Showing posts with label टेक्निकल. Show all posts
Showing posts with label टेक्निकल. Show all posts

Thursday, April 26, 2012

सफरचंदी डोळा-वहीची प्रथमा

प्रत्येकाला आपला ब्लॉग आणि त्यावरची प्रत्येक पोस्ट ही अतिशय आवडती, महत्वाची वगैरे असते. अर्थात काही वेळा ती आवडती, काही वेळा महत्वाची तर काही वेळा किंबहुना कित्येकदा दोन्ही असते.... कसलं फालतू वाक्य आहे नाही हे?

ही 'कंपोस्ट' वाटू नये म्हणून जरा पाणी घालून वाढवतोय इतकंच. कारण छोटी असली तरी ही कंपोस्ट नाही. पोस्ट छोटी असण्याचं कारण वेगळं आहे. आणि पुरेसं तेल वाहून गेल्यावर नमन संपून प्रयोग सुरु होईल हेही चतुर चाणाक्ष इ इ वाचकांनी ओळखलंच असेल.

लोक शंभरावी, दोनशेवी, पाचशेवी पोस्ट किंवा मग दोन लाख, पाच लाख, दहा लाख वाचक वाली पोस्ट लिहितात परंतु आमच्या शब्द-असामर्थ्यामुळे तसे टप्पे गाठायचे म्हणजे आम्हास वर्षानुवर्षं थांबावं लागेल. असो.

घडा भरला.... मुद्दा सुरु....

तर ही पोस्ट माझ्या दृष्टीने महत्वाची अशासाठी की ही नव्याकोऱ्या 'सफरचंदी डोळा-वही' वरून लिहिलेली प्रथमा आहे. नव्याकोऱ्या अ‍ॅपल आय-पॅड वरून लिहिलेली पहिली पोस्ट... !!!! आणि कदाचित (नाही. नक्कीच) शेवटचीही. लय यळ लागला राव. आता कळलं ना छोटी का आहे पोस्ट ते? ;)

पण ते काय ते म्हणतात ना की आय-पॅड वापरण्यापेक्षा मिरवण्यासाठीच घेतला जातो.... त्यामुळे महत्वाची असो वा नसो, आवडती असो वा नसो (अर्थात माझ्यासाठी दोन्ही आहे म्हणा) पण तो आय-पॅडवाला नियम सिद्ध करण्यासाठी म्हणून काढलेली मिरवणूक म्हणा हवं तर. किंवा मग "जनातलं म्हणता म्हणता मनातलं लिहिणाऱ्या आणि स्वतःच्या आणि स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणाऱ्या" मराठी ब्लॉगरची पोस्ट म्हणा. ;)... कारण केवळ मराठी ब्लॉगर असल्यानेच नवीन आय-पॅड घेतल्याची पोस्ट ब्लॉगवर टाकू शकतोय. (काहीही चालतं आपल्या ब्लॉगवर)

 जय ब्लॉगिंग... जय आय-पॅड.... !!!!

Friday, May 13, 2011

कंपोस्ट-३ : गुग्ल्या आणि कं

- तुम्ही ब्लॉग लिहीत असाल,

- ब्लॉगवर मोठमोठाल्या पोस्ट्स टाकत असाल,

- आणि त्या मोठमोठाल्या पोस्ट्स पब्लिश करायच्या आधी ब्लॉगरवर सेव्ह न करता 'घमेल्या'तल्या ड्राफ्टमधे सेव्ह करत असाल...

वर सांगितलेल्या तिन्ही अटींमध्ये तुम्ही-म्हणजे तुमचा ब्लॉग-बसत असेल तर ही छोटीशी पोस्ट उर्फ कंपोस्ट तुमच्यासाठीच आहे. (नाही. ब्लॉगर कित्येक तास बंद पडलं होतं त्याच्याशी या कंपोस्टचा काहीही संबंध नाही.)

