Sunday, June 17, 2018

बाप(पु)डे

किड्स : यु आर द बेस्टेस्ट डॅड 💗💗

अ‍ॅडल्ट्स : हॅप्पी फादर्स डे !!

लेजंड्स : 👇👇👇
.
.
.
.
.

चिरंजीव : आई, बघ बघ. तुझा एक केस पांढरा झालाय.

आईसाहेब : हो रे राजा.

चि.  : बाबा, तुझे तर खूप केस पांढरे झालेत.

अस्मादिक : असूदेत. तुझे पण किती केस पांढरे झालेत ते बघ.

चि. : काहीही काय बाबा? माझे केस पांढरे कसे होतील? शक्यच नाही माझे केस पांढरे होणं.

अ आणि आ : का बरं?

चि. : माझे केस पांढरे होऊच शकत नाहीत कारण मला मुलगा कुठे झालाय अजून ?????? 

#आदिआणिइत्यादी 
#फादर्सडे

Tuesday, February 13, 2018

एकपण !

"आई, आजीचा फोन होता ना? कुठे चालली आहे आजी?"

आपण फार मोठ्याने बोलतो की लेकाचं बारीक लक्ष (आणि कान) असतं या क्म्फुजन मध्ये मातोश्रींना दोन क्षण ताटकळत ठेवून झाल्यावर लेकाने पुन्हा विचारलं.

"आ... ई..."

"अरे हो हो. सांगते. तुला कसं सांगितलं की कळेल याचा विचार करत होते. म्हणून जरा थांबले"

"त्यात काय एवढं?  कुठे चालली आहे ते सांगायचं फक्त" गोष्टी कोण कोणाला सिम्प्लीफाय करून सांगतं हे तर मला कधीकधी कळतच नाही !

"हो का? बरं मग ऐक. आजी नर्मदा परिक्रमेला चालली आहे."

"काय? कुठे? नर्म काय??"

"म्हणूनच... म्हणूनच म्हंटलं तुला कसं सांगू याचा विचार करत होते. ऐक आता नीट. आजी नर्मदा परिक्रमेला चालली आहे. नर्मदा हे एका नदीचं नाव आहे आणि परिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा. नर्मदा नदीला प्रदक्षिणा करायला चालली आहे आजी." संदर्भासह स्पष्टीकरण.

"म्हणजे आपण देवळात घालतो तशी प्रदक्षिणा ना?"

"हो तशीच. पण नर्मदा खूप मोठी असल्याने या प्रदक्षिणेला खूप दिवस लागतात."

"खूप दिवस? म्हणजे? कधी जाणार आजी? कधी येणार? किती दिवस?" संदर्भासह स्पष्टीकरणाचे संदर्भासह स्पष्टीकरण द्या.

"आपण ना उद्या आजीकडे जाणार आहोत. आजीला हॅप्पी जर्नी करायला. तेव्हा तू तुझे सगळे प्रश्न आजीला विचार. कळलं? " मातोश्रींनी मानगूट तात्पुरती सोडवून घेतली.

दोन दिवसांनी आजीकडे गेल्यावर आता आजी "एकवेळ परिक्रमा नको पण हे प्रश्न थांबव बाबा" असं काही म्हणते की काय असं वाटावं इतका प्रश्नांचा मारा करून झाला. पण आजी शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती.

ही प्रदक्षिणा खूप मोठी असते, तिला खूप दिवस लागतात, बरोबर मोठा ग्रुप आहे, बसने जाणार, वेगवेगळ्या ठिकाणी राहणार, नदीतून होडीने जाणार, चिखलातून जाणार, जंगलातून जाणार, नर्मदेचं दर्शन होऊ शकतं, अश्वत्थामा दर्शन देऊ शकतो अशी बरीच माहिती गोळा करून झाली. पण हा अश्वत्थामा हे काहीतरी विशेष खास गूढ प्रकरण आहे हे चिरंजीवांच्या लक्षात आलं. त्यानंतर मग अश्वत्थामा म्हणजे कोण? तो गॉड आहे का? तो भूत आहे का? चिरंजीव म्हणजे काय? तो आपल्याला का दिसतो? अशा एकेक प्रश्न/उपप्रश्नांचाही भडीमार झाला. अखेरीस ज्याच्यासाठी गेलो होतो ते हॅप्पी जर्नीही करून झालं.

