Wednesday, July 21, 2010

लेका बोले...

अरे काय हे? किती पसारा करून ठेवतोस.. सगळीकडे काय तुझ्या वस्तू पसरून ठेवल्या आहेस? आवरणार कोण त्या ? मला काय तेवढं एकच काम आहे का? आणि हे एवढं सगळं आता फटाफट संपवायचं आहे. जरा आवडती भाजी नसली की जेवणाची नाटकं सुरु तुझी. हे बरंय. रोज नवीन नवीन भाज्या कुठून आणायच्या रे? सगळं खायला शिका जरा... काहीही टाकायचं नाही पानात.. !!

अग जाऊदेत.. आपण आहोत ना आवरायला.. त्याने पसारा नाही करायचा तर कोणी करायचा? आणि खाण्याचं काही नाही इतक्यात.. आत्ता त्याला हवं ते खाऊदेत. हळू हळू खायला लागेल तो सगळं...

तो हसतो.. तिचा माझ्याकडे बघून एक तुच्छ कटाक्ष............ पडदा पडतो.

**

बास झालं.. उगाच रात्री जागत बसायचं नाही. वेळेवर झोपा चला.. हे असं जागत बसायचं रात्री आणि मग सकाळी उठायचं नाव नाही.. आणि सारखं काय रे लॅपटॉपशी खेळतोस ? जरा इतर गोष्टींकडेही बघ. लॅपटॉपशिवाय इतरही खेळणी आहेत घरात.. !!!!

अग जागला थोडा तर काय बिघडतंय.. नंतर उठायचंच आहे त्याला लवकर आणि खेळला त्याच्या लॅपटॉपशी तर काय बिघडलं?

तो पुन्हा हसतो. तिचा पुन्हा एकदा माझ्याकडे बघून तुच्छ कटाक्ष................ पुन्हा पडदा पडतो.

**

हे बघ आंघोळीची नाटकं अजिबात चालणार नाहीत. आंघोळीचा कसला रे कंटाळा तुला... इतका आळशीपणा बरा नाही.. !!

ए काहीही काय? त्याची अंघोळीची अजिबात काही नाटकं नसतात हां. उलट जाम आवडते त्याला आंघोळ. मस्त एन्जोय करतो तो.

तिचा 'काय येडं गळ्यात बांधून घेतलंय' अशा अर्थाचा लूक...

अरे हो रे... त्याला आंघोळ आवडतेच.. तसं तर तो विशेष पसाराही करून ठेवत नाही आणि केला तरी त्याचा पसारा आवरायला एवढं काही वाटत नाही. अर्थात जेवणाची नाटकं अधूनमधून करतो तो पण तेही ठीक्के.. रात्री थोडासा जागला तरीही जरा गाणं म्हणून झोपवलं की झोपतो तो... उगाच जागत बसत नाही... आणि त्याच्या खेळण्यातल्या लॅपटॉपचा इतकाही काही त्रास नाहीये. उलट अधूनमधून त्याला कंटाळाच येतो लॅपटॉपचा तेव्हा इतर खेळण्यांशी खेळतो तो. त्याच्याविषयी तक्रारच नाहीये.

तिचा पुन्हा एकदा तुकतुकाट उर्फ तुच्छ कटाक्षांचा सुळसुळाट... तोही त्याचे असले नसलेले ५-६ दात काढून टाळ्या पिटायला लागतो. सगळी मिलीभगत च्यायला...

पुन्हा एकदा पडदा पडतो आणि यावेळी पडद्याबरोबर मीही...

ए टप्पर टप्पर ....

Friday, July 16, 2010

(हि) किप्स डागदर अवेवेवेवेवे !!

 "उंची किती?" असं विचारल्यावर "३२ इंच - प्रश्नचिन्ह" किंवा "वजन किती?" असं विचारल्यावर "दहा किलो - प्रश्नचिन्ह" अशी उत्तरं द्यावी लागत असतील तर उत्तर देणार्‍याला कसं विचित्र वाटत असेल ना? आणि त्यात पुन्हा असं उत्तर द्यावं लागणारी व्यक्ती ही स्वतः डॉक्टर असेल तर तिला तर अजूनच मेल्याहून मेल्यासारखं होत असेल. या डॉक्टर लोकांबद्दल मला खरंच खूप सहानुभूती वाटते कधीकधी. आधीच कामाचं टेन्शन, कामाचे विचित्र तास, वेळीअवेळी/विकांतात अटेंड कराव्या लागणार्‍या इमर्जन्सीज हा मानसिक छळ जणु काही कमी असतो म्हणून त्यात काही उद्योगी पेशंट्सच्या कृपेने होणारे शारीरिक छळ !! शारीरिक छळ ???? हम्म्म्म. हो.. शारीरिक छळही !! तर ही गोष्ट आहे असं मेल्याहून मेल्यासारखं व्हावं लागणार्‍या आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागलेल्या एका बिच्चार्‍या डॉक्टरीणबाईंची आणि त्यांच्या सवंगड्यांची पक्षि अशिष्टंट वग्येरेंची. (योग्य शब्द 'वगैरे' आहे हे आम्हास ठाऊक आहे परंतु आत्ता उगाचंच चुकीचं लिहायचा मूड आला म्हणून लिहिलं. कृपया निषेध नोंदवू नयेत ;)) 

ठरल्याप्रमाणे आम्ही डॉक्टरीणबाईंच्या दवाखान्यात (चक्क चक्क) वेळेत पोचलो. वेळेत कसले वेळेआधीच. अशिष्टंटांकडे बघून खोट्या हास्याची देवाणघेवाण करून (खरं तर नुसती घेवाणच कारण मी खरं खरं हसलो होतो. त्या खोटं खोटं हसल्या. येथे 'त्या' हे तिथे असलेल्या (नसलेल्या) अशिष्टंट काकूंना उद्देशून आदरार्थी अर्थाने वापरण्यात आलेले नसून चिवचिव करणार्‍या इतर २-३ (मादक नव्हे तर) माफक अशिष्टंट सुंदर्‍यांना उद्देशून आहे याची कृपया नोंद घ्यावी.), नाव, येण्याची वेळ आणि प्रत्यक्ष अपॉइंटमेंटची वेळ इत्यादी निरर्थक तपशील (नाव सोडून) नोंदवून झाले. माअसुं पुन्हा एकदा माझ्याकडे बघून खोटं खोटं हसल्या. मी पुन्हा एकदा त्यांच्याकडे बघून खरं खरं हसलो. त्यानंतर त्या 'ओव, ऑ, शो श्वीत' असं बोब्यद्य ('बोबडं' हा शब्द बोबड्या भाषेत कसा लिहिता येईल असा एक किडा अनेक दिवस माझ्या डोक्यात नाचत होता. त्या नाचर्‍या किड्याचे हे पहिले बोल) बोलत माझ्या कडेवर विराजमान झालेल्या युवराजांकडे बघून (अगदी, ज्याम, कैच्याकै) खरं खरं हसल्या. युवराजांनी एक क्षुद्र, तुच्छ कटाक्ष टाकून मान फिरवली. च्यायला दैव देतं नि कर्म नेतं !!!... तेवढ्यात त्यातली एक अशिष्टंट (हे लिखाण बायको देखील वाचू शकते या सत्याचा अचानक साक्षात्कार झाल्याने 'माअसुं' ला पुन्हा एकदा 'अशिष्टंट' हे जुनंच परिस्थितीजन्य रुपडं बहाल करण्यात आलेले आहे हे सुज्ञ वाचकांनी ....) उठून आमच्याजवळ आली आणि दोरीसदृश काहीतरी घेऊन बाळराजांच्या डोक्याला गुंडाळू लागली. 

