Thursday, December 31, 2020

२०२० चा (पुस्तकी) जमाखर्च

 २०२० चा (पुस्तकी) जमाखर्च

चिनी व्हायरस आणि लॉकडाऊन मुळे यावर्षी वाचन नेहमीपेक्षा बरंच जास्त झालं. सुरुवातीच्या दोन-तीन महिन्यांत 'किंडल अनलिमिटेड' वर नारायण धारपांची अनेक नवीन पुस्तकं आली होती. ती एकामागोमाग एक वाचून झाली. गेल्या वर्षीही KU कृपेने धारपांची अनेक पुस्तकं झाली होतीच. त्यानंतर दीपक करंजीकर यांचं 'घातसूत्र' वाचून हादरून गेलो. नंतर निरंजन घाटे यांचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हाती आलं आणि ते आवडलंही खूप. एखाद्या लेखकाचं एखादं पुस्तक आवडलं की त्याची अजून पुस्तकं शोधून वाचून काढायची या माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मग निरंजन घाटे यांची बरीच पुस्तकं वाचून झाली. आणि त्यानंतर अचानक मे-जून दरम्यान कधीतरी ली चाईल्डच्या 'जॅक रीचर' सिरीज मधलं पहिलं पुस्तक अर्थात 'Killing Floor' हाती आलं आणि अक्षरशः भारावल्यागत मी रीचर वाचायला घेतला. त्यानंतर काही वैयक्तिक कारणांमुळे जुलै-ऑगस्ट मध्ये वाचन जवळपास बंद झालं. ऑगस्टच्या शेवटाकडे पुन्हा रीचरपुराण सुरु झालं. रीचरची पुस्तकं अन्य मराठी पुस्तकांपेक्षाही मोठी असूनही प्रामुख्याने त्यातल्या कथेच्या प्रवाहीपणामुळे, ली चाईल्डच्या अप्रतिम निवेदनशैलीमुळे ती खूप भराभर वाचून झाली. त्याबद्दल मी माझ्या रीचरसंबंधीच्या ओळखपर लेखात तपशीलाने लिहिलं आहेच. तो लेख वाचून अनेकांनी रीचर सिरीजची पुस्तकं वाचायला घेतल्याचं, आवडल्याचं आवर्जून कळवलं ही त्यातली आनंदाची बाब. 

सगळ्यात आनंदाची, अभिमानाची आणि हुरळून जाऊन फुशारक्या मारण्यासारखी गोष्ट म्हणजे यंदा पुस्तकांची शंभरी गाठली. वर्षभरात तब्ब्ल १०५ पुस्तकं वाचून झाली. पुन्हा कधी आयुष्यात वर्षभरात शंभरी पार होईल असं वाटत नाही. तस्मात् हे वर्ष विशेष महत्वाचं. पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे. 

#शंभरी_भरली 

#Happy_Reading


नारायण धारप

थैलीतला खामरा

कपटी कंदार आणि कांताचा मनोरा

तळघर

अघोरी हिरावट

विश्वसम्राट

भुकेली रात्र

विषारी वारसा

केशवगढी

झाकलेला चेहरा

१० मैफल

११ सावट्या

१२ सैतान

१३ रत्नपंचक

१४ परीसस्पर्श

१५ न्यायमंदिर

१६ देवाज्ञा

१७ रावतेंचा पछाडलेला वाडा

१८ ऐसी रत्ने मेळवीन

१९ काळोखी पौर्णिमा

२० पडछाया

२१ अंधारातील उर्वशी

२२ चंद्रविलास

२३ संसर्ग

२४ दिवा मालवू नका

२५ शोध

२६ शिवराम

दीपक करंजीकर

२७ घातसूत्र

२८ आजच्या विश्वाचे आर्त

निरंजन घाटे

२९ वाचत सुटलो त्याची गोष्ट 

३० हटके भटके

३१ स्वयंवेध

३२ माझ्याविषयी

३३ आपली पृथ्वी

३४ आपल्या पूर्वजांचे तंत्रज्ञान

३५ गुन्हेगारांचे जग

३६ अमेरिकन गुन्हेगारी

३७ आण्विक अपघात आणि अण्वस्त्रे

३८ हायजॅक

३९ जगप्रसिद्ध विज्ञान कथा

४० यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता

४१ स्वयंवेध

४२ आपली पृथ्वी

अतुल कहाते

४३ स्टीव्ह जॉब्स

४४ युद्धखोर अमेरिका

सुहास शिरवळकर

४५ कल्पांत

४६ धुकंधुकं

४७ जाता.... येता

एस हुसेन झैदी

४८ भायखळा ते बँकॉक

४९ माफिया क्वीन्स ऑफ मुंबई

बाळ फोंडके

५० दृष्टिभ्रम

५१ गुडबाय अर्थ

५२ अखेरचा प्रयोग

५३ चिरंजीव

५४ ऑफलाइन

५५ द्विदल

वसंत वसंत लिमये

५६ लॉक ग्रिफिन

५७ विश्वस्त

५८ इन्साफ : बाबा कदम

५९ अक्करमाशी : शरणकुमार लिंबाळे 

६० उचल्या : लक्ष्मण गायकवाड 

६१ प्रेमचंद यांच्या श्रेष्ठ कथा : अनुवाद - डॉ विशाल तायडे 

६२ प्रेमचंद यांच्या निवडक कथा :  अनुवाद - आराधना कुलकर्णी 

६३ चौंडकं : राजन गवस 

६४ स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेप आणि वास्तव : अक्षय जोग

६५ विज्ञान युगातला शेरलॉक होम्स : विजय देवधर

६६ रॉ: भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा : रवी आमले

६७ निवडक बाबुराव अर्नाळकर : संपादन - सतीश भावसार

६८ यक्षांची देणगी : जयंत नारळीकर

६९ "व्योमकेश बक्षी रहस्यकथा : मूळ लेखक : शरदिंदु बंदोपाध्याय - अनुवाद : अशोक जैन 

अनुवादित

७० सेवन्थ सिक्रेट : मूळ लेखक : आयर्विंग वॉलेस - अनुवाद : विजय देवधर 

७१ सेकंड लेडी : मूळ लेखक : आयर्विंग वॉलेस - अनुवाद : रवींद्र गुर्जर

७२ द पेलीकन ब्रिफ : मूळ लेखक : जॉन ग्रिशम - अनुवाद : रवींद्र गुर्जर

७३ द स्ट्रीट लॉयर : मूळ लेखक : जॉन ग्रिशम - अनुवाद : शीला कारखानीस 

७४ रनअवे जुरी : मूळ लेखक : जॉन ग्रिशम - अनुवाद : अनिल काळे 

७५ द पार्टनर : मूळ लेखक : जॉन ग्रिशम - अनुवाद : विभाकर शेंडे 

७६ सत्तर दिवस : मूळ लेखक : पिअर्स पॉल रीड - अनुवाद : रवींद्र गुर्जर

७७ कन्टेजन : मूळ लेखक : रॉबिन कूक - अनुवाद : प्रमोद जोगळेकर

७८ कोमा : मूळ लेखक : रॉबिन कूक - अनुवाद : रवींद्र गुर्जर

७९ माय नेम इज परवाना : मूळ लेखक : डेबोरा एलिस - अनुवाद : अपर्णा वेलणकर

८० पैसे कसा हा पैसा (Sucker Punch) : मूळ लेखक : जेम्स हॅडले चेस - अनुवाद : मनोरमा देवरे

८१ हिकरी डिकरी डॉक : मूळ लेखक : अगाथा ख्रिस्ती - अनुवाद : रेखा देशपांडे

८२ महाभारताचे रहस्य : ख्रिस्तोफर सी डॉयल - अनुवाद : मीना शेटे-संभू

८३ सियालकोट सागा : मूळ लेखक : अश्विन सांघी - अनुवाद : तृप्ती कुलकर्णी

८४ कालचक्राचे रक्षक : मूळ लेखक : अश्विन सांघी - अनुवाद : आरती देशपांडे

English

८५ Prey : Michael Christon

८६ The Litigators : John Grisham

Lee Child

८७ Killing Floor

८८ Tripwire

८९ The Visitor (UK), or Running Blind (US)

९० Echo Burning

९१ Without Fail

९२ Persuader

९३ The Enemy

९४ One Shot

९५ The Hard Way

९६ Bad Luck and Trouble

९७ Nothing to Lose

९८ Gone Tomorrow

९९ 61 Hours

१०० Worth Dying For

१०१ The Affair

१०२ Never Go Back

१०३ Make Me 

१०४ The Midnight Line

१०५ The Sentinel


Thursday, October 29, 2020

रिडींग रीचर इज रीचिंग रीचर"मला इनो'ज डायनर मध्ये अटक करण्यात आली" असं एक व्यक्ती सांगते आहे या ओळीने पुस्तकाची सुरुवात होते. मग हॉटेलचं इत्यंभूत वर्णन येतं. त्यानंतर ती व्यक्ती हॉटेलात कुठे बसली आहेकाय खाल्लं हे हळूहळू सांगितलं जातं. त्यानंतर पोलिसांचं आगमनत्यांचंत्यांच्या गणवेशाचंरिव्हॉल्वरशॉटगन इत्यादी हत्यारांचं तपशीलवार वर्णन आणि त्यांचे फायदे-तोटे सांगितले जातात. कशासाठी अटक झाली आहे हे सांगितलं जातं. त्यानंतर हॉटेल मधून बाहेर पडतानाच्या प्रसंगाचं अतिशय मुद्देसूद वर्णन येतं. एव्हाना हॉटेलची रचनाटेबल्स, किचन, वेट्रेसहॉटेलच्या बाहेरचा परिसरदुकानंरस्ते हे सारं सारं आपल्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष साकार झालेलं असतं. पोलीस स्टेशनला पोचल्यावर एकामागोमाग धक्क्यांची मालिका सुरु होते. तोवर वाचक इतका रंगून गेलेला असतो की एवढ्या कमी वेळात आपण एवढा लांबचा पल्ला गाठला आहे हे त्याच्या लक्षातही येत नाही. कारण अजूनही धक्कादायक प्रसंगांची मालिका संपलेली तर नसतेच उलट त्यांचा वेग आणि वारंवारता वाढलेली असते.

