Tuesday, March 27, 2012

लिहावे फाटके !!


ब्लॉगिंगची ताकद जगभरातल्या नेटकर्‍यांना अगदी चांगल्या प्रकारे समजूनही आता निदान दहा एक वर्षं सहज झाली असावीत. अगदी मराठीतही सशक्त, जोमदार, दर्जेदार, कसदार लिखाणाने ओतप्रोत भरलेले ब्लॉग सुरु होऊन निदान अर्धं तप तरी उलटलं असावं. होता होता हे लिखाण-- माहितीपर, कथा, कविता, ललित, सामाजिक-- इत्यादी इत्यादी सगळ्या प्रकारचं लिखाण मराठी ब्लॉग्जवर विपुल प्रमाणात आणि सातत्याने दिसायला लागलं. हळू हळू निरस, रटाळ, अशुद्ध, चुकीचं आणि कित्येकदा खोटं लिहिणाऱ्या मराठी वर्तमानपत्रांनाही (मुद्दाम वार्ताहर किंवा बातमीदार न म्हणता वर्तमानपत्र म्हणतोय. कारण वृत्तपत्र हे संपादकाचं राहिलं नसून भांडवलदाराचं झालं आहे हे केसरी/नवाकाळच्या अग्रलेखांपासून अधःपतित होऊन ते थेट अनावृत नटव्या आणि त्यांच्या आवडत्या संभोग सवयी इत्यादींवर खमंग चर्चा करण्यापर्यंत घसरणाऱ्या महामुर्ख टाईम्स सारख्यांच्या डाव्या कोपर्‍यातल्या चौकोनांनी सिद्ध केलंच आहे.) एव्हाना खडबडून जाग आली.

कारण कित्येक ब्लॉगवर आढळणारं दर्जेदार, माहितीपर लेखन हे तथाकथित, सोम्यागोम्या आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या 'नेटक्या' टिनपाट पत्रकारांच्या 'फाटक्या' शब्दांनी भरलेल्या 'थोटक्या' मराठीतल्या लिखाणा(!!!!!) पेक्षा कैक पटीने वास्तव, खरंखुरं आणि निष्पक्षपाती होतं. कित्येकदा एखाद्या नियमित लिहिल्या जाणाऱ्या ब्लॉगवरचा एखादा वाईटातला वाईट लेख हाही एखाद्या चांगल्या वर्तमानपत्रातल्या (सायटेशन नीडेड) शिकाऊ आणि तरुण स्तंभलेखकाच्या तथाकथित चांगल्यातल्या चांगल्या लेखापेक्षा खूप चांगला आणि माहितीपर असतो हे सहज ध्यानात यायला लागलं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ब्लॉगर्सना ना भांडवलदाराच्या बापाची भीती ना जाहिरातदाराच्या पक्षाबद्दलचं प्रेम. असो.

तर होता होता अशा चांगल्या, दर्जेदार, वाचनीय ब्लॉग्जची संख्या आणि वारंवारता इतकी वाढायला लागली की आपल्या समाजाचा चौथा बांबू असलेल्या... ओह सॉरी सॉरी स्तंभ म्हणायचं होतं मला... तर बांबू.. सॉरी खांब.. सॉरी स्तंभ.. सॉरी बांबू असलेल्या वर्तमानपत्रांना त्यांची दखल घेणं भागच पडलं. फेकमत सारख्या कित्येक पेप्रांनी सुरुवातीला चांगल्या ब्लॉग्जवरचे चांगले लेख मूळ ब्लॉगलेखकाला न विचारता सरळसोटपणे उचलून आपल्या रंगीबेरंगी, रंगतरंग, फनडे, एन्जोय, कलर, याहू इ इ इ एखाद्या नावाच्या पुरवणीत बिनधास्त छापूनही टाकले. त्यानंतर ब्लॉगर्सनी अचूक नसा दाबून ते चौर्यकर्म उघडं पाडून त्या पेप्रांना वाकायला लावल्याच्याही घटना घडल्या. परंतु कालांतराने वर्तमानपत्रं शहाणी झाली आणि ब्लॉगर्सही थोडे समंजस झाले.