पण यावेळी थोडं वेगळं आहे. ही कंपोस्ट  माझ्या कं विषयी नसून राजाधिराज, सिंहासनाधिश्वर, महासम्राट (गो-ब्राह्मणप्रतिपालक मुद्दाम लिहिलं नाहीये. उगाच वाद होतात त्या शब्दाने ;) ) गुगल महाराजांच्या कं विषयी आहे. आणि कंपोस्ट असल्याने अर्थातच छोटीशी आहे.

पेबची गोष्ट  लिहिताना आठवून, वेळ काढून, तुकड्यातुकड्यात लिहायला मला जवळपास ४-५ दिवस लागले होते. चांगली सवय की वाईट सवय किंवा चूक की बरोबर ते माहित नाही पण पोस्ट लिहिताना मी ती घमेल्याच्या मसुद्यांमध्ये (जीमेल ड्राफ्ट) मधे लिहितो. थोडा भाग लिहून झाल्यावर लिखाण बंद करायचं असेल तर ते तिकडेच सेव्ह करून ठेवतो. तर त्या सवयीप्रमाणे ४-५ रात्री जागून लिहून शुक्रवारी रात्री (अ‍ॅक्च्युअली शनिवारी पहाटे) पेब बर्‍यापैकी पूर्ण केलं आणि शनिवारी सकाळी पुन्हा एकदा नीट वाचून चेक करून पहिला भाग टाकायचा असं ठरवलं.

पण शनिवारी सकाळी उठून बघतो तर काय !! शेवटचे दोन भाग गायब !! पुन्हा पुन्हा शोधलं पण जैसे थे. आणि नेमका मी पहिला भाग जस्ट टाकला होता. त्यामुळे रात्री बसून शेवटचे दोन भाग संपवायचे असं ठरवलं आणि त्याप्रमाणे शनिवारी रात्री बसून ते संपवलेही. एकच चूक केली की सगळे भाग वेगवेगळया ड्राफ्टसमधे सेव्ह करण्याऐवजी एकत्र सेव्ह केले आणि रविवारी सकाळी व्हायचं तेच झालं. पुन्हा दोन भाग गायब होते !!!!

आधीच्या वेळी कदाचित अति झोप आल्याने मी सेव्ह करायला विसरलो असेन (खरंतर ड्राफ्टस ऑटोसेव्ह होतात.. पण तरीही) असा संशयाचा फायदा मी घमेल्याला दिला होता पण यावेळी मात्र मला पक्कं आठवत होतं की मी ड्राफ्ट नक्की सेव्ह केला होता. आणि त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा मी गुग्ल्यावर अविश्वास व्यक्त केला. प्रचंड राग आला होता त्याचा. तोवर दुसरा भाग टाकून झाला होता. त्यामुळे त्या रात्री (म्हणजे रविवारी रात्री, सोमवारी सकाळी ऑफिसला जायचं असूनही) रात्रभर जागून पुन्हा एकदा शेवटचे दोन भाग नीट लिहून काढले आणि सगळे भाग वेगवेगळ्या ड्राफ्टसमधे सेव्ह केले. मग उरलेल्या दोन दिवसात शेवटच्या भागांवर फायनल हात फिरवून ते पोस्ट केले.

नंतर 'इनसाईड जॉब' बघून झाल्यावर पुन्हा एकदा लंब्याचवड्या पोस्टस  लिहायची खुमखुमी आली :P .. पण यावेळी आठवणीने वेगवेगळे ड्राफ्टस बनवले होते. पण तरीही प्रत्येक भागाला वेगळा ड्राफ्ट बनवला नव्हता.. एका ड्राफ्टमधे दोन-तीन भाग एकत्र असं सेव्ह केलं आणि व्हायचं तेच झालं. शेवटचे दोन भाग पुन्हा यावेळीही उडाले. !!!! :(

त्यानंतर आधीप्रमाणेच जागरणं करून, पुन्हा पुन्हा माहितीपट बघून सगळे भाग पुन्हा लिहिले. या सगळ्याला जवळपास १५-२० दिवस लागले आणि थोडक्यात पोस्ट किमान वीस दिवसांनी तरी लांबली. यावेळी मात्र एका भागाला एक ड्राफ्ट असं करून पोस्ट्स सेव्ह केल्या असल्याने वाचलो.