******

"आत्मघातकी हल्लेखोरांना (Suicide bombers) हेरणं सोपं असतं" असं आपल्याला सांगितलं जातं. आणि ते तसं का याची कारणमीमांसाही आपल्याला सांगितली जातात. प्रत्येक कारण हे प्रत्यक्षात अतिशय प्रयत्नपूर्वक मांडलेलं निरीक्षण असतं. हे आपण का वाचतोय हे नीट लक्षात न येऊनही आपण वाचत जातो आणि अचानक एक जोरदार धक्का आपल्याला बसतो! पुढे वाचत गेल्यावर कळतं की हा तर फक्त पहिला धक्का होता.

******

शहरातल्या एका अतिशय गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार होतो. काही व्यक्ती मृत्यमुखी पडतात. एकच गोंधळ उडतो. दोन दिवसांनी एक व्यक्ती तिथे हजर होते. ती व्यक्ती कोणती का आली आहे आणि तिचा या गोळीबाराच्या घटनेशी काय संबंध हे सगळं वाचता वाचता वाचक अक्षरशः हादरून जातो.

******

कडाक्याच्या थंडीत हॉटेलमध्ये कॉफी पीत बसलेला नायक एका व्यक्तीचा जीव वाचवायचा म्हणून पुढाकार घेतो. हळूहळू अशा काही गुंतागुंतीच्या आणि रहस्यमय घटना घडत जातात की जे समोर दिसतंय ते पूर्ण चित्र नाही हे त्याच्या लक्षात येतं. त्या प्रकरणाची पाळंमूळं खणून काढायचीच असं ठरवून पुढे आलेला नायक त्या रहस्यात अधिकाधिक गुंतत जातो.

******

सहज फिरत असताना अचानक एका जुन्या वस्तू विकणाऱ्या दुकानात नायकाला एक अतिशय मौल्यवान अशी अंगठी दिसते. त्या अंगठीला एक वेगळ्या प्रकारचं महत्व असतं. त्यानंतर सुरु होतो तो शोध आणि पाठलागाचा एक लांबलचक प्रवास ज्यात नेहमीप्रमाणे अनेक धक्के बसून शेवटी कोडं उलगडतं.

******

कॉलेजच्या फाटकामधून बाहेर पडणाऱ्या एका तरुणाचं अपहरण करण्याचा कट वास्तवात येत असतो आणि अचानक काही चक्रं फिरतात आणि तो कट उधळून लावला जातो. पुढे काही वेगवान घटना घडून पहिलं प्रकरण संपता संपता अगदी शेवटच्या ओळीत आपल्याला प्रचंड धक्का बसतो आणि अधाश्याप्रमाणे आपण दुसऱ्या प्रकरणावर झडप घालतो आणि आधीचा धक्का सुसह्य म्हणायची पाळी आपल्यावर येते.

 ******

जेम्स डोवर ग्रांट नामक आणि अर्थात ली चाईल्ड या टोपणनावाने सुप्रसिद्ध असणाऱ्या ब्रिटिश लेखकाच्या अनुक्रमे किलिंग फ्लोअरगॉन टुमॉरोवन शॉटवर्थ डाईंग फॉरद मिडनाईट लाईन आणि पर्स्युअडर या काही सुप्रसिद्ध पुस्तकांचे हे ढोबळ सारांश आहेत. वर आलेल्या वर्णनांमध्ये नायक म्हणून आपल्या भेटीस येणारी व्यक्ती म्हणजे दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा तारणहार असलेला एकमेवाद्वितीय जॅक रीचर (नो मिडल नेम). ली चाईल्डने जॅक रीचर या काल्पनिक पात्राला केंद्रस्थानी ठेवून २४ पुस्तकं लिहिली आणि त्याचं पंचविसावं पुस्तक (द सेंटिनलनुकतंच दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालं. 'किलिंग फ्लोअरहे जॅक रीचरवरचं पहिलं पुस्तक ली चाईल्डने १९९७ मध्ये लिहिलं आणि अल्पावधीतच त्याला जगभर प्रचंड प्रसिद्धी आणि लोकप्रियता लाभली. जॅक रीचर हा जगभरातल्या रोमांचक आणि रहस्यमय प्रकारचं लेखन आवडणाऱ्या वाचकांच्या गळ्यातला ताईत बनला आणि पुढच्या प्रत्येक पुस्तकानंतर ही मालिका अशीच यशस्वीपणे मार्गक्रमणा करत राहिली.

कोण आहे हा जॅक रीचर??

एका वाक्यात ओळख करून द्यायची झाल्यास जॅक रीचर हा एक भटक्या अवलिया आहे, एकांडा शिलेदार आहे. सतत भटकत असल्याने तो कधी कुठे असेल हे कोणालाच माहीत नसतं परंतु त्याच्या गुन्ह्याच्या तपासातील असामान्य कौशल्यापायी निवृत्त झाल्यानंतरही त्याच्या मित्रांना, परिचितांना, लष्करातल्या लोकांना लोकांना त्याची मदत लागत असते. परंतु त्याचा स्वतःचा पत्ता (पर्मनंट अ‍ॅड्रेस) नसतो की फोन/मोबाईल नंबर नसतो. त्यामुळे त्याच्यापर्यंत पोचायला तऱ्हेतऱ्हेचे मार्ग चोखाळले जातात. कोणी विशिष्ट अशा सांकेतिक रेडिओ कोड्सच्या माध्यमातून त्याच्या बँकखात्यापर्यंत आणि पर्यायाने त्याच्यापर्यंत पोचतात तर कोणी लष्करी वृत्तपत्रांमध्ये बातमी देतात तर कोणी सरळ डिटेक्टिवच्या मार्फत त्याचा शोध घेतात. 

-----------------------------------------------------------------

"यू आर न्यु इन टाऊन. आरण्ट यू?" शी सेड.

"युज्युअली" रीचर सेड.

-----------------------------------------------------------------

त्याच्या या अशा प्रकारे आयुष्य कंठण्याला त्याची लष्करी पार्श्वभूमी कारणीभूत आहेरीचर हा अमेरिकन लष्करातल्या ११०व्या विशेष अन्वेषण दलात (110th Special Investigations Unit) १३ वर्षं मिलिटरी पोलीस म्हणून काम करून मेजर या हुद्द्यावरून निवृत्त झालेला एक माजी लष्करी अधिकारी आहे. रीचर हा या ११०व्या विशेष अन्वेषण दलाचा प्रथम प्रमुख अधिकारी अर्थात कमांडिंग ऑफिसर होता. या विशेष अन्वेषण दलाकडे अमेरिकन लष्करांतर्गत घडणाऱ्या अतिशय गुंतागुंतीच्या प्रकरणांची चौकशी करण्याची जबाबदारी असते. दुर्दैवाने अमेरिकन लष्करात करण्यात आलेली मनुष्यबळातील कपात आणि काही ज्येष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना दुखावल्याच्या कारणास्तव १९९७ साली रीचरला लष्करातून सन्माननीय निवृत्ती (Honorable Discharge) स्वीकारावी लागते. जॅक रीचरला 'ज्योनावाचा थोरला भाऊ असून त्याची आई फ्रेंच आणि वडील अमेरिकन असतात. रीचरचे वडील अमेरिकन लष्कराच्या आरमारात (US Marine Corps) कॅप्टन पदावर असतात. त्यांच्या सतत बदल्या होत असल्याने जॅक रीचरचं सुरुवातीचं आयुष्य जगभरातल्या विविध अमेरिकन लष्करी तळावर गेलेलं असतं. त्याचा जन्म जर्मनीमधील बर्लिन येथील लष्करी तळावर झालेला असतो. रीचरने लष्करातल्या नोकरीदरम्यान जगभर भटकंती केलेली असल्याने त्याचं स्वतःचं असं नियमित वास्तव्याचं ठिकाण नसतं. त्याचबरोबर अंगभूत फिरस्त्या वृत्तीमुळे त्याला एकाच ठिकाणी राहायलाही आवडत नसतं.

