Wednesday, March 2, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-५

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

* भाग ३ इथे  वाचा
* भाग ४ इथे  वाचा

मागोमाग दारही उघडलं गेलं. एका रापलेल्या चेहर्‍याच्या माणसाने आम्हाला बाहेर यायला फर्मावलं. आम्ही ताबडतोब बाहेर आलो. बाहेर येऊन आधी आमच्या मैत्रिणीं कशा आहेत ते पाहिलं.. त्या ठीक होत्या. सगळं ठीक वाटत होतं. आम्ही आत असताना त्यांची चौकशी चालू होती, त्यांना काही प्रश्न विचारले गेले, किंचित वादावादीही झाली  (हे सगळं आम्हाला नंतर कळलं) !!

"नावं सांगा" अचानक समोरून आवाज आला....

समोरच्या टेबलाच्या मागे असलेल्या खुर्चीवरून तो आवाज येत होता. खुर्चीत बसलेला तेल लावून केस मागे फिरवलेला, उभट चेहर्‍याचा, चष्मिस, बुटका माणूस हळू आवाजात बोलत होता. सरकारी (??) ऑफिसर आणि एवढा मृदू आवाज हे समीकरण अगदीच न पटणारं, अविश्वसनीय होतं. पण तरीही ते सत्य होतं.

"मुलांनो, तुमची नावं सांगा" तो पुन्हा एकदा तेवढ्याच हळू आवाजात म्हणाला.

त्याच्यासमोर त्याच्या नावाची पाटी होती. तो खरंच (!!) फॉरेस्ट ऑफिसर होता. पण उगाचंच लवकर हायसं वाटून घेतल्याने काय होतं याचा अनुभव नुकताच घेतला असल्याने आम्ही तेव्हा काहीही वाटून घेतलं नाही. आम्ही भराभर आमची नावं सांगितली आणि त्याने ती भराभर लिहून घेतली. त्यानंतर तो हळू आवाजात बोलायला लागला आणि बोलतच गेला. जवळपास अर्धा तास तो बोलत होता. पण त्याचं बोलणं जेव्हा संपलं तेव्हा आमच्या लक्षात एकच गोष्ट आली होती --किंवा एक गोष्ट तो आमच्या डोक्यात प्लांट करण्यात यशस्वी झाला होता असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल-- की आम्ही एक मोठा गुन्हा केला आहे आणि त्यासाठी आम्हाला दंड भरायला लागणार आहे आणि दंड भरला नाही तर आम्ही वन-संरक्षण कायद्याअंतर्गत काही (बहुतेक दहा.. आता नक्की आकडा आठवत नाहीये)  वर्षांसाठी तरी आत जाऊ शकतो.

त्याच्या म्हणण्याप्रमाणे

- आम्ही संरक्षित (??) वनक्षेत्रात आग लावली (??) होती.

- जे जळलं ते गवत अतिशय दुर्मिळ आणि म्हणूनच अतिशय किमती होतं.

- एका चौरस मीटर गवताची किंमत कमीतकमी दोनशे रुपये होती.

- आम्ही अंदाजे शंभर चौरस मीटर क्षेत्रफळातलं गवत जाळलं होतं.

- आणि त्यामुळेच दंड म्हणून आम्हाला वीस हजार रुपये भरायला लागणार होते.

- जर दंड भरला नाही तर वनखातं आम्हाला दुसर्‍या दिवशी कोर्टात उभं करणार होतं. आमच्यावर खटला
चालणार होता आणि खटला जर हरलो असतो तर आम्हाला निदान दहा वर्षं तरी आत जायला लागणार होतं.

सगळं भविष्य अंधकारमय झाल्यासारखं वाटलं. डोक्यावर हात मारून घेऊन मटकन खाली बसण्याची जी एक वेळ असते ती हीच असावी. खरंच सगळीकडे अंधार पसरला होता. आई-बाबा, मित्र, कॉलेज, नोकरी, पेपरात नाव, गुन्हा, शिक्षा, मनःस्ताप असं सगळं सगळं दोन मिनिटांत डोळ्यासमोरून तरळून गेलं. पण क्षणभरच....... !!

