Showing posts with label ट्रेक. Show all posts
Showing posts with label ट्रेक. Show all posts

Wednesday, March 2, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-७ -- अंतिम

* हा सातवा अर्थात अंतिम भाग वाचण्यापूर्वी सहावा  भाग वाचला आहेत याची खात्री करून घ्या. पाचव्या भागानंतर सहावा आणि सातवा दोन्ही लागोपाठ टाकलेत म्हणून सांगतोय.

भाग १ इथे  वाचा
भाग २ इथे  वाचा
भाग ३ इथे  वाचा
भाग ४ इथे  वाचा
भाग ५ इथे  वाचा
भाग ६ इथे  वाचा

त्या खिडकीच्या बाहेर 'नेरळ जंक्शन' असा ठसठशीत मोठ्या अक्षरात लिहिलेला रेल्वेचा बोर्ड दिसत होता आणि बाजूलाच नेरळ स्टेशनचे ऐसपैस लांब प्लॅटफॉर्म पसरले होते. आमच्या खिडकीपासून ते स्टेशन जेमतेम चार-पाचशे मीटर (होहो.. म्हणजे आम्ही जाळलेल्या (!!!) दुर्मिळ (!!!) गवताच्या सो कॉल्ड क्षेत्रफळाच्या जेमतेम चार-पाचपट) अंतरावर होतं. म्हणजे आम्ही आमची सुटका करायला येणार्‍या ट्रेनरूपी वैकुंठ विमानापासून जेमतेम अर्ध्या किलोमीटर अंतरावर होतो. त्या कल्पनेनेही इतकं हायसं वाटलं म्हणून सांगू !! अजून पंधरा मिनिटांत आम्ही ट्रेनमध्ये असणार होतो अर्थात हा जंगल्या आमची ट्रेन चुकू देणार नाही हे गृहीतक सत्य मानलं तर..

"हे बघा. इकडून आपल्याला इथे येणारी प्रत्येक गाडी आधीच दिसते. त्यामुळे तुमची ट्रेन चुकणार नाही हे नक्की."

खरं तर त्याच्या त्या वाक्याचा, त्या खिडकीचा आणि आमची ट्रेन मिळण्या-न मिळण्याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. पण कदाचित तो ते फॉर्म येईपर्यंत असाच काहीतरी वेळ काढत असावा. आणि अर्थातच एवढ्या जवळ स्टेशन बघून आमच्या मनाला एक उभारी मिळाली होती हे मात्र नक्की.

पुढच्या दहा मिनिटांनी दोन गोष्टी झाल्या.. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा तो माणूस फॉर्म घेऊन आला. तो आल्या आल्या लगेच ते फॉर्म त्याच्याकडून अक्षरशः हिसकावून घेऊन भरून टाकावेत आणि इथून सुटावं असा विचार मनात आला होता. पण त्या माणसाने आपल्या साहेबाच्या स्टायलीतच हळूहळू एकेक करत ते फॉर्म्स त्याच्या सायबाला दिले. साहेब एकेक फॉर्म काळजीपूर्वक भरायला लागला.

एखादा दिवस असा असतो की त्या दिवशी आपण जे काम हातात घेतो ते तडीला जातं, हात लावू त्या गोष्टीचं सोनं होतं, प्रत्येक गोष्टीत यश मिळतं. पण काही दिवस असेही असतात की त्या दिवशी प्रत्येक गोष्टीचा विचका होतो, हात लावू त्या कामाची माती होते.. आमचा हा दिवस त्यातलाच होता.

दुसरी गोष्ट अशी झाली की त्या हरकाम्याच्या मागोमाग आम्हाला ट्रेनचा मोठा हॉर्न ऐकू आला आणि त्यामागोमाग ट्रेनच्या हेडलाईटने ती खिडकी उजळून निघाली. आल्यानंतर अक्षरशः दोन मिनिटांत ट्रेनने स्टेशन सोडलं आणि त्याबरोबरच आजच्या दिवसात घरी जाऊन, मस्त गरम पाण्याने शेकत शेकत आंघोळी करून, आईच्या हातचं गरम गरम जेवून, पांघरुणात गुडुप्प होऊन, दुसर्‍या दिवशी दुपारी बाराशिवाय न उठण्याच्या आमच्या साध्या-सोप्या स्वप्नाची राखरांगोळी झाली.

"हं.. इथे करा सह्या" असं म्हणून त्याने पॅडला लावलेले फॉर्म्स आणि पेन आमच्या दिशेने सरकवलं. एका पेनाने किंवा पॅडला असलेल्या त्या स्प्रिंगने एखाद्या माणसाला जास्तीत जास्त किती जखमी करता येऊ शकतं असे आसुरी विचार मनात डोकावून गेले. आणि त्यासाठी कुठलीही शिक्षा भोगण्याची आमची तयारी होती. निदान न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा भोगण्यापेक्षा ते शतपटीने चांगलं होतं. अर्थात आम्ही काही न बोलता अर्धवट बघत/वाचत त्या फॉर्म्सवर सह्या केल्या आणि काही न बोलता तिथून उठून बाहेर पडायला लागलो.

"तुमचं नशीब म्हणून आज तुम्हाला सोडतोय. पण पुढच्या वेळी सांभाळून राहा. दरवेळी माझ्यासारखा चांगला माणूस तुम्हाला भेटेलच असं नाही" असा शेरा आमच्या पाठीवर पडला. आता मात्र काय व्हायचं ते होवो. पुढच्या ट्रेनला म्हणजे पहाटेच्या पहिल्या ट्रेनला निदान ४-५ तास तरी होतेच. तोवर याची चांगली कणिक तिंबायचीच. आपलं काय व्हायचं ते होवो. असे अविचार मनात मुळ धरायला लागले. पण पुन्हा एकदा संयम राखून आम्ही तिथून बाहेर पडलो. काही क्षणांपूर्वी फक्त अर्धा किलोमीटर वाटणारं ते अंतर आता पा-च-शे मीटर वाटायला लागलं होतं. कोणाच्याही अंगात आता काडीचाही उत्साह राहिला नव्हता. कसेबसे धडपडत, पाय खेचत आम्ही स्टेशनपर्यंत पोचलो. किती वेळ लागला, किती वाजलेत कशाकशाची आम्हाला पर्वा नव्हती.

तेवढ्यात स्टेशनच्या जवळच 'पीसीओ' असं लिहिलेला एक मोठ्ठा बोर्ड दिसला आणि अचानक आम्हाला किती उशिरा झालाय, घरचे कसे आपली वाट बघत असतील, काळजीने बेजार झाले असतील वगैरे वस्तुस्थितीचा साक्षात्कार झाला. सगळ्यांनी फोन करायला जाण्यापेक्षा कोणीतरी एकानेच घरी फोन करायचा आणि त्यांच्याकडे सगळ्यांचे नंबर्स देऊन त्यांना पुढे सगळ्यांच्या घरी फोन करायला सांगायचे असा एक अतिशय विचित्र निर्णय आम्ही घेतला. आधीच्या प्रत्येक चुकीच्या (बरोबर निर्णय जवळपास नगण्य होते) निर्णयाप्रमाणेच हाही निर्णय आम्ही का घेतला याचं कुठलंही स्पष्टीकरण माझ्याकडे नाही.. कदाचित हा निर्णय पूर्णतः चुकीचा नसेलही पण माझ्यापुरता तरी तो पूर्णतः चुकला. कारण आमच्या घरी तेव्हा फोन नव्हता आणि मी आमच्या शेजारच्यांचा नंबर दिला होता. त्यांचा फोन लागला नाही किंवा त्यांना मेसेज मिळाला नाही आणि त्यामुळे आमच्या घरीही मला यायला उशीर होतोय वगैरे काहीही निरोप मिळाला नाही. (अर्थात हे सगळं मला नंतर कळलं)

स्टेशनमध्ये शिरल्याशिरल्या आम्ही प्लॅटफॉर्मवर असलेल्या टाईमटेबलमध्ये पुढची गाडी बघितली. चुकली ती खरोखर शेवटची गाडी होती की अजून एखादी गाडी नंतर आहे अशी वेडी आशाही त्यात होतीच. पण रेल्वेला आमच्या शहाण्या/वेड्या आशेशी काही घेण-देणं नव्हतं. चुकली ती ट्रेन शेवटचीच होती आणि पुढची ट्रेन पहाटे सव्वाचारला होती. थोडक्यात आम्हाला कमीतकमी चार तास तरी या थंडीत कुडकुडत काढायचे होते. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरच्या दिसेल त्या जागेवर आम्ही बसलो आणि सॅक उशाशी घेऊन पसरलो. जरा वेळ झोप लागलीही पण भरपूर डास आणि प्रचंड थंडी यामुळे खूप त्रास होत होता. अखेरीस झोपण्यात काही अर्थ नाही हे लक्षात आल्यावर आम्ही तसेच आडवे पडून, बसून गप्पा आणि डास मारत वेळ काढायला लागलो. डोंबिवली स्टेशनवर असणार्‍या रात्रभर चालणाया चहाच्या टपरीसारखी टपरी इतर कुठेही नसते या इतर वेळी अभिमानाने मिरवण्याच्या गोष्टीचं निदान त्यावेळी तरी आम्हाला चांगलंच दुःख झालं.

काही किलो गप्पा आणि अंदाजे सहा डझन डास मारायला चार तास लागत असावेत. कारण तेवढं होईस्तोवर आम्हाला ट्रेनचा प्रखर हेडलाईट आणि त्याच्या मागोमाग आमचा त्याक्षणीचा सगळ्यात आवडता आवाज म्हणजे ट्रेनचा भोंगा ऐकू आला. गाडी थांबताक्षणी आम्ही आत शिरलो आणि मिळेल त्या ठिकाणी लवंडलो. थंडगार वार्‍यात तासभर चांगली गाढ झोप लागली. तासाभराने 'डोंबिवली' असा बोर्ड दिसल्यावर आमचा क्षणभर विश्वासच बसेना. पण ते खरं होतं.

उतरल्यावर पटापटा फायनल टाटा-बाय करून आम्ही सगळे दोन ग्रुपमध्ये स्टेशनच्या दोन दिशांना पांगलो. चालत जात जात स्टेशनच्या एका टोकाला आल्यावर बाहेर पडणार एवढ्यात समोर उभ्या असलेल्या एका माणसाने आम्हाला अडवलं. तो कोण आहे वगैरे क्षणभर आम्हाला कळलंही नाही आणि जेव्हा कळलं तेव्हा अशक्य संताप झाला........................

आता यापुढे मी जे लिहिणार आहे ते म्हणजे निव्वळ फेकाफेकी किंवा शेवटचा प्रसंग उगाच अजून चढवून चढवून सांगण्यासाठी केलेली योजना वाटण्याची दाट शक्यता आहे. कदाचित तुमच्या जागी मी असतो तर मलाही असंच काहीसं वाटलं असतं. म्हणून मुद्दाम स्पष्टीकरण देऊन सांगतोय की जे घडलं ते अगदी असंच घडलं होतं................

