Thursday, May 19, 2022

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त, खुनशी, क्रूर, अमानुष असणारी, खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्ती असते अशी एक सर्वसाधारण समाजमान्यता आहे. परंतु अत्यंत हुशार, मनमिळावू, कुटुंबवत्सल, कर्तबगार आणि स्वतःच पोलीस खात्यात काम करणारा एक सिरीयल किलर इसम आपल्यापुढे मांडून यातल्या प्रत्येक गृहीतकाला, पूर्वग्रहाला छेद देणारा नायक आपल्यापुढे आला तर? अर्थात मी 'डेक्स्टर' या मालिकेविषयी बोलतोय हे वाचकांच्या एव्हाना लक्षात आलं असेलच.

मयामी पोलीस खात्यात रक्त-नमुना-विश्लेषक अर्थात ब्लड स्प्लॅटर अनॅलिस्ट म्हणून काम करणारा डेक्स्टर मॉर्गन मायकल सी हॉल या अत्यंत गुणी अभिनेत्याने आपल्यासमोर छोट्या पडद्यावर सादर केला होता. डेक्स्टर, त्याचे दिवंगत वडील हॅरी, त्याची दत्तक बहीण डेब्रा, बायको रिटा आणि त्याचे पोलीस खात्यातले सहकारी यांच्याभोवती ही मालिका फिरते. या मालिकेचे २००६ ते २०१३ असे आठ सीझन्स प्रसारित झाले होते. (नुकतीच 'डेक्स्टर  - न्यू ब्लड' ही नवीन मालिका/सिझन ७-८ वर्षांच्या गॅपनंतर प्रसारित झाली.) या डेक्स्टर मालिकेविषयी सुमारे ११ वर्षांपूर्वी, म्हणजे त्या मालिकेचा पाचवा सिझन प्रसारित होत असताना, मी एक सविस्तर ब्लॉगपोस्ट लिहिली होती. पहिला सिझन बघत असताना ही मालिका जेफ लिंडसे या लेखकाच्या 'डार्कली ड्रीमिंग डेक्स्टर' या पुस्तकावर आधारित आहे असं वाचलं होतं. त्यामुळे कधीपासून हे पुस्तक वाचायचं ठरवत होतं परंतु योग आला  नाही. नंतर काही वर्षांनी शोधाशोध करताना कळलं की जेफ लिंडसेने डेक्स्टर या पात्रावर आठ पुस्तकं लिहिली आहेत. अखेरीस मी पुस्तक मालिकेतलं पहिलं पुस्तक अर्थात Darkly Dreaming Dexter वाचायला घेतलं आणि खरंच सांगतो पहिला सिझन बघतानाचा डेक्स्टरचं उलगडत जाणारं व्यक्तिमत्व, त्याचा खेळकर-हलकाफुलका-विनोदी स्वभाव, त्याचं सिरीयल किलर असणं, त्यामागची कारणं हे सगळं जितक्या प्रभावीपणे उलगडत जातं त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रवाहीपणे ते पुस्तक वाचताना सामोरं येतं.

जेफ लिंडसेने डेक्स्टर पुस्तक मालिकेत एकूण आठ पुस्तकं लिहिली. ती पुढीलप्रमाणे

1 Darkly Dreaming Dexter
2 Dearly Devoted Dexter
3 Dexter in the Dark
4 Dexter by Design
5 Dexter is Delicious
6 Double Dexter
7 Dexter's Final Cut
8 Dexter is Dead


पहिल्या पुस्तकात डेक्स्टरची सामाजिक
, कौटुंबिक पार्श्वभूमी तर उलगडतेच परंतु त्याचं सिरीयल किलर बनणं, तो तसा का बनतो, किंवा त्याला तसं कोण आणि का बनवतं या सगळ्याची एकामागोमाग एक धक्कादायक उत्तरं मिळायला लागतात. ज्या कारणामुळे तो सिरीयल किलर बनतो तेच कारण त्याला भावनाविहीन, शुष्क बनवायलाही कारणीभूत ठरतं. त्याच्या वेळोवेळी येणाऱ्या स्वगतातून तो स्वतःला मानव किंवा ह्युमन मानत नसतो इतका तो भावनाविहीन किंवा शुष्क झालेला असतो हे वाचकांना कळतं. पण आपण ह्युमन नाही हे जगाला कळू न देण्यासाठी तो करत असलेल्या नाना खटपटी-लटपटी पाहूनही थक्क व्हायला होतं.

मालिकेविषयी लिहितानाही मी लिहिलं होतं की मालिकेचा (आणि अर्थात पुस्तकांचाही) यूएसपी म्हणजे डेक्स्टरची वेळोवेळी येणारी स्वगतं, त्यातला प्रसंगी विक्षिप्त वाटू शकणारा मिश्किलपण, खोडकरपणा. अर्थात त्याला २४ तास हा मुखवटा घालून वावरणं अनिवार्यच असतं अन्यथा त्याचं खरं स्वरूप कधीही उघड होण्याची भीती असते. मालिका पाहिली असल्याने या सगळ्यातला जोर किंचित कमी होत असला तरी फायदा हा की वाचत असताना पूर्ण वेळ आपल्या समोर मायकल सी हॉल वावरत असतो.

मालिकेचा पहिला सिझन हा ढोबळपणे पहिल्या पुस्तकावर बेतलेला आहे. त्यानंतरच्या सीझन्समध्ये प्रमुख पात्रं तीच असली तरी कथा पुस्तकापासून फारकत घेते. पहिल्या पुस्तकात मायामीमधल्या वेश्यांचे खून करत सुटलेल्या एका माथेफिरू सिरीयल किलरची कथा आहे. पण विशेष म्हणजे प्रत्येक खुनाच्या जागी फक्त डेक्स्टरलाच कळेल अशी एखादी खूण किंवा क्लु /हिंट असते. अर्थात त्यालाही हे हळूहळू लक्षात यायला लागतं. तर हा खून करणारा इसम कोण, तो हे का करत असतो आणि डेक्स्टर साठी कुठल्या हिंट्स  आणि का पेरत असतो या सगळ्याचं तपशीलवार वर्णन पुस्तकात येतं.

मालिकेतलं दुसरं पुस्तक म्हणजे डिअरली डिवोटेड डेक्स्टर. या पुस्तकात तर जेफ लिंडसे अजून एक पाऊल पुढे गेला आहे. एखाद्या व्यक्तीचं अपहरण करून, त्याचे हालहाल करून परंतु त्याला न मारता तसंच ठेवणारा एक विक्षिप्त खुनशी सिरीयल किलर या पुस्तकात आपल्या भेटीस येतो. अर्थात तो कोण आहे आणि तो हे का करतोय हे काही क्षणातच मायामी पोलीस खात्याच्या लक्षात येतं आणि एफबीआय च्या स्पेशल एजंटला तपासासाठी आमंत्रित केलं जातं. पहिल्या एजंट चा तशाच प्रकारे खून झाल्यावर दुसरा अधिक अनुभवी आणि ज्येष्ठ एजंट पाठवला जातो. तो डेक्स्टरच्या मदतीने त्या खुन्याला पकडण्यात काही अंशी यशस्वी होतो.

डेक्स्टरची तीव्र विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर), मिश्कीलपणा, चाणाक्षपणा, त्याचं आपण ह्युमन नसल्याचं वारंवार सांगणं हे अतिशय हलक्याफुलक्या शैलीत लेखकाने जागोजागी मांडून ठेवलं आहे.

1
Darkly Dreaming Dexter
* Perhaps because I'll never be one, humans are interesting to me.
* Wow,” I said. “You just blew away all the competition in the Subject Changing Tournament.”
* And of course you don't actually have to take an IQ test to become a reporter.

-----------------

2 Dearly Devoted Dexter:
* There are still very few laws against thinking, although I'm sure they're working hard on that in Washington.

*
Still, it's always nice to be around somebody who thinks I am wonderful. It confirms my low opinion of people.

* I know family comes first, but shouldn't that mean after breakfast?

* “Human beings need sleep, Debs,” I said. “And so do I.”

* Sergeant Doakes was gone, out of my life—and soon, presumably, out of his own life, too.

