Monday, January 10, 2011

सोशल 'ग्रेट'वर्क : एक न चुकवावेसे 'सोने'

गेल्या काही महिन्यांत बर्‍याच वेळा चित्रपटांवर लिहिणं झाल्याने मी ठरवलं होतं की आता चित्रपटांवर लिहायचं नाही.. अगदी कितीही कितीही आवडला तरी.. पण हे असं ठरवताना मला हे कुठे माहित होतं की एवढ्यातच मला 'द सोशल नेटवर्क' बघण्याचा योग येणार आहे आणि तो 'कितीही कितीही' आवडण्याच्या खूप पलिकडचा चित्रपट आहे. मागे इन्सेप्शन बघायला गेलो असताना 'सोने' चं ट्रेलर सर्वप्रथम बघायला मिळालं होतं आणि तेव्हाच त्याच्या "यु डोन्ट गेट टू ५०० मिलियन फ्रेंड्स विदाऊट मेकिंग अ फ्यु एनिमीज" या अतिशय आकर्षक टॅगलाईनने लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे चित्रपट बघायचा हे तेव्हाच नक्की केलं होतं. अर्थात अजून एक कारण म्हणजे हा डेव्हिड फिंचरचा चित्रपट होता हेही एक कारण होतंच. असो. त्याबद्दल नंतर लिहितो.

 'फेसबुक' या नावाचं काही अस्तित्वात नसल्याच्या काळातल्या एका प्रसंगापासून चित्रपटाला सुरुवात होते. या प्रसंगानंतर फेसबुक (तेव्हाचं फेसमॅश) जन्म घेणार आहे अशी पुसटशीही शंका येणार नाही असा हा प्रसंग. मार्क झकरबर्ग त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये बसलेला असतो. तिथे काही कारणावरून त्यांच्यात खटका उडतो, शब्दाने शब्द वाढत जातो.. खरं तर साधा भांडणाचा प्रसंग पण या पहिल्याच प्रसंगात आपल्याला कळतं की स्क्रीनवर जो पोरगेलासा मुलगा दिसतो आहे तो साधासुधा नाहीये. तो प्रचंड बुद्धिमान आहे, अतिशय हुशार, सुपीक डोक्याचा आहे. सहज बोलता बोलता अनेक फॅक्ट्स तो लीलया मांडतो. पुढे चित्रपटात अनेक प्रसंग आहेत, प्रचंड तिखट, भेदक, हुशार संवाद आहेत ज्यातून मार्कच्या तर्कशुद्ध पण यांत्रिकतेने विचार करण्याच्या पद्धतीची आपल्याला ओळख होत जाते. कित्येकदा या यांत्रिकतेचा अतिरेक होतो. पण मार्कला त्यात काहीही वावगं वाटत नाही. त्याच्यासाठी ते फारच सरळ-सोपं-स्वाभाविक असतं. नाहीतर गर्लफ्रेंडशी भांडताना (वाचा समजूत काढताना) चायनाबद्दलच्या फॅक्ट्स कोण सांगत बसेल बरं??

