Sunday, February 27, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-२

* भाग-१ इथे  वाचा.

वाट तुडवत उतरत असताना आम्ही पुन्हा एकदा आम्हाला एका सुकलेल्या ओहोळाच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या वाटेत फाईंड केलं. गड चढत असताना ही वाट आम्हाला लागली होती का (आमची वाट लागली होती याबद्दल तर वाटच... आपलं सॉरी वादच नव्हता) या प्रश्नाचं उत्तर आत्ताच काय पण तेव्हाही आम्ही ठामपणे 'हो' असं देऊ शकत नव्हतो. आम्ही खालच्या दिशेने चाललोय ही आमच्या दृष्टीने त्यावेळची एकमेव समाधानाची बाब होती. अजून एक चैनीची बाब म्हणजे आम्ही दोन्ही बाजूला घनदाट झाडी असलेल्या वाटेने उतरत होतो. त्यामुळे उन्हाचा तर पत्ता नव्हताच वर थंडगार हवेचा बोनस होता. तर तो बोनस घेत घेत त्या सुकलेल्या ओहोळातून उतरत असताना एका ठिकाणी आम्हाला बऱ्यापैकी सपाट जागा दिसली जिथे बसून आम्ही डबे खाऊ शकणार होतो. काही विचार न करता आम्ही ताबडतोब थांबून तिथे पोटपूजा करून घेण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेणं आणि तो अंमलात आणणं यातली धुसर सीमारेषा प्रसंगी किती रुंद होऊ शकते याचा प्रत्यय आम्हाला यायचा होता.

अरे हो... एवढा वेळ चुकचुकाट करण्याच्या नादात डब्याचा एक किस्सा सुरुवातीलाच सांगायचा होता तो राहूनच गेला. हरकत नाही. आता सांगतो. मला खात्री आहे की पुढचं वाक्य वाचून तुम्ही एक तर "च्यायला, काय फेकतोय यार हा" असं तरी म्हणाल किंवा मग "सत्य हे कल्पिताहून अदभूत (इथे फसवं) असतं" यावर तुम्हाला विश्वास तरी ठेवावा लागेल. तर झालं काय की यावेळी डब्यासाठी आम्ही एक वेगळी आयडिया केली होती. नेहमी प्रत्येक जण आपला डबा म्हणजे पोहे, उपमा, पराठे वगैरे काय काय आणत असतं त्याऐवजी यावेळी आम्ही असं ठरवलं होतं की दहा वेगवेगळे डबे आणण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्र सँडविचेस खाऊ आणि त्यासाठी लागणारं सामान एकेक करत प्रत्येकाने आणू. थोडक्यात ब्रेड एकाने आणायचे, दुसर्‍याने बटर, तिसर्‍याने कांदा.. असं करत करत प्रत्येकाने काही काही सामान आणलं की प्रत्येकाला आणायला लागायचं वजनही कमी असेल आणि सगळ्यांनी एकत्र सँडविच खायला मजा येईल !

ओके. आता बॅक टू ओहोळ. तर आम्ही तिथे असं छानपैकी गोल करून बसलो आणि प्रत्येकाने आपापले डबे काढायला सुरुवात केली आणि........ आणि आधीचा धक्का बरा होता असं म्हणायची पाळी यावी असे एकेक नवीननवीन धक्के आम्हाला बसायला लागले.

- प्रचंड उकाड्याने बटर विरघळून जाऊन डबा एकदम चिकट, तेलकट झाला होता.

- बटाट्यांना प्रचंड वास यायला लागला होता.

- त्या छोट्या टेकडीवरून चढ-उतार करताना नेमकी ब्रेडवाल्याची सॅक जमिनीवर आदळली असावी. कारण ब्रेड स्लाईसचा आकार अक्षरशः होत्याचा नव्हता झाला होता. ब्रेड तुटले होते, आक्रसले होते, मऊ झाले होते. एकूण इतका विचित्र प्रकार झाला होता की भलेही ब्रेड चांगला असला तरी त्याच्या त्या रुपाकडे बघून तो तोंडातही घालावासा वाटत नव्हता.

