Wednesday, June 17, 2020

'वाचतं' राहण्याविषयीचं पुस्तक : 'वाचत सुटलो त्याची गोष्ट'

'बुक्स ऑन बुक्स' अर्थात पुस्तकांबद्दलची पुस्तकं हा साहित्यक्षेत्रातला एक स्वतंत्र विभाग आहे. परदेशांमध्ये या विषयावर अनेक पुस्तकं असली तरी आपल्याकडे आणि विशेषतः मराठीत तर या विषयावरची फारच कमी पुस्तकं आहेत. डॉ अरुण टिकेकरांचं 'अक्षरनिष्ठांची मांदियाळी', निखिलेश चित्रे यांचं 'आडवाटेची पुस्तकं', नितीन रिंढे यांचं 'लीळा पुस्तकांच्या', निरंजन घाटे यांचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' ही त्याची काही उदाहरणं. मी आत्तापर्यंत यातलं एकही पुस्तक वाचलं नव्हतं. पुस्तकप्रेम कितीही असलं तरी पुस्तकं या विषयावर लिहिलेलं पुस्तक वाचण्यात मला फारसं स्वारस्य नव्हतं. पण ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट कधी ना कधीतरी पहिल्यांदाच घडत असते त्याप्रमाणे मुहूर्त लागला आणि निरंजन घाटे यांचं 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे पुस्तक हाती (किंडली) आलं. आणि मी ही अक्षरशः हे पुस्तक वाचतच सुटलो आणि जेमतेम दोन-तीन दिवसांत संपवूनही टाकलं.

निरंजन घाटे लिखित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट : एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर' हे त्या पुस्तकाचं पूर्ण नाव.

 

हे पुस्तक सुरुवातीला येणाऱ्या लेखकाच्या मनोगतापासूनच आपल्या मनाची पकड घ्यायला सुरुवात करतं. मनोगत इतकं सुंदर आहे की खरं तर ते पूर्ण मनोगत इथे देण्याचा मोह होतोय. पण तो टाळून फक्त दोन महत्वाचे परिच्छेद इथे नमूद करतो.

 

१.

वाचन म्हणजे घरबसल्या जगप्रवास करणं आहे असं मला वाटतं. वाचनातून आपल्या जग कळतं. जगाचा इतिहास-भूगोल कळतोसंस्कृती कळते. जगाकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन कळतात. जग आपल्यापरीने घडवणारी माणसं कळतात. त्यातले वाद-प्रतिवाद कळतात. जग नावाच्या गोष्टीचा वेगळाच आवाका येतो. माझा अभ्यासविषय नसलेल्या एखाद्या भलत्याच क्षेत्रातल्या खाचाखोचा मला माहिती असतातहे पाहिलं की अनेकदा त्या विषयातले तज्ज्ञही चाट पडतात. ही आत्मप्रौढी नव्हेतर केवळ वाचनामुळे आयुष्यात आनंद कसा अनुभवता येतोहे मला सांगायचंय. वाचनाचा हा माझा प्रवास आणि त्यातून हाती लागलेला खजिना वाचकांसमोर मांडला तर त्यांनाही हा आनंद घेता येईलया विचाराने मी हे पुस्तक लिहायला घेतलं.

दुसरं असंकी माझे स्नेही मला नेहमी विचारतात, “तू एवढं केव्हा आणि कसं वाचतोस?” जुजबी ओळख असलेल्यांना माझ्या घरात एवढी पुस्तकं कशी याचं आश्‍चर्य वाटतं. या प्रश्‍नावर मी खास असं स्पष्टीकरण देऊ शकणार नाही. पण दिवसभरात काही वाचलं नाही तर मला अस्वस्थ व्हायला होतंम्हणून मी वाचतो. अगदी आजारपणाने अंथरुण धरलेलं असलं तरी पडल्या पडल्या काही तरी वाचल्याखेरीज मला बरं वाटत नाही. बर्‍याचदा मला असंही विचारलं जातंकी तुम्हाला एवढं सगळं वाचायला वेळ कसा मिळतोत्यावर माझं उत्तर असतंदारूड्याला जसा दारू प्यायला वेळ मिळतो तसा मला वाचायला वेळ मिळतो. हे ऐकून समोरच्या व्यक्तीला मी त्याची चेष्टा करतोय असं वाटतंपण ते खरं आहे.

