Tuesday, January 26, 2010

कुणी "पद्म" (विकत) घ्या.. कुणी... !!संत सिंग चटवाल. अतिशय मानाच्या पद्मभूषण पुरस्काराचे या वर्षीचे मानकरी. यशस्वी उद्योजक. "बॉम्बे पॅलेस" या जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या मोठ्या हॉटेल-चेनचे मालक. शून्यातून विश्व उभं केलं. या हॉटेल-चेन मधलं पहिलं हॉटेल उघडलं ते न्यूयॉर्क मध्ये आणि नंतर त्याच्या अनेक शाखा उघडल्या त्या जगभर. वेगवेगळ्या देशांत. सगळं एकदम आखीव रेखीव, टिपिकल आत्मचरित्रात आढळणारं. एकदम आदर्शवत्. एवढंच नाही तर अमेरिकेतील अत्युच्च राजकीय वर्तुळात उठबस. निवडणूक काळात हिलरी क्लिंटन यांच्यासाठी भरीव निधी उभारण्याचं अति-महत्वाचं काम केल्याने हिलरी, बिल क्लिंटन या दोघांनाही अगदी जवळचे. अगदी विश्वासू सहकारी. क्लिंटन फाऊन्डेशनचे ट्रस्टी.

Toss the coin. नाणं उडवा, दुसरी बाजू. पहा काय दिसतंय? काळोख.. अगदी काळाकुट्ट. मिट्ट, कभिन्न... दिव्याखाली अंधार.

याच देववत भासणाऱ्या, आदर्शवत वाटणाऱ्या माणसावर असंख्य गुन्हे दाखल झालेले आहेत. फक्त अमेरिकेतच नाही तर अगदी आपल्या भारतात पण. त्याच्या काळ्या कृत्यांची यादी देणारे अनेक लेख अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. आणि तेही शब्दकोडं वाल्या चार पानी सायंदैनिकांमध्ये नव्हे तर अगदी टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट सारख्या मानाच्या वृत्तपत्रांत .. तर काय काय केलं या चटवाल साहेबांनी??? ............ काय नाही केलं विचारा.

-अमेरिकेतल्या मोठ मोठ्या बँकांमधून मोठ्ठल्ली कर्जं घेऊन ती बुडवली?
----- हो बुडवली. लिंकन सेव्हीन्ग्स, फर्स्ट न्यूयॉर्क बँक फॉर बिझनेस सारख्या बँकांना विचारा.

-भारतातल्या मोठ्या बँकांमधून मोठ्ठल्ली कर्जं घेऊन ती बुडवली?
----- हो अगदी. आणि तेही "द गल्ली बँक ऑफ भूरगड" वगैरे सारख्या नाही तर बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया अशा सरकारी बँकांना.

-हॉटेल संदर्भात चुकीची कागदपत्रे दाखवून एक्स्चेंज कमिशनची दिशाभूल केली?
----- हो केली. खोट्या कागदपत्रांच्या आधारे बँकरप्सी नोंदवून कर्जं बुडवण्यासाठी याचा वापर केला.

- राजकीय संबंधांचा वापर व्यक्तिगत स्वार्थासाठी केला?
----- हा हा हा.. हा गुन्हा असेल तर भारतातले सगळे आजी, माजी, भावी नेते १०००० वर्षांसाठी तुरुंगात जातील. पण असो. विषयांतर नको. तर हे सुद्धा केलं चटवाल साहेबांनी.

-  यांना कधी अटक झाली होती?
----- अहो बँकांना फसवल्याबद्दल सीबीआय ने अटक केली होती. पण वर उल्लेखल्याप्रमाणे राजकीय बळाचा वापर करून ते यातून सही सलामत सुटले.

आणि अशा महान माणसाला आपलं सरकार राष्ट्राच्या उच्चतम सन्मानांपैकी एक सन्मान हसतहसत बहाल करतं. भलेही चटवाल या सगळ्यात निर्दोष असेल, गुन्हे खोटे असतील वगैरे वगैरे गोष्टी आपण मान्य करू. पण तरीही देशातील अशा महान सन्मान दिल्या जाणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्यावर (सामाजिक चारित्र्य या अर्थी) कुठलाही डाग नको, तो अगदी स्वच्छ असला पाहिजे ही अपेक्षा चटवाल आणि त्याच्या पिलावळीच्या दृष्टीने भ्रामक असली तरी आपल्या सारख्या सामान्यांच्या मताचा विचार करता अवास्तव आहे का? की सरकार पुरस्कारांच्या घोषणा करताना त्या बातमीच्या खाली ** घालून तळटीपा वगैरे देते की "आम्ही हवे त्याला पुरस्कार देऊ, जनतेचा यात काही संबंध नाही" वगैरे वगैरे !!

चटवालची बातमी वाचण्याआधी मी "सैफ अली खान" ला पद्मश्री मिळाल्याबद्दल जाम वैतागलो होतो. म्हटलं याचं काय  कर्तृत्व? पण आता ही बातमी बघून त्याबद्दल काहीच वाटत नाहीये. चटवाल सारख्याला जर पद्म पुरस्कार मिळतो तर सैफ अलीच्या गेल्या ४० आणि येणा-या ८० पिढ्यांनाही तो दिला गेला तरी आपली काही तक्रार नाही.

अर्थात गोपीनाथ मुंड्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून पुरस्कार मागे घेण्याची मागणी केली आहे. पुढे काय होईल कोण जाणे. पण माझा मूळ मुद्दा अतिशय छोटासा आणि वेगळाच आहे. मला २ दिवसांपूर्वी पर्यंत संतसिंग चटवाल बद्दल काय माहित होतं? शून्य. काहीही नाही. टोटल ब्लँक.. पुरस्कारांच्या घोषणा ऐकल्या चटवाल बद्दल ऐकलं. थोडं विकी केलं, थोडं गुगल मारलं आणि वरचे सगळे मुद्दे मिळाले. जर माझ्या सारख्या सामान्य माणसाला २-४ टिचक्या मारून चटवाल बद्दलची सगळी (आक्षेपार्ह) माहिती दीड मिनिटात मिळाली तर मग पुरस्कार समिती, तेथील अधिकारी, पंतप्रधान कार्यालय किंवा इतर कुठलीही संबंधित कार्यालयं काय झोपा काढत होती की काय? मुंड्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आक्षेप नोंदवल्यानंतर या सर्व वेबसाईट्सवर चटवाल बद्दल माहिती टाकली गेली असं नाही न होऊ शकत? मग तरीही त्याला दामटून पुरस्कार देण्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत? आणि ते कोणाचेही गुंतले असोत पण अशा माणसाला पुरस्कार देण्याने पद्म पुरस्कारांची किंमत आणि पुरस्कार समितीची विश्वासार्हता मात्र नक्कीच कमी झालीये. अगदी काही न करणा-या ओबामाला शांततेचा नोबेल देणाऱ्या नोबेल समितीच्या विश्वासार्हतेपेक्षाही काकणभर नाही तर अगदी मणभर अधिकच कमी कारण कितीही म्हटलं तरी नोबेल परका आहे पण पद्म आपला आहे आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे आपल्या करांच्या पैशातला आहे. म्हातारीही जातेय आणि काळही सोकावतोय. अधिकाधिकच !!!

Thursday, January 21, 2010

(शोधा)शोध

प्रसन्न सकाळ.. छान उन बिन पडलेलं. जास्त उकाडा नाही कि विशेष गारवा नाही अशी मोहक हवा. तो सकाळी नाश्ता वगैरे करून त्याच्या नेहमीच्या आवडत्या बागेत येऊन पोचला. चांगलं हिरवंगार, भरपूर सावली असलेलं आणि खाली चांगली हिरवळ असणारं झाड शोधून त्याखाली त्याने बैठक मांडली. आजूबाजूच्या रंगीबेरंगी फुलांचा मोहक गंध आणि छोट्या छोट्या पक्षांची गोड किलबिल कानांना, गात्रांना, मनाला सुखावत होती. निसर्गाचा आस्वाद घेता घेता तो नेहमीप्रमाणेच विचारांच्या राज्यात गढून गेला. त्याचं असं हे नेहमीच व्हायचं. कुठेही, कधीही. मनात नाना त-हेच्या आवडत्या विचारांची गर्दी झाली की तो त्याचा रहात नसे. आणि त्यात पुन्हा एवढा सुंदर नयनरम्य निसर्ग, ती बाग, प्रसन्न सकाळ म्हणजे तर त्याच्या साठी सोन्याहुन पिवळं असं होतं. आपल्या मनाला विचाररुपी अश्वावर बेलगाम सोडून देऊन तो अगदी स्वेच्छेने आणि आवडीने त्या विचारांच्या मागे जात असे.

त्यादिवशी असंच झालं. नेहमीप्रमाणे विचारांच्या जत्रेत हरवला असताना अचानक त्याचं लक्ष एका अगदी छोट्याशा वाटणाऱ्या घटनेने वेधून घेतलं. अर्थात तुमच्याआमच्या सारख्या अतिसामान्य जनांना सामान्य भासणारी घटना त्याच्या दृष्टीने फार फार महत्वाची, विचार करायला लावणारी आणि (त्याच्या आणि जगाच्या)  इतिहासाला कलाटणी देणारी होती. झालं काय की तो विचारात गढलेला असला तरी डोळे, कान, नाक आपापली कामं करत होते. (म्हणून तर सुरुवातीला म्हटलेली सुंदर फुलं, त्यांचा सुवास, पक्ष्यांची किलबिल त्याला जाणवली ना.) तर डोळ्यांनी एका सामान्य घटनेचा वेध घेतला. समोरच्या झाडावरून एक फळ हलकेच तुटून पडलं आणि जमिनीवर येऊन स्थिरावलं. झालं. त्याच्या डोक्यात विचारांचं चक्र सुरु झालं. हे फळ पडलंच का? पडलं तर खाली का पडलं वर का पडलं नाही? तर अशा अनेक काकांनी (का कां नी) त्याच्या मनात वादळ उत्पन्न केलं. आणि ही एका महान शोधाची नांदी होती. असा शोध जो मानव जातीला पुढची करोडो वर्षे उपकारक ठरणार होता, अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं देणार होता, अनेक विषयांवरील संशोधनाला कलाटणी देणार होता. आणि तो शोध म्हणजे.....

