हेरंब : ह्म्म्म
जेरेमी : पुन्हा सांगू का?
हेरंब : म्म्म्म.. चालेल..
जेरेमी : बरं.. थोडक्यात सांगतो. वर गेल्यावर दार उघडून मी उजवा पाय बाहेर ठेवीन. माझ्या पायाच्या किंचित अलीकडे तू तुझा उजवा पाय ठेवायचास. पुढचं सगळं मी बघून घेईन. त्यानंतर लगेच शरीराचा आकार धनुष्यासारखा करायचा. डोकं आणि पाय जास्तीत जास्त मागे न्यायचे. हात पुढे बांधलेले. नंतर मी तुझ्या खांद्यावर हळूच चापट मारून तुला खुण करेन तेव्हा हात पूर्ण पसरायचे.. आडवे. उडल्यासारखं करायचं. आत्ता इथपर्यंत पुरेसं आहे. उरलेलं मी नंतर सांगेन...
हेरंब : बरं.
नंतर जेरेमी हेरंबच्या पाठीला सॅकसारखं काहीतरी बांधतो.. अर्थात ते जे काही असतं ते साध्या सॅकच्या १५-२० पट जड असतं. दोन पट्टे पाठीवरून आणि दोन पट्टे पायातून येऊन मांडीजवळ आवळले जातात. आता हेरंब एकदम तयार असतो. जेरेमीच्या मते.. स्वतः हेरंबच्या मते तर तो कधीचाच तयार असतो.
जेरेमी : मी आता शुटींग करतो.
दोन-अडीच तास वाट बघत थांबल्याने हेरंबला आधीच कंटाळा आलेला असतो. कधी एकदा वर जातोय असं झालेलं असतं.. त्यामुळे जेरेमीच्या कॅमेर्यात बघून तो काहीतरी बडबडायचं म्हणून बडबडतो.
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : हो
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : नाही
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : माहीत नाही
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : हो. पण मला आता फक्त वर जायचंय.
जेरेमी : ओके
हेरंब, जेरेमी, हेरंबचा एक मित्र आणि जेरेमीचा एक मित्र असे सगळे आत बसतात. पोरगेलासा पायलट विमान सुरु करतो.विमान कसलं ते? मारुती-८०० एवढी रुंदी आणि दोन मारुत्यांएवढी लांबी असलेलं आणि पंख असलेली एक गाडीच ती.जेरेमीने सांगितल्याप्रमाणे हेरंब पायलटच्या शेजारी बसतो. पाय पसरून. हेरंबच्या बरोबर मागे जेरेमी. जेरेमीच्या शेजारी हेरंबचा मित्र आणि जेरेमीचा मित्र बसतात. विमान सुरु होतं आणि बघता बघता आकाशात झेपावतं.जेरेमीने सांगितल्याप्रमाणे विमान सुरु झाल्याझाल्या हेरंब जेरेमीच्या पाठीला रेलून बसतो. हेरंब पूर्ण वेळ लहान मुलासारखा बाहेर बघत असतो. अडीच तासांपूर्वी लख्ख ऊन असणार्या आकाशात थोडे ढग दिसायला लागलेले असतात.. विमान प्रचंड घरघर, खरखर, धुस्सधुस्स करत असतं. त्यामुळे
जेरेमी : खरं १५ सेकंदांचा फ्रीफॉल आहे. त्यानंतर पॅराशूट उघडायचं. पण ढगांमुळे आपला फ्रीफॉलचा कालावधी ५ सेकंदांनी कमी होईल. कारण १०,००० फुटांऐवजी आपण ९,००० च जाणार आहोत.
हे हेरंबला
जेरेमी : खरं घरघरघरघर १५ घरघर फ्रीफॉल आहे. त्यानंतर पॅराशूट खरखरखर. पण ढगांमुळे आपला फ्रीफॉलचा घरघरघर ५ सेकंदांनी कमी होईल. कारण आपण १०,००० धुस्सधुस्स फक्त ९,००० च घरघरघरघर..