भांडणानंतर दोघेही रागाने निघून जातात. मार्क आपल्या होस्टेलरूममध्ये येऊन लॅपटॉप सुरु करतो. नायिकेने केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा म्हणून आपला मित्र एदुआर्दोच्या मदतीने एक प्रोग्राम लिहितो ज्यात कॉलेजमधल्या मुलींची एकमेकींशी आणि प्राण्यांशी अपमानास्पद पद्धतीने तुलना केलेली असते. प्रोग्राम लिहितो, बीअर रिचवतो आणि एकीकडे त्या सगळ्याचं लाईव्ह ब्लॉगिंग करतो. ब्लॉगमध्येही आपल्या मैत्रिणीचा खूप वाईट पद्धतीने अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यानंतर नेटवर्क हॅक करून तो प्रोग्राम कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवला जातो. मुली संतापतात, चिडतात, मैत्रिणीची बदनामी होते. मार्कचा हेतू साध्य होतो. या दोन प्रसंगांनंतर फेसबुक (फेसमॅश) सुरु झालेलं असतं. पण हे प्रसंग प्रत्यक्ष घडत असतानाच्या दरम्यान दाखवलेल्या छोट्या छोट्या घटना आणि संवाद हे प्रचंड फास्ट आणि कल्पक आहेत. मार्कची असामान्य हुशारी, तो इतरांच्या किती पुढचा विचार करू शकतो, बघता बघता समोरच्याला कसा शब्दात पकडू शकतो हे पाहताना थक्क व्हायला होतं. कदाचित हे सगळं बिंबवण्यासाठीच या चित्रपटातले संवाद हे अतिशय अतिशय फास्ट आहेत. कित्येकदा गुंतागुंतीचे वाटण्याएवढे कल्पक आहेत.. ही गुंतागुंत मार्क आपल्या साध्या साध्या संवादांतून इतक्या अचूकपणे व्यक्त करतो की कित्येकदा त्याच्यावर चालू असलेल्या खटल्यादरम्यान प्रतिपक्षाचे वकील एवढे मेटाकुटीला येतात की मार्कच्या वकिलाला विनंती करून मार्कला नीट उत्तरं द्यायला सांगावीत अशी विनंती करण्याची वेळ त्यांच्यावर येते. मात्र आपल्या वकिलाकडून परवानगी मिळाल्यानंतर मार्क त्याच प्रश्नांची एवढ्या सरळपणे उत्तरं देतो की त्याच्या हुशारीला मनोमन पुनःपुन्हा सलाम केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही!!


पण तो अगदीच सोवळा आहे असं मात्र नाही. प्रत्यक्षातल्याची कल्पना नाही पण निदान चित्रपटातला मार्क तरी सोवळा नक्कीच नाही. (हा चित्रपट सत्यघटनांवर आधारित असला तरी प्रामुख्याने 'अ‍ॅक्सिडेंटल बिलियनियर्स' या पुस्तकावर आधारित आहे.) आणि त्याचं हे सोवळं नसणं चित्रपटातल्या अनेक प्रसंगांतून स्पष्ट दिसतं. तो कधी कधी अजाणतेपणी, कित्येकदा जाणूनबुजून समोरच्याला तोंडघशी पाडतो, त्याची फसगत करतो. कित्येकदा हे त्याला करायचं नसतं पण तरीही तो ते करतोय असंही वाटत राहतं. चित्रपटाच्या शेवटी "आय अ‍ॅम नॉट अ बॅड मॅन" म्हणतानाची त्याच्या चेहर्‍यावरची वेदना बरंच काही सांगून जाते. आपल्यावर चित्रपट काढला जावा (आणि त्यात आपली इमेज काळ्या रंगत रंगवली जावी) हे (खर्‍या) मार्कला (अर्थातच) मान्य नव्हतं आणि ते त्याने तसं बोलूनही दाखवलं होतं. "मी जिवंत असताना कोणी माझ्यावर चित्रपट काढला नसता तर अधिक बरं झालं असतं" अशी प्रतिक्रिया चित्रपट निघाल्यावर त्याने दिली होती. पण अर्थात तरीही चित्रपट निघाला, प्रदर्शित झाला आणि धोधो चाललाही !! मार्कने नापसंती दर्शवली असतानाही तो प्रदर्शित झाला म्हणून काही कोणी जाळपोळी, दगडफेक, संप, बंद, आंदोलनं केली नाहीत की मुख्यमंत्र्याला (इथे गव्हर्नरला) स्वतः थेटरात हजर राहून इस्पेशल संरक्षणात चित्रपट दाखवावा लागला नाही !!!! यावरून अजून एक आठवलं ते म्हणजे येशू ख्रिस्ताचा आक्षेपार्ह उल्लेख असलेलं डॅन ब्राउनचं 'दा विंची कोड' हे पुस्तक आणि त्याच नावाचा सिनेमा हे दोन्ही ख्रिश्चनबहुल असलेल्या पाश्चात्य देशात हातोहात खपले. दोन्हींनी जोरदार धंदा केला. पण भारतातल्या चर्चेसनी मात्र त्यावर बंदी आणावी म्हणून जोरदार निदर्शनं केली.. हाय की नाय मज्जा..?? मागे एकदा माझ्या एका अमेरिकन सहकार्‍याशी बोलताना मी त्याला येशूच्या आक्षेपार्ह उल्लेखाबद्दल आणि त्या पुस्तक/चित्रपटाबद्दल विचारलं होतं तेव्हा तो अतिशय सहजपणे म्हणाला होता की "त्यात काय..? ती तर फक्त एक काल्पनिक कथा आहे. इटस जस्ट अ नॉव्हेल.. जस्ट अ फिक्शन.. !!!"...  तेव्हा मला त्याच्या पाठीवर एक जोरदार थाप मारावीशी वाटली होती.. असो ! विषयांतर झालं. कुठल्याही चित्रपट/पुस्तकाचं परीक्षण/समीक्षण म्हणून पोस्ट न लिहिता निव्वळ 'माझा दृष्टीकोन' या अनुषंगाने पोस्ट लिहिण्याचं एक बरं असतं (समीक्षा  करण्याएवढी योग्यता नसते ही झाकली मुठ झाली.) .. असं कधीही कुठेही कितीही भरकटता येतं आणि वर मी कुठे समीक्षण लिहितोय असं म्हणून हात वर करता येतात.. ;) (आणि वर पुन्हा का भरकटलोय हेही जाहीरपणे सांगता येतं ;))

