Saturday, August 28, 2010

एय उडी उडी उडी...

जेरेमी : आलं ना सगळं लक्षात?
हेरंब : ह्म्म्म
जेरेमी : पुन्हा सांगू का?
हेरंब : म्म्म्म.. चालेल..
जेरेमी : बरं.. थोडक्यात सांगतो. वर गेल्यावर दार उघडून मी उजवा पाय बाहेर ठेवीन. माझ्या पायाच्या किंचित अलीकडे तू तुझा उजवा पाय ठेवायचास. पुढचं सगळं मी बघून घेईन. त्यानंतर लगेच शरीराचा आकार धनुष्यासारखा करायचा. डोकं आणि पाय जास्तीत जास्त मागे न्यायचे. हात पुढे बांधलेले. नंतर मी तुझ्या खांद्यावर हळूच चापट मारून तुला खुण करेन तेव्हा हात पूर्ण पसरायचे.. आडवे. उडल्यासारखं करायचं. आत्ता इथपर्यंत पुरेसं आहे. उरलेलं मी नंतर सांगेन...
हेरंब : बरं.
नंतर जेरेमी हेरंबच्या पाठीला सॅकसारखं काहीतरी बांधतो.. अर्थात ते जे काही असतं ते साध्या सॅकच्या १५-२० पट जड असतं. दोन पट्टे पाठीवरून आणि दोन पट्टे पायातून येऊन मांडीजवळ आवळले जातात. आता हेरंब एकदम तयार असतो. जेरेमीच्या मते.. स्वतः हेरंबच्या मते तर तो कधीचाच तयार असतो.

जेरेमी : मी आता शुटींग करतो.
दोन-अडीच तास वाट बघत थांबल्याने हेरंबला आधीच कंटाळा आलेला असतो. कधी एकदा वर जातोय असं झालेलं असतं.. त्यामुळे जेरेमीच्या कॅमेर्‍यात बघून तो काहीतरी बडबडायचं म्हणून बडबडतो.

जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : हो
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : नाही
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : माहीत नाही
जेरेमी : बकबक बकबक ?
हेरंब : हो. पण मला आता फक्त वर जायचंय.
जेरेमी : ओके
हेरंब, जेरेमी, हेरंबचा एक मित्र आणि जेरेमीचा एक मित्र असे सगळे आत बसतात. पोरगेलासा पायलट विमान सुरु करतो.विमान कसलं ते? मारुती-८०० एवढी रुंदी आणि दोन मारुत्यांएवढी लांबी असलेलं आणि पंख असलेली एक गाडीच ती.जेरेमीने सांगितल्याप्रमाणे हेरंब पायलटच्या शेजारी बसतो. पाय पसरून. हेरंबच्या बरोबर मागे जेरेमी. जेरेमीच्या शेजारी हेरंबचा मित्र आणि जेरेमीचा मित्र बसतात. विमान सुरु होतं आणि बघता बघता आकाशात झेपावतं.जेरेमीने सांगितल्याप्रमाणे विमान सुरु झाल्याझाल्या हेरंब जेरेमीच्या पाठीला रेलून बसतो. हेरंब पूर्ण वेळ लहान मुलासारखा बाहेर बघत असतो. अडीच तासांपूर्वी लख्ख ऊन असणार्‍या आकाशात थोडे ढग दिसायला लागलेले असतात.. विमान प्रचंड घरघर, खरखर, धुस्सधुस्स करत असतं. त्यामुळे

जेरेमी : खरं १५ सेकंदांचा फ्रीफॉल आहे. त्यानंतर पॅराशूट उघडायचं. पण ढगांमुळे आपला फ्रीफॉलचा कालावधी ५ सेकंदांनी कमी होईल. कारण १०,००० फुटांऐवजी आपण ९,००० च जाणार आहोत.

हे हेरंबला

जेरेमी : खरं घरघरघरघर १५ घरघर फ्रीफॉल आहे. त्यानंतर पॅराशूट खरखरखर. पण ढगांमुळे आपला फ्रीफॉलचा घरघरघर ५ सेकंदांनी कमी होईल. कारण आपण १०,००० धुस्सधुस्स फक्त ९,००० च घरघरघरघर..

असं ऐकू येतं. बराच वेळ झाला तरी विमानाचं नाक अजूनही वर असल्याचं हेरंबला जाणवतं. एव्हाना खालच्या गोष्टी जवळपास साखरेच्या दाण्यांएवढ्या दिसायला लागलेल्या असतात. आणि सगळीकडे नुसतं पाणीच पाणी दिसत असतं. हेरंबच्या मनात किंचित भीतीसारखं काहीतरी टकटक करून जातं. "आता मागे नाही ना फिरता येणार?" अशासारखं काहीतरी. तो चटकन दुर्लक्ष करतो. आणि तेवढ्यात.... यस्स !!!!! 'तो' क्षण येतो. जेरेमी त्याच्या सॅकच्या पट्ट्यांचे हुक्स हेरंबच्या पट्ट्यांच्या हुक्समध्ये अडकवतो. दोघे उभे रहातात. जेरेमी विमानाचं दार उघडतो आणि त्याचा उजवा पाय विमानाच्या पायरी(??)वर ठेवतो आणि हेरंबला त्याचा उजवा पाय स्वतःच्या उजव्या पायाच्या अलीकडे ठेवायला सांगतो. आयुष्यात पहिल्यांदाच आपली विमानात चढण्याची आणि 'उतरण्याची' पद्धत सर्वस्वी भिन्न असणार आहे असले काहीतरी विचार हेरंबच्या डोक्यात येऊन जातात. हेरंब पाय विमानातून बाहेर काढून जेरेमीच्या पायाच्या अलीकडे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पाय नीट ठेवता येणार नाही याची अतिप्रचंड महाभयंकर वारा काळजी घेतो. कसाबसा पाय ठेवल्यावर थेट खाली बघितल्यावर उंचीSSSSSSचा थोडासा फोबिया की तत्सम काहीतरी हेरंबला जाणवून जातं. आता काय होणार असा क्षणभर विचार करत असताना जेरेमीने आपलं काम केलेलं असतं. एका सेकंदाच्या आत हेरंब अजूनही तोच विचार जमिनीपासून काही फुट जवळ येऊन करत असतो. भप्पसप्पठप्प आवाज करत वारा कानावरून जात असतो. जेरेमी खांद्यावर हलकी चापट मारून हेरंबला हात पसरण्याची आठवण करून देतो. जे काही घडतंय ते विश्वास ठेवण्याच्या पलीकडचं असतं. इतक्या वेळ पडतोय तरी आपण अजून अधांतरी कसे असं वाटावं इतका वेळ मध्ये गेलाय असं वाटतं ना वाटतं तोच जेरेमी पुन्हा खांद्यावर चापट मारतो. हेरंब हात जवळ घेतो आणि अचानक गुरुत्वाकर्षणशक्तीला गंडवणारी एक शक्ती हवा बनून पॅराशूटमध्ये शिरते. पुन्हा भप्पसप्पठप्प आवाज कानाशी होतो पण यावेळी तो ठप्पसप्पभप्प असा वाटतो. जेवढ्या वेगाने खाली येत होतो तेवढ्याच वेगाने हेरंब आणि जेरेमी वर जायला लागतात. आईसक्रीम सांडून ठेवल्यासारखे ढगांचे गोळे मधून मधून दिसत असतात. "आयला, इथूनच तर खाली आलो ना? मग मगाशी कसे दिसले नाहीत हे?" असा विचित्र विचार करत हेरंब वर जात रहातो.. काहीच क्षण. नंतर सगळं नॉर्मल होतं अचानक. आता एकदम हलकं वाटत असतं. आजूबाजूला काय दिसतंय, काय घडतंय याच्या नोंदी हेरंबच्या मेंदूवर व्हायला लागतात. हे असं कित्येक सेकंदांनंतर होत असतं. मधला काही वेळ एवढा वेगात गेलेला असतो की नोंदी व्हायच्या आतच त्या जुन्या झालेल्या असतात आणि त्यांची जागा नव्या गोष्टींनी घेतलेली असते. मग झाडं, शेतं, जलाशय, पाणी, बिल्डिंग्स, गाड्या, रस्ते, लोकं, विमानं या सगळ्यांचे एक शंभरांश आकार दिसायला लागतात. हळूहळू जेरेमीची कलाकुसर दिसायला लागते. तो मधेच पॅराशूट गोलगोल फिरवतो, मधेच गिरक्या घेतो, मधेच वळवतो, मधेच घिरट्या घातल्यासारखं करतो. हवेशी खेळ चालू असतात, वारा भिरभिरत असतो. तीच तीच झाडं, शेतं वेगवेगळया कोनांतून दिसत रहातात. या सगळ्या इमुकल्या चिमुकल्या पिटुकल्या जगाचा राजा असल्यासारखं हेरंबला वाटतं. हे घिरट्यांचे खेळ बराच वेळ चालू रहातात. जेरेमी अगदी फॉर्मात आलेला असतो. ही त्याची दिवसातली सातवी उडी आहे याच्यावर कोणाचा सांगूनही विश्वास बसणार नाही अशा प्रकारे जेरेमीचे खेळ चालू असतात. बघता बघता एक शंभरांश आकार वाढत वाढत मोठे होत जाताना दिसायला लागतात. एव्हाना हेरंबलाही उंचीचा आणि त्या घिरट्यांचा थोडासा कंटाळा यायला लागतो. पाय जमिनीवर यायची वाट बघायला लागतात. हे सगळं जणु कळल्याप्रमाणे जेरेमी जमिनीच्या दिशेने झेपावायला लागतो. झूम्म्म्म्म्म करत दोघेही खाली येतात. एअरपोर्ट वर लँड होताना विमानाचा काढावा तशा धर्तीवर हेरंब आणि जेरेमीचा धरतीवर पाउल ठेवायच्या काही क्षण आधी एक फोटो टिपला जातो आणि हेरंब एकदाचा जमिनीवर येऊन पोचतो. थोडंसं गरगरत असतं. जाम बरं वाटतं. तेवढ्यात जेरेमी कानाशी येऊन किंचाळतो. "माझं नाव काय??".. फुटला न फुटला अशा आवाजात हेरंब "ज्ये र्र मि" असं काहीसं बडबडतो. क्लिक खटॅक.. कॅमेरा ऑफ. गुड बाय जेरेमी. हेरंब पुन्हा एकदा खात्री करून घेतो.. सुखरूप असतो.. हातीपायी धड असतो... "एय उडी उडी उडी" बरोब्बर जमिनीवर पडलेली असते.