दोन्ही पोस्ट्स पूर्ण लिहून झाल्यावर सहज कुतूहल म्हणून नेटवर ड्राफ्टच्या साईझ लिमिटबद्दल काही माहिती मिळते का म्हणून शोधाशोध केली (म्हणजे पुन्हा गुगलवरच.. आईशप्पत $%^$). अर्थातच कुठेच काहीच सापडलं नाही. मग पुन्हा एकदा माझ्या पोस्ट्स बघितल्या आणि एक गोष्ट लक्षात आली. 'पेब' चे पाहिले पाच भाग मिळून अंदाजे ३२७५ शब्द होतात आणि 'इनसाईड जॉब'चे पहिले तीन भाग मिळून अंदाजे ३७१७ शब्द होतात. थोडक्यात घमेल्याच्या ड्राफ्टसमधे या आकड्यांच्या आसपास कुठेतरी काहीतरी गफलत नक्की आहे. यापेक्षा जास्त शब्दसंख्या झाली की घमेलं टांग देतं. अजिबात रिस्क घ्यायची नसेल तर ३००० शब्द अँड दॅट्स ऑल असं म्हणू. !!

वरची सगळी बडबड ऐकून तुमच्या डोक्यात दोन विचार नक्की आले असतील. एक म्हणजे ही खरंच कंपोस्ट असेल तर हा एवढी बडबड का करतोय.. ही खरंच कंपोस्ट आहे का? तर हो आहे. कारण आता लवकरच ही संपणार आहे

आणि दुसरी गोष्ट म्हणजे "च्यायला, ब्लॉगसाठी हा किती मेहनत करतो, दोन-चार रात्री जागतो, १५-२० दिवस लिहीतो अँड व्हॉट नॉट !!" हे दाखवण्यासाठी हे लिहिलंय असं वाटतंय. किंबहुना आता वाचताना मलाही ते तसंच वाटतंय ;) ... पण तरीही तुम्हाला बरं वाटावं म्हणून क्षणभर ते खरं आहे असंही समजू पण तरीही एवढी बडबड वाचल्यावर तुम्हाला ३००० शब्दांच्या लिमिटविषयी तरी कळलं ना? आणि तेही न जागता ;) थोडक्यात आपल्या दोघांसाठीही विन-विनचं आहे हे.. नाही का?

तर तात्पर्य एकच.... ३००० शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे लेख गुगल ड्राफ्टमधे सेव्ह करू नका आणि केलेत तर विसरून जा कारण कितीही कामसू आणि आज्ञाधारक असला तरीही गुग्ल्यालाही कधीकधी कं येतोच !! ;)


* तळटीप : ही पोस्ट मात्र (कंपोस्ट असल्याने) एका बैठकीतच संपवलेली आहे ;)

Friday, October 1, 2010

कंपोस्ट : १

कधीकधी उगाच लांबलचक, मोठमोठ्या पोस्ट्समुळे फार 'कं' यायला लागतो ....... वाचणार्‍याला...... अर्थात लिहिणारा माझ्यासारखा असेल तर मग हमखासच. अर्थात माझा मलाही 'कं' येतोच लिहिताना.. पण तरीही कधी कधी सगळं तपशीलवार लिहिल्याशिवाय विषय पोचत नाही, पोस्ट चांगली होत नाही. याच्या उलट कित्येकदा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांचा एका स्वतंत्र पोस्टएवढा काही जीव नसतो. पण त्यावर लिहावसं तर वाटत असतं. अर्थात असं करता करता त्या डोक्यातून निघून जातात. त्यामुळे आजपासून मी एक नवीन प्रयोग सुरु करतोय. छोट्या पोस्ट लिहिण्याचा.. (नियमित नाही हो.. कधीकधी, अधून मधूनच किंवा प्रसंगाच्या मागणीनुसार ;) .. एवढेही सुदैवी नाही आहात तुम्ही लोक)

