Saturday, September 28, 2019

आर्यन ताई आणि सामंत/दांडेकर बाई

भाडीपा वाल्यांचे मी काही फारसे शोज, व्हिडीओज वगैरे वगैरे बघितलेले नाहीत. काहीही कारण नाही. उगाच. कधी मुद्दाम बघावेसे वाटले नाहीत किंवा बघायच्या पेंडिंग लिस्ट मधले एवढे चित्रपट/सिरीज बाकी असायच्या की मला स्टॅन्डअपच्या (म्हणजे बघण्याच्या) वाट्याला कधी जावंसंच वाटलं नाही. यात "मी लय भारी" वगैरे दाखवण्याचा काहीही हेतू आढळल्यास तो माझ्या शब्दनिवडीचा दोष समजावा.

तर काही महिन्यांपूर्वी भाडीपावरचा एका मराठी मुलीचा भारी स्टॅन्डअप व्हिडीओ  फिरत फिरत कोणा एकाच्या टाईमलाईनवर दिसला. मग दुसऱ्याच्या दिसला. काही दिवसांनी तिसऱ्याच्या दिसला. सोशल मीडिया, युट्युब वगैरे सर्वसामान्यांच्या अगदी हातबोटावर पोचल्याने अनेकदा त्यावरच्या कन्टेन्टचा दर्जा इतका घसरलेला असतो की असे व्हिडीओज किमान १०-१५ जणांच्या टाईमलाईनवर आणि किमान दहाएक कायाप्पा ग्रुप्समध्ये दिसल्याशिवाय मी स्वतःहून उगाच त्यांच्या वाट्याला जात नाही. पुन्हा एकदा यात "मी लय भारी" वाला प्रकार आढळल्यास.... 

तर या मराठी मुलीच्या व्हिडीओने वरील सर्व निकष उडत्या रंगांत (फ्लाईंग कलर्स) पार केल्याने एकदाचं मी त्या व्हिडीओवरचं 'प्ले' बटन दाबलंच. आणि बरोब्बर छत्तिसाव्या सेकंदाला 'स्टॉप' ही दाबलं. बघायला जाऊ नका. का ते सांगतो. छत्तिसाव्या सेकंदाला 'साऊथ बॉंबे' असं ऐकू आलं आणि माझा इंटरेस्ट संपला. होय. मुंबईत राहणाऱ्या, मराठी माध्यमात शिकलेल्या मुलीच्या तोंडून 'बॉंबे' ऐकल्याने मला पुढे ऐकावंसं वाटलं नाही. हो. हा माझाच दोष आहे. असो.

त्यानंतर पुन्हा महिन्यांनी अनेक टाईमलाईन्सवर आणि ग्रुप्समध्ये दिसायला लागल्याने पुन्हा एकवार तो 'बॉंबे' चा खडा दाताखाली चावून टाकून पुढे जायचा निर्धार केला. काही सेकंद पुढे सरकल्यावर व्हिडीओ याआधी न बघितल्याचा मला थोडा पश्चाताप व्हायलाच लागला. त्यानंतर ती आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेची थोडक्यात आर्यन शाळेची माजी विद्यार्थिनी आहे असा उल्लेख ऐकल्यावर तर मला विशेष आनंद झाला. कारण इयत्ता पहिली पर्यंत मी ही त्याच आर्यन शाळेचा विद्यार्थी होतो. क्षणभर तेव्हाच्या माझ्या वर्गशिक्षिका सामंत बाई आणि तेव्हाच्या आमच्या मुख्याध्यापिका (आमच्याच चाळीत राहणाऱ्या) दांडेकर बाई नजरेसमोर चमकून गेल्या.