एकदा एका गुन्हेगाराचा पाठलाग करत असताना डेक्स्टरच्या गाडीला अपघात होतो. त्या अपघाताचं अतिशय मिश्किल वर्णन करताना लेखक आपली तीव्र विनोदबुद्धी दाखवून जातो

* I had only a moment to notice that the cropped grass seemed to be switching places with the night sky. Then the car bounced hard and the passenger air bag exploded into my face. It felt like I had been in a pillow fight with Mike Tyson


ध्वनी प्रदूषण करणाऱ्या एका भयंकर आवाजी पार्टीचं वर्णन करतानाही असाच मिश्कीलपणा दिसतो.

* There had been a nonstop soundtrack of monotonous techno-pop music turned up to a volume designed to induce voluntary self-performed brain surgery.


वस्तुतः डेक्स्टरच्या अफाट विनोदबुद्धीचे आणि त्याच्या भावनाविहीन असण्याचे पुरावे देणारे असंख्य प्रसंग
, वाक्यं पहिल्या दोन पुस्तकांच्या पानोपानी वाचकांच्या भेटीस येतात. पण विस्तारभयास्तव त्यातली निवडक वाक्यच इथे दिली आहेत. पहिल्या दोन पुस्तकांमध्ये ओघवत्या कथेबरोबरच वाचकाला डेक्स्टरच्या विनोदबुद्धीचा आणि चातुर्याचाही अनुभव येतो.

आणि अतिशय अपेक्षेने आपण तिसरं पुस्तक उघडतो आणि कुठेतरी माशी शिंकते. न थकता वाचकाला त्याच्या चातुर्याने आणि विनोद्बुध्दीने स्तंभित करणारा डेक्स्टर (आणि अर्थात जेफ लिंडसे) हाच का असा वाचकाला प्रश्न पडावा इतका नीरस, कंटाळवाणा डेक्स्टर आपल्याला तिसऱ्या पुस्तकात भेटतो. आत्ता संपेल, मग संपेल म्हणत म्हणत आपण वाचत तर जातो पण दिशाहीन, रटाळ प्रवास काही संपत नाही. पहिली दोन दमदार पुस्तकं लिहिणाऱ्या जेफ लिंडसेच्या प्रतिभेला झालंय तरी काय असं वाचकाच्या मनात सतत येत राहतं आणि एकदाचं तिसरं पुस्तक संपतं.

तिसऱ्या पुस्तकाच्या असामान्य यशामुळे(!) चौथ्या पुस्तकाकडून वाचकाला फारशा अपेक्षा नसतातच आणि अपेक्षां लेखक पूर्ण करतो. अर्थात तिसऱ्याइतकं नसलं तरी चौथं पुस्तकही वाईटच आहे. लागोपाठ दोन पुस्तकांचा छळ सहन न झाल्याने मी काही पाचव्या पुस्तकाच्या वाट्याला गेलो नाही. पण पहिल्या दोन पुस्तकांनी दिलेल्या निखळ आनंदामुळे उरलेली चार पुस्तकं वाचून मगच लेखकाला शिव्या घालायच्या की ओव्या गायच्या याचा निर्णय घ्यायचा असं ठरवलं आहे. पण तरीही उरलेली चार पुस्तकं आत्ता वाचणं शक्यच नाही. काही महिन्यांनी धाडस करून पुन्हा वाचेनही कदाचित आणि तेव्हा या पोस्टचा दुसरा भागही लिहीन कदाचित. ज्यांना रक्तपात
, खून या बरोबरच हलकीफुलकी परंतु अतिशय मिश्किल वर्णनं वाचायची आवड असेल अशांकरता पहिली दोन पुस्तकं हायली रेकमेंडेड आहेत. एन्जॉय! 

Tuesday, May 17, 2022

'तंतू' नावाचं महाकाव्य

गेल्या दोन आठवड्यांत डॉ भैरप्पांची दोन पुस्तकं वाचून झाली. धर्मश्री आणि तंतू.

धर्मश्री (अनुवाद : विजयालक्ष्मी रेवणकर) : 'धर्मश्री' तसं छोटंसं पुस्तक. जेमतेम दोनेकशे पानी. विषय प्रामुख्याने ख्रिस्ती धर्म, त्यांचे धर्मप्रसारक, त्यांनी छळकपटाने किंवा हरतऱ्हेची आमिषं दाखवून भारतभर केलेला धर्मप्रसार आणि धर्मांतरं. कट्टर हिंदू विचारसरणीच्या मुलाचा ख्रिस्ती मुलीच्या प्रेमात पडून, ख्रिस्ती धर्म स्वीकारून परत हिंदू धर्मात (सपत्नीक) परत येण्याचा प्रवास म्हणजे धर्मश्री. (गेल्याच आठवड्यात वाचलेल्या Christopher Hitchens च्या Missionary Position या पुस्तकात हेच 'कार्य(!)' मदर तेरेसाने जगभर कसं आणि किती शिताफीने राबवलं याचे असंख्य संदर्भ वाचले होतेच).

पण डॉ भैरप्पा त्यांच्या नेहमीच्या शैलीत धर्माची ओळख, पात्रांची ओळख, त्यांची विचारसरणी, नातेसंबंध, स्वभाववैशिष्ट्यं या सगळ्याचं एक परिपूर्ण चित्रण वाचकांपुढे उभं करतात. भैरप्पांच्या चाहत्यांनी आवर्जून वाचावं असं पुस्तक. याच पुस्तकातली स्थळं आणि (काही) पात्रं भैरप्पांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'गृहभंग' या पुस्तकात भेटीस येतात असं आत्ताच 'गृहभंग' च्या मनोगतात वाचलं. त्यामुळे ती एक उत्सुकता आहेच.

तंतू (अनुवाद : उमा कुलकर्णी) : 'तंतू' आज संपवलं. चांगलं लांबलचक, जाडजूड ८७८ पानांचं पुस्तक. पुस्तक कसलं, ग्रंथच. पण त्यात शेकडो वर्षांचा, कित्येक पिढ्यांचा इतिहास आहे असंही नाही. कथा घडते ती साधारण १९५५ ते १९७५ या वीसेक वर्षांतच. पण मग तरी इतक्या आठेकशे पानांत एवढं घडतं तरी काय नक्की? तर ते म्हणजे यात असलेली किमान वीस हून ही अधिक 'प्रमुख' पात्रं आणि प्रत्येक पात्र खरोखरच महत्वाचं पात्र आहे. प्रत्येक पात्राला कादंबरीत एक महत्वाचं स्थान आहे. प्रत्येक पात्राची विचारसरणी, स्वभाव इत्यादींची अतिशय तपशीलवार माहिती देऊन त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचं एक परिपूर्ण चित्रण वाचकांपुढे उभं करण्यात भैरप्पा कमालीचे यशस्वी ठरले आहेत. प्रत्येक पात्राचं वर्णन, त्याचे/तिचे गुणविशेष इतक्या कमालीच्या बारकाव्यांसह रंगवले गेले आहेत की प्रत्येक पात्राचा त्याचा एक स्वतःचा असलेला असा चेहरा वाचकांसमोर उभा राहतो. एकदा का त्या त्या पात्राचे व्यक्तिविशेष आणि स्वभाव वाचकांना सुपरिचित झाले की काही प्रसंगी विचित्र किंवा अविश्वसनीय वाटणारे प्रसंग किंवा कृती यांवर आक्षेप न घेता वाचक त्या त्या प्रसंगांत, त्या त्या पात्राशी पूर्णतः एकजीव होतो, समरस होतो. इतका की जणू हे सगळं आपल्या स्वतःच्याच आयुष्यात घडत आहे असं वाटावं किंवा टीव्ही/ओटीटीवर एखादी महा-मालिका बघत आहे असं वाटावं!

'तंतू' कुठल्याही एकाच विषयाला वाहिलेली नाही की एकाच मुख्य विषयावर भाष्य करते असंही नाही. ती सर्वसमावेशक आहे. मानवी भावभावना, परस्पर नातेसंबंध, संस्कार, विवाहबाह्य संबंध, पुरुष-स्त्री संबंध, आधुनिकीकरण, शिक्षण, संगीत, गुरू, ध्यानधारणा, रसातळाला चाललेली जीवनमूल्यं, वाढता अविवेक, सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार आणि अखेरीस बाईंनी लादलेली आणीबाणी अशा अनेकानेक विषयांवर, वेगवेगळ्या पात्रांच्या आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांच्या माध्यमातून केलेलं दीर्घ भाष्य म्हणजे तंतू. इतकी पात्रं, घटना आणि मुख्य म्हणजे सुमारे ९०० पृष्ठसंख्या असूनही कधीही कंटाळा येत नाही की घटनांची संगती तुटत नाही. अनेकदा एका प्रकरणानंतर पुढची ५०-१०० पानं त्या पात्राचा साधा उल्लेखही येत नाही. पण जेव्हा येतो तेव्हा मात्र "आता हा/ही कोण आहे बाबा?" असा प्रश्न वाचकाला पडत नाही. पूर्वी घडलेल्या घटना आणि सद्यस्थितीत घडणारे प्रसंग यांची अगदी सहज संगती लागते आणि अतिशय समरस होऊन वाहक पुढे वाचत राहतो हे या पुस्तकाचं सर्वात मोठं यश.

