानक वाट्याला आलेल्या अमाप लोकप्रियतेमुळे त्याच्या धाकट्या भावंडाला (की भगिनीला?) उर्फ 'आयटम' ला मरण नाही हे निश्चित आणि कदाचित आयटमच्या मागोमाग 'माल' आणि तत्सम शब्दही या भल्यामोठ्या यादीत असतील !!!

अनेक वर्षांपूर्वी निळूभौंच्या मराठी सिनेमात एका स्त्रीवर झालेल्या अतिप्रसंगाबद्दल बोलताना फक्त 'भानगड' असा काहीतरी शब्द वापरून त्या प्रसंगाचं वर्णन केलं गेलं होतं. त्यानंतरही कित्येक वर्षं जबरदस्ती, बळजबरी असे तुलनेने अहिंसक (वर्णनाच्या दृष्टीने अहिंसक) शब्द वापरण्याचा अलिखित नियम होता. एखादा निवडक 'ए' प्रमाणपत्र असलेला हिंदी चित्रपट आला तर त्यात चुकून 'बलात्कार' हा शब्द ओझरता निघून जायचा. जेमतेम वीस वर्षात चित्रपटांच्या भाषेची, दिग्दर्शकांच्या अकलेची आणि प्रेक्षकांच्या संवेदनशीलतेची एवढी 'प्रगती' झाली की एके काळी दबून हलक्या आवाजात उच्चारला जाणारा शब्द 'चमत्कार' ला प्रतिशब्द म्हणून वापरला गेला आणि तो तशा पद्धतीने वापरला गेल्याने जणु त्याची तीव्रता कमी होत असावी अशा प्रकारे त्या शब्दावर विनोद करून पोट धरून हसण्यापर्यंत या प्रगतीच्या कक्षा रुंदावल्या !!!

खरं तर हेलन, बिंदु, अरुणा इराणी वगैरे बायका म्हणजे आद्य आयटम गर्ल्स. एखाद्या क्लबात कॅबरे वगैरे करणं हे त्यांचं चित्रपटातलं प्रमुख काम. कारण आशा पारेख, शर्मिला टागोर, हेमामालिनी, साधना, बबिता, नूतन वगैरे बायांनी असलं काही करणं हे कमीपणाचं किंवा अशोभनीय समजलं जायचं. पण आता करीना, प्रियांका, कतरिना वगैरेंसारख्या मेन हिरविणीच हे काम आनंदाने आणि प्रसंगी मुद्दाम मागून घेऊन करायला लागल्याने राखी सावंत, इत्यादींसारख्या फुलटाईम आयटम-गर्ल्सवर भुकेकंगाल होण्याची वेळ आली आणि त्यांना एकतर बाष्कळ बडबड करून, बेगडी स्वयंवरं रचून आणि टुक्कार न्यायालयांचे तमाशे मांडावे लागले किंवा मग भुक्कड टीव्ही मालिकांमध्ये भडक काजळं लावून भोळ्याभाबड्या, सहनशील नायिकेच्या नवऱ्यांना पटवण्याची कामं इमानेतबारे करावी लागली.

असो.. खरंतर हाही विषय नव्हताच आजचा. तसं म्हटलं तर कुठलाच नव्हता किंवा कोणाबद्दल कसली काही तक्रारही नाही. कारण सिनेमा हे जात्याच एवढं बदलतं माध्यम असल्याने हे कधीनाकधी तरी होणार होतंच.. पण तरीही 'चम्मकचल्लो' मुळे चित्रपटांमधल्या बदलत्या भाषेचा प्रवास सहज जाणवून गेला आणि तो थोडाफार इथे मांडला. अर्थात ही पोस्ट म्हणजे काही तो प्रवास मांडण्याचा वगैरेही काही प्रयत्न नव्हता कारण तो समग्र प्रवास मांडण्यासाठी खूपच विस्तृतपणे लिहावं लागेल. हा लेख म्हणजे फार तर फार काही निवडक किंवा एके काळी वाळीत असलेल्या किंवा सभ्य नायकाने चारचौघात वापरण्यावर बंदी असलेल्या शब्दांचा 'ए' पासून 'यु' पर्यंतचा प्रवास असं म्हणू शकतो जास्तीत जास्त आणि मुख्य म्हणजे 'दिल्लीच्या गुरगुरणाऱ्या पोटा' कडे पाहता/ऐकता ही म्हणजे त्या प्रवासाची फक्त, फक्त आणि फक्त सुरुवात आहे असंच केवळ आपण म्हणू शकतो !!

