Wednesday, September 29, 2010

णिषेढोपणिषड

नमो नमः सुजनहो, सृजनहो व भक्तजनहो. 'आदिलीलापुराणा'च्या आजच्या श्रवणोपासनेत आपले स्वागत. विविध आदिलीलांनी ओतप्रोत भरलेल्या 'आदिलीलापुराणा'चे अमृत आपल्या कानांत साठवून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या, विशाल संख्येने उपस्थित पावलेल्या या विशाल जनसागराचे मी 'आदि-दास' मनःपूर्वक स्वागत करतो. आजवरच्या आपल्या 'आदिलीलापुराणा'च्या प्रवासादरम्यान आपण 'दंतोपनिषद', 'निद्रानाशानुभव', 'पुनर्दंत विवेचन', 'प्रथम-पाद्या-नुभुति', 'प्रथमग्रासोपनिषद' अशा आदिस्वामींच्या अनेकानेक लीलांचे मनोभावे श्रवण केले. पण आजचा अध्याय थोडा वेगळा आणि म्हणूनच गंमतीशीर आहे. त्यात एक आगळीच मौज भरलेली आहे. बाल-आदिने आपल्या बंडखोर बाललीलांनी त्याच्या मातापित्याच्या तोंडचे पाणी कसे पळविले होते याचे समग्र वर्णन आद्य 'आदि-दासां'नी या खंडात केले आहे. ते तुमच्यासमोर मांडणारा हा एक सामान्य 'आदि-दास' आहे. तर आजच्या अध्यायाचे नाव आहे 'निषेधोपनिषद' किंवा आदिस्वामींच्या तातांच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'णिषेढोपणिषड'.. क्षमायाचना.. 'णिषेढोपनिषद'. या 'णिषेढोपनिषदा'त आदिस्वामींच्या मनाविरुद्ध काही घटना घडल्यास--ज्या कधी घडू शकतील हे साक्षात आदि-स्वामी सोडून कोणासही उमगत नसे--त्यांनी वेळोवेळी केलेल्या निषेधांचे संकलन केलेले आहे. परंतु हे निषेध स्वामींनी अशा विविधांगी, विविध रूपांत, निरनिराळ्या मार्गांनी नोंदवले आहेत की आपल्यासारखी सामान्य माणसे त्यांचा विचारही करू शकत नाहीत व त्यांच्या या विविध लीलांची निव्वळ श्रवणभक्ती करणे एवढेच काय ते आपल्यासारख्या पामर भक्तांच्या हाती उरते. इतुकेच नव्हे तर कित्येकदा हा निषेधाचाच एक प्रकार आहे हे खुद्द स्वामींच्या मातापित्यांनाही उमगत नसे असे स्वतः त्यांनीच सांगून ठेवल्याचीही नोंद आहे. असो. 'णिषेढोपनिषद' वर्णिण्यासाठी, श्रवण्यासाठी ही एवढी प्रस्तावना पुरेशी आहे. संपूर्ण णिषेढोपनिषद हे अत्यंत मधुर आणि श्रवणीय आहेच परंतु कालाभावामुळे आज आपण त्यातील काही महत्वाच्या मुद्यांबाबत व अनुभवांबाबत विवेचन करू.

'वस्तू-क्षेपण' णिषेढ :

एके समयी बाल आदिस्वामी त्यांच्याकडे असलेल्या अनेक लहान चारचाकी खेळण्यांपैकी एका चारचाकीशी खेळण्यात मग्न होते. चारचाकीशी खेळणे म्हणजे चारचाकी उलटी करून तिची चाके फिरवणे आणि मधेच मुखात घालणे अशा स्वरूपाची क्रीडा चालू होती. स्वामींच्या मातोश्रींनी ते पाहताच लगेच त्यावर तीव्र आक्षेप नोंदविला व स्वामींना असे न करण्याविषयी बजावले. झाले !! त्याक्षणी स्वामींना क्रोध अनावर झाला व अकस्मात स्वामींनी ती छोटी चारचाकी उचलून मातोश्रींच्या दिशेने भिरकावली. ते देखोन मातोश्री अजूनच संतापदग्ध झाल्या आणि त्यांनी स्वामींना तसे न करण्याविषयी पुनश्च एकवार दटावले. जे अर्थातच स्वामींना सहन होणे शक्य नव्हते. त्यामुळे स्वामींनी दुसरी चारचाकी घेऊन ती भिंतीवर आणि तिसरी चारचाकी सज्जाच्या काचेच्या दिशेने आदळली. मातोश्रींनी लगबगीने महालातल्या सर्व चारचाक्या जमा करून त्यांच्यावर तात्पुरती जप्ती आणविली खरी पण अर्थातच स्वामींच्या अभिनव णिषेढ प्रकाराने स्वामींचे माता-पिता चांगलेच दिग्मूढ व चिंतीत झाले.

'हस्त-पार्श्वे-बंधित दौड' णिषेढ :

णिषेढाचा हा एक आगळा प्रकार स्वामीलीलांमध्ये वाचावयास मिळतो. आदिस्वामींनी हे असे विविध णिषेढांचे प्रकार कसे शोधून काढले असावेत या विचाराने त्यांचे अपार कौतुक वाटत राहते. अखेर स्वामीच ते !! तर उपरोल्लेखाप्रमाणे हा प्रकार काहीसा निराळा आहे. स्वामींना सतत निरनिराळी पुस्तके, विविध धातूंची अथवा काचेची पात्रे, अन्य अवजारे, भोजनाची अन्यान्य उपकरणे यांच्याशी खेळण्यास आवडत असे. अर्थातच त्यांना पुस्तके आणि काचेची उपकरणे इत्यादींशी खेळण्यास मज्जाव असे. तरीही अनेकदा ते माता-पिताश्रींचा डोळा चुकवून शिताफीने या वस्तू मिळवीत असत. परंतु अनेकदा तत्क्षणीच किंवा काही कालानंतर ती वस्तू त्यांचेपासून हिरावून घेतली जाई. एकदा असाच एक काचेचा घट त्यांच्या हातातून हिरावून घेतला गेला असता त्यांना अचानक काय झाले त्याची कल्पना नाही परंतु स्वामींनी अचानक आपले दोन्ही हात मागे बांधले आणि दाणदाण पावले टाकीत दौडत तेथून निघून महालाच्या एका कोपर्‍यात निघून गेले गेले आणि तिथून जोरजोराने चित्कारत, आक्रोश करत आपला णिषेढ णोंडवू ... क्षमायाचना.. नोंदवू लागले. परंतु त्यांचे ते उच्चरवाने ओरडणे विसरून जात त्यांचे माता-पिता त्यांचे हात मागे बांधून धावत जाण्याचे विचित्र, विनोदी परंतु तितकेच विलोभनीय दृश्य मोठ्या कौतुकाने पहात राहिले. अशा रीतीने स्वामींच्या मातापित्यांना स्वामींच्या णिषेढ-कृत्याचे एक अनोखे स्वरूप पहावयास मिळाले. अर्थात तदनंतर हे दृश्य वारंवार पहावयास मिळू लागले हे सांगणे न लगे.

'शीघ्र-कोने-दौड' णिषेढ :

'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' हा 'हस्तपार्श्वेबंधित दौड-णिषेढा'शी बहुतांशी साधर्म्य साधतो. या णिषेढाची पार्श्वभूमी आणि दरम्यान घडणार्‍या किंवा थोडक्यात म्हणजे त्यासाठी कारणीभूत असणार्‍या विविधतम घटना या अनेकदा एकसमान असत. फक्त त्या घटनेनंतर येणारी स्वामीमहाराजांची प्रतिक्षिप्त क्रिया जरा वेगळी असे. उदाहरणादाखल म्हणून आपण उपरोल्लेखित घटनाच घेतली तर काही प्रसंगी स्वामी 'हस्तपार्श्वेबंधित दौड-णिषेढा' चा वापर करीत तर कधी 'शीघ्र-कोने-दौड णिषेढा'चा. या 'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' प्रकारचा वापर करताना स्वामी घटनास्थळावरून अकस्मात दौडत दौडत निघून जात व महालाच्या एखाद्या कोन्यात--ज्यास 'कोपरा' असेही संबोधले जाते--जाऊन थांबत आणि त्या कोन्यातून उच्चरवातील आरोळ्या चालू राहत असत. तर असा हा 'शीघ्र-कोने-दौड णिषेढ' स्वामी कोणत्या प्रसंगी वापरत ते तपशीलात पाहू.
एके समयी स्वामींचे तात उर्ध्वपटावर कार्यरत असता स्वामी तेथे अचानक विराजमान झाले आणि वविध कळांवर आपले हस्तकौशल्य आजमावू लागले. अर्थातच तातांनी त्यांस तेथोन तत्क्षणी दूर लोटले. अर्थातच स्वामी प्रचंड क्रोधित झाले व दौडत दौडत तातांपासून दूर निघोन महालाच्या एका कोन्यात गेले. तातांकडे पाठ करून, चेहरा भिंतीच्या कोन्याच्या दिशेला ठेवून तीव्र स्वरात उद्घोषू लागले. णिषेढाचा हा प्रकार पाहून तात व माता यांच्या मुखकमलावर हास्याची कारंजी उडाली.

'मही-अधर-निद्रित' णिषेढ :

स्वामींनी अवलंबिलेल्या णिषेढांच्या विविध प्रकारांपैकी 'मही-अधर-निद्रित' हा णिषेढाचा प्रकार खरंतर फारच विलक्षण, अगम्य आणिक दुर्मिळ संबोधला पाहिजे. या प्रकाराचा त्यांनी जेव्हा सर्वप्रथम उपयोग केला त्या प्रसंगाचा तपशील जाणून घेऊन मग आपण या प्रकाराचा अधिक परिचय करून घेऊ. एके दिनी स्वामी त्यांच्या माता-पित्यांसमवेत एका भ्रमणध्वनीशीयंत्रांशी संबंधित आस्थापनाच्या केंद्रात गमते झाले. स्वामींच्या माता-पित्यांना नूतन भ्रमणध्वनीयंत्रांची आवश्यकता होती. अर्थात जुनी भ्रमणध्वनीयंत्रे कार्यरत नसण्यास बव्हंशी स्वामीच कारणीभूत होते. कारण स्वामींच्या मुखग्रंथीतून स्त्रवलेल्या द्रवाने सचैल न्हाऊन निघाल्याने जुनी भ्रमणध्वनीयंत्रे गतप्राण झाली होती. असो. तर स्वामींचे माता पिता भ्रमणध्वनीयंत्रे बघण्यात गर्क असताना स्वामींनी अचानक जमिनीच्या दिशेने बोट दाखवून त्यांना खाली ठेवण्याची मागणी केली. मातोश्रींनी लगबगीने त्यांना खाली ठेवले व एकीकडे स्वामींवर लक्ष ठेवत ठेवत त्या विविध भ्रमणध्वनीयंत्रे तपासू लागल्या. स्वामी आसपास डकवलेल्या भ्रमणध्वनीयंत्रांच्या विविधरंगी कागदी पत्रकांशी खेळत होते. अकस्मात ते ज्या कारणामुळे त्यांना पुस्तकांपासून कटाक्षाने दूर ठेवले जाते हे कसे योग्य आहे हे सिद्ध करू लागले. अर्थात नित्याच्या सवयीप्रमाणे निमिषार्धातच स्वामी त्या विविधरंगी कागद व पुस्तके यांचे तुकडे तुकडे करू लागले. मातोश्री आणि यावेळी तर पिताश्रींनी त्यांना तसे न करण्याविषयी फर्मावले व बळाचा वापर करून ती कागदपत्रे त्यांच्या हातून काढून घेतली. स्वामी एक दोन वाकडी-तिकडी पावले टाकून अचानक धरतीवर गडबडा लोळवयास लागले. मधेच पालथे होणे, चित्कारणे, पुनः उताणे होऊन अजून उच्च स्वरात ओरडणे चालू होते. अधून मधून तीव्र स्वरात रोदनही चालू होते. केंद्रातील समस्त जन विस्मयाने स्वामी आणि त्यांच्या मातापित्यांकडे पाहू लागले. शरमेने गोरेमोरे होऊन स्वामींच्या मातापित्यांनी त्यांना तेथून उचलले आणि केंद्राबाहेर चालते झाले. या धरतीवर गडबडा लोळून राग व्यक्त करण्याच्या पद्धतीचा तस्मात् 'मही-अधर-निद्रित णिषेढ' पद्धतीचा स्वामींनी तदनंतरही अनेकदा उपयोग केल्याचे असंख्य उल्लेख णिषेढोपनिषदाच्या पानापानांत आढळतात.