त्यानंतर ब्लॉगवरचे निवडक लेख, लोकप्रिय ब्लॉग्जच्या ओळखींची सदरं अशा अनेक प्रकारे ब्लॉग्ज आणि ब्लॉगर्स मराठी वृत्तापत्रांत हजेरी लावायला लागले. मटा, सकाळ, सामना, पुढारी, प्रहार, कृषीवल इ. जवळपास सगळ्या वर्तमानपत्रांनी ब्लॉगर्सची दखल घ्यायला, त्यांना आपल्या वृत्तपत्रात स्थान द्यायला सुरुवात केली.

तर जवळपास सगळ्या म्हणण्याचं कारण हे की काही कारणाने लोकसत्ताचे डोळे अजून उघडले नव्हते किंवा त्यांना ब्लॉग माध्यमाच्या बळाची जाणीव तरी झाली नव्हती. कदाचित कु(सु)मार केतकरांच्या बाहेर पडण्या(काढण्या??)ने झालेल्या शुद्धीकरणानंतर त्यांना ती झाली असावी. पण तोपर्यंत वर म्हटल्याप्रमाणे ब्लॉगर्सचे लेख, ओळख, मुलाखती वगैरे सगळे प्रकार इतर वृत्तपत्रांनी करून झाले होते. त्यामुळे काय करायचं हा एक मोठा प्रश्नच होता.

अशा वेळी चिमूटभर हळदीने पिवळा झालेला/ली 'अभिनव' कल्पना 'गुप्त' रुपाने साकारणारा एक फाटक्या.. सॉरी नेटक्या मताचा एक पत्रकार संपादक साहेबांच्या केबिनात जाऊन धडकला/ली. बरं हे ला/ली यापुढे अध्याहृत आहे. दर वेळी लाली करत बसायला वेळ नाहीये मला. हो हो ब्लॉगर असलो तरी..

तर गुप्ताने संपादकसाहेबांसमोर एक एकदम सोप्पी, बिनखर्चाची, बिनअकलेची, बिनापरिश्रम करता येणारी अशी एक अभिनव योजना मांडली. तो म्हणाला "साहेब, एकदम सोप्पं काम आहे. आपल्याला डोकं लावायची गरज नाही. सगळा माल रेडीमेड मिळेल. !!!" संपादकसाहेबांनीही फुकट मिळतंय म्हंटल्यावर गुप्ताचा माल कुठून येणार आहे याची काहीही चौकशी न करता बिनधास्त होकार देऊन टाकला. झालं. लगेच गुप्ताने दुसऱ्या दिवशीच्या पेप्रात एक एकदम नवीन कोरं सदर सुरु केलं. कोरं म्हणजे एकदम साफ कोरं. तुळतुळीत एकदम. एकदम रिकामं. त्याच्याकडे त्या सदराबद्दलची, किंवा त्याच्याकडे अ(न)सणाऱ्या संबंधित डेटाबद्दलची काहीही माहिती नव्हती. पण या माहितीची आपल्या माहिती नाही हे कसं लपवावं याची मात्र त्याला चांगली माहिती होती.

लहानपणापासून विविध भारतीवर "इस गाने की मांग की है झुमरी तलय्यासे बाबुराव प्रेमजी, वत्सला प्रेमजी, गानू प्रेमजी, इशा प्रेमजी, भागलपूरसे चंद्रेश कांकेरा, भीमी कांकेरा, राजा कांकेरा और रीझी कांकेराने" हे ऐकायची सवय असलेल्या गुप्ताने तीच आयडिया तशीच्या तशी वापरायचं ठरवलं आणि दिला डकवून पहिल्या दिवशीचा मजकूर !!