कारण यातल्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये हे आम्हाला पुढच्याच क्षणी जाणवलं. त्याची ती आयडिया आमच्या डोक्यात प्लांट झाली होती खरी. पण तात्पुरतीच.... कारण लगेचच आम्हाला त्यातला फोलपणा जाणवला. सुदैवाने आमचे विचार, सारासार बुद्धी अजूनही जागृत होती.

- ते संरक्षित वनक्षेत्र होतं तर मग कुठेही तशी पाटी आणि/किंवा कुंपण का नव्हतं?....

- ते सो कॉल्ड गवत दुर्मिळ वगैरे नाही तर आपलं नेहमीचं साधं गवतच होतं हे सांगायला आमच्यापैकी कोणी वनस्पतीशास्त्रज्ञ असण्याची आवश्यकत नव्हती.

- आग लागण्यापूर्वी ज्या जागेवर आम्ही जीव मुठीत धरून उभे होतो त्या जागेला शंभर चौरस मीटरची जागा म्हणत असतील तर एकतर आम्हाला तरी पुन्हा गणित शिकायची आवश्यकता आहे किंवा तुम्हाला तरी. विशेष करून तुम्हालाच !

त्याच्या प्रत्येक प्रश्नाची आणि आक्षेपाची अशी चिरफाड आम्ही सहज करू शकत होतो. पण त्याने निष्पन्न काहीच झालं नसतं. उलट प्रकरण अजून गंभीर मात्र नक्कीच झालं असतं. त्यामुळे आम्ही त्याची सगळी बडबड ऐकून घेतली आणि शेवटी फक्त एवढंच म्हणालो

"आमच्याकडे वीस हजार रुपये नाहीत."

"बरं ते नंतर बघू." असं म्हणून त्याने एका फायलीत डोकं घातलं.

आता हा मध्येच हे काय वाचतोय, याच्या डोक्यात नक्की शिजतंय तरी काय असे विचार आमच्या डोक्यात थैमान घालत होते. जरा वेळाने त्याने फायलीतून डोकं बाहेर काढलं आणि आमच्यातल्या प्रत्येकाकडे एकेक करत रोखून बघायला लागला. होता होता मध्येच थांबून अचानक म्हणाला,

"अरे याच्या खांद्यातून रक्त येतंय का? काय झालं त्याला?" अचानक आलेल्या या प्रश्नाने आम्ही क्षणभर गांगरलो.

"तो उतरत असताना वाटेत घसरून पडला आणि दगडावर डोकं आपटलं."

"नाही पण मग खांद्यावर रक्त कसं?" त्याच्या त्या आवाजात उगाचंच एक वेगळा अर्थ दडला असल्यासारखं काहीतरी आम्हाला जाणवलं.

"अहो सरळ आहे. रक्त ओघळत खांद्यापर्यंत आलं. आमच्याकडे पाणी नव्हतं की मोठं बँडेड नव्हतं. तशीच कशीबशी जखम साफ करून रुमाल बांधला. पण तोवर बरंच रक्त गेलं." एव्हाना चाललेल्या प्रकाराने वैतागून जाऊन एका मुलीचा संयम संपला.

"बरं ठीक आहे. पण उतरताना घसरून पडला मग डोक्याच्या मागच्या बाजूला कसं काय एवढं लागलंय? पुढच्या बाजूला लागायला हवं ना? तुम्ही काहीतरी लपवताय... !!!!!! नक्की काहीतरी गडबड आहे."

"काहीही काय बडबडताय? तो उतरत असताना मागून उतरत असलेल्या एकीच्या पायाखालचा दगड निसटला आणि तो वेगाने घरंगळत येऊन पुढच्याच्या डोक्याला लागला. यात कसली आलीये गडबड? कसलं लपवणं? आता कसं, कुठून घसरून पडायचं ते काही कोणी ठरवून पडतं का?" आता मात्र तिला राहवत नव्हतं.