तर भक्तजनहो. आदिस्वामींनी त्यांच्या बालपणी योजिलेले व उपयोजिलेले णिषेढांचे विविध प्रकार ऐकताना नेहमीच असे लीन, तल्लीन, मंत्रमुग्ध झाल्याचे अनुभव येतात. थोडक्यात या 'णिषेढोपणिषडा'चे प्रत्येकाने हरदिनी पारायण करावेसे आहे. नियमित पारायण करणार्‍यास अनेक सुखद व चमत्कृतीपूर्ण अनुभव येतात. मनाविरुद्ध घडणार्‍या प्रत्येक गोष्टीचा णिषेढ अर्थात निषेध व विरोध करण्यासाठी हे णिषेढोपणिषड वाचावे. हे वाचल्याने

१. 'णिषेढा' च्या विविधतम व नाविन्यपूर्ण संकल्पना सुचू लागतात.
२. 'णिषेढां' च्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे विरोधक विस्मयचकित व दिग्मूढ होऊन जातात.
३. विरोधकांच्या विरोधाची तीव्रता कमी होते अथवा तो पूर्णतः गळून पडतो.
४. बहुरंगी, बहुढंगी, बहुआयामी 'णिषेढां'च्या भयापोटी तुमच्या कुठल्याही कल्पनांना विरोध केला जात नाही.
५. धनहीनाला धन मिळते, अपत्येच्छुकांना अपत्यप्राप्ती होते.
६. अंतःकरणातल्या सर्व इच्छांची पूर्ती होते.
७. 'णिषेढां'च्या वैविध्याच्या भयाने कोणीही विरोधक नुरल्याने हमखास यशप्राप्तीची हमी.
८. थोडक्यात सर्व आकांक्षा पूर्णत्वाला पोचल्याने चिरंतन यश लाभते.

|| इति णिषेढोपणिषडः समाप्तः ||


बोला आदिस्वामींचा विजय असो. णिषेढोपणिषडाचा विजय असो. ओम शांतिः शांतिः शांतिः ... इत्यलम

Monday, September 27, 2010

एक नवं डायट

१. माझा एक मित्र आहे. चहाबाजांना जसा दुपारी २ ला चहा लागतो तसं त्याला दुपारी चारला पेप्सी लागायचं. पेप्सी लागायचं म्हणजे पेप्सी'च' लागायचं. कोक, लिम्का, थम्सप वगैरे काही चालायचं नाही

२. माझी आजी आयुष्यभर ब्रुक बॉंडचा रेड लेबलचा चहा प्यायली. रेड लेबल सोडून इतर कुठलाही चहा तिला चालायचा नाही. म्हणजे रेड लेबल पेक्षा चांगला, महाग, भारी, इम्पोर्टेड वगैरे वगैरे काय पण असुदे.. सगळ्यांची विकेट उडायची. आणि घरात आम्ही पडलो सगळे कॉफी वाले. त्यामुळे 'तुम्हाला ते कळणार नाही' हे तिचं म्हणणंही ऐकून घ्यावं लागायचं.

३. आमच्याकडे पूर्वी वर्षानुवर्षं घरात कोलगेटची पेस्टच यायची. इतकी की थोडा मोठा होईपर्यंत मला कोलगेट सोडून इतर कोणीही टूथपेस्ट बनवत नाही असंच वाटायचं. किंवा पेस्ट आणि कोलगेट हे समानार्थी शब्द वाटायचे. म्हणजे आपण कॅनन ची झेरोक्स किंवा नेस्लेची कॅडबरी म्हणतो ना अगदी तसंच.

सुदैवाने मला कुठल्याच बाबतीत अशा कुठल्याच ब्रांडची सवय नव्हती. आवडती पेस्ट व्हिको होती पण तीच पाहिजे असं नाही. कुठलीही चालायची. आवडती नेसकॅफे पण चालायची कुठलीही. आता यापुढे मी फक्त आवडता ब्रांड सांगतो 'चालायचा/ची/चे' कुठला/ली/ले ही हे अध्याहृत आहे किंवा तुम्ही तुमच्या सोयीसाठी ते पुढे लावून घ्या दर वेळी.

आवडता शाम्पू गार्नियर फ्रुक्टीस पण ...
आवडता परफ्युम चंदनाचा कुठलाही पण..
आवडतं शेव्हिंग क्रीम जिलेट पण ...
आवडते क्लोदिंग ब्रांडस अ‍ॅरो, लुई फिलीप वगैरे पण..

असो.. सदरचा मुद्दा पटवायला इतके मुद्दे पुरे. उगाच लांबण नको (थोडक्यात 'वादि' ला किंवा उगाचंच सहज म्हणून मला गिफ्ट देताना निर्णय घेणं तरी सोप्पं जाईल. ;) )

पण पण पण... (हा पण का आहे ते लवकरच कळेल.) .... कट्टा, नाका, अड्डा, चावडी या सगळ्या प्रकारांना सोशल नेटवर्किंगचं गोंडस लेबल लावून ओर्कुटने (निदान भारतात तरी) २००४ च्या आसपास प्रवेश केला. पडीक नेटकर या नात्याने आम्ही तेथे तातडीने रुजू झालो. सुरुवातीला काही महिने ऑर्कुट ऑर्कुट खेळून झाल्यावर काही दिवसांनी कंटाळा आल्याने तिथला वावर कमी झाला. कम्युनिटीज ढिगाने जॉईन केलेल्या असल्या तरी मी कधीच कुठल्याच कम्युनिटी पेजच्या डिस्कशनपेज/फोरम वर तासन् तास गप्पा मारत बसलोय, स्क्रॅपास्क्रॅपी करत राहिलोय असं कधीच झालं नाही. नंतर एक दिवस कळलं की आपल्याकडे जसं ऑर्कूट वापरतात तसं अमेरिकेत फेसबुक वापरतात आणि ते ऑर्कुटपेक्षा जाम भारी आहे. लगेच पडत्या फळाची आज्ञा झेलून आम्ही आमचा जामानिमा फेसबुकवर हलवला. पण ते खरोखरच ऑर्कुट पेक्षा जाम भारी आहे पक्षि हेवी आहे, त्यात चिकार गुंतागुंत आहे, बराच गोंधळ आहे, अजिबात लाईटवेट नाही हेही लक्षात आलं. त्यामुळे तिथूनही बाहेर पडणं झालं. बाहेर पडलो म्हणजे लॉगिन करणं बंद झालं. अकाऊंट मात्र सगळी आहेतच. कधीच कुठलंच डिलीट केलेलं नाही. लोकं कम्युनिटी जॉईन करण्याची आमंत्रणं, काही 'शेतकी' खेळ खेळण्याची आमंत्रणं पाठवत राहिली. पण त्याला 'बाणेदारपणे' [;)] नकार देत राहिलो. त्यानंतर (माझ्या आयुष्यात) आलेल्या मायस्पेस, हायफाय, बेबो, वेन अशा अनेक 'मी टू' (me too) सायटींवर जाऊन अकाऊंट ओपनिंगचं पुण्यकृत्य एक कर्तव्य म्हणून पार पाडलं पण रमलो कधीच नाही. दरम्यान एक-दोन मराठी संकेतस्थळांवरही हजेरी लावून झाली. पण तिथेही पुन्हा एक खातं अडवण्याइतकाच माझा रोल होता. अ‍ॅक्टीविटी शून्यच... तोवर आलं ट्वीटर.. लोकलज्जेस्तव तिकडचीही एक जागा अडवून बसलो. चिवचिवाट मात्र फारच्या फार कमी केला.

पण पण पण (वरचं पण वरतीच संपलं.. हे नवं आहे.) ..... पण पण पण (हे आत्ताचंच आहे) यावर्षीच्या फेब्रुवारीच्याच्या दरम्यान अचानक काहीतरी उलथापालथ झाली. गुगलने ढोलताशे घेऊन म्हणा, जबरदस्तीने म्हणा बझची गाय दावणीला बांधली. आणि तीही अशी घट्ट आणि शिताफीने की विचारता सोय नाही. म्हणजे एका सकाळी "तुम्हाला बझमध्ये सहभागी व्हायचं आहे का?" असं आवताण घेऊनच हजर. 'फुकट ते पौष्टिक' या लाडक्या नियमाला अनुसरून बझ म्हणजे नक्की काय हे ओ की ठो माहित नसताना सरळ 'यस्स' वर टिचकी मारून मोकळा झालो. पण गुगलबाबा इतरांसारखे कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांना अशा अकाऊंट अडवून बसणार्‍या लोकांचा (स्वतःविषयी लिहिताना 'शुंभांचा' लिहिणं हा शुंभपणा आहे म्हणून...) चांगलाच (म्हणजे वाईटच) अनुभव असणार. त्यामुळे त्यांनी शिताफीने तुमच्या अ‍ॅड्रेस बुकमध्ये असलेल्या लोकांना तुमच्या तुम्हाला आणि तुम्हाला त्यांच्या पाठलागावर लावलं. दुसरं म्हणजे तुम्ही चुकून माकून कुठल्या बझवर काही खरडलंत की रडकं, दंगेखोर, चुकार पोर बाहेर मस्ती करून लगेच आपल्या घरी पळून येऊन लपून बसावं त्याप्रमाणे ती खरड तुमच्या मेलबॉक्सात येऊन विराजमान व्हायला लागली. न वाचलेल्या मेल प्रमाणे न वाचलेल्या बझांची संख्याही ठळकपणे वाचण्याची (वाचायला लावण्याची, डोळ्यात भरण्याची काहीही म्हणा) सोय गुगलस्वामीमहाराजांनी करून ठेवली. थोडक्यात बझचा हा आंतरजालीय आयुष्यातला चंचूप्रवेश फारच हॅपनिंग ठरला. उठसुठ बझबझायला लागलो. जोक दिसला, कर बझ, एखादी महत्वाची बातमी दिसली, कर बझ. दरम्यान मब्लॉवि वर माझ्या ब्लॉगच्या अपडेट्स दिसणं बंद झालं होतं त्यामुळे तेव्हापासून नवीन पोस्टीही बझ करायला लागलो. दरम्यान देवकाकांचा "सुप्रभात मंडळी, या गप्पा मारायला" वाला आवताणाचा बझ एक दिवस कुठून कसा नजरेस पडला आणि त्यावर "सुप्रभात" असं एक उत्तर टाकून/टंकून मीही बझकट्ट्यात/मठात सामील झालो.

ब्लॉग लिहायला लागल्यापासून झालेला एक जबरदस्त फायदा म्हणजे अनेक नवीन, समविचारी, ग्रेट, भटक्या, खादाड, हृदयस्पर्शी, विनोदी, बिनधास्त लिहिणार्‍या अनेक लोकांशी खूप चांगली मैत्री झाली. कधीच कोणालाही भेटलेलो नसलो तरी अनेकांशी फोनवर बोलणी झाली, चॅट/स्काईपवर गप्पा झाल्या, भरपूर मेलामेली झाली. काही महिन्यांपूर्वी झालेली ओळख कैक जन्मांची असल्यासारखी वाटायला लागली. (हे वाक्य या पोस्टच्या आणि एकूणच या ब्लॉगच्या मूडशी विसंगत वाटणारं असलं तरी चालवून घ्या कारण ते खरं आहे.).. त्यावर कडी केली ती या बझने. पूर्वी फक्त एकमेकांच्या पोस्ट्सवर कमेंट टाकणारे आम्ही सगळेजण चॅट/मेल वगैरे वन-टू-वन संवादाच्या पलीकडे जाऊन बझवर जमून सामुहिक चॅटिंग करायला लागलो. खेचाखेची, विनोद, गप्पा, फोटो, गाणी या सगळ्याला नुसता ऊत आला. व्हर्च्युअल कट्ट्याचं व्हर्च्युअल रूप गळून पडलं. एकमेकांशी गळाभेटी घेत किंवा हाय-फाय करत भेटल्यासारख्या गप्पा रंगू लागल्या. थोडक्यात ब्लॉग, मेल, चॅटवर घडू शकलं नाही ते एक मोठं काम बझने केलं. लोकांमधलं अंतर अजून कमी केलं. सगळ्यांशी समोरासमोर बसून गप्पा मारण्याचं सुख मिळालं. हा या बझचा एक जब्ब्ब्ब्ब्ब्ब्बबरदस्त फायदा !!!

पण पण पण (हा आता तिसरा पण हे सुवाओअ ... तरीही).. इथेच कुठेतरी घोडं पेंड खायला लागलं. नाय नाय म्हणजे गप्पा वाढल्या, नाती वृद्धिंगत झालली वगैरेला पेंड खाणं कोण म्हणेल (इथेही वरचा शुंभवाला नियम लागू शकतो. असो.) पण या गप्पा वाढत चालल्या. रोज सकाळी उठल्यावर काल रात्रभर म्हंजी भारतातल्या दिवसभर काय काय गप्पा झाल्या त्या वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होईनाशी झाली. ५०० खरडींनंतर बझ पडत असल्याने रोज एक बझ पाडल्याशिवाय चैन पडेनासं झालं. (मी करोडो रुपयांच्या पैजेवर सांगू शकतो की बझमधला हा किडा (बग बग) आपल्या मराठी ब्लॉगर्सच्या गँगला सोडून कोणाला माहितही नसेल). जाम धमाल यायची. खूप खूप म्हणजे अतिखूप गप्पा व्हायच्या. सगळे विषय चर्चिले जायचे, नवीन बातम्या, ब्लॉग्स, रक्तदानासारखे सामाजिक, सणासुदीचे सांस्कृतिक, भटकंती/ट्रेक, फोटो सगळ्यांवर गप्पा व्हायच्या. पण पण (आधीच्यातलाच हा उप-पण म्हणा हवं तर) या गप्पाटप्पा, खेचाखेची, टगेगिरी, धुमाकूळ या सगळ्यात खूप वेळ जातोय असं लक्षात आलं. फार उशिराने का होईना पण आलं खरं. आणि तेही बायकामुलं.... हा शब्द फक्त वर्णनात्मक सौंदर्यासाठी योजिला आहे हे सुवाओअ... जाउद्या कसं.... रिफ्रेजच करतो. आणि तेही बायको-मुलगा, वाचन, ब्लॉग्स, लिखाण, प्रतिक्रिया, पेपरवाचन, फोन अरे हो आणि हापिसातलं काम [घाईघाईत हा मुद्दा विसरणारच होतो ;) ] हे सगळं सांभाळून !!! नाय बा. आपल्या क्षमतेच्या (आपली ती क्षमता दुसर्‍याची ती लायकी) पलीकडलं होतं हे. बझबझाट कमी करावा हे कळत होतं पण वळत नव्हतं.