या पुस्तकात इतकी पात्रं आणि घटना आहेत की त्या सगळ्यांचा परामर्ष घेणं कठीण आहे. त्यापेक्षा 'तंतू' आवर्जून वाचून, अनुभव घेणं उत्तम. इतकं सशक्त कथाबीज असलेल्या पुस्तकावर आत्तापर्यंत वेबसिरीज कशी बनली नाही, बनत नाही हे आश्चर्यच आहे. अर्थात त्यासाठी लागणाऱ्या अफाट परिश्रमाची आणि अभ्यासाची, तयारीची वानवा हे एक कारण असू शकतं. असो. भैरप्पांच्या चाहत्यांनी दोन्ही पुस्तकं वाचायलाच हवीत एवढंच सांगेन.

Friday, April 15, 2022

सनातन संस्कृतीच्या प्रदक्षिणेचा वारसा : तत्त्वमसि

वाचकाला एखाद्या पूर्णतः भिन्न अशा आणि जवळपास अविश्वसनीय वाटावं अशा विश्वाची ओळख घडवून आणून, त्या विश्वातले रीतिरिवाज, नियम, जीवनशैली, चालीरीती, प्रसंगी आगळीवेगळी वाटणारी व्यक्तिमत्वं इत्यादी सगळ्या गोष्टी समोर मांडून, या सगळ्यांतून वाचकाला विश्वासार्ह वाटाव्या अशा विश्वाची मांडणी करणं यासाठी लेखकाकडे असामान्य प्रतीची प्रतिभा असावी लागते. ज्याप्रमाणे हॅरी पॉटर किंवा मार्व्हल/डीसी युनिव्हर्समधील अविश्वसनीय घटना आणि पात्रांवर आपण अगदी काहीही शंका/प्रश्न मनात ना आणता सहज विश्वास ठेवतो तद्वतच ख्यातनाम गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांनी आपल्या तत्त्वमसि या पुस्तकात महानदी नर्मदा आणि तिच्या तीरावरचे आदिवासी यांचं एक अजब पण तितकंच विश्वासार्ह आणि वाचकांचा सहज विश्वास बसेल असं एक अनोखं विश्व वाचकांसमोर उभं केलं आहे. आणि या मूळ गुजराती पुस्तकाचा तितकाच सशक्त मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केला आहे. या 'नर्मदा युनिव्हर्स' मध्ये नर्मदा आणि नर्मदा परिक्रमा यांच्याबरोबरच तिच्या तटावरची गूढ आणि घनदाट जंगलं, तिथले अशिक्षित आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांच्या रूढी परंपरा, श्रद्धा/अंधश्रद्धा, बोलीभाषा, समजुती, त्यांची भीषण गरिबी, त्यांचे संस्कार, त्यांचा साधेपणा आणि नितळ सच्चाई आणि त्याचबरोबर सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, समजुती, सेवाभावाची आदिम प्रेरणा, एकूणच विश्व आणि निसर्ग, आपल्या सभोवतालची सृष्टी या सगळ्यासगळ्या कडे पाहण्याचा आपल्या संस्कृतीचा डोळस दृष्टिकोन आणि या सगळ्यांच्या मिश्रणातून उभं राहिलेलं एक अद्भुत जग आपल्या भेटीस येतं आणि आपल्याला थक्क करून सोडतं. हे विश्व आपल्यासमोर मांडलं जातं ते एका भारतीय वंशाच्या परंतु अमेरिकेत स्थित असणाऱ्या आणि नर्मदा भेटीसाठी काहीशा अनिच्छेनेच भारतात आलेल्या किंबहुना काहीशा जबरदस्तीनेच पाठवण्यात आलेल्या एका अनामिक तरुणाच्या नजरेतून आणि निरीक्षणांमधून. 

पुस्तकाच्या सुरुवातीच्या काही उल्लेखांमधून कथानायक हा इथले आदिवासी, त्यांच्या अंधश्रद्धा, गैरसमजुती या सगळ्याला कसा वैतागला आहे आणि या सगळ्याच गोष्टींचा त्याला सतत कसा राग येत असतो याचे उल्लेख येतात आणि मानव संसाधन (human resource) क्षेत्रात संशोधन करणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या अमेरिकेतून आलेल्या एका सुशिक्षित, आधुनिक आणि काहीशा अहंमन्य तरुणाचं एक विश्वास बसण्याजोगं व्यक्तिमत्व आपल्यापुढे उभं राहतं. नर्मदा परिक्रमा अर्थात नर्मदेची प्रदक्षिणा या विषयाला वाहिलेलं हे पुस्तक नसलं तरी परिक्रमा, परिक्रमेचा मार्ग, तिथले कडक नियम, समजुती, सेवाभाव या सगळ्याची तोंडओळख करून देऊन त्यानंतर परिक्रमेविषयी अधिकाधिक माहिती आपल्याला पुढच्या अनेक प्रसंगांमधून मिळत जाते. असं म्हणतात की नर्मदा परिक्रमा ही ठरवून होत नाही. नर्मदामातेची इच्छा असेल तरच ती घडते. या पुस्तकात कथानायक किंवा अन्य कोणाच्याच नर्मदा परिक्रमेविषयी थेट उल्लेख किंवा चित्रण नसलं तरी कथानायकाला नर्मदामैय्याचं अगदी बोलावणं आल्यागत त्याच्या परिक्रमेला (किंवा त्यातल्या काही भागाला) अवचित सुरुवात होते. परिक्रमा सुरु केल्यापासून ते शेवट होईपर्यंत परिक्रमावासी (पुस्तकाच्या भाषेत 'पराकम्माबासी') व्यक्तीच्या स्वभावात, व्यक्तिमत्वात, विचारसरणीत आमूलाग्र बदल होतो असं म्हणतात. आजच्या तारखेला भेटणाऱ्या गलितगात्र अवस्थेतल्या कथानायकाच्या (जो कथानायक वगैरे आहे हे आपल्याला तोवर माहीतही नसतं) वर्णनाने पुस्तकाची सुरुवात होते. त्यानंतर रोजनिशीच्या पानांमधून हळूहळू वैचारिक बदल घडत  जाणारा, आयुष्याकडे एका वेगळ्याच दृष्टीने पाहणारा नायक आपल्याला भेटत जातो. आणि ज्याप्रमाणे परिक्रमा संपल्यावर परिक्रमा करणारी व्यक्ती संपूर्णपणे वेगळ्या वैचारिक, अध्यात्मिक पातळीवर जाऊन पोचते असं मानतात तद्वतच पुस्तकाच्या शेवटी एका आमूलाग्र बदललेल्या कथानायकाचं दर्शन आपल्याला घडतं.अमरकंटकपासून अर्थात नर्मदेच्या उगमापासून प्रवास सुरु करून, वाटेत कुठेही नर्मदेचा प्रवाह न ओलांडता, ती जिथे सागराला मिळते तिथपर्यंत जाऊन त्यानंतर पुन्हा जिथून प्रवास सुरु केला आहे तिथे जाऊन पोचणे अशा प्रकारची प्रदक्षिणा हा सर्वसाधारणपणे नर्मदा परिक्रमेचा मार्ग असतो. पुस्तकाच्या सुरुवातीला कथानायकाची आपल्याला जिथे भेट होते, जिथे पुस्तकाची सुरुवात होते तिथेच अखेरीस आपल्याला आणून सोडून पुस्तकाचा शेवट होतो. पण या सगळ्या प्रवासादरम्यान घडणाऱ्या घटना, प्रसंग, अनुभव या सर्वांमुळे फक्त कथानायकाच्याच नव्हे तर वाचकांच्याही विचारांत आमूलाग्र फरक पडलेला असतो. पुस्तकालाच परिक्रमेचं रूपक म्हणून वापरण्याच्या लेखकाच्या अद्वितीय हातोटीला आपण मनोमन दंडवत घालतो.

