Saturday, June 14, 2025

रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन

काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) 'द हाऊसमेड' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे, भरपूर ट्विस्ट्स आहेत असं वाचल्याने पुस्तक वाचायला घेण्याचं ठरवलं. दरम्यान ती १. 'द हाऊसमेड', २. 'द हाऊसमेड'ज सिक्रेट', ३. 'द हाऊसमेड इज वॉचिंगअशी पुस्तकत्रयी असल्याचं कळलं.

पहिलं पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि ते आवडलं तर पुढची दोन सुद्धा वाचू असं ठरवलं. आणि कसलं काय! 'द हाऊसमेड' हातात घेतलं ते ठेवता ठेववेना हातातून. रात्री दोन वाजेपर्यंत वाचन झाल्यावर नाईलाजाने ठेवायला लागलं. दुसऱ्या दिवशीही कामाच्या गडबडीतून जसा वेळ मिळेल तसा वाचत होतो. नंतर सुदैवाने विकांत असल्याने पुढच्या दोन दिवसांत ते संपलं.

 वाचकाला अतिशय गुंगवून ठेवणारं पुस्तक आहे. पुढे काय होईल याची वाचकाला सतत काळजी वाटत राहील, वाचकाच्या मनावर असह्य ताण निर्माण होईल एवढं बळ लेखिका फ्रीडा मॅकफॅडनच्या लेखणीत नक्कीच आहे. पुस्तक तीन भागांत विभागलेलं आहे. पहिल्या भागात गडद काळा भूतकाळ असणारी मिली नावाची एक तरुणी एका अतिश्रीमंत घरात घरकामाची बाई म्हणून नाईलाजास्तव नोकरी पत्करते. तिला झटपट श्रीमंत व्हायचं असतं. त्यासाठी वाटेल ते करायची तिची तयारी असते. घरातले तिचे तरुण मालक मालकीण आणि त्यांची छोटी मुलगी अशा सर्वांना ती कशा प्रकारे घोळवते, फसवते आणि घरात प्रवेश मिळवते याचं वर्णन सुरुवातीला येतं. मालकीण जरा चक्रम आहे याचा तिला सुरुवातीच्या २-३ दिवसांतच अनुभव येतो. तरी पैशांची गरज असल्याने ती तिकडे दुर्लक्ष करते. काही दिवसांतच मालकिणीचा विक्षिप्तपणा हाताबाहेर जात चालल्याचं तिच्या लक्षात येतं. सतत छळ करणे, त्रास देणे, टोमणे मारणे, खोटे आरोप करणे यामुळे वैतागून जाऊनही इतर काही पर्याय नसल्याने मिली तो छळ तसाच सहन करत राहते.

 प्रचंड मोठ्या घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या पोटमाळ्यावरच्या एका छोट्या खोलीत मिलीची राहण्याची व्यवस्था केलेली असते. त्या खोलीत तिला निरनिराळे अनुभव यायला लागतात. आपल्याला डांबून ठेवलंय असे भास व्हायला लागतात. मालकिणीचा छळ वाढतच जात असतो.... आणि अचानक एक दिवस एक भयंकर घटना घडते आणि मिलीचं आयुष्यच बदलून जातं.

 पुस्तकाच्या मध्यावर आल्यावर कथन करणारी व्यक्ती बदलते आणि अन्य व्यक्ती येऊन त्याच घटना अन्य दृष्टीकोनातून सांगायला लागते. एकावर एक ट्विस्ट्स येत राहतात. सर्व घटनांचे निराळेच अर्थ समोर स्पष्ट व्हायला लागतात. आपल्याला समोर दिसणारी परिस्थिती किती एकांगी आणि फसवी होती हे लक्षात आल्यावर वाचक हतबुद्ध होऊन जातो. तिसऱ्या भागात या सगळ्याला एक नवीन कलाटणी मिळून सर्व समस्यांचं निराकरण होऊन प्रमुख पात्रांच्या आयुष्यांना निराळ्या दिशा मिळून त्यांच्या नवीन आयुष्यांना सुरुवात होते.

 'द हाऊसमेड'ज सिक्रेट' मध्ये पुन्हा एकदा मिली, एक नवीन मालकीण, एक नवीन समस्या, एक नवीन रहस्य, जीवावर बेतणाऱ्या वेगळ्याच घटना असा सगळा मालमसाला आहे. हे पुस्तक देखील अप्रतिम असलं तरी पहिल्याइतकं जमलेलं नाही असं वाटत राहतं.

