Thursday, October 29, 2009

तेरी जात का !!

आज मजा आली. आमच्या एका याहू ग्रूप वर एका सदस्याने तामीळनाडूच्या एका देवळात दलितांना प्रवेश मिळाल्यासंबंधीच्या एका बातमीची लिंक पाठवली होती. आणि झालं मग. एकच चर्चा सुरू झाली.जातपात किंवा जनरल कॅस्ट सिस्टम, धर्मांतर अशा वळणावरुन जाता जाता ती हळूहळू आणि थोडीशी जातीव्यवस्था का हवी, जातीव्यवस्था विसर्जीत (!!!) करण्याआधीतिला योग्य पर्याय शोधायला हवा अशा वळणांवर जायला लागली. मग आम्हीही थोडी आमची लेखणी (आपला कीबोर्ड हो) चालवली. तोच reply जसाच्या तसा खाली देतोय.

--------------------------------

जातीव्यवस्थेला कधीही कुठलाही पर्याय असु शकत नाही. जातीव्यवस्था नष्ट (विसर्जीत हा शब्द जातीव्यवस्थेला खूपच मान देणारा आहे त्यामुळे) करणे हा एकमेव पर्याय आहे. जातीव्यवस्थेतून निर्माण होणार्‍या विषामतेची झळ आपल्याला कधीच बसत नाही, बसली नाही (कारण आपण असे प्रसंग फक्त पुस्तक/वर्तमानपत्रातूनच वाचतो) आणि ज्यांना ती बसते त्यांच्यापासून आपण सुरक्षित अंतरावर असतो त्यामुळे त्याची तीव्रता आपल्याला कळत नाही. ज्या जातीव्यवस्थेने शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर यासारख्या महापुरुषांना सोडलं नाही तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्यांची काय कथा? जातीव्यवस्थेमुळे झालेले असंख्य दुष्परिणाम आपल्याला माहीत आहेत. फक्त ते डोळसपणे मान्य करायला लागतील इतकंच. (शिवाजीमहाराजंसारख्या महापुरुषाला राज्याभिषेक नाकारण्यात आला होता तो ते ब्राह्माण की क्षत्रिय की राजपूत या वादामुळेच.)

-- ब्राह्मणात पुन्हा तुम्ही कोकणस्था की देशस्थ की कर्‍हाडे की देवरुखे?.. त्यात पुन्हा यजुर्वेदी की ऋग्वेदी, आणि अजुन घोळ घालायचे असतील तर हे पुढचा ऐका.. तुम्ही शुक्ल यजुर्वेदी की कृष्ण यजुर्वेदी.. ???

-- मराठ्यांमधे पुन्हा कुणबी की ९६ कुळी मराठा की अजुन काही. (मराठा आरक्षणाचा वाद कशा मुळे निर्माण झाला काही अंदाज?)

-- अरे हे तर लेवा पाटील. आम्ही ९६ कुळी.. तुमची आणि आमची सोयारीक जुळु शकत नाही..

-- आम्ही सारस्वत. म्हणजे सरस्वतीचे भक्त. म्हणजे मांस खाणारे ब्राह्मणच.

-- आम्ही सोनार.. म्हणजे दैवद्न्य ब्राह्मण..

असे तट अजूनही पडताना दिसतात. मला नाही वाटत या गटातटातुन कोणालाही काही फायदा होतोय.. !!

या जातीव्यवस्थेमुळेच दादोजी कोंडदेवांना शिवरायांचे गुरू मानायचे की नाही असे वाद घालण्यात येतात. समर्थ रामदसांची रामदास ठोसर अशी संभावना करण्यात येते. बाबासाहेब पुरंदर्‍यांचं शिवाजी महाराजांच्या अभ्यासावरील श्रेष्ठत्व नाकारलं जातं ते या जातीपतीतील भेदांमुळेच. संभाजी ब्रिगेड ची साइट/ब्लॉग एकदा वाचून बघा म्हणजे जाती व्यवस्थेने खोलवर केलेले दुष्परिणाम कळून येतील.

खेडेगावांमधे (ज्यांच्यापसून आपण फक्त काही मैलांवर आहोत किंवा थोडक्यात सुरक्षित अंतरावर आहोत) अजुन ही दलितांसाठी वेगळा पाणवठा असतो. त्यांना गावाच्या विहिरीवर पाणी भरू दिले जात नाही. त्यांना देवळात जायला मज्जाव असतो.. २००६ चं महाराष्ट्रातलं भैय्यालाल भोतमांगे प्रकरण एवढ्यात विसरलो आपण?


अनिल आवचटानच कुठलाही पुस्तक काढून वाचा म्हणजे जातीव्यवस्थेचे चटके किती तीव्र असतात ते कळेल.