Wednesday, November 9, 2011

सिनेमाच्या ऑटोमॅटिकली प्रेमात पाडणारं 'सिनेमॅटिक'

- अतिशय प्रसिद्ध आणि सगळ्यात गाजलेल्या ' द एक्झॉर्सिस्ट' या भयपटाचा निर्माता आणि त्याच नावाच्या कादंबरीचा लेखक विल्यम पीटर ब्लॅटी हा त्यापूर्वी विनोदी पटकथाकार म्हणून प्रसिद्ध होता आणि 'द एक्झॉर्सिस्ट' लिहिण्यापूर्वी आर्थिकदृष्ट्या अतिशय वाईट परिस्थितीत असलेल्या ब्लॅटीने त्या काळात विनोदी लेखन/चित्रपटांची लाट ओसरल्याने निव्वळ प्रयत्न म्हणून आणि उपजीविकेचं साधन म्हणून एका १४ वर्षांच्या मुलाच्या अंगातलं भूत उतरवण्याच्या अमेरिकेत प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर आधारित ' द एक्झॉर्सिस्ट' नावाची कादंबरी लिहिली.

- मेट्रिक्स चित्रत्रयी बनवताना वाचोस्कींनी त्यांच्यारोबरच 'अ‍ॅनिमेट्रिक्स' ही नऊ अ‍ॅनिमेटेड लघुपटांची मालिका आणि 'एन्टर द मेट्रिक्स' हा संगणकीय खेळ तयार केला. मेट्रिक्स चित्रत्रयीबरोबरच ही लघुपटांची मालिका आणि संगणकीय खेळ बघितल्या/खेळल्याशिवाय मेट्रिक्सचा आनंद पूर्णपणे उपभोगता येत नाही.

- ९/११ ची ऐतिहासिक दुर्घटना घडल्यानंतर पुढची कमीतकमी ४ ते ५ वर्षं अमेरिकन चित्रसृष्टीने त्या विषयाकडे (काही मोजकेच अपवाद वगळता) जाणूनबुजून संपूर्णतः दुर्लक्ष केलं होतं. प्रेक्षक त्या घटनेला पडद्यावर कसे स्वीकारतील हे त्यामागचं प्रमुख कारण होतं.

एक्झॉर्सिस्ट, मेट्रिक्स किंवा ९/११ शी संबंधित चित्रपट माहिती नसलेले/न बघितलेले (इंग्रजी चित्रपटांचे) रसिक हे नक्कीच अगदी फार फार विरळ असतील परंतु वर दिलेले हे मुद्दे किंवा या प्रकारची माहिती ठाऊक नाही असे लोक मात्र नक्कीच तितकेसे विरळ नसावेत. किंबहुना विपुल असतील.

किंवा मग पायरसीच्या विरोधात बोलण्याची (काही प्रमाणात रास्त) पद्धत असतानाही "निव्वळ पायरसीमुळे का होईना दुर्मिळ किंवा आपल्या इथे प्रदर्शित न होणारे चित्रपट सहजगत्या लोकांपर्यंत पोचवणार्‍या पायरेटेड डीव्हीडी मार्केटच्या प्रेक्षक घडवण्याच्या प्रक्रियेतल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल पायरसीचे आभार" अशा प्रकारचा खळबळजनक आणि तितकाच क्रांतिकारक विचार एका सिनेपरीक्षकाकडून मांडला जाऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसेल का?