-निरंजन घाटे

(वाचत सुटलो त्याची गोष्ट)


२. 

लिहावं कसंवाचावं कसं आणि जे वाचलं त्याबद्दलचं मतप्रदर्शन करण्यापूर्वी काय करावं याबद्दलही रामदास जे मार्गदर्शन करतात ते मला महत्त्वाचं वाटत आलं आहे.

ते म्हणतात,

 

पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण।

तो दुरात्मा दुराभिमान। मत्सरें करी॥

 अखंड एकांत सेवावा। ग्रंथ मात्र धांडोळावा।

प्रचित येईल तो घ्यावा। अर्थ मनी॥

 बहुत करावें पाठांतर। कंठी धरावें ग्रंथांतर।

भगवत्कथा निरंतर। करीत जावी॥

 जाणत्यापासी लेहो सिकावें। जाणत्यापासी वाचो सिकावें। जाणत्यापासी पुसावें। सर्व कांही॥

 अक्षरें गाळून वाची। कां ते घाली पदरीची।

निघा न करी पुस्तकाची । तो एक मूर्ख॥

 लिहावें शुद्ध वाचावें। जाणावें तदनंतरे।

जाणता कळता बिंबे। बिंबतर स्फूर्ती होतसे॥

 

-निरंजन घाटे

(वाचत सुटलो त्याची गोष्ट)


दारू/दारुडा यांच्या उदाहरणाने एक परिच्छेद संपतो ना संपतो तोच पुढच्या परिच्छेदात लेखक थेट समर्थ रामदासांच्या ओव्यांचा दृष्टांत देतात हे वाचून आपल्या चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित उमटून जातं आणि हे असं रसाळ मनोगत वाचून आपल्याला सुरुवातीलाच पुस्तक आवडायला लागलेलं असतंच पण त्यानंतर तर लेखकाचं वाचन, पुस्तकप्रेम इत्यादींबद्दलचे एकापेक्षा एक प्रसंग वाचून त्यांच्या वाचनप्रेमाबद्दलचा आदर वाढतच जातो.

या सुमारे ३६० पानी पुस्तकात जवळपास प्रत्येक पानावर किमान २-३ पुस्तकांचा उल्लेख आहे. त्याव्यतिरिक्त असंख्य नियतकालिकं, मासिकं, वर्तमानपत्रं, पाक्षिकं इत्यादींचे उल्लेख आहेत ते वेगळेच. त्यामुळे हे पुस्तक वाचत असताना आपल्याला प्रामुख्याने एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे "एखादा माणूस एवढं वाचू शकतो? शक्य आहे?".  परंतु हा प्रश्न वाचकांना पडणार हे जाणून असल्यागत आणि आधी आलेल्या याच धर्तीवरच्या अनेक अनुभवांवरून लेखक आपल्या या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीलाच देऊन टाकतात. आणि ते म्हणजे वाचनाचा वेग. ते पुस्तकं अत्यंत वेगाने वाचू शकतात. ते त्यांनाच कसं काय जमतं?,  इतरांना जमेल का? या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत. पण ते अफाट वेगाने वाचतात हे मात्र नक्की. आणि याच वाचन वेगाच्या संदर्भात त्यांनी एक छान अनुभव सांगितला आहे. 