तर या छोट्या पोस्ट म्हणजे छोटी गोष्ट तपशीलात मोठी करून लिहिण्याचा कंटाळा आलेल्या पोस्ट म्हणून कंपोस्ट... 'कं'पोस्ट .. अर्थात या कंपोस्टीतही श्लेष आहे. म्हणजे वरिजनल वाला श्लेष नव्हे पण त्याच अर्थाचा काहीसा. या कंपोस्टी अगदी छोट्या तर असतीलच पण त्या (माझा) 'कं' या विषयाला पूर्णतः वाहिलेल्या असतील. थोडक्यात कं वरच्या छोट्या पोस्टी म्हणजे कंपोस्टी... छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला कसा कं येतो आणि (जमल्यास) त्या छोट्या गोष्टी अजून सोप्या करण्यासाठी सांगितलेली छोटीशीच पोस्ट... तर या कंपोस्ट सिरीजमधलं आजचं हे पाहिलं पुष्प (आयला काय भारी वाटतं असं म्हटलं की)

ब्लॉगपोस्टवर प्रतिक्रिया देताना व्हेरिफिकेशन वर्ड इनेबल केलेल्या समस्त ब्लॉगरांची क्षमा मागून सांगतो की मला हा प्रकार बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नाही. वैताग येतो नुसता. छान लेख वाचून झाल्यावर मस्त प्रतिक्रिया द्यावी तर हे गुगलबाबा चष्म्याच्या दुकानात जाऊन डोळ्यांची चाचणी केल्याच्या थाटात चित्रविचित्र अक्षरं (न् कधी कधी आकडेही) वेड्यावाकड्या आकारात समोर आणतात आणि म्हणतात "वाचून दाखव बरं हे आणि पुन्हा लिही हेच खाली"... आणि ३-४ अक्षरी शब्द असेल तर गुगलचा शेअर जणु १०० डॉलरांनी खाली येत असल्याच्या आवेशात ते शब्दही चांगले ७-८ अक्षरी असतात. सुरुवातीला प्रामाणिकपणे मन लावून मी अख्खा शब्द टाकायचो. कारण तोवर 'कं' ने टंकण्याचा (ही) ताबा घेतलेला नव्हता. पण होता होता हे वाढायला लागलं. गुग्ल्याचे मोठमोठे शब्द आणि ते आम्ही मन लावून कॉपी करणं हे प्रकार चालूच राहिले.. आणि आणि आणि तो आलाच. "तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं" च्या थाटात एके दिनी 'कं' ने सगळी सूत्र हातात घेऊन माझ्या डोक्यात एक भुंगा सोडून दिला. तुम्हालाही सांगतो. पण "उतू नाका, मातू नाका, पूर्ण व्हेरिफिकेशन वर्ड (कधीही) टाकू नका."

तर गुग्ल्याने असा मोठा व्हेरिफिकेशन वर्ड दिला ना की सरळ डोळे मिटून ए बी सी किंवा ए ए ए किंवा १ २ ३ असं कायपण लिहून टाकायचं. गुग्ल्या गंडतो.. त्याला वाटतं आपल्याला नीट कळला नाही शब्द. आणि त्यामुळे मग तो एकदम सोपा शब्द देतो. म्हणजे आधीचा आठ अक्षरी असेल तर पुढचा थेट चार अक्षरी. अगदी आपली कीव केल्यासारखी. पण ठीक्के कीव करायची तर कर विश्वविजयी 'कं' जिंकतो हे सत्य कसं नाकारशील?

