१. माझा एक मित्र आहे. चहाबाजांना जसा दुपारी २ ला चहा लागतो तसं त्याला दुपारी चारला पेप्सी लागायचं. पेप्सी लागायचं म्हणजे पेप्सी'च' लागायचं. कोक, लिम्का, थम्सप वगैरे काही चालायचं नाही
२. माझी आजी आयुष्यभर ब्रुक बॉंडचा रेड लेबलचा चहा प्यायली. रेड लेबल सोडून इतर कुठलाही चहा तिला चालायचा नाही. म्हणजे रेड लेबल पेक्षा चांगला, महाग, भारी, इम्पोर्टेड वगैरे वगैरे काय पण असुदे.. सगळ्यांची विकेट उडायची. आणि घरात आम्ही पडलो सगळे कॉफी वाले. त्यामुळे 'तुम्हाला ते कळणार नाही' हे तिचं म्हणणंही ऐकून घ्यावं लागायचं.
३. आमच्याकडे पूर्वी वर्षानुवर्षं घरात कोलगेटची पेस्टच यायची. इतकी की थोडा मोठा होईपर्यंत मला कोलगेट सोडून इतर कोणीही टूथपेस्ट बनवत नाही असंच वाटायचं. किंवा पेस्ट आणि कोलगेट हे समानार्थी शब्द वाटायचे. म्हणजे आपण कॅनन ची झेरोक्स किंवा नेस्लेची कॅडबरी म्हणतो ना अगदी तसंच.
सुदैवाने मला कुठल्याच बाबतीत अशा कुठल्याच ब्रांडची सवय नव्हती. आवडती पेस्ट व्हिको होती पण तीच पाहिजे असं नाही. कुठलीही चालायची. आवडती नेसकॅफे पण चालायची कुठलीही. आता यापुढे मी फक्त आवडता ब्रांड सांगतो 'चालायचा/ची/चे' कुठला/ली/ले ही हे अध्याहृत आहे किंवा तुम्ही तुमच्या सोयीसाठी ते पुढे लावून घ्या दर वेळी.
आवडता शाम्पू गार्नियर फ्रुक्टीस पण ...
आवडता परफ्युम चंदनाचा कुठलाही पण..
आवडतं शेव्हिंग क्रीम जिलेट पण ...
आवडते क्लोदिंग ब्रांडस अॅरो, लुई फिलीप वगैरे पण..
असो.. सदरचा मुद्दा पटवायला इतके मुद्दे पुरे. उगाच लांबण नको (थोडक्यात 'वादि' ला किंवा उगाचंच सहज म्हणून मला गिफ्ट देताना निर्णय घेणं तरी सोप्पं जाईल. ;) )
पण पण पण... (हा पण का आहे ते लवकरच कळेल.) .... कट्टा, नाका, अड्डा, चावडी या सगळ्या प्रकारांना सोशल नेटवर्किंगचं गोंडस लेबल लावून ओर्कुटने (निदान भारतात तरी) २००४ च्या आसपास प्रवेश केला. पडीक नेटकर या नात्याने आम्ही तेथे तातडीने रुजू झालो. सुरुवातीला काही महिने ऑर्कुट ऑर्कुट खेळून झाल्यावर काही दिवसांनी कंटाळा आल्याने तिथला वावर कमी झाला. कम्युनिटीज ढिगाने जॉईन केलेल्या असल्या तरी मी कधीच कुठल्याच कम्युनिटी पेजच्या डिस्कशनपेज/फोरम वर तासन् तास गप्पा मारत बसलोय, स्क्रॅपास्क्रॅपी करत राहिलोय असं कधीच झालं नाही. नंतर एक दिवस कळलं की आपल्याकडे जसं ऑर्कूट वापरतात तसं अमेरिकेत फेसबुक वापरतात आणि ते ऑर्कुटपेक्षा जाम भारी आहे. लगेच पडत्या फळाची आज्ञा झेलून आम्ही आमचा जामानिमा फेसबुकवर हलवला. पण ते खरोखरच ऑर्कुट पेक्षा जाम भारी आहे पक्षि हेवी आहे, त्यात चिकार गुंतागुंत आहे, बराच गोंधळ आहे, अजिबात लाईटवेट नाही हेही लक्षात आलं. त्यामुळे तिथूनही बाहेर पडणं झालं. बाहेर पडलो म्हणजे लॉगिन करणं बंद झालं. अकाऊंट मात्र सगळी आहेतच. कधीच कुठलंच डिलीट केलेलं नाही. लोकं कम्युनिटी जॉईन करण्याची आमंत्रणं, काही 'शेतकी' खेळ खेळण्याची आमंत्रणं पाठवत राहिली. पण त्याला 'बाणेदारपणे' [;)]
नकार देत राहिलो. त्यानंतर (माझ्या आयुष्यात) आलेल्या मायस्पेस, हायफाय, बेबो, वेन अशा अनेक 'मी टू' (me too) सायटींवर जाऊन अकाऊंट ओपनिंगचं पुण्यकृत्य एक कर्तव्य म्हणून पार पाडलं पण रमलो कधीच नाही. दरम्यान एक-दोन मराठी संकेतस्थळांवरही हजेरी लावून झाली. पण तिथेही पुन्हा एक खातं अडवण्याइतकाच माझा रोल होता. अॅक्टीविटी शून्यच... तोवर आलं ट्वीटर.. लोकलज्जेस्तव तिकडचीही एक जागा अडवून बसलो. चिवचिवाट मात्र फारच्या फार कमी केला.