ध्रुव भट्ट 


या पुस्तकात अनामिक कथानायकाबरोबरच त्याचे अमेरिकेतले प्रोफेसर, त्यांची मुलगी आणि नायकाची प्रेयसी असलेली ल्युसी ही एका टोकाची विदेशी पात्रं ते जगाच्या थेट दुसऱ्या टोकावर असणारे नर्मदेच्या तीरावरच्या दाट जंगलात राहणारे बित्तुबंगा नावाचे आदिवासी भाऊ, वनकन्या पुरिया, आदिवासी लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते सुप्रिया (जी पुस्तकभर आपल्याला 'सुपरिया' या नावाने भेटते कारण आदिवासी लोक कधीही जोडाक्षरं उच्चारत नाहीत. ते एकेक अक्षर सुट्टं करून बोलतात.)  आणि लक्ष्मण, वेडा फकीर, गुप्ताजी, शास्त्रीजी, ध्येयवादी शिक्षक विष्णू मास्तर आणि त्यांची पत्नी, साठसाली नावाची आदिवासींची देवी अशी अनेकानेक चित्रविचित्र, आकर्षक आणि प्रसंगी रहस्यमय वाटणारी अशी पात्रं भेटतात. या सर्वांविषयी सविस्तरपणे पुढे बोलूच.

अर्पणपत्रिका हा तसं म्हंटल तर तुलनेने दुर्लक्षित असा विषय आहे. अनिल अवचट यांच्या 'स्वतःविषयी' या पुस्तकाच्या अतिशय सुंदर आणि तरल अशा अर्पणपत्रिकेनंतर इतकी सुंदर अर्पणपत्रिका मी प्रथमच वाचली.

"भारतवर्षाच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणाऱ्या, एकत्र बांधणाऱ्या, उभयान्वयी, भुवनमोहिनी महानदी नर्मदेला —"

ही अर्पणपत्रिका वाचून अक्षरशः नतमस्तक व्हायला होतं. याच विचाराला अनुमोदन देणारा एक प्रसंगही पुस्तकात आहे.

तिनं नकाशा उघडला. लक्षपूर्वक नर्मदेचं स्थान बघत ल्युसी म्हणाली,

‘‘सबंध भारताचे बरोबर मध्यावर दोन भाग करते नर्मदा.’’

‘‘माझं मत वेगळं आहे.’’ शास्त्री म्हणाले, ‘‘ही या देशाला जोडते. उत्तराखंड आणि दक्षिणपथाला जोडून एकत्र ठेवते रेवा.’’

एकाच वस्तुस्थितीकडे बघण्याचे पौर्वात्य आणि पाश्चात्य संस्कृतींचे दोन पूर्णतः भिन्न असणारे असे दृष्टिकोन दोन संस्कृती आणि विचारसरणी यांमधला फरक लख्खपणे स्पष्ट करतात.

लेखकाचं नर्मदेवर असलेलं अपरंपार प्रेम प्रसंगाप्रसंगातून आणि नर्मदेला उद्देशून त्यांनी ठायीठायी वापरलेल्या विशेषणांवरूनच कळतं. 'खाली दरीत चांदीचा दोर दिसावा तसा दिसणारा नर्मदेचा प्रवाह', 'सदाजिवंत महानदी नर्मदेचा चांदीचा प्रवाह' किंवा 'भारतमातेच्या कंबरेभोवती चमचमणारी साखळी' तसंच महानदी, भुवनमोहिनी, जीवनदायिनी, सदाजातिवंत, सोमद्रवा अशी अनेक अर्थपूर्ण विशेषणं मिरवत महानदी नर्मदा आपल्या भेटीस येते. एका प्रसंगात लांबच्या एका उंच अशा टेकडीवरून खाली पाहत गुप्ताजी 'नर्मदे हर' असं म्हणून नमस्कार करतात. इतक्या लांबवरही नर्मदा असेल यावर विश्वास न बसून कथानायक चमकून जाऊन त्यांना विचारतो की इथे, एवढ्या लांब ही नर्मदा आहे? त्यावर गुप्ताजींचं अतिशय मार्मिक असं उत्तर येतं,

"‘इहां तो सब कुछ नर्मदाज है।" ..... अर्थात इथं तर सर्व काही नर्मदाच आहे!

निसर्ग, हिरवी रानं, त्यातल्या पशुपक्ष्यांच्या असंख्य जाती, त्यांच्या विविध आवडीनिवडी/सवयी आणि या सगळ्यांकडे बघण्याचा आपल्या प्राचीन संस्कृतीने शिकवलेला असा आदिवासी लोकांचा विशाल असा दृष्टिकोन यावर भाष्य करणारे अनेक प्रसंग पुस्तकात आहेत.

एका प्राचीन महावृक्षात प्रत्यक्ष शिवाचा वास असून तो सर्वांचं संरक्षण करत असून, त्याच्या परिसरात कोणालाही काहीही धोका नाही यावर आदिवासींची ठाम श्रद्धा असते जे अर्थातच आधुनिक विचारांच्या नायकाला पटत नाही. दरम्यान जंगलातून चालत असताना अचानक रस्ता चुकून, भरकटून भलतीकडेच गेलेल्या नायकाला बऱ्याच वेळाने नर्मदेच्या प्रवाहाचं लांबवरून दर्शन होतं आणि त्याला अचानक हायसं वाटून जातं. आणि त्यावेळी अचानक त्याच्या मनात येतं की बऱ्याच वेळाने भेटलेला नर्मदेचा प्रवाह क्षणभराकरता दिसूनही तो आपल्याला मानसिक शांतता, निश्चिंतता प्रदान करू शकत असेल तर वर्षानुवर्षं एखाद्या सुपरिचित आणि भव्य अशा वृक्षाच्या छायेत राहिल्याने त्या परिसरात निर्भयता, सुरक्षितता अनुभवणाऱ्या आदिवासींना आपण नक्कीच खोटं ठरवू शकत नाही.

मधमाश्या पालन केंद्राविषयी लिहिताना मधमाश्या, त्यांच्या सवयी, त्यांची जीवनशैली इत्यादींचा लेखकाने तपशीलवार अभ्यास केल्याचं जाणवतं. मधमाश्या मध कसा शोधतात, तो गोळा कसा करतात इत्यादींची इत्यंभूत माहिती लेखक विषयाच्या ओघात पुरवून जातो. बित्तुबंगावरच्या वाघाच्या हल्ल्याचा प्रसंग असाच डोळ्यातून पाणी काढणारा आहे. प्राणाहून प्रिय भावावर झालेल्या हल्ल्याचा सूड म्हणून वाघाला जिवंत न सोडण्याची प्रतिज्ञा बित्तुबंगा करतात. त्यासाठी प्रचंड प्रयत्न करतात. अखेरीस वाघ तावडीत सापडतो सुद्धा. वाघावर हल्ला न करण्याविषयी किंवा त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास न देण्याबद्दलची तंबी त्याला खुद्द वन्य प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडूनही दिली जाते. त्याकडे दुर्लक्ष करून तो निघून जातो आणि अचानक दुसऱ्या दिवशी एक अशक्य कोटीतील वाटावा असा प्रसंग घडतो. तो प्रसंग मुळातून वाचण्यासारखा असल्याने आणि मुख्य म्हणजे वाचताना हिरमोड होऊ नये म्हणून इथे देत नाही. पण एका छोट्याशा प्रसंगातून विशालहृदयी आदिवासी, त्यांचं बंधुप्रेम, त्यांच्यातील ममत्व या सगळ्यासगळ्याचं एक अनोखं दर्शन घडतं.

पाप, पुण्य, संस्कार, पुनर्जन्म इत्यादींवरही अनेक छोट्या छोट्या प्रसंगांतून सुरेख रीतीने भाष्य केलं जातं. आवर्जून उल्लेख करावासा प्रसंग म्हणजे कथानायक आणि लक्ष्मण यांच्यातील एक संवाद. वर सांगितलेला बित्तुबंगाचा प्रसंग आणि हा संवाद हे या पुस्तकातले माझे विशेष दोन आवडीचे प्रसंग आहेत. कामादरम्यान अनेक विषयांवर चर्चा करत असताना एकदा मागचा जन्म, पुनर्जन्म वगैरे विषयावर चर्चा येऊन पोचते आणि सहजच नायक लक्ष्मणाला विचारतो की त्याचा गेल्या जन्मावर विश्वास आहे का? आणि त्यावर त्याला लक्ष्मणसारख्या सामान्य कार्यकर्त्याकडून जे सर्वस्वी अनपेक्षित आणि धक्कादायक असं उत्तर मिळतं त्याने नायकाला त्या दोघांच्या विचारसरणीमधला तीव्र फरक जाणवून जातो.