================================================

हे ‘आपण सर्वानीच करून पाहण्या’ची पद्धत सोपी आहे. तुम्हाला मराठीतला वा इंग्रजीतला एखादा ब्लॉग किंवा नियतकालिकांच्या वाचनाला पर्याय ठरू शकेल, असं वारंवार अपलोड होणारं समकालीन लिखाण देणारं संकेतस्थळ पसंत असेल, तर त्यावरला ताजा लेख आम्हाला आठवडाभरात ईमेलनं कळवायचा. लगेच सोमवारी त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न इथं केला जाइैल. अशा शिफारशी बऱ्याच येऊ शकतात आणि त्यातून निवडही करावी लागेल.. ते करण्यासाठीचे निकष असे : 
- आपण शिफारस केलेला लेख ताजाच असावा, 
- आपण शिफारस केलेलं संकेतस्थळ वा ब्लॉग नेहमीच वाचनीय आणि ‘ओरिजिनल’ किंवा स्वलिखित मजकूर देतं, असा विश्वास तुम्हाला हवा. अनेक ब्लॉग्ज मजकूरदेखील ‘कटपेस्ट’ करतात, म्हणून ही अट! 
- हे संकेतस्थळ वा हाच ब्लॉग का आवडतो, याबद्दल आपलं जे म्हणणं असेल, तेही निवडीसाठी गृहीत धरलं जाईल. 
ही पथ्यं पाळून केलेल्या शिफारशींची दखल इथं घेतली जाणार नाही, असं सहसा होणारच नाही. पण झालं तर, ईमेलनं पाठपुरावा करण्याचा हक्क आहेच तुमचा! 
उत्तमतेचा हा शोध कुणा एकटय़ाला घ्यायचा नाहिये, असं ठरवूनच हा सामूहिक प्रयत्न. 


================================================

अरेच्चा म्हणजे ब्लॉग शोधायचा, तो वाचायचा, तो आवडतो की नाही हे ठरवायचं, आवडला नाही तर अजून ब्लॉग्ज शोधायचे, ब्लॉग आवडला की का आवडला हे लिहायचं.. हे एवढं सगळं वाचकांनी करायचं आणि एवढं करूनही तुमची ही एवढी मेहनत पाण्यात जाणार नाही याची मुळीच खात्री नाही. आणि समजा गेलीच पाण्यात तरी आम्ही एवढ्या मोठ्या मनाचे गुप्तोत्तम आहोत की आम्ही तुम्हाला आमचा इमेल आयडी देतोय की. त्याच्यावर करा की पाठपुरावा. घ्या !! आहे की नाही? घरबसल्या बिनभांडवली, बिनामेहनतीने लिखाण गुप्तांच्या पदरात. त्यानंतर दोन चार क्लिक करून अर्धा/पाऊण लेख वाचून झाला की मग गुप्तेबाई/बुवा त्या ब्लॉगरवर, त्याच्या लिखाणावर, चुकून झालेल्या एखाद्या र्‍हस्व/दीर्घाच्या चुकीवर, लेखनाच्या पद्धतीवर, शब्दांच्या निवडीवर, भाषेच्या साधेपणावर, प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीवर अशा ज्या दिसेल त्या प्रत्येक गोष्टीवर शेलक्या विशेषणांचा शब्दबंबाळ मारा करणार.

च्यामायला झाला की लेख तयार. आणि ब्लॉग वाचणारे आणि ब्लॉगर्स काय पैश्याला पासरी मिळतात की. "कुठलाही ब्लॉग द्या, म्या त्याची चिरफाड करून दाखिवतो/ते की नाय ते बगाच" अशा थाटात लेख (!!!!) लिहायला कितीशी अक्कल लागते न् कितीसा अभ्यास लागतो?? आणि आपण फाडलेला प्रत्येक ब्लॉग/ब्लॉगर काही प्रतिहल्ला करणार नाही की स्वतःची बाजू मांडणार नाही की पत्र लिहून छळणार नाही. आणि लिहिलंच एखाद्याने पत्र तर ते पत्र अशा उलटे सुलटे मुद्दे मांडून अशा पद्धतीने मांडायचं की साला गिरा तो भी टांग उपरच्य... हाय काय नाय काय !!! आणि अशी पत्रं पाठवण्यापेक्षा खरं तर एखाद्या ब्लॉगरने त्याच्या ब्लॉगवरून आपल्याला (म्हंजी गुप्त्याला) उत्तर दिलं तर अजूनच बहार येईल. कारण फाटकी-थोटकी सदरं वाचणाऱ्यांपेक्षा लोकप्रिय ब्लॉग्ज नियमित वाचणाऱ्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. आणि जमलंच तर नावं ठेवताना ज्यांचे फॉलोअर्स निदान दोनशे-सव्वादोनशेच्या घरात आहेत किंवा मग ज्यांच्या ब्लॉगहिट्सची संख्या निदान पाचलाख किंवा अधिक आहे असे ब्लॉग निवडायचे. कारण असे ब्लॉगर्स स्वतःच्या ब्लॉगवरून शक्यतो उत्तर देणारच. झालं.. घरबसल्या पंचम् लक्ष हिट्स नक्की झाल्या !!