त्यानंतर आजीची परिक्रमा सुरु झाली. मधून मधून फोन/कायअप्पा वर अपडेट्स कळत होते.

आजी कधी येणार कधी येणारचा चिरंजीवांचा घोषा मध्ये मध्ये चालू होता. आणि शेवटी आजी उद्या येते आहे हे कळल्यावर उद्या आपण नक्की आजीकडे जायचं आहे हे हे ठासून सांगून झालं.

चिरंजीव आणि मातोश्री सकाळीच स्वागताला घरी पोचले होते आणि अस्मादिक संध्याकाळी.

टेलीफोन उचलल्यानंतर "हॅलो.. हॅलो" असे म्हणावे हा जगाने मान्य केलेला शिष्टाचार आहे. पण पुणेरी मराठीत हॅलो च्या ऐवजी दुपारच्या झोपेतून जागे केल्यावर आवाजाला एक नैसर्गिक तुसडेपणा येतो ना त्या आवाजात हॅलो म्हणण्याऐवजी "कोणे??" असे वसकन ओरडावे हा किस्सा पुलंना कसा सुचला असेल याची एक झलक घरात पाऊल टाकल्याक्षणीच अस्मादिकास मिळाली. म्हणजे अगदी चित्रपट किंवा शिरलींमध्ये दाखवतात त्याप्रमाणे आमच्या लेकाने धावत येऊन बा.... बा.... म्हणत पायांस विळखा घालावा असल्या काही अस्मादिकांच्या अपेक्षा मुळीच नाहीत पण "बाबा, आजीची ट्रीप एकदम फ्लॉप झाली." हे स्वागताचं वाक्य म्हणजे त्या "कोणे?" मधल्या तुसडेपणाचा बा... बा.... होतं..

आम्ही सगळेच क्षणभर गडबडलोच.

"ओ राजे. जरा सांभाळून. काय बडबडताय?"

"बडबडत नाहीये. खरंच सांगतोय. आजीची ट्रीप एकदम बोरिंग झाली."

"अरे काही काय बडबडतो आहेस? असं बोलायचं नसतं बेटा"

"अरे खरंच सांगतोय. आजीची ट्रीप एकदमच बोरिंग झाली. का माहित्ये का??? अरे तिला एकपण अशत्ताम्मा दिसला नाय"

आणि त्यानंतर घरातल्या हास्यरुपी नर्मदेला जो पूर आला त्याने बराच वेळ थांबायचं नाव घेतलं नाही !

Saturday, January 20, 2018

प्रोटेक्शन

प्रश्न : मुलांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, 'अवघड' प्रश्न असले तरी टाळू नयेत, उलट सगळं नीट सोप्या भाषेत, त्यांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगावं, अजिबात टाळाटाळ करू नये हे असं सगळं सगळं असंख्य लेख, ब्लॉग्ज, पोस्ट्स, व्हिडिओज, आर्टिकल्स इ० सगळ्या ठिकाणी वाचलेलं असलं तरी ते सगळं साफच विसरून जाऊन त्याच्या अगदी १०१% उलटं वागण्याची वेळ कुठली?

उत्तर : ती वेळ म्हणजे आज रात्री १० ची जेव्हा बेसावध क्षणी टिव्हीवरची अ‍ॅड बघताना लेक यॉर्कर टाकतो की "बाबा, हे *स्टेन प्रोटेक्शन* म्हणजे काय रे?" आणि आपण दहा-एक सेकंद पूर्ण ब्लॅंक होऊन, वरचे सगळे सल्ले साफ विसरून जाऊन "अरे ते स्टेन नसेल टेन वगैरे काहीतरी असेल" किंवा "अरे वॉशिंग पावडरची अ‍ॅड आहे ती बहुतेक" असलं काहीतरी थातूर मातूर बडबडून प्रश्न शिताफीने (!) टाळतो. तीच!! तीच ती वेळ !!

बेटर लक नेक्स्ट टाईम, बाबा. यु नीड इट !!

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...