गणपतीच्या आधीच्या आठवड्यात दिवसा वाढलेल्या ऑफिसच्या कामामुळे आणि रात्री मखराच्या तयारीमुळे नेटवर आणि त्यामुळे अर्थातच बझवर येणं खूप कमी झालं. तेव्हा तर रोज बझवर काय होत असेल, काय गप्पा होत असतील, त्या आपल्याला कधी वाचायला मिळतील असं वाटत होतं आठवडाभर. दॅट्स इट. तेव्हाच कळलं की हे अति होतंय आता. हाताबाहेर जायला लागलंय. 'मी कधीही कुठल्याही ब्रांडच्या आहारी गेलो नाही' हा मानाने मिरवायचा मुद्दा मला उपडा पाडून माझ्या छाताडावर उभा राहून तांडवनृत्य करतोय असं दिसायला लागलं (चला सुरुवातीच्या अर्थहीन पाल्हाळाची लिंक लागली तर !!).. अर्थात बझ वाईट असं म्हणायचं नाहीये मला पण अतिबझची सवय वाईट.. किंवा जाउदे ते ही नको. हा प्रकार मला झेपण्याच्या पलिकडचा होता असं म्हणू हवं तर. जे काय म्हणायचं ते म्हणू पण थोडक्यात या सर्वव्यापी बझच्या आहारी जाणं कमी करायला लागणार होतं. म्हणून मग प्रयोग म्हणून गणपतीनंतरचा एक आठवडा बझ करणं कमी केलं. त्यानंतर काही दिवस बझवर प्रतिक्रिया देणं, गप्पा मारणं कमी केलं, हळूहळू लाईक करणंही कमी केलं. एकदोघांशी चॅट करताना बझबंदीचा हा निर्णय त्यांच्या कानावर घातला. एकजण गंमतीने म्हणाला की "अरे, ऑफिसचं काम थोडं कमी कर" .. त्याला म्हटलं "अरे अजून कमी केलं तर मायनसात जाईल काम" ते बव्हंशी खरंही असावं.. असो.. जास्त एक्सपोजर नको ;)

तरीही अजूनही बझवर अधूनमधून डोकावणं होतंच. कारण कुठलंही डाएटिंग मला कधीच झेपलं नाहीये. पण हे डाएटिंग करायचंच असा पक्का विचार आहे. भलेही मग त्यासाठी घ-मेल्याच्या पायथ्याशी जाऊन 'बझ बंद करा' वर टिचकी मारावी लागली तरी बेहत्तर.

थोडक्यात मी आता बझवर नसेन. जनरली एखादा कोणी बझच्या गप्पांमध्ये दिसला नाही, त्याचे नवीन बझ दिसले नाहीत, बझला 'लाईक' केलं नाही की बझ्जनांमध्ये थोडी चलबिचल होते आणि ती व्यक्ती कुठे आहे, कशी आहे अशा काळजीपोटीच्या चौकश्या केल्या जातात. त्यामुळे "हमने वो सुन लिया तुमने कहा ही नही" टाईप त्या न विचारलेल्या प्रश्नांचं हे उत्तर समजा किंवा कंपन्या ज्याप्रमाणे नवीन अपडेट्स देण्यासाठी न्यूजलेटर पाठवतात तसं हे न्यूजलेटर समजा (पण हे पुन्हा पुन्हा येऊन पकवणारं न्यूजलेटर नाही) किंवा उगाच एक वाढीव रटाळ पोस्ट समजा किंवा मग नुसताच एक आगाऊपणा समजा. काय हवं ते समजा.थोडक्यात आमच्या बझायुष्याची इति झाली. अर्थात हा कोमा आहे की खरोखरची इति आहे हे काळच ठरवेल.. (हेही वाक्य या पोस्टच्या आणि एकूणच या ब्लॉगच्या मूडशी विसंगत वाटणारं असलं तरी पुन्हा एकदा प्लीज चालवून घ्या कारण हेही खरं आहे.) .. हात्तिच्या "आमच्या बझायुष्याची इति झाली" हा एका वाक्यात कळणारा निरोप देण्यासाठी ब्रांडविश्व ते फेसबुक, ऑर्कुट, बझचे फायदे वाली एवढी मोठी वरात काढली होय ??????

होय.. होय.... होयच !!!! अहो कारण आता बझ नाही त्यामुळे वेळच वेळ आहे !!! नाही का? ;)

आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी फालतू का होईना पण विनोदी, सामाजिक, चित्रपट/पुस्तकं या विषयांवर लिहून झाल्यावर कधीतरी सहज म्हणून कितीही नॉनग्लॅमरस असलं तरीही आपल्याला वाटलं ते लिहिलं तर हरकत नाय ना? ;)

** नेहमीच्या सवयीप्रमाणे ही पोस्ट पण बझ करणार होतो.. ;) वाचलो :P

Friday, September 24, 2010

मला बी 'जत्रं'ला येऊ द्या की वो....

"मी पंखा झालोय यार तिचा.. आणि तिच्या त्यांचाही. काय तो त्यांचा दांडगा आवेश, तो सळसळता उत्साह, ती जळजळीत भाषा, ती रसरशीत लेखणी, ते विखारी फुत्कार, घुत्कार, ठुत्कार, डूत्कार, युत्कार ('त्कार' च्या अलिकडे काहीही लिहिलं तरी चालतं. ते फुत्कार क्याटागरीतलंच ठरतं.) ... जिओ लोक्स जिओ.. तुम्ही महान आहात.. तुमच्यापुढे इतर लोक ते काय... भ्याड, मुर्दाड, स्वाभिमान गमावलेले, कणा नसलेले.. थुत् तिच्यायला त्या इतर लोकांच्या.. तुमची जातच साली काय और आहे. मानला यार तुम्हाला"

आजकाल मी तिचं आणि तिच्या त्यांचं कौतुक करताना थकत नाही.. थकूच शकत नाही.. प्रेमात पडलोय मी त्यांच्या.. त्यांच्या धडाडीच्या.. त्यांच्या त्या जोरदार घोषणांच्या... त्यांच्या तडफेच्या....

"साली ती पाहिजे तर अशी आणि तिचे ते पाहिजेत तर असे.. उगाच नाही तिला 'बरगड्डी संघटना' म्हणत आणि तिचे 'ते' म्हणजे तिचे कार्यकर्ते... माफी सरकार माफी.. कार्यकर्ते नाही मावळे.. बेड्डर, निड्डर मावळे... आंगाश्शी.. हल्ली कुठलाही ब्लॉग, वृत्तपत्रं, बातम्या, मासिकं, वेबसाईटस इत्यादी काहीही बघितलं तरी तिचा आणि त्यांचा उदोउदो चालू असतो सगळीकडे.. छा गेलेत मस्त सगळीकडे !! सध्याच्या काळात एवढ्या वेगाने आणि फार्फार जोमाने घोडदौड करत पुढे येत 'समाजप्रबोधनाचं' (काही सडके याला समाज विघटनाचं कार्यही म्हणतात. म्हणोत च्यायला.. आपल्याला काय.) काम करणारी दुसरी 'ती' माझ्यातरी पाहण्यात नाही."

शेवटी व्हायचं तेच झालं. तिच्याबद्दल इतकं वाचून, ऐकून, पाहून माझा कणा ताठ झाला, स्वाभिमान जागृत झाला, उत्साह परत आला.. आपले शत्रू कोण आणि मित्र कोण याची मला नव्याने ओळख झाली. जर नुसतं वाचून, ऐकून इतका प्रभाव पडत असेल तर मग प्रत्यक्ष तिच्या त्यांना भेटून तर माझ्या जीवनात किती आमुलाग्र बदल होईल विचार करा... हट साला.. अमुलाग्र बदल काय.. ही भटी-बामणी भाषा नकोच.. मी पेटून उठलो, जडावलेल्या मेंदूत तप्त सळया डागाव्यात त्याप्रमाणे मी भस्सकन जागा झालो.. हां.. जमतंय जमतंय.. जमेल जमेल.. !!

तर असा पेटून उठल्यावर, कणा ताठ करून, मेंदू जागृत करून मी थेट पोचलो ते तिच्या हापिसात. आणि दारातूनचं ओरडलो

"ए हलकट कुत्र्यांनो.. असे बसलात काय षंढासारखे? मी तुमच्याकडे आलोय ते तुमच्यात सामील व्हायला. मलाही घ्या तुमच्यात. मलाही काम करू द्या तुमच्याबरोबर. माझं रक्त सळसळत आहे, मेंदूत जाळ आहे, कणा ताठ आहे, स्वाभिमान जागृत आहे."

"अरे ए... कोण तू? काय हवंय तुला? कशासाठी आला आहेस इथे?" त्यांच्यातला मुख्य वाटणारा असा एकजण म्हणाला.

"मला तुमच्यात सामील व्हायचंय. तुमच्याबरोबर काम करायचंय. माझा कणा ताठ आहे, मेंदू जागा आहे."

"अबे, ते सगळं ठीक आहे. पण आम्ही असं कोणालाही आमच्यात सामील करून घेत नाही. आमच्या काही अटी आहेत."

"हो अटी बीटी सगळ्या माहित्येत मला. षंढ नको, नपुंसक नको, स्वाभिमान हवा, मुठी आवळता यायला हव्यात, स्वतःला मावळा म्हणता यायला हवं वगैरे वगैरे ना?"

"अरे तेवढंच नाही बाबा. अजूनही चिकार अटी आहेत. या बघ" असं म्हणत त्याने चक्क एक कागदाचं मोठं भेंडोळंच माझ्या पुढ्यात नाचवलं. अधीरतेने ते हातात घेऊन मी ते अधाशासारखं वाचायला लागलो. त्यात बरगड्डी संघटनेत सहभागी होण्यासाठीची पात्रता, त्यांचे नियम, अटी वगैरे वगैरे दिल्या होत्या. एकंदरीत फारच विचारपूर्वक, अभ्यास करून सगळे मुद्दे मांडलेले होते हे तर स्पष्टच होतं.

बरगड्डी संघटना : पात्रता, नियम व अटी

१. 'बामण' हा शब्द शुद्ध लिहिता आला पाहिजे. अलिकडे 'बामण' ला 'ब्राह्मण' असं म्हणण्याची आणि 'ब्राह्मण' हा शब्दच योग्य आहे असा प्रचार करण्याची एक फ्याशन आलेली आहे. तर या अपप्रचाराला बळी न पडता 'बामण' असं योग्य पद्धतीनेच लिहिता आलं पाहिजे.

२. किरटेगाव बुद्रुकच्या 'दै. सत्यभेदक बातमीदार' किंवा भाम्बुर्डी खुर्दच्या ' दै. रणमर्दाचा आसूड' यांसारख्या महान वृत्तपत्रात पत्रकारितेचा अनुभव असावा. तिथे संपादक असाल तर उत्तमच. अगदीच काही नाही तर निदान संपादकांशी चांगली ओळख तरी असावी. तुमच्या स्वतःच्याच मालकीचं वृत्तपत्र असेल तर मग तर सोन्याहून पिवळं. तुम्हाला संघटनेत महत्वाचं पद मिळणार याची खात्री बाळगा.

३. लेख, ब्लॉग, सदर इ. काहीही लिहिताना दर एका वाक्याआड 'षंढ' हा शब्द आला पाहिजे. षंढ शब्दाचा वाक्यात उपयोग करता आला नाही तर तुमच्या वकुबावर नक्कीच प्रश्नचिन्ह उमटवलं जाईल आणि तुमचा संघटनेतला प्रवेश लांबेल.

४. नागडा, हरामखोर, भट, भटुरडा, नीच, हलकट, पाजी हे शब्द 'षंढ' एवढ्या वारंवारतेने नाही तरी बर्‍यापैकी मुबलक प्रमाणात वापरता आले पाहिजेत.