 तिसऱ्या अर्थात 'द हाऊसमेड इज वॉचिंग' मध्ये तर बऱ्याच गोष्टी वरवरच्या वाटत राहतात. रहस्य निर्माण होत जातात, गुंते वाढत जातात पण ते अगदीच निराकरण करता न येण्याजोगे आहेत असं कुठेही किंचितही वाटत नाही. तिसरं पुस्तक हे कथा, संवाद, प्रसंग, पात्रं, कथेवरील लेखिकेची पकड या सर्वच बाबतींमध्ये या पुस्तकत्रयीमधलं सर्वात कमकुवत पुस्तक वाटतं. पण अर्थात तरीही ते टाकाऊ नक्कीच नाही. एकदा सहज वाचू शकतो.

हाऊसमेड पुस्तकत्रयीचा एकंदरीत अनुभव सुखद असल्याने फ्रीडाचंच अजून एक बेस्टसेलर ठरलेलं 'नेव्हर लाय' नावाचं पुस्तक वाचायला घेतलं. शहराबाहेरच्या एका भल्यामोठ्या वाडासदृश बंगलीत एक दाम्पत्य हिमवादळामुळे नाईलाजाने अडकून पडतं अशी अत्यंत क्लिशे सुरुवात असल्याने पुढे वाचायचं की नाही अशा द्विधा मनःस्थितीत होतो. तरीही नेटाने वाचणं सुरु ठेवल्याचा फायदा असा झाला की एक पूर्णतः वेगळा अनुभव मिळाला. नायक-नायिका, महत्वाची दोन-तीन अन्य पात्रं अशा सर्वांभोवती ही कादंबरी फिरत राहते. महत्वाच्या पात्रांचे भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांशी जोडले जातात आणि एक सर्वस्वी नवीन कथा निर्माण होते. या नवीन विश्वात काळे, पांढरे, करडे असे सारे रंग एकमेकांशी मिसळले जाऊन अखेरीस एक अतिशय गडद अशी कलाकृती निर्माण होते आणि वाचक थक्क होऊन जातो.


त्यानंतर गुडरीड्सच्या रेटिंग्जप्रमाणे द इनमेट, द वाईफ अपस्टेअर्स आणि ब्रेन डॅमेज या तीन पुस्तकांची रेटिंग्ज उतरत्या क्रमाने होती. द इनमेट मध्ये खुनाच्या खोट्या आरोपावरून तुरुंगात असलेला कैदी, त्याच तुरुंगात नर्स म्हणून नाईलाजाने कामाला लागलेली त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी, त्यांचे इतर काही मित्र ही प्रमुख पात्रं आहेत. अनेक वर्षांपूर्वी, कॉलेजच्या काळात घडलेला एक अतिशय भयंकर प्रसंग आणि वर्तमान अशा दोन रेषांवरून कथानक हळूहळू पुढे सरकत राहतं. खुनी कोण, हत्या कोणी आणि का केली या आणि अशा अनेक गूढ प्रश्नांची उत्तरं देत पुस्तक संपतं.

द वाईफ अपस्टेअर्स या कादंबरीचं कथानक हे हाऊसमेड सीरिजच्या पहिल्या दोन पुस्तकांसारखं आहे. किंबहुना वाईफ अपस्टेअर्स हे आधी प्रकाशित झालेलं असल्याने या कथानकाचा विस्तार करून फ्रीडाने हाऊसमेड शृंखलेतली पहिली दोन पुस्तकं लिहिली असावीत असं सहज लक्षात येतं.

 ब्रेन डॅमेज हे शीर्षक प्रेक्षकांना उद्देशून असावं असं वाटतं. अत्यंत रटाळ, विचित्र कथानक, काहीही गूढ किंवा रहस्य नसूनही उगाचंच काहीतरी भलंमोठं रहस्य लपलेलं असल्याचा आव आणणारी ही कादंबरी वाचून वाचकाचा ब्रेन डॅमेज झाल्यावाचून राहत नाही हे नक्की. पण पहिली सहा पुस्तकं आवडली असल्याने सातव्या पुस्तकाच्या दर्जाकडे मी किंचित दुर्लक्ष केलं मात्र आठवं पुस्तक काही वाचायला घेतलं नाही हेही तितकंच खरं.