सोमवारचे पहाटेचे साडेपाच वाजलेले आणि हा काळा डगला घातलेला माणूस त्या निर्मनुष्य प्लॅटफॉर्मच्या एका टोकाला उभा राहून आमच्याकडे तिकीट मागत होता. त्याच्या तोंडावर तिकीट मारून तिथून ताबडतोब बाहेर पडावं म्हणून आम्ही खिशात हात घातला आणि चर्र झालं, बॅगा तपासल्या आणि ठार मेलो. काल पहाटे (म्हणजे बरोबर चोवीस तासांपूर्वी) ज्याने आमची सगळ्यांची तिकिटं काढली होती ती तिकिटं त्याच्याकडेच राहिली होती. पूर्ण वेळ एकत्र असल्याने ती तिकिटं मागून घेण्याचं आमच्या कोणाच्या डोक्यातही आलं नव्हतं की त्याची तशी गरजही वाटली नव्हती. पण आता या बाप्याला हे समजावणार कसं?? तिकीट नाही आणि दंड भरायला पैसेही नाहीत.. थोडक्यात नेरळचा टाळलेला तुरुंग डोंबिवलीत येऊनही आमची पाठ सोडणार नव्हता. गेल्या चोवीस तासात आमच्या मानसिकतेत कसला बदल झाला होता !! पूर्वी तुरुंग हा विचारही मनात न
आणू शकणारे आम्ही तोच शब्द किती सहजपणे उच्चारू शकत होतो..

पण नाही. अचानक आमच्यातल्या एकानेच उरलंसुरलं प्रसंगावधान आयत्या वेळी वापरलं आणि त्या टीसीला समजावलं. त्याला सगळी कहाणी इत्यंभूत कथन केली. अर्थात इत्यंभूत म्हणजे आग लागली, दंड भरला वगैरे प्रकार वगळून.. उतरताना रस्ता चुकलो, शेवटची गाडी चुकली त्यामुळे रात्रभर स्टेशनवर बसून राहायला लागलं, आमची तिकिटं मित्रांकडेच राहिली आणि ते आत्ताच दुसर्‍या बाजूने बाहेर पडले वगैरे सगळं त्याला समजावून सांगितलं. आमची एकंदर अवस्था बघून त्याचाही आमच्यावर विश्वास बसला असावा.त्याने काही न बोलता हसून आम्हाला सोडून दिलं. गेल्या चोवीस तासात आमच्याबरोबर घडलेली ही एकमेव चांगली घटना आणि त्यामुळेच इतकी छोटी असूनही (अर्थात सहीसलामत सुटल्याने आता ती आम्हाला छोटीशी वाटत होती.) आम्ही डोंबिवलीतल्या जगप्रसिद्ध २४x७ टपरीवर चहा पिऊन ती सेलिब्रेटही केली.

घरी पोचल्यावर दार उघडता उघडताच आईचा काळजीने काळवंडलेला चेहरा, रात्रभर जागरण केल्याने तारवटलेले डोळे आणि "अरे काय हे? होतास कुठे तू रात्रभर??" ने झालेलं स्वागत पाहताच मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. पण दुसर्‍याच क्षणी लक्षात आलं की निरोप पोचलेला नसावा !! त्यामुळे शूज काढता काढताच दिवसभर घडलेले वेगवेगळे किस्से आणि ओढवलेले प्रसंग यांचं साग्रसंगीत (पण अर्थातच तीव्रता कमी करून) कथाकथन करून आणि फोन करून निरोप द्यायला सांगितलं होतं हेही अगदी हायलाईट करून सांगून झालं. गरमागरम खाऊन, पिऊन गादीवर अंग टाकताना अजूनही हे खरं घडतंय यावर विश्वास बसत नव्हता. काल याच गादीवरून उठताना परत झोपायला जाईपर्यंत थेट चोवीस तास उलटून जातील आणि त्या चोवीस तासांत "काळ आला होता पण वेळ आली नव्हती" किंवा "जान बची लाखो पाए" असल्या वाक्प्रचारांचे अर्थ एवढे जवळून आणि ठसठशीतपणे समजण्याइतके अनुभव गाठीशी बांधले जातील याची पुसटशी कल्पनाही नव्हती.

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर आजूबाजूला झाडं, जंगल, दगड-धोंडे (आणि फॉरेस्ट ऑफिस आणि तुरुंगही) नसून आपली नेहमीची गादी, उशी, पांघरूण आहे हे पाहून प्रचंड हायसं वाटलं. बहुतेक स्वप्नातही मी पुन्हा एकदा प.. प.. पेब उतरून आलो होतो.. !!! संध्याकाळी सगळ्यांशी बोलताना जवळपास प्रत्येकाच्या घरी असंच स्वागत झालं असल्याचं कळलं. पण एवढं सगळं होऊनही एक गोष्ट मात्र चांगली झाली ती म्हणजे कोणाच्याही घरून ट्रेक्सना बंदी आली नाही, ट्रेक्स चालूच राहिले. मात्र त्या दिवसानंतर आम्ही कोणीही कधीच त्या दिवसाविषयी, त्या पेब ट्रेकविषयी एकमेकांशी आणि कोणाशीच कधीच विशेष बोललो नाही.

त्यानंतर अनेक ट्रेक केले.. पेबच कमीत कमी ४-५ वेळा केला. अनेक ट्रेक्सना चुकलो, पडलो, घसरलो, धडपडलो, उपाशी राहिलो, पाण्यासाठी वणवण केली, वैतागलो, चिडलो, संतापलो, डिप्रेस झालो. पण दर वेळी ८ फेब्रुवारीचा पेब ट्रेक आठवला की अचानक सगळं सुसह्य वाटायला लागायचं. त्या दिवसाच्या मानाने आजचा दिवस एवढा वाईट नक्कीच नाही असं जाणवायचं, वाट आपोआप सापडायची, आपोआपच धीर यायचा, सगळं सहज शक्य वाटायला लागायचं..... हा त्या पेब ट्रेकमधून मिळालेला पॉझिटिव्ह धडा !!!

या ट्रेकनंतर मी ट्रेकशी संबंधित तीन गोष्टी कधीही केल्या नाहीत

१. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.

२. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही.

३. ८ फेब्रुवारीला कधीही ट्रेक केला नाही. !!!!!

- (एकदाचं) समाप्त

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-६

भाग १ इथे  वाचा
भाग २ इथे  वाचा
भाग ३ इथे  वाचा
भाग ४ इथे  वाचा
भाग ५ इथे  वाचा

सकाळपासून वेगवगळ्या प्रसंगी आम्हाला आमचे ब्रेकिंग पॉईंट आलेत असं वाटत होतं. आधी त्या टेकडीच्या समोर अडकलो तेव्हा नंतर सँडविचेस खराब झाल्याचं लक्षात आलं तेव्हा, नंतर त्या ओहोळात रस्ता चुकतो तेव्हा, त्याच्यानंतर आग लागली तेव्हा आणि नंतर जेव्हा या सायबाच्या तावडीत सापडलो त्या पहिल्या क्षणी. दर वेळी आम्हाला "झालं.. आता सगळं संपलं. आम्ही संपलो" असं वाटत होतं पण दर वेळी कधी प्रयत्नांनी कधी नशिबाने पण आम्ही उठून उभे राहत होतो.

पण आता मात्र आमचा सगळा त्राण संपला होता. आम्ही अगदी गलितगात्र झालो होतो. एकाचंही शरीर, मेंदू साथ देत नव्हतं. अशा अवस्थेत अजून नवीननवीन धक्के पचवायला आमची सिस्टम तयार नव्हती. बाहेर काहीही दाखवत असला तरी आमच्यातला प्रत्येकजण आतल्याआत तरी पूर्णतः कोलमडला होता. त्यामुळे आता काय व्हायचं ते होऊ देत, आम्हाला त्याची पर्वा नाही असेही विचार डोक्यात येऊन गेले. पण या म्हणण्याला अर्थ नव्हता. कारण काहीही घडू शकणार होतं. त्या ऑफिसबाहेर असलेला जमाव अजूनही तसाच होता. उलट अजून थोडा वाढलाच होता असं आवाजावरून तरी वाटत होतं. ते नक्की कशासाठी उभे होते कळत नव्हतं. या जंगल्याच्या डोक्यात नक्की काय शिजतंय काही कळत नव्हतं. हार मानून चालणार नव्हतं. कितीही म्हंटलं तरी आमच्यावर जवाबदारी होती. विशेषतः मुलींची अधिकच. त्यांच्या आईबाबांना समजावून, मस्का मारून आम्ही ट्रेकला पाठवायला मोठ्या मुश्किलीने तयार केलं होतं. डोक्यात येणारे नाही नाही ते विचार झटकून टाकून आम्ही अखेरचा प्रयत्न करायचा ठरवलं.

"साहेब, प्लीज आम्हाला सोडा. आमच्याकडे हजार रुपये आहेत अंदाजे. आम्ही अजून शोधतो. सगळ्यांच्या सॅक, बॅग्ज, वॉलेट्स शोधतो. सापडतील तेवढे सगळे पैसे आम्ही तुम्हाला देऊ. पण प्लीज आम्हाला जाऊद्या. आम्ही काहीही केलेलं नाही (आणि हे तुम्हालाही चांगलं माहित्ये). बोलता बोलता तुम्हाला चुकून काही उलटसुलट बोललं गेलं असेल तर त्याबद्दल सॉरी. पण प्लीज आम्हाला जाऊद्या." हे आणि असं बरंच कायकाय--जे आता मला आठवतही नाहीये--आम्ही बोलत राहिलो.. बोलत राहिलो. आणि मग एकदाचे थांबलो.

पुन्हा एकदा बाहेरून आरडाओरड्याचा आवाज आला. जंगल्या खूप काहीतरी विचार करतोय असं दाखवत शांत बसून होता. आम्ही सगळे आळीपाळीने एकदा त्याच्याकडे आणि एकदा बाहेर चाललेल्या गोंधळाकडे बघत होतो. बराच वेळ झाल्यावर अखेर त्याने त्याचं मौनव्रत सोडलं.

"बरं ठीके. तुम्ही चांगल्या घरची पोरं दिसता. (गेले चार तास काय डोळे फुटले होते का रे भाड्या?) आणि कदाचित तुम्ही काही केलंही नसावं.. (कदाचित?????) पण तरीही गवत तर जळलं आहेच."

"साहेब आमच्याकडे सगळे मिळून बाराशे रुपये आहेत." त्याच्या मुद्दा घोळवत, फिरवत, रवंथ करत करत बोलण्याच्या सवयीला ओळखल्याने आणि एव्हाना चांगलेच कंटाळल्याने आमच्यातला एकजण एक घाव दोन तुकडे करायचे म्हणून त्याला पुढे बोलू न देता सरळ मधे बोलला.

तो क्षणभर थांबला. चेहर्‍यावर मंद स्मित आल्यासारखं वाटलं.

"म्म्म्म बाराशे? बरं ठीके.. काढा बघू."

तो बाराशे कुठल्या बळावर म्हणाला होता याची कल्पना नव्हती पण सगळ्यांनी ताबडतोब आपापले खिसे, पाकिटं, पर्स उघडून त्यात होते नव्हते तेवढे सगळे पैसे समोर टाकायला सुरुवात केली. एकाचा त्या महिन्याचा पॉकेटमनी नुकताच झाला होता त्यामुळे त्याच्याकडून पाचशे रुपये निघाले आणि बाकी सगळ्यांचे थोडे थोडे करत जवळपास चौदाशे रुपये जमले. त्याने ते पैसे लगबगीने मोजायला सुरुवात केली. पॉकेटमनीवाल्याला आपला सगळा पॉकेटमनी एका फटक्यात जातोय हे सहन झालं नसावं. तो मधे पडला आणि म्हणाला

"साहेब, आमच्याकडे परतीच्या तिकिटाचेही पैसे नाहीयेत. निदान तेवढे तरी राहूदेत आमच्याकडे."

