Thursday, December 30, 2010

दृष्टीआड .... !!

तारीख : ३१ डिसेंबर २०२०

प्रति,
मायबाप सायेब

विषय : बरगड्डी संघटना अहवाल २०१०-२०

मायबाप सायेब,

आपल्या हुकुमापरमाने बरगड्डी संघटनेच्या गेल्या धा वर्षांतल्या महत्वाच्या विजयांचा रिपोर्ट पाठवत आहे. सांगन्यास लय आनंद वाटटू की तुमी येळोयेळी सांगितल्या परमानं वागल्यानंच संघटनेला हा दिस दिसला आनी तेच्याबद्दल म्या धनाजी गनपत पवार (श्यान्नव कुळी मराठा-कुनबी) बरगड्डीचा अध्यक्ष या नात्याने माज्या सर्व बेडर, निडर, धाडसी बरगड्डी मावळ्यांच्या वतीने आपले लय लय आभार मानतो.

२०१० : दादू कुल्कर्न्याच्या नावाचा पुरस्कार आपन आधीच बंद पाडला व्हता. त्यानंतर त्याच तापलेल्या वनव्यात दाद्याचा लाल म्हालातला पुतला करकरीत कट्टरन्ये कापून उखडून टाकला.

२०११ : शिवाजी म्हाराजांनी रामदाश्या ठोसरला सज्जनगड वस्तीसाठी दिल्याचा कुठलाही पुरावा बाब्या पुरंदर्‍या, ब्येडेकर वेगेरे न देऊ शकल्याने  रामदाश्याच्या सज्जनगडावरच्या मठाची नासधूस.

२०१२ : रामदाश्या ठोसर नावाचा कोनी साधू अस्तीत्वात असल्याचाही पुरावा न भेटल्याने त्याच्या नावावर खपवलं जानारं दासबोध नावाचं फडतूस पुस्तक चिंध्या करून शिवथर घळीच्या धबधब्यात बुडवून टाकलं. आनी शिवथर घलीत जाळपोळ व तोडफोड.

२०१३ : ज्ञान्या कुल्कर्न्याने भगवद्‌गीतेची कापी करून त्याला स्वःताचं नाव देऊन 'ज्ञानेश्वरी' नावाचं पुस्तक काढलं होतं हे बरगड्डीच्या संशोधक मंडळाने पुराव्यानिशी शाबित करून दाखवल्यानंतर 'जाळा मनुस्मृती-जाळा ज्ञानेश्वरी' या महायोजनेची हाक.

२०१४ : (तुमी सांगितल्यापरमानं) दादू कुल्कर्न्याच्या येळी वापरलेलं कटर वापरूनच भगवद्‌गीतेची कापी करनार्‍या ज्ञान्या कुल्कर्न्याचं नेवाश्याचं मंदिर जमीनदोस्त.

२०१५ : स्वःताला 'तेल्यातांबोळ्यांचा नेता' अशी जातीद्वेषक पदवी लावून मिरवनार्‍या बाळ टिळकाचा निषेध करन्यासाठी भव्य 'टिळक धिक्कार सभे'चं  आयोजन आनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठावर हल्ला. बाळ टिळक खरोखरीच 'लोकमान्य' होता याचा कुठलाही पुरावा न भेटल्याने टिळकाच्या अलिकडे 'लोकमान्य' हा शब्द लावन्यास बंदी घालन्यासाठी जनजागृती.

२०१६ : शेंगडावरचा टिळक बंगला बाळ टिळकाने रामलाल नाईक यांच्याकडून बळजबरीने काढून घेतल्याचे पुरावे बरगड्डी संशोधक मंडळाला भेटलेले असल्याने 'टिळक बंगल्या'चं नाव बदलून 'नाईक बंगला' करावं यासाठी भव्य रॅली.

२०१७ : वासुदेव फडक्या आद्यच काय पर सादा क्रांतिकारक बी असल्याचे कुटलेबी पुरावे बरगड्डी संशोधक मंडळाला भेटले नसल्याने फडक्या हा इंग्रजांचा 'साधारन चाकर' होता हे सिद्ध होतं. त्यामुळे फडक्याचं नाव क्रांतिकारकांच्या यादीतून वगळन्यासाठी भव्य जनआंदोलन.

२०१८ : भटाबामनांच्या हिंदू धर्माला सर्वश्रेष्ठ धर्म म्हनवनार्‍या आनी बहुजनांच्या डोळ्यात धूळ फेकनार्‍या सावरकराचा धिक्कार करन्यासाठी 'सावरकर महानिषेध ब्रिगेड' ची स्थापना. सावरकराला 'स्वातंत्र्यवीर' न म्हनन्याचा फतवा बरगड्डीतर्फे जारी.

२०१९ : भटुरड्या आनी छंदीफंदी असलेल्या पहिल्या बाजी पेशव्याच्या निषेधार्थ आनी भटुरड्या माधव पेशव्याच्या निषेधार्थ त्या दोघांवरच्या 'राऊ' आनी 'स्वामी' इत्यादी पुस्तकांवर बंदीची मागनी. 'गोखले प्रकाशन'च्या ऑफिसवर एक हजार निडर बरगड्डी मावळ्यांचा हल्ला. 'राऊ' आनी 'स्वामी' च्या सगळ्या प्रती जाळल्या.

२०२० : सरकारी कागदपत्रात 'ब्राह्मण' या शब्दाऐवजी 'बामन' असा योग्य शब्द वापरला जावा अशी मागनी. २०१० च्या जातीनिहाय गननेनुसार 'बामन' म्हनून नोंदनी केलेल्या व्यक्तींना २०% 'बामन कर' भरावा लागन्याची मागनी आनी त्यासाठी भव्य 'बामन करसक्ती रॅली'चं आयोजन.

सायेब, यापुढेही बरगड्डी संघटना आनी आमचे मावळे आपल्या आदेशापरमानं काम करन्यास सदैव तय्यार असतील अशी मी शपथ घेतो. जय जिजाऊ जय शिवाजी.

आपला निडर मावळा,
धनाजी गनपत पवार (श्यान्नव कुळी मराठा-कुनबी)
अध्यक्ष
बरगड्डी संघटना, जिजाऊ ब्रिगेड, बहुजन क्रांती समिती, मराठा महासेवा मंडळ वेगेरे वेगेरे वेगेरे..

-------------------------------------------

अहवाल वाचून संपवल्यावर साहेबांच्या चेहर्‍यावर संतोषाची स्मितरेषा झळकून गेली. सगळं कसं चोख घडत गेलं होतं. आपली चतुराई, ताब्यात असलेलं गृहखातं आणि दिल्लीचा वरदहस्त या सर्वांच्या अनोख्या संगमाने आपण बामनांची कशी पळताभुई थोडी केली या विचाराने साहेब मनोमन सुखावले. स्वतःच्या हुशारीचा त्यांना पुन्हा एकदा अभिमान वाटला. सगळं कसं ठरवल्याप्रमाणे घडलं होतं. दर वर्षाच्या शेवटी पुढच्या वर्षाच्या योजना आखल्या जात आणि बरगड्डीला वापरून त्या बरहुकूम काम पार पाडलं जाई. स्वतःच्या हुशारीचं पुन्हा एकदा कौतुक करून घ्यावसं वाटून मंद स्मित करत त्यांनी टेबलचा ड्रॉवर उघडून त्यातून एक कागदाचं जुनाट चिटोरं बाहेर काढलं आणि उघडून वाचू लागले.

२०१० :
राष्ट्रकुल, आदर्श, २-जी, बँक कर्ज - २०० कोटी

२०११ :
शेतजमीन स्कीम, ३-जी - ३०० कोटी

२०१२ :
शेतकरी मदत योजना, पूर पॅकेज, दुष्काळ पॅकेज  - ५६९ कोटी

२०१३ :
खेडी-जोडणी रस्ता महायोजना - ८४० कोटी

२०१४ :
दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी क्रेडीट कार्ड योजना, दुष्काळ पॅकेज - ९०० कोटी

२०१५ :
ऑनलाईन लॉटरी स्कीम, दुष्काळ पॅकेज, पूर मेगापॅकेज - १००० कोटी

२०१६ :
'गाव तिथे इंटरनेट' योजना - १२२० कोटी

२०१७ :
रिझर्व्ह बँक स्कीम, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी घरबांधणी महायोजना - १४५५ कोटी

२०१८ :
सॅटेलाईट-केबल मेगास्कीम, हमरस्ते बांधणी योजना : १६८० कोटी

२०१९ :
नलिकागॅस मेगास्कीम, 'सर्वांसाठी केरोसिन' योजना : १९४३ कोटी

२०२० :
मेडिकल इंश्युरन्स मेगास्कीम, बेघरांसाठी महाकर्ज योजना : २४०० कोटी

-------------------------------------------

'क्या ब्बात है' अगदी एकास एक झालं होतं सगळं. स्वीस बँक अकाउंट भरून फुगून वहात होतं नुसतं. दर वर्षाअखेरीस निवडक पक्षसदस्यांना विश्वासात घेऊन त्यांना नवीन योजना सांगायची आणि काही महिन्यांतच पुढच्या वाटचालीची दिशा बरगड्डीला दाखवायची. एकदम सुपरस्पेशल प्लान होता. आणि गेली अनेक वर्षं तो बिनबोभाटपणे यशस्वी होत होता. पण यावेळचा प्लान जरा जास्तच डेंजर होता. इतल्या वर्षांच्या अनुभवावरून यावेळी साहेबांनी थोडी जास्तच लांबची उडी मारायचं ठरवलं होतं. एकाच वेळी तिन्ही सैन्यदलाच्या शस्त्रास्त्र खरेदीत, रिझर्व्ह बँकेत, शेअर बाजारात, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या पेन्शन योजनेत अशा सगळ्या ठिकाणी एकाच वेळी हात मारायचा म्हणजे जरा व्यवस्थित प्लानिंग लागणार होतं. पण पुष्कळ विचारांती ते साहेबांकडे तयारही होतं. गृहखातं हातात होतं आणि दिल्लीचा वरदहस्त डोक्यावर होता त्यामुळे तशी काही चिंता नव्हतीच. प्लान अगदी छोटासाच होता अगदीच दोन ओळींचा..... त्यांनी तो प्लान बरगड्डीला देण्यासाठी कागदावर उतरवायला सुरुवात केली.

-------------------------------------------

माज्या बरगड्डी भावांनो,

१. बामन टिळकाने सुरु केलेल्या गनपती उत्सवातली गनपतीची मूर्ती कधी व्यवस्थित बघितली आहेत का? नीट बघा... त्या मूर्तीच्या गळ्यात जान्हवं आहे.. भट वापरतात तसलं जान्हवं, भटांची ओळख पटवनारं जान्हवं !! थोडक्यात हा गनपती बी बामनच हाये. भटच हाये. भटांचा देव असलेल्या भट गनपतीचा निषेध करा. देवळं तोडा, मुर्त्या फोडा....... !!!!!!!!!!  सुरुवात करा या पाच ठिकाणांपासून....... प्रभादेवी, लालबाग, दगडूशेठ, केशवजी नाईक चाळीतला गनपती आनी सारसबागेतला गनपती.

२. जे भट-बामन आड येतील त्या सगळ्यांना सरळ कापत सुटा. कोणालाही सोडू नका !!!

जय जिजाऊ जय शिवाजी !!!!

तुमचा,
साहेब

-------------------------------------------

Thursday, December 23, 2010

सुवर्ण (महोत्सव)

तो (,ते आणि अनेकजण) : पुन्हा मॅच घालवली पठ्ठ्याने !!!!!

मी : म्हणजे????

त्याच्या प्रश्नातल्या चारी शब्दांसाठी एकेक प्रश्नचिन्ह वापरत मी मोठा आ वासत प्रतिप्रश्न केला. कारण "पुन्हा" म्हंटल्यावर  "आधी कधी?" , "घालवली" म्हंटल्यावर "उरली कधी होती?" आणि "पठ्ठ्याने" म्हंटल्यावर "नक्की कोणी? श्रीशांतने की उनाडकतने?" असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात उभे राहिले.. पण माझ्या "म्हणजे?" वाल्या प्रश्नाने त्याला (,त्यांना आणि अनेकजणांना) एवढे तीन-तीन प्रश्न सोडा, काहीच अर्थबोध झाल्याचं दिसेना. त्यामुळे मग मी डोक्यात उभे राहिलेले ते प्रश्न तोंडावाटे उभे केले.

पहिल्या दोन प्रश्नांना साफ बगल देत तिसर्‍या प्रश्नावर फिस्सकन हसत तो (,ते आणि अनेकजण) म्हणाला "अरे ते दोघे कशाला घालवतायत मॅच? सच्च्याने घालवली ना." शिव्या घालतानाही जवळीक दाखवण्याचा मोह न सुटलेल्या त्या (, त्यांच्या आणि अनेकजणांच्या) अश्राप जीवाकडे सौहार्दपूर्ण नजरेने पाहून मी न समजल्यासारखं करत पुन्हा विचारलं..... "म्हणजे?"... यावेळी कदाचित त्याला प्रश्न समजला असावा. तोंडाच्या पुरचुंडीची गाठ सोडून तो (, ते आणि अनेकजण) बदाबदा बोलायला लागला.

"अरे काय यार. एवढं करून स्वतःसाठीच खेळला ना. स्वतःचे शंभर होण्यासाठीच !! स्वतःची पन्नासावी सेंच्युरी मारण्यासाठी सगळी धडपड. मग मॅचचं काहीही होऊदेत." या चिरपरिचित सुरुवातीवरून गाडी आता स्वार्थी खेळ, स्वतःपुरते विक्रम, मॅचविनर नाही, प्रेशरखाली खेळत नाही, दुसर्‍या इनिंगमध्ये परफॉर्मन्स देत नाही वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वाल्या घिसापीट्या विषयाकडे वळणार हे माझ्या लक्षात आलं.

अशा फालतू बडबडीला गप्प करण्यासाठी मी नेहमी ही  महान वेबसाईट वापरतो. ज्याप्रमाणे असं म्हणतात की दासबोधात समर्थांनी आपल्यासारख्या सामान्यांना सुचणारही नाहीत इतक्या शंका काढून स्वतःच त्या शंकांची उत्तरं दिली आहेत त्याप्रमाणे या वेबसाइटवाल्यांनी त्याच्या (, त्यांच्या आणि अनेकजणांच्या) सारख्यांना पडलेले प्रश्न, शंका, संशय यांची धूळधाण तर उडवली आहेच पण इतरही अनेक कुशंकांना आपणहून उत्तरं दिली आहेत.

थोडक्यात अशा बाष्कळ बडबडीकडे दुर्लक्ष करण्याचं, त्यांना अनुल्लेखाने मारण्याचं कसब गेल्या एकवीस वर्षांत सचिनकृपेने माझ्या ठायी एकवटलं आहे. मात्र ती बडबड पुन्हा एकदा ऐकून यावेळी मात्र असह्य होत होतं !

तो (,ते आणि अनेकजण) बोलतच होता... "शेवटच्या दिवशी त्याने सगळी सूत्रं हातात घेणं आवश्यक होतं, त्याने जास्तीत जास्त बॉलर्सना फेस करणं आवश्यक होतं, तर उलट हा एक रन घेऊन या नवीन लोकांना बॉलर्सच्या तोंडी देत होता."

"लक्ष्मण आणि इशांतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहाली टेस्टमधल्या ऐतिहासिक मॅचविनिंग भागीदारीत इशांत लक्ष्मणपेक्षा अधिक चेंडू खेळला असल्याचं आणि त्याबद्दल काही दिवसांपूर्वीच आपण त्या दोघांचंही कौतुक केलेलं असल्याचं एवढ्यातच विस्मृतीत गाडणार्‍या हे महान पामरा" हे सगळं मनातल्या मनात म्हणून मी प्रकटपणे एवढंच म्हणालो "अरे पण त्यामुळे मॅच वाचली असती का? बाकीच्या विकेट्स धडाधड पडत असतानाही सचिन खेळतच होता आणि नाबादही राहिला याबद्दल त्याला स्वार्थी संबोधून दोष देणं म्हणजे मास्तरांनी वर्गात हजर असलेल्या मुलांनाच गैरहजेरीबाबतचे खडे बोल सुनावण्यासारखं नाहीये का ?"

तो (,ते आणि अनेकजण) काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. असे लोक कधीच काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. असो..

"अरे पण तो तर देव आहे ना तुमचा? तुम्ही त्याला देव मानता ना? मग त्याला हे का शक्य नाही? खरं तर त्याला सगळं शक्य असलं पाहिजे, सगळं जमलं पाहिजे, त्याने सगळ्या मॅचेस जिंकून दिल्या पाहिजेत. आणि अशा अवघड प्रसंगात तर त्याची किमया, चमत्कार दाखवून स्वतःला सिद्ध केलंच पाहिजे."

"तुझ्याकडे गाडी आहे?" माझ्या अचानक आलेल्या प्रश्नाने तो (,ते आणि अनेकजण) गोंधळला.

"काय?"