एक तर आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलोय दिवसभर, त्यात पुन्हा इथे अडकलोय आता आणि त्यात तुमचे हे निरर्थक प्रश्न !!! हे सगळे सगळे भाव तिच्या चेहर्‍यावर उफाळून आले होते. प्रकरण अगदीच हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर आमच्यातल्या एकाने तिला थांबवलं आणि त्या साहेबाला विचारलं.

"तुम्ही नक्की काय सुचवायचा प्रयत्न करताय? उतरताना मागून एक दगड घरंगळत आला याच्या डोक्याला लागला हे आम्ही तुम्हाला सांगतोय तर तुम्ही आम्हालाच उलटसुलट प्रश्न का विचारताय?"

"कारण सरळ आहे." अचानक इतका वेळ मृदू आवाजात बोलत असणारा माणूस हाच का असा प्रश्न पडावा इतकी जरब आवाजात आणून तो म्हणाला "कशावरून तो दगड घरंगळत आला होता? कशावरून तुम्हीच तुमच्या मित्राला मारायचा प्रयत्न केला नसेल?"

हा मात्र शुद्ध कहर होता. तो तारेत असल्यागत बडबडतोय याची आम्हाला खात्री झाली. पण तसं नव्हतं. तो मुद्दाम आम्हाला घाबरवण्यासाठी काहीही बडबडत होता. काहीतरी आरोप करत होता. आणि हे सगळं तो का करत होता ते आम्हाला लवकरच कळणार होतं.

"ओ. तोंड सांभाळून बोला. आमच्या आईवडिलांनी असले संस्कार केलेले नाहीत आमच्यावर" मगासच्या रणरागिणीने पुन्हा समशेर फिरवली.

"तोंडं तुम्ही सांभाळा तुमची. 'दुर्मिळ गवत जाळणं' एवढ्या एकाच आरोपाखाली तुम्हाला अटक होईल असं नाही एवढंच सांगायचा मी प्रयत्न करतोय. त्याच्याबरोबरच खुनाचा कट, खुनाचा प्रयत्न असेही आरोप लागतील."

हे सगळं खरंच चाललंय का मी एक मोठं दुःस्वप्न बघतोय असं मला वाटायला लागलं. कदाचित एवढ्यात जाग येईल आणि हे सगळं खोटं होतं, स्वप्न होतं हे कळेल असं सारखं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. तो जंगली ऑफिसर बोलतच होता बोलतच होता. बराच वेळ तीच तीच बडबड करून झाल्यावर अखेरीस तो म्हणाला.

"बोला मग आता काय करताय?"

"........" आमची तर बोलतीच बंद झाली होती.

"म्हणजे दंड भरताय की कोर्टात जाताय उद्या?"

ओओ... अहा.. ओक्के !!!!!!!! त्याच्या त्या प्रश्नात एक छुपी हिंट होती आणि एवढ्या वेळ फिरवून फिरवून बडबड करत तो तेच आम्हाला सुचवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी ऑफिसरकडून दुसरी काय अपेक्षा असणार म्हणा. पण आम्हाला एवढ्या वेळात हे कसं लक्षात आलं नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
अर्थात त्यात काही नवलही नव्हतं. आजचा दिवसच असा होता की आज काहीही घडलं असतं (म्हणजे वाईट) तरी आम्हाला आश्चर्य वाटलं नसतं. त्याच्या पलीकडे गेलो होतो आम्ही एव्हाना.

"साहेब, आमच्याकडे दंड भरायला पैसे नाहीयेत. आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. त्यामुळे एवढा दंड भरणं आम्हाला कोणालाच शक्य नाहीये."

"ठीके मग तुमच्या आईवडिलांना घेऊन या. ते भरतील दंड"

"......" आता याच्यावर काय बोलणार म्हणून आम्ही पुन्हा एकदा गप्प बसलो. पण आमच्या डोळ्यात फारच आर्तता वगैरे दाटली असावी. त्याला अचानक आमच्याबद्दल कणव दाटून आली.