"तुमच्याकडे रिटर्न तिकिटं नाहीत?" त्याने जरा संशयानेच विचारलं

"नाही साहेब"

त्याक्षणी त्याने आमची किंवा आमच्या बॅग्जची वगैरे झडती घेतली असती तर आम्ही संपलोच असतो. कारण आमच्याकडे अर्थातच रिटर्न तिकिटं होती. पण तोही तितकासा मूडमधे नसावा. त्यालाही उशीर झाला होताच. आणि काही न करता चार तासात जरा धमक्या देऊन, घाबरवून चौदाशे रुपये म्हणजे त्याच्या दृष्टीने चांगलीच कमाई होती.

"नक्की?"

"खरंच नाहीयेत साहेब. परत जाताना टीसीने पकडलं तर खरंच आत जायला लागेल"

"बरोबर आहे.. बरोबर आहे.." तो उगाच खदाखदा हसत म्हणाला आणि शंभरची नोट पुढे करून म्हणाला.

"हे घ्या"

अजून एक शंभरची नोट मागायची असह्य उर्मी दाबून त्याने जेवढे मिळाले तेवढे परत घेतले.

"बरं साहेब. आम्ही जाऊ आता?"

"अरे थांबा. असं कसं?? फॉर्म भरायचे आहेत. तुमची नावं लिहायची आहेत. सरकारी काम आहे. अर्धवट करून कसं चालेल."

"पण साहेब, नावं तर मगाशीच लिहिली ना?"

"हो. पण ती डायरीत लिहिली होती. ती आता फॉर्ममधे भरायची आहेत. आणि त्याच्या खाली तुम्हाला सह्या करायला लागतील."

उगाच शब्दाने शब्द वाढवण्यात काही अर्थ नव्हता. उलट त्यापेक्षा तो म्हणतोय त्याप्रमाणे फटाफट वागलो तर आम्ही तिकडून लवकरात लवकर बाहेर पडू शकणार होतो कदाचित. त्यामुळे आम्ही (एवढ्या वेळ घेत होतो त्याप्रमाणे आत्ताही) त्याच्याच कलाने घ्यायचं ठरवलं.

"बरं.. कुठे आहेत फॉर्म्स? आम्ही सह्या करतो."

"थांबा. माझ्याकडे पुरेसे फॉर्म्स नाहीयेत. मी जरा फॉर्म्स मागवून घेतो." असं म्हणून त्याने दारात उभ्या असलेल्या एका हरकाम्याला (त्या रापलेल्या चेहर्‍यांच्या गँगमधल्या एकालाच) बोलावून त्याच्या कानात काहीतरी पुटपुटून त्याला फॉर्म आणायला पिटाळलं. एवढ्या अंधार्‍या रात्री, सुनसान माळरानावर तो इसम ते फॉर्म्स कुठून पैदा करणार होता याचं उत्तर फक्त वन-खातंच देऊ शकणार होतं. कदाचित त्याचं घर जवळपास असावं आणि तिथून त्याने फॉर्म आणायला सांगितले असावेत. अर्थात तो काय आणतो, कसं आणतो, कुठून आणतो याच्याशी आम्हाला काहीही घेणं-देणं नव्हतं. फक्त तो ते फॉर्म्स किती लवकर आणतो हाच आमच्या दृष्टीने एकमेव कळीचा मुद्दा होता.

बराच वेळ झाला तरी तो फॉर्मवाला हरकाम्या काही परतला नाही. इकडे आमची चुळबुळ वाढायला लागली. हे म्हणजे नरड्यात घास कोंबलाय पण गिळू देत नाहीयेत अशासारखं काहीतरी होतं. न जाणो असाच वेळ जात राहिला आणि त्या जंगल्याचे विचार बदलले तर?? आम्हाला कल्पनाही सहन होत नव्हती. शेवटी अगदीच अति झाल्यावर आम्ही (आमच्या) प्राप्त परिस्थितीची जाणीव आणि आठवण करून देण्यासाठी त्याला पुन्हा एकवार डिवचलं.

"अजून किती वेळ लागेल? जरा लवकर करा ना. पावणे बाराची आमची शेवटची गाडी आहे. ती चुकली तर आम्हाला पूर्ण रात्र स्टेशनवर कुडकुडत काढावी लागेल." हे बोलताना त्या कल्पनेनेही आम्ही अक्षरशः थरथरत होतो.

"ते मी बघतो. त्याची तुम्ही काही काळजी करू नका" असं म्हणून तो अचानक उठला आणि त्याच्या खुर्चीमागे असलेल्या दोन कपाटांच्या मधल्या जागेतून कपाटांच्या मागे जायला लागला. त्या कपाटांमुळे त्या ऑफिसचे दोन भाग पडले होते. एक दर्शनी ऑफिस आणि दुसरा म्हणजे त्या कपाटांच्या मागे असलेली खोलीसदृश जागा. आता हा माणूस नेमकं काय करतोय हे न कळल्याने आम्हीही दोन कपाटांमधल्या जागेतून डोकावून बघू लागलो. तोवर त्याने कुठल्यातरी अदृश्य भिंतीवरचं अदृश्य बटन सराईतपणे चालू केलं. अचानक त्याच टिपिकल मंद पिवळ्या प्रकाशाने खोली भरून गेली आणि मागच्या भिंतीवर असलेल्या ठसठशीत मोठ्या खिडकीचं आम्हाला दर्शन झालं. तोवर तो त्या खिडकीपाशी पोचलाही होता. त्याने ती खिडकी उघडली आणि आमचे अक्षरशः आ वासले..

(हा शेवटचा) क्रमशः

- भाग ७ अर्थात अंतिम भाग इथे  वाचा.

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-५

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

* भाग ३ इथे  वाचा
* भाग ४ इथे  वाचा

मागोमाग दारही उघडलं गेलं. एका रापलेल्या चेहर्‍याच्या माणसाने आम्हाला बाहेर यायला फर्मावलं. आम्ही ताबडतोब बाहेर आलो. बाहेर येऊन आधी आमच्या मैत्रिणीं कशा आहेत ते पाहिलं.. त्या ठीक होत्या. सगळं ठीक वाटत होतं. आम्ही आत असताना त्यांची चौकशी चालू होती, त्यांना काही प्रश्न विचारले गेले, किंचित वादावादीही झाली  (हे सगळं आम्हाला नंतर कळलं) !!

"नावं सांगा" अचानक समोरून आवाज आला....

समोरच्या टेबलाच्या मागे असलेल्या खुर्चीवरून तो आवाज येत होता. खुर्चीत बसलेला तेल लावून केस मागे फिरवलेला, उभट चेहर्‍याचा, चष्मिस, बुटका माणूस हळू आवाजात बोलत होता. सरकारी (??) ऑफिसर आणि एवढा मृदू आवाज हे समीकरण अगदीच न पटणारं, अविश्वसनीय होतं. पण तरीही ते सत्य होतं.

"मुलांनो, तुमची नावं सांगा" तो पुन्हा एकदा तेवढ्याच हळू आवाजात म्हणाला.

त्याच्यासमोर त्याच्या नावाची पाटी होती. तो खरंच (!!) फॉरेस्ट ऑफिसर होता. पण उगाचंच लवकर हायसं वाटून घेतल्याने काय होतं याचा अनुभव नुकताच घेतला असल्याने आम्ही तेव्हा काहीही वाटून घेतलं नाही. आम्ही भराभर आमची नावं सांगितली आणि त्याने ती भराभर लिहून घेतली. त्यानंतर तो हळू आवाजात बोलायला लागला आणि बोलतच गेला. जवळपास अर्धा तास तो बोलत होता. पण त्याचं बोलणं जेव्हा संपलं तेव्हा आमच्या लक्षात एकच गोष्ट आली होती --किंवा एक गोष्ट तो आमच्या डोक्यात प्लांट करण्यात यशस्वी झाला होता असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल-- की आम्ही एक मोठा गुन्हा केला आहे आणि त्यासाठी आम्हाला दंड भरायला लागणार आहे आणि दंड भरला नाही तर आम्ही वन-संरक्षण कायद्याअंतर्गत काही (बहुतेक दहा.. आता नक्की आकडा आठवत नाहीये)  वर्षांसाठी तरी आत जाऊ शकतो.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे

- आम्ही संरक्षित (??) वनक्षेत्रात आग लावली (??) होती.

- जे जळलं ते गवत अतिशय दुर्मिळ आणि म्हणूनच अतिशय किमती होतं.

- एका चौरस मीटर गवताची किंमत कमीतकमी दोनशे रुपये होती.

- आम्ही अंदाजे शंभर चौरस मीटर क्षेत्रफळातलं गवत जाळलं होतं.

- आणि त्यामुळेच दंड म्हणून आम्हाला वीस हजार रुपये भरायला लागणार होते.

- जर दंड भरला नाही तर वनखातं आम्हाला दुसर्‍या दिवशी कोर्टात उभं करणार होतं. आमच्यावर खटला
चालणार होता आणि खटला जर हरलो असतो तर आम्हाला निदान दहा वर्षं तरी आत जायला लागणार होतं.

सगळं भविष्य अंधकारमय झाल्यासारखं वाटलं. डोक्यावर हात मारून घेऊन मटकन खाली बसण्याची जी एक वेळ असते ती हीच असावी. खरंच सगळीकडे अंधार पसरला होता. आई-बाबा, मित्र, कॉलेज, नोकरी, पेपरात नाव, गुन्हा, शिक्षा, मनःस्ताप असं सगळं सगळं दोन मिनिटांत डोळ्यासमोरून तरळून गेलं. पण क्षणभरच....... !!

कारण यातल्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये हे आम्हाला पुढच्याच क्षणी जाणवलं. त्याची ती आयडिया आमच्या डोक्यात प्लांट झाली होती खरी. पण तात्पुरतीच.... कारण लगेचच आम्हाला त्यातला फोलपणा जाणवला. सुदैवाने आमचे विचार, सारासार बुद्धी अजूनही जागृत होती.

- ते संरक्षित वनक्षेत्र होतं तर मग कुठेही तशी पाटी आणि/किंवा कुंपण का नव्हतं?....

- ते सो कॉल्ड गवत दुर्मिळ वगैरे नाही तर आपलं नेहमीचं साधं गवतच होतं हे सांगायला आमच्यापैकी कोणी वनस्पतीशास्त्रज्ञ असण्याची आवश्यकत नव्हती.

- आग लागण्यापूर्वी ज्या जागेवर आम्ही जीव मुठीत धरून उभे होतो त्या जागेला शंभर चौरस मीटरची जागा म्हणत असतील तर एकतर आम्हाला तरी पुन्हा गणित शिकायची आवश्यकता आहे किंवा तुम्हाला तरी. विशेष करून तुम्हालाच !

त्याच्या प्रत्येक प्रश्नाची आणि आक्षेपाची अशी चिरफाड आम्ही सहज करू शकत होतो. पण त्याने निष्पन्न काहीच झालं नसतं. उलट प्रकरण अजून गंभीर मात्र नक्कीच झालं असतं. त्यामुळे आम्ही त्याची सगळी बडबड ऐकून घेतली आणि शेवटी फक्त एवढंच म्हणालो

"आमच्याकडे वीस हजार रुपये नाहीत."

"बरं ते नंतर बघू." असं म्हणून त्याने एका फायलीत डोकं घातलं.