"गाडी रे.. कार.. कार.."

"हो आहे ना. ऑल्टो आहे."

"ओके.. आणि घर?"

"काय बडबडतो आहेस तू? किती वेळा तू घरी येऊन गेला आहेस."

"बरं ते जाऊदे. बँकबॅलन्स किती आहे?"

"काहीही काय बडबडतो आहेस? आहे पुरेसा.."

"समजा मी तुला आत्ता तुझ्या ऑल्टोऐवजी एक मर्सिडिझ, तुझ्या घराऐवजी पाच हजार स्क्वेअरफीटचा बंगला आणि दहाकोटीचा बँकबॅलन्स हे सगळं दिलं तर घेशील? की तू आत्ता आहेस त्यात सुखी आहेस?"

"काहीही प्रश्न विचारतोयस. वेड लागलंय तुला. कायतरी बडबडतो आहेस."

"बोल ना."

"अरे अर्थात !! कोणीही घेईलच. मी आत्ता कितीही सुखी असलो तरी या सगळ्या गोष्टींना कोण नाही म्हणेल? या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात, कधीतरी आपल्या व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं. तुलाही वाटत असेलच."

"बरोबर"

"पण या सगळ्याचा मॅचशी काय संबंध??"

मी जवळजवळ दुर्लक्ष करत... "बरं देवाला मानतोस?"

"हो ही आणि नाहीही. थोडं फार मानतो"

"बरं मला आता एक सांग की आस्तिक असलास तर देव आणि नास्तिक असलास तर जी कुठली वैश्विक, आंतरिक, सर्वव्यापी, महान शक्ती वगैरे वगैरे तुम्ही म्हणता ती शक्ती यांना एक प्रश्न विचारू आता. तू तुझ्या देवाची/शक्तीची एवढी पूजाअर्चा, प्रार्थना करतोस, तुझी मागणी मागतोस, गार्‍हाणी घालतोस तरी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात का? सगळी मागणी मान्य होतात का? सगळी गार्‍हाणी पुरी होतात का? बोल ना? मग का नाही तुझ्याकडे अजून मर्सिडिझ? का नाहीये पाच हजार स्क्वेअरफीटचा बंगला आणि दहाकोटीचा बँकबॅलन्स?"

"क्काय??"

"मी सांगतो.. देव काहीही, मनात येईल ते, वाट्टेल ते  करू शकतो... देव आपल्याला हवं ते सगळं देऊ शकतो... हा सगळा निव्वळ भ्रम आहे. म्हणजे देव हे करू शकत नाही असं मला म्हणायचं नाही.. कदाचित करू शकतही असेल पण म्हणून ते त्याने करावंच, केलंच पाहिजे, चमत्कार दाखवून स्वतःला सिद्ध केलेच पाहिजेत, आपलं अस्तित्व दाखवलंच पाहिजे असा घोशा आपण नाही लावू शकत.. थोडंफार आहे त्यात समाधानी राहायला शिकायला हवं.. नाही का?"

"म्हणजे?" गेल्या काही वेळात तो फक्त "म्हणजे" आणि "काय" या व्यतिरिक्त काहीही बोलला नव्हता... !

"म्हणजे हेच रे... १४००० च्या वर कसोटी धावा, ५० शतकं, ५९ अर्धशतकं, ५६ चा अ‍ॅव्हरेज, २०१० च्या कॅलेन्डर वर्षात ८५ चा अ‍ॅव्हरेज आणि १५०० च्या वर धावा, पाहिलं आणि एकमेव एक दिवसीय द्विशतक करणारा खेळाडू, १७००० एकदिवसीय धावा, अनुक्रमे ४६ आणि ९३ एकदिवसीय शतकं आणि अर्धशतकं, एकवीस वर्षं सतत न दमता, न थकता खेळणारा खेळाडू हे एवढं सगळं खूप आहे रे आमच्यासाठी.. त्यातच आनंद आहे आम्हाला.. देवच आहे तो आमच्यासाठी.. स्वतःचं देवत्व (तुमच्यासारख्यांसाठी) सिद्ध करण्यासाठी कदाचित तो प्रत्येक सामना जिंकून देऊ शकेलही, प्रत्येक सामन्यात शतक करेलही.. पण त्याची काही आवश्यकता नाही रे.. त्याने केलंय तेवढंच खूप आहे त्याला न मागता देवत्व देण्यासाठी.. न मागता हे महत्वाचं यात.. बरं या सगळ्यात त्याचा विनम्रपणा, सदैव जमिनीवर असलेली पावलं, सामाजिक दृष्टीकोन वगैरे तर कुठे धरतही नाहीये मी.. खरं तर नुसतं तेही पुरेसं आहे त्याचं देवत्व सिद्ध करण्यासाठी. तस्मात्  देवत्व सिद्ध करणं, स्वतःला सिद्ध करणं वगैरे वगैरे आपण सचिनच्या बाबतीत तरी विसरून जाऊया....... नाहीतर एक आयडिया...!!!!! हे स्वतःला सिद्ध करणं उरलेल्या दहा जणांसाठी का नाही राखून ठेवत आपण... प्रत्येक सामन्यात शतक ठोकून/द्विशतक ठोकून/हॅटट्रिक घेऊन/डावात ५-१० गडी बाद करून सगळे सामने जिंकून द्यायला सांगून ? क्या बोलता?? व्हॉट से??"

-------------------------

तळटीप १ : काल्पनिक............ पण खरंखुरं !!
तळटीप २ : सचिनच्या प्रत्येक विक्रमावर पोस्ट लिहावंसं वाटतंच पण तसं केलं तर पठ्ठ्यासाठी (म्हणजे इथे मात्र सचिनसाठीच) एक नवीन ब्लॉगच काढावा लागेल. त्यामुळे एखाद्या विक्रमासाठी पोस्ट नाही लिहिली तरी चालेल असं म्हणून पन्नासाव्या शतकाबद्दल पोस्ट लिहिणार नव्हतो. जस्ट फेबु,ओर्कुट वर स्टेटस टाकून साजरा करणार होतो तो विक्रम.. पण गेल्या २-३ दिवसात क्रिकइन्फोवरचे काही कॉलम्स, त्याखाली आलेल्या प्रतिक्रिया, काही ट्विटस, काही कोट्स वाचून छान करमणूक झाली. त्यामुळे अखेर पोस्टला पर्याय नाही हे नक्की झालं..
तळटीप ३ : गेल्या २-३ दिवसात काही मस्त कोट्स वाचायला मिळाले. त्यात सर्वात आवडलेला म्हणजे हा.

"Sachin Tendulkar - Reducing the number of atheists since 1989"

आणि हा अजून एक.. हा मीच टाकलेला.. :)

Breaking News : Raju Parulekar and Sanjay Manjarekar attempted suicide..... The 50th Time !!

अब तक पच्चास !!

Wednesday, December 22, 2010

इम्म च्ची

हे काये?
क्का?
सांताक्लॉSSSज
आंताक्काSSS

आणि हे?
ए?
स्नोमॅSSSन
ओमाSSS

आणि हे काय?
एका?
डिअSSSर
दिआंSS

आणि हे?
ए?
पेंग्विन
एंन्नी

आSSSणि हेSSS ????
इम्म च्ची SSSSSSSS
बरोब्बर.. ख्रिसमस ट्री

-१० मधले आंताक्का, ओमा आणि दिआं 
-१० च्या (इथे आडवी रेघ सहज गंमत म्हणून मारली नसून ते 'वजा/उणे/मायनस/निगेटिव्ह दहा' असे वाचावे.) कुडकुडत्या थंडीत घराखाली उभं राहून लेकाला कडेवर घेऊन नाताळातल्या अशा वेगवेगळया प्राण्यापक्षांच्या तास-दीड तास मुलाखती घेऊन झाल्यावर मी माझा हात शोधायला लागलो. खरं तर 'माझे' हात शोधायला लागलो. दोन्ही मिळेनात. गजनीच्या तोंडाला फेस येईल एवढ्या जोराने आठवून (हो असं हळू/जोरात वगैरे आठवता येतं. बिलीव्ह मी.) तास दीडतासापूर्वी कुठे बरं ठेवले होते हात असं स्वतःलाच विचारत अंदाजानेच हात शोधले. त्यानंतर एकशे-एकोणसत्तराव्यांदा त्या पाचजणांची हजेरी घेऊन झाल्यावर मी लेकासमोर पांढरं निशाण फडकावलं आणि त्याला म्हटलं "आता बास. आता घरी जायचं. तू वरून खिडकीतून बघ आता". या वाक्यातल्या एकूण तीन 'आतां' पैकी पहिल्या 'आता'लाच त्याने निरुपा रॉयच्या "नSSSSही"ला घरी बसवेल एवढ्या जोरात "भ्याSSSS(ही)" करून आजूबाजूच्या चारदोन मानांना वळवून त्याच्याकडे अतीव करुणेने आणि माझ्याकडे तेवढ्याच तुच्छतेने पहाण्यास भाग पाडलं. 
 -१० मधले आंताक्का, ओमा आणि दिआं :२   

त्या चारी मानांच्या वर वसणार्‍या चेहर्‍यांच्या साधारण मध्यभागी अर्थात नाकावर काल्पनिक ठोसे मारून "एवढा छळ चाललाय असं वगैरे वाटत असेल ना तर सांभाळा याला दीड तास आणि दाखवत रहा ते प्राणी पक्षी" असं त्यांना म्हणावं असं फार वाटत होतं पण दरम्यान "भ्याSSSS(ही)" सातव्या आसमानात चढायला लागल्याने त्या मानांकडे दुर्लक्ष करून मी लगबगीने घरात परतलो. घरात आल्यावरही रडगाणं कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. एक चॉकलेट, एक गाडी यांच्या मदतीने आणि पुन्हा एकदा अर्धा तास खिडकीत उभं राहून त्या "आंताक्का, ओमा, दिआं आणि इम्म च्ची" चा टॉप व्ह्यू घेऊन झाल्यावर मगच माझी सुटका झाली. एकुणात हे असंच चालू राहिलं तर त्याची ए फॉर आप्प, बी फॉर बें वाली बाराखडी आमच्यासाठी बदलून आय फॉर आयोडेक्स, सी फॉर क्रोसिन करावी लागेल आणि त्याला -१० [आमचे येथे एकदाच अर्थ सांगितले जातात :(आमच्याच) हुकुमावरून] च्या थंडीत स्नोमन दाखवता दाखवता जागच्या जागी गोठून लवकरच आमचाच स्नोमन होईल याबाबत माझ्यात आणि बाल-सांताच्या मातोश्रींत (कधी नव्हे ते) एकमत झालं आणि त्यामुळेच "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" च्या थाटात "स्वहस्तपाद-रक्षणाय आणि (इम्मच्ची)खूळ-निग्रहणाय" आम्ही काही पावलं तातडीने उचलण्याचा निर्णय घेतला.

हेच ते आम्हाला गोठवणारं इम्म च्ची
पाहिलं पाऊल : त्याला खाली नेऊन इम्म च्ची दाखवणं बंद करणे.
दुसरं पाऊल : वरून खिडकीतूनही 'एका वेळी फक्त १० मिनिटंच' असं दिवसातून दोनदाच दाखवणे.

परंतु बाल-सांता कुठल्याही पावलाला दाद देत नसून पाहिलं पाऊल आणि दुसरं पाऊल म्हणजे प्रत्यक्षात आमचा पहिला फाऊल आणि दुसरा फाऊल असून आमच्यातला करार हा एखाद्या एकतर्फी प्रेमापेक्षाही एकतर्फी असल्याचं दुसर्‍या दिवशी दिवसभर वाजलेल्या इम्मच्ची-गानामुळे आणि त्यामुळे भंडावून गेलेल्या डोस्क्यामुळे आमच्या लक्षात आलं. थोडक्यात सप्तपदीतली पहिली दोन्ही पावलं चुकीची पडली होती (वरच्या हो. उग्गाच कैच्याकै).. लहानात लहान फावलालाही बाल-सांता चांगली कडडक शिक्षा देतो या नियमाच्या तात्पुरत्या झालेल्या विस्मरणाची फळं भोगून झाल्यावर आम्ही पुढचं पाऊल कुठलाही फाऊल न करता अगदी योजनापूर्वक उचलण्याचं ठरवलं.

तिसरं पाऊल : इम्म च्ची घरी आणणे.

काही काही गोष्टी, घटना, प्रस्ताव, विधानं ही जोवर आपण त्यामागची पार्श्वभूमी, कार्यकारणभाव वगैरे वगैरे समजावून घेत नाही तोवर वाचायला/ऐकायला फार सोपी वाटतात. थांबा.. सोप्पं करून सांगतो.

१. ज्यांचे आजोबा/पणजोबा महामहोपाध्याय वगैरे वगैरे होते,

२. ज्या घरात गेली कित्येक वर्षं दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा न चुकता केली जात असे,

३. ज्या घरात नॉनवेज, अंड वगैरे तर सोडाच पण ब्रेड, पाव, पिझ्झा, मॅगी, बिस्किटं वगैरेही अजूनही खाल्ली जात नाहीत,

४. ज्या घरात अजूनही कट्टर चातुर्मास पाळला जातो.. म्हणजे कांदालसूण विरहित वगैरे वगैरे,

५. ज्या घरात आत्तापर्यंत कधीही वाढदिवस केक वगैरे कापून साजरे झालेले नाहीत,

त्या घरातल्या लेकाने/सुनेने आणि नातवाने संगनमताने च्यामारिकेतल्या घरात का होईना ख्रिसमसट्री उर्फ इम्म च्ची आणणे.

हां.. आता बोला.. आता कसं वाटतंय वाचायला? थोडक्यात घरात ख्रिसमसट्री आणणे म्हणजे छ्या छ्या छ्या !! अब्रह्मण्यम !! धर्मभ्रष्ट !! अर्थात अतिशयोक्ती राहुदेत पण अगदी एवढी तीव्र मतं नसली तरी आपल्या लेकाने आपल्या नातवाच्या हट्टासाठी स्वतःच्या घरात ख्रिसमस ट्री आणणे ही कल्पना पचवणं त्यांच्यासाठी जरा जडच होतं. पण -१० वाली थंडी, हात शोधणे, स्नोमन होणे वगैरे वगैरे रोजच्यारोज घडणार्‍या घटनांच्या अपरिहार्य तीव्रतेमुळे अखेरीस या फावलाचं एका यशस्वी पावलात रुपांतर झालं. अशा रीतीने 'स्वदेसा'तून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर आम्ही लगेच इम्मच्चीच्या तयारीला लागलो.

ज्या घरातला कुठलाही मेंबर आर्टिस्ट नसतो त्या घरातले लोक फार्फार सुखी असतील असं मला आपलं एक उगाच वाटतं नेहमी.. म्हणजे त्यांना येताजाता "आम्ही कलाकार लोक .." टाईपची वाक्य ऐकायला लागत नाहीत म्हणून नाही (म्हणजे.. म्हणूनही) तर त्या घरातल्या लोकांना गणपतीचं मखर, दिवाळीतला आकाशकंदील वगैरे प्रकार उगाच रात्र रात्र जागत, स्वतःच कायकाय खुडबुड वगैरे करत घरी बनवावे लागत नाहीत तर ते त्यांना कुठलाही कमीपणा न बाळगता, ताठ मानेने बाजारातून विकत घेण्याची चैन करता येते !! गणपतीत ही चैन  माझ्या नशिबी नव्हती, दिवाळीतल्या कांदिलाच्या वेळीही अस्पष्ट का होईना पण निषेध नोंदवून मी आमच्या घरातल्या आर्टिस्टला आकाशकंदील एकटीने करायला सोडून देऊन ती चैन साधली होती.

पण यावेळी मात्र मी स्पष्टपणे निषेध नोंदवून ख्रिसमस ट्री घरी वगैरे न करता कंपल्सरी बाहेरून विकत आणायचा असा वटहुकूम काढला. पण दीड-दोन फुटी उंचीच्या, रंगीबेरंगी चमचमत्या कागदाच्या खोट्या ख्रिसमस ट्रीच्या आयफेल टॉवर/अल बुर्ज/ट्विन टॉवर्स वगैरे वगैरेंच्या उंच्यांनाही लाजवेल इतक्या उंचावर पोचलेल्या किंमती बघून तो वटहुकूम नसून वाट-हुकूम असल्याचं लवकरच माझ्या लक्षात आलं.