विशेष आवड म्हणून, लक्षपूर्वक चित्रपट बघणारे , चित्रपट या प्रकारावर प्रेम करणारे असा एक गट आणि जड विषय न आवडणारे आणि मेंदूला उगाच ताण न देता हलकेफुलके, डोकं बाजूला ठेवून बघायचे चित्रपट आवडणारे असा दुसरा गट असे प्रेक्षकांचे दोन ढोबळ प्रकार पाडता येऊ शकतात. पण तुम्ही कुठल्याही प्रकारचे प्रेक्षक असलात तरीही चित्रपट बघण्यापूर्वी तो चित्रपट कुठल्या घटनेवर बेतला आहे (असल्यास) , तत्कालीन सामाजिक, जागतिक परिस्थिती, लेखक/दिग्दर्शकाची पार्श्वभूमी, विचारधारा, वैशिष्ठ्य इत्यादी तुरळक गोष्टी माहित असतील तर मग कुठलाही चित्रपट अगदी तद्दन विनोदी किंवा गल्लाभरू हाणामारीचा चित्रपट बघतानाही जरा वेगळीच मजा येते किंवा तो चित्रपट आपल्यापर्यंत पोचल्याची एक हलकीशी का होईना जाणीव निर्माण होऊ शकते. अशी चित्रपटांची अंतर्बाह्य ओळख करून देऊन, चित्रपट कसा बघायचा, त्यात नक्की काय बघायचं याची माहिती करून देऊन चित्रपट बघायला शिकवणारे आणि चित्रपटांच्या प्रेमात पडायला लावणारे अशा प्रकारच्या सिनेसमीक्षकांमध्ये गणेश मतकरी यांचं नाव निर्विवादपणे बरंच वर आहे. सुरुवातीला दिलेले तीन मुद्दे आणि ते क्रांतिकारक विधान (आणि इतरही असंख्य महत्वपूर्ण गोष्टी) त्यांच्या नुकत्याच शिकागो येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात प्रकाशित झालेल्या 'सिनेमॅटिक' या पुस्तकाद्वारे आपल्या भेटीस येतात.

'सिनेमॅटिक' म्हणजे मतकरींनी दिवाळी अंक किंवा तत्सम सिनेविषयक विशेषांकांमध्ये वेळोवेळी लिहिलेल्या माहितीपूर्ण लेखांचा संग्रह. त्यात रहस्यपट, भयपट, युद्धपट, सुपरहिरोपट, लघुपट, मराठी चित्रपट, साय-फाय यावर प्रत्येकी एक आणि समांतर सिनेमा व ९/११ यावर प्रत्येकी दोन लेख अशा विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या एकापेक्षा एक माहितीपूर्ण लेखांची भरगच्च मेजवानी आहे. या पुस्तकाला अरुण खोपकरांसारख्या दिग्गज जागतिक चित्रपट-अभ्यासकाची प्रस्तावना लाभली आहे.

मागे एकदा रॉजर एबर्ट या जगप्रसिद्ध चित्रपट-समीक्षकाविषयी लिहिताना मतकरींनी समीक्षकांचे ढोबळ मानाने तीन प्रकार सांगितले होते. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर

१. दैनिका, साप्ताहिकांत निव्वळ जागा भरून काढण्यासाठी लिहिणारे.. चित्रपटांचं परीक्षण करण्यापेक्षा गोष्ट तपशीलात सांगून जागा भरण्याकडे या मंडळींचा कल असतो. त्यांना प्रेक्षकांच्या चित्रपट विषयक ज्ञानात भर टाकण्याची गरज वाटत नाही, किंबहूना ते मुळात असावं असाही त्यांचा आग्रह नसतो.

२. चित्रपटांचे अभ्यासक असणारे आणि चालू चित्रपटांना बऱ्या वाईटाची लेबलं लावण्यापेक्षा एकूण चित्रपटांच्या इतिहासात अधिक रस असणारे. हे लोक बऱ्यापैकी दुर्मिळ असतात.

३. आणि तिसरे म्हणजे या दोन्ही प्रकारांचा सुवर्णमध्य साधणारे. या मंडळींचा स्वतःचा असा अभ्यास आहे. त्यांच्याकडून होणारा सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे चित्रपट रसिकांना होऊ शकणा-या अचूक मार्गदर्शनाचा. यांचं लिखाण क्लिष्ट नाही, पण काही विशिष्ट अभ्यासातून आलेलं आहे. ते शक्य तितक्या सोप्या भाषेत आपल्या वाचकांपर्यंत नेण्य़ाची त्यांची हातोटी आहे.

