Tuesday, August 28, 2012

इचिभना... शाळा !! : पिरेड दुसरा

आधी एकदा लिहुन झाल्यावरही बरंचसं लिहायचं राहूनच गेलं आहे हे लक्षात आल्याने हा पुनःप्रयत्न !

शाळा... अंदाजे '७६ सालच्या डोंबिवलीतल्या (संदर्भ डास : डासिवली, मुंब्रा इ. इ. उल्लेख) एका साध्या टिपिकल मराठी शाळेत शिकणार्‍या पौगंडावस्थेतल्या कथानायकाचं वर्णन आणि त्याच्या व अनेकदा त्याच्या ग्रुपमधल्या त्याच्या वयाच्या मुलांच्या नजरेतून घडणारं तत्कालीन समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं, साध्या सोप्या (वाटणार्‍या) शब्दांतलं चित्रण !!

मी मुद्दामच 'वाटणार्‍या' असं म्हणतोय. कारण अगदी साधे शब्द, सोपी वाक्यरचना वगैरे असली तरी वाचत असताना प्रचंड 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करावं लागतं. एकेका ओळीत, एकेका वाक्यात, एकेका शब्दांत त्या परिस्थितीला निरनिराळ्या कोनांतून बघणारे, त्यावर भाष्य करणारे कैक उल्लेख आहेत. जातीभेदावर आहेत, विषमतेवर आहेत, चंगळवादावर आहेत, दांभिकपणावर आहेत आणि अगदी म्हंटलं तर लहान मुलांच्या बाबतीत घेतल्या जाणार्‍या लैंगिक गैरफायद्यावरही आहेत. पण गंमत म्हणजे या सगळ्या सगळ्यावर काही भाष्य केलं जातोय याचा पुसटसा आभासही यातल्या एकाही वाक्यात नाहीये. वाचताना वाटत राहतं की आपण मराठी शाळेतल्या एका साध्यासुध्या मुलाची वर्षभराची गोष्ट वाचतोय ज्यात त्याचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, शिक्षक आहेत आणि त्याला 'लाईन' देणारी (वाचा आवडणारी, प्रेम करणारी इ. इ.) त्याची एक मैत्रीण आहे. पण प्रत्यक्षात मात्र या सार्‍या लेखनाचा आवाका समोर दिसतो त्यापेक्षा फारच विस्तृत आहे !!!

या संपूर्ण पुस्तकात मला सगळ्यात आवडलेला किस्सा म्हणजे अथर्वशीर्ष पठणाचा. देववादी, दैववादी, अंधश्रद्धाळू, पूर्णतः नवसावर विसंबून राहणारे वगैरे लोकांवर अत्यंत साध्या शब्दांत पण एकदम खणखणीत, सट्टाकदिशी लागणारा असा एक जबरदस्त फटकारा लेखकाने ओढलेला आहे. आणि त्यातल्याच एका छोट्याशा ओळीत जातीपातींवरही एक खणखणीत फटका ओढलेला आहे. कितीही झालं तरी तो परिच्छेद इथे देण्याचा मोह टाळता येत नाहीये.

============================

(आईसाहेबांनी मला सांगितलं होतं की) गणपतीला म्हण की स्कॉलरशिप मिळाली तर एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवीन म्हणून. मला त्यावेळी जाम हसायला आलं होतं. गणपतीला पण आलं असणार. गणपती कशाला असलं काही ऐकतोय ? कारण त्याला माहित असणार की, आईसाहेब उकडीच्या मोदकांऐवजी कणकेच्या तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार. आणि तोसुद्धा सुक्या खोबर्‍याच्या खुळखुळ्या मोदकांचा.... आमच्या वर्गात फक्त बिबीकरला ती स्कॉलरशिप मिळाली..... नंतर आईसाहेब म्हणाल्या की, गणपतीला नवस करून काही उपयोग नाही. कुलस्वामिनीलाच करायला हवा होता. आता मी दहावीला गेल्यावर तसा त्या करतील.

मला तसं अथर्वशीर्ष येतं म्हणा. आमच्या बिल्डिंगीत पोंक्षेकाकांकडे वर्षातून एकदा सहस्त्रावर्तनाचा कार्यक्रम असतो. तेव्हा ते झाडून सगळ्यांकडचे पाट आणि माणसं गोळा करतात. निकमांकडचे फक्त पाट (ही ओळ म्हणजे तर तीन शब्दांत अक्षरशः उघडं करण्याचा सर्वोत्तम नमुना आहे !!!). पोंक्षेकाकांचा किरण तेव्हा आम्हाला आदल्या दिवशी सांगतो की उद्या आमच्याकडे गणपतीला गंडवायचा कार्यक्रम आहे म्हणून.कारण ते दहापंधरा लोक गोळा करतात. त्यांना साबुदाण्याची खिचडी आणि केळी देतात आणि त्यातल्या एकानं ते अथर्वशीर्ष म्हटलं तरी सगळ्यांनी म्हटलं असं समजतात आणि आकडा वाढवतात. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम दोनतीन तासांत आवरतो. गणपतीला काय हे कळत नसणार? पण ह्यांचं चालूच..."

============================

जातीपातींवर दबकत दबकत पण तेवढेच खणखणीत वार केल्याचे अजूनही छोटे छोटे अनेक नमुने आहेत. नरूमामासाठी देशमुखांच्या मुलीचं स्थळ आलेलं ऐकून मुकुंदाच्या आईने "आपल्यातल्या मुली काय मेल्या आहेत का?" या एका वाक्यातच त्या स्थळाची वासलात लावणे..

किंवा मग नरूमामाच्या लग्नात भेटलेल्या आशक्याबरोबरचा एक संवाद. मुकुंदाची आशक्या गायकवाडबरोबर छान गट्टी जमल्यानंतर मुकुंदा जेव्हा त्याला एकदा त्याच्या 'लाईन' बद्दल विचारतो आणि गायकवाड आणि त्याच्या 'लाईन' चं एकत्र भेटणं, बोलणं, फिरणं वगैरे चालू आहे हे पाहून आशक्या किती भाग्यवान आहे आणि त्याचं सगळं एकदम मस्त जमून गेलंय याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. तेव्हा गायकवाड जे उत्तर देतो ते ऐकून तर एकदम चरकायलाच होतं. गायकवाड म्हणतो "जमलंय कसलं रे..? काही नाही जमलंय. कारण आम्ही 'बीशी' आहोत ना" !!!!!!!

किंवा मग नरुमामाच्या लग्नाविषयी शिरोडकरशी बोलताना मुकुंदाने मुद्दाम आईसाहेबांना कशी 'आपल्यातली'च मामी हवी होती हे सांगताना 'आपल्यातली'च वर विशेष भर देणे वगैरे सगळे प्रसंग अगदी नकळत आलेले पण अगदी लहान लहान मुलामुलींच्याही मनात अजाणतेपणी का होईना खोलवर रुजलेले तत्कालीन समाजातले जातीभेदाचे संस्कार अगदी ठळकपणे अधोरेखित करतात. (आताही यातलं काहीही फारसं बदललेलं आहे असा माझा मुळीच दावा नाही.)

असंच अजून एक उदाहरण म्हणजे मुकुंदाच्या आईचं.. तिची मैत्री निकमकाकूंशीच असते. त्यांचं कधीही एकमेकींशी भांडणही होत नाही. याउलट पोंक्षेकाकूंशी कायम वादविवाद होत असतात पण तरीही सवाष्ण म्हणून जेवायला आई कायम पोंक्षेकाकूंनाच बोलावते. आणि ब्राह्मण म्हणून किरणला.. तो नेहमी पानात सगळं टाकत असतो तरीही !!

असे कित्येक छोटे छोटे प्रसंग बोकिलांनी संपूर्ण पुस्तकभर पेरून ठेवले आहेत. अनेक ठिकाणी सामाजिक भेदभाव, चुकीच्या किंवा अन्यायकारक रुढी-परंपरा इत्यादींना लक्ष्य केलं आहे.

नवरा हयात नसलेल्या स्त्रियांना समाजात दिला जाणारा दुजाभाव एका अगदी छोट्या वाक्यात मांडलाय त्यांनी. फावड्याची आई पूर्वी (नवरा असताना) आडवं कुंकू लावायची पण आता लावत नाही. चित्र्याला त्या आडव्या रेघेत कुंकू कसं बसतं हे बघायचं असतं पण ते आता शक्य नाही कारण फावड्याच्या आईला कुंकू लावण्याविषयी कोण समजावणार? पुरुषप्रधान समाजात नवरा नसल्यावर स्त्रीच्या अगदी छोट्या छोट्या आवडी-निवडीवरही सामाजिक रुढींमुळे कसा घाला घातला जातो हे यापेक्षा कमी शब्दांत आणि अधिक प्रखरपणे समजावणं जवळपास अशक्य आहे !

अनेक छोट्या छोट्या प्रसंगांत अक्षरशः एका वाक्यात सामाजिक विषमता/भेदभाव/रुढी/मानसिकता यापैकी कशा ना कशावर तरी कोरडा ओढलेला आहे. उदा भाई शेट्याने उल्लेखलेली पायलीभर भातासाठी काहीही करणारी नायकीण सामाजिक विषमतेवर बोट ठेवते किंवा एक दोन प्रसंगांत चित्र्याच्या अनुषंगाने आलेला "गोऱ्या पोरांवर लोकांचा विश्वास बसतोच" वाला उल्लेख गोऱ्या त्वचेकडे आकृष्ट होणारी किंवा गोऱ्यांनी केलेलं सगळं बरोबर आणि इतरांचं सगळंच वागणं प्रश्नार्थक किंवा संशयास्पद असतं अशी जी भारतीय समाजमनात खोल रुजलेली मानसिकता आहे ती दर्शवते.

एकीकडे "प्रत्येक काम हे सारखंच महत्वाचं आहे" म्हणणारा समाज प्रत्यक्षात मात्र शारीरिक आणि बौद्धिक श्रमांच्या श्रेयात दुजाभाव करतो आणि शारीरिक श्रमाला बौद्धिक श्रमांच्या मानाने अगदी दुय्यम स्थान देतो !! समाजाच्या या वृत्तीला बोकिलांनी एका छोट्या प्रसंगांतल्या केवळ एका वाक्यात फटकारलं आहे. सुऱ्या आणि फावड्याला मैदानी खेळात मिळालेल्या कपापेक्षा मुकुंदाला 'बुद्धिबळात' मिळालेला कप मोठा असतो कारण शाळेत बुद्धिबळाला मान आहे. !!"

नारुमामाच्या लग्नात मामीकडच्यांनी मुकुंदाच्या आईला घेतलेली साडी भारीतली नसते तसंच त्यांनी मुकुंदाच्या बहिणीला साडी घेतली नसते यासारख्या छोट्या कारणांनी मुकुंदाची आई रागावते आणि तिचा लग्नातला मुड जातो. अशा छोट्या छोट्या मान-अपमानाच्या प्रसंगातून लग्नाला उत्सवाचं स्वरूप आणणाऱ्या किंवा 'मुला'कडच्या लोकांना आपण केवळ मुलाकडचे आहोत म्हणून कशीही मनमानी करू शकतो या सामाजिक गृहितकाला आणि अनाठायी, अनावश्यक जुने पुराने रितीरिवाज पाळणाऱ्या आणि आपल्याला आपल्या आजूबाजूला नियमितपणे भेटणाऱ्या लोकांच्या (थोडक्यात आपल्या सगळ्यांच्याच) वर्तनावर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे !

अशाच प्रकारे स्त्री-पुरुष विषमतेला खतपाणी घालणाऱ्या आणि आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांचे दाखले कित्येक छोट्या छोट्या प्रसंगांतून पानोपानी विखुरलेले आहेत. त्यातला सगळ्यात जबरदस्त म्हणजे बेंद्रे बाई आणि मांजरेकर सरांची वेळोवेळी केली गेलेली तुलना. या दोघांमध्येही एक गोष्ट समान आहे ती म्हणजे ते दोघेही अविवाहित आहेत परंतु त्या अनुषंगाने त्यांच्याकडे बघण्याकडे मुलांचा (म्हणजेच भावी नागरिकांचा) दृष्टीकोन अक्षरशः भयावह आहे. या संदर्भातले काही उल्लेख म्हणजे "बेन्द्रीण लग्न झालेलं नाही तरीही सदैव तोऱ्यात असते." किंवा बेंद्रे बाई शिक्षा करतात तेव्हा "बेन्द्रीणीचं कधीही लग्न होणार नाही" असा सुऱ्याने दिलेला शाप या गोष्टी अतिशय छोट्या किंवा लक्षातही न येण्याजोग्या आहेत. पण एक मिनिट !! आता याच गोष्टींची आपण मांजरेकर सरांच्या अविवाहित असण्यासंदर्भात आलेल्या उल्लेखांशी तुलना करून पाहू. मांजरेकर सरांविषयी बोलताना मुकुंदाच्या तोंडून त्यांचं जे वर्णन येतं ते असं आहे. मांजरेकर सरांचं लग्न झालेलं नसल्याने ते 'एकदम बिन्धास' असतात, तोऱ्यात असतात, आकर्षक असतात, मुलांचे हिरो असतात, मुलांमुलींचे आवडते असतात !!!

केवढं मोठा विरोधाभास आहे हा !! म्हणजे जणु स्त्रीचं लग्न न होणं हे जणु अतिशय मानहानीकारक, अपमानास्पद, चुकीचं वगैरे असून त्याउलट पुरुषाचं लग्न न होणं हा त्याच्या तरुणपणाचा, सदाहरितपणाचा पुरावाच !!! थोडक्यात जातीपाती, पत्रिका, हुंडा, ऐपत इत्यादी इत्यादींमुळे किंवा कुठल्याही क्ष कारणामुळे जर एखाद्या मुलीचं लग्न होऊ शकत नसेल तर समाजाचा तिच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा चुकीचा असतो या दुटप्पीपणावर बोकिलांनी मोठ्या खुबीने बोट ठेवलं आहे.

अजून एक अगदी अगदी छोटा उल्लेख म्हणजे प्रगतीपुस्तकांचा गठ्ठा नंबरवार लावलेला असतो त्यात मुलांची प्रगतीपुस्तकं आधी असतात आणि मग मुलींची असतात असा एक छोटासा उल्लेख आहे. काही खास कारण नाही पण प्रत्यक्षातही याच्या उलट कधीच नसतं. प्रत्यक्षातही कायम प्रगतीपुस्तकं, हजेरीपटावरची नावं यात कायमच मुलांचा क्रमांक आधी असतो आणि मग मुलींचा असतो. अशी छोटी छोटी निरीक्षणं शाळेतून बाहेर पडणाऱ्या भावी पिढीच्या मनावर जन्मभरासाठी परिणाम करू शकतात !