"बरं एक करा दोन हजार रुपये द्या मी सोडतो तुम्हाला"

ते ऐकून आम्ही सगळे प्रचंड खुश झालो. पण तरीही एक प्रॉब्लेम होताच.. आमच्याकडे दोन हजार रुपये नव्हते... खरंच नव्हते... जवळपास सगळे शिकत होते आणि जेमतेम १-२ जण नोकरी करणारे होते. आणि काहीही असलं तरी ट्रेकला कोणी हजारो रुपये घेऊन जातं का? तस्मात प्रत्येकी अंदाजे शंभर रुपये गृहीत धरता आमच्याकडेही जेमतेम हजार एक रुपये असावेत.

"साहेब आमच्याकडे हजार रुपये असतील अंदाजे. ते घ्या आणि प्लीज आम्हाला जाऊद्या."

"नाही. दोन हजार तरी पाहिजेतच. एक हजार असतील तर एकालाच सोडेन.. !!!!!"

"एकालाच? म्हणजे?" क्षणभर काही रजिस्टरच होईना टाळक्यात. हा मनुष्य काय बडबडतोय ??

"नाही. दोन हजार दिले असतेत तर मी दोघांना सोडण्याचा विचार करत होतो. म्हणजे कसं एकाने जाण्यापेक्षा दोघांनी गेलेलं बरं. दोघांनी जा आणि तुमच्या पालकांकडून उरलेले अठरा हजार रुपये घेऊन या असं म्हणत होतो मी. तोवर बाकीचे इथेच राहतील. पण काही हरकत नाही. एक हजार देत असाल तर एकालाच जाऊन उरलेले पैसे आणावे लागतील. बोला कोण जातंय तुमच्यातलं??"

क्रमशः

(यानंतर फक्त एकच क्रमशः शिल्लक आहे.)

- भाग ६ इथे  वाचा.

43 comments:

 1. ह्या ह्या ह्या -

  मी समजू शकतो. एकदा वाई जवळ धोम धरणात फोटो काढले होते. त्यांना कुठून कळल कुणास ठावूक; १५-२० मिनिटानी चेक नाक्यावर माझा फिल्म वाला क्यामेरा जप्त करण्यात आला.

  त्यावेळेस तो इतका 'आवरा' पातळीला गेला की त्याने आम्हाला विचारले "कशावरून तुम्ही अतिरेकी नाहीत आणि तुम्ही धरणाच्या भिंतीचे फोटो काढले नाहीत?"

  तोच प्रसंग आठवला मला!

  ReplyDelete
 2. छ्या, साला सगळी मज्जाच गेली. ही असली संकट सगळ्या सरकारी टेबल खुर्च्यांवर भीक मागत बसलेली असतात.
  त्याचंपण बरोबर आहे रे. आपल्यासारखी माणसे RTO किंवा तत्सम सरकारी ऑफीसमध्ये जशी वारंवार जातात तशी फॉरेस्ट ऑफीसला जात नाहीत. इतक्या लोकांना वेठीस धरून पैसे उकळण्याची त्याच्या आयुष्यातली पहिली व शेवटची संधी असेल ती. त्यामुळे गवत जाळणे सोड तुम्ही शेणाच्या पोवर पाय दिला असता तरी त्यामुळे लाखो दुर्मिळ जीवजंतू ठेचून मारल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागला असता.

  ReplyDelete
 3. हुश्श... का हुश्श माहितीये का हे नैसर्गिक संकट नाहीये... (म्हणजे मी उगाचच लवकर हायसं वाटून घेतेय पण चालेल)

  सरकारी ’खा’त्यांबद्दल काय बोलावे.... एक हजार दिले तर एकाला सोडतो, दोन हजारात दोघांना, नाही म्हणजे कनवाळू होता म्हणायचा तो... एकट्याला रस्त्याने बोअर होईल असा विचार केला त्याने ;)

  आज नो निषेध...जो काय निषेध तो आता शेवटच्या भागात :) (तूला काय वाटलं सस्पेन्स सस्पेन्स काय तो तूला एकट्यालाच येतो ;) ... शिरवळकर आम्हिही वाचलेत म्हटलं :) ..आवरा !! )

  ReplyDelete
 4. >>>>> त्यामुळे गवत जाळणे सोड तुम्ही शेणाच्या पोवर पाय दिला असता तरी त्यामुळे लाखो दुर्मिळ जीवजंतू ठेचून मारल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागला असता.