त्या शोधाची "खरी" माहिती सांगण्यापूर्वी एक सर्वमान्य आणि प्रचलीत शोध सांगतो. तो म्हणजे गुरुत्वाकर्षण. तुम्हालाही अगदी हेच वाटलं ना? कारण आपल्याला हेच शिकवलं जातं. (साला बदला रे हा इतिहास.. मेटे, खेडकर ऐकताय का?).. पण तो शोध म्हणजे गुरुत्वाकर्षण नाहीच्च मुळी. गुरुत्वाकर्षण हा काय शोध आहे? तो काय कोणीही लावला असता. आपलं गॅलीलीओ होता,  गॅलीलीओ नाही तर आर्किमिडीज होता. तो पण नाही तर गेला बाजार जेम्स वॅट तर होताच. एवढे ढीगाने शोध लावले या लोकांनी. त्यात सफरचंद पडताना बघून ते गुरुत्वाकर्षणाने पडतंय हे सांगायला काही कोणा शास्त्रज्ञाची गरज होती का? नाही...

तर मग खरा शोध काय होता? पुन्हा बघू. तो विचारात गढलेला, सफरचंद खाली पडलं, त्याने लगेच गुरुत्वाकर्षणावर प्रबंध लिहून काढला. इतकं सोप्पं होतं ते. पण त्याने तो प्रबंध का लिहिला, त्यामागची प्रेरणा काय होती? तर ते पडतं फळ त्याला आवाहन करत होतं, आज्ञा करत होतं. आणि ती आज्ञा मानून त्याने तो प्रबंध लिहिला. तर मुख्य शोध होता "अमृतातेही पैजा जिंकणा-या" भाषेला "पडत्या फळाची आज्ञा" या म्हणीरुपी एक महान अलंकार प्राप्त करून दिला तो माणसाने. आता तुम्हाला वाटेल काय हे. काय फालतूपणा आहे हा. हा काय शोध आहे का? पण बघा ही म्हण शोधणं एवढं सोप्पं होतं तर मगाशी उल्लेखलेल्या  (आणि न उल्लेखलेल्या) त्याच्या अनेक मित्रगणांनी ती आधीच का नाही शोधून काढली बरं? मला ठाउक आहे की तुम्हाला अजूनही माझं म्हणणं पटणार नाही. आता खाली दिलेली उदाहरणं बघा. जर "पडत्या फळाची आज्ञा" ही म्हण, हा सुविचार आपल्या भाषेत नसता तर खालील महान व्यक्तींनी त्या त्या कोड्यात टाकणा-या प्रसंगांच्या वेळी काय उत्तर दिलं असतं? मला नका सांगू उत्तर. तुम्ही स्वतःशीच विचार करा आणि माझं म्हणणं चूक कि बरोबर ते ठरवा. (हे असं म्हटलं की जाम बरं असतं बाबा)

१. सोनिया गांधी मनमोहन सिंग यांना जेव्हा म्हणाल्या (असतील) "मी नाही बावा पंतप्रधान होत. तुम्हीच व्हा कसे."

२. संरक्षणमंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री आणि युद्धाशी संबंधीत असलेल्या सगळ्या अस्तित्वात असलेल्या आणि नसलेल्या खात्यांचे मंत्री बुश कडे जाऊन जेव्हा म्हणाले (असतील) "दादा, त्या सद्दामकडे रासायनिक आणि कसली कसली अस्त्र आहेत. त्याच्यावर हल्ला केला पायजेल "

३. नारायण दत्त तिवारींची "मैत्रीण" जेव्हा त्यांना म्हणाली (असेल) "मी ना गडे तुम्हाला तुमच्या ऑफिस मध्ये नाही भेटत. राजभवनाच्या बेडरूम मध्येच भेटते. चालेल?"

४. बाळासाहेब ठाकरे जेव्हा राजू परुळेकरला म्हणाले (असतील) "अरे राजूबा, हा सचिन जाम वटवट करतोय. मार की थोडे फटकारे"

५. मणीशंकर अय्यर जेव्हा पक्षबैठकीत म्हणाले (असतील) "अरे त्या सावरकराच्या नावाची पट्टी कशाला पायजे रे अंदमानात"

६. मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा  सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे "मासिक भत्तेवाढ आणि नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना फुकट विमान प्रवास करू दिला जावा" असा प्रस्ताव मांडला (असेल) तेव्हा मुख्यमंत्री काय म्हणाले असतील?

७. शरद पवार ललित मोदींना जेव्हा म्हणाले (असतील) "भाया ललित, तुला आय पी एल साठी माझी जी काही मदत लागेल ती बिनधास्त सांग. वेळचवेळ आहे आपल्याकडे. कृषीमंत्री म्हणून तसंही मला "१५ दिवसात धान्याचे भाव कमी होणार", "३ महिन्यात साखरेची टंचाई निर्माण होणार" असल्या भविष्यवाण्या करण्याशिवाय काय काम असतं "

८.विधू आणि आमीर जेव्हा चेतनला आणि महेश जेव्हा मराठा महासंघाच्या गँगला आणि अवधूत जेव्हा नितीशला म्हणाला (असेल) की "जाम मंदी आहे राव. नुसती जाहिरातबाजी करून पैसा वसूल होणार नाही. कायतरी वाद घातला पायजे."

९. दाउद, छोटा/मोठा/मधला राजन/शकील/मिरची जेव्हा दया नायकला म्हणाले (असतील) "अब्बे तू गोलिया उडाते रेह और नोट गिनते रेह. बाकी आप्पून संभालेगा "

१०. नारायण राणेंचे व्यक्तिगत सल्लागार जेव्हा त्यांना म्हणाले (असतील) की "नारूसाहेब, या शेतकऱ्यांच्या आत्महत्या काय कर्जबाजारीने नाय होतं. दारू पितात लेकाचे. त्यामुळे होतात आत्महत्या. पण कोणीतरी हे बोललं पाहिजे"

तर आता मला सांगा "पडत्या फळाची आज्ञा" या सुवर्ण म्हणीचा शोध त्याने लावला नसता तर या वरच्या सगळ्या प्रश्नांना त्या त्या व्यक्तीने काय उत्तरं दिली असती? "हो", "चालेल, "बरं", "सहीच", "मस्त", "झालं म्हणून समजा" अशी काहीतरी बावळट, अळणी उत्तरं द्यायला लागली असती की नाही? अजूनही पटत नसेल तर या सगळ्या प्रश्नांना "पडत्या फळाची आज्ञा" ऐवजी "गुरुत्वाकर्षण" असं उत्तर देऊन बघा. लागतोय काही अर्थ? नाही ना? मग आता तुम्हीच मला सांगा की "गुरुत्वाकर्षणाचा" शोध जास्त महान की "पडत्या फळाची आज्ञा" या अलंकाराचा शोध महान?

आणि हे मीच म्हणतोय असं नाही. आयझॅकने त्याच्या आत्मचरित्रातही याचा उल्लेख केलाय की गुरुत्वाकर्षणा पेक्षाही त्या म्हणीचा शोध हा माझ्या दृष्टीने महान होता. पण लोकांना तो कळलाच नाही अशी खंतही त्याने पुढे व्यक्त केली आहे. विश्वास बसत नसेल तर इथे क्लिक करून बघा. असो. आणि या महान शोधाबद्दल तुम्हाला यापूर्वी माहीत नसेल तर आपला मराठी भाषा या विषयातला "म्हणींचे शोध" या उपवर्गातला अभ्यास आणि वाचन हे फार्फार कमी आहे असं खुश्शाल समजा.

क्रमशः
(असे अजून इतर महान परंतु मानवजातीला विशेष माहीत नसलेले आणि माहीत असतील तरीही दुर्लक्षिले गेलेले शोध जगासमोर आणणे हा या लेखमालेचा उद्देश आहे. तर असे इतर शोध आमच्या शोधखात्याला गवसताक्षणीच त्यांची योग्य ती छाननी करून आणि सगळे पुरावे, घटना तपासून ते आपल्या पुढे मांडले जातील. तोवर.... शोधत राहा.. शोधा म्हणजे सापडेल.. इति आलम...)

महत्वाची टीप : सावरकर म्हणजे माझं दैवत आहे. त्यांचा एकेरी उल्लेख हा फक्त प्रसंगाच्या गरजेसाठी केला आहे. त्यांचा कुठेही यत्किंचितही अपमान करण्याचा हेतू नाही.

Tuesday, January 19, 2010

माय रूम बाथरूम !!

मला बाथरूम आवडतं. दुसरीतल्या मुलाने "माझा आवडता प्राणी" या विषयावर निबंध लिहिताना "मला गाय आवडते कारण की " अशासारखी सुरुवात केली पोस्टची म्हणून कंटाळू नका. पण मला दुसरी काही सुरुवात आत्ता तरी सुचत नाहीये. पोस्ट संपेपर्यंत एखादी चांगली सुरुवात सुचली तर बदलेनही.**
असो पण खरंच सांगतो मला बाथरूम आवडतं. एकदम मस्त वाटतं तिथे. छान. मोकळं. छान मोठ्ठा आरसा. टूथपेस्ट, माउथवॉश, शेव्ह जेल, परफ्युमस, बॉडी स्प्रेज, आंघोळीचे साबण, कपड्याचे साबण, बॉडी वॉश, शांपू, कंडीशनर, लॉंड्री डीटर्जंट, सॉफ्टनर, एअर फ्रेशनर, सेंटेड कँडल्स (ही नवीन एन्ट्री आमच्या बाथरूम मधली) अशा कित्येक गोड, उग्र, प्रसन्न, ताजंतवानं करणाऱ्या सुगंधी वस्तूंचं भांडारच उघडलेलं असतं तिथे. प्रत्येक गोष्ट बघा यातली. प्रत्येकीला स्वतंत्र असा सुगंध (कृत्रिम का होईना) आहे.

दुसरी आवडती गोष्ट म्हणजे समोरच्या भिंतीला टांगलेला तो कृत्रिम वरुणदेव. आपला शॉवर हो. कितीही दमून भागून कंटाळून आलो तरी एकदाका त्या सहस्त्रधारांनी बरसणाऱ्या शॉवर खाली उभं राहिलं की कसं एकदम मोकळं वाटतं. नितळ वाटतं.