अखेरीस आमच्याकडे फक्त काकडीचे आणि कांद्याचे काप एवढंच काय ते शिल्लक राहिलं होतं. नाईलाजाने, कंटाळून, भूकेपोटी का होईना सगळ्यांनी त्याचा अक्षरशः दोन मिनिटात फन्ना उडवून टाकला..... आणि त्यानंतर आम्हाला अचानक एका भयंकर वास्तवाची जाणीव झाली. आमच्याकडचं जेवण, कोरडी खादाडी, पाणी असं सगळं सगळं पूर्णतः संपलं होतं.... गड पोहोचू शकायच्या पलीकडे होता.... पायथा दृष्टीक्षेपातही नव्हता. आमचा अक्षरशः त्रिशंकू झाला होता. तरीही न डगमगता, डोक्यावरच्या उन्हाची आणि शुष्क घशांची पर्वा न करता आम्ही पुन्हा उतरायला सुरुवात केली. त्या ओहोळ-वाटेतले दगड चांगलेच निसरडे आहेत आणि फार जपून पाऊल टाकणं आवश्यक आहे अन्यथा कपाळमोक्ष ठरलेलाच वगैरेची जाणीव मला पहिल्याच दगडावरून पाय निसटून, नाक, तोंड आणि पोट जोरदार जमिनीवर आपटल्यावर झाली. उरलेल्या काही लोकांना तीच जाणीव व्हायला दुर्दैवाने अधिक खडतर परीक्षा द्यावी लागली......

ओहोळ उतरताना आमच्यात दोन ग्रुप्स पडले होते. ग्रुप्स म्हणजे अगदी काही लांब वगैरे नाही.. दोन्ही ग्रुप्स एकमेकांच्या दृष्टीक्षेपातच पण अंतर जरा जास्त. वरच्या ग्रुपमधल्या एका मुलीच्या पायाखालून एक मोठा धोंडा निसटून तो धडधडत खाली येत खालच्या ग्रुपमधल्या सावधपणे बसून गड उतरत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला, मानेच्या किंचित वर जोरात लागला आणि काय होतंय ते कळायच्या आत तो धापकन जमिनीवर पालथा पडला. तो गडगडत येणारा दगड आणि त्याच्या आघाताने आमच्या मित्राने फोडलेली किंकाळी हे सगळं एवढ्या कमी वेळात झालं होतं की कोणाला काहीच कळलं नव्हतं. तो आवाज ऐकून सगळेजण अक्षरशः थरकापले. जेव्हा त्याच्या केसातून एक लालसर रंगाची धार खाली येऊन त्याच्या मानेवरून, कानावरून वाहून त्याचा खांदा भिजवायला लागली तेव्हा तर सगळ्यांचे पाय क्षणभर गोठल्यासारखे झाले. या अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरत लगेच त्याला उचलून कुठे लागलंय, किती लागलंय वगैरे बघायला आम्ही पुढे धावलो. सुदैवाने एवढ्या मोठ्या दगडाची धडक डोक्याला लागूनही आणि रक्तस्त्राव होऊनही तो शुद्धीवर होता. त्याची जखम धुवायलाही साधं पाणी नसल्याचं लक्षात आल्यावर आम्ही आततायीपणे पाणी संपवून टाकल्याबद्दल स्वतःलाच डझनावारी शिव्या घातल्या. शेवटी तसंच त्याच्या त्या जखमा रुमालांना, त्याच्या शर्टला वगैरे पुसून आम्ही त्याला त्यातल्यात्यात चालू शकण्याइतपत अवस्थेत आणलं.