५. तसंच नपुंसक, रक्त, पेटून, हराम, अवलाद, वर्णवर्चस्व, कष्टकरी, शास्त्री, पिलावळ, भांडार, कर, थंड, रक्त, साले, नीच यांसारखे विविध शब्दही अतिशय कुशलतेने आणि खुबीने जागोजाग पेरता आले पाहिजेत.

६. फक्त मराठा जातीच्या व्यक्तींचा उल्लेख करतानाच नावापुढे जी, साहेब, राव वगैरे शब्द लावले जावेत. अन्य कुठल्याही नावांपुढे हे उल्लेख चालणार नाहीत. कारण जे मराठा नाहीत ते कर्तृत्ववान नाहीत हे तर उघडच आहे. तरीही अजूनही कोणाला काही शंका असल्यास कुठले शब्द कशा रीतीने वापरावेत याचा एक छोटा नमुना पुढीलप्रमाणे. पाहिले शब्द हे (बामणांच्या) बोलीभाषेतील आहेत तर त्यांच्या पुढे दिलेले शब्द हे बरगड्डीच्या सुधारित भाषेतील आहेत.

बाबासाहेब = बाब्या
देशपांडे = देशपांड्या
रामदास = रामदाश्या
पुरंदरे = पुरंदर्‍या
दादोजी = दादू इत्यादी इत्यादी इत्यादी

७. कुठल्याही पुस्तकातल्या उपमा, अलंकार, वर्णन वगैरेंचे उगाच बामणी अर्थ लावू नयेत. बामणाने लिहिलेल्या प्रत्येक ओळीत, प्रत्येक शब्दात एक छुपा अर्थ असतो. आणि प्रत्येक बामण हा नीच, हलकट, पाजी, बेशरम (इथे आपल्या आवडीची विशेषणं/शिव्या आपल्याला कंटाळा येईपर्यंत लावू शकता. कारण ही प्रत्येक शिवी प्रत्येक बामणाला लागू पडतेच.)

उदा. "अ आणि ब यांचं गोत्र एकच होतं" याचा बामणी अर्थ त्यांचं ध्येय, इच्छा, आकांक्षा, दिशा एकच होत्या असा हे बामण तुम्हाला सांगतील. पण याचा खराखुरा आणि छुपा अर्थ मात्र "अ आणि ब चं 'वेगळंच' नातं होतं" हा होतो हे चतुराईने ओळखता आलं पाहिजे.

८. इतिहासातल्या कुठल्याही एका बामण व्यक्तीबद्दल सणसणीत, खणखणीत, दणदणीत माहिती काढून, शोध लावून त्या बामणाचं छुपं स्वरूप सगळ्यांसमोर उघडं केलेलं असेल अशा स्वरूपाचं एखादं २५-३० पानी का होईना पण पुस्तक किंवा गेला बाजार एखादं इ-बुक तरी छापलेलं असलंच पाहिजे.

९. झाकी-बाकी यांसारखी प्रत्यक्षात य ला ट सारखी असणारी पण प्रत्यक्षात सर्वसामान्यांना प्रचंड जवळची अशी वाटणारी, प्रचंड अर्थ असणारी यमकं जुळवता आली पाहिजेत.

उदा : "भांडारकर तो झाकी है, शनिवारवाडा अभी बाकी है" ही जगप्रसिद्ध घोषणा आपण ऐकली असेलच. दरम्यान गेल्याच आठवड्यात एका नवीन मावळ्याने बरगड्डीत प्रवेश मिळवताना खाली दिलेली घोषणा दिली. त्याला एका क्षणात बरगड्डीचं आजीव सभासदत्व मिळालं.
(बरगड्डीत प्रत्येकालाच न्याय मिळतो याचं यापेक्षा उत्कृष्ट उदाहरण दुसरं काय मिळणार?)

ती घोषणा : "रामादाश्या तो झाकी है, ज्ञान्या अभी बाकी है"

ही नऊ अटींची नियमावली वाचता वाचताच माझं रक्त सळसळायला लागलं होतं. मेंदू पेटून उठला होता. सर्वांग थरथरायला लागलं होतं. या अटी वाचून मी प्रचंड प्रभावित आणि उत्साहित झालो होतो. कधी एकदा बरगड्डीत सामील होतो असं झालं होतं मला. पण त्या समोरच्याला काही विशेष घाई नसावी. त्याला काही विशेष वाटलं नाही माझी अवस्था बघून.

त्याने थंडपणे (चुकून षंढपणेच लिहिणार होतो. प्रभाव प्रभाव म्हणतात तो हाच असावा.) विचारलं "मान्य आहेत सगळ्या अटी? सगळ्या नियमांची पूर्तता होते आहे?"

मी घाईघाईने पुन्हा एकदा सगळे नियम वाचले आणि अत्यानंदाने हो SSS अशी आरोळी ठोकली.

"बरं मग कुठल्या वृत्तपत्राशी तुम्ही संबंधित आहात?"

"अम्म्म्म्म.. कुठल्याच नाही" मी पडेल स्वरात म्हणालो.

"बरं मग एखादं पुस्तक बिस्तक? इ-बुक ही चालेल." नाही हो तेही नाही. मी जवळपास रडवेला व्हायला आलो होतो.

"हूं !!!" तो अपार तुच्छतेने माझ्याकडे बघून म्हणाला "असं चालणार नाही. २ आणि ७ या तर सगळ्यांत महत्वाच्या अटी आहेत. त्या पाळल्या गेल्याच पाहिजेत. च्यायला, काही तयारी करत नाहीत आणि येतात उठून बरगड्डीत जायचं म्हणून. नेहमीचं आहे हे तुम्हा लोकांचं."

"प्लीज काहीतरी करा ना. काहीतरी करता येईलच. काहीतरी मार्ग असेलच."

"हम्म. मार्ग आहेच. तुम्ही काही पहिले नाही आहात अशा अटी पूर्ण न करणारे. पण तुमच्यासारख्यांसाठीच आम्ही एक तरतूद केली आहे."

"कोणती तरतूद? सांगा ना.." मी प्रचंड आनंदी होत विचारलं.

"सांगतो. नीट ऐका."

"बोला, बोला. ऐकतोय"

"तुम्हाला लिहिता येतं का, तुमचं मत मांडता येतं का, वेळप्रसंगी पेपरात लिहायची वेळ आली, एखाद्या वादग्रस्त विषयावर छोटसंच का होईना पण एखादं इ-बुक काढायची वेळ आली तर ते जमेल का याची परीक्षा म्हणून तुम्ही एक काम करायचं. तुम्हाला आमच्या या बरगड्डी संघटनेत का यावसं वाटलं, तुम्ही त्याच्यासाठी काय प्रयत्न केलेत, तुम्हाला काय अनुभव आले, तुम्ही इथे कसे आलात, इथे काय झालं हे सगळं एका छोट्या वृत्तांकनाच्या/बातमीच्या स्वरूपात लिहून आणायचं. सगळं लिहा, तुम्हाला काय वाटेल ते लिहा. अगदी आपलं हे बोलणं, नियम, अटी, तुमचे अनुभव वगैरे यावर लिहिलंत तरी चालेल. पण काहीतरी लिहावं लागेल. तुम्ही तुमचा लेख आम्हाला द्यायचा. आमची कमिटी तो लेख वाचेल आणि त्यावरून तुम्हाला बरगड्डीत प्रवेश द्यायचा की नाही ते ठरवलं जाईल."

मी प्रचंड खुश झालो. हे काम नक्की होईल असं वाटत होतं. असा एखादा लेख मी कधी लिहिला नव्हता पण लिहिणं काही अवघडही नव्हतं. शाळेतल्या निबंधासारखं तर लिहायचं होतं. त्यात काय मोठंसं???

-------

मला जाम टेन्शन आलंय. त्याने सांगितल्याप्रमाणेच मी बरगड्डीत का आलो, संघटनेचा सभासद व्हावसं मला का वाटलं, अटी, नियम काय होते, ते मी कसे पूर्ण केले वगैरे वगैरे काहीतरी लिहून टाकून तो लेख मी त्यांना देऊन आलोय. कुठला काय? अहो हाच वर दिलेला... थोडा बाळबोध वाटतोय पण जाउदे... आवडला का तुम्हाला? आवडेल का त्यांनाही? मिळेल का मलाही बरगड्डीचं सभासदत्व? टेन्शन.... नुसतं टेन्शन सालं !!! पण काम होईल बहुतेक... असं वाटतंय तरी खरं....

"रामादाश्या तो झाकी है, ज्ञान्या अभी बाकी है"
"हेल बरगड्डी !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!"


*** मला हे माहित आहे आणि कळतंही आहे की बरगड्डीचे कितीही दावे असले तरी सगळेच मराठा लोक काही बरगड्डीच्या बाजूचे नाहीत, उलट बरगड्डीचे लोक हे जे काही करताहेत त्यांचा त्यांना रागच आहे. तसंच बरगड्डीचे लोक जातीपातीच्या नावावर आपल्याच समाजात फुट पाडताहेत याचीही सर्व सुज्ञांना जाणीव आहेच हेही मला ठाऊक आहे. परंतु हीच जाणीव वेड पांघरून पेडगावला जाणार्‍या बरगड्डीवाल्यांनाही व्हावी म्हणून हा खटाटोप (तो व्यर्थच जाणार याची खात्री असली तरीही) !!!!!!...... अजून एक गोष्ट म्हणजे इतक्या वेळा जातीपातीचा उल्लेख पोस्टमध्ये आल्याबद्दल माझी मलाच प्रचंड लाज वाटते आहे. पण हल्ली हे असले 'आधुनिक जातीभेदा'चे आणि उगाचंच एकाच समाजाला त्यांच्या पूर्वजांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल आजही पद्धतशीरपणे दोषी ठरवून उफराटे न्याय लावण्याचे हे प्रकार फार म्हणजे फारच वाढले आहेत. वृत्तपत्रांपासून ते थेट ब्लॉगपर्यंतचं प्रत्येक माध्यम या किडीने व्यापलं आहे हे बघून कसंसंच होतं. "जाउदे, मुर्ख आहेत च्यायला.. कशाला लक्ष द्यायचं यांच्याकडे" असं म्हणून या विचित्र प्रकारांकडे दुर्लक्ष करून गप्प बसलो तर म्हातारीही मरते आणि काळही सोकावतो. त्यामुळे त्या काळाला (उर्फ कलीला) वेळीच रोखण्यासाठी हा आपला छोटासा खारीचा वाटा. तरीही नकळतच का होईना चुकूनही कोणाच्या (अर्थातच बरगड्डीचे गडी सोडून) भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी सखेद अंतःकरणाने क्षमा मागतो.

Thursday, September 23, 2010

फॅरनहीट, लुज चेंज, कॉन्स्पिरसी थिअर्‍या इत्यादी इत्यादी

हे वाचन, नेट.. माहितीचा खजिना... अनेक उलटसुलट मतं.. अनेक सत्य, अनेक दावे, अनेक भास, अनेक अफवा.. अनेक मतमतांतरं.. साले सगळे संदर्भच बदलून जातात.. पण आपलेच.. अनेकांना हे संदर्भ इटसेल्फच नवीन असतात.. त्यांची पुसटशीही कल्पना नसते, जाणीव नसते.. अगदी आपण पूर्वी होतो तसेच म्हणजे उलटसुलट माहितीचा खजिना आणि ते सत्यच आहे हे छातीठोकपणे सांगणार्‍या अनेक माहितीस्त्रोत आपल्यासमोर सत्य उलगडून ठेवण्यापूर्वी होतो तसेच.. अगदी तसेच..

मी 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरची जागा पहिल्यांदा २००५ च्या ख्रिसमसमध्ये बघितली. जागा कसली अवाढव्य खड्डाच तो. चारी बाजूंनी भक्कम जाळीच्या भिंती उभारून बंद केलेला. प्रचंड खोदकाम चालू होतं. भल्यामोठ्ठ्या क्रेन्स, ट्रक्स अन् कायकाय होतं तिथे. स्वेटर्स, जॅकेटच्या चार लेयर घालूनही त्या प्रचंड थंडीत कुडकुडत कुडकुडत इतर टुरिस्टस (तेव्हा मी नवीन यॉर्कात नसल्याने मी ही टुरिस्टच होतो) सारखाच त्या जाळीतून कसाबसा डोकावून 'इथे पूर्वी वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं' असं कॅप्शन टाकता येईल अशा टाईपचे फोटो काढण्यासाठी जीवाची धडपड करत होतो. त्यानंतर जवळच असलेल्या ९/११ च्या घटनेविषयी माहिती देणार्‍या एका छोट्या सेंटरमध्ये गेलो. तिथे त्यावेळचे फोटोज, प्रचंड धूर, धुरळा, रस्त्याने धावणारे न्यूयॉर्कर्स, धावपळ करणारे पोलीस आणि अग्निशमनदलाचे लोक असे अनेकानेक फोटो लावले होते. जवळच थोडक्यात घटनाक्रम मांडला होता. तो विराट खड्डा बघून जेवढी विषण्णता आली नाही तेवढी हे फोटो बघून आली. सत्तेच्या, अहंकाराच्या, धर्मांधतेच्या, द्वेषाच्या, सुडाच्या अनिवार वासनेपायी कित्येक निष्पापांनी आपले जीव गमावले होते.

