Thursday, May 27, 2010

कंटाळा पुराण - तृतीयोध्याय

काही कारणांनी ग्रंथालयात जाऊन जुन्या पोथ्या, पुराणं चाळण्याचा योग नुकताच आला. चाळता चाळता अचानक या जिव्हाळ्याच्या विषयावरचं पुराण नजरेस पडलं. पुराणाचं नाव होतं "कंटाळा पुराण" !!! आपल्या एवढ्या आवडीच्या विषयावर एखादं पुस्तक आणि तेही चक्क पुराण असेल याची तोवर कल्पनाही नव्हती. थोडक्यात "पुराणकाळीही लोक कंटाळत असत तर".. !! या कल्पनेने जेवढं हायसं वाटलं तेवढाच आनंदही झाला. हे पुराण निश्चित कधी लिहिलं गेलं असावं हे स्पष्ट होत नाही. परंतु काही उल्लेखांवरून ते फार तर पाचशे-सहाशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज बांधता येतो. गंमतीचा भाग म्हणजे या पुराणाचा फक्त 'तिसरा अध्याय'च उपलब्ध आहे असं कळलं. अधिक चौकशीनंतर याचा हा एवढा एकच अध्याय लिहिला गेला असून त्याच्या 'मागे-पुढे' काही नाही अशी मौलिक माहितीही मिळाली.

या पुराणात त्यावेळच्या समाजातल्या ढोंगीपणावर, अन्यायावर, खोटेपणावर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यात आली आहे. कोणीही कुठलेही उच्च-नीच असे भेद मानण्याचे कारण नाही कारण सर्वांच्या हृदयी 'तो'च वसत असतो असा महान संदेश स्पष्ट शब्दांत देण्यात आला आहे. तो आश्चर्यकारकरित्या आपल्या आजच्या समाजाला आणि आपल्या अनेक अपसमजांना चपखलपणे लागू होताना पाहून मती कुंठीत होते. अर्थात एवढं उच्च दर्जाचं, प्रबोधनपर लेखन असूनही आपल्या आद्य धर्मग्रंथांत, वेद/पुराणात या पुराणाला स्थान कसे दिले गेले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. जाणकारांच्या मते वेद, पुराण हे 'अपौरुषेय' आहेत म्हणजेच ते कुठल्याही व्यक्तीच्या तोंडून जन्माला आलेले नसून प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून जन्माला आले आहेत. त्यामुळे ते अपौरुषेय आहेत. तो नियम या 'कंटाळा पुराणा'ला लागू केला असता ते अपौरुषेय या व्याख्येत बसत नाही. परंतु टीकाकारांच्या मते 'अपौरुषेय' चा हा नियम ही फक्त एक पळवाट आहे. तेव्हाच्या समाजाचं तंतोतंत चित्रण आणि रुढी, परंपरा, विषमता यांच्यावर चढवलेला हल्ला सहन न झाल्याने या ग्रंथाला धर्मग्रंथाचा दर्जा दिला गेला नाही.

खरे खोटे कंटाळेश्वर जाणे. आपण थेट 'कंटाळा पुराण' काय आहे ते प्रत्यक्षच बघू.

----------------------

|| आद्य कंटाळेश्वर प्रसन्न ||

कंटाळा पुराण - तृतीयोध्याय

"कंटाळा पुराण - तृतीयोध्याय" असे वदल्याने संभ्रमित होणे नसे. आम्ही यापूर्वीच लेखनास आरंभ करण्याचा विचार केलेल्या प्रथमोध्यायाचा अतीव कंटाळ्यामुळे प्रत्यक्षात प्रारंभ झालाच नाही. द्वितीयोध्यायाचा आरंभ करून केवळ '|| आद्य' अतःपर लेखणीतून उतरवून झाल्यावर त्या अपरंपार कंटाळ्याने आम्हास  द्वितीयोध्याय लिहिण्यापासून रोखले. अंतिमतः आवश्यक शारीरिक आणि मानसिक बळ संग्रहित करून निग्रहाने तृतीयोध्याय प्रसवण्याचे अंत:करणी ठसविले. हे 'कंटाळा पुराण' त्या आद्य कंटाळेश्वराच्या चरणी सादर...

म्हणती कंटाळा | जीवाचा हा चाळा |
त्याजला जिव्हाळा | लावू नये ||१||

करेल तो घात | सोडा त्याची साथ |
देई त्याला मात | तोचि स्वामी ||२||

भावार्थ : (किंचित का होईना कं चा अंमल असल्याने दोन्ही श्लोकांचे भावार्थ एकत्रित देत आहोत !!) आजच्या जगात सदैव कंटाळ्यास आणि कंटाळणार्‍यांस नाही नाही ते बोलून, त्यांचा उपमर्द करून, त्यांना कंटाळ्यापासून फारकत घेण्याचे सुचवले जाते. त्याविषयी हे वरील दोन श्लोक आहेत. 

कोणी म्हणो काही | कं जात नाही |
तो वसो राही | अंतर्यामी ||३||

भावार्थ : अशा लोकांना उद्देशून महाराजांनी 'कोणी म्हणो काही | कं जात नाही |' असे ठामपणे सांगितले आहे.

अशा लोकांना उद्देशून महाराजांनी पुढील श्लोकांमध्ये अधिक विस्ताराने लिहून एकेका मुद्द्याचा व्यवस्थित परामर्श घेतला आहे. महाराजांचे एकच सांगणे आहे. "आळस, वीट आणि त्याचे इतर अनेक सुहृद ही कंटाळ्याचीच अपत्ये आहेत. आणि यातले कुठले ना कुठले अपत्य हे प्रत्येक प्राणीमात्रात अंशरुपाने का होईना आढळतेच. त्यामुळे निव्वळ कंटाळ्यावर आणि कंटाळणार्‍यांवर टीका करण्यात काहीच हशील नाही की त्यात कुठलाही पुरुषार्थ नाही."


आठवा 'आळस' | कंटाळ्याचा भास |
देई अर्थ खास | कंटाळ्याला ||४||

कंटाळ्या ऐवजी | येई मुखामाजी |
खरा खरा आजि | 'वीट' आला ||५||

कधी म्हणो जातो | 'वैताग'च येतो |
अर्थ उमटतो | कंटाळ्याचा ||६||

हिंदीचिया मुखी | येते सुखासुखी |
देतो जेव्हा हाकी | "'पक' गया यार" ||७||

कधी कंटाळ्याचे | वाजती पडघम |
म्हणती 'बोरडम' | आंग्ल भाषी ||८||

म्हणे सत्यवान | 'कं' महान |
त्याचीच तहान | लागो राहे ||९||

भावार्थ : घसा दाटून आल्याने आणि भावनांचा कल्लोळ उफाळल्याने आणि मुख्य म्हणजे वरील श्लोकांचा भावार्थ समजावून सांगून महाराजांचा उपमर्द करण्याची इच्छा नसल्याने येथेच विरमतो. 

असा हा महान 'कं' आचंद्रसूर्य नांदो !!

Wednesday, May 26, 2010

रहाशील?

तू शेजारी झोपलेला असतोस. किंचित चुळबुळ करत... काल किरकिर करत, रडत झोपला असल्याचा मागमूसही नसतो चेहर्‍यावर. ते गोबरे गाल, लांब पापण्या, इवलुसे ओठ.. मी एकटक बघत रहाते तुझ्याकडे आणि न राहवून चटकन पापी घेते तुझी. तुझी झोप चाळवते. मी पुन्हा पापी घेते.. दुसर्‍या गालाची.. तुझी पुन्हा थोडी हालचाल होते. तुझा छोटुसा तळवा मी हातात घेते आणि गुदगुल्या करते.. हळूच.. तू खुदकन हसतोस. माझी बोटं हळूहळू वर चढत जातात.. दंडावर, काखेत आणि शेवटी मानेला. तू दरवेळी हसत असतोस. हसणं वाढतच जातं. अक्षरशः खिदळायला लागतोस बघता बघता.. खिदळता खिदळता माझ्या कुशीत शिरतोस आणि खिदळत रहातोस.. घुसळत रहातोस.. !!

रहाशील असाच नेहमी? असाच लहानसा... असाच नेहमी घुसळत, खिदळत.. नेहमी माझ्या कुशीत..

या शशुल्या पिल्लाला हातावर घेऊन बाबुडा आला होता माझ्याकडे .. ते तुझं पहिलं दर्शन.. डॉक्टरांना किती वेळा सांगितलं तरी त्यांनी दाखवलंच नव्हतं तुला. नुसतं लांबून दाखवलं. पिल्लांना काही असं लांबून दाखवतात का? :( .. पण बाबाने तुला आणल्यावर मात्र मी लगेच बाबाकडून तुला माझ्याकडे घेतलं. डोळे भरून पहात होते तुझ्याकडे तर मधेच बाबा म्हणतो "अरे, याला हे चायनीज नाक कुठून आलं?" .. कळतच नाही त्याला.. सगळ्या पिल्लांची नाकं सुरुवातीला तशीच असतात.. हो किनई रे..

तुझं पाहिलं रडं, पहिलं हसू, पहिल्यांदा उपडं पडणं, पहिलं रांगणं, पहिला दात, पाहिलं पाउल, पाहिलं धडपडणं, पहिला ताप सगळं सगळं आठवतंय मला. पहिल्या रांगण्याचं, पहिल्या पावलाचं, पहिल्या दाताचं ते कौतुक, तो अवर्णनीय आनंद... पहिल्या तापातली ती प्रचंड काळजी, अस्वस्थता, हुरहूर. रडण्या-जागरणामुळे झालेली क्वचित चिडचिड.. तुझं ते सारखं धडपडणं.. पहिल्यांदा पडला होतास तेव्हा तर तुझ्यापेक्षा जास्त मीच रडले होते.. आठवतंय सगळंच. एक दीड वर्ष होऊन गेलं तरीही सगळं कालपरवाच घडून गेल्यासारखं वाटतंय. या गोष्टी काही विसरण्याच्या थोडीच आहेत. मीही काहीही बडबडते..

तू रांगता रांगता चालायला आणि चालता चालता धावायला कधी लागलास ते कळलंच नाही. तसंच तुझ्या त्या बडबडीचंही.. बडबड कसली खरं तर.. नुसतं अं अं, ब्या ब्या, द्या द्या .. किंवा नुसतंच आरडाओरडा करणं नाहीतर किंचाळत राहणं. पण मला तेही आवडतं. माझं सगळ्यात आवडतं म्हणजे तुझं मला 'आई' म्हणण्याऐवजी 'आ' 'आ' म्हणणं !! :)

या प्रत्येक पहिलेपणात मी रमायचेच पण तेवढेच पुढचेही वेध लागलेले असायचे. पालथा पडायला लागलास तेव्हा रांगशील कधी असं वाटायचं.. रांगायला लागल्यावर उभा कधी रहाशील याचीच हुरहूर.. उभा रहातोयस ना रहातोयस तोवर "आता पटकन मोठा होऊन पावलं टाकायला लाग" असं म्हणाले होते मी..

पण अचानक त्या पुढे पुढे जाणार्‍या पावलांचा वेग जाणवतो. हळूहळूच पण अटळ असणारा असा.. डे-केअर, प्ले-स्कूल, शाळा.. जाऊदे.. पुढचं नाहीच बोलत..

नावं वेगळी, टप्पे वेगळे.. पण सगळ्याचा परिणाम एकच. तू दुरावणार माझ्यापासून.. लांब जाणार. कमी वेळ मिळणार.. आत्तासारखं २४ तास एकत्र नाही रहाता येणार. हव्या तेव्हा गप्पा मारता नाही येणार सारख्या सारख्या.. तुझ्या गप्पा, बडबड ऐकता नाही येणार हवी तेव्हा.. हवं तेव्हा कुशीत घेऊन घुसळता नाही येणार.. हव्या तेव्हा पाप्या नाही घेता येणार.. तू तिथे रडलास तर इथे मला कळणारही नाही !!! तू माझ्या शेजारी नसशील तेव्हा माझं काय होईल कल्पनाही करवत नाही. रडेन का मी.. जाउदे..

तू शाळेतून येऊन बोबड्या बोलांनी दिवसभर काय केलंस शाळेत, काय गप्पा मारल्यास, काय खेळलास, काय खाऊ खाल्लास, काय मस्ती केलीस असं सारं सारं सांगत रहाशील. मी आवडीने ऐकतही राहीन. पण त्या तेवढ्या तासा-दोन तासात तुझी किती आठवण आली हे कोणाला सांगू? हसतील सगळे. तुही हसशील. अजून मोठा झालास की तर अजून हसशील.