सगळ्यांत अप्रतिम आणि जमलेला भाग म्हणजे नायक आणि सुपरिया यांच्यात वेळोवेळी घडणारे अर्थपूर्ण आणि तितकेच नायकाला नवी दृष्टी प्रदान करणारे अनेक प्रसंग. यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद अतिशय चतुराईने लिहिण्यात आल्याचं जाणवतं जेणेकरून फार कमी शब्दांत नायकालाच नाही तर किंबहुना वाचकालाही आधुनिक जग आणि भारतीय सनातन संस्कृती, धर्म, त्यांच्या अंतर्प्रेरणा, संस्कार या साऱ्यासाऱ्याचं अतिशय विलोभनीय दर्शन घडतं. खरंतर एकच प्रसंग निवडणं हे जवळपास अशक्य काम आहे तरीही प्रयत्न करतो. सुपरिया रोज महाभारत वाचत असताना तिचा आणि कथानायकाचा संवाद सुरु होतो. बोलताबोलता त्याने महाभारत वाचलं आहे का असं ती विचारते. तो नाही असं उत्तर देतो जे अर्थातच अपेक्षित असतं. त्यानंतर महाभारतातल्या वेगवेगळ्या प्रसंगांवर त्यांची चर्चा होते ज्यातलं एकही प्रसंग नायकासाठी अनोळखी नसतो. त्यापुढे काय होतं हे खरं तर सांगायचीही गरज नाही पण तरीही मूळ प्रसंगामधली त्यांची प्रश्नोत्तरं आणि नायकाला अखेरीस बसणारा धक्का हा अप्रतिमरित्या चित्रित केला गेला आहे.

ध्येयनिष्ठा, तत्त्वनिष्ठा हे गुण सांगणं वेगळं आणि ते विशेष काहीही वेगळं  केल्याचा आव न आणता अट्टहासाने जगणं वेगळं आणि तितकंच कठीणही. पण नर्मदेच्या तीरावरच्या दुर्गम रानवनातली ही साधीभोळी माणसं नक्की कुठल्या मातीची बनलेली आहेत असा विचार करायला भाग पाडणारा एक प्रसंग आहे. वणवा लागल्याने हजारो झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असतात. वणवा पसरत पसरत हळूहळू आजूबाजूच्या गावांचा घास घेणार हे जवळपास नक्की होतं. त्यावेळी तिथून स्थलांतर करायला तयार नसलेल्या विष्णू नावाच्या एका शिक्षकांशी आणि त्याच्या पत्नीशी नायकाची भेट होते. भविष्यात शाळाच न राहिल्याने विष्णू मास्तरांची नोकरीही कदाचित जाईल अशा विचाराने नायक मास्तरांजवळ हळहळ व्यक्त करतो. परंतु दुसऱ्या गावी बदली होईल असं सांगून काही काळजी करण्याचं कारण नाही असा दिलासा मास्तर त्याला देतात. पण खरी समस्या वेगळीच आहे असंही ते पुढे म्हणतात. ती समस्या ऐकून विष्णू मास्तरांच्या चांगुलपणावर नायकाचा काय आपलाही विश्वास बसत नाही. इतकी अपार ध्येयनिष्ठा, त्यागबुद्धी, स्वतःच्या कर्तव्याप्रती असणारी तळमळ आणि समाजाचं आणि विशेषतः नवीन पिढीचं भलं व्हावं यासाठी अविरत झटणं या फक्त एखाद्या पुस्तकात किंवा एखाद्या आदर्शवादी श्लोकात/गीतात शोभतील अशा गुणांचा एकाच व्यक्तीत आणि तेही अत्यंत सामान्य अशा व्यक्तीत एकसमयावच्छेदेकरून वास असणं ही पूर्णतः अविश्वसनीय अशी गोष्ट प्रत्यक्ष समोर घडताना बघून नायक हतबुद्ध होतो.

प्रचंड गरिबी, सततची उपासमार, अतीव कष्ट हे सगळं आयुष्याचा अविभाज्य भाग असूनही कधीही निराश न होता छोट्या छोट्या प्रसंगांतून सहजसुंदर आनंद शोधणारे आदिवासी वेळोवेळी भेटतात. इतकं सगळं असूनही अतिथी म्हणून आलेल्या अगदी अनोळखी अशा व्यक्तीचाही पाहुणचार करण्याची पद्धत, त्याचा यथायोग्य आदरसत्कार केल्याशिवाय त्याला जाऊ न देणारे आदिवासी हे खरोखर पंचतंत्रातल्या एखाद्या आदर्श बोधकथेत वगैरे शोभावेसे आहेत. इतकं महाप्रचंड दारिद्र्य असूनही फसवाफसवी करणे, इतरांचे हक्क/लाभ पळवणे, कर्ज किंवा त्यावरचं व्याज बुडवणे, अफरातफर करणे असली शहरी जीवनात पावलोपावली घडणारी आणि कायद्याचं भय नसतं तर ज्यामुळे सुंदोपसुंदीही माजू शकेल असली अनीतीपूर्ण कृत्यं करण्याचा साधा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवून गेल्याचं आढळत नाही.

नर्मदा परिक्रमेविषयी अधिक माहिती देताना ती कधी सुरु झाली असावी, का सुरु झाली असावी आणि गेली कित्येक शतकं का चालू राहिली असावी या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखक करताना दिसतो. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच आपल्या प्राचीन संस्कृतीच्या विधायकतेशी निगडित आहेत. आणि त्यामुळे परिक्रमावासीला नर्मदारूप मानणे, त्यांची सेवा करणे या सहज घडणाऱ्या कृती या कोणा एका परिक्रमावासीसाठी नाही तर नर्मदेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतात यावर विस्ताराने भाष्य केलं जातं. इतकंच नाही तर नर्मदा परिक्रमेत सप्त चिरंजीव वावरत असतात, ते भेटू शकतात इत्यादी गोष्टींवर या लोकांची असलेली अमाप श्रद्धा आणि त्यामागचं कारणही तितकंच रोचक आहे. त्याचप्रमाणे त्यांची सेवा करणं हे आपलं परमकर्तव्य असून त्यामागे 'कर्मण्येवाधिकारस्ते' सारखं थेट भगवद्गीतेतून आलेलं तत्त्वज्ञान असेल हे वाचूनही सुखद आश्चर्य वाटतं.

या आदिवासींचं मूलस्थान हे एका वेगळ्याच प्रदेशातलं आहे आणि त्यावर त्यांचा ठाम विश्वास असून ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे तसे पुरावेही आहेत हे वाचून तर अजूनच धक्का बसतो. अर्थात विश्वास ठेवणं न ठेवणं हे लेखक नेहमीप्रमाणेच आपल्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडून देतो.

निवडक, महत्वाचे प्रसंग लिहायचे म्हंटले तरी कुठले निवडावे आणि कुठले वगळावे अशी दोलायमान परिस्थिती होऊन जाते. तरीही आवर्जून उल्लेख करावाच किंवा ज्या उल्लेखाशिवाय हा लेखच काय कदाचित पुस्तकही अपूर्ण राहील तो म्हणजे अखेरचा प्रसंग. नायकाचा अखेरच्या प्रसंगाकडे येण्याचा प्रवास अगदी अवचितपणे, न ठरवता सुरु होतो. काही महत्वपूर्ण घटना घडत अखेरीस आपण परिक्रमेच्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोचतो. नास्तिक असणाऱ्या, धर्म न मानणाऱ्या, लोकांच्या श्रद्धांवर टीका करणाऱ्या, त्यांच्या अज्ञानापायी क्रोधीत होणाऱ्या नायकाच्या आयुष्यात शेवटच्या क्षणी एक विलक्षण घटना घडते आणि जणू त्याची परिक्रमा पूर्ण होते आणि त्याचं अवघं विश्वच बदलून जातं. सुरुवातीच्या वस्तुनिष्ठ कट्टरतेपासून सुरु होणारा प्रवास एका हळुवार वळणावर संपतो. पण त्याच वेळी एक नवा प्रवास सुरु झालेला असतो. महानदी नर्मदा, तिची परिक्रमा, तिथले आदिवासी, त्यांच्या चालीरीती, संस्कार, हिंदू संस्कृती या सगळ्यासगळ्यांना कडकडून भेटावं अशी तीव्र इच्छा दाटून येणाऱ्या वाचकाच्या मनात. आणि हा प्रवास मात्र आपला आपल्यालाच पूर्ण करायचा असतो.