==========================

द वॉक वॉज लॉन्ग बट नॉट डिफिकल्ट.

जस्ट अ केस ऑफ पुटिंग वन फूट इन फ्रन्ट ऑफ द अदर.

==========================

त्यामुळे लष्करातून निवृत्त झाल्यावर तो सार्वजनिक बस वाहतुकीच्या माध्यमातून संपूर्ण अमेरिकाभर भटकंती करत राहतो आणि छोट्या आणि स्वस्त मोटेल्समध्ये एका रात्रीच्या बोलीवर वास्तव्य करत असतो. या संपूर्ण भटकंती दरम्यान (तो अजूनही कुठेही स्थिर झालेला नसून भटकंती अद्यापही चालूच आहे) त्याला आलेले अनुभवभेटलेली माणसंगुदरलेले चांगले-वाईट प्रसंगओढवलेली संकटं आणि तो ती शिताफीने आणि धडाकेबाजपणे कशी परतवून लावतो या सगळ्याचा लेखाजोखा हा जॅक रीचर सिरीजमधल्या किंबहुना रीचर सिरीजमधल्या २५ पुस्तकांचा ऐवज आहे. (नाव जॅक रीचर असलं तरी हा आपली ओळख फक्त 'रीचरअशीच करून देत असतो. किंबहुना त्याची स्वतःची आई देखील त्याच्या भावाला 'ज्यो' मात्र जॅकला रीचर’ अशीच हाक मारत असते.)

 जॅक रीचरची वैशिष्ट्यंस्वभाव आणि आवडीनिवडी

हजारो नाही तरी निदान शेकडो माणसांमध्ये ठळकपणे उठून दिसू शकेल अशी साडेसहा फूट उंची आणि सुमारे १२५ किलो वजन अशी भरदार शरीरयष्टी रीचरला लाभलेली आहे. आणि विशेष म्हणजे दिवसरात्र व्यायाम करून किंवा मेहनत करून त्याने ही शरीरयष्टी कमावलेली नसून ती त्याला लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे. कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करताही त्याचं शरीर पिळदार आहे. व्यक्तिमत्व महाकाय आहे. (त्याच्या या अशा अतिविशाल देहापायी त्याला अनेकदा बिगफूटएपमॅनइनक्रेडिबल हल्क अशी विविध विशेषणं बहाल केली जातात.अजून एक वेगळेपण म्हणजे रीचर घड्याळ वापरत नाही. वापरत नाही म्हणण्यापेक्षा त्याला ते वापरायची आवश्यकताच भासत नाहीकारण त्याच्या मेंदूत एक निसर्गदत्त घड्याळ आहे जे सदैव चालू असतं आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याला त्या माध्यमातून वेळ कळत असते. वेळ बघायची असताना सामान्य माणसं मनगट किंचित फिरवतात तर हा मेंदूत (ल्या घड्याळात) डोकावून बघतो. अजून कहर म्हणजे तर हे घड्याळ फक्त जागेपणीच चालू असतं असं नाही तर सामान्य माणसं जशी गजर लावण्यासाठी गजराच्या घड्याळाचा वापर करतात अगदी त्याचप्रमाणे रीचर त्याच्या मेंदूतल्या घड्याळात गजर लावतो आणि आश्चर्य म्हणजे पहिल्या गजराला उठतोही!  रीचर हा पूर्वी अमेरिकन लष्करातल्या अंतर्गत पोलीस खात्यात कार्यरत असल्याने ली च्या पुस्तकांमध्ये अमेरिकन लष्करतिथलं अंतर्गत राजकारणघडामोडीडावपेच तसेच अमेरिकेने भाग घेतलेली काही युद्धं (रीचरच्या कालावधीत घडलेली) यांचे तपशीलवार उल्लेख येतातप्रचंड हजरजबाबी असणारा आणि प्रसंगी जरासा उर्मटही वाटणारा रीचर मूळचा मात्र बऱ्यापैकी अबोल आहे. अनेकदा समोरची व्यक्ती काही अपमानास्पद किंवा दुर्लक्ष करण्यायोग्य बोलली तर याचं उत्तर ठरलेलं असतं "आय सेड नथिंग. आय अ‍ॅम गुड अ‍ॅट सेइंग नथिंग!".

==========================

"यू नो मच अबाउट हेड इन्ज्युरीज?"

"ओन्ली द वन्स आय कॉज" रीचर सेड.

==========================

रीचर हा प्रचंड कॉफी प्रेमी आहे. जवळपास व्यसन म्हणावं इतपत कॉफी तो सतत पीत असतो. आणि तीही भरपूर आणि अतिशय कडक. अतिशय कडवट. त्यात दूध नाही की साखर नाही.

==========================

मेड मी सम कॉफी व्हिच पुट द होल डे इन अ बेटर लाईट!

--------------------------

देअर वॉज नो कॉफी अगेन. आय वॉज ऑन द पॉईंट ऑफ टेकिंग दॅट पर्सनली.

--------------------------

शी आस्क्ड "डजण्ट कॉफी कीप यू अवेक?"

"अन्टील आय वॉन्ट टु गो टु स्लीप. दॅट्स व्हॉट इट्स फॉर"

==========================

 सदैव भटकत असूनही किंबहुना त्यामुळेच रीचरकडे एक कालबाह्य (expired) पासपोर्टएक एटीएम कार्ड (तेही सुरुवातीची काही वर्षं नसतंच) आणि एक फोल्डिंग टूथब्रश वगळता इतर काहीही सामान नसतं. तो दरवेळी स्वस्तातले पण नवीन कपडे घेतो३-४ दिवस वापरतो आणि त्यानंतर धुण्याबिण्याच्या भानगडीत न पडता ते सरळ टाकून देऊन नवीन कपडे घेतो. यासाठीही त्याचं एक (जरासं विचित्र) लॉजिक आहे. कारण कपडे धुवायचे म्हणजे मशीन हवंमशीन हवं म्हणजे घर हवं आणि घर असेल तर एका(च) ठिकाणी राहावं लागेल जे त्याच्या प्रकृतीला आणि सवयीला मानवणारं नसतं. किंवा कपडे बाहेर धुवायला दिले तरी त्याचा भटक्या स्वभाव पाहता ते कपडे मिळेपर्यंत तो त्या शहरात असायला हवा. अजून एक कारण म्हणजे रीचर तसा काटकसरीने राहणारा माणूस आहे. स्वस्त मोटेल्समध्ये राहणारास्वस्त हॉटेल्समध्ये नाश्ता/कॉफी/जेवण घेणाऱ्या रीचरला कपडे धुणेइस्त्रीसाठी देणे वगैरे खर्च मान्य नसतात की परवडणारेही नसतात. नवीन घेतलेले कपडे दिवसा वापरून झाल्यावर रात्री मोटेलरूममधल्या गादीच्या खाली घडी करून ठेवून रात्रभर त्यावर झोपून सकाळी आपोआपच छान इस्त्री झालेले कपडे तो वापरत असतो.

==========================

"आय लाईक आयसोलेशन. आय कॅन गो थ्री वीक्स विदाऊट सेइंग अ वर्ड"

==========================

रीचरच्या अशा अनेक चित्रविचित्र सवयींनीप्रभावी संवादांनीथरारून सोडणाऱ्याअंगावर काटे आणणाऱ्या प्रसंगांनी आणि जबरदस्त हादरे देत देत अतिशय वेगाने पुढे सरकणाऱ्या घटनांनी रीचर सिरीजमधील पुस्तकांची पानंच्या पानं व्यापून टाकणाऱ्या ली चाईल्डच्या लेखणीपुढे आपण अक्षरशः नतमस्तक होऊन जातो.

 कोण आहे हा ली चाईल्ड??


वर उल्लेख आल्याप्रमाणे जॅक रीचर या महाकाय भटक्या नायकाला जन्माला घालणारा आणि त्याच्या रोमांचकारी साहसांनी वाचकांना वेड लावणाऱ्या रीचरचा मानसपिता म्हणजे जेम्स डोवर ग्रांट हा ब्रिटिश लेखक म्हणजेच ली चाईल्ड. शिक्षणाने वकील असून १९७७ ते १९९५ अशा सुमारे अठरा वर्षं ग्रनाडा या ब्रिटिश टेलिव्हिजन वाहिनीवर काम करत असताना हजारो बातम्याजाहिराती यांचं लेखन करणारा आणि अनेक कार्यक्रमांचा निर्माता असणाऱ्या ली च्या नोकरीवर १९९५ अचानक गदा आली आणि त्यानंतर त्याने लेखणी हातात घेतली. १९९७ साली प्रकाशित झालेल्या 'किलिंग फ्लोअर'च्या अभूतपूर्व यशानंतर मागे वळून न पाहता ली लिहीतच गेला आणि लिहीतच राहिला. १९९८ साली तो अमेरिकेत स्थायिक झालातेव्हापासून तब्बल २२ वर्षं तो लिहितोच आहे आणि वर्षाकाठी एक या वेगाने रीचर सिरीजमधली नवीन पुस्तकं सतत बाजारात येत आहेत. जगभरातल्या एकशेएक देशांपैकी कुठेतरीकोणीतरी दर तेराव्या सेकंदाला ली चाईल्डचं पुस्तक विकत घेत असतं आणि अशा तऱ्हेने आत्तापर्यंत ली चाईल्डच्या पुस्तकांच्या कमीत कमी १० कोटी प्रतींची विक्री झालेली आहे.