दरम्यान मायकल मूरचा फॅरनहाईट ९/११ बघण्यात आला. तसा मी तो आधीही बघितला होताच. पण काही संदर्भ नीट कळले नव्हते. कदाचित आता प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देऊन आल्यावर, काही वाचन केल्याने बर्‍याच गोष्टी नीट स्पष्ट झाल्या असाव्यात. त्यानंतर काही दिवस तर ९/११ च्या कॉन्स्पिरसी संदर्भात माहिती शोधण्याचा मला छंदच जडून गेला.. छंद कसला व्यसनच. त्या एकूण प्रकाराबद्दल बरंच वाचन केलं, अनेक लिंक्स पालथ्या घातल्या. त्याच काळात 'लुज चेंज' बघण्याचा योग आला. 'लुज चेंज' ही २००५ ते २००९ च्या दरम्यान रिलीज झालेल्या शॉर्टफिल्म डॉक्युमेंटरीजची एक सिरीज आहे. ही ९/११ च्या घटनेमागचे अनेक संदर्भ सांगते, अनेक पुरावे देते. अत्त्युच्च सरकारी पातळीवर या घटनेची आखणी कशी केली गेली होती आणि ९/११ चे हल्ले हे ओसामा बिन लादेन किंवा अल कायदाच्या १९ अतिरेक्यांनी केले नसून स्वतः बुश प्रशासनानेच कसे केले होते याबद्दलचे अत्यंत धक्कादायक निष्कर्ष मांडते. ही शॉर्टफिल्म सर्वप्रथम २००५ मध्ये प्रदर्शित झाली, त्यानंतर थोडे अजून मुद्दे मांडून २००६ आणि २००७ पुन्हा प्रदर्शित करण्यात आली. प्रत्येक रिलीजमध्ये अजून काही नवीन मुद्दे मांडून आपण आधी काढलेल्या निष्कर्षाचा पुनरुच्चार ही सिरीज करते.

प्रत्येक गोष्टीला, घटनेला, इतकंच काय तर माणसांच्या वागण्यालाही दुसरी बाजू असते यावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण या प्रकारातली दुसरी बाजू इतकी काळी असेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अनेक उलगडे झाले, अनेक गूढं उकलली, अनेक खुलासे झाले, अनेक भ्रम निमाले. अर्थात प्रत्येक मोठ्या घटनेच्या काही कॉन्स्पिरसी थिअरीज असतातच. अनेक गुपितं उलगडल्याचे दावे केले जातात. ९/११ बद्दलची कॉन्स्पिरसी थिअरीही तशीच काहीशी. 9/11 conspiracy theory असं गुगल केलंत की ढिगाने साईट्स आणि व्हिडीओज मिळतील. पण हे खरं असेल तर मात्र आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या सामान्य कल्पनांना जोरदार सुरुंग लागणार एवढं मात्र नक्की. खाली दिलेले व्हिडीओज बघा. मुख्यत्वे 'लुज चेंज' आणि 'ग्रुसम ट्रुथ' वाले.. हे दोन्हीही व्हिडीओज प्रत्येकी ७०-८० मिनिटांचे आहेत. पण मिनिटाला एकेक अशा वेगाने एकेक रहस्य उलगडत जातं. अनेक घटना, तेव्हाची स्थिती, नव्याने मांडल्या जातात किंवा त्यांच्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दाखवला जातो. हे दोन्ही व्हिडीओज थोडे मोठे असले तरीही नक्की बघाच. तसंच या व्हिडीओजमध्ये आलेले काही अतिशय महत्वाचे मुद्दे मी खाली थोडक्यात देतोच आहे.

९११ लुज चेंज :लुज चेंज : फायनल कट :९११ ग्रुसम ट्रुथ (911 Gruesome Truth) : यात ९/११ च्या दरम्यान घडलेल्या अनेक संशयास्पद घटनांचा उहापोह केलेला आहे.
Controlled Demolition of WTC-7 : या व्हिडीओमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर-७ वाला टॉवर कसा पद्धतशीरपणे स्फोटकांच्या सहाय्याने (जसं कंट्रोल्ड डिमोलिशनमध्ये केलं जातं त्याप्रमाणे) पाडला गेला यावर भाष्य केलं आहे.Newton's laws temporarily suspended : या व्हिडीओमध्ये न्युटनच्या गतिविषयक नियमांना अनुसरून टॉवर्सचं पडणं हे नैसर्गिक नसून ते स्फोटकांच्या सहाय्यानेच कसे पाडले गेले याचं विश्लेषण आहे. व्हिडिओकर्त्यांच्या म्हणण्यानुसार टॉवर्सच्या पडण्याच्या संदर्भातल्या सरकारच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवायचा झाल्यास न्युटनचे गतिविषयक नियम तात्पुरते का होईना रद्दबातल ठरवावे लागतात.या सगळ्या व्हिडीओज मध्ये मांडलेले महत्वाचे मुद्दे मी इथे संकलित करतो आहे. अर्थात या व्हिडीओजमध्ये नसलेले पण आत्तापर्यंत अनेक वेळा उपस्थित केले गेलेले इतरही अनेक मुद्दे आहेत. उदा.

१. अमेरिकन शस्त्रास्त्र कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात शस्त्रनिर्मिती केली होती. आणि जर का ती शस्त्रास्त्र वापरली गेली नसती तर त्या कंपन्या डबघाईला आल्या असत्या. त्यामुळे मुद्दामच हा ९/११ चा हल्ला घडवला गेला जेणेकरून या हल्ल्यानंतर अमेरिका आपोआपच युद्ध करण्यासाठी प्रवृत्त झाली आणि अमेरिकन नागरिकांचाही सरकारच्या निर्णयाला पाठींबा मिळाला.

२. हल्ल्यानंतर होणार्‍या युद्धाच्या निमित्ताने आखाती देशांमधल्या तेलसाठ्यांवर अमेरिकेला कब्जा मिळवता आला.

३. युद्धानंतर अफगाणिस्तान, इराकमध्ये अमेरिकेच्या तालावर नाचणारं कठपुतळी सरकार स्थापन करण्यात आलं. जेणेकरून अमेरिकेचा त्या देशांवर पूर्ण कब्जा राहील.

४. युद्धसमाप्तीनंतर रस्तेबांधणी वगैरेंसारख्या विकासकामांची मोठमोठी कंत्राटं अमेरिकन कंपन्यांनाच मिळाली.

आता या व्हिडीओज मध्ये उल्लेखलेले महत्वाचे मुद्दे पाहू.

१. '९११ ग्रुसम ट्रुथ' वाल्या व्हिडीओनुसार हल्ला घडवला गेला तो अतिरेक्यांच्या मार्फत नव्हेच. कदाचित रिमोटच्या सहाय्याने विमानं चालवली गेली असावीत किंवा प्रवासी विमानांच्या ऐवजी कार्गो विमानं धडकावली गेली असावीत. पण काही झालं तरी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १९ मुस्लीम अतिरेक्यांनी ४ प्रवासी विमानांचं अपहरण करून ती या टॉवर्सन धडकावली हे दिशाभूल करणारं आहे. कारण ब्रिटीश प्रेसच्या न्यूजप्रमाणे त्या १९ अतिरेक्यांमधल्या तब्बल ७ छायाचित्रांशी साधर्म्य साधणारे स्थानिक तरुण पोलिसांना भेटले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार "छायाचित्रात दाखवलेली व्यक्ती मी आहे. पण मी अतिरेकी नाही. मी सामान्य माणूस आहे. मी जिवंत आहे. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.".... पण त्यातल्या एकाही व्यक्तीची दाखल घेतली गेली नाही आणि हे प्रकरण सुरुवातीलाच दाबलं जाईल याची पुरेपूर खबरदारी घेतली गेली.

२. फिडेल कॅस्ट्रोला क्युबामधून निलंबित करण्यासाठी अमेरिकेने १९६० साली एक 'ऑपरेशन नॉर्थवूड्स' नावाची योजना आखली होती. त्या ऑपरेशनप्रमाणे

अ. वॉशिंग्टन डीसीवर बॉम्बहल्ले करून त्याचा आळ क्युबावर घ्यायचा.

आ. अमेरिकन सैनिकांनी क्युबन सैनिकांचे गणवेश परिधान करून 'ग्वांटानामो बे' येथल्या अमेरिकन नौदलाच्या तळावर (Naval base) हल्ला करायचा. जेणेकरून क्युबाशी युद्ध उकरून काढण्याचे अमेरिकेचे डावपेच यशस्वी होतील आणि अमेरिकन नागरिकही आपोआपच युद्धाला पाठींबा देतील.

३. तर या 'ऑपरेशन नॉर्थवूड्स'प्रमाणेच आत्ताही अफगाणिस्तान आणि इराकशी युद्ध करून तिथल्या तेलसाठ्यांवर कब्जे करणं आणि तिथे आपल्या मर्जीतली सरकारं स्थापणं हे अमेरिकेसाठी अत्यावश्यक झालं होतं. पण हे युध्द लादण्यासाठी तशीच काही सक्षम कारणं दाखवणं आवश्यक होतं. त्यामुळेच हा ९/११ चा घाट घातला गेला. नुसत्या अमेरिकन अर्थव्यवस्थेवरच नाही तर अमेरिकन सुरक्षायंत्रणेवरही हल्ला पुकारला गेला आहे असं दाखवणं आवश्यक होतं. त्यामुळे मग डब्ल्यू.टी.सी. बरोबरच पेंटागॉनवरही हल्ला केल्याचं भासवलं गेलं.

४. पण पेंटागॉनवर जसा हल्ला केला गेल्याचं सांगितलं जातं तसा हल्ला प्रत्यक्षात विमानाने करणं हे जवळपास अशक्य होतं. कारण

अ. पेंटागॉन हा अँण्ड्रयुज हवाई तळा (एअरफोर्स बेस) पासून फक्त १५ मैलांवर आहे. या हवाईतळावरील फायटर जेट्स वॉशिंग्टन डीसीला कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी सदैव पूर्णतः तयारीत असतात.

आ. पेंटागॉनच्या हवाईक्षेत्रात शिरणार्‍या कुठल्याही अनाहूत विमानावर थेट हल्ला होऊन ते क्षणार्धात नष्ट करण्यासाठीची यंत्रणा पेंटागॉनच्या बाहेर कार्यान्वित आहे.

इ. पेंटागॉनवर विमान धडकावणारा तथाकथित वैमानिक हानी हान्जोर हा अतिशय सामान्य दर्जाचा वैमानिक होता. ही माहिती त्याने जिथून विमान प्रशिक्षण घेतल्याचे पुरावे मिळाले आहेत त्या विमान प्रशिक्षण संस्थेकडूनच मिळाली. याच्यासारख्या सामान्य दर्जाच्या वैमानिकाला एवढं पद्धतशीरपणे आणि अचूकतेने पेंटागॉनवर विमान धडकायला जमणं हे सर्वस्वी अशक्य होतं. किंबहुना एखाद्या कसलेल्या वैमानिकासाठीही ही गोष्ट अतिशय अवघड होती.

ई. पेंटागॉनच्या भिंतीला पडलेलं भगदाड हे इतकं लहान आहे की तिथे विमानाने हल्ला झाला यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. विमानाने हल्ला झाला असता तर संपूर्ण भिंतच कोसळली असती.

या सर्व मुद्दयांचं तात्पर्य एकच की पेंटागॉनवर झालेला हल्ला हा विमानाने झालेला नव्हता तर मिसाईल्स वापरून करण्यात आला होता. किंबहुना अमेरिकेच्या स्वतःच्या फायटर जेटनेच हा मिसाईल हल्ला घडवून आणण्यात आला.

५. तज्ज्ञांच्या मते ट्विन टॉवर्समध्ये अनेक बोईंग विमानांचे हल्ले पचवूनही न कोसळता उभे राहण्याची क्षमता होती. त्यामुळे फक्त २ विमानांच्या हल्ल्याने एवढ्या बुलंद इमारती कोसळणं हे सर्वस्वी अशक्य होतं. थोडक्यात ट्विन टॉवर्स पाडण्यासाठी विमानं हे नुसतं दाखवण्याचं कारण आहे आणि ते पाडण्यामागचं खरं कारण म्हणजे टॉवर्सच्या आतून पेरली गेलेली असंख्य विस्फोटकं हेच आहे.