आता हा मध्येच हे काय वाचतोय, याच्या डोक्यात नक्की शिजतंय तरी काय असे विचार आमच्या डोक्यात थैमान घालत होते. जरा वेळाने त्याने फायलीतून डोकं बाहेर काढलं आणि आमच्यातल्या प्रत्येकाकडे एकेक करत रोखून बघायला लागला. होता होता मध्येच थांबून अचानक म्हणाला,

"अरे याच्या खांद्यातून रक्त येतंय का? काय झालं त्याला?" अचानक आलेल्या या प्रश्नाने आम्ही क्षणभर गांगरलो.

"तो उतरत असताना वाटेत घसरून पडला आणि दगडावर डोकं आपटलं."

"नाही पण मग खांद्यावर रक्त कसं?" त्याच्या त्या आवाजात उगाचंच एक वेगळा अर्थ दडला असल्यासारखं काहीतरी आम्हाला जाणवलं.

"अहो सरळ आहे. रक्त ओघळत खांद्यापर्यंत आलं. आमच्याकडे पाणी नव्हतं की मोठं बँडेड नव्हतं. तशीच कशीबशी जखम साफ करून रुमाल बांधला. पण तोवर बरंच रक्त गेलं." एव्हाना चाललेल्या प्रकाराने वैतागून जाऊन एका मुलीचा संयम संपला.

"बरं ठीक आहे. पण उतरताना घसरून पडला मग डोक्याच्या मागच्या बाजूला कसं काय एवढं लागलंय? पुढच्या बाजूला लागायला हवं ना? तुम्ही काहीतरी लपवताय... !!!!!! नक्की काहीतरी गडबड आहे."

"काहीही काय बडबडताय? तो उतरत असताना मागून उतरत असलेल्या एकीच्या पायाखालचा दगड निसटला आणि तो वेगाने घरंगळत येऊन पुढच्याच्या डोक्याला लागला. यात कसली आलीये गडबड? कसलं लपवणं? आता कसं, कुठून घसरून पडायचं ते काही कोणी ठरवून पडतं का?" आता मात्र तिला राहवत नव्हतं.

एक तर आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलोय दिवसभर, त्यात पुन्हा इथे अडकलोय आता आणि त्यात तुमचे हे निरर्थक प्रश्न !!! हे सगळे सगळे भाव तिच्या चेहर्‍यावर उफाळून आले होते. प्रकरण अगदीच हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर आमच्यातल्या एकाने तिला थांबवलं आणि त्या साहेबाला विचारलं.

"तुम्ही नक्की काय सुचवायचा प्रयत्न करताय? उतरताना मागून एक दगड घरंगळत आला याच्या डोक्याला लागला हे आम्ही तुम्हाला सांगतोय तर तुम्ही आम्हालाच उलटसुलट प्रश्न का विचारताय?"

"कारण सरळ आहे." अचानक इतका वेळ मृदू आवाजात बोलत असणारा माणूस हाच का असा प्रश्न पडावा इतकी जरब आवाजात आणून तो म्हणाला "कशावरून तो दगड घरंगळत आला होता? कशावरून तुम्हीच तुमच्या मित्राला मारायचा प्रयत्न केला नसेल?"

हा मात्र शुद्ध कहर होता. तो तारेत असल्यागत बडबडतोय याची आम्हाला खात्री झाली. पण तसं नव्हतं. तो मुद्दाम आम्हाला घाबरवण्यासाठी काहीही बडबडत होता. काहीतरी आरोप करत होता. आणि हे सगळं तो का करत होता ते आम्हाला लवकरच कळणार होतं.

"ओ. तोंड सांभाळून बोला. आमच्या आईवडिलांनी असले संस्कार केलेले नाहीत आमच्यावर" मगासच्या रणरागिणीने पुन्हा समशेर फिरवली.

"तोंडं तुम्ही सांभाळा तुमची. 'दुर्मिळ गवत जाळणं' एवढ्या एकाच आरोपाखाली तुम्हाला अटक होईल असं नाही एवढंच सांगायचा मी प्रयत्न करतोय. त्याच्याबरोबरच खुनाचा कट, खुनाचा प्रयत्न असेही आरोप लागतील."

हे सगळं खरंच चाललंय का मी एक मोठं दुःस्वप्न बघतोय असं मला वाटायला लागलं. कदाचित एवढ्यात जाग येईल आणि हे सगळं खोटं होतं, स्वप्न होतं हे कळेल असं सारखं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. तो जंगली ऑफिसर बोलतच होता बोलतच होता. बराच वेळ तीच तीच बडबड करून झाल्यावर अखेरीस तो म्हणाला.

"बोला मग आता काय करताय?"

"........" आमची तर बोलतीच बंद झाली होती.

"म्हणजे दंड भरताय की कोर्टात जाताय उद्या?"

ओओ... अहा.. ओक्के !!!!!!!! त्याच्या त्या प्रश्नात एक छुपी हिंट होती आणि एवढ्या वेळ फिरवून फिरवून बडबड करत तो तेच आम्हाला सुचवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी ऑफिसरकडून दुसरी काय अपेक्षा असणार म्हणा. पण आम्हाला एवढ्या वेळात हे कसं लक्षात आलं नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
अर्थात त्यात काही नवलही नव्हतं. आजचा दिवसच असा होता की आज काहीही घडलं असतं (म्हणजे वाईट) तरी आम्हाला आश्चर्य वाटलं नसतं. त्याच्या पलीकडे गेलो होतो आम्ही एव्हाना.

"साहेब, आमच्याकडे दंड भरायला पैसे नाहीयेत. आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. त्यामुळे एवढा दंड भरणं आम्हाला कोणालाच शक्य नाहीये."

"ठीके मग तुमच्या आईवडिलांना घेऊन या. ते भरतील दंड"

"......" आता याच्यावर काय बोलणार म्हणून आम्ही पुन्हा एकदा गप्प बसलो. पण आमच्या डोळ्यात फारच आर्तता वगैरे दाटली असावी. त्याला अचानक आमच्याबद्दल कणव दाटून आली.

"बरं एक करा दोन हजार रुपये द्या मी सोडतो तुम्हाला"

ते ऐकून आम्ही सगळे प्रचंड खुश झालो. पण तरीही एक प्रॉब्लेम होताच.. आमच्याकडे दोन हजार रुपये नव्हते... खरंच नव्हते... जवळपास सगळे शिकत होते आणि जेमतेम १-२ जण नोकरी करणारे होते. आणि काहीही असलं तरी ट्रेकला कोणी हजारो रुपये घेऊन जातं का? तस्मात प्रत्येकी अंदाजे शंभर रुपये गृहीत धरता आमच्याकडेही जेमतेम हजार एक रुपये असावेत.

"साहेब आमच्याकडे हजार रुपये असतील अंदाजे. ते घ्या आणि प्लीज आम्हाला जाऊद्या."

"नाही. दोन हजार तरी पाहिजेतच. एक हजार असतील तर एकालाच सोडेन.. !!!!!"

"एकालाच? म्हणजे?" क्षणभर काही रजिस्टरच होईना टाळक्यात. हा मनुष्य काय बडबडतोय ??

"नाही. दोन हजार दिले असतेत तर मी दोघांना सोडण्याचा विचार करत होतो. म्हणजे कसं एकाने जाण्यापेक्षा दोघांनी गेलेलं बरं. दोघांनी जा आणि तुमच्या पालकांकडून उरलेले अठरा हजार रुपये घेऊन या असं म्हणत होतो मी. तोवर बाकीचे इथेच राहतील. पण काही हरकत नाही. एक हजार देत असाल तर एकालाच जाऊन उरलेले पैसे आणावे लागतील. बोला कोण जातंय तुमच्यातलं??"

क्रमशः

(यानंतर फक्त एकच क्रमशः शिल्लक आहे.)

- भाग ६ इथे  वाचा.

Tuesday, March 1, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-४

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

* भाग ३ इथे  वाचा

हे अचानक काय चाललंय आम्हाला कळेना. तरी आम्ही त्याच्याकडे लक्ष न देता पुढे जाणार इतक्यात त्याच्या आजूबाजूच्या अजून ५-६ जणांनी अचानक आमच्या समोर उभं राहून आम्हाला जागच्या जागी उभं राहायला भाग पाडलं. आता मात्र आम्हाला नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं. भीतीही वाटायला लागली.

आम्ही काही बोलणार एवढ्यात आमचा रस्ता पहिल्यांदा अडवणारा माणूस म्हणाला,

"तुम्हाला साहेबांनी बोलावलंय"

"कोण साहेब?"

"इथले फॉरेस्ट ऑफिसर साहेब"

"फॉरेस्ट ऑफिसर? आणि आम्हाला कशाला बोलावलंय?"

"तुम्ही जंगलाला आग लावलीत. तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचाय. त्या आगीच्या बाबतीत तुमची चौकशी करायची आहे त्यांना. तुम्हाला नुकसानभरपाई द्यावी लागेल".. हे ऐकताक्षणी आम्ही गळपटलो. हे म्हणजे "मरे हुए को और मारना" प्रकारचं होतं. तरीही त्यातल्या त्यात काहीतरी प्रयत्न करणं भागच होतं.

"ओ गुन्हा बिन्हा काहीही काय बडबडताय? आणि आग लावली काय लावली. चुकून लागली आग. आणि नुकसानभरपाई कसली. थोडंसं गवत तर जळालंय. तेही चुकून पेटलं तर त्याची चौकशी कसली आणि नुकसानभरपाई कसली त्यात?" प्रकरण भलतंच भरकटतंयसं वाटून आमच्यातल्या दोन-तीन जणांनी पुढे होऊन आमची बाजू मांडायचा प्रयत्न केला.

"ते काय ते तुम्ही साहेबांशी बोला" त्या माणसांनी साफ हात झटकून टाकले.

काही झालं तरी त्यांच्या आणि त्यांच्या त्या सायबाच्या मनातलं खरं झाल्याशिवाय आमची काही इथून सुटका नाही हे त्यामानाने चटकन लक्षात येताच प्रकरण झटपट मिटवावं म्हणून आम्ही विचारलं "बरं, कुठे आहे तुमचा साहेब?"

"हे इथेच मागे आहे फॉरेस्ट ऑफिस" त्यांच्यातल्या एकाने लांब कुठल्यातरी एका टोकाला हात दाखवला. त्याने हात दाखवलेल्या ठिकाणी आम्हाला मोठं अंधारं माळरान सोडून बाकी काहीही दिसत नव्हतं.

"त्याच्यापेक्षा त्यांना इकडे यायला सांगा. आम्ही इथेच थांबतो ते येईपर्यंत" हा नक्कीच काहीतरी विचित्र प्रकार आहे याची जाणीव झाल्याने आम्ही त्यातल्या त्यात शेवटचा प्रयत्न करून बघितला. पण सकाळपपासूनच्या एकूणएक प्रयत्नांप्रमाणेच या प्रयत्नालाही यश आलं नाही. पुढच्या पाच मिनिटांत आम्ही त्यांच्या मागोमाग चालायला लागलो. आमच्या पुढे, मागे आणि भोवताली प्रत्येकी चार-पाच जण आणि त्या पंधरा जणांनी आवळलेल्या अदृश्य रिंगणात आम्ही थकलेभागलेले उपाशी दहा-बारा जण अशी सगळी वरात चालली होती. त्या सगळ्यांच्या हातात मोठमोठ्या काठ्या होत्या, चेहरे चांगले रापलेले आणि म्हणूनच भीतीदायक होते. सभोवताली मोठा मोकळा माळ आणि लांबून सतत न थांबता ऐकू येणारी रातकिड्यांची किरकिर या भयानक मिश्रणात आकाशातून येणारा शीतल चंद्रप्रकाशच काय तो मोहक वाटत होता.