अशा या अमाप जनप्रियत्व लाभलेल्या लेखकाला २०१९ साली साहित्यक्षेत्रातील अपूर्व योगदानासाठी ब्रिटिश सरकारने त्यांच्या देशातला 'सीबीईहा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. तर यंदाच्या बुकर पारितोषिकाच्या निवडीसाठीच्या परीक्षक मंडळातही ली चाईल्डचा समावेश करण्यात आला होता.विषय आणि लेखनशैली

ली चाईल्डने आपला मानसपुत्र जॅक रीचर याचं व्यक्तिमत्व स्वतःवरच बेतलेलं आहे असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. रीचरची उंची, वजन हे स्वतः ली शी मिळतंजुळतं तर आहेच पण रीचरचं साधं राहणीमान हेही थेट ली च्या राहणीमानाप्रमाणेच आहे. ली स्वतः अतिशय साधे, स्वस्त कपडे वापरतो. उंची किंवा महागड्या वस्तूंची त्याला फारशी आवड नाही. या साऱ्यांचं प्रतिबिंब रीचरच्या व्यक्तिमत्वात पडतं. ली चाईल्डच्या कादंबऱ्यांमधली शब्दनिवड अतिशय सोपी आणि वाक्यरचना सुटसुटीत असते. कुठलंही वाक्य साधारण ८-१० शब्दांत संपतं. (आणि यावरून 'पूर्णविरामांचा सढळ हस्ते वापर करणारा लेखक' म्हणून त्याच्यावर टीकाही होते.) 'किलिंग फ्लोअर' या पहिल्याच पुस्तकात ते पानोपानी जाणवतं. कदाचित एवढं सोपं आणि ओघवतं लेखन असल्यामुळे पहिल्या पुस्तकापासूनच तो सर्वसामान्य वाचकांना आपलासा वाटायला लागला असावा. ली चाईल्डच्या कादंबऱ्यांचा एक साचा पाहता त्यांचे ढोबळमानाने तीन भागांत विभाजन करता येते.

१. रहस्यमय घटना : कादंबरीच्या सुरुवातीच्या काही पानांमधून रहस्यमय/गूढ घटना घडायला लागतात. हळूहळू अशा धक्कादायक घटनांची एखादी छोटीशी मालिकाच तयार होते. नक्क्की काय घडतंयका घडतंय याचा पत्ता काही केल्या वाचकाला लागत नाही.

२. रहस्याचा उलगडा : हळूहळू वेगवेगळ्या भासणाऱ्या घटनांचा अर्थ उलगडायला लागतोघटना वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यात असलेलं एक सामायिक नातं समोर यायला लागतं. त्या एकमेकांत कशा गुंतलेल्या आहेत याचं चित्र स्पष्ट होत जातं.

३. खलनायकांचा बिमोड : रहस्यघटना आणि त्यांचं कनेक्शन लक्षात आलं तरी या सगळ्यामागे नक्की कोण आणि कितीजण आहेत आणि कुकर्मांमागचा त्यांचा नक्की उद्देश काय हे सगळं शेवटच्या एक तृतीयांश भागात स्पष्ट होतं आणि शेवटी अर्थातच रीचर सर्व खलनायकांना त्यांच्या पापांची फळं भोगायला लावतो.

हा एक ढोबळ साचा असला तरी प्रत्येक पुस्तकात वेगवेगळे प्रसंग, पात्रंरहस्यघटनाराजकारण या सर्वांची शिताफीने सरमिसळ करत प्रत्येक वेळी एक परिपूर्ण रोमांचक अनुभव वाचकांसमोर ठेवण्याच्या ली चाईल्डच्या लेखनकसबाचं अफाट कौतुक वाटल्याशिवाय राहवत नाही.

प्रत्येकवेळी वाचकांना अक्षरशः जखडून टाकणाऱ्यामंत्रमुग्धअचंबित करणाऱ्या लेखनाची निर्मिती सतत करत राहणं हे फारच कौतुकास्पद आहे. हे लेखन अत्यंत प्रभावी होण्याची काही प्रमुख कारणं आहेत.

 


१. तपशीलवार वर्णनं : लेखाच्या सुरुवातीला 'किलिंग फ्लोअरच्या वर्णनात म्हंटल्याप्रमाणे रीचर ज्या गावात/शहरात येऊन पोचला असेल त्या शहराचं अतिशय तपशीलवार वर्णन आपल्याला वाचायला मिळतं. रस्तेत्यांना मिळणारे उपरस्तेगल्ल्याचौकदुकानांची रांगत्यांचा क्रमहॉटेल/ऑफिस/मोटेल मधील बैठकीची व्यवस्थावस्तूंची मांडणीत्या त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारीत्यांची वाहनंवाहनांचे प्रकारपोलीस किंवा खलनायक आणि त्यांची हत्यारं आणि त्यांचे फायदे/तोटे इत्यादी सगळ्या सगळ्याची अतिशय सविस्तर मांडणी आपल्यापुढे केली जाते. त्याच त्याच वस्तूंचे संदर्भ आपल्याला पुन्हा पुन्हा दिले जातात जेणेकरून आधी दिलेल्या वर्णनाशी आपण ते मनातल्या मनात आपोआपच ताडून बघू लागतो आणि बघता बघता त्या गावाचा/शहराचा त्रिमितीय नकाशा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. "रीचर सेकंड स्ट्रीट वरून चालत जाऊन उजवीकडे वळला" हे वाचलं की तिथे त्याचं हॉटेल आहे किंवा टायर्सचं दुकान आहे हे आपल्या डोक्यातल्या चित्रात पक्कं बसून जातं.

 २. वातावरण निर्मिती : कुठल्याही महत्वाच्या प्रसंगाचं वर्णन करत असताना ली चाईल्ड त्या अनुषंगाने घडत जाणाऱ्या घटनावातावरण हे अतिशय अचूकपणे आपल्यासमोर मांडत जातो. याची सगळ्यात उत्तम उदाहरणं म्हणजे कुठल्याही पुस्तकात आलेली हाणामाऱ्यांची वर्णनं. हाणामाऱ्यांचे प्रसंग हे जेमतेम ३०-४० सेकंदात आटपणारे असतात (कारण रीचरसारख्या महाकाय प्रपातापुढे कुठलाही खलनायक टिकणं हे जवळपास अशक्य आहे.). परंतु या ३०-४० सेकंदांच्या प्रसंगांसाठी आवश्यक ती पार्श्ववभूमी तयार करताना सभोवतालचं वातावरणसमोरासमोर आलेल्यांचे पोशाखशरीरयष्टीतोंडवळा इत्यादीं इतकं अचूक वर्णन आपल्यासमोर केलं जातं की तो मारामारीचा किंवा पळून जाण्याचा किंवा गोळीबाराचा प्रसंग थेट आपल्यासमोर घडतोय असंच वाचकाला सतत वाटत राहतं.

३. रहस्यमय घटना आणि धक्कातंत्र : अतिशय वेगाने घडणाऱ्या घटनांच्या मालिकेत अधूनमधून सातत्याने धक्के बसत गेल्याने वाचकाच्या मनात तयार होत असलेलं किंवा वाचकाला वाटत असलेलं चित्र पार उधळूनभिरकावून दिलं जातं. या ज्या धक्कादायक घटना घडत जातात त्या अतिशय स्वाभाविक रीतीने घडत जातात. त्या कुठेही उगाच ओढूनताणून किंवा अट्टहासपूर्वक घडतायत असं कधीच वाटत नाही. त्यातलं रहस्य अतिशय अस्सल वाटतं. किंवा हे सगळे क्लूज आपल्याला माहीत असूनही हे आपल्या कसं लक्षात आलं नाही असं वाचकाला सतत वाटत राहतं. ली चाईल्डने काही वर्षांपूर्वी 'How to create Suspense' या शीर्षकाचा एक लघुनिबंध लिहिला होता. लिहिता लिहिता मधेच दुसऱ्या-तिसऱ्या परिच्छेदात "नव्वदीच्या दशकात लागलेल्या एका शोधाने मानवाचं आयुष्य बदललंअतिशय सुखकर झालं." असं एक वाक्य आलं. त्यानंतर टीव्हीकार्यक्रमघरपुस्तकं अशा इतर वर्णनांनी काही परिच्छेद भरले. पण काही केल्या तो शोध कुठला यावर भाष्य नव्हतं. त्यामुळे वाचकाच्या डोक्यात सतत भुणभुण चालूच की "तो शोध कोणता असेल बरं?". १-२ परिच्छेदांनंतर ली मिश्कीलपणे म्हणतोही की "मी अजूनही तुम्हाला तो शोध कोणता हे सांगितलेलं नाही. आणि तरीही किंवा म्हणूनच तुम्ही हा लेख वाचताय" आणि पुढच्या परिच्छेदात अखेरीस तो त्या कोड्याचं उत्तर देऊन टाकतो. त्या प्रश्नाचं/कोड्याचं उत्तर असतं टीव्हीचा रिमोट कंट्रोल. एवढ्या साध्याछोट्या उदाहरणातून 'How to create Suspense' या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर ली देऊन टाकतो आणि आपण त्याला मनोमन दंडवत घालतो कारण गेली काही मिनिटं ती वस्तू काय असेल या विचाराने आपल्या मेंदूचा अक्षरशः भुगा झालेला असतो. 