एकदा लेखक आपल्या धनंजय डोळे नावाच्या मित्राकडे अभ्यासासाठी गेला असताना त्याला मित्राच्या घरी अर्ल स्टॅन्ली गार्डनर नावाच्या लेखकाचं एक पुस्तक दिसलं. लेखक ते पुस्तक वाचण्यात अगदी गुंतून गेला. धनंजयचा मोठा भाऊ बाबा एक-दोन वेळा खोलीत डोकावून गेला पण लेखकाचं तिकडे लक्षही नव्हतं. ते पुस्तक आवडल्याचं कळल्यावर बाबाने भिंतीतल्या एका कपाटातली रांगेने मांडलेली अर्ल स्टॅन्ली गार्डनरची पुस्तकं दाखवली आणि एकेक करून वाचायला न्यायला सांगितलं. परीक्षा संपल्यावर लेखक रोज एक पुस्तक वाचून संपवू लागला. बाबाला जेव्हा कळलं, की हा मुलगा रोज एक पुस्तक घेऊन जातो आणि दुपारपर्यंत वाचून संपवतो, तेव्हा तो आश्चर्यचकितच झाला. त्याचा विश्वास बसेना. नुकत्याच वाचून संपवलेल्या एका पुस्तकावरून त्याने लेखकाची परीक्षा घेतली बाबाने घेतलेल्या त्या तोंडी परीक्षेत लेखक समाधानकारकरीत्या उत्तीर्ण झाला आणि त्या दिवसापासून त्याला एका दिवशी एका ऐवजी दोन पुस्तकं मिळू लागली. दरम्यान लेखकाने एकदा ए. ए. फेअर नावाच्या एका लेखकाचं पुस्तक वाचलं. तेव्हा त्याला त्या शैलीतलं लिखाण कुठे तरी वाचलंय असं सारखं वाटत होतं. पुढे ए. ए. फेअरच्या एका नव्या पुस्तकावर अर्ल स्टॅन्ली गार्डनर रायटिंग अ‍ॅज ए. ए. फेअरअसं छापलेलं वाचलं तेव्हा उलगडा झाला. अर्ल स्टॅन्ली गार्डनर हाच ए. ए. फेअर या नावानेही लिहीत असे. 

आपण आत्मचरित्र लिहायचं नाही हे लेखकाने आधीच ठरवलं होतं. पण मग आत्मचरित्र नाही तर निदान त्यांची वाचनाची आवड, प्रवास या विषयावर तरी त्यांनी लिहायला हवं असं त्यांच्या मित्रमंडळींचं मत पडलं आणि ते त्यांना पटलंही. आणि त्यातूनच या पुस्तकाचा जन्म झाला.

त्यामुळे वाचनयात्रेची सुरुवातया पहिल्याच प्रकरणात अधूनमधून लेखकाच्या आयुष्यातले व्यक्तिगत प्रसंग, वैयक्तिक अनुभव इत्यादींचा वेळोवेळी उल्लेख होताना दिसतो. तसंच गूढ किंवा रहस्यकथांच्या आवडीबद्दल लिहिताना आपल्या वडिलांच्या राजकीय कारणावरून झालेल्या हत्येबद्दल लेखक उल्लेख करतो. त्यांच्या खुन्याचा शोध कधीच लागला नाही त्यामुळे हे कोणी केलं असेल, का केलं असेल? अशा प्रकारच्या प्रश्नांमधून कदाचित आपण गूढकथाप्रकाराकडे आकर्षित झालो असू असं निरीक्षण नोंदवून ठेवतात. त्याचबरोबर अनेक ठिकाणी त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या प्रचंड वेडाबद्दल बरेच उल्लेख आहेत. सैन्यात जाण्याची खूप इच्छा असूनही रंगांधळेपणामुळे नाकारल्या गेलेल्या प्रवेशाबद्दल छोटीशी खंतही मांडलेली आहे.

अनेक वर्तमानपत्रंनियतकालिकं, मासिकं इत्यादींच नियमित वाचन, किताबमिनार वाचनालयामुळे जोपासता आलेली वाचनाची आवड तसेच अशा ठक्कर, जैन, बाबू, पोपट अशा अनेक पुस्तकविक्रेत्यांबद्दलच्या हृद्य आठवणींचे उल्लेख येतात. आईने वाचनासाठी प्रोत्साहन दिलं आणि मामाने वाचनासाठी विविध पुस्तकं उपलब्ध करून दिली याचे कृतज्ञतापूर्वक केलेले उल्लेखही येतात कारण त्यांच्यामुळेच लेखकाचं सुरुवातीच्या काळातलं वाचनप्रेम जोपासलं गेलं.

ओढ रहस्यकथांची आणि साहसकथांची मोहिनी या प्रकरणांमध्ये अनुक्रमे दिवाकर नेमाडे, नारायण धारप आणि  बाबुराव अर्नाळकर यांचे आदरपूर्वक उल्लेख येतात. नेमाडे आणि धारप यांच्याशी लेखकाचे असलेले लेखक-वाचक संबंध कालांतराने गळून जाऊन त्यांच्यात मित्रत्वाचं नातं कसं प्रस्थापित झालं याबद्दलही तपशीलवार माहिती मिळते. दरम्यान एका प्रकरणात डॉ गोखले, गोविंदराव तळवलकर, कोठावळे अशा अनेक संपादकांविषयीच्या काही भलेबुरे उल्लेखही आढळतात.

