Friday, July 15, 2011

अन्वयार्थ आणि दहापैकी अकरा मार्कंवालं संदर्भासहित स्पष्टीकरण !!

प्रिय गिरीश कुबेर,

मी गेली अनेक वर्षं असंख्य नावं ठेवत ठेवत का होईना पण लोकसत्ता नियमितपणे वाचतोय. नावं ठेवण्याचं एक सर्वमान्य कारण म्हणजे कु(सु)मार केतकर आणि त्यांचे कॉंग्रेसचं लांगुलचालन करणारे अग्रलेख आणि अन्य बातम्या. कुमार केतकर बाहेर पडल्यानंतर वाचकांना एकांगी नसलेल्या, कॉंग्रेसचा, राहुलचा, सोनियाचा, मनमोहन सिंगांचा अनाठायी उदो उदो न करणाऱ्या निष्पक्षपाती बातम्या वाचायला मिळतील अशा अपेक्षेने माझ्यासारख्या अनेक सामान्य वाचकांनी सुटकेचा भलामोठा निःश्वास सोडला होता. पण तो आमचा भ्रमच आहे असं काहीकाही बातम्या वाचताना सतत जाणवत रहायचं. अर्थात कुमारसेनेच्या काळापेक्षा लोकसत्ताची आत्ताची कामगिरी नक्कीच उजवी होती.... हो.... आता होती असंच म्हणावं लागेल. त्याचं कारण म्हणजे आजचं (शुक्रवार दिनांक १५ जुलै२०११) अन्वयार्थ.

संपूर्ण लेखच प्रचंड संतापजनक आहे. पण काही काही वाक्यं इतकी भयंकर एकांगी, अर्धवट माहितीवर आधारित आणि मुख्यतः परवाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या दुर्दैवी जीवांच्या मृत्यूचा इतका प्रचंड मोठा अपमान करणारी आहेत की त्यासमोर राहुलचं "सरकार प्रत्येक हल्ला रोखू शकणार नाही" वालं बालिश वाक्यही अतिशय समंजस वाटावं किंवा मग दिग्याचं प्रत्येक वाक्य हे एखाद्या मोठ्या विचारवंताच्या थाटाचं वाटावं. ही बातमी (!!!!!) वाचून मला तर क्षणभर असंही वाटून गेलं की दिव्यभास्करात जम न बसू शकल्याने (ऐकीव माहिती आहे. ऐकीव माहितीवर आधारित बातम्या फक्त लोकसत्तेनेचा द्याव्यात असा कुठे नियम आहे??) सुमार केतकरांचं पुन्हा लोकसत्तेत आगमन झालं की काय किंवा मग हल्लीच्या उथळ पत्रकारितेच्या जमान्यातल्या नियमाप्रमाणे केतकरसाहेब अतिथी संपादक म्हणून पुन्हा आमच्या डोक्यावर बसणार की काय. आम्हा वाचकांच्या दुर्दैवाने हे असं काही जर चुकून माकून जरी घडलं ना तर तेव्हा तुम्ही पत्रकार लोक दंडाला त्या काळ्या पट्ट्या बांधून निषेध बिषेध करत हिंडता ना तसेच आम्ही वाचक लोक loksatta.com ला जाण्यापूर्वी काळे गॉगल लावून मगच 'कॉंग्रेस-सत्ता' च्या बातम्या वाचू.

असो.. मूळ मुद्द्याला मी थेटही सुरुवात करू शकलो असतो पण मुद्दाम थोडी पार्श्वभूमी तयार केली जेणेकरून या असल्या कणाहीन पत्रकारांचं दर्जाहीन वृत्तांकन वाचून एक सामान्य नागरिक आणि वाचक म्हणून आमचा किती संताप होत असेल याची एक अतिशय छोटीशी झलक तुम्हाला मिळावी यासाठी एवढी खरडेघाशी केली. मला खात्री आहे की आजच्या या अर्थहीन अन्वयार्थाच्या संदर्भात तुम्हाला पत्र पाठवून निषेध नोंदवणारी मी पहिली व्यक्ती नक्कीच नसेन. सुदैवाने अनेक सजग वाचक महाराष्ट्रात आणि जगभर आहेत. आणि त्या सगळ्यांनी त्यांचं मत मांडताना या अन्वयार्था..... शी.. हा शब्द मला फारच अस्थानी वाटतोय.. खरंतर याला मला कणाहीन पत्रकाराचा दर्जाहीन लेख उर्फ क. प. द. ले. असं म्हणावसं वाटतंय पण ते जाऊदे...... तर त्या सगळ्यांनी त्यांचं मत मांडताना या दुर्दैवी लेखात त्यांना काय काय गोष्टी खटकल्या हे सांगितलंच असेल पण तरीही माझ्या अल्पस्वप्ल्प बुद्धीला सुचलेल्या गोष्टी मी इथे मांडतो आणि तुम्हाला दुर्दैवाने त्या पुन्हा पुन्हा वाचायला लागत असल्याबद्दल तुमची क्षमाही मागतो.