मला वाटतं मतकरींनी रॉजर एबर्टसाठी लिहिलेलं हे वर्णन त्यांच्या स्वतःसाठीही अगदी चपखलपणे लागू होतं. सिनेमॅटिकमधला प्रत्येक लेख हा याचा पुरावा आहे. प्रत्येक लेखात त्या त्या प्रकारच्या चित्रपटांच्या निर्मितीपासून तत्कालीन सामाजिक, राजकीय, जागतिक परिस्थितीवर प्रकाश टाकून कुठलाही चित्रपट हा तसाच का बनवला गेला, त्यामागची प्रेरणा काय होती, दिग्दर्शकाला नक्की काय दाखवायचं होतं या साऱ्या साऱ्या विषयीची विपुल माहिती अजिबात रटाळ किंवा किंचितही क्लिष्ट न होता ओघवत्या स्वरूपात आपल्यापुढे येते. या पुस्तकात उल्लेखलेले काही चित्रपट आपण कधी ऐकलेलेही नसतील पण तरीही त्याची निर्मिती प्रक्रिया, कार्यकारणभाव, उद्देश, त्यासाठी घेतली गेलेली मेहनत आणि त्या चित्रपटाचा समाजावर, लोकमनावर आणि अन्य चित्रपटांवर झालेला परिणाम इ. इ. तर आपण अक्षरशः जगतोच. पण खरी मजा तर पुढेच आहे. कित्येक माहित असलेल्या, लाडक्या असलेल्या आणि अनेकदा पाहिलेल्या चित्रपटांविषयी तो कसा बघायचा, त्या चित्रपटात नक्की काय बघायचं, प्रसंगी त्यात काही काही उणीव कशा आहेत हे दाखवून देऊन आपण इतक्या वेळा बघितलं तरी हा मुद्दा किंवा हा दृष्टीकोन किंवा अगदी हा कॅमेरा अँगल आपल्या अजिबातच कसा लक्षात आला नाही याप्रकारची माहिती वाचून आपण अचंबित होऊन जातो. ठाऊक असलेला चित्रपटही अधिक चांगल्या प्रकारे कसा बघायचा याचं रसाळ मार्गदर्शकच जणु..

अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यातली ओळ न् ओळ वाचताना हे सगळं प्रचंड अभ्यासातून आणि निरीक्षणातून आलेलं आहे हे सतत जाणवत राहतं. प्रत्येक लेख, प्रत्येक नवीन परिच्छेद आपल्या चित्रपटविषयक ज्ञानात भर घालत असतो. आणि पुस्तकाच्या अखेरीस दिलेली संदर्भग्रंथांची सूची पाहता त्याची सत्यताही पटते. जागतिक चित्रपटाच्या विविध अंगांवरच्या अनेक पुस्तकांच्या वाचनातून आणि अभ्यासातून प्रत्येक लेख जन्माला आला आहे हे सतत जाणवत राहतं.