प्रत्येक नवीन टप्पा, तुझी प्रगती हवीहवीशी वाटणारीच. पण या टप्प्यात मला ते जड जाईल कदाचित.. कदाचित नाही नक्कीच.. त्यापेक्षा तू असाच रहा ना. असाच छोटूला, लहानसा, रडका, थोडासा हट्टी, सारखं 'आ आ' करत माझ्या मागे लागणारा, आरडाओरडा करणारा, किंचाळणारा, हवी ती गोष्ट मिळाली नाही तर तमाशा करणारा, मधेच उगाचच खुद्कन हसणारा, उगाच उड्या मारणारा, पसारा करणारा, धिंगाणा करणारा, धावत येऊन पायाला विळखा घालणारा... नकोच होऊस मोठा.

कोणी म्हणेल काय बाई आहे. लोकं म्हणतात "मोठा हो, औक्षवंत हो" आणि ही बाई म्हणते आहे की असाच रहा, लहानच रहा.. जाउदे आपल्याला काय लोकांशी. त्यांना काय कळतंय. या तुझ्यामाझ्यातल्या गप्पा आपल्यालाच कळणार. म्हणून म्हणते नकोच होऊस मोठा. असाच रहा ना. नेहमीच.. कायम.. रहाशील??

Friday, May 21, 2010

मराठी (आणि) ब्लॉगिंग आणि इतर .... !!!

आम्ही मागे एकदा आमच्या संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त नाटक बसवत होतो. लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळा हौशी मामला होता. पण सगळ्यांना नाटकात काम करायची आवड, इच्छा होती आणि त्याप्रमाणे आपलं शिक्षण, नोकरी आणि इतर उद्योग सांभाळून सगळे जण नाटकात काम करत होते. आमच्या दिग्दर्शक मित्राबरोबर नाटकाची आवड असणारे त्याचे २-३ मित्रही तालमीला येत. दिग्दर्शक सीन समजावून सांगत असताना, संवाद, शब्दफेक, हावभाव, स्टेजचा वापर या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असताना त्याचे हे मित्रही अनाहूत 'सल्ले' देत असत. हा संवाद म्हणताना टोन असा असा असायला हवा, असे असे हातवारे हवेत वगैरे मतं मांडली जात. हे दिग्दर्शकाने सांगितलं असतं तर कोणाला काही वाटलं नसतं पण उगाच त्याचे मित्र आहोत म्हणून आपल्यालाही दिग्दर्शन करण्याचा अधिकार आपसूकच प्राप्त होतो या विचारातून दिले जाणारे हे अनाहूत सल्ले अनेकदा त्रासदायक वाटत. पण दिग्दर्शक सगळ्यांचाच मित्र आणि ती टाळकी त्याचे मित्र म्हणून कोणी विशेष लक्ष देत नव्हतं. कालांतराने नाटकात दोन अतिशय छोट्या भूमिका करायला आम्हाला कलाकार मिळेनात. तेव्हा याच दोन टाळक्यांना या भूमिका देऊ असं ठरलं. ते दोघेही आनंदाने तयार झाले. पण...

सगळ्यांसमोर उभं राहून फक्त पाहिलं वाक्य म्हणताना त्यांची अशी काही तारांबळ उडाली की बास रे बास !!!!

ते अडखळत होते, शब्द चुकत होते, वाक्य पूर्ण करता येत नव्हतं. हावभाव, हातवारे, आवाजातला चढउतार, संवादफेक, स्टेज कव्हर करणं वगैरे वगैरे तर फार फार पुढच्या गोष्टी होत्या.

हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे नीरजा पटवर्धन यांनी मायबोलीवर लिहिलेल्या ब्लॉगर्सच्या लेखाला मिळालेल्या प्रतिक्रिया. १-२ गोष्टी वगळता नीरजा यांचा लेख मला पटला. मराठी ब्लॉगर्सच्या ज्या गोष्टी त्यांना खटकल्या आहेत त्या का खटकल्या आहेत हे त्यांनी योग्य शब्दांत आणि सौम्य भाषेत सांगितलं आहे. त्यामुळे या लेखाचा विषय तो लेख नाही तर त्या लेखावर भरभरून आलेल्या प्रतिक्रिया हा आहे. (सध्या तरी) तीन पानं भरून आहेत. सगळ्या वाचा. काही प्रतिक्रिया विचारी आहेत, संयत आहेत, बॅलन्स्ड आहेत. पण अशा प्रतिक्रियांची संख्या तुलनेने कमीच. इतर अनेक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा, आगाऊपणा, ब्लॉगर्सना क:पदार्थ लेखणार्‍या तुच्छ भावना, स्वतःबद्दलच्या (माझ्या दृष्टीने अनाकलनीय) गर्वाचा (इथे मी गर्व हा गर्व या वाईट अर्थानेच वापरतो आहे. हल्ली वापरला जातो त्या अभिमान या अर्थी नव्हे.) सोसच जास्त. मला प्रामुख्याने खटकलेल्या काही प्रतिक्रिया देतो इथे. (>> च्या खाली मी माझं उत्तर लिहिलं आहे असं वगैरे काही नाही. आधी कोणीतरी लिहिलेल्या प्रतिक्रियेवर पुढच्या व्यक्तीने दिलेली ती प्रतिक्रिया आहे. गोंधळ होऊ नये म्हणून मुद्दाम सांगितलं.)

------

- जरी काही दर्जेदार असले तरी माणशी एक ब्लॉग जर निघाला तर कुणाकुणाचे आणि कितीकिती आणि कायकाय वाचायचे हा प्रश्न उरणारच!
मग त्यातुन आपल्या ब्लॉगचा टीआरपी वाढावा म्हणुन वेगवेगळी मार्केटिंग गिमिक्स वापरली जाण्याचीच आणि दर्जाकडे दु:र्लक्ष (हा शब्द अशुद्ध आहे हे मला माहीत आहे. पण प्रतिक्रियेतला शब्द जसाच्या तसा दिला आहे.) होण्याचीच शक्यता अधिक वाटते!

- >> बाकी ब्लॉग संस्क्रुती वाढेल तसे विषयाचे वैविध्य वाढेल यात शंकाच नाही.
वैविध्य वाढेलही कदाचित पण दर्जाचे काय?
प्रिंट प्रकारात निदान प्रकाशन तरी काही निकषांवर हे साहित्य पडताळुन घ्यायचे... इथे तर ते ही मॉडरेशन नाही!

- अनेक मराठी blog वाचताना मला खटकलेली गोष्ट म्हणजे खुप nostalgic (प्रवीण दवणे छापाचे) लिखाण . विनोदी लिखाणात तोच तोच मराठी मध्यमवर्गीयपणातुन निर्माण होणारा विनोद (इथे पुलछाप म्हणायला हरकत नाही,हा प्रभाव शिरिष कणेकर, मंगला गोडबोले ह्यांच्या लिखाणातही जाणवतो ). हे इतके तेच तेच होते की मग कधीकधी खरे लिखाण असले तरी खोटे वाटायला लागते.
सामाजिक बांधिलकिच्या जाणिवेतुन केलेले लिखाणही कुठेतरी शाळु/teenager types असते (उदा. systemमधे भ्रष्टाचार आहे,राजकारणी वाईट असेच काहीतरी).

- प्रथितरश (वरचाच कंस पुन्हा एकदा.. असो..) ब्लॉगर्स स्वतःच्या मनाने शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करताना दिसतात. ह्या लोकांकडून तू मराठी भाषेसाठी काही करण्याची अपेक्षा करते आहेस का ?

- जिथे फॉर्मचे बंधन नाही, जिथे वाट्टेल ते लिहीता येऊ शकते तिथेही अनुभवांची/कल्पनांची वानवा का? मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणुन पाहिले तर वैचारिक दिवाळखोरीच जास्त दिसते, आणि तसाच समाज असेल तर कोण काय करणार.

- इतकं बोरिंग झालंय मराठी ब्लॉगविश्व.. काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करायचे! किंवा चक्क टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडायचे.. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनचा उत्तम नमुना! लेटेस्ट हॉट टॉपिक असल्याने व 'तू मला छान म्हण, मी तुला म्हणतो' अशा प्रकारच्या कंपुबाजीने(!) कमेंट्स तर बख्खळ पडतात व लेखक समाधान करून घेतो की तो लेख फार भारी जमला होता वगैरे..

- ब्लॉग अकाउंट फुकट काढता येतं. त्यातुनच इतकं पीक उगवलय. बरं बहुत करुन साचेबब्द्ध आयुष्य असलेल्या लोकांच्या अनुभवविश्वात वैविध्य कुठुन येणार ? त्यात प्रतिभेची वानवा.

- आता इतकी प्रचंड गर्दी आलीय की निसटले जाते हे लिखाण, आणि मग उरतात नुसत्याच प्राची ला गच्ची टाईप कविता किंवा फॉर्वर्डेड माल स्वतःच्या ब्लॉगवर टाकणारी जनता.. अरे ही कुठली ब्लॉग काढायची प्रेरणा?

------

सिंडरेला यांच्या १-२ प्रतिक्रिया आणि स्वाती_आंबोळे यांच्या सगळ्याच प्रतिक्रिया पटल्या. निव्वळ त्या प्रतिक्रिया (सिंडरेला यांच्या प्रतिक्रियांमधले काही मुद्दे वगळता) ब्लॉगर्सच्या बाजूने आहेत म्हणून नव्हे तर त्या एकांगी नाहीत म्हणून.
आणि ही आहे शर्मिला फडके यांची प्रतिक्रिया. मला सगळ्यांत जास्त आणि पूर्णपणे पटलेली एकमेव प्रतिक्रिया. कारण त्यांनी अतिशय विचारपूर्वक, इतरांप्रमाणे उगाच आक्रस्ताळेपणा न करता, सगळ्या बाजूंचा सारासार विचार करून, समतोल राखत, ब्लॉगर्सची बाजू अतिशय योग्य रीतीने मांडली आहे. अतिशय माहितीपूर्ण प्रतिक्रिया आहे ही. खाली वाचा.

------

- नेटबाहेरच्या जगात गेली काही वर्षे अमाप संख्येने मराठी पुस्तके निघत आहेत पण त्यापैकी नव्वद टक्के पुस्तकांना दुसर्‍यांदा आवर्जून वाचावे इतकेही वाचनमूल्य नाही. मग मराठी ब्लॉगर्सकडून इतक्याच 'साहित्य निर्मितीची' अपेक्षा करणे चुकीचेच. पण असं असूनही उद्याचे दर्जेदार साहित्य किंवा कंटेपररी साहित्य हे ह्या ब्लॉग्जवरच्या पोस्ट्समधूनच निर्माण होऊ शकेल इतकी क्षमता नक्कीच निर्माण झाली आहे काही ब्लॉगर्समधे.

डायरीवजा लिखाण हा ब्लॉग्जचा काहीतरी 'कमीपणा' मानला जातो पण उलट मला तर ती ब्लॉग्जची स्ट्रेन्ग्थ वाटते. ब्लॉग्ज लिहिणारे सुरुवात 'मी' पासून करत असले तर ते योग्यच. अक्षरशः जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेले मराठी ब्लॉगर्स यानिमित्ताने आपले विविध क्षेत्रातले, विविध समाजांमधले अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवात शाळकरी निबंधासारखी झाली तरी त्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगणे, पलीकडे जाणे यातूनच होते. अनुभवांना थेटपणे भिडून लिखाण करण्याची कुवत त्यांच्यापैकी काहींमधे निर्माण अवश्य होते आहे.

डायरीवजा किंवा 'मी'च्या लिखाणामधे कल्ट साहित्यकृती निर्माण होण्याची किती ताकद असते हे कित्येक क्लासिक्सनी ऑलरेडी दाखवून दिलेले आहे. कोसलाही याचेच उत्कृष्ट उदाहरण.

ब्लॉगर्समधे गुणवत्ता, क्षमता आहे फक्त कमतरता आहे ती सातत्याची आणि वेगवेगळे फॉर्म्स धीटपणे हाताळण्याची. आणि अजून एक वेगळेपणा म्हणजे येणार्‍या इन्स्टन्ट प्रतिक्रिया. ज्या बाहेरच्या जगातल्या लेखकांना कधीच मिळू शकत नाहीत. आपले पुढचे पोस्ट जास्त दर्जेदार किंवा वेगळे करण्याची स्फुर्ती ब्लॉगर्सना यातूनच मिळू शकते मात्र उगीच सामान्य लिखाणाला चढवले गेले तर ब्लॉगर कमी कालावधीत संपूही शकतो. यात मला वाटतं वाचकांचीही जबाबदारी खूप आहे. प्रतिक्रिया देताना परखड वस्तुनिष्ठपणा दाखवणे वाचकाला जमले पाहिजे आणि क्रिटिसिझम योग्य त्या स्पिरीटने घेणे ब्लॉगरला जमले तरच तो पुढे जाऊ शकेल.

