Thursday, April 26, 2012

सफरचंदी डोळा-वहीची प्रथमा

प्रत्येकाला आपला ब्लॉग आणि त्यावरची प्रत्येक पोस्ट ही अतिशय आवडती, महत्वाची वगैरे असते. अर्थात काही वेळा ती आवडती, काही वेळा महत्वाची तर काही वेळा किंबहुना कित्येकदा दोन्ही असते.... कसलं फालतू वाक्य आहे नाही हे?

ही 'कंपोस्ट' वाटू नये म्हणून जरा पाणी घालून वाढवतोय इतकंच. कारण छोटी असली तरी ही कंपोस्ट नाही. पोस्ट छोटी असण्याचं कारण वेगळं आहे. आणि पुरेसं तेल वाहून गेल्यावर नमन संपून प्रयोग सुरु होईल हेही चतुर चाणाक्ष इ इ वाचकांनी ओळखलंच असेल.

लोक शंभरावी, दोनशेवी, पाचशेवी पोस्ट किंवा मग दोन लाख, पाच लाख, दहा लाख वाचक वाली पोस्ट लिहितात परंतु आमच्या शब्द-असामर्थ्यामुळे तसे टप्पे गाठायचे म्हणजे आम्हास वर्षानुवर्षं थांबावं लागेल. असो.

घडा भरला.... मुद्दा सुरु....

तर ही पोस्ट माझ्या दृष्टीने महत्वाची अशासाठी की ही नव्याकोऱ्या 'सफरचंदी डोळा-वही' वरून लिहिलेली प्रथमा आहे. नव्याकोऱ्या अ‍ॅपल आय-पॅड वरून लिहिलेली पहिली पोस्ट... !!!! आणि कदाचित (नाही. नक्कीच) शेवटचीही. लय यळ लागला राव. आता कळलं ना छोटी का आहे पोस्ट ते? ;)

पण ते काय ते म्हणतात ना की आय-पॅड वापरण्यापेक्षा मिरवण्यासाठीच घेतला जातो.... त्यामुळे महत्वाची असो वा नसो, आवडती असो वा नसो (अर्थात माझ्यासाठी दोन्ही आहे म्हणा) पण तो आय-पॅडवाला नियम सिद्ध करण्यासाठी म्हणून काढलेली मिरवणूक म्हणा हवं तर. किंवा मग "जनातलं म्हणता म्हणता मनातलं लिहिणाऱ्या आणि स्वतःच्या आणि स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणाऱ्या" मराठी ब्लॉगरची पोस्ट म्हणा. ;)... कारण केवळ मराठी ब्लॉगर असल्यानेच नवीन आय-पॅड घेतल्याची पोस्ट ब्लॉगवर टाकू शकतोय. (काहीही चालतं आपल्या ब्लॉगवर)

 जय ब्लॉगिंग... जय आय-पॅड.... !!!!

Sunday, April 1, 2012

ऐशु


सकाळ सकाळी फोन वाजला. मी धडपडतच उठून फोन घ्यायला गेलो. अनोळखी नंबर आणि तोही इतक्या भल्या सकाळी? काही कळेना.. वैतागतच हिरवं बटन जोरात रागाने दाबून शक्य तितक्या त्रासिक आवाजात 'हॅलो' म्हणालो.

"ओळखलंस का?"

"नाही. कोण तुम्ही?"

"खरंच नाही ओळखलंस?"

"नाही मॅडम.. कोण तुम्ही?"

नंतर दीडेक मिनिटं नुसता हसण्याचा आवाज येत होता..

"ई.. मला मॅडम काय म्हणतोयस?"

"मग काय सर म्हणू?" असा प्रश्न आतल्या आत दाबून टाकत पुन्हा शक्य तितका संयम राखत म्हणालो. "अनोळखी स्त्रीला थेट 'अग जा ग' करायचे संस्कार नाहीत माझ्यावर."

पुन्हा पलीकडून हसण्याचा आवाज आला.

"अनोळखी? मी अनोळखी?"

"हे बघा बाई." आता मात्र मी कंटाळलो होतो. पण तेवढ्यात मला तिथेच थांबवून ती म्हणाली.

"अरे मी ऐशु बोलतेय. ऐशु शिरोडकर"

"काय?????" मी उडालोच होतो.

"ऐशु??? म्हणजे पी डी एच मधली ऐशु"

"होय होय तीच. पवनराव धैर्यधर हायस्कूलमधली ऐशु"

"कसं शक्य आहे? तुझा आवाज तर किती वेगळा येतोय."

"हो. थोडा बदललाय खरा. अरे त्या सततच्या डबिंगमुळे थोडा वेगळा वाटत असेल."