टॅबूविषयातला खजिना या एका आगळ्यावेगळ्या प्रकरणात लेखक 'सेक्स' या अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या विषयांवर वाचलेल्या अनेक पुस्तकांचे उल्लेख करतात.

शृंगार या विषयावरील पुस्तकांसंबंधी लिहिताना लेखक "खरं तर शृंगारिक काव्य मानवजातीच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे" असं म्हणून पुढे प्राचीन साहित्यामधील तत्सम उल्लेख/वर्णनं यांच्याविषयी भाष्य करतात. वेद किंवा एकूणच प्राचीन साहित्यात आढळणारे लैंगिक, कामुक उल्लेख याविषयी लिहिताना लेखक आपल्याला आजच्या काळात अविश्वसनीय वाटतील किंवा पटायला/पचायला कठीण जातील अनेक उदाहरणं देतात. त्यात अथर्ववेद, ऋग्वेदातील यम-यमीचा संवाद, रामायण-महाभारतातली शृंगाराची उदाहरणं, जयदेवाच्या गीतगोविंदामधील कृष्ण आणि गोपींचे प्रसंग, रघुवंश, कामसूत्र, अनंगरंग रतिशास्त्र आणि कोकशास्त्र इत्यादींचा समावेश आहे. तसेच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचं भारतीय विवाहसंस्थेचा इतिहासहेही पुस्तक आवर्जून वाचण्याचा आग्रह लेखक करतात.

जाता जाता लेखक आद्य शंकराचार्यांनी लिहिलेल्या मंत्रशास्त्रया पुस्तकाच्या ज्योतिषाचार्य, मंत्रशास्त्रज्ञ डॉ. र. शं. केळकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाविषयी माहिती देतात. हे पुस्तक प्रत्यक्षात सौंदर्यलहरीया ग्रंथाचं मंत्रशास्त्रीय विश्लेषण आहे. यातली त्रिपुरसुंदरी ललितादेवीची वर्णनं अत्यंत कामुक आहेत आणि संपूर्ण स्तोत्र म्हणजे या देवीच्या एकेका अवयवाचं वर्णन आहे.

या सर्व वाचनाचा लेखकाला आपली सेक्सायन’, ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षणआणि तीची कहाणीही त्याच विषयावरची पुस्तकं लिहिताना खूपच उपयोग झाला.

साहित्यातला हसरा अध्यायया प्रकरणात पुलं आवडते लेखक असल्याचा उल्लेख वाचून आपल्याला मनोमन आनंद होतो. पुढे वि आ बुवांनी लिहिलेल्या एक एक चमचाया भन्नाट कादंबरीविषयी लेखक सांगतात. त्या कादंबरीत त्या काळात लोकप्रिय असलेल्या साने गुरुजी, गो. नी. दांडेकर, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर अशा दहा-बारा लेखकांच्या लेखनशैलीत एक एक प्रकरण लिहलेलं आहे. हे असं एकदम वेगळ्या प्रकारच्या लेखनाचा उद्योग अन्य कोणी, अगदी इंग्रजी वाङ्मयातही कोणी, केल्याचं आढळत नाही. दरम्यान वि आ बुवांची एक बोचरी आठवणही लेखक सांगतात. आयुष्यभर उदंड लेखन करणाऱ्या बुवांना कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात 'महाराष्ट्र साहित्य परिषद जीवन गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्याबद्दल लेखकाशी बोलताना बुवा म्हणाले की मी आयुष्यभर विनोदी लेखन केलं, २०० च्या वर पुस्तकं लिहिली. परंतु आजतागायत मला कुठलाही पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळे शेवटी का होईन मिळालेल्या या पुरस्काराचं महत्व माझ्यासाठी मोठं आहे. कायम विनोदी पुस्तकं लिहिल्याने दुर्लक्षित राहिल्याबद्दलची खंत व्यक्त करतानाही त्यात कुठे कटुता नसते की तक्रार नसते. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं.  दरम्यान एका ठिकाणी लेखकही आपल्या मनीची दुखरी नस उलगडून दाखवतात. विविध प्रकारचं लेखन      करूनही साहित्यिक म्हणून मान्यता न मिळता 'विज्ञानकथालेखक' अशी मर्यादित ओळखच मिळाल्याबद्दलची खंत व्यक्त करतात.