अर्थात हे गुप्ता नाव पण नुकतंच कळलं बरं आम्हाला. गेले कित्येक आठवडे नाव लपवत फिरणाऱ्या गुप्ताला एका ब्लॉगरने पत्र पाठवून झोडल्यावर काहीतरी नाव घ्यायचं म्हणून मग जे सुचलं ते नाव लावलंय पठ्ठ्याने! आता हे एवढं सगळं कळत असूनही, माहित असूनही, लक्षात आलं असूनही गुप्तांच्या सापळ्यात अलगद अडकणार्‍याला काय म्हणावं बरं !!! काही म्हणू नका कारण

लिहावे फाटके
शब्दांची थोटके
भले टीनपाटके
गुप्ता म्हणे ||

तू भी क्या याद करेगा, गुप्ता. तू भी खुश हो जा.. तुला घरबसल्या एकूण पंधरा लाख हिट्स मिळण्यासाठी वर दोन लिंका दिल्यात आणि खाली अजून एक लिंक देतोय बघ.

लिहावे फाटके


ना भीती कुणाच्या बापाची
ना चिंता कसल्या खपाची
ना गरज कुठल्या थापांची
सत्यवाना ||

-लेखनसीमा

Thursday, March 8, 2012

अतिथी : २


विनोदी विशेषांकासाठी संपादकीय लिहायचं म्हणजे फार आव्हानात्मक प्रकार आहे. खरं तर विनोदी अंक काढणं हेच बर्‍यापैकी मोठं आव्हान आहे. असो पण तूर्तास फक्त संपादकीयाविषयी बोलू. तर आव्हानात्मक अशासाठी की वाक्यावाक्याला खळखळून हसायला आलं पाहिजे अशी वाचकांची अपेक्षा असते. ती अपेक्षा पूर्ण करत विनोदी लिहावं तर अशीही खबरदारी घ्यावी लागते की विनोदी लिखाण (संपादकीय) हे विनोदी वाटेवाटेतो हास्यास्पद होण्याच्या पातळीला जाता कामा नये. कारण दोन्हीतली सीमा बर्‍यापैकी निसरडी आहे आणि विनोदी लिहिता लिहिता कधी पाय घसरून 'हास्यास्पद'वाल्या धरतीवर नाक घासायची पाळी येते ते कळतही नाही. थोडक्यात एवढे सगळे निसरडे कोपरे ध्यानात घेऊन मी आधीच ठरवून टाकलं की काहीही झालं तरी संपादकीय हे विनोदी वगैरे लिहिण्याच्या भानगडीत पडायचं नाही (आपोआपच ते हास्यास्पद होण्याचं टळलं !!) आणि वर "अंकात प्रदर्शित झालेल्या मतांशी --संपादकीय धरून-- संपादक सहमत असेलच असे नाही" अशी तळटीप टाकायची की झालं काम. नरो वा कुंजरो वा !!

असो... तर हास्यगाऽऽरवा उर्फ होळी विशेषांकाचं हे आपलं तिसरं वर्ष. आहां.. पण खरी गंमत तिथेच आहे. हे तिसरं वर्ष असलं तरी लौकिक जगताच्या गणिताप्रमाणे  तिसरं वर्ष म्हणजे हा तिसरा अंक असेल असं तुम्ही गृहीत धरलं असाल तर तुम्ही साफ गंडलेले आहात...थांबा,थांबा. विस्कटतोय. थोडा धीर धरा.. !