एवढाल्ले पैसे (वाचा डॉलर्स) देऊन लोकं खरंच दर वर्षी ख्रिसमस ट्री घेतात? बापरे !! पण आता (तिसरं) पाऊल मागे घेणं शक्यच नसल्याने आम्ही एक त्यातल्या त्यात स्वस्त पण टिकाऊ , कमी उंचीचं पण देखणं, खोटं पण चमचमतं थोडक्यात आखूडशिंगी बहुदुधी असं एक 'मध्यमवर्गीय' ख्रिसमस ट्री विकत घेतलं. मला टिकाऊ, देखणं, चमचमतं वगैरे वगैरे वाटत असलेलं ते ट्री बाल-सांताच्या मातोश्रींच्या दृष्टीने फारच साधंसुधं, नीरस, टिपिकल इत्यादी ठरल्याने त्यांनी ते थोडं (!) सजवण्यासाठी त्याच्याभोवती गुंडाळायला दोन-चार चमचमत्या चंदेरी माळा, दोन-तीन छोट्या बेल, काही रंगीत चेंडू असे सगळे '... पेक्षा मोती जड' आयटम्स घेतले. तो सारा लवाजमा घेऊन आम्ही घरी परतल्या परतल्या सांता आणि मातोश्री यांनी मिळून शॉपिंग बॅग्स रिकाम्या केल्या. मी शांतपणे लॅपटॉपमध्ये डोकं घातलं.

२-४ मेल्स, ५-६ ब्लॉग्ज, ३-४ पेपर्स वाचून होतात ना होतात तोवर "कसं दिसतंय रे? बघ ना !" चा चित्कार माझ्या कानी पडला. फार काहीतरी महत्वाचं वाचतोय असा आभास निर्माण करून किंचित त्रासिक चेहरा करून लॅपटॉपमधून डोकं बाहेर काढलं. "एवढं महाग ख्रिसमस ट्री एवढ्यात सजवून झालं सुद्धा??" असा विचार माझ्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता (असावा) परंतु माझ्या निव्वळ मुद्राभिनयातून तो विचार समोरच्या कलाकारांपर्यंत पोचेल एवढी माझ्या अभिनयाबद्दलची शाश्वत्ती माझी मलाच नसल्याने प्ले-सेफ म्हणून मी तो मुद्राभिनय प्रत्यक्ष संवादाचा आधार घेत पुन्हा एकदा साभिनय सादर करून दाखवला. त्यावर "त्याचा काय संबंध?" या समोरून आलेल्या बाणेदार उत्तराने मी डगमगून जात पुन्हा एकदा मूकपटाची 'कोशिश' केली.
"महाग ट्री असलं तर सजवायला जास्त वेळ लागतो असा काही नियम आहे की काय? आणि तसाच नियम लावायचा म्हटला तर उलट आपलं हे ट्री साधारण दीडेक मिनिटात सजवून व्हायला पाहिजे.. नाही का?"

मी पुन्हा एकदा मुद्राभिनयाचीच कास धरली परंतु यावेळचा अभिनय शरद कपूर/चंद्रचूड सिंग/इम्रान हाश्मी वगैरे वगैरे बोकडांच्या प्रेरणेने पक्षि तोंडावरचं झुरळही (नेहमी नेहमी काय माशी??) न हलवता केला त्यामुळे मला नक्की काय म्हणायचं आहे ते समोरच्या दीड तिकिटाला कळलंही नाही.

घरातलं इम्म च्ची
लपवलेलं निरांजन'


अर्थात जे काय असेल ते असो पण ती रंगीबेरंगी सजावट, डिझाईन वगैरे वगैरेमुळे ते ख्रिसमस ट्री दिसत मात्र जाम सही होतं. आता या वाक्यातलं 'होतं' चं टायमिंग एवढं जबरी असेल असं मलाही वाटलं नव्हतं कारण मी हा ट्रीच्या देखणेपणाचा वगैरे विचार करतोय ना करतोय तोच रारा सांतासाहेब यांनी त्याला अचानक धक्का देऊन, खाली पाडून त्याला 'होत्याचं नव्हतं' करून टाकायचं ठरवल्याचं दिसत होतं. त्या एकंदर सजावटीच्या चिंतेने बायको आणि उंच किंमतीच्या भीतीने मी असे दोघेही एकदम ट्रीच्या दिशेने धावलो आणि ते उचलून टेबलवर ठेवलं. थोडक्यात हा दीड-दोन फुटी ख्रिसमस ट्री समुद्रसपाटीपासून किमान चार-पाच फुट उंचावर तरी ठेवायला लागणार होता कारण केट विन्स्लेटला लाजेपोटी टायटॅनिकच्या डेकवरून उडी मारायला भाग पाडेल अशा शिताफीने पायांच्या अंगठ्यांवर उभं राहून हात वर करून चार पाच फुटाचं अंतर कापणं हा सांतोजीच्या डाव्या हाताचा मळ होता. आता त्याचा हात पोचू नये म्हणून गुढी किंवा आकाशकंदिलाप्रमाणे ख्रिसमस ट्री टांगून तर ठेवता येणार नव्हता आणि त्याच्या हातच्या मळाच्या कक्षेत येणार नाही असं कुठलंही टेबल घरात शिल्लक राहिलं नव्हतं.

परिस्थितीच्या अशा विचित्र कात्रीत सापडलो, क्षितिजापर्यंत लांब (आणि उंच) नजर टाकूनही जेव्हा कुठलाच मार्ग दिसत नाही अशा वेळी परमेश्वर हमखास मदतीला येतो या (मला तेव्हा नुकत्याच सुचलेल्या) उक्तीप्रमाणे परमेश्वर थेट नाही पण इनडायरेक्टली आमच्या मदतीला आला. आम्हाला अगदी आकाशकंदील टांगून ठेवल्यागतही नाही की अगदीच बाल-सांताचा थेट हात लागेल इतक्याही खाली नाही अशी परफेक्ट उंचीची एक वस्तू हाती लागली. बाप्पा पुन्हा एकदा पावला होता. गणपतीत केलेली मेहनत गणपती गेले तरीही वाया गेली नव्हती.

निरांजनाचा उपयोग देवासमोर दिवा लावणे, गणपतीचं आसन  म्हणून वापरणे याबरोबरच नासधूस होऊ नये इतपत उंचीवर ख्रिसमस ट्री ठेवण्यासाठीही यशस्वीपणे केला जाऊ शकतो याचा आम्हाला नवीन साक्षात्कार झाला. अर्थात गणपतीच्याच निरांजनावर थेट ख्रिसमस ट्री ठेवायला जरा विचित्र वाटत असल्याने ते पाप आपलं सॉरी निरांजन झाकायला आम्ही गणपतीच्या सजावटीत (न) वापरलेलं पांढरं सॅटीनचं कापड वापरलं. त्यामुळे स्नोचा इफेक्टही आला आणि पाप/निरांजनही लपलं ;)

पुढच्या वर्षीचं गणपतीचं मखर हे त्याचा दिवाळीतला आकाशकंदील आणि पुढच्या वर्षीचं इम्मच्ची ठेवायला कसा उपयोग करता येईल या सगळ्याचा विचार करूनच बनवायचं हे तर आता नक्की ठरलं.  ;)

***

परवा बाल-सांता इम्मच्ची समोर पाठमोरा उभा असलेला दिसला. हा एवढा शांत उभा राहून काय एवढं बघतोय हे न कळल्याने दोन मिनिटं वाट बघून हळूच त्याच्या मागे जाऊन उभा राहिलो आणि त्याला विचारलं "काय करतोयस रे बेटा?" अचानक माझं लक्ष त्याच्या जोडलेल्या हातांकडे गेलं आणि तेव्हाच तोही माझ्याकडे बघून खिदळत खिदळत समोरच्या झाडाकडे बघून हात जोडत 'बाप्पॅ, बाप्पॅ' ओरडायला लागला. मी निरांजनासकट इम्मच्चीही हादरेल एवढ्या जोराने डोक्यावर हात मारून घेतला !! ;)

Thursday, December 16, 2010

'मॅजिक'चं 'दगडावर'चं गारुड !!

"लेडीज अँड जंटलमन, प्लीज वेलकम.. मेरा दोस्त, मेरा भाई, जोसेफ मॅस्कार्हेनSSSस"

बास रे बास. हे वाक्य ऐकलं आणि मी जोरजोरात टाळ्या वाजवल्या नाहीत किंवा "यस्स यस्स" करत मुठ हवेत उडवली नाही किंवा आनंदातिशयाने उठून उभा राहिलो नाही असं कधीच झालं नाही. पहिल्यांदा 'रॉक ऑन' बघताना तर या जोसेफ मॅस्कार्हेनसच्या शेवटच्या प्रसंगातल्या स्टेजवरच्या आगमनानंतर आणि आदि श्रॉफने खणखणीत आवाजात केलेल्या त्याच्या स्वागतानंतर मी अक्षरशः नाचलो होतो.

त्यानंतर गंभीर चेहर्‍याचा, लांबलचक केस मोकळे सोडलेला, खांद्याला गिटार अडकवलेला जोसेफ स्टेजवर प्रवेश करतो आणि पुढची पाच-सात मिनिटं 'सिंदबाद द सेलर' सादर करत नाचत, गात, ओरडत, उड्या मारत, थिरकत हे दोघे सभोवतालचं वातावरण अक्षरशः भारून टाकतात. त्यानंतर अचानक जोसेफच्या पत्नी आणि मुलाला स्टेजच्या एका कोपर्‍यातून प्रवेशताना बघून आदि हळूच जोसेफच्या कानात पुटपुटतो आणि माईक जोसेफच्या हातात देतो. जोसेफ त्या दोघांकडे बघतो आणि किंचित स्मित करत शांत, संयत 'तुम हो तो' चं रॉक व्हर्जन गायला लागतो. आवाज, संगीत चढत जात जात 'तुम हो तो' कधी 'सिंदबाद द सेलर' शी एकरूप होतं हे कळतही नाही.


एवढा दिमाखदार, उत्साही, सकारात्मक शेवट असलेल्या 'रॉक ऑन' मधे संपूर्ण चित्रपटभरच या उस्फुर्ततेचे, उत्साहाने सळसळणार्‍या, रसरसणार्‍या तरूणाईचे अनेक छोटे छोटे प्रसंग विखुरलेले आढळतात. हा चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या न बघण्याचा कपाळकरंटेपणा मी केला होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे एकूण जाहिराती, ट्रेलर्स, त्या चौघांचे गेटप, गाणी वगैरे बघून मला हा चित्रपट म्हणजे बॉलिवूडी रॉकच्या नावाखाली चाललेला काहीतरी विचित्र प्रकार असेल असं उगाचंच वाटलं होतं. त्यामुळे अंमळ उशिरानेच म्हणजे रिलीज झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनी हा चित्रपट बघायचा योग आला किंबहुना माझ्या एका मित्राला तो काही करून बघायचा असल्याने त्याच्याबरोबर अपघातानेच बघितला गेला. आणि बघितल्यावर लक्षात आलं की कसल्या अफलातून अनुभवला आपण मुकणार होतो.

नावात रॉक असलं तरीही रूढार्थाने फक्त रॉकला वाहिलेला हा चित्रपट नाही. सॉरी.. हे वाक्य सिनेमाच्या प्रिव्ह्यूमधे लिहितात तसं झालंय. म्हणजे येत्या शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि एखाद्या समीक्षकाने चित्रपटाचा प्रि-रिलीज शो बघून आपल्या ब्लॉगवर लिहावं तसं. खरं तर चित्रपट रिलीज झाल्यानंतर २-३ वर्षांनी त्यावर काही लिहिताना ही अशा प्रकारची वाक्यं लिहिली नाहीत तरी चालतं. कारण रॉक ऑन सारखा चित्रपट आवडला नाही (यावर मतभेद होऊ शकतात, म्हणून सेफ गेम म्हणून)/ पाहिला नाही असा माणूस विरळाच.. पण तरीही मुद्दा तसाच महत्वाचा असल्याने प्रि-रिलीज टाईप वाक्य तसंच लिहिलं. तर रॉक संगीत या पैलूएवढेच अन्य दोन ठळक महत्वाचे पैलू या चित्रपटात आहेत. एक म्हणजे चित्रपट पाहताना आपल्याला नोस्टॅल्जिक व्हायला भाग पाडणारी मित्रामित्रांमधली हलकीफुलकी पण लाईव्हली दृश्यं आणि दुसरं म्हणजे चित्रपटाच्या टॅगलाईनमधे थेट दिला जाणारा आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा 'लिव्ह युअर ड्रीम' हा ठळक मेसेज. चित्रपटांमधल्या संदेशांनी जग बदलत नसतं असं कोणीही कितीही म्हणालं आणि क्षणभर का होईना त्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं तरीही मला अजूनही संदेश देणारे चित्रपटच आवडतात. म्हणजे देशप्रेम, भ्रष्टाचारमुक्ती असे मोठमोठे संदेशच असावेत असं काही नाही किंबहुना अनेकदा हे असले संदेश बटबटीत आणि उथळपणे दाखवले गेल्याने त्यातली परिणामकारकता कमी होऊन उलट ते हास्यास्पदच वाटायला लागतात. याउलट अनेकदा हे 'लिव्ह युअर ड्रीम' सारखे साधे, सरळ संदेश पोकळ देशप्रेमाच्या 'एन्नाराय' गप्पा ठोकणार्‍या संदेशांपेक्षा अधिक जवळचे वाटतात.

भन्नाट शब्द आणि रँडम सीन्सची भलतीच देखणी सरमिसळ केलेलं उल्हसित टायटल सॉंग.. एकत्र जमलेला, मजामस्ती करणारा मित्रमैत्रिणींचा ग्रुप, गाणी, गिटार, मस्करी, बाईकवरच्या शर्यती, समोरच्या जलाशयात धावत जाऊन मारलेल्या उड्या या सगळ्यासगळ्यांत एक जिवंतपणा आहे. ओरिजिनॅलिटी आहे. टायटल सॉंग, त्यातलं एकूण एक दृश्य आपल्याला भूतकाळात घेऊन जातं. प्रत्येक प्रसंग कुठूनही कसाही आपल्याच कॉलेजजीवनातल्या कुठल्यातरी प्रसंगाशी नकळत आणि तितकाच सहज जोडला जातो, जोडता येतो. प्रत्येक फ्रेम एकतरी जुना प्रसंग जिवंत करते. प्रत्येक गाणं एकातरी लाडक्या मित्राची/मैत्रिणीची आठवण करून देतेच देते.

रॉक ऑन बघून झाल्या झाल्या मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना मेल करून या चित्रपटाबद्दल कळवलं होतं.

"Aatta ch just "Rock On" baghitala.. I dont know whether u guys have watched it or not.. but i loved it and regretted why i didnt watch it earlier.. it is an awesome movie.. felt very nostalgic.. mala tumachi jaam aathavan yayala lagali.. the days, evenings, nights, midnights (and rare mornings) together.. the time we spent together, the fun, masti and all.. u shud watch it.."

आणि एका मैत्रिणीचं लगेच उत्तर आलं.

"ya,when i saw it, i also felt the sameway.... that night only i told x "mi ice-cream gatarat fekale to kissa" & he also shared some of the funny kissa's from his frnd circle.

yesterday only x ,Myself & y we met & spoke abt those "best days of our life" & also discussed abt so many people & now wht they do & all... we too missed u a lot!!"

याहून काही लिहीत नाही..

असो... गंमत म्हणजे या चित्रपटात सगळे साईडहिरो आहेत. रूढार्थाने हिरो कोणीच नाही. श्रेयनामावली दाखवताना सगळी नावं एकत्र दाखवता येत नसल्याने ती पुढे मागे दाखवली गेली इतकंच. आपल्या हातात गिटार आहे म्हणून ते विचित्र अंगविक्षेप करूनच वाजवलं पाहिजे या दशकानुदशकांच्या कल्पनेला मुठमाती देणारा वास्तव (हिरो नव्हे तर) साईडहिरो यात आहे. शांतपणे, चेहर्‍यावर मंद स्मित असणारी व्यक्तीही गिटारिस्ट असू शकते किंबहुना गिटारिस्ट हा हिरो नसून साईडहिरो असू शकतो (आणि त्याला खरोखरीचं सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक मिळू शकतं) आणि गिटार हे पोरी पटवण्यासाठी न वापरता छंद, आवड, करियर म्हणूनही वाजवता येतं असे (बॉलीवूडच्या) प्रस्थापित नियमांना छेद देणारे अनेक प्रकार यात आहेत. तसंच पार्श्वगायनासाठी भारदस्त किंवा हाय पीचचा आवाज असणारे गायक अत्यावश्यक आहेत याही लोकप्रिय समजाला किंचित किनरा पण प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला आवाज वापरून जबरदस्त छेद देण्याचं कामही या चित्रपटाने केलंय. थोडक्यात नियमाला अपवाद असणारे असे अनेक प्रकार प्रचंड ताकदीने आणि कल्पकतेने वापरून त्यांना रूढ नियमांचा दर्जा मिळू शकेल इतकी सुंदर कलाकृती निर्माण करण्यात दिग्दर्शक कमालीचा यशस्वी ठरला आहे.