असाच अजून एक प्रसंग. शाळेत ऑफ पिरेडला सिनेमाच्या भेंड्यांच्या वेळी एक उल्लेख असा येतो वर्गातल्या मुलींना मुलांबरोबर खेळ खेळण्याची भयानक हौस आहे... यापुढचं संपूर्ण वाक्य अदृश्य आहे पण आधी म्हटल्याप्रमाणे "रीडिंग बिटवीन द लाईन्स" केलं तर आपण ते सहजपणे पूर्ण वाचू शकतो !! "वर्गातल्या मुलींना मुलांबरोबर खेळ खेळण्याची भयानक हौस आहे..." "............ "पण मुलींनी पुढे होऊन मुलांशी मैत्री केलेली समाजाला चालत नाही, मुलीने असं केलं तर तिला आगाऊ/फॉरवर्ड वगैरे वगैरे ठरवलं जातं. तिला वाटेल तशी नावं ठेवली जातात. उदाहरणार्थ सुकडी-महेश प्रकरणात सुकडीकडे बघण्याचा मुलांचा दृष्टीकोन !! पण सुऱ्यासारखी मुलं मात्र बिनधास्त पुढे होऊन मुलींची छेड काढू शकतात कारण तो मुलगा असतो" आणि त्यामुळेच ही अनावश्यक शेरेबाजी किंवा मानहानी टाळण्यासाठी इच्छा असूनही मुली मुलांशी बोलण्यात, ओळखी करून घेण्यात पुढाकार घेत नाहीत उलट मुलांनी ओळख करून घेण्याची वाट बघत राहतात किंवा गाण्याच्या भेंड्यांसारख्या प्रसंगातून मुलांशी बोलण्याच्या छुप्या इच्छेला, उत्सुकतेला, भावनेला मोकळीक मिळवून देतात. पौगंडावस्थेतल्या मुलामुलींनी एकमेकांकडे आकर्षित होणं यात काहीच चूक नाही की ते वावगं नाही. ती एक अतिशय सद्दी अशी नैसर्गिक प्रवृत्ती आहे. परंतु समाजाच्या अनावश्यक जाचक नियमांमुळे या नैसर्गिक उर्मींना मुलींना दाबून ठेवण्यास भाग पाडलं जातं. असो..

पुस्तकात पानोपानी येणारे आणीबाणी उर्फ अनुशासनाचे उल्लेख आणि त्या अनुषंगाने येणारे प्रसंग हे तर निव्वळ अप्रतिम. १४-१५ वर्षांच्या मुलाच्या दृष्टीकोनातून आणीबाणीकडे बघून त्यावेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती, लोकांची मतं, विचार मांडण्याची कल्पनाच कसली बेफाट आहे !! त्याकाळची परिस्थिती, आणीबाणीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन, त्यांची मतं, आणीबाणीला ठाम विरोध करणारे ग्रुप्स आणि आणीबाणीला अनुशासन म्हणवून त्यापायी येणार्‍या शिस्तीचं कौतुक करणारे लोक आणि आणीबाणीच्या वेळी लोकांना आलेले अनुभव इत्यादी गोष्टी दहा अग्रलेख वाचून कळणार नाही एवढ्या चांगल्या रीतीने या पुस्तकातून कळतील कदाचित !! अनेक छोट्या उल्लेखांतून लेखकाने तत्कालीन विरोधाभास उलगडून दाखवले आहेत. इतिहास शिकवताना विद्यार्थ्यांना फ्रेंच राज्यक्रांती शिकवली जाते परंतु प्रत्यक्षात होऊ घातलेल्या क्रांतीबाबत मात्र सरकार मुलांना पुसटशी कल्पनाही न येऊ देता ती क्रांती आणीबाणीच्या माध्यमातून दडपून टाकत असते !

एका प्रसंगात मुलांना 'अनुशासन गीत' 'हम होंगे कामयाब' म्हणताना कामयाबच्या पुढे "उ उ उ" म्हणायला मजा येत असते पण अति झाल्यावर मात्र कंटाळा येतो असा उल्लेख आहे. हा प्रसंग आणीबाणीची विफलता खूपच परिणामकारकपणे विषद करतो. आणीबाणीला अनुशासनाच्या गोंडस नावात गुंडाळून जनतेसमोर आणलं जातं. सुरुवातीला दट्ट्या बसतोय म्हणून कामं वेळेवर होतातही आणि त्यामुळेच आणीबाणी आवडूही शकते पण कालांतराने अतिरेक झाल्याने त्या ताणलेल्या 'ऊ ऊ ऊ' प्रमाणेच आणीबाणी नकोशी वाटू लागते !! किंवा पीटीच्या तासाला कोणीतरी "आणीबाणी मुर्दाबाद" म्हणून ओरडल्यावर शिस्त मोडली म्हणून रागावणारा मुख्याध्यापक आप्पा म्हणजे जनतेला आणीबाणीतल्या दडपशाहीला शिस्त मानायला लावणाऱ्या सरकारचं प्रतिनिधित्व करतो. आणीबाणीवर आडून प्रहार करणारा अजून एक प्रसंग म्हणजे केवड्याच्या वडिलांनी मुकुंद आणि सुऱ्याला शिक्षा व्हावी यासाठी मुख्याध्यापाकाना आग्रह करण्याचा प्रसंग. केवडाचे वडील म्हणतात शिक्षा झालीच पाहिजे यांना. रस्टीकेट करा, पोलिसात तक्रार द्या आणि रिमांड होममध्ये टाका. त्यांना हे सगळं ताबडतोब व्हायला हवं असतं. मुलांना बोलायची किंवा आपली बाजूही न मांडू देता करायचं असतं. ते बघून आप्पाही चमकतो. मला वाटतं हा प्रसंग आणीबाणीची भीषणता, वाईट परिणाम मांडणारा प्रतिकात्मक प्रसंग आहे. आणीबाणीत असंच लोकांना आपली बाजू मांडू न देता सरकार/पोलीस सरळ कोणालाही अटक करत असतात. समजा मुकुंदाच्या वडिलांनी मध्यस्थी करून त्याला आणि सुऱ्याला सोडवलं नसतं तर निरपराधी असूनही त्यांची भरती रिमांड होम मध्ये झाली असती आणि कदाचित दोन नवीन गुन्हेगार जन्माला आले असते. आणीबाणीचे भयानक परिणाम दाखवणारा हा एक अतिशय उत्तम प्रसंग !!

'शाळा' नाव असलेल्या पुस्तकात शैक्षणिक क्षेत्रातले विरोधाभास दाखवले नसतील असं होणं शक्य तरी आहे का? जातीभेद, अंधश्रद्धा, मानापमान, परंपरा, रुढी, राजकीय, सामाजिक या सगळ्यांच्या बरोबरीने शैक्षणिक क्षेत्रातले विरोधाभास अनेक प्रसंगांतून सामोरे येतात. उदा. फावड्याची बॉलिंग अतिशय फास्ट असते, एक चांगला खेळाडू होऊ शकण्याची त्याच्यात पात्रता असते, तसंच सुऱ्याची चित्रकला अप्रतिम असते. परंतु त्यांना त्यांच्या छंदाकडे, आवडीकडे, कलेकडे लक्ष देऊ दिलं जात नाही किंवा त्या अनुषंगाने प्रोत्साहन मिळत नाही कारण की समजो वा ना समजो, आवडो वा ना आवडो पण शाळा, शिक्षण हे काहीही आणि कितीही झालं तरी सर्वात आवश्यक असा आपल्या समाजाचा नियम आहे !! धीरुभाई अंबानी, सचिन तेंडूलकर, ए आर रेहमान, स्टीव्ह जॉब्स, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग अशा शिक्षण अर्धवट सोडूनही यशाच्या अत्युच्च शिखरावर असलेल्या लोकांकडे पाहिल्यावर हा विरोधाभास चांगलाच जाणवतो. सुऱ्या आणि फावड्याच्या रुपाने जन्माला येऊ शकणारे असे कित्येक सचिन, रेहमान, बिल गेट्स हे मुलांची कुवत न ओळखता शिक्षणाचं जोखड त्यांच्या गळ्यात बांधण्याच्या हट्टापायी आपण गमावत असू ! याच अनुषंगाने पुस्तकाच्या शेवटी चित्र्याच्या तोंडी एक अप्रतिम संवाद आहे. निकालाच्या भीतीविषयी बोलणं चालू असताना चित्र्या म्हणतो "खरं तर दहावीपर्यंत सगळ्यांना सरळ जायला द्यायला हवं. दहा वर्षं शाळा शिकली ना. आता बास झालं. ज्यांना पुढे जायचंय त्यांनीच दहावी पास करायची" !!!!

शाळेचे नियम, भिंती, कायदे, बेंच, तास, पुस्तकं, तास, गृहपाठ, कव्हरं या अशा एकांगी वातावरणात अडकलेल्या आपल्या देशातच गुरुदेवांची 'शांतिनिकेतन' जन्माला आली होती यावर विश्वास बसणं खरंच कठीण जाईल आणि हेच बोकिलांनी काही छोट्या प्रसंगांतून दाखवून दिलंय. शाळेच्या बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या वातावरणात बसलेले असताना सुऱ्याच्या तोंडी असलेला अशा अर्थाचा एक संवाद आहे की अशी शाळा असेल या शाळेत मी कितीही वेळ शिकेन आणि या शाळेत शिकवलेलं सगळं कळेल !! अजून एक प्रसंग म्हणजे शाळेत वह्यांना खाकी कागदाची कव्हरं घालण्याचा नियम असतो. त्यावेळी मुकुंदाच्या तोंडचा एक संवाद या नियमातल्या फोलपणावर बोट ठेवतो. तो म्हणतो की खाकी कव्हरं कंपल्सरी असल्याने संतू आणि फावड्यासारख्या आर्थिक परिस्थिती चांगली नसलेल्या मुलांना विनाकारण खर्च करून खाकी कव्हरांसारखे फोल नियम पाळावे लागतात. शिरोडकरच्या वहीला तिच्या बाबांनी जागून घातलेलं कव्हर निव्वळ खाकी नाही म्हणून बेंद्रे बाई फाडून टाकतात तोही असाच एक प्रसंग. उगाच पुस्तकी नियम बनवले जातात परंतु त्यांची उपयुक्तता, आवश्यकता इत्यादी गोष्टी तपासून पाहण्याचे कष्ट न घेता ते नियम सरसकट सगळ्यांवर लादले जातात. फक्त शाळेतच नव्हे तर ही गोष्ट आपल्या समाजातल्या अनेक विचित्र नियमांना लागू होऊ शकते. कदाचित आणीबाणी हे ही त्याचंच एक उदाहरण !

पुस्तकातला एकूण एक प्रसंग १४ ते १५ वयोगटातल्या मुलाच्या किंवा मुलांच्या समूहाच्या नजरेने टिपलेला आहे. ही त्यांची निरीक्षणं आहेत. आणि अर्थातच मुलांची निरीक्षणं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर पालकांचं वागणं, त्यांचे संस्कार.. काही अपवाद वगळता एकाही प्रौढ व्यक्तीला जात-पात किंवा स्त्रीपुरुष भेदभाव, अंधश्रद्धा इ वर थेट भाष्य करताना दाखवलेलं नाही. जे काही संवाद आहेत ते जास्तीत जास्त मुलांच्या तोंडचेच आहेत. थोडक्यात तो पालकांवर, आजूबाजूच्या समाजावर, शिक्षणपद्धती आणि शिक्षकांवर केलेला प्रहार आहे. कारण अशा अडनिड्या किंवा संस्कारक्षम वयातली मुलं या सगळ्याचा स्वतः विचार करून मत बनवू शकत नाहीत. तेवढी त्यांची तयारी नसते. थोडक्यात त्यांचे विचार, मतं जी तयार होतात ती आजूबाजूला घडणाऱ्या घटनांच्या त्यांनी केलेल्या निरीक्षणांवरून, लावलेल्या अर्थावरून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या संगोपनाच्या प्रक्रीयेदरम्यान पालक आणि शिक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांवरून होत असतात. भविष्यातला आदर्श समज घडवण्याची भाषा करणारे आपण आपल्या भावी नागरिकांना प्रत्यक्षात मात्र जातीभेद, रुढी, अंधश्रद्धा, खोट्या परंपरा अशा चुकीच्या गोष्टींचं बाळकडू पाजून नक्की कशा प्रकारचा समाज घडवतोय हा भयावह प्रश्न या प्रत्येक प्रसंगानंतर आपल्यासमोर विक्राळ रुपात उभा राहतो !

मुकुंदाच्या मनात जो एक सतत वैचारिक गोंधळ चालू असतो तो आवरायला थेट अशी मदत होते ती फक्त नरुमामाचीच. तो मामा कमी आणि मित्र जास्त असल्याने त्याच्याबरोबर इंग्रजी पिक्चर बघणे, बिनधास्त गप्पा मारणे, त्याच्याशी मुलींविषयी बोलणे, त्याला शाळेतल्या मुलींचे किस्से सांगणे असे प्रकार दर भेटीत होत असतातच. अनेक प्रसंगांत नरूमामाच मुकुंदाचं चुकीचं पडलेलं किंवा पडू पाहणारं पाउल जागेवर आणताना दिसतो. उदा 'सुकडी'ला चिडवण्याचा प्रसंग किंवा धीर करून 'शिरोडकर'शी बोलण्याचा प्रसंग. किंबहुना मुकुंदाच्या प्रत्येक कृतीवर, प्रतिक्रियेवर, वागण्याबोलण्यावर नरूमामाचाच प्रचंड पगडा आहे, फार मोठा प्रभाव आहे आणि पुस्तकातल्या वाक्यावाक्यात तो जाणवतो. पानोपानी नरुमामाचे दाखले सापडतात. मुकुंदाच्या प्रत्येक वाक्यात, विचारात, कृतीत, कृतीच्या पुष्ठ्यर्थ नरूमामाची उदाहरणं आहेत. अर्थातच नरूमामा हा त्या काळाच्या तुलनेत विचारांनी अधिक सुधारित असणार्‍या अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करतो.