प्रत्येक लेख हा निर्विवाद अप्रतिम आहेच तरीही माझे या पुस्तकातले विशेष आवडते लेख म्हणजे 'रम्य नसलेल्या युद्धकथा', 'गरीबांचा सिनेमा', 'समांतर - एका चित्रप्रकाराचा प्रवास', 'हॉलिवूड पोस्ट ९/११' आणि 'हॉलिवूडचा पडदा आणि ९/११' हे लेख. बाकीचे लेखही अत्यंत माहितीपूर्ण आणि अप्रतिम आहेतच परंतु हे लेख अधिक आवडण्याची विशेष कारणं आहेत. युद्धपटांवरच्या लेखात युद्धपटांच्या संक्रमणाचा जो प्रवास मांडला आहे त्याला खरंच तोड नाही. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळातल्या किंबहुना अगदी युद्धाच्या आणि त्यानंतरच्या काही वर्षांतल्या चित्रपटांत सैनिक, सैन्य, युद्ध इत्यादींना जे एक स्वप्नील रूप देऊन, हिरो बनवून, युद्धांना रम्यकथा म्हणून दाखवण्यापासून ते काही वर्षांतच युद्धांचे भीषण दुष्परिणाम जाणवायला लागल्यानंतर समाजाच्या आणि त्यामुळे चित्रकर्त्यांच्याही युद्धपटनिर्मितीच्या बदललेल्या जाणिवांवर आणि प्रतिमांवर हा लेख अगदी अचूक बोट ठेवतो. युद्धपटांचं संक्रमण अक्षरशः आपल्यासमोर घडताना दिसतं. तर समांतर सिनेमे खूप जास्त प्रमाणात बघितले नसल्यामुळे समांतर चित्रपटांचा इतिहास, प्रवास वेगवेगळया दिग्गजांनी केलेली हाताळणी, त्याची कारणमीमांसा इ सगळं वाचायला खूप आवडलं. 'गरीबांचा सिनेमा' मध्ये एका पूर्णपणे वेगळ्या ज्यॉनरमधल्या चित्रपटांविषयी लिहिताना 'बायसिकल थिव्ज', 'पथेरपांचाली', 'दो बिघा जमीन' पासून ते थेट 'पीहोटे', 'सलाम बॉम्बे' आणि अगदी आजच्या 'स्लमडॉग मिलिअनेअर पर्यंतच्या चित्रपटांचा तपशीलवार घेतला गेलेला मागोवा फारच रोचक वाटला. अर्थात ९/११ वरचे दोन लेख विशेष आवडण्याचं महत्वाचं कारण म्हणजे ९/११ बद्दल मला व्यक्तिशः असलेलं प्रचंड आकर्षण किंवा आवड. अर्थात आकर्षण किंवा आवड हे शब्द योग्य आहेत की नाहीत याची कल्पना नाही पण थोडक्यात हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्या विषयावरचा आणि तो विषय हॉलिवूडसारख्या सतत नवनवीन प्रकार लीलया हाताळणाऱ्या चित्रसृष्टीने कसा मांडला हे समजून घेण्याच्या दृष्टीने ९/११ वरचे लेख खूपच आवडले.

पुस्तकाचं मुखपृष्ठही खरंच अतिशय सुंदर आहे. दहा विषयांवरच्या दहा लेखांना दहा स्तंभांमध्ये मांडून दाखवल्याने पुस्तकातल्या विषयांची व्याप्ती मुखपृष्ठापासूनच ध्यानात येते. पण मुखपृष्ठापेक्षाही त्याच्या पुढचं पान हे माझं जास्त आवडतं आहे. त्याला कारणही तसंच आहे !!!




नुकताच गणेश मतकरींच्या भेटीचा योग आला आणि त्यावेळी चित्रपटांवरच्या भरपूर गप्पांच्या मेजवानीबरोबरच प्रत्यक्ष मतकरींकडूनच त्यांनी स्वाक्षरी केलेलं पुस्तक मिळवण्याची सुवर्णसंधी लाभली.

एवढं सगळं लिहिल्यावरही पुस्तक नक्की वाचा असं वेगळं सांगण्याची गरज नाहीच पण तरीही सांगतो प्रत्येक चित्रप्रेमीने अगदी आवर्जून वाचण्यासारखं असं हे पुस्तक आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला मनोगत व्यक्त करताना मतकरी म्हणतात की "मला वाटतं चित्रपट कसा पाहावा या प्रश्नाचं माझ्यापुरतं उत्तर म्हणून 'सिनेमॅटिक' कडे पाहता येईल." यातलं "माझ्यापुरतं" काढून टाकून "चित्रपट कसा पाहावा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'सिनेमॅटिक' आहे" असं मी म्हणेन. !!

प्रकाशक : मॅजेस्टिक प्रकाशन
ऑनलाईन वितरक : बुकगंगा

-मीमराठी.नेटच्या २०११ च्या दिवाळी अंकात पूर्वप्रकाशित

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...