वर सांगितलेला नोस्टॅल्जियावाला भाग संपेसंपेपर्यंत दुसरा तेवढाच इंटरेस्टिंग आणि महत्वाचा प्रकार सुरु होतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं नाव 'लिव्ह युअर ड्रीम'.. छोट्या कारणावरून मतभेद होऊन, गैरसमज होऊन, संगीतापासून, ग्रुपपासून, आपल्या 'मॅजिक'बँड पासून, आपल्या स्वप्नापासून, एकमेकांपासून दुरावलेले आणि आपापल्या उद्योगात रमलेले (निदान रमल्याची बतावणी करणारे) पण आतल्या आत कुढणारे चार मित्र हातातली सगळी काम, सगळे उद्योगधंदे, सगळे गैरसमज आणि अशाच छोट्या-मोठ्या अडचणी दूर सारून सळसळत्या तारुण्यात पाहिलेलं स्वप्न पुन्हा एकदा पेलायला तयार होतात ही कल्पना ऐकायला साधी वाटली तरी दिग्दर्शकाने ती ज्या काही ओघवत्या शैलीत मांडली आहे तिला तोडच नाही. चित्रपटाच्या मध्यापर्यंत विनाकारण आपापले इगोज जपत राहणारे हे चौघे कालांतराने एक होतात आणि आपल्या जुन्या स्वप्नाच्या शोधात, ते सत्यात उतरवण्याचा ठाम निश्चय करून, अनेक अडचणींना तोंड देत देत, प्रसंगी जीवघेण्या रोगाची पर्वा न करता आपलं उद्दिष्ट कसं गाठतात याचा प्रवास म्हणजे चित्रपटाचा उत्तरार्ध. पण दोन्हीही तेवढेच सशक्त आणि दर्जेदार. कित्येकदा, वेगळं होण्यापूर्वीचा तरुण मित्रांचा, धम्माल मजेचा नोस्टॅल्जिक भाग खमंग जमलाय की अचानक गृहस्थाश्रमातून बाहेर पडून आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रचंड धडपड करणार्‍या, निरनिराळ्या अडचणींना तोंड देत देत शेवटी आपलं ध्येय गाठणार्‍या मध्यमवयीन काका लोकांचा उत्तरार्ध जास्त चमचमीत झालाय अशा कोड्यात आपण पडतो.

पण आपल्यापैकी प्रत्येकानेच अगदी तीच नाही पण बरीचशी तसीच मजा, गप्पाटप्पा, जागरणं, गाणी, पिकनिक्स, ट्रेक्स आपापल्या ग्रुप बरोबर केली असल्याने पूर्वार्ध तर आवडतोच पण खूपच प्रॉमिसिंग, पॉझिटिव्ह, आशादायी असल्याने उत्तरार्धही तेवढाच आवडतो. पण मला उत्तरार्ध आवडण्याचं अजून एक कारण आहे. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर चित्रपटातच्या उत्तरार्धात घडतं तसं आपल्याही आयुष्यात घडावं, लहानपणी, तरुणपणी किंवा अगदी काही वर्षांपूर्वी बघितलेली आपलीही काही छोटी स्वप्नं पुरी व्हावीत अशी सुप्त इच्छा असतेच परंतु ती स्वप्नं पूर्ण होणार नाहीत याची जवळपास खात्रीही असल्याने प्रत्यक्षात नाही तर निदान पडद्यावर तरी ती पूर्ण झालेली बघताना मला प्रचंड आनंद होतो !! मला वाटतं 'रॉक ऑन' एवढा भिडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेच आहे. 'लिव्ह युअर ड्रीम' चा स्वैर अनुवाद करायचा झाल्यास मी तरी 'कुठलंही स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी झटा.... अक्षरशः कुठल्याही वयात !!' असा करीन.

रॉकऑन प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी त्यावर लिहिण्याचं कारण म्हणजे ....... म्म्म्म कारण काही नाही. परवा पुन्हा एकदा रॉक ऑन बघितला. गेल्यावेळेस पेक्षा अजून आवडला. लिहावसं वाटलं. हेच कारण.. आंबरसाच्या वाटीत पाची बोटं बुडवून ती चाटून खाताना मिळणाऱ्या सुखाचं काय कारण? सचिनचं शतक झाल्यावर आनंदाने उर भरून येतो याचं काय कारण? काहीकाही आनंदांची कारणं शोधायची नसतात. फक्त मनावर होणारं त्यांचं गारुड अनुभवायचं असतं !! बस्स... !!

* हे गारुड यापूर्वी जालरंग प्रकाशनाच्या दीपज्योती इ-दीपावली अंकात  करून झालेलं आहे.

Monday, December 13, 2010

वेळ .... वेल !!

परवा 'खेले हम जी जान से' बघण्याचा योग आला. नाही. खरं म्हटलं तर अगदी मुद्दाम ठरवून बघितला. इथल्या एका लोकल वाहिनीवर दर रविवारी सकाळी साधारण तासभर चालणार्‍या बॉलीवुडबद्दलच्या कार्यक्रमात बघितलेले प्रोमोज, युट्यूब आणि पेपरातलं परीक्षण वाचून वेगळा (आणि जिव्हाळ्याचा) विषय वाटल्याने बघायचं नक्की केलं. जवळपास वर्षभरानंतर बघितलेला हिंदी चित्रपट. गेल्यावर्षी 'थ्री इडियट्स' बघितला होता आणि त्यानंतर थेट हा 'खेले हम ..'... अर्थात मध्ये (चुकून, दुर्दैवाने वगैरे वगैरे) 'माय(ला) नेम इज खान' बघितला (बघावा लागला) होता. पण तो बघितला आहे असं लोकलज्जेस्तव मी कधीच कबुल करत नाही. त्यामुळे ऑफिशियली, ऑन पेपर 'थ्री इडियट्स' नंतर वर्षभराने बघितलेला चित्रपट म्हणजे 'खेले हम..'.. जाउदे.. सिरीयस लिहिताना उगाच आचरटपणा नको. 'खेले हम.. ' बद्दल सांगायचं तर चित्रपटाचा उद्देश, कथा, पात्रनिवड वगैरे चांगले आहेत. परंतु संकलन, संवाद अशा अनेक महत्वाच्या बाबतीत तो बराच डावा वाटतो. पण अशा काही उणीवा असल्या तरीही चटटोग्राम सारख्या छोट्याशा गावातली स्वातंत्र्यलढ्याची एक प्रचंड मोठी आणि तितकीच दुर्लक्षित (माहित नसल्याने) कहाणी आजच्या पिढीपर्यंत पोचवण्याची निर्मात्यांची धडपड, उत्साह आणि उद्देश निव्वळ वाखाणण्याजोगा !! असो.. (पुन्हा एकदा) चित्रपटाचं परीक्षण, समीक्षण वगैरे वगैरे लिहिण्याचा अजिबात काही विचार नाही. पण अशा प्रकारचे चित्रपट बघताना आणि बघून झाल्यावर किंवा अशा प्रकारची पुस्तकं वाचताना जो एक विचार नेहमी मनात येऊन जातो तोच आज पुन्हा आला. हाच विचार 'भगतसिंग' बघतानाही आला होता आणि 'रंग दे बसंती' बघतानाही.. 'लगान' बघतानाही असंच वाटलं होतं,'मंगल पांडे' बघतानाही .. 'वीर सावरकर'च्या वेळीही असंच वाटलं होतं आणि 'बोस.. द फरगॉटन हिरो' च्या वेळीही अगदी अगदी असंच... अगदी असंच काहीसं डोक्यात येऊन गेलेलं ते श्रीमान योगी, राजा शिवछत्रपती, स्वामी, छावा, संभाजी, महानायक वगैरे वगैरे वाचतानाही..

हे सगळं वाचत, बघत असताना सतत दिसतो तो त्या त्या काळातला अन्याय, त्या त्या महापुरुषांनी त्या त्या काळात दिलेले लढे, केलेलं शत्रूचं निर्दालन, स्वातंत्र्यासाठी दिलेलं जीवाचं बलिदान, केलेले महान त्याग.. संसार, जातीपाती, उच्चनीचता, नोकरी, पगार, पैसा, वडिलोपार्जित जमीनी, बादशाही जहागिर्‍या, वतनं, इमले, माड्या, मानसन्मान या सगळ्या जोखडांना बेधडकपणे धुडकावून कणभरही विचलित न होता आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने केलेली अथक वाटचाल आणि त्यासाठी वेळोवेळी लावलेली जीवाची बाजी. हे सगळं सगळं दिसतं आणि एकच विचार मनात येतो... "च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!"

खरंच.. असंच वाटतं नेहमी.. !! निदान मला तरी वाटतं. किमान शंभर-दीडशे वर्षं आधी जन्माला यायला हवं होतं. इतक्या आधी की साधारण १८५७ च्या आद्य स्वातंत्र्य लढ्यात निदान एक बाल क्रांतिकारक म्हणून भाग घेता आला असता.. बाबू गेनू, शिरीष कुमार यांच्यासारखं कोवळ्या वयात देशासाठी जीव सत्कारणी लागला असता.. भगतसिंगांच्या 'नौजवान भारत सभा' मध्ये दाखल होता आलं असतं.. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना जवळून बघता आलं असतं.. बहिर्‍या इंग्रजांना ऐकू जाईल असा आवाज केलेल्या असेंब्लीतल्या बॉम्बस्फोटाच्या योजनेत सहभागी होता आलं असतं.. त्या क्रांतीसुर्यांबरोबर 'इन्कलाब जिंदाबाद'चे नारे बेंबीच्या देठापासून देता आले असते, लोकमान्य टिळकांचे अग्रलेख वाचून 'शरीरातला अणुरेणु पेटून उठणे' म्हणजे काय याचा अनुभव घेता आला असता.. चापेकर बंधू, मदनलाल धिंग्रा इत्यादींप्रमाणे आपल्यालाही निदान एका तरी इंग्रज अधिकार्‍याला गोळी घालायला मिळाली असती किंवा त्यांच्या गाडीवर बॉम्ब फेकता आला असता.. "कदम कदम बढाए जा खुशी के गीत गाए जा" म्हणत सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत सामील होता आलं असतं.. त्यानिमित्ताने त्यांच्यासारख्या हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला जवळून बघता आलं असतं.. जीव गेला तरी बेहत्तर पण तिरंगा जमिनीला न टेकू देण्याच्या प्रयत्नात लांबून आलेल्या एखाद्या गोळीची शिकार होताना कृतकृत्य होऊन त्या तिरंग्याकडे अखेरची नजर टाकताना डोळ्यात भरून वाहणारं समाधान अनुभवता आलं असतं आणि शेवटचा 'वंदे मातरम्' चा जयघोष करता आला असता...

किंवा मग.... किंवा मग थेट सतराव्या शतकात जन्माला यायला हवं होतं. शिवकालात.. महाराष्ट्राच्या सुवर्णयुगात !! १६३० ते १६८० च्या मध्ये कधीही !! शक्यतो १६३० च्या जवळपास.. म्हणजे मग बाल शिवाजीबरोबर त्यांच्या सेनेत सामील होता आलं असतं.. रोहिडेश्वराच्या पिंडीच्या साक्षीने स्वराज्याची रक्तशपथ घेता आली असती.. पन्हाळगड ते विशाळगडाच्या जीवघेण्या पाठलागात छत्रपतींच्या पालखीला निदान खांदा देता आला असता.. तोफांचे तीन आवाज ऐकेपर्यंत बाजीप्रभूंबरोबर पावनखिंड लढवत ठेवता आली असती आणि शिवरायांचे प्राण वाचवण्याचं एक विलक्षण समाधान आणि शेकडो जन्मांचं पुण्य गाठीशी लावता आलं असतं.. प्रतापगडावर, जावळीच्या खोर्‍यात अफ्झुल्ल्याच्या सैन्याला कापता आलं असतं. लाल महालाला विळखा देऊन बसलेल्या शास्ताखानाला ठेचायला जाताना निदान एका तरी खरंच निदान एका तरी मुघल सरदाराला अल्लाला प्यारा करता आलं असतं.. शिवराज्याभिषेकाच्या वेळी "गोब्राह्मणप्रतिपालक राजाधिराज सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज की SSSSSSSS" ला घसा फुटेल एवढ्या मोठ्ठ्या आवाजात बेंबीच्या देठापासून 'ज SSSS य' असं पुकारून लवून मुजरा करता आला असता.. किंवा.. किंवा... किंवा अगदी असंच काही नाही पण कुठल्या एखाद्या दूरच्या किल्ल्यावर किंवा छोट्याशा खेड्यात का होईना पण राजांचा सेवक म्हणून अभिमानाने आणि समाधानाने राहता आलं असतं..

हे सगळं सगळं थ्रील, तो अनुभव, ते समाधान, ती हुरहूर, ती काळजी, स्वराज्य/स्वातंत्र्यप्राप्ती साठी झालेली युद्धं, लढाया, चकमकी, हल्ले, ते आनंदाचे क्षण, देशासाठी, समाजासाठी जीवाचं बलिदान करण्यातलं समाधान या सगळ्या सगळ्याला मुकलो.. खरंच खरंच खरंच मुकलो!! पण.. पण मग अशा वेळी मला पुनर्जन्मावर विश्वास ठेवावासा वाटतो. तसा माझा पूर्वजन्म, पुनर्जन्म, पिंड, कावळा, पितर, श्राद्ध, पक्ष वगैरे गोष्टींवर विशेष विश्वास नाही. अर्थात विश्वास नाही म्हणजे काही मी लगेच अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्याच्या थाटात लगेच जे विश्वास ठेवतात त्यांच्या अकलेची मोजमापं काढत नाही किंवा त्यांना दूषणंही देत नाही. आपापली श्रद्धा म्हणून त्या मतांचा मला आदरच आहे.. पण हे असे चित्रपट बघितल्यावर किंवा अशी पुस्तकं वाचल्यावर मात्र मला खरंच पूर्वजन्मावर विश्वास ठेवावासा वाटतो. भलेही जन्माला येण्याचा काळ आपण चुकलो असू पण मागच्या जन्मी कदाचित खरंच आपल्याला लोकमान्य टिळकांचं निदान भाषण का होईना ऐकायची संधी मिळाली असेल, सुभाषचंद्र बोसांचं कदाचित पुसटसं का होईना दर्शन आपल्याला झालं असेल, भगतसिंगांना ओझरतं का होईना पण पाहिलं असेल... किंवा त्याच्याही मागच्या जन्मात कदाचित खरंच राजांच्या पालखीला खांदा दिला असेल किंवा खरंच दरबारात यःकश्चित चाकर म्हणून का होईना पण राजांच्या पावलांची धूळ मस्तकी लावण्याचं अहोभाग्य आपल्याला मिळालं असेल किंवा कोणी सांगावं पण आग्र्याहून सुटताना कदाचित आपणच त्यांच्या निवडक सैन्यातले एक असू !!

चित्रपट संपल्यानंतर हे जे विचार सुरु होतात ते थेट दुसर्‍या दिवशी सकाळी उठेपर्यंत.. हो हो अगदी झोपेतही हेच असतं डोक्यात !! सकाळी उठल्यावर मी लोकसत्ता/मटाची वेबसाईट उघडतो आणि दिसतात घोटाळेच घोटाळे.. गडबड घोटाळे.. २-जी स्पेक्ट्रम घोटाळा, कर्ज घोटाळा, 'आदर्श' घोटाळा (बाकी घोटाळा कसा करावा आणि तो कसा पचवावा या बाबतीत 'आदर्श' घोटाळा हा इतर 'घोटाळे'करांनी खरंच अगदी आदर्श घेण्यासारखा आहे. मुमं सोडून कोणाच्याही अंगाला साधं खरचटलंही नाहीये !! आहे की नाही एकदम आदर्श !!).. किंवा मग दिसतं ते गुरुसाहेबांच्या रूपातलं सरकारी पातळीवरचं लांगुलचालन किंवा कसाबराजांच्या रुपाने वसत असलेली एकदम ऑफिशियल अशी सर्वांगीण निष्क्रियता................................ यस्स.. खट्याक !! आणि मग माझ्या लक्षात येतं जन्माला येण्याची वेळबीळ काही चुकलेली नाही. किंबहुना योग्य काळात जन्माला येणं असं वगैरे काही नसतंच.. त्या त्या काळातली लोकं त्या त्या काळाला आपल्या महान कार्याने, आपल्या असीम त्यागाने एवढं महान करून ठेवतात की पुढच्या कित्येक पिढ्यांच्या मनावर त्यांच्या व्यक्तीमत्वांच्या पाउलखुणा ठसठशीतपणे उमटल्या जातात... इतक्या की मग पुढच्या पिढीत जन्माला आलेल्या, चांगल्या कोडकौतुकात लाडाकोडात वाढलेल्या, सगळे हट्ट वेळच्यावेळी पुरवल्या गेलेल्या लोकांना वाटायला लागतं की "अरे, आपण का नाही जन्मलो त्या सुवर्णकाळात... आपण खरंच चुकीच्या काळात जन्मलो".. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आपण ज्या काळाला सुवर्णकाळ संबोधतोय त्या काळातही गुलामगिरी, भ्रष्टाचार, वैचारिक पारतंत्र्य, नीतीमूल्यांची पडझड हे सारं सारं तेवढ्याच भीषण पातळीवर पोचलेलं होतं जेवढं आत्ताच्या काळात आहे. परंतु त्या लोकोत्तर पुरुषांनी त्यांच्या मनगटाच्या, इच्छाशक्तीच्या, अपार निश्चयाच्या जोरावर त्या काळाला सुवर्णकाळात रुपांतरीत केलं.........  आणि आपण मात्र म्हणत राहतो "च्यायला, चुकीच्या वेळी जन्माला आलो यार.. !!!"