तळटीप क्र. १ : खरं तर ही वाचण्याची नाहीच तर तर बघण्याची किंबहुना करण्याची गोष्ट. तरीही उगाच कायतरी लिहिल्यासारखं केलं. आवडलं नसेल, कळलं नसेल तरी खालचा व्हिडीओ बघा लगेच. तेवढंच (माझं) पापक्षालन होईल... आणि हो. धरतीवर पाउल ठेवतानाचा फोटू पण आहेच.

तळटीप क्र २ : प्रथमपुरुषी एकवचनाऐवजी उगाच टीपी म्हणून विशेषनामाचा वापर केला. पण खरं सांगतो, इतक्या वेळा स्वतःचं नाव लिहिताना, वाचताना भारी मजा येते. अगदी जनार्दन नारो शिंगणापूरकराची शप्पत !!

तळटीप क्र ३ : ही आमची शंभरावी नोंद. अर्थात या टिपेचा या नोंदीशी काहीही संबंध नाही हा भाग अलाहिदा.

व्हिडीओ इथे चिकटवला आहेच आणि आता त्याचा उजवीकडचा भाग कापलाही जात नाहीये. धन्स कांचन. आणि हा तूनळीचा दुवा. जस्ट इन केस.. :)

http://www.youtube.com/watch?v=fEvDlHzYBNo
Monday, August 23, 2010

...... !!!

ज्जे ब्बात.. असं कन्फ्युजिंग शीर्षक टाकण्याचा एक फायदा असतो तो म्हणजे सदरहू लेख किती विस्कळीत आहे याचा थोडाफार तरी अंदाज येऊन वाचक नाईलाजाने का होईना जरा सावरून बसून वाचायला लागतात. आता आपल्यात म्हणून सांगतो खरं तर 'शॉपिंगिंग' (शॉपिंग 'करणे' म्हणून शेवटचा शेपरेट इंग ) किंवा 'माझे खादाडीचे प्रयोग : भाग ४' यापैकी एक नाव देणार होतो पण शॉपिंग विषयी वाचायला आलेल्यांना विंडो कसलं विंडोच्या साध्या गजाच्याही शॉपिंगचं सुख मिळालं नसतं आणि खादाडीवर वाचायला आलेल्यांना काहीतरी अर्धकच्चं, शिळंपाकं वाचायला लागल्याने खर्रेखुर्रे वैताग-निषेध नोंदवावे लागले असते त्यामुळे मग 'खेळ सुरक्षित' (हे तिसरं शीर्षक नाही.. 'प्ले सेफ' चा भावानुवाद आहे. आयला त्या खोखोच्या. तो सुरु झाल्यापासून भाषांतर च्या ऐवजी भावानुवादच तोंडात येतं सारखं..) म्हणत '...' हे दिलं. जो जे वांछील तो ते लाहो... अर्थात 'बाजार.... हाट !!' असंही एक शीर्षक डोक्यात होतंच पण 'शॉपिंगिंग'चं च विश्लेषण (आवरा !!) यालाही लागू होतं म्हणून वगळलं. ही पोस्ट कुठूनही कुठेही भरकटत गेलेली आहे हे शीर्षक आणि पहिल्या परिच्छेदावरून दिसतंच आहे. (नाममहात्म्य असतं पण म्हणून पहिल्या ८ ओळी त्यासाठीच?)... पोस्टबाळाचे पाय पहिल्या परिच्छेदातच दिसतात. दुसरं काय. मुळात दोन पोष्टींमधलं अंतर [तारीख (पे तारीख)] पाहता सुचलेलं धाडधाड लिहून टाकण्याऐवजी "हे असं काय सुचतंय विचित्र." किंवा "जरा विषयाला धरून नाही वाटत नै" असले लाड करून घेतले तर मग (ब्लॉगची) उपासमारच की.

तर परवाची गोष्ट. "ती नाही रे.. ती.. तिच्या बाजूची.. पिवळी डाळ", "अरे पातळ पोहे नकोत.. जाड घे तिथले", "अरे इडली रव्याने कसा करणार उपमा? इडली रवा नकोय.. त्याच्या बाजूचा घे.. 'सुजी' लिहिलेला" अशा बाजारहाट (घरगुती खरेदीला शॉपिंगिंग म्हणणं हा समस्त मॉलांचा अपमान आहे खरं तर) हे (जणु) एक महादिव्य काम आहे (अर्थात ते आहेच.), तुला काहीही कळत नाही, मी नसले की काहीही उचलून आणतोस अशा छुप्या हल्ल्यांनी भरलेल्या सूचनास्त्रांचा वर्षाव चुकवण्याचा असफल प्रयत्न करत त्या सगळ्या सूचना पाळत पाळत (न पाळून सांगतोय कोणाला?), ती अवाढव्य ट्रॉली त्या टीचभर सुपरमार्केटच्या इवल्याशा गल्ल्यांमधून नेत नेत मी कसाबसा काउंटरच्या रांगेपाशी येऊन पोचलो. (हे 'पॅसिव्ह' प्रकारचं वाक्य आहे ज्यात (सूचना)कर्त्याचा नामोल्लेख करावा लागत नाही आणि तरीही कर्ता(र्ती) कोण हे सर्वांना ठाऊक असतं). समोर बघतो तर तिथल्या ट्रॉलीत एकावर एक तीन ट्रॉल्या भरतील एवढ्या सामानाचा डोंगर. मला एकदम तो डोनाल्ड डक मगात चिक्कार पाणी भरतो तरी ते सांडण्याऐवजी खांबासारखं सरळ वर वर जातं त्याची आठवण झाली. आयला म्हणजे असं प्रत्यक्षात सुद्धा होतं तर. उगाच त्या अ‍ॅनिमेशनमधल्या अतिशयोक्तीला नावं ठेवायचो. सॉरी डिस्ने आजोबा. जवळपास पंधरा मिनिटं स्थितप्रज्ञासारखं उभं राहूनही रांगेत एक इंचही पुढे सरकलो नव्हतो. कॅशिअरबाई त्या सामानाच्या ढिगार्‍यात हात घालून एकेक जिन्नस बाहेर काढून ते बारकोड-रीडरसमोर धरून बील करत होत्या. कित्येक वस्तू त्या ढिगार्‍यातून बाहेर पडून काउंटरच्या दुसर्‍या बाजूचा ढिगारा तयार करण्यात खर्ची पडल्या तरीही इकडचा ढिगारा काही कमी होण्याची लक्षणं दिसत नव्हती. कॅशिअरबाईंचा कारभारही जगाची पर्वा नसल्याप्रमाणे अगदी निवांत असा चालला होता. थोडक्यात सोमालिया किंवा तत्सम कुठल्याशा आफ्रिकेतल्या देशातल्या एखाद्या बाईला पकडून तिला एक लाख रुपये देऊन "बाई ग, कर तुला हवी ती हवी तेवढी खरेदी" असं सांगितलं तर ती जेवढी खरेदी करेल तेवढी खरेदी करणारी बाई काउंटरच्या या बाजूला आणि पुण्याच्या चितळ्या-पितळ्यांच्या दुकानातल्या निवांतपणाने काम करणार्‍या बाईला इथे आयात केलं किंवा तिचा क्लोन केला तर जे काही तयार होईल ती बाई काउंटरच्या त्या बाजूला असा दोन सर्वस्वी भिन्न संस्कृत्यांचा अनोखा संगम माझ्या (कंटाळलेल्या) डोळ्यांसमोर घडत होता. काउंटरच्या अलिकडलीचा बाजाराहाटीचा दांडगा उत्साह आणि पलीकडलीची निवांत स्थितप्रज्ञता यासमोर माझा अवसानघातकी संयम दुबळा ठरला. त्या आत्यंतिक धिम्या गतीने आकुंचन पावणार्‍या (ट्रॉलीतल्या) ढिगार्‍याकडे पहात राहण्याएवढं धैर्य माझ्या अंगी नव्हतं. सुस्कारे टाकत, चकचुक करत "तू थांब इथेच जरा वेळ, मी पटकन राउंड मारून येतो" असं बायकोला सांगून मी रांगेतून बाहेर पडलो. आमच्यात दुकानातल्या रांगेत उभं राहिल्यावर हे 'राउंडयुद्ध' फार रंगतं. समोरचा बेसावध असताना शिताफीने जो "मी जरा राउंड मारून येतो/ते" हे वाक्य टाकतो तो/ती जिंकला/ली. यात तो-ला कधीच जिंकत नाहीत आणि ते-ली कधीच हरत नाहीत. पण आज सचिनच्या खणखणीत स्ट्रेट ड्राईव्हची आठवण करून देणारं टायमिंग वापरून मी या युद्धात जिंकलो होतो. त्या अतीव आनंदात आधीच्या पंधरा मिनिटांची कटकट विसरूनही गेलो. हे शेवटच्या क्षणी राउंड मारणं म्हणजे काय तर उगाच दुकानात चकरा मारत राहणं. हातात ट्रॉली नसते की कडेवर लेक नसतो. बागडा हवं तेवढं. तर असाच बागडत बागडत एकेक सेक्शन फिरत फिरत मी फ्रोझन सेक्शनपाशी जाऊन पोचलो..... आणि तिकडे घडलेला अजून एक अनोखा संस्कृतीसंगम पाहून फ्रीझ झालो !!! हा संगम होता रुचकर इटालिअन संस्कृती आणि रांगड्या पंजाबी संस्कृतीचा... !! तिथल्या फ्रीजमधून फ्रोझन पिझ्झाची बरीचशी पुडकी डोकावत होती. "नान पिझ्झा"... नान पिझ्झा.. नान पिझ्झा? नान पिझ्झा?????? नानाची टांग तुमच्या.. त्या पिझ्झाच्या पुडक्यांवर एक सरदार आपल्या मिशीला ताव देत पिझ्झावर ताव मारत होता. आणि त्या पिझ्झाचे प्रकार तरी किती .. पालक पिझ्झा, पनीर पिझ्झा, छोले पिझ्झा, मेथी पिझ्झा.... बास, पुरे.. च्यायला, मेथीच्या आणि पालकाच्या भाज्यांबरोबर नान खायला घालतायत आणि नाव मेथी नान-पिझ्झा !! हट् साला.. हा संस्कृत्यांचा संगम कसला ही तर एतद्देशीय आणि परदेशी खाद्यसंस्कृतीची मारामारी होती, युद्ध होतं, खडाजंगी होती.. संग्राम होता... संगम सोडून दुसरं काहीही होतं.. मी त्या मिशीला ताव देणार्‍या सरदाराकडे बघून कुत्सितपणे हसलो. तेवढ्यात काय झालं काय माहित पण अचानक त्या सरदाराने रागावून त्याच्या हातातला पिझ्झाचा तवा दाणकन माझ्या डोक्यातच घातला आणि खदाखदा हसायला लागला. पण बघता बघता हसायचं थांबला आणि मी जोरजोरात हसायला लागलो. कारण तव्याला सरसरून टेंगुळ आलं होतं. त्यानंतर मी असा एक जोरदार पंच त्या तव्याच्या टेंगळावर दिला की तवा सपाट होऊन ते टेंगुळ सरदाराच्या पगडीतून बाहेर येऊन रसरसून वर आलं. तव्याचं टेंगुळ आणि त्यानंतर स्वतःला आलेलं टेंगुळ पाहून 'नान पिझ्झा' चा एव्हाना 'ना ना पिझ्झा' झाला होता.