पुन्हा काही सेकंदांनी हिंदुत्व आणि मराठीला चिमटे निघायला लागले. आणि थेट "मंदिर वही बनाएंगे" वरच्या कोट्या झाल्या. पुन्हा एकवार 'स्टॉप' चं बटन दाबलं  गेलं. हे सगळेच स्टॅन्डअपवाले स्वतःला स्वतःच्या गल्लीतले कुणाल कामरा समजून त्याचं अंधानुकरण करायला का जातात हा मला नेहमीच पडलेला प्रश्न आहे. नाही. हे मी दुर्दैवी या अर्थाने म्हणतोय, खेदाने म्हणतोय, विषादाने म्हणतोय. कामरा सर्वोच्च आदर्श??? तोही मुंबईत राहणाऱ्या, आर्यन शाळेत शिकलेल्या, मराठी मुलीचा? पुन्हा एकदा सामंत बाई आणि दांडेकर बाई नजरेसमोर तरळून गेल्या. पण यावेळी मी त्यांना नजर देऊ शकलो नाही.

आज उगाच रिकामटेकडेपणा करत बसलो असताना पुन्हा एकदा "बघाच" अशा अर्थाने तो व्हिडीओ पुन्हा एकदा समोर आला. दोन्ही बाईंकडे दुर्लक्ष करून मी पुन्हा एकवार तो बघायला घेतला. (सॉरी बाई!). आधीचे दोन्ही खडे निकराने चावून टाकून मी पुढच्या हल्ल्यांना सज्ज झालो. त्यानंतर मराठी शाळेच्या गणवेशाची (कदाचित तोकडा स्कर्ट नसण्याबद्दल आणि) सलवार-कुडता-ओढणी असण्याबद्दल आणि बांगड्या-टिकल्यांची टर उडवून झाली. मग आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेला नाताळच्या नसलेल्या पण गोकुळ अष्टमीला मिळणाऱ्या दहा दिवसांच्या सुट्टीवर ताशेरे ओढून झाले. मराठी शाळेने नाताळच्या सणाला दहा दिवस सुट्टी देण्याची गरज काय किंवा संबंध काय हा छोटासा तपशील इंग्रजी गटणे बाई विसरल्या. असो. त्यानंतर शाळेत वॅलेन्टाईन 'साजरा' होत नसल्याची आणि त्याऐवजी त्यादिवशी आसारामबापूच्या आश्रमातल्या लोकांची प्रवचनं वगैरे विषय झाला. आर्यन शाळेत हे असं खरंच होतं का याची कल्पना नाही परंतु पुढे मारायच्या एका सॉल्लिड पंच (बुक्की) साठी ती सोय असावी असा समज मी करून घेतला.

त्यानंतर इतर छंद आणि वार्षिक स्नेहसंमेलन यांचं दुय्य्मत्व दिसण्याचा नंबर लागला. आता छोटी शेजारीण शाळेत "साऊंड ऑफ म्युझिक" करते म्हणून आर्यन शाळेनेही तेच करावं ही अनाठायी अपेक्षा आणि त्याबरोबरच आर्यन शाळा ते करत नसल्याने स्टॅन्डअपमध्ये त्यावर टोमणे मारावे हे समीकरण फारच ओढूनताणून जुळवल्यासारखं वाटलं. आता ताईंच्या स्कर्ट-टायवाल्या शाळा वार्षिक स्नेहसंमेलनात अफझलवधा बद्दलचं नाटुकलं किंवा नटसम्राट मधली स्वगतं म्हणत नाहीत म्हणून त्या शाळेतल्या एखाद्या/एखादीने असलं बादरायण स्टॅन्डअप केल्याचा व्हिडीओ पाहिलाय का तुम्ही? ते जेवढं अस्थानी आणि अर्थहीन आहे तेवढंच सदरहू व्हिडीओतली तुलनाही!

त्यांनंतर गाडी घसरली ती कोळीनृत्यावर. त्यानंतर 'त्यांना' शिकवलं जाणारा शेक्सपिअर आणि 'आम्हाला' असलेल्या जड जड मराठी कविता यांची अनावश्यक तुलना!! या सगळ्या सगळ्यात विषय पुन्हा तोच आणि आशयही तोच. कित्ती गावठी आहे हे सगळं ! आणि या सगळ्यापायी आमच्यातल्या क्रिएटिव्हिटीला कसा अज्जिबात वाव मिळाला नाही हे उगाचंच ओढूनताणून विनोदी पद्धतीने सांगितलेलं तात्पर्य! आर्यन शाळेतले संस्कार, शिकवण, वातावरण,त्या कविता, "कोळी नृत्य" इत्यादी सगळ्यांमुळेच आज आपण इतक्या सगळ्या लोकांसमोर स्टॅन्डअपला उभे राहून (त्याच शाळेला आणि संस्कृतीला वारेमाप नावं ठेवतोय) बोलू शकतोय हा महत्वाचा तपशील पुनश्च एकवार गटणेताई विसरल्या.