नर्मदे हर !!!!

-हेरंब ओक

Tuesday, April 5, 2022

काश्मिरी पंडितांची भयकारी रोजनिशी : दहशतीच्या छायेत

रोजनिशी स्वरूपात लिहिलेल्या पुस्तकांच्या बाबतीत काही महत्वाच्या बाबी सांगायच्या झाल्यास त्यांची यादी खालीलप्रमाणे करता येईल. 

१. लेखन बऱ्याचदा विस्कळीत स्वरूपात असतं. व्यक्ती, स्थळ, घटना यांची स्पष्ट ओळख दर वेळी असतेच असं नाही. अनेकदा एखाद्या दिवशी एका ओळीची एखादी छोटीशी नोंद असते तर कधी कधी पानभर लिखाण केलेलं असतं. 

२. (दिनांक लिहिला नसल्यास) काळाबद्दल स्पष्ट माहिती दर वेळी मिळतेच असं नाही. लेखनात उल्लेख आलेल्या राजकीय आणि सामाजिक घटना आणि संदर्भ यांच्या आधारे काळाचा अंदाज बांधावा लागतो. 

३. पुस्तक स्वरूपापेक्षा ते बऱ्याचदा 'स्वतःपुरत्या केलेल्या अनुभवांच्या नोंदी' या स्वरूपात असल्याने रोजनिशी लिहिणाऱ्या व्यक्तीची मनःस्थिती, सामाजिक स्थान, आर्थिक परिस्थिती या आणि अन्य बऱ्याच बाबींची छाया त्या अनुभवकथनावर असते.

परंतु एवढे सगळे दोष किंवा उणीवा असूनही अनेकदा अशी पुस्तकं अतिशय लोकप्रिय होतात किंवा अगदी स्तिमित करणारी, काळजाचा तळ ढवळून काढणारी असतात आणि याचं एकमेव किंवा निदान सर्वात महत्वाचं कारण म्हणजे (बऱ्याचदा) ती सत्यघटनांवर आधारित असतात. पुस्तकात घडणाऱ्या अमानुष घटना, अन्याय, क्रौर्य हे कोणीतरी भोगलेलं असतं आणि ते अनुभव लिहून ठेवायला ती व्यक्ती मागे जिवंत राहिलेली असते ही जाणीवच वाचकाचा थरकाप उडवायला पुरेशी असते. किंबहुना लेखकाने भोगलेले सर्व अत्याचार, अन्याय इत्यादी वाचक प्रत्यक्ष अनुभवतो आणि लेखकाशी सहजगत्या जोडला जातो. 

अशा स्वरूपाच्या अत्यंत लोकप्रिय पुस्तकाचं उदाहरण म्हणजे अँन फ्रॅंक या ज्यु मुलीने नाझी अत्याचारांबद्दलचे लिहून ठेवलेले अनुभव जे कालांतराने 'Diary of a young girl' या नावाने प्रसिद्ध झाले. किंवा दोनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेलं 'The Silent Patient' हे पुस्तक. मराठीत अशा प्रकारची पुस्तकं तुलनेने कमी असली तरी आज आपण ज्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ते पुस्तक म्हणजे वाचकाला अंतर्बाह्य हादरून टाकण्याची क्षमता असलेली एक नकोशी डायरी आहे.

'Under the Shadow of Militancy: The Diary of an Unknown Kashmiri' या मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक तेज एन धर असून सुजाता देशमुख यांनी 'दहशतीच्या छायेत' या नावाने या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे. हे पुस्तक म्हणजे श्रीनगर मध्ये राहणाऱ्या एका अज्ञात काश्मिरी व्यक्तीने अंदाजे फेब्रुवारी ते ऑगस्ट १९९० या दरम्यान आपल्या आजूबाजूला पाहिलेल्या, ऐकलेल्या, निरीक्षण केलेल्या आणि आपल्या रोजनिशीत नोंदवून ठेवलेल्या घटनांचा लेखाजोखा आहे. या रोजनिशीत कुठल्याही पानावर दिनांक वगैरे नाही. मात्र अखेरच्या पानावर २३ ऑगस्ट १९९० अशी तारीख घालून शेवटची घटना लिहिलेली आढळते. त्यानंतर त्या व्यक्तीचं काय झालं याची स्पष्ट माहिती नसली तरी अखेरच्या नोंदीवरून त्या घटनेनंतर ती व्यक्ती फार काळ जिवंत राहिली नसावी असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ही रोजनिशी कमल नावाच्या एका बीएसएफ च्या जवानाला एका पडक्या घरात लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळाली. त्यानंतर काही दिवसांतच त्या जवानाचीही हत्या करण्यात आली. परंतु तत्पूर्वी त्याने ती लेखकाकडे सुपूर्त केली असण्याची शक्यता आहे. कालांतराने लेखकालाही काश्मीर खोऱ्यातून परागंदा व्हावं लागलं.

रोजनिशी विस्कळीत स्वरूपात आहे. (कारण अनेक पानं पुढेमागे झालेली होती.) अनेक पानं गहाळ झाली असण्याचीही शक्यता आहे. तरीही या सगळ्या अडचणींवर मात करून त्या काश्मिरी पीडित व्यक्तीचे अखेरच्या काही महिन्यांतील भयंकर अनुभव लोकांपर्यंत पोचवण्याच्या लेखकाच्या जिद्दीला दंडवतच घालायला हवं.

रोजनिशी लिहिणाऱ्या व्यक्तीचे नाव वा अन्य काही तपशील माहित नसले तरी ती व्यक्ती पूर्वाश्रमीची शिक्षक असून नंतर एखाद्या राज्य सरकारी कार्यालयात काम करत असते असे उल्लेख येतात. ही अत्यंत सुशिक्षित, रसिक मनाची, सामाजिक आणि राजकीय जण असणारी असावी हे पुस्तकात अनेकदा येणाऱ्या ग्रीक कथांचे संदर्भ, काव्य तसेच राजकीय परिस्थिती आणि कपटी राजकारणी यांच्यावरील भाष्य इत्यादींवरून जाणवतं.

१९ जानेवारीच्या इस्लामी अतिरेक्यांनी "रलीव-गलीव-सलीव" च्या घोषणा देत काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचं थैमान माजवल्याच्या काही दिवसांनंतर रोजनिशीची सुरुवात होते. त्यावेळी सुदैवाने लेखक काश्मीरमध्ये नसतो परंतु दुर्दैवाने लेखकाची मुलगी आणि पत्नी मात्र तिथेच असतात. त्यांना काय भोगायला लागलं याचे स्पष्ट उल्लेख नसले तरी त्यानंतर लेखक ताबडतोब त्या दोघींना काश्मिरातून अन्य ठिकाणी हलवतो ही प्रतिक्रिया काय घडलं असावं हे याचा अंदाज बांधता यायला पुरेशी आहे.

अनेक वर्षं चालत आलेला हिंदू-मुस्लिम एकोपा ते इस्लामी अतिरेक्यांकरवी करण्यात आलेल्या पंडितांच्या क्रूर हत्याकांडांच्या मालिका असा संपूर्ण प्रवास मांडताना लेखकाने मुस्लिम, त्यांच्या श्रद्धा, अतिरेक, बलात्कार, क्रौर्य, हत्या आणि इतकं सगळं होऊनही मुस्लिमांवर विश्वास ठेवणारे भाबडे पंडित आणि त्यांचे कुटुंबीय यांचे उल्लेख तर केले आहेतच. पण त्याचबरोबर राज्य आणि केंद्रातील राजकीय परिस्थिती, उदासीनता, पंडितांकडे केलं गेलेलं दुर्लक्ष याबद्दलच्याही अनेक घटनांच्या नोंदी आहेत.