मला माहित्ये की कृत्रिम, छोट्या छोट्या गोष्टीतून उगाचंच काहीतरी आनंद बिनंद कसा मिळतो ते सांगण्यासाठी हे पोस्ट लिहिलंय असं वाटतंय. पण ते तसं नाहीये. आणि तसं वाटत असेल तर ते माझ्या शब्दनिवडीच्या मर्यादेमुळेच आहे. मी कुठेही आणि कधीही हे असं निव्वळ मुर्खासारखं आणि कर्मदरिद्री विधान करणार नाही की पावसापेक्षा शॉवर श्रेष्ठ किंवा गुलाबाच्या सुगंधापेक्षा रूम फ्रेशनरचा सुवास श्रेष्ठ. पण या धावपळीच्या, शरीरातली सगळी क्रयशक्ती आणि मेंदूतली सगळी विचारशक्ती, कल्पनाशक्ती शोषून घेणा-या अरसिक, बोजड आयुष्यात कुठलीही (कृत्रिम का होईना)  हिरवळ दिसली की माणूस थबकणारच ना? तेव्हा हा सुवास, हा रंग, हा नाद हे नैसर्गिक कि कृत्रिम अशा अनाठायी विचारात अडकून हा सहज मिळणारा आनंदही नाकारणं म्हणजे आयुष्यातल्या छोट्या छोट्या आनंदांना आपणहून लाथाडण्यासारखंच नाही का?

असो.. उगाच भरकटलो भलतीकडेच. तर मुद्दा हा की निव्वळ हरतऱ्हेचे सुवास, रंग, जलधारा हे बाथरूमकडे आकृष्ठ होण्याचं कारण नाहीच आहे मुळी. मूळ मुद्दा वेगळाच आहे. (नमनाचं ८-१० घडे तेल संपवून लागला बाबा हा एकदाचा मार्गी.) लोकं जशी महत्वाचे निर्णय घेताना, काही ठरवताना थिंकिंग कॅप घालतात असं म्हणतात तसं हे बाथरूम म्हणजे माझी थिंकिंग रूम आहे. अर्थात थिंकिंग कॅप मधलं थिंकिंग हे जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, ठरवून केलेलं असतं. पण माझ्या थिंकिंगरूम (वाचा बाथरूम) मधलं होणारं थिंकिंग, सगळे विचार, आयडियाज हे अर्थातच न ठरवता, अपघाताने झालेले असतात. पण बाथरूम मधेच. स्थळसामर्थ्य असेल :-)

मैत्रिणीला-बायकोला (हे एकाच व्यक्तीचं अनुक्रमे भूतकाळ आणि वर्तमानकाळातलं वर्णन आहे. Some more general knowledge :) ), किंवा घरातल्या इतरांना, खूप जवळच्या मित्रांना दिलेली असंख्य सरप्रायझेस, मस्त्या, पार्ट्या, दंगा, धिंगाणा या साऱ्या साऱ्या कल्पनांचं जन्मस्थळ म्हणजे हे बाथरूम. आणि मला या एवढ्याशा "मूर्ती लहान पण कीर्ती महान" अशा जागेत असे काही एकेक भन्नाट प्लान्स सुचतात हे मलाही तसं उशिराच लक्षात आलं. म्हणजे पूर्वी पण ते प्लान्स डोक्यात यायचे पण त्याची अंमलबजावणी करायचो नाही. आळसामुळे म्हणा, भीतीमुळे म्हणा. पण एकदा जे (बाथरूम मध्ये) सुचलं ते अगदी तसंच्या तसं केलं आणि एकदम सुपरहिट झालं. सगळ्यांना आवडलं एकदम. त्याचं काय झालं कि मागे (वीसेक वर्षं होऊन गेली असतील या घटनेला) एकदा माझ्या आजीची साठी शांत करायची असं सगळ्यांनी ठरवलं. साड्या, भेटवस्तू, पुस्तकं, साखरेची तुला असं काय काय ठरवत होते आई बाबा आणि काका काकू वगैरे. आणि आम्ही (स्वयं या अर्थी) काय सगळं बघत ऐकत होतो. सकाळी आंघोळीला गेलो आणि अचानक डोक्यात विचार घुसला "अरे सगळी मोठी लोकं काय काय देतायंत आजीला. आपण नातवंडानी पण दिलं पाहिजे काहीतरी". मग सरळ जाऊन आईला सांगितलं कि मला असं असं करावसं वाटतंय. तेव्हा पॉकेटमनी वगैरेची पद्धत नसल्याने (आणि अर्थात आमच्या घरात तर ती कधीच नव्हती) सुचलेले विचार अंमलात आणण्यासाठी आईला सांगणे हा एकच पर्याय होता. तर आंघोळ करताना सुचलेल्या (हे मुख्य त्यातलं) त्या विचाराप्रमाणे आम्ही सगळ्या नातवंडानी मिळून आजीला एक साडी घेतली आणि ती साडी आजीला आणि ती कल्पना घरातल्या सगळ्यांना आवडल्याने आमचा (पुन्हा स्वयं या अर्थी) बाथरूममधल्या विचारप्रक्रियेवरील अंमलबजावणीने मिळणाऱ्या यशावर  अगदी पूर्ण विश्वास बसला. त्यानंतर वर म्हटल्याप्रमाणे त्या मालिकेत सरप्रायझेसचे अनेक यशस्वी प्रसंग चढत्या भाजणीने ओवले गेले. त्या मालिकेतला लेटेस्ट एपिसोड म्हणजे गेल्या वर्षीची अचानक केलेली स्वदेस-ट्रीप. एकदम अचानक, गुप्तपणे कोणालाही न सांगता शेवटच्या क्षणी ठरवलेली. अर्थात या ग्रँड एपिसोड्सच्या मध्ये मध्ये थोडे थोडे कविता, नवीन पोस्ट सुचणे वगैरे वगैरे सारखे छोटे छोटे प्रसंगही आहेत म्हणा. अर्थातच प्रत्येक बाथरूम-ट्रीप नंतर काही मी एखादी कविता, लेख, पोस्ट  किंवा एखादं नवीन सरप्राईज असलं काही पाडत ("कविता पाडली" च्या तालावर हे वाचावे) नाही आणि अर्थातच एवढ्या साधा कॉमनसेन्स वापरून कळणाऱ्या गोष्टीचा उल्लेखही इथे करणं वेडेपणाचंच आहे. तरीही..
पण सगळ्याच कल्पना या आपल्यालाच (पुन्हा एकदा स्वयं. आयला किती बोलतो हा) सुचलेल्या असल्याने त्यात मोठी/छोटी कल्पना असं काही नसतंच.
तर ही नेहमीच्या कल्पना सुचण्याच्या ठिकाणावर लिहिण्याची कल्पना नेहमीच्या कल्पना सुचण्याच्या ठिकाणी न सुचता (थोडक्यात हे पोस्ट लिहावं हे बाथरूममध्ये सुचलेलं नाही) ऑफिसमध्ये सुचली आणि तरीही मी ती (बाथरूमची माफी मागून) प्रत्यक्षात आणतोय. बाथरूम हेच अजूनही थिंकिंग रूम आहे कि मी आता बाहेर विचार करायलाही तेवढाच सक्षम आहे हे मिळणाऱ्या प्रतिसादावरून कळेलच :)

**पोस्ट संपवल्यावरही यापेक्षा चांगली सुरुवात आठवण्याचा कंटाळा आल्याने सुरुवात तशीच ठेवली आहे

अप्सरा आली (च नाही) !!

"गणा आणि त्याचे साथीदार तमाशासाठी बाईचा शोध घेत असतात. शेवटी किशोर कदमला (त्याचं चित्रपटातलं नाव विसरलो) एका जत्रेत/लग्नात ती नाचताना दिसते. संगीतावर नाचणारी लयदार पावलं, मोकळे केस अशी बेधुंद नाचणारी सोनाली कुलकर्णी काही क्षणातच पडद्यावर अवतरणार असते. तिच्या घामेजल्या चेहऱ्यावर कॅमेरा स्थिरावतो."

आणि मी एकदम वैतागून म्हटलं "हात्तीच्या, अजूनही सोनाली कुलकर्णीची एन्ट्री नाही? मला वाटलेलं हीच असणार सोनाली कुलकर्णी".
हा असा काय वेंधळ्यासारखं बडबडतोय अशा नजरेने बायकोने माझ्याकडे बघितलं.
"काय झालं?" मी
"बरा आहेस ना?" बायको
"????" मी
"अरे बाबा हीच तर आहे सोनाली कुलकर्णी" बायको
"क क क क्काय" असं मी एकदम शाहरुख थाटात कोरडलो.. आपलं ओरडलो
"अग असं काय" माझा पुन्हा एकदा निष्फळ प्रयत्न
"का?"
"अगं ही कोण सोनाली कुलकर्णी? मला वाटलं ती आपली सोनाली कुलकर्णी आहे या सिनेमात"
माझ्या अज्ञानमुलक प्रश्नाला वैतागून किंवा सोनाली कुलकर्णीला आपली म्हटल्याने बायकोने शांत राहणं पसंत केलं.

त्याचं झालं काय की मी नटरंग बघण्याआधी कुठेही त्याचे प्रीव्युज, प्रोमोज, पुरस्कार सोहळे वगैरे बघितले नव्हते. (गाणी बऱ्याच दिवसां पासून ऐकतोय पण विडीओज नाही बघितले. अर्थात युट्युबच्या युगात हे एवढं अडाणी राहणं म्हणजे जरा अतीच झालं.) जिथे जिथे ऐकलं तिथे तिथे अतुल कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी असंच ऐकलं होतं. आणि जेवढे फोटो बघितले ते पण सगळे अतुल कुलकर्णीचे रांगड्या रूपातले. नंतर नटरंगचे बरेच रीव्युज वाचले.पण मला ज्या २ गोष्टी अपेक्षित होत्या त्याबद्दल एकाही ओळीचा कुठेच उल्लेख नव्हता.

१. सोनाली कुलकर्णीने कारकीर्दीत प्रथमच केलेल्या तमासगीर बाईच्या भूमिकेबद्दल
२. वय झालं असूनही (अर्थात इतकंही नाही बट स्टील) सोनालीने अप्सरा अप्रतिम रंगवलीये

वगैरे वगैरे... अशा काही ओळींची मला अपेक्षा होती. पण कुठेच काहीच न आल्याने मला वाटलं की सोनालीला अगदीच छोटी भूमिका असावी.