६. डब्ल्यूटीसी-७ च्या मागचं रहस्य तर फार मोठं आहे. ही ४७ मजली इमारत नॉर्थ आणि साउथ टॉवर्सपासून कमीत कमी ३०० फूट अंतरावर होती. हिला तर कुठलंही विमान वगैरेही येऊन धडकलं नव्हतं. तरीही अचानक संध्याकाळी आग लागून ही इमारतही पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे काही सेकंदात जमीनदोस्त झाली. या इमारतीत सीआयए, संरक्षण खातं, आय आर एस (टॅक्स डिपार्टमेंट), सिक्रेट सर्व्हिसेस (ज्यांच्यावर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची जवाबदारी असते) त्यांची कार्यालयं होती. तसंच या इमारतीत वॉलस्ट्रीटवरच्या अनेक कंपन्यांची चौकशी चालू होती. पण तरीही ही इमारत नक्की कशामुळे कोसळली हे नक्की कळलंच नाही. त्यामुळे याचं गुढ अजूनच जास्त आहे. या इमारतीच्या आजूबाजूच्या इमारती व्यवस्थित राहिल्या. मात्र ही इमारत सरळ खाली कोसळली. ती ही फक्त ६ सेकंदात. सरकारी स्पष्टीकरणाप्रमाणे ट्विन टॉवरच्या पडण्याने निर्माण झालेल्या प्रचंड उष्णतेमुळे या बिल्डिंगला आग लागून ती कोसळली. यावर या डॉक्युमेंटरीमध्ये जगभरातल्या इतर अनेक गगनचुंबी इमारतींची उदाहरणं दिली आहेत ज्यांना आगी लागल्या, आग अनेक मजल्यांमध्ये पसरली, आग विझवायला अनेक तास लागले पण तरीही त्यातली एकही इमारत कोसळली नाही. कोसळले ते फक्त ट्विन टॉवर्सच !!

७. तेरेसा वेलीझ नावाची ट्विन टॉवरमधल्या नॉर्थ टॉवरच्या ४७व्या मजल्यावर बसलेली कर्मचारी म्हणते "सगळीकडून स्फोटांचे प्रचंड आवाज येत होते. सर्वत्र बॉम्ब पेरलेत असं वाटत होतं आणि कोणीतरी अतिशय सुसूत्रतेने रिमोट च्या सहाय्याने त्या बॉम्बसचा स्फोट करत होतं."

८. ९:५९ ला साउथ टॉवर १० सेकंदात कोसळला. २९ मिनिटांनी नॉर्थ टॉवरही बरोबर १० सेकंदात सरळ खाली आला. ट्विन टॉवर्सला आग लागली तेव्हा सगळ्यात आधी तिकडे पोचले ते न्यूयॉर्क सिटीचे अग्निशमन दलाचे जवान. आग विझवण्याच्या प्रयत्नात असताना त्यांनाही तिथे बॉम्बसचे आवाज ऐकू आले. इमारत पाडण्याच्या दृष्टीनेच बॉम्बस पेरले होते असं त्यातल्या अनेकांनी खात्रीपूर्वक सांगितलं.

९/११ च्या काही महिने आधीच्या महत्वाच्या घडामोडी.

१. २४ ऑक्टोबर २००० : पेंटागॉनमध्ये दोन प्रशिक्षणांचा एक वर्ग घेतला गेला ज्यात बोईंग ७५७ चा हल्ला झाला तर तो कसा रोखायचा/परतवायचा याचं प्रात्यक्षिक दिलं गेलं. असा हल्ला लवकरच होऊ शकतो अशा शक्यताही वर्तवल्या गेल्या.

२. ४ जुलै २००१ : ओसामा बिन लादेनला दुबईमध्ये विशेष हॉस्पिटलमध्ये भरती करून त्याला ट्रीटमेंट दिली गेली. त्यासाठी तिथला संपूर्ण कर्मचारी वर्ग बदलला गेला. लादेनला भेटण्यासाठी सीआयएचे स्थानिक प्रमुख स्वतः तिथे गेले होते.

३. २४ जुलै २००१ : लॅरी सिल्व्हरस्टन या डब्ल्यूटीसी-७ च्या मालकाने ती इमारत ३.२ बिलियन डॉलर्सना (अंदाजे १५०० कोटी रुपये ) ९९ वर्षांसाठी भाडेपट्टीने दिली. तसंच त्या इमारतीचा अंदाजे तेवढ्याच किंमतीचा विमा उतरवला ज्यात अतिरेकी हल्ल्यांपासून होणार्‍या नुकसानाबद्दलच्या तरतुदीचा प्रामुख्याने अंतर्भाव होता.

४. ६ सप्टें २००१ : युनायटेड एअरलाईन्सच्या शेअरवर ३१५० 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत चौपट अधिक होते. कुठल्याही कंपनीच्या समभागावर पुट ऑप्शन अशा वेळी लावला जातो ज्यावेळी तो समभाग कोसळणार अशी बाजाराची खात्री असते.

५. ७ सप्टें २००१ : बोईंग कंपनीच्या समभागावर २७२९४ 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत पाचपट अधिक होते.

६. १० सप्टें २००१ : अमेरिकन एअरलाईन्सच्या समभागावर ४५१६ 'पुट' ऑप्शन लावले गेले जे सर्वसामान्य दिवसाच्या तुलनेत अकरापट अधिक होते.

(हल्ल्यांमध्ये वापरली गेलेली विमानं बोईंग कंपनीने बनवलेली आणि वरील दोन विमान कंपन्यांच्या मालकीची होती याला योगायोग मानणं हा भाबडेपणा ठरावा.)

७. १० सप्टें२००१ : पेंटागॉनमधल्या अनेक महत्वाच्या व्यक्तींनी आपली दुसर्‍या दिवशीची उड्डाणं रद्द केली.

८. १० सप्टें२००१ : सॅन फ्रान्सिस्कोचे मेयर विली ब्राउन यांनाही असाच एक फोन येऊन त्यात त्यांना दुसर्‍या दिवशीचं त्यांचं उड्डाण रद्द करण्यास फर्मावण्यात आलं होतं. कालांतराने तो फोन स्वतः कोंडोलिसा राईस (बुश प्रशासनाच्या तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) यांनी केला असल्याचं उघडकीस आलं.

९. १० सप्टें २००१ : पाकिस्तानातल्या एका हॉस्पिटलमध्ये ओसामा बिन लादेन याला विशेष देखरेखीखाली काळजीपूर्वक ठेवण्यात आलं.

१०. अँण्ड्रयुज हवाईतळावरची अनेक फायटर जेट्स अलास्का आणि उत्तर कॅनडाला एका तथाकथित ऑपरेशन मिशनसाठी हलवण्यात आली.

११. पेंटागॉनपासून फक्त १५ मैलांवर असलेल्या याच अँण्ड्रयुज हवाईतळावरून अनेक विमानांच्या तुकड्या १८० नॉटीकल मैलांवर असलेल्या नॉर्थ कॅरोलायनाला एका तथाकथित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी हलवल्या गेल्या. अशा तर्‍हेने फक्त चौदा विमानं पेंटागॉनच्या संरक्षणासाठी शिल्लक राहिली.

१२. पेंटागॉनवर कोसळलेलं विमान ज्या पद्धतीने धडकाल्याचं सांगितलं जातं अगदी त्याच पद्धतीने पण एक अतिशय छोटंसं विमान काही वर्षांपूर्वी कोसळलं होतं. त्यावेळी ते जमिनीवर कोसळताना आसपासच्या हिरवळीवर प्रचंड मोठ्या खुणा उमटल्या होत्या. तसेच आजूबाजूचे इलेक्ट्रिसिटीचे खांब उखडले गेले होते. पण त्या विमानापेक्षा कैक पटीने मोठं असूनही पेंटागॉनवर आदळलेल्या विमानाच्या बाबतीत असं काहीच घडलं नाही.

१३. पेंटागॉनवर बोईंग ७५७ कोसळलं असं सरकारतर्फे सांगितलं जात असलं तरीही कुठेही ७५७ सारख्या मोठ्या विमानाचे अवशेष सापडले नाहीत. त्यावर सरकारतर्फे असं स्पष्टीकरण दिलं गेलं की प्रचंड उष्णतेमुळे विमानाचे सर्व अवशेष वितळून गेले. क्षणभर या दाव्यावर विश्वास ठेवायचा म्हटला तरी जर त्या ठिकाणची उष्णता एखाद्या मोठ्या विमानाला वितळून टाकण्याएवढी अतिप्रखर होती तर मग फोरेन्सिक टीमला एकूण १८९ मृतांपैकी १८४ लोकांची प्रेतं कशी सापडली? एखाद्या जेटला वितळवून टाकण्याची क्षमता असणार्‍या उष्णतेत ती प्रेतं जळून खाक कशी झाली नाहीत?

१४. बोईंग विमानाचं इंजिन हे स्टील आणि टीटानियम पासून बनवलेलं असतं. त्यात प्रत्येकी ६ टनांची अशी दोन इंजिन्स असतात. तसंच त्या विमानांचं इंधन हे केरोसिनसदृश असतं.या दोघांचाहि मेल्टिंग पॉईंट २२०० डिग्रीच्या (फॅरनहाईट) वर आहेत. समजा या सगळ्या गोष्टी वितळून गेल्या असत्या तरी निदान या दोन प्रचंड अवाढव्य इंजिन्सचे अवशेषतरी नक्कीच मिळाले असतेच. याउलट एका अतिशय छोट्या विमानाच्या काही फुटी इंजिनाचे अवशेष सापडले. "ते अवशेष बोईंगचे नक्कीच नाहीत" असं बोईंगचं इंजिन बनवणार्‍या हनिवेल आणि रोल्सरॉईस कंपन्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

१५. पेंटागॉनवर आदळलेल्या विमानाचे अवशेष पाहिले असता ते जे विमान धडकलं असं सांगितलं जातं त्यातल्या कुठल्याही भागांशी साधर्म्य सांगत नाहीत.

१६. पेंटागॉनचे कर्मचारी एक अजस्त्र वस्तू निळ्या आवरणाखाली झाकून नेताना दिसले. पण त्यात काय होतं याचा कधीच उलगडा झाला नाही.

१७. जर पेंटागॉनवर धडकलेलं विमान जागच्या जागी वितळून गेलं असेल तर ही जगाच्या उड्डाण इतिहासातली अशा स्वरुपाची पहिली घटना असेल. पेंटागॉनच्या बाहेरच्या संरक्षक भिंतीला एक १६ फुटाचं भगदाड पडलं. जर ७५७ सारखं एखादं १५५ फूट लांब, ४४ फूट उंच, १०० टन वजन असलेलं विमान जर ताशी ५३० मैलाच्या वेगाने येऊन धडकलं तर फक्त १६ फूटाचं भगदाड पडतं यावर कसा विश्वास ठेवायचा?

१८. पेंटागॉनवरच्या हल्ल्याच्या वेळी पेंटागॉनच्या वेस्ट साईडला काम करत असलेली एप्रिल गॅलप नावाची एक स्त्री खूप जखमी झाली. तिच्या म्हणण्यानुसार ती हॉस्पिटलमध्ये असताना सुटाबुटातले काही लोक तिला भेटायला येत असत. त्यांनी कधीही त्यांची नावं सांगितली नाहीत किंवा ते कुठल्या सरकारी खात्यात काम करतात तेही सांगितलं नाही. ते फक्त म्हणत असत की नुकसानभरपाई घे आणि तुझं तोंड बंद ठेव. तसंच ते सतत, वारंवार हेच म्हणत असत कि लक्षात ठेव पेंटागॉनवर जे आपटलं ते विमान होतं. ती पुढे म्हणते "पण मी तर तिथे विमान बघितलं नाही. एवढंच काय तर विमानाचे अवशेषही बघितले नाहीत. हे विमान प्रकरण निव्वळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी पद्धतशीरपणे पसरवलं जातंय असं नक्की वाटतं."

१९. घटना घडल्यानंतर तिथे काम करणाऱ्या अनेकांना तिथे विस्फोटकसदृश वस्तूंचे वास आले.

२०. सरकारतर्फे पुरावा म्हणून प्रदर्शित केल्या गेलेल्या अधिकृत व्हिडीओमध्ये कुठेही बोईंग ७५७ आढळत नाही.

२२. हल्ल्याच्या पूर्वी चार दिवस जो पेंटागॉनचा एरियल व्ह्यू घेतला गेला होता त्यात पेंटागॉनच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच्या हिरवळीवर एक पांढरा मोठा पट्टा दिसतो. चार दिवसांनी बरोब्बर त्या पट्ट्याने आखलेल्या मार्गावरून येऊन विमान धडकलं.

२३. अतिप्रखर उष्णतेमुळे विमानांचे ब्लॅकबॉक्सेसही वितळून गेले/सापडले नाहीत असं सांगितलं जातं. परंतु अनेक प्रवाशांचे पासपोर्टस मात्र सापडले !!!!!!!!

२४. काही महिन्यांपासून मिळत असलेल्या बॉम्बच्या धमक्यांमुळे आणि अफवांमुळे ट्विन टॉवर्सचं सुरक्षा कार्यालय अधिक सजग होउन काम करत होतं. परंतु ११ सप्टेंबरच्या बरोब्बर चारच दिवस आधी तिथली सुरक्षा कमी केली गेली. तिथली श्वानपथकं इतरत्र हलवली गेली.

२५. १५ जुलै २००१ ला न्यूयॉर्कमधल्या चारशे फूट उंचीच्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळातल्या दोन टाक्या कंट्रोल्ड डीमोलीशनच्या सहाय्याने पाडण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही त्याचं स्पष्टीकरण किंवा कारणही दिलं गेलं नाही किंवा ते कामही थांबवलं गेलं नाही. त्या का पाडल्या गेल्या याचं कारण कोणाला कधीच कळलं नाही. ती ११ सप्टेंबरची रंगीत तालीम होती का?