क्षणभर ही बया 'खैके पान बनारस वाल्या' 'अमिताबच्चन'सारखा ('अमिताबच्चन' या मूळ नावाचा अपभ्रंश 'अमिताभ बच्चन' किंवा 'बिग बी' असा करतात लोक हल्ली. पण त्यात 'अमिताबच्चन'ची मजा नाही.) रुमाल माझ्या बाळाच्या डोक्याला का बरं गुंडाळते आहे हे मला उलगडलं नाही. पण तेवढ्यात त्या दोरीवरचे आकडे दिसल्यावर ती टेप आहे हे लक्षात आलं. पण एवढे लहान आकडे? एवढी बारीक टेप? दिसणार तरी कसे ते आकडे? मोजणार तरी कसा लेकाच्या डोक्याचा घेर? असे अनेक 'क'कारांभ प्रश्न माझ्या डोक्यात पिंगा घालतायत ना घालतायत तोच 'उप्स' असा तारस्वरातला चित्कार आणि 'भ्याआआआ' अशी मोठ्ठ्या आवाजातली तक्रार माझ्या कानी पडले. हे एवढ्या चटकन झालं होतं की जणु एखाद्या सस्पेन्स चित्रपटात हिरोने पडद्यावर दिसावं आणि एन्ट्रीलाच कुठेकुठे लपलेल्या चार व्हिलनांना सटासट लोळवावं आणि आपल्याला ते कळूही नये. अगदी तसंच झालं होतं इथेही. फक्त इथे हिरोने (पक्षि बाळराजांनी मी नव्हे. हिरो म्हंटल्यावर गैरसमज होण्याची अमाप शक्यता असल्याने मुद्दाम स्पष्टीकरण दिले आहे हे सुज्ञ वाचकांनी.....) व्हिलनांऐवजी ललनांना लोळवलं (शब्दशः नव्हे) होतं हाच काय तो तपशीलातला फरक.

अर्थात हे नक्की कसं झालं हे रिवाईंड करून बघता येणं शक्य नसल्याने साधारण अंदाज लावल्यावर असं लक्षात आलं की डोक्याचा घेर मोजायला आलेल्या ललनेने उर्फ अशिष्टंटने ती टेप हिरोच्या (वरचाच कंस) डोक्याला लावताक्षणीच हिरोने अशा जोरात मान हलवली होती की घाबरून जाऊन ललना मागे आणि टेप जमिनीवर पडली आणि तिच्या तोंडून (ललनेच्या.. टेपच्या नव्हे) 'उप्स' रूपी उसाचे उपसे बाहेर पडले. "ओह ही मस्ट हॅव स्केअरर्ड !!!! लेट्स ट्राय अगेन..." क्षणार्धात प्राप्त परिस्थितीचं विवेचन करून पुढील योजनांची घोषणा करण्याची तिची तत्परता वाखाणण्याजोगी होती. "कॅन यु गिव्ह मी अ हँड हिअर?" मी तत्परतेने पाउल पुढे टाकणार एवढ्यात हे तिने मला "मला जरा हात देतोस का?" याअर्थी विचारलं नसून तिच्या सह-ललनेला किंवा को-अशिष्टंटला "मला जरा (पोराच्या डोक्याचा घेर मोजायला) मदत करतेस का?" याअर्थी विचारलं आहे हे ती क्षणाचाही विलंब न लावता उठून उभी राहिली यावरून माझ्या लक्षात आलं. वाढलेल्या पोटामुळे पावलं टाकण्याच्या मंदावलेल्या वेगामुळे पुढचा बराच अनर्थ टळला होता. मी मनोमन पिझ्झाराजांचे आभार मानले आणि पुढे केलेला हात घड्याळात किती वाजले आहेत हे बघण्यासाठी केला होता असं दाखवून उगाचच वेळ बघून वेळ मारून नेली. ६:१५ झाले होते. अचानक गेल्या पंधरा मिनिटांत मी कित्येक गोष्टी 'उगाचच' केल्या असल्याची जाणीव मला 'उगाचच' झाली.

दरम्यान लेकाचा एकूण रागरंग पाहून माझ्या सुविद्य पत्नीने पडद्यावर एन्ट्री घेतली आणि लेकाला माझ्याकडून स्वतःकडे घेतलं. ललना एकवार माझ्याकडे आणि नंतर एकमेकींकडे पाहून (कुत्सितपणे) हसल्याचा भास मला उगाचच झाला. मी उगाच तिकडे लक्ष नाहीये असं दाखवून मान वळवून 'रडत असलेल्या बाळाला शांत कसं करावं?' वाला टीव्ही शो बघायला लागलो. सँडल्सच्या टक टक टक टक टक टक (तीन ललना, सहा सँडल्स, प्रत्येकी एक 'टक') आवाजावरून ललना पुन्हा हिरोच्या दिशेने वळल्या असाव्यात असा अंदाज मी बांधला.

तेवढ्यात अचानक जोरदार रडण्याचा आवाज आला आणि त्यामागोमाग पियानोचे मंद सूर ऐकू आले. "आयला डॉक्टरकडे पियानो आहे आणि एवढा वेळ दिसला कसा नाही? या पोरी खरंच अशिष्टंट आहेत की पियानो-बडव्या? आणि मगाशी त्या पोरींना रडवणारं कार्ट स्वतः रडतंय? अशक्य !!" असले भलते सलते विचार डोक्यात येऊन मी मागे वळून बघणार एवढ्यात लक्षात आलं की हे सगळे चित्रविचित्र आवाज टीव्हीवरच्या जाहिरातीतले आहेत. कारण रडण्याचा आवाज तिथून येत होता आणि एक बाब्या पियानोसदृश दिसणारं एक छोटंसं खेळणं (अक्षरशः) बडवत होता. त्या बडवण्याच्या पुष्ठ्यर्थ "पियानोच्या मंद सुरांनी बाळांचं चित्त स्थिर होतं, त्यांचं रडणं बंद होतं : डॉक्टर इशेक क्वोश्चीमिन्न, येमेन" असा कुठल्याशा डागदराच्या शोधाचं कॅप्शनही खालून फिरत होतं. 'बाबा बंगाल्यांची' पृथ्वीच्या डोस्क्यापासून (पृथ्वीच्याच, बाबा बंगाल्याच्या नव्हे) पायाच्या करंगळीपर्यंत पसरलेली पिलावळ पाहून मला 'आमची कुठेही शाखा नसलेल्यांची' आठवण येऊन भरून आलं.

तेवढ्यात पुन्हा रडण्याचा आवाज आला. आयला म्हणजे पियानो बडवा नाहीतर माउथ ऑर्गन, पोरं रडतात ती रडतातच, मग काय उपयोग इतक्या डॉलरां (गुणिले ४७) चा चुथडा करून. बरं झालं असलं काही घेतलं नाही ते.
माझ्या टाळक्यात अशा मध्यमवर्गीय विचारांची गर्दी होते ना होते तोच लक्षात आलं की त्या जाहिरातीतलं लेकरू तर खुशीत मुठी चोखत होतं. म्हणून चटकन मागे वळून बघितलं तर पुन्हा टेप जमिनीवर पडलेली होती, बाळराजांचा आवाज टिपेला पोचला होता, राजांचे हात घट्ट धरून ठेवलेल्या, डोकं पकडून ठेवलेल्या आणि प्रत्यक्ष डोक्याचा घेर मोजणार्‍या तीन अशिष्टंटांच्या डोळ्यातलं बाळराजांबद्दलचं कौतुक किंचितसं ओसरत चाललेलं दिसलं. मी पियानोतून डोकं काढून घेऊन त्या काय म्हणतायत हे बघायला गेलो तर तेवढ्यात त्या 'लेटस डू इट लेटर' असं म्हणून किंचित हसून तिथून निघून गेल्या. यावेळी त्या खर्‍या हसल्या होत्या की खोट्या हे मात्र कळलं नाही. अर्थात ते खोटंच असणार हे मी पूर्वानुभवावरून सांगू शकत होतो.