डिसेंबर २००९ मध्ये सर्वप्रथम 'शब्दगाऽऽरवा' हा जालरंग प्रकाशनाचा पहिला जालीय अंक निघाला. अर्थात तेव्हा जालरंग प्रकाशन वगैरे काहीही नव्हतं. देवकाका आणि इतर हौशी ब्लॉगर्सनी मिळून या जालीय अंक प्रकाराची सुरुवात केली. त्यानंतर तीनच महिन्यात 'हास्यगाऽऽरवा' असा पुढचा अंक निघाला. कालांतराने या सगळ्याला 'जालरंग प्रकाशन' असं नाव देण्यात आलं. आणि दर तीन ते चार महिन्यांनी जालरंग प्रकाशनाचे शब्दगाऽऽरवा, हास्यगाऽऽरवा, (श्रावणात निघणारा) ऋतूहिरवा, दिवाळी अंक असे एकेक नवनवीन कल्पनांनी भरलेले आणि भारलेले अंक रसिकांच्या भेटीस येत राहिले. आधीच दर ३-४ महिन्यांनी जालीय अंक काढणं ही स्वतःतच एक आगळीवेगळी कल्पना होती. कारण तोपर्यंत रसिकांना फक्त दिवाळी अंक हा प्रकार माहीत होता. जालरंग प्रकाशनाने रसिकांना दर तीन महिन्यांनी अंक निघू शकतो या कल्पनेवर विश्वास ठेवण्यास भाग पाडलं, असं करता करता २०१० च्या ऑगस्टमध्ये एक अतिशय वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न केला गेला. लोकांना कितपत आवडेल किंवा त्या कल्पनेला लोकांचा किती पाठिंबा मिळेल याबद्दल आम्ही सर्वजणच जरा साशंक होतो. तर त्या अंकाचं नाव होतं 'जालवाणी'. त्यात एकही लेख, कविता शब्दस्वरुपात नव्हते. हा अंक ध्वनीमुद्रित विशेषांक होता. पूर्णतः श्राव्य स्वरूपाचा. त्यात होते ते सगळे लेख/कविता स्वतः लेखकांनी स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले होते. ही कल्पना निश्चितच विलक्षण आगळीवेगळी होती. फक्त आणि फक्त ध्वनिमुद्रित स्वरूपातला हा पहिला जालीय अंक होता. रसिकांनीही ती कल्पना तुफान डोक्यावर घेतली. थोडक्यात १५ ऑगस्ट २०१० रोजी जालीय अंक बोलू लागले !! जालरंग प्रकाशनाचे अंक तुफ्फान हिट होण्याचं अजून एक अतिशय महत्त्वपूर्ण कारण म्हणजे कुठलंही लेखन नाकारलं जात नाही. संपादकांपर्यंत आलेलं प्रत्येक लेखन स्वीकारलं जातं. हा प्रकारही कुठल्याही जालीय अंकाच्या बाबतीत न आढळणारा !! असो..

मी ही जी वरती बडबड केलीये ती 'पुराव्याने शाबीत करायची' झालीच तर हे घ्या दोन पुरावे. पहिल्या दुव्यात जून २०११ पर्यंत निघालेल्या जालरंग प्रकाशनाच्या विविध अंकांची यादी आहे आणि दुसर्‍या दुव्यात त्या त्या अंकांसंबंधी वेळोवेळी करण्यात आलेल्या उद्घोषणा आहेत.

जलरंग प्रकाशनाच्या विविध अंकांची यादी

उद्घोषणा

"दर तीन महिन्यांनी नवीन अंक निघतो" हे वाक्य अतिशयोक्तिपूर्ण किंवा विनोदीच वाटण्याचा संभव केव्हाही जास्त. परंतु ते अतिशयोक्तिपूर्ण नाही की विनोदी नाही. सब फॅक्ट्स हय भाय. स्वतः त्या दुव्यांवर टिचक्या मारून तपासून बघा. आता कळलं मी मगाशी का म्हणत होतो की मी संपादकीय विनोदी लिहिण्याच्या भानगडीत पडणार नाही म्हणून. कारण खरं लिहिलं तरी विनोदी (आणि कदाचित खोटं) वाटण्याची शक्यता अधिक.