४. कडकचटपटीत संवाद : रीचरच्या हजरजबाबी स्वभावाला साजेसे चटपटीत संवाद किंवा वर्णनांमधून येणारी छोटी छोटी वाक्यं (Quotes) हा यातल्या प्रत्येक पुस्तकाचा अक्षरशः प्राण आहे.  "रीचर सेड नथिंग" हे तर त्यापैकी सर्वाधिक वापरलं गेलेलं आणि तरीही दरवेळी समोरच्याला तितक्याच प्रभावीपणे निरुत्तर करणारं वाक्य! अशा चुरचुरीत संवादांची ही काही निवडक उदाहरणं. यांसारखी अनेक मनोरंजक आणि चटपटीत वाक्यं ली चाईल्डच्या पुस्तकांमध्ये पानोपानी आढळतात.

 =============================================

यू नेव्हर हॅव अ‍ॅन अ‍ॅलाबाय व्हेन यू नीड वन. दॅट्स अ युनिव्हर्सल लॉ ऑफ नेचर.

----------------------------------------------------

"यू क्लिअर ऑन व्हॉट आय'ल डू टु यू इफ यू आर बुलशिटिंग मी?"

"आय कॅन गेस"

"ट्रिपल इट" रीचर सेड.

----------------------------------------------------

ही केम लिट्ल क्लोजर. हिज बडी केम वुईथ हिम. द स्मेल ग्रु स्ट्रॉन्गर.

आय (रीचर) सेड "यु गाईज नीड टु टेक अ बाथ. नॉट नेसेसरीली टुगेदर".

----------------------------------------------------

द वेट्रेस वॉज अ टिपिकल आयविटनेस. शी वॉज कंप्लिटली अनेबल टु डिस्क्राईब द वूमन हु हॅड बीन लूकिंग फॉर मी.

----------------------------------------------------

शी हॅड रिटन "यू आर लाईक न्यूयॉर्क सिटी. आय लव टु व्हिजिट बट आय कुड नेव्हर लिव देअर"

----------------------------------------------------

शी सेड "रीचरथ्री डेज इज नॉट पॉसिबल"

"लेट'स चॅलेन्ज दॅट अझम्प्शन. लेट'स मेक इट पॉसिबल." रीचर सेड.

=============================================

ली चाईल्डचं लेखन अभिजात असल्याचा किंवा त्याला फार साहित्यिक मूल्य असल्याचा 'आरोपखुद्द ली देखील मान्य करणार नाही. त्याचं लेखन हे सर्वसामान्य वाचकांना आपलंसं वाटणारंत्यांना आवडणारं खुसखुशीतमसालेदार आणि पूर्णतः कमर्शिअल स्वरूपाचं आहे. नव्वदच्या दशकातले अ‍ॅरनॉल्ड किंवा सिल्वेस्टर स्टॅलनचे हाणामारीचे आणि खलनायक व एकूणच शत्रुपक्षाचा एकहाती बिमोड करणारे 'माचोनायक असलेले चित्रपट ज्यांना आवडतात त्यांना रीचरच्या कादंबऱ्या प्रचंड आवडतील. त्याच्या कादंबऱ्यांची शीर्षकंही कादंबऱ्यांचा आशय पुरेशा स्पष्टपणे विशद करून सांगणारी असतात. उदाहरणार्थ किलिंग फ्लोअरडाय ट्रायिंगवर्थ डाईंग फॉरएको बर्निंगवन शॉटअ वॉन्टेड मॅनद हार्ड वेबॅड लक अँड ट्रबल (हे २०२० वर्षाचं चपखल वर्णन करणारं शीर्षक वाटू शकतं).

चित्रपट आणि साहित्यातले अन्य प्रयोग

ली चाईल्डच्या 'वन शॉटआणि 'नेव्हर गो बॅकया पुस्तकांवर आधारित अनुक्रमे 'जॅक रीचरआणि 'जॅक रीचर : नेव्हर गो बॅकअसे दोन चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. [दोन्ही चित्रपटांत ली ने पडद्यावर काही सेकंदांसाठी हजेरी (cameo) लावली आहे.] परंतु साडेसहा फुटी आणि सव्वाशे किलोच्या महाकाय रीचरला पडद्यावर टॉम क्रूझला साकारताना बघून रीचरच्या कट्टर चाहत्यांना सहनच झालं नाही. दोन्ही चित्रपट व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी झाले असले तरी चाहत्यांच्या निषेधाचा विचार करून ली ने यानंतर क्रूझच्या ऐवजी रीचरच्या शारीरिक वर्णनाला योग्य न्याय देऊ शकेल असा कलाकार घेण्याचं ठरवलं. त्यानुसार यंदाच्या वर्षी कोरोनाच्या चीनी विषाणूची अवकृपा झाली नसती तर आपल्याला 'किलिंग फ्लोअरया पहिल्या पुस्तकावर आधारित सिरीजचा पहिला सिझन बघायचा योग आला असता. सध्या त्यावर काम चालू असून प्राईमवर ती मालिका प्रदर्शित होणार आहे अशी बातमी आहे. पहिल्या सिझनच्या यशापयशावरून रीचरच्या अन्य पुस्तकांवरही पुढील सीझन्स येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पहिल्या सिझन मध्ये रीचरची भूमिका अ‍ॅलन रीचसन हा (टॉम क्रूझच्या) तुलनेने विशेष प्रसिद्ध नसलेला अभिनेता करणार आहे.

कॅरीन स्लॉटर या लेखिकेच्या कादंबऱ्यांमध्ये आढळणारा विल ट्रेंट हा नायक आणि ली चा रीचर या दोन नायकांना एकत्रितपणे सादर करून त्यावर 'क्लिनिंग द गोल्डनावाची एक कथाही यावर्षी प्रकाशित झाली. तर डायन कॅप्री या लेखिकेने तर एक अजूनच अभिनव प्रयोग केला. प्रत्येक पुस्तकाच्या शेवटी रीचर त्या त्या गावातून/शहरातून निघून जातो असं वर्णन येतं. आणि त्यानंतर पुढच्या पुस्तकात तो एखाद्या वेगळ्याच राज्यात आहे असं दाखवलं जातं. तर कॅप्रीने दोन पुस्तकांच्या मध्ये रीचर कुठे असेलकाय करत असेल या कल्पनेवर आधारित 'द हंट फॉर जॅक रीचरया नावाच्या सिरीजमध्ये तब्ब्ल चौदा पुस्तकं लिहिली. तर ज्यूड हार्डीन या लेखकाने तर शब्दशः एक पाऊल पुढे टाकून, ४० वर्षं पुढे भविष्यकाळात जाऊन रीचरचा क्लोन केलेला नायक रॉक वॉल्हमन साकारला आणि त्याच्यावर आधारित 'द रीचर एक्सपरिमेंट' नावाची ९ पुस्तकांची सिरीज लिहिली. जगभर रीचर किती लोकप्रिय आहे याची ही एक प्रकारची पावतीच आहे.