Thursday, December 9, 2010

कलर'फूल'

बरं मला एक सांगा. तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का? खरं तर 'बरं' या शब्दाने पोस्टच्या पहिल्या वाक्याची सुरुवात करत नाहीत पण थेट "तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का?" असला काहीतरी प्रश्न विचारून कशी सुरुवात करणार?? म्हणून मग जरा आधाराला, टेकायला म्हणून 'बरं' वापरला..... बरं का !! ;)

रंगीला
रंगीत
रंगारी
रंगीबेरंगी
रंगकर्मी

तर सांगा बघू या शब्दांचे अर्थ माहित आहेत का? म्हणजे प्रत्यक्ष अर्थ नका सांगू फक्त अर्थ माहित आहेत की नाही तेवढंच सांगा. होय की नाही. ते पत्त्यांच्या जादूत जादूगार समोरच्याला नाही का म्हणत की "हे पान बघा आणि लक्षात ठेवा. मला नका सांगू" .. अगदी तसंच..

------

या जगात प्राथमिक रंग किंवा प्रायमरी कलर तीनच. पिवळा, निळा आणि लाल. या रंगांपासून इतर सगळे रंग बनतात, तयार करता येतात. हे तीन रंग म्हणजे मूळ रंग आणि उरलेले सगळे ते सगळे मिश्र रंग. त्यामुळेच मला या तीन प्राथमिक रंगांबद्दल जेवढं प्रेम (वाचा ज्ञान) आहे तेवढंच इतर रंगांबद्दल अजिबात नाही. अर्थातच हे तीन रंग कळले की झालं आणि इतर रंगांवाचून आपलं काही अडत नाही असं माझं ठाम मत (वाचा अज्ञान) काही वर्षांपूर्वीपर्यंत होतं. तर हे प्राथमिक रंग लक्षात ठेवून बाकीचे उरलेले रंग म्हणजे त्याच रंगांना डार्क किंवा फिकट/फेंट चे प्रिफिक्स लावून मी ओळखायचो. थोडक्यात सुर्यफुल म्हणजे डार्क पिवळा आणि लिंबू म्हणजे फेंट किंवा फिक्कट पिवळा. झालं संपलं. उगाच त्या लेमन यलो, क्रोम यलोच, यलो ऑकरच्या (या 'यलो ऑकर'ला  कोणी कोणी 'हगरा' रंगही म्हणायचे. आम्ही म्हणायचो नाही हे सांगण्यासाठीच मुद्दाम 'कोणी कोणी' या शब्दाची योजना केली आहे हे चाणाक्ष वाचकांनी .... ) भानगडी नाहीत. कालांतराने फेंट किंवा फिक्कट हेही फार 'व्हर्नाक्युलर' वाटायला लागलं. त्याच्याऐवजी फेड म्हणजे जरा भारीतलं (म्हणजे अर्थ फिकटच हो. शब्द भारीतला म्हणतोय मी) वाटायला लागलं. तर असं फिक्कट-फेंट-फेड करत करत का होईना पण आमचं प्राथमिक रंगांशी असलेलं नातं कायमच तसंच टिकून राहिलं....... थेट लग्न होईपर्यंत !! पण त्यानंतर ...

प्रसंग १ : 

मागे एकदा दिवाळीत आईसाठी एक साडी घेतली होती. त्या साडीचा रंग, डिझाईन, पोत (कन्फेशन : हा पूर्णतः ऐकीव शब्द आहे. आम्हास 'पोतं' माहित आहे किंवा 'पोट'. परंतु हे/हा/ही पोत हे आम्हास पूर्णतः अझेप्य आहे. तेव्हा भावनाओंको समझो) वगैरे आईला आणि तिच्या मैत्रिणींनाही इतकं आवडलं होतं की मी साडी घेण्याच्या बाबतीत फार ग्रेट आहे असा माझा (वाचा माझ्या घरच्यांचा) उगाचच्या उगाचच समज झाला होता. तो उगाचच्या उगाच झालेला समज उर्फ गैरसमज तसाच वाढत वाढत जात कालांतराने इतका दृढ झाला की कसं कुणास ठाऊक पण लग्नानंतर माझ्या बायकोलाही ते खरंच आहे असं वाटायला लागलं. आमचा लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांतला उत्साह आणि तिचा माझ्या साड्यांच्या रंगसंगतीबद्दलचा दृढ विश्वास हे दोन्ही ऐन ऐन ऐन भरात असताना एक दिवस तिच्या साडी खरेदीसाठी आम्ही दुकानात प्रवेश करते झालो. आता पुलंच्या 'असा मी असामी' मधल्या डब्बल घोडा, चिकन, मांजरपाट, बोकड, दंडिया सारखी मौज आमच्या (वाचा बायकोच्या) साडीखरेदीत आली नाही पण उलट ती मौज परवडली असली एक जोरदार फजिती या 'चारुदत्ताच्या' नशिबी आली. आम्ही दुकानात शिरताच शहाडे किंवा आठवले किंवा 'आणि मंडळी' या पैकी कोणीच नसणार्‍या एका सदगृहस्थांनी आमचं स्वागत केलं. नमस्कार-चमत्कार, काय दाखवू?, बजेट वगैरे प्रश्नोत्तरांचा तास पार पडल्यावर त्यांनी आम्हाला काहीही बोलायची संधी न देता वेगवेगळया रंगांच्या, निरनिराळ्या प्रकारांच्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या साड्या आमच्यासमोर आणून ओतल्या. एकेक साडी निरखून बघत असताना बायकोने मधेच मला विचारलं "कुठली आवडली?". हा प्रश्न साडीच्या संदर्भातला आहे याचं भान ठेवून चटकन भानावर येत मी समोर (न)असलेल्या एका साडीकडे बोट दाखवून "ही फिक्कट लाल बरी वाटत्ये." असं म्हणून कोथळ्याऐवजी बोटांवर सुटका करून घेतली.

"अरे ही गुलाबी आहे."
"हो हो. मला गुलाबीच म्हणायचं होतं. फिक्कट गुलाबी बरी आहे त्यातल्या त्यात"
"मग लाल काय म्हणालास?" तिने (फिदीफिदी) हसत पृच्छा केली. 
"अग फिक्कट लाल म्हणजेच गुलाबी. आणि फिक्कट गुलाबी म्हणजे...." काही सुचेना तेव्हा मी क्षणभर गप्प बसलो आणि तेवढ्यात त्या सदगृहस्थांनी दावा साधला
"दुधगुलाबी"
"काय?" मी खेकसलो.
"दु ध गु ला बी..... फिक्कट फिक्कट फिक्कट गुलाबी म्हणजे दुधगुलाबी. म्हणजेच या साडीचा रंग" 'नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या प्रायव्हेट संवादात (साडी विषयी असला तरीही) तोंड खुपसू नये' या सर्वमान्य, जगन्मान्य नियमाला पायदळी तुडवत त्याने मी दाखवत नसलेल्या (मला दिसतही नसलेल्या) एका फिक्कट लाल किंवा त्याच्या भाषेत फिक्कट फिक्कट फिक्कट लाल उर्फ गुलाबी उर्फ दुधगुलाबी साडीकडे बोट दाखवलं.

"काय गुलाबी?"
"दुध.. दुध.."
"उग्गाच कैच्याकै"
"अहो हा रंग दुधगुलाबीच आहे. म्हणजे एकदम हलका हलका गुलाबी"
"मग मी तेच म्हणालो ना !! फिक्कट गुलाबी.... फिक्कट गुलाबी, दुध गुलाबी. काय फरक आहे. पटॅटो.. पोटॅटो.. दोन्ही एकच" माझ्या त्या पोटॅटोवाल्या हल्ल्याने टो सॉरी तो क्षणभर गांगरला असं मला वाटलं पण माझ्या त्या जोकचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही किंबहुना त्याला तो कळलाही नाही हे पाहून वैतागून मी (माझ्याच) कपाळावर हात मारून घेणार एवढ्यात तो पुन्हा म्हणाला.

"साहेब, दुध वेगळं बटाटा वेगळा. मी इथे गुलाबी रंगाविषयी बोलतोय. दुधगुलाबी.. दुधगुलाबी.. रंग रंग.. ही साडी दुधगुलाबी रंगाची आहे." भाजीबाजार, दुधमार्केट ते साड्यांचं दुकान असा बहिर्गोलाकार फेरफटका (आपला लॉंगकट हो) मारत मारत मी पुन्हा साड्यांच्या दुकानात शिरेपर्यंत माझा आणि त्या हिरोचा संवाद ऐकून यथेच्छ हसून झाल्यावर बायको एकदम त्याला म्हणाली. 

"जाऊ दे हो. माझा नवरा असाच 'रंगीला' आहे जरा".. एकदम गुदगुल्या झाल्यासारख्या वाटल्या आतमध्ये. साड्या, दुकान, गुलाबी, फिक्कट लाल, दुधगुलाबी, पोटॅटो सगळं सगळं विसरून गेलो क्षणभर.. एकदम हलकं हलकं वाटत होतं.


प्रसंग २ : 

एकदा बायकोला हपिसातल्या एकाचा बिनडोक किस्सा ऐकवत होतो. हपिसातला बिनडोकपणाचा किस्सा म्हणजे अर्थातच बॉसचा असणार हे ज्याप्रमाणे आत्ता समस्त वाचकांनी ओळखलं त्याप्रमाणेच माझ्या चतुर चाणाक्ष बायकोनेही ते तेव्हा ओळखलं. त्या दिवशी आमच्या डॅमेजरला काहीतरी कारणासाठी बाहेर जायचं होतं आणि स्वतःचं पेट्रोल हजार रुपये लिटर आणि लोकांचं (वाचा टीममध्ये काम करणार्‍या साध्याभोळ्या गरीब बापड्या जनतेचं) पेट्रोल दहा रुपये लिटर असा स्वतःचा जाणूनबुजून गैरसमज करून घेऊन तोच कुरवाळत बसत त्याने बाहेर जाण्यासाठी माझी बाईक मागितली. कारण काय तर माझी बाईक पार्किंग लॉटच्या एन्ट्रन्सला लावलेली होती. मला कोणालाही गाडी द्यायला फार जीवावर यायचं (येतं आणि येत राहील). पण निव्वळ बॉसने मागितली या महत्वाच्या कारणामुळे आणि अप्रायजल जवळ आलेलं होतं या त्याहीपेक्षा महत्वाच्या कारणामुळे नाईलाजास्तव, जड अंतःकरणाने, जीवाची काहिली तगमग जे काय म्हणतात ते होत असूनही त्याला चावी दिली. पठ्ठ्या दात विचकत हसला. हसताना त्याचे सुळे माझ्या बाईकचं पेट्रोल पिणार्‍या आणि बाईकचे लचके तोडणार्‍या बाईक-ड्रॅक्युला सारखे भासले. अर्थात बिचारा नुसताच प्रेमाने (पक्षि दात न विचकताही) हसला असेल आणि ड्रॅक्युला बिक्युलासारखा वाटलाही नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तरी इतकंच म्हणेन की तुम्ही माझा (एवढा चांगला, छान, मस्त) लेख वाचताय ना? मग बाजू कोणाची घेणार तुम्ही? तुम्हीच ठरवा.. मला नका सांगू.. हां अगदी ते मगाससारखंच किंवा त्या जादुगारासारखंच. असो. तर दात विचकून/न विचकता [इथे काय वाचायचं ते मी तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडतो ;)] तो ड्रॅक्युला बाहेर जाण्यासाठी पुढे सरकणार एवढ्यात मी त्याला म्हणालो. "(अरे ए गधड्या,) गाडीचा नंबर माहित्ये का? XXX-yyyy.. ती निळ्या......."

"हो माहित्ये माहित्ये.. ती बर्गंडी रंगाची आहे तीच"
"काय? बर्गंडी???" आता तो चावी नक्की कुठल्या बाईकमध्ये घालतो (आणि माझ्या चावीची विल्हेवाट लावतो) या विचाराने (आणि त्या भयंकर उच्चाराच्या विचित्र रंगाच्या कल्पनेने) माझ्या बरगडीतून एक मोठ्ठी कळ आली. पण ती कळ ओसरेपर्यंत तो (वायुवेगाने दौडत दौडत वगैरे) दिसेनासाही झाला. तरीही अगदी राहवेना म्हणून जरा वेळाने मी पार्किंग लॉटमध्ये एक फेरी मारून आलो. आणि त्यावेळी मला तीन साक्षात्कार झाले

१. बॉसची बाईक माझ्या बाईकच्या शेजारीच होती
२. बॉसने रंग बरोब्बर ओळखून माझीच बाईक नेली होती आणि
.
.
.
.
.
.
.
३. माझ्या डार्क निळ्या रंगाच्या बाईकला बर्गंडी रंगाची बाईक असंही म्हणतात.

एवढं सांगून मी बायकोला विचारलं "अग कुठला हा बरगडी रंग? आपली बाईक डार्क निळी आहे की बरगडी? बरगडी म्हणजे नेमका कुठला रंग?"
ती बाकी काही न बोलता हसत हसत फक्त एवढंच म्हणाली "जाऊदे रे.. तू असाच रंगारी आहेस."

आता 'रंगारी' हा शब्द 'रंगीला' एवढ्या गुदगुल्या वगैरे करणारा काही नाही हे स्वतः 'पेंटरबुवा' पण मान्य करतील पण तरीही 'रंगीला' शब्दाचाच रोमँटीक चुलत मित्र वगैरे याअर्थी मला 'रंगारी' शब्दही जवळपास तेवढ्याच गुदगुल्या करून गेला. 

असो. तर त्यानंतर असेच वेगवेगळे, साधे, छोटे किस्से होत राहिले. सगळे सांगून उगाच पकवत नाही तुम्हाला. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर तो किरमिजी* शर्ट घेताना मला मिळालेली 'रंगीत' ही पदवी किंवा तिचा फिक्कट केशरी उर्फ अबोली* ड्रेस घेताना मिळालेली 'रंगकर्मी' ही पदवी, किंवा मग तिचं मरून रंगाचं नेलपॉलिश घेताना लाभलेली 'रंगीबेरंगी' ही पदवी असे अनेक अनेक किस्से घडले, घडत राहिले आणि मला अशी लाडाची नवीननवीन छोटीमोठी नावं बहाल करत राहिले.

*किरमिजी म्हणजे कुठला रंग हे तर मला अजूनही माहित नाहीये. फक्त बायको म्हणते म्हणून मी त्या शर्टाला किरमिजी शर्ट म्हणतो. थोडक्यात "आमच्या कपाटात किरमिजी शर्ट दाखवा आणि हजार रुपये मिळवा"
(वरच्या वाक्यात किरमिजीच्या ऐवजी अबोली किंवा मरून वाचून ते वाक्य तसंच्या तसं पुढे वाचलंत तरी काही फरक पडत नाही. मतितार्थ, भावार्थ, शब्दार्थ, रूढार्थ वगैरे सगळे 'र्थ' तेच)

पण असं होता होता एक दिवस एक विलक्षण प्रकार घडला.. म्हणजे म्हटलं तर साधासुधाच पण म्हटलं तर फार भयानक. काय म्हणायचं, कुठली बाजू घ्यायची हे तुम्ही ठरवा.. आठवा सद्सद्विवेकबुद्धी वगैरे वगैरे..

त्या दिवशी जेवायला बसलो होतो. माझ्या आवडीची चांगली बटाट्याची भाजी होती. (नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणारी कुठलीही ट्रेन थांबवून आतल्या लोकांच्या बॅगा उघडून त्यातले डबे उघडून बघितले तर शंभरपैकी नव्व्याण्णव लोकांच्या डब्यात बटाट्याची भाजी किंवा कांदा-बटाट्याची भाजी किंवा कांद्यात बटाटा घालून केलेली भाजी किंवा बटाट्यात कांदा घालून केलेली भाजी यापैकी एक आढळते असे मत नोंदविण्यात आलेले आहे. असो..). एवढी आवडती भाजी असूनही मी नीट जेवत नाहीये हे चाणाक्ष, हुशार, चतुर वगैरे वगैरे बायकोने लगेच ओळखलं.