"माफ करना पाजी" सरदार कळवळून म्हणाला
"अरे पाज्या, माफी तर तुला मागितलीच पाहिजे. उगाच कैच्याकै काय खायला घालता तुम्ही लोक पिझ्झाच्या नावावर? आणि वरून दादागिरी? आणि त्या पिझ्झाला काहीतरी अर्थ नको? नान पिझ्झा काय नान पिझ्झा ? अरे अशाने उद्या चितळ्यांनी 'भाकरी पिझ्झा', पटेलांनी 'खाखरा पिझ्झा', शेट्टींनी 'डोसा पिझ्झा', सिंधवान्यांनी 'पापड पिझ्झा' आणला म्हणजे मग? आम्ही काय पिझ्झाच्या नावावर हे असले प्रकार खायचे? आणि हे प्रकार फोफावायला लागले तर ओरिजनल पिझ्झाची चव पुढच्या पिढीला कळणार कशी?"
"ओरिजनल? म्हणजे ते इटालियन?"
"अरे हट. मी ओरिजनल म्हणतोय आणि तू इटालियन इटालियन काय लावलंयस?"
"अच्छा म्हणजे अमेरिकन?"
"अरे ए सरदारा. गपतो का आता? मी ओरिजनल पिझ्झाविषयी बोलतोय आणि तू काय इटालियन, अमेरिकन करतोयस रे? इटालियन, अमेरिकन असतात ते पिट्झा असतात. मी पिट्झा नाही ओरिजनल पिझ्झाविषयी बोलतोय.. जाउदे च्यायला.. मीही कोणाशी वाद घालतोय.. नानवर भाज्या घालून तो पिझ्झा म्हणून विकणार्‍या अज्ञानी जीवाशी?"
"दादा, असं काय करता..? मग तुम्हीच सांगा की नीट." .. मी चुकून अर्धी चड्डी घालून बाहेर भटकतोय की काय आणि असेलच तर तिची नाडी बाहेर लोंबते आहे की काय असे दोन अत्यंत स्वाभाविक प्रश्न 'दादा' हे संबोधन ऐकल्यावर माझ्या मनात डोकावले. पण मी मात्र खाली डोकावलो नाही. स्वतःच्या मतांशी आणि कृतीशी ठाम असल्याचे फायदे मी ऐकले होते आणि पण आज ते एका मठ्ठ सरदाराशी वाद घालताना असे उपयोगी पडतील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता.
मलाही उत्तर माहीत नाहीये की मला ते ठाऊक असूनही मी उगाचंच भाव खातोय हे न कळल्याने "दादा, सांगा ना" असा पुकारा त्याने पुन्हा एकदा केला. यावेळी मात्र कोणीच कुठेच डोकावलं नाही. (आठवा : कृतीशी ठाम).. पण आता बोललो नाही तर ही 'दादा' ची पुंगी काय थांबायची नाही हे लक्षात येऊन मी म्हंटलं "अरे बाबा, पिझ्झा भारतीयच.." टॉमची बुबुळं गरागरा फिरतात तशी त्याची बुबुळं क्षणभर फिरली. त्याच्या बुबुळांचे टप्पे थांबण्याची वाट बघत असताना मी गुपचुप खाली डोकावून खात्री करून घेतली. फुक्कट रिस्क का घ्या..? जस्ट इन केस.. क्काय?
"अरे म्हणजे पिझ्झा हा पदार्थ इटालियन असला तरी आपल्याला आवडणारा ओरिजनल पिझ्झा हा आपल्याच स्टाईलचा, आपणच तयार केलेला, आपल्याला आवडणारा आणि अतिमहत्वाचं म्हणजे ज्यात खाली नान आणि त्याच्यावर मेथी, पालक, छोले असे काहीही प्रकार नसतील असा".. टोमणा कळून तो अचानक मान खाली घालून चक्क लाजला. आधी मला वाटलं डोकावूनच बघतोय की काय. "च्यायला लाजतो काय? कैच्याकै !!" वगैरे बडबडणार होतो मी पण काही उपयोग झाला नसता हे समजून घेऊन शांत राहिलो. पुरेसं लाजून, ओशाळून वगैरे झाल्यावर तो म्हणाला
"म्हणजे कसं हो नक्की?"
"आता तुला ते इथे कसं सांगू? असं तोंडी नाही सांगता येणार."
"अहो चालेल की. तोंडी कशाला मी लिहूनच घेतो".. "अरे एSS .. माझ्या तोंडी न सांगता येण्याचा आणि तुझ्या लिहिण्याचा काय संबंध?" हे वाक्यही मी आधी प्रमाणेच गिळून टाकलं.
"बोला ना दादा, सांगा ना"
"अरे, असं सांगता, लिहिता नाही येणार बाबा."
"असं कसं?? तुम्ही तर प्रत्यक्ष मॅगीचे वडे केलेत, पास्त्यात सॉरी पास्तुल्यात खरवडलेलं खोबरं घातलंत.. त्या मॅगीवर, त्या पास्तुल्यावर कसं का असेना पण तुम्ही लिहिलंतच ना. तसंच हे पिझ्झाचं. सांगा ना." माझा ब्लॉग अमेरिकेत (की पंजाबात?) ही वाचला जातो या नवीन मिळालेल्या माहितीने आनंदी आनंद गडे होऊन मी ते 'कसं का असेना' साफ विसरूनच गेलो किंवा त्याच्याकडे अंमळ दुर्लक्षच केलं आणि 'कसं का असेना' हे लिखाणाला उद्देशून नाही तर कृतीला उद्देशून असावं अशी स्वतःची समजून घालून घेतली.
"बरं तर. होऊनच जाऊदे."
"अरे वा. मग करायची सुरुवात?"
"हम्म चला."
"बरं आता पहिल्यांदा काय करायचं?"
"पहिल्यांदा मी म्हणतो ते ऐकायचं.
१. मी सांगतो ते, सांगतो तसं फटाफट लिहून घ्यायचं."
त्या मंद जीवाने तेही फटाफट लिहून घेतलं. "गधड्या, हे लिहून नको रे घेऊ. या मी तुला आपली पिझ्झाची रेसिपी सुरु होण्याआधीच्या माझ्या अटी सांगतोय."
"अच्छा अच्छा.. असं होय. मला वाटलं पिझ्झा करण्याआधी काहीतरी फटाफट लिहून घेण्याची तुमची शिक्रेट रेसिपी असेल."
"२. कमी बोलायचं. प्रश्न विचारायचे नाहीत. आता पुढे काय? काय छान वास सुटलाय नै? असलं काहीही बडबडायचं नाही. थोडक्यात सगळ्या अटींचं एक सामायिक एकत्रीकरण अर्थात सगळ्यांत सोप्पी अट म्हणजे स्वतःला प्रशांत दामले समजायचं नाही."
त्याला काहीही कळलं नाही. त्याला प्रशांत दामले माहीत नाही पण माझा ब्लॉग मात्र माहिती आहे हे कळल्यावर तर मला अजूनच मुठभर मांस चढलं आणि त्या आनंदातच मी एकदम भाषण देण्याच्या आवेशात उभा राहिलो आणि त्याला (त्याच्या मते) माझी शिक्रेट रेसिपी सांगायला लागलो.

१. महिन्याची तारीख आणि खिशाचं जडत्व यांची सांगड घालून, हिशेबाहिशेबी करून, अचूक उत्तर मिळवून त्यानुसार पिझ्झा खाण्यास बाहेर जावयाचे आहे की सासर्‍याचे आहे हे ठरवावे. आपलं सॉरी.. जावयाचे आहे की ... नकोच ते.. जायचे आहे (आंग्गाश्शी) की पिझ्झा घरीच करायचा आहे हे ठरवावे.

२. ही कृती सार्वकालिक असली तरीही सध्या महिन्याचा शेवटचा आठवडा चालू असल्याने वास्तव वाटावं म्हणून आणि खरोखरचं खिशाचं हलकत्व अधिक असल्याने घरी पिझ्झा करण्याची कृती आधी पाहू या. अद्यापही जड खिसे असणारे डायरेक्ट पायरी क्र. अमुक अमुक पासून वाचू शकतात.

तेवढ्यात अचानक त्या सरदाराने माझा दंड पकडला आणि एकदम ओढत मला कुठेतरी न्यायला लागला. माझे खांदे गदागदा हलवायला लागला.


"अरे काय झालं? असा भाषण दिल्यासारखे हातवारे का करतो आहेस? काय बडबडतो आहेस? आणि अरे इथे काय करतो आहेस? अख्ख्या दुकानात तुला फ्रोझन पिझ्झाचं सेक्शन सोडून दुसरं काही दिसलं नाही?" बायकोने वैतागून माझ्या दंडाला धरून ओढत ओढत मला काउंटरजवळ आणलं. त्या सोमालियाच्या बाईचा आणि पितळ्यांच्या ताईचा द्विराष्ट्रीय आयात-निर्यात कार्यक्रम नुकताच आटपला होता. द्विराष्ट्रीय आयात-निर्यातीच्या तुलनेने अतिशयच तोकडं आणि चिरकुट भासणारं आमचं सामान बायको काउंटरवर काढून ठेवायला लागली.