ली च्या अनेक कट्टर चाहत्यांनी त्याची सगळी (२५) पुस्तकं दोनदा-तीनदा-पाचदा वाचलेली आहेत. काहींनी एकदा प्रकाशनाच्या क्रमानुसार तर एकदा कालक्रमानुसार (chronologically) वाचलेली आहेत. द एनिमीद अफेअर आणि नाईट स्कुल ही तीन पुस्तकं रीचर लष्करात कार्यरत असतानाच्या घडामोडींवर आधारित आहेत. त्यामुळे अनेकांनी ती त्याच क्रमाने वाचली आहेत. काही चाहत्यांकडे जॅक रीचर मालिकेतलं प्रत्येक पुस्तक पेपरबॅक आणि हार्डकव्हर या दोन्ही स्वरूपात आहे. आता दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या द सेंटिनल या पंचविसाव्या पुस्तकाला चाहते कसा प्रतिसाद देतात हे पाहणं फार औत्सुक्याचं ठरेल आणि त्याला कारणही तसंच महत्वाचं आहे. साधारण विसाव्या पुस्तकानंतर ली च्या मनात लेखननिवृत्तीचे विचार घोळायला लागले आणि ते त्याने प्रकाशकांना बोलूनही दाखवले. परंतु एवढी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सोडून द्यायला प्रकाशक तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी ली ला अजून काही काळ लिहीत राहण्याची विनंती (जबरदस्ती!) केली. त्याप्रमाणे त्याने अजून चार पुस्तकं लिहिली देखील. परंतु पंचविसाव्या पुस्तकाच्या वेळी मात्र त्याने लेखणी खाली ठेवली. त्याने रीचरचा शेवट करायचं ठरवलं होतं. 'डाईंग अलोनअसं त्या पुस्तकाचं नावही त्याने ठरवलं होतं. परंतु प्रकाशक तयार झाले नाहीत. त्यांनी ली ची समजूत घालायचा प्रयत्न केला. अखेरीस सुवर्णमध्य म्हणून ली ने आपला रीचर हा नायक अन्य एखाद्या लेखकाला लिहायला द्यावा असं प्रकाशकांनी सांगितलं. परंतु अन्य कोणाला लिहायला दिल्यास रीचरच्या व्यक्तिमत्वाच्या मूळ गाभ्यालाच धक्का बसायच्या धोक्याने ली ने ते नाकारलं. अखेरीस व्यावसायिक लेखक असलेलाली पेक्षा पंधरा वर्षांनी धाकटा असलेला त्याचा भाऊ अँड्र्यू ग्रांट अर्थात अँड्र्यू चाईल्ड याच्याकडे रीचरच्या नवीन पुस्तकाची जबाबदारी सोपवण्यात आली आणि ली सहलेखक म्हणून काम बघेल असं ठरलं. ली ने निवृत्त व्हायचं ठरवल्यापासून अर्थात एकविसाव्या पुस्तकापासून पुढची चार पुस्तकं अँड्र्यूनेच लिहिली आहेत असंही म्हणतात. थोडक्यात 'द सेंटिनललोकांना आवडलं तर निदान पुढची दहा एक पुस्तकं तरी रीचरला मरण नाही.

एकाच कल्पनेवर आणि एकाच नायकाला केंद्रस्थानी ठेऊन सलग दोन दर्शकांहून अधिक काळ लिहीत राहणं (२५ कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा) हे फारच अवघड आव्हान आहे आणि ते ली चाईल्डने इतकी वर्षं लीलया पेललं आहे. इतकी वर्षं सतत लिहीत राहून जगभरातल्या वाचकांचं अनुभवविश्व समृद्ध करणाऱ्या ली चाईल्डचा आज सहासष्टावा तर जॅक रीचरचा साठावा वाढदिवस. दोघांनाही दीर्घायुष्य चिंतून आणि कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो.

Happy Birthday Lee Child!

Happy Birthday Jack Reacher!

#HappyBirthdayLeeChild

#HappyBirthdayJackReacher

#LeeChild

#JackReacher

Wednesday, June 17, 2020

'वाचतं' राहण्याविषयीचं पुस्तक : 'वाचत सुटलो त्याची गोष्ट'

'बुक्स ऑन बुक्स' अर्थात पुस्तकांबद्दलची पुस्तकं हा साहित्यक्षेत्रातला एक स्वतंत्र विभाग आहे. परदेशांमध्ये या विषयावर अनेक पुस्तकं असली तरी आपल्याकडे आणि विशेषतः मराठीत तर या विषयावरची फारच कमी पुस्तकं आहेत. डॉ अरुण टिकेकरांचं 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी', निखिलेश चित्रे यांचं 'आडवाटेची पुस्तकं', नितीन रिंढे यांचं 'लीळा पुस्तकांच्या', निरंजन घाटे यांचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' ही त्याची काही उदाहरणं. मी आत्तापर्यंत यातलं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. पुस्तकप्रेम कितीही असलं तरी पुस्तकं या विषयावर लिहिलेलं पुस्तक वाचण्यात मला फारसं स्वारस्य नव्हतं. पण ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी पहिल्यांदाच घडत असते त्याप्रमाणे मुहूर्त लागला आणि निरंजन घाटे यांचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे पुस्तक हाती (किंडली) आलं. आणि मी ही अक्षरशः हे पुस्तक वाचतच सुटलो आणि जेमतेम दोन-तीन दिवसांत संपवूनही टाकलं.

निरंजन घाटे लिखित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट : एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर' हे त्या पुस्तकाचं पूर्ण नाव.

 

हे पुस्तक सुरुवातीला येणाऱ्या लेखकाच्या मनोगतापासूनच आपल्या मनाची पकड घ्यायला सुरुवात करतं. मनोगत इतकं सुंदर आहे की खरं तर ते पूर्ण मनोगत इथे देण्याचा मोह होतोय. पण तो टाळून फक्त दोन महत्वाचे परिच्छेद इथे नमूद करतो.

 

१.

वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणं आहे असं मला वाटतं. वाचनातून आपल्या जग कळतं. जगाचा इतिहास-भूगोल कळतोसंस्कृती कळते. जगाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. जग आपल्यापरीने घडवणारी माणसं कळतात. त्यातले वाद-प्रतिवाद कळतात. जग नावाच्या गोष्टीचा वेगळाच आवाका येतो. माझा अभ्यासविषय नसलेल्या एखाद्या भलत्याच क्षेत्रातल्या खाचाखोचा मला माहिती असतातहे पाहिलं की अनेकदा त्या विषयातले तज्ज्ञही चाट पडतात. ही आत्मप्रौढी नव्हेतर केवळ वाचनामुळे आयुष्यात आनंद कसा अनुभवता येतोहे मला सांगायचंय. वाचनाचा हा माझा प्रवास आणि त्यातून हाती लागलेला खजिना वाचकांसमोर मांडला तर त्यांनाही हा आनंद घेता येईलया विचाराने मी हे पुस्तक लिहायला घेतलं.

दुसरं असंकी माझे स्नेही मला नेहमी विचारतात, “तू एवढं केव्हा आणि कसं वाचतोस?” जुजबी ओळख असलेल्यांना माझ्या घरात एवढी पुस्तकं कशी याचं आश्‍चर्य वाटतं. या प्रश्‍नावर मी खास असं स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. पण दिवसभरात काही वाचलं नाही तर मला अस्वस्थ व्हायला होतंम्हणून मी वाचतो. अगदी आजारपणाने अंथरुण धरलेलं असलं तरी पडल्या पडल्या काही तरी वाचल्याखेरीज मला बरं वाटत नाही. बर्‍याचदा मला असंही विचारलं जातंकी तुम्हाला एवढं सगळं वाचायला वेळ कसा मिळतोत्यावर माझं उत्तर असतंदारूड्याला जसा दारू प्यायला वेळ मिळतो तसा मला वाचायला वेळ मिळतो. हे ऐकून समोरच्या व्यक्तीला मी त्याची चेष्टा करतोय असं वाटतंपण ते खरं आहे.

-निरंजन घाटे

(वाचत सुटलो त्याची गोष्ट)


२. 

लिहावं कसंवाचावं कसं आणि जे वाचलं त्याबद्दलचं मतप्रदर्शन करण्यापूर्वी काय करावं याबद्दलही रामदास जे मार्गदर्शन करतात ते मला महत्त्वाचं वाटत आलं आहे.

ते म्हणतात,

 

पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण।

तो दुरात्मा दुराभिमान। मत्सरें करी॥

 अखंड एकांत सेवावा। ग्रंथ मात्र धांडोळावा।

प्रचित येईल तो घ्यावा। अर्थ मनी॥

 बहुत करावें पाठांतर। कंठी धरावें ग्रंथांतर।

भगवत्कथा निरंतर। करीत जावी॥

 जाणत्यापासी लेहो सिकावें। जाणत्यापासी वाचो सिकावें। जाणत्यापासी पुसावें। सर्व कांही॥

 अक्षरें गाळून वाची। कां ते घाली पदरीची।

निघा न करी पुस्तकाची । तो एक मूर्ख॥

 लिहावें शुद्ध वाचावें। जाणावें तदनंतरे।

जाणता कळता बिंबे। बिंबतर स्फूर्ती होतसे॥

 

-निरंजन घाटे

(वाचत सुटलो त्याची गोष्ट)


दारू/दारुडा यांच्या उदाहरणाने एक परिच्छेद संपतो ना संपतो तोच पुढच्या परिच्छेदात लेखक थेट समर्थ रामदासांच्या ओव्यांचा दृष्टांत देतात हे वाचून आपल्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटून जातं आणि हे असं रसाळ मनोगत वाचून आपल्याला सुरुवातीलाच पुस्तक आवडायला लागलेलं असतंच पण त्यानंतर तर लेखकाचं वाचन, पुस्तकप्रेम इत्यादींबद्दलचे एकापेक्षा एक प्रसंग वाचून त्यांच्या वाचनप्रेमाबद्दलचा आदर वाढतच जातो.