"का रे जेवत का नाहीयेस? आवडली नाही का भाजी? तुझी आवडती तर आहे."
"अग आवडली ग... पण"
"पण?"
"नाही तसं नाही.. पण भाजीचा रंग जरा नीट नाही आलाय"
"नीट म्हणजे?"
"म्हणजे आपला तो छान खमंग पिवळा असा ग."
"अरे हा पिवळाच आहे"
"हो पण नेहमीसारखा छान खरपूस पिवळा रंग नाही आलाय."
"अरे त्यात काय. मिरच्यांचा, हळदीचा रंग वगैरे थोडाफार वेगळा असतो कधीकधी. त्यामुळे वेगळा रंग वाटत असेल. पण त्याने चवीला काय फरक पडतोय. आणि तुझा तो आवडता खमंग, खरपूस का कुठला तो पिवळा रंग नाही म्हणून तू जेवणार नाही की काय?"
"अग तसं नाही ग. पण तो तसा नेहमीचा छान पिवळा रंग असल्याशिवाय चवच येत नाही. मजाच येत नाही खायला"
"रंगाचा आणि चवीचा काय संबंध?"
"अरे वा. असं कसं. संबंध नाही कसा?"
"बरं असेल संबंध... पण तुझा आणि रंगाचा काय संबंध?"
"काय?????? काय म्हणालीस???? म्हणजे???" एकता, करण, शाहरुख/सलमान यांच्या सिरीयलींतल्या/चित्रपटातल्या 'हिरविनी' जशा धक्क्याने (म्हणजे धक्का बसून.. धक्का लागून नव्हे) कपबशा फोडतात किंवा कपूर, जोहर, खान यांच्या सिरीयलींतले/चित्रपटातले 'हिरवे' जसे रागाने टीव्ही, कॉफीटेबल वगैरे फोडतात तसं या धक्क्याने (धक्का बसून नाही तर निदान धक्का लागून तरी) निदान एखादा कप तरी फोडावा असा विचार माझ्या मनात येऊन गेला.

"म्हणजे काय? तेच.. तुझा आणि रंगाचा किंवा तुझा आणि एकूणच रंगांचा काय संबंध?"
"अग तूच तर मला 'रंगीला', 'रंगारी', 'रंगीबेरंगी', 'रंगकर्मी', 'रंगीत' आणि असंच अजून काय काय म्हणायचीस ना? त्याचं काय झालं मग आता?
"त्याचं काय झालं? त्याचं काय होणारे?"
"म्हणजे?"
"म्हणजे हेच की तुला जसे रंग अजिबात ओळखता येत नाहीत तसेच या शब्दांचेही अर्थ अजिबात कळलेले नाहीत"

------

बरं मला एक सांगा. तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का? (लेखाच्या शेवटच्या वाक्याची सुरुवात 'बरं' ने होऊ शकते याची कृ नों घ्या) 

रंगीला
रंगारी
रंगीत
रंगीबेरंगी
रंगकर्मी

तर सांगा बघू या शब्दांचे अर्थ माहित आहेत का? पण यावेळी नुसतं 'हो' किंवा 'नाही' असं उत्तर नाही चालणार. तर या शब्दांचे अर्थही सांगा. किंवा मग मीच सांगतो. तुम्ही फक्त टॅली करून बघा.

रंगीला : रंग + इल्ला = ज्याचा रंगांशी काहीही संबंध नाही असा तो
रंगारी : रंग + अरि = रंगांचा अरि उर्फ शत्रू आहे असा तो
रंगीत : रंग + इत (इति) = ज्याच्यापाशी रंगांची इति होते असा तो
रंगीबेरंगी : रंगांना 'बेरंग' करून ठेवणारा असा तो
रंगकर्मी : ज्याला पाहिल्यावर रंग 'कर्म माझं' असं म्हणतात असा तो

तळटीप १ : सदरहू रंगरंगोटी यापूर्वी 'मोगरा फुलला दिवाळी अंकात' ही करण्यात आलेली आहे. परंतु जे वाचक ती तिथे न वाचल्याने स्वतःला उगाचंच सुदैवी समजत होते त्यांच्यासाठी खास !!
तळटीप २ : रंगीबेरंगी (चांगल्या अर्थाने) चित्राबद्दल मोफु क्रिएटीव्ह टीमचे विशेष आभार. खरं तर या आभाराची काही गरज नव्हतीच कारण ज्या माणसाला बर्गंडी रंग ओळखता येत नाही त्याला बर्गंडी चित्र काय (कप्पाळ) काढता येणार ही साधी गोष्ट कळण्यासाठी आभारांच्या उल्लेखाची गरज नाहीच. पण काये की आपण कोणाचा वाटा मारत नाय.. काय?? ;)
तळटीप ३ :  या दोन्ही तळटीपा (आणि ही तिसरीही) ताज्या आहेत. अर्थात आधीच्या लेखात नाहीत. :P

Wednesday, December 8, 2010

काही बोलायाचे आहे...

सकाळचे ७:००

तो : झाली तयारी?
ती : म्हणजे काय? बघितलंस का वाजले किती ते?
तो : हॅ हॅ हॅ
ती : म्हणजे तू तयार नाहीयेस... नाहीयेस?
तो : आहे ग.. नेहमीची गाडी...
ती : नेहमीची जागा.. बाय.
तो : बाय

सकाळचे ७:१५

ती : नशीबच पोचलास. मला वाटलं की गेली आज पण गाडी.
तो : ए.. आज पण काय? आज म्हण. फक्त आज. आणि तीही गेलेली नाहीये.
ती : बरं बरं.. आली गाडी.. जा आता पटकन..
तो : ओके. दुपारी फोन करतो.
ती : दुपारी नाही. आज मंगळवार. एक्स्ट्रॉ लेक्चर असणार आज. संध्याकाळी कर.
तो : अरे हो.. विसरलोच. तुला जमलं तर तू कर दुपारी.
ती : यस. ट्राय करते नक्की.

सकाळचे ९:१५

तो : हॅलो. कोण?
ती : मी
तो : आयला. तू? आत्ता? कुठून बोलते आहेस?
ती : हो. रे इथे आल्या आल्या कळलं पाहिलं लेक्चर फ्री. मग काय बाहेर पडलो आम्ही भटकायला. पीसीओ दिसला. म्हणून म्हटलं पटकन तुला फोन करुया.
तो : मजाए. तुम्ही भटकताय. आणि आम्ही इथे कामं करतोय.
ती : ही ही.. तुम्हीही भटका मग.
तो : आहा.. म्हणे भटका.
ती : ए चल मी ठेवते. बिप बिप वाजायला लागलंय.
तो : आयला मग कॉइन टाक की. वाजायला लागलं की लगेच ठेवायचं असतं की काय?
ती : अरे कॉइन पण नाहीये माझ्याकडे.
तो : शी.. त्यात काय.. त्या रीमाकडून घे ना.
ती : नको. मी जाते. त्या ऑलरेडी हसतायत. चिडवतायत मला.
तो : ई हसायला काय झालं त्यात. काहीही.
ती : बरं असुदे काहीही. ठेवते मी.
तो : ए थांब थांब.. आता कधी? संध्याकाळी?
ती : अर्थात.
तो : ओके.
ती : गेले रे. बाय..

संध्याकाळचे ५:३०

तो : अरे. तू आलीस पण घरी? मी असाच करून बघितला. उगाच सहज. माझ्या डोक्यात पण नाही की कोणी फोन उचलेल.
ती : अरे. एक क्षण झाला घरात पाउल टाकून. अजून सँडल्सही काढले नाहीयेत. दार उघडते तोवर फोन वाजायला लागला. अरे आजचं एक्स्ट्रॉ लेक्चर कॅन्सल झालं. त्यामुळे मस्त लवकर आले घरी.
तो : सहीये बाबा. पाहिलं लेक्चर फ्री आणि शेवटचं कॅन्सल. जाता कशाला तुम्ही लोक कॉलेजला?
ती : ए.. शेवटचं एक्स्ट्रॉचंच होतं. त्यामुळे ते कॅन्सल झालं तर त्यात काय एवढं बिघडलं?
तो : काही नाही बिघडलं. बरं. संध्याकाळी नेहमीच्या जागी?
ती : नेहमीच्या वेळी.
तो : ओके.. बाय.
ती : बाय.

रात्रीचे ८:००

ती : आई ग्ग. कसली सही तिखट पाणीपुरी बनवलेली भय्याने.. मस्त चव आली तोंडाला.
तो : मला वाटतं आईस्क्रीमने अजून चांगली चव येईल ना??
ती : हेहे.. आय सोSS थॉट इट. खात्री होती मला :)
तो : अग आईस्क्रीम शिवाय पाणीपुरीला मजा येत नाही.
ती : हे उगाचंच. काहीही अगदी.
तो : बरं आईस्क्रीमच्या आधी पाणीपुरी खाल्ली की आईस्क्रीम चांगलं लागतं ना... ओक्के? झालं? जिंकली पाणीपुरी?
ती : हे पण खरं तर काहीही आहे. पण ठीक्के. पाणीपुरी जिंकली ना बास. आता माझी आईस्क्रीमला ना नाही.
तो : अति होतंय..
ती : होऊ दे.
तो : हॅ हॅ हॅ
ती : चल रे. नऊ वाजत आलेत.
तो : मग?
ती : मग काय? घरी जायचंय आपल्याला........ आपापल्या.
तो : मग?
ती : चूप रे. पकवू नको उगाच..
तो : हेहे
ती : रात्री कर कॉल
तो : यस मॅडम. रात्री बोलू.
ती : बाय
तो : बाय

रात्रीचे ९:३०

ती : तुलाच करत होते फोन. जस्ट जेवण झालं.
तो : आता नको करूस. एंगेज लागेल.
ती : कित्ती फालतू !
तो : किती?
ती : शी.. गप् रे.. तुझं झालं जेवण??
तो : नाही ताट हातात घेऊनच बोलतोय.
ती : काय????? अरे ओरडेल ना आई.
तो : हा हा हा हा हा हा हा हा..
ती : शी.. काहीही. मला खरंच वाटलं एकदम. जाम पकाऊ आहेस.
तो : मग का बोलते आहेस माझ्याशी? अजून पकायला?
ती : नाही. तुला सुधारीन म्हणते.
तो : बा SSS र्र

******

ती : ए झाली का तयारी? कितीला निघताय?
तो : मी नाही येणारे. मला जमत नाहीये.
ती : शी.. प्रचंड फालतू होता हा. आणि अंगठी कोणाला घालू ती? हॉल पण बुक झालाय हां आता. येऊन पटकन जा हवं तर.
तो : हा हा हा हा हा
ती : हे हे हे हे हे
तो : बरं बाई. तू इतकी मागे लागली आहेसच तर येतो आता.
ती : शी...... बाई काय?
तो : जीवनातलं एक शाश्वत सत्य सांगतो. प्रत्येक मुलगी ही शुगरबॉक्सनंतर बाई आणि लग्नानंतर काकू होते. लक्षात ठेव !!
ती : डोंबलाचं शाश्वत सत्य. यात शाश्वतही काही नाही आणि सत्यही.
तो : कळेल कळेल.
ती : काही नकोय कळायला. ते जाऊ दे. आम्ही निघतोय अर्ध्या तासात. वेळ मिळाला तर ये अंगठी घालून घ्यायला.
तो : स्वयंवर आहे का?
ती : ते लग्नात असतं. आज फक्त पुडा आहे.
तो : हाहाहा
ती : टाटा..
तो : बाय. प्लान चेंज. येतोय मी.
तो : ओव.. सो काईंड ऑफ यु !!

******

तो : झोपली होतीस का ग?
ती : उहू. जस्ट उठले.. तू कुठे आहेस?
तो : निघेन जरा वेळाने
ती : अजून ऑफिसमध्येच आहेस?
तो : हो ग. आता पहिल्याच दिवशी कसं लवकर निघणार?
ती : लवकर नको निघुस. अरे पण वेळेवर तरी? साडे नऊ होऊन गेले असतील ना?
तो : हो होतायत.
ती : तुझ्या क्लायंटला सांग अमेरिकन असलात तर तुमच्या घरी. मी काही लेट बिट बसणार नाही.
तो : सांगतो हं काकू. नक्की सांगतो.
ती : काकू?????? याआक्क्क्क..
तो : शाश्वत सत्य !!
ती : बरं बरं.. जेवायचं काय करणार आहात आज? रुमीज बरे आहेत का?
तो : बघू. घरीच करू काहीतरी. रुमीज मस्त आहेत. विकएंडला इथे आल्याने चांगल्या ओळखी झाल्या. त्यामुळे इथला पहिला दिवस आहे असं वाटतही नाहीये.
ती : वा ते बरं आहे एक. संपवा तीन महिने पटपट एकदाचे.
तो : मी हातातल्या घड्याळाचे काटे फिरवतोय भराभर. लगेच संपतील तीन महिने.
ती : अमेरिकेत जाऊनही तू तसलेच पकाऊ जोक्स मारतोस हे पाहून मला फार भरून आलंय.
तो : झाकण लाव. सांडेल.
ती : शीई. सकाळी सकाळी अजून किती फालतू पीजे ऐकायचे रे !! त्यापेक्षा लवकर परत ये. तुझ्या शेजारी बसूनच ऐकेन.
तो : नको. मग मला सुचणार नाहीत.
ती : मग काय पीजे सुचावेत म्हणून तिथेच राहणार आहात का आपण?
तो : हो.
ती : ग्रेट. ये परत.. बघते तुला..
तो : हा हा हा. चल मी जातो आता. सकाळी फोन करेन.. म्हणजे माझ्या सकाळी. तुझी सकाळ तर संपेलच आता.
ती : बास रे !! टाटा. नक्की कर फोन


*****

अग तुला सांगितलं का मी?

ब्या ब्या ब्या ब्या ब्या ब्या आआआआंआंआं

अग तो राजन आहे ना... अरे काय झालं?

आआआंआआंआआं एबीशीबी

ओके ओके ए बी सी.. अग राजनचं मेल आलं SSSSSSSSSSS य.. अरे चावतोयस काय तू??????

मन्या, चावतात असं बाबाला?? ओह. काय म्हणाला? कसा आहे? आणि मेधा?

अग तो म्हणत होता..

प्या प्या प्या .. में में में में एम्म आई-बाब्बा... भ्या भ्या भ्या..

अरे सोन्या ओरडतो का आहेस उगाच? तू सायकल चालवतोस? कधी आलंय मेल?

चाक्क्ल चाक्कल चाक्कल..

अग दोन-तीन दिवस.... चाक्कल चाक्कल चाक्कल चाक्कल..... बाSSSSSS ब्याब्याब्या ..... 

अरे ही काय इथेच आहे ना सायकल.. बस ना. मी मागून ढकलतो...

आबाजीगाबाजी गब.. ब्य्य्या ब्या...

अग हा पुन्हा काहीतरी त्या आबाजीच्या भाषेत बोलायला लागला बघ..

आबाजीगाबाजी गब.. आबाजीगाबाजी आबाजीगाबाजी आबाजीगाबाजी

म्हणजे काय????

ह्या ह्या ह्या ह्या ... बाब्या.. पांई पांई पांई

आता मधेच पाणी हवंय बघ याला.. थांब हां देतो तुला पाणी.. तू मेधाला फोन केलेलास का?

हो ट्राय केलेला गेल्या आठवड्यात. पण लागला नाही. अरे ए SSSS किती पाणी सांडवलं आहेस? काय हे?? सगळे कपडे खराब झालेत. सर्दी होईल न पुन्हा. काय हे राजा?

अग राजन तेच म्हणत होता. ब्या भ्या.. बाब्बाईईई बाब्बाईईई... झ्या झ्या.. दादी.. दादी..

हो.. झाड आहे ना. ख्रिसमस ट्री म्हणतात त्याला.. आणि तो डॉगी आहे.. बरोबर.. तुझ्याकडे पण आहे न डॉगी टीव्हीत दाखवतात तसा... कुठेय रे? काय म्हणत होता रे राजन?

दादी.. दादी.. दादी.. दादी.. दादी.. दादी..

हो हो हो.. आण ना तो तुझ्या खेळण्यांच्या बास्केटमधून.. जा आण.. राजन म्हणत होता....

दादी.. दादी.. दादी.. दादी.. दादी.. दादी..

बरं चल आपण आणूया डॉगी.. थांब एक मिनिट..

बाब्या. ध्या. ध्या.. आबाजी गाबाजी गबगब... एबीशीबी एबीशीबी एबीशीबी...

हे बघ आता.. आता याला एबीसी लावून हवंय. काय रे मन्या??? दोन मिनिटं खेळ की त्या डॉगीशी. मी बोलतोय ना आईशी..

एबीशीबी एबीशीबी एबीशीबी... एबीशीबी... एबीशीबी...

बरं साहेब.. लावतो आधी एबीसी. अग लॅपटॉप कुठे ठेवलायस?

एबीशीबी... एबीशीबी...

अरे आतमध्ये आहे.. बेडरूममध्ये... आई एबीशीबी.. पांई..

मिळाला का रे? आता अजिबात पाणी बिणी काही मिळणार नाही.. बघ बाबा लॅपटॉप लावतोय. तू एबीसी बघत बस..

चाक्कल.. चाक्कल.. चाक्कल.. चाक्कल.. चाक्कल.. चाक्कल..

आता सायकल कशाला ? एबीसी कोणी लावायला सांगितलं होतं?

जा मन्या.. लावलं बघ एबीसी... राजनकडे न्यूज.... एबीशीबी... एबीशीबी... एबीशीबी...

क्काय ???

क्का.. क्का ... क्का.. 

हो?????? वॉव... तू काय क्काय करतोयस? कॉपी कॅट.. :)

अग याने बघ लॅपटॉपच बंद केला.. एबीशीबी... एबीशीबी...