थोडक्यात :

१. ११ सप्टेंबरचा अमेरिकेवरचा हल्ला हा अतिरेकी हल्ला नसून बुश प्रशासनाने स्वतःच आखणी आणि अंमलबजावणी केलेला एक मोठ्ठा कट होता.

२. या हल्ल्यांमुळे अनेक संबंधितांनी आपापली उखळं पांढरी करून घेतली.

३. अमेरिकेचा इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा मार्ग मोकळा झाला आणि त्याला अमेरिकन नागरिकांच्या पाठिंब्याचं बळही मिळालं

४. अमेरिकेचं भवितव्य हातात असलेल्या लोकांनी हजारो निष्पाप जीव आणि करोडो डॉलर्सचा बळी देऊन स्वतःचे स्वार्थ आणि राजकीय लालसा पूर्ण केल्या.

ही आणि अशी अनेक धक्कादायक विधानं, मतं या व्हिडीओज मध्ये आहेत. व्हिडीओ बघून झाल्यावर डोकं अक्षरशः सुन्न होऊन जातं? खरंच हे असं झालं असेल का असं सारखं वाटत राहतं. अर्थात कुठल्या बाजूवर विश्वास ठेवायचा हे आपापल्या मर्जीवर आहे. कोणाला कुठली बाजू पटते हे ज्याच्या त्याच्या मनावर, दृष्टीकोनावर आहे. पुन्हा सांगतो. प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू ही असतेच. आणि एखादी गोष्ट खूप मोठ्या पातळीवर म्हणजे अनेक लोकांच्या जीवनावर परिणाम करणार्‍या पातळीवर घडलेली असेल ज्यात अनेक व्यक्ती, संपत्ती, स्वार्थ, सत्ता गुंतलेल्या असतील तर त्या गोष्टीतली दुसर्‍या बाजूला नेहमीच 'कॉन्स्पिरसी थिअरी'चं लेबल लागतं. आपल्या २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यांविषयी आणि करकरे, कामटे, साळसकर यांच्या मृत्यूबद्दलही अशीच एक 'कॉन्स्पिरसी थिअरी' सांगितली जातेच. अगदी अमेरिकेच्या 'मॅन ऑन मून' किंवा 'अपोलो-१३' बद्दलही अशाच थिअर्‍या आहेतच. कुठल्या बाजूवर विश्वास ठेवायचा हे ज्याचं त्याने ठरवायचं.

टीप : वर लिहिलेल्या मुद्द्यांपैकी एकही मत हे माझं नाही किंवा अर्थातच मी शोधलेलं नाही. पण जी वस्तुस्थिती म्हणून सांगून सर्वसामान्य माणसांची दिशाभूल केली जाते त्यापेक्षा ही दुसरी बाजू, त्यातले मुद्दे, ती मतं मला जास्त पटतात, जास्त जवळची वाटतात. म्हणून ते मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर ११ सप्टेंबरलाच पोस्ट टाकायचा प्रयत्न होता पण पोस्ट लिहिताना थोडी शोधाशोधी करताना असंख्य व्हिडीओ, साईट्स पुन्हा नव्याने सापडल्या आणि त्या बघून, त्यातले महत्वाचे मुद्दे टंकायला जास्त वेळ लागला.

Wednesday, September 15, 2010

बाप्पा 'बोले' तो...

हस्तकला या विषयात मला पहिल्यापासूनच आंबटी, कडी, तुरटी, तिखटी होती. थोडक्यात, अजिबात गोडी नव्हती. पण का उगाच सणासुदीच्या (किंवा कुठल्याही) दिवसांत पोस्टची सुरुवात नकारार्थी करा म्हणून हे आपलं उगाच. तर हस्तकला (याला आता क्राफ्टिंग म्हणतात म्हणे) म्हणजे काही करता आलं नाही तरी चालेल असं वाटण्याचा किंवा "मला हे असलं काही करता येत नाही" असं अभिमानाने सांगण्याचा विषय असं मला पूर्वी उगाचंच वाटत असे. मग शाळेतल्या/बिल्डिंगमधल्या मित्रांच्या मदतीने कापाकापी, चिकटवा-चिकटवी करत बाईंनी सांगितल्याच्या सदृश काहीतरी वस्तू बनवून लज्जारक्षणाचं काम पार पाडलं जाई. हे असं कित्येक वर्षं सुरळीतपणे चालू होतं. पण ज्याला आपण (मी) चिरकुट काम समजतो त्याला जाम, जबरी, जबरदस्त, कैच्याकै, भारी ग्ल्यामर आहे तस्मात् आपण किती नॉन-ग्ल्यामरस आहोत याचा साक्षात्कार मला अचानक एका वर्षी झाला.

माझ्या एका जवळच्या मित्राकडे गणपती असत पण माझा त्यातला रोल फक्त गणपतीचं दर्शन घेणे, जोरजोरात आरत्या म्हणणे, प्रसाद खाणे आणि "व्वा, छान" म्हणत मखराचं कौतुक करणे येथवरच सीमित असे. मखराचं काम सर्वस्वी काका लोकांकडे होतं. पण अचानक माझ्या मित्राच्या दादा लोकांना "आता आपण मोठे झालो आहोत, आपण आपल्याला हवं तसं मस्त डिझाईनचं मखर बनवू" असा माज किंवा काका लोकांना "चला भाऊ, बस झालं हे मखर प्रकरण आता. आताशा झेपत नाही. आता कार्ट्यांनाच कामाला लावलं पाहिजे" असा साक्षात्कार (साक्षात्कार, साक्षात्कार फार होतंय. दुसरा चांगला (पण समानार्थी पाहिजे हां) शब्द माहित्ये का कोणाला?) झाला असावा. नक्की कोणाला काय झाला हे (निदान माझ्यासाठी तरी) गुलदस्त्यातच होतं पण अचानक त्यावर्षी यंग ब्रिगेड ... शी शी... गणपतीचं वर्णन आणि 'ब्रिगेड' नको.. टीम टीम.. हां हे बरं आहे... तर अचानक त्यावर्षी यंग टीमने मखर करायचं असा फतवा निघाला (च्यायला, ब्रिगेड काय, फतवा काय. पेपर वाचणं पूर्ण बंद केलं पाहिजे.) आणि आम्हा मित्रमैत्रिणींच्या जोरावर (!) त्यांनी एकदम चकाचक मखर बनवायचं ठरवलं. चर्चांच्या अनेक फेर्‍या घडत, सूचनांच्या असंख्य फैरी झडत अखेरीस मखर म्हणून सिंहासन करायचं फायनल झालं आणि सगळे कामाला लागले. वर्षानुवर्ष आपले शाळेतले हस्तकलेचे प्रयोग आपण रोजंदारीवर असल्यासारखे इतरांच्या दयेवर आणि उपकारावर चालतात हा तपशील साळसूदपणे विसरून मीही टीमबरोबर कामाला लागलो. पण 'सारी सोंगं आणता आली तरी कलेचं सोंग आणता येत नाही' असं माझ्यासारख्याच कोण्या दीनवाण्या कला-कफल्लकाने म्हणून ठेवलं असल्याप्रमाणे सुरुवातीच्याच काही प्रसंगांतून माझं सोंग लवकरच उघडं पडलं.

१.
म्होरक्या : अरे हे सोनेरी कागदाचे असे तुकडे कोणी केलेत?
म्या : मी
म्हो : चौकोनी तुकडे करायला सांगितले होते ना?
म्या : चौकोनीच आहेत ना हे.
म्होरक्या : बरं !! विन्या, याने केलेल्या तुकड्यांचे चौकोनी तुकडे कर फटाफट.

२.
म्हो : सिंहासनामागच्या पडद्याला बांधायची फुलं कोणत्या रंगाची करायची?
मेंदू क्र १ : लाल
मेंदू क्र २ : पिवळा
मेंदी क्र. ३ : अबोली
म्या : काळा
म्हो आणि सगळे मेंदे : ह्या ह्या ह्या ह्या ह्या ह्या

उपरोल्लेखित आणि अनुल्लेखित २ (३,४,५,६.....) प्रसंगांनंतर कलाकुसर, सजावट, डेकोरेशन, रंगरंगोटी या विषयांत आपण जगाच्या (निदान आपल्या मित्रांच्या तरी) किमान ५० वर्षं मागे आहोत या शाश्वत सत्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद (!!) घेत स्वतःहूनच माझी बदली मखर टीमच्या ......

म्हो : कोण कोण काय काय करणार आहे फटाफट बोला
दु १ : मी सिंहासनावरचे 'लोड' करतो
दु २ : मी वरची छत्री करतो
दी १ : मी मागची फुलं करते
म्या : मी मॅगी करतो

स्वतःहूनच माझी बदली मखर टीमच्या 'खानपान' विभागात करून घेतली. अर्थात मॅगी करण्यात माझा हात कोणी धरू शकत नसल्याने (अगदी शब्दशःही. कारण मखर सोडून कोण येईल मॅगी करायला?) आणि मॅगी करणं माझ्या डाव्या हाताचा मळ असल्याने मखर करता करता समोर येणार्‍या गरमागरम मॅगीला स्मरून सगळ्यांनी माझ्या त्या निर्णयाचं स्वागतच केलं. अशा तर्‍हेने वर्ष-दोन वर्षं आनंदात गेली. पण तोवर दादा गँगचा उत्साह गंडल्यामुळे मखराची सारी सूत्रं माझ्या मित्राच्या हातात आली आणि मला स्वतःवर नसेल एवढ्या त्याला माझ्याबद्दल वाटत असलेल्या कॉन्फीडन्सपायी पुन्हा एकदा मखर टीमच्या खानपान विभागातून माझी बदली मुख्य विभागात केली गेली. पण त्याही वर्षी असेच अकलेचे आणि कागदांचे तारे तोडले गेल्याने आणि मॅगी आणि कॉफी (हो एकदा कॉफीही केली होती ते सांगायचं राहिलंच मगाशी) करायचा कंटाळा आल्याने मी "मखर करण्याच्या (करणार्‍यांच्या) अतीव उत्साहात आणि गोंगाटातही शांत झोप कशी घ्यावी" याचं प्रात्यक्षिक दाखवणार्‍या 'निद्राग्रहण' विभागाचा एकमेव आजीव सभासद झालो. पण त्या गोंगाट, आरडाओरडा, बडबड, मस्करी या सगळ्यांत 'निद्राग्रहण' विभागाचा बघता बघता 'निद्रानाश' विभाग झाला आणि पुनःश्च हरिओम म्हणत मी पुन्हा एकदा आपला 'दर्शन, आरती, प्रसाद आणि मखराचं कौतुक' इतपत सीमित असलेला रोल इमानेतबारे पार पाडायला लागलो.

------

"यंदा गणपतीचं दर्शन घ्यायला मिळणार नाही. काय बाई तरी यांची ही अमेरिका :(" राजमाता राणीमातेला वदत्या झाल्या.

"हो ना. खरंच करमणार नाही यंदा" राणीमाता

"कशाला काळजी करताय? आपला छान छोटा गणपती आहे की घरात." राणीसाहेब

"मग घरातल्या याच छोट्या गणपतीच्या निमित्ताने आपण यावर्षी गणपती घरी आणूया... काय?" इति स्वयमेव एकमेव.

बघता बघता हा माझा प्रस्ताव दोन्हीकडच्या आईबाबांनी आणि प्रत्यक्ष राणीसाहेबांनी अत्यानंदाने उचलून धरला आणि च्यामारिकेत बाप्पा आणायचा बेत पक्का झाला. मखर, प्रसाद, आमंत्रणं वगैरेंच्या तयारीची लगबग सुरु झाली. पूर्वानुभवामुळे आणि माझ्या आजवरच्या (अ)यशस्वी रेकॉर्डमुळे मखराच्या चर्चेत मी अर्थातच पाणी (वाचा कॉफी, मॅगी) आणण्यापुरताच असणार हे सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. आणि बरोब्बर अशा वेळी मी पहिला षटकार ठोकला.

"हा गणपती बाळराजांच्या निमित्ताने आहे. त्यामुळे बाळगणेशाचा पाळणा आपण मखर म्हणून करुया". बघता बघता आ वासले गेले, दाही डोळ्यांमधले भाव आधी आश्चर्य, मग अविश्वास आणि त्यानंतर कौतुक अशा चढत्या क्रमाने बदलत गेले. ही कल्पना मी सुचवतो आहे यावर विश्वास ठेवणं सुरुवातीला कठीण गेलं असलं तरी सगळ्यांना कल्पना मात्र जाम आवडली होती. त्यानंतर ती प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाहीला सुरुवात केली गेली.

१. एक मोठा खोका घेऊन त्यात भरपूर कपडे आणि पुस्तकं भरली गेली.

२. चांगल्या जाड सेलोटेपने खोका बंद केला गेला.

३. त्यावर पाचही बाजूंनी सोनेरी कागद लावला गेला. अशा तर्‍हेने पाळण्याचा बेस तयार झाला.