या सुमारे ३६० पानी पुस्तकात जवळपास प्रत्येक पानावर किमान २-३ पुस्तकांचा उल्लेख आहे. त्याव्यतिरिक्त असंख्य नियतकालिकं, मासिकं, वर्तमानपत्रं, पाक्षिकं इत्यादींचे उल्लेख आहेत ते वेगळेच. त्यामुळे हे पुस्तक वाचत असताना आपल्याला प्रामुख्याने एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे "एखादा माणूस एवढं वाचू शकतो? शक्य आहे?".  परंतु हा प्रश्न वाचकांना पडणार हे जाणून असल्यागत आणि आधी आलेल्या याच धर्तीवरच्या अनेक अनुभवांवरून लेखक आपल्या या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीलाच देऊन टाकतात. आणि ते म्हणजे वाचनाचा वेग. ते पुस्तकं अत्यंत वेगाने वाचू शकतात. ते त्यांनाच कसं काय जमतं?,  इतरांना जमेल का? या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत. पण ते अफाट वेगाने वाचतात हे मात्र नक्की. आणि याच वाचन वेगाच्या संदर्भात त्यांनी एक छान अनुभव सांगितला आहे. 

एकदा लेखक आपल्या धनंजय डोळे नावाच्या मित्राकडे अभ्यासासाठी गेला असताना त्याला मित्राच्या घरी अर्ल स्टॅन्ली गार्डनर नावाच्या लेखकाचं एक पुस्तक दिसलं. लेखक ते पुस्तक वाचण्यात अगदी गुंतून गेला. धनंजयचा मोठा भाऊ बाबा एक-दोन वेळा खोलीत डोकावून गेला पण लेखकाचं तिकडे लक्षही नव्हतं. ते पुस्तक आवडल्याचं कळल्यावर बाबाने भिंतीतल्या एका कपाटातली रांगेने मांडलेली अर्ल स्टॅन्ली गार्डनरची पुस्तकं दाखवली आणि एकेक करून वाचायला न्यायला सांगितलं. परीक्षा संपल्यावर लेखक रोज एक पुस्तक वाचून संपवू लागला. बाबाला जेव्हा कळलं, की हा मुलगा रोज एक पुस्तक घेऊन जातो आणि दुपारपर्यंत वाचून संपवतो, तेव्हा तो आश्चर्यचकितच झाला. त्याचा विश्वास बसेना. नुकत्याच वाचून संपवलेल्या एका पुस्तकावरून त्याने लेखकाची परीक्षा घेतली बाबाने घेतलेल्या त्या तोंडी परीक्षेत लेखक समाधानकारकरीत्या उत्तीर्ण झाला आणि त्या दिवसापासून त्याला एका दिवशी एका ऐवजी दोन पुस्तकं मिळू लागली. दरम्यान लेखकाने एकदा ए. ए. फेअर नावाच्या एका लेखकाचं पुस्तक वाचलं. तेव्हा त्याला त्या शैलीतलं लिखाण कुठे तरी वाचलंय असं सारखं वाटत होतं. पुढे ए. ए. फेअरच्या एका नव्या पुस्तकावर अर्ल स्टॅन्ली गार्डनर रायटिंग अ‍ॅज ए. ए. फेअरअसं छापलेलं वाचलं तेव्हा उलगडा झाला. अर्ल स्टॅन्ली गार्डनर हाच ए. ए. फेअर या नावानेही लिहीत असे. 

आपण आत्मचरित्र लिहायचं नाही हे लेखकाने आधीच ठरवलं होतं. पण मग आत्मचरित्र नाही तर निदान त्यांची वाचनाची आवड, प्रवास या विषयावर तरी त्यांनी लिहायला हवं असं त्यांच्या मित्रमंडळींचं मत पडलं आणि ते त्यांना पटलंही. आणि त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला.

त्यामुळे वाचनयात्रेची सुरुवातया पहिल्याच प्रकरणात अधूनमधून लेखकाच्या आयुष्यातले व्यक्तिगत प्रसंग, वैयक्तिक अनुभव इत्यादींचा वेळोवेळी उल्लेख होताना दिसतो. तसंच गूढ किंवा रहस्यकथांच्या आवडीबद्दल लिहिताना आपल्या वडिलांच्या राजकीय कारणावरून झालेल्या हत्येबद्दल लेखक उल्लेख करतो. त्यांच्या खुन्याचा शोध कधीच लागला नाही त्यामुळे हे कोणी केलं असेल, का केलं असेल? अशा प्रकारच्या प्रश्नांमधून कदाचित आपण गूढकथाप्रकाराकडे आकर्षित झालो असू असं निरीक्षण नोंदवून ठेवतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या प्रचंड वेडाबद्दल बरेच उल्लेख आहेत. सैन्यात जाण्याची खूप इच्छा असूनही रंगांधळेपणामुळे नाकारल्या गेलेल्या प्रवेशाबद्दल छोटीशी खंतही मांडलेली आहे.

अनेक वर्तमानपत्रंनियतकालिकं, मासिकं इत्यादींच नियमित वाचन, किताबमिनार वाचनालयामुळे जोपासता आलेली वाचनाची आवड तसेच अशा ठक्कर, जैन, बाबू, पोपट अशा अनेक पुस्तकविक्रेत्यांबद्दलच्या हृद्य आठवणींचे उल्लेख येतात. आईने वाचनासाठी प्रोत्साहन दिलं आणि मामाने वाचनासाठी विविध पुस्तकं उपलब्ध करून दिली याचे कृतज्ञतापूर्वक केलेले उल्लेखही येतात कारण त्यांच्यामुळेच लेखकाचं सुरुवातीच्या काळातलं वाचनप्रेम जोपासलं गेलं.

ओढ रहस्यकथांची आणि साहसकथांची मोहिनी या प्रकरणांमध्ये अनुक्रमे दिवाकर नेमाडे, नारायण धारप आणि  बाबुराव अर्नाळकर यांचे आदरपूर्वक उल्लेख येतात. नेमाडे आणि धारप यांच्याशी लेखकाचे असलेले लेखक-वाचक संबंध कालांतराने गळून जाऊन त्यांच्यात मित्रत्वाचं नातं कसं प्रस्थापित झालं याबद्दलही तपशीलवार माहिती मिळते. दरम्यान एका प्रकरणात डॉ गोखले, गोविंदराव तळवलकर, कोठावळे अशा अनेक संपादकांविषयीच्या काही भलेबुरे उल्लेखही आढळतात.

टॅबूविषयातला खजिना या एका आगळ्यावेगळ्या प्रकरणात लेखक 'सेक्स' या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या विषयांवर वाचलेल्या अनेक पुस्तकांचे उल्लेख करतात.

शृंगार या विषयावरील पुस्तकांसंबंधी लिहिताना लेखक "खरं तर शृंगारिक काव्य मानवजातीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे" असं म्हणून पुढे प्राचीन साहित्यामधील तत्सम उल्लेख/वर्णनं यांच्याविषयी भाष्य करतात. वेद किंवा एकूणच प्राचीन साहित्यात आढळणारे लैंगिक, कामुक उल्लेख याविषयी लिहिताना लेखक आपल्याला आजच्या काळात अविश्वसनीय वाटतील किंवा पटायला/पचायला कठीण जातील अनेक उदाहरणं देतात. त्यात अथर्ववेद, ऋग्वेदातील यम-यमीचा संवाद, रामायण-महाभारतातली शृंगाराची उदाहरणं, जयदेवाच्या गीतगोविंदामधील कृष्ण आणि गोपींचे प्रसंग, रघुवंश, कामसूत्र, अनंगरंग रतिशास्त्र आणि कोकशास्त्र इत्यादींचा समावेश आहे. तसेच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं भारतीय विवाहसंस्थेचा इतिहासहेही पुस्तक आवर्जून वाचण्याचा आग्रह लेखक करतात.

जाता जाता लेखक आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या मंत्रशास्त्रया पुस्तकाच्या ज्योतिषाचार्य, मंत्रशास्त्रज्ञ डॉ. र. शं. केळकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाविषयी माहिती देतात. हे पुस्तक प्रत्यक्षात सौंदर्यलहरीया ग्रंथाचं मंत्रशास्त्रीय विश्लेषण आहे. यातली त्रिपुरसुंदरी ललितादेवीची वर्णनं अत्यंत कामुक आहेत आणि संपूर्ण स्तोत्र म्हणजे या देवीच्या एकेका अवयवाचं वर्णन आहे.

या सर्व वाचनाचा लेखकाला आपली सेक्सायन’, ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षणआणि तीची कहाणीही त्याच विषयावरची पुस्तकं लिहिताना खूपच उपयोग झाला.