पण हाय रे..  ही अप्सरा वेगळीच निघाली. मी "मुक्ता" पासून कारकीर्द सुरु करून अप्रतिम अभिनय, निखळ,गोड हास्य आणि सुस्पष्टट (कित्ती स्पष्ट ते कळावं म्हणून ट ला ट मुद्दाम जोडलाय) शब्दोच्चार या प्रमुख गुणांवर पुढे असंख्य अविस्मरणीय भूमिका साकार करणाऱ्या त्या सोनाली कुलकर्णी नावाच्या अप्सरेची वाट बघत होतो. अर्थात या सोनालीला नावं ठेवत नाहीये मी. पण आपल्या  (ज्यामुळे बायकोने शांत राहणं पसंत केलं त्या) सोनालीची जादू  काही औरच. तिच्या मुक्ता मधल्या अभिनयाने आणि दिसण्याने वेड लावलं होतं. त्यानंतर दोघी, कैरी, देवराई, सखाराम बाईंडर (सयाजी शिंदे बरोबरचं) करत करत दिल चाहता है पर्यंतचा थक्क करून सोडणारा प्रवास. इथे खरंच टिळक जयंतीच्या दिवशी आढळणारा आगरकरांबद्दलचा (किंवा तत्सम.. तपशील चुकले असतील) जाज्वल्य पुणेरी अभिमान दाखवण्याचा हेतू नाही. पण खरंच नामसाधर्म्याने झालेल्या गोंधळामुळे (किंवा आमच्या अडाणीपणामुळे) का होईना आमची अप्सरा आलीच नाही :(

जनहितार्थ : सिद्धार्थची जनहितार्थची कल्पना आवडली. (कमेंट बघा). जुनियर सोकूचे सगळे फोटोज लावणं शक्य नाही. म्हणून "जनहितार्थ" म्हणून एक लावतोय. आणि ज्यू सोकू चा लावल्यावर "आपल्या" सोकू चा पण लावलाच पाहिजे म्हणून तो ही लावतोय :)

"नटरंग" वाली सोकू

 
"आपली" सोकू 

(ज्यु सोकू इ-मेल forward वरून आणि "आपली" सोकू आंतरजालावरून  साभार)

Friday, January 15, 2010

पिझ्झा, पोट, तब्येत, ब्लॉग, शिक्षा वगैरे वगैरे

डोळ्यासमोरची ट्रेन चुकली आज. असला वैताग आला.. आता पुढच्या ट्रेन साठी थांबा. म्हणजे पाचच मिनिट. पण आपल्याला काय वैतागायला काही कारण चालतं. पण त्या पाच मिनिटांचा मी नेहमीप्रमाणे सदुपयोग केला. विचार करण्यासाठी. म्हणजे आता मी दोन ट्रेन च्या मधल्या वेळातच विचार करतो (आणि एखाद्या दिवशी ट्रेन साठी थांबावं लागलं नाही तर विचार नाही?) हे असले अभद्र विचार (तुम्ही माझ्यासारखे दोन ट्रेनच्या वेळेच्या मध्येच विचार करता असं मी गृहीत धरत नाहीये. तेव्हा तुम्हीही धरू नका.) मनात आले असतील तर ते ताबडतोब झटकून टाका. आणि आले नसतीलच तर मग.. तर मग.. वरची ओळ वाचलीच नाही असं समजा. इरेज करा. विसरून जा (गजिनी, मोमेंटो हेल्प मी)

ज्यांच्या मनात वर सांगितलेले कुजकट नासकट विचार आले नसतील त्यांच्यासाठी पोस्ट इथपासून सुरु होतेय. (आणि ज्यांच्या आले असतील त्यांनी १०८ वेळा गजिनीचा जप करावा)

तर त्या पाच मिनिटात मी खूप विचार केला. आपली ट्रेन का चुकली. नेहमीच डोळ्यासमोर असतानाही का चुकते. खूप विचार केल्यावर कारण लक्षात आलं आपण धावत नाही (धावू शकत नाही) हेच त्याचं कारण. धावू का शकत नाही? (पहिल्या प्रश्नाच्या उत्तराने दुसऱ्या प्रश्नाला जन्माला घातलं होतं) त्याचं कारण सुटलेलं पोट. मग हळू हळू १० पावलं धावल्यावर होणारी दमछाक, लेकाला कडेवर घेऊन थोडा वेळ फिरलं की लागणारा दम, कमी होत चाललेला स्टॅमीना, अॅक्टीवनेस, चपळता सगळं जाणवून गेलं. आयला, ही तिशी उलटली ना की सगळं लय वंगाळ होऊन जातं. मी तिशीला दोष द्यायला लागायच्या आतच "बाकीचे बघ ना तिशी पार केलेले, ते कसे अॅक्टीव्ह आहेत फिट आहेत, दमत नाहीत" अशा दुगाण्या तिशीने माझ्या दिशेने झाडल्या. अरे हो तेही आहे म्हणा. मग काय बरं? हा बरोबर.. मी जॉगिंग/वर्कआउट काही करत नाही म्हणून असेल का हे असं?
"ह्म्म्म.. partially" मगाशी झाडलेल्या दुगाण्या आवरून घेत तिशी म्हणाली.

"हात्तीच्या.. एवढं करून पार्शलीच का? मग 'फुल-टू'-ली काय असेल बरं?" आमचं आपलं लाउड थिंकिंग चालूच.

आणि अचानक उत्तर सापडलं. 'तुझे आहे तुजपाशी'... युरेक्का..

पिझ्झा. चीजने रसरसलेला पिझ्झा हेच त्याचं उत्तर होतं. पिझ्झा अति आवडणाऱ्या आणि अति खाणाऱ्या लोकांमध्ये माझा समावेश होतो. जनरल नॉलेज म्हणून माहित असलेलं बरं .. उगाच देशद्रोही, आपल्या मातीशी नाळ तुटलेला असली लेबलं नका लावू बाबा. पुरणपोळी, अळूच्या वड्या, बटाटेवाडे , पाणी पुरी पण तितक्याच आवडीने खातो मी. पण पिझ्झा जरा जास्तच आवडतो. तर तो पिझ्झा, चीज (चीजला चीजवस्तू असं का म्हणत नाहीत असं मला नेहमी वाटतं. कुठल्याही चीजवस्तू पेक्षा ते कणभरही कमी नाहीये), त्यातले फॅट्स, कॅलर्या या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आमची कमी झालेली चपळता असा निष्कर्ष मी चपळतेने काढला. 
तर मग त्यादिवशी पासून ठरलं की पिझ्झा कमी करायचा आता. एकदम कमी... नाही नको.. कमी नको. बंद एकदम बंद.. अजिबात खायचा नाही.. हा हे कसं बरं आहे एकदम. (हाहाहा हाहा हाहाहा.. "तिशी" च कुत्सित हास्य)..  हे जमेल का कळत नव्हतं. पिझ्झा अजिबात नाही खायचा? बाप रे. पण जमवायलाच हवं. आणि ते जमेल आणि ते जमतंय यावर आपला विश्वास बसेल असं काहीतरी करायला हवं होतं. मग मी स्वतःलाच प्रॉमिस दिलं की पिझ्झा खाणार नाही. (वचन पेक्षा प्रॉमिस जरा हलकं फुलकं वाटतं. वचन म्हणजे एकदम पौराणिक कथा किंवा ५०-६० मधले मराठी कृष्ण-धवल सिनेमे आठवतात.) तर मी असं स्वतःलाच प्रॉमिस दिलं पिझ्झा न खाण्याचं. मोठी लोकं (मान्यवर व्यक्ती या अर्थाने म्हणतोय मी) स्वतःला देतात तसं. म्हणजे पिझ्झा न खाण्याचं नव्हे कुठलीही गोष्ट अगदी ठामपणे करताना "he promised himself" असं कुठल्याशा पुस्तकात वाचलं होतं. (आता स्वतःला प्रॉमिस दिल्यानंतर ती लोकं मोठी होतात की मोठी झाल्यावर असं प्रॉमिस द्यायला शिकतात हे नक्की आठवत नाहीये) तर आम्ही दिलं प्रॉमिस. पण हे प्रॉमिस असं होतं की जर का पिझ्झा खाल्ला तर शिक्षा म्हणून ब्लॉग वर रोज एक नवीन पोस्ट टाकायचं. पिझ्झाचा आणि ब्लॉगचा अर्था अर्थी काही संबंध नाही हो किंवा मी ब्लॉग शिक्षा म्हणून लिहितोय असं वगैरे काही नाही. तरीपण नेहमीच येणाऱ्या ढीगभर आळस आणि कंटाळ्याला बाजूला करून रोज एक पोस्ट लिहायला जमणार आहे का? आपण काय महेंद्र काका आहोत का? आपल्यासाठी..-किंवा सोयीसाठी माझ्यासाठी म्हणतो...- तर माझ्यासाठी ती शिक्षाच.

**********************

आज बायको म्हणाली ""पोस्ट-प्रेग्नन्सी- डायट वर वाचत होते आज. मला बरंच डायट करावं लागणार आहे. तू पण सुरु कर ना डायट  माझ्या बरोबर. एकाला दोघे असले कि जरा बरं." .. असं सुरु करून ती हळू हळू फक्त माझ्याच डायट वर घसरली. "आता बटर बंद. चीज बंद. पिझ्झा तर साफ बंद. कॉफीत साखर एकदम कमी घेत जा. जॉगिंग सुरु कर, वर्कआउट सुरु कर"

तर गेल्या चार दिवसात अजिबात पिझ्झा खाल्ला नाहीये आम्ही. हे पोस्ट ड्राफ्टमध्ये पडलेलं दिसलं की काय तिला?? म्हणजे "तब्येतीची काळजी" पेक्षा "रोज ब्लॉग वाचायला लागण्याची भीती" हे मुख्य कारण आहे की काय?