"काय झालं हो यांना अचानक?" रांगेतली तिच्या मागची बाई एकदम म्हणाली.
"काही नाही हो. असंच.." सौ.
"पण तरीही?"
अखेर सौचा बांध (बडबडीचा व्हो) फुटला असावा. तिला राहवलं नाही.
"मगाशी जाड पोह्यांचं एकच पाकीट घेतलं ते कमी पडेल कदाचित. अजून एक पाकीट घेऊन ये" असं सांगून मला लांब पिटाळून ती त्या बाईंकडे आपलं मन मोकळं करायला लागली.
"अहो काय सांगू तुम्हाला.. सगळंच विचित्र.. याला पिझ्झा अतिशय म्हणजे अतिशय आवडतो. पण मध्यंतरी डाएटिंगचं भूत शिरलं डोक्यात. त्यामुळे चीज, पिझ्झा वगैरे एकदम बंद करायचं ठरवलं याने. हळूहळू कडक पथ्य पाळायलाही लागला. पण काही दिवसच. काही दिवसांनी त्याला आपोआप पिझ्झाची आठवण यायची आणि मग पिझ्झा खावासा वाटायचा. कुठेही दुकानात, हॉटेलमध्ये पिझ्झा दिसला की याची पिझ्झा खाण्याची इच्छा अनावर व्हायची. मग तो एकदम ट्रान्समध्ये जायचा. भास व्हायला लागायचे. विचित्र वागायचा. म्हणून मग हे टाळण्यासाठी आम्ही जिथे पिझ्झा मिळतो किंवा अगदी दृष्टीक्षेपातही येतो अशा ठिकाणी जाणंच बंद केलं. अमेरिकन स्टोर्समध्ये जाणं बंद, अमेरिकन रेस्टॉरंटमध्ये जाणं बंद. पण इंडियन स्टोरमध्ये जाणं कसं सुरक्षित होतं एकदम. पण आता यांनी काय तो नवीन नान पिझ्झा का काय तो नवीन काढला आहे ना.. आता हा नेमका त्या पिझ्झासमोर जाऊन थडकला. आणि मग नेहमीसारखेच हातवारे, बडबड वगैरे वगैरे.. नशीब मी वेळेवर पोचले तिकडे. नाहीतर उगाच शोभा झाली असती."
"हो ना. अरेरे."
सगळ्या वस्तूंचं बिल करून त्या कॅरीबॅगमध्ये भरून झाल्या. पैसे देऊन झाले. रिसीटवर पन्नास डॉलरांचा आकडा बघून पितळेताई लगबगीने उठल्या आणि एका बॅगेत काहीतरी भरून ती बॅग आमच्या पुढ्यात ठेवून सुहास्य वदनाने वदत्या झाल्या "हे तुमचे नान पिझ्झा. अहो आमच्या इथे ही स्कीम चालू आहे. पन्नास डॉलर्सचं शॉपिंग करणार्‍यांना दोन 'नान पिझ्झा' फ्री. एन्जॉय.."

बायको फ्लॅट झाली आणि मी पुन्हा पाजीशी बोलण्यात मग्नाळलो !!!

तळटीप : स्वप्नात कायपण घडू शकतं आणि त्या कायपणचं उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही. ख्रिस्तोफर नोलान परमानेच.. !!

Sunday, August 22, 2010

३३ कोटी + १ : पुन्हा एकदा

मेलवर फॉरवर्ड होत होत, फिरत फिरत एक मस्त लेख मागे मेलबॉक्समध्ये आला होता. मेलवरून फिरत फिरत तो एक दिवस बझवर येऊन पोचला. आपल्या सचिन (तेंडुलकरांच्या) विषयीचा हा लेख टाईम मॅगझिनमध्येही आला होता (बहुतेक).. तर हा लेख बझवर पोचल्यावर आपल्याच सचिनने (पाटलांच्या) "तो मराठीत अनुवाद करून ब्लॉगवर टाक ना" अशी फर्माईश केली. सचिनसाठी (आणि कुठल्याही सचिनभक्तासाठी) जी-जान हजर करायला तयार असलेल्या माझ्यासारख्याला ही कल्पना जाम आवडली. तसंही नुकतंच त्या मावसबोलीतल्या कवितांच्या अनुवादाच्या खोखोचं भूत डोक्यावर बसलेलं होतंच. त्यामुळे त्याच मुडात झटपट हाही अनुवाद करून टाकला. पण घाबरू नका कारण

१. मूळ लेख वाचलाच पाहिजे अशी कळकळीची विनंती आणि महत्वाची अट असली तरीही अनुवाद वाचलाच पाहिजे अशी [(पाटलांचा) सचिन सोडून] कोणालाही अट नाही.
२. हा कुठल्याही प्रकारच्या खोखोचा उगम नाही. त्यामुळे वाचून झाल्यावर शेवटच्या ओळीत पुढच्या खो साठी आपलं नाव तर नाही ना अशी धास्ती न बाळगता बिनधास्त वाचता येण्याची हमी आहे.
३. खरं तर यात चुकण्यासारखं काहीही नसलं तरीही हा अनुवाद १००% अचूक आहे याची कुठलीही शाश्वती नाही आणि त्यामुळे तसा काही दावाही नाही.

पुणेरी पाट्या समाप्त. लेखन चालू.

मूळ लेख :

व्हेन सचिन तेंडुलकर ट्रॅव्हल्ड टू पाकिस्तान टू फेस वन ऑफ द फायनेस्ट बॉलिंग अटॅक्स एव्हर असेंबल्ड इन क्रिकेट, मायकल शुमाकर वॉज येट टू रेस अ एफ१ कार, लान्स आर्मस्ट्रॉंग हॅड नेव्हर बीन टू द टूर दी फ्रान्स, दिएगो मॅरादोना वॉज स्टील द कॅप्टन ऑफ अ वर्ल्ड चँपियन अर्जेंटिना टीम, पीट सँप्रस हॅड नेव्हर वन अ ग्रँडस्लाम. व्हेन सचिन तेंडुलकर एम्बार्क्ड ऑन अ ग्लोरियस करिअर टेमिंग इम्रान अँड कंपनी, रॉजर फेडरर वॉज अ नेम अनहर्ड ऑफ; लिओनेल मेसी वॉज इन हिज नॅपीज, युसेन बोल्ट वॉज अ‍ॅन अननोन कीड इन जमैकन बॅकवॉटर्स. द बर्लिन वॉल वॉज स्टील इनटॅक्ट, यु एस एस आर वॉज वन बिग, बिग कंट्री, डॉ मनमोहन सिंग वॉज येट टू ओपन द नेहरूविअन इकॉनॉमी. इट सीम्स व्हाईल टाईम वॉज हॅविंग हिज टोल ऑन एव्हरी इंडीव्हिज्युअल ऑन द फेस ऑफ धिस प्लॅनेट, हि एक्सक्युज्ड वन मॅन. टाईम स्टँड्स फ्रोझन इन फ्रंट ऑफ सचिन तेंडुलकर. वुई हॅव हॅड चँपियन्स, वुई हॅव हॅड लिजंड्स, बट वुई हॅव नेव्हर हॅड अनदर सचिन तेंडुलकर अँड वुई नेव्हर विल.

अनुवाद :

ज्यावेळी सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या इतिहासातल्या काही सार्वकालिक सर्वोत्कृष्ट आणि धारदार गोलंदाजींपैकी एकीला सामोरा जाण्यासाठी पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाला होता त्यावेळी, मायकल शुमाकर तोवर त्याच्या आयुष्यातली एकही एफ-१ गाडीची शर्यत खेळलेला नव्हता, लान्स आर्मस्ट्रॉंगने तोवर एकदाही टूर दी फ्रान्स शर्यतीत साधा भागही घेतलेला नव्हता, त्या क्षणीही दिएगो मॅरादोना अर्जेंटिनाच्या विश्विजेत्या फुटबॉल संघाचा कर्णधार होता, पीट सँप्रसला अजूनही आपल्या आयुष्यातलं पाहिलं ग्रँडस्लाम जिंकायचं होतं. ज्यावेळी सचिन तेंडुलकरने इम्रान आणि त्याच्या साथीदारांवर वर्चस्व गाजवून आपल्या दैदिप्यमान कारकीर्दीची सुरुवात केली होती त्यावेळी रॉजर फेडरर हे नाव कोणाच्या कानावरही पडलेलं नव्हतं, लिओनेल मेसी तर लंगोटात बागडत होता, युसेन बोल्ट जमैकाच्या खाड्यांमध्ये खेळणारा एक अज्ञात, सामान्य चिमुरडा होता. बर्लिनची भिंत अद्यापही अतिशय दिमाखात उभी होती, यु एस एस आर (रशिया) तेव्हा एक प्रचंड विराट आणि विशाल असा देश होता , डॉ मनमोहन सिंग यांनी अजूनही नेहरूंच्या काळातली अर्थव्यवस्था 'खुली' केलेली नव्हती.
थोडक्यात या सर्वशक्तिमान अशा काळाने पृथ्वीतलावरच्या प्रत्येक जीवाला तावून सुलाखून घेऊन त्याच्या त्याच्या पदरात त्याचं त्याचं माप पुरेपूर घालत असताना एका माणसाला मात्र यातून (आश्चर्यकारकरित्या) वगळलं. हा महाप्रतापी काळ सचिन तेंडुलकरसमोर नतमस्तक झाला. अनेक रथी झाले, महारथी निपजले परंतु अतिरथीं सचिन तेंडुलकर यापूर्वी कधी झाला नाही आणि यापुढे कधी होणे नाही.

तळटीप : क्र २ ची अट लक्षात आहे हो पण कोणाला जर असेच काही चांगल्या पुस्तकांमधले, उत्तम मासिकांमधले उत्कृष्ट उतारे माहीत असतील तर हा वैयक्तिक खो समजून अनुवाद करून ब्लॉगवर टाकण्याचे करावे ही विनंती.

Monday, August 9, 2010

इमोसनल अत्याचार अर्थात खो(टा) अनुवाद !!


यापूर्वीचा खो ही मला अपर्णानेच दिला होता आणि हा खो ही तिनेच दिलाय. पण त्या दोघांत एक मुख्य फरक आहे. आधीचा खो मस्त होता कारण तो सोप्पा होता. पण या वेळचा लय डेंजर. त्यामुळेच जेव्हापासून ही खोखोगिरी सुरु झालीये ना ब्लॉगविश्वात तेव्हापासून या खो वाल्या पोस्ट्स पासून मी चांगलाच टरकून होतो. खो वाली पोस्ट दिसली की ती उघडून त्यातली एकही ओळ न वाचता (स्वारी लोक्स) मी स्क्रोल करत थेट पोस्टच्या शेवटाकडे जायचो आणि तिथे पुढच्या खो साठी माझं नाव नाहीयेना हे बघायचो. तिथे प्रतिथयश नावं दिसली की सुटकेचा भलामोठा निःश्वास सोडून मग मोकळेपणी ती पोस्ट वाचायचो. पण दैवाला फार काळ हे सुख पाहवलं नाही आणि त्याने अखेरीस माझ्या हस्ते एका तरी मावसभावाचा छळ करण्याचं नक्की केलं आणि मी सेप्युलच्युरा नावाचा मावसभाऊ निवडला. तशा मला मावश्या दोनच. तिसरी मावशी फक्त दहावीत स्कोरिंगसाठी आणि संध्याकाळी शुभंकरोती म्हणण्यासाठी किंवा उगाचंच अधेमधे सुभाषितं टाकण्यासाठी. त्यामुळे तो मावसभाऊ/बहिण वाचली. आणि तसंही त्या दोन मावश्यांशी सख्य हे पुस्तकं/चित्रपट या पुरतंच मर्यादित. काव्य, कविता, पद्य वगैरे म्हणजे "बाब्बो... येडा झाला की काय रे !!".. थोडक्यात या दोन्ही मावश्यांची अपत्य निवडली आहेत ती कविता नसून थेट चित्रपट किंवा अल्बममधली गाणी आहेत. 