साहित्यातला हसरा अध्यायया प्रकरणात पुलं आवडते लेखक असल्याचा उल्लेख वाचून आपल्याला मनोमन आनंद होतो. पुढे वि आ बुवांनी लिहिलेल्या एक एक चमचाया भन्नाट कादंबरीविषयी लेखक सांगतात. त्या कादंबरीत त्या काळात लोकप्रिय असलेल्या साने गुरुजी, गो. नी. दांडेकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर अशा दहा-बारा लेखकांच्या लेखनशैलीत एक एक प्रकरण लिहलेलं आहे. हे असं एकदम वेगळ्या प्रकारच्या लेखनाचा उद्योग अन्य कोणी, अगदी इंग्रजी वाङ्मयातही कोणी, केल्याचं आढळत नाही. दरम्यान वि आ बुवांची एक बोचरी आठवणही लेखक सांगतात. आयुष्यभर उदंड लेखन करणाऱ्या बुवांना कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात 'महाराष्ट्र साहित्य परिषद जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्याबद्दल लेखकाशी बोलताना बुवा म्हणाले की मी आयुष्यभर विनोदी लेखन केलं, २०० च्या वर पुस्तकं लिहिली. परंतु आजतागायत मला कुठलाही पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळे शेवटी का होईन मिळालेल्या या पुरस्काराचं महत्व माझ्यासाठी मोठं आहे. कायम विनोदी पुस्तकं लिहिल्याने दुर्लक्षित राहिल्याबद्दलची खंत व्यक्त करतानाही त्यात कुठे कटुता नसते की तक्रार नसते. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं.  दरम्यान एका ठिकाणी लेखकही आपल्या मनीची दुखरी नस उलगडून दाखवतात. विविध प्रकारचं लेखन      करूनही साहित्यिक म्हणून मान्यता न मिळता 'विज्ञानकथालेखक' अशी मर्यादित ओळखच मिळाल्याबद्दलची खंत व्यक्त करतात.

विनोदी साहित्यावर पुढे लिहिताना संस्कृत साहित्यातले विनोद, त्यातले विदूषकाचे संवाद इत्यादींची उदाहरणं देऊन लेखक संस्कृत साहित्यामध्ये असलेल्या विनोदाचं महत्व विशद करतात. मराठीत विनोदाची मीमांसा करणाऱ्या गंभीर पुस्तकांबद्दल लिहिताना न चिं केळकरांचं 'हास्यविनोद मीमांसा’, आचार्य अत्र्यांचं विनोदगाथा’, चिं. वि. जोशी यांच्या हास्यचिंतामणीची ४२ पानी प्रस्तावना, डॉ. अ. वा. वर्टी यांचं विनोद- एक आख्यानया अभ्यासपूर्ण पुस्तकांची माहिती मिळते. 

नंतरच्या प्रकरणांमध्ये वूडहाऊस, मार्क ट्वेन, मेरी शेली,जोनाथन स्विफ्ट, आर्थर क्लार्क, आयझॅक असिमोव यांसारख्या अनेक पाश्चात्य लेखक व त्यांच्या पुस्तकांबद्दलचे अनेक अनुभव मुक्तहस्ताने मांडलेले आढळतात. शंभराहून अधिक पुस्तकं लिहिणारा आयझॅक असिमोव हा रशियन-अमेरिकन विज्ञानकथालेखक हा लेखक निरंजन घाटे यांचा अत्यंत आवडता लेखक. त्याच्या विज्ञानकथा, त्याला प्रत्यक्ष आलेले अनुभव, त्यावर त्याने रचलेल्या थोड्या विनोदी ढंगाच्या कथा, प्रत्येक व्यक्तीच्या अंगी वाह्यातपणाचा थोडा तरी अंश असतोच यावर ठाम विश्वास असणाऱ्या असिमोवचे त्याच्या स्वतःच्या वाह्यातपणाचे काही किस्से अशी त्याच्याविषयीच्या आठणींची रेलचेल आहे.

आत्मचरित्रपर एका प्रकरणात व्हिन्सेंट व्हॅन गॉगचं चरित्र लस्ट फॉर लाइफवाचल्यानंतर पुढे एकदा रद्दीत सापडलेल्या हॉलंड न्यूजनावाच्या नियतकालिकात त्याच नियतकालिकाचा संपादक आणि खुद्द व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांच्या असणाऱ्या साम्याविषयी आणि त्यातून जन्माला आलेल्या कुतुहलापायी त्याने व्हिन्सेंट व्हॅन गॉगशी असलेलं नातं शोधून काढण्याच्या प्रवासाची सत्यकथा वाचताना तर छाती दडपूनच जाते.

त्यानंतरचं प्रकरण म्हणजे एकदम वेगळंच, विलक्षण, अगदी एकमेवाद्वितीय असं आणि पुस्तकातलं माझं सर्वात आवडतं प्रकरण आहे आणि ते म्हणजे काही झंगड पुस्तकं. यात आपल्याला जगभरातल्या एकापेक्षा एक वेगवेगळ्या, प्रसंगी अशक्य वाटणाऱ्या ध्येयाने पछाडून गेलेल्या आणि ध्येयपूर्तीसाठी लोकोत्तर कामगिऱ्या करणाऱ्या लोकांच्या पुस्तकांची सखोल माहिती मिळते. त्यात युआन त्सांगने भारतात येण्यासाठी वापरलेल्या सिल्क रूटचा वापर करत त्याच मार्गाने चीन ते भारत प्रवास करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या मिशी शरण नावाच्या भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित प्रवासी लेखिकेच्याचेजींग द मॉंक'ज शॅडोनावाच्या पुस्तकाची माहिती मिळते.

अ‍ॅन मुस्टो नावाच्या ब्रिटिश शिक्षिका आणि सायकलीस्टने हनुमंताच्या द्रोणागिरी पर्वत उचलण्याच्या कथेविषयी ऐकलं आणि त्याने तो प्रवास कसा केला असेल, कुठल्या मार्गाने केला असेल या विचाराने ती इतकी झपाटून गेली की मारुतीच्या श्रीलंका ते द्रोणागिरी या मार्गावर तिने सायकलप्रवास करायचं ठरवलं आणि अथक वाचन, अभ्यास, परिश्रम घेत तिने तो प्रवास करूनही दाखवला. त्या संपूर्ण प्रवासाचं वर्णन म्हणजे तिचं 'टू व्हील्स इन डस्ट  : फ्रॉम काठमांडू टू कॅण्डी' हे पुस्तक. 

भारतातल्या मौसमी पावसाच्या प्रेमात पडलेला आणि त्यासाठी पावसाचा केरळपासून ते थेट आसामपर्यंत पाठलाग करणारा ब्रिटिश अवलिया अलेक्झांडर फ्रेटर, नेपोलियन बोनापार्टच्या अखेरच्या दिवसांबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला ठेवण्यात आलेल्या बेटावर ठाण मांडणारी ज्युलिया ब्लॅकबर्न असेही अजून काही अवलिये त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमांतून आपल्याला भेटतात.           

या झंगड पुस्तकांमध्ये अजून एका चमत्कारिक पुस्तकाचा उल्लेख येतो. १९७५ साली प्रकाशित झालेल्या द फर्स्ट टाइमनावाच्या त्या पुस्तकात त्यात २८ गाजलेल्या अमेरिकी व्यक्तींच्या अर्थात सेलिब्रिटींच्या पहिल्या लैंगिक अनुभवांचं वर्णन आहे. १९७३ मध्ये कार्ल फ्लेमिंग आणि अ‍ॅन टेलर-फ्लेमिंग यांनी अमेरिकेतील तत्कालीन १०० सुप्रसिद्ध व्यक्तींना यासंबंधीच्या मुलाखतीविषयी विचारणा केली होती आणि त्यातल्या फक्त २८ जणांचा त्याला होकार आला. त्यातलं जळजळीत वास्तव म्हणजे त्यातल्या काही स्त्रियांवर त्यांच्या जवळच्याच प्रौढ व्यक्तींनी बलात्कार केला होता, तर काही पुरुषांना त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रियांनी आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. या असल्या काही विषयाला वाहिलेलं पुस्तक असेल याची आपण स्वनातही कल्पना केलेली नसते आणि त्यामुळे लेखकाने या प्रकरणाला दिलेल्या 'झंगड पुस्तकं' या नावाची यथार्थता जाणवते.

 वर म्हंटल्याप्रमाणे या ३६० पानी पुस्तकांत पानोपानी पसरलेल्या आणि आपल्याशी गळाभेट घेणाऱ्या शेकडो पुस्तकांची यादी बघून मी थक्क तर झालोच पण त्याचबरोबर इतकी पुस्तकं वाचायला आपल्याला किती जन्म घ्यावे लागले असते असा विचारही मनात चमकून गेला. आणि त्याक्षणीच 'बुक्स ऑन बुक्स' या प्रकारातली पुस्तकं वाचण्याचा माझा कंटाळा तर दूर पळून गेलाच पण तो निर्णय किती चुकीचा आणि अज्ञानमूलक होता हेही लक्षात आलं. त्यामुळे जर एकाच पुस्तकात अनेक विषयांवरची विविध पुस्तकं समजावून घेण्याची आणि त्याचबरोबर त्या पुस्तकांबद्दलचं विश्लेषणही वाचण्याची संधी मिळत असेल तर कुठल्याही पुस्तकप्रेमी व्यक्तीने "देता किती देशील दो करांनी" म्हणत अशा पुस्तकांचं स्वागतच करायला हवं !

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...