कर्माने नेल्यावर थोडक्यात अशिष्टंटा तिथून निघून गेल्यावर राजे जरा मुडात येऊन खेळायला लागतायत ना लागतायत तोच ते पाहवलं जात नसल्याप्रमाणे त्यातली एक अशिष्टंट परत आली आणि या वेळी खरं-खोटं काहीही न हसता म्हणाली 'लेट्स चेक हिज वेट'. आम्हीही मग 'व्हाय वेट' म्हणत तिच्या मागोमाग चालायला लागलो. काहीतरी वावगं घडतंय असं लक्षात येऊन राजांनी मगाशी शिल्लक राहिलेल्या हुंदक्यांची मदत घ्यायचं ठरवलं. पण त्यांनी ते ठरवून त्याची अंमलबजावणी करेकरेपर्यंत आम्ही त्यांना त्या वजनाच्या काट्यावर नेऊन आदळलंही. पण त्याक्षणी जणु दाही दिशांनी होणारे हल्ले परतवून लावावेत तशा प्रकारे बाळराजांनी हात, पाय, मान गदागदा हलवायला सुरुवात केली. वजनकाट्यावर घातलेला पातळ कागद फाटून त्याच्या चिंध्या झाल्या. काटा थरथरायला लागला. या दुष्ट लोकांना त्या काट्याचं कॅलिब्रेशन पुन्हा करायला लागल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही असा जणु चंग बांधल्याप्रमाणे राजांचं हातपाय हलवणं चालूच होतं. आणि जोडीला मुसळधार रडंही. अशा बिकट प्रसंगाची सवय नसल्याने अशा प्रसंगांत कसं रिअ‍ॅक्ट व्हायचं याची काहीच कल्पना त्या अशिष्टंटांना नव्हती. राजांनी एकेक खिंड, गढी, बुरुज, माच्या, दरवाजे सर करत अखेरीस किल्ला सर केला. थोडक्यात वजनाचा काटा चांगलाच डुगडुगायला लागला.

अखेरीस अशिष्टंटांनी कंटाळून जाऊन आणि मुख्य म्हणजे काट्याची अवस्था बघून हे सुद्धा 'लेटर' करुया असं सुचवलं. आम्ही पडत्या फळाची आज्ञा मानून लेकाला त्या सीसॉच्या फळीवरून उचललं. तेवढ्यात एका बयेने "वुई विल हॅव टू डू इट सम अदर वे" असं म्हणत एका मोठ्ठ्या वजनकाट्याकडे बोट दाखवलं आणि बाळाला घेऊन मातोश्रींना तिथे जाण्याची विनंती केली. त्यानंतर राजे आणि राजमातेचं एकत्र वजन करून झाल्यावर राजांना आमच्याकडे सोपवलं गेलं. त्यावेळी राजांनी जणु काही त्यांना बोर्डिंगच्या शाळेत सोडून देऊन आम्ही निघून चाललोय अशा थाटात धिंगाणा केला. राजांना बोर्डिंगमध्ये पाठवल्यानंतर राजमातेचं पुन्हा एकदा वजन केलं गेलं आणि सोप्पी वजाबाकी करून वजाबाकीचं उत्तर आम्हाला राजांचं वजन म्हणून सांगण्यात आलं.

ते फारच कमी वाटल्याने रारा राजमातासाहेबांनी त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. "दोन महिन्यात एवढंसंच वजन वाढलं? शक्यच नाही. आपण पुन्हा करुया.. लेट्स डू इट अगेन". तिचं ते "लेट्स डू इट अगेन" ऐकल्यावर एक अशि न वाजलेला फोन उचलायला, दुसरी अशि पडलेलं पेन उचलायला आणि तिसरी कुठलीतरी फाईल शोधायला धावली. अशा तर्‍हेने तिचं ते "लेट्स डू इट अगेन" चारी भिंतींवर आदळून पुन्हा आमच्याकडे आल्यावर मी ते पटकन पकडून खिशात कोंबलं आणि तिच्या कानात जोरात खेकसलो उर्फ कुजबुजलो "लेट्स नॉट डू इट अगेन !!!". ती खेकस-कुजबुज बहुतेक भलतीच लाउड झाली असावी. कारण पहिल्या अशिने चटकन फोन ठेवून देऊन, दुसर्‍या अशिने पेन लगेच उचलून आणि तिसर्‍या अशिने फाईल टेबलवर आदळून "नो नीड टू डू इट अगेन" असं म्हणून माझ्याकडे पाहून स्माईल दिलं आणि ते खरं खरं होतं हे मी यावेळी पैजेवर सांगू शकत होतो.

बायकोचा "अरे पण"चा प्रयत्न ताबडतोब दाबून टाकून आपण त्याच्यापुढे 'अप्रोक्झीमेट' असं त्यांना लिहायला सांगू असा प्रस्ताव मी मांडला. ज्ञानोबा माउलींचं ऐकून रेड्यानेही वेद वदावेत तसं माझ्या मुखातून ते 'अप्रोक्झीमेटली' ऐकून तिन्ही 'अश्या' "यस, ऑफ कोर्स, इट्स अप्रोक्झीमेट" चे वेद वदु लागल्या. त्यातली एक जण पुढे होऊन राजमातेला समजावणीच्या सुरात म्हणाली की  "लेट्स पुट द वेट फिगर अ‍ॅज २२ पाउंड्स - क्वेश्चन मार्क". मातेच्या चेहर्‍यावरचा 'क्वेश्चन मार्क' तसूभरही कमी झालेला नसला तरी माझ्या चेहर्‍यावरची अख्खीच्या अख्खी अ‍ॅन्सरशीट बघून त्यांनी त्या माहितीच्या फॉर्मवर '२२ पाउंडस - क्वेश्चन मार्क' असं लिहून टाकलंही.

सौभाग्यवतीच्या जळजळीत कटाक्षांना चुकवावं म्हणून मी तो पियानोवाला कार्यक्रम पुन्हा बघायला लागलो. तर तो कार्यक्रम संपून तिथे लंबे काले घने बालांसाठी अ‍ॅलोव्हेरा उर्फ कोरफडीचं तेल कसं लावावं याचं प्रात्यक्षिक चालू होतं. "बाळांच्या असलेल्या वहिनीवर 'बालां'चे कार्यक्रम दाखवलेले चालतात वाटतं? इंग्रजीत 'ळ' अक्षर नसल्याने त्याचा ते फायदा घेत असावेत बहुतेक" असा फडतूस पीजे मारून सुविद्य पत्नीला हसवावं का असा विचार करून तिच्याकडे मान वळवून बघितल्यावर तिने पुन्हा हळू आवाजात "अप्रोक्झीमेट काय????" असं म्हंटल्यावर मी पुन्हा त्या बालांच्या कार्यक्रमात माझे चित्त गुंतवून घेण्याचा पर्याय लॉक केला. हे सारं होईतो डागदरीनबाई प्रवेश करत्या झाल्या आणि त्यांनी लेकाकडे बघून गोड स्माईल दिलं. (डागदरीनबाई मासुं नसून काकू क्याट्यागरीतल्या असल्याने इथे 'त्या' हे त्यांना आदरार्थी बहुवचन रुपात वापरले आहे हे सुज्ञ वाचकांनी....) लेकाने 'हसा तो फसा' हे जणु स्वतःचं बोधवाक्य असल्याप्रमाणे पुन्हा त्या स्माईलचा चुथडा करण्याचं काम इमानेतबारे पार पाडून मान दुसरीकडे वळवली.