सेप्युलच्युरा किंवा फॉर दॅट म्याटर कुठल्याही 'डेथ/थ्रॅश मेटल' वाल्या ग्रुपची गाणी ही त्यातले गिटार, ड्रम्सचे पीसेस ऐकण्यासाठी असतात शब्द ऐकण्यासाठी नव्हे हा गैरसमज थोडाफार का होईना सेप्युलच्युराच्या बर्‍याच गाण्यांमधून खोडून काढला जातो. मेटल ऐकणार्‍यांना "यात तुला नक्की काय कळतं? किंवा "दिज आर (फॉर) सिक पिपल" असंही विचारलं/म्हटलं जातं आणि अर्थात ते थोडंफार खरंही आहे. सेप्युलच्युराची चार-पाच गाणी सलग ऐकली की डोकं बधीर होऊन जातं.... अर्थगर्भतेमुळे नव्हे तर वाद्यतांडवामुळे.. पण तरीही मला सेप्युलच्युराची गाणी आवडतात. हा ग्रुप आता विभक्त झाला पण त्यापूर्वी त्यांनी उत्तमोत्तम गाणी दिली आहेत. आणि त्यातलं अ‍ॅटीट्युड हे माझं सगळ्यांत लाडकं. 

अ‍ॅटीट्युड

वन वीक ऑफ स्ट्रगलिंग
ऑन द रिअल वर्ल्ड इज
सो यु कॅन सी !!!

फील युअर सोल अँड
शेप अप युअर माईंड टू वॉरफेअर
इटस् ऑल फॉर रिअल

लिव्ह युअर लाईफ
नॉट द वे दे टॉट यु
डू व्हॉट यु फील !

सर्व्हाईव द जंगल
गिव्ह मी ब्लड
गिव्ह मी पेन
दिज स्कार्स वोन्ट हील

व्हॉट वेर यु थिंकिंग
व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड !!!
यु'आर फुल ऑफ शिट

लिव्ह इट बिहाईंड
दे डोंट केअर इफ यु क्राय
ऑल इज लेफ्ट इज पेन

कॅन यु टेक इट ?
कॅन यु टेक इट ?
कॅन यु टेक इट ?
कॅन यु टेक इट ?

द ओन्ली वे
टू गेट अवे
किल युअर प्राईड
अ‍ॅटीट्युड

आय वोन्ट टेक इट
आय वोन्ट टेक इट
आय वोन्ट टेक इट
आय वोन्ट टेक इट

सो इन द एंड
आय वॉन्ट टू सी सम रिस्पेक्ट
(आय सेड)
यु बेटर शो सम रिस्पेक्ट
(आय सेड)
अ‍ॅटीट्युड अँड रिस्पेक्ट

या गाण्याचा व्हिडीओ बघा. त्या (केशरी जर्सी घातलेला) मॅक्स कॅव्हलेराने गिटार असलं काही वाजवलं आहे की बस्स्स !!!


मूळ गाणं वाचून आणि ऐकून झाल्यावरही जर स्वैर (उर्फ भरकटलेला) अनुवाद वाचायची शक्ती, इच्छा आणि धाडस असेल तर आम्ही अडवणारे कोण?

टीप : हा अनुवाद साफ चूक असू शकतो. पण हा मला लागलेला आणि आवडलेला अर्थ आहे. जाणकारांनी सुचवलेल्या सुधारणा नक्कीच प्रातःस्मरणीय असतील.

वृत्ती

फक्त आठवडाभर कर जरा मेहनत
या वास्तव जगात
म्हणजे कळेल मग

आत्म्याला तयार कर
आणि कर मनाला निबर
युद्धासाठी..
हे सारं आहे फार फार खरं

नको जगुस तुझं जीवन
तुला कोणी पढवल्याप्रमाणे
जे तुला हवं तेच कर !

रक्त आटव घाम गाळ
या निर्दयी जगाच्या जंगलात
(तरीही) या जखमा नाहीत भरणार

आणि तुला काय वाटत होतं रे?
हे जग खूप छान सुंदर आहे?
तू महामुर्ख बेअक्कल आहेस गधड्या.. !!!

सगळं सोडून दे
इथे तुझ्या अश्रुंची ना कोणाला पर्वा
इथे सार्‍यांनाच आहेत आपापल्या यातना

आहे का हे शक्य तुला?
आहे का हे शक्य तुला?
आहे का हे शक्य तुला?
आहे का हे शक्य तुला?

एकच आहे मार्ग
निसटून जाण्याचा
तुझा आत्मसन्मान दे सोडून
आणि बदल तुझी वृत्ती

माझ्यासाठी तरी हे केवळ अशक्य
माझ्यासाठी तरी हे केवळ अशक्य
माझ्यासाठी तरी हे केवळ अशक्य
माझ्यासाठी तरी हे केवळ अशक्य

अखेरीस, मिळालाच पाहिजे मला माझ्या वाटचा आदर
(ऐकताय ना?)
भल्यासाठी सांगतोय मिळालाच पाहिजे मला माझ्या वाटचा आदर
(ऐकताय ना?)
वृत्ती आणि आदर


दुसरं गाणं म्हणजे असंच मला प्रचंड आवडणारं, हळवं करून सोडणारं.. हजारो वेळा ऐकलं असेल हे गाणं पण ऐकलं आणि डोळ्यात पाणी आलं नाही असं कधीच झालं नाही. 

चिठ्ठी आई है

चिठ्ठी आई है आई है
चिठ्ठी आई है
चिठ्ठी आई है वतनसे
चिठ्ठी आई है

बडे दिनोंके बाद
हम बेवतनोंको याद
वतन की मिट्टी आई है..

उपर मेरा नाम लिखा है
अंदर ये पैगाम लिखा है
ऑ परदेस को जानेवाले
लौटके फिर ना आनेवाले
सात समुंदर पार गया तू
हमको जिंदा मार गया तू
खून के रिश्ते तोड गया तू
आंखमे आंसू छोड गया तू
कम खाते है कम सोते है
बहुत जियादा हम रोते है

चिठ्ठी आई है

सुनी हो गयी शहर की गलियां
काटे बन गई बाग की कालियां
केहते है सावन के झुले
भूल गया तू हम नाही भुले
तेरे बिन जाब आई दिवाली
दीप नही दिल जले है खाली
तेरे बिन जब आई होली
पिचकारीसे छुटी गोली
पिपल सुना पनघट सुना
घर शमशान का बना नमुना
फसल कटी आई बैसाखी 
तेरा आना रह गया बाकी

चिठ्ठी आई है

पेहले जब तू खत लिखता था
कागज मे चेहरा दिखता था
बंद हुआ ये मेल भी अब तो
खत्म हुआ ये खेल भी अब तो
डोलीमे जब बैठी बेहना
रस्ता देख रहे थे नैना
मै तो बाप हुं मेरा क्या है
तेरी मां का हाल बुरा है
तेरी बिवी करती है सेवा
सुरतसे लगती है बेवा
तुने पैसा बहोत कमाया
इस पैसेने देस छुडाया
देस पराया छोडके आजा
पंछी पिंजरा तोडके आजा
आजा उम्र बहोत है छोटी
अपने घरमे भी है रोटी

चिठ्ठी आई है

हा चिठ्ठीचा व्हिडीओ


आणि हा माझा क्षीण प्रयत्न. अर्थात आपल्या मातीतली भाषा असल्याने चुकांची शक्यता (किंचितच) कमी...

पत्र आलं रे

पत्र आलं रे आलं रे
पत्र आलं रे
पत्र आलं रे देशातून
पत्र आलं रे

कितीक दिवसांनी
आम्हा भरकटलेल्यांना
आपल्या मातीची आठवण आली रे 

वरती लिहिलंय माझं नाव रे 
आत निरोप असा आहे रे
बा परदेशी जाणार्‍या तू
परतुनी कधी ना येणार्‍या तू
सात समुद्रापार गेलास तू
आम्हाला जिवंतपणी ठार केलंस तू
रक्ताची नाती तोडून गेलास तू
डोळ्यात पाणी ठेवून गेलास तू
कमी आता खातो कमीच आता झोपतो
खूपच बेटा मी रडतो 

पत्र आलं रे

वैराण झाल्यात गल्ल्या गावातल्या 
काटे बनल्यात कळ्या बागेतल्या
साद घालताहेत झोके श्रावणातले 
विसरलास तू ना आम्ही विसरलो
तुझ्यावाचून आली जी दिवाळी
पणत्या नाही रे, जळलं हे हृदयच रिक्त
तुझ्यावाचून आली जी होळी
पिचकारीतून सुटे रे गोळी
पिंपळपार निस्तेज, ते कारंजंही एकलं
घर जणु स्मशानाचा अवतारच दुसरा
कापणी झाली सरला ऋतू
यायचा बाकी राहिलास रे तू

पत्र आलं रे

पूर्वी जेव्हा तुझं पत्र यायचं
कागदात तुझं रूप दिसायचं
बंद पडला तो रिवाज आताशा
थंड झाला तो आवाज आताशा
छोटी निघाली सासरी जायला
लागले नयन वळूनी पहायला
मी आहे बाप मला दे सोडून
तुझ्या आईचे हाल बघवेना
बायको तुझी करते सेवा
चेहर्‍यावरून भासे विधवा
तू रुपडे तर चिकार कमवलेस
त्या रुपड्यांनी देश गमावलास
देश परका सोडून ये रे
सोनेरी पिंजरा तोडून ये रे
ये रे आयुष्य नाही मोठं फार
आपल्याही घरात आहेत रोट्या चार

पत्र आलं रे

हुश्श...

माझा खो ज्यांनी हे प्रकार यापूर्वीही कैक वेळा आणि अशा खोखो शिवायही अतिशय सहजतेने आणि सक्षमपणे पेलले आहेत त्या मोकळं आकाश वाल्या गौरीला आणि दवबिंदू देवेनला 

Wednesday, August 4, 2010

...वा : भाग २ (अंतिम)

भाग-१ इथे  वाचा.