वेगळ्या स्टाईलची भाषा, काहीतरी नवा वेगळा विचार, नवा फॉर्म ब्लॉगिंगमधे अचूक पकडता येऊ शकतो. मात्र असा प्रयत्न करणारे खूप कमी. जे करताहेत त्यांचे कौतुक आहे आणि करत नाहीत त्यांनी तो आवर्जून करायला हवा.

डायरीवजा लिखाणाने सुरुवात करुन स्वतःची स्टाईल मिळणे, मग त्यापुढे जाऊन काही वेगळे मांडणे, स्वतःच्या अनुभवांतून वाचकांना स्वतःशी जोडणे, अनुभवांच्या पलिकडचे काहीतरी वाचकांच्या पदरात टाकणे, भाषा समृद्ध करत नेणे, संदर्भ मिळवण्याचा प्रयत्न करणे हे करणारे काही ब्लॉगर्स बस्केने उल्लेख केले आहेतच. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या एका ब्लॉगरला मराठीतल्या मान्यवर प्रकाशकांनी ऑलरेडी तिचे पोस्ट्स संकलित करण्याची ऑफर दिली होती. मराठी प्रकाशकांनी असे जास्तीतजास्त प्रयत्न आता करायला हवेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी काही सीमारेषा मराठी साहित्यकृतींमधे पुढल्या काळात नसावी.

ब्लॉगर्समधे गेल्या काही महिन्यांमधे पेन्शनर्स लिखाणाचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरुन जाताना दिसले अमुक की टाक त्यावर पोस्ट टाईप उत्साह त्यांच्यात अमाप ओसंडून जातो आहे. ब्लॉगर्सचा दर्जा आणि संख्या याचे प्रमाण यामुळे विपरित होईल की काय अशी भिती साहजिकच वाटते. पण हा ब्लॉगर्सचा एक वेगळा, स्वतंत्र प्रकार आहे आणि त्यांचा वाचकही वेगळाच रहाणार. यामुळे तरुण, उत्साही ब्लॉगर्सनी आपला ब्लॉगिंगचा उत्साह गमावता कामा नये. लिहित रहायला हवे.

चांगले, सकस असे काही जन्मतःच प्रत्येकवेळी नसते. ते घडत जाते. ज्यांच्यात क्षमता आहे ते घडतील. बाकी फोलपटे उडून जातील आपोआप.

------

शर्मिला फडके यांचा ब्लॉगही अतिशय उत्तम आहे. नक्की वाचा. !! असो.

तर या अशा प्रतिक्रिया टाकणार्‍या लोकांच्या प्रोफाईल्समध्ये डोकावून मी मुद्दाम त्यांच्या ब्लॉग्सला भेटी देऊन आलो (अनेकांचे तर स्वतःचे ब्लॉग्सही नाहीयेत. निदान प्रोफाईलमध्ये ब्लॉगची लिंक तरी नाहीये.) आणि मला सुरुवातीला सांगितलेली नाटकाची गोष्ट आठवली. याउपर काही लिहीत नाही. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. पण मला काही काही प्रश्न राहून राहून पडले.

१. आपण स्वतः एका ओळीचीही निर्मिती न करता किंवा केलीच तरी नियमितपणे न लिहिता आणि अगदी नियमितपणे आणि दर्जेदार लिहीत असलो तरीही त्यामुळे समग्र मराठी ब्लॉगविश्वावर चिखलफेक (यातून समस्त मराठी माणसाचं दैवत पुल ही सुटलेलं नाही बरं.) करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? हे म्हणजे संभाजी ब्रिगेड सारखी स्वघोषित 'सेन्सॉरबोर्ड गिरी' झाली. संभाजी ब्रिगेड चित्रपट थेटरमध्ये घुसून चित्रपट डायरेक्ट बंद पाडते आणि हे लोक असल्या प्रतिक्रियांमुळे नवख्या ब्लॉगर्सचं खच्चीकरण करून त्यांना लिखाणापासून परावृत्त करून पर्यायाने त्यांचे ब्लॉग्स बंद पडायला कारणीभूत ठरतात. याउलट मला तरी आत्तापर्यंत कुठल्याही मराठी ब्लॉगवर इतर कुठल्या मराठी संस्थळाची किंवा त्याच्या सदस्यांची अशा प्रकारे नाचक्की करणारे लेख वाचायला मिळाल्याचं स्मरत नाही.

२. एखादी व्यक्ती कसं आणि किती उत्तम लिहिते यावर तिच्या लिखाणाचा दर्जा अवलंबून असतो की ती कुठल्या संस्थळावर लिहिते यावर? (त्याशिवाय का यांना ९५% ब्लॉग्स वाचण्याच्या लायकीचे वाटत नाहीत?)

असो प्रश्न अनेक आहेत पण मला मूळ मुद्द्यापासून भरकटायचं नाहीये त्यामुळे प्रश्नावली तूर्तास इथेच थांबवतो. मला वैयक्तिकरित्या उद्देशून कोणीही काहीही लिहिलेलं नसलं तरीही समस्त 'मराठी ब्लॉगर्सना' उद्देशून ताशेरे झाडण्यात आले असल्याने मला मराठी ब्लॉगर्सची बाजू मांडणं आवश्यक वाटतं. (इथे मी समस्त मराठी ब्लॉगर्स मंडळींचा प्रतिनिधी म्हणून हे मांडतोय असा कुठल्याही प्रकारचा माझा दावा नाही. मी फक्त मराठी ब्लॉगर म्हणून माझी बाजू मांडतोय आणि अनेकांची बाजू हीच असेल याची मला खात्री आहे..... उगाच कोणी काही विचारण्याच्या आधीच स्पष्टीकरणं देऊन टाकलेली बरी असतात अनेकदा. नाहीतर पुन्हा एखादा प्रतिक्रिया टाकलेला/ली येऊन विचारायचा/ची "तुम्ही ठेका घेतला आहे का मराठी ब्लॉग विश्वाचा")

१. आत्तापर्यंत किती मराठी पुस्तकं लिहिली गेली असतील? एक अगदी अंदाजे आकडा म्हणून १००० धरू. (मला वेड लागलेलं नाही. खरा आकडा यापेक्षा कित्येक पट अधिक आहे. तरीही तूर्तास आपण अगदी छोटा आकडा धरू).

२. साधारण किती वर्षं पुस्तकं निर्मितीचं काम चालू आहे? पुन्हा अंदाजे १०० वर्षं धरू.

आता हेच दोन प्रश्न आपण आता मराठी चित्रपट आणि मराठी संगीत/गीतं यांना अनुसरून विचारू.

तर आता मला सांगा गेल्या १०० वर्षांत निघालेल्या १००० पुस्तकांपैकी सगळीच्या सगळी पुस्तकं चांगली होती का? गेल्या १०० वर्षांत निघालेलं प्रत्येक मराठी गाणं, प्रत्येक मराठी चित्रपट हा सर्वोत्तम होता का? प्रत्येकाचा दर्जा अत्युच्च होता का? चित्रपटांच्या विषयात कमालीचं वैविध्य होतं का? प्रत्येक पुस्तकं/गाणं/चित्रपट भावनेला स्पर्शून जाणारं, अनुभवाची नवीन कवाडं खुलं करणारं, प्रचंड माहितीपूर्ण, सहज प्रयोग म्हणून न करता नवनवीन संकल्पना मांडणारं, नवीन शोध लावणारं असं काही होतं का???

जर मराठी लेखक, चित्रपटकर्ते, संगीतकार/गीतकार १०० वर्षं मिळूनही निर्माण होणारं एकूणएक, प्रत्येक पुस्तक/चित्रपट/गाणं हे प्रेक्षकाला/वाचकाला आवडणारं बनवू शकले नाहीत आणि हे आपण मान्यही करतो तर मग तोच नियम मराठी ब्लॉगविश्वाला लागू का होत नाही? मराठी ब्लॉगविश्वात जन्माला येणारा एकूण एक, प्रत्येक लेख हा वेगळा, अत्त्युच्च दर्जाचा असावा हा अट्टाहास का? (आता कोणी म्हणेल की आम्ही प्रतिक्रियेत म्हटलं आहे की ५% ब्लॉग्स वाचनीय असतात. पण ती शुध्द तांत्रिक पळवाट आहे. ५% ब्लॉग्सना चांगलं म्हटलं तरीही एकूणच मराठी ब्लॉगविश्वाबद्दल असणारा अनाकलनीय आकस लपून रहात नाही.)

इंटरनेट खर्‍या अर्थाने घरोघरी सुरु होऊन आत्ताशी जेमतेम दहा-पंधरा वर्षं झाली आहेत. त्यात ब्लॉग प्रकरण सुरु झालं अंदाजे ६-७ वर्षांपूर्वी आणि त्यातही मराठी टंकायच्या सोयी उपलब्ध होऊन, पूर्णतः मराठीत लिहिले जाणारे ब्लॉग्स सुरु होऊन तर जेमतेम २-३ वर्षं झाली आहेत. तर थोडक्यात वय वर्ष ३ असणार्‍या या बाळाकडून किती जलद आणि किती मोठ्ठाल्या अपेक्षा ठेवायच्या?

लोक आत्ता कुठे मराठी लिहायला लागले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक नवीन ब्लॉग्स सुरु झाले. अनेक नवीन लोक लिहिते झाले. नवनवीन कल्पना, शैली, वर्णनं, बाज, प्रकार यायला आत्ता कुठे सुरुवात होते आहे. माझ्या स्वतःच्या ब्लॉगलाही अजून दोन आकडी संख्या (महिन्यांची) गाठायची आहे. तर अशा वेळी नवीन ब्लॉगर्सना प्रेरणा मिळेल असं काही लिहिता येत नसेल तरी निदान त्यांना झोंबेल किंवा त्यांचा उपमर्द होईल असं तरी आपल्या हातून लिहिलं जाणार नाही याची दक्षता घेणं हे (कमीत कमी आंतरजालावरच्या तरी) प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य नाही का? सगळे ब्लॉग्स अत्त्युच्च दर्जाचे नाहीत हे मान्य करू पण म्हणून काय सगळेच ब्लॉग्स टाकाऊ आहेत, दर्जाहीन आहेत, अर्थहीन आहेत, पाट्या टाकणारे आहेत?

दुसरी गोष्ट आणि अजून महत्वाची म्हणजे वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चित्रपट, संगीत, पुस्तकं वाल्यांप्रमाणे ब्लॉगर्स काही (अजून तरी) व्यावसायिक नाहीत. व्यावसायिक इंग्रजी ब्लॉगर्स आहेत पण मराठीत त्याची संख्या जवळपास नगण्य आहे. आपले नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर सगळ्या बाबी सांभाळून चालवला जाणारा प्रकार आहे हा. पूर्णतः हौशी. (तसं नसतं तर ब्लॉगर्स मेळाव्याचा संपूर्ण खर्च कोणी एका अनामिकाने उचलला नसता. स्वतःच्या प्रोडक्टचे/ब्लॉगचे पोस्टर्स, बॅनर्स लावून त्या मेळाव्यातून व्यावसायिक फायदा काढला असता.) थोडक्यात या हौशी प्रकाराच्या यशाची मोजमाप करताना व्यावसायिक फुटपट्ट्या वापरणं सर्वस्वी अयोग्य.