मार्क : चित्रपटातला आणि खरा
 चित्रपट बघून झाल्यावर (आणि बघत असतानाही मध्ये मध्ये) मी नेहमीच्या सवयीप्रमाणे मार्क झुकरबर्गला विकीवर टाकला. विकीबाबांनी नेहमीप्रमाणे आश्चर्यकारक माहिती पुरवली. मार्क हा लहानपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचा मुलगा. आई वडील दोघेही डॉक्टर.. त्याची हुशारी बघून त्याच्या वडिलांनी त्याला सुरुवातीला स्वतः कॉम्प्युटर प्रोग्रामिंग शिकवलं आणि काही वर्षांनी तर (बहुतेक दहाव्या वर्षीच) त्याला ट्रेनिंग देण्यासाठी एका सॉफ्टवेअर डेव्हलपरची नेमणूक केली !! किती दूरदृष्टी असेल त्यांची.. !!! मला क्षणभर पालकांनी केलेल्या अन्यायाला (!!) वाचा (!!) फोडणारा (!!) 'तीन वेड्यां'चा चित्रपट आठवला.. असो. लहानपणीच बाबांच्या दवाखान्यातले संगणक आणि घरातले संगणक यांना एकमेकांशी संवाद साधता यावा यासाठी त्याने 'झुकनेट' (झ/झुकरबर्ग नेटवर्क) तयार केलं. आणि तेही याहू किंवा तत्सम इन्स्टन्ट मेसेंजर्स यायच्या अनेक वर्षं आधी.. ज्या वयात लहान मुलं प्रचंड आवडीने कॉम्प्युटर गेम्स खेळतात त्या वयात या माणसाने ते गेम्स स्वतः तयार केले, त्यांचे प्रोग्राम्स लिहिले !! त्यानंतर आपली आवडती गाणी ऐकण्याचं आणि शेअर करण्याचं एक अ‍ॅप्लिकेशन त्याने विकसित केलं.. ते इतकं सही होतं की मायक्रोसॉफ्ट ते अ‍ॅप्लिकेशन खरेदी करायला तयार होतं. तर या पठ्ठ्याने काय करावं? त्याने ते नेटवर फुकट उपलब्ध करून दिलं.  फेसबुकचा पसारा वाढवताना त्याकडे त्याने अर्थार्जनाचा एक स्त्रोत म्हणून किंवा अधिक अधिक पैसे कमवायची हाव म्हणून केलं नसावं हे ओझरतं दाखवून देणारे हा आणि असे काही प्रसंग. थोडक्यात त्याने जे गुन्हे (!) जाणता अजाणता केलेत, जे बळी घेतलेत (शब्दशः नव्हे) ते पैसे कमावण्यासाठी म्हणून नाही हे कुठेतरी अधोरेखित करणारे हे प्रसंग. फेसबुकची निर्मिती गर्लफ्रेंडचा बदला घेण्यापायीच्या झपाटलेपणातून झाली असली तरी त्यानंतर मात्र  ते त्याचं पॅशनच होऊन गेलं. त्याच्या वेगाने आणि बुद्धीने चालू न शकणार्‍यांना त्याच्या प्रगतीच्या आणि फेसबुकच्या भरारीच्या आड येऊ देता कामा नये यासाठीच कदाचित अशांचे पंख कापले गेले असावेत.