काश्मीरचा इतिहास, वर्तमान, काश्मिरी पंडित आणि त्यांची हत्याकांडं, त्यांच्यावर झालेले अत्याचार, राजकारण आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती इत्यंभूत यांबद्दल माहिती देणारी अनेक पुस्तकं आहेत. उदा डॉ सच्चिदानंद शेवडे यांचं 'काश्मीरनामा' , दोन वेळा काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम बघितलेले जगमोहन यांचं 'धुमसते बर्फ' किंवा शेषराव मोरे यांचं 'काश्मीर - एक शापित नंदनवन', विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाल्यानंतर उठलेल्या गदारोळात एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली ती म्हणजे अशी की उपरोल्लेखित पुस्तकांचे संदर्भ दिले तरी "यातील कोणीही मूळ काश्मिरी नाहीत आणि त्यामुळे त्यांचं लेखन किती विश्वासार्ह असणार किंवा तेव्हा राज्यपाल असलेले जगमोहन हे स्वतःची बाजू मांडणारंच लेखन करणार" असे तद्दन भंपक आणि हास्यास्पद युक्तिवाद मांडणाऱ्या वाचाळवीर महाभागांशी दुर्दैवाने गाठ पडली. या पार्श्वभूमीवर 'दहशतीच्या छायेत' पुस्तकाचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकाचा लेखक मूळचा काश्मिरी पंडित आहे आणि त्याने स्वतः पाहिलेल्या, ऐकलेल्या भीषण घटनांची मांडलेली जंत्री वर दिलेले भाकड युक्तिवाद मांडणाऱ्या महाभागांना निरुत्तर करते.

हत्याकांडं, हल्ले, विश्वासघात, बलात्कार इत्यादींचे अनेकानेक उल्लेख पुस्तकाच्या पानापानावर आढळतात. मुस्लिम शेजारी, मित्र, परिचित यांचं खरं स्वरूप न ओळखता त्यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकण्याच्या पंडितांच्या स्वभावामुळे त्यांना जीवाला मुकावं लागल्याची अनेक उदाहरणं पाहून मुस्लिमांच्या कपटी आणि पंडितांच्या भाबड्या वृत्तीकडे बघून विषण्ण व्हायला होतं.

सुरुवातीलाच लेखकाचा मित्र भरत याला हेर असल्याच्या संशयावरून मुस्लिम अतिरेकी त्याच्या घरातून फरफटत रस्त्यावर आणून तिथे त्याला लाथाबुक्क्यांनी तुडवतात ते वर्णन वाचवत नाही. तो तिळातिळाने मरावा, यासाठी अतिरेकी थोड्याथोड्या वेळाने त्याच्या एकेका अवयवात गोळ्या मारतात, पाणी मागितलं असता जबड्यावर सणसणीत लाथ मारली जाते. आणि अखेरीस छातीत गोळी मारली जाते. त्याच्या प्रेताजवळ कोणीही अगदी त्याच्या आईवडिलांनीही जायचं नाही असा अतिरेक्यांचा सक्त फतवा असतो. हे सगळं भरदिवसा, रस्त्याच्या मधोमध घडत असतं यावर आपला विश्वासच बसू शकत नाही आणि अखेरीस लेखक एक जोरदार धक्का देतो. 

हे सगळं जिथे घडलं तिथून सशस्त्र पोलिसांची स्थानिक पोलीस चौकी जेमतेम शंभर फुटांवर असते !!

सरला आणि सराह या दोन बालमैत्रिणी आणि शेवटच्या क्षणी सराहने आपल्या जिवलग मैत्रिणीशी ती निव्वळ हिंदू असल्याने केलेला दगाफटका भयंकर आहे. सरलाला सराह अतिरेक्यांनी सांगितलेल्या एका विवक्षित ठिकाणी फसवून घेऊन जाते. तिथे सरलाच्या नवऱ्याला आधीच फसवून आणून बांधून ठेवलेलं असतं. सरकारी नोकरीत असणाऱ्या सरलाच्या नवऱ्याकडून अतिरेक्यांना काही माहिती हवी असते जी तो देत नाही. सरलावर तिच्या नवऱ्यादेखतच सामूहिक बलात्कार केला जातो, तिचे स्तन कापून टाकले जातात. हे सगळं असह्य होऊन सरलाच्या नवऱ्याला जबरदस्त मानसिक धक्का बसतो. त्यालाही नंतर हालहाल करून मारलं जातं.

प्रेमी पंडित नावाच्या अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय अशा व्यक्तीला निव्वळ गंध आणि पगडी या हिंदू प्रतिकांमुळे इतकं भयंकर अमानुष मरण येतं की असल्या क्रौर्याची आपण स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. महंतांची बोलणी करण्यासाठी प्रेमींच्या घरी काही तरुण येतात आणि त्यांना बाहेर चलण्याचा आग्रह करतात. रात्र झालेली असल्याने प्रेमींचा मुलगाही त्यांच्यासोबत येतो. थोडं दूर चालत गेल्यावर एका ठिकाणी प्रेमी आणि त्यांच्या मुलाची त्या अतिरेक्यांशी काही बोलाचाली होते. अपमान होतात, धक्काबुक्की केली जाते. गंध आणि पगडी ही हिंदू प्रतिकं न मिरवण्याबद्दल प्रेमींना ताकीद दिली जाते. परंतु ते ऐकत नाहीत. अखेरीस त्यांच्या मुलाला झाडाच्या एका फांदीला लटकावून फाशी दिलं जातं. पण प्रेमींच्या नशिबी इतकं सोपं मरण नसतं. त्यांची पगडी खाली पाडून ती लाथांनी तुडवली जाते. शरीराचा अक्षरशः लोळागोळा होईपर्यंत त्यांना जबरदस्त मारहाण केली जाते. त्यानंतर त्यांना झाडाला लटकावून, कपाळावर बरोब्बर गंधाच्या जागी एक मोठा खिळा ठोकला जातो, त्यानंतर त्यांचे डोळे फोडून बाहेर काढले जातात. पंडित आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांना दहशत बसावी यासाठी त्यांची प्रेतं तिथेच तशीच ठेवली जातात. एवढं सगळं होऊनही कोणाचीही तोंडातून एक शब्दही काढण्याची प्राज्ञा नसते.

श्रीनगरमध्ये मुलं, सुना, आज्या, लहान मुलं अशी सुमारे सुमारे डझनभर माणसं असलेलं एक कुटूंब त्यांचं मोठं राहतं घर सोडून जायला तयार नसतं. हा एवढाच दोष असतो त्यांचा. एके दिवशी भल्या पहाटे त्या घरात घुसून अमानुष गोळीबार केला जातो. हा गोळीबार एवढा मोठा आणि इतका सतत चालला होता की त्या गोळीबाराचा आवाज पुढे अनेक दिवस वातावरणात घुमत राहतो. गोळीबार थांबल्यावर काही वेळाने आजूबाजूचे लोक घरात शिरतात आणि अक्षरशः हादरून जातात. घरभर प्रेतांचा खच पडलेला असतो. एक घराच्या पोर्चमध्ये, दोन जिन्यांवर, मुलं त्यांच्या बिछान्यात, एक बाई स्वयंपाकघरात तर दोन वृद्ध स्त्रिया दिवाणखान्यात मरून पडलेल्या असतात.

जागरनाथ नावाच्या एका पंडितांची काही मुस्लिम तरुणांशी ओळख होते आणि ते तरुण नियमित त्यांच्याकडे यायला जायला लागतात. जागरनाथ यांची मुलगी शीला हिच्याशीही त्यांची चांगली मैत्री होते. कालांतराने वातावरण पेटायला लागल्यावर जागरनाथ आपली आई, बायको आणि अन्य मुलं यांच्याबरोबर काश्मीर सोडून जायला निघतात. त्याचवेळी ते मुस्लिम तरुण त्यांना अडवतात आणि त्यांना शीलाला नेता येणार नाही असं सांगतात. ट्रक चालकाने ताबडतोब ट्रक चालू न केल्यास तो इथेच उडवून दिला जाईल अशी धमकी देऊन त्यांना तिकडून हाकलून दिलं जातं. त्यानंतर अतिरेक्यांचा समूह शीलाला अक्षरशः इतकं वापरतो की ती अगदी शुष्क होऊन जात जात अखेरीस आपलं मानसिक संतुलन गमावून बसते आणि यातना, वेदनांचं एक नवीन प्रतीक बनते.

श्रीनगरमध्ये राहणारं एक म्हातारं जोडपं आपल्या मुस्लिम मित्राला त्यांचं मोठं राहतं घर विकणार असतं. व्यवहार पक्का होतो. त्यानंतर काही मुस्लिम लोक आणि अतिरेकी त्या मुस्लिम कुटुंबियांकडे येतात आणि धमकवतात की तुम्ही आपल्या पवित्र कार्याच्या आड येताय. पंडितांकडून घर विकत घेण्याची काय आवश्यकता आहे. तसंही ते घर आपलंच होणार आहे. त्यांना फक्त धमकी देऊन हाकलून दिलं की झालं. दुसऱ्या दिवशी ते मुस्लिम कुटुंब त्या पंडित कुटुंबाला धमकी देऊन हाकलून देतं आणि घरावर कब्जा मिळवतं.