असं सगळंच जगावेगळं करणार्‍या नरुमामाने आधी (गंमतीतच) सांगितल्याप्रमाणे ख्रिश्चन मुलीशी लग्न न करता आईसाहेबांना आवडलेल्या 'आपल्यातल्याच' मुलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर सगळ्यात जस्त हिरमोड होतो तो मुकुंदाचा. सामाजिक, वैचारिक जोखडं भिरकावून देऊन वेगळं काहीतरी करणार्‍या नरूमामाने प्रत्यक्षात मात्र एवढा मोठा निर्णय घेताना मळलेली वाटच चोखाळावी हे नरूमामाकडे एक ग्रेट मित्र, आदर्श माणूस म्हणून बघाणार्‍या, स्वप्नील आयुष्यात वावरणार्‍या मुकुंदाला पचवायला जड जातं.

मुकुंदाच्या मनातले गोंधळ शमवू शकणारी किंवा त्याच्या विचारांना चालना देणारी, मदत करणारी अजून दोन पात्रं म्हणजे बाबा आणि चित्र्या. बाबांची थेट अशी मदत फारच कमी होते. परंतु बुद्धिबळाविषयीची आवड वाढीला लावणे किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींशी गैरवर्तणूकीच्या कथित आरोपावरून शाळेतून अगदी नाव काढायची पाळी आलेल्या मुकुंदाला विश्वासात घेऊन, प्रसंग समजावून घेऊन आणि आपल्या मुलाची काहीच चूक नाहीये हे कळल्यावर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून शांत व संयमित आवाजात मुकुंदाची बाजू थेट मुख्याध्यापक आणि तक्रारकर्ते यांना पटवून देण्याची त्यांची हातोटी दाखवणारा प्रसंग वाचून तर त्यांचा मोठेपणा अगदी थेट पोचतोच.

चाळीत टीव्ही आल्यामुळे सगळेजण टीव्हीच्या मागे लागल्याने बुद्धिबळ संपल्यामुळे विषण्ण झालेले बाबा, मोकळ्या जागेत बुद्धिबळ खेळले न गेल्याने आणि टीव्हीपायी लोकं न जमल्याने आजुबाजुच्यांनी अंगणात कचरा टाकायला लागणे यांसारख्या अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगांत चंगळवादावर अतिशय संयत आणि जवळपास शून्य शब्दांत लेखकाने ओढलेला कोरडा चांगलाच लागतो. चंगळवादावर ओढलेला असाच एक आसूड म्हणजे मुकुंदाच्या शाळा ते घर या मार्गावरचं पूर्ण पुस्तकभर डोकावणारं शेत पुस्तकाच्या शेवटच्या पानात एकाएकी नाहीसं होण्याच्या मार्गावर येतं तो प्रसंग.. तिकडे शेती करण्याऐवजी चाळी बांधायचं ठरवलं असल्याचं शंकर्‍याचे बाबा मुकुंदाला सहज सांगितल्याप्रमाणे सांगतात तेव्हा तर अगदी विषण्णच व्हायला होतं. पुस्तकातल्या निर्जीव पात्रांशीही आपण एवढे एकरूप होऊन गेलेलो असतो हे तोवर आपल्याला जाणवलेलंच नसतं.

मुकुंदाला आवरणारं आणि सावरणारं दुसरं एक महत्वाचं पात्र म्हणजे चित्र्या !! हा चित्र्या म्हणजे एक अवली कार्ट आहे. अतिशय हुशार, प्रचंड अभ्यासू, समजूतदार, परिस्थितीची चांगली जाण असणारं, आईबाबांमधल्या सततच्या भांडणांमुळे त्यांच्या प्रेमाला पारखा झालेलं, 'देवकी' पासून येणार्‍या कटु अनुभवांनी कंटाळून गेलेलं आणि घरातल्या या विचित्र परिस्थितीला कंटाळून जास्तीत जास्त वेळ त्याच्या आवडत्या वैज्ञानिक प्रयोगांत आणि ग्रुपचा नाका असलेल्या सुर्‍याच्या बिल्डिंगीत घालवणारं असं हे एक अतिशय इंटरेस्टिंग पात्र आहे. तो मुकुंदाला वेळोवेळी समजावतो, काही महत्वाची गुपितं फक्त मुकुंदाशीच शेअर करतो, आपल्या शांत आणि संयमित वागण्याने, गोड बोलण्याने आणि (मुकुंदाच्या भाषेत) गोर्‍यागोमट्या चेहर्‍याचा वापर करून ग्रुपला कित्येकदा मोठ्या संकटांतूनही वाचवतो. थोडक्यात नरूमामाला नियमित भेटता येत नसल्याने आणि त्याच्याकडून नियमितपणे मार्गदर्शन (!!!) मिळवता येत नसल्याने नरूमामानंतर चित्र्या हाच मुकुंदाचा एकमेव आधार असतो.

'शिरोडकर'बद्दल न लिहिता लेख संपवला तर मुकुंदा मला कधीही माफ करणार नाही. ('शाळे'त सर्वस्वी गुंतून गेल्याचा पुरावा यापेक्षा दुसरा देता येणार नाही :) ) .. कारण पुस्तकाचा निम्मा भाग हा शिरोडकरने व्यापलेला आहे. निम्म्या पानात प्रत्यक्षात आणि उरलेल्या निम्म्या पानात मुकुंदाच्या विचारांत, बोलण्यात, गप्पांत सगळीकडे. ही एक अतिशय गोड मुलगी आहे हा आपला विचार प्रत्येक पानागणिक अधिकाधिक पक्का होत जातो. तिचं मुकुंदाशी ओळख करणं, बोलणं, चोरून भेटायला जाणं वगैरे सगळं सगळं एकदम पटून जातं आपल्याला. आणि मुकुंदाची तिच्याबद्दलची इन्टेन्सिटी शाळेतल्या गाण्याच्या भेंड्यांचा प्रसंग, मुकुंदाने तिच्यासाठी मार खाण्याचा प्रसंग, स्काउट कॅम्पचा प्रसंग, तिच्यासाठी लांबचा क्लास लावण्याचा प्रकार इत्यादीमधून अधिकच ठळकपणे समोर येते. तिच्यासाठी चेसची स्पर्धा जिंकणं, तिच्यासाठी जीव खाउन अभ्यास करून निव्वळ शेवटच्या काही महिन्यात अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं वगैरे वगैरे प्रकार प्रचंड आवडतातच आणि पटूनही जातात. किंवा नाईट कॉलेज शोधणं, मुंबईत भाड्याच्या घरात राहण्याची कल्पना करणं वगैरे प्रकार तर पटत नसूनही मुकुंदाच्या विचारांची भरारी आणि त्याची तयारी पाहून मनोमन हसायला आल्याशिवाय राहत नाही..

अर्थात हे पुस्तक नववीच्या एका टारगट ग्रुपविषयीचं असल्याने मुली, त्यांच्याबद्दलचे बिनधास्त उल्लेख, कट्ट्यावरची भाषा, नवीननवीन शब्द, शिव्या, 'ढिंगच्याक' गाणी, वात्रटपणा, आगाऊपणा या सगळ्याचा पुरेपूर वापर पुस्तकात आहे पण तो क्वचित कधीतरीच आक्षेपार्ह वाटतो किंवा बरेचदा वाटतही नाही. कारण सुरुवातीपासूनच आपण या पुस्तकात आणि विशेषतः मुकुंदात एवढे गुंतुन गेलेलो असतो की आपणही त्याच्याबरोबर शाळेत, कट्ट्यावर, सुर्‍याच्या बिल्डिंगीत, संध्याकाळच्या क्लासला, गुपचूप शिरोडकरच्या मागे, नरूमामाबरोबर इंग्रजी पिक्चरला, केटी आणि विजयच्या रुमवर, शाळेच्या रस्त्यावर असलेल्या शेतात जाऊन पोचलेलो असतो. त्यामुळे तो करतोय ते, बोलतोय ते, वागतोय तसं आपण ऑलरेडी वागायला लागलेलो असतो. आक्षेप घेण्याचा प्रश्न येतोच कुठे !!!!

थोडक्यात पुस्तकभर एवढे चढ-उतार येऊन, टक्केटोणपे खाऊन अचानक शेवटच्या काही पानांमध्ये मुकुंदाची आणि त्याच्या प्रेमाची घडी अगदी सुरळीतपणे बसणार आणि अगदी गोड गोड सुखांत शेवट वाचायला मिळणार असं वाटायला लागतं. आणि तेव्हा ते थोडंसं टिपिकल पुस्तकी वाटतंय की काय असं म्हणेम्हणेस्तोवर शेवटचं पान आलेलं असतं आणि तेवढ्यात.......... काही कळायच्या आत आपल्या पायाखालची चादर सर्रकन ओढली जाते. एकदम चटका बसून आपण वास्तवात येतो. स्वप्न संपल्यागत वाटतं... तसं म्हटलं तर पुस्तकाचा शेवट रूढार्थाने तितकासा काही ग्रेट किंवा जगावेगळा वगैरे नाहीये पण वर म्हटल्याप्रमाणे आपण मुकुंदामध्ये एवढे गुंतून गेलेले असतो की शेवटी मुकुंदाच्या मनावर जेवढा प्रचंड आघात होतो तेवढाच जोरदार धक्का आपल्यालाही बसतो. अगदी वेड्यागत होतं.

वपुंचं पार्टनर वाचताना त्यात शेवटी एके ठिकाणी "पार्टनर हा खराच होता की आपल्याला जसं व्हावंसं, वागावंसं वाटत होतं तसं वागणारी एक काल्पनिक व्यक्ती होती" अशा काहीश्या अर्थाचा एक उल्लेख आहे. त्याचप्रमाणे शाळा वाचताना आणि वाचून संपल्यावरही कित्येकांना अगदी स्वतःच्या शाळेविषयी वाचल्यासारखं, आपल्या त्यावेळच्या आयुष्याविषयी, त्यावेळी केलेल्या मस्ती, धम्माल, दंग्याविषयी आणि खोड्यांविषयी आठवतं, काही जणांना अगदी तसंच्या तसं नाही पण अनेक प्रसंग आपल्या शालेय जीवनाच्या जवळ जाणारे वाटतात किंवा कित्येकांना ही 'शाळा' म्हणजे फक्त पुस्तकात असणारी आणि आपल्या प्रत्यक्षातल्या नववी-दहावीच्या आयुष्यापेक्षा कित्येक मैल लांबची वाटते पण असंच सगळं आपल्यावेळीही आपल्या बाबतीतही घडलं असतं तर खूप धमाल आली असती असंही वाटत राहतं.

पण कुठल्याही स्वरुपात का होईना आपण 'या शाळे'ला आपल्या शाळेशी रिलेट करतोच आणि मला वाटतं हेच 'शाळा' चं सर्वात मोठं यश आहे आणि त्याबद्दल मिलिंद बोकीलांचे कितीही आभार मानले तरी ते मुकुंदाच्या शिरोडकरवर असलेल्या, चित्र्याच्या 'केवडा'वर असलेल्या, 'सुकडी'च्या महेशवर असलेल्या, आंबेकरच्या मांजरेकर सरांवर असलेल्या प्रेमापेक्षा आणि समस्त पोरापोरींच्या मनात बेंद्रीणीबद्दल, आप्पाबद्दल आणि केवड्याच्या बापाबद्दल असणार्‍या रागापेक्षा कित्येक पटीने कमीच असतील !!!!

Wednesday, August 1, 2012

य्या य्या.... वॉड्डेवर !!

मी : हे

तो : हाय

बरेच दिवस जातायेताना, प्रवेशद्वाराशी, एलिव्हेटरमध्ये, लॉबीत, पाण्याच्या फिल्टरजवळ, कॅन्टीनमध्ये गाठभेट होत असते. पण प्रत्यक्ष ओळख झालेली नसते. त्यामुळे आज ऑफिसमधून बाहेर पडताना तो दिसतो तेव्हा ओळख करून घ्यायची म्हणून मी आपणहून त्याला ग्रीट करतो. तो ही करतो. नाव, गाव वगैरे सांगून जुजबी ओळख होते. मी कॉफी प्यायला निघालेलो असतो आणि तो सहज वॉकसाठी. त्यामुळे आम्ही कॉफीशॉपच्या दिशेने चालायला लागतो. हळूहळू गप्पांना सुरुवात होते.

मला आधी तो मराठी वाटलेला असतो पण तो नसतो. [अर्थात त्यामुळे संभाषण हिंदीत होतं. परंतु ब्लॉग मराठी असल्याने संभाषणाचा भावानुवाद करतोय (खो-खो विरहित) ;) ]

मी : तू याच महिन्यात जॉईन झालास का?

तो : हो. पुढच्या आठवड्यात एक महिना होईल.

मी : कुठल्या टीममध्ये ?

तो त्याच्या ग्रुपचं नाव सांगतो.

मी : आधी कुठे होतास?

तो : मेनहेटनमध्ये.

मी : अच्छा. मनहॅटनमध्ये कुठे?

तो : मिडटाउन

मी (उगाच काहीतरी विचारायचं म्हणून) : सेंट्रल पार्कच्या जवळपास का?

तो : सेंट्रल पार्क??

मला त्याच्या प्रश्नाचा अर्थच कळत नाही. तो मला "सेंट्रल पार्क म्हणजे?" अशा अर्थाचा प्रश्न विचारतोय किंवा दुसरंच काहीतरी विचारतोय किंबहुना नक्की काय विचारतोय तेच क्षणभर कळत नाही. मी फक्त हम्म.. हुं... अशा काहीतरी निरर्थक अर्थाचं बोलून विषय बदलतो. (प्रसंगाचं गांभीर्य कळण्यासाठी : 'सेंट्रल पार्क' न्यूयॉर्कच्या मनहॅटन भागात मिडटाऊन आणि अपटाउन वगैरे परिसरात पसरलेलं अत्यंत विस्तीर्ण आणि अत्यंत प्रसिद्ध उद्यान आहे.)

तो न्यूयॉर्कमध्ये बहुतेक नवीनच आलेला असतो . बोलता बोलता आधी कुठे होतास, कुठे राहतोस वगैरे प्रश्नांची देवघेव होते. तो जवळपास दहा वर्षं न्यूयॉर्कमध्ये राहत आहे आणि त्यातली पाच वर्षं अपटाउनमधल्या एका कंपनीत होता हे ऐकून मी फक्त कोलमडायचाच बाकी राहतो. कधी एकदाचं ते कॉफीशॉप येतंय असं मला होऊन जातं. तिथे पोचतो तर नेमकी भलीमोठी रांग असते. आधीच्या धक्क्यातून जेमतेम सावरत असल्याने काय बोलायचं तेच मला कळत नाही.. आणि एवढ्या वेळ बडबड केल्यावर अचानक एकदम शांतही बसता येत नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारतो..