त्यांचं कसं भारी वालं 'डेटिंग' आणि आमचं आपलं 'प्रकरण' वाल्या हास्यास्पद तुलनेवर पुन्हा एकवार 'ते' बरोबर आणि 'हे' चूक असं का याचा कुठलाही ढोबळही संदर्भ पुरवण्याच्या फालतू फंदात न पडता व्हिडीओ (एकदाचा) संपला.

या संपूर्ण प्रकरणात मराठी शाळा कशा टाकाऊ, दर्जाहीन, फालतू, प्रांतवादी, कमअस्सल, दर्जाहीन आहेत हे विविध प्रकारच्या टोमण्यांमधून आणि अत्यंत चुकीच्या उदाहरणांचा आधार घेऊन पटवून देण्याचा अयशस्वी प्रयत्न आढळला. पण त्याच वेळी मराठी शाळांचा (निदान आमच्या [आणि ताईंच्याही] वेळचा) दर्जा, अत्यंत कमी फीया, मराठी सणांचे संस्कार या सगळ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचंही लक्षात आलं.

आता यावर अनेकांचं म्हणणं असंही असेल की हा निव्वळ विनोद आहे. स्टॅन्डअप आहे. यात एवढं सिरीयस होण्यासारखं काय आहे? नाही आवडलं तर सोडून द्या वगैरे वगैरे. तर ज्यांना असं वाटतं त्यांनी हे आमचं लेखनही एका नावाजलेल्या मराठी शाळेच्या जुन्या माजी विद्यार्थ्याने स्मरणरंजनात (ताईंच्या चाहत्यांनी इथे 'नॉस्टॅल्जीक' वाचावे) रममाण होऊन या विनोद म्हणूनआणि वस्तुस्थिती म्हणूनही अत्यंत चुकीच्या असलेल्या (आणि तरीही) नावाजलेल्या व्हिडीओला दिलेलं उत्तर असून तुम्हाला आवडलं नसल्यास सोडून द्यावं कारण हे तुम्हा कोणासाठीही किंवा टीकेसाठी किंवा व्हिडीओला उत्तर देण्यासाठी केलेलं नाही!

मात्र हे सगळं लिहून झाल्यावर पुन्हा एकदा स्वतःशीच वाचून बघत असताना अचानक आमच्या सामंत बाई आणि दांडेकर बाई क्षणभर समाधानाने हसल्याचा भास झाला आणि एकदम भरून पावल्यासारखं मात्र नक्की झालं!

Monday, September 23, 2019

सोप्पं!

घरातले सर्वजण विविध मोहिमांसाठी बाहेर पडलेले असल्याने आज घरात बाप-लेक दोघांचाही आवडता 'डिनर टाईम वुइथ बाबा' असा एक विशेष कार्यक्रम रंगणार असतो. झोम्या/स्वीग्यांना साकडं घातलं जातं. घरचे सगळे सीमोल्लंघनाला गेलेले असणे म्हणजे मोबाईलवर मनसोक्त गेम खेळायला मिळणे असा एक सोयीस्कर अर्थ लेकाने काढलेला असतो. अभ्यास झालेला असल्याने आणि बऱ्याच दिवसात गेमगिरी झालेली नसल्याने बापाच्या नकारात अजिबातच धार नसते.

पिझ्झे, पास्ते, पावभाज्या सोडून लेक सरळ महाराष्ट्रीय बाणा दाखवून मिसळ पावाची मागणी करतो. पिझ्झाची संधी हुकल्याने किंचित वैतागलेला बाबा स्वीगीवर मिसळीची 'घ्या एक मिळवा एक' अशी योजना पाहून किंचित सुखावतो. एक तिखट आणि एक मध्यम मिसळ मागवून बाबा पुस्तकात डोकं घालतो. अधूनमधून खान-पान सेवेकरी कुठपर्यंत आलेत याची चाचपणी फोनवर चालू असते.