अजून एक म्हणजे सरसकट सगळ्या ब्लॉगर्सच्या अकलेचे बाजारभाव काढणार्‍यांनी नियमितपणे किती ब्लॉग्स (लिहिले म्हणत नाहीये मी) वाचले आहेत हा प्रश्नच आहे आणि त्यांची (ब्लॉग्स न वाचता केलेली) निरीक्षणं बघून तो प्रश्न म्हणजे वस्तुस्थिती आहे याबद्दल दुमत नसावं. निदान मराठी ब्लॉगर्सचं तरी. मराठी ब्लॉग विश्वातून सलग दोन-तीन आठवडे नजर फिरवली तरी लक्षात येईल की इथे अनियमित पण दर्जेदार लिहिणारे तर आहेतच आहेत पण नियमित आणि दर्जेदार अशा दुर्मिळ मिश्रणाचं कसबही सहजतेने साधणारे अनेक अनेक अनेक लोक आहेत. माझ्या ब्लॉगवर 'माझे ब्लॉगु ब्लगिनी' खाली जी चित्र दिसतायत ना तिथे टिचक्या मारून ते ब्लॉग्स वाचून बघा आणि दुसरं म्हणजे 'मला हे भावतं' च्या खाली जी यादी आहे ना तेही ब्लॉग्स आवर्जून वाचा. बरं यातल्या एकालाही मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही, कोणालाही कधीच भेटलेलोही नाही. ज्या काही ओळखी आहेत त्या ब्लॉग्समुळेच. सगळे ब्लॉग्स वाचून झाले की मग "मराठी ब्लॉग्समध्ये विविधता नाही, दर्जा नाही, वैचारिक दिवाळखोरी आहे, अनुभवांची/कल्पनांची वानवा आहे, फुकट अकाउंट आहे म्हणून ब्लॉग काढले आहेत" ही वाक्य पुन्हा एकदा म्हणून बघा. काहीतरी चुकल्यासारखं जाणवेल (चिखलफेक करणार्‍या सरसकट सगळ्यांना जाणवेलच असा दावा अजिबात नाही. पण निदान काही जणांना तरी जाणवेल.. !!). आणि हे झाले मला माहीत असलेले काही ब्लॉग्स पण मला/आपल्याला माहीत नसलेले किंवा आपल्या नजरेस पडले नसलेले इतरही अनेक मराठी ब्लॉग्स असतीलच की. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अशी आगपाखड करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी आणि कसा दिला? नैतिक अधिकार म्हणतोय मी अधिकार नाही. किंवा सोप्प्या शब्दांत म्हणजे आपलं त्या क्षेत्रात भरीव नाही तरी निदान काहीतरी कार्य आहे म्हणून आपण टीका करू शकतो या जाणीवेतून केली गेलेली टीका असेल तर ठीक आहे. "मी वाचक आहे आणि ब्लॉग्स नेटवर उपलब्ध आहेत म्हणून मी त्यांच्यावर तोंडसुख घेणार" वाल्या अधिकाराविषयी बोलतच नाहीये मी. त्यातून पुन्हा "पैसे मोजून तिकीट काढून चित्रपट बघितलाय त्यामुळे मला एखाद्या रामगोपाल वर्माला किंवा मधुर भांडारकरला नावं ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे" हा मुद्दाही इथे गैरलागू आहे. तिकीट काढून चित्रपट बघितलाय त्यामुळे निर्माता/दिग्दर्शकावर तिखट टीका करण्याचा जो अधिकार आपल्याला लाभतो त्याच अधिकाराने ब्लॉग्सवर (जे वाचायला विनामुल्य असतात) आणि ब्लॉगर्सवर टीका करणंही कदाचित चुकीचं नाही असं म्हणू आपण. पण टीका करताना आपण कुठल्या पातळीवर उतरतो, कुठली भाषा वापरतो याचं भान ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं.  एखादं मराठी संस्थळ म्हणजे इंटरनेटवरील समस्त मराठी विश्व नव्हे हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर माझ्या म्हणण्याचा अर्थ कळायला मदत होईल. असो.. !!

मध्यमवर्गीय विनोद, शाळू विनोद, मॉडरेशन नसलेलं लिखाण, शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करणारे, असल्या लोकांकडून मराठीसाठी काय होणार, अनुभवांची/कल्पनांची वानवा असणारं लिखाण, अतिशय बोरिंग, टिपिकल, मोनोटोनस, कंपूबाजी करणारे (या शब्दाला तर मी प्रचंड हसलो. कारण अशा कित्येक मराठी संस्थळांवर किती कंपूबाजी चालू असते आणि तिथले सभासदच त्यावर कशी टीका करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असो.), बख्खळ कमेंट्स घेणारे (यामागचा आक्षेपच मला कळला नाही. ब्लॉगेटिकेट्स बद्दलच्या अज्ञानातून हे असं म्हटलं गेलं असावं कदाचित), वैचारिक दिवाळखोरी, बौद्धिक दिवाळखोरी, ब्लॉग्सची प्रचंड गर्दी (यात आक्षेपार्ह काय आहे? मराठी संस्थळावर खोर्‍याने सभासदसंख्या झाल्यावर सुखावणारे हेच लोक पण यांच्या मते ब्लॉग्सची गर्दी मात्र होता कामा नये.) अशा वस्तुस्थितीची जाणीव न ठेवता केल्या जाणार्‍या आढ्यताखोर, शेलक्या विशेषणांनी भरलेल्या तुच्छतादर्शक प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का दरवेळी आपलं मत मांडताना?

"हो SSSSSS य .... आहे. अगदी आहे. पूर्ण आहे. कारण पब्लिकली छापल्या जाणार्‍या प्रत्येक लिखाणावर माझं मत देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे." असं उत्तर मिळण्याचीच अधिक शक्यता आहे. पण वर म्हंटल्याप्रमाणे ते मत कुठल्याही भाषेत (लँग्वेज याअर्थी नव्हे पद्धत याअर्थी म्हणतोय) अगदी अपमानजनक भाषेत दिलं गेलं असल्याने मलाही उत्तर द्यावं लागलं आणि एवढं मोठ्ठं उत्तर तिथे प्रतिक्रिया म्हणून देण्यापेक्षा माझ्या ब्लॉगवरच लिहिलं तर समस्त मराठी ब्लॉगजगताला (जगातला प्रत्येक मराठी माणूस माझा ब्लॉग वाचतो असा मुर्खासारखा दावा अजिबात नाहीये इथे.) ब्लॉगविश्वाच्या बाहेर मराठी ब्लॉगर्सविषयी काय मतं आहेत ते लक्षात येईल आणि ते (आणि मीही) आपलं लेखन अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न करतील या हेतूने इथे लिहिलं. ;-)

पण कितीही झालं तरीही ब्लॉगर्सना "काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करणारे, टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडणारे, बोरिंग लिहिणारे, तेचतेच लिहिणारे, वैचारिक दिवाळखोरी असणारे, अनुभवांची/कल्पनांची वानवा असणारे, दर्जाहीन लिहिणारे" अशा पदव्या बहाल करणार्‍यांचं मराठी ब्लॉग किंवा एकूणच मराठी संस्थळांवरचं किंवा मराठी भाषेकरता दिलेलं योगदान काय आणि किती आणि तरीही अशी अपमानास्पद विशेषणं वापरण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले हे प्रश्न उरतातच !!

Tuesday, May 18, 2010

ते, तुम्ही आणि आम्ही

छत्तीसगढमधील दंतेवाडा परिसरात नक्षलवाद्यांनी पुन्हा हल्ला करून एक बस भूसुरुंगांच्या सहाय्याने उडवून दिली. आता पुन्हा सर्वसामान्य जनता चवताळून उठेल. सरकार कसे निर्लज्ज आहे, कसे निष्क्रीय आहे हे दाखवणारी अनेक लेख वृत्तपत्र, मासिकं, ब्लॉग्स, टॉक शो, चर्चासत्रं आता रंगतील. किती वर्षात किती लोक मारले गेले याच्या आकडेवार्‍या सदर केल्या जातील. आणि या सगळ्यांमुळे 'सरकार भ्याड आहे' हा लोकांचा असलेला समज अजून दृढ होईल. मी मुद्दाम समज म्हणतोय. कारण तो निव्वळ समज आहे, सत्य परिस्थिती नव्हे. सत्यपरिस्थिती तुम्हाआम्हाला, जनतेला, बहुतांशी लोकांना माहीतच नसते. आणि उगाच सगळे म्हणतात म्हणून आपणही सरकारला नावे ठेवू लागतो. पण सरकारचीही बाजू आहे. अशी बाजू की जी आपल्याला कधीच कळत नाही, दिसत नाही. या दुसर्‍या बाजूवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.

काय आहे ही दुसरी बाजू?

दुसरी बाजू जाणून घेण्यापूर्वी 'सरकार निष्क्रीय आहे, कुठलीही ठाम भूमिका घेण्यास सक्षम नाही' असे जे समज आपल्या मनात भरून दिले गेलेले असतात ते दूर सारून पूर्वग्रहदुषितपणा दूर सारून मोकळेपणाने विचार करायला हवा. २००९-१० मध्ये सरकारने नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी अमुक अमुक रुपये वापरले.

शस्त्रखरेदी : रु. अमुक अमुक
वाहन खरेदी : रु. अमुक अमुक
प्रशिक्षण : रु. अमुक अमुक
पगार : रु. अमुक अमुक
विशेष टीमच्या नियुक्तीचा खर्च : रु. अमुक अमुक

सरकार जेव्हा एवढा खर्च करते तेव्हा ते निष्क्रीय आहे किंवा त्याला लोकांच्या मागण्यांची जाण नाही, भावनांची कदर नाही असे कसे म्हणता येईल? उलट सरकार नक्षलवादी चळवळीचा समूळ निषेध करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी सरकार वेगवेगळया योजना आखत आहे. पण त्या योजनांचे दृष्य परिणाम प्रत्यक्षात दिसण्यासाठी अजून काही वर्षं वाट पहावी लागेल. नक्षलवादाच्या चळवळीचा जन्म झाल्यापासून सुरुवातीची काही वर्षं सोडली तर उलट ती उत्तरोत्तर निकामी करण्यातच सरकारला यश आले आहे. ते कसे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला आधी नक्षलवादी चळवळीची सुरुवात कशी झाली हे पाहायला लागेल.

नक्षलवादाची सुरुवात

सुमारे अमुक अमुक रोजी, अमुक अमुक या जंगलात, अमुक अमुक आणि तमुक तमुक या दोन तरुणांनी त्यावेळच्या सत्तेच्या, जमिनदारीच्या, फसवेगिरीच्या विरोधात एक जालीम पाऊल म्हणून आणि निर्धन शेतकरी, भूमिपुत्र यांना मदतीचा हात देण्यासाठी ही चळवळ सुरु केली. त्या चळवळीचा इतिहास पुढील प्रमाणे

--------
--------
--------
------
-------
--------

तर हा झाला नक्षलवादाचा इतिहास. हा इतिहास पाहिल्यावर नक्षलवाद उत्तरोत्तर निकामी करण्यात सरकारला कसे यश आले आहे ते आपण बघू.

आकडेवारी

कालावधी : १९८१-९०
हल्ले : १२२
मृतांची संख्या : अंदाजे ४७३
मृत पोलिसांची संख्या : --
मृत स्त्रियांची संख्या : --
मृत मुलांची संख्या : --

कालावधी : १९९१-२०००
हल्ले : ११५
मृतांची संख्या : अंदाजे ४२७
मृत पोलिसांची संख्या : --
मृत स्त्रियांची संख्या : --
मृत मुलांची संख्या : --

कालावधी : २००१-२०१०
हल्ले : १०२
मृतांची संख्या : अंदाजे ३९८
मृत पोलिसांची संख्या : --
मृत स्त्रियांची संख्या : --
मृत मुलांची संख्या : --

तर या आकडेवारीवर बारकाईने नजर फिरवल्यास एक गोष्ट लक्षात येते की विरोधक कितीही काहीही म्हणत असले तरी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांची आणि त्यातील मृतांची कमी कमी होत चालली आहे हे नक्की. आणि अर्थात हे सरकारी आकडे आहेत त्यामुळे शंका घ्यायला वाव नाहीच. अशा वेळी सरकारच्या डावपेचांवर अविश्वास न दर्शवता सरकारला अधिकाधिक पाठिंबा देणे हे आपलं कर्तव्य आहे जेणेकरून सरकारला वाटाघाटी करून, चर्चेने प्रश्न सोडवायला मदत होते. या अशा वारंवार केल्या जाणार्‍या सरकारच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन गेल्या तीस वर्षात जवळपास १४ नक्षलवाद्यांनी शस्त्रं खाली ठेवून शरणागती पत्करली आहे. अशा अजून काही चर्चांच्या फेर्‍या उत्तरोत्तर घडत गेल्या की शस्त्रं खाली ठेवणार्‍या नक्षलवाद्यांची संख्या वाढत जाईल हे नक्कीच. फक्त त्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यायला हवा.

आपण काय करतो? आपण काय करायला हवं?

हल्ली सरकारला नावं ठेवून, सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका करून, सरकारच्या कामाचं, मर्यादित का होईना पण मिळालेल्या यशाचं कौतुक न करता सरकारवर हल्ला करायची फॅशनच आहे. पण अशा वेळी आपण काही प्रश्न स्वतःला विचारायला हवेत.

आपण काय करतो? :

सरकारच्या धोरणांवर टीका करतो.
सरकारच्या पद्धतीवर हल्ला करतो.
सरकारला नावं ठेवतो.

आपण काय करायला हवं?