"सांगे वडिलांची कीर्ती, तो येक मूर्ख" हे समर्थांनी सांगितलेलं मूर्खाचं लक्षण ठाऊक असूनही तरीही जालीय अंक प्रकारात 'बाप' असणार्‍या जालरंग प्रकाशनाच्या अंकांबद्दल स्वतःच एवढी माहिती देण्याला अजूनही एक कारण आहे. आपल्या मराठी भाषेची मनापासून सेवा करणारी अनेक चांगली आणि जुनी संकेतस्थळं उपलब्ध आहेत. जालरंग प्रकाशनाला (उद्घोषणा करण्यासाठी) वेळोवेळी त्यांची मदतही झालेली आहे. परंतु 'ग' ची कावीळ झाल्याने सगळं जालीय जगच पिवळं दिसणार्‍या काही आयड्यांना (छ्या छ्या.. शिवी नाही हो.. आयडी चं अनेक वचन) देवकाका स्वतःचा फायदा (??? !!!!) करून घेण्यासाठी त्या आयड्यांच्या (म्हंजी वो???) संकेतस्थळाचा वापर करून घेताहेत असा स्वघोषित साक्षात्कार झाला. तेव्हा अशा काही आयड्यांना जालरंग प्रकाशनाचा प्रवास, मेहनत, कळकळ (आणि यातून कोणालाही आर्थिक फायदा कसा होत नाही) हे सगळं थोडक्यात दाखवावं या दुसर्‍या उद्देशाने हा प्रवास थोडक्यात मांडला.

"कोणत्याही प्रसिद्ध हयात/मृत व्यक्तीची नावानिशी टिंगलटवाळी केलेली चालणार नाही." अशा सूचनेनुसार खरं तर मी त्या आयड्यांची जाहीर नावं घेऊनही टिंगलटवाळी करू शकलो असतो कारण या काही व्यक्ती नाहीत.. या आयड्या आहेत फक्त. खर्‍या-खोट्या लोकांनी खरी-खोटी नावं घेऊन धारण केलेली खोटी रूपं. त्यामुळे नावं घेऊन टिंगल करूनही मी नियम मोडला असं काही झालं नसतं पण तरीही नावं न घेताच जर काम होतंय तर अजून खोलात कशाला जा !! आणि अर्थात या गळे काढणार्‍या आयडीज अतिशय थोड्या आहेत.. आणि मुख्य म्हणजे 'नेहमीच्या यशस्वी' आहेत. तेव्हा असल्यांकडे लक्ष देण्याएवढा आपल्याकडे वेळ नाही, गरज नाही आणि त्यांची तेवढी लायकीही नाही.. आणि मुख्य म्हणजे असे काही विघ्नसंतोषी वगळता बाकी सगळे आपलेच तर आहेत !!!

खरं तर संपादकाने निष्पक्षपातीपणे लेखन करणं अपेक्षित असतं पण म्हणून त्याने 'खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट' या संतवचनाला विसरावं असाही काही नियम नाही. तस्मात् या वचनानुसार मी निष्पक्षपातीच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी काही हाडाचा संपादक नाही त्यामुळे थोडं इकडंचं तिकडे चालतं हो..... आणि अर्थात हे असलं संपादकीय वाचून तुमच्या ते एव्हाना लक्षातही आलं असेल. असो आपण पुन्हा एकदा आपल्या हास्यगाऽऽरव्याकडे वळू. आपला यावेळचा हास्यगाऽऽरवा नेहमीप्रमाणेच निरनिराळ्या लेखनप्रकारांनी सजलेला आहे.