"ओह ही इज सो स्वीट, काम अ‍ॅंड क्वायट" असं डागदरीनबाई वदताच तिन्ही अश्या पुन्हा एकदा आपापल्या (नसलेल्या) कामात व्यग्र झाल्या. फक्त राजमाता आणि मी अशा दोघांनीच डागदरीनबाईंच्या त्या विधानाला जोरदार अनुमोदन दिलं. "प्लीज ब्रिंग हिम इन" असं म्हणून डागदरीनबाई आत गेल्या. त्यांच्यामागोमाग आमचं अडीच तिकीट आत गेलं. त्यांनी आम्हाला जरा वेळ बसायला सांगून उगाच चार वह्यांत काहीतरी लिहून झाल्यावर, आठ फायली उघडून बंद करून झाल्यावर पुरेसा टाईमपास करून झाल्यावर खाटेवर जाड पांढरा कागद अंथरला आणि आम्हाला बोलावलं.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे मातोश्री लेकाला खाटेवर झोपवणार एवढ्यात त्याने कर्णकर्कश्श स्वरात साताचा भोंगा दिला. "ऑलाला, व्हॉट हॅपन्ड डिअर? डोंट क्राय.. आय डिंट डू एनिथिंग" असं म्हणत डागदरीन बाईंनी उंची मोजण्यासाठी त्याच्या डोक्याखालच्या कागदावर पेन्सिलने एक खुण केली आणि पायाखाली एक खुण करावी म्हणून त्याचा पाय ताठ करायला जाणार एवढ्यात त्याने मनोमन "दॅट्स युअर प्रॉब्लेम, बट आय विल डू माय जॉब" असं म्हणून त्यांच्या हातावर जोरदार लाथ मारली. या अचानक झालेल्या अनपेक्षित हल्ल्याने कळवळून जात त्या किंचित मागे सरकल्या. या सगळ्याची सवय असल्याने आम्हाला खरं तर काहीच विशेष वाटलं नाही परंतु त्यांच्यासमोर असं दाखवणं म्हणजे आम्ही आमच्या मुलाच्या हट्टीपणाला प्रोत्साहन देत आहोत किंवा आम्हाला स्वतःच्या लेकाला सांभाळता येत नाही असा त्यांचा समज करून दिल्यासारखं झालं असतं त्यामुळे काहीही निष्पन्न होणार नाही हे ठाऊक असूनही आम्ही उगाचंच (लेकावर) ओरडल्याचा अभिनय केला. आम्ही मायबाप जणु काही अदृश्य आहोत आणि आमचं ओरडणं (रागावणं या अर्थी) हे मानवी कानांच्या श्रवणक्षमतेच्या डेसिबल पातळीच्या पलीकडचं असावं अशा प्रकारे आमच्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून राजांनी दुसरी लाथ झाडली.

त्यानंतर डागदरीन बाईंच्या मुखातून त्याचे दोन्ही पाय घट्ट धरून ठेवण्याचा हुकुम सुटेपर्यंत तिसरी, चौथी, पाचवी........ तेरावी, चौदावी असा गुणतक्ता चढत गेला होता. दोन्ही पाय धरून झाल्यावर मोठ्ठ्या प्रयासाने बाई त्याच्या पायाखालच्या कागदावर पेन्सिलची रेष ओढणार एवढ्यात कसा कोण जाणे त्याने एक पाय हलवालाच आणि पायाखालची रेष योग्य जागी मारली गेली आहे की नाही अशा संभ्रमात डागदरीनबाईंना टाकून गेला. त्यानंतर त्याला तिथून उचलण्याचा हुकुम सुटला आणि मगासच्याच 'खैके पान बनारस वाल्या' टेपने उंची मोजली गेली. तेवढ्यात "हाऊ मच?" असा आत्ता वाटत नसला तरी त्यावेळी उद्धट आणि भोचक वाटणारा प्रश्न विचारण्याचा नाकर्तेपणा माझ्या तोंडून घडला. एका जळजळीत कटाक्षाबरोबर "३२ इंच - क्वेश्चन मार्क" असं उत्तर आमच्या कानांवर आदळलं. "पुन्हा काय क्वेश्चन मार्क????" इति बायको. इथे तर तोंड लपवायला किंवा विषय टाळायला तो टीव्हीही नव्हता. काय हा कंजूसपणा, इतक्या फिया घेतात आणि प्रत्येक रूममध्ये टीव्ही लावायला यांना होतं काय? याच्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे असे विचार करत करत मी 'माय बेबीज बॉडी' वाल्या बाळांच्या अवयवांची सचित्र माहिती देणार्‍या तक्त्यात तोंड खुपसलं.

त्याच्या 'क्वेश्चन मार्क' उंची आणि 'क्वेश्चन मार्क' वजनाची नोंद करून झाल्यावर आपण त्याला आज ठरल्याप्रमाणे दोन लशींची इन्जेक्शनं देणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं. मी घामानं डबडबलेलं कपाळ पुसलं आणि 'आज शामके सबसे सुनहरे मौके के लिए' स्वतःला सज्ज केलं. बायकोने काय तयारी केली हे ठाऊक नाही कारण पहिल्या 'क्वेश्चन मार्क'नंतर आत्तापावेतो तिच्या नजरेला नजर द्यायची माझी तयारी झाली नव्हती.

त्यानंतर पुन्हा एकदा 'हुकुमावरून' बाळराजांना खाटेवर आडवं केलं गेलं आणि 'होल्ड हार्ड अ‍ॅट हिज नीज' आणि 'होल्ड बोथ ऑफ हिज हँड्स टाईटली' असेही दोन महत्वाचे हुकुम सुटले. त्या हुकुमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करूनही जेव्हा प्रत्यक्ष सुई टोचण्यासाठी बाई जवळ आल्या तेव्हा हजार आदितेयांचं बळ अंगात संचारल्याप्रमाणे या एका आदितेयाने एक पाय सोडवून घेण्यात यश मिळवलंच. आणि त्यानंतर तो सुटलेला पाय धाडधाड धाडधाड झाडण्याचा कार्यक्रम काही काळ झाला आणि त्या प्रयत्नांच्या यशस्वितेचं परिमाण बघून अजून अजून जोर लावून दुसराही पाय सोडवला गेला आणि त्या धाडधाड तोफांच्या सरबत्तीचं प्रमाण वाढतच गेलं. अखेरीस बाईंनी बाहेरील शक्तींची मदत घेण्याचं ठरवून त्यांना पाचारण करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांना बोलावणं धाडलं. तेव्हा एका शक्तीने आपलं अशिने बाहेरूनच विचारलं की "इंजेक्शन्स देऊन झाली का?" त्यावर आतल्या शक्तीने तेवढ्याच जोरात ओरडून उत्तर दिलं "होतायत कसली एवढ्यात? उलट मलाच स्वतःला इंजेक्शन्स घेतल्यासारखं वाटतंय. तुम्ही लवकर आत या." हे ऐकताच त्यांची तिरंगी फौज आत धावली. "कॅन यु गाईज स्टँड लिट्ल बिहाईंड?" असं आम्हाला उद्देशून, "इच ऑफ यु होल्ड हिज हँड्स अ‍ँड लेग्स टाईटली अ‍ँड आय विल टेक केअर ऑफ द रेस्ट" असं तिरंगी फौजेला उद्देशून आणि "धिस इज द टफ्फेस्ट फिफ्टीन मन्थ बेबी आय हॅव एव्हर हँडल्ड" असं स्वतःशी पुटपुटत बाईंनी एकेक करत दोन सुया फटाफट खुपसल्या.

आता बिल्डिंग पडते की काय, भूकंप होतो की काय, सुनामी येते की काय असं वाटावं इतक्या उच्च डेसिबलातलं बाळराजे रडायला लागल्यावर त्या रणरागिणीने आणि तिच्या फौजेनी त्यांचं काम फटाफट आवरतं घेतलं आणि बघता बघता युद्धकैद्याची सुटका करून त्याला आमच्या हवाली केलं.