आता या तिरसट लेखातले कुठले मुद्दे मला आवडले नाहीत असं विचारलं तर साला अख्खा लेखच मला कॉपी पेस्ट करून द्यावा लागेल आणि असं करण्यात कितीही तथ्यांश असला तरी मुद्द्याचं गांभीर्य कमी होण्याची नितांत भीती आहे. त्यामुळे मला प्रचंड खटकलेली आणि माझ्या संतापाचा कडेलोट करू पाहणारी निवडक मुक्ताफळंच इथे डकवतो.

>> १. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारी अपयश नाकारले नाही, पण त्याचबरोबर गेल्या ३१ महिन्यांत मोठा हल्ला झालेला नाही हेही लक्षात आणून दिले.

>> २. दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी येतात याची कल्पना सौम्य शब्दात पण पक्की आकडेवारी समोर ठेवून करून दिली.

>> ३. कितीही दक्षता बाळगली तरी दहशतवादी हल्ला थांबविता येत नाही. तो फक्त लांबविता येतो. चिदम्बरम यांना हीच बाब सांगायची होती.

>> ४. परंतु दहशतवादी हल्ल्यासारखी संवेदनशील घटना घडली की, नेत्याने जबाबदारीने कसे वागावे हे त्यांच्याकडून सर्वच नेत्यांनी शिकण्यासारखे आहे.

>> ५. ते बॉम्बस्फोट टाळू शकले नाहीत. मात्र देशाचा गृहमंत्री स्थिर बुद्धीने, विचारपूर्वक व संतुलित वृत्तीने परिस्थिती हाताळत आहे, हा संदेश त्यांच्या पत्रकार परिषदेतून गेला.

>> ६. मुंबईतील विशिष्ट समाज वा आर्थिक उलाढालीची केंद्रे यांनाच स्फोटाचे लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू नसावा असा दावा त्यांनी केला. पाकिस्तानवर कोणताही आरोप केला नाही, पण पाकिस्तानच्या प्रतिसादाबद्दल भारत समाधानी नाही हेही लपविले नाही.

>> ७. पोलीस चांगली कामगिरी करीत असले तरी या हल्ल्याबद्दल निश्चित माहिती नव्हती याची कबुली दिली.

>> ८. एकंदर चिदम्बरम यांची पत्रकार परिषद ही संतुलित. जबाबदार आणि आपले काम गंभीरपणे करणाऱ्या नेत्याची पत्रकार परिषद होती. आपले काम व आपल्या मर्यादा यांची त्यांना व्यवस्थित जाणीव आहे हे लक्षात येत होते.

ही दर्जाहीन बातमी छापणाऱ्या कणाहीन पत्रकाराचं नक्की काय म्हणणं आहे? दर ३१ महिन्यांनी आम्ही आमच्या मोबाईलवर रिमायंडर लावायचे का "की बाबा रे आता ३१ महिने झाले. उद्या बॉम्ब फुटणार हो SSSS". कुबेरसाहेब, तुम्हाला खरंच सांगतो. मला पी चिदंबरम यांच्या निष्क्रियतेचा भयंकर राग येतो. बट गेस व्हॉट.. ही बातमी... तेच ते हो.. दर्जाहीन वगैरे.. तर ती वाचून मला चिदंबरमपेक्षाही ही बातमी छापणाऱ्या पत्रकाराचाच विलक्षण राग आला. हे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराची 'रीडिंग बिटवीन द लाईन' करण्याची क्षमता कसली जबरी असेल हाच विचार माझ्या मनात राहून राहून येतोय !!! म्हणजे चिदुभाऊ एक वाक्य बोलले की त्याचा (आमच्यासारख्या) सर्वसामान्य लोकांच्या अधूबुद्धीत शिरू न शकणारा नक्की अर्थ कोणता? ते असं म्हणाले तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचं होतं, त्यामागे असलेली त्यांची भूमिका कोणती?, प्रत्येक वाक्य उच्चारल्यानंतर त्या वाक्याच्या अनुषंगाने (फक्त सदरहू पत्रकाराच्याच) लक्षात येणारे चिदुभाऊंचं कर्तृत्व अधोरेखित करणारे, त्यांच्यात दडलेले सुप्त गुण कोणते इत्यादी इत्यादींचं दहावीतल्या संदर्भांसहित स्पष्टीकरणच्या थाटात वर्णन करताना या बातमीदाराने इतक्या असंख्य अस्पर्श मुद्द्यांना शिताफीने स्पर्श केला आहे की त्याला दहावीत 'संस्प' मध्ये दहापैकी अकरा मार्क नक्की मिळाले असणार याची खात्री पटली !!