होता होता चालून पंधरा वीस मिनिटं होऊन गेली तरी त्यांच्या साहेबाचं 'जवळच' असलेलं ऑफिस काही येईना. आम्ही मधेमधे दोन-तीन वेळा विचारण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दोन वेळा "आहे. इथे जवळच", "आलंच" सारखी उत्तरं मिळाली. जसजसे आम्ही जास्त जास्त चालत गेलो तसतशी ती उत्तरं मिळणंही बंद झाली. एक मात्र लक्षात येत होतं ते म्हणजे आम्ही बरंच अंतर कापलं आहे आणि पुन्हा गडाच्या पायथ्याच्या दिशेने कुठेतरी चाललो आहोत. ही लोकं आम्हाला कुठे घेऊन चालली होती याचा काहीच अंदाज येत नव्हता आणि त्यांनी घातलेल्या त्या अदृश्य कुंपणाने आणि त्यांच्या हातातल्या जाड काठ्यांनी मात्र अजूनच भीती वाटत होती. शेवटी जवळपास अर्धा-पाऊण तास चालल्यावर आमची प्रतीक्षा संपली.

आम्ही एका छोट्याशा उंचवट्यावर असलेल्या एका लहान बंगलीवजा घरासमोर येऊन थांबलो. कौलारू छपराच्या त्या घराला समोरून एक दार होतं आणि त्यातून आतला मंद पिवळा प्रकाश दिसत होता. सगळाच विचित्र प्रकार वाटत होता पण त्याहीपेक्षा विचित्र वाटत होता तो त्या घराभोवती जमलेला, लाठ्याकाठ्या हातात घेतलेला, जोरजोराने आरडाओरडा करणारा २५-३० माणसांचा जमाव. ही एवढी लोकं अचानक कुठून आली, आम्ही नक्की कुठे आहोत काही कळेना. ती मगासची माणसं म्हणतात त्याप्रमाणे हे फॉरेस्ट ऑफिसरचं आहे म्हणावं तर त्या घराच्या बाहेर कुठली पाटी-बिटीही नव्हती. जरा वेळ त्या घराबाहेर उभं राहायला लावून नंतर आम्हाला आत नेण्यात आलं. आत एक खुर्ची, टेबल, त्यावर बरीच कागदपत्रं, एक छोटा टेबलफॅन वगैरे ऑफिसात असणारं किरकोळ साहित्य होतं. पण ते ऑफिसचं सामान बघूनही आम्हाला इतकं हायसं वाटलं म्हणून सांगू. आम्ही फॉरेस्ट किंवा कुठल्याही का असेना पण एका (बहुतेक सरकारी) ऑफिसात होतो एवढं मात्र नक्की. पण ते हायसं वाटणं संपायच्या आतच उगाचंच एवढ्यात हायसं वाटून घेतलं असं वाटायला लागावं असं काहीतरी झालं.

आम्ही आत प्रवेश केल्या केल्या त्यांनी आम्हाला बाजूच्या एका खोलीत जायला सांगितलं. आम्ही सगळेजण निमूटपणे आत जायला लागलो. तेवढ्यात "फक्त मुलांनीच आत जा" असं हुकुम सुटला. आता मात्र आम्हाला प्रचंड टेन्शन आलं होतं. पण तिथे त्याक्षणी प्रतिकार करणं अधिक धोकादायक होतं. नक्की काय चाललंय ते बघून किंचित थांबून मग काय घडतंय किंवा काय करता येईल याचा विचार करू असं आम्ही ठरवलं. कदाचित आम्हाला वाटतं तितकं काही गंभीर नसेलही अशी मनाची समजूत घालून घेऊन, मुलींना डोळ्यांनीच "सांभाळून राहा.. आम्ही आलोच" असं सांगून आम्ही त्या खोलीत शिरलो. मला कल्पना आहे की आमचं हे वागणं आत्ता हे वाचणार्‍यांना प्रचंड विचित्र वाटत असेल (कारण आमचं आम्हालाही तेव्हा ते खूपच विचित्र वाटलं होतं.. पण करतो काय). पण आम्ही किती असहाय होतो हे मला खरंच आत्ता शब्दांत सांगता येणार नाही. कदाचित कधीच येणार नाही. असो. आम्ही आत शिरल्या शिरल्या खोलीचं दार बाहेरून बंद झालं. कडी लावल्याचा अस्पष्ट आवाजही आला.

खोलीत अंधुक पिवळा प्रकाश होता. एका कोपर्‍यात मोठ्ठा दोर ठेवला होता. त्याच्या बाजूला जाड बांबू, काठ्या, सळया,  सुतळी असं बरंच काही ठेवलं होतं. ते सामान बघून आम्हाला चांगलीच धडकी भरली. एकीकडे बाहेर काय होतंय या कल्पनेने आमचे जीव टांगणीला लागले होते. कानात प्राण आणून आम्ही बाहेर काय घडतंय याचा कानोसा घ्यायचा प्रयत्न करत होतो पण काहीच ऐकू येत नव्हतं, काहीच कळत नव्हतं, काहीच सुचत नव्हतं.... आम्ही जवळपास दहा-पंधरा मिनिटं अशीच असहायपणे काढली.

आणि अचानक बाहेरून दाराची कडी उघडल्याचा आवाज आला ....... !!!!

क्रमशः

- भाग ५ इथे  वाचा.

Monday, February 28, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-३

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

एवढ्यात अचानक जोरात चित्कारल्याचा आवाज आला. तो आमच्यातल्याच एकाचा आवाज होता आणि तो आनंदातिशयाने ओरडत होता. तो बाकी ग्रुपच्या थोडा पुढे होता आणि खाणाखुणा करून आम्हाला बोलवत होता. त्याचा तो आनंदाने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून सगळेजण अक्षरशः धावतच त्याच्याकडे गेलो. तो जिकडे उभा होता तिथून पायथा, रस्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सकाळी ओलांडलेला पोल्ट्री फार्म दिसत होता. बघता बघता आमचे चेहरे उजळले. काय करावं काही सुचेना. वेड्यासारखे ओरडत एकदा त्या पोल्ट्री फार्मकडे आणि एकदा एकमेकांच्या चेहर्‍यांकडे बघत होतो. प्रचंड आनंद झाला होता. लवकरच या दिवसभराच्या कटकटीतून आम्ही सुटणार होतो. पण... !!!

आमच्या फुग्याला क्षणभरातच टाचणी लागली. खालचा रस्ता, पोल्ट्री फार्म वगैरे सगळं दिसत होतं पण दिसत नव्हती ती एकच गोष्ट. आम्ही उभे होतो त्या टेकडीवरून खाली त्या पोल्ट्री फार्मपर्यंत जाण्याची वाट...... !!!!

पक्की वाट नाही की साधी छोटीशी पायवाट नाही. उलट सगळीकडे एक तर वाळलेलं गवत होतं किंवा मग निसरडे खडक.आता मात्र चांगलंच टेन्शन यायला लागलं होतं. दिवसभर पुरवून पुरवून वापरलेला पेशन्स आता मात्र संपला होता. सकाळपासून एकही गोष्ट धड झाली नव्हती. अर्थात सारखं सारखं तेच तेच रडगाणं गाऊनही उपयोग नव्हता. साडेपाच होत आले होते. बघता बघता आकाशातला सोनेरी रंग कमीकमी होत जात होता. लवकरच अंधार पडणार होता त्यामुळे तातडीने काहीतरी करायला लागणार होतं. आम्ही निर्णय घेतला. इथून उतरत खाली जाणं तर शक्य नव्हतं, आमच्या हातात वेळही नव्हता. आम्हाला एकच मार्ग सुचत होता, एकच पर्याय दिसत होता. आता विचार केला तर त्या पर्यायाला तितकासा अर्थ नव्हता हे लगेच लक्षात येतं. पण त्यावेळी तरी आमची सारासार विचार करण्याची बुद्धी खुंटली असावी.

आम्ही खाली पोचू शकत नसल्याने खालच्यांचं (जे तिथे होते की नव्हते हेही आम्हाला दिसत नव्हतं) लक्ष आमच्याकडे वेधून घेणं हा एकमेव पर्याय आम्हाला दिसत होता. अर्थात खाली असलेल्या लोकांचं लक्ष आमच्याकडे गेलं तरी "आम्ही चुकलो आहोत, खाली यायचा रस्ता कुठून आहे?" वगैरे गोष्टी आम्ही त्यांना कशा विचारणार होतो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आत्ताही नाही आणि तेव्हाही आमच्याकडे नव्हतं. पण मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही कोणी एवढा विचारही केला नव्हता.....

आमच्याकडे जुनी वर्तमानपत्रं होती. आमच्याकडे काडेपेटी होती. लक्ष वेधून घेण्याचा एकमेव मार्ग आम्हाला दिसत होता. बघता बघता वर्तमानपत्रांच्या गुंडाळ्या केल्या गेल्या आणि त्यांच्या टोकाशी पेटती काडी धरण्यात आली. सगळे कागद एकदम संपू नयेत म्हणून एका वेळी एकच वर्तमानपत्र पेटवण्याची हुशारी (!!) आम्ही दाखवत होतो. खरंच खाली कोणी होतं की नाही याचाही काही अंदाज येत नव्हता. पेटवलेलं वर्तमानपत्र जोरजोरात हलवून आमच्याकडे लक्ष वेधून घेण्याचा आमचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते. एकेक करत कागद संपत चाललेले बघून आमचा दिवसभर ताणून धरलेला उरला सुरला पेशन्सही संपला. कदाचित एकच पेटवलेला पेपर त्यांना दिसत नसेल म्हणून आम्ही उरलेले सगळे पेपर एका वेळी पेटवण्याचं ठरवलं आणि बघता बघता ते पेटवलेही. शेवटचा पेपर जाळून संपत चालला होता. पण ढिम्म........ शून्य.......... खाली (न)असलेल्या कोणालाही वर काय चाललंय इकडे लक्ष देण्याची काहीएक फिकीर पडली नव्हती. शेवटचा कागद अगदी बोटाला चटका बसेल इतक्या अखेरच्या क्षणापर्यंत हातात धरला गेला होता. हाताला जेव्हा चांगलाच चटका बसला त्यावेळी तो कागद हातातून खाली पडला. आणि खल्लास.........

एवढा वेळ शहाण्यासारखं आमच्याकडे पाहणार्‍या आणि आमच्या सभोवती जिकडे नजर जाईल तिथवर पसरलेल्या त्या वाळलेल्या गवताने बघता बघता पेट घेतला. अचानक सगळीकडे ज्वाळा दिसायला लागल्या. ती आग विझवण्याचे आकाशाला ठिगळ लावण्याचे आमचे निष्फळ प्रयत्न करून झाले. पण आग काही दाद देईना.... !!!

त्यानंतर जे झालं ते कसं झालं हे मला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही आठवत नाहीये. अंधुक अंधुकसं एवढं मात्र नक्की आठवतंय की बघावं तिकडे मोठमोठ्या ज्वाळांचं तांडव चालू होतं. ती धग असह्य झाल्यावर, पायाखालचं गवत जळायला लागल्यावर आमच्यातल्या प्रत्येकाने काहीही विचार न करता जिथून दिसेल तिथून, जिथून सुचेल तिथून खालच्या दिशेने उड्या घेतल्या. खरचटत, धडपडत, घसरत, पडत खाली आलो. काही मिनिटांपूर्वी इथून कसं उतरायचं वगैरेचे भंपक विचार करणारे आम्ही पाचव्या मिनिटाला (धडपडत का होईना पण) खाली आलो होतो. जवळपास प्रत्येकाचे गुढगे फुटले होते. कोपर, दंड, पाठ, मनगट अशा कुठल्या ना कुठल्या अवयवावर रक्तदान केल्याच्या खुणा उमटल्या होत्या. केस पिंजारले होते. चेहरे धुळीने माखले होते. पण कोणालाही त्याचं कसलंही दुःख नव्हतं. वाईट रीतीने अडकलेलो असताना अचानक सुटका झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर अगदी स्पष्ट दिसत होता. त्यासमोर या जखमा वगैरे फारच क्षुल्लक होत्या.