 


फ्रीडा मॅकफॅडनच्या लेखनाची काही महत्वाची वैशिष्टय म्हणजे तिच्या कादंबरीचं कथानक अत्यंत प्रवाही असतं, भाषा अतिशय सोपी आणि सुटसुटीत असते. बरीचशी कथानकं न्यूयॉर्क आणि त्याच्या आसपासच्या शहरांत घडतात. वेगवान प्रसंगांच्या मालिकेमुळे वाचकाला विचार करायला वेळच मिळत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक कादंबरीत मोजकीच पात्रं असल्याने प्रत्येक पात्र, त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांसह  वाचकांसमोर उभं तर राहतंच पण त्याचबरोबर प्रत्येक पात्राला एक महत्वाची भूमिकाही निभावायला मिळते. कादंबऱ्यांमध्ये ठिकठिकाणी काही छोटेमोठे तपशील फार खुबीने पेरून ठेवलेले असतात जे पुस्तकाच्या उत्तरार्धात वापरले जाऊन, धागे जोडले जाऊन एक पूर्णतः भिन्न विश्व तयार होतं. 

वेगवान प्रसंगांच्या मालिकेमुळे वाचकाला विचार करायला वेळ मिळत नाही हे जेवढं खरं, तेवढंच पुस्तक वाचून झाल्यावर विचार करत असताना किंवा अनेकदा पुस्तकाच्या शेवटाकडे आल्यावर कथानकातल्या त्रुटी दिसायला लागतात. कित्येकदा त्यांना त्रुटी म्हणण्यापेक्षा कथानकातलं खिंडार म्हणणं योग्य ठरावं ऐक्य त्या मोठ्या असतात. वाचकांच्या सहज लक्षात येणाऱ्या या गडबडी लेखिका म्हणून फ्रीडाच्या लक्षात कशा आल्या नसतील या विचाराने आश्चर्य वाटत राहतं. की प्रत्येक पुस्तकात अशा थोड्याफार त्रुटी आढळत गेल्याने त्या ती मुद्दाम ठेवते की लेखनात सफाई नसल्याने त्या राहून जातात हे मात्र कळायला काही मार्ग नाही.

अनेक अमेरिकी लेखक आणि अमेरिकी टीव्ही कोळून प्यालेल्या वाचक/प्रेक्षकांना पोलिसांची कार्यपद्धती, कायदेप्रक्रिया यातल्या अचूक बारीकसारीक तपशिलांची एवढी सवय झालेली असते की त्या पार्श्वभूमीवर तर फ्रीडाच्या लेखनातले हे कच्चे दुवे फारच त्रासदायक वाटू शकतात.

 पण तरीही ज्यांना काही चटपटीत, फार गहन नसलेलं आणि स्त्री पात्र केंद्रस्थानी असेल अशा प्रकारचं लेखन वाचायला आवडत असेल त्यांनी आवर्जून वाचायला हरकत नाही. तसंच कादंबऱ्यांची लांबी फार जास्त नसल्याने पुस्तकं वेगाने वाचून होतात हा ही अजून एक फायदा. (माझी तीनेक महिन्यांत सात पुस्तकं वाचून झाली). ज्यांना दर्जाशी अशी तडजोड करायची नसेल त्यांच्यासाठी अन्य नेहमीचे यशस्वी लेखक आहेतच. पण अगदीच काही नाही तरी हाऊसमेड त्रयी आणि नेव्हर लाय ही तरी आवर्जून वाचाच असं सुचवेन.

जाता जाता फ्रीडाबद्दल काही महत्वाची माहिती म्हणजे ती स्वतः पेशाने डॉक्टर असून ती मेंदूसंबंधित आजारांवर उपचार करते असं म्हणतात. मात्र ती बुक टूर्स करत नसल्याने, फार कुठल्या समारंभांना जात नसल्याने आणि महत्वाचं म्हणजे गेल्या जेमतेम ४-५ वर्षांत तिची पंधराहून अधिक पुस्तकं प्रकाशित झालेली असल्याने ती कदाचित खरी नसून खरी ओळख सामोरी आणण्याची इच्छा नसलेल्या वैद्यकीय पेशातल्या काही व्यक्ती एकत्र येऊन Freida McFadden या नावाने त्यांच्या रुग्णांचे अनुभव कादंबऱ्यांच्या स्वरूपात मांडतात अशा स्वरूपाची एक मांडणी वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. खरं खोटं Freida May Fathom!

--हेरंब ओक


No comments:

Post a Comment

रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन

काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...