सारखं बाहेरच्या दिशेने बोट दाखवून तिथून बाहेर पडण्याविषयीची अपार तळमळ बाळराजे बोटांतून व्यक्त करत असले तरी पुढच्या महिन्यातल्या इंजेक्शन्ससाठी अपॉइंटमेंट घेणं आवश्यक असल्याने मी ते काम करण्यासाठी रिसेप्शनच्या दिशेने जात होतो तेवढ्यात डागदरीनबाई आपल्या जागेवरूनच ओरडून त्या रिसेप्शनिस्टला म्हणाल्या की "यांना आता (थेट) तीन महिन्यांनतरची तारीख दे (प्लीज)". अचानक त्या रिसेप्शनिस्टच्याही मुखकमलावर विलक्षण हास्य पसरलं आणि तिने तीन महिन्यांनंतरची तारीख दिली.

तिथून बाहेर पडल्यावर बाळराजे भलतेच खुशीत होते. मगासच्या हाय डेसिबल आरडाओरड्याचा आणि 'अमिताबच्चन' वाल्या लाथाळीचा मागमूसही चेहर्‍यावर नव्हता. चांगले खुशीत हसत होते. म्हणून मग असंच उगाच म्हणून तिथे जवळच असलेल्या बागेत आमची वरात शिरली. बागेतल्या छोट्या झोपाळ्यावर लेकाला बसवावं म्हणून त्या झोपाळ्याजवळ गेलो तर तेवढ्यात तिथल्या पाटीने लक्ष वेधून घेतलं "वीस पाउंड्पेक्षा कमी वजन असलेल्या मुलांसाठी नाही." आणि आमच्या चेहर्‍यावर साहजिकच उमटलं ते भलंमोठ्ठं 'क्वेश्चन मार्क' !!

* समस्त प्रश्न आणि अन्य चिन्हे गुगल इमेजेसवरून साभार 

Monday, July 12, 2010

'काळा' पाठलाग

काळा सुट घातलेला एक गोरागोमटा तरुण लंडनच्या रस्त्यावरून हिंडत असतो. मधेच तो एका हॉटेलमध्ये शिरतो आणि कॉफी ऑर्डर करतो. तेवढ्यात त्याच्या बाजूच्याच टेबलवर एक लांब केसवाला, दाढी वाढलेला माणूस येऊन बसतो आणि त्या गोर्‍या तरुणाला काही वेळ न्याहाळत रहातो. थोड्या वेळाने तो गोरा तरुण उठतो आणि थेट त्या लांब केसवाल्या माणसाच्या टेबलाजवळ जातो आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसतो. उगाच आडवळणं न घेता तो त्याला थेट दरडावून विचारतो की "तू माझा पाठलाग का करतो आहेस? काय हवंय तुला?". सुरुवातीला थोडे आढेवेढे घेऊन झाल्यावर आणि गोर्‍या माणसाचे आरोप नाकारून झाल्यावरही तो बधत नाही हे पाहिल्यावर तो लांब केसवाला हळूहळू बोलायला लागतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो एक होतकरू लेखक असतो. तो एक पुस्तक लिहीत असतो आणि त्यासाठी नवीन नवीन पात्र मिळवण्यासाठी तो असाच कोणाचाही पाठलाग करत असतो. (त्याचे पाठलागाचे विशेष नियम असतात. तेही कालांतराने 'कळतात'). पुढे मग बोलता बोलता त्या गोर्‍याच्या संमतीने त्याच्या बॅगची झडती घेऊन झाल्यावर तो एक भुरटा चोर आहे हे त्या लांब केसवाल्याला कळतं आणि लांब केसवाला खरंच अतिशय निरुपद्रवी आहे याची खात्री त्या गोर्‍याला पटते. अशा तर्‍हेने जुजबी गप्पा आणि (खर्‍या) ओळखी झाल्यावर लेखक त्या चोराबरोबर भटकायला तयार होतो. ते ३-४ घरांमध्ये फुटकळ चोर्‍या करतात. चोर त्या प्रत्येक घरातून उगाचंच काहीबाही गोष्टी लंपास करतो. सीडीज, पत्रं, रुमाल, अंतर्वस्त्रं, इअररिंग्स असं काहीही चोरतो. अशा चोर्‍या करताना केलेल्या शोधाशोधीमुळे त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजायला मदत होते असं चोराचं म्हणणं असतं. लेखकालाही ते पटतं. एका चोरीत तर ते पकडले गेले असतानाही चोराच्या हुशारीमुळे तिथून सटकतात. दरम्यान लेखक एका मुलीच्या प्रेमात पडतो. बोलता बोलता त्याला कळतं की त्या मुलीच्या काही आक्षेपार्ह फोटोंमुळे एकजण तिला ब्लॅकमेल करत असतो. ते फोटो ब्लॅकमेलरच्या कपाटात असतात. लेखक तिला वचन देतो की तो काहीही करून तिला ते फोटो आणून देईल आणि तिची त्या ब्लॅकमेलरच्या तावडीतून सुटका करेल आणि वचन दिल्याप्रमाणे तो त्या चोरीच्या तयारीलाही लागतो. त्यानंतर बरेच उलटसुलट प्रसंग घडतात परंतु ते स्पॉयलर असल्याने इथेच थांबणं योग्य.

'मोमेंटो'वाल्या (Memento असं स्पेलिंग असलेल्या या शब्दाचा खरा उच्चार 'मेमेंटो' असा नाही... तर 'मोमेंटो' किंवा 'ममेंटो' असाच आहे. ) क्रिस्टोफर नोलनच्या 'फॉलोइंग'ची कथा थोडक्यात आणि सरळपणे सांगायची झाल्यास मी तरी अशी सांगेन. (खरं तर 'फॉलोइंग' हा नोलनचा 'मोमेंटो'च्या आधीचा चित्रपट पण 'मोमेंटो'मुळे नोलनला जास्त प्रसिद्धी मिळाली त्यामुळे 'मोमेंटो'वाला क्रिस्टोफर नोलन असं म्हणतोय.) पण एवढ्या सरळपणे कथा, दृष्य, प्रसंग मांडेल तो नोलन कसला. तो त्याच्या टिपिकल शैलीत गुंतागुंत करून सगळे प्रसंग आपल्यासमोर मांडतो. चित्रपटात सुरुवातीला आपल्याला दिसतात ते लंडनचे गजबजलेले रस्ते, त्याच्या पार्श्वभूमीवर मागून त्या लेखकाचा आवाज येत असतो. तो पाठलाग का, कसा आणि कोणाचा करतो हे सांगत असतो. त्यानंतर वर सांगितलेला हॉटेलचा प्रसंग घडतो. पुढच्याच प्रसंगात ते एका घरासमोर उभे राहून घराचं दार डुप्लिकेट चावीने उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतात. तिथे चोरी करून झाल्यावर अचानक दुसर्‍या मग तिसर्‍या घरात चोरी करताना दिसतात. मधेच लेखक एका मुलीशी हॉटेलात बोलत बसलेला दिसतो तर पुढच्या प्रसंगात तिच्या घरी असतो. तिच्या बॉयफ्रेंडने एका माणसाला तिच्या डोळ्यासमोर कसं हालहाल करून मारलेलं असतं ते ती सांगते. अचानक पुढचा प्रसंग सुरु होऊन त्यात तो लेखक एक छोटी पेटी उघडतो आणि त्यात त्याला काय काय मिळालं हे त्या चोराला फोनवर सांगतो. पुन्हा तो अचानक त्या मुलीला भेटतो ते एकदम वेगळ्याच रुपात. त्याचे केस बारीक कापलेले असतात आणि स्वच्छ दाढी केलेली असते. अचानक पुढच्या प्रसंगात डोळा सुजलेल्या अवस्थेत तो त्या मुलीच्या घराखाली दिसतो. पुढच्या प्रसंगात तो केस कापलेल्या आणि स्वच्छ दाढी केलेल्या नवीन रुपातच दिसतो पण डोळा सुजलेला नसतो. त्या प्रसंगात तो त्या चोराला भेटतो. तिथे त्यांची बोलाचाली होते, हाणामारी होते. पुन्हा पुढच्या प्रसंगात लेखक ते फोटो चोरण्यासाठी एका घरात शिरतो आणि ते कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असतो.