अचानक एकाच्या डोक्यात काहीतरी आलं. त्याने ताबडतोब त्याची सॅक उघडून ग्लुकॉन-सी/डी चा एक मोठा खोका बाहेर काढला आणि आमच्या सगळ्यांच्या हातावर चिमूट चिमूट टाकलं. त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही सगळ्यांनी ताबडतोब ते तोंडात टाकलं. ते तोंडात टाकताक्षणी तोंडात पाण्याचा एक जो भास निर्माण झाला त्याची तुलना फक्त मृगजळाशीच होऊ शकेल. आम्ही अक्षरशः मृगजळ पीत होतो मृगजळ. काही का असेना पण त्या चिमूटचिमूट ग्लुकॉन-सी ने तात्पुरती का होईना पण तरतरी वाटली. पुन्हा एकदा नव्या उमेदीने आम्ही झपझप उतरायला लागलो. जवळपास अर्धा तास सगळेजण शांतपणे उतरत होते. कोणी कोणाशी बोलत नव्हतं. किंवा बोलायचे त्राणही नव्हते हे जास्त समर्पक. त्यामुळे आहे ती उर्जा साठवून ठेवून तिचा वापर बोलण्यापेक्षा चालण्यासाठी करुया असं साधं एनर्जी कन्झरवेशनचं सूत्र आम्ही (नकळत) वापरत होतो.

अर्धा तास न बोलता चालल्यावर आता मात्र बोलणं भागच आहे हे लक्षात आल्यावर एकाने तोंड उघडलं आणि त्याचं पुढचं वाक्य आमचा ठोका चुकवून गेलं. जवळपास १००% विश्वासाने आम्ही चुकलो असल्याचं त्याने जाहीर केलं. एवढा वेळ चालताना इतका वेळ घडणार्‍या अतर्क्य घटनांचा विचार करत असल्याने ही साधी-सोपी उघड वस्तुस्थिती कोणाच्या लक्षातच आली नव्हती. सगळेजण चरकलो. कारण तो म्हणाला ते पूर्णपणे सत्य होतं. त्या ओहोळातून उतरत उतरत आम्ही भलतीकडेच जात होतो. त्याक्षणी अचानक भानावर आल्यागत सगळ्यांनी इकडे तिकडे बघत आजूबाजूच्या वाटांचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. क्षणभर आम्ही कुठे आलो आहोत आणि नक्की कुठे जायचं आहे हे काही कळेचना. मग हळूहळू नीट विचार करून सगळ्यांनी धावपळ करण्यापेक्षा दोन-तीन जणांनी पुढे जाऊन वाट शोधून परत यावं आणि तोवर बाकीच्यांनी तिथेच बसून राहावं असं ठरलं. वीसेक मिनिटांत ते परत आले ते खांदे आणि चेहरे पाडूनच. कारण आजूबाजूला ओळखीचं काहीच दिसत नव्हतं. पण आम्ही चालतोय तो रस्ता तर नक्की चुकीचा होताच. त्यामुळे सर्वानुमते या ओहोळाच्या रस्त्यातून बाहेर पडणं हे अत्यावश्यक होतं. ओहोळाच्या रस्त्याच्या डावीकडून एका छोट्या वाटवजा रस्त्याने आम्ही त्या सुकलेल्या ओहोळाला अलविदा करून बाहेर पडलो. समोर दिसणार्‍या वाटेने हळूहळू अंदाज घेत चालणं चालू होतं. सगळ्यांच्या नजरा अक्षरशः चारी दिशांना घिरट्या घालत होत्या. एखादी ओळखीची वाट, ओळखीचं झाड, ओळखीचा कातळ असं काही काही शोधण्याचा प्रयत्न चालू होता. पण कुठेच काही हाती लागत नव्हतं. या सगळ्या गडबडीत आम्ही उपाशी आहोत, तहानलेले आहोत, एकाचं डोकं फुटून त्यातून रक्त वाहतंय वगैरे वगैरेची कसलीही शुद्ध आम्हाला नव्हती. आम्हाला काही करून रस्ता शोधायचा होता फक्त आणि तोही लवकरात लवकर. कारण मगाशी तीन वाजलेले बघितल्यानंतरचे दोन तास कधी कुठे आणि कसे गेले याचा काहीच हिशोब लागला नव्हता की आमच्या परिस्थितीतही विशेष काहीच फरक पडला नव्हता. उलट ती बिघडलीच जास्त होती. आता अजून फार तर तासाभरात अंधार पडायला सुरुवात होणार होती आणि अंधार्‍या रात्रीत जंगलात/डोंगरावर वाट शोधत फिरणं म्हणजे........... !!! आम्हाला कल्पनाही करवत नव्हती. झपाझप पावलं पडायला लागली. पण जाणार कुठे, कसं काहीच कळत नव्हतं. एवढ्यात..................................