असं ऐकू येतं. बराच वेळ झाला तरी विमानाचं नाक अजूनही वर असल्याचं हेरंबला जाणवतं. एव्हाना खालच्या गोष्टी जवळपास साखरेच्या दाण्यांएवढ्या दिसायला लागलेल्या असतात. आणि सगळीकडे नुसतं पाणीच पाणी दिसत असतं. हेरंबच्या मनात किंचित भीतीसारखं काहीतरी टकटक करून जातं. "आता मागे नाही ना फिरता येणार?" अशासारखं काहीतरी. तो चटकन दुर्लक्ष करतो. आणि तेवढ्यात.... यस्स !!!!! 'तो' क्षण येतो. जेरेमी त्याच्या सॅकच्या पट्ट्यांचे हुक्स हेरंबच्या पट्ट्यांच्या हुक्समध्ये अडकवतो. दोघे उभे रहातात. जेरेमी विमानाचं दार उघडतो आणि त्याचा उजवा पाय विमानाच्या पायरी(??)वर ठेवतो आणि हेरंबला त्याचा उजवा पाय स्वतःच्या उजव्या पायाच्या अलीकडे ठेवायला सांगतो. आयुष्यात पहिल्यांदाच आपली विमानात चढण्याची आणि 'उतरण्याची' पद्धत सर्वस्वी भिन्न असणार आहे असले काहीतरी विचार हेरंबच्या डोक्यात येऊन जातात. हेरंब पाय विमानातून बाहेर काढून जेरेमीच्या पायाच्या अलीकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पाय नीट ठेवता येणार नाही याची अतिप्रचंड महाभयंकर वारा काळजी घेतो. कसाबसा पाय ठेवल्यावर थेट खाली बघितल्यावर उंचीSSSSSSचा थोडासा फोबिया की तत्सम काहीतरी हेरंबला जाणवून जातं. आता काय होणार असा क्षणभर विचार करत असताना जेरेमीने आपलं काम केलेलं असतं. एका सेकंदाच्या आत हेरंब अजूनही तोच विचार जमिनीपासून काही फुट जवळ येऊन करत असतो. भप्पसप्पठप्प आवाज करत वारा कानावरून जात असतो. जेरेमी खांद्यावर हलकी चापट मारून हेरंबला हात पसरण्याची आठवण करून देतो. जे काही घडतंय ते विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं असतं. इतक्या वेळ पडतोय तरी आपण अजून अधांतरी कसे असं वाटावं इतका वेळ मध्ये गेलाय असं वाटतं ना वाटतं तोच जेरेमी पुन्हा खांद्यावर चापट मारतो. हेरंब हात जवळ घेतो आणि अचानक गुरुत्वाकर्षणशक्तीला गंडवणारी एक शक्ती हवा बनून पॅराशूटमध्ये शिरते. पुन्हा भप्पसप्पठप्प आवाज कानाशी होतो पण यावेळी तो ठप्पसप्पभप्प असा वाटतो. जेवढ्या वेगाने खाली येत होतो तेवढ्याच वेगाने हेरंब आणि जेरेमी वर जायला लागतात. आईसक्रीम सांडून ठेवल्यासारखे ढगांचे गोळे मधून मधून दिसत असतात. "आयला, इथूनच तर खाली आलो ना? मग मगाशी कसे दिसले नाहीत हे?" असा विचित्र विचार करत हेरंब वर जात रहातो.. काहीच क्षण. नंतर सगळं नॉर्मल होतं अचानक. आता एकदम हलकं वाटत असतं. आजूबाजूला काय दिसतंय, काय घडतंय याच्या नोंदी हेरंबच्या मेंदूवर व्हायला लागतात. हे असं कित्येक सेकंदांनंतर होत असतं. मधला काही वेळ एवढा वेगात गेलेला