  लोळालोळ!!

  ReplyDelete
 5. हेरंब, मला आशा आहे की ही भीतीदायक सत्यकथा चांगल्याच घटनेवर संपेल....

  ReplyDelete
 6. दीड महिन्याने ब्लॉगजगतात परतलोय आज.गाडी 'काय वाटेल ते' कडे नेत होतो पण तुझ्या 'तत पप'च्या बझवरच्या टीआरपीने मला गाडी मध्येच वटवट सत्यवानाकडे वळवण्यास भाग पाडले.'तत पप' चे चारही भाग सलग वाचल्यावर लगेच तुझा पाचवा भागही आला आणि क्रमश:च्या टेन्शनपासून वाचण्याचे अहोभाग्य लाभले पण डोक्याला शॉट लागलाच..... भयंकर दिवस होता रे तुमचा तो.संकट जणू तुमच्याबरोबर खोखो खेळत होती.मला वाटते तुमच्यातल कोणीच तो दिवस कधीच विसरू शकणार नाही....बाकी हा असला प्रसंगही तू ज्या शब्दात लिहिलास त्यावरून ब्लोगाबाने जे तुला 'शब्दांचा शब्दशहा ' म्हटला आहे त्याला १००० % अनुमोदन....

  ReplyDelete
 7. >>>>> त्यामुळे गवत जाळणे सोड तुम्ही शेणाच्या पोवर पाय दिला असता तरी त्यामुळे लाखो दुर्मिळ जीवजंतू ठेचून मारल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागला असता.

  :) :) :)

  ReplyDelete
 8. ओह्ह्ह्ह...भारतात प्रत्येक गोष्ट कधी ना कधी तोडपाण्यावर येते याचा अजुन एक प्रत्यय...
  आणि हो सिद म्हणतोय तसा कुठल्या शेणाच्या पोवर पाय दिला असतास तर लाखो दुर्मिळ जीवजंतू ठेचून मारल्याबद्दल तुम्हाला सांगितलेली दंडाची रक्कम पार लाखावर गेली असती बघ... नशीब वाचलात ;)

  असो पुढील भागाची वाट बघिंग...

  ReplyDelete
 9. झकास चाललेय....
  च्यामारी घरोघरी मातीच्या चुली. पुढचा भाग कधी?

  ReplyDelete
 10. अय भो.. आता किती वाट पहायला लावितो. लिव्ह की पटकन. एकतर ट्रेकची पोस्ट आणि चार-पाच दिवस उपाशी ठेवून एकदा भाकरी आणि एकदा भाजी असं वाढणं चाल्लंय. एकदाचं सगळं वाढून दे.

  ReplyDelete
 11. कैच्याकै चाललंय!! पण मस्त जमलाय सस्पेन्स ठेवणं! आत्ता वाचायला गंमत वाटतेय, पण काय झालं असेल तुमचं त्या १-२ दिवसात!

  वाट पाहतेय पुढच्या पोस्ट ची!

  ReplyDelete
 12. ज ह ब ह र!!!!
  लवकर टाका राव आता... फॉरेस्ट गम्प! :D

  ReplyDelete
 13. बापरे..काय काय एकेक अनुभव नै...कठीण आहे ...पण अरे हेरंब का अंत बघतोयेस रे बाबा..टाक की आता पोस्ट धडाधड...जास्त वाट आता बघवत नाही रे...

  ReplyDelete
 14. तुमचे अनुभव वाचून पेबला जाण्याची इच्छा झाली........ :)

  पण यानंतर तुम्ही पुन्हा पेबचा ट्रेक केलात का?

  ReplyDelete
 15. chittathararak vagaire shabda kamee padatayat...