मी : 'डार्क नाईट रायझेस' बघितलास का?

तो : परवा मुलांनी डीव्हीडी वर लावला होता. मी नाही बघितला.

मी : डीव्हीडी? अरे गेल्या आठवड्यात तर रिलीज झाला तो. डीव्हीडी कुठे मिळाली तुला? आधीचा भाग बघितला असेल त्यांनी.

तो : हो का? असेल असेल. त्यानंतर 'बीटल्स' ही लावला होता त्यांनी.

मी : 'बीटल्स' लावला होता? म्हणजे? बीटल्सचा कुठला अल्बम?

तो : अल्बम नाही चित्रपट.

मी : अरे 'बीटल्स' हा चित्रपट नाहीये.. असो... काही नाही.

तो : हो का? मला कल्पना नाही. मी इंग्रजी चित्रपट बघत नाही.

(............. छोटा पॉज .............)

मी : ______

तो : हिंदी बघतो

मी : (अरे वा वा)... एवढ्यात कुठला बघितलास?

तो : यलगार

मी : अरे तो तर किती जुना....... नाही.. काही नाही...

तो : ______

मी : ______

तो : ______

(................................................... मोठा पॉज ................................................... )

तोवर रांग थोडी पुढे सरकलेली असते.

मी : काय घेणार आहेस?

तो : म्म्म्म... माहीत नाही.. मी कधी घेतली नाहीये कॉफी.

मी : अरे हे दुकान नवीनच आहे. मीही जास्त वेळा नाही आलोय इथे.

तो : ह्म्म्म.

मी : जनरली काय घेतोस?

तो : मी बाहेर कधीच पीत नाही कॉफी.

मी : अच्छा

तो : तू काय घेतोस?

मी : कपॅचिनो.... सो.. तू कुठली टेस्ट करतोयस?

तो (काही वेळ समोरचा बोर्ड निरखून झाल्यावर) : मोचा

मी (बावरून इकडे तिकडे बघत) : यु मीन मोका?

तो : नाही रे. ते बघ. मोचा.

मी : (शक्यतो कमीतकमी शब्द वापरून आणि कमीत कमी उद्धट वाटेल अशा बेताने) अरे ते 'मोका' आहे.

तो : अच्छा. मी म्हणालो ना तुला मी कधीच बाहेर कॉफी घेत नाही.

मी ("अरे पण इतक्या वर्षांत निदान एकदा तरी ऐकलं/वाचलं/पाहिलं असशीलच ना?" हे सारे संवाद गिळून टाकून) : हम्म. चालायचंच !!!

तोवर रांग अजून पुढे सरकते आणि साहेबांचा नंबर येतो.

कॉफीवाली बाई : हाऊ कॅन आय हेल्प यु सर?

तो : वन मोचा.

कॉबा : एक्स्क्युज मी?

तो : वन मोचा.

कॉबा : यु मीन मोका?

तो : यस.

माझं लक्षच नाहीये असं दाखवत मी इकडे तिकडे बघायला लागतो. तो पैसे देऊन आणि 'मोचा'चा कप घेऊन बाजूला सरकतो. मी पुढे होतो.

कॉबा : हाऊ कॅन आय हेल्प यु सर?

मी : कॅन आय हॅव वन मोचा  प्लीज?

कॉबा (चेहरा वेडावाकडा करत आणि कपाळाला प्रचंड आठ्या घालत) : डु यु (ऑल्सो) मीन मोका?

मी : य्या य्या.... वॉड्डेवर (च्या मायला) !!!


टीप : पोस्ट चुकून उद्धट वाटत असली तरी कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाहीये. आणि यात काडीचाही कल्पनाविस्तार नसून उलट थोडीफार 'टोन-डाउन'च केलेली आहे !

Thursday, July 19, 2012

चिवड्याच्या गोष्टीची पोस्ट !

कुरियरने आलेला मोठ्ठा खोका हातात घेऊन मी दार बंद केलं. सपासप वार करून सेलोटेप्स कापून टाकून खोका उघडला. भारतातून आलेल्या खोक्यात एक प्रकारची मायेची ऊब असते, प्रेम असतं, जिव्हाळा असतो. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यात चिवडा असतो. भरपूर चिवडा.. ताजा, खमंग, चविष्ट चिवडा !! पूर्ण खोका भरून वेगवेगळया आकाराच्या ४-५ पिशव्या भरून झाल्यावर उरल्यासुरल्या जागेत दाण्याचे लाडू आणि तत्सम लिंबूटिंबू पदार्थ, १-२ पुस्तकं वगैरेही असतात. पण मेन रोलमध्ये कायम चिवडाच ! तर यावेळीही अशाच चार पिशव्या होत्या. तीन लहान, झिपलॉक वाल्या पिशव्या आणि एक भली मोठी पिशवी. सगळं घर चिवडामय झालं !!

झिपलॉकवाल्या छोट्या पिशव्या ऑफिसला न्यायला बऱ्या पडतील म्हणून वरती शेल्फात टाकून दिल्या. मोठी पिशवी खोक्यातून बाहेर काढली. ती मोठी म्हणजे खरंच खुपच मोठी होती. अवाढव्य.. एकदम ढब्बू. तिला लावलेले दोन रबर काढले आणि पिशवी उघडायला गेलो तर ती उघडेना. दोन्ही टोकं एकदम घट्ट चिकटून बसली होती. पुन्हा प्रयत्न केला तरी उघडेना. यावेळी मोठी पिशवी पण झिपलॉक आहे की काय अशा विचाराने त्याप्रमाणे उघडायचा प्रयत्न केला. पण इल्ला. कुठे सेलोटेप लावलाय का म्हणून शोधलं तर तसंही काही नव्हतं. कदाचित स्टेपल केलं असावं म्हणून बघितलं तर ते ही नाही. समोर एवढा चिवडा दिसतोय पण खाता येत नाहीये या विचाराने मी कासावीस झालो.

पुन्हा एकदा शांतपणे नीट लक्ष देऊन पिशवी नक्की का उघडत नाहीये ते बघायचं ठरवलं. नीट चेक केलं तर लक्षात आलं की पिशवीची दोन्ही टोकं अगदी घट्ट चिकटून बसली आहेत. म्हणजे अगदी सराईत, अगदी प्रोफेशनल काम असावं तसं, स्टेपल नाही, सेलोटेप नाही, झिपलॉक नाही तरी पिशवी का उघडत नाहीये? पूर्वी ते दुकानदार मेणबत्तीवर पिशव्या धरून पॅक करायचे तसं काही केलं की काय आईने? कैच्याकै... एवढं करण्याची काय गरज होती? आई म्हणजे ना. या युगात मेणबत्तीने पॅकिंग? माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण ते सुपरपॅकिंग बघून विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. काय रे देवा. स्टेपल/सेलोटेपच्या युगात हे असं पॅकिंग? आता उघडू कशी ही पिशवी आणि खाऊ कसा चिवडा? खरं म्हणजे एव्हाना चिवड्याचे दोन-चार बकाणे भरून व्हायला हवे होते तर आमचं गाडं पिशवीमध्येच अडकलं होतं !

मी वैतागून मोठी कात्री काढली. हे म्हणजे मधमाशी मारण्यासाठी एके-४७ वापरण्यासारखं होतं. पण काही इलाज नव्हता कारण मधासाठी आपलं ते चिवड्यासाठी एके-४७ काय तोफ, रणगाडा काहीही वापरायला मी मागेपुढे पाहिलं नसतं. कात्रीने मी पिशवीचं वरचं टोक कापून टाकलं. यकश्चित पिशवी उघडण्यासाठी कात्री वापरण्याचा प्रसंग कित्येक वर्षांनंतर आला होता. पण इतिहासाकडे दुर्लक्ष करून पिशवीत हात घातला आणि बकाणा भरला. अहाहाहा.. काय तो ठसका, काय ती चव. बेस्ट एकदम. एवढ्या चविष्ट, खमंग, खुसखुशीत चिवड्याबद्दल मी आईला मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याचा गुन्हा माफ करून टाकला. नंतर थोडा चिवडा डिशमध्ये काढून घ्यावा म्हणून पिशवी उचलली आणि..................

...
..
.
.
.
.
..
...

आणि सगळं घर चिवडामय झालं !!!!!!!! माझ्या पायाशी चिवड्याची भलीमोठी रास तयार झाली. दुसऱ्या टोकाने पिशवी उघडी होती !! स्टेपलच्या पिनांचा त्रास होऊ नये किंवा पिशवी उघडताना सेलोटेप चिकटू नये यासाठी आईने पिशवीचं तोंड चांगलं ४-५ वेळा फोल्ड करून त्यावर चांगले दोन मोठे रबर लावून दिले होते (जे मी पोस्टच्या सुरुवातीलाच काढले होते). थोडक्यात मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याच्या मध्ययुगात आई नव्हती तर आईने असं केलं असेल असं वाटणारा मी होतो !!

ती रास बघून 'छोटा चेतन' मधली मुलं आईस्क्रीमच्या डोंगरात उड्या मारता मारता एकीकडे आईस्क्रीम खातात किंवा अंकल स्क्रुज (ज जेवणातला, जहाजातला नव्हे) त्याच्या पैशाच्या राशीत यथेच्छ डुबक्या मारतो तद्वत चिवड्याच्या राशीत अगदी डुबक्या मारल्या नाहीत तरी निदान तोंड तरी घालावं असं मला वाटून गेलं. पण तरीही तो मोह टाळून मी सगळा चिवडा पुन्हा त्या पिशवीत भरून ती पिशवी मस्त हवाबंद डब्यात भरून टाकली.

हल्ली कधी कधी चिवडा खाताना एखादा घास किंचित विचित्र लागला तरी चुकून मीठ/लिंबू वगैरे काहीतरी कमीजास्त झालं असेल किंवा नीट ढवळला गेला नसेल अशी स्वतःची समजून घालून मी त्या चवीकडे साफ दुर्लक्ष करून खमंग चिवड्याचा पुढचा घास तोंडात कोंबतो !!!

Saturday, May 19, 2012

साक्षात्कार

किरकिरत्या गजराने चिडचिडतच उठलो..
आन्हिकं उरकली..
नाश्ता झाला, ज्यूस झालं,.. कॉफीही पिऊन झाली.
कपडे करून तयार झालो आणि हापीसला जायला निघालो.
काय माहित पण असं फ्रेश्श नव्हतं वाटत आज............ !!

ट्रेन पकडली, बसायला जागाही मिळाली..
नेहमीप्रमाणे पुस्तक काढून वाचायला घेतलं..
वाचत होतो पण अर्थ डोक्यात शिरत नव्हता..
कंटाळून बंद केलं पुस्तक आणि डोळे मिटून बसून राहिलो.
स्टेशन आल्यावर नाईलाज म्हणून उठून उभा राहिलो आणि उतरलो.
हापीसला पोचलो...
काही कळत नव्हतं का ते पण आज जराही फ्रेश्श वाटत नव्हतं....... !!

कामाला सुरुवात झाली, मेल्स, मिटींग्ज, कॉन्फरन्स कॉल्स सगळं एकामागून एक नेहमीप्रमाणे चालू होतं....
बॉसची बडबड, बॉसच्याबॉसची बडबड, ते मेल्स, एच आरचे टीम-बिल्डिंगचे यंत्रवत मेल्स हेही होतंच...
या सगळ्या गडबडीतून उठून जाऊन एकदा चेहरा चांगला खसाखसा धुऊन आलो...
चांगली लार्ज कॉफी घेऊन डेस्कवर आलो...
पण तरीही.. तरीही मुळीच फ्रेश वाटत नव्हतं आज.......... !!

जेवण झालं, मिटींग्ज, मेल्स, कॉल्सचं चक्र चालूच राहिलं...
ट्रबलशुटींग्ज, एस्कलेशन्स झाले...
भारत-कॉल झाला....
पुन्हा एकदा चेहरा धुवून आणि लार्ज कॉफी घेऊन डेस्कवर आलो...
त.. री... ही... अजिबातच फ्रेश वाटत नव्हतं आज......... !!

पुरेसं राबवून घेऊन झाल्यावर, छळून झाल्यावर दिवस संपत आला...
दिवस संपताना कालच्या दुप्पट मेल्स, इश्युज, प्रॉब्लेम्स हे आपण आज दिवसभरात खरोखर काही केलं की नाही असं वाटायला लावणारे होते...
पण त्या सगळ्यांकडे एक तुच्छ दृष्टीक्षेप टाकून स्क्रीन लॉक केली आणि निघालो.
दिवसभर वाटलं नाही ते आता काय दगड फ्रेश वाटणार होतं म्हणा..... !!

ट्रेनमध्ये बसलो...
दोन पानं वाचून पुस्तक ठेवून दिलं,,..
डोळे मिटून बसून राहिलो...
तेवढ्यात मोबाईल किरकिरला...

आत्ता कोणाचा फोन म्हणून बघायला गेलो तर रिमायंडर वाजत होता.

"पेस्ट घेणे".... स्क्रीनवर शब्द चमकत होते... आयला हा रिमायंडर तर मी काल सकाळी लावला होता.. काल संध्याकाळी टूथपेस्ट विकत घ्यायची आठवण करण्यासाठी. सकाळी अखेरची फाईट मारून झाल्यावर पेस्टने मान टाकली होती. त्यामुळे संध्याकाळी पेस्ट घेतली नाही तर वाट लागणार होती. अरे पण हे सगळं कालचं झालं........... मग आज... आज............... ओह... !!!!!!! रिमायंडरमध्ये कालची तारीख टाकायच्या ऐवजी चुकून आजची तारीख टाकली होती.............