सरकारची भूमिका जाणून घ्यायला हवी.
चर्चा आणि वाटाघाटींचे दुरगामी परिणाम लक्षात घ्यायला हवेत.
सरकारला पाठिंबा द्यायला हवा.
जनमानसात सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

**

बस झालं च्यायला. पुन्हा एकदा झालेल्या नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यानंतर विविध तथाकथित बुद्धिवादी, विचारवंत, स्तंभलेखक आणि लाखो रुपडे घेऊन 'पेड न्यूज' छापणारे तथाकथित निर्भीड संपादक यांच्या दृष्टीकोनातून लिहायचा विचार करत होतो. तेवढ्यात चिदुभाऊं नक्षलवाद्यांकडे ७२ तास हल्ला न करण्याची मागितलेली भीक नजरेस पडली. आणि त्यानंतर तर खात्रीच झाली की असे काही लेख येतीलच. (अजून आलेले नाहीत.. म्हणजे निदान मी तरी वाचलेले नाहीत. पण पैसे घेऊन किंवा ना घेताही सरकारच्या चुकीच्या गोष्टींचीही भलामण करणारा एक मोठा वर्ग अस्तित्वात आहे.). वरची बडबड लिहिताना सुरुवातीला अवघड जाईल असं वाटलं होतं. पण नंतर लक्षात आलं की हे काही अवघड नाही. थोडा मेंदू बाजूला ठेवून, भावनाशून्य बनून, विचारांना फाटा देऊन लेखणी सरसावली की सगळं शक्य आहे. आणि आपलं मत अजून पटवून द्यायला उगाच जुना इतिहास द्यायचा, आकडेवार्‍या छापायच्या, सरकारने आत्तापर्यंत यांवर किती खर्च केला आहे ते दुकानात किमतीची लेबलं लावली असल्याप्रमाणे द्यायचं, प्रत्येक जीवाला किंमत आहे हे साळसुदपणे विसरून जाऊन मृतांची संख्या कशी ३/५/९/१३ अशा कुठल्याही आकड्याने कमी झाल्याचं दाखवायचं आणि त्यायोगे सरकारची भूमिका कशी बरोबर आहे हे लोकांच्या मनात ठसवण्याचा उगाच प्रयत्न करायचा.
अरे तुम्ही किती खर्च केलात याच्याशी काय घेणंदेणं आहे सामान्य माणसाला? अजूनही आदिवासी, पोलीस, इतर निष्पाप मारतायत एवढंच दिसतंय आम्हाला. तुम्ही गणित कसं सोडवता, किती हातचे घेता, कुठली पद्धत वापरता याच्याशी आमचा सबंध नाही. आम्हाला योग्य उत्तर मिळालं पाहिजे. सुभाषबाबू म्हणाले होते "इंग्रजांशी लढून भारतमातेला मुक्त करण्यासाठी मला सैतानाची मदत घ्यावी लागली तरी ती मी आनंदाने घेईन." तद्वत कुठलीही पद्धत वापरा पण या नक्षलवाद्यांचा बिमोड करा. पुरता बंदोबस्त करा. उगाच "लष्कराची मदत घेणार नाही, पोलीस सक्षम आहेत" च्या टिमक्या वाजवत बसू नका.

आणि हल्ली तर अजून एक प्रॉब्लेम झालाय च्यायला. असं सरकारला प्रश्न विचारायला लागलं की उलट आपल्यालाच प्रश्न विचारले जातात "हल्ली तर काही झालं की सरकारला नावं ठेवायची फॅशनच आहे. पण तुम्ही स्वतः काय करताय?" सरकारच्या निष्क्रीयपणावर वार केले की हे "आपण काय करतोय" वाले प्रश्न हमखास विचारले जातात. त्याने तर डोकं अजून किटतं... अरे !!!! आता नक्षलवाद्यांना तोंड द्यायला सामान्य माणसाने जंगलात उतरावं अशी अपेक्षा आहे की काय तुमची?

या असल्या लोकांना एक प्रश्न विचारावासा वाटतो मला. नक्षलवादी, अतिरेकी हल्ल्यांमध्ये तुमच्या घरचे/नातेवाईक/मित्रमंडळी यातलं कधी कोणी मृत सोडा साधं जखमी तरी झालं आहे का? साधं खरचटलं तरी आहे का कोणाला? की स्वतःच्या जवळच्या कोणाचा जीव गेल्याशिवाय तिथे नक्षलवाद्यांच्या गोळ्यांना बळी पाडणार्‍या जीवांची किंमत कळणार नाहीये तुम्हाला?

सरकारला तर असंख्य प्रश्न आहेत.

१. अजून किती बळी गेल्यावर शस्त्रसंधीच्या भिका मागणं सोडून काहीतरी कडक उपाय योजण्याचा विचार आहे तुमचा?
२. अजून किती दिवस नक्षलवाद्यांना अतिरेकी न संबोधता त्यांना भारताचे नागरिक म्हणण्याचं ठरवलं आहेत तुम्ही?
३. अजून किती पोलीस ठार झाल्यावर (आणि तेही हालहाल होऊन) लष्करी कारवाई करण्याचा विचार आहे तुमचा?
४. अजून किती गावं, जिल्हे, राज्य नक्षलवाद्यांच्या हातात गेल्यावर जागे होणार आहात तुम्ही?
५. अजून किती लाख/कोटी रुपये आणि शस्त्रास्त्रांची मदत इतर अतिरेकी गटांकडून त्यांना होतेय हे सिद्ध झाल्यावर तुम्ही त्यांना अतिरेकी ठरवून त्यांचा बिमोड करण्याचा विचार करणार आहात?
६. अजून किती निष्पाप आदिवासींचे जीव जाईपर्यंत काही ठोस कृती न करता फक्त नक्षलग्रस्त प्रदेशाच्या हवाई टेहळण्या करण्याचा विचार आहे तुमचा?

एकदा देऊनच टाका सगळी उत्तरं. म्हणजे मग हे सगळे आकडे सर होईपर्यंत, तुमच्या पापांचे घडे भरेपर्यंत, तुमच्या कोडगेपणावर आणि षंढपणावर प्रश्नचिन्हं उमटवण्याचं धाडस करणार नाही आम्ही. जगत राहू तुमच्यासारखेच स्वतःपुरताच विचार करत, स्वतःच्याच विश्वात मग्न होत !!!

Thursday, May 13, 2010

दृष्टीचे कोन !!

काल संध्याकाळी घरी येण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो. नेहमीप्रमाणे ग्रिशम वाचायला घेतलं. तेवढ्यात मागून दोन माणसांचा मोठा आवाज ऐकू आला. ओरडल्यासारखा. आरडाओरडा नव्हता किंवा भांडणही नव्हतं. पण जरा भाषण दिल्यासारखं. न बघताच माझ्या लक्षात आलं की हे कोण असणार ते. इथे ट्रेन्स मध्ये,

प्लॅटफॉर्मवर, स्टेशनच्या बाहेर बरेचदा आफ्रिकन-अमेरिकन लोक उभे असतात. अगदी ढगळ आणि एकावर एक घातलेले भरपूर कपडे, गळ्यात जाड माळा, बोटांत भरपूर अंगठ्या, एका खांद्याला मोठ्ठी बॅग, हातात बायबल आणि तोंडाने "झिजस लव्हज यु" चा जयघोष. तसंच मधे मधे बायबलमधले उतारे वाचून दाखवतात. पण हे सगळं प्रचंड मोठ्ठ्या आवाजात, घशाच्या शिरा ताणून चालू असतं. तर हे दोघे त्यापैकीच एक असणार हे लक्षात आलं. पुस्तक वाचत असताना शेजारचे लोक मोठ्याने बोलत असतील तरी माझी चिडचिड होते आणि त्यात हे असे जयघोष करणारे लोक आपल्याच डब्यात आले की ती चिडचिड शिगेला पोचते. पुढच्या स्टेशनला डबा बदलणे किंवा शांतपणे सहन करणे हे दोनच पर्याय असतात. पण माझा जाम इंटरेस्टिंग चाप्टर चालू होता आणि तो वाचल्याशिवाय चैन पडलं नसतं म्हणून पुढच्या स्टेशनला डबा बदलू असं ठरवून मी तसंच वाचायला लागलो.

त्या दोघांची बडबड चालूच होती. अचानक ते क्षणभर थांबले आणि एकदम मृदुंगाची थाप ऐकू आली आणि त्याच्या मागोमाग झांजेचा मंजुळ आवाज. काहीतरी वेगळं आहे हे जाणवतंय तोवर पुन्हा ग्रिशमने ताबा घेतला. आणि अचानक अमेरिकन अक्सेंटमध्ये "हरे राम्मा हरे राम्मा हरे क्रिश्ना हरे क्रिश्ना" सुरु झालं. सलग दोन वेळा ते म्हणून झालं की पुढच्या ओळींना चाल बदलत होती. असं सतत चालू होतं. आता मात्र मला राहवेना. मी मान वळवून बघितलं. साधा पांढरा झब्बा आणि (चक्क) धोतर अशा वेशात दोन आफ्रिकन-अमेरिकन माणसं बसली होती. दोघेही साधारण पंचेचाळीस-पन्नाशीचे वाटत होते. एकाच्या हातात मृदुंग होता आणि एकाच्या हातात झांजा. दोघेही इस्कॉन वाले असणार नक्की. तोंडाने सतत "हरे राम्मा हरे क्रिश्ना" चालूच होतं. वेगळं वाटत होतं ऐकायला. पण मी 'आर्ट ऑफ लिव्हिंग' च्या मंडळींची भजनं ऐकली आहेत अनेकदा. त्यामुळे 'राम्मा, क्रिश्ना' च्या उच्चारांचं काही वाटलं नाही. ते वेगवेगळया चालीत, मृदुंग आणि झांजेच्या साथीने ऐकायला छान वाटत होतं.................  अचानक चमकलो !!!!!!!! 

क्षणभरापूर्वी त्या सुरुवातीच्या कोलाहालाला वैतागलेलो मी काही क्षणातच त्याचा आनंद घ्यायला लागलो होतो. कशामुळे हे? त्यांचं गाणं, भजन एवढं सुश्राव्य होतं का? नक्कीच नाही. मी धार्मिक, हिंदुत्ववादी आहे का? हो.. नक्कीच.. थोडाफार.. पण जोवर त्याच्याआगेमागे कट्टर, हाडाचा, जहाल वगैरे लागत नाही तोवरच. या "हरे राम्मा हरे क्रिश्ना" ऐवजी "झिजस लव्हज यु" असतं तरी मला ते तेवढंच आवडलं असतं का? सांगता येत नाही.. कारण ते मी ते हळुवार, मंजुळ आवाजात, आरडाओरड्याशिवाय कधीच ऐकलेलं नाही. निदान ट्रेन मध्ये तरी. आणि खरंच हळुवार, सुश्राव्य आवाजात असतं तरी आवडलं असतं का?? सांगता येत नाही. तेव्हा मला नक्कीच ग्रिशमच आपलासा वाटला असता... अचानक आपल्या मुंबईच्या ट्रेनमधली टाळ-मृदुंगाच्या संगतीने "जय जय राम कृष्ण हरी" करणारी भजनी मंडळी आठवली. सुरुवातीला काही दिवस त्यांची गाणी जरा तरी बरी वाटायची, पण हळूहळू त्या अशक्य कोलाहलाला कंटाळून जाऊन मी त्यांच्या डब्यापासून कसा लांब जाऊन बसायला (उभा राहायला) लागलो तेही आठवलं. तेही एक प्रकारचं (खरं तर मूळचं आणि आपल्याला जवळचं असणारं) "हरे राम्मा हरे क्रिश्ना"च. पण त्याच्यापासूनही मी पळून जाणंच पसंत केलं होतं. इथेही "झिजस लव्हज यु"वाल्या आरडाओरड्याचाही तिटकाराच वाटला कायम. पण हे "हरे राम्मा हरे क्रिश्ना" मात्र अगदी आवडलं वगैरे नसलं तरी छान वाटलं. कशामुळे? कल्पना नाही.. कोडंच आहे.

क्षणभराच्या त्या "हरे राम्मा हरे क्रिश्ना" ने हिंदुत्ववादी, धार्मिक, "झिजस लव्हज यु" व्हाया "जय जय राम कृष्ण हरी" असा प्रवास करत करत वेगवेगळया दृष्टीकोनातून विचार करायला भाग पाडलं.... कोडं मात्र उलगडलं नाही.. !!

Tuesday, May 11, 2010

सुंदर माझं घर !!