"अरे हो बरोबर.. तू तर काय आता अगदी..."

"अरे तसं नाही. आणि मध्ये कित्येक वर्ष आपण बोललोय कुठे? तुझा पत्ताच नव्हता. फेबु/ऑर्कट कुठेच नाहीयेस तू. कसा बसा तुझा नंबर मिळवला विव्याकडून. सल्याशी तर मी बोलतच नाही. अभीला आवडत नाही."

"कोणे ग?" मागून अभीचा आवाज आला. त्याचाही आवाज वेगळा वाटत होता. तेच त्या डबिंगमुळेच असेल.

"कोणी नाही रे. झोप तू. बेबीला उठवून ठेवशील नाहीतर."

"मी आज का फोन केलाय माहित्ये का?".. अच्छा म्हणजे आधीचं वाक्य अभ्याला उद्देशून होतं..

"नाही."

"नाही?"

"नाही."

"आजची तारीख माहित्ये?"

इचिभना... !!!!!!!!!!!!!!!!!

----------

आमच्या घरापासून शाळेत जायला एक जवळचा रस्ता आहे. गावातून जाणारा. पण मला तो आवडत नाही. मी लांबच्या रस्त्याने जातो. शेतातल्या रस्त्याने. मस्त दोन्ही बाजूला छान झाडं, शेतं, पिकं असतात. मस्त वारा वाहत असतो. दगडांवरून उड्या मारत मारत जायचं शाळेत. येताना तर मी नेहमीच याच रस्त्याने येतो. तर ही अशी शेतांची रांग संपल्यावर उजव्या हाताला वळलं की गंप्याशेठचं दुकान लागतं. त्या दुकानाच्या समोरच्या रस्त्याने डावीकडे वळून पाच मिनिटं चाललं की आली शाळा. पण आम्ही लगेच शाळेत जात नाही. गंप्याशेठच्या दुकानाच्या इथे मला सल्या आणि विव्या भेटतात. मग आम्ही सल्याच्या बाबांच्या जुन्या स्टुडीओतल्या एका खोलीत जातो आणि तिथे टाईमपास करत बसतो. गुलाब आली की सल्या नुसता चेकाळतो. ती कधी एकदा लाईन देईल याच विचारात तो असतो.

मी नेहमीप्रमाणे शेतांची रांग संपते तिथे उजव्या हाताला वळलो. समोर सल्या आणि विव्या उभे असलेले मला दिसले. मी त्यांच्या दिशेने जायला लागणार एवढ्यात मधल्या चिंचोळ्या बोळातून अचानक ऐशु बाहेर आली आणि माझ्या समोर उभी राहिली.


**

"इचिभना... काय म्हणत होती रे?" सल्याने नुसतं भंडावून टाकलं होतं मला.

"काही नाही रे. नेहमीचंच"

"म्हणजे?"

"अरे बाबा. नेहमीचंच म्हणजे दुसरं काय असणार?" विव्या किंचित जळक्या स्वरात म्हणाला.

"अरे पण काय?"

"सल्या, उगाच नाटकं करू नकोस मुद्दाम"

"अरे खरंच नाही रे. बस का? सांग ना साल्या जोश्या"

"अरे हेच रे. नेहमीचंच. लाईन देतोस का विचारत होती."

"इचिभना.. आपल्याला तर आधीच माहीत होतं. मी तुला आधी बोललोही होतो. तर उगाच मलाच म्हणत होतास की मी का डाउट खातोय म्हणून"

"ते जाऊदे.. पण तू काय म्हणालास?" विव्याला सोक्षमोक्ष लावल्याशिवाय राहवत नव्हतं.

"मीही तेच म्हणालो नेहमीचंच,"

"अ‍ॅना??" इति विव्या

"होय"

"इचिभना... म्हणजे तिला अ‍ॅनाबद्दल सांगून टाकलंस?" सल्या

"हो.. सरळ सांगून टाकलं की मी अ‍ॅनाशिवाय कोणाचाही विचार करू शकत नाही. हे असलं काही आपल्याला जमायचं नाही आणि पुन्हा कधीही मला याविषयी विचारू नकोस."

"अच्छा तरीच ती एवढं हमसून हमसून रडत गेली"

"म्हणजे? तुम्ही बघितलंत तिला रडताना?"

"म्हणजे काय? समोरच तर होतो की आम्ही"

"बरं. बोलू नका कोणाला. आमच्या घरी बहिणाबाईला कळलं ना तर घर डोक्यावर घेईल ती."

त्यानंतर शाळेत दिवसभरात एकदाही मी ऐशुकडे बघितलं नाही.

