'नेमेचि येते मग आजारपण' या उक्तीला जागत हंगामी आजारपणाने आमच्याकडे दबक्या पावलाने चंचुप्रवेश
केला. परंतु आजारी असो वा ठणठणीत, पण तरीही ब्लॉगसाठी खाद्य
पुरवायचं असिधाराव्रत बाळराजांनी सोडलं नव्हतं. त्या हंगामी आजारपणादरम्यानचे हे
काही किस्से.
पडू आजारी-१
प्रचंड सर्दी आणि खोकला झाल्याने धावाधाव, सायकलिंग, क्रिकेट, फुटबॉल आणि
तत्सम सगळ्याच मैदानी खेळांवर मर्यादा आल्याने बाळराजांची आजारपणातली चीडचीड
बहुअंगी आणि बहुरंगी झाली होती. आम्ही आपल्या परीने घरातल्या घरात खेळता येणाऱ्या
बैठ्या खेळांचं महत्व समजावून सांगण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो. पण यश येत
नव्हतं.
"अरे राजा, उगाच
धावू नकोस, उड्या मारू नकोस. पुन्हा खोकला सुरु होईल.
त्यापेक्षा आपण छान काहीतरी बसून खेळू"
"बसून काय छान खेळणार?" ५६ वाघांची तुच्छता!
"अरे चेस खेळूया. नाहीतर मग बिझनेस..
किंवा सापशिडी, लुडो."
"नको. यातलं मला काहीही आवडत
नाही" वाढीव चीडचीड..
"ठीके. मग ते काय ते तुझे ब्लॉक्स...
लिगो.. लिगो.. लिगोची कार बनवूया"
"नको लिगो नको. ते खूप किचकट असतं.
कंटाळा येतो मला. खूप अवघड आहे ते." मेरा वचनही है मेरा शासन!
"अरे काहीही अवघड नाहीये. मस्त सोपं
आहे उलट. छान इंटरेस्टिंग आहे एकदम."
"नको रे. खूप अवघड आहे ते."
"अरे राजा खरंच अवघड नाहीये. ये इकडे.
मी शिकवतो तुला"
"अरे बाबा!!!!!! सांगतोय ना मी तुला.
ते जाम अवघड आहे. मलाच येत नाही ते. तर तुला कुठून येणार आहे?"
-----------------------------------------------------------------------------------------
पडू आजारी-२
बाळराजांचा सेहवागी षटकार सहन न झाल्याने
(किंवा कटू सत्य न पचल्याने) काही दिवसांत 'पडू आजारी'
च्या पुढच्या सत्रात अस्मादिकांचा नंबर लागला असावा. दोनेक दिवसांत
ताप कमी झाला पण बराच अशक्तपणा असल्याने लोळण्याचं आवडतं काम इमानेइतबारे चालू
होतं. तेवढ्यात डोअरबेल वाजली. दार उघडत असतानाचा बाळराजांचा बाहेरूनच
"बाबा.. बाबा" असा चालू असलेला जप ऐकू येत होता.
"अरे हो हो. काय झालं काय एवढं?"
"बाबा.. बाबा.. आई खोटं बोलली
आज."
"काय? म्हणजे?"
अस्मादिक
"अरे काहीही काय बडबडतो आहेस राजा?"
मातोश्री.
"झालं का ग काम?"
"हो. झालं. लाईन होती जरा. पण झालं
काम. बँकेतून बाहेर पडलो तर बाहेरच आकाश भेटला. भरपूर गप्पा मारत होता. तीन वर्षं
कॅनडाला होता. आता परत आलाय इथेच. कॉलेजनंतर पहिल्यांदाच भेटलो ना आम्ही. तुझी
चौकशी करत होता. कसा आहेस? काय चाललंय विचारत होता."
"तेव्हाच.. तेव्हाच.. तेव्हाच आई खोटं बोलली, बाबा"
"काय?????" ड्युएट
कम कोरस...
"अरे आकाशकाकाने विचारलं की तू कसा
आहेस.... तर तुला बरं नाहीये, ताप आलाय असं खरं सांगायच्या
ऐवजी आई चक्क खोटं बोलली. तू बरा आहेस असं म्हणाली."
औषधांपेक्षा या किस्सा ऐकूनच ताप पळाला असावा
यावर आम्हा सर्वांचं एकमत झालं हे सांगणे न लगे !!
#आदि_व_इत्यादी
हा हा
ReplyDeleteInnocence overloaded :D :D
ReplyDelete