कसलं बायकी नाव वाटतंय ना. लेख मात्र बायकी नाही. पुर्षी आहे. पुर्षाने लिहिला आहे म्हणूनही आणि पुर्षावर लिहिला आहे म्हणूनही....... चला आजचा पांचटपणाचा कोटा संपला. (जास्त जोरात हुश्शकारू नये. तुमच्या हुश्श्कार्‍यांच्या (सुस्कार्‍यांच्या चालीवर) आवाजाने आम्हाला अजून पांचट लिहिण्याचा मोह झाल्यास त्याला समस्त पुर्षी मंडळी (म्हणजे सदरहु लेखातली) जवाबदार नाहीत)....  जाऊदेत. ऑन अ सेकंड थॉट, सव्वा (कंस धरून सव्वा) वाक्यांपूर्वी  सोडलेला संकल्प आम्ही मागे घेत आहोत. कारण लिहीत असताना वेळोवेळी पाउल सांभाळणे (घाबरू नका.. पांचटपणा या अर्थी म्हणतोय मी) अंमळ कठीणच जाईल असे आजवरच्या एकूण अनुभावरून दिसते आहे. (जास्त जोरात अरेरू नये. आधीचे हुश्श्कारे आणि आताचे 'अरेरे' हे एकाच व्यक्तीचे आहेत हे आम्ही आवाजावरून ओळखू शकतो. तेव्हा सांभाळून.) असो. पुणेरी पाट्या संपल्या.. आता मूळ मुद्द्याकडे वळू.

आटपाट नगरातल्या 'सुंदर माझ्या घरात' सगळं नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होतं.

१. बायकोने डायनिंग टेबलच्या खालून पातेलं उचललं, हॉलच्या एका कोपर्‍यातून डाव उचलला.
२. लपवून ठेवलेली सुरी हळूच बाहेर काढून पटकन भाजी चिरली आणि पुन्हा पटकन सुरी लपवून ठेवली.
३. हॉलमधून हिंगाची आणि मिठाची डबी आणली आणि भाजीत हिंग, मीठ घालून पुन्हा जाग्यावर (म्हणजे हॉलमध्येच) ठेवून दिली.
४. मी बेडरूम मधून टूथपेस्ट घेतली आणि ब्रशवर लावून पुन्हा जाग्यावर (म्हणजे बेडरूममधेच) ठेवून दिली.
५. दात घासून बाहेर आल्यावर मी मगाशी आत जाताना शिताफीने चुकवलेल्या टॉयलेटपेपरच्या गुंडाळीत पाय अडकून धडपडलो.
६. हॉलमध्ये येऊन सोफ्याखालून मोबाईल उचलून २-३ फोन केले. फोन झाल्यावर मोबाईल पुन्हा सोफ्याच्या खाली ठेवून दिला.

नाही.. यातलं एकही वाक्य आणि त्यांच्या (आणि वस्तूंच्याही) जागा चुकलेल्या नाहीत. सगळं अगदी जागच्या जागी आहे व्यवस्थित. आणि सुरुवातीला थोडं अवघड गेलं असलं तरी आता आम्हालाही त्याची एकदम छान सवय झालेली आहे. कोण म्हणतं सवयी बदलणं कठीण आहे? सव्वा वर्षाचा युवराज मॅनेज करत असलेल्या कुठल्याही घराच्या आणि घरच्यांच्या सवयी या अश्शा चुटकीसारख्या बदलू शकतात. बदलाव्याच लागतात. नाहीतर इतकी वर्षं करतोय तसं बाथरूममधल्या छोट्या ब्रशहोल्डर मधून ब्रश आणि पेस्ट घेऊन दात घासून झाल्यावर तिथेच ठेवायला आणि रोज सकाळी तिथूनच परत घ्यायला कोणाला आवडणार नाही? हिंग मिठाच्या डब्या त्यांच्या स्वयंपाकघराच्या नेहमीच्या जागी सापडल्या तर कुठल्या गृहिणीला आवडणार नाहीत? स्वयंपाकाचं पातेलं, डाव, झारा, चमचा अशा वस्तू चमचाळ्यातून घ्यायला आणि तिथेच ठेवायला कोणाला आवडणार नाहीत? मोबाईल टेबलवर किंवा टीपॉय वर सापडला तर कित्ती मज्जा येईल. टॉयलेटपेपरची लांबच्या लांब गुंडाळी बेडरूम, किचनपर्यंत न येता बाथरुमात तो त्याच्या योग्य स्थळी अर्थात टॉयलेटपेपरहोल्डर वरच विसावला तर काय बहार येईल.

उगाच किती त्या अपेक्षा ठेवतो आपण आणि त्या अपेक्षांच्या गुंत्यात (मी जसा टॉयलेटपेपरच्या गुंडाळीत अडकतो तसे) उगाच अडकून बसतो. कारण खरं पाहता या सगळ्या वस्तू आपापल्या जागी असल्याच पाहिजेत असा नियम का? आणि 'आपापली जागा' च्या आपल्या व्याख्येत आणि युवराजांच्या व्याखेत जमीन आस्मानाचं नाही तरी निदान बाथरूम ते बेडरूम एवढं अंतर तरी नक्कीच असतं.

आता आमच्याकडेच बघा ना. सकाळी युवराज उठले की बेडरुमीतून थेट हॉलच्या दिशेने धावत सुटतात, आवरलेला हॉल (दिवसभर पोराने केलेला सगळा पसारा आम्ही आवरून ठेवतो आणि मगच झोपतो हे सांगण्याचा सुप्त उद्देश या वाक्यात आहे असं जर कोणाला वाटत असेल तर ते १०१% खरं आहे.) बघून क्षणभर आम्हाला (आई किंवा बाप जो त्याच्या नजरेच्या तावडीत सापडेल त्याला) खुन्नस देतात, दुसरा तुच्छ कटाक्ष कोपर्‍यात विसावलेल्या खेळण्यांच्या बास्केटकडे टाकतात, त्यात विसावलेल्या कुत्रे, मांजरी, ससे, अस्वलं, गायी, बैल, बॉल, बॅट, गेम्स, विमानं, छोटी पुस्तकं, गाड्या, खुळखुळे, जोकर्स, रिंगा, ठोकळे, हेलीकॉप्टर यांना त्या बास्केटमधून दणादणा बाहेर काढतात आणि... आणि.. आणि त्याक्षणी काय होतं काही माहित पण निवडणुका संपताक्षणी जनतेकडे दुर्लक्ष करणार्‍या नेत्यांच्या थाटात आमच्या बाळासाहेबांचा (राजकारणाच्या उपमेला थोडं शोभेसं नाव नको का) ती खेळणी बास्केटमधून बाहेर भिरकावून लावून घरभर पसारा करून झाल्या झाल्या त्या खेळण्यांच्या राशीमधला इंटरेस्ट संपतो. (नक्की नेता होणार मोठेपणी.) आणि त्यानंतर त्या तुच्छ जीवांना, बाहुल्यांना, गाड्यांना तुडवत, लाथाडत '३००' मधल्या शूर योद्ध्यांप्रमाणे युवराज (मगासचं उदाहरण संपलं. म्हणून पुन्हा मूळ नाव) दणादण पावलं टाकत किचनच्या दिशेने प्रस्थान करतात. त्यांच्यामागे आम्ही हळू हळू सांभाळून पावलं टाकत कुठलंही खेळणं (आणि तंगडंही.. हे मुख्य) न मोडता चालण्याचा प्रयत्न करतो.

अ. तुम्ही 'मि. नटवरलाल' बघितलाय का? त्यात शेवटच्या प्रसंगात विक्रम (पक्षि अमजद) नटवर (पक्षि अमिताभ) ला, त्याच्या हिरविणिला (रेखा. पक्ष्याचं नाव आठवत नाही) आणि काही गाववाल्यांना एका गुहेत कोंडून ठेवतो. गुहेच्या बाहेर जमिनीच्या खाली बॉम्ब्स पेरून ठेवतो आणि स्वतः लाल चष्मा लावून जमिनीखालचे बॉम्ब्स शिताफीने चुकवून निघून जातो. त्यानंतर अमिताभ दाराचं कुलूप फोडून ('मी आणि माझा शत्रुपक्ष' मधल्या घोड्यासारखं तेही मरतुकडंच तर असतं खरं तर.. तरीही), त्या कैदेतून बाहेर पडतो. "पण त्याच्याकडे लाल चष्मा नसल्याने जमिनीखालचे बॉम्ब्स (अर्थात न दिसणारे) त्याला कसे दिसणार बरं आता?" छापाचे प्रश्न आपल्याला पडतात न पडतात तोच नटवर आयडियेची कल्पना लढवतो आणि विक्रमच्या बुटांच्या ठशांवर पाय ठेवून अगदी सावधपणे आणि शिताफीने बॉम्ब्स चुकवत गुहेच्या बाहेर पडतो.

(एवढं करण्यापेक्षा विक्रम त्यांना तिथेच मारून का टाकत नाही, एवढं मरतुकडं कुलूप का लावतो, लाल चष्म्याने जमिनीखालचे बॉम्ब्स दिसू शकतात का वगैरे वगैरे प्रश्न विचारू नयेत.)

आ. तुम्ही तुफ्फान पाऊस पडून गेल्यावर कधी डोंबिवलीच्या रस्त्यातून हिंडला आहात का? किंवा जनरलच पावसाळ्यात डोंबिवलीत फिरला आहात का? प्रत्येकजण एका हातात छत्री आणि दुसर्‍या हाताने जीन्स/पँट्स/साड्या/सलवारी पावलापासून वर करून, नजर जमिनीला खिळवून ठेवून, हलकेच एकेक पाऊल टाकत, रस्त्यावरचा चिखल, पाणी, डबकी, घाण शिताफीने चुकवत चुकवत जाताना दिसतो.

(डोंबिवलीत अजूनही पाणी साठतं का, अजूनही चिखल होतो का, मग महापालिका रस्ते दुरुस्त का करत नाही वगैरे वगैरे प्रश्न विचारू नयेत.)

युवराज ताडताड निघून गेल्यावर आम्ही त्यांच्या मागे जाताना कशी सावरत, सांभाळत, सावकाश पावलं टाकत जातो याचं अगदी चित्रमय वर्णन करण्यासाठी आणि चं प्रयोजन होतं. (बाकी मीही डोंबिवलीचाच आहे. आणि त्या चिखलाचा मला अभिमानही आहे कारण त्या सवयीमुळेच मी आज (माझ्याच) घरात कितीही पसार्‍यात निर्भयपणे चालू शकतोय. तेवढंच एक वाईटात चांगलं.) विषयांतराबद्दल (नेहमीप्रमाणेच) क्षमस्व. तर असे तीन 'सा' लावत आम्ही किचनात पोचेपर्यंत तिथल्या ट्रॉल्या, ड्रॉवर्स उघडले गेलेले असतात. त्यातून हिंग, मीठ, मसाल्याच्या डब्या (आठवतंय?) बाहेर येतात. पातेली, चिमटे, चमचे, डाव, कालथे, गाळणी आपापल्या जागा सोडतात. अशा रीतीने समस्त वस्तू अस्ताव्यस्त करून झाल्या की विक्रमची स्वारी बेडरूमीच्या दिशेने वळते. चार्जिंगला लावलेला मोबाईल खेचला जातो, धुतलेले कपडे धुण्याच्या कपड्यात आणि व्हाईसव्हर्सा ("याला मराठीत समर्पक प्रतिशब्द काय?".. हा मला आत्ता लिहिताना पडलेला प्रश्न आहे. विक्रमला तो प्रश्न पडण्याची आवश्यकता भासत नाही.) केले जातात. त्यानंतर बेडरुम, किचन, हॉल अशा अनेक फेर्‍या घडतात, अनेक वस्तूंचं (अर्थात जबरदस्तीने) स्थलांतर केलं जातं, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात रहात नाही (पायपुसणं धुतलेल्या कपड्यांच्या ढिगात बघितलं की हा वाक्प्रचार अक्षरशः जिवंत झाल्यासारखा वाटतो मला.). अचानक काहीतरी राहून गेल्याचं आठवून सिकंदराची स्वारी बाथरूममध्ये धडक देते. टॉयलेटपेपरच्या रोलवर घाव घातला जातो. तो एका हातात धरून खेचत खेचत मधल्या पॅसेजमधून बाहेर येऊन त्याची बेडरूमपर्यंत वरात काढली जाते. त्या कागदाच्या ढिगावर वर्चस्व प्रस्थापित करून झालं की कंटाळा येतो. मग पुन्हा किचन, हॉल, बेडरुम अशा फेर्‍या घडणं सुरु होतं.