संध्याकाळी शाळेतून घरी जाताना अचानक ऐशु पुन्हा समोर आली आणि म्हणाली "हे घे तुला सकाळी व्याकरणाचं पुस्तक हवं होतं ना"..

सल्या आणि विव्या येड्यासारखे माझ्याकडे बघायला लागले. मी गुपचूप पुस्तक हातात घेतलं आणि तिथून निघून गेलो.

त्यानंतर एका आठवड्यात परीक्षाच सुरु झाली. मी भरपूर अभ्यास केला होता. परीक्षा संपत आली तशी आई कामाला लागली कारण बाबांची बदली दुसऱ्या शहरात होणार होती.


----------

"अरे आहेस कुठे तू? मी विचारत्ये की आजची तारीख माहित्ये का? लक्षात आहे का?"

"हो. माहिती आहे. पण लक्षात नव्हती"

"वाटलंच होतं मला... पण तू ते पुस्तक कधी उघडून बघितलंस शेवटी?"

"अग त्यानंतर माझ्या बाबांची बदली झाली. आम्ही दुसऱ्या शहरात गेलो. तिकडे जरा नीट रुळल्यानंतर माझा खण लावताना व्याकरणाची दोन पुस्तकं दिसली मला.. तेव्हा अचानक आठवलं मला."

"छान.. धन्यच आहेस"

"मग हळूच ते पुस्तक उघडून बघितलं तर त्यात तुझा फोटो"

"हाहाहाहाहा...."

"हसत्येस काय? बहिणाबाईला सापडला असता तर मेलोच असतो मी"

"ते पुस्तक आहे का रे तुझ्याकडे अजूनही?"

"हो आहे. पण मलाही ते माहित नव्हतं गेल्या महिन्यापर्यंत.. !! अग आई-बाबांनी माझ्या लहानपणीचं सगळं सामान एका मोठ्या बॅगमध्ये भरून ठेवलं होतं. मागच्याच महिन्यात या नवीन घरात शिफ्ट झाल्यावर ती बॅगही इथे आली. तेव्हा मला पुन्हा दिसलं ते पुस्तक.. इतक्या वर्षांनी"

"गुड....... बरं तू ब्लॉग लिहितोस ना?"

"हम्म. अधून मधून.. तुला कसं माहित?"

"अरे मी वाचते अधून मधून, माझे सासरेबुवा सेलिब्रिटी ब्लॉगर आहेत म्हटलं."

"अरे हो. ते तर आहेच"

"ओके. आता मुद्द्याचं. मी फोन याच्यासाठी केला होता की परवा 'शाळा' बघताना मला आपली शाळेतली धम्माल आठवली. आजच्याच दिवशी मी तुला ते व्याकरणाचं पुस्तक आणि फोटो दिला होता. म्हणून आजच्या दिवशी तू हा किस्सा तुझ्या ब्लॉगवर टाकावास अशी माझी इच्छा आहे आणि त्याबरोबरच माझा फोटोही.."

"काय? फोटो सुद्धा?"

"हो. फोटोही टाक. बघूया कोण कोण ओळखतं ते."

"अग तुझ्या आजच्या ग्लॅमरस इमेजच्या मानाने हा फोटो अगदी साधा आहे ग."

"चालेल रे. काही होत नाही. टाक तो फोटो."

"बरं. लिंक पाठवतो तुला पोस्टची नंतर"

"त्याची गरज नाही. मी तुझा ब्लॉग फॉलो करते. हिडन फॉलोअर आहे मी. हाहाहाहाहा.. बरं ते जाऊदे.. आता मी ठेवते फोन. बेबीची उठायची वेळ झालीये. मामंजी सकाळीच उठून शुटींगला गेले असतील. सासूबाई कुठल्या तरी सभेबिभेला गेल्या असतील आणि मी उठवल्याशिवाय काही अभ्या उठायचा नाही. तेव्हा जाते मी आता."

----------

तेव्हा मंडळी, ऐशुला वचन दिल्याप्रमाणे हा झाला किस्सा आणि हा ऐशु शिरोडकरचा फोटो....

इचिभना ऐशु !!!!!!!!!!!!



तळटीप : आजच्या दिवसाचे 'महत्व' विषद करणे आणि आमच्याकडे (आदरार्थी) असलेला ऐशुचा (खराखुरा) फोटो सर्वांस दाखवणे हे दोनच उद्देश असल्याने या पोस्टमधील लिखाणास विशेष महत्व नसून फक्त फोटोस आहे हे पवनराव धैर्यधर हायस्कूलातल्या समस्त आजी/माजी/भावी/इच्छुक विद्यार्थ्यांनी ओळखलेच असेल !!

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...