क्रमशः

* आता अजून थोडेच भाग !!

- भाग ३ इथे  वाचा

33 comments:

  1. हेरंबा तू कालच्या पोस्टमधे आणि कमेटांना दिलेल्या उत्तरांमधे लिहिल्याप्रमाणे निश्चितच काहितरी भयानक अनूभव समोरं येत आहे असे जाणवतेय रे...

    आत्ता नक्की काय वाटतय ते नाही सांगता येणार पण एखाद्या कथेत गुंतल्यावर कसे मनात आपण प्रार्थना करतो की देवा यांना लवकर परतीचा रस्ता सापडू दे आणि पुरे आता संकट, असे काहीसे चाललेय मनात... उतर रे बाबा पटकन त्या पठारावरून...

    जाता जाता... हेरंबाबरोबरच्या ट्रेकला रोहन नसला तर मी येणार नाही :) (काय केविलवाणा विनोद आहे हा... )

    ReplyDelete
  2. बापरे तन्वी.. एवढी सुपर डुपर एक्सप्रेस प्रतिक्रिया ?? आभार्स आभार्स :)

    पठारावरून उतरण्याची मोठी स्टोरी आहे ग.. येईलच ती उद्या..

    >> जाता जाता... हेरंबाबरोबरच्या ट्रेकला रोहन नसला तर मी येणार नाही :) (काय केविलवाणा विनोद आहे हा... )

    विनोद नाही वस्तुस्थिती आहे ही... अग तूच काय रोहणा नसेल तर मी स्वतःही माझ्याबरोबर जाणार नाही ;)

    ReplyDelete
  3. बापरे, आमची परिस्थिती एवढी भयानक नव्हती रे !!! आम्ही तिकोना शोधण्याच्या नादात संपूर्ण मावळ आणि मुळशी तालुका पायथा घातला होता खरा, पण अशी डोकेफ़ुटी वगैरे नशिबात नव्हती.. येऊ देत पुढचे भाग !!
    हा भागही सुपरलाईक !!

    ReplyDelete
  4. लवकर येवूदेत..........

    ReplyDelete
  5. प्रकरण बरंच गंभीर झालेलं दिसतंय. कालच्या हसत-खेळत वाचलेल्या पोस्टनंतर हा सॉलीड रच्याक होता रे! मला माथेरानची ट्रीप आठवली. असं डेंजर काही झालं नव्हतं. पण सगळेच अननुभवी होतो. पाऊस, वारा, थंडी, मरणाची भूक, निवारा नाही अशा अवस्थेत काढलेले पाच तास आठवले. सॅकमधे ठेवलेल्या सगळ्या अन्नाचा लगदा झाला होता पण तोही खाल्ला. नशीब तेवढं तरी मिळालं. तुझं ट्रेकचं प्रकरण तर भयानक आहे.

    ReplyDelete
  6. हम्म्म्म...
    मला एक नक्की माहितेय की तुम्हीं सगळे त्या भयंकर प्रसंगातून सुखरूप बाहेर पडलात...आणि आता तू आम्हांला खूप खूप पूर्वी घडलेली घटना सांगतोयस! हुश्श!
    :)

    ReplyDelete
  7. अपर्णा, ते 'आमेन' तुला प्रत्येक पोस्टनंतर 'अगेन अँड अगेन' म्हणावं लागणार आहे बघ ;)

    ReplyDelete
  8. स्वामी, डोकेफुटी हा मध्यंतर आहे जेमतेम.. आगे आगे पढो..... होता है क्या..