तर हे असं चालू आहे अनेक दिवस. (आणि बाहेरच्या जगाला त्याचा पत्ताही नाही. जरा कोषातून बाहेर निघा आपापल्या ;-) ) पहिल्या दिवशी आवरलं, दुसर्‍या दिवशी (स्वतःला) सावरलं आणि पुन्हा आवरलं. आणि असं करता करता हे रोजच व्हायला लागलं हो. आणि त्यामुळे बाकीची कामं (म्हणजे नवीन पोस्ट्स लिहिणे, इतरांच्या पोस्ट्स वाचणे, मेलामेली करणे, बझ-बझ खेळणे वगैरे वगैरे) सोडून सारखं घरच आवरत बसायला लागायला लागलं. आधीच आम्ही 'कं'ग्रस्त आणि त्यात ही सततची आवराआवरी करून अजूनच कं यायला लागला आणि आम्ही निर्णय घेऊन टाकला. 'ठेविले अनंते तैसेची रहावे' अर्थात युवराजांनी वस्तूंना जसं आणि जिथे ठेवलं आहे तसंच आणि तिथेच राहू द्यावं आणि अगदी खरं सांगतो 'चित्ती असो द्यावे समाधान' वालं समाधान आम्ही अगदी स्वानुभवाने उपभोगायला लागलो. त्यामुळे वर दिलेलं १ ते ६ (अजूनही बरेच आहेत. आत्ता एवढेच आठवले) ची आता आम्हाला सवय झाली. सुरुवातीला जड गेलं पण आता काही वाटत नाही. मसाल्याच्या डब्या हॉलमधेच असणार, स्वच्छ कपडे धुवायला टाकलेल्या कपड्यांमध्येच मिळणार, मोबाईल सोफ्याखालीच सापडणार वगैरे वगैरेची आम्हाला एवढी सवय झाली की काहीच वेगळं वाटेनासं झालं.. अगदी अंगवळणी पडलं. आणि आता अगदी आपल्यात म्हणून सांगतो.. पातेलं, डाव, चमचे हॉलमध्ये असलं, किंवा टूथपेस्ट बेडरुममध्ये असली किंवा मोबाईल सोफ्याखाली असला की कसं बरं पडतं. म्हणजे चमचा शोधताना उगाच भांड्यांचा अख्खा ढीग शोधायला नको किंवा चमचाळ्यातली गर्दी हटवायला नको.. सोफ्यावर बसल्या बसल्या सोफ्याखाली हात घातला की मिळाला मोबाईल उगाच त्यासाठी टेबल/ड्रॉवरपर्यंत जायला नको. थोडक्यात फायदे अनेक आहेत फक्त आपल्या (वाईट) सवयी थोड्या बदलाव्या लागतील. आहात तयार?

तळटीप : वर्णन अधिक वास्तवदर्शी वाटावं (कारण ते वास्तवच आहे) म्हणून पुराव्यादाखल घरातल्या पसार्‍याचे फोटो टाकणार होतो परंतु बायकोच्या धाकाने ते आवरतं घेतलं आहे.

Sunday, May 9, 2010

आजचा उचक्या-भूकंप

प्रिय महेंद्र काका, रोहन, कांचन, तसंच त्यांना भरपूर मदत केलेल्या आणि मेळाव्याला हजर असणार्‍या माझ्या प्रिय ब्लॉगु-ब्लगिनींनो,

नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार दासावा येथे झालेल्या ब्लॉगर्स-उचक्यांरूपी भूकंपाचे केंद्र अमेरीकेतील नवीन जर्सी येथे आहे. या घटनेचा सखोल मागोवा घेण्याचे काम चालू आहेच तरीही प्राथमिक शक्यतेनुसार मेळावा चालू असेपर्यंत आणि त्यानंतरही अनेक तास/दिवस हा उचक्या-भूकंप चालू रहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या उचक्या-भूकंपाची तीव्रता आणि वारंवारता कमी करण्याचा एकमेव प्रभावी उपाय म्हणजे भूकंपाची (मेळाव्याची) छायाचित्रे, चलतचित्रे, अहवाल ताबडतोबीने ब्लॉग्सवर टाकण्याचे करावे. सध्या तरी या उचक्या-भूकंपाची तीव्रता कमी करण्याचा हा एकमेव उपाय तज्ज्ञांस ज्ञात आहे. असो.

आता जरा घट्ट टंकतो. घट्ट म्हणजे पांचटपणा कमी करून या अर्थी. :-)


अतीव इच्छा असूनही मेळाव्याला प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही तरी कुठल्यातरी मार्गे मेळाव्याशी जोडून घेण्याचा, तुम्हा सगळ्यांशी एकतर्फी का होईना संवाद साधण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न !! बाकी, भरपूर मजा करा, चिक्कार गप्पा मारा, भरभरून अनुभव सांगा आणि हे सगळं अगदी आठवणीने ब्लॉगवर टाकायला विसरू नका. फोटो टाका, व्हिडिओ टाका, पोस्ट्स टाका. तुम्हाला दिसलेला, रुचलेला, भावलेला, पटलेला हा मेळावा प्रत्येकाच्या नजरेतून बघायला मला आणि अर्थातच इच्छा असूनही इथे हजर राहू न शकलेल्या प्रत्येकालाच आवडेल. प्रत्येक ब्लॉगरच्या मेळाव्याच्या संदर्भातल्या पोस्टला मी आवर्जून प्रतिक्रिया देईन नक्की :-)

असो.. खूप बडबड झाली. मी तनाने इथे असलो तरी मनाने तुमच्या सगळ्यांच्या बरोबरच आहे. अजून काय लिहू !!! पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. !!

Friday, May 7, 2010

(((((...))))) ( किंवा कं(स) )

१.
हल्ली (तसं म्हटलं तर ब्लॉग सुरु केल्यापासून असं नाही, आधीपासूनच) मला (इतरांबद्दल बोलण्याचं आपल्याला काय प्रयोजन?) असं (तसं, वगैरे वगैरे) जाणवायला (आम्हालाही जाणवतात गोष्टी. जाणीवा जागृत आहेत आमच्याही) लागलं (जास्त जोरात नाही पण अगदी हळूही नाही) आहे (?.. खरं तर नाही. पण लोकांनी नाही नाही ते बोलून भाग पाडलं आम्हाला विचार करायला) की (!) मी (खरं तर आम्ही लिहायला पाहिजे होतं पुन्हा, पण पुन्हा लोकं विचारतात की आम्ही म्हणजे कोण कोण. घ्या काय बोलणार यावर आता !!) कंसांचा (मामा, मला वाचवा) फारच (हेही खरं तर खोटं आहे. पण लोकेच्छेचा मान राखून आम्ही (या आम्ही बद्दल आधीच स्पष्टीकरण दिलेलं आहे. आठवा (म्हणजे लक्षात घ्या या अर्थी) आठवा (एकाच अर्थाचा शब्द लागोपाठ दोनदा वापरण्यात काय हशील. तेव्हा या शब्दाचा अर्थ अर्थातच (अर्थ अर्थ द्विरुक्ती झाली रे :( ) आठ क्रमांकाचा या अर्थी आहे) कंस..)) तो शब्द जसाच्या तसा (कारण लोकांच्या शब्दात बदल करून छापणे आमच्या स्वभावात बसत नाही !!) ) अवाजवी (खरं तर हेही आम्हांस मान्य नाही. कारण वाजवी/अवाजवी हे कितीही झालं तरी सापेक्ष नाही का?) वापर (यात कुठलाही आप-पर भाव नाही.) करायला (करायला गेलो एक आणि झालं .... !!) लागलो (त्याने एवढं काही बिघडलं नाही म्हणा) आहे (खरं तर नाहीच... !!). त्यामुळे (काय काय करावं लागतं बघा !!) निदान (जमेल का?) एकतरी (ओवी अनुभवावी) सलग (आणि सजग) वाक्य (अनेकही चालतील. पण आधी एक तरी जमलं की मग पुढचं बघू.) बिनाकंसांचं (हाय हाय रे दुर्दैवा) लिहायचं (पक्षि टंकायचं) असं (च) ठरवून (वचने किं दरिद्रता) प्रयत्न ((प्र)यत्न तो देव जाणावा) केला (झाला एकदाचा). बघा (उर्फ वाचा) जमलंय (जमलंय जमलंय) का (इथे का हा प्रश्नार्थक नाही. विध्यर्थ म्हणून वापरला आहे.) !!

एक अक्षरही कळलं नसणार याची मला खात्री आहे. ही पोस्ट टंकायला सुरुवात करताना खरं तर मला असं म्हणायचं होतं की

२.
हल्ली मला असं जाणवायला लागलं आहे की मी कंसांचा फारच अवाजवी वापर करायला लागलो आहे. त्यामुळे निदान एकतरी सलग वाक्य बिनाकंसांचं लिहायचं असं ठरवून प्रयत्न केला. बघा जमलंय का !!


पण एकदा टंकायला लागलो की अनंत विचार मेंदूची द्वारं फोडून झिरपत झिरपत बोटांमार्गे कधी कीबोर्डवर उमटतात कळत नाही आणि बघता बघता स्क्रीनवरचं वाक्य (अ)शक्य (अ)वाचनीय  होतं. (आता हेच बघा ना. खरं तर 'अशक्य अवाचनीय' असं लिहायचं होतं. पण सवयीने दोन्ही '' कंसात गेले चुकून :( (हा कंस नाही, रडका स्मायली आहे... रडका स्मायली. कसला विरोधाभास आहे नाही? )). तरी बरं मी साधे सोप्पे कंसच वापरतो. ते महिरपी आणि चौकोनी कंस आपल्याला झेपतच नाहीत. आपले साधे सोपे. आधी जेवढे उघडलेत (शक्यतो न चुकता) तेवढेच शेवटी मिटायचे ;-) (पुन्हा एकदा.. हा कंस नाही. हा 'डोळे मिचकावू' स्मायली आहे. चला सुदैवाने यात विरोधाभासही नाही..)

असो. तर १ आणि २ वाचल्यावर तुम्हाला कळलंच असेल की कंसांचे कसे अनंत फायदे, उपयोग आहेत. एकाच वेळी मनात उत्पन्न होणार्‍या असंख्य कल्पनांना शब्दबद्ध करून ब्लॉगावर टाकणं हे कंसांशिवाय कसं अशक्य आहे. (अजूनही कळलं नसेल तर १ आणि २ पुन्हा वाचून बघा आणि कळेपर्यंत वाचत रहा. आणि तरीही नाही कळलं तर काय करायचं ते मी कंसात आपलं सॉरी कानात सांगेन).. म्हणूनकंस जिंदाबाद !!!

जाता जाता एक श्लोक आठवला तो सांगतो. (लहानपणी खरं तर हा श्लोक मला आवडायचा नाही कारण त्यात कंसाला मारलं आहे. पण कालांतराने मी इतके कंस वापरायला लागलो की असं लक्षात आलं की कंस तर अजूनही स्मृतीरुपाने आपल्या (लिखाणा) बरोबर आहेच ;-) काळजी नको.)

वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनं |
देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगतगुरूं ||


किंवा अगदी सुयोग्य शब्दांत कंसांची थोरवी गायची तर


कंसेवीण फळ नाही ||
कंसेवीण राज्य नाही ||

- बाबा वटवट कंसवान


(श्रीताईच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना मला हा नवीन (!!) श्लोक (!!) सुचला (??).. आधी पोस्ट टाकली तेव्हा अ‍ॅक्च्युअली तो पोस्ट मध्ये नव्हता. पण बरा जुळत होता म्हणून मग पोस्टमध्ये अपडेट करून टाकला ;-) )

Thursday, May 6, 2010

चक्र

वडील : वाचलीस का त्या अझर मसूदची बातमी?
मुलगा : हो वाचली. वेळीच त्याला फासावर लटकावला असता तर कारगील युद्धातल्या हुतात्म्यांची अशी बेअब्रू झालेली पाहायला लागली नसती. आता त्याला सन्मानाने कंदाहारला सोडून यावं लागतंय !!
वडील : काय करणार. आपली न्यायव्यवस्थाच अशी आहे. दुर्दैव आपलं.. दुसरं काय..

**

मुलगा : चला. एकदाची फाशीची शिक्षा झाली त्या अफझल गुरुला.
वडील : प्रत्यक्ष फाशी दिली गेली की शिक्षा झाली असं म्हणायचं. तोवर ... !!
मुलगा : बाबा, संसदेवर हल्ला केला आहे त्याने. फाशी होणारच. नक्कीच.
वडील : ".."

**

मुलगा : चला. एकदाची फाशीची शिक्षा झाली त्या कसाबला.
वडील : अफझल गुरुच्या वेळीही असंच झालं होतं. आठवतंय? पण काय बदललंय अजून? सगळं आहे तसंच आहे.
मी : बाबा, पण कसाबच्या बाबतीत नाही असं होणार. शेकडो लोकांचे जीव घेतले आहेत त्याने.
वडील : ".."