तरीच आज दिवसभर अजिबात अजिबात, जराही, यत्किंचितही, मुळीच फ्रेश वाटत नव्हतं..... !!!!!!!!!! (आणि च्युईंगमचं पाकीटही दुपटीने रिकामं झालं होतं ;) )

Thursday, May 17, 2012

तीन उपाय


कारचं दार उघडताक्षणी बाहेरचा रणरणता उकाडा झपकन आत शिरून कारमधला एसीचा गारवा खाऊन टाकायला लागला. मी चटकन दार लावून घेतलं. उरलेलं कोक संपवलं आणि कारमध्ये बसूनच बाहेरचा अंदाज घ्यायला लागलो. मी रस्ता चुकलो नव्हतो एवढं नक्की आणि पारही तोच होता. पण बाबा काही दिसत नव्हते. शेवटी त्या पाराशेजारीच गाडी पार्क केली आणि नाईलाजानेच गाडीतून उतरलो. त्या असह्य उकाड्याने एकदम गुदमरल्यासारखं झालं. चेहरा आणि मान रुमालाने खसाखसा पुसले आणि शेजारच्या टपरीच्या दिशेने चालायला लागलो. टपरीपर्यंत पोचतोय ना पोचतोय तोच समोरच्या कोपऱ्यात खुणेचं लाल पागोटं दिसलं. होय तेच.. तेच तेच.. बाबाच होते ते. माझ्याकडेच बघत होते. अतिशय आनंदित होऊन मी त्यांच्या दिशेने हात हलवला. पण प्रत्युत्तरादाखल त्यांचा हात हलला नाही की चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. दमले असावेत. आणि ऊनही टिपेला होतं ! मी पटापट पावलं टाकत त्यांच्या दिशेने चालायला लागलो इतक्यात अचानक ते उठून उभे राहिले.

****************

वैतागून मी हातातली पिशवी खाली ठेवली आणि पारावर बसलो. खिशातून मोबाईल काढला आणि नंबर डायल केला.

"हॅलो"

"..."

"अग नाही. इथेच आहे अजून. आधीची एसटी चुकली माझी आणि आता पुढची एसटी कॅन्सल झालीये म्हणे. पुढे काहीतरी अपघात झाल्याने रस्ता बंद आहे"

"..."

"छे. आज जाणं तर नक्कीच होणार नाही. आता परत कसं यायचं बघतो."

"..."

"हो.. बरं फोन करतो नंतर."

आता परत जायला बस कधी आणि कुठून मिळेल काहीच अंदाज नव्हता. आता काय करायचं या विचारात मी इकडे तिकडे बघत तिथेच उभा होतो.

"राम राम"

थोड्या अंतरावरून आवाज आला. एक किंचित वयस्कर गृहस्थ डोळे मिटून शांत बसले होते. मीही हसून राम राम केलं. त्यांनी डोळे किंचित किलकिले उघडून हात हलवला. आता त्यांनी नुसतंच "बरं" अर्थाने हात हलवला की "इकडे या" या अर्थी हलवला हे मला समजलं नाही. आणि या आगजाळ उन्हाने किलकिले केलेले डोळे त्यांनी पुन्हा मिटूनही घेतले. मला तसंही काम नव्हतं आणि कदाचित बोलता बोलता बसची माहिती मिळेल या हेतूने मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो.

"नमस्कार"

"नमस्कार नमस्कार"

"भारीच ऊन आहे नाही?"

"या ऊन्हाचं कौतुक तुम्हा एसीवाल्यांना.. आम्हाला काय रोजचंच आहे" किंचित हसत ते म्हणाले. मीही हसलो.

"त्रासलेले वाटता"

"हुं"

"आणि तेही उन्हाने नाही"

अनोळखी माणसाशी एवढी जवळीक, चौकशी वगैरे मला जरा अप्रस्तुत वाटली. पण तरीही म्हातारबाबा कदाचित काळजीने किंवा सहज काहीतरी संभाषण पुढे न्यायचं म्हणून म्हणत असतील म्हणून मी ही म्हणालो.

"खरंय. पण तुम्हाला कसं कळलं?"

"ज्योतिषी आहे मी. फक्त चेहरा बघून सांगू शकतो"

"काय?? खरंच?"

म्हातारबाबा अचानक जोराने हसले. "नाही ओ. चेष्टा करत होतो तुमची. तुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं ना. त्या अंदाजाने म्हणालो फक्त".... मी काहीच बोललो नाही.

"काही समस्या आहे का?"

अचानक माझे सगळे प्रॉब्लेम्स त्यांना घडाघडा सांगून टाकून मोकळं व्हावंसं वाटून गेलं मला. अनोळखी माणसाला सगळं सांगून टाकल्याचा फायदा असा असतो की आयुष्यात तो पुन्हा आपल्याला भेटणार नसतो, अनोळखी असल्याने एकमेकांविषयी काही मतं किंवा पूर्वग्रह नसतात. समोरचा माणूस आपल्याला जज करणार नाहीये ही भावना मन मोकळं करण्यासाठी किती आवश्यक आहे हे तेव्हा मला प्रकर्षाने जाणवून गेलं !! ओळखीच्यांसमोर आपली रडगाणी गाऊन आपल्या 'स्व' ला धक्का लावून घेण्यापेक्षा हा पर्याय कितीतरी सोपा !!

काही समस्या?? त्या हिंदी चित्रपटातल्या "एक हो तो बताऊँ" सारखं म्हणावसं वाटलं मला.

"हम्म. अहो काही ना काही प्रॉब्लेम्स चालूच आहेत. एकही धड मार्गी लागत नाहीये. वैतागून आज शेवटी एका ज्योतिषीमहाराजांना भेटायला चाललो होतो. बरेच ज्ञानी आहेत असं ऐकून आहे. तिकडेच चाललो होतो तर नेमकी बसही नाहीये आता."

बाबांनी पुन्हा एकदा किलकिल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघितलं. पुन्हा डोळे मिटून काही वेळ शांत बसले आणि जरा वेळाने म्हणाले

"मी मगाशी चेष्टा करत नव्हतो. खरं सांगत होतो."

"म्हणजे?"

"भविष्याबद्दल"

"काय????? खरंच?"

"होय"

मग मगाशी थट्टा करतोय असं का म्हणालात?"

"ते उगाच. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही असं वाटलं म्हणून"

"तुम्ही खरंच ज्योतिषी आहात?"

"हो. आणि तोही कुडमुड्या नाही. चांगलं शास्त्रशुद्ध शिकलेला. तुमचा चेहरा बघताक्षणीच तुमच्या सगळ्या समस्या माझ्या नजरेसमोर आल्या. फक्त समस्याच नाही तर त्यावरचे उपायही"

"चेहरा बघताक्षणीच? कधी बघितलात तुम्ही चेहरा? आपण भेटल्यापासून तुमचे डोळे मिटलेले आहेत. अगदी आत्ताही" मी एक शेवटचा खडा टाकून बघितला,

"पहिल्या वेळी रामराम केलं तेव्हा दिसला तेवढंच दर्शन पुरतं मला. पण मला आधी आली होती ती शंका रास्त होती. तुमचा विश्वास बसणार नाही माझ्यावर. तुम्ही तुमच्या बसची शोधाशोध करा. मी निघतो"

"अहो तसं नाही" आता मात्र मी पुरता खजील झालो होतो. "प्लीज तुम्ही रागवू नका. तुमच्यावर अविश्वास दाखवण्याचा हेतू नव्हता माझा."

"हम्म.. असो"

"अहो बरेच प्रॉब्लेम्स चालू आहेत सध्या.. घरात, कामात........... "

"एक मिनिट.. " बाबांनी अचानक हात वर करून मला थांबवलं. "मी तुम्हाला तुमच्या समस्या विचारत नाहीये. मला त्या माहित आहेत असं म्हणालो मी. आणि त्यावरचे उपायही...!!! लक्ष नाहीये तुमचं"

"सॉरी. अहो तसं नाही."

"बरं. हे घ्या". त्यांनी खिशातून एक खडा काढला आणि माझ्या हातात दिला.

"तुमच्या घराजवळ गणपतीचं देऊळ आहे?"

"हो अगदी घरासमोरच आहे."

"अरे वा छान.. आणि शनीचं?"

"शनीचं? नाही. म्हणजे आहे पण ते खुपच लांब आहे"

"कितीही लांब असो. उद्यापासून रोज सकाळी उठायचं गणपतीच्या देवळात जायचं. बाहेरूनच दर्शन घ्यायचं. आत जायची गरज नाही. आणि त्यानंतर तिथून थेट शनीमंदिरात जायचं. तिथेही बाहेरूनच दर्शन घ्यायचं. आणि त्यानंतर ती दोन देवळं म्हणजे दोन बिंदू समजून त्या दोन्ही देवळांना मिळून एक अशा प्रदक्षिणा घालायच्या. पण आपल्या नेहमीच्या प्रदक्षिणांसारख्या नाही. धावत. जितक्या जास्त वेगात धावता येईल तितक्या वेगात"

"बरं"

"किती घालाल प्रदक्षिणा? एकवीस. आणि या सगळ्या प्रदक्षिणा सूर्योदयाच्या आत झाल्या पाहिजेत."

"सूर्योदयाच्या आत?"

"का काय झालं? जमणार नाही?"

"नाही नाही. जमेल."

"आणि हा खडा चोवीस तास तुमच्या बरोबर बाळगायचा. एक क्षणही अंतर द्यायचं नाही"

"बरं"

"आणि शेवटची अट म्हणजे आजपासून फक्त खरं बोलायचं. एक कणभरही खोटं नाही. असत्याचा अंशही नको."

"बरं"

"ठीक. या आता"

झालं? एवढंच? अजून काही नाही? पुन्हा भेट, दक्षिणा वगैर काहीच नाही? असे विचार करत मी तिथेच चुळबुळत उभा राहिलो. ते विचार जणु वाचल्याप्रमाणे पुन्हा ते स्वतःच म्हणाले "मी दक्षिणा वगैरे काही घेत नाही. रोज प्रदक्षिणा घालायला जेवढी मिनिटं त्याला दहाने गुणून तेवढे रुपये रोज बाजूला काढून ठेवा. त्या पैशाचं काय करायचं ते नंतर सांगेन. असो. मी सांगितले ते नियम अगदी मनापासून पाळा. बदल दिसेल. नक्की दिसेल. सुधारणा दिसायला लागली की मला इथेच येऊन भेटा. तेव्हा दक्षिणेचं बोलू. या आता" मी एकदम त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. आधी काही म्हणाले नाहीत पण नंतर अचानक मागे सरकले आणि म्हणाले "याची गरज नाही"

****************

बाबांनी सांगितलेल्या उपायांनी सुरुवातीला काहीच फरक जाणवला नाही. तरीही मी ते नेटाने करत राहिलो. प्रदक्षिणा, तो खडा, आणि असत्य टाळणं वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि बघता बघता एकदम फरक जाणवायला लागला. बुडायला आलेलं वर्कशॉप पुन्हा उभारी धरायला लागलं, हातात पैसे शिल्लक राहायला लागले, विकलेली गाडी थोडेसेच जास्त पैसे देऊन पुन्हा विकत घेतली, तब्येतीच्या कटकटी बघता बघता कमी होत गेल्या, झोपेच्या तक्रारी बंद झाल्या, हे म्हणजे एकदम जादूची कांडी फिरवल्यागत होत होतं सगळं !! बाबांना मी रोज मनोमन नमस्कार करत होतो. सुधारणा नक्कीच जाणवत होती. बाबांना भेटायला जायचं होतं पण कामाच्या व्यापात बघता बघता कसे १०-११ महिने उलटून गेले कळलंच नाही. गेल्या उन्हाळ्यात बाबांचे पाय धरून इथून निघालेलो मी पुन्हा या उन्हाळ्यात परतलो होतो. त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांना काय हवी ती दक्षिणा देण्यासाठी. खुणेच्या पाराच्या ठिकाणी येऊन मी कार थांबवली आणि दार उघडलं. कारचं दार उघडताक्षणी बाहेरचा रणरणता उकाडा झपकन आत शिरून कारमधला एसीचा गारवा खाऊन टाकायला लागला. मी चटकन दार लावून घेतलं. उरलेलं कोक संपवलं आणि कारमध्ये बसूनच बाहेरचा अंदाज घ्यायला लागलो.

****************

अतिशय आनंदित होऊन मी त्यांच्या दिशेने हात हलवला. पण प्रत्युत्तरादाखल त्यांचा हात हलला नाही की चेहऱ्यावर हसू उमटलं नाही. दमले असावेत. आणि ऊनही टिपेला होतं ! मी पटापट पावलं टाकत त्यांच्या दिशेने चालायला लागलो इतक्यात अचानक ते उठून उभे राहिले. माझ्याकडे पाठ केली आणि उलट दिशेने पावलं टाकायला लागले. पण चालण्याचा वेग अतिशय मंद होता. अचानक माझं लक्ष त्यांच्या हातातल्या लाल-पांढऱ्या छडीकडे गेलं. मी जागच्या जागी थिजून गेलो. वर्षभरात आपण बाबांची साधी चौकशीही केली नाही की त्यांना भेटायला आलो नाही. त्यांच्यावर एवढा भयानक प्रसंग ओढवला आणि आपल्याला त्याची साधी कल्पनाही नाही. खूप अपराधी वाटायला लागलं. मी जागच्याजागी थरथरायला लागलो. किंचित गरगरल्यासारखंही वाटायला लागलं आणि मी एकदम जमिनीवरच बसकण मारली. टपरीवाला माणूस धावत जवळ आला आणि माझ्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं. त्याने दिलेला चहाचा कप थरथरत्या हाताने कसाबसा प्यायल्यावर थोडी हुशारी आली. मी उठून उभा राहिलो. मी ठीक आहे हे बघितल्यावर तो जायला लागला. मी त्याला थांबवलं आणि त्याच्या हातात पाचाची नोट दिली आणि विचारलं

"हे बाबांचं असं कसं झालं? कधी झालं?"

"कोणाचं?"

"ते लाल पागोटंवाले बाबा."

"अच्छा ते. त्यांचं काय?"

"त्यांच्या डोळ्यांना काय झालं? काही अपघात वगैरे झाला का? कधी झाला?"

तो काही न बोलता माझ्याकडे वेड्यासारखा बघायला लागला.

"अरे मी काय विचारतोय? कळतंय का?"

"नाही कळत. खरंच कळत नाहीये"

"म्हणजे?"

"अहो ते म्हातारबा पहिल्यापासूनच आंधळे आहेत"

"काय?" आता वेड्यासारखं बघायची पाळी माझी होती.