४. चारी बाजूंना कुंपणसदृश भिंती पाळण्याची चौकट म्हणून लावल्या गेल्या.

५. सोनेरी कागदांचे गोल तुकडे करून त्यांना पाळण्याच्या सोनेरी दोर्‍यांचं रूप दिलं गेलं.

एका मिनिटात लिहिलेल्या या पाच स्टेप्ससाठी प्रत्यक्षात पाच माणसांना सात दिवस रोजचे किमान चार तास राबावं लागलं. (सहावा माणूस (मी नाही) छोट्या गणपतीला सांभाळायला असे.).

**

विषयांतर :

१. अशी पाच मखरं करायला तीन माणसांना किती दिवस लागतील?
२. हेच मखर दोन दिवसांत पूर्ण करायला किती माणसं लागतील?
३. हेच मखर तीन माणसांनी पूर्ण करायला किती दिवस लागतील?

या प्रश्नांची अचूक उत्तरं देणार्‍यांना मंडळातर्फे एकशे एकवीस मोदकांचं बक्षीस.

**

आणि अशा तर्‍हेने माझ्या आयुष्यातलं पाहिलं मखर ज्यात मी कॉफी, मॅगी, झोप या टीम्स मध्ये नाव नोंदवून कपडे सांभाळण्याऐवजी प्रत्यक्ष मैदानात उतरून लढण्याचं काम केलं होतं ते जन्माला आलं. खाली पाहून (म्हणजे पोस्टमध्येच व्हो) ते आपल्यालाही पाळण्यासदृश नाही नाही पाळणाच दिसतो आहे की नाही याची खात्री करून घ्या. नसल्यास नेत्रवैद्य गाठण्याची घटिका समीप आली आहे असे खुशाल समजावे.


------

यंदा तर प्रसंग मोठा बाका होता. राजमाता-पिता आणि राणीमाता-पिता आपापल्या राज्यांत सुखाने नांदत होते. बाळगणेशाचे पराक्रम अतिवेगाने वृद्धिंगत होत होते. चार दिवसांवर गणेशाचं आगमन आलं तरीही मखरातला 'म'ही तयार नव्हता.. तयार कसला सुचतही नव्हता !! सिंहासन, परडी हे दोन प्रमुख स्पर्धक स्पर्धेत आघाडीवर होते. शेवटी साधं, सोपं, सुटसुटीत असे तीन वरचे 'सा' मिळाल्याने परडीने स्पर्धा जिंकली आणि आम्ही परडीच्या तयारीकरता दुकानं पालथी घालायला सुरुवात केली. परडीच्या आकाराची प्लास्टिकची टोपली घेताघेता गेल्यावर्षीचा पाळणावाला मेंदू चळवळायला लागला आणि अचानक एक नवीन कल्पना सुचली आणि बघता बघता त्याला मूर्त स्वरूप दिलं गेलं. (हे बघता बघता हे फक्त म्हणण्यापुरतं आहे. त्याला मूर्त स्वरूप देता देता आमच्या स्वतःच्या मूर्त्यांची स्वरूपं बदलली गेली ;) )

१. प्लास्टिकच्या दोन टोपल्या एकमेकींवर ठेवून तळाशी भोकं पाडून दोरीने घट्ट गाठ मारून त्या एकमेकांना जोडून निरांजनासारखा आकार केला.

२. निरांजन हे नेहमी चांदीचंच असल्याने भल्यामोठ्या चंदेरी रोलची खरेदी झाली.

* पुढच्या वर्षी मखर म्हणून निरांजन करू इच्छिणार्‍या भक्तजनहितार्थ प्रकाशित : चंदेरी कागद प्लास्टिकला चिकटत नाही. सारखा निसटतो, निघतो. निरांजनाच्या (माजी टोपलीच्या) गोल वळणार्‍या आकाराबरहुकुम कागदाने वळावं इतकं काही जीवाभावाचं नातं त्यांच्यात नसतं. कागद निघत राहतो, आपण चिकटवत राहतो, हात गमने माखत राहतात, वेळ वाया जातो, आपण वैतागतो, चिडचिड होते आणि अखेरीस पाच तासांच्या ऐवजी साडेतीन-चार तासाची झोप नशिबी येते. हे सगळं टाळण्यासाठी टिटानियम सिल्व्हर कलरचा कुठल्याही पृष्ठभागावर वापरता येणारा स्प्रे घेणं सगळ्यांत सोयिस्कर. थोडा महाग पडतो पण काम लवकर आणि अचूकपणे पूर्ण होण्याची आणि तस्मात् झोपेची हमी. उगाच चिक्कुबाजी करून एक स्प्रे घेतलात तर अखेरीस तो कमी पडतो आणि निरांजनाचा तळ आणि जिथे ज्योती असतात तो वरचा भाग आपला मुळचा (आमच्या केसमध्ये लाल) रंग दाखवत राहतो. पुन्हा दुसर्‍या दिवशी दुकानात जाऊन तसाच स्प्रे पुन्हा घेऊन येऊन 'ये लाल रंग कब मुझे छोडेगा' असं म्हणत पुन्हा पुन्हा (स्प्रेचे) हात मारावे लागतात.

३. चंदेरी कागद रात्रीही डोळ्यासमोर चंद्र न उभा करू शकल्याने आम्हाला वर जनहितार्थ प्रकाशित केल्याप्रमाणे रोज एक या प्रमाणात दोन दिवस हार्डवेअरच्या दुकानाच्या चकरा माराव्या लागल्या आणि रात्री घरी येऊन रंगकाम करावं लागलं. पण दोन बाटल्या रित्या करून झाल्यावर ते लखलख चमचमणारं निरांजन बघून डोळ्यांचं पारणं का कायसंसं म्हणतात ते फिटलं.

४. त्यानंतर जाड पुठ्ठ्याचा ज्योतीचा आकार तयार करून त्यावर सोनेरी कागद (हो इथे मात्र कागद चालतो कारण.... पाणीच मिळे पाण्याशी | सारखाच भेटे सारख्याशी | विजातीय द्रव्यांशी | समरसता होणे नसे || - इति प.पू. दासगणू महाराज) चिकटवला.

५. निरांजनाच्या मध्यभागी जिथे गजनानाचं विश्रामस्थान आहे त्यासाठी जुन्या मोबीलचा खोका कामी आला. फिट्ट बसलेल्या त्या खोक्यालाही चंदेरी रंगाचं सचैल स्नान घातलं गेलं आणि त्यालाही निरांजनाशी एकरूपता प्राप्त करून दिली.

६. वरच्या टोपलीचा म्हणजे आता निरांजनाच्या वरचा भाग म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागाच्या तळात आणि या खोक्यात असलेली गॅप भरून काढण्यासाठी तांदुळांचा मुक्त हस्ते वापर केला गेला.

७. निरांजन तयार झाल्यानंतर ते जिथे ठेवायचं आहे ते मोठ्ठं टेबल सजवलं गेलं. पाठीमागे गणपतीस्तोत्र लिहिलेला मोठा भगवा पडदा लागला आणि त्याच्या आजूबाजूला दीपमाळा लावल्या गेल्या.

हुश्श.... लिहिता लिहिता धाप लागली. लिहायला पाच मिनिटं लागलेल्या त्या वरच्या मखराच्या वेळी घातलेली गणितं आता यावेळी सोडवून बघा. बघा केवढी मोठी उत्तरं येतात ते. उत्तरं जेवढी मोठी तेवढी चिडचिड मोठी आणि तेवढीच झोप छोटी.

अखेरीस, गणेशाचं आगमन, प्राणप्रतिष्ठा, आरती, प्रसाद आणि विसर्जन सगळं सगळं यथासांग पार पडलं.

------

हे एवढं सगळं का लिहिलंय? कशासाठी लिहिलंय? नक्की काय सांगायचंय याला? या पोस्टचं अर्थ काय? उपयोग काय? मेसेज (!!!) काय? चित्रपटासारख्या साध्या करमणूकप्रधान गोष्टींतूनही मेसेज शोधणारे आपण लोक... ही एवढी मोठी बकबक पोस्ट वाचली पण त्याचा अर्थ काय, ती कशासाठी लिहिली आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काहीच इंटरेस्ट वाटणार नाही आपल्याला या पोस्टमध्ये. तर सांगतो.. अर्थ सांगतो, उद्देशही सांगतो.

ते वर सांगितलेल्या खानपान, निद्राग्रहण, निद्रानाश विभागात मनसोक्त भटकंती करून झाल्यावर कंटाळून मी एकदा बाप्पासमोर उभा राहिलो आणि त्याची प्रार्थना केली..

"बाप्पा, लोकं बघ ना किती छान छान मखरं करतात, त्यांना मखराच्या छान छान आयडिया सुचतात, सिंहासन, कमळ, रथ, असं काय काय करतात.. त्यासाठी लागणारे सोनेरी, चंदेरी, लाल, निळे, हिरवे असे कसलेकसले चौकोन कापतात आणि सुंदर डिझाईन बनवतात. आणि मी !! मी आपला उगाच मॅगी, कॉफी कायकाय करतोय, झोपा काढतोय. प्लीज मला पण हे असं सगळ्यांसारखं मखर बनवता येऊदे ना.. प्लीज प्लीज.."

अचानक बाप्पा किंचित हसला आणि बोलायला लागला (खोटं नाही बोलत.. अगदी खरं सांगतोय.. म्हणाल त्याची शप्पत घेतो).. म्हणाला "काळजी करू नकोस. दरवर्षी माझी प्रार्थना करत रहा. सगळं ठीक होईल"

क्षणभर माझा स्वतःवर विश्वासच बसला नाही. चक्क बाप्पा बोलतोय?? पण सोंड हलताना व्यवस्थित दिसत होती. शंकेला जागाच नव्हती. मी प्रचंड खुश झालो होतो. प्रत्यक्ष बाप्पाने आशीर्वाद दिला होता. मी पुन्हा पुन्हा बाप्पाला नमस्कार केला आणि म्हणालो "बाप्पा, खूप खूप आभार्स.. मी पुढच्या वर्षीपासून न कंटाळता, टाळाटाळ न करता नियमितपणे मखर करत जाईन, सगळ्यांना मदत करत जाईन."

बाप्पा एकदम रागावल्यासारखा वाटला. किंचित ओरडून तो म्हणाला "तुला जेवढं सांगतोय तेवढं कर. तुला मखर करण्यासाठी मदत करायला कोणी सांगितलंय? मी सांगतो तेवढंच कर. दरवर्षी नियमित माझी प्रार्थना करत रहा. बास. इतकंच"

बाप्पाला एवढं रागवायला काय झालं हे कळेना. मी आपला 'कष्टेविण फळ नाही, कष्टेविण मखर नाही' म्हणत स्वतः मखर करणार्‍यांच्या मदतीला जायला तयार होतो. ते कसं करतात हे बघून आपणही मखर करायला शिकावं असा साधा सरळ विचार होता माझा. पण बाप्पाने एवढ्या ठामपणे नाही म्हंटल्यावर मी लगेच सावरून घेत "बरं बरं. तू म्हणशील तसं... मी फक्त प्रार्थना करीन तुझी दरवर्षी.. अगदी मनोभावे."

बाप्पा म्हणाला होता ते खरं होतं. अगदी शेंट परशेंट खरं !! कारण अशी अनेक वर्षं प्रार्थना करत राहिल्यावर थेट मखर नाही पण उत्तम मखर करू शकणारी आर्टिस्ट बायको बाप्पाने मला दिली. नुसतीच आर्टिस्ट नाही तर चतुर आर्टिस्ट !! जी मखराच्या कल्पना अशा काही रीतीने मांडते की माझ्या तोंडून आपोआपच हवं ते, योग्य ते उत्तर बाहेर पडून मखराची आयडिया आपली स्वतःचीच आहे असं मला वाटतं राहतं, अशीच माझी समजूत होते (आणि मग मी असल्या पोस्ट्स पाडत राहतो.) .. सुबक मखर, ग्रेट आयडिया, बायको खुश, त्या आयडियेची मालकी आपली असल्याच्या अविर्भावात मी खुश, उत्तम, देखणं मखर मिळाल्याने बाप्पा खुश. विन विन सिच्युएशन !! (अर्थात या चतुराईचा साक्षात्कार (पुन्हा साक्षात्कार !! पण ठीक्के. बर्‍याच वेळाने झालाय त्यामुळे चलता है..) मला नुकताच मखराने परडीच्या थ्रू निरांजनाचं रूप घेताना सॉरी घेऊन झाल्यावर झाला)

तर मग कळलं का तात्पर्य? मिळाला का मेसेज?

प्रार्थना करत रहा. इच्छा कुठल्या ना कुठल्या 'रुपात' पूर्ण होईलच !!!

स्थलकालाची बंधनं झुगारणारा पाशवी विखार : एका माळेचे मणी

सुविख्यात इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी पानिपत युद्ध ते हैद्राबाद स्वातंत्र्य चळवळ आणि समर्थ संप्रदाय ते भारतीय मुसलमान अशा अनेकविध विषया...