दरम्यान आरडाओरडा, चित्कार, खिदळणं, चिडणं, वैतागणं, रागावणं या सगळ्याच्या मिश्रणातून येणाऱ्या विविध आवाजांनी घर भरून गेलेलं असतं. यथोचित समयी मिसळींचं आगमन होतं. मध्यम अर्थात कमी तिखट मिसळ लेकाच्या पुढ्यात मांडून तिखट मिसळीवर बाबा ताव मारायला लागतो. मोबल्यातून डोकं वर काढून समोर बघण्याचेही कष्ट दुसऱ्या पार्टीकडून घेतले जात नाहीत. बाबा किंचित वैतागतो. गेम किती भारी अवघड आहे ते तुला माहीत नाही असं सांगून बाबाचा आवाज दाबला जातो.

आणि... प्रथम ग्रासे......... अश्रूपातः!!!!

"बा बा............"

"अरे झालं काय?"

"अरे किती तिखट आहे ही मिसळ!!!!" फोन आणि नजरेची एकरूपता न ढळू देता वाग्बाण सोडण्याच्या वादातीत कौशल्याचं सादरीकरण!

तिखट आणि मध्यम मिसळींचं सव्यापसव्य झालं की काय कल्पनेने घाबरून बाबा दोन्ही मिसळींवरचं लेबल वाचतो आणि दोघीही आपापल्या जागेवर असल्याचं पाहून सुटकेचा निःश्वास सोडतो.

"बाबा, तू मला तिखट मिसळ दिली आहेस" स्वर टीपेचा!!

"नाही रे बाबा. ही बघ तिखट मिसळ माझ्यासमोर आहे. आणि तू खातोयस ती तुझ्यासाठीच मागवलेली 'मिडीयम' मिसळ आहे."

"ठीके. आता जाऊदे. पण पुढच्या वेळी माझ्यासाठी 'इझी' वाली मागव" गेमरचा हुकूम सुटतो.

बाबाच्या डोळ्यातून पाणी येतं ते हसल्याने की तिखट (वाचा नॉन-इझी) मिसळ खाल्ल्याने हे गुपितच राहतं!!

#आदिआणिइत्यादी

Wednesday, July 24, 2019

क्रम!

सध्याच्या पिढीतल्या साधारण ९-१०-११ वर्षं अर्थात प्री-टीन वयातल्या मुलांमध्ये लग्न, नवरा, बायको, मुलं या विषयांवर जात्याच उत्सुकता असते की आमच्याच चिरंजीवांच्या मुखकमलातून यावर मखलाशी होत असते हे न कळे. पण असं होतंय खरं. गेल्या काही महिन्यांत आडून आडून किंवा थेट या विषयांवर प्रश्न येतात.

काही दिवसांपूर्वी लेकाला शाळेच्या बसस्टॉप वर सोडायला गेलो होतो. तिथे त्याचा मित्र आणि त्याला सोडायला आलेली त्याची आई असे दोघेजण उभे होते. भेटल्यावर लगेच गप्पा सुरु झाल्या.... अर्थात मुलांच्या. आम्ही काय संतूरबाबा नसल्याने एका तोंडदेखल्या स्मिता (स्माईल ओ स्माईल) वर आमची बोळवण केली गेली. आपलं 'सांतूरिक स्थान' काय आहे याची कल्पना असल्याने अस्मादिकांनीही लगेचच मोबल्यात डोकं खुपसलं. गप्पांच्या (जुनंच डिस्क्लेमर पुन्हा) नादात बराच वेळ गेला असावा किंवा काहीतरी गडबड असावी असं लेकाच्या मित्राच्या मातोश्रींच्या सतत चाललेल्या चुळबुळीवरून अस्मादिकांच्या लक्षात आलं. एका रिकामटेकड्या पोस्टवर तितकंच रिकामटेकडं लाईक ठोकून मी मोबल्यातून डोकं बाहेर काढणार न काढणार तोच स्मायलीताईंचं "एक्सक्युज मी" किणकिणलं.

"यस?"