विनोदी साहित्यावर पुढे लिहिताना संस्कृत साहित्यातले विनोद, त्यातले विदूषकाचे संवाद इत्यादींची उदाहरणं देऊन लेखक संस्कृत साहित्यामध्ये असलेल्या विनोदाचं महत्व विशद करतात. मराठीत विनोदाची मीमांसा करणाऱ्या गंभीर पुस्तकांबद्दल लिहिताना न चिं केळकरांचं 'हास्यविनोद मीमांसा’, आचार्य अत्र्यांचं विनोदगाथा’, चिं. वि. जोशी यांच्या हास्यचिंतामणीची ४२ पानी प्रस्तावना, डॉ. अ. वा. वर्टी यांचं विनोद- एक आख्यानया अभ्यासपूर्ण पुस्तकांची माहिती मिळते. 

नंतरच्या प्रकरणांमध्ये वूडहाऊस, मार्क ट्वेन, मेरी शेली,जोनाथन स्विफ्ट, आर्थर क्लार्क, आयझॅक असिमोव यांसारख्या अनेक पाश्चात्य लेखक व त्यांच्या पुस्तकांबद्दलचे अनेक अनुभव मुक्तहस्ताने मांडलेले आढळतात. शंभराहून अधिक पुस्तकं लिहिणारा आयझॅक असिमोव हा रशियन-अमेरिकन विज्ञानकथालेखक हा लेखक निरंजन घाटे यांचा अत्यंत आवडता लेखक. त्याच्या विज्ञानकथा, त्याला प्रत्यक्ष आलेले अनुभव, त्यावर त्याने रचलेल्या थोड्या विनोदी ढंगाच्या कथा, प्रत्येक व्यक्तीच्या अंगी वाह्यातपणाचा थोडा तरी अंश असतोच यावर ठाम विश्वास असणाऱ्या असिमोवचे त्याच्या स्वतःच्या वाह्यातपणाचे काही किस्से अशी त्याच्याविषयीच्या आठणींची रेलचेल आहे.

आत्मचरित्रपर एका प्रकरणात व्हिन्सेंट व्हॅन गॉगचं चरित्र लस्ट फॉर लाइफवाचल्यानंतर पुढे एकदा रद्दीत सापडलेल्या हॉलंड न्यूजनावाच्या नियतकालिकात त्याच नियतकालिकाचा संपादक आणि खुद्द व्हिन्सेंट व्हॅन गॉग यांच्या असणाऱ्या साम्याविषयी आणि त्यातून जन्माला आलेल्या कुतुहलापायी त्याने व्हिन्सेंट व्हॅन गॉगशी असलेलं नातं शोधून काढण्याच्या प्रवासाची सत्यकथा वाचताना तर छाती दडपूनच जाते.

त्यानंतरचं प्रकरण म्हणजे एकदम वेगळंच, विलक्षण, अगदी एकमेवाद्वितीय असं आणि पुस्तकातलं माझं सर्वात आवडतं प्रकरण आहे आणि ते म्हणजे काही झंगड पुस्तकं. यात आपल्याला जगभरातल्या एकापेक्षा एक वेगवेगळ्या, प्रसंगी अशक्य वाटणाऱ्या ध्येयाने पछाडून गेलेल्या आणि ध्येयपूर्तीसाठी लोकोत्तर कामगिऱ्या करणाऱ्या लोकांच्या पुस्तकांची सखोल माहिती मिळते. त्यात युआन त्सांगने भारतात येण्यासाठी वापरलेल्या सिल्क रूटचा वापर करत त्याच मार्गाने चीन ते भारत प्रवास करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या मिशी शरण नावाच्या भारतीय वंशाच्या अमेरिकास्थित प्रवासी लेखिकेच्याचेजींग द मॉंक'ज शॅडोनावाच्या पुस्तकाची माहिती मिळते.