पण पण पण (वरचं पण वरतीच संपलं.. हे नवं आहे.) ..... पण पण पण (हे आत्ताचंच आहे) यावर्षीच्या फेब्रुवारीच्याच्या दरम्यान अचानक काहीतरी उलथापालथ झाली. गुगलने ढोलताशे घेऊन म्हणा, जबरदस्तीने म्हणा बझची गाय दावणीला बांधली. आणि तीही अशी घट्ट आणि शिताफीने की विचारता सोय नाही. म्हणजे एका सकाळी "तुम्हाला बझमध्ये सहभागी व्हायचं आहे का?" असं आवताण घेऊनच हजर. 'फुकट ते पौष्टिक' या लाडक्या नियमाला अनुसरून बझ म्हणजे नक्की काय हे ओ की ठो माहित नसताना सरळ 'यस्स' वर टिचकी मारून मोकळा झालो. पण गुगलबाबा इतरांसारखे कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांना अशा अकाऊंट अडवून बसणार्या लोकांचा (स्वतःविषयी लिहिताना 'शुंभांचा' लिहिणं हा शुंभपणा आहे म्हणून...) चांगलाच (म्हणजे वाईटच) अनुभव असणार. त्यामुळे त्यांनी शिताफीने तुमच्या अॅड्रेस बुकमध्ये असलेल्या लोकांना तुमच्या तुम्हाला आणि तुम्हाला त्यांच्या पाठलागावर लावलं. दुसरं म्हणजे तुम्ही चुकून माकून कुठल्या बझवर काही खरडलंत की रडकं, दंगेखोर, चुकार पोर बाहेर मस्ती करून लगेच आपल्या घरी पळून येऊन लपून बसावं त्याप्रमाणे ती खरड तुमच्या मेलबॉक्सात येऊन विराजमान व्हायला लागली. न वाचलेल्या मेल प्रमाणे न वाचलेल्या बझांची संख्याही ठळकपणे वाचण्याची (वाचायला लावण्याची, डोळ्यात भरण्याची काहीही म्हणा) सोय गुगलस्वामीमहाराजांनी करून ठेवली. थोडक्यात बझचा हा आंतरजालीय आयुष्यातला चंचूप्रवेश फारच हॅपनिंग ठरला. उठसुठ बझबझायला लागलो. जोक दिसला, कर बझ, एखादी महत्वाची बातमी दिसली, कर बझ. दरम्यान
मब्लॉवि वर माझ्या ब्लॉगच्या अपडेट्स दिसणं बंद झालं होतं त्यामुळे तेव्हापासून नवीन पोस्टीही बझ करायला लागलो. दरम्यान
देवकाकांचा "सुप्रभात मंडळी, या गप्पा मारायला" वाला आवताणाचा बझ एक दिवस कुठून कसा नजरेस पडला आणि त्यावर "सुप्रभात" असं एक उत्तर टाकून/टंकून मीही बझकट्ट्यात/मठात सामील झालो.
