Wednesday, April 8, 2020

भास (डीडीएलजे-२)

ज्याप्रमाणे प्रत्येक यशस्वी चित्रपटाचा पुढील भाग काढण्याचा मोह चित्रकर्त्याला होतोच तद्वत तो आम्हालाही झालाच!

तर काही काळाने, कितीही भांडत असले तरी, राज-सिमरन हे नवरा बायको नसून फक्त मित्रच आहेत हे चिरंजीवांच्या गळी उतरवण्यात डोंबोलीचे राज-सिमरन यशस्वी ठरले. तोवर युरोप टूरचा समारोप होऊन, विमानतळावरचा निरोप समारंभ संपून 'हो गया है तुझको तो प्यार सजना' वाजू लागलं. लग्नाला येणार नाही असं सांगून बाय न करता निघून जाणारा राज आणि पाठमोऱ्या राजकडे आ वासून एकटकपणे बघणारी सिमरन पडद्यावर झळकत होती. मधेच ती दोघं युरोपात फिरतायत, नाचतायत, घरात/हॉटेलमध्ये गप्पा मारतायत, जेवतायत असं सगळं सुरू होतं. चिरंजीव पुन्हा बोल्ड होण्याच्या बेतात आले. (बोल्डवर श्लेष आहे. तो पुढे कळेलच.) 

"आई, टूर संपली ना? आता ते आपापल्या घरी गेले ना? मग ते मधेच असे एकत्र फिरताना, गप्पा मारताना का दाखवलेत?" भाबड्या वाटणाऱ्या प्रश्नातच पुढील जटिल प्रश्नांची मुळं दडलेली असतात. 

"अरे हो टूर संपली. पण आता टूरमध्ये धमाल केली त्याची आठवण येतेय, एकमेकांची आठवण येतेय, भास होतायत. म्हणून तसं दाखवलंय." साधं, सरळ स्पष्टीकरण.

"भास? असे भास होतात? एकमेकांच्या आठवणी येतात?"

"म्हणजे?"

"अग पण मला तर कधीच अशी कोणाची आठवण येत नाही, कोणाचे भासही होत नाहीत की कधी असं कोणी डोळ्यांसमोर दिसतही नाही. मला कधी दिसेल असं?"

आणि बघता बघता आई-बाप हसून हसून लोळायच्या बेतात येतात. 

Pre-teenage is knocking on the doors!! 

#आदिआणिइत्यादी

Tuesday, April 7, 2020

कोण? (डीडीएलजे-१)

लॉकडाऊन आणि प्राईम यांच्या संयुक्त विद्यमाने 'डीडीएलजे' चं एकशे एकविसावं पारायण चालू होतं. चिरंजीवांची पहिलीच वेळ असल्याने त्यांना प्रत्येकच गोष्टीचं फार अप्रूप होतं. पण सुरुवातीच्या प्रसंगांमध्ये राज-सिमरनच्या सततच्या भांडणांनी वैतागून अखेर त्यांनी एक यॉर्कर टाकलाच.

"हे दोघे कोण आहेत? काय बडबडतायत? एवढे भांडतायत का सारखे सारखे? नवरा-बायको आहेत का ते?"

#आदिआणिइत्यादी

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...