चित्रपटातलं कुठलंही पात्र मी वर लिहिलेल्या वाक्यांमधलं एकही वाक्य स्पष्टपणे बोलत नाही की सांगत नाही. "मार्कला असं वाटलं .. म्हणून त्याने असं असं केलं.. त्याला खरं तर हे असं करायचं होतं.. तो असा असा हुशार आहे" असं कोणीही स्पष्टपणे सांगत नाही पण तरीही काय घडलं, काय झालं असावं, कोण कसं आहे, कोणी काय केलं, काय केलं नाही या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थितपणे कळतात. आणि याचं संपूर्ण श्रेय एकाच व्यक्तीला आहे. श्रीयुत डेव्हिड लिओ फिंचर !! या माणसाने कमाल केली आहे. कथेला पुढे-मागे नेणारे प्रसंग, एखादा भूतकाळात घडणारा प्रसंग आणि तोच प्रसंग पुढे खेचून नेऊन वर्तमानकाळातल्या प्रसंगात त्या जुन्या प्रसंगाच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं (उदा वकील एदुआर्दोला सही करण्यासाठी पेन देतो तो भूतकाळातला प्रसंग आणि तो प्रसंग तिथेच संपवून वर्तमानकाळात (दुसरा) वकील त्याला विचारतो की "मग तू त्या पेनाने काय केलंस" हा प्रसंग आणि असे कित्येक प्रसंग) हा प्रकार अनेक प्रसंगात, घटनांमध्ये इतक्या अप्रतिम रीतीने जमवला आहे या माणसाने की चित्रपटाचं ते मागे-पुढे जात जात हळू हळू कथा उलगडवत नेणं हे आपल्याला प्रचंड आवडून जातं !!! खरं तर मला फिंचरचा यापूर्वी 'पॅनिक रूम' वगळता कुठलाही चित्रपट विशेष आवडला नव्हता. तसे त्याने सेव्हन, क्युरियस केस ऑफ बेंजामिन बटन, झोडियॅक, फाईट क्लब असे बरेच लोकप्रिय चित्रपट दिले आहेत. पण निदान मला तरी यात प्रचंड आवडला असा कुठलाच चित्रपट नव्हता (मला कल्पना आहे की यावर प्रचंड वाद होऊ शकतो. पण तरीही...).. पण हा माणूस नेहमी काहीतरी वेगळं करत असतो हे मात्र नक्की. त्यामुळेच सुरुवातीच्या त्या आकर्षक टॅगलाईनने लक्ष वेधून घेतल्यानंतर फिंचर दिग्दर्शन करतोय म्हंटल्यावर फेसबुकबद्दल काहीतरी आगळंवेगळं बघायला मिळणार याची १००% खात्री झाली होती आणि ती अपेक्षा या माणसाने १०००% पूर्ण केली. फिंचरचे चित्रपट बर्‍याचदा गुंतागुंतीचे असतात. खूप विचार करून आणि नीट लक्ष देऊन बघायला लागतात.. प्रत्येक संवादात बराच अर्थ दडलेला असतो. ते या चित्रपटाच्या बाबतीतही अगदी अगदी खरं आहे. शक्यतो सबटायटल्स ऑन करून बघितलात तर अधिक उत्तम. जास्त एन्जॉय करता येईल चित्रपट !!