त्यात श्री अरविंद रामचंद्र बुधकर यांनी लिहिलेली चार खुसखुशीत विडंबनं आहेत, विनायक पंडित यांनी लिहिलेली आणि स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित केलेली दोन अतिशय सुंदर प्रहसनं आहेत. राजस्थान, छत्तिसगढ इत्यादींसारख्या राज्यांत विवाह किंवा तत्सम शुभप्रसंगांच्या वेळी गायली जाणारी व्यंगात्मक किंवा शिव्यांनी भरलेल्या गारी(ली) गीतं अशा वेगळ्या प्रकारच्या लोकगीतांवर असणारा अरुंधती कुलकर्णी यांचा भन्नाट लेख आणि तितकाच अमित गुहागरकर यांचा एकदम ४४० व्होल्टचा झटका देणारा 'शॉक' लेख आहे !! गंगाधर मुटे यांची एक खणखणीत हझल आहे आणि देवकाकांच्या स्वतःच्या आवाजातल्या होळीच्या आठवणी आहेत... अनिताताई आठवले आणि विजयकुमार देशपांडे यांचे खळखळून हसवणारे विनोदी किस्से आहेत आणि विजयकुमार देशपांडे यांचं एक नर्मविनोदी काव्यही आहे. नरेंद्र गोळे यांचा चित्रकविता हा एक आगळावेगळा प्रकार आहे आणि विशेष म्हणजे शशिकांत गोखले आणि अथर्व गोखले या आजोबा आणि नातवाच्या जोडीने सादर केलेलं एक सुंदर अभिवाचन आहे. एकुणात अगदी भरगच्च म्हणता येणार नसला (विनोदी अंकाचं नेहमीचं दुखणं !) तरी विनोदांच्या आगळ्यावेगळ्या प्रकारांनी भरलेला हा आमचा हास्यगाऽऽरवा वाचताना न बिचकता अगदी मनसोक्त हसा कारण प्रत्येकच टवाळाला विनोद आवडत असला तरी विनोद आवडणारा प्रत्येकच जण टवाळच असतो असं काही नाही !! तेव्हा होऊ द्या जोरदार हाहाहूहू !!

वाचकांना सूचना : अंकात प्रदर्शित झालेल्या मतांशी (आणि संपादकीयाशीही) संपादक सहमत असेलच असे नाही परंतु संपादकीयाशी मात्र देव काका आणि अंकात लेखन प्रकाशित झालेले सर्वजण लेखक सहमत असतीलच असतील याची खात्री बाळगा (कारण नियमच आहे तसा यावेळचा) आणि त्यामुळे काही तक्रारी, सल्ले, सूचना, नापसंतीदर्शक प्रतिक्रिया इ इ इ सगळं देवकाकांना मेल करा आणि हे वगळून जे काही कौतुकास्पद, स्तुतिपर वगैरे वगैरे जे काही असेल ते मला मेल करा.

कळावे,

आपलाच,
-हेरंब ओक

# जालरंग प्रकाशनाच्या हास्यगाऽऽरवा '२०१२ या विनोदी विशेषांकासाठी लिहिलेलं हे संपादकीय. पूर्ण अंक इथे  वाचता येईल

Saturday, March 3, 2012

सानुल्या


निरोप घेऊन हात हलविल्याक्षणीच रे गहिवरलो
दाबून धरल्या हुंदक्यांशी रे पार लढाई हरलो
कासावीस अन् आर्त हाकांची भरती ये कानांशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||१||

गादीवरती झोकून द्याया भीतीच रे वाटते
फुफाटणाऱ्या आठवणींची गर्दी फार दाटते
कुस बदलता एकाएकी भिजून जाते उशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||२||

प्रहार करुनी प्रहरांचे त्या रात्र सांडूनी जाते
पुऱ्या जागत्या नेत्रांमधूनी पहाट होऊ येते
किती आराधा तरी न लागे डोळा रे डोळ्याशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||३||

बिछान्यातुनी उठोन बसणे संकट नित्य सकाळी
कुणास ठावे कधी भेटशील काय लिहिले भाळी
सुकलो रे कोमेजून गेलो जीव नसे थाऱ्याशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||४||

लाथाडावे फेकून द्यावे सारे रोज ठरवितो
धावधावुनी अखेरीस परि परीघातच अडखळतो
देवालाही बापाची या दया न येत जराशी
कसा सानुल्या पडलो अडकून असा दूरच्या देशी ||५||

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...