आता conversions विषयी. एवढ्या मोठ्या प्रमाणावर धर्मांतर का होतं? सगळे धर्मांतर करणारे अशिक्षित नसतात. सगळीच धर्मांतरे धनाच्या लालसेने किंवा जबरदस्तीने होत नसतात. त्याला एकमेव कारण आहे ते म्हणजे ही भ्रष्ट जाती व्यवस्था. जर माझ्या धर्मात राहून (निव्वळ माझ्या जातिमुळे जो माझ्या उदात्त (!!) धर्माचाच एक भाग आहे) मला कायम हीन वागणूक मिळत असेल, मला माझ्या सामान्य अधिकारांपासून वंचित ठेवले जाणार असेल तर खड्ड्यात गेला तुमचा धर्म. मी धर्मच बदलतो. सगळ्याच कटकटी मिटल्या. ही आणि फक्त हीच मानसिकता असते. हे फक्त हिंदू धर्मविषयीच आहे असं नाही. अनेक आफ्रो-अमेरिकन्स/ब्लॅक्स हे इस्लाम स्वीकारतात कारण त्यांच्या धर्मात त्यांना सतत हीन वागणूक दिली जाते. मुसलमानांमधे होणारे सुन्नी आणि शिया वाद/दंगली तर सर्वश्रुतच आहेत.

सॉरी.. बरच मोठं आणि विस्कळित झालं ईमेल. पण जे जसं सुचलं/साचलं होतं तसं लिहिलं. कारण जेव्हा एक तरुणांचा ग्रूप २१ व्या शतकात जातीव्यवस्थेच्या फायद्यांविषयी, ती विसर्जित न करण्या विषयी बोलू लागतो तेव्हा एक भयंकर विचित्र फीलिंग येत त्याचाच हा परिपाक !!

Friday, October 23, 2009

कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???

कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???

कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !!
भावनांची व्याकुळता आठवणींचा जंजाळ
झाकोळल्या क्षितिजाला गडद अंधारलेली किनार
अडकलेला कण न कण, कोंडलेला श्वास अन श्वास
राहून राहून होणारे सारे सारे तुझेच भास

ओहटल्या सागराला आर्त हाकांचं वलय
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||१||

अनोळखी माणसांचं वैराण वाळवंट
निर्जीव चेहर्यांच अरण्य घनदाट
निःशब्द रस्त्यांवर हुंकार अस्पष्ट
साथीला बोचणारी बेचैनी मात्र स्पष्ट

एकटेपणाची अशी कधी होते का सवय?
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||२||

तेज लोपलेला सूर्य आणि डागाळलेला चन्द्र
कोमेजल्या फुलांचे आटलेले गंध
कुंद हवेतले निराश उःश्वास
बेचव उन्हं आणि कुबट पाउस

सारं सारं जणू विचित्र विचित्र झालंय
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! ||३||

ओळखीच्या वाटा पण अनोळखी पावलं
काळोख्या उजेडाच्या निस्तेज सावल्या
हव्याशा आठवणींचे लख्ख कवडसे
सोबतीला दाबलेले हुंकार आणि उसासे

नको नको असलं तरी सारं खरयं
कसं गं जगायचं तुझ्याशिवाय ???
सांग ना मला उत्तर हवयं !! सांग ना मला उत्तर हवयं !! ||४||

हेरंब ओक
२८ एप्रिल '०९

शिल्लक !!

२६ नोव्हेंबर च्या मुंबई हल्ल्यानंतर तुकड्यातुकड्यात सुचलेली कविता !!

शिल्लक !!

थोडीशी लाज विकत घ्यायची होती
या सत्ताधार्‍यांना वाटण्यासाठी
या राजकारण्यांच्या तोंडावर फेकण्यासाठी
या सत्तापिपासुंना भीक म्हणुन देण्यासाठी
या झोपेच सोंग घेतलेल्या कुंभकर्णांना उठवण्यासाठी ||१||

थोडीशी माणुसकी विकत घ्यायची होती
मेलेल्या मढयावरचं लोणी खाणार्‍या
असंख्य बलिदानांवरही खुर्चीची पोळी भाजणार्‍या
निष्पापांच्या जिवांशी खेळणार्‍या
जवानांच्या मृत्युला "कुत्र्याचीही" किंमत न देणार्‍या
या मानवी चेहर्‍यात वावरणारया श्वापदांसाठी ||२||

थोडं रौद्र थोडं धैर्य थोडं वीर्य विकत घ्यायच होत
या मनगटातल्या ताकदी संपलेल्या
चर्चेची गुर्हाळं चालवून कागदी घोडे नाचावणार्‍या
पोकळ धमक्यांनी शत्रूला घाबरवल्यासारखं करणार्‍या
शब्दांचे बुडबुडे उडवणार्या या भेकड युद्धतज्ज्ञांसाठी ||३||

असं बरंच काही मागण्यासाठी देवाकडे गेलो होतो
तर तो म्हणाला यातलं काही शिल्लक नाहीये आता
कारण ते सगळं मी इस्रायलला दिलंय !!!!!!!