"होय"

"अरे कसं शक्य आहे? त्यांनी माझा चेहरा बघून माझं भविष्य सांगितलं. माझ्या समस्या न सांगता त्यांना समजल्या होत्या, त्यावर त्यांनी उपायही सांगितले मला. अरे जेमतेम वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे. गणपतीचं देऊळ, शनीचं देऊळ, खडा, सत्य बोलायचं. विश्वास बसणार नाही एवढी प्रगती झाली माझी. कुठून कुठे पोचलो" असं बरंच बरंच काही मी बोलत राहिलो. बराच वेळ. तो फक्त किंचितसा हसला आणि तिथून जायला लागला.

-समाप्त

Wednesday, May 16, 2012

श्री. अभिजीत ताम्हणे यांस

परममित्र अभिनवगुप्त, उर्फ समीक्षाबाई नेटके, उर्फ (काही काळ) निनावी उर्फ .................... श्री. अभिजीत ताम्हणे यांस सप्रेम वंदे,

ताम्हणे, तुम्हाला एक गंमत सांगतो. लहानपणी मला लपाछपीचा खेळ अजिबात आवडायचा नाय. कारण माझ्यावर राज्य आलं की मला कधीच कोणाला शोधता यायचं नाय. मोठेपणी पुन्हा एकदा लपाछपीचं राज्य येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण माझ्या सुदैवाने बालपणीची शोधाशोधी करता न येण्याची सवय मी बदलू शकलो त्यामुळे बराच फायदा झाला माझा. तर लपाछपी !!! गेले काही दिवस आपली जी लपाछपी चालू आहे ना... लपाछपी म्हणजे ते नेहमीचंच आपलं की राज्य पुन्हा माझ्यावरच आणि माझी शोधाशोधी चालूच. मनापासून सांगतो ताम्हणे, मला ही लपाछपी खेळायची नव्हती. मला काही प्रश्न विचारायचे होते तुम्हाला, काही गोष्टींवर चर्चा करायची होती, काही शंकांचं निरसन करून घ्यायचं होतं, काही मुद्दे मांडायचे होते. त्यासाठी मोठ्या प्रयत्नाने शोधलं तुम्हाला. आता खरं सांगायचं तर 'मोठ्या प्रयत्नाने' हे म्हणजे फक्त म्हणायची पद्धत म्हणून. प्रत्यक्षात फार प्रयत्न करावे लागले नायत. तर काय सांगत होतो? हां..

- तर तुम्हाला फेसबुकवर शोधलं, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पण तुम्ही काही ती स्वीकारली नाय.

- तुम्हाला 'वाचावे नेटके' च्या आयडीवर पत्र पाठवलं कित्येकदा, त्यालाही उत्तर आलं नाय,

- 'वाचावे नेटके' वर दिलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेत माझा खराखुरा इमेल आयडी दिला होता. पण त्याचाही काही उपयोग झाला नाय.

- शेवटी ब्लॉगवर खुलं (अनावृत) पत्र लिहिलं, परंतु त्यालाही काही पोच आली नाय.

अर्थात मी काही एवढा मोठा माणूस नाय की तुम्ही माझ्या पत्रांना उत्तरं द्यावीत. मी तर एक सर्वसामान्य ब्लॉगर. कोणीही यावं आणि टपली मारून जावं. म्हणून मग अशा परिस्थितीत सर्वसामान्य ब्लॉगर जे करतो तेच करायचं ठरवलं. बास का आता? करून करून करणार काय मी? अजून एक खुलं पत्र लिहिणार.

तर वर म्हटल्याप्रमाणे काही प्रश्न विचारायचे होते. त्याआधी एक सांगतो. मीही डोंबिवलीचाच बरं का. असो.

१. ताम्हणे, आपलं डोंबिवलीत कधी कोणत्याही प्रसंगी, एखाद्या भेटीत, क्रिकेट मॅचमध्ये, नळाच्या रांगेत, वाण्याच्या दुकानात, फडके रोडवर, भागशाळा मैदानात, गणपती मिरवणुकीत वगैरे वगैरे कुठल्याही प्रसंगी भांडण झालं होतं का ओ?

२. मी तुम्हाला माझ्या ब्लॉगवरच्या एखाद्या पोस्टमधून जाणता/अजाणता कधी नावं ठेवली होती का?

३. मी कधी काळी एखाद्या मराठी संकेतस्थळावर कार्यरत असताना आपले काही मतभेद, वादविवाद, बाचाबाची, तूतू-मैंमै वगैरे काही झालं होतं का? हे कारण असेल तर मला तरी ते कधीच कळू शकणार नाय. कारण ते आयडी प्रकरण मला कधीच झेपलं नाय. त्यामुळे तुमचा आयडी कुठला वगैरे मला माहित नाय आणि मी त्या फंदातही पडलो नाय कारण सगळीकडे मी माझ्या नावानेच वावरत होतो. बादवे, आताचा वावर फक्त आणि फक्त ब्लॉग, हे तुमच्या अवांतर माहितीसाठी...

४. मागे तुम्ही प्रहारमध्ये 'समीक्षा नेटके' या नावाने लिखाण करत असताना मी तुमच्या कुठल्या लेखावर कधी काही तुमच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती का? किंवा ब्लॉगवर काही (तुमच्या दृष्टीने) आक्षेपार्ह लिहिलं होतं का?

ताम्हणे, मी हे सगळं अगदी मनापासून विचारतोय. कारण या सगळ्या प्रश्नांना माझं उत्तर एकच आहे. "माहीत नाय" !!!!!!..

खरंच सांगा यापैकी काही झालं होतं का? अरे मित्रा, मग कारण तरी काय होतं/आहे असं येता जाता, उगाचच्या उगाच एवढ्या मोठ्या वर्तमानपत्रातल्या, संपादकीय पानावर चालणाऱ्या सदराचा (गैर)वापर करून उगाच माझ्या ब्लॉगला टोमणे मारण्याचं, विचित्र भाषा वापरून लक्ष्य करण्याचं, आडून हल्ले करण्याचं. तू तर महेंद्र कुलकर्णींसारख्या ज्येष्ठ ब्लॉगरलाही सोडलं नायस. तुला ब्लॉगिंग आवडत नसेल. वपु आवडत नसतील, महेंद्र कुलकर्णींचा ब्लॉग आवडत नसेल, माझ्या ब्लॉगकडे तर ढुंकूनही बघायची इच्छा होत नसेल. ठीके रे.. चालतं. त्यात काहीच चूक नाय.. असते एकेकाची आवड निवड. पण म्हणून काय वैयक्तिक हिशोब चुकते करायला (कधीचे हिशोब ते तर फक्त देवच जाणे) 'लीडिंग इंटरनॅशनल मराठी न्यूज डेली' म्हणून मोठ्या मानाने मिरवणाऱ्या पेप्राचा वापर करायचा? (आम्ही त्याला लाडाने 'मिसलीडिंग' म्हणतो), संपूर्ण सदराला वेठीला धरायचं?

असो. क्षणभर, आपण असं समजू की वरच्या चारी प्रश्नांची तुमची उत्तरंही "नाय" अशीच आहेत. अहो फक्त समजा क्षणभरासाठी. तर आपण असं गृहीत धरू की आपल्यात काही एक वाकडं नव्हतं तर मग तुम्ही का केलंत असं? कोणाच्या सांगण्यावरून केलंत? तुमच्या 'मंदीरा'तल्या मित्रांच्या सांगण्यावरून की अन्य 'स्थळांच्या'?? म्हणजे ठिकाणच्या.... असो.

ताम्हणे, मी तुमच्या सदरातले सुरुवातीचे(सुद्धा) लेख वाचले आहेत. एखाद्या 'माहितगाराने' लिहिल्याप्रमाणे माहितीपूर्ण होते पण भारीच शब्दबंबाळ. जड-जड, अगम्य, अतर्क्य शब्दांचा पसारा. अशा विचित्र शब्दांनी भरलेली मोठमोठी वाक्यं. समीक्षा नेटके 'बनून' लिहायचात तेव्हाही असंच करायचात. पण तेव्हा थोडं तरी सुसह्य असायचं. पण आत्ता मात्र जड शब्दांचा नुसता गोंधळ माजला होता. पण शैली मात्र तीच.. समीक्षा नेटकेचीच. पहिल्या लेखातच ओळखलं होतं हो आम्ही सगळ्यांनी की ही म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून समीक्षा नेटकेच च च च.. असो.. मुद्दा तो नाय. तर असे जड शब्दांनी भरलेले त्याहून जड लेख वाचले न गेल्याने सदराला स्वस्तात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी केलंत का हे? सगळेजण असंच म्हणतायत. (अर्थात मी तर म्हणतोच आहे.)..

असो. अजूनही काही बिघडलेलं नाय. एक काम करा. माझ्या ब्लॉगवर 'माझे ब्लॉगु-ब्लगिनी !!' आणि 'मला हे भावतं !!!' हे दोन उल्लेख दिसतायत? त्याखालच्या कुठल्याही दुव्यावर क्लिक करा, कुठलाही लेख उघडा आणि वाचून पहा. किती वेगवेगळ्या प्रकारचं, निरनिराळ्या शैलीत, असंख्य विषयांवर लिहिलंय बघा लोकांनी. काय लिहिलंय ते नव्हतं हायलाईट करायचं मला. दाखवायचं हे आहे की किती साध्या सोप्या सरळ शब्दांत लिहिलंय बघा. उगाच 'विचक्षण' नाय की 'जीवनशैलीची अपरिहार्यता' नाय की 'उद्वेग दाटून येणं' नाय. जे सांगायचं ते उगाच भलत्या शब्दांशी न खेळता, हलत्या भाषेच्या तिरप्या गिरक्या न घेता सरळ वाक्यांत लिहिलंय.

एक काम करा.. अशा साध्या भाषेत लिहून बघा येत्या सोमवारचं 'वाचावे नेटके', नाय उड्या पडल्या वाचकांच्या, नाय धावायला लागलं सदर तर माझा ब्लॉग बंद करेन मी ! मागे एकदा माझ्याच ब्लॉगवर 'तुमच्या मित्रमैत्रिणींना'सुद्धा हे 'माझे ब्लॉगु-ब्लगिनी !!' आणि 'मला हे भावतं !!!' बद्दल असंच सुचवलं होतं मी. त्यांनी वाचलं की नाय याची कल्पना नाय. बहुतेक नसावं वाचलं. म्हणून तर तुम्हाला सुचवलं नाय ना त्यांनी !

कसं आहे ताम्हणे, की तुम्ही तुमच्या सदरात उगाच सगळ्यांचं कौतुक करत सुटावंत, वारेमाप स्तुती करावीत असं कोणाचंच म्हणणं नाय, कोणीच अपेक्षा करत नाय तशी. दोष दाखवा ना, ठेवा नावं. कोण नाय म्हणतंय? पण दोष दाखवायचीही एक पद्धत असते हो. मी म्हणतो म्हणून नाय रीतच आहे तशी. सगळ्या स्त्री ब्लॉगर्सना एका फटक्यात "दुपारच्या मासिकंवाल्या" म्हणणं किंवा मग उगाच चार लेख वाचून पूर्ण ब्लॉगला, त्यातल्या भाषेला अश्लाघ्य भाषेत नावं ठेवणं (आणि वर चार लेख वाचून सदर लिहिण्याच्या पद्धतीचं समर्थन करणं) हे सगळं कोण सहन करेल? आणि कोणी का सहन करावं? आता पुन्हा प्लीज तुमच्या 'त्या मित्रमैत्रिणीं' प्रमाणे म्हणू नका की आंतरजालावरच्या लिखाणावर टीका होणारच वगैरे वगैरे. मी याचं उत्तर आधीच्या लेखात आणि त्याआधीच्या लेखातही दिलं आहे. तुम्ही लोकांकडे ब्लॉग्जच्या शिफारशी मागितल्यात म्हणून तुम्हाला लोकं दुवे (लिंक हो लिंक) देतायत. अर्थात त्या न्यायाने आणि (तुमच्याच) नियमाने तुम्ही माझ्या ब्लॉगबद्दल काहीच लिहायला नको कारण माझा ब्लॉग मी किंवा कोणीही तुम्हाला सुचवलेला नाय. असो.. तर पुन्हा तेच.. शिफारशी मागितल्यात म्हणून दिल्या, प्रत्येक ब्लॉग आवडलाच पाहिजे असं काही नाय. नाय आवडला तर सोडून द्या किंवा योग्य शब्दांत टीका करा ज्यामुळे तो ब्लॉगलेखक खच्ची न होता उलट त्याला अजून लिहायला उभारी येईल. आणि हो.. टीका करताना शक्यतो जमल्यास "बुडाखाली" , "च्यायला" वगैरे शब्द टाळता आले तर बघा. लोकही त्याच शब्दांत उत्तरं देऊ शकतात हो.

चला. हरकत नाय... ! झालं तितकं पुरे झालं, सांगायचं ते सांगून झालं. बोळा निघाला. पाणी वाहतं झालं..

फॉर द रेकॉर्ड, माझ्या दृष्टीने या प्रकरणावर पडदा पडला !!!

जय ब्लॉगिंग !!!!!!

Sunday, May 13, 2012

च्यायला, हेही पत्रकार झाले !!माननीय गिरीश सर,

ताकाला जाऊन भांडं लपवण्यात किंवा लपवलेलं भांडं तासभर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर हळूच बाहेर काढण्यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे पहिल्याच ओळीत सुरुवात करतो. सध्या लोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाच्या एका सुमार सदराला संपादकीय पानावर स्थान मिळत आहे. लोकसत्ताची मतं पटत नसूनही मी अनेक वर्षं लोकसत्ता नियमित वाचतोय. परंतु मतं पटत नसली तरीही लोकसत्ता/संपादक इत्यादींवर वैयक्तिक चिखलफेक करणे वगैरे बालिश भानगडीत मी कधीच पडलेलो नाही. जेव्हा जेव्हा तीव्र मतभेद झाले तेव्हा तेव्हा त्या त्या बातमीच्या खाली मी माझी प्रतिक्रिया नोंदवली आहे. (छापणे-न छापणे लोकसत्ताच्या (तथाकथित) पॉलिसीवर अवलंबून..). जेव्हा असंवेदनशीलपणाचा कहर होतो आहे असं वाटलं (उदा दिनांक १५ जुलै२०११ चं चिदंबरम यांच्यावर लिहिलेलं अन्वयार्थ.) तेव्हा मी स्वतः तुम्हाला इमेल करून माझा तीव्र निषेध नोंदवला आहे. 