आता पहिलाच मुद्दा बघा ना. ए.. क.. ती.. स.. (आकड्यात लिहिलं की पटकन संपल्यासारखं वाटतं म्हणून मुद्दाम अक्षरात लिहितोय.) महिन्यात एकही बॉम्बस्फोट झाला नाही हे सांगायला ना चिदुभाऊची गरज होती ना तुमच्या त्या पेड न्यूजवाल्या पत्रकाराची. काये की सामान्य माणूस बुद्धीने कितीही अधू असला तरी ज्या हल्ल्यांत आपल्या घरातले, नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी, ओळखीचे, आपल्याबरोबर ऑफिसमध्ये काम करणारे लोक गेले तो हल्ला किती वर्षांपूर्वी झाला होता एवढं साधं गणित तो करू शकतो हो. कारण त्याला समांतर म्हणून अजून एक गणित त्याच्या (म्हणजे आमच्याच हो.. तुमच्या त्या संदर्भांसहित वाल्या पत्रकाराच्या नव्हे..) डोक्यात चालू असतं आणि ते म्हणजे गेले ३१ (मुद्दाम आकड्यात लिहिलंय. कारण सरकारच्या दृष्टीने ते फक्त ३१ आहे. पटकन म्हणून होणारं. ए क ती स सारखं लांबलचक नव्हे.) महिने आमच्या आप्तस्वकीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या कसाब नावाच्या किड्यालाही आम्ही पोसतोय.. हे ते गणित. तो अजूनही मेला नाहीये हा संदर्भ आणि तो जिवंत असण्यामागे त्याचा महान धर्म कारणीभूत आहे हे त्याचं स्पष्टीकरण. तर ही एवढी सगळी गणितं डोक्यात घुमत असल्याने ३१ महिन्यात हल्ला झालेला नाही हे आम्हालाही माहित्ये. पण मग ३२ महिन्यात दोन प्रचंड मोठे हल्ले झाले हे साधंसुधं अपयश झालं का? मला तरी खरंच कळलं नाही नीट. तुमच्या त्या पत्रकाराला चिदुभाऊला विचारायला सांगाल का प्लीज? आणि त्यांनी त्याला समजावून सांगितलं की पुढच्या अन्वयार्थमध्ये त्याचं पुन्हा एक भलंमोठं 'संस्प'ही छापायला सांगा..

दुसरा मुद्दा.. आकडेवारी !!!! हाहाहाहाहा.. चिदुभाऊ खुर्चीत आल्यापासून मी तर त्याला फक्त आकडेवारी मांडतानाच बघतोय. नक्षलवादी हल्ल्यात अमुक इतके पोलीस मेले, अमुक इतके गावकरी मेले, बॉम्बहल्ल्यात इतके इतके लोक आणि तितके तितके पोलीस मेले. अहो आणि दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी येतात याची का आम्हाला कल्पना नाही?? अहो ज्या सामान्य माणसाला तीन आकडी किंमतीच्या भाज्या, तिसऱ्या आकड्याकडे विसावू पाहणारं पेट्रोल आणि चौथ्या आकड्याकडे सरकू पाहणारा गॅस इत्यादी बेसिक गोष्टी आकाशाला भिडलेल्या दारात खरेदी करायला भाग पाडलं जातं (आणि तेही घामाच्या पांढऱ्या पैशाने.. काळ्याबिळ्या नाही हो.) थोडक्यात रोजचं साधं आयुष्य जगतानाही इतक्या असंख्य अडचणींचा मुकाबला करावा लागतो त्याला सरकारच्या अडचणी माहित नसतील हे असं गृहीत धरणं आणि तसं बोलून दाखवणं म्हणजे शुद्ध दिग्विजयपणा  झाला. तर ब्रोकन रेकॉर्ड प्रमाणे पुन्हा मुद्दा तोच.. दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी सांगणे आणि आकडेवार्‍या समोर मांडणे यात एखाद्या व्यक्तीचं गृहमंत्री म्हणून काय कर्तृत्व असू शकतं हो?