झाली आमची गोष्ट
आली पहिली कंपोस्ट

किंवा


उपाय सारे सरून जाती नेहमीच जिंकतो कंटाळा
विषय बापुडे मरून जाती सदैव विजयी कंटाळा
हुरूप हरतो, हर्ष थरथरतो दिग्विजयी योद्धा कंटाळा
उर्जा पतते, जिव्हा ढळते रामबाण, ब्रह्मास्त्र कंटाळा

-- आद्य 'कं' पोस्टीकडून साभार

तटी : या प्रथम कंपोस्टीत ओळखीपायी दोन परिच्छेद वाया गेले. पण पुढची कंपोस्ट ही नक्की या कंपोस्टीच्या निम्मी असेल.... अगदी नक्की... कं शप्पत !!!

Friday, December 25, 2009

बरहाताईचा गुगल-दादा (इमे)

गेल्या आठवड्यात एका मित्राने बरहाताईच्या या गुगल-दादाबद्दल सांगितलं. इमे त्याचं नाव. मी कधीपासून डाउनलोड करून ट्राय करणार होतो पण राहून जात होतं. शेवटी आज वेळ मिळाला आणि हे गुगल इनपुट मेथड एडिटर (IME - इमे) डाउनलोड केलं. एकदम झक्कास आहे. बरंचसं बरहा सारखंच आहे. म्हणजे तळाशी लँग्वेज बार उघडतो. तिकडे मराठी निवडायचं. (आणि ही मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु भाषा वगैरे आपण डाउनलोड करायच्या वेळी निवडायची.) आणि नेहमीप्रमाणे दाणादण टंकायचं. बरहावाल्यांना कदाचित विशेष आवडणार नाही. पण माझ्यासारखे गुगल भक्त असतील त्यांना नक्की आवडेल. आणि खूप सोयीस्कर पण वाटेल. क्वीलपॅड, बरहा वगैरे मध्ये कॉमनसेन्सचा अभाव आहे असं मला वाटतं. म्हणजे गुगल मराठीतले नेहमीचे वापरातले शब्द आपोआप टिपतं. पण क्वीलपॅड, बरहा ते नाही करत. सोप्प उदाहरण म्हणजे "येतं, जातं, करतं" सारख्या शब्दांमधला शेवटचा अनुस्वार किंवा विंग्रजीत लिवलेले office किंवा camera सारखे शब्द गुगल बरोब्बर टिपतं. अर्थात क्वील/बरहा मध्ये पण असेल अशी काहीतरी सोप्पी सोय किंवा शोर्टकट. पण मला नाही सापडले. अजून एक म्हणजे IME मध्ये आपण शब्द टाईप करायला लागलो कि तिथे तो आपोआप आपल्याला शब्द सुचवतो. म्हणजे समानार्थी वगैरे नाही हो (करेल. ते पण करेल गुगल १-२ वर्षात :P) . म्हणजे word-suggestion. आपल्या मोबाईल मधल्या डिक्शनरी सारखं.
गुगलदादा काय एकेक प्रोडक्टस काढतो यार. (आणि पुन्हा चकटफू) जी-मेल, युट्युब, ओर्कट,पिकासा, अर्थ, जी-टॉक, क्रोम, गुगल maps. गुगल वॉईस. सगळे एकापेक्षा एक. गुगलने जी-टॉक जी-मेलच्या पेज मधेच इंटीग्रेट केल्यावर याहूला पण तसं करावंच लागलं. किंवा पीसी-टू-पीसी वॉईस चॅट पण सुरु केलं ते गुगलने. त्यांनी क्रोम लॉंच केल्या केल्या त्या दिवसापासून मी ते वापरायला सुरु केलं. काय मस्त लाईट-वेट आहे. खरंच अगदी हलकं-फुलकं वाटतं. लॅपटॉपलाही आणि आपल्यालाही.. आता वाट पहायची ती क्रोम ओ.एस. ची.
असो गुगलचा उदो उदो थोडा अति होतोय आणि तो उद्देश नव्हता या पोस्टचा. इमे बद्दल चटकन-पटकन सांगायचं होतं. म्हणून हे क्विक पोस्ट.

रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन

काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...