"पण तू कसला एवढा रिसर्च करतो आहेस? तुझ्या रिसर्चमध्ये मी तुला काय मदत करणार? तुझ्या रिसर्चशी माझा कसा आणि काय संबंध?"
"मी तुम्हाला तेच सांगणार होतो..... अं  .. व्हॉट शुड आय कॉल यु?"
"आय वुड प्रिफर आजोबा."
"वॉव.. यु नो इंग्लिश?"
"यस. ऑफ कोर्स.. व्हॉट डू यु मिन?? पण तरीही मला मराठीतून बोललेलं जास्त आवडेल."
"ओके आजोबा. तुम्ही म्हणाल तसं. तुम्हाला हवी ती लँग्वेज मी इंटरप्रिटर स्टिकवर सेट करू शकतो." मराठी ऑप्शन सिलेक्ट करता करता मी म्हणालो. "आता मी तुम्हाला माझ्या थिसीसविषयी थोडक्यात सांगतो आणि तुमची मदत कशी होईल तेही सांगतो. माझ्या थिसीसचा विषय आहे 'सिवा, द वॉरियर : लाईफ अ‍ॅंड मिस्टरीज'.. सतराव्या शतकातल्या एका सरदाराबद्दल आहे."
"एक मिनिट. तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो आहेस का?"
"म्म्म्म... यस.. सिवा... सिवा भोसला."
"तू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असशील तर तू तुझ्या थिसीसबद्दल काही ऐकण्यापूर्वी प्रथमदर्शनीच मला त्यात दोन मोठ्या चुका दिसताहेत. एक.. ते सिवा नव्हते. शिवाजी होते. शिवाजी महाराज होते. शिवराय होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सरदार नव्हते. अभिषिक्त राजा होते. छत्रपती होते. तू तुझ्या थिसीसमध्ये काय लिहावंस हा तुझा प्रश्न आहे पण माझ्याशी बोलताना तरी तुला त्यांचा उल्लेख शिवाजी महाराज असाच करावा लागेल."
"सॉरी आजोबा. माझा त्यांचा अपमान करायचा उद्देश मुळीच नव्हता. किंबहुना तुमच्याकडून अशाच अनेक महत्वाच्या गोष्टींविषयीची माहिती मला हवी आहे जी माझ्या प्रबंधासाठी अत्यावश्यक आहे. मला अनेक प्रश्न पडले आहेत ज्यांची समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत"
"पण मी तुला काय माहिती सांगणार? मी काही इतिहासतज्ज्ञ नाही किंवा संशोधक नाही. मी एक सामान्य माणूस आहे. अरे हो.. आता होतो म्हंटलं पाहिजे नाही का. आणि तू हे मला कुठे घेऊन आला आहेस? कुठलं साल आहे हे?"
"२५१०. आजची तारीख एप्रिल १०"
"काय????? म्हणजे जवळपास साडेचारशेपेक्षाही जास्त वर्षं मी या अशा अवस्थेत आहे तर."
"हो आजोबा. माझ्या या प्रयोगाच्या ५०० वर्षं मागे जाण्याच्या अटीनुसार मी जेव्हा 'चाफेकर ट्री' मध्ये शोध घेतला तेव्हा त्यात मला तुमचं नाव मिळालं. तुमचा कालखंड साधारण ४७५ ते ५२५ वर्षं पूर्वीचा आहे. म्हणूनच या प्रयोगासाठी मी तुमची निवड केली. कारण मला अतिशय ऑथेंटीक, फर्स्ट हँड, मूळ स्वरूपातली, आणि अगदी खरीखरी माहिती हवी होती."
"अरे पण मूळ मुद्दा राहिलाच. मी तुला काय मदत करणार? मी इतिहाससंशोधक नाही."
"आजोबा, मला इतिहाससंशोधकाचं मत नाही तर तेव्हाच्या सामान्य माणसाचं मत हवं होतं. खरं तर मला महाराजांच्या काळात मागे जाता येईल असं काहीतरी करायचं होतं. परंतु या प्रयोगाची लिमिटेशन्स ते करू देत नाहीत. त्यामुळे तुम्ही द्याल ती सगळी माहिती माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. आणि राहिला प्रश्न इतिहास संशोधक असण्याचा. मी इतिहासावरचे इतके संशोधनात्मक ग्रंथ वाचले आहेत की मला त्या बनावट मतांचा तिटकारा आला आहे. म्हणून मला सामान्य माणसाचं मत हवं आहे. त्या दृष्टीने तुम्ही त्या व्याख्येत अगदी चपखल बसता उलट. अर्थात मी तुमच्याविषयीही अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. पण 'शिरीष सदानंद चाफेकर' या तुमच्या नावाव्यतिरिक्त अन्य कुठलीही माहिती माझ्या हाती लागली नाही. पण ते ठीक आहे. विशेष महत्वाचं नाही ते."
"बाप रे. बरीच शोधाशोध केलीस तर तू... बरं. बोल तुला काय माहिती हवी आहे?"
"बरेच प्रश्न आहेत. एकेक करत सांगतो. शिवाजी महाराज फक्त ... म्म्म्म काय बरं ते? एक मिन..." मी माझ्या नोट्समध्ये पीप करून मला हवा असलेला वर्ड फाईंड करायचा ट्राय करायला लागलो. "ओह या.. फक्त मराठ्ठा जातीचे होते तर मग त्यांनी त्यांचे नोकर ब्राह्मण्ण जातीचे कसे ठेवले? त्यांना शिकवणारे शिक्षक ब्राह्मण्ण कसे होते? त्यांचे गुरु ब्राह्मण्ण कसे काय होते? त्यावेळी जातीपातीचं प्रस्थ फार होतं ना. मग त्यांना हे कसं काय शक्य झालं?"
ओल्डी आय मिन आजोबा काहीच बोलत नव्हते.
"आजोबा... ??"
"काय बोलू राजा. चार-पाचशे वर्षं सरली तरी तेच पोकळ आरोप, त्यांना एकाच जातीला बांधण्याचे अपमानास्पद प्रयत्न. छे !!"
आजोबांनी वन्स मोअर एक लॉंग पॉझ घेतला.
"अरे राजे म्हणजे तुम्हाआम्हासारखे जातीपातीच्या क्षुद्र कल्पनांत स्वतःला बांधून घेणारे कोत्या मनाचे नव्हते रे. त्यांनी त्यांचे लोक निवडले ते त्यांच्या जातीवरून नाही... तर त्यांच्या कर्तृत्वावरून. आणि दादोजींना तर स्वतः साक्षात शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवाजी राजांबरोबर पाठवलं होतं. मदतनीस म्हणून, माहितगार म्हणून, आधार म्हणून. शिवाजीराजांनी समर्थ रामदासांना गुरुस्थानी मानलं ते ते ब्राह्मण होते म्हणून नव्हे तर समर्थांची तेवढी योग्यता होती म्हणून."
"ह्म्म्म मला याची साधारण कल्पना होती. पण अनेक पुस्तकांत परस्परविरोधी मतं वाचल्याने थोडा संभ्रमात पडलो होतो."
"हम्म्म"
"एका साध्या सेवकाच्या  पोटी जन्माला येऊनही आपल्या सरदार घराण्याच्या वडिलांचं नाव लावायला मिळाल्याचा शिवाजीला खूप फायदा झाला ना?"
अचानक माझ्या ब्रेनमध्ये क्रेझी साउंड्स झाल्यासारखे वाटले. ते हळूहळू वाढतच गेले. आजोबांचा फेस एकदम रेडीश झाला होता.
"तू काय बडबडतो आहेस नीश? शुद्धीवर आहेस का? सेवकाच्या पोटी काय? सरदार घराण्याच्या वडिलांचं नाव काय?"
"शिवाजी... आय मिन शिवाजीराजे हे जिजाबाई आणि दादोजी यांच्या ...."
"गप्प बस नीश. हलकट. हरामखोर. शट युअर डॅम फ*ग माउथ अप. यु बास्टर्ड. तू काय मुर्खासारखा बडबडतो आहेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे का?" आजोबा प्रचंड डिस्टर्ब झाले होते. ही वॉज ऑलमोस्ट स्पिटींग अ फायर.. !! त्यांचा तो अचानक बदललेला मूड पाहून आय वॉज स्टण्ड.
"आजोबा, काय झालं?"
"अरे काय झालं काय? हे खोटं आहे. धादांत खोटं. चुकीचं आहे."
"जस्ट अ मोमेंट, आजोबा" असं म्हणून मी उठलो आणि माझ्या ओल्ड रेफरन्स बुक्सचं कलेक्शन असलेली एक मोठी बॅग घेऊन आलो. माझ्या कलेक्शनमध्ये नंबर ऑफ व्हेरी ओल्ड आणि रेअर अशी बुक्स होती. ती एकेक करत बॅगमधून बाहेर काढून मी आजोबांच्या समोर टाकायला लागलो.
"हे बघा आजोबा..
'सिवा भोसला : द ग्रेट मराठा सोल्जर' बाय 'जॉन टोनीओ'
'सिवा : ब्रेन बिहाईंड मराठा वॉर टेक्निक्स' बाय 'निकोलस टीमसन'
'हाऊ मराठा वॉरियर्स फॉट' बाय 'जिमी हॉकीन्स'
'सिवा स्पिक्स : द ट्रू स्टोरी ऑफ हिंदू किंग' बाय 'खुर्शीद अलीम'
'न्यू डिस्कव्हरीज अबाउट द बर्थ ऑफ सिवा' बाय 'फेनिल व्हिमनी'
'सिवा अगेन : वॉज ही रिअली अ भोसला' बाय पीटर लेन