ब्लॉग लिहायला लागल्यापासून झालेला एक जबरदस्त फायदा म्हणजे अनेक नवीन, समविचारी, ग्रेट, भटक्या, खादाड, हृदयस्पर्शी, विनोदी, बिनधास्त लिहिणार्या अनेक लोकांशी खूप चांगली मैत्री झाली. कधीच कोणालाही भेटलेलो नसलो तरी अनेकांशी फोनवर बोलणी झाली, चॅट/स्काईपवर गप्पा झाल्या, भरपूर मेलामेली झाली. काही महिन्यांपूर्वी झालेली ओळख कैक जन्मांची असल्यासारखी वाटायला लागली. (हे वाक्य या पोस्टच्या आणि एकूणच या ब्लॉगच्या मूडशी विसंगत वाटणारं असलं तरी चालवून घ्या कारण ते खरं आहे.).. त्यावर कडी केली ती या बझने. पूर्वी फक्त एकमेकांच्या पोस्ट्सवर कमेंट टाकणारे आम्ही सगळेजण चॅट/मेल वगैरे वन-टू-वन संवादाच्या पलीकडे जाऊन बझवर जमून सामुहिक चॅटिंग करायला लागलो. खेचाखेची, विनोद, गप्पा, फोटो, गाणी या सगळ्याला नुसता ऊत आला. व्हर्च्युअल कट्ट्याचं व्हर्च्युअल रूप गळून पडलं. एकमेकांशी गळाभेटी घेत किंवा हाय-फाय करत भेटल्यासारख्या गप्पा रंगू लागल्या. थोडक्यात ब्लॉग, मेल, चॅटवर घडू शकलं नाही ते एक मोठं काम बझने केलं. लोकांमधलं अंतर अजून कमी केलं. सगळ्यांशी समोरासमोर बसून गप्पा मारण्याचं सुख मिळालं. हा या बझचा एक जब्ब्ब्ब्ब्ब्ब्बबरदस्त फायदा !!!
पण पण पण (हा आता तिसरा पण हे सुवाओअ ... तरीही).. इथेच कुठेतरी घोडं पेंड खायला लागलं. नाय नाय म्हणजे गप्पा वाढल्या, नाती वृद्धिंगत झालली वगैरेला पेंड खाणं कोण म्हणेल (इथेही वरचा शुंभवाला नियम लागू शकतो. असो.) पण या गप्पा वाढत चालल्या. रोज सकाळी उठल्यावर काल रात्रभर म्हंजी भारतातल्या दिवसभर काय काय गप्पा झाल्या त्या वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होईनाशी झाली. ५०० खरडींनंतर बझ पडत असल्याने रोज एक बझ पाडल्याशिवाय चैन पडेनासं झालं. (मी करोडो रुपयांच्या पैजेवर सांगू शकतो की बझमधला हा किडा (बग बग) आपल्या मराठी ब्लॉगर्सच्या गँगला सोडून कोणाला माहितही नसेल). जाम धमाल यायची. खूप खूप म्हणजे अतिखूप गप्पा व्हायच्या. सगळे विषय चर्चिले जायचे, नवीन बातम्या, ब्लॉग्स, रक्तदानासारखे सामाजिक, सणासुदीचे सांस्कृतिक, भटकंती/ट्रेक, फोटो सगळ्यांवर गप्पा व्हायच्या. पण पण (आधीच्यातलाच हा उप-पण म्हणा हवं तर) या गप्पाटप्पा, खेचाखेची, टगेगिरी, धुमाकूळ या सगळ्यात खूप वेळ जातोय असं लक्षात आलं. फार उशिराने का होईना पण आलं खरं. आणि तेही बायकामुलं.... हा शब्द फक्त वर्णनात्मक सौंदर्यासाठी योजिला आहे हे सुवाओअ... जाउद्या कसं.... रिफ्रेजच करतो. आणि तेही बायको-मुलगा, वाचन, ब्लॉग्स, लिखाण, प्रतिक्रिया, पेपरवाचन, फोन अरे हो आणि हापिसातलं काम [घाईघाईत हा मुद्दा विसरणारच होतो ;) ] हे सगळं सांभाळून !!! नाय बा. आपल्या क्षमतेच्या (आपली ती क्षमता दुसर्याची ती लायकी) पलीकडलं होतं हे. बझबझाट कमी करावा हे कळत होतं पण वळत नव्हतं.