हे सगळं एवढ्या सविस्तरपणे मांडायचं कारण इतकंच की माझं भांडं स्वच्छ आहे परंतु वेळोवेळी लोकसत्ता उर्फ 'वाचावे नेटके' च्या नासलेल्या ताकाने ते खराब होतंय हे दाखवणं. लोकसत्तासारख्या आघाडीच्या (निदान मुंबईत तरी.) दैनिकाला ब्लॉगरांवर सदर लिहितोय असं दाखवून उगाच त्यांना टपल्या मारत सुटणे, अपमानास्पद बोलणे, टोमणे मारणे, वैयक्तिक हल्ले करणे, डिवचणे असे (माझ्या आणि सर्वसामान्य ब्लॉगर्सच्या दृष्टीने) हलक्या दर्जाचे प्रकार करणं शोभत नाही. तुमच्या या सदरात वैयक्तिक माझ्यावर विनाकारण, काहीही गरज नसताना आणि अजिबात संबंध नसताना दोन वेळा थेट आणि अनेकवेळा आडून हल्ले झालेले आहेत. त्या सगळ्यांची जंत्री मी या क्षणी देऊ शकतो आणि देऊ इच्छितो. पहिल्या वैयक्तिक हल्ल्याला मी त्याच भाषेत माझ्या ब्लॉगवरून उत्तर दिल्यानंतर हे प्रकार वाढले आहेत. पहिला थेट हल्ला झाला तो दिनांक १२ मार्चच्या लेखात. 

" काहीवेळा काय वाट्टेल तेकिंवा हरकतनायसारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते. "

श्री अभिनवगुप्त यांच्या लेखनाच्या दर्जा, खोली आणि व्याप्ती यावर थेट टिप्पणी करण्याचं टाळूनही मी त्यांचं एका गोष्टीसाठी कौतुक करू इच्छितो. ते म्हणजे सुरुवातीचे काही आठवडे त्यांनी भविष्य, पानिपत, भूकंप, पाकिस्तान, सिरीयामधली यादवी, आंतरराष्ट्रीय अनुवादक, इराण युद्ध, चित्रकला आणि कलासमीक्षक किंवा न्यूयॉर्क टाईम्स मधल्या संपादकीयांचा काही भाग अशा देशविदेशांतल्या अनेक ब्लॉग्जविषयी लिहूनही त्या विषयांमधल्या अंगभूत जडपणापायी आणि त्याहीपेक्षा श्री अभिनव गुप्त यांच्या अजून जड शब्द वापरून स्वतःच्या अगम्य शैलीत ते लिहिण्याच्या अट्टाहासापायीच त्यांनी हे विशेष चालत नसलेलं सदर "घटं भिंद्यात पटं छिंद्यात" करून का होईना चालवण्यासाठी त्यांनी बॉलीवूडछाप मार्गाचा आधार घेण्याचं ठरवलं. 

माज किंवा अहंकार म्हणून सांगत नाही परंतु माझ्या ब्लॉग हिट्स पावणे दोन लाखाच्या वर आहेत, २३४ जण माझ्या ब्लॉगचे फॉलोअर्स आहेत आणि किमान १३० जणांनी माझा ब्लॉग इमेल मधून सब्स्क्राईब केलेला आहे. 'काय वाटेल ते' ब्लॉग लिहिणारे महेंद्र कुलकर्णी तर समस्त ब्लॉगर्सचे आदर्श आहेत ते त्यांच्या लेखनाच्या वारंवारतेमुळे, विषयांच्या वैविध्यामुळे आणि कुठलाही विषय सोपा करून सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे. 'काय वाटेल ते' ची आजची वाचक संख्या जवळपास ९ लाख आहे, किमान ७१३ लोकांनी त्यांचा ब्लॉग इमेलमधून सब्स्क्राईब केलेला आहे. (आम्ही दोघेही कुठल्याही मराठी संकेतस्थळांवर लिहीत नाही (पूर्वी लिहीत असलो तरी आता सोडलं आहे) हे आमच्यातलं एक साम्य). मला वाटतं एवढी कारणमीमांसा आणि पुरावे दिल्यावर न चालणाऱ्या सदराला चालवण्यासाठी आमच्या ब्लॉग्सवर वैयक्तिक हल्ला का झाला असावा किंवा कोणाच्या 'प्रेरणेने' झाला असावा हे आपल्यासारख्या विद्वान आणि बॅलंस्ड संपादकाला समजावून सांगणे म्हणजे आपला (तुमचा) अपमान करण्यासारखं आहे. तेव्हा कारणमीमांसेचा भाग इथेच थांबवतो.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या १२ मार्चच्या लेखापर्यंत श्री अभिनव गुप्त हे निनावी होते. लेखाखाली कोणाचंही नाव नसायचं. परंतु निनावी हल्ले करणाऱ्या श्री गुप्त यांच्यावर अनेक ब्लॉग, फेसबुक भिंतीं आणि काही मराठी संकेतस्थळांवर टीका झाल्यानंतर अचानक 'हजला जावं' त्याप्रमाणे स्तंभलेखकाने त्या लेखांखाली श्री अभिनव गुप्त असं नाव द्यायला सुरुवात केली. (यातलं श्री हे मी माझ्या सोईने वापरलं असून काही चुकलं असल्यास आत्ताच माफी मागतो)

आता माझा नक्की आक्षेप कशावर आहे ते पुराव्यासकट सांगतो. 

भाग १ : वैयक्तिक हल्ले

१. माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन सर्वप्रथम थेट हल्ला झाला तो वर म्हटल्याप्रमाणे १२ मार्चच्या सदरात.

काहीवेळा काय वाट्टेल तेकिंवा हरकतनायसारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते. 

२. १२ मार्चच्या सदरातलाच हा अजून एक उल्लेख पहा.

महिलांसाठीची दुपारची मासिकंहा सर्वच काळात हसण्यावारी नेण्याचा, पण मोठा वाचकवर्ग असलेला प्रकार होता. त्यात येणाऱ्या कथा वा लेखांवर वाचकांमधून मनात तरंग उमटले..पद्धतीच्या प्रतिक्रिया असत. त्या प्रतिक्रिया लिहून, टपालानं संबंधित मासिकापर्यंत पाठवल्या जाण्याची शक्यता फार कमी होती आणि जर कुणी पाठवलीच तर ती छापली जाई. अशा पत्रांना बाकीचे वाचक खुशीपत्रंसमजत आणि सोडून देत. 

आता तुम्हाला मुद्दा क्रमांक एक मधला विघ्नसंतोषीपणा लक्षात येईल !  

३. १२ मार्चच्या सदरातील आक्षेपार्ह उल्लेखामुळे संतापून श्री महेंद्र कुलकर्णी यांनी तुम्हाला म्हणजे श्री गिरीश कुबेर यांना थेट पत्र लिहिलं. ते पत्र चुकीचा मुलामा देऊन १९ मार्चच्या सदरात छापण्यात आलं. हे तुमच्या परवानगीने झालं की कसं यावर मी मतप्रदर्शन करू इच्छित नाही. तो तुमचा आणि श्री अभिनवगुप्त यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

४. आजच्या म्हणजे १४ मेच्या 'वाचावे नेटके' च्या सदरात पुन्हा एकवार माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन हल्ला झालेला आहे. (आणि अवांतर म्हणजे ही टीका करताना श्री अभिनव गुप्त यांनी तळटीपा देण्याची एका ब्लॉगरची शैली जशीच्या तशी चोरली आहे !!!!)

तर तातडीनं वाचावे नेटकेबंदच करा, अशी मोहीम (अशा संभाव्य मोहिमेतले पहिले १५ ब्लॉगर तर घरचेच असल्यानं) सुरू व्हायला हरकत नाही.*
* (या वाक्यातील हरकत नाहीहा शब्द वाचावे नेटकेचा गटणेपणा अगदीच सिद्ध करणारा नाही काय?) 

कुबेर सर, माझ्या ब्लॉगचं युआरएल हरकतनाय.कॉम असं आहे (FYI)

भाग २ : मराठी ब्लॉगर कम्युनिटीवरील हल्ले

१. १२ मार्चच्या सदरात समस्त स्त्री ब्लॉगर्सना वेठीला धरलं गेलंय (हे मातृदिनाच्या दिवशी तुमच्यापर्यंत पोचावं हा अपूर्व योगायोगच !!).. हा उल्लेख पहा.

अनेकजणींचे  ब्लॉग आज दुपारच्या मासिकांची उणीव भरून काढतात. अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका मनातलंलिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो. 

तुमचे श्री अभिनव गुप्त किती स्त्री ब्लॉगर्सचे ब्लॉग्ज वाचतात हा नियमित ब्लॉगिंग करणाऱ्या आणि मराठी ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निदान माझ्यासारख्या ब्लॉगरसाठी आणि अन्य कित्येक ब्लॉगर्ससाठी मोठाच प्रश्न आहे. किंबहुना फक्त स्त्री-ब्लॉगर्सचेच नव्हे तर एकुणातच ते किती ब्लॉग्ज वाचतात आणि किती ब्लॉग्ज पूर्ण वाचतात हाच खरा प्रश्न आहे. कारण कुठल्याही पुस्तकाची चार पानं वाचून किंवा कुठलाही चित्रपट १५ मिनिटं बघून त्या पुस्तकाचं किंवा चित्रपटाचं समीक्षण करणं आणि कुठल्याही ब्लॉगवरचे २-३ लेख वाचून त्या ब्लॉगवर राष्ट्रीय दर्जाच्या वृत्तपत्रांतून लाथाळ्या झाडणं हा माझ्या दृष्टीने सारखाच प्रकार. फरक इतकाच की चित्रपट आणि पुस्तकाच्या बाबतीत असला बालिश प्रकार करणारे समीक्षक (आमच्या) सुदैवाने निदान आजच्या काळात तरी उपलब्ध नाहीत. (आणि श्री अभिनव गुप्तच्या प्रेरणेने असली फळी जन्मालाही न येओ ही सदिच्छा)

कदाचित तुम्ही म्हणाल की श्री अभिनव गुप्त संपूर्ण ब्लॉग वाचत नाहीत असा दावा तू कशाच्या आधारावर करतो आहेस? तर हे बघा त्याचं उत्तर.

२. ९ एप्रिलच्या सदरातला हां उल्लेख.

 ओळख करून घ्यावी आणि पुढे वाचत राहावेत अशा ब्लॉग वा संकेतस्थळांवरल्या ताज्या नोंदींआधारे त्यांवर टिप्पणी आणि भाष्य करताना, हेतू तपासण्यासाठी अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील, तेवढय़ा वाचणं इष्ट ठरतं. 

"अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील" म्हणजे काय? म्हणजे नक्की किती? हे कोण ठरवणार? श्री अभिनव गुप्त हे का ठरवणार? हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कसा?

"कारण श्री अभिनव गुप्त हे सदर चालवतात" असं बिनाशेंड्या-बुडख्याचं उत्तर इथे अर्थातच ग्राह्य नाही. असो.


३. आता अनेक छोटी छोटी उदाहरणं देतो की ज्यांत त्या त्या ब्लॉग्ज/ब्लॉगर्सवर विनाकारण हल्ले केले गेलेले आहेत. ५ मार्चच्या लेखात मुख्यमंत्री नावाच्या ब्लॉगवर टीका करण्यासाठी आणि लाथाळ्या झाडण्यासाठी खर्ची घातलेला एक संपूर्ण परिच्छेद. आणि दुसऱ्या परिच्छेदात दुसऱ्या एका ब्लॉगला वेठीस धरण्याचा प्रकार.

एक बाब स्पष्ट करून सांगतो की "जेव्हा तुम्ही तुमचं लेखन आंतरजालावर प्रसिद्ध करताय तेव्हा तुम्ही त्यावरील टीकेला तयार असलं पाहिजेत" वालं दिशाहीन आणि चुकीचं समर्थन इथे पूर्णतः गैरलागू आहे. कारण इथे श्री अभिनव गुप्त स्वतः लोकांकडून ब्लॉग्जच्या शिफारशी मागत आहेत (संदर्भ : २ जानेवारीच्या पहिल्या लेखात श्री अभिनव गुप्त (परंतु त्या दिवशी निनावी) यांनी केलेलं आवाहन). आणि जर लोकांनी स्वतःचे किंवा स्वतःला आवडणारे ब्लॉग्ज केवळ आणि केवळ श्री अभिनव गुप्त यांच्या मागणीप्रमाणे दिले तर श्री अभिनव गुप्त यांनी ते ब्लॉग 'संपूर्ण' (point to be noted, Me lord) वाचून ते आवडले नाहीत तर सोडून देऊन अन्य ब्लॉग्ज वाचावेत आणि जे आवडतील ते छापावेत असं अपेक्षित आहे. चांगल्या ब्लॉग्जच्या ओळखीसाठी हे सदर सुरु केलं असून (पुन्हा एकवार २ जानेवारीच्या आवाहनाचाच संदर्भ) जे ब्लॉग्ज आवडले नाहीत त्यांच्यावर लाथाळ्या झाडण्यासाठी नव्हे !

४. १९ मार्चच्या शीर्षकातच 'साडेतीन' टक्क्यासारख्या आक्षेपार्ह बाबीचा उल्लेख करून श्री अभिनव गुप्त यांना नक्की काय म्हणायचं आहे हे केवळ तेच जाणोत !

५. १९ मार्चच्या लेखातलं हे वाक्य स्तंभलेखकाच्या छुप्या हेतूंना बोलकं करण्यासाठी पुरेसं ठरावं.

अशा वेळी आणि अशा स्थितीत वाचावे नेट-केमुळे सध्यातरी गैरसमज होऊ आणि वाढू शकतात, याचा मासला ठरणारं एक पत्र सोबत आहे.  

पुन्हा एकदा १९ मार्च. शीर्षकात पुनःश्च एकवार साडेतीन टक्क्यांचा उल्लेख !! आणि त्याहीपुढे एका चांगल्या ब्लॉगचं कौतुक करण्यापूर्वी न चुकता ओढण्यात आलेले ताशेरे.

एक आहे प्रसाद चिक्षे यांचा ब्लॉग. मराठीत, आणि किमान गुगल-क्रोमवर उघडणे कठीण. शिवाय एका वेळी एकच नोंद येताना फार वेळ खाणारा हा ब्लॉग, असा विविध सिस्टीम्सवरचा अनुभव आहे. ही तांत्रिक अडथळय़ांची शर्यत जिंकलात, तर जणू बक्षीस म्हणून  

"गुगल क्रोमवर उघडू नका" हे एवढं साधं चार शब्दांत सांगणं किती सोपं आहे. परंतु श्री अभिनव गुप्त यांनी आपल्या अंगभूत (दुर्) गुणाने किमान ३८ शब्द त्यासाठी खर्ची घातले आहेत !!!