हे काही ऐतिहासिक ग्रंथ. महाराजांच्या आयुष्यावर लिहिलेले. प्रचंड संशोधन करून, मेहनत करून लिहिलेले. त्या प्रत्येकात शिवजन्माचा उल्लेख तसाच आहे जसा मी तुम्हाला आत्ता सांगितला. तुमच्या दृष्टीने ते चूक असेल पण मला आणि माझ्या आधीच्या निदान दहा पिढ्यांना तरी हाच इतिहास शिकवला गेलाय. आणि ही पुस्तकं निदान दोनशे वर्षं जुनी आहेत. गेल्या शंभर वर्षांत तर शिवाजीमहाराज खरंच एवढे महान होते का?, ते फक्त मराठा जातीसाठीच लढले मग ते पूर्ण हिंदु धर्माचे राजे कसे? ते तर फक्त मराठ्यांचे राजे.... फक्त मराठा जात आणि मराठी लोक राजांना मानतात पण भय्ये, दाक्षिणात्य, पूर्वेच्या राज्यातल्या लोकांच्या दृष्टीने त्यांना एवढं महत्व कुठे आहे? मग ते राष्ट्रपुरुष कसे ते तर फक्त मराठ्यांचे राजे.. महारथी, शूर, धिप्पाड अफझलखानाच्या छावणीत शिरून त्याला ठार करणं शक्य होतं का? ती घटना खरंच तशी घडली आहे का?, लाखोंचं सैन्य पहारा देत असलेल्या लाल महालात जाऊन साक्षात मोगल सम्राटाचा मामा असलेल्या शास्ताखानाची बोटं कापणं शक्य तरी आहे का? आणि तसं असतं तर त्यांनी फक्त बोटंच का कापली, अफझलखानाप्रमाणे शास्ताखानालाही सरळ ठार का केलं नाही? यात नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे, महान मोगल सम्राट  औरंगजेबासारख्या कसलेल्या आणि मुत्सद्दी बादशहाच्या नजरकैदेतून सुटून, लहान मुलाला घेऊन, हजारोंचा कडक पहारा चुकवून पेटार्‍यातून किंवा वेषांतर करून बादशाहाच्या तावडीतून पळून जाणं इतकं सोपं होतं का.. हेही खरं तर अविश्वसनीय आहे असे अनेकानेक प्रश्न उपस्थित केले गेले. अखेरीस जन्मापासूनच इतकी संशयास्पद कारकीर्द असलेल्या राजाला नवीन पिढीच्या इतिहासाच्या पुस्तकात स्थान कशाला, उगाच नवीन पिढीवर चुकीचे संस्कार व्हायला नकोत असं म्हणून त्यांचं नाव पुस्तकातूनच वगळलं गेलं. त्यामुळे आताच्या पिढ्यांना तर शिवाजी भोसले हे नावही माहित नाही. ज्यांना माहित्ये त्यांच्या दृष्टीने हा एक डेड सब्जेक्ट आहे. बोरिंग हिस्टरी.."
"बास कर रे बास कर.. खरंच.. तुझ्या पाया पडतो मी हवं तर. पण माझ्या राजावर हे घाव घालणं बंद कर आता. ऐकवत नाहीये. सहन होत नाहीये !!"
"आजोबा, सॉरी अगेन. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं फक्त तुमच्या राजांना आजच्या युगाच्या नजरेत काय किंमत आहे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं. प्लीज रागावू नका. अर्थात यातल्या कित्येक गोष्टी मला मान्य नाहीत. पण त्याला पुरावे नाहीत. जे पुरावे आहेत ते डायरेक्ट/इनडायरेक्टली राजांच्या अस्तित्वावर, पराक्रमावर, शौर्यावर, धैर्यावर, असामान्यत्वावर प्रश्नचिन्हच उमटवतात. पुन्हा सांगतो. मला यातल्या अनेक गोष्टी मान्य नाहीत. मलाही राजांबद्दल आत्मियता आहे, आदर आहे. पण या एवढ्या ढीगभर पुराव्यांमुळे कधीकधी आपोआपच शंका यायला लागते. त्यात पुन्हा त्यांच्यावर होणारे जातीपातींचे आरोप, त्यांच्या जन्माबद्दलचे प्रश्न, त्यांच्या जन्मतारखेबद्दलची अनिश्चितता अशा अनेक गोष्टींमुळे नक्की कशावर विश्वास ठेवावा या संभ्रमात पडायला होतं."
"नाही रे नीश. प्लीज शंका घेऊ नकोस. मी तुला एक गोष्ट सांगतो. साधारण २००० सालच्या आसपास जेम्स लेन नावाच्या अमेरिकन लेखकाने-जो पुढे महान इतिहासतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध पावला- राजांवर एक पुस्तक प्रसिद्ध केलं. 'शिवाजी : हिंदु किंग इन इस्लामिक इंडिया'. त्यात सर्वप्रथम त्याने राजांच्या जन्माबद्दल आक्षेपार्ह विधानं करून खळबळ उडवून दिली. तू वाचलं आहेस ते पुस्तक?"
"हो वाचलं आहे."
"गुड. तर ते विधान करताना त्याने 'असं गंमतीने म्हंटलं जातं' किंवा  'पीपल जोक अबाउट इट नॉटीली' असं लिहिलं होतं."
"एक मिनिट.. पण मी वाचलेल्या पुस्तकात तर मी 'पीपल जोक अबाउट इट नॉटीली' असं कुठेच वाचलं नाही. उलट पूर्ण संशोधन करून ते वाक्य लिहिल्याचं मला तरी वाटलं."
"ह्म्म्म.. वाटलंच मला. मी त्या विषयावर येतोच हळूहळू. तर अर्थातच त्यामागे कुठलाही तर्कशुद्ध अभ्यास, संशोधन, सत्य शोधण्याची/जाणून घेण्याची इच्छा किंवा त्यादृष्टीने केली गेलेली मेहनत नव्हती. फक्त एक खळबळजनक वाक्य टाकून पुस्तकाचा बोलबाला करून पुस्तकाची विक्री वाढवण्याचा एक अमेरिकन प्लान होता. त्यापूर्वीही कित्येक अमेरिकनांनी आपापली आत्मचरित्रं, पुस्तकं खपवताना या मार्गाचा वापर यशस्वीपणे केला होता. पण लेनने ती चूक राजांसारख्या ऐतिहासिक महापुरुषाच्या संदर्भात केली. त्या पुस्तकावरून रणकंदन माजलं. राजांना जातीपातीत अडकवणार्‍या काही ब्रिगेडी संघटनांनी त्याचं निमित्त करून एका महत्वाच्या प्राचीन संशोधनसंस्थेची तोडफोड करून प्रचंड नासधूस केली. अखेरीस सरकारने त्या पुस्तकावर बंदी आणली. बंदीच्या विरोधात न्यायालयात खटला चालू झाला. परंतु सरकारने आपली बाजू अतिशय हलगर्जीपणाने मांडल्याने किंवा अन्य काही कारणांनी सरकार खटला हरलं."
"पण सरकार असं मुद्दाम करेल? का बरं?"
"मुद्दाम केलंच असेल असं नाही परंतु बंदी कायम राहण्यासाठी कुठलेही विशेष प्रयत्न घेऊन खटला लढवला गेला नाही एवढं मात्र नक्की. अरे ज्या लोकांनी शिवाजीराजांची 'शिवाजी म्हणजे एक वाट चुकलेला देशभक्त, एक बंडखोर सरदार किंवा एक लुटारू' अशी संभावना केली त्या लोकांच्या पुढच्या पिढ्यांमधली टाळकी सरकार म्हणून आपल्या शिरावर बसवली गेल्यावर असल्या सरकारांकडून दुसरी अपेक्षा तरी काय ठेवणार? न्यायालयाच्या निर्णयावर दोन्ही बाजूंची अनेक मतं आली. अनेक सुशिक्षित, बुद्धीजीवी, पत्रकार, कलाकार यांना बंदी मान्य नव्हती. त्यांच्या मते कुठल्याही कलाकृती (!!) वर बंदी येता काम नये. बंदी म्हणजे एखाद्याच्या 'फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' वर घाला घालण्यासारखं आहे. अनेक पत्रकारांनी बंदीला विरोध दर्शवला. त्यातल्या निम्म्यांना तर शिवाजी महाराजांच्या अपूर्व लोकोत्तर व्यक्तीमत्वाची धड माहितीही नव्हती पण असे लोक बंदीच्या विरोधात हिरीरीने बोलत होते."
"बरोबरच आहे की ते. कोणी काय बोलावं हे ज्याचं त्याचं मत आहे. त्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. तुम्हाला एक खूप जुनं पुस्तक माहित्ये का? मला वाटतं तुमच्यावेळीच प्रकाशित झालं होतं ते. 'द दा विंची कोड' नावाचं.. डॅन ब्राऊन नावाच्या लेखकाचं. त्यात तर जिझस ख्राईस्टच्या देवत्वावर आक्षेप घेतले गेले आहेत. त्याच्या पुढच्या पिढीविषयी माहिती दिली आहे. पण त्यावर कधी कोणी बंदी घातली नव्हती. मग लेनच्याच पुस्तकावर बंदी का?"
"हो मला ते पुस्तक माहित आहे. मी वाचलंही होतं ते. पण एक लक्षात घे. या दोन गोष्टींची तुलनाच होऊ शकत नाही. डॅन ब्राऊन हा काही कोणी इतिहासतज्ज्ञ किंवा संशोधक, इतिहासाचा जाणकार नव्हता. ते पुस्तक निव्वळ एक मनोरंजन म्हणून लिहिलं आहे. पण लेनच्या बाबतीत तसं नाही. पुस्तक खपवायचं म्हणून का होईना पण त्याने इतिहासतज्ज्ञ असल्याचा आव आणलेला आहे. याउपर म्हणजे जे अमेरिकेने केलं तो त्यांचा प्रश्न आहे. ते जे करतील ते सरसकट सगळंच योग्य असतंच असं नव्हे आणि त्यामुळे त्यांचं अंधानुकरण केलंच पाहिजे असं काही नाही. असो. विषय तो नाहीये. तर जे लोक बंदीच्या विरुद्ध होते त्यांनाही 'फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' चं महत्व मान्य होतंच परंतु 'फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' जपण्याच्या नादात एखाद्या महापुरुषावर अन्याय होता कामा नये, त्यांची चुकीची प्रतिमा जनमानसात रूढ होता कामा नये एवढंच सर्वांचं म्हणणं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेनने काढलेला राजांच्या जन्माचा निष्कर्ष हा कुठल्याही अभ्यासाविना, संशोधनाविना काढलेला होता. त्याने फक्त गंमतीने काय बोललं जातं एवढंच सांगितलं होतं. हेच वाक्य जर एखाद्या सामान्य माणसाने लिहिलं असतं, बोललं असतं तर त्याला किंचितही किंमत न देता त्या माणसाकडे मुर्ख म्हणून निश्चितच दुर्लक्ष केलं गेलं असतं. पण जेव्हा एखाद्या 'तथाकथित' इतिहासकाराच्या/लेखकाच्या, इतिहासाचा आव आणून एखाद्या ऐतिहासिक महापुरुषावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकात विनोदाने म्हणून का होईना जर त्या महापुरुषाला उद्देशून अपमानास्पद लिहिलं गेलं तरी त्या पुस्तकाकडे त्यातल्या उल्लेखांकडे कालांतराने इतिहास म्हणूनच बघितलं जातं. पुढे हा मुद्दा खुपच पेटत गेला. लेनने आणि प्रकाशकांनी पुढच्या आवृत्त्यांमध्ये तो उल्लेख वगळण्याचं मान्य केलं. वाद तात्पुरता थांबला. पुढच्या आवृत्त्यांमध्ये उल्लेख वगळले गेले तर नाहीतच उलट 'पीपल जोक अबाउट इट नॉटीली'हे एवढेच शब्द वगळले गेले. पुन्हा वाद पेटवून बंदी घालण्यात ना सरकारला उत्साह होता ना लोकांना. त्यामुळे लेन आणि कंपनीचं फावलं. त्या पुस्तकात जे लिहिलं आहे ते खरं आहे असा समज कालांतराने दृढ होत गेला. थोडक्यात त्याला इतिहास म्हणून मान्यता मिळाली. त्याच्या सत्यासत्यतेची परीक्षा करण्याची कोणालाच गरज वाटली नाही. 'पीपल जोक अबाउट इट नॉटीली' वाली सुरुवातीची आवृत्ती तर केव्हाच गायब झाली होती. उरल्या होत्या त्या या अशा नवीन 'सुधारित' आवृत्त्या.. बघता बघता इतिहास बदलला गेला."
"तरीही दोन प्रश्न उरतातच. एक म्हणजे लेन एवढेच त्याला जाणूनबुजून चुकीची माहिती देणारेही दोषी नाहीत का? लेनने छापायच्या आधीही लोक उघडउघडपणे हे बोलतच असणार म्हणून तर लेनला ते कळलं ना. आणि दुसरा प्रश्न म्हणजे इतिहासाच्या नेहमीच दोन बाजू असतात. जेत्यांची इतिहासाची आवृत्ती आणि पराभूतांची इतिहासाची आवृत्ती यात कायमच तफावत असतेच मग त्यात खरी कुठली आणि खोटी कुठली ते आपण कसं ठरवणार?"
"तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तरं मी आधीच दिलं आहे. "हेच वाक्य जर एखाद्या सामान्य माणसाने लिहिलं असतं, बोललं असतं तर त्याला किंचितही किंमत न देता त्या माणसाकडे मुर्ख म्हणून निश्चितच दुर्लक्ष केलं गेलं असतं." समाजात असे अनेक सडके मेंदू असतातच त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य. पण एखाद्या इतिहासकाराने ती चुकीची विधानं कुठलाही अभ्यास न करता तशीच्या तशी आपल्या पुस्तकांत चिटकवून देणं हे हे सर्वथा गैर आहे. त्यात पुन्हा अजून एक मुद्दा आहेच. लेनला ती चुकीची माहिती खरंच कोणी सांगितली आहे का हे आपल्याला कुठे माहित्ये? तो तसं म्हणाला आणि आपण विश्वास ठेवला. पण प्रत्यक्षात हा त्याच्याच डोक्यातला किडा नसेल कशावरून? पुरावा नाही पण संशयाला नक्कीच वाव आहे नाही का? आणि कुठलंही विधान करताना पुरावे देत नसणार्‍या लेनच्या बाबतीत विधानं करताना पुराव्यांची काय गरज?... आता दुसरा प्रश्न.. इतिहासाच्या बाबतीत तू म्हणतोस ते अगदी खरं आहे. पण कुठल्याही संशोधनाला इतिहास म्हणून मान्यता मिळण्यासाठी त्या अनुषंगाने केलं गेलेलं संशोधन दाखवणं, लोकांना अज्ञात असलेले पुरावे समोर आणणं अपेक्षित असतं. तरच तो इतिहास म्हणून गणला जातो. लेनच्या पुस्तकाच्या बाबतीत यातली कुठलीही गोष्ट संभवत नाही. त्याने कुठलंही संशोधन केलेलं नाही. पण तरीही त्याने इतिहासावर लिखाण केलं आहे त्यामुळे त्याला तथाकथित इतिहासतज्ज्ञ समजून त्याच्या 'जोक अबाउट इट नॉटीली' ला आपण प्रत्यक्ष इतिहास समजून, त्याचं फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन जपायला गेलो हा आपला करंटेपणा झाला आणि त्याहीपेक्षा शिवाजीराजांसारख्या महापुरुषाच्या वाट्याला हे यावं याचं वाईट वाटतं."
"ओह ओ.. आता मला एकेका गोष्टीचा उलगडा होतोय आजोबा.. मला वाचल्याचं आठवतंय की लेनच्या पुस्तकातल्या उल्लेखांचा संदर्भ देऊन त्या विधानाच्या आधारावर इतर पुस्तकं निघाली. अनेक तथाकथित इतिहासकारांनी आपापली मतं मांडली. पुन्हा काही वर्षांनी जेम्स लेनचंच अजून एक पुस्तक निघालं. 'हाऊ राईट आय वॉज अबाउट शिवाजी' नावाचं. त्यात त्याने अशाच एका इतिहासतज्ज्ञाच्या पुस्तकातल्या त्याच्या काही मतांचा, काही वाक्यांचा हवाला देऊन त्याने आधीच्या पुस्तकात मांडलेलं मत कसं योग्य होतं हे दाखवून दिलं. जेम्स लेननंतर त्याच्या त्या दोन्ही पुस्तकांचा संदर्भ देऊन त्याच्याच पीटर लेन नावाच्या नातवाने 'सिवा अगेन : वॉज ही रिअली अ भोसला' नावाचं पुस्तक लिहिलं. तेही मी वाचलं आहे."
"हं !!! कठीण प्रसंग आहे रे खरंच. सहन होत नाही.. या अशा पद्धतशीर प्रयत्नांनी लोकांच्या मनात संशय उत्पन्न केले जातात. वारंवार, सतत कानावर पडणारी एखादी खोटी गोष्टही कालांतराने खरी वाटायला लागते. दुसर्‍या महायुद्धात हिटलरच्या सैन्यातील डॉ गोबेल्स याने या पद्धतीचा सर्वोत्तम वापर केला होता. तुझ्यासारख्या इतिहासाच्या विद्यार्थ्याला 'गोबेल्स नीती' म्हणजे काय ते नक्कीच माहित असेल."
"अर्थातच... !"
"त्याच नीतीचा वापर करून हळूहळू शिवजन्मासंबंधीचे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण केले गेले असावेत. होता होता लोकांचा विश्वास बसायला लागला असणार. या थिल्लर पुस्तकांमधल्या कुठल्याही विधानांना मूळ संशोधनाचा आधार नाही हे लोक विसरले. शिवप्रेमी हळहळले. हळहळत राहिले. इतिहासात हेच शिकवलं गेलं. मूळचा इतिहास बदलला गेला. असंच घडलं असणार. आमच्या वेळीही हे असंच घडलं होतं. आधी एका समाजाला मान्य नाही म्हणून शिवाजीमहाराजांनी अफझुल्ल्याचा कोथळा बाहेर काढल्याचा खराखुरा घडलेला इतिहास इतिहासाच्या पुस्तकांतून वगळला गेला, नंतर एका जातीला मान्य नाही म्हणून शिवाजीमहाराजांच्या गुरूंना जातीपातीच्या गुंत्यात अडकवून त्यांनाही इतिहासाच्या पुस्तकातून हद्दपार केलं गेलं, त्यांच्या नावाचे शासकीय पुरस्कार बंद पाडले गेले आणि तुमची पिढी तर इतकी पुढे गेली की तुम्ही प्रत्यक्ष साक्षात शिवाजी महाराजांनाच इतिहासातून आणि इतिहासाच्या पुस्तकांतून बेदखल केलंत. वा रे !!!! जेव्हा ही जेम्स लेनची मुक्ताफळं आमच्या माथी मारली गेली तेव्हाच खरं तर आमचे डोळे उघडायला हवे होते कारण ती पुढे घडणार्‍या अराजकाची नांदी होती. पण तसं झालं नाही. ही विषवल्ली बघता बघता फोफावणार याची कल्पना असूनही ते रोखण्याच्या दृष्टीने माझ्या पिढीने विशेष काहीच केलं नाही. आम्ही होतो तसेच राहिलो. शांत, स्वस्थ, थंड, निवांत.. पण आता वाईट वाटून घेऊन उपयोग नाही. आता मी काहीही बदलू शकणार नाही.!! हुं !!!