अ‍ॅन मुस्टो नावाच्या ब्रिटिश शिक्षिका आणि सायकलीस्टने हनुमंताच्या द्रोणागिरी पर्वत उचलण्याच्या कथेविषयी ऐकलं आणि त्याने तो प्रवास कसा केला असेल, कुठल्या मार्गाने केला असेल या विचाराने ती इतकी झपाटून गेली की मारुतीच्या श्रीलंका ते द्रोणागिरी या मार्गावर तिने सायकलप्रवास करायचं ठरवलं आणि अथक वाचन, अभ्यास, परिश्रम घेत तिने तो प्रवास करूनही दाखवला. त्या संपूर्ण प्रवासाचं वर्णन म्हणजे तिचं 'टू व्हील्स इन डस्ट  : फ्रॉम काठमांडू टू कॅण्डी' हे पुस्तक. 

भारतातल्या मौसमी पावसाच्या प्रेमात पडलेला आणि त्यासाठी पावसाचा केरळपासून ते थेट आसामपर्यंत पाठलाग करणारा ब्रिटिश अवलिया अलेक्झांडर फ्रेटर, नेपोलियन बोनापार्टच्या अखेरच्या दिवसांबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला ठेवण्यात आलेल्या बेटावर ठाण मांडणारी ज्युलिया ब्लॅकबर्न असेही अजून काही अवलिये त्यांच्या पुस्तकांच्या माध्यमांतून आपल्याला भेटतात.           

या झंगड पुस्तकांमध्ये अजून एका चमत्कारिक पुस्तकाचा उल्लेख येतो. १९७५ साली प्रकाशित झालेल्या द फर्स्ट टाइमनावाच्या त्या पुस्तकात त्यात २८ गाजलेल्या अमेरिकी व्यक्तींच्या अर्थात सेलिब्रिटींच्या पहिल्या लैंगिक अनुभवांचं वर्णन आहे. १९७३ मध्ये कार्ल फ्लेमिंग आणि अ‍ॅन टेलर-फ्लेमिंग यांनी अमेरिकेतील तत्कालीन १०० सुप्रसिद्ध व्यक्तींना यासंबंधीच्या मुलाखतीविषयी विचारणा केली होती आणि त्यातल्या फक्त २८ जणांचा त्याला होकार आला. त्यातलं जळजळीत वास्तव म्हणजे त्यातल्या काही स्त्रियांवर त्यांच्या जवळच्याच प्रौढ व्यक्तींनी बलात्कार केला होता, तर काही पुरुषांना त्यांच्यापेक्षा मोठ्या वयाच्या स्त्रियांनी आपल्या जाळ्यात अडकवलं होतं. या असल्या काही विषयाला वाहिलेलं पुस्तक असेल याची आपण स्वनातही कल्पना केलेली नसते आणि त्यामुळे लेखकाने या प्रकरणाला दिलेल्या 'झंगड पुस्तकं' या नावाची यथार्थता जाणवते.

 वर म्हंटल्याप्रमाणे या ३६० पानी पुस्तकांत पानोपानी पसरलेल्या आणि आपल्याशी गळाभेट घेणाऱ्या शेकडो पुस्तकांची यादी बघून मी थक्क तर झालोच पण त्याचबरोबर इतकी पुस्तकं वाचायला आपल्याला किती जन्म घ्यावे लागले असते असा विचारही मनात चमकून गेला. आणि त्याक्षणीच 'बुक्स ऑन बुक्स' या प्रकारातली पुस्तकं वाचण्याचा माझा कंटाळा तर दूर पळून गेलाच पण तो निर्णय किती चुकीचा आणि अज्ञानमूलक होता हेही लक्षात आलं. त्यामुळे जर एकाच पुस्तकात अनेक विषयांवरची विविध पुस्तकं समजावून घेण्याची आणि त्याचबरोबर त्या पुस्तकांबद्दलचं विश्लेषणही वाचण्याची संधी मिळत असेल तर कुठल्याही पुस्तकप्रेमी व्यक्तीने "देता किती देशील दो करांनी" म्हणत अशा पुस्तकांचं स्वागतच करायला हवं !

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...