कळतंय काही ?? काहीतरी कळतंय का ? नाही ना? हीच तर आहे नोलनची खासियत. हा माणूस छोट्याछोट्या  प्रसंगांचे उलटसुलट तुकडे करून काळाच्या परिमाणालाच धोबीपछाड देतो. जेमतेम सत्तर मिनिटांच्या असलेल्या चित्रपटात पहिली पस्तीस मिनिटं हे असेच सगळे अगम्य आणि अतर्क्य प्रसंग घडत असतात. एकाही दृश्याचा ना संदर्भ लागतो ना अर्थ कळतो. पस्तीस मिनिटांनी वैतागून जाऊन मी चित्रपट बंद करणार होतो. पण तरीही तसाच चिकाटीने बघत राहिलो. त्यानंतरच्या वीस मिनिटांत बर्‍याच घटना उलगडत जातात. अनेक प्रसंगांचे अर्थ कळत जातात. आधी घडलेल्या अनेक छोट्या छोट्या घटना ज्यांना आपण किरकोळ म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सोडून दिलेल्या असतात (किंवा अनेकदा टिपलेल्याही नसतात) अशा घटना अचानक वेगळंच रूप घेऊन आपल्यापुढे येतात. त्या वीस मिनिटांत बराच चित्रपट आपल्याला समजतो. आधीच्या ३५ मिनिटांच्या नीरस रोलरकोस्टर राईड मधून आपण थोडेफार स्थिरावतो. चांगला कोण, वाईट कोण, कोणाचा हेतू काय, कोणी कोणाला वापरलंय हे थोडंथोडं लक्षात यायला लागतं. आणि हे 'थोडंथोडं लक्षात यायला लागतं' असं आपण म्हणून आपण थोडेफार स्थिरावतोय ना स्थिरावतोय तोच शेवटच्या दहा मिनिटांत आपल्या पायाखालची चादर खेचली जाते. भूकंप होऊन पायाखालची जमीन सरकते आहे असा भास होतो. कारण इतक्या खटाटोपानंतर आपण ज्या गृहितकाशी स्थिरावलो असतो त्याच गृहितकावर घाव घालून त्याचे तुकडे केले जातात. अशक्य धक्का बसतो. एक नवीनच मांडणी आपल्यासमोर येते. आपल्याला पूर्णतः संभ्रमात टाकते. आणि आपला त्यावर विश्वास बसायला लागतोय आणि अजून काही धक्का तर नाही ना असा विचार करेपर्यंत चित्रपट संपतो. आपण पुन्हा एकदा चित्रपट बघायचं मनोमन ठरवून टाकतो. कारण काही न उलगडलेल्या कोड्यांची किंवा पहिल्या अर्ध्या तासातल्या अनेक अर्थहीन घटनांची उत्तरं मिळाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नसतं. आपण पुन्हा एकदा चित्रपट वेगळ्या नजरेने बघतो आणि मोठ्ठंच्या मोठ्ठं कोडं उलगडल्यासारखं वाटतं. एका कोड्याची उकल झाल्याचं समाधान लाभतं.

हा चित्रपट निओ-न्वार किंवा मॉडर्न-न्वार फिल्म (Film Noir) प्रकारातला आहे. मतकरींच्या ब्लॉगमुळे एव्हाना आपल्याला या शब्दाचा परिचय झालेलाच आहे. Noir या फ्रेंच शब्दाचा अर्थ काळा. म्हणजे रूढार्थाने 'न्वार फिल्म'चा अर्थ काळा चित्रपट. थोडक्यात 'चांगलं विरुद्ध वाईट, सत्याचा असत्यावर विजय, चांगली व्यक्ती म्हणजे नायक आणि ती खलनायकावर विजय मिळवते' असल्या टिपिकल, पुस्तकी कल्पनांना नाकारून खलनायकाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अनुषंगाने मांडलेला गुन्हेगारीपट. यात केंद्रस्थानी असलेली व्यक्ती ही खरोखरीच वाईट असते. उगाच चांगला व्हिलन (!) वाली बाळबोध कल्पना इथे लागू होत नाही. थोडक्यात 'अमिरोंका दुष्मन, गरीबोंका मसीहा' वाला प्रकार नाही. फक्त स्वतःचा मसीहा असलेला आणि स्वतः सोडून सगळ्यांचा दुष्मन असलेल्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून मांडलेली कथा. असे न्वारपट युरोप आणि अमेरिकेत ४०-५० च्या दशकात मुबलक प्रमाणात आले आणि त्यांच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांनी ते उचलूनही धरले. विकीवर शोधताना ही न्वारपटांची यादीच सापडली. आपल्या इथेही हा न्वार प्रकार थोडाफार हाताळला गेला. फिदा, जॉनी गद्दार, कमीने ही त्याची काही ठळक उदाहरणं.

अजून एक गोष्ट म्हणजे ब्लॅक अ‍ॅंड व्हाईटच्या जमान्यातला नसूनही नोलनने हा चित्रपट ब्लॅक अ‍ॅंड व्हाईट केला आहे. माझ्या अल्पस्वल्प मतीनुसार दोन कारणं असावीत. एक तर त्याला जुन्या न्वारपटाचा लुक देण्यासाठी असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'न्वार' शब्दाचा कृष्णकृत्यांशी असलेला संबंध अधोरेखित करण्यासाठीही असावं. अर्थात हे चूकही असेल. जाणकारांनी योग्य मार्गदर्शन करावं. मी फक्त मला लागलेला अर्थ सांगितला.

थोडक्यात 'आधीच न्वार, त्यात नोलनची हाताळणी' असं जबरदस्त मिश्रण आहे हे आणि ही दोन विलक्षण रसायनं एकत्र आलेली बघणं म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने खरीखुरी मेजवानीच. चुकवू नये अशी. काय मग? कधी निघताय 'पाठलागा'वर ??

Saturday, July 3, 2010

गच्च .. !!

मोठा विकांत असल्याने प्लॅटफॉर्मवर बराच वेळ वाट बघून झाल्यावर मग ट्रेन मिळाली. आत शिरताक्षणी बसायला मिळाल्याबद्दल स्वतःचेच कौतुकसोहळे साजरे करावेत असा काही प्रकार नव्हता. कारण सुट्ट्यांमुळे ट्रेन तशी रिकामीच होती. दिवसभर उन्हात भटकंती झाली होती. दिवसभर फिरल्यामुळे जास्त दमलोय की घामाची आंघोळ झाल्यामुळे असं विचित्र कोडं पडत होतं. ट्रेनमध्ये एसी वगैरे सगळं व्यवस्थित असूनही ते शोभेची वस्तू वाटावं अशी परिस्थिती होती. आमच्या समोर दोन बायका येऊन बसल्या. त्यांच्याबरोबर एक छोटीशी मुलगी होती. ४-५ वर्षांचीच असेल. छकुली अगदी गोड होती. गुलाबी गुलाबी बूट, त्याच रंगाची सशाच्या चेहर्‍याची गळ्यात अडकवलेली छोटूशी पर्स, मोठ्ठी फुलंफुलं असलेली जीन्स, छान गोल चेहरा. मधेच खुदकन गोड हसायची. छान होती एकदम.