"आज बहुतेक बसला यायला उशीर होतोय"

"ट्येल मी समथिंग आय डोन्ट क्नो" (मनात)... "हं.. हो ना" (जनात)

"इफ यु डोन्ट माईंड, तुम्ही अयानला बसमध्ये बसवून द्याल का?  झालंय असं की मला कॉलेजला पोचायला उशीर होतोय आणि पहिलं लेक्चर माझंच आहे"

"ओह यस. चालेल की. काहीच प्रॉब्लेम नाही"

अजून थोडं मोठं स्मितून ताई स्कुटीवरून फरार झाल्या. यथावकाश मुलांना बसमध्ये बसवून अस्मादिकही 'मेन्टॉस जिंदगी'तुन 'नॉर्मल जिंदगी'त परत आलो.

... ... ... ...

रात्री झोपायची तयारी चालू असताना "बाबा" अशी नेहमीपेक्षा थोडी सावध हाक ऐकू आली.

"बोला"

"बाबा, लग्न.... "

"क्काय???"

"अरे ऐक तरी"

"..."

"लग्न नंतर करतात ना? म्हणजे आधी स्कुल, मग कॉलेज, मग ऑफिस मग लग्न आणि मग त्यानंतर बेबीज ना?"

दिवसभर प्रचंड समीकरणं सोडवण्यात गेला होता हे स्पष्टच होतं. तेवढ्यातही मला राजेश खन्ना-ट्विंकल खन्नाचा जुना विनोद आठवला. ट्विंकल म्हणते "बाबा, मी खूप मोठी होणार, मग लग्न करणार आणि मग आई होणार".. त्यावर पिताश्री खन्ना म्हणतात "व्हेरी गुड बेटा. फक्त हा क्रम विसरू नकोस म्हणजे झालं "

"बाबा???"

"हो रे. (क्रम) अगदी बरोबर आहे" मी काका खन्नांचा आधार घेतला. "का? झालं काय पण?"

"कॉलेज, ऑफिस, लग्न मग बेबीज असं आहे तर मग अयानची आई 'आई' झाल्यावर का कॉलेजला जाते आहे? आधीच जायला हवं होतं ना? आता का जाते आहे? अयान त्याच्या आईच्या कॉलेजच्या आधीच कसा बॉर्न झाला?"

यानंतर माझी बसलेली वाचा, बत्तीशी उभी करून, धो धो कोसळणारं हास्य सावरून झाल्यावर त्याला सगळं नीट समजावून सांगायला जवळपास ९ महिने सॉरी मिनिटं तरी नक्कीच लागली !

#आदि_आणि_इत्यादी

Sunday, May 5, 2019

पडू आजारी'नेमेचि येते मग आजारपण' या उक्तीला जागत हंगामी आजारपणाने आमच्याकडे दबक्या पावलाने चंचुप्रवेश केला. परंतु आजारी असो वा ठणठणीत, पण तरीही ब्लॉगसाठी खाद्य पुरवायचं असिधाराव्रत बाळराजांनी सोडलं नव्हतं. त्या हंगामी आजारपणादरम्यानचे हे काही किस्से.

पडू आजारी-१

प्रचंड सर्दी आणि खोकला झाल्याने धावाधाव, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल आणि तत्सम सगळ्याच मैदानी खेळांवर मर्यादा आल्याने बाळराजांची आजारपणातली चीडचीड बहुअंगी आणि बहुरंगी झाली होती. आम्ही आपल्या परीने घरातल्या घरात खेळता येणाऱ्या बैठ्या खेळांचं महत्व समजावून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. पण यश येत नव्हतं.

"अरे राजा, उगाच धावू नकोस, उड्या मारू नकोस. पुन्हा खोकला सुरु होईल. त्यापेक्षा आपण छान काहीतरी बसून खेळू"

"बसून काय छान खेळणार?" ५६ वाघांची तुच्छता!

"अरे चेस खेळूया. नाहीतर मग बिझनेस.. किंवा सापशिडी, लुडो."

"नको. यातलं मला काहीही आवडत नाही" वाढीव चीडचीड..