खरं तर ज्याप्रमाणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पायात पाय अडकवून वाटचाल चालू आहे त्याचप्रमाणे या बातमीतल्या मुद्द्यांचेही एकमेकांत पाय अडकलेलेच आहेत. कारण आता तिसरा मुद्दा बघा. अहो हा मुद्दा मांडण्यात 'चि'चं काय कर्तृत्व असेल हे तर मला अजूनही लक्षात येत नाहीये !! अर्थात तुमच्या त्या महान पत्रकाराला दिसलंही असेल कर्तृत्व पण त्याने ते अधिक विस्ताराने विस्कटून सांगण्याची काही तसदी घेतलेली नाही... कारण येताजाता अमेरिकेचा जप करणाऱ्या, अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर बनून राहणाऱ्या सरकारने त्याच अमेरिकन सरकारने एकदा झालेल्या महाहल्ल्यांमुळे सजग होऊन सुरक्षा यंत्रणा एवढी बळकट केली की त्यानंतर १० वर्षांत कितीही धमक्या आल्या तरी प्रत्यक्ष हल्ले झाले नाहीत ही बाब "कितीही दक्षता बाळगली तरी दहशतवादी हल्ला थांबविता येत नाही. तो फक्त लांबविता येतो." असं म्हणताना चिदुभाऊ विसरले आणि त्यांचं कौतुक करण्याच्या नादात या असल्या धेडगुजरी मुद्द्यावर आसूड ओढण्याचं तुमचा पत्रकारही विसरला !! असो.. चालायचंच...

खरं तर प्रत्येक मुद्द्याबद्दल प्रचंड विस्ताराने लिहिता येईल आणि इतकं लिहूनही तुमच्या त्या विशाल अंतःकरणाच्या पत्रकाराला त्या प्रत्येक ओळीत सामान्य माणसाला पर्वताप्रमाणे दिसणारे दोष/चुका/अपराध न दिसता त्या प्रत्येक वाक्यात, कृतीत रारा चिदंबरम साहेब यांचं महान कर्तृत्वच कसं दिसलं आणि ते त्याने एका शब्दाबद्दल अनेक शब्द वापरून विस्ताराने उद्धृतही कसं केलं हे माझ्यासारख्या अल्पमती माणसाला न झेपणारं आहे. अर्थात मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि अति झालं आणि हसू आलं (हे माझं सुमार केतकरांच्या बाबतीतलं आवडतं वाक्य आहे. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी) असं माझ्या बाबतीत होऊ नये यासाठी फक्त अजून एकच खूप महत्वाचा आणि प्रचंड खटकलेला मुद्दा मांडून माझं रटाळ पुराण थांबवतो.

तर काय सांगत होतो?? हां.. तो चौथा मुद्दा वाचलात? काय लिहिलंय?? "दहशतवादी हल्ल्यासारखी संवेदनशील घटना घडली की" घडली की???? घडली की??? अशी भयानक घडली की जवाबदारीने वागायचं असतं गृहमंत्र्यासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीने की ती घटना घडायच्या आधी?? किंवा थोडक्यात कायमच?? ही अशी घटना वारंवार (किंवा चिदुभाऊच्या भाषेत दर ३१ महिन्यांनी) होऊ नये म्हणून जवाबदारीने वागणं अपेक्षित आहे की घटना घडल्यानंतर??? मला तर क्षणभर काहीच उमगेनासं झालंय.

आमच्यासारख्या सामान्य जीवांना न कळलेले, कधीच न कळणारे अनेकानेक छुपे अर्थ हे खरे की बातमी वाचून डोक्यात शिरणारा साधासोपा अर्थ खरा? कोण खरं कोण खोटं? माझ्या तरी मते तुमच्या या धडाडीच्या पत्रकाराने पत्रकारितेतले आणि एकूणच पावसाळे आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि किमान बुद्धीच्या वाचकांपेक्षा जास्त पाहिले असल्याने तोच बरोबर असेल असं मला तरी मनोमन वाटतंय. पण पुन्हा बातमी वाचल्यावर आम्हाला जे वाटतंय तेच खरं असावं असंही वाटतंय. थोडक्यात गोंधळ झालाय माझा. खूप मोठा गोंधळ. तुम्ही सोडवू शकाल तो गोंधळ? द्याल उत्तर? किंवा मग साध्या (आणि बिनडोक) वाक्यांतून ओढून ताणून अन्वयार्थ शोधून काढणाऱ्या तुमच्या महान पत्रकाराला तरी विचारा न याचं उत्तर आणि पुढच्या अन्वयार्थ मधून कळवा.. वाट बघतोय. शक्यतो पुढच्या स्फोटांच्या/हल्ल्यांच्या आत दिलंत तर अजून बरं कारण नाहीतर मग आम्हा लोकांचा अजून अजूनच गोंधळ उडत राहील. म्हणून म्हणतो लवकर द्या उत्तर.. द्याल ना?

-हेरंब ओक

हेच पत्र गिरीश कुबेर यांना त्यांच्या girish.kuber@expressindia.com या इमेल आयडीवरही पाठवलं आहे. !!

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...