हे काही निवडक प्रसंगच आहेत. अशा धक्कादायक आणि अमानुष प्रसंगांची मालिका पुस्तकाच्या पानोपानी दिसते. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यातील राजकारणावर देखील लेखकाने धिटाईने भाष्य केल्याचं आढळतं. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग म्हणजे रुबिया सईद हिच्या अपहरणाचा प्रसंग. १९८९ साली मुफ्ती मोहम्मद सईद या तत्कालीन गृहमंत्र्याच्या मुलीचं अतिरेक्यांकडून अपहरण केलं जातं आणि काही दिवसांपूर्वीच पकडलेल्या ५ अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी केली जाते. या प्रसंगाचं वर्णन करताना लेखक म्हणतो की राज्य आणि केंद्र सरकारकडून हे प्रकरण अतिशय ढिसाळपणे हाताळलं गेलं. एखादं नाटक चालू असल्याप्रमाणर सगळं अगदी ठरल्याबरहुकूम घडलं. लेखक म्हणतो की हे ओलीस प्रकरण म्हणजे अतिरेक्यांनी अनेक लोकांच्या सहभागाने आखून रेखून, ठरवून केलेली कृती होती हे लवकरच सिद्ध झालं. खुद्द सरकारमधले काही जण या नात्यात सहभागी होते. एखाद्या नाटकाची संपूर्ण तालीम पाठ असावी त्याप्रमाणे अनेकांना अपहरणापासून ते सुटकेपर्यंतच्या सर्व घटनांची इत्यंभूत माहिती होती. अनेकांना या अपहरण प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व लोकांची नावं, पत्ते ही माहिती तर होतीच पण कैदेत असताना रुबिया कुठे कुठे राहिली, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिला कसं आणि केव्हा नेलं गेलं या सगळ्याचीही समग्र माहिती त्यांना होती. माहिती नव्हती ती फक्त सरकारला आणि त्यामुळे सरकारचं हसं झालं. आणि हे सगळं पुस्तकात ज्या सहजतेने येतं ते आणि गृहमंत्री असलेला एक इसम निव्वळ धर्मापायी इतक्या नीच पातळीचा देशद्रोहीपणा करू शकतो हे वाचून अक्षरशः चक्रावून जायला होतं आणि संतापही येतो. अजून एक असंच धक्कादायक प्रकरण म्हणजे घरं बांधण्यासाठी सरकारकडूनच पंडितांना भरीस पाडलं जातं ती घटना. जुनी घरं स्वस्तात विकून, नवीन घरं घेण्यासाठी पंडितांकडून कर्जं काढली जातील, घरं बांधली जातील आणि काही वर्षांतच पंडितांना तिथून हुसकावून लावलं जाईल अशा प्रकारची योजना सरकारी पातळीवर शिजून तिची अंमलबजावणी केली गेली होती हे ऐकून तर भयंकर संताप संताप होतो.

शेख अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, बक्षी आणि इतर तत्कालीन राजकारणी आणि त्यांचे स्वार्थी डावपेच यांचा उल्लेख असलेल्या अनेक घटना कधी तपशीलात तर अनेकदा त्रोटक स्वरूपात येतात. पानागणिक काश्मीर मधील बदलत चाललेली परिस्थिती, दहशत, आपलं राहतं घर सोडून जाऊन जीव वाचवावा असा लेखकाच्या मित्रमंडळींचा आग्रह आणि काही झालं तरी आपली जन्मभूमी न सोडण्याबद्दलचं लेखकाचं ठाम मत या या दोलायमान परिस्थितीत भिरभिरणारी लेखकाची अवस्था वाचताना अंगावर काटा येतो. काही प्रसंगांमध्ये अगदी थोडक्यात जीव वाचल्याची उदाहरणं तर काही वेळा निव्वळ हिंदू म्हणून दिला जाणारा त्रास आणि त्या त्रासातून लुटली जाणारी मजा असेही अनुभव लेखकाने सांगितले आहेत.

शेवटच्या प्रकरणापर्यंत लेखकाच्या मानसिक अवस्थेचा लंबक दोन टोकांमध्ये फिरत राहतो. पण त्याला कुठल्याही अंतिम निर्णयावर ठाम होऊ देत नाही. अखेरीस दहशतीच्या छाया गडद होत जात जात अधिक समीप येतात आणि दरवाज्यावर धडका ऐकू येतात. कदाचित अखेरच्याच. लेखकाला ते नक्की माहीत नसतं आणि आपल्यालाही. पण काय झालं असेल, कसं झालं असेल याचा अंदाज वाचक बांधू शकतो. संपूर्ण पुस्तकावर भय आणि विषण्णता यांची एक खिन्न पण तितकीच भयंकर सावली आहे. पुस्तक संपल्यावरही पुस्तकातले कित्येक प्रसंग, क्रूर अतिरेकी आणि धूर्त राजकारणी आपल्या डोळ्यांपुढून हलत नाहीत. संताप येतो, भीती वाटते आणि सतत एक अस्वस्थता जाणवत राहते आणि पुढचे अनेक दिवस आपल्याला या 'दहशतीच्या छायेत'च राहायचं आहे याची खूणगाठ आपण मनाशी बांधू लागतो!!

-हेरंब ओक 

Wednesday, December 22, 2021

रक्तरंजित पुस्तकमाला : Cody Mcfadyen (Smoky Barrett Series)

Cody Mcfadyen या अमेरिकन लेखकाच्या Smoky Barrett सिरीज मध्ये पुस्तकं आहेत.

  1. Shadow Man

  2. The Face of Death

  3. The Darker Side

  4. Abandoned

  5. The Truth Factory


स्मोकी
बॅरट ही एफबीआय ची स्पेशल एजंट आहे. एका विकृत सिरीयल किलरने तिच्या कुटुंबीयांचं दुर्दैवी हत्याकांड घडवून आणून तिच्यावरही प्राणघातक हल्ला केलेला असतो. सुदैवाने त्या जीवघेण्या हल्ल्यातून जेमतेम वाचलेली स्मोकी ही विद्रुप चेहरा, असंख्य जखमा आणि कमालीचं नैराश्य या सगळ्यांच्या साथीने आयुष्य ढकलते आहे.

आणि अचानक अजून एका अशाच विकृत सिरीयल किलरचं आव्हान तिच्या पुढ्यात उभं ठाकतं आणि स्मोकी पुन्हा जुन्या उमेदीने त्याला सामोरी जाते. शाडो मॅन या पहिल्या पुस्तकाचा हा साधारण गोषवारा.

पुढच्या पुस्तकांमध्येही असेच पण वेगळ्या तऱ्हेचे, विक्षिप्त, खुनशी, विकृत सिरीयल किलर्स वाचकांच्या भेटीला येतात. प्रचंड रक्तस्राव, खुनी हल्ले, हत्याकांडं यांनी भरलेली ही पुस्तकं आहेत.

*अर्थातच सर्व वाचकांना झेपणारी.*

ज्यांना या प्रकारचं जान्र आवडतं त्यांना नक्की आवडू शकतील. अर्थात शाडो मॅन मध्ये जाणवणारी लेखकाची, पात्रं आणि प्रसंग यांवरची पकड पुढच्या पुस्तकांमध्ये हळूहळू निसटत चालल्याचं जाणवतं. तिसरं पुस्तक (डार्कर साईड) मध्ये तर उगाचच काहीही चाललंय असं वाटतं काही वेळा. त्यामुळे मी चौथं पुस्तक सुरू केलं पण संपवलं नाही. हळूहळू संपेल. बघू.

ज्यांना रक्तरंजित, बीभत्स, विकृत, विक्षिप्त सिरीयल किलर्स आणि हत्याकांडं,  त्यातली वर्णनं, गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या अचाट विचित्र पद्धती आणि त्यावर स्पेशल एजन्टसची दमदार प्रत्युत्तरं अशा प्रकारचे विषय आवडतात त्यांना नक्की आवडेल अशी ही बुकसिरीज.

#CodyMcFadyen
#SmokyBarrett

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...