"ठीके. मग ते काय ते तुझे ब्लॉक्स... लिगो..  लिगो..  लिगोची कार बनवूया"

"नको लिगो नको. ते खूप किचकट असतं. कंटाळा येतो मला. खूप अवघड आहे ते." मेरा वचनही है मेरा शासन!

"अरे काहीही अवघड नाहीये. मस्त सोपं आहे उलट. छान इंटरेस्टिंग आहे एकदम."

"नको रे. खूप अवघड आहे ते."

"अरे राजा खरंच अवघड नाहीये. ये इकडे. मी शिकवतो तुला"

"अरे बाबा!!!!!! सांगतोय ना मी तुला. ते जाम अवघड आहे. मलाच येत नाही ते. तर तुला कुठून येणार आहे?"

-----------------------------------------------------------------------------------------

पडू आजारी-२

बाळराजांचा सेहवागी षटकार सहन न झाल्याने (किंवा कटू सत्य न पचल्याने) काही दिवसांत 'पडू आजारी' च्या पुढच्या सत्रात अस्मादिकांचा नंबर लागला असावा. दोनेक दिवसांत ताप कमी झाला पण बराच अशक्तपणा असल्याने लोळण्याचं आवडतं काम इमानेइतबारे चालू होतं. तेवढ्यात डोअरबेल वाजली. दार उघडत असतानाचा बाळराजांचा बाहेरूनच "बाबा.. बाबा" असा चालू असलेला जप ऐकू येत होता.

"अरे हो हो. काय झालं काय एवढं?"

"बाबा.. बाबा.. आई खोटं बोलली आज."

"काय? म्हणजे?" अस्मादिक

"अरे काहीही काय बडबडतो आहेस राजा?" मातोश्री.

"झालं का ग काम?"

"हो. झालं. लाईन होती जरा. पण झालं काम. बँकेतून बाहेर पडलो तर बाहेरच आकाश भेटला. भरपूर गप्पा मारत होता. तीन वर्षं कॅनडाला होता. आता परत आलाय इथेच. कॉलेजनंतर पहिल्यांदाच भेटलो ना आम्ही. तुझी चौकशी करत होता. कसा आहेस? काय चाललंय विचारत होता."

"तेव्हाच..  तेव्हाच.. तेव्हाच आई खोटं बोलली, बाबा"

"काय?????" ड्युएट कम कोरस...

"अरे आकाशकाकाने विचारलं की तू कसा आहेस.... तर तुला बरं नाहीये, ताप आलाय असं खरं सांगायच्या ऐवजी आई चक्क खोटं बोलली. तू बरा आहेस असं म्हणाली."

औषधांपेक्षा या किस्सा ऐकूनच ताप पळाला असावा यावर आम्हा सर्वांचं एकमत झालं हे सांगणे न लगे !!

#आदि_व_इत्यादी  

Wednesday, May 1, 2019

स्पॉयलर

********* SPOILER ALERT **********


"बाबा, बाबा, बाबा... तुला माहित्ये का की 'एन्ड गेम' मध्ये आपला आवडता आयर्न मॅन मरतो."

लेक टोनी स्टार्कचा अतीव फॅन असल्याकारणाने (They share the birth date, could be one of the prime reasons) मी हे त्याला सांगितलं नव्हतं. पण बाहेरच्या जगातल्या अव्हेंजर फॅन्स मुळे त्याला अखेर ते कळलं असावं.

"हो अरे. माहिती आहे मला"

"तुला माहिती होतं तरी मला का सांगितलं नाहीस" प्रतिप्रश्न!

आता काय बोलावं हे न सुचून मी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून गेलो... "अरे मुव्हीमधल्या अशा महत्वाच्या घटना सांगायच्या नसतात. त्यांना स्पॉयलर्स म्हणतात. तू कशाला मला सांगितलंस? मला माहीत होतं म्हणून ठीके" मी उगाचच विद्वत्ता पाजळली.

"त्यात काय बाबा? हा काही स्पॉयलर नाहीये. तो काही खरा मरत नाही काही. फक्त पिक्चरमध्ये मरतो. खरा जिवंत आहे रे तो"
 
#बाबाचा_एन्डगेम
#आदि_आणि_इत्यादी

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...