  ReplyDelete
 16. हेरंब
  हे खरोखरच आक्रीत आहे पण मला नवल वाटते हे सगळा मला आधी कसे माहित नव्हते ?
  मला साधारण तू कधी गेला होतास ते सांग म्हणे मला ताळमेळ लागेल कि मी कुठे होतो..
  असं नाही कि मी तिकडे आगडे दीड शहाणपणा केला आसता पण आता मला जाणून घायचे आहे कि पुढे काय झाले आणि जर का तुम्ही त्याला पैसे दिलेत तर नंतर त्या बद्दल काही केले का..
  पुढच्या भागाची आतुरतेने वाट बघिंग!!
  अमेय

  ReplyDelete
 17. Eagerly waiting for the next part !!
  Please post it soon !!

  ReplyDelete
 18. तुम्हाला पकडून खोलीत डांबले तेव्हांच सरकारी खाक्या कुठे वळणार आहे हे दिसलेले... :D:D:D
  पण निदान लाठ्याकाठ्यांचा वापर नाही केला हे पाहून जीव भांड्यात आपलं गवतात पडला. :P

  ए तुम्ही त्याला का नाही रे विचारलेत, " काय पुरावा आहे तुझ्याकडे की ते गवत आम्ही जाळलेयं म्हणून? उलट तू पोरींना व आम्हाला बळजोरीने इथे डांबले आहेस व दहशत माजवतो आहेस म्हणून आम्हीच कोर्टात खेचतो तुला असे दामटायचेत ना... " मला माहिती आहे त्याचा काही उपयोग झाला नसता.. तरी निदान आपणही क्षणभर त्याचा ठोका चुकवल्याचे समाधान मिळाले असते... :)

  आता कधी टायपतोस पुढचा???

  ReplyDelete
 19. >>त्यामुळे गवत जाळणे सोड तुम्ही शेणाच्या पोवर पाय दिला असता तरी त्यामुळे लाखो दुर्मिळ जीवजंतू ठेचून मारल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागला असता.

  हे लय भारी.

  च्यायला तुमची जाम टरकली असेल ना....खुनाचा प्रयत्न...वनसंपत्तीचा नाश...कैच्याकै.

  ReplyDelete
 20. हेरंब, हे छान जमल बघा! खूप आवडलं आणि एक म्हणजे वाचता वाचता डोळ्यासमोर उभ पण राहिलं आधीच्या भागात वाचल्या प्रमाणे जितके त्रास त्यांनी सहन केले त्याहून जास्त मोठा ताप किंवा मनस्ताप म्हणावा तो यांना सहन करावा लागतोय आता. पुढील वाचन चालू आहे.

  ReplyDelete
 21. अर्जुन, अतिरेकी??? आवरा गिरी आहे ही खरंच. हे लोक असेच टपून बसलेले असतात वाटतं :(

  ReplyDelete
 22. खरंय रे. फॉरेस्ट ऑफिसशी आपला संबंध येतोय कशाला? हो त्याची ही नेहमीची कार्यपद्धती असणार. खोलीत जरा वेळ बंद करायचं, खुनाचे आरोप करायचे त्यामुळे बिचारे दिवसभर वणवण फिरलेले/चुकलेले लोक अजूनच हवालदिल होऊन जातात आणि अनायासे रक्कम उकळता येते त्यांच्याकडून.

  >> त्यामुळे गवत जाळणे सोड तुम्ही शेणाच्या पोवर पाय दिला असता तरी त्यामुळे लाखो दुर्मिळ जीवजंतू ठेचून मारल्याबद्दल तुम्हाला दंड भरावा लागला असता.

  लोळालोळी:)

  ReplyDelete
 23. हो ग पण मानवनिर्मित असूनही त्याने पुढे काय होणार आहे याबद्दल सस्पेन्स अगदी नैसर्गिक संकटासारखाच ठेवला होता. हो पण भारीच कनवाळू. वीस हजारांच्या ऐवजी १४०० मधेच सोडलं :P

  बरं शिरवळकरांच्या पंखीचा शेवटच्या भागातला निषेधही वाचतो आता :)

  ReplyDelete
 24. अनघा, भीतीदायक सत्यकथा चांगल्याच घटनेवर संपली. पण पुरेसा टोल घेऊन ! :(

  ReplyDelete
 25. देवेन, महापातक केलंस तू !! अरे कितीही झालं तरी 'काय वाटेल ते' ते 'काय वाटेल ते' आणि 'तत पप' ते 'तत पप' :)

  खरंय.. फारफार भयानक दिवस होता. अजूनही काही विसरलो नाहीये त्यादिवशीचं. एकेक गोष्ट डोळ्यासमोर आहे.. शत्रूलाही असा दिवस न येवो. :(

  ReplyDelete
 26. खरंय सुहास.. बस तोडपानीही चलता है. आणि मुख्य म्हणजे अशा वेळी आम्ही पैसे देणार नाही वगैरे म्हणून आपण नडूही शकत नाही.