हेरंब ओक
१९ जानेवारी '०९

गर्विष्ठ की अभिमानी ??

हा लेख मी दुसर्या एका ब्लॉगवरून उचलला आहे. घाबरू नका. गंमत करत होतो. दुसरा ब्लॉग पण माझाच आहे. तेव्हा कॉपीराइटचा काही प्रॉब्लेम येणार नाही :-). नवीन मराठी ब्लॉगवर हा लेख जास्त योग्य वाटेल म्हणून इथे पुन्हा पोस्ट करतोय. बाकी काही नाही.


=============================================
आपण सर्वांनीच नितांतसुंदर असा "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय" बघितला असेलच. तो किती अप्रतिम आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही किंवा त्याची उत्कृष्टता जोखण्याएवढी माझी कुवतही नाही. फ़क्त त्यातला एक खटकलेला मुद्दा मांडावासा वाटला जो (माझ्या मते) अतिशय महत्वाचा आहे आणि तो विषयाच्या हेतुच्या आड़ येणारा ठरू शकतो किंवा मराठीत चुकीच्या शब्दांचा पायंडा पाडणारा ठरू शकतो म्हणुनच हा ब्लॉग प्रपंच.
या चित्रपटाची tagline आहे "गर्व आहे मला महाराष्ट्रीय असल्याचा". माझ्या मते दिग्दर्शकाला "गर्व" च्या जागी "अभिमान" हा शब्द अभिप्रेत असावा किंबहुना "अभिमान" हा शब्दच तेथे जास्त समर्पक आहे परंतु हिंदी भाषेच्या अतिरेकामुळे
(किंवा पगडा म्हणा हवं तर) हा चुकीचा शब्दा प्रयोग कोणाच्याच लक्षात आलेला नाही. कारण हिंदीत "मुझे गर्व है की मैं आपका बेटा हूं" किंवा "मुझे अपने भारतवासी होनेपे गर्व है" असे शब्दप्रयोग वापरले जातात कारण त्या भाषेतील त्या शब्दाच्या अर्थाप्रमाणे ते योग्यही आहे. असं म्हणतात की कुठलीही भाषा जितकी जास्तीत जास्त वापरली जाते तितके तिच्यातील शब्दालन्कार, तिचे आयुष्या व्रुधिन्गत होत जाते. गुरुमुखी (किंवा पंजाबी) भाषा ही काही वर्षांपूर्वी मृतवत होऊ घातली होती परंतु त्यभाषिकांनी प्रयत्नपूर्वक अंगिकारलेल्या प्रयत्नांमुळे आज ती भाषा भारतातील अनेल हिंदी भाषिक राज्यांमधे संवाद साधण्याची एक प्रभावी भाषा बनली आहे। (आणि याउप्पर तिला बॉलीवुड च्या चित्रपटांमधे जवळपास राष्ट्रीय भाषेचा दर्जा ही मिळाला आहेच हे सांगणे न लगे). इथे मला मराठी भाषेच्या वापराच्या नावाने गळे काढायची इच्छा नाही. परंतु त्यामुळे वस्तुस्थितीत बदल होत नाही हे मात्र नक्की.
आपल्याला लहानपणा पासून शिकवण्यात आलेल्या "गर्वाचे घर खाली" किंवा "ग ची बाधा" अशा म्हणी किंवा शब्दप्रयोगांवरून गर्व हा शब्द गुणांच्या कक्षेत न येता त्याकडे अवगुण म्हणूनच पहिले जाते हे नक्की. (परंतु हिंदीत गर्व हे अभिमान या अर्थी आणि अभिमान हे गर्व या अर्थी वापरले जाते म्हणून आपणही मराठीतले अर्थ सोडून हिंदी अर्थ उसनवार घेण्याची गरज नाही.. आठवा अमिताभ आणि जया चा "अभिमान".... असो). प्राथमिक शिक्षण झालेल्या कुठल्याही व्यक्तीच्या हे खरतर चटकन ध्यानात यायला हवं होतं. क्षणभरासाठी आपण हे विसरू की सामान्य माणसाच्या हे लक्षात आले नाही परंतु इतके साहित्यिक, लेखक, मराठी कथा/पटकथा लेखक इत्यादी कोणाच्याच हे लक्षात आल नाही हे खर तर मोठ्ठं आश्चर्य म्हन्टल पाहिजे. किंबहुना चित्रपटाचा निर्माता, पटकथाकार हा महेश मांजरेकर सारखा प्रथितयश मराठी कलाकार असून ही त्याच्याही ही गोष्ट लक्षात आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते. कालांतराने पुढल्या पिढीने "गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा" आणि "गर्वाचे घर खाली" याच्या संधितून "त्यामुळेच महाराष्ट्रीय माणूस खाली असतो" असा निराळाच अर्थ काढला तर आश्चर्य वाटायला नको...