अजूनही तो पोल्ट्री फार्म अगदी जवळ असा नव्हता पण तिथपर्यंत जाण्याची वाट मात्र चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसत होती. पोल्ट्री फार्म क्रॉस केला की आम्ही सुटणार होतो. जसजसा तो पोल्ट्री फार्म जवळ यायला लागला तसतसा आमचा उत्साह वाढत चालला होता.

आम्ही एव्हाना त्या फार्मच्या एवढे जवळ येऊन पोचलो होतो की दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पहिली म्हणजे सकाळी जाताना लागलेला पोल्ट्री फार्म आणि आम्हाला आत्ता समोर दिसत असलेला फार्म वेगवेगळे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूला साधारण १५-२० घरांचा एक पाडा (छोटं गाव) होता. अचानक इतका वेळ विसरलेल्या किंवा दाबून ठेवलेल्या तहान-भूक वगैरे वगैरेची आम्हाला तीव्रतेने जाणीव झाली. पण तो पाडा इतका छोटा दिसत होता की तिथे खायला वगैरे काही मिळणं ही गोष्ट अगदीच दुरापास्त होती. पण निदान पाणी तरी नक्की मिळेल या आशेने आम्ही तिथल्या पहिल्या घरासमोर जाऊन उभे राहिलो आणि पाणी द्यायची विनंती केली. त्यांनी जणु आमच्या स्वागतासाठी पाणी तयारच ठेवलेलं असल्यागत भराभर पाण्याने भरलेले तांब्ये आमच्या हातात दिले.

खरंच सांगतो, आयुष्यात एका वेळी एकदम प्यायलं नसेल एवढं पाणी त्यादिवशी पहिल्यांदा प्यायलो. तहान भागल्यावरही निव्वळ प्यायचं म्हणून प्यायलो, चेहर्‍यावर ओतलं, मानेवर ओतलं, हात धुतले. पुन्हा भरपूर पाणी प्यायलो. पुन्हा पुन्हा प्यायलो. पाणी पिऊन मस्त ताजेतवाने होऊन आम्ही निघणार एवढ्यात..........

एवढ्यात तिथल्या एका माणसाने आमची वाट अडवली........ !!!!!!!!!!

क्रमशः

- भाग ४ इथे  वाचा.

Sunday, February 27, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-२

* भाग-१ इथे  वाचा.

वाट तुडवत उतरत असताना आम्ही पुन्हा एकदा आम्हाला एका सुकलेल्या ओहोळाच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या वाटेत फाईंड केलं. गड चढत असताना ही वाट आम्हाला लागली होती का (आमची वाट लागली होती याबद्दल तर वाटच... आपलं सॉरी वादच नव्हता) या प्रश्नाचं उत्तर आत्ताच काय पण तेव्हाही आम्ही ठामपणे 'हो' असं देऊ शकत नव्हतो. आम्ही खालच्या दिशेने चाललोय ही आमच्या दृष्टीने त्यावेळची एकमेव समाधानाची बाब होती. अजून एक चैनीची बाब म्हणजे आम्ही दोन्ही बाजूला घनदाट झाडी असलेल्या वाटेने उतरत होतो. त्यामुळे उन्हाचा तर पत्ता नव्हताच वर थंडगार हवेचा बोनस होता. तर तो बोनस घेत घेत त्या सुकलेल्या ओहोळातून उतरत असताना एका ठिकाणी आम्हाला बऱ्यापैकी सपाट जागा दिसली जिथे बसून आम्ही डबे खाऊ शकणार होतो. काही विचार न करता आम्ही ताबडतोब थांबून तिथे पोटपूजा करून घेण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेणं आणि तो अंमलात आणणं यातली धुसर सीमारेषा प्रसंगी किती रुंद होऊ शकते याचा प्रत्यय आम्हाला यायचा होता.

अरे हो... एवढा वेळ चुकचुकाट करण्याच्या नादात डब्याचा एक किस्सा सुरुवातीलाच सांगायचा होता तो राहूनच गेला. हरकत नाही. आता सांगतो. मला खात्री आहे की पुढचं वाक्य वाचून तुम्ही एक तर "च्यायला, काय फेकतोय यार हा" असं तरी म्हणाल किंवा मग "सत्य हे कल्पिताहून अदभूत (इथे फसवं) असतं" यावर तुम्हाला विश्वास तरी ठेवावा लागेल. तर झालं काय की यावेळी डब्यासाठी आम्ही एक वेगळी आयडिया केली होती. नेहमी प्रत्येक जण आपला डबा म्हणजे पोहे, उपमा, पराठे वगैरे काय काय आणत असतं त्याऐवजी यावेळी आम्ही असं ठरवलं होतं की दहा वेगवेगळे डबे आणण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्र सँडविचेस खाऊ आणि त्यासाठी लागणारं सामान एकेक करत प्रत्येकाने आणू. थोडक्यात ब्रेड एकाने आणायचे, दुसर्‍याने बटर, तिसर्‍याने कांदा.. असं करत करत प्रत्येकाने काही काही सामान आणलं की प्रत्येकाला आणायला लागायचं वजनही कमी असेल आणि सगळ्यांनी एकत्र सँडविच खायला मजा येईल !

ओके. आता बॅक टू ओहोळ. तर आम्ही तिथे असं छानपैकी गोल करून बसलो आणि प्रत्येकाने आपापले डबे काढायला सुरुवात केली आणि........ आणि आधीचा धक्का बरा होता असं म्हणायची पाळी यावी असे एकेक नवीननवीन धक्के आम्हाला बसायला लागले.

- प्रचंड उकाड्याने बटर विरघळून जाऊन डबा एकदम चिकट, तेलकट झाला होता.

- बटाट्यांना प्रचंड वास यायला लागला होता.

- त्या छोट्या टेकडीवरून चढ-उतार करताना नेमकी ब्रेडवाल्याची सॅक जमिनीवर आदळली असावी. कारण ब्रेड स्लाईसचा आकार अक्षरशः होत्याचा नव्हता झाला होता. ब्रेड तुटले होते, आक्रसले होते, मऊ झाले होते. एकूण इतका विचित्र प्रकार झाला होता की भलेही ब्रेड चांगला असला तरी त्याच्या त्या रुपाकडे बघून तो तोंडातही घालावासा वाटत नव्हता.

अखेरीस आमच्याकडे फक्त काकडीचे आणि कांद्याचे काप एवढंच काय ते शिल्लक राहिलं होतं. नाईलाजाने, कंटाळून, भूकेपोटी का होईना सगळ्यांनी त्याचा अक्षरशः दोन मिनिटात फन्ना उडवून टाकला..... आणि त्यानंतर आम्हाला अचानक एका भयंकर वास्तवाची जाणीव झाली. आमच्याकडचं जेवण, कोरडी खादाडी, पाणी असं सगळं सगळं पूर्णतः संपलं होतं.... गड पोहोचू शकायच्या पलीकडे होता.... पायथा दृष्टीक्षेपातही नव्हता. आमचा अक्षरशः त्रिशंकू झाला होता. तरीही न डगमगता, डोक्यावरच्या उन्हाची आणि शुष्क घशांची पर्वा न करता आम्ही पुन्हा उतरायला सुरुवात केली. त्या ओहोळ-वाटेतले दगड चांगलेच निसरडे आहेत आणि फार जपून पाऊल टाकणं आवश्यक आहे अन्यथा कपाळमोक्ष ठरलेलाच वगैरेची जाणीव मला पहिल्याच दगडावरून पाय निसटून, नाक, तोंड आणि पोट जोरदार जमिनीवर आपटल्यावर झाली. उरलेल्या काही लोकांना तीच जाणीव व्हायला दुर्दैवाने अधिक खडतर परीक्षा द्यावी लागली......

ओहोळ उतरताना आमच्यात दोन ग्रुप्स पडले होते. ग्रुप्स म्हणजे अगदी काही लांब वगैरे नाही.. दोन्ही ग्रुप्स एकमेकांच्या दृष्टीक्षेपातच पण अंतर जरा जास्त. वरच्या ग्रुपमधल्या एका मुलीच्या पायाखालून एक मोठा धोंडा निसटून तो धडधडत खाली येत खालच्या ग्रुपमधल्या सावधपणे बसून गड उतरत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला, मानेच्या किंचित वर जोरात लागला आणि काय होतंय ते कळायच्या आत तो धापकन जमिनीवर पालथा पडला. तो गडगडत येणारा दगड आणि त्याच्या आघाताने आमच्या मित्राने फोडलेली किंकाळी हे सगळं एवढ्या कमी वेळात झालं होतं की कोणाला काहीच कळलं नव्हतं. तो आवाज ऐकून सगळेजण अक्षरशः थरकापले. जेव्हा त्याच्या केसातून एक लालसर रंगाची धार खाली येऊन त्याच्या मानेवरून, कानावरून वाहून त्याचा खांदा भिजवायला लागली तेव्हा तर सगळ्यांचे पाय क्षणभर गोठल्यासारखे झाले. या अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरत लगेच त्याला उचलून कुठे लागलंय, किती लागलंय वगैरे बघायला आम्ही पुढे धावलो. सुदैवाने एवढ्या मोठ्या दगडाची धडक डोक्याला लागूनही आणि रक्तस्त्राव होऊनही तो शुद्धीवर होता. त्याची जखम धुवायलाही साधं पाणी नसल्याचं लक्षात आल्यावर आम्ही आततायीपणे पाणी संपवून टाकल्याबद्दल स्वतःलाच डझनावारी शिव्या घातल्या. शेवटी तसंच त्याच्या त्या जखमा रुमालांना, त्याच्या शर्टला वगैरे पुसून आम्ही त्याला त्यातल्यात्यात चालू शकण्याइतपत अवस्थेत आणलं.

अचानक एकाच्या डोक्यात काहीतरी आलं. त्याने ताबडतोब त्याची सॅक उघडून ग्लुकॉन-सी/डी चा एक मोठा खोका बाहेर काढला आणि आमच्या सगळ्यांच्या हातावर चिमूट चिमूट टाकलं. त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सगळ्यांनी ताबडतोब ते तोंडात टाकलं. ते तोंडात टाकताक्षणी तोंडात पाण्याचा एक जो भास निर्माण झाला त्याची तुलना फक्त मृगजळाशीच होऊ शकेल. आम्ही अक्षरशः मृगजळ पीत होतो मृगजळ. काही का असेना पण त्या चिमूटचिमूट ग्लुकॉन-सी ने तात्पुरती का होईना पण तरतरी वाटली. पुन्हा एकदा नव्या उमेदीने आम्ही झपझप उतरायला लागलो. जवळपास अर्धा तास सगळेजण शांतपणे उतरत होते. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. किंवा बोलायचे त्राणही नव्हते हे जास्त समर्पक. त्यामुळे आहे ती उर्जा साठवून ठेवून तिचा वापर बोलण्यापेक्षा चालण्यासाठी करुया असं साधं एनर्जी कन्झरवेशनचं सूत्र आम्ही (नकळत) वापरत होतो.