गणपतीच्या आधीच्या आठवड्यात दिवसा वाढलेल्या ऑफिसच्या कामामुळे आणि रात्री मखराच्या तयारीमुळे नेटवर आणि त्यामुळे अर्थातच बझवर येणं खूप कमी झालं. तेव्हा तर रोज बझवर काय होत असेल, काय गप्पा होत असतील, त्या आपल्याला कधी वाचायला मिळतील असं वाटत होतं आठवडाभर. दॅट्स इट. तेव्हाच कळलं की हे अति होतंय आता. हाताबाहेर जायला लागलंय. 'मी कधीही कुठल्याही ब्रांडच्या आहारी गेलो नाही' हा मानाने मिरवायचा मुद्दा मला उपडा पाडून माझ्या छाताडावर उभा राहून तांडवनृत्य करतोय असं दिसायला लागलं (चला सुरुवातीच्या अर्थहीन पाल्हाळाची लिंक लागली तर !!).. अर्थात बझ वाईट असं म्हणायचं नाहीये मला पण अतिबझची सवय वाईट.. किंवा जाउदे ते ही नको. हा प्रकार मला झेपण्याच्या पलिकडचा होता असं म्हणू हवं तर. जे काय म्हणायचं ते म्हणू पण थोडक्यात या सर्वव्यापी बझच्या आहारी जाणं कमी करायला लागणार होतं. म्हणून मग प्रयोग म्हणून गणपतीनंतरचा एक आठवडा बझ करणं कमी केलं. त्यानंतर काही दिवस बझवर प्रतिक्रिया देणं, गप्पा मारणं कमी केलं, हळूहळू लाईक करणंही कमी केलं. एकदोघांशी चॅट करताना बझबंदीचा हा निर्णय त्यांच्या कानावर घातला. एकजण गंमतीने म्हणाला की "अरे, ऑफिसचं काम थोडं कमी कर" .. त्याला म्हटलं "अरे अजून कमी केलं तर मायनसात जाईल काम" ते बव्हंशी खरंही असावं.. असो.. जास्त एक्सपोजर नको ;)
तरीही अजूनही बझवर अधूनमधून डोकावणं होतंच. कारण कुठलंही डाएटिंग मला कधीच झेपलं नाहीये. पण हे डाएटिंग करायचंच असा पक्का विचार आहे. भलेही मग त्यासाठी घ-मेल्याच्या पायथ्याशी जाऊन 'बझ बंद करा' वर टिचकी मारावी लागली तरी बेहत्तर.
थोडक्यात मी आता बझवर नसेन. जनरली एखादा कोणी बझच्या गप्पांमध्ये दिसला नाही, त्याचे नवीन बझ दिसले नाहीत, बझला 'लाईक' केलं नाही की बझ्जनांमध्ये थोडी चलबिचल होते आणि ती व्यक्ती कुठे आहे, कशी आहे अशा काळजीपोटीच्या चौकश्या केल्या जातात. त्यामुळे "हमने वो सुन लिया तुमने कहा ही नही" टाईप त्या न विचारलेल्या प्रश्नांचं हे उत्तर समजा किंवा कंपन्या ज्याप्रमाणे नवीन अपडेट्स देण्यासाठी न्यूजलेटर पाठवतात तसं हे न्यूजलेटर समजा (पण हे पुन्हा पुन्हा येऊन पकवणारं न्यूजलेटर नाही) किंवा उगाच एक वाढीव रटाळ पोस्ट समजा किंवा मग नुसताच एक आगाऊपणा समजा. काय हवं ते समजा.
थोडक्यात आमच्या बझायुष्याची इति झाली. अर्थात हा कोमा आहे की खरोखरची इति आहे हे काळच ठरवेल.. (हेही वाक्य या पोस्टच्या आणि एकूणच या ब्लॉगच्या मूडशी विसंगत वाटणारं असलं तरी पुन्हा एकदा प्लीज चालवून घ्या कारण हेही खरं आहे.) .. हात्तिच्या "आमच्या बझायुष्याची इति झाली" हा एका वाक्यात कळणारा निरोप देण्यासाठी ब्रांडविश्व ते फेसबुक, ऑर्कुट, बझचे फायदे वाली एवढी मोठी वरात काढली होय ??????
होय.. होय.... होयच !!!! अहो कारण आता बझ नाही त्यामुळे वेळच वेळ आहे !!! नाही का? ;)
आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी फालतू का होईना पण विनोदी, सामाजिक, चित्रपट/पुस्तकं या विषयांवर लिहून झाल्यावर कधीतरी सहज म्हणून कितीही नॉनग्लॅमरस असलं तरीही आपल्याला वाटलं ते लिहिलं तर हरकत नाय ना? ;)
** नेहमीच्या सवयीप्रमाणे ही पोस्ट पण बझ करणार होतो.. ;) वाचलो :P