सडनली आजोबा क्वायट झाले. इतक्या वेळ सतत बोलल्याने ते वन्स अगेन टायर्ड वाटायला लागले होते.
"आजोबा !!"
"असो. चालायचंच. पण आता मला निघायला हवं."
अचानक त्यांचा चेहरा किंचित थरथरल्यासारखं वाटायला लागला.
"आजोबा, पुन्हा कधी भेटाल?"
वॉल वरचं पिक्चर एव्हाना गोल फिरत फिरत त्या ग्रीन रे मधून बाहेर पडायला लागलं होतं. तेवढ्यात आजोबांचं साउंड एको झाल्याप्रमाणे आला.
"राजा, आता पुन्हा येईनसं वाटत नाही रे. तुझ्याशी एवढं बोललं, तुला सगळं सांगितलं आता एकदम हलका झालो. बहुतेक यासाठीच इतकी वर्षं भटकत राहिलो होतो. पण आता सुटका झाली. आता चाललो मी. मी सांगितलेलं सगळं नीट लक्षात ठेव. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचव. राजांच्या नावावरचा बट्टा पुसला गेला पाहिजे. तुझ्या पिढीची जवाबदारी आहे ती. वचन दे मला."
"नक्की आजोबा नक्की. मी वचन देतो... मी वचन देतो.. !!!!" एकाएकी आईज टीअर्सनी भरून गेले. कशामुळे ते माझं मलाच कळलं नाही.  

--समाप्त

टीप : छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दलच्या वेळोवेळी झालेल्या आक्षेपार्ह उल्लेखांबद्दल क्षमस्व. ते प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द लिहिताना मला अनंत यातना झाल्या. परंतु वेळीच ही विषवल्ली ठेचली नाही तर भविष्यात किती भयानक प्रसंगांना सामोरं जावं लागेल याचं चित्र रंगवताना तसे उल्लेख येणं अपरिहार्य होतं. त्याबद्दल क्षमस्व. राजे क्षमा करा !!!

स्थलकालाची बंधनं झुगारणारा पाशवी विखार : एका माळेचे मणी

सुविख्यात इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांनी पानिपत युद्ध ते हैद्राबाद स्वातंत्र्य चळवळ आणि समर्थ संप्रदाय ते भारतीय मुसलमान अशा अनेकविध विषया...