कोणी बंद केला लॅपटॉप? आता काही नाही एबीसी वगैरे. गाणी पण नाहीत.

गांई गांई गांई.... गांई.... भ्यां भ्यां भ्यां...


******

तो : झोपला एकदाचा.
ती : हो ना. किती मस्ती !!
तो : मी म्हणत होतो की..
ती : अरे हो ना.. ते राजनचं राहिलंच.
तो : की... ZZZZzzzzzzzz
ती : काय? zzzzZZZZZZZZZZZZZZ

Monday, November 29, 2010

हृतिक आणि कोल्हा

रोशनांचा हृतिक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं?

१. 'धूम-२' मधला देखणा, रांगडा चोर आर्यन किंवा

२. 'जोधा अकबर' मधला भारदस्त, राजबिंडा अकबर किंवा

३. 'कोई मिल गया' मधला साधाभोळा रोहित किंवा

४. अगदी क्रिश, काईट्स, के३जी वाला हृतिक

अशी कितीही आणि कुठलीही कॅरेक्टर्स आठवत राहिली तरी हृतिक म्हटलं की त्या आठवण्याचा यादीत 'कहो ना प्यार है' मध्ये जबरा डान्स करून सगळ्यांच्या मनावर गारुड करणारा रोहितच सगळ्यात वर असतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. परंतु या गारुड्या (गारुडी नव्हे) हृतिकने आपल्या जीवघेण्या अदांची जादू विणून यौवनाने मुसमुसलेल्या समस्त सुस्वरूप रुपगार्वितांनाच केवळ घायाळ केले आहे असा आमचा आजवर समज होता. परंतु हृतिकबाबाची आणि त्याच्या नृत्याची जादू ही यापेक्षाही खोलवर पोचलेली आहे याचा साक्षात्कार आम्हास नुकताच जहाला.

आपण एखादं गाणं सकाळी उठल्यापासूनच का गुणगुणायला लागतो? आपण गुणगुणत असतो ते प्रत्येकच गाणं आपलं आवडतं असतं का किंवा आपल्याला आवडतात ती सगळी गाणी आपण सक्काळी सक्काळी उठून गुणगुणायला लागतो का? नाही. आपण दिवसभर काय गुणगुणतो ते आपल्या आवडीवर नाही तर आपण सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा 'पद्य आणि चाल लावलेल्या स्वरुपात' काय ऐकतो याच्यावर अवलंबून असतं. मग ते एखादं हिंदी गाणं किंवा रेडिओ जिंगल किंवा मग मराठी भावगीत असं काहीही असू शकतं. अगदी पूर्वी (म्हणजेच) माझ्या ऐन उमेदीच्या काळात कित्येक दिवसचे दिवस मी "पर्रद्येस्सी पर्रद्येस्सी ज्याना नई" किंवा "घुंघट की आर शे" किंवा अगदी गेला बाजार "आज्जा मेर्री ज्यान" असली गाणी म्हणत (वाचा गुणगुणत) काढले आहेत कारण सकाळी उठल्या उठल्या घरातला टीव्ही, रिक्षावाल्याची वरच्या 'सा' ला गवसणी घालणारी नवीन मुज्यिक शिष्टीम किंवा मग ट्रेनमधली आधुनिक चिपळ्या बडवणारी पोरं ही माझा मेंदू (माझ्याच) कानामार्गे दिवसभरासाठी भाड्याने घेऊन टाकायचे. मेंदूत घुसलेली ती गाणी संपायची ती थेट रात्री झोपल्यावरच.

कालांतराने हिंदी चित्रपटसृष्टीत रेहमान नावाच्या यक्ष/किन्नर/गंधर्व/जादुगाराने अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे आगमन करत सगळ्या जोड्याजोड्यांनी कान किटवणार्‍या जोड्यांच्या पार्श्वभागावर जोडे हाणून अस्सल संगीत म्हणजे काय असतं हे जगाला दाखवून दिलं. पुढची कित्येक वर्षं या जादुगाराने आमच्या हृदयावर एकहाती अंमल गाजवला तो थेट अगदी आमच्या घरी नवीन जादुगाराचं आगमन होईपर्यंत. नवीन जादूगार आल्यानंतर बाकीचे सारेच जण अर्थातच बघता बघता मोडीत निघाले. आवडी नाही तरी निवडी बदलल्या, उपलब्ध पर्याय आणि त्यांची अनिवार्यता बदलली. आणि मागे एकदा लिहिल्याप्रमाणे  "हम्मा हम्मा हम्मा"च्या ऐवजी "ससा तो ससा" आलं, , "एक घर बनाउंगा तेरे घर के सामने"ची जागा "असावा सुंदर चॉकलेटचा बंगला"ने पटकावली, "सागर किनारे"ला बाजूला सारून "एक मुलगा गेला तळ्याच्या काठी" तिथे विराजमान झालं आणि "चमचम करता है ये नशीला बदन"च्या ऐवजी "किलबिल किलबिल पक्षी बोलती" आलं. होताहोता पद्याच्या या बडबडगीतंवाल्या दुनियेतही मी तरबेज झालो आणि लेकासाठी रोज अजून अजून नवीन बालगीतं, बडबडगीतं तूनळीवर शोधायला लागलो. लेकाबरोबर त्यांची मजाही लुटायला लागलो. तर असंच शोधता शोधता मला एक नवीन साक्षात्कार झाला तो म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या दुनियेत (म्हणजे हिंदी चित्रपटांच्या आणि चित्रपटगीतांच्या दुनियेत) "तम्मा तम्मा लोगे" आणि "जुम्मा चुम्मा दे दे" अशी तंतोतंत एकाच चालीची परंतु वेगळ्या शब्दांची किंवा मग "दीदी तेरा देवर दिवाना" आणि "तुझे देखा तो ये जाना सनम" अशी किंचित चाल बदलून केलेली अशी दोन दोन व्हर्जन्स असतात तशीच दोन दोन व्हर्जन्स या बालगीतांच्या दुनियेतही असतात. फरक इतकाच असतो की एकाचं अ‍ॅनिमेशन अतिशय टुकार असतं तर दुसर्‍याचं जरा बरं ! तर नुकतंच "एका माकडाने काढलंय दुकान" या सलीलने संगीत दिलेल्या गाण्याचं दुसरं म्हणजे जरा बरं अ‍ॅनिमेशन असलेलं व्हर्जन हाताला लागलं. मी आणि माझ्या मांडीवर बसलेला लेक असे दोघेही त्या गाण्याचा आस्वाद घेत होतो. बघता बघता गाणं संपत आलं आणि ............ आणि अचानक मला हृतिकच्या वर सांगितलेल्या सर्वसमावेशक जादूचा साक्षात्कार झाला. त्या गाण्याचा व्हिडीओ खाली देतोय. आधी व्हिडिओ बघा आणि मगच पुढचं वाचा. अर्थात तिशी-पस्तीशीच्या आतबाहेर नसलेल्या किंवा वर्षा-दोन वर्षांच्या लेकरांना मांडीवर बसवून ही असली अ‍ॅनिमेटेड गाणी पाहायला लागत नसलेल्या आणि तस्मात्‌ त्याची सवय नसलेल्या वाचकांचा हे पूर्ण गाणं पाहण्यामागचा कंटाळा, वैताग समजू शकतो. अशा जनतेने (खरं तर सर्वांनीच) निदान ४:०९ पासून पुढचं गाणं पहावं आणि मगच पुढे वाचावं.



४:०९ ला आपल्या समोरच्या फ्रेममध्ये एक कोल्हा (कोल्ह्यासारखं दिसणारं काहीतरी) उजवीकडे दिसतो. तो उलटा चालत चालत स्क्रीनच्या मध्यभागापर्यंत येतो. तोवर सगळं ठीक चाललेलं असतं. मात्र त्यानंतर तो कोल्हा जे काही करतो ते बघून मी एकदम नोस्टॅल्जिकच झालो. "एका माकडाने काढलंय दुकान"ला दूर सारून चक्क "इक पल का जीना, फिर तो है जाना" वाजायला लागलं माझ्या डोक्यात. टाईट स्लिव्हलेस टी आणि गॉगल घातलेला हृतिक माझ्या डोळ्यासमोर (अगदी शब्दशः) नाचायला लागला. मनोमन मी त्या अनाम अ‍ॅनिमेटरच्या सच्च्या हृतिक प्रेमाला दाद दिली. डॅन ब्राऊनच्या 'दा विंची कोड' किंवा 'द लॉस्ट सिम्बॉल' मध्ये ज्याप्रमाणे पानोपानी आपली दुर्मिळ रहस्य चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडू नयेत मात्र त्यातला योग्य तो संदेश लायक लोकांपर्यंत पोचावा यासाठी मागच्या पिढीने पुढच्या पिढ्यांसाठी मुद्दाम मागे सोडलेली चमत्कारिक क्लिष्ट कोडी, पत्रं, रहस्यमय वस्तू, खजिन्याचे नकाशे इ इ इ आढळतात त्याप्रमाणे पुढेमागे चुकूनमाकून जर कोण्या एखाद्या आधुनिक औरंगजेबाने या पिढीचं हृतिकप्रेम नष्ट करण्याचं कुटील कारस्थान रचून हृतिकच्या चित्रपटांच्या सीड्या आणि रीळं नष्ट केली तरी हृतिकचं वादातीत नृत्यकौशल्य, अप्रतिम नृत्यनैपुण्य (खरं तर दोन्ही एकच पण.. असो) येनकेनप्रकारेण पुढच्या पिढीपर्यंत पोचवावं हा त्याचा (अ‍ॅनिमेटरचा.. औरंगजेबाचा नव्हे) सुप्त हेतू आणि त्यादृष्टीने केलेली त्याची ही कृती खरोखर वाखाणण्याजोगीच. मला तर अगदी भरून आलंय हो !!!!! ;-)

थोडक्यात पुढच्या काही वर्षात "ससा तो ससा" मधला ससा जळती सिगरेट हवेत फेकून धावता धावताच ती ओठात पकडायला लागला, किंवा "किलबिल किलबिल पक्षी बोलती" मधली मुलं किलबिल म्हणायच्या ऐवजी "क क क क क क किलबिल क क क क क क किलबिल  पक्षी बोलती" म्हणायला लागली किंवा मग "शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा" मधले सगळे प्राणी अंगातले कपडे काढून (शेपटीला गुंडाळलेले वगळता) येताजाता आपापली अंगप्रत्यंग दाखवायला लागले तर आश्चर्य वाटायला नको. नाही का? ;-)

तळटीप : मी हृतिकचा गरगर फिरणारा पंखा आहे !!!

Friday, November 26, 2010

रिक्त

.









































































































































१९७५ साली इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीच्या आणि त्यांनी केलेल्या वृत्तपत्रांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ त्यावेळच्या वृत्तपत्रांनी अग्रलेखाची जागा कोरी ठेवून आपला निषेध व्यक्त केला होता असं मागे वाचलं होतं.

तीच कल्पना पुढे रेटून मुंबई हल्ल्याला दोन वर्षं पूर्ण होऊन गेल्यावरही कसाबला अजूनही फाशी देऊ न शकल्याबद्दल मोहन, प्रतिभा, सोनिया, राहुल, चिदु, प्रणब या भिकार**चा या रिकाम्या पोस्टने निषेध !! (या न्यायाने तर गुरूला अजूनही जिवंत ठेवल्याबद्दल हजारो ब्लॉग्ज रिकामे पाडावे लागतील !!!!!!!!!)

Saturday, November 20, 2010

माझिया 'खुना'

१.

आम्ही चौघेजण रस्त्याने बडबडत, थट्टामस्करी करत चाललो होतो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं.. काळाकिर्र अंधार.. पण आम्हाला कसलीच पर्वा नव्हती. सगळ्यांची मस्त बडबड चालू होती. एक दोघांनी थोडीशी 'टाकली'ही होती. चालताचालता मी आमच्या चाळीत शिरलो. माझ्या मागोमाग ते तिघेसुद्धा आत आले. जिने चढत चढत सगळ्यात वरच्या मजल्यावर माझ्या घराच्या बाहेर एक कॉमन पॅसेज आहे तिथे आम्ही पोचलो. एकमेकांचे चेहरे अगदी जेमतेम पुसटसे दिसू शकतील एवढाच उजेड पाडणारा एक रात्रदिवा अगदी अंधुकपणे चमकत होता. आम्ही हळूहळू चालत होतो. तेवढ्यात एका 'टाकलेल्या'ला मागून (की पुढून?) कोणाचा तरी धक्का लागला. हा त्याला काहीतरी बडबडला. मग तोही उलटून याला बडबडला. शब्दाने शब्द वाढत गेले. आवाज चढत गेले. शब्दांतली धार वाढत गेली. अचानक ते दोघे हातापायीवर आले. आमच्यातला अजून एक (किंवा दोघेजण) सामील झाले आणि ते सगळे मिळून 'त्याला' झोडायला लागले. हे असे अचानक लाथाळ्यांवर उतरलेले पाहून मी काहीच का करत नाहीये हे मला कळत नव्हतं किंवा केलं असेल तरी काय केलं हे आत्ता मला आठवत नाहीये. मी त्या गुद्दगुद्दीत सामील झालो नसलो तरी काही न करता शुंभासारखा बघत होतो (किंवा बघत नसेनही.. मला खरंच आठवत नाहीये. सोरी हे पुन्हापुन्हा होतंय.. पण माझा खरंच इलाज नाही.) खरं तर मी त्यांना आवरायला हवं होतं. जे समोर चाललंय ते योग्य नाही हे मला कळतही होतं. मी टाकलेली बिकलेलीही नव्हती. तरीही मी शांतपणे काहीही न करता उभा होतो. गुद्दगुद्दीचा, आराडाओरड्याचा आवाज एव्हाना टिपेला पोचला होता. आमच्यातला तिसराही बहुतेक त्यांना सामील झाला असावा. कळत नव्हतं नीट. यांच्या आवाजाने घरातले आणि शेजारीपाजारी कुठल्याही क्षणी उठणार आता असं वाटून मला टेन्शन यायला लागलं होतं. इथे हाणामारी चाललेली आणि मला घरचे उठून मला रागावले तर काय असल्या विवंचना पडल्या होत्या. च्यायला कोणाचं काय तर कोणाचं काय !!

आता मला आठवतंय की अचानक बळ अंगात शिरावं किंवा अवचित स्वप्न संपावं तद्वत मी झोपेतून जागा झाल्याप्रमाणे त्यांच्यावर झेपावलो. पण .......... !! पण तोवर उशीर झाला होता. सगळं संपलं होतं. एवढ्या वेळात आत्ता पहिल्यांदा मला 'त्याचा' चेहरा नीट निरखता आला. तो चेहरा बघून तर माझ्या छातीत अजूनच धस्स झालं. आमच्या शेजारच्यांचा वयाने बराच मोठा असलेला वेडसर मुलगा (माणूस) होता तो. ते बघून मगाशीच आमच्या आवाजाने घरातले आणि शेजारचे उठले असते तर किती बरं झालं असतं असं मला वाटून गेलं. निदान हा अनर्थ तरी टळला असता !!! बघता बघता परिस्थितीचं गांभीर्य सगळ्यांनाच कळून चुकलं. आता काय करायचं हे कोणालाही कळत नव्हतं. भीती सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात ज्याने धक्का दिला होता तो बोलायला लागला. तो समहाऊ तितकासा घाबरलेला वाटत नव्हता. त्याच्या मते तिथून ताबडतोब पळून जाणं हा एकमेव पर्याय होता. कारण आत्ता इथे कोणी आम्हाला अशा परिस्थितीत बघितलं असतं तर आमचं नक्की काय झालं असतं याचा विचारही करवत नव्हता. आम्हाला कोणीही आत येताना बघितलेलं नव्हतं. त्या माणसाशी आमची बाचाबाची आणि मारामारी झाली हे पाहायला तिथे कोणीही नव्हतं. त्यामुळे ताबडतोब पळून गेलं तर आम्ही तिथे होतो याचा कुठलाही पुरावा शिल्लक राहणार नव्हता. हो-नाही करता करता सगळ्यांनाच त्याचं म्हणणं पटलं. मला पटलं का किंवा माझी प्रतिक्रिया काय होती हे मला आठवत नाही. पण एवढंच आठवतं की त्या सगळ्या गोंधळात आपापल्या इतस्ततः पडलेल्या वस्तू उचलून (पुरावे नाहीसे करून) त्या सगळ्यांबरोबर मीही घाईघाईने बाहेर तिथून पळून गेलो.