असतो की नोंदी व्हायच्या आतच त्या जुन्या झालेल्या असतात आणि त्यांची जागा नव्या गोष्टींनी घेतलेली असते. मग झाडं, शेतं, जलाशय, पाणी, बिल्डिंग्स, गाड्या, रस्ते, लोकं, विमानं या सगळ्यांचे एक शंभरांश आकार दिसायला लागतात. हळूहळू जेरेमीची कलाकुसर दिसायला लागते. तो मधेच पॅराशूट गोलगोल फिरवतो, मधेच गिरक्या घेतो, मधेच वळवतो, मधेच घिरट्या घातल्यासारखं करतो. हवेशी खेळ चालू असतात, वारा भिरभिरत असतो. तीच तीच झाडं, शेतं वेगवेगळया कोनांतून दिसत रहातात. या सगळ्या इमुकल्या चिमुकल्या पिटुकल्या जगाचा राजा असल्यासारखं हेरंबला वाटतं. हे घिरट्यांचे खेळ बराच वेळ चालू रहातात. जेरेमी अगदी फॉर्मात आलेला असतो. ही त्याची दिवसातली सातवी उडी आहे याच्यावर कोणाचा सांगूनही विश्वास बसणार नाही अशा प्रकारे जेरेमीचे खेळ चालू असतात. बघता बघता एक शंभरांश आकार वाढत वाढत मोठे होत जाताना दिसायला लागतात. एव्हाना हेरंबलाही उंचीचा आणि त्या घिरट्यांचा थोडासा कंटाळा यायला लागतो. पाय जमिनीवर यायची वाट बघायला लागतात. हे सगळं जणु कळल्याप्रमाणे जेरेमी जमिनीच्या दिशेने झेपावायला लागतो. झूम्म्म्म्म्म करत दोघेही खाली येतात. एअरपोर्ट वर लँड होताना विमानाचा काढावा तशा धर्तीवर हेरंब आणि जेरेमीचा धरतीवर पाउल ठेवायच्या काही क्षण आधी एक फोटो टिपला जातो आणि हेरंब एकदाचा जमिनीवर येऊन पोचतो. थोडंसं गरगरत असतं. जाम बरं वाटतं. तेवढ्यात जेरेमी कानाशी येऊन किंचाळतो. "माझं नाव काय??".. फुटला न फुटला अशा आवाजात हेरंब "ज्ये र्र मि" असं काहीसं बडबडतो. क्लिक खटॅक.. कॅमेरा ऑफ. गुड बाय जेरेमी. हेरंब पुन्हा एकदा खात्री करून घेतो.. सुखरूप असतो.. हातीपायी धड असतो... "एय उडी उडी उडी" बरोब्बर जमिनीवर पडलेली असते.
तळटीप क्र. १ : खरं तर ही वाचण्याची नाहीच तर तर बघण्याची किंबहुना करण्याची गोष्ट. तरीही उगाच कायतरी लिहिल्यासारखं केलं. आवडलं नसेल, कळलं नसेल तरी खालचा व्हिडीओ बघा लगेच. तेवढंच (माझं) पापक्षालन होईल... आणि हो. धरतीवर पाउल ठेवतानाचा फोटू पण आहेच.
तळटीप क्र २ : प्रथमपुरुषी एकवचनाऐवजी उगाच टीपी म्हणून विशेषनामाचा वापर केला. पण खरं सांगतो, इतक्या वेळा स्वतःचं नाव लिहिताना, वाचताना भारी मजा येते. अगदी जनार्दन नारो शिंगणापूरकराची शप्पत !!
तळटीप क्र ३ : ही आमची शंभरावी नोंद. अर्थात या टिपेचा या नोंदीशी काहीही संबंध नाही हा भाग अलाहिदा.
व्हिडीओ इथे चिकटवला आहेच आणि आता त्याचा उजवीकडचा भाग कापलाही जात नाहीये. धन्स कांचन. आणि हा तूनळीचा दुवा. जस्ट इन केस.. :)
http://www.youtube.com/watch?v=fEvDlHzYBNo