अर्धा तास न बोलता चालल्यावर आता मात्र बोलणं भागच आहे हे लक्षात आल्यावर एकाने तोंड उघडलं आणि त्याचं पुढचं वाक्य आमचा ठोका चुकवून गेलं. जवळपास १००% विश्वासाने आम्ही चुकलो असल्याचं त्याने जाहीर केलं. एवढा वेळ चालताना इतका वेळ घडणार्‍या अतर्क्य घटनांचा विचार करत असल्याने ही साधी-सोपी उघड वस्तुस्थिती कोणाच्या लक्षातच आली नव्हती. सगळेजण चरकलो. कारण तो म्हणाला ते पूर्णपणे सत्य होतं. त्या ओहोळातून उतरत उतरत आम्ही भलतीकडेच जात होतो. त्याक्षणी अचानक भानावर आल्यागत सगळ्यांनी इकडे तिकडे बघत आजूबाजूच्या वाटांचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. क्षणभर आम्ही कुठे आलो आहोत आणि नक्की कुठे जायचं आहे हे काही कळेचना. मग हळूहळू नीट विचार करून सगळ्यांनी धावपळ करण्यापेक्षा दोन-तीन जणांनी पुढे जाऊन वाट शोधून परत यावं आणि तोवर बाकीच्यांनी तिथेच बसून राहावं असं ठरलं. वीसेक मिनिटांत ते परत आले ते खांदे आणि चेहरे पाडूनच. कारण आजूबाजूला ओळखीचं काहीच दिसत नव्हतं. पण आम्ही चालतोय तो रस्ता तर नक्की चुकीचा होताच. त्यामुळे सर्वानुमते या ओहोळाच्या रस्त्यातून बाहेर पडणं हे अत्यावश्यक होतं. ओहोळाच्या रस्त्याच्या डावीकडून एका छोट्या वाटवजा रस्त्याने आम्ही त्या सुकलेल्या ओहोळाला अलविदा करून बाहेर पडलो. समोर दिसणार्‍या वाटेने हळूहळू अंदाज घेत चालणं चालू होतं. सगळ्यांच्या नजरा अक्षरशः चारी दिशांना घिरट्या घालत होत्या. एखादी ओळखीची वाट, ओळखीचं झाड, ओळखीचा कातळ असं काही काही शोधण्याचा प्रयत्न चालू होता. पण कुठेच काही हाती लागत नव्हतं. या सगळ्या गडबडीत आम्ही उपाशी आहोत, तहानलेले आहोत, एकाचं डोकं फुटून त्यातून रक्त वाहतंय वगैरे वगैरेची कसलीही शुद्ध आम्हाला नव्हती. आम्हाला काही करून रस्ता शोधायचा होता फक्त आणि तोही लवकरात लवकर. कारण मगाशी तीन वाजलेले बघितल्यानंतरचे दोन तास कधी कुठे आणि कसे गेले याचा काहीच हिशोब लागला नव्हता की आमच्या परिस्थितीतही विशेष काहीच फरक पडला नव्हता. उलट ती बिघडलीच जास्त होती. आता अजून फार तर तासाभरात अंधार पडायला सुरुवात होणार होती आणि अंधार्‍या रात्रीत जंगलात/डोंगरावर वाट शोधत फिरणं म्हणजे........... !!! आम्हाला कल्पनाही करवत नव्हती. झपाझप पावलं पडायला लागली. पण जाणार कुठे, कसं काहीच कळत नव्हतं. एवढ्यात..................................

क्रमशः

* आता अजून थोडेच भाग !!

- भाग ३ इथे  वाचा

Saturday, February 26, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-१

हापूसच्या गोडव्याचं वर्णन करणं हे निराळं आणि तो गोडवा प्रत्यक्ष अनुभवणं हे निराळं.... हा अनुभव म्हणजे असंच आम्ही प्रत्यक्ष हापूसचा गोडवा कसा चाखला होता त्याची गोष्ट. फरक एवढाच की त्यात गोडवाही नाहीये की हापूसही नाहीये. असले तर फणसाचे काटेच असतील आणि तेही कारल्याच्या कडूपणाबरोबर...... !!!

****  

गेल्या काही वर्षांत एकूण ट्रेकिंगच कमी-नगण्य-बंद अशा पायर्‍या उतरत गेल्याने हल्ली लक्षात येत नाही पण पूर्वी मात्र ट्रेकिंग म्हटलं की हमखास पेब डोळ्यासमोर यायचा आणि पेब म्हटलं की ८ फेब्रुवारी १९९८ डोळ्यासमोर चमकायचा. त्या पेब ट्रेकच्या आठवणी, झालेली प्रचंड दमछाक, तो गोंधळ, ती चुकामुक, तो उशीर... सगळं कसं पद्धतशीरपणे चुकलेलं.... !! थोडक्यात, या आठवणी 'रम्य त्या आठवणी' कॅटेगरीतल्या खचितच नाहीत (आणि वाटत असतील तर तो माझ्या लेखनशैलीचा दोष समजावा) कारण ट्रेकच्या रम्य आठवणींमध्ये गाणी, भेंड्या, धडपडणे, थट्टा, मस्करी, चढाई, रॉकपॅच, गप्पा, धुमाकूळ, आरडाओरडा असे प्रकार असतात. पण आमच्या पेब चढाईत यापैकी काहीच नव्हतं. असलंच तर जेमतेम १०% किंवा सकाळचे काही तासच !

सकाळी साधारण सात-साडेसातच्या सुमारास आम्ही नेरळ स्टेशनला उतरलो. प्रत्येक ट्रेकला होतो तसा चहा, वडापाव वगैरेचा कार्यक्रम पार पाडला. प्रत्येक ट्रेकला असतं तसं निरभ्र आकाश, मस्त फ्रेश हवा होती आणि प्रत्येक ट्रेकला असतो तसा एक मस्त, भन्नाट, बिनधास्त मूड आमचाही होता. आम्ही दहा-बारा जण होतो साधारण. चार-पाच मुली आणि बाकीची मुलं. काही महत्वाच्या फॅक्टस म्हणजे 

- निम्म्यापेक्षा जास्त लोकांचा पहिलाच ट्रेक होता, 
- सगळ्या मुलींचा पहिलाच ट्रेक होता आणि 
- आमच्यातल्या प्रत्येकाचाच हा पहिलाच पेब दौरा होता. 

थोडक्यात आधीच अनुभवी लोक कमी आणि त्यातही पेबचा अनुभव शून्य असलेले लोक अशी आमची एक अल्टिमेट गँग होती. हे दोन कारणांसाठी सांगतोय. पुढे येणार्‍या घटना वाचून तुम्ही आमचं नाव समर्थांच्या मुर्खविषयक लक्षणांमध्ये नोंदवण्यासाठी धावू नये म्हणून आणि दुसरं म्हणजे जे काही घडलं त्याचं खापर आम्हाला सर्वस्वी परिस्थितीवर फोडता येऊ नये म्हणूनही ! 

नेरळला स्टेशनात उतरून डावीकडे गेलं की माथेरानकडे जायचा रस्ता लागतो आणि उजवीकडून गेलं की पेबचा रस्ता हे आम्ही सगळ्यांनी एकमुखाने पाठ करून ठेवलं असल्याने स्टेशनातून बाहेर पडल्या पडल्या उजव्या दिशेने आमचा जथ्था निघाला. वाटेत ओहोळ, काही भलेमोठे विजेचे टॉवर्स, पोल्ट्री फार्म वगैरे वगैरे (चूभूद्याघ्या. बर्‍याच वर्षांपूर्वीचं वर्णन आहे.) खुणा लागेपर्यंत चालायचं अशीही माहिती आम्ही काढली होती. या सगळ्या गोष्टी ओलांडल्यावर लगेच (बहुतेक) डावीकडे एका वळणावर वळलं की आपण पेबच्या पायथ्याच्या दिशेने जायला लागतो या माहितीचाही त्यात समावेश होता. साधारण पाऊण-एक तास चालूनही आम्हाला यातला पोल्ट्री फार्म सोडून काहीही दिसलं नाही ....... म्हणजे आम्ही बहुधा सुरुवातीपासूनच रस्ता चुकलो असू असा निष्कर्ष आता काढणं सोपं असलं तरी तेव्हा आमच्या कोणाच्याही ते साधं डोक्यातही आलं नाही. त्यामुळे त्यावेळी पोल्ट्री फार्म लागल्यानंतर त्यानंतरच्या एका (कुठल्यातरी) डाव्या वळणाला वळून आम्ही बिनधास्त समोर दिसेल तो पेबचा पायथा असावा असं समजून तिथून चढायला लागलो. यातले बरेच तपशील चुकीचेही असतील. कदाचित एवढा मुर्खपणा, निष्काळजीपणा आम्ही केलेलाही नसेल. पण अर्थात त्याने नंतर घडणार्‍या घटनांवर काहीही परिणाम होणार नव्हता एवढं मात्र नक्की. तर त्या अगम्य सो कॉल्ड पायथ्यापासून चढाईला सुरुवात झाली. हसत खिदळत निवांत रस्ता कापणं चालू होतं. साधारण तासभराचं चढण झालं की एक छोटं पठार लागतं. ते पठार म्हणजे पेबचा साधारण अंदाजे हाफवे मार्क. त्या पठारावरून गडाच्या दिशेने जाण्यासाठी योग्य वाट पकडणं आवश्यक असतं. कारण तिथे बर्‍याच वाटा आहेत आणि त्या किल्ला सोडून इतर कुठेही जातात. त्यामुळे योग्य वाटेने जाणं अत्यावश्यक. या पठाराचं अजून एक महत्व म्हणजे समोरच्या डोंगरावरून कोसळणार्‍या धबधब्याचं मनमोहक दर्शन. साधारण इथे हिरवळीवर पहिला ब्रेक घेऊन, थोडी खादाडी करून, धबधब्याचं सौंदर्य अनुभवून गडाच्या दिशेने कुच करण्याचा रिवाज, शिरस्ता वगैरे वगैरे आहे. पण अर्थातच आम्ही तो रिवाज पाळला नाही. म्हणजे पाळावाच लागला नाही. ती वेळच आमच्यावर आली नाही.. कारण ते मुदलातलं पठार आणि तो धबधबाच आम्हाला न लागल्याने त्यावर चढलेलं चुकीच्या वाटांचं व्याज आमच्या नशिबी आलं नाही. अर्थात पण त्याने काही फरक पडला नाही. कारण आम्ही आमच्या चुकण्याचा वाटा स्वतः ठरवत होतो आणि पावलागणिक त्यात वाढ होत होती. असो. ते सगळं नंतर येईलच..