आम्ही चौघेही बरेच दिवस गायब होतो. काही दिवसांनी परत आलो तेव्हा वातावरण मी अपेक्षा केली होती तेवढं तापलेलं नव्हतं. तुलनेने शांत होते सगळे. कदाचित कोणाला खरंच काहीच माहित नसावं आमच्या त्या प्रकारातल्या सहभागाबद्दल. एक-दोनदा पोलीस घरी येऊन गेल्याचं कळलं. पण आवर्जून माझ्याबद्दल किंवा त्या तिघांबाद्दल काही विचारलं वगैरे नसावं. तेवढ्यात तिकडून 'त्या'ची आई आली. भरल्या डोळ्यांनी, करुण नजरेने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाली "पोलीस आले आणि तुझ्याबद्दल आणि xxx बद्दल विचारून गेले. का केलंत असं? तुम्हाला काय वाटलं कोणालाच काही कळलं नसेल?" मी उभ्या जागी हादरलो !!

क्रमशः .................... किंवा समाप्त...

=========

२.

खूप रात्र झाली होती. मी एका टोळक्याबरोबर भटकत होतो. ते कोण होते मला माहित नाही आणि आता आठवतही नाही. एकही चेहरा ओळखीचा नव्हता. मी त्यांच्याबरोबर का फिरत होतो हेही माहित नव्हतं. फिरत होतो एवढं मात्र नक्की. सगळी एकदम अवली कार्टी होती. चालता चालता आम्ही एका मोठ्या बसस्टॉपवर येऊन उभे राहिलो. तिथे काही पोरी उभ्या होत्या. पण आमचं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं. सगळेजण  सेवंथेवंथात होते. मोठमोठ्या आवाजात गप्पा, बडबड चालली होती. तेवढ्यात समोरून पाच-सहा पोरांचा एक ग्रुप जाताना दिसला. त्यांची अवस्था पाहून ते आमच्यापेक्षाही एक मजला वर चढले होते हे स्पष्ट कळत होतं. आमच्या बाजूला उभ्या असलेल्या पोरींकडे बघून त्यांनी हात दाखवायला, शिट्ट्या मारायला सुरुवात केली. चित्रविचित्र आवाज काढणं झालं, कमेंट्स पास करून झाले. शेवटी आमच्या ग्रुपमधल्या पोरांची डोकी सटकली. खरं तर थोडी बडबड करून समोरचा ग्रुप निघून जायच्या तयारीत होता तरीही आमच्यातल्या काही पोरांनी समोरच्यांना शिव्या घातल्या. त्या मुलींना न छळण्याबद्दलही बजावून झालं.. लगेच समोरूनही प्रत्युत्तरं आली. "का? तुमच्या बहिणी लागतात का?" वगैरे वाले टिपिकल डायलॉग मारून झाले. काही संबंध नसलेल्या, ओळखदेखही नसलेल्या कोणा कुठल्या मुलींच्या ग्रुपला तिसर्‍याच कुठल्याशा ग्रुपने अपरात्री छेडलं तर आमच्या पोरांना एवढं भडकायचं काय कारण होतं हे मला अजूनही कळलेलं नाही. असो. पण ते जाम भडकले एवढं मात्र खरं. आरडाओरडा, बोंबाबोंब होत होत बघता बघता राडा सुरु झाला. थेट समोरच्या ग्रुपचा म्होरक्या आहेसं वाटणार्‍याच एका मुलाला आमच्या पोरांनी धरला आणि दे-दणादण कुदवायला सुरुवात केली. मी लांबूनच बघत होतो. नजर थिजून गेली होती. बराच वेळ हात साफ करून झाल्यावर अचानक त्या म्होरक्याचा आधी येत असलेला अस्पष्ट कण्हण्याचा आवाजही बंद झाल्याचं जाणवलं. अचानक भानावर येऊन बघतो तोवर तो पोरींचा ग्रुप, समोरच्या ग्रुपमधली एकूण एक पोरं (अर्थात आता खाली निपचित आडवा पडलेला म्होरक्या सोडून), आमच्याही ग्रुपमधली अनेक पोरं हे सगळे सगळे गायब झाले होते. उरलो होतो ते आम्ही जेमतेम ४-५ जण. काय करावं ते कळत नव्हतं. शेवटी काहीही न सुचून आम्हीही जिवाच्या आकांताने तिथून पळून गेलो. रात्री घरी पोचल्यावर काय झालं ते मला आठवत नाही. दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आली तेव्हा आमच्या घराच्या मोठ्ठ्या फ्रेंच विंडोमधून बाहेर बघितलं तर रस्त्यावर काहीतरी पडलेलं दिसलं. थोडं नीट निरखून
 बघितल्यावर जे दिसलं ते बघून पूर्ण हादरून गेलो. हा तर कालचाच पोरगा होता. मोठ्या रस्याच्या मध्यभागी आडवा पडला होता. अगदी कालच्याच अवस्थेत. जराही हलला नव्हता. म्हणजे काल खरंच आमच्या हातून .... !! विचारानेही हादरलो पुन्हा एकदा. आठवणही नको होती मला त्या घटनेची पण तीच आठवण माझ्यापासून निव्वळ १०-१५ फुटांवर निपचित पडली होती. कालच्या घटनेची पुनरावृत्ती माझ्या मनात पुन्हा पुन्हा करण्यासाठी.. !!

नंतर दिवसभर मी घरीच राहिलो. दर पाच-दहा मिनिटांनी खिडकीतून बाहेर बघत होतो. तो तसाच पडला होता दिवसभर. असंख्य वाहनं येजा करत होती. पण कोणालाही तो दिसला कसा नाही किंवा कुठलंही वाहन त्याला धडकलं कसं नाही हेच मला कळत नव्हतं. संध्याकाळ होत आली. कालपासून घरातलेही कोणी दिसले नव्हते. कुठे गेले होते सगळे जण देव जाणे. आणि तेही मला न सांगता. माझा दर पाच मिनिटांनी त्याच्याकडे बघणं चालूच होतं. अचानक पाचच्या सुमारास तो मला किंचित हलताना दिसला. म्हणजे तो.... म्हणजे तो..... अचानक मला प्रचंड प्रचंड आनंद झाला आणि.........  तेवढाच जोरदार धक्काही बसला. आमच्या हातून काल काही बरं-वाईट घडलं नव्हतं याचा तो आनंद होता मात्र तो शुद्धीवर आला की पोलिसांना सगळं सगळं सांगणार आणि आमचं पुढचं पूर्ण आयुष्य तुरुंगात खडी फोडण्यात जाणार या निव्वळ कल्पनेचाही धक्का जबरदस्त होता. घरच्यांची नाचक्की होणार होती ती वेगळीच. मी पुन्हा बाहेर बघितलं तर तो थोडासा उठून बसल्यासारखा वाटला. त्याच्याजवळ कोणीतरी उभं होतं. पोलीस होते बहुतेक. काय करावं काहीच कळत नव्हतं मला. सगळं संपल्यासारखं वाटत होतं. पूर्ण गळून गेल्यासारखं झालं होतं. काहीच न सुचून मी देवघराकडे धाव घेतली आणि हात जोडून देवापुढे नतमस्तक झालो.

क्रमशः .................... किंवा समाप्त...

=========

बाहेरच्या जोरदार वार्‍याचा आवाज ऐकू येत होता. घरातला हिटर चांगलाच तापला असल्याचं जाणवत होतं. तरीही प्रचंड प्रचंड थंडी वाजत होती. मी ब्लँकेट अजूनच घट्ट गुंडाळून घेतलं तरी काही उपयोग झाला नाही. खाडकन डोळे उघडले. अंधारात धडपडत, चाचपडत कसाबसा स्वेटर शोधला आणि तो अंगावर चढवून पुन्हा एकदा माझ्या ब्लँकेटच्या कोषात शिरलो. मोबाईलवरचं घड्याळ पहाटेचे ५:३० वाजवत होतं. मी थंडीने थरथरतोय की भीतीने हे मला अजूनही कळत नव्हतं.

=========

पूर्वी मला बॉलीवूड टायपाचं एक स्वप्न पडायचं.. नाग-सापांचं.. अचानक साप दिसायचा, मधेच कुठून तरी नाग फणा काढून समोर यायचा. कोणीच कोणाला (म्हणजे ते मला किंवा मी त्यांना) कधीच काही करायचो नाही किंवा घाबरायचो वगैरेही नाही. ते एखादा स्पेशल अपिअरन्स मारायचे आणि बघता बघता गायब व्हायचे. चिक्कारदा पडलीयेत ही अशी स्वप्नं. किंवा मग कधी कधी फार मध्यमवर्गीय स्वप्न पडायचं. एकच स्वप्न. अगदी टिपिकल. घटना, क्रम सगळं  सेम. मी चालतोय आणि मला एक नाणं रस्त्यावर पडलेलं दिसतं. मी हळूच ते नाणं उचलून हातात घेतो. पुढचं पाउल टाकणार तोच फुट-दोन फुटावर दुसरं नाणं दिसतं. मग मी तेही उचलून हातात घेतो. मग तिसरं दिसतं, चौथं, पाचवं, सहावं दिसतं. अशी ढिगाने नाणी उचलतो मी.. भरपूर वेळ. बघता बघता नाण्यांचा मोठा ढीग जमतो माझ्याकडे. चांगले पन्नास-शंभर रुपये तरी असतील. अहो सगळी चार-आठ आण्यांची नाणी असतात (आठवा मध्यमवर्गीय). अरे हो मगाशी तेवढं सांगायला विसरलोच नाही का. हे एक स्वप्नं गेली कित्येक वर्षं मला पडत आलंय. थोडक्यात स्वप्नात का होईना मी करोडपती झालेलो आहे. कुठल्याही गरम-खुर्च्यांवर न बसता ;) .. कालांतराने 'स्वप्नील'शेठने आमचं प्रमोशन करून आम्हाला स्वप्नात एक-दोन रुपयांची नाणी बहाल करायला सुरुवात केली आणि माझा बघता बघता टर्नओव्हर एक कोटीवरून एकदम तीन-चार कोटींवर पोचला. मी समाधानी होतो. खरंच समाधानी होतो. काही तक्रार नव्हती. रोज नाग-साप बघा, नाणी वेचा आणि सकाळी फ्रेश होऊन उठा असं छानपैकी चाललं होतं सगळं. मध्यंतरी बर्‍याचदा मी ट्राऊझर, बेल्ट, सॉक्स, शूज घालून, हपिसाची ब्याग घेऊन घरातून बाहेर पडलोय आणि अचानक लक्षात येतं की वरती चांगला इस्त्री बिस्त्री केलेला शर्ट घालायच्या ऐवजी रात्रीचा चुरगळलेला टीशर्ट घालूनच बाहेर पडलोय असंही स्वप्न पडायचं. पण त्याबद्दलही कधी काही विशेष तक्रार नव्हती.

नंतर मी शिणेमे बघायला लागलो. खूप चिक्कार भरपूर आणि सगळे विंग्रजी. पूर्वी कुठलेही बघायचो. बघता बघता हळूहळू कळायला लागलं की 'सगळे विंग्रजी शिणेमे ब्येष्टच असतात' हा विंग्रजी शिणेमे फार कमी बघणार्‍यांनी किंवा अजिबात न बघणार्‍यांनी पसरवलेला एक मोठ्ठा सैरगमज उर्फ उलटा समज आहे. निव्वळ मिथ आहे ते एक. मग हळूहळू मला आवडतील तेवढेच शिणेमे बघायला लागलो. मला आवडतील त्या प्रकारातलेच, त्या ज्यॉनरचेच. हळूहळू कळलं की कॉमेडी, हिस्ट्री, वॉर, लव्हस्टोरी, चिक-फ्लिक्स हे विभाग आपल्यासाठी पूर्णतः वर्ज्य आहेत. त्यामुळे मी भक्तीभावाने फक्त सस्पेन्स, थ्रिलर, क्राईम, अ‍ॅक्शन, ड्रामा वालेच चित्रपट निवडून बघायला लागलो. निदान एक तरी खून, चार दोन पाठलाग, एखादं मोठठं रहस्य आणि त्याच्या आजूबाजूची त्याची पंधरा-वीस कच्चीबच्ची असलेली टिल्ली रहस्यं, एखाद्या खजिन्याचा किंवा घबडाचा शोध, त्यातून होणार्‍या हाणामार्‍या, संशयाची विणली जाणारी जाळी आणि खुबीने विणलेलं आणि शेवटपर्यंत टिकवून ठेवलेलं महा-रहस्य किंवा मेगा-रहस्य (दर तीन-चार एपिसोडआड महा किंवा मेगा एपिसोड आला नाही तर फाउल धरतात हा पुलंनी सांगितलेला प्राचीन पुणेरी समज अगदी खरा आहे.) या आठ दहा मुद्द्यांपैकी किमान सहा ते सात मुद्दे कव्हर झाले नसतील तर आमच्या स्वयंभू स्टार रेटिंगमध्ये तो चित्रपट एकदम एका स्टारवर येतो. (अजून एक : आमच्या रेटिंग सिस्टममध्ये चित्रपट हा एक स्टार किंवा दहा स्टारचाच असतो. म्हणजे चित्रपट एकतर जबरा तरी असतो नाहीतर भंकस तरी. 'बरा' श्रेणीसाठी येथे चौकश्या करू नयेत : (आमच्याच) हुकुमावरून)..

तर माझ्या या आवडीला स्मरून गेली काही वर्षं मी फक्त याच टाईपचे चित्रपट बघत आलोय. (१ आणि २ वाचून (किंवा बघून) ही आवड आता भारी पडणार आहे असं वाटतंय.) मात्र गेल्या एक-दोन महिन्यांत माझ्या मासिक ढोबळ सरासरीच्या चारच्या आकड्याला जोरदार लाथ घालून मी माझा स्तर उंचावत नेऊन जवळपास दहावर स्थिर केला. गेल्या महिन्याभरात जॅकी ब्राऊन, सिन सिटी, इल्युजनिस्ट, सिटी ऑफ गॉड, डॉनी डार्को, शेरलॉक होम्स, अ सिंपल प्लान, शालो ग्रेव्ह , बिग नथिंग, द गेम, व्ही फॉर व्हेन्डेटा, किल-बिल १ आणि २, फ्युजिटीव्ह असे अनेक न पाहिलेले, काही पाहिलेले चित्रपट ही माझी गेल्या आठवड्याची (खरी) कमाई. हे चित्रपट पाहिले नसलेल्यांसाठी सांगतो. या प्रत्येक चित्रपटात वरच्या हुकुमात सांगितलेले सगळे प्रकार भरभरून आहेत. खून, मारामार्‍या, गोळीबार, विश्वासघात, खजिने, पाठलाग सगळं भरपूर भरपूर म्हणजे "एक मांगो, दस मिलेगा" अशा प्रमाणात आहेत. आयला, हे असले चित्रपट सतत बघितल्यावर नाणी उचलून उचलून पैसा गाठीशी लावण्याची स्वप्नं दिसण्याऐवजी रस्त्यात हाणामार्‍या केल्याची स्वप्नं नाही दिसणार तर काय होणार अजून? फक्त ते तेवढं थंडीचं बघितलं पाहिजे एकदा. स्वेटर घालूनच झोपावं कसं.. !

ऑन अ सिरीयस थॉट, मारामार्‍यांची, खुनाबिनांची स्वप्नं पडतात, आणि जवाबदार नागरिकाप्रमाणे पोलिसांना कळवण्याऐवजी त्यातून वाचण्यासाठी चित्रपटात दाखवतात तसं थेट पळून बिळून जातो आपण.. !! म्हणजे आपलं नक्कीच वैचारिक अधःपतन झालं आहे की काय असाही एक विचार पहाटे थंडी वाजत असताना मनात तरळून गेला. पण (न केलेल्या खुनाबिनाचा) निदान पश्चात्ताप तरी होतोय ना, अगदीच त्या व्हिलनांसारखं अजून जास्त गोळीबार करत, लुटमार करत ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ करत हसत रस्त्यावरून चालत जात दहशत माजवत असल्याची तरी स्वप्नं पडत नाहीयेत ना? झालं तर मग. तोवर आपण सेफ. ते पश्चात्ताप, अपराधी भावना वगैरेंचं बघून घ्या नक्की, नीट, न विसरता... आणि मग बघा काय बघायचं ते. हवं तेवढं !!

तळटीपा :

१. "चित्रपटांचा (समाजमनावर होतो का नाही याची पुरेशी कल्पना नाही परंतु) समाज बघत असलेल्या स्वप्नांवर तीव्र परिणाम होतो" हे आमचं आवडतं वाक्य आहे.

२. "मनी वसे ते स्वप्नी दिसे" या उक्तीचा आम्ही येथे (आणि सगळीकडेच) जाहीर णी शे ढ करतो. (केला नाही तर आम्ही गोत्यात येऊ असे कोणी समजत असल्यास.... ते पूर्णतः खरे आहे. ;) )

३. '१' मधल्या xxx मध्ये त्या बाईने आपल्यातल्याच एका ब्लॉगर मित्राचं नाव घेतलं होतं.

४. आता मी डी निरोचा 'रॉनीन' बघणार आहे. तेव्हा आज रात्री (आणि नेहमीच) कोणीही उगाचंच रस्त्यावरून फिरू बिरू नका, उगाच कोणा अनोळखी व्यक्तींशी बाचाबाची करू नका, पोरीबाळींना छेडूबिडू नका अन्यथा..... !!! :P

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...