माझ्या एका मित्राला शाहरुख-उर्मिलाच्या'चमत्कार'ची गाणी एवढी आवडायची की तो म्हणायचा की "मी कधी जर चित्रपट काढला तर अनु मलिकलाच संगीत करायला देईन." .. त्यानंतर हा संवाद आमच्यात खूप कॉमन झाला. त्याप्रमाणे आत्तापर्यंत अशा माझ्या स्वतःच्या (! ;) ) कित्येक चित्रपटांसाठी मी संगीतकार/दिग्दर्शक/संवादलेखक यांची निवड वेळोवेळी केलेली आहे. ;) त्याच धर्तीवर पुढे म्हणायचं झाल्यास मी आयुष्यात कधी चित्रपट काढला तर तो असाच असेल असा प्रयत्न मी करेन किंवा मग मी सरळ फिंचरलाच दिग्दर्शन करायला सांगेन.. :)

फेसबुकने जगाला किती मोठ्या प्रमाणात झपाटलं आहे हे दाखवणारा आणि तितक्याच टोकदारपणे आजच्या सामाजिक स्थितीवर बोट ठेवणारा एक छोटा प्रसंग चित्रपटाच्या शेवटी आहे. खटला संपल्यावर मार्क आपल्या लॅपटॉपवर काम करत असताना प्रतिपक्षाची ट्रेनी वकील त्याला विचारते "तू काय करतो आहेस?".. मार्क उत्तरतो "बॉस्नियाची स्थिती कशी आहे ते बघतोय" .. ती खिन्नपणे हसून म्हणते "बॉस्निया... हं !! जिथे साधे रस्ते नाहीयेत पण फेसबुक मात्र नक्की आहे. !!!"

'सोने' बघून झाल्यावर मी फेबुवर स्टेटस मेसेज टाकला होता. "इफ यु डोन्ट वॉच सोशल नेटवर्क, मार्क वुईल डिसेबल युअर फेसबुक अकाउंट... !!!"

(यस.. ही कॅन.. ही इज प्रोबॅबली रजनी इन द वेब वर्ल्ड.. ;) चित्रपट बघितल्यावर तुम्हाला कळेलच की तो काहीही करू शकतो :) ) !!
थोडक्यात हे न चुकवावेसे 'सोने' आहे. इटस अ सोशल 'ग्रेट'वर्क !!

टॉप न्यूज. मोस्ट रिसेंट १+ : 'सोने' च्या जबरदस्त संवादांपैकी काही निवडक संवाद इथे  अनुभवता येतील.

Wednesday, January 5, 2011

तात्पर्य !

** सदर 'तात्पर्य' यापूर्वी 'शब्दगारवा २०१०' येथेही काढण्यात आलेले आहे याची चिकित्सक वाचकांनी नोंद घ्यावी. :)

----------------------------------------------------------------------------------------