७. आता त्याच लेखात हा अजून एक आक्षेपार्ह उल्लेख 

नोंदींची भाषा बाळबोध म्हणावी, अशी आहे. ब्लॉगलेखक प्रसाद चिक्षे यांना भाजपसारख्या पक्षाच्या प्रसिद्धीविषयक कामासाठी बोलावणे आले होते असा निष्कर्ष ब्लॉगवरील कुठल्या तरी एका सूचक उल्लेखाचा जरा विचार केल्यावर काढता येत असला, तरी त्यावर विश्वास बसणे कठीण व्हावे, अशी भाषेची रीती! 

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास श्री अभिनव गुप्त यांच्या निरर्थक आणि प्रामुख्याने शब्दबंबाळ मराठीपेक्षा मी कुठलंही साध्या भाषेतलं लिखाण कधीही आवडीने वाचेन. पण एखाद्या ब्लॉगरच्या भाषाशैलीवरून त्याला एखादा राजकीय पक्ष कामासाठी बोलावू शकेल की नाही यावर गृहीतक मांडणं हा निखळ मुर्खपणा !! या निरर्थक आणि बिनबुडाच्या मतप्रदर्शनाचा अधिकार श्री अभिनवगुप्त यांना दिला कोणी? ते भाजपचे राष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत की भाषातज्ज्ञ??? माझ्या मते तरी "यापैकी नाही" हेच उत्तर योग्य आहे नाही का?

८. १२ मार्चच्या लेखातील स्त्री ब्लॉगर्सबद्दलच्या अवमानकारक उल्लेखानंतर त्या उल्लेखाच्या निषेधार्थ त्या लेखाखाली अनेक प्रतिक्रिया आल्या (आणि लोकसत्ताने त्यातल्या कित्येक छापल्याच नाहीत) आणि अनेक ब्लॉगलेखकांनी आपल्या ब्लॉगवर/फेसबुक भिंतीवर त्याबद्दल निषेध नोंदवला. त्यानंतर अचानक श्री अभिनव गुप्त यांना १२ मार्चपर्यंत स्त्री ब्लॉगर्सचे दुपारच्या मासिकांची उणीव भरून काढणारेब्लॉग्ज या निषेधमालिकांनंतर अचानक १९ मार्चच्या दिवसापासून  शुद्ध हेतूने लिहिले गेलेलेवाटायला लागले. कंप्लीट युटर्न !!! हा पहा १९ मार्चच्या लेखातला पुरावा.

आपण हेतूंबद्दल बोलत होतो.  अनेकदा, ब्लॉगलेखन करणाऱ्या स्त्रियांचे हेतू अधिक शुद्ध असल्याचं दिसतं. हा नियम नाही. असा लिंगविषमतामूलक नियम मानूही नये. पण तरीही दिसतं. ब्लॉगलेखन करणारा जो आवाज वाचकापर्यंत पोहोचतो, तो तपशिलांमधून जाणवतो. तपशील मांडणं म्हणजे माहिती देणंअपरिहार्यपणे आलंच. पण माहिती कशाची द्यायची आहे, त्यातून काय सांगायचं आहे, हे महत्त्वाचं मानण्याची वृत्ती असलेल्या २५ ब्लॉगरपैकी २० स्त्रियाच असतात.. आणि या सर्वच्या सर्व- म्हणजे वीसहीजणींच्या ब्लॉग-लिखाणात अनेकदा, स्वत:सकट सर्वाना पुन्हा पाहण्याची, तपासून घेण्याची विश्लेषक वृत्ती दिसते! स्वत:च्या जगण्याचे हेतू दुसऱ्यांच्या जगण्यातही  मिसळलेले असतात, ही व्यक्तिबाह्य अस्तित्वाची पातळी मान्य करणं बहुधा पुरुषांना जमत नसावं, त्यालाही सामाजिकच कारणं असावीत. पण हेतू तपासणारं विश्लेषण मराठी ब्लॉगांवरून करण्यात सध्या स्त्रिया पुढे आहेत. 

९. आता हा अजून एक विनोदी उल्लेख ९ एप्रिलच्या लेखातला.

(आणि वाचन, अभ्यास वगैरे नसावं) असं त्यांच्या ब्लॉगवरला मजकूर वाचून वाटत राहतं. मग लक्षात येतं की, फक्त तरुण वयावर खापर फोडून चालणार नाही. भाषा ज्या हेतूंसाठी वापरली जाते आहे, ब्लॉग ज्या प्रकारच्या संवादासाठी लिहिला जातो आहे, तो हेतू एकतर लेखकाला स्पष्ट आहे का आणि वाचकाला पटण्यासारखा आहे का, हे अखेर ब्लॉगचा मगदूर ठरवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं

श्री अभिनव गुप्त यांनी लोकांच्या भाषेवर आक्षेप घेणे हे म्हणजे "शीशे के घर मे....." वाल्या संवादासारखं झालं !!

१०. आता ३० एप्रिलच्या लेखाची ही सुरुवातच बघा.

माझे जीवनगाणे माझ्या ब्लॉगमधून मी ऐकवणारहा आग्रह अनेकांचा असतो आणि तो अत्यंत कडक आग्रह असतो, हे वाचावे नेटकेबद्दल ज्या चर्चा- प्रतिसाद- प्रतिक्रिया बाहेर अन्यत्र चालताहेत, त्यांतून कुणाच्याही लक्षात येईल. 

थोडक्यात हे सगळं जाणूनबुजून चालू आहे आणि स्तंभलेखक त्यातला विकृत आनंद उपभोगत आहे हेच स्पष्ट होतं. यावरून जॉर्ज बर्नार्ड शॉचं "Never to wrestle with a pig. You get dirty, and besides, the pig likes it." वालं वाक्य आठवलं. असो.

भाग ३ : अशुद्ध, चुकीची आणि न समजणारी मराठी 

१. २७ फेब्रुवारीच्या लेखातला हा उल्लेख.

अभिनिवेश नाही, पण अतिरेकी निष्ठा! लेखक बहुतेकदा अभ्यासू, पण सारा अभ्यास त्या निष्ठांच्या कक्षेतला. मुद्दा अगदी वकिली बाण्यानं, जणू काही तर्कशुद्धपणेच पटवून दिलेला वरकरणी दिसेल, पण अर्धसत्यच लोकांपुढे मांडून तो आधार कसा निर्णायक आहे हे पटवण्याचा आटापिटा करणं, चुकीच्या किंवा अयोग्य मुद्दय़ांपायी शब्दांचं जाळं रचणं, हे दोष या लिखाणात नेहमीच असतात. 

स्वतः एवढं विचित्र, अतर्क्य आणि अगम्य मराठी लिहिणाऱ्या श्री अभिनव गुप्त यांनी अन्य ब्लॉगर्सवर "शब्दांचं जाळं रचणं" हा आरोप करणं हे म्हणजे विरोधाभासाचा माउंट एव्हरेस्ट म्हणावं लागेल !!

२. १२ मार्चच्या लेखातला हा उल्लेख म्हणजे इतर काही नसून फक्त स्वतःला माहित असणारे काही जडबंबाळ शब्द त्यांचे अर्थ न तपासता एकापुढे एक लिहिण्याचा हास्यास्पद प्रयत्न म्हटला पाहिजे !

आपल्या जीवनशैलीबद्दल आपल्याच भाषेत वाचायला मिळणं, ही विचक्षण नसलेल्या सामान्यवाचकांची गरज असते. ती कुठल्याही भाषेत असतेच. जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं, हाच या वाचनाचा उद्देश असू शकतो, पण वाचकांना तो या शब्दांमध्ये माहीत नसण्याचीच शक्यता अधिक असते! 

"विचक्षणा नसलेला सामान्य वाचक" आणि "जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं" ही दोन वाक्य दिनांक १२ ते १९ मार्चच्या आठवड्यात त्यांच्या अर्थांसाठी सर्वाधिकपणे गुगल केली गेली (आणि तरीही कोणालाही त्याचा अर्थ उमगला नाही) असं ऐकून आहे !!

३. ९ एप्रिलच्या लेखातला हा असाच अजून एक विनोदी उल्लेख.

स्त्री-ब्लॉगर फक्त स्वत:बद्दल लिहितात म्हणून त्या किती छानपैकी हेतू तपासू शकतात, असा छुपा वारही कुणी करू नये. 

असले तिरपागडे आरोप अन्य कोणी नाही तर स्वतः श्री श्री अभिनव गुप्त करताहेत हा तपशील ते सोयीने विसरताहेत. 

४. २३ एप्रिलच्या लेखातला शेवटच्या परिच्छेदातला हा उल्लेख बघा.

आणि च्यायला.. हेही ब्लॉगर झाले

आणि श्री अभिनव गुप्त यांची एकूण शब्दनिवड पाहता मला १०१% खात्री आहे की त्यांनी शीर्षकातही हाच शब्द वापरला असणार परंतु आपण किंवा आपल्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ आणि ज्ञानी संपादक/पत्रकाराने वेळीच हस्तक्षेप करून 'च्यायला' ला 'अरेच्चा' मध्ये बदललं असेल. त्यामुळे २३ एप्रिलच्या लेखाचं शीर्षक 'वाचावे नेट-के : अरेच्चा.. हेही ब्लॉगर झाले !' असं मर्यादापूर्ण दिसतोय. माझ्या तीस वर्षांच्या वर्तमानपत्र वाचनाच्या अनुभवात  'च्यायला' सारखा शब्द संपादकीय पानावरील स्तंभात वाचण्याचा हा केवळ पहिला आणि कदाचित एकमेवच योग !!

ब्लॉगर्सवरील यथेच्छ लाथाळीने भरलेल्या या सदरातील आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये एक अपवाद मात्र नक्कीच दिसला. तो म्हणजे श्री चंद्रशेखर आठवले यांच्या ब्लॉगविषयीचा ७ मे २०१२ चा लेख. पण अर्थात एकही अपशब्द न वापरता किंवा खोडसाळपणा न करता हा लेख लिहिण्याचं कारण म्हणजे म्हणजे श्री अभिनव गुप्त यांच्या विचारात झालेला बदल नसून श्री गोखले यांच्यासारख्या ज्ञानी, तल्लख आणि व्यासंगी ब्लॉगरबद्दल अपशब्द काढण्याएवढी आपली पात्रता नाही की प्राज्ञा नाही हे श्री अभिनव गुप्त यांनी त्यांच्या सुदैवाने ओळखलं हे आहे. !!!

आता अजून एक अतिशय महत्वाचं परंतु कित्येकांना न रुचणारं निरीक्षण नोंदवू इच्छितो. ज्या ब्लॉग्जची अतिशय स्तुती करण्यात आलेली आहे ते ब्लॉगर्स एक तर कुठल्या ना कुठल्या मराठी संकेतस्थळाचे प्रतिनिधी आहेत किंवा ज्यांनी कुठल्याही मराठी संकेतस्थळाशी जाणीवपूर्वकच संबंध ठेवलेला नाही (उदा श्री चंद्रशेखर आठवले). माझ्या ब्लॉगची शप्पत घेऊन सांगतो की त्यांच्याची माझं वैयक्तिक शत्रुत्व मुळीच नाही की त्या ब्लॉग्जचं कौतुक झाल्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही असूया नाही. उलट एक मराठी ब्लॉगर या नात्याने दुसऱ्या एका मराठी ब्लॉगरचं कौतुक होणं हे माझ्यासाठी खचितच अभिमानास्पद आहे आणि त्याउपर जाऊन म्हणायचं तर श्री अभिनवगुप्त सारख्या छिद्रान्वेषी इसमाला निदान कुठल्यातरी ब्लॉगबद्दल त्या ब्लॉगला लाथा न घालता निव्वळ स्तुरी करावीशी वाटली हे पाहून तर तो अभिमान अजूनच दुणावला. असो.

श्री अभिनव गुप्त यांच्या माझ्यासारख्या मराठी ब्लॉगर्सच्या ब्लॉगपोस्टमधील लिंक्स मधून (का होईना) वाचक वाचावे नेटके पर्यंत पोहोचोत अशा विक्षिप्त हेतूला बळी न पडता मुद्दामच वाचावे नेटकेच्या लिंक्स न देता लेखांतले आक्षेपार्ह उल्लेख इथे कारणांसहित नोंदवले आहेत. तुम्ही त्याची योग्य ती दखल घ्यालच. अर्थात फक्त दखलच आणि कारवाई नाही कारण "च्यायला, हेही पत्रकार झाले !!" 

दर सोमवारी प्रसिद्ध होणारे हे सगळे लेख इतक्या काळजीपूर्वक आणि बारकाईने वाचता की नाही याची खात्री नसल्याने मुद्दाम सगळे मुद्दे आणि आक्षेप कारणांसहित तुमच्यासमोर मांडत आहे. जाता जाता एकच छोटा प्रश्न विचारावासा वाटतो की इतक्या मोठ्या वृत्तपत्रात अशा प्रकारचं सदर चालवणं यासाठीची पात्रता काय आहे? कारण आजच्या घडीला कित्येक ब्लॉगर-पत्रकार आंतरजालावर आणि वर्तमानपत्रांमध्ये उपलब्ध आहेत जे वृत्तपत्रीय लेखन आणि ब्लॉगलेखन हे दोन्ही सारख्याच ताकदीने सांभाळतात आणि त्यातल्या कित्येकांना मी वैयक्तिक ओळखतो. कदाचित ते श्री अभिनव गुप्त यांच्यापेक्षा वयाने आणि पदाने कनिष्ठ असतील परंतु त्यांचं लेखनकौशल्य निर्विवादपणे श्री अभिनव गुप्त यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे तसंच कुठलाही पूर्वग्रह ठेवून दुषित लिखाण न करता निर्भेळ लेखनावर त्यांचा अधिक विश्वास आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो आणि अशी अनेक नावं मी याक्षणी सुचवूही शकतो !!

So, Mr Girish Kuber, Are you watching closely??

तळटीप : हेच पत्र मी श्री गिरीश कुबेर आणि श्री अभिनव गुप्त यांना त्यांच्या इमेल आयडीवर पाठवलं आहे.

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...