**

वडील : वाचलीस का रे त्या अफझल गुरु आणि कसाबची बातमी?
मुलगा : हो वाचली. वेळीच त्यांना फासावर लटकवलं असतं तर संसद हल्ल्यातल्या आणि मुंबई हल्ल्यातल्या हुतात्म्यांची अशी बेअब्रू झालेली पाहायला लागली नसती. आता त्यांना सन्मानाने पाकिस्तानात सोडून यावं लागतंय !!
वडील : काय करणार. आपली न्यायव्यवस्थाच अशी आहे. दुर्दैव आपलं.. दुसरं काय..

**

मुलगा : हॅलो बाबा, कसे आहात तुम्ही आणि आई? सगळं ठीक आहे ना? किती भीषण आहे हे !! मुंबई, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद, पुणे, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद सगळ्या ठिकाणी एकाच वेळी हल्ला ??
बाबा (जुना मुलगा) : आम्ही ठीक आहोत देवाच्या कृपेने. पण कठीण आहे सगळं. मुंबई हल्ल्याच्या वेळी ३६ तास लढावं लागलं होतं. यावेळी नक्की आठवडाभर तरी लढावं लागेल. कारण मागच्या प्रसंगातून आपण काही शिकलो नसलो तरी ते मात्र शिकले असतील. अजून जय्यत तयारीने आले असतील.

**

आजोबा (जुना मुलगा) : हॅलो बाळा. बोल. कसा आहेस? कधी येतो आहेस तू?
नातू : नाही आजोबा. येणं शक्य नाही. प्रोग्राम बदलावा लागतोय. तेच सांगायला फोन केला होता. बातम्या बघितल्यात का? सहा विमानांचं अपहरण झालं आहे. त्यात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी २०२० च्या मुंबई, दिल्ली, बंगलोर वगैरे शहरांवर झालेल्या हल्ल्यात जिवंत पकडलेल्या १० अतिरेक्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान असं कुठेकुठे सोडून येणार आहेत आपले संरक्षणमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्रमंत्री वगैरे वगैरे. त्यामुळे पुढचे ४८ तास भारतातले सगळे विमानतळ बंद आहेत. त्यामुळे आम्ही आमचं येणं थोडं पुढे ढकलतो आहोत. कदाचित पुढच्या महिन्यात वगैरे..
आजोबा : हो आत्ताच पाहिलं आम्ही. सांभाळून रहा रे बाबांनो.

--

आणि चक्र चालूच राहतं !!!

य असल्या अफझुल्ल्यांवर कोर्ट कचेर्‍या करत खटले चालवत राहून शिक्षेच्या अंमलबजावणीची वाट बघण्यापेक्षा वाघनखांनी कोथळा बाहेर काढणे हा योग्य न्याय आहे ही शिवरायांची शिकवण आपण जोवर अंमलात आणत नाही तोवर हे असंच चालायचं !!

'ते' एव्हाना पुढच्या तयारीला लागलेही असतील. चला, आपणही लठ्ठ कातडीचा एक गच्च थर अंगावर चढवू आणि आपापली ढापणं लावून घेऊ. थोडक्यात ही (ही) फाशी होणे नाही कारण आता अशी होईल पुढील कारवाई.

प्रार्थना : हा सगळा कल्पनाविलास खोटा ठरावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु पूर्वानुभव पाहता तो खोटा ठरेलच याची शाश्वती मात्र नाही दुर्दैवाने.. :(

Wednesday, May 5, 2010

संभ्रम आणि कोंडमारा


मागे एका पुस्तक प्रदर्शनातून दोन पुस्तकं आणली. 'संभ्रम' आणि 'कोंडमारा'. दोन्ही अनिल अवचटांची. निव्वळ अनिल अवचटांची आहेत म्हणून डोळे झाकून घेतली. त्यापूर्वी स्वतःविषयी, माणसं, छंदाविषयी, अमेरिका, मोर, धागे आडवे उभे, प्रश्न आणि प्रश्न, दिसले ते, कार्यरत अशी अनेक पुस्तकं वाचली होती आणि प्रत्येक पुस्तक वाचून झाल्यावर (अपवाद छंदाविषयी, दिसले ते आणि मोर. ही तीन मला विशेष आवडली नाहीत.) काही वेळा निराशा, तगमग काही वेळा सामाजिक जाणीवा वृद्धिंगत होण्याचा अनुभव, काही वेळा 'तेथे कर माझे जुळती' चा अनुभव असे वेगवेगळे अनुभव घेतले होते. पण ही 'संभ्रम' आणि 'कोंडमारा' बहुतेक आउट-ऑफ-प्रिंट होती काही महिने. त्यामुळे ती त्या प्रदर्शनात दिसताक्षणी उचलली.

**
संभ्रम 

अनिल अवचटांच्या नियमित वाचकांना त्यांची लेखन शैली माहीत आहेच. ते नेहमी समाजातले जातीभेद, शोषितांच्या समस्या, तळागाळातल्या लोकांची दु:ख, धार्मिक/समाजिक/आर्थिक भेदभाव इत्यादी विषयांवर अत्यंत तळमळीने लिखाण करतात. परंतु त्यांचं  लिखाण कधीही प्रक्षोभक नसतं. अन्यायाविरुध्द लिहितानाही अतिशय संयत लिहितात ते.

त्यांनी अनेक पुस्तकांमध्ये तळागाळातल्या लोकांच्या अंधश्रद्धांवर प्रहार केले आहेत पण संभ्रम या पुस्तकाचं वैशिष्ठ्य म्हणजे या पुस्तकात त्यांनी चक्क मध्यमवर्गीय लोकांच्या अंधश्रद्धांवर आसूड ओढला आहे. खरं तर त्यांची संयत शैली पाहता त्या लेखनाला आसूड म्हणणं थोडं धारिष्ट्याचं होईल. पण शहाण्याला शब्दाचा (आसूड) !! या पुस्तकात त्यांनी पुण्यातला मीरा दातारचा दर्गा, काळूबाईच्या डोंगरावरची जत्रा, रमा माता, भगवान रजनीश (ओशो), सदानंद महाराज, न्यायरत्न धुंडीराज विनोद, देवदासी वगैरे विषय तर घेतले आहेतच परंतु आश्चर्यकारकरित्या त्यांनी शिर्डीचे साईबाबा आणि समर्थ रामदासांच्या पादुका या विषयांवरही एकेक प्रकरण लिहिलं आहे. पण लेखकाचा साईबाबा आणि समर्थ रामदास या संतांवर हल्ला करण्याचा नसून त्या त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, भक्तांकडून जोपासल्या जाणार्‍या अंधश्रद्धांवर हल्ला करणे हा मुख्य हेतू आहे हे त्या त्या प्रकरणांना दिलेल्या शीर्षकांवरून जाणवतं. 

- समर्थांच्या पादुका 
- साईबाबांची शिर्डी

अर्थात नेहमीप्रमाणेच हा हल्ला कुठेही जराही आक्रमक वगैरे होत नाही. उलट लेखक जास्तीत जास्त सौम्य भाषेत परंतु सभोवतालच्या  परिस्थितीचं अगदी बारीकसारीक वर्णन करून त्यातून काय अर्थ घ्यायचा हे वाचकांवर सोडतो. या पुस्तकात भक्तांची जी विविध विचित्र उदाहरणं, प्रसंग, अनुभव दिलेले आहेत ते वाचता वाचता कित्येकदा मला आश्चर्यचकित होऊन हसायला येत होतं. पण हसता हसता अचानक मनात कुठेतरी एक विचारही चमकून गेला की ज्यांना आपण हसतो आहोत त्यांच्या इतका नाही तरी त्यांच्या अगदी जेमतेम १% मुर्खपणा आपणही करत नाही का रोजच्या आयुष्यात अनेक वेळा?? आणि जाणवतं, खरंच संभ्रम आहे .. !!

**
कोंडमारा 

'कोंडमारा' चं एकेक प्रकरण वाचताना जीवाची अक्षरशः घालमेल होते.. खरंच कोंडमारा होतो जातीपातीच्या भिंती आणि त्यातून येणारे जातींवर आधारलेलं उच्चनीचपणाचे समज, आणि अजूनही खेडेगावात (काही प्रकरणं मुंबईतली सुद्धा आहेत. उदा. वरळीची दंगल.. खरंच विश्वास बसत नाही !!!) कसोशीने पाळले जाणारे (पाळायला भाग पाडले जाणारे) जातीपातींचे नियम वाचून. 

या पुस्तकात महाराष्ट्राच्या गावागावात दलित, महार, मातंग, मांग, नवबौद्ध या 'तथाकथित' नीच जातींवर मराठे, पाटील आणि इतर 'तथाकथित' उच्च वर्णीयांकडून वेळोवेळी केला गेलेला भयानक अत्याचार मांडला आहे. सगळी प्रकरणं दंगली -- म्हणजे दलितांविरुद्ध मुद्दाम घडवून आणलेल्या दंगलीं -- वर, किंवा खुनाखुनी आणि उघड उघड हल्ल्यांवर, अत्याचारांवर आणि त्यानंतर केल्या जाणार्‍या न्यायालयीन चौकशी आणि खटल्यांच्या नाटकांवर झगझगीत प्रकाश टाकतात. आणि ही सगळी प्रकरणं ७०-८० च्या दशकातली आहेत. माझ्या पिढीला हे असे काही प्रकार माझ्या महाराष्ट्रात घडतात हे खैरलांजीच्या 'भैयालाल भोतमांगे' प्रकरणामुळे कळलं. (हो खैरलांजी म्हणजे तेच गाव जिथे काही वर्षांपूर्वीच एवढं भीषण हत्याकांड घडून, आरोपींना निर्दोष सोडून दिलं गेलं आणि तरीही त्याला आंधळ्या सरकारने नुकतंच 'तंटामुक्त' गावाचं पारितोषिक दिलं. किती हा दुर्दैवीपणा !!!) पण त्याही आधी कित्येक गेली वर्षं हे 'दलितांविरुद्ध मुद्दाम दंगलीं घडवून आणण्या'चे प्रकार चालूच आहेत !!!   

'कोंडमारा' मधल्या नुसत्या प्रकरणांची नावं वाचूनही घुसमटायला होतं. काही नावं सांगतो.

- वरळीची दंगल
- मराठवाड्यातील दंगल
- फलटणची दंगल
- सत्यभामेची विटंबना
- एका गोसाव्याची तोड (यात त्या गोसाव्याला डोळे फोडून हालहाल करून मारलं जातं.)
- पार्टीबाजीचे बळी
- पोलीसकोठडीतील मृत्यू 
- पारधी मेळावा (हे प्रकरण पारध्यांच्या अमानुष कत्तलीविषयी आहे.)

या पुस्तकातल्या सगळ्या घटना साधारणपणे १९७४-७८ या ४-५ वर्षांत घडलेल्या आहेत. घटना घडल्यानंतर काही महिन्यांनी/वर्षांनी लेखकाने तिथे जाऊन अत्याचारपिडीतांशी, गावकर्‍यांशी, ज्यांनी प्रत्यक्षात ते अत्याचाराचे गुन्हे केले आहेत त्यांच्याशी, पोलिसांशी बोलून, स्वतः घटनेची अधिक माहिती गोळा केली आहे आणि त्यांच्या आधारे हे लेख लिहिले आहेत.

पण या पुस्तकाचं एक अतिशय दु:खद वैशिष्ठ्य आहे ते म्हणजे या सगळ्या ठिकाणी पहिली भेट देऊन झाल्यानंतर साधारण ५-७ वर्षांनी लेखक पुन्हा तिथे भेट देतो, तिथे कशी परिस्थिती आहे ते पाहतो आणि काय दिसलं ते सांगतो. आणि आपण पुन्हा हादरून जातो.

खटले भरलेले आरोपी पुराव्यांच्या अभावी निर्दोष सुटलेले असतात, गावात मोकाट फिरत असतात, त्याच प्रकारचे अनेक गुन्हे तिथे घडून गेलेले असतात, केस सशक्त असूनही निव्वळ पैशाची आमिषं दाखवून गरीब साक्षीदार फितवले गेलेले असतात... आणि अन्यायाचं चक्र चालूच राहतं !!

**

थोडक्यात, दोन्ही पुस्तकं संग्रही असणं अत्यावश्यक !!


महत्वाची तळटीप : या लेखात आलेले सर्व जातीपातींचे उल्लेख पुस्तकातून जसेच्या तसे घेतलेले आहेत. कोणालाही किंचितही दुखावण्याचा इथे अजिबात उद्देश नाही. कृपया गैरसमज नसावा ही विनंती !!

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...