****
तळटीप १ : (अ)पूर्णतः काल्पनिक. (फार प्रेमळ बायको आहे हो माझी)
तळटीप २ : हे पोस्ट इतकं फालतू आणि भरकटलेलं झालंय की ते कुठल्याही कॅटेगरी मध्ये बसणारं नसल्याने मी त्याला "अर्थहीन" अशा लेबलात टाकतोय.
तळटीप ३ : इतकं भरकटलेलं झालं असतानाही का टाकलंस या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इतका वेळ टाईप करून झाल्यावर निव्वळ आवडलं नाही या कारणाने पोस्ट न टाकायला मी काही चांदीचा (पक्षी पोस्ट्सचा) चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला गर्भश्रीमंत ब्लॉगर नाही म्हणून. आमची आजी म्हणायची "खाउन माजावं पण टाकून माजू नये"
तळटीप ४ : चुकून माकून मोहाला बळी पडून मी जरी पिझ्झा खाल्लाच तरी रोज पोस्ट टाकणार नाही (टाकू शकणार नाही) हे नक्की. (तेव्हा सगळ्यांनी सुटकेचे नि:श्वास सोडून आपापले जीव आपापल्या भांड्यात टाकावेत.) कारण आमच्यात संकल्प हा "संकल्प केला" या अर्थी नव्हे तर "संकल्प सोडला" या अर्थी वापरतात. म्हणजे आचमन करून सोडून द्यावं तसं. जसं पुण्यात सायकल चालवणे हे वाहन चालवणे याअर्थी नाही तर "चळवळ चालवणे " किंवा "तलवार चालवणे" या अर्थी वापरतात तसंच.. (पु ल, पुन्हा एकदा थँक्स हो)

Monday, January 11, 2010

कारणं

चार महिन्यांपूर्वी साधनाताई आमटेंचं "समिधा" वाचून झाल्यानंतर कुठलंच मराठी पुस्तक वाचलं नव्हतं. "समिधा" च्या आधी आणि नंतर पण जॉन ग्रिशम च वाचत होतो. ग्रिशमचं "द चेंबर" (एकदम टुक्कार पुस्तक आहे) वाचल्यानंतर लायब्ररीत जाउन नवीन पुस्तक घ्यायला वेळ मिळाला नाही. तेवढ्यात कमल पाध्येंचं "बंध-अनुबंध" हाती पडलं. पहिली काही पानं वाचता वाचताच ते एकदम आवडून गेलं. मग म्हटलं "बंध-अनुबंध" होईपर्यंत ग्रिशमला कलटी. कमल पाध्ये म्हणजे लेखक, संपादक, विचारवंत प्रभाकर पाध्ये यांच्या पत्नी अशी त्यांची नेहमी करून दिली जाणारी पण त्यांना विशेष न रुचणारी ओळख मी करून दिली तर माझ्या त्या पुस्तकाच्या वाचनाला काही अर्थच उरणार नाही. तर कमल पाध्ये म्हणजे प्रजा-समाजवादी महिला दल, राष्ट्र सेवा दल अशा आणि यांसारख्या अनेक संस्थांमध्ये झोकून देऊन काम करणाऱ्या सच्च्या हाडाच्या समाजसेविका. त्यांनी जयप्रकाश नारायण, प्रभावती नारायण, बंडू गोरे, मृणाल गोरे, मधू दंडवते, प्रमिला दंडवते अशा अनेक समाजवादी नेत्यांच्या बरोबर काम केलं आहे. तसेच प्रभाकर पाध्ये धनुर्धारी, नवशक्तीचे संपादक असल्याने त्यांचे आणि कमलताईंचेही कुसुमाग्रज, पुल आणि सुनिताबाई, आचार्य अत्रे, दादा धर्माधिकारी, प्रभाकर पाध्येंना गुरुस्थानी असणारे डॉ आंबेडकर इ अनेकांशी जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. पुस्तकात या सर्व मान्यवरांच्या विचारांचे, कार्याचे, व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब तर पडतेच पण त्याच बरोबर कमलताईंचं  व्यक्तिमत्व कसं घडत गेलं तेही कळतं.
कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पत्नीने लिहिलेल्या आत्मचरित्रात जसा एक नाराजीचा, (नवऱ्यामुळे) स्वतःवर अन्याय झाल्याचा जो एक सूर असतो (काही अपवाद वगळता) तो इथेही आहेच. तसेच घरातले रुसवे-फुगवे, समाज, गैरसमज, एकमेकांना गृहीत धरणं आणि त्यातून होणारी भांडणं इ इ विषयावर जवळपास निम्मी पाने खर्ची घातली आहेत. पण हा लेख (मी परीक्षण म्हणणार नाही त्याचं कारण नंतर कळेलच) मी लिहितोय तो उरलेल्या निम्म्या पानांबद्दल. ती खुपच सच्ची आणि अतिशय विचार करायला लावणारी अशी आहेत.
पुस्तक सुरु होतं ते मुंबईतल्या रामवाडीतल्या धनसंपन्न विनायक भटजींच्या कमळीच्या आठवणींपासून. त्यात कमळीला आलेले वेगवेगळे अनुभव, घरातला मोकळेपणा, दूरचे नातेवाईक, इतर ओळखी-पाळखीचे पुरुष यांनी जाणून बुजून सलगी करण्याचे केलेले प्रयत्न, त्यातून अनेकदा बसलेले धक्के, त्या नजरा, त्यांच्याबद्दल उत्पन्न झालेली किळस, मधेच लाभणारा  एखादा निखळ स्नेहाचा स्पर्श अशा अनेक गोष्टींतून प्रकट होतात. पुढे मग त्यांचं स्वतःच्या पुढाकाराने प्रभाकर पाध्यान्शी झालेलं लग्न, पाध्यांच्या घरची काही विक्षिप्त मंडळी, पाध्यांचा मित्र परिवार, त्यात त्यांचं सुरुवातीला बुजून जाणं, त्यानंतर प्रशांतचा जन्म हे तर येतंच पण त्याचा अकाली मृत्यु, पाध्यांचा मृत्यू, विविध संस्था, संघटनांशी वेळोवेळी झालेल्या वादांमुळे काम न करण्याचा घेतलेला निर्णय असे काही धक्कादायक प्रसंगही येतात. पण मी जी विचार करायला लावणारी पानं म्हणत होतो ती ही नाहीच. त्या पानांमध्ये कमल पाध्ये (सौ, श्रीमती काही नाही नुसतं कमल पाध्ये) या नुसत्या कमल पाध्ये न राहता त्या काळच्या पुरुषप्रधान संस्कृतीत घुसमटणाऱ्या स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या, वेगळ्या विचारांची कास धरणाऱ्या, वेळोवेळी त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्या अशा वेगवेगळया रूपात आपल्याला भेटतात.
राणीचा गुलाम असला तरी तो हाच विचार करतो की आपण हिचे गुलाम असलो तरी ही स्त्री असल्याने आपल्यापेक्षा कनिष्ठच हा विचार त्यांना ऐकवणाऱ्या, किंवा एका दारुड्याच्या बायकोने त्याच्यावर हात उचलला असता इतर बायकांनी "तो तर प्यालेला होता, तू कशापाई त्याच्यावर हात उगारलास" असे सल्ले देणाऱ्या, वेळोवेळी येणार्या भयानक अनुभव सांगणाऱ्या इतर अनेक बायकांची वर्णनं यात येतात. आणि आपण हादरून जातो. विचार करायला प्रवृत्त होतो.स्त्रियांवर पदोपदी होणारे छुपे अन्याय आपल्याला दिसायला लागतात. पण हे नेहमीचंच झाल्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याची प्रवृत्ती आपल्यात बळावू लागलेली असते आणि तेही आपल्या अगदी नकळत. आणि अर्थात ते समाजमान्य पण असतं. कोणी काही वावगं करतंय, काही चुकीचं घडतंय असं कोणालाच वाटत नाही

********

आणि वाचता वाचता मी एकदम हतबुद्ध झालो. एकदा नाही अनेकदा. कारण हे सगळं भूतकाळात लिहिण्याची गरजच नाही असं वाटायला लागलं मला. त्यातल्या अनेक घटना घडून ५०-६०-७०-८० वर्षं उलटून गेली तरीही त्यावर केलेली भाष्य सद्यस्थितीत घडणाऱ्या कित्येक घटनांना अजूनही किती चपखल बसतात. आणि स्त्रियांवरचे अत्याचार वगैरे पाहण्यासाठी अगदी गावात वगैरे जायची काही गरज नाही (अर्थात तिकडे त्यांचं प्रमाण अधिक आहे हे निर्विवाद्च). शहरात घडणाऱ्या रुचिका, जेसिका आणि इतर अनेक अनाम बालिकांची प्रकरणं हा तर स्त्रियांवरच्या अन्यायाचा परमोच्च बिंदू झाला. पण अनेक घटना किंवा आपल्या रोजच्या जीवनातले आचार-विचार, व्यवहार यातही ते इतक्या बेमालूमपणे मिसळलेले असतात की आणि (त्यामुळेच की काय) आपल्याला त्याची इतSSSSकी सवय झालेली असते की त्या घटना, त्या पद्धती यांच्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही.

साधं लग्नाचं उदाहरण घ्या. (पौराणिक/वैदिक कुठल्याही पद्धतीचा) लग्नाचा सोहळा हे म्हणजे या छुप्या अन्यायाचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. मला धर्मबुडव्या, धर्मभ्रष्ट, स्वतःला अतिशहाणा समजणारा, आधुनिक विचारांचा बेगडी आव आणणारा अशा शेलक्या विशेषणांचा आहेर देण्यापूर्वी जरा पुढे वाचा.

अजूनही अनेक लग्नात वधूपक्षाने सगळा खर्च करायचा अशी पद्धत आहे. या नियमाचा मला आत पर्यंत तरी अर्थ लागलेला नाही. कोणी केला हा नियम? ५०-१००-२०० वर्षांपूर्वीच्या वरपक्षाला अनुकूल असे नियम बनवणाऱ्या सुपीक मेंदूतून ही कल्पना आली असावी. पण ती आपण काहीही सारासार विचार न करता लग्नातल्या रुढी म्हणून बिनडोकपणे तशीच पुढे चालू ठेवण्यात काय हशील आहे? जर लग्न दोघांचंही होणार आहे तर खर्च एकजण का करेल? आणि हल्लीच्या लग्नात उधळले जाणारे वारेमाप पैसे बघता या प्रश्नाची तीव्रता अजून वाढते. आणि एकापेक्षा अधिक मुली असतील तर बघायलाच नको. तसंच अजूनही बऱ्याच लग्नात घेतला जाणार हुंडा ही अजून एक गोष्ट. प्रत्येक लग्नात आणि हुंड्याला लागणारे लाखो रुपये उभे करताना मुलीच्या घरच्यांच्यावर काय परिस्थिती येत असेल याची कल्पनाच केलेली बरी. गर्भजल परीक्षा करून मुलीचा गर्भ असल्यास तो पाडण्याच्या वृत्तीत या लग्न आणि हुंड्याच्या खर्चाच्या "पारंपारिक" पद्धतीचा किती मोठा हात आहे ते नीट विचार करून बघा. अर्थात तशा सगळ्याच घटना या एकाच हेतूने होतात असं म्हणत नाहीये मी. पण बराच प्रभाव असणार/आहे हे मात्र नक्की.