    पुन्हा एकदा सुपर हाबार्स !!

    ReplyDelete
  9. लीना,

    येणार येणार :) लवकरच..

    ReplyDelete
  10. जबराट... हा भाग छोटा झाला रे.. अजुन थोडा मोठा चालला असता...

    >> विनोद नाही वस्तुस्थिती आहे ही... अग तूच काय रोहणा नसेल तर मी स्वतःही माझ्याबरोबर जाणार नाही ;)

    लोळालोळी...

    ReplyDelete
  11. कांचन, हो चढत्या क्रमाने गंभीर होत गेलं प्रकरण. त्यामुळे काळाच्या लाईट मूडपेक्षा आजचं लिखाण थोडं सिरीयस होतं.. आणि उद्या......

    या ट्रेकमध्ये आम्हाला ट्रेकला किंवा खरं तर एकूणच कधीच येऊ नयेत असले एकेक अनुभव आले.. लवकरच !

    ReplyDelete
  12. योग :) .. तसंच काहीसं..

    ReplyDelete
  13. विक्रांत, येणार येणार रोज एक भाग येणार :)

    ReplyDelete
  14. अगदी अगदी हाच विचार करून मी हा प्रसंग कथारुपात लिहिणार होतो म्हणजे कोणाला काहीच गेस करता आलं नसतं पण मग ते कदाचित खरंही (विश्वसनीय याअर्थी) वाटलं नसतं म्हणून मग जसं घडलं तसं प्लेन लिहायचं ठरवलं..

    ReplyDelete
  15. आनंदा, पहिला भाग खुपच मोठा झाल्यासारखा वाटला त्यामुळे हा किंSSचित लहान केला. आणि अजून एक म्हणजे मागचा भाग 'योग्य' त्या स्पॉटला थांबला की पुढचा भाग वाचायला अजून मजा येते म्हणूनही..

    एक ट्रेक रोहणाबरोबर करायचाच आहे रे लवकरात लवकर :)

    ReplyDelete
  16. अरे, हे काय आत गरे नाही तर निदान हटला तरी. फणस सोलला तर साला आत पण काटे?

    ReplyDelete
  17. होरे.. गरे नाही कि हटला (आठळ्या) नाही ! काटे पण कसे अजून अजून टोचत जातील बघ पुढे !! :(

    ReplyDelete
  18. कोणत्या जागी थाम्बले की वाचणार्याची उत्सुकता वाढेल हे तुम्हाला मस्त जमले आहे. आता पुढचा भाग लवकर येऊ द्या.

    ReplyDelete
  19. हेरंब, अरे कालचा पहिला भाग वाचून वाटलं थोडीफार हरवाहरवी, रडारड होऊन किल्ला न बघताच परत याल तुम्ही. पहिल्यांदाच ट्रेकला येणारे पुन्हा या वाटेला जाणार नाहीत ... पण तेवढीच पडझड. हे भलतंच डेंजर प्रकरण दिसतंय.

    ReplyDelete
  20. हेहे अरुणाताई, हा ट्रेकच एवढा हॅपनिंग झाला होता की काही विचारू नका. त्यामुळे त्यातल्या प्रत्येक महत्वाच्या वळणावर लिखाण थांबवून तेवढंच जरा उत्कंठावर्धक करण्याचा प्रयत्न करतोय.

    आणि हो अजून एक.. मला 'तुम्ही' पेक्षा 'तू' चालेल, धावेल, आवडेल:)

    ReplyDelete
  21. गौरी, अग सुरुवातीला आम्हालाही असंच वाटलं होतं. एकेका प्रसंगानंतर वाटायचं की ओके.. झालं आता.. सुटलो यातून.. पण तोवर नवीन काहीतरी समोर उभं रहायचं.. पुढे पुढे तर... असो.. लवकरच..