कुठल्याही हिवाळी/दिवाळी इत्यादी इत्यादी इ-अंकांसाठी लिहायचं म्हटलं की माझ्या अंगात एकदम प्रचंड उत्साह संचारतो... किती आणि काय लिहू असं होऊन जातं... नवनवीन कल्पना सुचायला लागतात.. नवनवीन विचार मनात घोळायला लागतात.. नवीन लेख, नवीन विषय, नवीन कविता, नवीन कल्पना वगैरे वगैरे माझ्या डोक्यात अक्षरशः फेर धरून का कायसंसं म्हणतात तशा नाचायला लागतात. काय लिहू आणि काय नको असं होऊन जातं अगदी. मी बरंच कायकाय मस्त लिहायचं ठरवायला लागतो. काही लेख, कथा, कविता मनातल्या मनात वगैरे तयारही होऊन जातात, रात्री झोपताना कित्येक कल्पना नव्याने सुचतात. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर त्या सगळ्या कल्पना फक्त कागदावर उतरवल्या की झाला लेख तयार.. अहाहा.. कस्सलं सही.. !!

दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर मी मोठ्या उत्साहाने लिहायला बसतो. काल सुचलेलं सगळं लिहून टाकायचं एकदाचं असं ठरवून झरझर लिहायला लागतो.

.
.
..
.
.
ए फॉSSर?
आप्प

बी फॉSSर?
बे

सी फॉSSर?
के

डी फॉSSर?
दाद
.
..
.
.
...
.
.
..
.

जानेवारी
दानॅनॅनॅ

फेब्रुवारी
पेमॅमॅमॅ

मार्च
माSS
.
.
..
...
.

चैत्र
तैत्त

वैशाख
बात्ता

ज्येष्ठ
देत्त
.
.
.
..
..
.

वन

तू SS

अरे वन म्हण ना वन

तू SS

बरं तू तर तू... माझं पांढरं निशाण !

थ्री SS
ती SS

फोर SS
पो SS
.
.
.
..
...
.
.
.



लिहिता लिहिता आणि लिहून झालेलं वाचल्यावर माझं मलाच नीट कळत नाही की मी काय लिहिण्याचा विचार केला होता, काय विचार करत होतो, काय काय सुचलं होतं, काय लिहायचं होतं आणि प्रत्यक्षात मात्र मी काय लिहिलं आहे. मग अचानक नळी (ट्यूब व्हो !) पेटते. झोपायच्या आधी सुचलेल्या कल्पना आणि प्रत्यक्ष झोपायला जाणं याच्यामध्ये काहीतरी घडलेलं असतं. लेकाला झोपवताना त्याचा अभ्यास घेण्याच्या नावाखाली आम्ही बरंच काय काय बडबडलेलो असतो.

रात्री झोपताना लिहिलेलं/वाचलेलं (आणि बोललेलंही) सकाळी उठल्यावर चांगलं लक्षात राहतं अशा आमच्या शाळेतल्या बाई म्हणायच्या !

Tuesday, January 4, 2011

कंपोस्ट-२ : बझबझ बसबस

तुम्ही 'बेसिक इन्सटींक्ट' बघितला आहे का? अर्थात बघितला असलात तरी हे असं चारचौघात ब्लॉगवर कबुल कोण करेल म्हणा.. 'बेसिक इन्सटींक्ट' न बघितलेला माणूस (पुरुष या अर्थी) विरळाच आणि तो (म्हणजे पिच्चर) बघितलाय हे असं चारचौघात ब्लॉगवर कबुल करणारा तर अजूनच विरळा. असो.. तर 'बेसिक इन्सटींक्ट' मध्ये मायकल डग्लसने सिगरेट सोडलेली असते. त्याबद्दल त्याची डॉक्टर मैत्रीण त्याला विचारते.

"हाऊ इट फील्स?"
"इट सक्स" जरा वेळ शांत राहून डग्लस उत्तरतो.

बास.. संपला प्रसंग. म्हणजे मला जे सांगायचं आहे त्यासाठी ही एवढी दोन वाक्य पुरेशी आहेत. ते वरचं एवढं मोठं तेल फक्त एवढ्यासाठीच सांडलं होतं. मुद्दा हा की मी बझ 'सोडलाय' हे माहित असलेल्या कोणीही जर मला आज विचारलं "हाऊ इट फील्स?" तर माझं उत्तर हेच असेल.. "इट सक्स" .. !!