लेकाला खेळवत त्याचं आणि आमचंही लक्ष उकाड्यापासून दूर वळवण्याचा व्यर्थ प्रयत्न आम्ही करत होतो. जरा वेळाने अगदीच घामाघूम झालो. अगदीच असह्य होत होतं. अचानक डोक्यात आलं. त्याचा टीशर्ट काढून टाकला आणि चांगला सैलसा बनियान त्याला घातला. जरा बरं वाटलं त्याला आणि त्यामुळे अर्थातच आम्हालाही. थोडा खेळायला लागला तो. त्याच्याबरोबर आमचीही बडबड, गप्पा, गाणी, खिदळणं चालू होतं. बघता बघता समोरच्या त्या छान गुलाबी बाहुलीशी लेकाची छान गट्टी जमली. तिच्याकडे बोट दाखवून हा खिदळत होता. तीही छान हसून त्याच्याकडे बघत होती. मधेच घामाने थबथबलेला चेहरा जरा कोरडा करावा म्हणून रुमाल काढला आणि चेहरा खसाखसा पुसत असताना अचानक एक गोष्ट जाणवली जी इतक्या वेळ बघूनही लक्षात आली नव्हती. छान गुलाबी बूट, गुलाबी पर्स, गोल चेहरा आणि .... आणि त्या चेहर्‍याभोवती घट्ट गुंडाळलेला तो जाड स्कार्फ. अगदी चेहरा झाकणारा बुरखा नसला तरी त्यातलाच एक प्रकार. हे का करायचं, का करतोय याबद्दलचं एक अक्षरही कळत नसताना, माहीत नसताना निव्वळ आई-बाप-आजी-आजोबा आणि अजून कोणकोण कुठकुठले ते धर्मरक्षक सांगतात म्हणून आणि धर्मात (!!) तसं सांगितलंय म्हणून आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे मरणाचं उकडत असतानाही गच्च रुमालाने चेहरा आवळून टाकाव्या लागणार्‍या त्या चिमुरडीची प्रचंड दया आली. किती मुली अशा अंध शिकवणींच्या आणि रीतीरीवाजांच्या बळी पडत असतील? स्वतःच्याच धर्माने परवानगी नाकारली म्हणून स्वतःच्याच धर्माच्या/देवाच्या प्रार्थनास्थळात जाऊ शकत नसतील? स्वतःचा धर्म सांगतो म्हणून आनंदाने (?) स्वतःच्या डोक्यावर सवती लादून घेत असतील?

अर्थात हे काही मी पहिल्यांदाच बघत नव्हतो किंवा नव्याने काहीतरी कळलं अशातलाही भाग नव्हता. पण त्या जीवघेण्या उकाड्यातला तो चेहर्‍याभोवती गच्च गुंडाळलेला रुमाल अनेक गोष्टी मनात पुन्हा जागवून गेला, प्रश्नांची पिल्लं सोडून गेला.

न राहवून मी लेकाचा चेहरा गार ओल्या वाईपने पुन्हा एकदा स्वच्छ पुसला आणि उगाचंच हातातल्या पेपरने त्याला वारा घालायला लागलो !!

Friday, July 2, 2010

एरिन, अपील, कार्बाईड, अन्याय वगैरे... !!

तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्या शोधात असते. जो वकील तिची केस लढतो त्याच्याकडेच नाममात्र पगारावर क्लर्क म्हणून कामाला लागते. काम करत असताना तिला एका खटल्याची माहिती कळते. एका बलाढ्य इलेक्ट्रिक/गॅस कंपनीवर त्या परिसरात हानिकारक रसायनं सोडून तेथील पाणी दुषित केल्याचा आरोप असतो. या पाण्याच्या वापरामुळे तेथील अनेक रहिवाश्यांना कित्येक प्रकारचे भयानक रोग झालेले असतात. कंपनी अतिशय मोठी आणि शक्तिशाली असल्याने अर्थातच ती असल्या आरोपांना किंमत देत नसते. ही बाई त्या परिसरातल्या नागरिकांशी संपर्क साधून, त्यांच्याशी बोलून, अधिकाधिक माहिती गोळा करते. त्या कंपनीविरुद्ध सगळ्यांनी एकत्र खटला दाखल करावा यासाठी त्या लोकांना आणि तिच्या स्वतःच्या बॉसला तयार करते. हे करताना तिला सर्वांचाच रोष पत्करावा लागतो. स्वतःचा बॉयफ्रेंड, किंबहुना मुलांशी भांडणं होतात. तिचा वकील बॉसही ही एवढी मोठी उडी घ्यायला साशंक असतो. कारण केस हरली तर दिवाळखोरी निश्चित असते. अखेरीस खटला उभा राहतो. बाजू मांडल्या जातात, पुरावे दिले जातात, साक्षी नोंदवल्या जातात. अंतिमतः त्या गॅस कंपनीने विषारी रसायनं त्या भागात निष्काळजीपणे, ते द्रव्य किती विषारी आहे हे ठाऊक असूनही योग्य काळजी न घेता सोडल्यानेच तेथील पाणी दुषित झालं आणि ते दुषित पाणी प्यायल्याने तेथील रहिवाश्यांना अनेक भयंकर जीवघेण्या आजारांना तोंड
द्यावं लागलं यावर शिक्कामोर्तब होतं. कंपनीला ३३३ कोटी डॉलर्सचा दंड होतो. !!! रूढार्थाने कायद्याचं शून्य ज्ञान असलेल्या एका साधारण स्त्रीपुढे अतिविशाल कंपनीला गुडघे टेकावे लागतात... !!!

ही अमेरिकेत कॅलिफोर्नियामधे घडलेली सत्यघटना आहे... !!! त्या बाईचं नाव एरिन ब्रोकोविच. या घटनेवर पुढे तिच्याच नावाचा चित्रपट निघाला. ज्युलिया रॉबर्टसने एरिन ब्रोकोविच अक्षरशः जिवंत केलीये. या चित्रपटासाठी ज्युलियाला ऑस्कर मिळाला.

****

मिसिसिपीतल्या एका छोट्या परगण्यातले (काऊन्टी) लोक अचानक फटाफट मृत्युमुखी पडू लागतात. सगळ्यांचं कारण एकच. कॅन्सर. हा वेग बघता बघता इतका वाढतो की या परगण्यात एका वर्षांत कॅन्सरने मरणार्‍यांची संख्या संपूर्ण अमेरिकेत एका वर्षात कॅन्सरने मरणार्‍यांच्या एकूण संख्येपेक्षा तिप्पट होते. कॅरी काऊन्टीला 'कॅन्सर काऊन्टी' हे भ्रष्ट नाव मिळतं. कॅन्सरमुळे अफाट संख्येने बळी पडणार्‍या लोकांच्या मृत्यूमागेही अशीच एक बलाढ्य रासायनिक कंपनी असते. अगदी तेच कारण. भयंकर विषारी द्रव्य कुठल्याही काळजीशिवाय जवळच्या जंगलात, जमिनीत, पाण्यात कुठेही सोडली जातात. ती झिरपत झिरपत जात प्यायच्या पाण्याच्या स्त्रोतापर्यंत पोचतात आणि पाण्यात मिसळतात.