तर "त्या पठारावरून पुढे जाताना सांभाळून जा आणि योग्य वाट निवडा" असे महत्वाचे सल्ले देणार्‍यांच्या तपशीलात एक गडबड होती. "त्या पठारापर्यंत येतायेताच चुकलो तर काय" याविषयी कोणीच काहीच सांगितलं नव्हतं. त्या प्रश्नाचं नवनीत मार्गदर्शक, २१-अपेक्षित वगैरे वगैरे आमच्याकडे नव्हतं. कारण पठारापर्यंत येतानाच आम्ही चुकू हे कोणाच्या खिजगणतीतही नव्हतं. बहुतेक आत्तापर्यंत कधीच कोणीच असली क्षुल्लक, फुटकळ वगैरे चूक केलेली नसावी. पण "प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी पहिल्यांदाच घडते" या नियमाला सर्वार्थाने सिद्ध करण्याची जवाबदारी आमच्या अननुभवी खांद्यांवर होती आणि त्याच्या सिद्धतेसाठी आम्ही अनावधानाने का होईना जंग जंग पछाडत होतो. तर थोडक्यात आम्हाला ते पठार न लागल्याने आम्ही समोर दिसेल तसा डोंगर चढत होतो, दिसेल ती वाट तुडवत होतो. तरीही म्हणावं तसं टेन्शन कोणाच्याच चेहर्‍यावर दिसत नव्हती कारण ज्याप्रमाणे "अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आधी अन्याय होतोय हेच कळणं आवश्यक असतं" त्याप्रमाणे चुकलो आहोत याचं टेन्शन येण्यासाठी आधी आम्ही चुकलो आहोत हेच आमच्यापैकी कोणाच्या गावीही नव्हतं. म्हणजे थोडंसं चुकलो आहोत याची कल्पना होती पण एवढं मोठं 'बलंडर' होतंय हे कोणालाही कळलं नव्हतं.

तर वाट तुडवता तुडवता ते विंग्रजी कादंबर्‍यांत वर्णन असतं की "ही फाउंड हिमसेल्फ इन फ्रंट ऑफ चर्च" अक्षरशः अगदी तसंच आम्ही आम्हाला अचानकच एका सत्तर अंशाच्या चढासमोर फाईंड केलं. म्हणजे अक्षरशः खरंच अचानक तो एवढा मोठा चढ/डोंगर/टेकडी समोर कुठून आली हे आम्हाला कळलंही नाही. आधी माफक आणि होता होता भयानक प्रयत्न करूनही आम्ही तो चढ चढू शकू याची कुठलीही चिन्हं दिसेनात. बरेच प्रयत्न केले तरी कोणीही माघार घेईना. कोणीही म्हणजे आम्हीही नाही की ती टेकडीही नाही याअर्थी.. एव्हाना सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. भयंकर उकडायला लागलं होतं. अक्षरशः आग आग होत होती. त्यादिवशी रोजच्यापेक्षा थोडं जास्तच ऊन पडलं होतं. अतीच गरम होत होतं. किंवा कदाचित नसेलही होत पण दर अर्ध्या तासाने पाणी पिऊन पिऊन आमच्याकडचं पाणी आम्ही संपवून टाकल्याने निदान आम्हाला तरी तसं वाटलं तेव्हा. पाणी संपलंय म्हटलं की अजून तहान लागते त्याप्रमाणे एकाच्या घशाला कोरड पडतेय ना पडतेय तोवर दुसर्‍यालाही ती जाणीव झाली आणि होता होता त्या गोष्टीचं जाणीव-अफवा-बातमी असं प्रमोशन होत होत सगळ्यांच्याच घशाला अचानक सामाईक कोरड पडली. झालं.. आता मात्र प्रसंग बाका होता. डोक्यावर रणरणता सूर्य, सुकलेले घसे, पोटात भूक आणि समोर न चढता येऊ शकणारी अशी उंच टेकडी... डबे होते पण ते या एवढ्या तळपत्या उन्हात आणि धड उभंही राहायला जागा नसलेल्या ठिकाणी खाणं शक्य नव्हतं. सुकी खादाडी चालताचालताच करून संपून गेली होती. काय करावं सुचत नव्हतं. तेवढ्यात त्या चढावरून थेट वर न जाता त्याला वळसा घालून जाऊन बघू अशी एक कल्पना कोणालातरी सुचली. अर्थात ज्याप्रमाणे प्रत्येक कल्पना सुचवणार्‍याला आपली कल्पना अभिनव वाटत असते त्याप्रमाणे यालाही ती वाटली परंतु आजूबाजूच्या सुकलेल्या घशांनी त्या एकमेव चाललेल्या मेंदूवर मात केली. सगळे त्या टेकडीच्या पायथ्याशी बसून राहिले होते. काही मिनिटांपूर्वी हसत खिदळत चालणार्‍या ग्रुपमध्ये अचानकपणे अंगात उठण्याचंही बळ नसल्यागत झालं. 

"ठीके.. तुम्ही सगळ्यांनी इथेच बसा. मी थोडं आजूबाजूला बघून येतो" त्या कल्पनेच्या मालकाने प्रस्ताव मांडला आणि लोकांचं मौन हीच त्यांची मूकसंमती गृहीत धरून तो चालायलाही लागला. सगळेजण वैतागून, काही न बोलता तिथेच तसेच बसले होते. काहीजण त्या जळत्या उन्हाचा बिमोड करण्यासाठी म्हणून रुमाल हलवून अक्षरशः 'सुर्व्याने' काजव्यासमोर चमकण्याचा प्रयत्न करत होते. असाच काही वेळ शब्दशः जळफळाट (डोक्यावर आणि पोटातही) सहन करेपर्यंत तो मालक पुन्हा हजर झाला. ओरडतच... !!! आमच्यातल्या दोघा तिघांना त्याने त्याच्याबरोबर यायला सांगितलं. दहा पंधरा मिनिटांनी तो कल्पनेचा मालक आणि त्याच्याबरोबर कल्पना बघायला गेलेले ते ३-४ प्रेक्षक असा सगळा ग्रुप परत आला. सगळ्यांच्या चेहर्‍यावर टेकडीच्या मागच्या बाजूला तानसा-वैतरणा तलाव आणि त्याच्या शेजारी आंबरस-पुरीचं पोटभर जेवण पुरवणारं हॉटेल असावं इतका आनंद ओसंडून वाहत होता. त्याचं कारणही तसंच होतं. एक म्हणजे थोडं मागच्या बाजूने गेल्यावर तो चढ तितकासा भयंकर नव्हता. त्याच्या कोनात भरघोस घट होती आणि दुसरं म्हणजे तिथून काही अंतरावर गड, सुळका वगैरे वगैरे असं काय काय दृष्टीक्षेपात येत होतं. हे असं काही ऐकल्यावर सुकलेले घसे, थंडावलेले मेंदू, थकलेली गात्रं एकदम उठून उभी राहिली. अक्षरशः दहा मिनिटांत आम्ही पुन्हा एकदा आम्हाला त्या कमी कोनाच्या चढाच्या पायथ्याशी फाईंड केलं.

होता होता अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर, हात धरून, साखळ्या बिखळ्या करून आम्ही कसेबसे तो चढ पार करण्यात यशस्वी झालो. पण........... वर पोचल्यावर आमच्या लक्षात आलं की इथे आलो तरीही परिस्थितीत विशेष असा काहीच फरक पडलेला नाही. पण एक छोटंसं झाड, कमी चढ, निदान कसंबसं का होईना बसता येण्यापुरती थोडीशी जागा अशा काही काही जमेच्या बाबी होत्या. पण तरीही डबे काढून, गप्पा मारत जेवणावर ताव मारता येणं हे अजूनही स्वप्नवतच होतं. कारण तेवढी जागा तिथेही नव्हतीच.... मला वाटतं तो आमचा 'ब्रेकिंग पॉईंट' ठरला. हिंदी चित्रपटातल्या 'दर दर की ठोकरे' खाल्ल्यावरही कुठेही नोकरी न मिळाल्याने गुन्हेगारी मार्गाकडे वाळलेल्या सुशिक्षित बेकार तरुणाप्रमाणे किंवा गरिबीला कंटाळून, आजारी मुलासाठी औषधं घ्यावीत म्हणून शेवटी नाईलाजाने चोरी करणार्‍या बापाप्रमाणे आमची अवस्था झाली होती. च्यायला, एवढं तडफडत, साखळ्या करत, उन तुडवत टेकडी चढून वर आलो ते काय पुन्हा वर येऊन उपाशीपोटी उभं राहण्यासाठी?? अरे हट !! हळूहळू तो पॉईंट कॉमन ब्रेकिंग पॉईंट ठरला. आपण रस्ता चुकलो आहोत हे मान्य करायलाच हवं, अजून शोधाशोध करून उगाच धडपडत, तडफडत, रस्ते शोधत वर जाण्याचा अट्टाहास सोडून द्यायला हवा हे जवळपास प्रत्येकाला पटलं. तरी एक-दोन मतं अशी होतीच की एवढे आलोय तर अजून थोडं वर जायला काय हरकत आहे. गड दिसतोय, साधारण अजून एक-दीड तासात गडावर पोहोचूही. गडावर भरपूर थंडगार निर्मळ पाणी आहे. क्षणभरासाठी का होईना गडाच्या टाक्यांमधलं थंड, निर्मळ, भरपूर पाणी हा वर चढाई करायला उद्युक्त करण्यासाठीचा एक आकर्षक मुद्दा भासत होता. पण तो भासमानच होता. कारण एक-दीड तासात पोचलो नाही तर काय? पुन्हा चुकलो तर काय? गडावर पाणी नसलं तर काय (हा पर्याय अशक्य होता.. तरीही)? असलं तरी पिण्यायोग्य नसलं तर काय? आणि एवढं सगळं करूनही वर पोचलो, वर पाणी असलं तरी वर पोचल्या पोचल्या जेमतेम दहा मिनिटं थांबून ताबडतोब परत फिरायला लागणार होतं. कारण या सगळ्या गडबडघोटाळ्यात, चुकामुकीत घडाळ्यात दुपारचे तीन वाजले आहेत याची कोणाला जाणीवच झाली नव्हती. मात्र ज्याक्षणी ती झाली (म्हणजे तीन वाजता ;) ) त्याक्षणी वरती साक्षात अमृत असलं तरी वर न जाता सरळ गड उतरायला लागायचा हा आमचा निर्णय पक्का झाला. कारण वर पोचायला लागणार्‍या तासा-दीड तासाच्या वेळेतच आम्ही खाली पोचू शकणार होतो, पोटभर खाऊ शकणार होतो. थंडगार पाणी पिऊ शकणार होतो. "खा मटार उसळी, खा शिकरण" वाल्या पुणेरी चैनीप्रमाणे सावलीत बसून पोटभर खाणं आणि थंडगार पाणी पिणं ही आमच्या दृष्टीने चैन होती त्या क्षणी. तर त्या चैनीच्या दिशेने मार्गक्रमणा करायला आम्ही सुरुवात केली. चढताना दमत थकत चढलेली ती टेकडी उतरताना मात्र आम्ही आश्चर्यकारक वेगाने उतरलो. गडावर पोचू न शकल्याचं दुःख, ट्रेक अर्धवट सोडावा लागल्याचं शल्य, तथाकथित अपमान, त्यातून येऊ शकणारं नैराश्य वगैरे वगैरे भावनांना (निदान तेव्हा तरी) पट्टीचे ट्रेकर नसल्याने निदान त्याक्षणी तरी आमच्या मनात थारा नव्हता आणि असलाच तरी त्या व्यक्त न करण्याएवढा सुज्ञपणा सुदैवाने जवळपास प्रत्येकाने दाखवला.. 

क्रमशः 

* जास्त मोठ्या पोस्ट्स असल्या की वाचणारा कंटाळतो या आजवरच्या अनुभवाने आणि स्वानुभवानेही मुद्दाम ही पोस्ट काही भागांमध्ये लिहितोय. कदाचित नेहमीपेक्षा अधिक भाग टाकावे लागतील. थोडक्यात, क्रमशः लिहून त्रास देण्याचा कुठलाही उद्देश नाही याची कृ नों घे :) 

- भाग २ इथे  वाचा.

२०२५ ची वाचनपूर्ती

२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...