बझ किती सही आहे, कशा गप्पा होतात (व्हायच्या), कसं अ‍ॅडीक्टीव्ह आहे वगैरे वगैरे बडबड मागे  एकदा करून झालीच आहे. त्यामुळे ती आत्ता पुन्हा करत नाही. मागे एकदा कुठेतरी एक मस्त वाक्य वाचलं होतं... ब्रह्मचर्य पत्करेल तो सोवळा आणि संसारात पडलेला म्हणजे पापी असं काही नसतं. संसारात राहूनही एकनिष्ठ राहणारा तो सोवळाच.. किंवा सुरुवात सिगरेटच्या उदाहरणापासून केली असल्याने सिगरेटचंच उदाहरण पुढे न्यायचं झाल्यास सिगरेटचं पाकीट खिशात ठेवून सिगरेट सोडण्यात जी मजा आहे ती मजा सिगरेटवाल्यापासून लपूनछपून फिरण्यात नाही.. अर्थात बझ चालू असूनही (सिगरेट खिशात असूनही) बझबझ न करता मोह आवरून कामाच्या वेळी काम करता येण्याएवढा (ती न ओढण्याएवढा) कंट्रोल आला की बझ चालू असलं काय नी बंद असलं काय.. सुदैवाने दोन तीन महिन्याच्या बझ-नातिरेकाने तेवढा कंट्रोल माझ्या ठायी आलाय (असं वाटतंय). आणि तसंही एकदा कंट्रोल करता आला की बझ काय, ब्लॉग काय, ओर्कुट काय नी फेसबुक काय... सगळं सारखंच.. (तुम्हा सर्वांना आधीच ठावं असलेलं हे सत्य मला थोडं उशिराने गवसलं).. त्यामुळे सिगरेटचं पाकीट पुन्हा खिशात ठेवावं म्हणतोय.. थोडक्यात मी मागे.. आय्याम ब्याच्क वुईथ बझबझ लिमिटेड.. म्हणजे लिमिटेड बझबझ !

आत्ता लिहिता लिहिता आठवलं.. बझ बंद केला तरीही अ‍ॅरिस्टॉटल साहेबांनी मांडलेल्या 'म्यान इज अ सोशल अ‍ॅनिमल' वाल्या नियमाला नाकारू शकण्याचं धैर्य अंगी नसल्याने हा पामर (म्हणजे स्वयं.. अ‍ॅरिस्टॉटल नाही) अचानक फेसबुकावर बराच अ‍ॅक्टिव्ह झालाय असं माझं माझ्याच लक्षात आलंय.. !!!

----

घाबरू नका.. पुन्हा फेसबुकाबद्दल पोस्ट टाकायची वेळ येण्याइतपत सोशल अ‍ॅनिमल प्रकार करणार नाही एवढं नक्की. बझ बंद-चालुच्या पोस्ट्स, फेसबुकची पोस्ट.. च्यायला काहीही लिहितोय मी.. खरंच ही एवढी दयनीय अवस्था कुठल्याही ब्लॉगरवर आणि त्याहूनही कंटाळवाणी अवस्था त्याच्या वाचकांवर २०११ मध्ये येऊ नये एवढ्या माफक शुभेच्छा देऊन थांबतो.. बाकी सुखसमाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे, हॅप्पी, हेल्दी, प्रॉस्परस वगैरे वगैरे आपापल्या आवडीने कमी-जास्त घालून घ्या. ज्यांना शुभेच्छा आत्ता नको असतील त्यांना याच शुभेच्छा चैत्राच्या पहिल्या दिवशी दिल्या जातील याची नोंद घेणे..

** ही पोस्ट आठवणीने बझ केली आहे. कसलं सही वाटतंय बर्‍याच दिवसांनी. :D

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...