पेशाने वकील असलेलं मेरीग्रेस पेटन आणि वेस पेटन हे जोडपं त्यातल्या जिनेट बेकर नावाच्या एका बाईची केस स्वीकारतात. या बाईने काही महिन्यांच्या अंतराने आपला नवरा आणि १०-१५ वर्षांचा मुलगा गमावलेला असतो. प्रचंड प्रयत्नाने आणि अफाट इच्छाशक्तीच्या बळावर पेटन्स खटला लढवतात आणि जिंकतातही. कंपनीने बेकरला नुकसान भरपाई म्हणून चार कोटी डॉलर्स द्यावेत असा निकाल कोर्ट देतं. स्थानिक कोर्टातल्या त्या निर्णयाला 'क्रेन केमिकल' चे वकील उच्चन्यायालयात आव्हान देतात. दरम्यान 'क्रेन' चा मालक कार्ल ट्रूडू (Carl Trudeau) एक जबरदस्त खेळी खेळतो आणि तीही एका सिनेटरच्या मदतीने. ज्या उच्च न्यायालयात ही केस साधारण चौदा महिन्यांनी उभी राहणार असते त्या न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी साधारण आठ महिन्यांनी निवडणुका होणार असतात. कार्ल निवडणुका 'मॅनेज ' करणार्‍या एका कंपनीला गाठतो आणि त्यांना काही कोटी डॉलर्स देतो. त्या कंपनीचा सर्वेसर्वा असलेला बॅरी एक साधा, सरळमार्गी वकील (रॉन) निवडतो, मिसिसिपीतल्या न्यायव्यवस्थेबद्दल, चुकीच्या न्यायप्रक्रियेबद्दल, एकूणच (न) होणार्‍या अन्यायाबद्दल रॉनचे कान भरतो आणि हा न्यायप्रक्रियेतील अन्याय दूर करण्यासाठी त्याची कंपनी काम करत असल्याचं सांगून हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी होणार्‍या निवडणुकीसाठी उभं राहण्याची गळ घालतो. पैशाची काळजी करू नकोस, त्याची व्यवस्था मी आणि माझी कंपनी बघू असं गोड आश्वासनही देतो. भोळा रॉन या सापळ्यात अडकतो आणि निवडणूक लढवायला तयार होतो. निवडणूक प्रचारात करोडो रुपये उडवले जातात, अस्तित्वातच नसलेल्या अनेक मुद्द्यांची राळ उठवली जाते, वातावरण गढूळ केलं जातं, जाहिरातींचा मारा केला जातो आणि शेवटी ती निवडणूक जिंकली जाते. काही दिवसांनी बेकर केस जेव्हा रॉन समोर येते तेव्हा तो काहीही विचार न करता ती केस, तो दंड, ती शिक्षा सरळ फेटाळतो आणि अशा काही अटी घालतो की जेणेकरून तो खटला पुन्हा सुनावणीसाठी म्हणून खालच्या कोर्टात जाऊ शकत नाही की अपील करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाऊ शकत नाही. तसंच त्या गोष्टींना 'क्रेन केमिकल' जवाबदार आहे याचा भक्कम पुरावा नाही असं सांगून "तो परिसर स्वच्छ करणे, पाणी शुद्ध करणे, रसायनं काढून टाकणे" यापैकी कुठल्याही प्रकारची जवाबदारी 'क्रेन केमिकल' वर नाही असा निर्णय देतो. आणि हे सगळं त्याच्याकडून बेमालूमपणे करवून घेतलं जातं. तो बळीचा बकरा आहे हे त्याला (एका प्रसंगाचा अपवाद वगळता) कळतही नाही.

पेटन वकील देशोधडीला लागतात, दिवाळखोरी जाहीर करतात. मुलाच्या आणि नवर्‍याच्या आठवणीने रडत राहण्याशिवाय जिनेट बेकरच्या हातात काहीच रहात नाही. या खटल्याकडे डोळे लावून बसलेले अनेक फिर्यादी आणि त्यांचे वकील खटला न लढताच हरतात. सुरुवातीला खटला हरल्यानंतर शेअर बाजारात शंभर कोटी डॉलर्स हरलेला कार्ल ट्रुड्रू त्याच्या कित्येक कोटी डॉलर्स परत मिळवतो. ४१ कोटीचा दंड चुकवणारा कार्ल शेवटी ९१ कोटीची मोठ्ठी बोट विकत घेतो.

'द अपील'. जॉन ग्रिशमच्या अनेक हादरवून टाकणार्‍या पुस्तकांपैकी एक. या कादंबरीचा सत्यघटनेशी संबंध नाही असं ग्रिशम कितीही म्हणत असला तरीही काही वर्षांपूर्वी व्हर्जिनिया मध्ये हायकोर्टाच्या न्यायाधीशाची खुर्ची विकत घेण्याचा यशस्वी प्रयत्न झाला होता त्याच्याशी ही कादंबरी कमालीचं साधर्म्य साधते.

****

एका गजबजलेल्या शहरात एका मध्यरात्री एका रासायनिक कंपनीच्या अफाट निष्काळजीपणामुळे वायूगळती होते. पंधरा हजार लोक थेट मृत्युमुखी पडतात. प्रचंड व्यंग घेऊन जन्माला येणार्‍या अर्भकांची तर गणतीही अशक्य. एक अख्खी पिढी काळाच्या पडद्याआड जाते आणि पुढच्या कित्येक पिढ्या अपंग होतात किंवा अनेक दुर्धर रोगांचे आगर बनतात. कंपनीच्या अमेरिकन मालकाला (सन्मानाने) भारतात आणलं जातं, खटला दाखल केल्यासारखं दाखवून त्याचा यथायोग्य पाहुणचार केला जातो, काही तासांत त्याला जामिनावर सोडलं जातं, प्रत्यक्ष मुख्यमंत्री आणि स्वतः पंतप्रधान यांच्या आशीर्वादाने त्याला विमानतळावर पोचवलं जातं आणि तो सुखरूप अमेरिकेत पोचेल याची काळजी घेतली जाते. कालांतराने "जामिनावर सोडलं जाईल" या अटीवरच तो पोलिसांच्या स्वाधीन झालेला असतो हे गुपित फुटतं. थोडक्यात तो सगळा खेळ असतो. सगळं काही ठरल्याप्रमाणे पोलीस त्याला फरार घोषित करतात. मुख्यमंत्री, पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, गृहमंत्री सगळे त्यांच्या हो ला हो करतात. त्याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेला जाब विचारण्याची आणि कालांतराने भीक मागण्याची भाषा केली जाते. पण पुढे काहीच ठरत नाही. कोणीच काही करत नाही.  २६ वर्षं खटल्याची कागदपत्र उबवून झाल्यावर 'अन्यायालय' आरोपींना २ वर्षं आणि काही लाख रुपड्यांची  शिक्षा देतं. (आणि मुख्य आरोपी तर आरोपींच्या यादीतून कधीच बाद झालेला असतो !!) काही लाखांच्या जामिनावर आरोपींची सुटण्याची व्यवस्था करून ठेवलेली असतेच. पंधरा हजारांचे खुनी दीड लाख रुपड्यात सुटतात. मुख्य आरोपीचं तर नखही दृष्टीस पडत नाही. (कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर तशी व्यवस्था केलेली असते.). आमचे पंतप्रधान त्यांच्या राष्ट्रपतींना भेटतात पण या सार्‍या अन्यायाबद्दल चकार शब्द काढण्याचा पुरुषार्थ दाखवत नाहीत.

सार्‍याच बेकर आशाळभूतासारख्या न्यायाची, मदतीची वाट बघत राहतात. पण कोणीच पेटन्स किंवा ब्रोकोविच मदतीला येत नाहीत. येतात ते फक्त बॅरी, ट्रूडू आणि रॉनच. लचके तोडायला !!!

तळटीप  : 'द अपील' वाचत असताना आणि वाचून झाल्यावर मला एरिन ब्रोकोविच तर आठवलीच पण आपल्या भोपाळ खटल्यात किंवा एकूणच न्यायव्यवस्थेत 'द अपील' सारखीच न्यायाधीशांची खरेदी-विक्री होत असेल का असा एक प्रश्नही मनात डोकावून गेला. असेल.. नक्कीच असेल.. त्याशिवाय का न्यायव्यवस्थेची, शोषितांची अब्रु खुल्यावर लुटली जात असतानाही सगळे मंत्री-संत्री, पुढारी (आपल्याला मिळालेल्या रुपड्यांच्या राशीवर लोळत) तोंड शिवून गुपचूप बसले होते !!!

* सर्व छायाचित्रे गुगल इमेजेस/विकी वरून साभार.

स्थलकालाची बंधनं झुगारणारा पाशवी विखार : एका माळेचे मणी

सुविख्यात इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी पानिपत युद्ध ते हैद्राबाद स्वातंत्र्य चळवळ आणि समर्थ संप्रदाय ते भारतीय मुसलमान अशा अनेकविध विषया...