    ReplyDelete
  22. ओह्ह्ह...दोन वर्षापुर्वी मित्राच्या भावाबरोबर झालेला प्रसंग आठवला. त्याचा मित्र आणि तो दोघेच ट्रेकला गेले होते. गोरखगडावर असलेल्या चढणीवर खाली पडला होता छोट्या दरीत. ना मोबाइल लागत होता ना कोणी तिथे होत एक रात्र तो तिथे बसून होता मित्राची जखम हाताने धरून, त्याच्या पाठीला सुद्धा खूप जोरात मार लागला होता...:( :(
    पूर्ण माहिती काढल्याशिवाय ट्रेक नकोच रे नको...

    ReplyDelete
  23. बापरे सुहास.. हा तर फारच भयंकर अनुभव आहे !!रात्रभर छोट्या दरीत अडकणं म्हणजे खराच गंभीर प्रसंग !!

    ReplyDelete
  24. म्या पन रोहनाविना तुझ्यासंग यायची नाय... :D

    बापरे! किती चुकचुकाट हा... तू आता हे सगळं लिहीतो आहेस म्हणजे रात्रीच्या आत तुम्ही नक्की ( चुकलेला ) गड उतरला असणार... अशी मला खात्री आहे असे म्हणणार होते पण... जरा डरले, त्यामुळे गप गुमान पुढला भाग वाचते. :)

    ReplyDelete
  25. हाहा.. रोहणाशिवाय कोणीच कुठेच जाणार नाही ग आता :P

    गड उतरलो ग पण 'कसा' उतरलो ते पुढच्या भागात वाचलं असशीलच :)

    ReplyDelete
  26. हेरंबा...अस काही घडल्याशिवाय अंगातली रग जिरत नाही.

    आजच्या पोस्टमधील लिखाणशैली खुप आवडली (याचा अर्थ असा नाही की यापुर्वी पांचट लिहीत होतास.. ;) )प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहत होता...उदाहरणार्थ...ट्रेकमधील एकाला झालेली जखम...त्याच भळभळणार रक्त.

    >>विनोद नाही वस्तुस्थिती आहे ही... अग तूच काय रोहणा नसेल तर मी स्वतःही माझ्याबरोबर जाणार नाही ;)

    लोळालोळी...

    ReplyDelete
  27. खरंच चांगलीच रग जिरली रे. आभार रे.. उलट मला यावेळी थोडी भीती वाटत होती. कारण अगदी विनोदीही लिहिता येणार नव्हतं आणि अगदी सिरीयस लिहूनही चालणार नव्हतं. त्यामुळे त्यातल्या त्यात माध्यममार्ग स्वीकारला.

    >> रोहणा नसेल तर मी स्वतःही माझ्याबरोबर जाणार नाही ;)
    सातही भाग वाचलेस की कळेल तुला मी असं का म्हणतोय ;)

    ReplyDelete
  28. अरे कसले एक एक प्रकार करताय... तो मालक कोण होता रे??? :D

    तुम्हाला वाटेत कोणीच भेटले नाही का? किंवा पडलेले एखादे गुटख्याचे पाकीट, पारलेचा कागद वगैरे?
    आणि हा संकेत तिकोना शोधताना कसा चुकू शकेल? धन्य आहेत....

    ReplyDelete
  29. अरे पुढे पुढे तर बघ अजून धन्य प्रकार केलेत आम्ही.. काय बोलू यार.. सगळंच चुकत होतं त्या दिवशी :(

    ReplyDelete
  30. बापरे.. आधी वाटलं होतं की विनोदी असेल, पण इथे तर सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट चालू झालाय...

    ReplyDelete
  31. संकेत, अरे चित्रपटासारखाच प्रकार झालाय :) वाच पुढे..

    ReplyDelete

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...