वधू पक्षाची आर्थिक अवहेलना संपली की त्यांच्या स्वत्वाची मानखंडना, अवहेलना करणाऱ्या अनेक छोट्या छोट्या प्रथा पारंपारिक लग्न विधीच्या नावाने त्यांच्या माथी मारल्या जातात. यादीच सांगतो. वधूच्या आईने वराचे (जो तिच्या मुलाच्या वयाचा असतो) पाय दुध-पाणी घालून धुवून, पुसून, त्यावर स्वस्तिक काढून स्वागत करायची पद्धत आहे. आणि त्याचं कारण काय तर वर हा विष्णूचं रूप असतो. बोंबला च्यायला .. आपल्या वयाच्या जवळपास दुपटीच्या वयाच्या व्यक्तीकडून पाय धुवून घ्यायला भाग पडणारी स्वागताची पद्धत मला तरी सर्वस्वी अमान्य आहे. हे कसलं स्वागत? हे पहिलं "स्वागत" झाल्यावर हॉलमध्ये फिरल्यावर बिचाऱ्या नवरदेवाचे पाय खराब होत असावेत बहुतेक. त्यामुळे लग्न विधी सुरु करताना पुन्हा एकदा तसेच पाय धुण्याची पद्धत आहे.   तसंच लग्नात नवरदेवाच्या घरच्यांचे मानपान (आणि त्यातून निर्माण होणारे मानापमान) करण्याच्या पद्धती हे अजून एक उदाहरण. वधूपक्षाचं मानपान अशी गोष्ट कधी ऐकली आहे का आपण? मी तरी नाही. स्वागत करायचं ते वर पक्षाचं, पाय धुवायचे ते वर पक्षाचे, मानपान करायचे ते वर पक्षाचे, हुंडा घ्यायचा तो वर पक्षाने आणि का तर लग्न त्यांच्या "सुपुत्राचं" आहे म्हणून. बाकी निकष काही नाही.
नंतर येतो तो लग्नाच्या शेवटी असणारा "झाल" ठेवण्याचा विधी. या विधीत दिव्यांनी/पणत्यांनी भरलेली परात वधूच्या आई वडिलांनी घेऊन ती समोर बसलेल्या वरपक्षातील प्रत्येकाच्या डोक्यावर ४-५ सेकंद ठेवायची असते. प्रत्येक वेळी गुरुजी मंत्र म्हणतात आणि मग ती पुढे न्यायची अशी पद्धत आहे. या विधीत खरं तर वावगं वाटण्या सारखं काही नसावं.पण नंतर कळलं कि या प्रथेचा, त्यातल्या मंत्रांचा अर्थ असा आहे की वधूचे मातापिता वरपक्षातील प्रत्येकाला "विनंती" करतात की आम्ही आमची मुलगी तुमच्या घरी देतोय. तेव्हा तिला प्लीज सांभाळून घ्या हो. आणि त्यासाठी ती परात प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवली जाते.
लग्नातली ही छुपी अवहेलना तिथेच संपत नाही. खरं तर छुपी नाही उघडउघडच.. पण प्रथा, पद्धत या गोंडस नावाखाली आपल्या विचारांवर, मत मांडण्याच्या पद्धतीवर इतकी पद्धतशीरपणे गदा आणली जाते आपल्याला वर्षानुवर्षे चाललंय तेच योग्य वाटायला लागतं. तर ही छुपी अवहेलना पुढेही (कमीत कमी) वर्षभर चालू राहते. वर्षासण, दिवाळसण, पहिली संक्रांत, अधिक महिना अशा वर्षभर या ना त्या कारणांनी जावईबापूंना आणि त्याच्या आई वडिलांना आहेर, भेट वगैरे द्यावे लागतात. पुन्हा एकदा वधू पक्षाने नुसतं द्यायचं. घ्यायचं काही नाही. आणि पुन्हा एकदा निकष फक्त "वरपक्ष आहे म्हणून" हाच.

लग्न म्हणजे या अन्याय मालिकेचा grand ceremony आहे. पण रोजच्या जीवनातही स्त्रियांना अनुभवायला लागणारी छेडछाड, धक्काबुक्की, हपापलेल्या नजरा, गर्दीत केले जाणारे सहेतुक स्पर्श असं रोजचं चक्र आहेच.

आता याला अन्याय/भेदभाव म्हणायचं कि नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण अन्याय नाही म्हणायचं तर तो कसा नाही हे पटणारी कारणं द्यावी लागतील. आणि मला तरी अशी कुठलीही कारणं दिसत नाहीत.

अचानक नचिकेतच्या ब्लॉगवर एका पोस्टमध्ये वाचलेलं "शिवी बाईवरून दिलेलीच जास्त लागते.." हे वाक्य आणि नीरजाताईंच्या ब्लॉगवरचं "स्वच्छतेच्या बैलाला..!!" आठवलं..

तर कारणं सांगायची खरंच गरज आहे का ?????

Friday, January 8, 2010

गर्जा जयजयकार क्रांतीचा (कुसुमाग्रजांची क्षमा मागून)

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!! तुम्ही विचाराल कसली क्रांती. सांगतो. मला लहानपणी क्रांती या शब्दाचा अर्थ नीट कळायचा नाही. (पोस्ट वाचून झाल्यावर तुम्ही म्हणाल आत्ता तरी कुठे कळलाय पठ्ठ्या). म्हणून मग मला कोणीतरी सोप्प्या शब्दात समजावून सांगितलं क्रांती म्हणजे बदल. अर्थातच फार ढोबळ अर्थ होता तो. पण आम्हाला आपलं ढोबळ, अंदाजे, शक्यतो, साधारण, बहुतेक, जमल्यास, कदाचित, बघुया हे असलंच आवडतं. बरं पडतं असं कुंपणावर राहिलं की. सेफ गेम. च्या मारी. (ही शिवी नाही. अजयचं शिवी-पुराण वाचा. अजय, तुझ्या आजच्या हिट्स माझ्याकडे वळव रे बाबा ;-) )

असो. वरच्या यादीत पाल्हाळ हे विशेषण जोडून घ्यायचं नाहीये म्हणून मुद्द्याकडे सरकू. (सरक ना रे बाबा, कोणी अडवलंय तुला.) अर्थात पोस्ट वाचून झाल्यावर तुम्ही म्हणाल कुठला आणि कसला मुद्दा राजा? पण असो. निंदकाचे घर असावे शेजारच्या ब्लॉगवर..

तर कुठे होतो आपण? हो हो .. क्रांती क्रांती. तर क्रांती म्हणजे बदल. आणि आमच्या ब्लॉग मधला बदल सुज्ञ वाचकांच्या एव्हाना (???) लक्षात आलाच असेल. (डोळे फुटले नाहीत अजून आमचे. चांगले शाबूत आहेत.. @*#$^*&). अर्थात ती क्रांती आणि हा बदल यांचं नातं जोडणं म्हणजे
१. सुर्व्यानं काज्यव्यासमोर चमकण्यासारखं आहे.
२. सशानं आपल्या टाळूला गंडस्थळ म्हणण्यासारखं आहे.
३. नळाच्या कृपेनं पाउस पडण्यासारखं आहे.
(पु ल, तुम्ही नसतात तर या तीनही मुद्द्यांच्या जागा मला रिकाम्या ठेवाव्या लागल्या असत्या एवढं चपखल लागू होतंय ते इकडे.)

तर एव्हाना तुमच्या लक्षात आलंच असेल की तशा अर्थाने क्रांती-बिंती काही नाही (पण एका अर्थाने आहेच. आठवा : क्रांती=बदल) ही तर आमची साधी-सोपी छोटीशी रंग-रंगोटी. (पण हे आधीच सांगितलं असतं तर पोस्ट थोडीच वाचलं असतंत आत्तापर्यंत?? ;-) ). तर ही रंग-रंगोटी कशी वाटली सांगा. की जुना रंगच चांगला होता ते ही कळवा. (डीस्टेमपर का होईना त्यात तुझं वाफाळलेलं तोंड तरी बघावं लागत नव्हतं)
तर पुन्हा एकदा क्रांतीचा आपलं रंग-रंगोटीचा जयजयकार !!!

Thursday, January 7, 2010

अँड ही इज ...................

गेल्या आठवड्यात असंच आदितेयशी खेळत बसलो होतो (म्हणजे तो त्याचा त्याचा खेळत होता आणि मी लॅपटॉपशी खेळत होतो) तर अचानक तो नेहमी प्रमाणे गुरगुरायला लागला. हो. त्याचं काही मनाविरुद्ध झालं, कंटाळा आला, "मला उचलून घे, कडेवर घे" अशा अर्थाचं सांगायचं असेल, किंवा आपण त्याला कडेवर घेऊन बसलो असू पण त्याला वाटतंय कि आपण त्याला कडेवर घेऊन फिरवावं या आणि अशा इतर अनेक (काही समजलेल्या, काही न समजलेल्या) कारणांनी साहेब गुरगुरायला लागतात. तर त्यादिवशी मी आपलं अंदाजाने त्याला कडेवर घेतलं (अंदाजाने म्हणजे गुरगुरण्याच्या कारणाच्या अंदाजाने म्हणतोय. कडेवर मी त्याला अंदाजाने नाही अगदी व्यवस्थितच घेतलं) आणि फिरवायला लागलो. "अगदी गोड दिसतो", "गोबरे गाल आहेत", "डोळे आई सारखे आहेत", "चेहरा आईसारखा आहे" अशा अनेक विशेषणांच्या कौतुकाचं कोंदण लाभलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे मी बघत होतो. अचानक साहेब पुन्हा गुरगुरले. अचानक माझी तंद्री भंग झाली आणि मला पटकन लक्षात आलं. यस. युरेका. म्हणजे... तो कशासाठी गुरगुरतोय ते नाही पण दुसऱ्या एका विचाराची ट्यूबलाईट लागली. म्हटलं हा असा गुरगुरतो कसा काय. आय मीन ही इज सो ओरिजनल. तो ते तसं कोणाचं बघून शिकला असण्याची शक्यताच नाही. जस्ट ९ महिन्याचा आहे तो. ही इज जस्ट टू यंग फॉर दॅट. म्हणजे ही त्याची स्वतःची सवय आहे. स्वतःची प्रतिक्रिया, प्रतिक्षिप्त क्रिया आहे. त्या ओरीजनॅलिटी साठी युरेका म्हटलं मी. मग मला आपल्यावर सहज, नकळतपणे झालेल्या होणाऱ्या इतरांच्या सवयी, लकबी, आवडी-निवडी, हसण्या-बोलण्याच्या, हातवारे करण्याच्या पद्धतींचा प्रभाव आठवून गेला. किंवा आपण पूर्वी अनेकदा जाणून बुजून उचलण्याचा प्रयत्न केलेल्या क्रिकेटप्लेयर्स/मुव्ही स्टार्स यांच्या हेअर स्टाईल्स्, कपडे, पिक्चरमधले डायलॉग्स हे सगळं आठवत गेलं आणि त्यामुळे तर मला त्याची ती ओरीजनॅलिटी अजूनच भावली. मग मी हळू हळू त्याच्या एकेका सवयीची मी यादी केली.  अर्थात मनातल्या मनातच. कागद-पेन, नोटपॅड (notepad.exe वाला) वगैरे घेऊन नाही. मग माझ्या लक्षात आलं की अरे याच्या तर सगळ्याच सवयी ओरिजनल. सगळंच स्वयंभू, सारंच स्वतःच. कारण त्याच्या राज्यात अजून कॉपी, इतरांच्या सवयी, त्यांचे प्रभाव या सगळ्याला जागाच नाही, कोणाशी स्पर्धा नाही, कसली घाई नाही. जाम आवडलं ते.
अर्थात हे सगळं मनात येणारा मी पहिलाच नाही किंवा मी काही हे नवीन शोधलंय मुलांबद्दल असं मी म्हणत नाहीये. पण माझ्यासाठी तरी ते एकदम नवीनच आहे. म्हणजे आपल्या कोलंबससारखं. कोलंबसने शोधायच्या आधीही अमेरिका तिथे होतीच. फक्त ती त्याला बाकीच्यांच्या आधी सापडली. त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येकाचा असा एकेकदा किंवा अनेकदा कोलंबस झालेला असणारच आहे. मी फक्त त्या कोलंबसचा एक काऊंट वाढवला इतकंच.