=============================================

प्रथमा

अनेक दिवसांपासून मनात असलेल्या मराठी ब्लॉग चा श्री गणेशा अखेरीस झाला तर. बरेच मुद्दे, विषय मराठी, महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी गोष्टींशीच संबंधित असतात आणि ते मराठी ब्लॉग मधे जास्त चांगल्या पद्धतीने मांडता येतील म्हणून हा ब्लॉग सुरू करतोय. खर तर इंग्लीश ब्लॉग नंतर हा ब्लॉग लगेच यायला हवा होता.. पण सुचल नाही, जमल नाही काहीही म्हणा.. दोन्ही ब्लॉग मधे सातत्य राखण्याची इच्छा आहेचं... बघुया कितपत जमतय ते.

अरे हो.. ब्लॉगच नाव (URL) थोडं विचित्र वाटेल खरं. पण त्याची एक गंमत आहे. गेल्या वर्षी (बर्‍याच वर्षांनी) एक कविता लिहिली आमच्या डोंबिवलीच्या माजी विद्यार्थी संघाच्या संकल्प या त्रैमसिकासाठी. त्या कवितेचं नाव होत "हरकत नाय". कविता '08 च्या पहिल्या 5-6 महिन्यातल्या विविध स्थानिक हिंसा/दंगलींवरआधारित होती. साधारण त्याच सुमारास इंग्लीश ब्लॉग ची पण सुरूवात झाली. (. . लिहिणं हे त्याच्या बरंच नंतर सुरू झालं हा भाग अलाहिदा :) )... कवितेच्या हॅंगओवर मधे असल्याने ब्लॉगला पण तेच नाव द्यायचं ठरवलं आणि "मनातल्या गोष्टी",किंवा माय थॉट्स, किंवा स्वतःचं नाव अशा टिपिकल नावांपेक्षा हे जरा वेगळं पण वाटलं. . मग तेच नाव (किंवा हॅंग ओवर म्हणा हवं तर) पुढे चालू ठेवावं म्हणून नाय च्या स्पेलिंग मधे थोडा बदल करून मराठी ब्लॉगला तेच नाव दिलं :)

पुढे ती कविता महाराष्ट्र टाइम्सच्या ऑनलाइन अंकात पण छापुन आली. बघा आवडते का...

=============================================

हरकत नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय !!

मारा झोडा ठेचुन काढा
गोळ्या झाडा बाँब फोड़ा
त्यांच डोक आमचा हातोड़ा
ताज्या रक्ताचा पडुदे सडा

एका घावात मागाल पाणी, असे आहोत आम्ही सनातनी
आमच्या देवांची मस्करी करायची नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||१||

खसकन उपसा नंग्या तलवारी
दिसूदे आपली ताकद खरी
भेदरल्या पाहिजेत दिशा चारी
थरथर कापेल दुनिया सारी

आमच्या समोर नको अजीजी, उगाच नही आम्हाला म्हणत "पाजी"
आमच्या गुरु च्या वाटेला जायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||२||

शिवबा आमचा आम्ही त्याचे मावळे
उलट बोलाल तर तोंड करू काळे
आदर व्यक्त करायचे आमचे मार्गच आगळे
फासून डाम्बर घर रंगवू सगळे

मुखी शिवबा हाती ग्रेनेड, अशी आमची राष्ट्रवादी ब्रिगेड
शिवबाचे स्मारक उभारू देत नाही म्हणजे काय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||३||

दिसला भैय्या तर सोडू नका
टँकसया फोड़ा सामान फेका
एकच असा देऊ जोरदार धक्का
की "आपला" खुंटा होइल पकका

नवमहाराष्ट्राची आम्हालाच जाण, आम्ही करू नवनिर्माण
मराठी सोडून दुसर काही बोलायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||४||

पण थाम्बा हे काय !!
हे सगळ अचानक थांबतय काय?
होय ! कारण मी आहे आजचा तरुण, कुठल्याही झापडांशिवाय
मीच गोविन्दसिंह, मीच कृष्ण आणि मीच शिवराय
आमच्या तरुणाईला फसवयाच नाय
याद राखा गाठ आमच्याशी हाय
ज़ातिधर्माच्या नावाने फूट पाड़ाल तर
होय !! आमची हरकत हाय, हरकत हाय, हरकत हाय !!!

हेरंब ओक
१५ जुलै '०८

=============================================

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...