  ReplyDelete
 27. धन्यवाद विशाल. हो सगळीकडे मातीच्याच :(

  ReplyDelete
 28. हेहे पंकज.. पुढच्या दोन्ही भाकऱ्या आपलं भाग एकदम वाढलेत बघ :)

  ReplyDelete
 29. धन्यवाद केतकी. खरंच तेव्हा ब्रह्मांड आठवलं होतं !!

  ReplyDelete
 30. बाबा, फॉरेस्टगंप.. लोळालोळी

  ReplyDelete
 31. माऊ, खरोखर भयंकर अनुभव, भयानक दिवस. सगळंच उलटं झालेलं..

  बघ तुमच्या सगळ्यांच्या शिव्यांपासून वाचायचं म्हणून सहावा आणि सातवा भाग लागोपाठ टाकले :)

  ReplyDelete
 32. इंद्रधनु :) :) .. धाडसाच्या दिसताय तुम्ही :) . पण पेब खरंच सुंदर आहे. नंतरही मी ४-५ वेळा केला पेब..

  ReplyDelete
 33. स्मिता आभार. चित्त-थरथराट झालं होतं त्यावेळी ;)

  ReplyDelete
 34. अमेय पहिल्या भागात सगळे उल्लेख आहेत बघ. नाही रे.. नंतर काहीच केलं नाही. काहीतरी हिसका दाखवायला हवा होता. चूकच झाली.

  ReplyDelete
 35. धन्यवाद हर्शल. याच्यानंतरचे दोन्ही भाग लागोपाठ पोस्टलो :)

  ReplyDelete
 36. अग ते खोलीत डांबणं, मुद्दाम तिथे लाठ्याकाठ्या, सळया ठेवणं वगैरे सगळा मानसिक दबाव आणण्याचा प्रकार होता. आम्ही अलगद त्याच्या सापळ्यात सापडलो.

  अग आम्ही त्याला दामत्तोय कसले.. आमचीच फेफे उडालेली.

  ReplyDelete
 37. योगेशा, अरे जामच टरकली होती. यातनं सुटतोय तरी की नाही असं वाटत होतं. नशिबाने सुटलो.

  ReplyDelete
 38. धन्यवाद कल्पेश. फार कठीण प्रसंग होता तो.

  ReplyDelete
 39. are poraanno,
  changala ghari sukhat basayache sodumn kashala bomblat janglat hindlay?
  nahi te dhande kele ki asach vaycha.
  geli 5000 varsh mansane jangle todun gave banvalit ataa urlya surlya junglatle he raanti sarkari praani tumchi shikar karaylaach thevlet.
  aso.
  bara lihilay
  next post lavkar taka

  ReplyDelete
 40. सोबत मुली असल्या की अश्या ठिकाणी जरा जपून वागावे लागते.. इथेच नाही, आम्हाला हिमाचल मध्येही हा अनुभव आलेला आहे...

  ReplyDelete
 41. हो रे रोहणा.. अरे मुली होत्या म्हणूनच तर सगळ्यात जास्त टेन्शन होतं. टरकलो होतो जाम...

  ReplyDelete
 42. खरोखरच अविस्मरणीय म्हणावा असा दिवस होता हा. या जन्मातच काय, तर पुढच्याही जन्मात तो तुम्हा सगळ्यांच्या स्मरणात राहील... :-)

  ReplyDelete
 43. सहमत.. जन्मोजन्मी लक्षात राहील असा ट्रेक होता तो !!

  ReplyDelete

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...