त्यामुळे आता कोणी त्याची डोळे, गाल, चेहरा इ इ मस्त आहे म्हंटलं की मी त्या यादीत अजून एक गोष्ट अॅड करतो. ती म्हणजे "And he is original" :-)

Wednesday, January 6, 2010

दोन छोट्या (पौराणिक) शंका

नारद मुनींच्या उपदेशाने पश्चाताप झालेला वाल्या कोळी तप करायला बसला आणि १२ वर्षं तप केल्यावर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला.वाल्मिकी ऋषींनी "रामायण" लिहिलं. त्यानंतर रामजन्म, स्वयंवर, सीता हरण, राम-रावण युद्ध, रावणाचा वध वगैरे वगैरे गोष्टी रामायणात सांगितल्याप्रमाणे घडत गेल्या.

ओके. रिवाईंड रिवाईंड....

 नारद मुनींच्या उपदेशाने वाल्या कोळ्याचे डोळे उघडले. तो नारद मुनींना शरण गेला तेव्हा त्यांनी त्याला १२ वर्षं "राम राम" असा जप करायला सांगितला. वाल्या कोळ्याने केलेल्या अनेक पापांमुळे त्याला "राम राम" (देवाचं नाव असल्याने) म्हणता येईना. तेव्हा नारद मुनींनी त्याला "मरा मरा" असं उलट म्हणायला सांगितलं जेणे करून आपोआपच त्याच्या तोंडून देवाचं नाव येईल. अशा तऱ्हेने १२ वर्षं तप केल्यावर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला.

शंका क्र. १ : वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर श्रीरामाचा जन्म झाला हे लक्षात घेतलं तर नारद मुनींनी वाल्या कोळ्याला (कमीत कमी) १२ वर्षांआधीच  रामाचा जप करण्यास सांगितलं हे कसं शक्य आहे? तेव्हा तर राम (राम नावाचा देव) अस्तित्वातच नव्हता.

शंका क्र. २ : वाल्मिकींनी आधीच लिहिलेलं रामायण श्रीरामाच्या काळात कोणीच कसं बघितलं नाही. ते बघितलं असतं तर कदाचित सीता हरण, सीतेला वनात सोडणे यासारखे प्रसंग टाळता आले असते. नाही का?

डिस्क्लेमर :
१. मी नास्तिक नाही. माझा देवावर विश्वास आहे.
२. मी अ.नि.स. किंवा इतर कुठल्याही तत्सम संस्थेशी/संघटनेशी संबंधित नाही.
वर दिलेले प्रश्न हे मला जेन्युईनली पडलेले प्रश्न आहेत.

Tuesday, January 5, 2010

संमेलनं ... वैचारिक गुलामगिरीची !!

राष्ट्रकुल देशांमधील संसद सभागृहांचे अध्यक्ष आणि पीठासीन सभापतींच्या संमेलना विषयीची बातमी आत्ताच वाचली. त्यात म्हटल्याप्रमाणे


"त्यात ४२ (राष्ट्रकुल) देशांच्या संसदांचे ५० अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भाग घेत असून ३४ संसदीय महासचिवांसह २५० प्रतिनिधी दिल्लीत आले आहेत. भारतातील राज्यांचे ३४ विधानसभा अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारीही यामध्ये सहभागी होणार आहेत."
 
बातमीत पुढे म्हटलंय कि 


"राष्ट्रकुल देशांच्या प्रतिनिधींना भारतीय लोकशाहीच्या विविध पैलूंचे दर्शन घडवण्यासाठी एक खास प्रदर्शन आयोजिन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या संमेलनात सभागृहाच्या अध्यक्षांची मध्यस्थाची भूमिका, कामकाजातील निष्पक्षतेचे रक्षण, संसदीय कामकाज प्रणालीचा विकास व संवर्धन, संसदीय कामकाजात नव्या तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी विषयांवर चर्चासत्रे होतील."


थोडक्यात म्हणजे फारच मोठा थाटमाट असलेल्या या संमेलनात विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांसारख्या मोठ्या असामी भाग घेणार आहेत तर. छान छान. कुठल्याही संमेलनाला, कार्यक्रमाला एक सूत्र असतं किंवा अमुक अमूक लोक त्यात भाग घेतील असा नियम असतो. तर त्याप्रमाणे या संमेलनात राष्ट्रकुल देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे. राष्ट्रकुल देश म्हणजे जे देश ब्रिटीश वसाहतीचे घटक होते किंवा थोडक्यात ज्या देशांवर ब्रिटिशांनी एके काळी राज्य केलं आहे किंवा जे देश ब्रिटिशांचे अंकित होते असे देश.  अशा देशांच्या समूहाला राष्ट्रकुल देश म्हणतात (कॉमनवेल्थ नेशन्स)...जस्ट इन केस.. :-)


हे संमेलन का झाले, कशासाठी झाले, त्याचे उद्दिष्ट काय, त्यातून काय निष्पन्न होईल झाले या सर्व तपशिलात शिरण्याएवढे माझे या विषयाचे ज्ञान नाही आणि तो या लेखाचा विषयही नाही. माझं म्हणणं साधं सोपं आहे. या संमेलनात भाग घेण्याचा निकष काय तर जे देश राष्ट्रकुल-देश आहेत,
कॉमनवेल्थ नेशन्स आहेत किंवा जे एकेकाळी इंग्रजांचे गुलाम होते ते देशच यात भाग घेऊ शकतात. यापेक्षा दुसरी मानहानीने बरबटलेली अट नसेल कुठल्याही संमेलनात, कार्यक्रमात, स्पर्धेत भाग घेण्यासाठी. भारतीयांच्या किंवा एकूणच राष्टकुल देशांच्या मानसिक गुलामगिरीचा एक उत्तम नमुना आहे हा. म्हणजे तुम्ही एकेकाळी आमचे गुलाम होतात (आणि अजूनही मानसिक गुलाम आहातच) हे इतर जगाला सांगण्याची सुपीक डोक्याच्या इंग्रजांची पद्धत. आणि आपणही ते मारे एवढे मिरवतो, त्याला एवढ महत्व देतो की आपल्या राष्ट्रपती इंग्लंडला जाऊन इंग्लंडच्या राणीबरोबर राष्ट्रकुल स्पर्धांच्या ज्योतीचं उद्घाटन करतात. मी साधारण हेच मुद्दे माझ्या या पूर्वीच्या "स्पर्धा ... वैचारिक गुलामगिरीची !!" या राष्ट्रकुल स्पर्धांविषयीच्या लेखातही मांडलेले आहेत. (थोडाफार सारखाच विषय असल्याने काही मुद्द्यांची कदाचित पुनरुक्ती होईल त्याबद्दल क्षमा करा.)  पण हे राष्ट्रकुल संमेलन म्हणजे मला तर राष्ट्रकुल स्पर्धांपेक्षाही भयंकर वाटतं. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्या त्या देशांचे फक्त खेळाडूच सामील होत असतात. पण या संमेलनांसारख्या कार्यक्रमात तर वर म्हटल्याप्रमाणे चक्क त्या त्या देशांच्या राष्ट्रपती/पंतप्रधान दर्जाची लोकं उपस्थित असतात.

माझा विरोध त्या संमेलनाला किंवा राष्टकुल स्पर्धेला नाही तर त्याच्या  नावाला, त्याच्या निकषाला आहे. हे म्हणजे आपण स्वतंत्र होऊनही ते स्वातंत्र्य नाकारून पारतंत्र्यात असताना आपण सगळे (देश) कसे एकत्र (दु:खात) होतो आणि कसे इंग्लंडच्या राणीशी स्वामीनिष्ठ होतो आणि त्याच समान धाग्याने आपण कसे बांधलो गेलो आहोत वगैरे वगैरे दाखवणारे हे भिकेचे डोहाळे हवेतच कशाला? आता आपण ब्रिटिशांचे सेवक नाही, ती ब्रिटीश बाई आपली राणी नाही हे आपल्या सरकारला माहित्ये ना? , लक्षात आहे ना? पटतंय ना ? मग तरीही ही एके काळच्या परकीय सत्तेच्या खुणा दाखवणारी जोखडं गळ्यात मिरवत फिरण्याची हौस का? आवश्यकता काय त्याची? आणि तेही सरकारी दर्जाचं, आंतरराष्ट्रीय पातळीवर.. कमाल आहे..


संमेलनाचं नाव बदला, निकष बदला आणि छोटे/मोठे, गरीब/श्रीमंत/ मध्यम, हिंदू/मुस्लीम/धर्म-निरपेक्ष, पूर्व/पश्चिम/दक्षिण/उत्तर, आशियातील/आफ्रिकेतील/ अमेरिकेतील देशांचं संमेलन असं किंवा यासारखं कुठलंही साधं पण कुठल्याही शाब्दिक, वैचारिक गुलामगिरीआड लपलेलं नसेल असं नाव द्या.

मला माहित नाही पण यात ब्रिटनचा किंवा ब्रिटीशांचा हात असण्याची शक्यता कमीच आहे. अर्थात म्हणजे जेव्हा त्यांचा या देशांवर अंमल होता तेव्हा ठीक आहे पण आता काही ते अशी हाळी देत नसावेत कि आमच्या एके काळच्या गुलाम राष्ट्रांनो, तुमचं संमेलन/स्पर्धा घ्या हो SSS .. आणि समजा आपण धरून चालू कि आपण ब्रिटनच्या सांगण्यावरून/आग्रहावरून अशी संमेलनं/स्पर्धा भरवत आहोत पण मग आपलं सरकार अशा गोष्टींना नाही का नाही म्हणत की "नाही बाबा आम्हाला हे मान्य नाही. आम्ही आता स्वतंत्र आहोत, स्वायत्त आहोत, छुप्या गुलामगिरीच्या या खुणा मिरवत राहायची आमची आता इच्छा नाही. आम्ही आता राष्ट्रकुलातून बाहेर पडत आहोत. राष्ट्रकुल या नावाने आम्हाला कुठलीही विनंती/आदेश/संदेश आला तर आम्ही त्याला सरळ केराची टोपली दाखवू.". इतर सरकारांनी काय करावं हा त्या त्या देशांचा अंतर्गत प्रश्न आहे. आपण आपल्या सरकार विषयीच बोलू. पण आपल्या सरकारला (यात कॉंग्रेस/बिगर कॉंग्रेस सगळे आले) ही छुपी वैचारिक गुलामगिरी आहे हे कळतं का? समजतंय का? जाणीव आहे का? कारण आधी म्हटल्याप्रमाणे  इंग्रज मायबाप सरकार देवाचं सरकार होत असे मानणारे, म्हणणारे महाभाग तेव्हाही आणि आत्ताही काय कमी होते/ आहेत?


कोणीतरी ही सुरुवात करायलाच हवी. राष्ट्रकुल देशांमध्ये भारत त्यामानाने बलाढ्य, तुलनेने प्रगत देश आहे आणि समजा नसला तरी आपल्याला मान्य नसलेल्या, आपल्या तत्वात बसत नसलेल्या गोष्टींना कितीही आंतर-राष्ट्रीय दडपणं आली तरी जाहीर नकार देण्यात आपल्याला भीती कसली? कोणाची?

तळटीप : राष्टकुल परिषदेचे इतरही काही विधायक हेतू/निकष असतील तर मला माहीत नाही. पण राष्टकुल म्हणजे इंग्रजांचे एकेकाळचे गुलाम देश एवढा निकष तर मला नक्की माहीत आहे. मुद्दाम मी विकीदादा कडून पण खात्री करून घेतली. माझा मुद्दा चुकला असल्यास जाणकारांनी कमेंट्स मध्ये माहिती टाकावी.

Monday, January 4, 2010

हरकत नाय !!

आधी म्हंटल्याप्रमाणे २ दिवस वाट बघूनही त्या ब्लॉग मालकाचं काहीच प्रत्युत्तर न आल्याने त्याची लिंक देतोय खाली. आणि माझी कविता सुद्धा देतोय. ती माझ्या याच ब्लॉग वर देखील आहे प्रथमा या पोस्ट मध्ये. अर्थातच या ब्लॉगवरचं ते माझं पहिलंच पोस्ट होतं. अर्थात ब्लॉगवर मी ती खूप उशिरा टाकली. ती कधी आणि कशी लिहिली गेली ते तुम्हाला वरचं पोस्ट वाचून कळेलच. थोडक्यात सांगायचं तर ती मी आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या "संकल्प" या त्रैमासिकासाठी २००८ च्या मध्यावर लिहिली. नंतर ती म.टा. च्या ऑनलाईन अंकात देखील छापून आली. २००८ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यात महाराष्ट्रात/मुंबईत घडलेल्या स्थानिक दंगली/अतिरेकावर (डोमेस्टिक टेररिझम) वर ती आधारित होती. कुमार केतकरांच्या घरावर संभाजी ब्रिगेडचा हल्ला, शीख धर्मगुरूच्या अंगरक्षकाने गोळीबार केल्यानंतर शीख तरुणांनी जवळपास १२ तास वेठीला धरलेली मुंबई, सनातन प्रभातचे कथित स्फोट आणि मनसेचे भैय्यांवरचे हल्ले  इ. इ. असो.
आणि मुख्य म्हणजे ही आहे त्या ब्लॉगची लिंक. आणि तिथे त्या महाशयांनी तिला बाल-कविता असं टॅगलं आहे ते बघून तर मला हसावं कि रडावं ते कळेना. मी आधीच्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे "नेटवर मराठीत जे जे आढळेल ते सरसकट (आणि बरेचदा मूळ लेखकाचे नाव न घालता) आपल्या ब्लॉगवर टाकणे" हा त्यांचा अजेंडा असावा असं मला तरी वाटलं.
मंडळी, शोधून बघा. मला तर वाटतं तिथे आपल्या प्रत्येकाचेच लेख/कविता असं काही काही सापडेल. आणि त्याखाली तुमचं नाव असेल तर तुमचं नशीब भलतंच जोरावर आहे असं समजायला हरकत नाय, हरकत नाय!!!

हरकत नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय !!

मारा झोडा ठेचुन काढा
गोळ्या झाडा बाँब फोड़ा
त्यांच डोक आमचा हातोड़ा
ताज्या रक्ताचा पडुदे सडा

एका घावात मागाल पाणी, असे आहोत आम्ही सनातनी
आमच्या देवांची मस्करी करायची नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||१||

खसकन उपसा नंग्या तलवारी
दिसूदे आपली ताकद खरी
भेदरल्या पाहिजेत दिशा चारी
थरथर कापेल दुनिया सारी

आमच्या समोर नको अजीजी, उगाच नही आम्हाला म्हणत "पाजी"
आमच्या गुरु च्या वाटेला जायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||२||

शिवबा आमचा आम्ही त्याचे मावळे
उलट बोलाल तर तोंड करू काळे
आदर व्यक्त करायचे आमचे मार्गच आगळे
फासून डाम्बर घर रंगवू सगळे

मुखी शिवबा हाती ग्रेनेड, अशी आमची राष्ट्रवादी ब्रिगेड
शिवबाचे स्मारक उभारू देत नाही म्हणजे काय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||३||

दिसला भैय्या तर सोडू नका
टँकसया फोड़ा सामान फेका
एकच असा देऊ जोरदार धक्का
की "आपला" खुंटा होइल पकका

नवमहाराष्ट्राची आम्हालाच जाण, आम्ही करू नवनिर्माण
मराठी सोडून दुसर काही बोलायच नाय !!

हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||४||

पण थाम्बा हे काय !!
हे सगळ अचानक थांबतय काय?
होय ! कारण मी आहे आजचा तरुण, कुठल्याही झापडांशिवाय
मीच गोविन्दसिंह, मीच कृष्ण आणि मीच शिवराय
आमच्या तरुणाईला फसवयाच नाय
याद राखा गाठ आमच्याशी हाय
ज़ातिधर्माच्या नावाने फूट पाड़ाल तर
होय !! आमची हरकत हाय, हरकत हाय, हरकत हाय !!!

हेरंब ओक
१५ जुलै '०८

Sunday, January 3, 2010

अल्पविराम संपला... पण !!!!

गेला आठवडाभर (न सांगता) घेतलेला अल्पविराम किंवा मध्यंतर/ब्रेक/टाईम-प्लीज वगैरे वगैरे संपला/ली. कोण वाट बघताय म्हणा माझ्या पोस्टची. पण ही अशी सुरुवात केली कि जरा बरं वाटतं आपलं आपल्यालाच. अल्पविरामाचं कारण म्हणजे घर-बदली उर्फ मुव्हिंग. आठवडाभर पॅकिंग, अन-पॅकिंग करत करत शेवटी आलो एकदाचे नवीन घरात. नवीन म्हणजे, कोरं करकरीत वगैरे नाही हो. आधीच्या घराऐवजी आता हे दुसरं घर. म्हणजे नवीनच नाही का. तर हे मुव्हिंग प्रकरण संपवून, नवीन घरात समान लावून, (इंटरनेट सुरु व्हायला २ लागलेले दिवस धरून) जवळपास आज ४ दिवसांनी आलो नेटवर. म्हटलं काहीतरी खरडूया ब्लॉगवर. मुव्हिंग, नवीन वर्ष, स्नोफॉल कशावरही. एकीकडे मेल्स, जुन्या पोस्ट्सवरचे कमेंट्स अप्रूव करणं चालू होतं आणि आपले नेहमीचे मराठी ब्लॉग्स पण चाळत होतो. कमेंट्स टाकत होतो. आणि बघता बघता अचानक कळलं उचलेगिरी झालीये. मी लिहिलेल्या एका जुन्या कवितेची. पुन्हा नीट बघितलं. कविता माझीच होती पण माझा नामोल्लेख कुठेही नाही. वाईट वाटलं थोडं. ब्लॉगच्या मालकाच्या काही खाणाखुणा, नाव-गाव, contact-me वगैरे काही आढळलं नाही सुरूवातीला. ब्लॉगचा फॉलोअर म्हणून जॉईन झाल्यावर एक लिंक मिळाली ब्लॉग-मालकाशी संपर्क करायची. २-३ जण मालक आहेत असं आढळलं. ज्याने माझ्या कवितेचं पोस्टिंग केलं होतं त्याच्या नावाने मायना टाकून त्याला सौम्य शब्दात जाणीव करून दिली आहे. बघुया काही प्रतिसाद मिळतो का. १-२ दिवसात काहीच उत्तर आलं नाही तर नवीन पोस्ट टाकेन त्या ब्लॉगची आणि माझ्या मूळ कवितेची लिंक देऊन.
नंतर सहज म्हणून तो ब्लॉग चाळत होतो. भरपूर लेख, कविता, गाणी, चित्रपट सामिक्षेसारखं काहीतरी असे बरेच प्रकार आहेत. काही ठिकाणी मूळ लेखकाची नावे आहेत तर बऱ्याच ठिकाणी नाहीत. माझा साधारण असा अंदाज आहे कि "नेटवर मराठीत जे जे आढळेल ते सरसकट (आणि बरेचदा मूळ लेखकाचे नाव न घालता) आपल्या ब्लॉगवर टाकणे" हा अजेंडा असावा. असो.
खरंतर काहीतरी चांगलं, नवीन किंवा थोडक्यात मी वर जे काही लिहिलं आहे ते न लिहिता दुसरं काहीतरी लिहायचं होतं. पण उचलेगिरी बघून जरा मूड गेलाय. अर्थात तात्पुरताच. ही नवीन गडबड संपली की लिहीनच पुन्हा.

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...